आहेत पराशर ऋषि आणि बृहस्पती यांना याचा उपदेश केला. त्यांनी मला हे सगळं भागवत सांगितलेलं आहे. तेव्हा ते भागवत तुम्हाला मी सांगतो. असं सांगून, कशी सृष्टी झाली, ब्रह्मदेवांना भगवान कसे भेटले हे सगळंही क्रमाने पूर्वीप्रमाणेच वर्णन केलेलं आहे. विश्वसृष्टी भगवंताच्या मायेने निर्माण झाली, पुढे सगळे कार्य सुरु झालेलं आहे. ब्रह्मदेवांना सृष्टीची आज्ञा केली, पंचमहाभूतं अगोदरच भगवंतांच्या संकल्पाने निर्माण झाली. भौतिक सृष्टी कशी तयार करायची आहे? सर्व ब्रह्मांड निर्माण करायचंय हे पुढचं कार्य भगवंताच्या आज्ञेप्रमाणे ब्रह्मदेवांनी केलेलं आहे. त्यांचीही संकल्प शक्ती मोठी आहे. हे सर्वही मैत्रेय महर्षींनी क्रमाक्रमाने सर्व वर्णन केलेलं आहे.
भगवान ब्रह्मदेव जे आहेत त्यांचं सृष्टीकार्य सुरु झालेलं आहे. तपश्चर्या केल्यामुळे परमेश्वराची कृपा झालेली आहे. भगवत् स्वरूप साक्षात्कार ब्रह्मदेवांना झाला. आणि मग सर्व सृष्टी केलेली आहे. ते सांगताहेत मैत्रेय महर्षि. तपाचा प्रभाव आहे हा. या तप प्रभावामुळे सबंध विश्व त्यांनी निर्माण केलं. त्या कमलातून ते उत्पन्न झालेले होते, त्या कमलाचेच विभाग करून त्यांनी सर्व सृष्टी, विश्व निर्माण केलं.
आरंभाला त्यांनी महत्त्त्व निर्माण केलं आहे. महत्त्त्वाला बुद्धितत्त्वही म्हणतात किंवा समष्टी म्हणतात. त्यापासून अहंकार तत्त्व निर्माण झालं, पंचभूतं निर्माण झाली. इंद्रिय सृष्टी झालेली आहे. ही सगळी क्रमाक्रमाने निर्माण झालेली आहे. वनस्पती निर्माण झाल्या त्याप्रमाणे पशू-पक्षी वगैरे यांचीही सृष्टी निर्माण झालेली आहे. देवांची सृष्टी हीही ब्रह्मदेवांनी केली. देव, पितर, गंधर्व, अप्सरा, सिद्ध, यक्ष, विद्याधर ही सगळी देवसृष्टी आहे. यानंतर मनू सगळे उत्पन्न झाले. प्रसंगाने क्रिया विभाग कसा झाला. सृष्टीची रचना लक्षात येण्याकरता, क्रिया कशी तयार झाली, त्या क्रियेपासून कालाचे परिमाण कसे तयार झालं हे सांगितले. सूर्यकिरण हे चाललेले आहेत, सूर्यनारायणाच्या गतीमुळे, एक अत्यंत सूक्ष्म जो कण आहे, किरणामध्ये दिसणारा, तो सूर्यकिरण त्या कणाच्या पलिकडे गेले की त्याला परमाणू काल म्हणतात. क्रियेवरून कालाची कल्पना आहे. पुढे तो वाढत जात एक तास झालेला आहे, प्रहर झाला एक दिवस झालेला आहे, सहा महिने झाले उत्तरायण, दक्षिणायन. संवत्सर म्हणजे वर्षाचा काल तयार झालेला आहे. कालाची गणना त्या सूर्यकिरणांच्या गती वरून ठरलेली आहे.
प्रत्येकाचे काल म्हणजे आयुष्य वेगळे वेगळे आहेत. कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग, कलियुग
ही कालाचीच गणना आहे. बाराहजार देवांची वर्ष ह्याच्यात चार युग होऊन जातात. कृतयुगामध्ये पूर्ण धर्माचं आचरण असतं. हळूहळू तो धर्म कमी होत जातो. अशी सृष्टी ब्रह्मदेवांच्या संकल्पाने निर्माण झालेली आहे.
त्यानंतर तमोगुण जो आहे त्यापासून सर्व सृष्टी केली. तामीस्र, अंधतामिस्र, मोह, महामोह ही सगळी सृष्टी निर्माण केली. ही तामसी सृष्टी त्यांना पसंत पडली नाही. आपल्या शुद्ध मनाने दुसरी सृष्टी त्यांनी केली. सनक सनंदन वगैरे निर्माण केले. भगवत् भक्त मोठे ज्ञानी. त्या मुलांना ब्रह्मदेवांनी सांगितलं तुम्ही गृहस्थाश्रमी व्हा. विवाह करा. चांगली संतती निर्माण करा. यज्ञयाग करा. त्यांना काही हे मान्य नाही. भगवंताचे भक्त होते ते. त्यांनी सांगितलं पिताजी आम्हाला गृहस्थाश्रम करायचा नाही. राग आला ब्रह्मदेवांना आणि तो क्रोध जो आहे तो त्यांच्या भृकुटीतून बाहेर पडला. तो क्रोध रुद्र रूपाने प्रगट झालेला आहे. सगळ्याच वृत्ती अशा प्रकारचं कार्य करणाऱ्या आहेत. त्याला स्त्रिया दिलेल्या आहेत. त्यालाही सृष्टी करायला सांगितली. त्याने पुष्कळ सृष्टी केली, त्याला नंतर ती बंद करायला सांगितली. पुढं मरिची, अत्री, पुलस्त्य पुलह, अंगिरा, भृगु, क्रतू, वसिष्ठ अशी मुलं त्यानी निर्माण केली, आपल्या संकल्पाने. त्यानंतर काम, क्रोध, लोभ वगैरे हेही विकार निर्माण झालेले आहेत. याप्रमाणे अशी सृष्टी ब्रह्मदेवांची चालू आहे. आपल्या चार मुखातून चार वेद त्यांनी प्रगट केले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. त्या प्रत्येकाचे उपवेद म्हणून आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्व वेद आणि स्थापत्यशास्त्र हेही निर्माण केलं. इतिहास पुराणात्मक पंचमवेद जो आहे तो सर्वांना स्पष्टीकरण व्हावं म्हणून निर्माण केला. यज्ञाच्या अनेक शाखा त्यांनी निर्माण केल्या. कितीतरी प्रकारचे यज्ञ आहेत. सर्व एकंदर आश्रम निर्माण केले. संन्यासाचे, वानप्रस्थाचे किती विभाग आहेत हे ब्रह्मदेवांनी निर्माण केले. याप्रमाणे सृष्टीचे कार्य अखंड चालू आहे.
त्यानंतर मनू नावाचा एक पुत्र निर्माण केला. आपल्या शरीराचे दोन भाग केले ब्रह्मदेवांनी. एका पासून तो मनुराजा उत्पन्न झाला, दुसऱ्या भागापासून त्याची स्त्री शतरूपा नावाची निर्माण झाली. मनुराजाला त्या स्त्रीपासून प्रियव्रत व उत्तानपाद हे दोन पुत्र झाले. आकृती, देवहूती, प्रसूती या तीन कन्या झाल्या आहेत. रुची ऋषींना आकृती ही कन्या दिली. कर्दमांना देवहूती दिली. दक्षप्रजापतीला प्रसूती ही कन्या दिलेली आहे. त्यांच्यापासूनही पुष्कळ सृष्टी झालेली आहे. मनुराजापासून पुढची सृष्टी स्त्री-पुरुष संभोगाच्या रूपाने झालेली आहे. तोपर्यंत ब्रह्मदेवाने आपल्या
मानस संकल्पानेच सर्व सृष्टी केली होती.
विदुरजी विचारतात, स्वयंभू सम्राट राजा मनू जो आहे ब्रह्मदेवांचा पुत्र, त्याचं चरित्र आपण सांगा म्हणाले. मोठा भगवत् भक्त, योगी पुरुष आहे, मनुराजा.
ऋषि सांगतात, विदुरजी, मनुराजा, आपल्या पित्याला, ब्रह्मदेवांना प्रार्थना करतो आहे की पिताजी, आपण सर्वही सृष्टीरचना केलेली आहे. आमचे स्वामी आपण आहात, आम्ही आपले प्रजाजन आहोत. तेव्हा काय आज्ञा आहे. आम्ही आपली सेवा कशी करावी हे आपण आम्हाला सांगा. ब्रह्मदेवाने आपल्या पुत्राला, मनूला सांगितलं ही स्त्री तुला मिळाली, या स्त्रीपासून चांगली संतती तू निर्माण कर. धर्ममार्गाचा प्रसार कर हीच माझी पूजा आहे. मनुराजाने विचारले महाराज हे सगळं मी करायला, आपली सेवा करायला तयार आहे पण आम्हाला राहायला जागा नाही म्हणाले. कुठे राहायचं आम्ही, कारण पृथ्वीही पाण्यामध्ये बुडून गेलेली आहे. ती पृथ्वी वर काढली पाहिजे, म्हणजे त्या पृथ्वीवर आम्हाला राहता येईल, राज्य करता येईल. ब्रह्मदेवांचे या सृष्टीरचनेकडे लक्ष असल्यामुळे. पृथ्वी पाण्यामध्ये गेली याकडे त्यांचं लक्ष नव्हतं. मनु राजाने लक्षात आणून दिल्यावर त्यांच्या लक्षात आलं, ही तर भूमी गेली म्हणाले. अतल, सुतल, वितल, तलातल सहाव्या लोकापर्यंत रसातलापर्यंत ती गेलेली आहे. काय करायचं, हिला वर कसं आणायचं. परमेश्वराचं चिंतन करू लागले, प्रार्थना करताहेत. त्यांच्या नासिकेतून एक लहानसा वराह बाहेर पडला. अंगुष्ठ मात्र आणि तो एकदम मोठा हत्ती एवढा मोठा झालेला आहे. त्याचं स्वरूप फार वाढलेलं आहे. सर्व ऋषि मंडळींनी भगवंताचं जे वराह रूप आहे त्याची पुष्कळ स्तुती केलेली आहे. यज्ञरूपी आपण आहात. त्या यज्ञानेच सर्व ऋषिमंडळी आपली पूजा, अर्चन करताहेत. आपण सर्वांचं संरक्षण करावं, अशी प्रार्थना केलेली आहे. वराह भगवान त्या पाण्यामध्ये गेले. रसातलाला गेलेली पृथ्वी त्यांनी आपल्या दाढेवर धारण केली. एवढी संपूर्ण विशाल पृथ्वी ते त्या दाढेवर घेऊन आले ते केवढं वराहाचं रूप असेल. कल्पनाच करता येणार नाही. स्थूल रूप मूलतः कसं आहे हे आपल्या मनामध्ये येऊ शकत नाही. बाहेर आणली ती पृथ्वी. वरच्या बाजूला आणलेली आहे. आपल्या शक्तीने पाण्यावरच तिची स्थापना भगवान वराहांनी केलेली आहे. त्यावेळेला तो हिरण्याक्ष दैत्य युद्ध करण्याकरता आलेला असताना, युद्ध करून त्याचा नाश भगवान वराहांनी केलेला आहे.
विदुरजींनी प्रश्न केला हा दैत्य जो हिरण्याक्ष त्याचा नाश भगवान श्रीहरींनी वराहरूपांनी केला, ते चरित्र आम्हाला सांगा. तो हिरण्याक्ष कोणाचा पुत्र आहे. त्याचा नाश कसा केला
भगवंतांनी हे सांगा.
सांगताहेत मैत्रेय महर्षि, मोठा इतिहास आहे म्हणाले. ब्रह्मदेवांनीच हा इतिहास सर्व देवांना सांगितला. गृहस्थाश्रम कसा असला पाहिजे, हे सांगताहेत मैत्रेय महर्षि.
दितिर्दाक्षायणी क्षत्तार्मारीचं कश्यपं पतिम् ।
अपत्यकामा च कमे संध्यायां हृच्छयार्दिता ।।
3.14.7 ।। श्री. भा.
मरिची ऋषींचे पुत्र म्हणजे कश्यप आहेत. ह्या कश्यपांची पत्नी दिती नावाची होती. त्यांच्या पुष्कळ स्त्रिया होत्या. त्यापैकी दिती नावाची एक स्त्री होती. तिची मुलं म्हणजे सर्व दैत्य झालेले आहेत. देव-दैत्याचं निरंतर युद्ध व्हावं, देवांनी दैत्यांचा संहार करावा हे सगळंही तिने पाहिलेलं आहे. आपल्याला असा मोठा चांगला मुलगा झाला पाहिजे जो देवांचा सुद्धा पराजय करेल. अशी तिला इच्छा उत्पन्न झाली. अंत:करण मोहाने व्याप्त झालेलं आहे. संध्याकाळच्या वेळेला, त्या अग्निशोळेमध्ये, ते कश्यप ऋषि बसलेले असताना ती आलेली आहे. मला आपल्यापासून पुत्र झाला पाहिजे. अशी प्रार्थना करती आहे. माझ्या सवतींना चांगली मुलं झाली, मला मात्र चांगला मुलगा नाही म्हणाली. मोठा पराक्रमी मुलगा व्हावा. आपल्या जवळ राहून मला अशा प्रकारचा पुत्र होणार नाही तर काय उपयोग? मी शरण आलेली आहे. ही इच्छा आपण पूर्ण करा. कश्यपांनी सांगितलं दिती संध्याकाळची वेळ आहे ही, हा काल जाऊ दे. आता होम-हवन करायचंय म्हणाले. तुझी इच्छा पूर्ण होईल, तुझ्या इच्छेप्रमाणे तुला पुत्र होईल. परंतु त्या दितीच्या मनामध्ये जो मोह उत्पन्न झाला, तो तिला आवरता आला नाही. आपलं मन काही आवरता आलं नाही. शेवटी तिचा आग्रह पाहून, भगवान कश्यप महर्षींनी तिची इच्छा पूर्ण केली. पुन्हा स्नान वगैरे करून आपल्या नित्यकर्माकडे प्रवृत्त झालेले आहेत. अग्निशोळेमध्ये येऊन राहिले. त्यावेळेला त्या दितीला पश्चाताप झालेला आहे. त्या दितीने विनंती केली. कश्यपही रागावलेले होते. इंद्रिय निग्रह तुझ्याजवळ नाहीये. तू कालाचा विचार केला नाहीस, माझी आज्ञा मान्य केली नाहीस. हा दोष आहे, काल दोष आहे. तुझं मन तुझ्या ताब्यामध्ये नाही. देवांचा अनादर तू केलेला आहेस त्यामुळे तुझ्या गर्भातून दोन दैत्य निर्माण होतील. भगवान श्रीहरी अवतार धारण करून तुझ्या मुलांचा नाश करतील. असं सगळं सांगीतलं. दितीने विचारले महाराज काही हरकत नाही, देवाच्या हातून माझ्या मुलांना मृत्यू येणार म्हणजे त्यांचा उद्धारच होईल. पुन्हा कश्यप ऋषि संतुष्ट झाले. त्यांनी सांगितले तुझा नातू मात्र उत्तम भगवत् भक्त होईल. भगवंताच्या कृपेने तो कीर्तिसंपन्न होईल.
याप्रमाणे दितीला हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू असे दोन पुत्र झाले.
वराहांनी ती पृथ्वी वर आणून स्थापन केली. मनू राजाला राहण्याचं स्थान मिळालेलं आहे. तो राज्य करण्याला प्रवृत्त झालेला आहे. त्याची व्यवस्था भगवत् कृपेने झाली.
ती दिती गर्भिणी झालेली असताना ब्रह्मदेव सांगताहेत, दितीचा गर्भ पुष्कळ वर्ष पर्यंत राहिलेला आहे. अंधार जिकडे तिकडे पडलेला आहे. सर्व देव ब्रह्मदेवांना शरण गेलेले आहेत. काय झालं काय? तेव्हा ब्रह्मदेवांनी सर्व कथा, इतिहास त्यांना सांगितला - कश्यप ऋषींची पत्नी दिती, तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला त्यामुळे अशा प्रकारची गर्भधारणा तिला झाली. तिच्या उदरात हे दोन जीवात्मे आलेले आहेत. कोण आहेत हे सांगताहेत. ब्रह्मदेवांचे जे मानसपुत्र आहेत, सनक सनंदन, सनातन आणि सनत्कुमार हे मोठे भगवत् भक्त आहेत. ब्रह्मदेवांनी त्या मुलांना भगवान श्रीहरींचा वैकुंठ लोक कसा आहे, तिथं भगवान कसे राहतात हे सगळे सांगितले. त्यांना एकदा भगवंताचं दर्शन करावं, त्याठिकाणी वैकुंठ लोकामध्ये जाऊन यावं, दर्शन करून यावं अशी इच्छा उत्पन्न झाली आणि ते वैकुंठ लोकामध्ये आले. मोठे योगी होते. ब्रह्मदेवांचेच पुत्र असल्यामुळे ते कोठेही जाऊ शकत होते. वैकुंठ लोकामध्ये आलेले आहेत. जिकडे तिकडे विमाणामध्ये बसून सर्वही देवगण, भगवद्भक्त फिरताहेत. मोठी मोठी विमानं आहेत. मोठी मोठी उद्यानं आहेत. उपवनं आहेत, ही सगळी वैकुंठ लोकाची रचना त्यांनी पाहिली. श्रीहरींचे निवासस्थान, त्याला सात दरवाजे होते. एक एक दरवाजा ओलांडून सातव्या दरवाजावरती जय विजय दोघे द्वारपाल उभे होते दोन्ही बाजूला. यांना आत जायचं होतं, कुमारांना. भगवंताचं दर्शन करण्याकरता ब्रह्मलोकातून ते तिथे आले होते. पण वय लहान आहे. पहिल्या पासूनच पाच वर्षाचं शरीर आहे. शरीर काही वाढलेलं नाही. जय विजयांना वाटले की ही लहान मुलं आत कशाला जात आहेत. त्यांनीही त्यांना ओळखलं नाही. त्यांनी आत जायचं नाही म्हणून सांगितलं. मज्जाव आत जाण्यासाठी केलेला आहे. त्यामुळे त्यांना थोडासा राग आलेला आहे. सनत्कुमारांनी त्यांना लगेच सांगितले.
को वां इहेत्य भगवत्परिचर्ययोच्चैः
तद्धर्मिणां निवसतां विषमः स्वभावः ।
तस्मिन् प्रशांतपुरुषे गतविग्रहे वां
को वाऽऽत्मवत्कुहकयोः परिशंकनीयः ।।
3.15.32 ।। श्री.भा.
वैकुंठ लोकामध्ये भगवंताच्या भक्तावर सनत्कुमार रागावलेले आहेत. त्यांनी सांगितलं,
अनेक जन्म भगवंताची सेवा करून तुम्हाला या वैकुंठ लोकामध्ये राहायला मिळालं म्हणाले. देवाच्या जवळ येऊन तुम्ही राहिलात. सलोकता, समीपता, सरूपता तुम्हाला मिळालेली आहे. भगवंतासारखं रूप आहे. चतुर्भुज, शंख, चक्र, गदा, पद्म सगळं आहे. विष्णूरूपामध्ये तुम्ही राहिलात, इतकी उच्च भूमिका तुम्हाला मिळालेली असताना तुमची अशी बुद्धी काही चांगली नाही. हा लहान आहे, याला आत सोडायचं नाही ही विषम बुद्धी अद्यापि तुमची राहिली म्हणाले. भगवान श्रीहरी किती शांत आहेत, आणि त्याचे भक्त म्हणविणारे तुम्ही असे रागावता कोणावरही, कोणालाही जाऊ देत नाही. तुम्ही या वैकुंठ लोकाला राहण्याला अपात्र आहात. निर्णय झाला, त्यांनी घेतला. ज्या मृत्यू लोकामध्ये अशी विषमबुद्धी आहे, हा योग्य, हा अयोग्य, हा चांगला हा वाईट, त्या लोकामध्ये तुम्ही चला म्हणाले. इथे राहण्याला तुम्ही पात्र नाहीये. हा ब्राह्मणांचा शाप झाला त्यांना. आणि नंतर त्यांचे डोळे उघडले, हे कोणीतरी महात्मे आहेत. पायावर मस्तक त्यांनी ठेवलेले आहे. हात जोडताहेत. क्षमा करा महाराज, प्रार्थना करताहेत. हे सगळं आत भगवंतांना कळलं. त्या जय-विजयांनी प्रार्थना केली. आम्हाला असुर जन्म येणार, मर्त्यलोकामध्ये, आपण शाप दिल्यामुळे. परंतु भगवान श्रीहरीची स्मृती आपली नष्ट होऊ नये. आपलं स्मरण राहावे. एवढी तरी कृपा राहावी. भगवंतांना समजल्याबरोबर ते आले बाहेर, जय विजय हात जोडून प्रार्थना करताहेत. सनत्कुमारांना दर्शन द्यायचं होतं मुद्दाम ते आलेले आहेत. दर्शन झालं भगवान श्रीहरीचं. आपल्या पिताजींनी जे रूप वर्णन केलेलं आहे, ते रूप आज आपल्याला पहायला मिळालेलं आहे. आनंद झाला कुमारांना, पीतांबरधारी भगवान श्रीहरी, प्रसन्न मुखकमल आहे. बाहेर आलेले आहेत. समाधान झालं कुमारांचं. त्यांनी सांगितलं, भगवंता आपण अव्यक्त रूपांनी सर्वत्र राहता. ज्याची बुद्धी शुद्ध नाही त्यांना आपलं दर्शन होत नाही म्हणाले. आज आमच्या दृष्टीला हे रूप पडलेलं आहे. आमच्या पिताजींनी आपलं सगळं वर्णन केलेलं होतं, ते आम्ही ऐकलं. आज आपल्याला प्रत्यक्ष पाहण्याचा योग आलेला आहे. आपल्याला आम्ही शरण आलेलो आहोत. आपली भक्ती ज्यांच्या अंत:करणामध्ये उत्पन्न झालेली आहे, त्यांच्या चित्तातले अज्ञान हे सगळं दूर होते. अशी प्रार्थना त्यांनी केली. भगवान श्रीहरी बोलायला लागले. ऋषीमहाराज, हे जे माझे भक्त आहेत, द्वारपाल जे आहेत, जय-विजय यांनी आपला अपमान केला आहे. असं मला समजलंय. तुम्हाला आत येऊ दिले नाही. तुम्हालाही राग आला, तुम्ही त्यांना दंड केला, शाप दिला, तुम्ही असुर जन्माला जावा, मर्त्यलोकात जावा म्हणून शाप दिला, याला माझी संमती आहे. तुम्ही दिलेला शाप मला मान्य आहे. कारण यांनी तुमच्या सारख्या श्रेष्ठ पुरुषांचा
अपमान म्हणजे फार मोठं पाप केलेलं आहे. यांच्या अपराधाबद्दल मी आपली क्षमा मागतो. आपल्यासारखे जे तपस्वीपुरुष, ब्राह्मण आहेत ते माझे दैवत आहेत, हे यांना माहिती नाही म्हणाले. तुमच्या कृपेने चंचल असलेली ही जी लक्ष्मी देवी माझ्या घरामध्ये राहाती आहे, ती स्थिर राहिलेली आहे. ही तुमची कृपा आहे. त्यांनी आपला अपमान केला म्हणून तुम्ही यांना शाप दिलात परंतु यांच्यावर आपण दया करा, दोन-तीन जन्मानंतर यांना इथे येण्याला परत आपण परवानगी द्या. अत्यंत नम्रपणाने भगवान श्रीहरींनी भाषण केलेलं आहे. ब्रह्मदेव सांगतात, देव हो, काय शांती आहे, भगवान श्रीहरीची, सत्त्वमूर्ती भगवान आहेत. त्यांची ती वाणी ऐकली त्या सनत्कुमारांनी. त्यांनीही हात जोडलेले आहेत ते म्हणतात, भगवन् काय आपण बोलता म्हणाले, माझ्यावर अनुग्रह करा, यांना उ:शाप द्या, सर्वेश्वर आपण आहात. आमचे दैवत आपण असताना, आम्हालाच आपण देव समजता, सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता, सनातन धर्माचं संरक्षण हे आपल्या या कृतीने सर्वत्र होते. तेव्हा झाली गोष्ट घडून गेली म्हणाले. आम्ही दिलेल्या शापाला आपण संमती द्या किंवा आपल्याला आम्हाला शाप द्यायचा असेल तर द्या, आपण समर्थ आहात, काहीही करू शकता आपण. दंड आम्हाला करायचा असेल तर करा म्हणाले. भगवान सांगताहेत, हे आता असुर जन्माला जातील म्हणाले आणि तीन जन्म त्या असुर योनीमध्ये राहून, पुन्हा या ठिकाणी ते येतील. तुम्ही काही मनाला लावून घेऊ नका. याला कारण मीच आहे म्हणाले, माझ्याच संकल्पाने हे सर्व झाले आहे. भगवंताचं दर्शन झालेलं आहे, संभाषण झालेलं आहे. त्यांचा आदर केलेला आहे. भगवंतांना प्रणाम करून सनत्कुमार ब्रह्मलोकामध्ये पुन्हा प्राप्त झाले. जय-विजयांना वाटलं देवांनी आमच्याकडे लक्ष दिलं नाही. त्या ऋषींनाच संमती दिली, त्यांनी दिलेला शाप, आम्ही इतकी सेवा केली, इतकी सेवा करतो, आमच्याकडे लक्ष दिलं नाही. भगवान म्हणाले तुम्ही पूर्वी एकदा लक्ष्मीला अडवले होते. तुम्हाला ही जी सवय लागलेली आहे, अहंकार, आम्ही द्वारपाल आहोत आम्ही कोणालाही आत सोडू नाहीतर सोडणार नाही. एकदा लक्ष्मीदेवी आली होती, तिलाही तुम्ही अडवून ठेवलं. तिने शाप दिलाय तुम्हाला. तो शाप आता भोगला पाहिजे. तुम्ही आता मर्त्यलोकावर जन्म घ्याल, माझा द्वेष कराल म्हणाले,
मयि संरम्भयोगेन ।।
3.16.31 ।। श्री.भा.
तुम्ही द्वेष माध्यमातून माझे अखंड स्मरण कराल. ही ब्राह्मणांची अवहेलना, ब्राह्मणांचा अपमान जो झालेला आहे, त्यांच्यातून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल, तर तीन जन्म तुम्हाला राक्षस
जन्मात, दैत्य जन्मात राहावं लागेल. हे चरित्र सांगितले आहे, ब्रह्मदेवांनी देवांना त्याचा बोध असा आहे, भगवंताचा भक्त मी आहे, असा जर अहंकार उत्पन्न झाला, तर त्या अहंकारामुळे, संत महात्म्यांचा अपमान होण्याचा संभव आहे. तो अपमान घडला यांच्याकडून. भगवद् भक्तांचा, श्रेष्ठ पुरुषांचा अपमान झाल्याबरोबर, तो भक्त जरी असला तरी त्याचा अध:पात होतो. भक्तीमार्गामध्ये हे मोठं पथ्य आहे. ""कोणाही जीवांचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे,'' तुकाराम महाराज सांगताहेत. खरी भक्ती, खरी ईश्वर पूजा म्हणजे ही आहे, कोणाचाही द्वेष मनामध्ये राहू नये. रागवायचं नाही, द्वेष नाही, तर भक्तीचं फळ मिळतं. संतांचा अपमान झाल्यामुळे, वैकुंठलोकामध्ये प्रत्यक्ष भगवंतांच्या सन्निध राहणारे, नेहमी रोज दर्शन होतंय, रोज भाषण होतंय, इतक्या मोठ्या उच्च भूमिकेवर गेलेले, जय-विजय पण संतांचा, भक्तांचा, महात्म्यांचा अपमान केल्यामुळे त्यांना या मर्त्यलोकावर पुन्हा यावं लागलं. सर्वात अत्यंत वाईट झालेली गोष्ट म्हणजे, देवावर प्रेम करणारे, भक्ती करणारे जय-विजय ते देवाचे शत्रू बनून त्यांना तीन जन्म घ्यावे लागले. देवाचं प्रेम गेलं, प्रेमातून ते बाहेर पडलेले आहेत.
तेव्हा ब्रह्मदेव सांगताहेत, देवहो, ते दोघे ह्या दितीच्या गर्भामध्ये आलेले आहेत. भगवंताला काळजी आहे. सर्वांची आपण कशाला काळजी करायची. सर्वांचं कल्याण करायला तो समर्थ आहे. मग सर्व देव मंडळी आपल्या स्थानाला निघून गेली.
पुढं त्या दितीला दोन पुत्र झालेले आहेत. भयंकर अपशकुन झाले त्या वेळेला. त्यानंतर कश्यप ऋषींनी त्यांचं नामकरण केलेलं आहे. प्रथम जन्माला आलेला हिरण्यकश्यपू आणि मागाहून जन्माला आलेला हिरण्याक्ष अशी नावं ठेवली. हिरण्यकश्यपूने तपश्चर्या केली, ब्रह्मदेवांचा वर मिळवलेला आहे. सर्व देवादिकांना आपल्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे. असुर वृत्तीने तो वागतो आहे. देवांचा द्वेष करतो आहे. भक्ती, वैकुंठ लोकामध्येच राहिली, तिची आठवणसुद्धा नाहीये. दुसरा हिरण्याक्ष जो आहे, त्याला युद्धाची आवड आहे. राज्य वगैरे नको आहे. हिरण्यकश्यपूनेच सर्व राज्य मिळवले, त्रैलोक्याचा ताबा घेतलेला आहे. सर्व देवांना अधिकारावरून काढून टाकलेलं आहे. सगळे दैत्य नेमलेले आहेत आणि तो राज्य करतो आहे. हा एक हिरण्याक्ष, हातामध्ये एक मोठी गदा घेऊन हिंडतो आहे. माझ्याबरोबर लढाई करणारा कोण आहे, याचा शोध चाललेला आहे. सगळे देव बाजूला निघून गेले, कोण याच्यासमोर उभं राहणार? भीतीग्रस्त सर्वही झालेले आहेत. पुढं वरुणाने काही राजसूय यज्ञ केला असं त्याने ऐकलं. वरुणलोकामध्ये गेलेला आहे तो
हिरण्याक्ष. त्याला सांगितलं वरुणा तू मोठा पराक्रमी आहेस. असं मला समजलं, म्हणून मी आलेलो आहे. माझ्याबरोबर युद्ध कर म्हणाले. त्या वरुणाने सांगितलं बाबा, तुझ्याबरोबर युद्ध करणारा जन्माला आलेला आहे. मी आता युद्ध वगैरे काही करणार नाही. सगळं सोडून दिलेलं आहे. पण तुला शासन करणारा एक समर्थ वीर असा निर्माण झालेला आहे. जा तू शोध करून त्याच्याबरोबर लढाई कर. आलेला आहे बाहेर तो हिरण्याक्ष, कुठे आहे ? हरी आहे म्हणाले त्याचे नांव. नारद ऋषि समोर आले. काय नारदा, तो हरी म्हणे उत्पन्न झालेला आहे. कुठे आहे तो हरी? चल म्हणाले नारदऋषि. दाखवतो मी तुला. त्याला घेऊन आले. वराह नुकतेच त्या पृथ्वीला घेऊन वर आलेले होते. ती जलावर स्थापन करण्याचं त्यांचं कार्य चाललेलं होतं. हिरण्याक्ष मोठी गदा घेऊन आलेला आहे. त्याच्याकडे पाहिल्याबरोबरच तो हसायला लागला, हा तर रानात राहणारा एक पशू आहे म्हणाले. हा काय लढाई करणार ? काही निमित्त पाहिजे म्हणून तो म्हणतो आहे, अरे ही पृथ्वी आमची आहे. जेवढं मिळालेलं आहे ते सगळं आमचंच आहे, असं समजणाऱ्यांपैकी हा दैत्य एक आहे. सर्वही स्थान आमचं आहे असं समजतो आहे हिरण्याक्ष. देवांचं काही नाहीये. सर्व स्थानावर आमचा अधिकार आहे ही पृथ्वी मुकाट्याने सोडून दे. नाहीतर तुझा नाश करावा लागेल. आजपर्यंत अनेक दैत्यांचा तू नाश केलेला आहेस, असं मी ऐकलेलं आहे. आज माझ्यासमोर तू आलेला आहेस. उभा रहा इथे, तुझा मी नाश करणार आहे. सगळ्या बांधवांच्या ऋणातून मी मुक्त होणार आहे. वराह भगवान ऐकताहेत नुसते. त्यांचं पृथ्वीची स्थापना हे काम व्हायचे होते. पृथ्वीची स्थापना झाल्यानंतर वर आले ते. उभे राहिले आणि बोलायला लागले, ""काय बाबा,
सत्यं वयं भो वनगोचरा मृगाः ।
युष्मद्विधान्मृगये ग्रामसिहान् ।।
3.18.10 ।। श्री.भा.
काय हिरण्याक्षा, आम्ही रानात राहणारे पशू असं तू म्हणतो आहेस. बरं आहे, पशू आहोत. पण तुझ्यासारखे जे गावठी सिंह जे आहेत, ते आम्ही पुष्कळ मारलेले आहेत. तुला माहिती नाही. काय तुझं सामर्थ्य आहे ते दाखव, म्हणाले. आम्ही काय केलेलं आहे, तुमचं काय घेतलेलं, आहे. ही जमीन तुमची कशी ? कोणी घेतली ? कोणी तुम्हाला दिली होती जमीन ? तुम्ही रसातलामध्ये राहणारे, ईश्वराने तुम्हाला रसातल निर्माण करून दिलेलं आहे. स्वर्गासारखं राज्य तिथं आहे, सर्व सुखसमृद्धी असताना ते रसातल आहेच आहे. पुन्हा स्वर्गलोक तुम्हाला पाहिजे, पुन्हा भूमी पाहिजे, म्हणजे जिथं तिथं तुमचंच साम्राज्य ? सर्व स्थानं तुमची. काय तुझा पराक्रम आहे तो दाखव म्हणाले. झालं, दोघांचं गदायुद्ध सुरु झालेलं आहे. हिरण्याक्षाने रागाने ती गदा जोराने
मारली. वराह एकदम बाजूला झालेला आहे. वराहाची शिकार करणं फार कठीण आहे म्हणाले. एकदम ते जातात जोराने. भगवान श्रीहरीने तो गदावेग चुकविलेला आहे. पुन्हा गदा घेतो आहे, फिरवतो आहे, गर गर फिरवतो आहे. हरीला मारण्याकरता. हिरण्याक्षाने मारली ती गदा. काही झालं नाही. त्यांनीही गदा घेतली. यांनीही गदा घेतली, त्या दोघांचं गदायुद्ध सुरु झालेलं आहे. मायाशक्तीने वराहरूप धारण करून आलेले भगवान श्रीहरी हिरण्याक्षाबरोबर युद्ध करताहेत. संध्याकाळची वेळ झाली, यांचं आपलं युद्ध चालूच आहे. वेगळ्यावेगळ्या प्रकारांनी गदायुद्ध सुरूच आहे. ब्रह्मदेव आले. देवांच्या देवांना त्यांनी विनंती केली. भगवंता, हा म्हणजे सगळ्या विप्रांचा, गाईचा अत्यंत नाश करणारा आहे, दैत्य आहे. लवकर याला मारा म्हणाले. रात्रीला सुरुवात झाली म्हणजे हे निशाचर आहेत, रात्री यांचं बल वाढतं आहे. तेव्हा रात्र होण्याच्य पूर्वीच याचा नाश आपण करा. लवकर नाश करा.
भगवंतांनी त्यांना सांगितलं, करतो म्हणाले नाश. दोघांचं ते गदायुद्ध सुरु झालेलं आहे. त्या हिरण्याक्षाने एकदम आपली ती गदा भगवंताच्या हातावर फेकली. आणि भगवंतांच्या हातामध्ये असलेली गदा एकदम खाली पडली. निश:स्त्र भगवान आहेत. हिरण्याक्षानेही युद्ध थांबवलेलं आहे. धर्मयुद्ध आहे, तो सुद्धा धर्मयुद्ध मानणारा होता. शत्रूच्या हातात शस्त्र नाही तर आपण कसं मारायचं, थांबला तो.
सुनाभं चास्मरद् विभुः ।।
3.19.5 ।। श्री.भा.
आपल्या सुदर्शन चक्राचं स्मरण भगवंतांनी केलं. ते चक्र त्या ठिकाणी आलेलं आहे. सर्वही मंडळी, देवगण, लवकर याचा नाश करा अशी प्रार्थना करताहेत. त्यानी आपल्या अनेक माया निर्माण केल्या. असुराने सुद्धा शक्ती पुष्कळ मिळवलेली आहे. प्रयत्नवाद म्हणजे विलक्षण आहे, ईश्वर मानत नाहीत काही नाही. पण शास्त्रीय प्रयत्न जे सर्व आहेत ते करतात. तपश्चर्या करायची, मंत्रशक्ति मिळवायची, योगशक्ती मिळवायची. त्यामुळे यांनी मंत्राने अनेक प्रकारच्या मायाशक्ती मिळवलेल्या होत्या. एकदम त्याठिकाणी युद्धभूमीवर सगळीकडे अंधार पडलेला आहे. आकाशातून दगडाची वृष्टी व्हायला लागली. भगवंतांनी आपल्या सुदर्शन चक्रानी त्या सर्व मायांचा नाश केलेला आहे. रागावला तो हिरण्याक्ष. त्याची गदाही सगळी फुटून गेलेली आहे, मोडून गेलेली आहे. धावत, धावत तो आला त्यांनी एकदम वराहांच्या छातीवर मूठ मारलेली आहे. हेही रागावले यांनीही त्याच्या थोबाडीत मारलेली आहे. कानावर ती जोरात बसल्यामुळे त्याला चक्कर आली