त्यांना ते समजलं होतं, उद्धवजींची भेट झाल्यावर सर्व यदुकुलाचा संहार झाला आहे, हे समजलं. पण हे तेवढं धर्मराजाला त्यांनी सांगितलं नाही. ऐकल्या बरोबर दु:ख होईल, समजेल तेव्हा समजेल म्हणाले. काही दिवस मुक्काम विदुरजींनी केला. धृतराष्ट्राला उपदेश करून त्याचा उद्धार करायची त्यांची इच्छा होती. विदुरजी म्हणजे मांडव्य ऋषींच्या शापाने या शूद्र जन्माला ते आलेले होते. यमधर्म शंभर वर्ष इथे राहिलेले होते. पुष्कळ काल गेलेला आहे. एके दिवशी रात्री विदुरजींनी धृतराष्ट्राला सांगितलं ""राजे साहेब, आता किती दिवस तुम्हाला या घरात राहायची इच्छा आहे. तुमचा काल जवळ आलेला आहे. विचार करा. ज्या पांडवांचा संहार करून, नाश करून, आपण सुखी व्हावं म्हणून पुष्कळ प्रयत्न केले तुम्ही आणि तुमच्या मुलांनी म्हणाले, काय मिळालं शेवटी त्यांचंच अन्न खाऊन राहण्याची पाळी तुम्हाला आलेली आहे. म्हातारा झालेला आहात तुम्ही आणि या शत्रूच्या घरामध्ये राहता आहात तुम्ही, तुम्हाला काही वाटत नाही म्हणाले. केव्हा बाहेर पडणार? विचार करा.''
धृतराष्ट्राच्या मनावरती परिणाम झालेला होता. आता कोणीच शिल्लक राहिलेलं नाही. मुलगा, मुलं नाही, काही नाही. त्यांनीही विदुरांना सांगितलं, ""बाबा तूच आता आम्हाला घेऊन जा तुझ्याबरोबर. आम्ही यायला तयार आहोत.'' रात्री धृतराष्ट्र, गांधारी दोघेही विदुरजींच्या बरोबर राजवाड्याबाहेर पडलेले आहेत. प्रातःकाल झाल्यानंतर रोजच्या नियमाप्रमाणे, धृतराष्ट्र, गांधारी, विदुर यांना नमस्कार करून सभेमध्ये जाण्याकरता धर्मराज निघाले. इथे येऊन पाहताहेत तर कोणीच नाही. संजय तेवढा बसलेला होता एका बाजूला. त्याला विचारलं धर्मराजांनी, ""हे आमचे पिताजी कुठे गेले, माता गांधारी कुठे गेली बाबा? यांनी आजपर्यंत आमचं संरक्षण केलं म्हणाले.'' संजयाला सुद्धा काही माहिती नाही. तो म्हणाला, ""मला सुद्धा काही माहित नाही. कुठं गेले. कुणाला ठाऊक.'' इतक्यात नारद महर्षि आले. त्यांची पूजा करून धर्मराजांनी त्यांना विचारले, ""हे गेले कुठे म्हणाले हे तिघेही.'' नारद म्हणाले, ""बाबा, शोक कशाला करतोस. त्यांचं संरक्षण तू करतोस का म्हणाले. ईश्वरच, सर्वांचं संरक्षण करणारा आहे.
स संयुनक्ति भूतानि स एव वियुनक्ति च ।।
1.13.40 ।। श्री. भा.
प्रेमळ मंडळींना एकत्र आणणे पुन्हा एकत्र आणणे आणि पुन्हा बाजूला करणे हे कार्य त्या परमेश्वराचं आहे. तेव्हा मनामध्ये तू आता दु:खी होऊ नकोस. देह हा पंचभौतिक आहे, कालाच्या अधीन असलेला. तो दुसऱ्याचं संरक्षण कसा करू शकेल म्हणाले. देवाचं कार्य सगळं भगवंतांनी
केलेलं आहे. काही थोडं शिल्लक राहिलेलं आहे.'' तोपर्यंतच तो परमात्मा याठिकाणी राहणार आहे असे नुसतं सूचक बोलले आहे. प्रत्यक्ष सांगितलेलं नाही. आणखी सांगताहेत, ""धर्मराज, धृतराष्ट्र हा आपल्या पत्नीला, गांधारीला बरोबर घेऊन, विदुरजींच्या बरोबर हिमालयामध्ये गेलेला आहे. गंगा नदीचे सात प्रवाह त्याठिकाणी झालेले आहेत, सप्तस्रोततिर्थ, त्याठिकाणी ते जाऊन राहिलेले आहेत. नित्य स्नान करताहेत, तिथं केवळ जलाचा आहार आणि भगवान श्रीहरीचं चिंतन त्यांचं चाललेलं आहे. आसनाचा जय झालेला आहे, प्राणवायूचा जय झालेला आहे. इंद्रियांचा जय झालेला आहे. हरिचिंतनामुळे रजोगुण, तमोगुण सगळे दूर झालेले आहेत. केवळ आत्मचिंतनामध्येच त्यांचा काळ चाललेला आहे. माया मोहातून ते मुक्त झालेले आहेत. आजपासून पाचव्या दिवशी त्यांच्या झोपडीला आग लागणार. धृतराष्ट्राचं शरीर दग्ध होऊन जाणार आहे आणि त्या अग्नीमध्ये साध्वी गांधारीही आपला देह अर्पण करणार आहे. विदुरजी दुसरीकडे तीर्थयात्रेकरता निघून जाणार आहेत. तू आता जाऊन त्यांना काही त्रास देऊ नकोस आणि काही उपयोगही नाही.'' हे नारदांनी धर्मराजाला सांगितलं.
यादवांचं एकंदर क्षेमकुशल समजून घेण्याकरता, अर्जुनाला धर्मराजांनी द्वारकेमध्ये पाठविलेलं आहे. सहा सात महिने झाले तरी अर्जुन परत आलेला नाही, काल बदललेला आहे. त्याच्या दृष्टीला पडले. अर्जुन परत आलेला नाही पाहून धर्मराज भीमाला म्हणाले, ""बाबा अर्जुनाला द्वारकेला पाठवून पाच सात महिने झाले, अजून काही तो परत आलेला नाही. नारद महर्षि काही तरी बोलले खरं सूचक, काय श्रीहरी निजधामाला गेले काय? काय भयंकर अपशकुन होत आहेत. काय करावं, काय स्थिती आहे काही समजत नाही'', मोठा दु:खी झालेला आहे धर्मराज. इतक्यात अर्जुन येऊन पोहचलेला आहे. पायावर मस्तक ठेवलं, नमस्कार केला. एका बाजूला खाली मान घालून, अर्जुन उभा राहिलेला आहे. डोळ्यातून अश्रुधारा सारख्या चाललेल्या आहेत. धर्मराजालाही एकदम काहीतरी धक्का बसला, काय झालं, अर्जुनाला विचारलं त्यांनी, ""बाबा, काय आहे स्थिती, वसुदेव देवकी, त्याचप्रमाणे रामकृष्ण प्रद्युम्न त्यांची मुलं सर्वही यादव मंडळी त्यांच्या स्त्रिया मुलंबाळं सर्वांच कुशल क्षेम आहे ना बाबा. काय स्थिती झाली. तुला दु:ख का झालं. तुझा कोणी अपमान केला काय? कोणाचं तरी संरक्षण करण्याची प्रतिज्ञा करून तुझ्याकडून त्याचं संरक्षण केलं गेलं नाही काय? काय आहे ते सांग मला.'' याप्रमाणे धर्मराजांनी अर्जुनाला विचारलेलं असताना फार दु:ख झालेलं आहे, कृष्ण वियोग झाला. बराच वेळ आणखी अश्रुधारा चाललेल्या आहेत. थोड्या वेळाने ते दु:ख कमी झाल्यानंतर, डोळे पुसले अर्जुनाने, भगवान श्रीहरीचं
ते प्रेम आहे, मैत्री आहे, हे सर्व आठवण झाली आणि अर्जुन बोलू लागला,
वंचितोऽहं महाराज हरिणा बंधुरूपिणा ।
येन मेऽपहृतं तेजो देवविस्मापनं महत् ।।
1.15.5 ।। श्री. भा.
भगवान श्रीहरींनी मलाही शेवटी फसविले म्हणाले, गेले निघून, माझं तेजही घेऊन गेले. ज्याच्या आश्रयामुळे प्रसादामुळे, द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळेला तो मत्स्यभेद करण्याचा पण जिंकून द्रौपदीला मी मिळविलं. खांडववन अग्नी नारायणाला पाहिजे होतं. पण भगवान गोपालकृष्ण रथामध्ये बसलेले होते. आणि सबंध ते वन अग्निनारायणाला दिलेलं आहे. तृप्त झाले, अग्निनारायण. त्याचप्रमाणे आपला बंधू, भीमसेन, आम्ही तिघे गेलो होतो, जरासंधाच्या राजधानीमध्ये. जरासंधाबरोबर युद्ध करून त्या भीमाने शेवटी त्याचा नाश केला, गोपालकृष्णांची कृपादृष्टी होती म्हणून हे घडलेलं आहे. द्रौपदीच्या केशपाशाला धरून त्या दुःशासनाने आणले होते, तिचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, ह्या सर्वही कौरवांचा नाश त्या भगवंतांच्या कृपेमुळेच आम्हाला करता आला. अशी पुष्कळ संकटं आली त्या संकटातून आम्ही मुक्त झालो. आज भगवान श्रीहरी आम्हाला सोडून गेलेले आहेत. रस्त्यातून येता येता, काही यादवांच्या स्त्रिया, लहान मुलं, म्हातारी मंडळी घेऊन येत असताना मला काही भिल्ल लोकांनी गाठलं, माझा पराभव केला. असा पराभूत होऊन मी आलेलो आहे. विप्रशाप झाला यादवांना. मदिरापान करून अत्यंत उन्मत्त झालेल्या यादवांचं युद्ध झालेलं आहे. सर्वांचा नाश झालेला आहे. चार पाच यादव शिल्लक राहिले. त्या परमेश्वराचीच इच्छा आहे म्हटलं पाहिजे. संरक्षणही एकमेकांचं करतात आणि नाशही करतात. यादवांच्या कडूनच यादवांचा नाश केला भगवंतांनी. भूभार दूर केलेला आहे. अशा रितीने भगवान कृष्णांचं स्मरण करतो आहे. अर्जुन सांगतो आहे. त्या भगवंताच्या भक्तीमुळे, त्याचं चित्त अत्यंत निर्मळ झालेलं आहे. संग्रामाच्या आरंभी जे ज्ञान भगवंतांनी त्याला दिलेलं होतं ते आत्ता एकदम त्याच्या चित्तामध्ये प्रगट झालेलं आहे. त्या ज्ञानाच्या प्रभावाने, सर्व शोक दूर झालेला आहे.
भगवान श्रीहरी वैकुंठलोकाला गेले हे धर्मराजांनी ऐकल्याबरोबर त्यांनीही ठरविले, आपणही प्रयाण करावे म्हणाले, उत्तर दिशेला निघून जावे. कुंतीनेही हे सर्व ऐकले. भगवंताचं चिंतन करीत तिनेही तसेच ठरवून तीही संसार बंधनातून मुक्त झालेली आहे. धर्मराज, शुद्ध त्यांचं चित्त झालेलं आहे, सिंहासनावरून खाली उतरलेले आहेत. परिक्षीत राजा वयामध्ये आलेला होता, त्यालाच राज्याभिषेक केला त्यांनी आणि निघाले. सर्व अलंकार, वस्त्रं काढून टाकलेली आहेत. कोणाबरोबरही
भाषण केलं नाही आणि लगेच नगरातून बाहेर पडले, निघाले हिमालयाकडे. त्याचे चारही बंधू, द्रौपदी हेही त्यांच्या पाठीमागून निघालेले आहेत. विदुरजींनी आपला देह प्रभास क्षेत्रामध्ये टाकलेला आहे, आणि ते आपल्या यमलोकात निघून गेलेले आहेत. द्रौपदीचाही उद्धार झाला. भगवंतांच्या कृपेने पांडवांचे हे कार्य उत्तम झालेलं आहे. परिक्षीत राजा सर्व ऋषिमंडळींच्या मार्गदर्शनाप्रमाणे उत्तम राज्यकारभार करू लागला. जनमेजय वगैरे त्याला चार मुलं होती. उत्तरेची कन्या इरावती हिच्याबरोबर त्याचा विवाह झाला. अश्वमेधादिक यज्ञ त्यांने केलेले आहेत, कृपाचार्यांना गुरु करून. तो एकदा रथामध्ये बसून आपल्या राष्ट्रामध्ये अवलोकन करण्याकरता निघालेला आहे. कोण कोण मंडळी कशी आहेत, कोणाला काय काय दु:ख आहे. असा तो निघालेला असताना प्रत्येक ठिकाणी सर्व लोकांनी त्याचा मोठा सत्कार केलेला आहे. हा कृष्णांचा भक्त मोठा आहे आपला राजा. याचे पिताजी वगैरे, पांडवही मोठे कृष्णभक्त होते, कृष्णांनी त्या पांडवांचं संरक्षण केलेलं आहे. सर्व लोकांच्या मुखातून हे सर्व परिक्षीत राजाला ऐकायला मिळाले. असं जाता जाता एका ठिकाणी, नदीतीरावरती एक बैल आहे, एक गाय आहे. आणि त्या बैलाला काठीने मारणारा एक कोणीतरी आहे, राजवेष धारण करून त्याला मारतो आहे. त्या परिक्षीत राजाने त्या वृषभाला विचारले, वृषभ म्हणजे बैल, धर्मच या वृषभरूपाने होता. आणि गोरूपी पृथ्वी होती. त्यांनाही अत्यंत दु:ख झालेलं आहे, कृष्णवियोगामुळे संरक्षण करणारा कोणी नाही. आणि तो मारणारा म्हणजे कलि होता. तेव्हा अत्यंत दु:खामध्ये ते आहेत, अत्यंत कष्ट त्यांना होत आहेत. पृथ्वीला दु:ख आहे, त्या धर्माला दु:ख आहे. परिक्षीत राजाच्या दृष्टीला हा प्रकार पडलेला आहे. हा कोणीतरी क्षुद्र हातामध्ये काठी घेऊन मारतो आहे या वृषभाला. रथ थांबवला परिक्षीत राजाने आणि विचारले,
कस्त्वं मच्छरणे लोके बलाद्धंस्यबलान् बली ।।
1.17.5 ।। श्री. भा.
अरे या माझ्या देशामध्ये ह्या दुर्बळ अशा प्रकारच्या या जीवांना त्रास देणारा तू कोण आहेस? श्रीकृष्ण दूर गेले, अर्जुन सुद्धा दूर गेलेला आहे म्हणून तू या ठिकाणी या लोकांना त्रास देतोस? त्या धर्मालाही विचारलं, आपले पाय असे का झाले? तीन पाय नसताना, एकाच पायाने आपण चालता, कोण आहे आपल्याला त्रास देणारा? आपण सांगा. ज्याच्या राष्ट्रामध्ये प्रजाजन संकटामध्ये राहतात त्याची कीर्ति, आयुष्य संपून जाते आहे. कोण आहे तुम्हाला त्रास देणारा? तो धर्मच होता तो कसं सांगेल, तो म्हणाला कोणी दु:ख दिलं, कसं सांगायचं बाबा? कर्माने दु:ख होतं, असं काही लोक म्हणतात दुर्जन दु:ख देतात असं काही लोक सांगतात. तूच विचार करून ठरव
म्हणाले. परिक्षीत राजाच्या लक्षामध्ये आलं, की हा साक्षात धर्म पुरुष आहे. दुसऱ्याचे दोष सुचविणं म्हणजे हाही दोषच आहे. शेवटी धर्माचे चार पाय जे आहेत, तप, शौच, दया आणि सत्य हे धर्माचे चार पाय म्हणजे चार रूप आहेत. अधर्माचरणानं तीन पाय नाहीसे झाले होते, फक्त सत्य तेवढा राहिला होता, आणि त्यात कलि त्रास देतो आहे. ही गोरूपी पृथ्वी आहे. हा कलि आहे हे लक्षात आल्याबरोबर परिक्षीत राजाने आपली तलवार म्यानातून बाहेर काढली आणि त्या कलीला मारून टाकायचं ठरवलं, शासन करायचं आहे. तोही शरण आलेला आहे, पायावर डोकं ठेवलं त्या कलीने, ""राजेशाहेब मी आपल्याला शरण आलेलो आहे. मला आपण मारू नका.'' त्यांनी त्याला सांगीतले, ""माझ्या या देशात तुला राहता येणार नाही. तू ज्या ठिकाणी राहशील त्या ठिकाणी लोभ, असत्य, हे दुर्गुण जे आहेत, दोष जे आहेत ते वाढणार आहेत. तू माझ्या देशात राहू नकोस. या ब्रह्मावर्त क्षेत्रामध्ये अनेक ऋषि मंडळी यज्ञयाग वगैरे करताहेत, ईश्वराच्या प्राप्तीकरता. इथे तुला राहता येणार नाही.'' कलीने सांगितले ""राजेशाहेब कुठं तुम्ही मला सांगाल तिथे मी राहतो.'' त्याने काही स्थानं त्या कलीला राहण्याकरता दिलेली आहेत. द्यूतगृह आहे, मद्यपानाचे गृह आहे, हिंसा ज्या ठिकाणी चाललेली आहे त्या ठिकाणी, शेवटी सुवर्ण हे एक स्थान त्या कलीला राहण्याकरता दिलेलं आहे. त्या सुवर्णामुळेच सर्व विकार मनामध्ये निर्माण होतात. परिक्षीत राजाच्या आज्ञेप्रमाणे इतरत्र कलि दुसरीकडे कोठे जाऊ शकत नाही. तो असे पर्यंत कलीला अधर्माचा प्रसार करता आलेला नाही. धर्मपुरुषाचे चारही पाय त्याने योग्य रितीने केले म्हणजे स्थापना केली. तप आहे, शुचिता आहे, दया आहे यांचा प्रचार सर्वत्र झालेला आहे. असा हा राजा, राज्य करतो आहे.
सूत सांगताहेत ऋषींना तुम्ही त्याच्याच राज्यामध्ये यज्ञ-याग वगैरे चालू ठेवा. परिक्षीत राजाला शुकाचार्यांच्या मुखातून भागवत ऐकायला मिळाले, आणि त्याने आपल्या शरीराचं विसर्जन केलेलं आहे. ज्या दिवशी परिक्षीत राजाने देहत्याग केला, किंवा तो या देहातून मुक्त झालेला आहे त्यादिवशीच एकदम कलीचा प्रभाव वाढलेला आहे. चांगली कर्मे जर केली, सत्कर्मे जर केली तर त्याचं फळ मिळतं, असा या कलीचा एक गुण आहे.
परिक्षीत राजाचं चरित्र आपल्याला सांगताहेत. परिक्षीत राजा एके दिवशी शिकारीकरता अरण्यामध्ये गेला. पुष्कळ शिकार केली, मध्यान्ह काल झालेला आहे. भूक लागली, तहान लागली, राजधानीकडे येण्याकरता निघाला वाटेत ऋषींचा आश्रम त्यांनी पाहिला. पाणी पिण्याकरता म्हणून आला आतमध्ये. ते ऋषि डोळे मिटून ध्यानस्थ बसले होते. शमीक ऋषि, सर्व इंद्रिय, प्राण मन वगैरेचा निग्रह करून समाधी अवस्थेमध्ये असताना परिक्षीत राजाला अतिशय तहान लागलेली
आहे. पाणी-पाणी म्हणतो आहे. सार्वभौम राजा होता, परंतु त्या आश्रमामध्ये त्याला पाणी कोणीही दिलेलं नाही. कोणी नव्हतंच तिथे. आश्रमामध्ये नोकरचाकर कोण असणार? मुलं कोठे तरी गेली होती, खाली नदीवर खेळायला. राजाला वाटलं आपला अपमान केला मुद्दाम यांनी. राग आलेला आहे त्याला. पाणी तर मिळालंच नाही. राजधानीला जाता जाता एक साप मरून पडलेला होता. तो त्यानी उचलला आणि त्या ऋषींच्या गळ्यामध्ये अडकवला. खरंच समाधी लावून बसले का खोटं आहे, ही परिक्षा करण्याकरता, त्या ऋषींना काहीच कल्पना नाहीये. इतक्यात ते कोणीतरी पाहिलं, खाली नदीतीरावर त्या ऋषींचा कुमार जो आहे, खेळत होता लहान मुलांबरोबर बालक्रीडा चाललेल्या आहेत. ""तुझ्या बापाच्या गळ्यामध्ये राजाने साप अडकवलेला आहे, साप जिवंत आहे का मेला हे या सांगणाऱ्यांनीही पाहिले नाही. त्या मुलाने हे ऐकल्याबरोबर त्याला अत्यंत राग आलेला आहे. मुंज नुकतीच झाली होती. आचरण, मंत्र-जप नित्य चालू आहे. लाल डोळे झाले त्या बालकाचे. श्रीकृष्ण हे आपल्या स्थानामध्ये गेल्यामुळे हे राजे लोक अत्यंत उन्मत्त झालेले आहेत त्यांना शासन केले पाहिजे. पहा माझं बल कसं आहे? हातामध्ये पाणी घेतलं आहे. नदीचं जल आणि विधिवत त्यांनी सोडलं.
""आपली मर्यादा ज्या राजाने सोडलेली आहे आणि ज्याने माझ्या पित्याचा उपमर्द केला त्याला आजपासून सातव्या दिवशी नागराज तक्षकाने दंश करून त्याचा नाश करावा''. पाताल देशाचा राजा आहे तक्षक. हा बालक आपल्या आश्रमात राहतो आहे आणि सार्वभौम राजाचा नाश करण्याची आज्ञा त्या तक्षकाला करतो आहे. काय वाणीचं सामर्थ्य आहे, तपोबल आहे. आला, वर आलेला आहे तो बालक. बापाच्या गळ्यामध्ये साप पाहून त्याला वाटलं, पित्याचा नाश झालेला आहे, रडू लागला तो बालक. सावध झालेले आहेत ते ऋषीमहाराज. डोळे उघडले, तो गळ्यामध्ये असलेला साप त्यांनी टाकून दिला. कोणी घातला, काही चौकशी केली नाही. मुलाला विचारलं ""बाळ काय झालं, रडतोस का? कोणी तुला त्रास दिलेला आहे?'' सगळा घडलेला वृत्तांत त्या ऋषींना सांगितला आहे की असं असं समजलं म्हणाला, तुम्हाला त्रास दिला असं समजलं. त्याला शाप दिला, यासाठी, ""अरे अरे'' म्हणाले - आपल्या मुलाबद्दल त्यांना फार राग आलेला आहे, ""काय'' म्हणाले ""केलंस? अपराध किती थोडा त्याबद्दल दंड किती केलास? देह दंडाची शिक्षा तू दिलीस. अपरिपक्व बुद्धी. या मुलाची बुद्धी परिपक्व नाही. सामर्थ्य मिळालेलं आहे. पण संयम नाही. परमेश्वराची क्षमा मागितली. राजाला हे लगेच सांगितले पाहिजे. काही पुढची व्यवस्था करेल. स्वतःचा उद्धार करेल, म्हणून आपल्या शिष्यांना, राजधानीमध्ये त्यांनी
पाठवून दिलेलं आहे. परिक्षीत राजा राजधानीमध्ये, राजवाड्यात आलेला आहे आणि त्याला पश्चाताप झाला आहे. आपल्या हातून हे असं कसं घडलं? असे श्रेष्ठ तपस्वी पुरुष त्यांचा अपमान मी केलेला आहे. ईश्वराने काहीतरी शासन मला केलं पाहिजे. असा तो विचार करतो आहे, इतक्यात ऋषींचे शिष्य तिथे आलेले आहेत. त्यांनी सांगितलं, ""राजेशाहेब ऋषिकुमारांचा शाप आपल्याला झालेला आहे, सातव्या दिवशी आपल्याला मृत्यू येणार आहे.'' एकदम त्याला वैराग्य उत्पन्न झालं. पूर्वीपासूनच होतं. भगवद्भक्ती अंत:करणामध्ये वंशपरंपरेने प्राप्त झाली. मुलाच्या स्वाधीन राज्य केलं. बाहेर आला राजा, गंगातीरावर आसन घालून बसलेला आहे. काय ईश्वर इच्छा असेल, ईश्वर आपला कसा उद्धार करणार, ईश्वरावर सर्व भार घालून तिथे बसून राहिला आहे. सर्व ऋषिमंडळी मोठी मोठी त्या ठिकाणी आली, हा राजा मोठा धर्मशील होता. सात दिवस या ठिकाणी बसून राहणार आहे, आपणही याला काही कथा सांगू, असं मनाचं समाधान करण्याकरता सर्व ऋषिमंडळी आली. परिक्षीत राजाने त्यांना विचारले, ""ऋषीमहाराज, ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे. त्यांनी काय करावे? आणि काय करू नये? एवढे मला सांगा. ऋषि मंडळींच्यामध्ये वाद-विवाद सुरु झाले. कोणी म्हणाले यज्ञ करावे, कोणी म्हणाले दानधर्म करावा, कोणी म्हणाले समाधीचा अभ्यास करावा. निर्णय काही यातून मिळेना.
इतक्यात शुकाचार्य महाराज त्या ठिकाणी येऊन पोहचलेले आहेत. परिक्षीत राजाचं मोठं पूर्वसुकृत आहे, अनेक जन्मांचं पुण्य आहे. आपल्याहून ब्रह्मज्ञानी, भगवद्भक्त शुकाचार्य तिथे आलेले आहेत. सोळा वर्षाचं वय आहे, अत्यंत सुंदर शरीर आहे. दिगंबर अवस्था! वस्त्र नाही, काही नाही. अंत:करणामध्ये भगवंताचे अखंड चिंतन चाललेलं आहे. शामवर्ण आहे. सर्व ऋषिमंडळी शुकाचार्यांना पाहिल्याबरोबर एकदम उठून उभी राहिली आहेत. राजाने त्यांची पूजा केली. आसनावर ते बसलेले आहेत. त्यांनाही त्यांनी हाच प्रश्न विचारलेला आहे. ""अनायासे आपली संगती मला लाभली, ईश्वरकृपेने, मला काही मार्गदर्शन करा. मृत्यू जवळ आलेला आहे माझा. काय करावं, माझं कर्तव्य मला समजावून सांगा. कोणाचं स्मरण करावं, कोणाचं भजन करावं. हे सगळं सांगा. आपण जास्त वेळ गृहस्थाश्रमी पुरुषाच्या घरामध्ये राहात नाही असं मला समजले. गाईची धार काढायला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ थांबायचे.''
समर्थांनी सुद्धा हाच मार्ग घालून दिलेला आहे. ते मनाचे श्लोक म्हणत घराबाहेर उभे राहायचे, तो श्लोक म्हणे पर्यंत कोणी भिक्षा दिली तर घ्यायची, नाहीतर पुढचा रस्ता, म्हटलं तर
अयाचित वृत्ती आहे. नाहीतर याचनाही आहे, देवाच्या कार्याकरता.
शुकाचार्य महाराज मुद्दाम त्याच्या उद्धाराकरताच आलेले आहेत. त्यांचा नियम वगैरे असला तरी अशा वेळेला नियमाला अपवाद आहे. संपूर्ण भागवत त्याला सांगण्याकरता ते आलेले आहेत.
त्यांनी बोलायला आरंभ केला, राजा,
वरीयानेष ते प्रश्नः कृतो लोकहितो नृप ।
आत्मवित्संमतः पुंसां श्रोतव्यादिषु यः परः ।।
2.1.1 ।। श्री. भा.
मृत्यू जवळ आलेल्या जीवांनी काय करावे? मृत्यू जवळच आहे नेहमी, पण तुला आज जाणीव झालेली आहे. काय करावं? मृत्यूच्या भितीने, अगोदर जितकं करता येईल तितकं करावं म्हणून तू प्रश्न विचारतो आहेस. चांगले आहे. पुष्कळ ऐकण्यासारख्या गोष्टी आहेत. आत्मतत्त्वाचं जोपर्यंत ज्ञान झालेलं नाही, तोपर्यंत पुष्कळ ऐकलं काय आणि काही केलं काय, त्याचा काही उपयोग नाहीये. शंभर वर्षांपैकी दिवसा अर्थार्जन करणं, संसार करणं, व्यवहार करणं याच्यात काल जातो. रात्रीमध्ये विषय भोग आहे. झोप आहे. याच्यामध्ये रात्रीचा काल जातो. आपला स्वतःचा देहसुद्धा स्थिर नाही. त्याला माहिती आहे, सर्व परिवार सर्वही आणखी विनाशी आहे. पण माणसाचं याकडे लक्ष जात नाही. असा विचारही मनामध्ये येत नाही. याकरता बाबा
तस्मात् भारत सर्वात्मा भगवान् ईश्वरो हरि: ।
श्रोतव्यः कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्चेच्छताभयम् ।।
2.1.5 ।। श्री. भा.
सर्वात मोठी भिती मृत्यूची आहे. सर्व भिती दूर होण्याकरता, भगवान श्रीहरीच्या लीला ऐकल्या पाहिजेत, त्याचं स्मरण अखंड केलं पाहिजे. हेच सर्व शास्त्राचे सार आहे.
जन्मलाभः परः पुंसामंते नारायणस्मृतिः ।।
2.1.6 ।। श्री. भा.
अंतकाली नारायणाचे स्मरण केलं पाहिजे म्हणजे जन्मभर तो अभ्यास केला पाहिजे. जन्मभर विषयाचा आणि व्यवहाराचा अभ्यास आणि अंत:काली स्मरण कशाचं होणार? त्याचंच होणार. मोठे मोठे महात्मे विधिनिषेधातीत झालेले, परंतु भगवान श्रीहरीचे गुण वर्णन करणं, श्रवण करणं याच्यामध्येच त्यांचा काल जातो. हे भगवंताचे अनंत गुण ज्याच्यामध्ये आहेत, अशा प्रकारचं भागवत नावाचं पुराण, वेदतुल्य, याचा अभ्यास मी पिताजांपासून केलेला आहे. गुणातीत अशा प्रकारचं ब्रह्मतत्त्व जे आहे, निर्गुण निराकार त्याचं चिंतन करणारा मी पण भगवंताची लीला
माझ्या कानावर पडल्याबरोबर मी इकडे वळलेलो आहे. याचा अभ्यास केला.
तदहं तेऽभिधास्यामि महापौरूषिको भवान् ।
यस्य श्रद्दधतामाशु स्यान्मुकुंदे मतिः सती ।।
2.1.10 ।। श्री. भा.
हे भागवत तुला सांगण्याकरता मुद्दाम मी आलेलो आहे राजा. मोठा भगवद् भक्त तो आहे. भगवान श्रीहरींच्या कृपेने अंत:करण प्रेममय होऊन जातं आहे याच्या श्रवणामुळे. पुष्कळ आयुष्य मिळालं म्हणाले. परमेश्वराकडे बिलकुल लक्ष नाही. काय उपयोग त्या आयुष्याचा. थोडं जरी आयुष्य मिळालं तरी आपण तेवढ्या कालामध्ये आपल्याला भगवंताचं स्मरण जर घडलं तर आपलं कल्याण होईल. "खट्वांग' नावाचा एक राजर्षि होता. देवांनी त्याला सांगितले, तुझं आयुष्य एक मुहूर्त राहिलेलं आहे, दोन घटका म्हणजे एक घंटा, एक तास सुद्धा नाही. पण त्याचं मन त्याच्या ताब्यामध्ये होतं. शुद्ध मन असल्यामुळे, त्या तेवढ्या कालामध्ये भगवंताचं ध्यान त्यांनी सुरु केलं. त्यासमाधी अवस्थेमध्ये देहपात झाला. मुक्त झाला तो. तुला तर सात दिवस आहेत अजून म्हणाले. तुला भिण्याचे काय कारण आहे? अंतकाल जवळ आलेला असताना, निर्भयपणाने मनातल्या सर्वही कामना, वासना दूर करून, परमेश्वराचे चिंतन केलं पाहिजे. एकांत स्थानामध्ये बसून मनाने भगवंताचं ध्यान करायला आरंभ करावा. विषयाकडे जाणारे इंद्रियही आवरावीत. बुद्धीच्या सहाय्याने, कर्माने, विषयाकडे जाणारे जे मन आहे, ते शुभ ठिकाणी, भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करावे. भगवंताच्या चरणापासून मुखापर्यंत सर्वही अवयव जे आहेत त्या अवयवांचे ध्यान करावे. मनातले विषय सगळे दूर करावे. रजोगुण, तमोगुण ध्यानाच्या अभ्यासामुळे कमी होतात.
राजाने विचारले महाराज, ध्यान करताना मनाची धारणा कशी असावी ? ध्यान करताना मन कुठे असावं ? कोणाचं ध्यान करावं सांगा ? शुकाचार्य सांगताहेत
जितासनो जितश्वासो जितसंगो जितेन्द्रिय: ।
स्थूले भगवतो रूपे मनः सन्धारयेद्धिया ।।
2.1.23 ।। श्री. भा.
ध्यानाचा अभ्यास करण्यापूर्वी, काय काय एकंदर, योग्यता कशी पाहिजे ? आसनजय प्रथम झाला पाहिजे. कमीत कमी तीन तास तरी एका आसनावर बसता आलं पाहिजे. प्राण जय झाला पाहिजे. पूरक-रेचक बंद होऊन कुंभक फक्त राहिलं पाहिजे. मनामध्ये कोणाबद्दलही संग उपयोग नाही. नि:संग मन झालं पाहिजे. इंद्रियाचा जय झाला पाहिजे. असा अधिकार प्राप्त झाल्यानंतर
हे भगवंताचं स्थूल रूप जे आहे, विश्वरूप, त्याचंच ध्यान करायला सांगितलं आहे. सूक्ष्मरूपाचं ध्यान करण्याचा अधिकार मिळायला फार वेळ आहे. पांचभौतिक जे विश्व दिसतं आहे, हा परमेश्वराचा देह आहे, शरीर आहे. पाताललोकापासून, सत्यलोकापर्यंत म्हणजे ब्रह्मलोकापर्यंत हे सगळे त्याचे अवयव आहेत. हे चिंतन करायचं आहे. सर्व ही एकंदर जीवात्मे, सर्व शरीरे जीवांची देव काय, गंधर्व काय, मानव काय, दानव काय सगळेही त्याचंच स्वरूप आहे. अशा रितीने चिंतन करायचं आहे, ध्यान करायचं आहे. म्हणजे यासाठी मन स्वस्थ पाहिजे, स्थिर पाहिजे. ही विश्वरूपाच्या ठिकाणी चित्ताची धारणा ज्यांनी केली, ब्रह्मदेवाने हा अभ्यास केलेला आहे. विश्वरूपी परमेश्वराचंंच ध्यान केलं. स्थूल रूपाचं ध्यान, त्यांना सवय झालेली आहे मनाला. सूक्ष्मरूपाकडे ध्यान जात नाही. त्या मूर्त रूपाचंच ध्यान करायचंय. त्या ध्यानामध्ये मन स्थिर होण्याकरता, विषयाची इच्छा बंद झाली पाहिजे, वैराग्य झालं पाहिजे. देहाची चिंता राहून उपयोग नाही. हे सगळं त्यांनी सांगितलं. भगवंताचं हे जे दुसरं रूप आहे, चतुर्भुज रूप, सगुणरूप याचंही ध्यान करणारे काही काही मंडळी आहेत. शंख चक्र गदा पद्म धारण करणाऱ्या परमेश्वराचं मुख प्रसन्न आहे. कमलाप्रमाणे मोठे नेत्र आहेत. पीतांबरधारी, त्या स्वरूपाचं चिंतनही काही काही लोक करतात. तोही सगुणरूप सुद्धा स्थूलच आहे. मूर्त नाही. आपल्या मनामध्ये खरा भक्तियोग निर्माण होईपर्यंत हे भगवंताचं स्थूल रूप जे आहे त्याचंच ध्यान करावं.
यावन्न जायेत परावरेऽस्मिन् विश्वेश्वरे द्रष्टरि भक्तियोग: ।
तावत् स्थवीयः पुरुषस्य रूपं क्रियावसाने प्रयत: स्मरेत ।।
2.2.14 ।। श्री. भा.
कर्तव्य कर्म पुष्कळ आपली असतात म्हणाले. मध्ये जर वेळ मिळाला तर या भगवंताच्या स्वरूपाच्या ध्यानाचा अभ्यास त्यांनी करावा. मनाला विषयापासून बाजूला करण्याचा अभ्यास या ध्यानाच्या योगाने होतो. असा हा अभ्यास झालेला असताना, शरीर त्याग करण्याची त्याला जर इच्छा झाली, तर तो योगीमहात्मा, ध्यानयोगी, तो आपल्या शरीरातून जो प्राणवायू शरीरात वाहणारा आहे, त्या प्राणवायूच्या आधाराने सगळी इंद्रियं आहेत, मन वगैरे आहे, त्याला उर्ध्वगती तो देतो आहे. मूलाधार चक्र आहे सर्वात खाली, त्याच्यावरती असलेलं स्वाधिष्ठान जे चक्र आहे, लिंगस्थानात असणारं त्या प्राणवायूला तो तिथपर्यंत नेतो. त्याच्याही वर नाभीस्थानात मणिपूर चक्र म्हणून आहे. तिथपर्यंत तो प्राण येतो. नंतर हृदयामध्ये अनाहत चक्र आहे. या चक्रातून वक्षस्थलामध्ये विशुद्धी चक्र आहे. आणि हळू हळू तो वायू वरती गेलेला असताना आपल्या टाळू