« Previous | Table of Contents | Next »
पान ८१

तोपर्यंत तुझ्या मनामध्ये भगवंताचे स्मरण कर. अनेक देवतांच्या उपासनेचे काय फल आहे ते शुकाचार्य महाराजांनी सांगितलेलं आहे. शेवटी तीव्र भक्तियोग झाला पाहिजे. त्या भक्तीमुळे, भगवत् प्रेमामुळे मनामध्ये कोणताही दुसरा विचार येत नाही. संसार सगळा विसरला पाहिजे. हा अभ्यास त्यांनी सांगितला आहे. आयुष्य चाललेलं आहे हा विचार केला पाहिजे. श्वासोच्छ्वास घेतला म्हणजे जिवंत राहिला असे नाहीये. पुष्कळ वर्ष झाडाचं आयुष्य असतं. शे-पाचशे वर्ष मोठीमोठी झाडं राहतात. काय त्याचा उपयोग आहे म्हणाले. तेव्हा भगवान श्रीहरीच्या लीला श्रवण करणं, त्याचं चिंतन करणं आणि ते प्रेम अंत:करणामध्ये निर्माण करून घेणं हे महत्त्वाचं.

परिक्षीत राजाच्या मनावरती परिणाम झालेला आहे. शुकाचार्य महाराज सांगताहेत, त्याचा उद्धार झाला पाहिजे. असा त्यांचा संकल्प आहे. भगवत् स्वरूपाचं चिंतन झालं पाहिजे. भगवत् कथा या स्मरणपूर्वक ऐकायला पाहिजेत. असं त्यांनी ठरविले. सर्व एकंदर ममता पाश मनातून काढून टाकले. शरीर माझं नाही, माझं काही नाहीये. सर्वत्र संग दूर केलेला आहे. श्रीकृष्णकथा श्रवण करण्याची इच्छा उत्पन्न झाली. त्यानी शुकाचार्य महाराजांना सांगितलं महाराज, भगवान श्रीहरी हे विश्व उत्पन्न करतात, रक्षण करतात आणि पुन्हा त्याचा संहार करतात ही त्यांची कार्ये आहेत. काल पुष्कळ जातो त्याच्यामध्ये तेव्हा हे त्याचे कार्य एकदम चालू आहे की क्रमाने चालू आहे. कसं कसं चालू आहे? त्यांची शक्ति कशी आहे? हे मला सांगा.

शुकाचार्य महाराजांनी आरंभाला भगवान श्रीहरीची प्रार्थना केलेली आहे, की त्या परमेश्वराचे गुणवर्णन, लीलावर्णन मला करायचं आहे. त्यानी मला आणखी प्रेरणा करावी. माझ्या बुद्धीला प्रेरणा करून, माझ्या वाणीच्या द्वारांनी आपले गुण वर्णन करून घ्यावेत अशी प्रार्थना करून शुकाचार्य महाराजांनी बोलायला आरंभ केला. शुकाचार्य म्हणाले राजा असाच प्रश्न नारदांनी विचारला. ब्रह्मदेव एकदा ध्यानस्थ बसलेले होते. ध्यानातून सावध झाल्यावर नारदांनी विचारलं, पिताजी, सर्व विश्व निर्माण करणारे आपण आहात, तर आपण कोणाचं ध्यान करता आहात? आमची कल्पना आपणच विश्व निर्माण करणारे, विश्व पालन करणारे, विश्वाचा उपसंहार करणारे आहात. आपल्यापेक्षा कोणी श्रेष्ठ ही कल्पनाही आमच्या मनामध्ये नाहीये. तेव्हा आपला हा ध्यानयोग आम्ही पाहिला. आम्हाला आश्चर्य वाटले कोणाचं ध्यान करता? ब्रह्मदेव म्हणाले, नारदा बरं झालं तू आज हा प्रश्न विचारलास, भगवंताचं सामर्थ्य काय आहे हे तुला समजावून सांगितले पाहिजे. स्वयंप्रकाश तो परमात्मा आहे. तो सर्व विश्वाला प्रकाशित करतो. सूर्य चंद्रादिक प्रकाश देणारे त्यांनाही प्रकाश देणारा तो परमात्मा आहे. त्याच्या कृपेने ही सृष्टी, विश्व निर्माण...

***
पान ८२

करण्याचे कार्य मी करतो आहे. ह्या नारायणाच्या सामर्थ्याचे वर्णन सर्वही वेदांमध्ये शास्त्रांमध्ये, पुराणांमध्ये केलेलं आहे.

कालं कर्म स्वभावं च मयेशो मायया स्वया ।
आत्मनः यदृच्छया प्राप्तं विबुभूषुरुपाददे ।।
2.5.21 ।। श्री. भा.

भगवान श्रीहरी एकटे आहेत. सृष्टी झाल्यानंतरही ते एकटेच आहेत. पूर्वी ते एकच होते. आणि अनेक रूप व्हावं. विविध रूप आपण व्हावं असा त्यांचा संकल्प झाला आणि सृष्टीला सुरुवात झाली. पंचभूतं तयार झाली. सृष्टी करण्याकरता त्यांनी कालाचं साहाय्य घेतलं. कालही त्यांचंच स्वरूप आहे. जीवांची सर्व कर्मे जी आहेत ती कर्म पाहून सृष्टी केली. कालाचा उपयोग म्हणजे सत्त्व, रज, तम हे त्रिगुण जे आहेत, हे सर्व व्यापक विचार आहेत.

सत्त्वरजस्तमसां साम्यावस्था प्रलय: ।

त्या त्रिगुणांची समस्थिती असणं म्हणजे प्रलय आहे. यालाच प्रकृती म्हणतात. प्रलय म्हणजे विश्व संपलं. त्या गुणांमध्ये विषमता सुरु झाली. त्याप्रमाणे स्वभावाप्रमाणे परिणाम म्हणजे रूपांतर होय. कर्मामुळे महत् तत्त्व म्हणून जे पहिले तत्त्व आहे ते निर्माण झालं. बुद्धीतत्त्व त्यालाच म्हणतात. त्या महत्तत्त्वापासून अहंकारतत्त्व निर्माण झालं. हे सात्त्विक, राजस, तामस या तीन प्रकारच्या अहंकारामध्ये आहे. तामस अहंकाराच्या भागापासून पंचभूतं उत्पन्न झाली. आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी ही पंचभूतं क्रमाने निर्माण झाली. त्या पंचभूतांच्या सत्त्वांशापासून पंच ज्ञानेंद्रियं निर्माण झाली. प्रत्येक जीवांची इंद्रियं आहेत. म्हणजे किती इंद्रियं निर्माण झाली असतील सृष्टीत! जीव अनंत आहेत. केवळ मनुष्यालाच इंद्रियं आहेत असं नाही. पशूंना आहेत, पक्ष्यांना आहेत. जलचर प्राणी, सस्तन प्राणी आहेत. प्रत्येकांची इंद्रियं तयार झालेली आहेत. तसेच राजस अंशापासून कर्मेंद्रियं तयार झाली. ती सगळी तत्त्वं पूर्वी भिन्न भिन्न होती म्हणाले. भगवान श्रीहरींनी सर्व तत्त्वांचं एकत्रीकरण केलेलं आहे. त्यापासून ब्रह्मांड निर्माण झालं. सगळे लोक तयार झाले. पाताल आहे, रसातल आहे, सप्तपाताल क्रमाने निर्माण झाले, पृथ्वी तयार झाली. भूलोक, स्वर्गलोक, गोलोक, जनलोक, सत्यलोकापर्यंत सर्व सृष्टी, ब्रह्मांड वगैरे तयार झाले. सृष्टीरचना संकल्पाने झालेली आहे हे सर्वही परमेश्वराच्या कृपेने, संकल्पाने निर्माण झाले. सर्व जीवांकरता विविध रूप तोच परमात्मा झालेला आहे. हे समजून घेणं मोठं कठीण आहे म्हणाले. अहंकार जो सर्वत्र व्यापलेला आहे. अहंकाराचं कार्य म्हणजे सगळी सृष्टी...

***
पान ८३
Lord Narasimha and Hiranyakashipu

आहे. त्या अहंकारापासूनच सर्व जीवांची बुद्धी आहे ती व्यष्टि बुद्धी त्याच्यापासूनच आहे. त्या बुद्धीमध्ये अहंकाराचा संबंध असल्यामुळे ईश्वराच्या शक्तीकडे त्या बुद्धीचं लक्ष जात नाही, मनाचं लक्ष जात नाही. आपण वेगळे आहोत, आपण समर्थ आहोत, आपल्या सामर्थ्यानी आपण सर्व सुखी होऊ, कल्याण आपलं प्राप्त करून घेऊ, इतरांचंही कल्याण करून घेऊ असे सगळेही विचार, त्या अहंकारामुळे मनामध्ये येतात. त्या अहंकाराची शक्ती बाजूला करणं हे फार कठीण आहे म्हणाले, इतका तो अहंकार बुद्धीशी तादात्म्य झालेला आहे. ईश्वराच्या कृपेनेच हे व्हायचं म्हणाले. परमेश्वराने मला आज्ञा केल्यामुळे, हे सृष्टी कार्य झालेलं आहे.

मग ब्रह्मदेवाने ईश्वराचे अवतार किती झाले हे संक्षेपाने नारदांना सांगितले.

यत्रोद्यतः क्षितितलोद्धरणाय बिभ्रत् ।
क्रौडीं तनुं सकलयज्ञमयीमनन्तः ।।
2.7.1।। श्री. भा.

पृथ्वी पाण्यामध्ये बुडालेली आहे तिला वर काढण्याकरता वराहरूप भगवतांनी धारण केलं. त्यांनी रुचि ऋषींचे पुत्र म्हणजे यज्ञ हे रूपही धारण केलं. कर्दमांच्या गृहामध्ये त्यांची पत्नि देवहूतीपासून, कपिल हा अवतार धारण केलेला आहे. ज्ञानमार्गाचा उपदेश त्यांनी केला. अत्री ऋषींना पुत्राची इच्छा उत्पन्न झाली. भगवंताची आराधना त्यांनी केली आणि भगवंतांनी आत्मदान त्यांना केलं.

दत्तो मयाहमिति यद् भगवान् स दत्तः ।।
2.7.4 ।। श्री. भ.

भगवंतांनी सांगितलं तुमची भक्ती पाहून मी माझच दान तुम्हाला केलेलं आहे. मी दत्त आहे. तुम्हाला दिला गेलेलो आहे. तुमचा मी आहे म्हणून दत्त हे नाव प्राप्त झाले. कार्तविर्यार्जुन आहे, यदुराजा, अनेक मोठेमोठे ऋषि भगवंतांच्या कृपेने योगसिद्ध झालेले आहेत. पुढं सनक, सनंदन, सनातन, सनत्कुमार हेही रूप भगवंतांनी धारण केलेलं आहे. असे पुष्कळ अवतार झालेले आहेत. पृथुराजा हेही भगवंतांनी रूप धारण केलं. ऋषभ देव अवतार हेही भगवंताचे स्वरूप आहे. माझ्या...

***
पान ८४

यज्ञामध्ये ब्रह्मदेव सांगताहेत, हयग्रीवरूपाने भगवंत प्रगट झालेले आहेत. मस्यावतार, कूर्मावतार, नृसिंह अवतार, हिरण्यकश्यपूचा नाश करण्याकरता धारण केला. मगरीने पायाला धरले आहे. गजेंद्रावर कृपा करण्याकरता भगवंतांनी अवतार धारण केला, त्याला मुक्त केलेलं आहे. अदितीचे पुत्र वामनरूप झाले, बळीराजाकडून सर्वराज्य घेऊन इंद्राला त्यांनी अर्पण केलं. तुमच्यावरतीही नारदा त्या भगवंतांनी कृपा केलेली आहे. तुम्हाला योगाचा, ज्ञानाचा उपदेश त्याच वासुदेवाने केलेला आहे.

धन्वंतरिश्च भगवान् स्वयमेव कीर्तिः
नाम्ना नृणां पुरुरुजां रुज आशु हंति ।।
2.7.21 ।। श्री. भा.

भगवान धन्वंतरी रूप घेऊन आलेले आहेत, सर्वांच्या रोगांची निवृत्ती करण्याकरता त्यांचं मार्गदर्शन आहे. उन्मत्त क्षत्रियांना शासन करण्याकरता भागर्वराम रूपाने भगवान प्रगट झालेले आहेत. रामचंद्र रूप धारण केलं, रावणादिकांचा संहार केला. कृष्णावतार धारण करणार आहेत, असं पुढचं सांगताहेत त्या वेळेला नारदाला. संपूर्ण कृष्णचरित्र संक्षेपाने ब्रह्मदेवाने नारदांना सांगून दिले. हे सगळं कृष्णचरित्र संक्षेपाने ब्रह्मदेवांच्या मुखातून नारदांनी ऐकलं. व्यासांच्या आश्रमामध्ये येऊन त्यांना ते सांगितले. तुम्ही विचार करून तुम्हाला आठवेल तसे ते लिहा म्हणून सांगितले. तर असे अनेक अवतार भगवान श्रीहरींनी धारण केले. लोकरक्षणाकरता हे आहेत. सृष्टी झाली पण संरक्षण करणं हेही जबाबदारीचं कामं आहे ना. ते संरक्षण करण्याकरता म्हणून धर्मशील अशा प्रकारचे महात्मे, त्यांना विरोध करणारे अधार्मिक लोक यांना शासन करून, धर्मशीलांचे रक्षण करणं म्हणजे धर्माचं संरक्षण आणि विश्वाचं संरक्षण होतं. असे अनेक अवतार भगवंताचे झालेले आहेत म्हणाले त्याचा काही अंत लागणार नाही.

ब्रह्मदेवांनी याप्रमाणे नारदांना सर्व समजावून सांगितले. शुकाचार्य सांगतात राजा, ही परमेश्वराची मायाशक्ती जी आहे; त्या मायाशक्तीने सर्व जीव मोहामध्ये पडलेले आहेत. ईश्वराचे आपण अंश आहोत अथवा ईश्वररूप आहोत हे काही त्यांना स्मरण राहिलेलं नाही. भगवंतांची कृपा संपादन करण्याकरता प्रयत्न करणारे, सत्संगती ज्यांना घडलेली आहे, अशा प्रकारचे जे महात्मे आहेत. तेच या मार्गाकडे जात आहेत. कठीण मार्ग जरी असला तरी तो सुलभ होतो आहे. त्यांना मार्गदर्शक जे महात्मे त्यांच्या संकल्पाने ते ईश्वरकृपासंपन्न होतात.

आपल्याला ईश्वराची कृपा झाली हे ब्रह्मदेवांनी नारदांना सांगितलं. त्यांच्या नाभिकमलातून...

***
पान ८५

मी उत्पन्न झालो म्हणाले. चार दिशेला चार मुखं ब्रह्मदेवांना आहेत. बाहेर सगळं पाणीच पाणी आहे, वर आकाश आहे. आपला जन्म कोठून झाला. त्या कमलातून आत प्रवेश केला व शोध घेतला पण मला काही कळलं नाही. कोण आपला स्रष्टा, जन्मदाता कोण आहे? एकदम त्या जलातून आवाज आलेला आहे. तप म्हणजे तपश्चर्या करा, आलोचना करा, स्मरण करा. आणि मग मी तपश्चर्या केली, पुष्कळ दिवसापर्यंत. मग भगवंतांचे दर्शन मला झालं म्हणाले. आणि त्यांनी मला उपदेश केला. थोडक्यात चतुःश्लोकी भागवत त्याला म्हणतात,

अहमेवासमेवाग्रे नान्यद् यत् सदसत् परम् ।
पश्चादहं यदेतच्च योऽवशिष्येत सोऽस्म्यहम् ।।
2.9.32 ।। श्री. भा.

भगवान सांगतात, ब्रह्मदेवा प्रथम सृष्टीच्या पूर्वी मीच आहे म्हणाले, दुसरं काही नाही. कार्य नाही, कारण नाही काही नाही. सृष्टीचा विनाश झाला, प्रलय झाल्यानंतरही मीच आहे. आत्ताही मीच आहे. पण मी एकटाच आदि अंती मध्ये असताना माझ्याशिवाय जे पदार्थ दिसताहेत हीच माझी माया आहे म्हणाले. खरा पदार्थ नाहीये. खरा पदार्थ म्हणजे भगवंताचं स्वरूप आहे, परमात्मा आहे. त्याच्याशिवाय काही काल दृश्य, काही काल नष्ट होणारे असे पदार्थ ही परमेश्वराची माया आहे. सर्वही पंचमहाभूतं ही सर्व भौतिक पदार्थांमध्ये प्रविष्ट आहेत, त्यांचे अंश सगळीकडे आहेत. आणि अप्रविष्टही आहे. भूतांनी त्यांच्यामध्ये प्रवेश केला म्हणजे पूर्वी त्याठिकाणी नव्हते असे म्हटले पाहिजे, प्रवेश केल्यानंतर आले, असं नाहीये. प्रविष्ट आहे याचा अर्थ दिसताहेत, उपलब्ध आहेत. त्याप्रमाणे सर्व ठिकाणी माझा संबंध आहे आणि नाही. हाच विचार तत्त्वजिज्ञासू पुरुषांनी निरंतर करायचांय. सर्व कालामध्ये अनवृत्ती कोणाची आहे? काही काल राहणारं आणि काही काल नसणारं असं कोण आहे? सगळा विचार करून निरंतर ज्याची अनवृत्ती आहे तेच खरं तत्त्व आहे असं समजून घ्यायचं आहे. हा तुम्ही विचार करा आणि सृष्टी रचना करा, म्हणजे तुम्हाला काहीही अहंकारादिक विकार बाधा करू शकणार नाही. हे मला सांगितलं परमेश्वरांनी आणि त्यांच्याच कृपेने सर्व हे झालेलं आहे. या भागवत पुराणामध्ये शुकाचार्य सांगताहेत परिक्षीत राजाला याची दहा लक्षणं आहे, दहा विषय आहेत.

अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः ।
मन्वंत रेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः ।।
2.10.1 ।। श्री. भा.

सर्ग हा पहिला विषय आहे.

***
पान ८६
भूतमात्रेन्द्रियधियां जन्म सर्ग उदाहृत: ।।
2.10.3 ।। श्री.भा.

पंचभूतं, इंद्रियं, बुद्धी यांची उत्पत्ती कशी झाली याचं वर्णन याला सर्ग म्हणतात. त्रिगुणांच्या विषमतेमुळे पुढची सगळी सृष्टी जी आहे त्याला विसर्ग म्हणतात. स्थिती-स्थान हा तिसरा विषय आहे. ईश्वराचा सर्वत्र विजय कसा आहे, उत्कर्ष कसा आहे, हे वर्णन केलेलं आहे काही काही कथा रूपांनी त्याला स्थान हे विषय म्हणतात. पोषण नावाचा विषय म्हणजे ईश्वराने कोणाकोणावर अनुग्रह केला कसा उद्धार केला, हा एक विषय आहे. मन्वंतर म्हणजे सदाचार. सज्जनपुरुष कसं आचरण करतात याकरता मन्वंतर हा विषय आहे. कर्मवासना म्हणजे या वासनांचं फल कसं मिळतंय? रजोगुणी, तमोगुणी दैत्यांचा नाश कसा झाला, सात्त्विक वृत्तीने राहणारे, भगवत् भक्त प्रल्हादिक यांचा उद्धार, संरक्षण कसं झालं? हे वासनांचं निरूपण आहे. सूर्यवंश, चंद्रवंश यांच्यामध्ये झालेले जे अवतार हरीचे आहेत त्यांचं चरित्र. भगवत् भक्तांचं चरित्र हे ईशानुकथा म्हणून एक आहे. निरोध म्हणजे प्रलय म्हणजे काही शक्तींचा निरोध करणं आणि पूर्ण शक्तींचा निरोध म्हणजे महाप्रलय होय. हे सगळं वर्णन आलेलं आहे. आश्रय मुक्ती म्हणजे या सर्वातून मुक्त होणं. मायाशक्तीच्या पलिकडे गुणत्रयातीत होणं म्हणजे मुक्ती होय. आश्रय म्हणजे ह्या सर्वही कार्याला अधिष्ठान भूत जो परब्रह्मरूप परमात्मा आहे, तो आश्रय आहे. अशा प्रकारे सगळे विषय भागवत पुराणामध्ये सांगितलेले आहेत.

शुकाचार्य महाराजांनी हे संपूर्ण भागवत परिक्षीत राजाला संक्षेपाने सांगितले.

आता सविस्तर विषय सांगायला त्यांनी आरंभ केला.

एवमेतत्पुरा पृष्टो मैत्रेयो भगवान् किल ।
क्षत्ता वनं प्रविष्टेन त्यक्त्वा स्वगृहऋद्धिमत् ।।
3.1.1 ।। श्री. भा.

शुकाचार्य सांगतात राजा, आपल्या घराचा त्याग करून विदुरजी बाहेर पडले. मैत्रेय महर्षि आणि त्यांची गाठ पडलेली असताना, त्यांच्या बरोबर संवाद झाला. विदुरजीही मोठे अधिकारी, यमधर्माचाच अवतार होते. राजाने विचारले, कोठे संवाद झाला, विदुरजींनी घरदार सोडून बाहेर पडण्याचे काय कारण झाले? शुक सांगतात राजा, धृतराष्ट्र आपल्या मुलांना काही आवरू शकत नाहीये. दुर्योधन उन्मत्त झालेला आहे. अहंकाराचं तो रूप आहे. त्या सर्व दुर्जन मुलांचा निग्रह करणं याच्या हाताबाहेर गेलेलं आहे. शेवटी आपल्या ज्येष्ठ बंधूची मुलं म्हणजे पांडवांचा नाश करण्याचा

***
पान ८७

प्रयत्न केला. लाक्षागृहामध्ये त्यांना राहण्यास सांगितलं. त्या गृहाला अग्नी लावून त्यांचा नाश करण्याचे त्यांनी ठरवले. भगवान श्रीहरी व विदुरजी यांच्या कृपेमुळे लाक्षागृहाखाली नवीन भुयार तयार केलं, त्यातून ते पांडव आपल्या मातेला बरोबर घेऊन बाहेर पडले. आणखी अपराध कौरवांनी केला, द्रौपदीच्या केसाला धरून तिला भर सभेत ओढून आणलेलं आहे. विवस्त्र करण्याचा प्रयत्न दुर्योधन, दुःशासन यांनी केला पण धृतराष्ट्र काहीही बोलला नाही. द्यूतक्रीडा झाली, कपटाने धर्मराजाला व पांडवांना जिंकलेलं आहे. परंतु तो सत्यनिष्ठ धर्मराज वनामध्ये निघून गेला. आपल्या बंधूंना, पत्नीला बरोबर घेऊन तेरा वर्ष संपल्यानंतर त्यांनी आपला दायभाग मागितला. माझं राज्य अर्ध असेल ते मला द्या. कृष्ण भगवान हे शिष्टाई करण्याकरता गेले. पण दुर्योधनाने त्यांचही ऐकले नाही. विदुरजींनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं. धृतराष्ट्रांनी सांगितलं, गांधारीनी सांगितलं, भीष्माचार्यांनी सांगितलं, द्रोणाचार्यांनी सांगितलं. सर्व ऋषिमंडळींनी दुर्योधनाला पुष्कळ सांगितलं, युद्ध नको आता. नाही म्हणाला, युद्धाशिवाय राज्य मी देणार नाही. एके दिवशी धृतराष्ट्राने आपल्या बंधूंना म्हणजे विदुरजींना विचारले, मोठं राजनीतिज्ञ विदुरजी होते. काय करायचं आता आपलं कुल सुरक्षित राहण्याकरता काय करावे? भर सभेमध्येच धृतराष्ट्रांनी हे विचारलं. विदुरजींनी त्यांना सांगितलं, हा तुमचा मुलगा, या सर्वांसाठी कारण आहे. कृष्णाकडे याचं बिलकुल लक्ष नाहीये. ह्याचं ऐश्वर्य सगळं नष्ट झालेलं आहे. तुमचं कुल सुरक्षित राहावं अशी तुमची इच्छा असेल तर या दुर्योधनाला राज्यातून बाहेर घालवून दिलं पाहिजे. तरच कुल सुरक्षित राहिल. पण फार वेळ झाला याला. दुर्योधनाच्या ताब्यात सर्वही आलेलं आहे. सर्व राज्यसभा सर्व मंडळी साम, दाम, भेद सर्व दृष्टीने त्याने ताब्यात घेतलेलं आहे. सभेमध्ये आपल्या पित्याला हा विदुर असा सल्ला देतो आहे. यालाच अगोदर इथून हाकललं पाहिजे. म्हणून दुर्योधन उठून उभा राहिला आणि विदुरजीचा त्याने अपमान केला. आमच्या या राजसभेमध्ये या दासीपुत्राला कोणी बोलावले म्हणाला. आमच्या राजसभेत येऊन बसण्याचा याला काय अधिकार आहे? यांनीच हद्दपार व्हावं, इथून निघून जावं. यालाच घालवून द्या. दुर्योधनाने इतका विदुरजीचा अपमान केला, पण सर्व, गप्प बसलेले आहेत. हे ऐकल्याबरोबर विदुरजी उठलेले आहेत. राजेशाहेब मी आता निघालो म्हणाले, मला आता इथे राहणे शक्य नाही. तुम्हीही काही प्रतिकार करत नाही, तुमच्याही मनामध्ये काही विचार येत नाही, मुलाला आवरत नाही, तुम्ही. तेव्हा तुम्ही व तुमची मुलं काय ते पाहून घ्या. चाललो मी. निघून गेले विदुरजी. तीर्थयात्रा करताहेत. सत्संगती करताहेत, मोठ्या महात्म्यांची भेट घेत आहेत. असे तीर्थयात्रा करता करता प्रभास क्षेत्रात ते येऊन

***
पान ८८

पोहचले. त्यावेळेला धर्मराजाला राज्य मिळालेलं आहे असं त्यांना समजले. सर्वही कौरवांचा संहार झालेला आहे हेही समजले. दु:ख झाले त्यांना पण शोक आवरला त्यांनी. त्यांच्या कर्माचे फल त्यांना मिळाले म्हणाले.

नंतर सर्व तीर्थक्षेत्रात फिरता फिरता यमुना नदीच्या तीरावर वृंदावनात येऊन विदुरजी पोहचले. त्याठिकाणी महान भगवद्भक्त उद्धवजींची भेट झाली. शांत आहेत उद्धवजी, वासुदेवाचे भक्त. साक्षात देवगुरु बृहस्पतिचे शिष्य आहेत. सर्व राजनीतीचा अभ्यास बृहस्पतींच्याकडून केलेला आहे. प्रेमाने आलिंगन दिलं त्यांना. विदुरजींनी विचारलं उद्धवजी रामकृष्ण हे कुशल आहेत ना महाराज? वसुदेव, देवकी सगळ्यांचं कल्याण आहे ना? सर्वही यादवांचं कुशल आहे ना? पुष्कळ प्रश्न केले. दुर्योधनाला सांगण्याचा पुष्कळ प्रयत्न केला म्हणाले मी. भगवान श्रीकृष्णांनीही त्याचे डोळे उघडावे म्हणून पुष्कळ प्रयत्न केला. पण तो शुद्धीवर आला नाही आणि त्याचा नाश झालेला आहे. गोपालकृष्णांचं सर्व कुशल मला सांगा.

उद्धवजींनी हे ऐकल्याबरोबर प्रथम त्यांना काही बोलताच येईना. सगळी आठवण झाली द्वारकेतील. पाच वर्षाच्या वयापासून उद्धवजी भगवद्भक्ती करत होते. पाच वर्षाचे असताना काही तरी मूर्ती मांडलेली आहे. पूजा करताहेत, ध्यानस्थ बसलेले आहेत. त्यांची माता जवळ आलेली आहे, अरे भूक लागलेली आहे, जेवणाची वेळ झाली, चल उद्धवा. पण ते तहान भूक सगळं विसरून गेले. अशा लहानवयापासून त्यांचं मन भगवद्भक्तीमध्ये तल्लीन झालेलं आहे आणि शेवटी तर भगवंतांची संगती अखंड घडलेली आहे. श्रीकृष्ण कोण आहेत याची जाणीव बाळगून त्यांची संगती करणारे, उद्धवजी एकटे आहेत. अक्रूरजी एक होते. पण हे उद्धवजी श्रेष्ठ आहेत. त्यांना काही बोलता येईना. स्मरण झालं कृष्णाचं. थोड्यावेळाने अश्रू पुसून त्यांनी बोलायला आरंभ केला.

कृष्णद्युमणिनिम्लोचे गीर्णेष्वजगरेण ह ।
किं नु नः कुशलं ब्रूयां गतश्रीषु गृहेष्वहम् ।।
3.2.7 ।। श्री. भा.

विदुरजी, भगवान श्रीकृष्णचंद्रांचा अस्त झालेला आहे. सर्व यादव कालसर्पाच्या मुखामध्ये गेलेले आहेत. कोणाचं कुशल सांगायचं? ह्या मर्त्यलोकात राहणारे यादव अत्यंत दुर्दैवी आहेत, असं मी समजतो. इतकी वर्ष त्या भगवंतांच्या सान्निध्यामध्ये राहून, भगवान श्रीहरीला या यादवांनी कोणी ओळखलं नाही. आमच्या प्रमाणेच हाही एक मनुष्य आहे. पांचभौतिक शरीर आमच्या

***
पान ८९

प्रमाणेच याचही आहे. हा यादवांच्यामध्ये एक पुढारी आहे आमचा. बुद्धिमान आहे, एवढीच कल्पना यादवांची आहे. भगवंतांनी आपण असेपर्यंत त्यांचं संरक्षण केलं. आपल्या अनेक शक्तींचं त्यांनी उद्घाटन केलेलं आहे. शक्ती प्रकाशित केली आणि अदृश्य झाले भगवान. भगवंतांनी कितीतरी लीला केलेल्या आहेत. लहानपणापासून उद्धवजींनी भगवंताचं चरित्र वर्णन केलेलं आहे. रुक्मिणी हरण कसं केलं? जांबवतीबरोबर विवाह कसा झाला? सगळं उद्धवजी सांगताहेत कारण अखंड स्मरण आहे ना. भगवंताच्या लीला वर्णन करण्यापलिकडे दुसरा कोठलाही विषय मनामध्ये नाहीये. असा बराच काल गेलेला आहे. यादवांच्या मुलांनी अपमान केल्यामुळे रागावलेल्या ऋषिमंडळींनी त्यांना शाप दिलेला आहे, यादवांच्या कुलाचा क्षय होईल. पुढं सगळ्या यादवांना बरोबर घेऊन गोपालकृष्ण प्रभास क्षेत्रामध्ये येऊन पोहचले आहेत. दानधर्म केलेला आहे, सर्वांच अर्चन केलेलं आहे. पुढं सर्वांनी भोजन केलं व यथेच्छ मद्यप्राशन केलं. वेळ आलेली आहे शेवटची. बोलाचाली सुरु झाली. त्यांच्यामध्ये सगळे विरोधी लोक होतोच ना. सर्वांना एकत्र करण्याचं काम बलरामजी करत होते. संकर्षण असेच त्यांचं नाव आहे. कोणाच्याही मनात विरोध राहू नये हे ते काम करत होते. प्रयत्न ते करत होते. पण विरोध जाणार कसा? त्याचं पर्यवसान म्हणजे प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली. सूर्यास्ताच्या वेळेला सर्व यदुकुलाचा संहार झालेला आहे. हे आपल्या मायाशक्तीचे कार्य त्यांनी पाहिलं. सृष्टी-स्थिती-प्रलय तीनही मायाशक्तीचीच कार्ये आहेत. आपल्या डोळ्यादेखत सर्वही यादव परस्परात युद्ध करून मरून गेलेले आहेत. भगवंतांनी मला सांगितलं उद्धवा,

बदर्यां त्वं प्रयाहीति स्वकुलं संजिहीर्षुणा ।।
3.4.4 ।। श्री. भा.

अगोदरच सांगितलं होतं हे सगळं करण्यापूर्वी मला सगळा उपदेश केला, आत्मस्वरूप कसं आहे हे सांगितलं तू आता बद्रिकाश्रमाला जा, मलाही आता वैकुंठ लोकाला जायचं आहे. मला त्या वेळेला उपदेश केला त्यावेळेला मैत्रेय महर्षि, व्यासांचे मित्र, तोही त्याठिकाणी आलेले होते. त्यांच्या समक्ष, ते असताना, सर्व मार्गदर्शन भगवंतांनी केलेलं आहे. त्यांच्याच आज्ञेने आता मी बद्रिकाश्रमाला जायला निघालो आहे. त्याचं स्मरण झाल्यामुळे मला अत्यंत वियोग दु:ख झालेलं आहे. विदुरांनी विनंती केली महाराज, उद्धवजी प्रत्यक्ष भगवंतांनी तुम्हाला ज्ञानाचा उपदेश केला, म्हणजे भगवानच तुमचे गुरु आहेत. ते आत्मज्ञान कसं आहे, आत्मस्वरूप कसं आहे, आपण सांगता का? उद्धवजी म्हणाले, बाबा तुमची आठवण झाली त्यावेळेला, देवांनी मैत्रेयांना सांगितले, मैत्रेय महर्षि, विदुरांशी ज्या वेळेला भेट होईल त्यावेळेला हे ज्ञान विदुरांना तुम्ही सांगा.

***
पान ९०

तेव्हा तुम्ही त्यांच्या आश्रमामध्ये जा. असा रात्रभर विदुरजी आणि उद्धवजी यांचा संवाद चाललेला आहे. भगवंतांच्या कथा सांगण्यामध्ये सबंध रात्र कशी गेली हे कळले नाही. भगवंतांच्याच कृपेमुळे उद्धवजी मात्र जिवंत राहिले. सर्व यादव गेले विप्रशापामुळे, रामकृष्णांनीही आपलं शरीर विसर्जन केलं, पण उद्धवजी, राहू देत, त्यांनीच संकल्प केला. माझ्या जवळचं ज्ञान सुरक्षित ठेवणारा, योग्य व्यक्तीला उपदेश करणारा हा उद्धवजी मोठा अधिकारी आहे. याप्रमाणे, दुसऱ्या दिवशी उद्धवजी बद्रिकाश्रमाला निघून गेले. आणि विदुरजीही हरिद्वार क्षेत्रात मैत्रेयऋषींच्या आश्रमामध्ये प्राप्त झाले. तिथे त्यांचा आणि मैत्रेयांचा संवाद सुरु झालेला आहे. विदुरजींसारखे मोठे जिज्ञासू अधिकारी भगवत् भक्त विचारणारे आहेत. आत्ममाया म्हणजे काय आहे? मायेने मोह कसा उत्पन्न झाला? सगळेही पुष्कळ विचार झालेले आहेत. भगवंतांनी ब्रह्मदेवांना दर्शन देऊन ब्रह्मदेवांना आदेश कसा दिला ही पूर्वी सांगितलेली ब्रह्मदेवाची कथा, तिचं मैत्रेय महर्षींनी वर्णन केलं. आणि सृष्टी रचना भगवंतांनी कशी केली हेही सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. विदुरांनी मध्येच एक प्रश्न केलेला आहे की भगवंतांनी ही सृष्टी कशाकरता केली? नित्य तृप्त असणारा भगवान, स्वयंप्रकाश असणारा, अज्ञानाने तो आवृत्त झाला कसा आणि सृष्टीची रचना झाली कशी? हे आश्चर्यच वाटले आहे. ईश्वर हा आहे, जगाचा कर्ता आहे हेच आणखी मान्य करता येत नाही असा आक्षेप आहे. तोच कर्ता झाला, तोच सुखी, तोच दु:खी हे कशाकरता सृष्टी केली म्हणाले काय आवश्यकता आहे.

मैत्रेय म्हणतात विदुरजी यालाच आम्ही माया म्हणतो. असंभवनीय आहे. एक सच्चिदानंद असलेला स्वयंप्रकाश परमात्मा यामध्ये सापडला कसा? शक्य नाही सापडणं. पण दिसतंय म्हणाले, अनुभव मात्र वेगळा आहे. ते अज्ञानाचं, अविद्येचं कार्य आहे. त्या अनुभवामुळे असं द्वैत कुठून आलं हे काही सांगता येत नाही. हे असंभवनीय आहे म्हणून ईश्वराची मायाशक्ती आहे असं मानावं लागलं म्हणाले. स्वप्नं, वाटेल तशी पडतात. स्वतःचं शरीर छिन्न-विच्छिन्न करून टाकलेलं पाहतो स्वप्नामध्ये तशी स्थिती ईश्वराच्या मायाशक्तीमुळे झालेली आहे. भगवान वासुदेवाची अनुकंपा, कृपा ज्या वेळेला होईल त्या वेळेला ही माया हळूहळू नाहीशी होती आहे.

कशी सृष्टी केली हे मैत्रेय ऋषींनी, विदुरजींना क्रमाक्रमाने सांगितले. त्यानंतर, भागवत पुराण सांगायला मैत्रेय महर्षींनी सुरुवात केली. ही भागवताची परंपरा याठिकाणी थोडी वेगळी दाखवलेली आहे. भगवान शेष, संकर्षण परमात्मा जे आहेत यांनी सनतकुमार यांना भागवताचा उपदेश केला. त्यानंतर त्यांनी सांख्यायन ऋषींना सांगितले. सांख्यायन ऋषींनी आमचे गुरु

« Previous | Table of Contents | Next »