« Previous | Table of Contents | Next »
पान ५१

तत्त्व आहे. तेच मी आहे, या समाधीमध्ये निमग्न असलेले आपले पुत्र, त्यांना पाहून, आमच्या मनावर काही परिणाम झाला नाही.'' शौनक ऋषी विचारतात, ""अशा उच्च भूमिकेवर गेलेले शुकाचार्य यांनी संपूर्ण भागवताचा अभ्यास केला कसा? समाधी काही त्यांनी सोडली काय? ते कोठेही एका ठिकाणी राहात नाहीत शुकाचार्य. संचार नेहमी चालू आहे. कोणाच्याही घरामध्ये थोडावेळ थांबायचं, पुढे जायचे. त्यांनी सबंध भागवत कसं सांगितलं, सात दिवस थांबून. परिक्षीत राजाने प्रायोपवेशन करून नदीतीरावर बसण्याचं काय कारण घडले? पराक्रमी राजा असताना मोठा भगवद् भक्त असताना त्याने राज्य का सोडलं? हे सर्वही आम्हाला सांगा''.

सूत सांगतात, ""ऋषि महाराज,

द्वापरे समनुप्राप्ते तृतीय युगपर्यये ।
जातः पराशराद्योगी वासव्यां कलया हरेः ।।
1.4.14 ।। श्री. भा.

सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग असा सारखा काल चाललेला आहे, पुन्हा कृतयुग, त्रेतायुग....... तिसरं द्वापारयुग जेव्हा चालू झाले, त्या तिसऱ्या द्वापार युगामध्ये वेदव्यासांचा जन्म झाला. वेदव्यास महर्षि एके दिवशी आपल्या आश्रमामध्ये प्रातःकालच्या वेळेला विचार करण्याकरता बसले. एकांत आहे, आणि समाधी त्यांची लागली. काय एकंदर, विश्वाची स्थिती कशी आहे हे पाहू लागले ते ऋषी. सर्व एकंदर शक्ती क्षीण झालेली आहे जगाची हे त्यांना दिसून आले. कोणाच्याही मनामध्ये श्रद्धा राहिली नाही, बल राहिलेलं नाही, बुद्धी नाही, आयुष्य नाही. सगळं कमी कमी होत चाललेलं आहे. ही स्थिती ज्या वेळेला वेदव्यासांच्या लक्षामध्ये आली, आरंभाला त्यांनी हा यज्ञमार्ग व्यवस्थित चालू राहावा, वेदाचे चार भाग करून ठेवले कारण पूर्वी एकच वेद होता. त्याचं सबंध अध्ययन कसं करता येईल, आयुष्य पाहिजे, बुद्धी पाहिजे. सोयीकरता म्हणून त्यांनी चार भाग केले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद आणि इतिहास पुराण हाही पाचवा वेदच आहे म्हणे. पैलऋषींनी ऋग्वेदाचा अभ्यास केला, जैमिनींनी सामवेदाचा अभ्यास केला, वैशंपायनांनी यजुर्वेदाचा अभ्यास केलेला आहे, सुमंतूंनी अथर्ववेदाचा अभ्यास केलेला आहे. इतिहासपुराणांचा अभ्यास आमचे पिताजी रोमहर्षण यांनी वेदव्यासांच्या जवळ केलेला आहे. सर्व ज्ञान या शिष्यांना अर्पण केलं वेदव्यासांनी. त्याही शिष्यांनी आपल्या वेदाचे भाग केले, पुराणांचे भाग केले, आपल्या आपल्या शिष्यांना शिकवले आहेत. अशी ही ज्ञानाची परंपरा पुढे चालू राहिलेली आहे. सर्वांनाच काही यज्ञयागाचा अधिकार नाही आहे, वेदाध्ययनाचा अधिकार नाही,

***
पान ५२

त्यांनाही ईश्वराचे ज्ञान झाले पाहिजे, भक्ती उत्पन्न झाली पाहिजे. म्हणून वेदव्यासांनी महाभारताची रचना केली. किती वाङ्मय त्यांनी तयार केलेलं आहे. असं कार्य चाललेलं आहे. सर्व लोकांना मार्गदर्शन घडावे हा उद्देश आहे. आपल्याला योग्य मार्ग कोणता हे समजून घेऊन त्याप्रमाणे त्यांनी जावं. असं सर्व कल्याणाकरता प्रयत्न करताहेत वेदव्यास महर्षि. परंतु त्यांच्या चित्ताला समाधान काही मिळालं नाही, काय झालं म्हणाले, माझ्या मनाला शांती का नाही आहे? महाभारताची रचना केली, महापुराणांची, अनेक पुराणांची रचना केली, सर्व देवतांचे जे अवतार आहेत ते सर्व वर्णन केले, तरीही काय न्यूनता काय आहे? अद्यापी काय करायचं राहिलं आहे? अशा विचारामध्ये वेदव्यास महर्षि असताना, ब्रह्मदेवांच्या आदेशाप्रमाणे, नारद महर्षि त्यांच्या आश्रमात येऊन पोहोचलेले आहेत. नारद महर्षि मोठे अधिकारी, ब्रह्मर्षि ब्रह्मज्ञानी. यथाविधी त्यांची पूजा केलेली आहे. बसले आसनावर नारद महर्षि आणि नारदांनीच बोलायला सुरुवात केली.

पाराशर्य महाभाग भवतः कच्चिदात्मना ।
परितुष्यति शारीर आत्मा मानस एव वा ।।
1.5.2 ।। श्री. भा.

""वेदव्यास महाराज काय आपल्या मनाचं समाधान आहे की नाही, शांती आहे ना तुमच्या मनाला, दुसरं काय विचारायचं. महाभारतासारखा ग्रंथ आपण केलेला आहे की ज्याच्या मध्ये सर्व ज्ञान आहे, धर्म अर्थ काम मोक्ष चारही पुरुषार्थाचं विवेचन,

यदिहास्ति तदन्यत्र यन्नेहास्ति न तत् क्वचित् ।।

व्यासांनीच प्रतिज्ञा केली, महाभारतमध्ये चार पुरुषार्थासंबंधी जेवढं आहे तेच बाहेर मिळेल ऐकायला. जे यात नाही ते बाहेर नाही आहे. एवढा मोठा ग्रंथ आपण केलात. परमेश्वर स्वरूपाचं ज्ञान करून आपण घेतलेलं आहे आणि आपल्याला काही समाधान दिसत नाही. काय कारण आहे सांगा?'' वेदव्यास म्हणाले, ""नारदा, तुम्ही बोलला असंत, मला काही समाधान शांती नाही काय कारण आहे आपण सांगा, आपण सर्वज्ञ आहात. त्रैलोक्यामध्ये सर्वत्र आपला संचार आहे. सर्वांचा गुणदोष आपल्याला माहिती आहे. माझं काय न्यून, काय माझं शिल्लक राहिलेलं आहे तेवढं सांगा आणि माझ्या मनाला शांती प्राप्त करून द्या''. नारद म्हणाले, ""वेदव्यास महर्षि,

यथा धर्मादयश्चार्था मुनिवर्यानुकीर्तिताः ।
न तथा वासुदेवस्य महिमा ह्यनुवर्णितः ।।
1.5.9 ।। श्री. भा.

धर्म, अर्थ, काम, मोक्ष चारही पुरुषार्थ सर्व जीवांना आवश्यक आहेत. पण या चार...

***
पान ५३

पुरुषार्थासंबंधी जेवढं आणखी महाभारतामध्ये आपण सांगितले आहे, भगवान वासुदेवाचा महिमा, मात्र तेवढा तसा वर्णन केलेला नाही. पुरुषार्थाला प्राधान्य दिलेलं आहे. भगवंताच्या लीला ऐकणारे जे आहेत, चिंतन करणारे, त्यांना पूर्ण शांती प्राप्त होती आहे. म्हणून वेदव्यास महर्षि आपण ज्ञानी आहात. भगवान श्रीहरींनी काय काय लीला केलेल्या आहेत हे तुम्हाला कोणाला विचारायला जायला नको आहे. समाधी लावून आपण बसल्याबरोबर आपल्याला, सर्वही भगवंताचे अवतार, त्यांनी केलेली सर्व चरित्रं आपल्या डोळ्यासमोर येतील. आणि त्याप्रमाणे स्मरण करून तो ग्रंथ, ते पुराण पूर्ण करा, भगवंताचं ज्याच्यामध्ये वर्णन आहे, अशी पुराण रचना आपण करा''.

हे सांगितलं नारदांनी आणि भगवंताच्या भक्तीचा प्रभाव कसा आहे हे सांगण्याकरता आपल्या पूर्वजन्माचा वृत्तांत नारद सांगताहेत.

अहं पुरातीतभवेऽभवं मुने ।
दास्यास्तु कस्याश्चन वेदवादिनाम् ।।
1.5.23 ।। श्री. भा.

पूर्व जन्मामध्ये मी एका खेडेगावात एका दासीचा मुलगा म्हणून जन्माला आलो होतो. पाच वर्षाचा मी झालो. आमच्या गावामध्ये काही संत मंडळी आली. त्यांच्या दर्शनाकरता मी रोज जाऊ लागलो. त्यांच्या मुखातून हरिकथा मला ऐकायला मिळाल्या. रोज प्रसाद मला त्याठिकाणी मिळत असे. तिथेच भोजन करणं, तिथेच त्यांची सेवा करणं, कथा ऐकणं, त्यामुळे माझ्या अंतःकरणामध्ये भगवत्कथा श्रवण करून, भगवत प्रेम निर्माण झाले. त्या सर्व ऋषिमंडळींच्या कृपेने, भगवत् भक्तीच्या प्रभावाने, ज्ञानही मला झाले. हे सर्व विश्व हे मिथ्या आहे. भासणारं आहे, खरंही नाही आणि खोटंही नाही. भासतंय, दिसतंय म्हणून खोटंही म्हणता येणार नाही. विनाशी आहे, एकरूपाने राहू शकत नाही म्हणून सत्यही म्हणता येत नाही. असं काही तरी आहे. त्यालाच मिथ्या म्हणतात. हे मला पक्कं समजलं. चार महिने मुक्काम त्या ऋषींचा झाला, रोज मला हरिकथा श्रवण करण्याचा लाभ झालेला आहे. चातुर्मास संपल्यानंतर ती ऋषिमंडळी निघाली. मला मात्र जाता आलं नाही. माझी आई जिवंत होती. तिला सोडून मला जाता आलं नाही. माझं कर्तव्य आहे. त्यांच्या उपदेशाने मला शांती मिळाली. आपल्या पूर्वजन्माचा वृत्तांत इतकाच नारदांनी सांगितला आणि वेदव्यासांना सांगताहेत. ही भक्ती सर्व लोकांना समजावी, त्यांना मिळावी, ती वाढावी याकरता हा ग्रंथ करा. वेदव्यास विचारतात, ""नारदा, पुढे तुमचा जन्म कसा गेला हे सांगा ना. सर्व चरित्र ऐकवा मला. कसं आयुष्य आपलं गेलं. शरीर तुमचं कसं पडलेलं आहे. पूर्वीचं स्मरण...

***
पान ५४

आपल्याला कसं राहिलं, सगळं सांगा.''

नारद सांगतात, ""ऋषि महाराज ती सर्व संत मंडळी निघून गेली.

एकात्मजा मे जननी योषित्मूढा च किंकरी ।
मय्यात्मजेऽन्यगतौ चक्रे स्नेहानुबंधनम् ।।
1.6.6 ।। श्री. भा.

एकुलता एक मी मुलगा माझ्या मातेला होतो. माझ्यावर अतिशय प्रेम त्या माऊलीचं. परतंत्र आहे. दुसऱ्याची कामंधामं करण्याकरता तिला जावे लागे. अशा रितीने माझा काल चाललेला आहे. मला काही त्या ऋषींच्या पाठीमागे जाता येईना. ते निघून गेले. एके दिवशी माझी माता आपल्या स्वामीच्या घरी गेली कामा करता. परत येताना सर्पदंश तिला झाला आणि तिचे प्राणोत्क्रमण झालेलं आहे. मला समजले हे.

तदा तदहमीशस्य भक्तानां शमभीप्सतः ।
अनुग्रहं मन्यमानः प्रातिष्ठं दिशमुत्तराम् ।।
1.6.10 ।। श्री. भा.

तळमळ माझ्या मनामध्ये लागली होती. ते महात्मे कुठे गेले असतील. त्यांना गाठले पाहिजे. त्यांच्या सान्निध्यामध्ये राहिले पाहिजे. पण एक पाश होता माझ्या पाठीमागे आईचा, मला सोडून जाता येईना. सर्पदंश झाला आणि ती गेल्यामुळे ईश्वरांनी मोठी कृपा केली माझ्यावर असे मला वाटलं. म्हणजे आईला मृत्यू यावा असं मला वाटलं असा अर्थ नाहीये. सर्व पाशातून मला मुक्त केलं. कारण मी आता तिकडे वळलेलोच आहे, ईश्वरा शिवाय मला दुसरं काही नाही. निघालो, मी गाव सोडलं, उत्तर दिशेला निघालेलो आहे. अनेक गावं लागली, नगरं लागली, वनं लागली, जाता जाता एका ठिकाणी अरण्यामध्ये मी आलेलो आहे. भूक लागलेली आहे. तहान लागलेली आहे. नदीमध्ये स्नान केलं त्या ठिकाणी. पाणी प्यायलो आणखी एका अश्वत्थ वृक्षाखाली डोळे झाकून आसनामध्ये बसलेलो आहे. शांतपणे भगवंताचं चिंतन करू लागलो. ईश्वराच्या कृपेने ते भगवंताचं स्वरूप माझ्या चित्तामध्ये प्रकट झालं. मला अत्यंत तन्मय अवस्था प्राप्त झाली. डोळ्यातून अश्रुधारा वाहताहेत. अंगावर रोमांच उत्पन्न झालेले आहेत. आनंद मला वाटला. इतक्यात काय झालं कुणाला ठाऊक. मी एकदम उठून उभा राहिलो, आसन सोडून दिलं, डोळे उघडले, ते रूप सगळं अदृश्य झालेलं आहे. तो आनंद गेला माझा. पुन्हा मी आसन घालून बसलो आणि पुन्हा मी प्रयत्न करू लागलो. ध्यान करावं, पुन्हा ते रूप मनामध्ये यावं. तो आनंद मिळावा, पण नाही, पुन्हा काही नाही. एवढ्यात आकाशवाणी झाली,

***
पान ५५
हंतास्मिन् जन्मनि भवान् मा मां द्रष्टुमिहार्हति ।।
1.6.22 ।। श्री. भा.

""बाळ, या जन्मामध्ये माझ्या दर्शनाला तू अधिकारी नाहीस. जोपर्यंत अंत:करणामध्ये अनेक वासना भरलेल्या आहेत, शुभाशुभ वासनांनी अंत:करण अगदी भरून गेलेलं आहे. त्यांना माझं दर्शन होत नाही''. एकदा कसं दाखवलं रूप, तोही सांगताहेत, ""माझं रूप तुला एकदा दाखवल्यामुळे मी नाही असं तुला कधीच वाटणार नाही. तू नास्तिक होणार नाहीस. तुझी श्रद्धा कायम राहावी, म्हणून तुला मी दिसलो. सज्जनांची संगती, सेवा तुला घडलेली आहे. माझ्याबद्दल दृढ प्रेम, तुझ्या चित्तामध्ये उत्पन्न झालेलं आहे. हे शरीर ज्या वेळेला तुझं पडेल, त्या वेळेला पुढच्या जन्मामध्ये साक्षात्कार संपन्न तू होशील. आणि माझ्या कृपेने तू मुक्त होशील''. आकाशवाणी मी ऐकली, वेदव्यास महर्षि, त्या जन्मामध्ये मला काही दर्शन नाही. ईश्वरचिंतन करतो आहे, नामस्मरण करतो आहे. त्या महात्म्यांनी सांगितलेल्या भगवंताच्या कथांचही चिंतन करतो आहे, असा माझा काळ गेला. प्रलयकाल संपत आलेला आहे. पुन्हा सृष्टी रचना करायची आहे. ब्रह्मदेव जागे झाले. त्यांच्या श्वासाबरोबर मी त्यांच्या शरीरामध्ये गेलो होतो. पुन्हा सृष्टी रचनेच्या वेळेला, श्वासातून बाहेर आलो आणि मला हे रूप मिळालेलं आहे. जन्माबरोबर भगवंताचं पूर्ण ज्ञान मला आहे आणि भगवंताच्या कथा निरंतर ऐकाव्या, सांगाव्या लोकांना, लोकांच्याही मनामध्ये प्रेम निर्माण करावे, हे माझे कार्य चाललेलं आहे. माझ्या जन्माचे रहस्य मी तुम्हाला सांगितलं. पण मला हा जो अधिकार मिळाला तो भगवंताच्या भक्ती प्रभावाने मला मिळालेला आहे. त्या भक्तीचा प्रसार होण्याकरता आपण चांगला एखादा ग्रंथ, पुराण एखादं करा''. असं सांगून देवर्षि नारद महर्षि, भजन करीत निघून गेलेले आहेत.

नारदांच्या आदेशाप्रमाणे ही न्यूनता भरून काढण्याकरता वेदव्यास महर्षींनी ठरवलेलं आहे की भगवंताचं चरित्र सर्व वर्णन करायचं. आपल्या आश्रमामध्ये प्रातःकालच्या वेळेला ध्यानस्थ बसले व्यास महर्षि. शुद्ध अंत:करण आहे. ज्ञान संपन्न महात्मे, साक्षात भगवंतांचे हे अवतारच आहेत. भगवंतांची मायाशक्ती कशी आहे, जीवात्मा कसा अनर्थ, संसार दुःख भोगतो आहे. सर्व दुःख दूर करण्याकरता भगवंत, भक्तियोग म्हणजे काय आहे, हा सगळा विचार त्यांनी केला. आणि हे सर्व लोकांना समजावून सांगण्याकरता भागवत संहिता त्यांनी तयार केली.

वेदव्यास महर्षि समाधी अवस्थेमध्ये असताना हे भागवत त्यांच्या मुखातून बाहेर पडलेलं आहे. सगळं पाहून लिहिलेलं आहे.

***
पान ५६
यस्यां वै श्रूयमाणायां कृष्णे परमपूरुषे ।
भक्तिरुत्पद्यते पुंसः शोकमोहभयापहा ।।
1.7.7 ।। श्री. भा.

भागवताचं महत्त्व सांगताहेत श्रुती. जे भागवत श्रवण केलेलं असताना भगवान श्रीहरी संबंधी अंत:करणामध्ये भक्ती निर्माण होते आणि त्या भक्तीने काय होते, सगळे शोक मोह दूर होतात. म्हातारपणही निघून जाते म्हणजे शरीराचे जे काही विकार आहेत ते सगळे विकार दूर होताहेत. अशी ही भागवत संहिता तयार करून, शुकाचार्य जे आपले पुत्र आहेत, ज्ञानी, ब्रह्मज्ञानी त्यांनाही त्यांनी शिकवून ठेवली. प्रसार झाला पाहिजे ना!

शौनकांनी पुन्हा विचारले, ""अहो पण शुकाचार्यांनी अभ्यास केला कसा? बाहेर त्यांचं लक्षच नाही आहे ना? समाधीमध्ये नेहमी असणारे. सूतजी सांगतात, ""यति महाराज हे जे आत्मज्ञानी महात्मे आहेत, त्यांच्या अंत:करणामध्ये भगवत् भक्ती ही नैसर्गिक असली पाहिजे. भगवंताचे गुण त्या शुकाचार्यांच्या कानावर पडले, कृष्णचरित्र त्यांनी थोडंसं ऐकलं. वेदव्यासांच्या शिष्यांपासून आणि एकदम त्यांची समाधी उतरली. त्या शिष्यांच्या जवळ गेले, शुकाचार्य. असे कोणी तुम्हाला शिकविले. मला घेऊन चला, मला अभ्यास करायचा आहे.

हरेर्गुणाक्षिप्तमतिर्भगवान् बादरायणिः ।।
1.7.11 ।। श्री. भा.

हरिगुण श्रवण केल्याबरोबर ती निर्गुण निराकार ब्रह्मसमाधी सुटली त्यांची आणि आले ते शिष्यांच्याबरोबर वेदव्यासांच्या जवळ. व्यासांपासून सर्व अभ्यास त्यांनी केलेला आहे. उत्तम बुद्धी आहे ज्ञान आहे.

शुकाचार्य भागवताचे वक्ते कसे झाले हे सांगितलं. आता श्रोता परिक्षीत राजा याचं चरित्र सांगताहेत.

यदा मृधे कौरवसृंजयानां ।
वीरेष्वथो वीरगतिं गतेषु ।।
1.7.13 ।। श्री. भा.

कौरव पांडवांचं युद्ध समाप्त झालेलं आहे अठरा दिवसांनी. सर्वही वीरांचा संहार झाला. दोन्ही पक्षाला जमलेले एकंदर अठरा अक्षौहिणी सैन्य नाहीसे झाले. शेवटच्या दिवशी भीमाने दुर्योधनाचाही नाश केला. मांडीवर गदा प्रहार करून दुर्योधनही खाली पडलेला आहे. अश्वत्थामा, कृपाचार्य आणि कृतवर्मा यादव हे तिघे दुर्योधनाच्या सैन्यापैकी शिल्लक राहिले होते. अश्वत्थाम्याला पांडवांच्या बद्दल अत्यंत राग आलेला आहे. त्यांच्या सेनापतीने आपल्या बापाला मारलेलं आहे,

***
पान ५७

त्या सेनापतीला तर मारायचंच आहे. पण त्या पांडवांचाही नाश करायचा आहे. असं अश्वत्थाम्याने ठरवलेले आहे, शेवटच्या दिवशी रात्री वेळ मिळालेला आहे. आपल्या आपल्या शिबिरामध्ये स्वस्थ झोपलेले आहेत. पांडवांना घेऊन गोपालकृष्ण दुसरीकडे गेलेले होते. त्या शिबिरात राहिले नाहीत. दोन्ही दरवाजांवरती कृपाचार्य व कृतवर्मा या दोघांना राहण्यास सांगितले अश्वत्थाम्याने. आपण आत शिरलेला आहे. मध्यरात्रीच्या वेळेला. त्याने अगोदर धृष्टद्युम्नाच्या शिबिरामध्ये जाऊन त्याला लाथ मारून जागा केला. लाथा बुक्क्या घालून त्याला मारलं. तुला शस्त्राने मरण येणार नाही म्हणाला, तुला नरकातच पाठवायला पाहिजे. मारलं त्याला. अठरा दिवसापर्यंत हा पांडवांचा सेनापती सुरक्षित राहिला होता. कौरवांचे बदलले सेनापती. भीष्म गेले, द्रोण गेले, कर्ण गेला. हा राहिला होता. तो शेवटी मारला त्याने. याप्रमाणे त्याच ठिकाणी त्या दिवशी द्रौपदीची पाचही मुलं त्या शिबिरामध्ये होती. त्यांनाही ठार मारले अश्वत्थाम्याने. पांडवांच्या वंशाला कोणीही ठेवायचं नाही. निर्वंश पांडव करायचे, हा त्याचा निश्चय झालेला आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी ही बातमी समजली. पांडव दुसरीकडे होते, कृष्ण त्यांना दुसरीकडे घेऊन गेले होते आणि हे झालं. सगळे सैन्य राहिलेलं मारलं अश्वत्थाम्याने. सेनापती मारला आणि आपली पाचही मुलं मारलेली आहेत. धर्मराजांच्या मनावर इतका परिणाम झाला, विजय कोणाचा झाला म्हणाले, कौरव विजयी झाले की पांडव विजयी झाले. काय विजय घेऊन करायचंय, सगळी मुलं गेली आता. अभिमन्यू पूर्वीच गेला होता युद्धामध्ये. द्रौपदीला अत्यंत दु:ख झालेलं आहे, बिचारी रडत बसलेली आहे. सबंध आयुष्य अपमान आहे, दु:ख आहे. अरण्यामध्ये राहावं लागलेलं आहे, आणि अत्यंत अपमान सहन करावा लागलेला आहे. शेवट तरी चांगला होईल, मुलं आहेत आता, आपलं राज्य करतील आता, आपण आनंदात राहू, सगळं गेलं, सगळा आनंद गेला. कृष्णार्जुन तिच्या जवळ आलेले आहेत. अर्जुनाने सागितलं, ""द्रौपदी, आत्ता जाऊन मी त्या अश्वत्थाम्याचा शिरच्छेद करतो आणि मग तुझं समाधान करण्याकरता येतो म्हणाले. निघाले कृष्णार्जुन, रथामध्ये बसून. अश्वत्थाम्याला धरून आणण्याकरता निघाले. तोही आणखी, बाहेर पडलेला आहे, हस्तिनापूर सोडून. तो पुढे जातो आहे आणि त्याला गाठले त्या कृष्णा अर्जुनांनी. त्याने पाहिले आता आपलं संरक्षण काही यांच्याकडून होणार नाही, मारणार हे आता. म्हणून प्राण रक्षणाकरता त्याने पाण्यामध्ये घेऊन ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला.

अजानन् उपसंहारं प्राणकृच्छ्र उपस्थिते ।।
1.7.20 ।। श्री. भा.
***
पान ५८

सूत सांगताहेत, ""ब्रह्मास्त्राचा उपसंहार कसा करावा हे त्याला ज्ञान मिळालेलं नाही आहे. प्रयोग फक्त ज्ञात आहे. उपसंहाराचं ज्ञान नाही आहे. अर्धवट ज्ञान आहे. तरीसुद्धा त्याने ते सोडले. चारी बाजूला अत्यंत तेज पसरलेलं आहे. सर्व लोकांचा नाश होण्याची पाळी आलेली आहे. अर्जुनाने भगवंतांना विचारले हे कुठले तेज आले म्हणाले, भगवान म्हणाले, हे ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे, अश्वत्थाम्याने, तूही ब्रह्मास्त्राचा प्रयोग कर. तुला पूर्ण ज्ञान आहे. अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं, अर्जुनानेही आपल्या ब्रह्मास्त्राचा प्रयोग केलेला असताना, सर्व प्रजाजनांचा संहार होऊ लागला. मग भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, दोन्हीही अस्त्रांचा उपसंहार तू कर. त्याने लगेच दोन्हीही अस्त्रं शांत केलेली आहेत. आणि रथातून खाली उडी मारून अश्वत्थाम्याला धरलेलं आहे. त्याचे हात दोन्ही बांधून टाकलेले आहेत. आणि त्याला घेऊन निघाले, द्रौपदीच्याकडे त्याला न्यायचे आहे. त्याची परीक्षा पाहताहेत भगवान गोपालकृष्ण, ""का रे अर्जुना त्या द्रौपदीच्याकडे कशाला घेऊन जातोस याला, इथेच ठार का मारत नाहीस? निजलेल्या मुलांना ज्यांनी मारलेलं आहे, हा किती क्रूर आहे. कशाला जिवंत ठेवतोस याला.'' परंतु आपल्या गुरुजींचा मुलगा आहे, मोठा गुरुभक्त होता अर्जुन. त्याने काही मारलं नाही त्याला. द्रौपदीच्या समोर आणून उभं केलेलं आहे. ती आपली मान खाली घालून रडती आहे बिचारी. काय करावे.

""द्रौपदी हा तुझा अपराधी आणलेला आहे, तू सांगशील ती शिक्षा मी याला करणार आहे.'' वर डोकं उचलून तिने पाहिले. खाली मान घालून अश्वत्थामा उभा राहिलेला आहे. हात बांधलेले आहेत. एकदम उठली. पुत्रशोक नाही, काही नाही, संसार सगळा, पुत्रशोक विसरून गेलेली आहे. आणि अश्वत्थाम्याच्या जवळ जाऊन तिने नमस्कार केला त्याला. मोठा ज्ञानी महात्मा आहे तो. आपल्या गुरुजींचा मुलगा आहे. लगेच तिने अर्जुनाला सांगितले,

मुच्यतां मुच्यतां एष ब्राह्मणो नितरां गुरुः ।।
1.7.43 ।। श्री. भा.

सामान्य शास्त्र सांगती आहे. विशेष शास्त्र सांगती आहे. हे सगळंही तिने सांगितले आहे. आणि द्रौपदी जे जे सांगेल ती शिक्षा करायची यांनी ठरविले आहे. द्रौपदीने सांगितले याला सोडून द्या. जीवदान द्या याला. हा ब्राह्मण आहे. सर्व धर्म, वेदाचा याने अभ्यास केलेला आहे. आणखी दुसरं कारण तिने अर्जुनाला सांगितले की, ""त्याच्या पित्याजवळ तुम्ही अभ्यास केला, त्यांची सेवा केली, द्रोणाचार्यांची, आणि सर्व ज्ञान तुम्ही मिळवलं धनुर्विद्येचं. देवांनाही, सर्वांना अजिंक्य आपण झालात. तेच द्रोणाचार्य तुमच्यासमोर अश्वत्थाम्याच्या रूपाने उभे राहिले आहेत. हे तुमच्या लक्षात येत नाही. अश्वत्थाम्याला मारायचे म्हणजे द्रोणाचार्यांना मारण्याचा दोष लागेल.'' हेही...

***
पान ५९

कारण सांगितले. आणखी शेवटी हे कारण सांगती आहे ती, अत्यंत दयाभाव मनामध्ये आहे.

मा रोदीदस्य जननी गौतमी पतिदेवता ।
यथाहं मृतवत्साऽऽर्ता रोदिम्यश्रुमुखी मुहुः ।।
1.7.47 ।।

""याची माता अजून जिवंत आहे. तिला पुत्रशोक व्हावा अशी माझी इच्छा नाही. पतिव्रता स्त्री आहे. पती गेला, ती या मुलाकडे पाहून जिवंत राहिलेली आहे. यालाही तुम्ही मारून टाकल्यावर जन्मभर तिला दु:ख करावं लागेल. मला पुत्रशोकाचा अनुभव येतो आहे. माझ्यासारखं दु:ख याच्या माऊलीला देऊ नका एवढीच माझी प्रार्थना आहे.

केवढा दयाभाव मनामध्ये आहे. भगवंतांनी गीतेमध्ये जे सांगितले आहे.

आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन ।
सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः ।।
6.32 ।। श्री. भगवद्गीता

हा अधिकार श्रेष्ठ योगी पुरुषांचा आहे. आपल्या प्रमाणे सर्वही सुखी असावेत. आपल्याला जी दु:ख भोगावी लागतात ती आणखी कोणालाही मिळू नयेत. सगळे दु:खरहित असावेत. ज्याची ही मनोभूमिका आहे तो मोठा योगी आहे. महान भगवद्भक्त, कृष्णभक्त द्रौपदी, सर्व मुलं ज्याने मारलेली आहेत त्या अश्वत्थाम्याला मारू नका म्हणून सांगते. ही आत्मौपम्य बुद्धी जी आहे ही ईश्वराची कृपा आहे. गेली मुलं आता काय करणार? राहिली असती तरी हे मिळालं असतं का? सर्व मंडळी आश्चर्यचकित झालेली आहेत, द्रौपदी रागाने काही तरी बोलेल, पण राग नाही आहे. सोडून द्या म्हणते. धर्मराजाला सुद्धा आश्चर्य वाटले, की काय ही द्रौपदी, अरण्यामध्ये मला रागावून बोलायची की तुमच्या धर्मामुळे हे सगळं गेलं, राज्य गेलं, दुर्योधनाने सगळं घेतलं आणि आता, केवढा धर्म आहे. भगवान गोपाल कृष्णांनी, सर्व ऋषिमंडळींनीही आणखी फार चांगली आहे द्रौपदी असं सांगितलं. भीमाला मात्र राग आलेला आहे, तो म्हणाला नाही, मी याला जिवंत सोडणार नाही. पुत्र शोकामुळे ही अशी वाटेल तशी बोलती आहे. हिला काही भान नाही आहे. शुद्ध नाही आहे. मी याला जिवंत सोडणार नाही.

भगवान गोपालकृष्ण म्हणाले, अर्जुना, द्रौपदीची मुलं ज्याने मारली, ती द्रौपदी सांगती आहे की याला जिवंत सोडून द्या. तुझा ज्येष्ठ बंधू भीम म्हणतो सोडणार नाही. काय करायचं तुझं तू ठरव बाबा. कितीही दुर्वर्तन करणारा ब्राह्मण असला तरी त्याला देहदंड देऊ नये, अशी माझी आज्ञा आहे.

***
पान ६०
ब्रह्मबंधुर्न हंतव्य आततायी वधार्हणः ।।
1.7.53 ।। श्री. भा.

घर जाळणारा, सर्वांचा नाश करणारा जो आहे त्याला तात्काळ ठार मारावे ही माझी आज्ञा आहे. तू विचार कर मनाने आणि योग्य ते कर. द्रौपदीचीही इच्छा पूर्ण झाली पाहिजे आणि भीमाचंही समाधान झालं पाहिजे. अर्जुन मोठा, ईश्वरभक्त, गुरुभक्त. भगवंताचा अभिप्राय त्याच्या लक्षामध्ये आलेला आहे. ते जरी स्पष्ट बोलले नाही तरी लक्षामध्ये आलेलं आहे. त्याने लगेच तलवार उपसली, अश्वत्थाम्याचे सर्व केस कापून टाकले. जन्मापासून त्याच्या मस्तकामध्ये एक दिव्य मणी होता, तो काढून घेतलेला आहे. बालहत्या केल्या त्याने. त्याचं सगळं तेज गेलेलं आहे. त्याला लगेच आज्ञा केली, आमच्या हद्दीमध्ये तू राहू नकोस. दुष्ट ब्राह्मणांना हाच दंड शास्त्रांनी सांगितलेला आहे. देहदंड नाहीये. अश्वत्थामा निघून गेला. सर्वही पांडव पुत्र शोक झाल्यामुळे अत्यंत दु:खी झालेले आहेत. द्रौपदीला बरोबर घेऊन गंगातीरावर गेलेले आहेत आणि जलांजली सर्वांना दिलेली आहे.

इकडे धृतराष्ट्र, गांधारी दु:खामध्ये पडलेले आहेत. सगळी शंभराच्या शंभर मुलं या भीमाने मारून टाकलेली आहेत. तिकडे त्यांना पुत्रशोक झाला. इकडे द्रौपदी, पांडव हेही पुत्रशोकामध्ये व्याकुळ झालेले आहेत. भगवंतांनी सगळ्या ऋषिमंडळींना सांगितलं, यांचं सांत्वन करा, यांना सांगा काहीतरी. कालगती आहे म्हणाले, कालाने कोणत्या वेळेला काय होईल काही सांगता येत नाही. पूर्ण सुख आहे आपल्याला असं वाटता वाटता एकदम दु:खाचा भाग उत्पन्न होतो आहे. अशी काही विलक्षण कालाची स्थिती आहे.

पांडवांच्याकडून यज्ञयाग केले पुष्कळ दिवस झाले. म्हणून त्यांची अनुज्ञा घेऊन द्वारकेला जाण्याकरता भगवान गोपालकृष्ण रथामध्ये जाऊन बसले. आता रथ निघणार इतक्यात ती अभिमन्यूची पत्नी उत्तरा धावत धावत आली.

पाहि पाहि महायोगिन् देवदेव जगत्पते ।।
1.8.9 ।। श्री. भा.

""हे योगीश्रेष्ठ, योगीश्वरा, श्रीकृष्णा माझं आपण रक्षण आता करा. दुसरं कोणीही माझं रक्षण करणार नाही. माझ्या पाठीमागे हा बाण आलेला आहे. मी मरणार म्हणाली, मी जिवंत राहणार नाही. मला जिवंत राहण्याची इच्छा नाही. पण माझ्या गर्भामध्ये पांडवांचा वंश आहे. त्याचा नाश होऊ नये.'' थांबवायला सांगितला रथ. आणि रथातून खाली उतरले गोपालकृष्ण.

अपांडवमिदं कर्तुं द्रौणेरस्त्रमबुध्यत ।।
1.8.11 ।। श्री. भा.
« Previous | Table of Contents | Next »