« Previous | Table of Contents | Next »
पान ६१

त्यांच्या लक्षात आले. अश्वत्थाम्याला निदान बंदीखान्यात ठेवायला हवे होते म्हणाले, चुकले आमचे. जीवदान दिलं. द्रौपदीच्या समाधानाकरता. त्याला सोडायला नको होतं. त्याच अश्वत्थाम्याने आणि या उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग केलेला आहे. ब्रह्मास्त्राचा प्रयोग कोणावर करायचा, कोणावर नाही, केव्हा करायचा, हे सगळे शास्त्रीय नियम आहेत. धर्मयुद्ध लक्षातच नाहीये. क्रोध मनामध्ये उत्पन्न झाल्यामुळे त्याला काही विचार राहिलेला नाहीये. पांडवांच्या अंगावरही पाच बाण आले, ब्रह्मास्त्रामुळे. सुदर्शन अस्त्राने सर्व बाणांचा नाश केला. उत्तरेला सांगितलेलं आहे, जा म्हणाले तू. अंत:पुरामध्ये आनंदात रहा. तुझ्या गर्भाचा नाश होणार नाही. निश्चित रहा म्हणाले. हा तुझा मुलगा होणार आहे, तुम्हा सगळ्यांना सुखी करणार आहे. तिला पाठवून दिलेलं आहे आणि भगवान श्रीहरींनी त्या उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केलेला आहे, सूक्ष्मरूपाने.

ब्रह्मास्त्र म्हणजे अमोघ आहे. त्याचा प्रतिकार कोणीही करू शकत नाही. त्याच्यावरती अर्जुनाला ब्रह्मास्त्रच सोडावं लागलं. असं हे ब्रह्मास्त्र आणि ते गर्भामध्ये गेलेलं आहे. तिथं दुसऱ्या अस्त्राचा प्रयोग करणं म्हणजे धोक्याचं आहे. अर्जुनसुद्धा काही करू शकणार नाही. त्यामुळे भगवान श्रीहरींनी त्या उत्तरेच्या गर्भा मध्ये प्रवेश केलेला आहे. नऊ महिने ते त्या गर्भामध्ये राहिलेले आहेत. त्या मुलाचं संरक्षण करताहेत. सर्व बाजूला पसरलेलं ते ब्रह्मास्त्राचं तेज आपल्या गदेने नाहीसं करताहेत. मुलाला त्या तेजाचा स्पर्श होऊ नये म्हणून. हे काय मातेला तरी करता येईल काय? तो महात्मा परिक्षीत राजा केवढा पुण्यवान असला पाहिजे की त्याच्याबरोबर भगवान श्रीहरी नऊ महिने गर्भात राहिलेले आहेत. त्यांना गर्भवास नाहीये, भगवंताला कर्म नाही म्हणून जन्म नाही. ही जन्म कर्मे दाखविली ही दिव्य आहेत. जीवांच्या प्रमाणे नाहीयेत. ही सगळी व्यवस्था लावून दिलेली आहे.

आणखी निघाले पुन्हा द्वारकेला जाण्याकरता. आपली आत्याबाई कुंतीच्या जवळ आले. आता येतो म्हणाले, पुष्कळ दिवस झाले म्हणाले. तुमची मुलं आता राज्यकारभार करतील. तुम्हालाही आनंद दिसेल सगळा. आता जातो म्हणाले मी द्वारकेला. गोपालकृष्ण कोण आहेत याचे ज्ञान कुंतीला उत्तम होते. हा आपला भाचा आहे असं नाही. भावाचा मुलगा असं ती समजत नाही. त्या कुंतीने स्तुती केलेली आहे.

नमस्ये पुरुषं त्वाऽऽद्यं ईश्वरं प्रकृतेः परम् ।
अलक्ष्यं सर्वभूतानां अंतर्बहिरवस्थितम् ।।
1.8.18 ।। श्री. भा.

हे ईश्वराचं स्वरूप आहे. आदि पुरुष आपण आहात, सृष्टी रचना आपल्यापासून झालेली आहे. प्रकृतीचं नियंत्रण करणारे, कोणालाही आपल्या स्वरूपाचं ज्ञान होत नाही. आत बाहेर...

***
पान ६२

असून सुद्धा कोणी ओळखू शकत नाही. मायेचा पडदा आहे. पण असं आपलं स्वरूप अदृश्य असताना सुद्धा सर्व ऋषिमंडळींना श्रेष्ठ मंडळींना भक्ती शिकवण्याकरता आपण प्रगट झालात.

भक्तियोगविधानार्थं कथं पश्येम हि स्त्रियः ।।
1.8.20 ।। श्री. भा.

कृष्णावताराचा हेतू काय? म्हणून एक ऋषींचा प्रश्न आहे. ह्या कुंतीच्या स्तुतीमध्ये तो हेतू आलेला आहे. आपण अवतार घेऊन कशाकरता आलात तर मोठे मोठे महर्षि आपली भक्ती करणारे त्यांना भक्ती कशी करावी हे शिकवण्याकरता आपण आलेले आहात.

कृष्णाय वासुदेवाय देवकीनंदनायच ।
नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नम: ।।
1.8.21 ।। श्री. भा.

देवकीला कंसाने कारागृहामध्ये टाकलेलं होतं. आपणही तिच्याजवळ राहिला नाही, राहता आलं नाही आपल्याला. अत्यंत शोकाकुल झालेली देवकी, आपली माता, तिला त्या कंसाचा नाश करून कारागृहातून, बंदीखान्यातून सोडविले आपण, पण मातेपेक्षासुद्धा आमच्यावर तुमची कृपा जास्ती आहे. किती संकटं आमच्यावर आली म्हणाली. भीमाला विष पाजलं त्यांनी, अग्नीमध्ये आमचा नाश करण्याचा प्रयत्न केला. अनेक राक्षस आम्हाला भेटले, वनवासामध्ये. त्या सभेमध्ये आणखी दुर्जनांनी द्रौपदीची विटंबना केली. वनवासातली संकटं आम्हाला भोगावी लागली आणि या भारतीय युद्धामध्ये अनेक मोठमोठ्या अस्त्रांचा उपयोग केलेला आहे. या अश्वत्थाम्यानेही पुष्कळ अस्त्रांचा प्रयोग केलेला आहे. पण या सर्वही संकटांपासून आपण आमचं रक्षण केलेलं आहे. तेव्हा ती कुंतीदेवी भगवंताच्या जवळ मागते आहे.

विपदः संतु नः शश्वत् तत्र तत्र जगद्गुरो ।
भवतो दर्शनं यत्स्याद् अपुनर्भवदर्शनम् ।।
1.8.25 ।। श्री. भा.

खरी विचारी आहे कुंती. भगवान श्रीकृष्णांनी सर्व संकटातून मोकळं केलेलं आहे आम्हाला पण माझी इच्छा अशी आहे की नेहमी संकटाचे प्रसंग आम्हाला यावेत, असं ती मागते आहे. कारण काय? आम्हाला संकटं आली, आम्हाला दु:खं झाली म्हणजे आपल्याला आमची आठवण होईल. आपण आम्हाला येऊन भेटाल. आपलं दर्शन आम्हाला होईल. चांगल्या कुळामध्ये जन्म आलेला आहे. पुष्कळ संपत्ती मिळालेली आहे. सत्ता मिळालेली आहे. ज्ञान मिळालेलं आहे. याचा परिणाम म्हणजे अंत:करणामध्ये अहंकार, गर्व निर्माण होतो. आपलं नामही त्याच्या मुखातून येत नाही आणि आपलं स्मरणही कधीच घडणार नाहीये. म्हणून ही संकटस्थिती, दु:खाची स्थिती...

***
पान ६३

आम्हाला असावी हे कुंतीने सांगितले. आणखी तिने सांगितले देवा हे जो माझ्या मनामध्ये स्नेह पाश आहे, ममता, यादव माझे आहेत. ही माहेरची मंडळी, पांडव आहेत. ही सगळी मंडळी सासरची मंडळी ही माझी मंडळी म्हणून जी वृत्ती माझ्या मनामध्ये उत्पन्न झाली हा मोठा पाश आहे. ही ममता आपण तोडून टाका. हा पाश. एवढी माझी इच्छा आहे. आणखी काही दिवस आपण राहिला तर बर होईल. प्रार्थना केली कुंती देवीनं. आणि भगवान गोपालकृष्ण रथातून खाली उतरले. ""जा बाबा रथ घेऊन जा. आज काही आत्याबाईंची इच्छा नाही.'' सगळ्या आपल्या मंडळींना पाठवून दिलं द्वारकेला. काही दिवस तिथं राहिलेले आहेत. धर्मराजाच्या मनाला शोक झालेला आहे ना. मला राज्य करायचं नाही. अरण्यात जाणार असा एक परिणाम झाला त्याच्या मनावर. त्याला घेऊन भीष्माचार्यांच्याकडे गोपालकृष्ण गेलेले आहेत. अर्जुनाला गीता सांगितली त्यालाही असा शोक झाला होता. आपलेच लोक, आपलेच गुरु मोठीमोठी मंडळी आपणच मारायची. काय करायचंय, नको लढाई नको. त्याला उपदेश करून, त्याच्याकडून युद्ध करवलं. विजय त्याला मिळवून दिला पण इथे धर्मराजाला आपण बोध केला नाही. पांडव, गोपालकृष्ण हे भीष्माचार्य ज्या ठिकाणी पडलेले होते त्या ठिकाणी आलेले आहेत. शरशय्येवर पडलेले आहेत भीष्माचार्य. अनेक मोठे मोठे ऋषि, ब्रह्मर्षि, देवर्षि सगळी मंडळी इथे जमलेली आहेत. गोपालकृष्णही त्याठिकाणी आलेले असताना, पडल्या पडल्या हात जोडले भीष्माचार्यांनी आणि त्यांचं स्वागत केलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण कोण आहेत हे जाणणारे भीष्माचार्य आहेत. हा साक्षात जगदीश्वर आहे. मायेने शरीर धारण करून आलेला आहे. परंतु अनंतरूप आहे. सच्चिदानंदघन आहे.

तेव्हा पांडवही आलेले आहेत. त्यांनीही सगळ्यांनी नमस्कार केला भीष्माचार्यांना. पांडवांच्या बद्दल अत्यंत प्रेम भीष्माचार्यांच्या मनामध्ये होतं. भीष्म बोलू लागले, ""धर्मराज, पांडूराजा तुमचा पिता गेल्यानंतर ही जी तुमची माता आहे, तुम्ही लहान होता, तुम्हाला घेऊन ती इथे येऊन राहिलेली आहे. पुष्कळ क्लेश तिने सहन केले. तुम्हालाही पुष्कळ क्लेश भोगावे लागले. काय तुमच्या बाजूला कमी होतं म्हणाले, तुम्हाला दु:ख यावीत याचं कारण काय? धर्मराजासारखा पूर्ण धर्मज्ञ आणि धर्म पालन करणारा आचरण करणारा राजा या बाजूला आहे. गदा हातामध्ये घेऊन भीम एकदा युद्धामध्ये गेल्यानंतर त्याच्यासमोर कोणीही उभा राहू शकणार नाही. ही शक्ती तुमच्या बाजूला आहे. हा नराचा अवतार गांडीव धनुष्य घेऊन आणखी युद्धाला उभा राहिलेला असताना देव दैत्य कोणीही याच्या समोर उभं राहू शकणार नाही. ही अस्त्र शक्ती तुमच्या बाजूला आहे. सर्वांपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सुहृद तुमचा मित्र हा भगवान गोपालकृष्ण आहे म्हणाले. असं असताना...

***
पान ६४

तुम्हाला ही दु:ख संकटं भोगावी लागावी, काय कारण काही कळत नाही म्हणाले, विचार करताहेत.

तस्मादिदं दैवतन्त्रं व्यवस्य भरतर्षभ ।।
1.9.17 ।। श्री. भा.

शेवटचा निर्णय त्यांनी दिला. दैववाद मानावा लागतो. कौरवांच्या पेक्षा तुमची बाजू फार मोठी आहे. तुमच्या बाजूला धर्म आहे, तुमच्या बाजूला शक्ती आहे, अस्त्र शक्ती आहे, भगवान गोपालकृष्ण तुमच्या बाजूला आहेत. तरीसुद्धा तुम्हाला दु:ख भोगावं लागलं म्हणजे दैव म्हणून काहीतरी आहे. दैव याचा अर्थ, जीवाने केलेलं पूर्वीचं कर्म म्हणजे त्याचेच फल, म्हणजे दैव आहे.

पूर्वजन्मकृतं कर्म तद्दैवमिति कथ्यते ।।

जीवाचं कर्म आहे, त्या कर्माचे फल भोगून तुमचं संपलेलं आहे म्हणाले. भगवान गोपालकृष्णांच्या आज्ञेमध्ये रहा म्हणजे तुम्ही सुखी व्हाल. तुम्ही ओळखलं नाही म्हणाले गोपालकृष्णांना, आपला मामेभाऊ आहे. अर्जुनाला वाटलं आपला मित्र आहे, वाटेल ती कामं सांगतो म्हणे यांना. रथ घेऊन ये. घोडे जुंपा, आपलं ऐकतो म्हणाले अर्जुनाचं. प्रेम आहे भक्तावरती. परंतू आज माझं सुदैव आहे मी समजतो. भीष्माचार्य म्हणताहेत, ""माझा शरीर त्याग करण्याचा संकल्प झालेला आहे.'' इच्छा मरणी होते भीष्माचार्य, यमधर्म तुझ्याकडे येणार नाही म्हणून बापाने वर दिलेला आहे. तुला आणखी शरीर सोडण्याची इच्छा झाल्याशिवाय हे शरीर पडणार नाही, असा पित्याचा वर मिळालेला आहे. भीष्म सांगाताहेत, धर्मराज, मला आता शरीर सोडायचंय म्हणाले. यावेळेला मला दर्शन देण्याकरता परमेश्वर गोपालकृष्ण आलेले आहेत. हे केवढं भाग्य आहे.

भक्त्याऽऽवेश्य मनो यस्मिन् वाचा यन्नाम कीर्तयन् ।
त्यजन् कलेवरं योगी मुच्यते कामकर्मभिः ।।
1.9.23 ।। श्री. भा.

शेवटी शरीर पात होण्याच्या वेळेला, अंत:करणामध्ये भगवंताचं स्वरूप धारण करणारा आणि मुखाने त्याचं पवित्र नाम नामस्मरण करणारा जो योगी आपल्या शरीराचा त्याग करतो तो सर्व कर्मातून, कर्मवासनेतून मुक्त होतो, सर्वातून मुक्त होतो. म्हणजे पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागत नाही. माझी एवढीच विनंती आहे. भगवान गोपालकृष्णांनी थोडा वेळ इथे थांबावे. मी आता शरीर टाकणार आहे. शरीर माझं पडेपर्यंत गोपालकृष्णांचं दर्शन माझ्या दृष्टीसमोर भगवंतांनी रहावं म्हणाले. ही शेवटची इच्छा भीष्माचार्यांनी बोलून दाखविली. मग धर्मराजांनी अनेक प्रश्न

***
पान ६५

केले, मोठे ज्ञानसंपन्न भीष्माचार्य होते ना. पराक्रमीही होते. सर्व कुरुकुलाचं संरक्षण त्यांनी केलेलं आहे. अनेक प्रश्न केले, दानासंबंधी विचारलेलं आहे. राजधर्म कोणता, मोक्षधर्म कोणते आहेत, स्त्रियांचे धर्म कोणते आहेत. भगवत् भक्ताचे धर्म कोणते आहेत. सगळं विचारले. आणि भीष्माचार्यांनी त्या शरशय्येवर निजूनच ते सगळं सांगितले. उत्तरे दिलेली आहेत. महाभारतातलं ""शांतिपर्व'' म्हणजे भीष्माचार्यांचं ज्ञान किती होतं हे दाखविलं आहे. सर्व एकंदर विवेचन केलं, अनेक प्रकारच्या कथा सांगितलेल्या आहेत. सर्व एकंदर साधनांचा विचार त्या धर्मराजाला समजावून सांगितलेला आहे. उत्तरायण सुरु झालं. मकरसंक्रांत लागलेली आहे. त्याचीच वाट पाहात होते भीष्माचार्य.

मकर संक्रांतीला सूर्यनारायण आल्याबरोबर त्यांनी बोलणं बंद केलेलं आहे. धर्मराजाला सांगितले, पुरे बाबा आता. पुष्कळ झालं. मला आता पुढे काही सांगायचं नाही. भीष्माचार्यांनी आपला देहत्याग कसा केला हे सांगताहेत, सूतजी.

तदोपसंहृत्य गिरः सहस्रणीर्
विमुक्तसंगं मन आदिपूरुषे ।
कृष्णे लसत्पीतपटे चतुर्भुजे
पुरःस्थितेऽमीलितदृग्व्यधारयत् ।।
1.9.30 ।। श्री. भा.

वाणी अगोदर बंद केली. मृत्यू कसा यावा, हे सांगताहेत. भीष्माचार्यांच्या शेवटच्या कालात, वाणी बंद केली अगोदर. मनामध्ये काहीच संग नाही, कुठेही मन गुंतलेलं नाही. भगवान पितांबरधारी गोपालकृष्ण समोर उभे आहेत. चतुर्भुज. त्यांच्याकडे दृष्टी लावलेली आहे. डोळे झाकलेले नाहीत. झाकून ध्यान नाहीये. समोर परमात्मा आहे. शुद्ध धारणा आहे. चित्ताची धारणा करण्याला भगवंताचं स्वरूप साक्षात समोर आहे. कोणती तरी मूर्ती मनामध्ये आणायची नाहीये. साक्षात भगवंताचीच मूर्ती स्वरूप साक्षात आहे. त्यामुळे सर्व पापे नष्ट झालेली आहेत. भगवंतांच्या कृपादृष्टीने सर्वही क्लेश नाहीसे झालेले आहेत. अंगामध्ये बाण रुतलेले आहेत. काही नाही. क्लेश नाहीयेत. इंद्रिय वृत्ती अत्यंत सावध आहे. अशा स्थितीमध्ये आपलं शरीर विसर्जन करण्याची इच्छा झालेले भीष्माचार्य महाराज ह्यांनी भगवान गोपालकृष्णांची स्तुती केलेली आहे.

इति मतिरूपकल्पिता वितृष्णा
भगवति सात्वतपुंगवे विभूम्नि ।
***
पान ६६
स्वसुखमुपगते क्वचिद्विहर्तुं
प्रकृतिमुपेयुषि यद्भवप्रवाहः ।।
1.9.32 ।। श्री. भा.

भीष्माचार्य सांगतात देवा, आपल्याला आता मी काय द्यायचं म्हणाले मी असा पराधीन आहे, फक्त माझी बुद्धी, मती जी आहे ती आपल्याला दिलेली आहे. मन आपल्याला दिलेलं आहे.

वितृष्णा मतिः ।।

पूर्ण आत्मविश्वास आहे. आपल्या बुद्धीमध्ये कोणतीही तृष्णा, वासना शिल्लक नाहीये. शुद्ध अशा प्रकारची बुद्धी मी आपल्याला अर्पण केली आहे. आपण कसे आहात.

स्वसुखमुपगते ।।

निजानंदामध्ये निमग्न आहात. सृष्टी नाही काही नाहीये. आनंदरूप असे आपण आहात. पण एखाद्या वेळेला, काही आणखी विश्व निर्माण करण्याचा संकल्प आपला झाला की, या प्रकृती शक्तीचा स्वीकार करून अनंत ब्रह्मांडं आपण निर्माण करता. हे आपलं रूप आहे. निर्गुण, सगुण, एकच आहे. ही भावना आहे भीष्माचार्यांची.

मग या भगवंताच्या सगुण रूपाचंच वर्णन पुष्कळ केलेलं आहे.

त्रिभुवनकमनं तमालवर्णं
रविकरगौरवरांबरं दधाने ।
वपुरलककुलावृताननाब्जं
विजयसखे रतिरस्तु मेऽनवद्या ।।
1.9.33 ।। श्री. भा.

त्रिभुवनामध्ये अत्यंत सुंदर रूप आहे. शामवर्ण आहे. पितांबर नेसलेलं आहे आपण. काळेभोर केस आणखी पसरलेले आहेत आपले कपाळावरती. असे आपण विजयाचे मित्र आहात. अशा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी शुद्ध प्रेम हे माझ्या मनामध्ये राहते. पुष्कळ वर्णन आहे. भीष्माचार्यांची स्तुती आठ दहा श्लोक आहेत. पण कितीतरी त्यात भाव आहे. आणि शेवटी त्यांनी एवढीच प्रार्थना केली. असा अनंत लीला करणारा भगवान गोपालकृष्ण सर्वही जीवांच्या शरीरामध्ये आणि बुद्धीमध्ये त्याचं वास्तव्य आहे. बुद्धीसाक्षी तो आहे. आणखी त्या परमेश्वराला मी शरण गेलेलो आहे. म्हणजे त्याच्याच चिंतनामध्ये मी हे शरीर विसर्जन करतो आहे. सगुण रूपही मनामध्ये आहे आणि निर्गुण निराकार सर्वव्यापी परमेश्वर स्वरूपाचे चिंतन चाललेलं आहे. याच ध्यानामध्ये

***
पान ६७

असतानाच भीष्माचार्यांच्या शरीरातून प्राण उत्क्रमण झालेले नाहीत, त्याच ठिकाणी सर्व प्राण विलीन होऊन गेलेले आहेत.

याचसाठी केला होता अट्टाहास
शेवटचा दिवस गोड व्हावा.

भगवान गोपालकृष्णांच्या ठिकाणी सर्व आपलं चित्त स्थिर करून भीष्माचार्यांनी आपलं शरीर, शेवटचं शरीर टाकलेलं आहे. शेवटचा जन्म आहे. सर्व ऋषिमंडळी स्वस्थ बसलेली आहेत, काही वेळाने आकाशातून पुष्पवर्षाव झालेला आहे, भीष्माचार्यांच्यावर. पुढे, धर्मराजांनी त्याचं सर्व और्ध्वदेहिक वगैरे केलेलं आहे. अशा रितीने धर्मराजाला उपदेश मिळाला. भगवान गोपालकृष्णांनीही त्याच्याकडून अश्वमेध यज्ञ करविलेले आहेत. पाप झालं, इतके मी लोक मारले आणि केवळ राज्याच्या लोभानी मी मारले. राजा असतो मी आणि कोणी पराक्रमी कोणी शत्रू आले असते तर युद्ध काही केलं तर चालेल. पण राजा कुठे होतो मी? म्हणजे लोभामुळे माझ्या हातून ही अशी हिंसा घडली आहे, म्हणून अत्यंत दु:खी झालेला धर्मराज, श्रीकृष्णांनी त्यावेळेला त्याचं समाधान केलं, यज्ञयाग करविले, त्याचं पाप गेलं म्हणून सांगितलं, त्याचा राज्याभिषेक केला, नंतर भगवान निघून गेलेले आहेत.

धर्मराजाला राज्याभिषेक झाला, धर्मराज राज्य करू लागले, नंतर भगवान श्रीहरीने धर्मराजाच्या मनाची आणखी सुधारणा केली, शांती झाली आणि तो राज्य करू लागला हे पाहून भगवंताला समाधान झाले. धर्मराजाचं राज्य म्हणजे अत्यंत आनंददायक सर्व प्रजाजनांना झालेलं आहे. पर्जन्यवृष्टी, वेळच्या वेळेला अगदी होत होती. त्याचप्रमाणे दुध-दुभतं पुष्कळ झालेलं आहे त्या वेळेला. अशी सर्व व्यवस्था लावून दिली भगवंतांनी आणि त्या धर्मराजाची अनुज्ञा घेऊन द्वारकेला जाण्याकरता भगवान श्रीकृष्ण निघाले आहेत. विरह भगवंताचा सहन झाला नाही सर्वांना. वाद्य वाजत आहेत. सर्व मंडळी आणखी त्यांना पोहचविण्याकरता निघालेली आहेत. छत्र आपल्या हातामध्ये घेतलं, अर्जुनाने, देवावर छत्र धरलेलं आहे. उद्धव, सात्यकी दोघांनीही, दोन पंखे हातामध्ये घेतले. सर्वही आणखी कौरवांच्या, पांडवांच्या स्त्रिया यांनाही अत्यंत आनंद झाला, हाच भगवान गोपालकृष्ण श्रीहरी सर्वांच्या संरक्षणाकरिता सज्जनांचं संरक्षण करण्याकरता अवतार घेऊन आलेला आहे. अधार्मिक लोकांना यांनी शासन केले आहे. यादवाचं कुल मोठं धन्य आहे. असं त्या सर्व स्त्रिया म्हणताहेत. पुष्कळ दूर ही मंडळी पोहचविण्याकरता आलेली पाहून कृष्णांनी त्यांना सांगितलं

***
पान ६८

थांबा आता तुम्ही. त्यांना पाठवून दिलेलं आहे. गोपालकृष्ण पुढे निघालेले आहेत. आपल्या देशाजवळ आल्याबरोबर त्यांनी आपला पांचजन्य शंख वाजविला, आपण आलो आहोत ही वार्ता समजावी म्हणून. तो आवाज कानावर पडल्याबरोबर द्वारकेमध्ये असलेले सर्वही स्त्रीपुरुष, भगवंताच्या दर्शनाबद्दल अत्यंत उत्सुक झालेले होते. सर्व बाहेर पडलेले आहेत. सर्वांनी नमस्कार केला श्रीहरींना. पुष्कळ दिवस झाले म्हणाले. आपण हस्तिनापुरला गेला होतात, पांडवांच्या कल्याणाकरिता. आतापर्यंतचा आमचा काल म्हणजे मोठ्या दु:खामध्ये गेलेला आहे. प्रजाजनांनी सांगिलतं. सर्वही स्त्रिया त्या आणखी आपल्या दरवाज्यामध्ये, माड्यांवरती भगवंताच्या दर्शनाकरता आणखी उभ्या होत्या. सर्व मंडळींना भेटले भगवान, वडील मंडळींना नमस्कार केला. मित्रमंडळींच्या गाठीभेटी झालेल्या आहेत. आपल्या त्या सर्व स्त्रिया होत्या त्याही वाड्यामध्ये भगवान जाऊन आले. देवकी आणि त्या स्वरूप त्या माता होत्या त्यांना नमस्कार केला, त्यांनाही मोठं समाधान वाटलेलं आहे.

शौनक ऋषी म्हणतात, सूतजी, जो परिक्षीत राजा जन्माला आलेला आहे. परमेश्वरांनीच त्याला पुन्हा जीवन दिलेलं आहे, अश्वत्थाम्याचं ब्रह्मास्त्र दूर करून. त्याने काय काय कर्म केली त्याचं चरित्र आपण सांगा. सूत सांगतात ऋषि महाराज, धर्मराजाचं राज्य अगदी उत्तम चालू आहे. धर्माचंच राज्य होतं ते. स्वतः काहीही मनामध्ये इच्छा न ठेवता भगवान श्रीकृष्णाची सेवा करायची, भक्ती करायची आणि प्रजाजनांचं पित्याप्रमाणे पालन करायचं. त्यांची कीर्ती स्वर्गलोकापर्यंत जाऊन पोहचलेली आहे. उत्तरेच्या गर्भामध्ये असणारा तो जो बालक आहे. त्याला आपल्या सभोवती म्हणजे, आपण जिथे गर्भात आहोत तिथे कोणी एक दिव्य पुरुष आहे आणखी आपल्याला ते तेज लागू नये, आपलं संरक्षण व्हावं म्हणून तो प्रयत्न करतो आहे, असं त्याला दिसलं गर्भामध्ये असताना. त्याचप्रमाणे आपलं तेज सर्व ठिकाणी पसरलेलं आहे. हातामध्ये गदा घेऊन फिरवितो आहे, ते तेज बालकाला लागू नये म्हणून. पूर्ण झाले नऊ महिने. ब्रह्मास्त्र सर्व शांत झालेलं आहे. आणि भगवानही गुप्त झालेले आहेत. तो पांडू राजाचा वंश वाढवणारा मुलगा हा जन्माला आलेला आहे. आनंद झाला धर्मराजाला. जात कर्म केलेलं आहे. सर्व ब्राह्मण मंडळींना अनेक प्रकारची दानं केलेली आहेत. सर्व ब्राह्मण मंडळींनी त्या मुलाचं नाव विष्णूरात असे ठेवले. विष्णूंनी संरक्षिले आहे. विष्णूनी दिलेलं आहे म्हणून विष्णूरात. हा आपला नातू आपल्या पूर्वजांप्रमाणे पराक्रमी, धार्मिक, भगवत् भक्त असा होईल की नाही? काय याचं चरित्र आहे ? धर्मराजांनी सर्व ब्राह्मण मंडळींना विचारले. त्यांनी त्याचं जातक सांगितलेलं आहे.

***
पान ६९

इक्ष्वाकु राजा प्रमाणे मोठा प्रजापालन दक्ष हा राजा होईल. सत्यप्रतिज्ञ आहे. दाता आहे मोठा. सर्व धनुर्धारी पुरुषांमध्ये अग्रणी. कार्तवीर्य अर्जुन किंवा अर्जुन यांच्याप्रमाणे. तितिक्षु, पृथ्वी प्रमाणे सहनशील राहील हा. असा सर्व सद्गुण संपन्न हा तुझा नातू आहे. वेगवेगळे यज्ञ करील. कलीचा सुद्धा निग्रह करील. कलीला बंधनामध्ये टाकेल. आणि ब्राह्मणपुत्राच्या शापाने आपला मृत्यू जवळ आलेला आहे असं समजल्याबरोबर, सर्वसंग परित्याग करून, शुकाचार्य महाराजांच्या, मार्गदर्शनाप्रमाणे वागून, त्यांच्या मुखातून सर्व भगवंतांच्या लीला श्रवण करून आणि हा उत्तम गतीला जाणार आहे. आनंद झाला धर्मराजाला. तो मुलगा बाहेर जन्माला आल्याबरोबर, जमलेल्या सगळ्या मंडळीकडे सारखा पाहायला लागलेला आहे. आपण आईच्या उदरात असताना जो पुरुष आपल्याला दिसला, तो यांच्यामध्ये कोणी आहे का? असं सारखं पाहतो आहे, परीक्षण करतो आहे. सर्व बाजूला पाहणारा म्हणून परिक्षीत या नावाने तो प्रसिद्ध झाला. त्याचं पालनपोषण करताहेत सर्व मंडळी वाढतो आहे तो. धर्मराजाला अश्वमेध यज्ञ करण्याची इच्छा झालेली असताना, भगवान श्रीकृष्णांच्या सांगण्याप्रमाणे, उत्तर दिशेला जे काही पुष्कळ धन पडलेलं होतं, ते भीम, अर्जुनांनी वगैरे सर्व बंधूंनी आणून दिलं. तीन अश्वमेध यज्ञ त्यांनी केले, भगवान श्रीहरीच्या इच्छेने. काही दिवस भगवान गोपालकृष्ण राहिले तिथे आणि पुन्हा द्वारकेला निघून गेले. विदुरजी युद्ध होण्याच्या पूर्वीच आणखी हस्तिनापुरातून बाहेर पडले. तीर्थयात्रा कराव्यात, सत्संगती करावी, भगवत् भक्ती करावी, भजन करावे म्हणून ते बाहेर पडले. सर्व पांडवांचा जय झालेला आहे हे त्यांना समजलं. मैत्रेय महर्षींची भेट झाली, त्यांची संगती झाली. त्यांच्याबरोबर संवाद झालेला आहे आणि हस्तिनापुरामध्ये विदुरजी पुन्हा आले. धर्मराजालाही मोठा आनंद झाला. धृतराष्ट्र, गांधारी सर्वांनाही समाधान झालेलं आहे. भोजन वगैरे झालेलं आहे. विदुरांची विश्रांती झाली आणि धर्मराज विचारताहेत, ""विदुरजी, लहानपणी आपण आमचं संरक्षण केलंत, आपलं आमच्याकडे लक्ष असल्यामुळे पुष्कळ संकटातून आम्ही मोकळे झालो म्हणाले. आपण कोणत्या कोणत्या तीर्थयात्रा केल्या, कुठं जाऊन आलात, येताना आपण द्वारकेला गेला होतात का? सर्व यादव कुशल आहेत ना?''

धर्मराजांनी विचारल्यामुळे सर्व विदुरजींनी सांगितलं, यदुकुलसंहाराची गोष्ट सोडून.

इत्युक्तो धर्मराजेन सर्वं तत् समवर्णयत् ।
यथानुभूतं क्रमशः विना यदुकुलक्षयम् ।।
1.13.12 ।। श्री. भा.
***
पान ७०

त्यांना ते समजलं होतं, उद्धवजींची भेट झाल्यावर सर्व यदुकुलाचा संहार झाला आहे, हे समजलं. पण हे तेवढं धर्मराजाला त्यांनी सांगितलं नाही. ऐकल्या बरोबर दु:ख होईल समजेल तेव्हा समजेल म्हणाले. काही दिवस मुक्काम विदुरजींनी केला. धृतराष्ट्राला उपदेश करून त्याचा उद्धार करायची त्यांची इच्छा होती. विदुरजी म्हणजे मांडव्य ऋषींच्या शापाने या शूद्र जन्माला ते आलेले होते. यमधर्म शंभर वर्ष इथे राहिलेले होते. पुष्कळ काल गेलेला आहे. एके दिवशी रात्री विदुरजींनी धृतराष्ट्राला सांगितलं ""राजे साहेब, आता किती दिवस तुम्हाला या घरात राहायची इच्छा आहे. तुमचा काल जवळ आलेला आहे. विचार करा. ज्या पांडवांचा संहार करून, नाश करून, आपण सुखी व्हावं म्हणून पुष्कळ प्रयत्न केले तुम्ही आणि तुमच्या मुलांनी म्हणाले, काय मिळालं शेवटी त्यांचंच अन्न खाऊन राहण्याची पाळी तुम्हाला आलेली आहे. म्हातारा झालेला आहात तुम्ही आणि या शत्रूच्या घरामध्ये राहता आहात तुम्ही, तुम्हाला काही वाटत नाही म्हणाले. केव्हा बाहेर पडणार? विचार करा.''

धृतराष्ट्राच्या मनावरती परिणाम झालेला होता. आता कोणीच शिल्लक राहिलेलं नाही. मुलगा, मुलं नाही, काही नाही. त्यांनीही विदुरांना सांगितलं, बाबा तूच आता आम्हाला घेऊन जा तुझ्याबरोबर. आम्ही यायला तयार आहोत. रात्री धृतराष्ट्र, गांधारी दोघेही विदुरजींच्या बरोबर राजवाड्याबाहेर पडलेले आहेत. प्रातःकाल झाल्यानंतर रोजच्या नियमाप्रमाणे, धृतराष्ट्र, गांधारी, विदुर यांना नमस्कार करून सभेमध्ये जाण्याकरता धर्मराज निघाले. इथे येऊन पाहताहेत तर कोणीच नाही. संजय तेवढा बसलेला होता एका बाजूला. त्याला विचारलं धर्मराजांनी, हे आमचे पिताजी कुठे गेले, माता गांधारी कुठे गेली बाबा. यांनी आजपर्यंत आमचं संरक्षण केलं म्हणाले. संजयाला सुद्धा काही माहिती नाही. तो म्हणाला, ""मला सुद्धा काही माहित नाही. कुठं गेले. कुणाला ठाऊक.'' इतक्यात नारद महर्षि आले. त्यांची पूजा करून धर्मराजांनी त्यांना विचारले, ""हे गेले कुठे म्हणाले हे तिघेही.'' नारद म्हणाले, ""बाबा, शोक कशाला करतोस. त्यांचं संरक्षण तू करतोस का म्हणाले. ईश्वरच, सर्वांच संरक्षण करणारा आहे.

स संयुनक्ति भूतानि स एव वियुनक्ति च ।।
1.13.40 ।। श्री. भा.

प्रेमळ मंडळींना एकत्र आणणे पुन्हा एकत्र आणणे आणि पुन्हा बाजूला करणे हे कार्य त्या परमेश्वराचं आहे. तेव्हा मनामध्ये तू आता दु:खी होऊ नकोस. देह हा पंचभौतिक आहे, कालाच्या अधीन असलेला. तो दुसऱ्याचं संरक्षण कसा करू शकेल म्हणाले. देवाचं कार्य सगळं भगवंतांनी...

« Previous | Table of Contents | Next »