« Previous | Table of Contents | Next »
पान ४१

सर्व व्यवस्था करावी, राहण्याची व्यवस्था वगैरे. पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख असं वाचन करावं. त्याचप्रमाणे आरंभाला अरुणोदयाच्या वेळेला स्नान संध्यादिक सर्व कर्म करून भगवान गणेशांची पूजा आरंभाला करावी. विघ्नं कोणतीही येऊ नयेत म्हणून. पितरांचं तर्पण वगैरे करावं, आणखी भगवान श्रीहरींची स्थापना करून, कृष्णांची, भगवंतांची पूजा करावी आणि प्रार्थना करावी की संसारसागरात मी मग्न झालेलो आहे. माझा उद्धार आपण करा. भागवत ग्रंथाचीही पूजा करावी. आणखी श्रीफळ त्याठिकाणी ठेवून नमस्कार करून भागवत म्हणजे साक्षात गोपालकृष्ण आहेत. या संसारबंधनातून सर्व कर्मबंधनातून मला मुक्ती प्राप्त व्हावी याकरता मी आपल्याला शरण आलेलो आहे. माझी इच्छा आपण पूर्ण करा. अशा रितीने हे सर्वही सांगितलेलं आहे. सूर्योदयापासून याला आरंभ करावा. मध्यान्हकाली भगवंताचं नामसंकीर्तन करावं, भजन वगैरे करावं, आणखी आहार अत्यंत सात्त्विक अशा प्रकारचा, हविष्यान्न वगैरे जे सांगितलं आहे, तेलकट, तूपकट वगैरे घेऊ नये. शक्तिसामर्थ्य असेल तर उपोषण करून आणखी श्रवण करावं. नुसतं तूप किंवा नुसतं दूध घेऊनही श्रवण करावं. फलाहार घेऊन श्रवण करावं किंवा एकवेळ भोजन करून श्रवण करावं. जे आपल्या प्रकृतीला मानवेल तसं करावं. परंतु मुद्दाम त्यांनी सांगितलंय सूतांनी, सनतकुमारांनी,

भोजनं तु वरं मन्ये कथाश्रवणकारकम् ।
नोपवासो वरः प्रोक्तः कथाविघ्नकरो यदि ।।
6.43 ।। माहात्म्य

कोणी एखाद्याला प्रकृती चांगली आहे, त्याने आणखी उपोषण केलं म्हणून आम्ही जर उपोषण करायला लागलो आणखी आमच्या प्रकृतीमध्ये जर विघ्न आलं तर! श्रवणच बंद होणार ना! त्यापेक्षा भोजन करायला हरकत नाही अशीही संमती त्यांनी दिली आहे. पत्रावळीमध्ये भोजन करावं. त्याचप्रमाणे मनाचा निग्रह, काम, क्रोध, गर्व, अहंकार वगैरे विकार मनामध्ये उत्पन्न होऊ नयेत. श्रेष्ठ पुरुषांची निंदा कोणाचीही करू नये. त्याचप्रमाणे काही वर्ज्य पदार्थ जे सांगितलेले आहेत ते भक्षण करू नयेत. आणखी वाणीचा सुद्धा निग्रह करून सत्य वाणी आहे त्याचप्रमाणे सरळ वाणी, विनीत वाणी असावी. असं सगळंही त्यांनी, मनाचे नियम, वाणीचे नियम आणखी शरीराचे नियम वगैरे सगळं सांगितलेलं आहे. अशा रितीने हे सर्व यथाविधी जर केलं तर त्याचं फल प्राप्त होतं. समाप्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आठव्या दिवशी भगवद्गीता वाचावी. आणि सर्व दोष जे काही न्यूनाधिक दोष दूर होण्याकरता विष्णुसहस्रनामाचंही पठण करावं हे ही त्यांनी सांगितलं. तशी इच्छा असेल तर भागवत दशम स्कंधाचा आणखी स्वाहाकार, हवनही करावं असाही एक विधी सांगितला आहे.

***
पान ४२

सनतकुमार सांगतात, ""नारदा हे सर्व माहात्म्य तुम्हाला सांगितलेलं आहे. यामुळे तुमची इच्छा पूर्ण होईल. भक्तीमार्गाचा प्रसार झाला पाहिजे. लोकांची बुद्धी शुद्ध झाली पाहिजे. भगवद्भक्तीशिवाय ती होणार नाही. त्याकरता तीही तुमची इच्छा पूर्ण होईल''. नारदांना अत्यंत आनंद झालेला आहे.

इतक्यात शुकाचार्य महाराज त्याठिकाणी आले फिरत फिरत. सोळा वर्षाचं वय आहे. "ज्ञान महाब्धिचंद्रः' त्यांना म्हटलेलं आहे. ज्ञान समुद्रातले चंद्र, अखंड भागवताचं पठण, सारखं मुखाने चाललेलं आहे. अठरा हजार श्लोकांचं भागवत पण सबंध पाठ आहे. ह्या भागवताचं माहात्म्य त्यांनी सांगितलेलं आहे. स्वर्गलोकामध्ये, ब्रह्मलोकामध्ये, कैलासपर्वतामध्ये हा रस नाही आहे त्याकरता या भागवताचं तुम्ही सेवन करा अशी सूचना त्यांनी केलेली आहे. भगवान श्रीहरी त्याठिकाणी प्रगट झाले. सगळी ऋषिमंडळी, सगळी देवमंडळी होती आणखी मग तिथे कीर्तनाला आरंभ झालेला आहे. शुकाचार्य महाराज कीर्तन करताहेत. प्रल्हाद तालधारी. टाळ धरण्याचं काम प्रल्हादजी करताहेत. इंद्राने मृदंग वाजवण्याचं काम सुरु केलेलं आहे. कार्तवीर्यार्जुनाने गायनाचं काम केलेलं आहे. शुकाचार्य महाराज भगवंताचं कीर्तन करताहेत. ब्रह्मदेव आहेत, शंकर भगवान आहेत. वैकुंठपती श्रीकृष्णपरमात्मा तर बसलेलेच आहेत. सर्वांना आनंद झाला. आणि भगवंताने त्या सर्व लोकांना सांगितलं. तुमची भक्ती पाहून मला समाधान झालेलं आहे. काय तुम्हाला मागायचा तो वर मागून घ्या. त्यांनी प्रार्थना केली देवाला, ""भगवंता,

निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतम् ।
पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः ।।
6.89 ।। माहात्म्य

(टीप: वरील श्लोक संदर्भाने 1.1.3 असावा, पण येथे पुस्तकातील संदर्भानुसार अर्थ घेतला आहे: "ज्याठिकाणी भागवत सप्ताह यज्ञ चाललेला असेल त्याठिकाणी आपल्या या सर्व भक्तमंडळींना घेऊन आपण इथे वास्तव्य करावं ही आमची इच्छा आहे.")

तथास्तु म्हणून भगवंतांनी सांगितलं. गुप्त झाले. नारदांनी सर्व ऋषिमंडळींचा सत्कार केला आहे. नमस्कार सर्वांना केला. भक्ती, ज्ञान, वैराग्य यांना अत्यंत शांती मिळालेली आहे. त्यांच्या मनाचं समाधान झालेलं आहे. हे नारदांचं काम आहे. शौनकांनी विचारलं, शुकाचार्यांनी परिक्षीत राजाला हे भागवत केव्हा सांगितलं? गोकर्णाने केव्हा भागवतसप्ताह केला? आणि देवर्षि नारदांना ब्रह्मकुमारांनी, सनतकुमारांनी केव्हा सांगितलं?

सूत सांगताहेत,

***
पान ४३
आकृष्णनिर्गमात्त्रिंशद्वर्षाधिकगते कलौ ।
नवमीतो नभस्ये च कथारंभं शुकोऽकरोत् ।।
6.94 ।। माहात्म्य

भगवान गोपालकृष्ण हे वैकुंठलोकाला निघून गेल्यानंतर तीस वर्ष परिक्षीत राजाने राज्य केलेलं आहे. तेव्हा तीस वर्ष गेल्यानंतर भाद्रपद शुद्ध नवमीपासून पौर्णिमेपर्यंत शुकाचार्यांनी परिक्षीत राजाला ही कथा सांगितली. परिक्षीत राजाचं श्रवण झाल्यानंतर कलियुगाचा दोनशे वर्षांचा काल गेला. त्यावेळेला आषाढ शुद्ध नवमीपासून पौर्णिमेपर्यंत गोकर्णाने ही कथा सांगितली. त्यानंतर तीस वर्षाचा कलीचा काल गेला असताना कार्तिक शुद्ध नवमीपासून पौर्णिमेपर्यंत सनतकुमारांनी ही कथा नारदांना सांगितली. असा एक कालनिर्णयही त्यांनी दिलेला आहे. अशी ही भागवतकथा भवरोग दूर करणारी आहे. भगवान श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे. सर्व आणखी पातकांचा नाश करणारी आहे. यमनगरातून आणि यमाच्या आज्ञेने पापी मनुष्याला नरकात आणण्याकरता यमदूत निघाले असताना यमधर्म त्यांना बोलावतो आहे. आणि त्यांच्या कानामध्ये सांगतोय,

परिहर भगवद्कथासुमत्तान् प्रभुरहमन्यनृणां न वैष्णवानाम् ।।

""भगवत्कथा अत्यंत प्रेमाने श्रवण करणारे श्रद्धेने असतील. त्यांच्याकडे तुम्ही जाऊ नका बाबांनो. त्यांच्यावर माझा अधिकार नाहीये. पापी लोकांवरती माझा अधिकार आहे''. अशा रितीने त्यांनी हे सांगितलेलं आहे. तेव्हा असं हे एकंदर सर्वशास्त्रांचा विचार करून शुकाचार्यांनी सांगितलेली कथा किती निर्मल आहे. शुद्ध आहे, पापक्षय करणारी आहे हे सगळंही आणखी सूतांनी शौनकादिक महर्षींना सांगितलेलं आहे. आणि मग त्यांचे प्रश्न, त्या प्रश्नांप्रमाणे संपूर्ण भागवत हे सूतांनी निवेदन केलेलं आहे.

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा । बुद्ध्यात्मना वा अनुसृतस्वभावात् ।।
करोति यद्यत् सकलं परस्मै । नारायणायेति समर्पयेत् तत् ।।
11.2.36 ।। भा.

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव ।।
प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णो भगवन् नमस्ते ।।

।। गोपालकृष्ण भगवान की जय ।।
।। श्रीमद्भागवत गोकर्ण माहात्म्य समाप्त ।।

***
पान ४४

।। श्रीमद्भागवत पहिला दिवस ।।

Lord Vishnu
ॐ नमस्तेस्तु गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने ।
यस्यागस्त्यायते नामविघ्नसागरशोषणे ।।

यस्यस्मरणमात्रेण जन्मसंसारबंधनात् ।
विमुच्यते नमस्तेस्तु विष्णवे प्रभविष्णवे ।।

विशुद्धज्ञानदेहाय त्रिवेदीदिव्यचक्षुषे ।
श्रेयःप्राप्तिनिमित्ताय नमः सोमार्धधारिणे ।।

यो देवः सवितास्माकं धियोधर्मादिगोचरः ।
प्रेरयेत्तस्य तद्भर्गस्तवरेण्यम् उपास्महे ।।

सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोस्तुते ।।

नमो आदिरूपा ॐकार स्वरूपा । विश्वाचिया रूपा पांडुरंगा ।।
तुझिया सत्तेने तुझे गुण गाऊ । तेणे सुखी राहू सर्व काळ ।।
तूची श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन । सर्व होणे जाणे तुझे हाती ।।
तुका म्हणे जेथे नाही मी-तू-पण । स्तवावे ते कवणे कवणालागी ।।
***
पान ४५
यत् कीर्तनं यत्स्मरणं यदीक्षणं यत् वंदनं यत् श्रवणं यदर्हणम् ।
लोकस्य सद्यो विधुनोति कल्मषम् तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः ।।

विवेकिनो यद्-चरलोपसादनात् संगं व्युदस्योभयतोऽन्तरात्मनः ।
विन्दंति हि ब्रह्मगतिं गतक्लमाः तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः ।।

तपस्विनो दानपरा यशस्विनो मनस्विनो मंत्रविदस्सुमंगलाः ।
क्षेमं न विन्दंति विना यदर्पणम् तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः ।।

माला पात्रे च डमरू शूले शंख सुदर्शने ।
दधानम् भक्तवरदम् दत्तात्रेयम् नमाम्यहम् ।।

योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् । संजीवयत्यखिलशक्तिधरः स्वधाम्ना ।
अन्यांश्चहस्तचरणश्रवणत्वगादीन् । प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् ।।

मूकं करोति वाचालं पंगुम् लंघयते गिरीम् ।
यत् कृपा तमहं वंदे परमानंदमाधवम् ।।

आपदामपहर्तारम् दातारम् सर्वसंपदाम् ।
लोकाभिरामम् श्रीरामम् भूयो भूयो नमाम्यहम् ।।

यत्र यत्र रघुनाथकीर्तनं । तत्र तत्र कृत मस्तकांजलिम् ।
बाष्पवारिपरिपूर्णलोचनं । मारुति नमत राक्षसांतकम् ।।

पुस्तकाजवटेहस्ते वरदाभयचिन्ह चारुबाहुुलते ।
कर्पुरामलदेहे वागीश्वरी चोदयशु मम वाचम् ।।

श्रीगणेशाय नमः
श्रीगुरुचरणारविंदाभ्याम् नमः ।

भगवान वेदव्यास महर्षि, अनेक पुराणग्रंथाची रचना त्यांनी केली. वेदांचे चार विभाग केले. महाभारतासारखा मोठा इतिहास ग्रंथ लिहिला. पण चित्ताला काही शांती लाभेना. नारदमहर्षींच्या मार्गदर्शनाप्रमाणे भागवत महापुराण करावं अशी त्यांना इच्छा उत्पन्न झाली. आरंभाला त्यांनी परमेश्वराचं स्मरण केलेलं आहे. मंगलाचरण. ईश्वर हाच सद्गुरुरूप आहे. ईश्वराची दोन रूपं त्यांनी या श्लोकामध्ये आरंभाच्या दाखविलेली आहेत. संपूर्ण सृष्टीचं कार्य करणारा परमात्मा आहे. ईश्वराचं ज्ञान करून देण्याकरता त्याचं लक्षण आरंभाला सांगताहेत. सर्व जगाची उत्पत्ती, स्थिती आणि...

***
पान ४६

प्रलय ही कार्य त्या परमेश्वराची आहेत. त्याच्यापासून होताहेत. सर्वज्ञान त्याला आहे. स्वयंप्रकाश अशा प्रकारचा हा परमात्मा आणि त्यांनीच आरंभाला ब्रह्मदेवाला सर्वही वेदज्ञानाचा उपदेश केलेला आहे. म्हणजे गुरुस्थानीही भगवान आहे. आणि सृष्टी करण्याचं सामर्थ्य असल्यामुळे सृष्टीकर्ताही तो आहे. तोच सर्वरूप बनलेला आहे. तेच समजून घ्यायचं ज्ञान होणं मोठं कठीण आहे. सूर्याचे किरण पसरलेले असताना पाणी आहे असा भास होतो त्या मृगाला. मृगजळ! त्याप्रमाणे त्रिगुणात्मक ही जी मायासृष्टी, हे जे विश्व आहे हे, सच्चिदानंद परमात्मा त्याच्या स्वरूपावर हे भासतं आहे. असत्य मिथ्या आहे. त्याला अधिष्ठानभूत जे सत्यतत्त्व आहे, परब्रह्मरूप त्याचं ज्ञान झालं म्हणजे हे सर्वही आभास, विश्वाभास मावळून जातो आहे. त्या आणखी आनंदस्वरूप परमेश्वराचं आम्ही चिंतन करतो, ध्यान करतो अशी प्रार्थना आरंभाला व्यासांनी केलेली आहे.

भागवत ग्रंथामध्ये कोणता विषय सांगितलेला आहे? मुख्य काय सांगितलेलं आहे तर परमेश्वराची भक्ती, आराधना, उपासना हाच मार्ग याच्यामध्ये सांगितलेला आहे. ईश्वराची भक्ती करावी सर्वांनी. निर्मत्सर म्हणजे मनामध्ये कामक्रोधादिक विकार ज्यांच्या मनामध्ये नाही आहेत. असे जे आहेत सत्पुरुष, साधू त्यांच्याकरता याठिकाणी ईश्वराची आराधना हा धर्म सांगितला. ईश्वराची आराधना केल्यानंतर ते जे आहे अधिष्ठानभूत, मूलतत्त्व जे आहे परमात्मा, भगवान, परब्रह्म ज्याला म्हणतात त्यांचं ज्ञान होतं. आणि सर्वही मिथ्या, आभास निघून जातात. तापत्रय सर्वही नाहीसं होतं आहे. असं हे भागवत, वेदव्यास मुनींनी केलेलं आहे. ईश्वराच्याच कृपेनेच याचं श्रवण जर घडलं तर तो परमात्मा चित्तामध्ये अभिव्यक्त होतो. असं सर्वही वेदांचं सारभूत हे आहे. हे सर्वांनीही ऐकावं, चिंतन करावं असं आवाहन करून कथेला आरंभ केलेला आहे वेदव्यासांनी.

नैमिषारण्यामध्ये, शौनकादिक ऋषिंचं वास्तव्य आहे. यज्ञागादि चालू आहेत त्यांचे. ईश्वराची उपासनाच ती आहे. त्या यज्ञयागामध्ये एकदा पुराणांचा ज्यांनी अभ्यास केलेला आहे, अशा प्रकारचे सूत तिथे आलेले आहेत, वेदव्यासांचे शिष्य. आनंद झाला सर्व ऋषींना. त्यांचं स्वागत केलं, सत्कार केला त्यांनी आणि बोलायला सुरुवात केली, ""सूतजी, वेदव्यासांच्याजवळ राहून आपण सर्वही पुराणांचा अभ्यास केलेला आहे. धर्मशास्त्र सर्व आपण शिकलेले आहात. व्यास महर्षींची आपल्यावर मोठी कृपा झालेली आहे, सर्वज्ञान आपल्याजवळ आहे. तर आम्हाला आपण सांगा, अनेक शास्त्रं आहेत, अनेक पुराणग्रंथ आहेत, या सर्वांमध्ये, मानवाने जे करावं, मुख्य जे आहे...

***
पान ४७

मानवांना करण्यासारखं ते आम्हाला आपण सांगा. सर्व ऐकायला इतकं आयुष्य आता कुणाजवळ आहे. आता कलियुग सुरु झालेलं आहे. अल्प आयुष्य आहे. बुद्धीही अल्प आहे आणि भाग्यही अल्प आहे. ऐकण्यासारख्या पुष्कळ गोष्टी असतील, सर्वांचं सार, प्रधान साधन कोणतं आहे तेवढं आपण आम्हाला सांगा''. हा एक प्रश्न आहे. असे पाचसहा प्रश्न ऋषींनी केलेले आहेत. दुसरा प्रश्न त्यांनी विचारला, ""महाराज, देवकी आणि वसुदेव यांचे पुत्र झाले भगवान, श्रीकृष्णांचा अवतार कशाकरता झाला, हेतू काय? श्रीकृष्णअवताराचा हेतू त्यांनी विचारलेला आहे. भगवंताची लीला ऐकणारे अशा प्रकारचे जे आहेत, मोठेमोठे ऋषि हे सगळ्या जगाला सुद्धा पवित्र करतात. उद्धार करू शकतात. त्या भगवान श्रीकृष्णांचं चरित्र आम्हाला सांगा. त्यानंतर भगवंतांनी मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम पुष्कळ अवतार, दहाच अवतार नाही, आणखीही अवतार या भागवतामध्ये सांगितलेले आहेत. त्या सर्वही अवतारांच्या कथा आपण आम्हाला सांगा. भगवंताच्या कथा कितीही ऐकल्या तरी आमच्या मनाचं समाधान होत नाही. बलरामांच्यासह भगवान गोपालकृष्ण अवतार घेऊन आले आणि, फार मोठ्या लीला त्यांनी केल्या. त्या श्रीकृष्णांचं संपूर्ण चरित्र आम्हाला आपण सांगा. आम्ही त्याकरता इथे बसलो आहोत. आपण इथे आम्हाला भेटण्याकरता आला ही देवाची कृपा आम्ही समजतो आहे. आपल्या मुखातून ईश्वराचं चरित्र आम्हाला ऐकायचंय''. आणखी एक प्रश्न असा आहे, ""योगेश्वर श्रीकृष्ण भगवान हे निजधामाला गेले, वैकुंठलोकाला गेल्यानंतर ह्या धर्माचं संरक्षण कोणी केलं? धर्मरक्षक कोण आहे?''

याप्रमाणे सूतांनी ऋषींचे प्रश्न ऐकले, त्यांची उत्कंठा, आस्थाही पाहिली. आणि त्यांनी आपले जे गुरुमहाराज शुकाचार्यमहाराज यांना वंदन केलेलं आहे. आणि सांगायला आरंभ केला. नरनारायण देवता आहे भारतवर्षाची. त्या नरनारायणांनाही नमस्कार केला सूतांनी. आणि विद्यादेवी सरस्वतीला वंदन करून आरंभ करताहेत.

""ऋषि महाराज, आपण फार चांगले प्रश्न मला विचारलेले आहेत. सर्व लोकांचं कल्याण यामुळे होणार आहे. श्रीकृष्णांचं चरित्र, आणखी अवतारांची चरित्रं, सगळी आपण विचारलेली आहेत. पहिला प्रश्न म्हणजे सर्व साधनांमध्ये श्रेष्ठ साधन कोणतं? सार काय सर्व ग्रंथांचं. ते सांगताहेत ...

स वै पुंसां परो धर्मो यतो भक्तिरधोक्षजे ।
अहेतुक्यप्रतिहता ययाऽऽत्मा सम्प्रसीदति ।।
1.2.6 ।। श्री. भा.
***
पान ४८

साधनं जी सांगितलेली आहेत, त्या साधनांचं फल काय म्हणाले? भगवान श्रीहरीविषयी अंतःकरणामध्ये अत्यंत प्रेम निर्माण झालं पाहिजे. तरच त्या साधनांचा उपयोग आहे. ती भक्ती अशी निर्माण झाली पाहिजे की अहेतुकी भक्ती पाहिजे. संसारामध्ये असणाऱ्या जीवात अहेतुक बनताच येत नाहीये. काही मनामध्ये हेतू नाही आणि देवावर प्रेम करायचं. कोणकोणावर प्रेम करतोय? प्रत्येकाच्या मनामध्ये काही हेतू असल्याशिवाय कोणी प्रेम करत नाही. ईश्वराची भक्ती निर्हेतुक पाहिजे आणि अप्रतिहत पाहिजे. अखंड चालू पाहिजे. सात दिवस आपल्याला भागवत श्रवण करायला मिळतंय. तसं नाही अखंड श्रवण झालं पाहिजे. म्हणजे चित्ताला प्रसन्नता प्राप्त होते. आणि त्या भक्तीच्या योगाने ज्ञान आणि वैराग्य यांचाही लाभ होतो.

परब्रह्म परमात्मा ज्याला म्हणतात, त्याचं ज्ञान होतं, साक्षात्कार होतो आहे. म्हणून भगवंताच्या कथा, लीला निरंतर श्रवण कराव्यात, चिंतन कराव्यात. मोठे मोठे ऋषि, महात्मे भगवान श्रीहरीच्या कथा श्रवण करून, अंत:करणामध्ये भगवद्भक्ती ज्यांच्या निर्माण झाली आहे, असे ते महात्मे, भगवद् भक्त, काम क्रोधादि विकार सर्वही त्यांच्या चित्तातले नाहीसे झालेले आहेत. प्रसन्न चित्त आहे आणि भगवंताचे ज्ञान, साक्षात्कार त्यांना होतो, आणि कृतार्थ ते होताहेत.

अशा प्रकारचा हा भगवान श्रीहरी, अनेक रूपं त्यांनी धारण केलेली आहेत. विश्व निर्माण केलं पण विश्वाचं संरक्षण करण्याचं कार्यही त्यांनाच करायचं आहे. अनेक अवतार त्यांनी धारण केलेले आहेत. मोठमोठ्या महर्षींनी, भगवान श्रीहरीची उपासना केली आणि आपलं कार्य त्यांनी करून घेतलेलं आहे. भगवान वासुदेव हा सर्वांना ध्येय आहे. ज्ञान, तप, धर्माचरण सर्वाचं फल शेवटी म्हणजे भगवान वासुदेवाची कृपा प्राप्त होणे हे मुख्य आहे. त्याच भगवंताने ही सृष्टी निर्माण केली. आपल्या मायाशक्तीने सामान्य जीवाप्रमाणे तो कार्य करतो आहे, लीला करतो आहे. सर्वही विश्वामध्ये तो भरून राहिलेला आहे. अनेक जीवरूपेही त्यानेच धारण केलेली आहेत. आरंभाचे मुख्यरूप म्हणजे विराट स्वरूप आहे.

चतुर्दश भुवनात्मक एक ब्रह्मांड अशी अनेक ब्रह्मांड म्हणजे विश्व आहे. ते विश्वरूप त्यांनी धारण केलं, आणि असा विराटरूपी, विश्वरूपी जो परमात्मा आहे, त्याचं ज्ञान हे, उपासना सामर्थ्याने आणि उपासना बलाने ऋषिमंडळी करून घेतात. त्यांच्याच नाभिकमलातून ब्रह्मदेव निर्माण झाले आणि त्यांनी सगळी सृष्टी पुढे ईश्वराच्या आज्ञेने केलेली आहे. हे विराट स्वरूप

***
पान ४९

म्हणजे, पुढे झालेले जे अनेक अवतार आहेत त्यांचं मूल कारण आहे. यापासूनच पुढची सगळी रूपं तयार झाली आहेत. म्हणून काही भगवंताची स्वरूपं, अवतार सांगताहेत.

स एव प्रथमं देवः कौमारं सर्गमाश्रितः ।।
1.3.6 ।। श्री. भा.

ब्रह्मदेव निर्माण झाले, आणि त्यांना आज्ञा केली परमेश्वरांनी, तुम्ही सृष्टी करा आता, त्यांना ज्ञानाचा उपदेश केला, वेदज्ञान दिलं त्यामुळे सर्व सृष्टीरचनेचे ज्ञानही त्यांना झालेलं आहे. त्यांनी आपल्या संकल्पानेच आरंभाला सृष्टी करायला आरंभ केला. मनामध्ये संकल्प झाल्याबरोबर सनक, सनंदन, सनत्कुमार आणि सनातन चार पुत्र उत्पन्न झाले. आणि चौघेही ब्रह्मचारी, तपस्वी अशाप्रकारचे भगवंताच्या चिंतनामध्ये निमग्न झाले. तोही भगवंतांचा अवतार आहे, भगवंतानीच ब्रह्मदेवाच्या संकल्पाने हे रूप धारण केलं. त्यानंतर ही पृथ्वी रसातलामध्ये गेलेली होती. तिला वर काढण्याकरता वराहरूप आणि वराह अवतार धारण केला. देवर्षि नारदांचे रूपही त्यांनी धारण केलं. भक्तिमार्गही प्रगट केलेला आहे. नरनारायण हेही अवतार त्यांनीच धारण केलेले आहेत. कपिल अवतार धारण केलेला आहे. अत्रीऋषींचे पुत्र झाले दत्तात्रेय रूपांनी, प्रल्हाद, अलर्क, कार्तवीर्यार्जुन या सर्वांनाही त्यांनी उपदेश करून कृतार्थ केलेलं आहे. यज्ञ नावाचा भगवंतांनी अवतार धारण केला. मनुराजाचं संरक्षण त्यांनी केलं. नाभी राजाचे पुत्र म्हणजे ऋषभ देव, ऋषभ अवतारही भगवंतांचा झालेला आहे. या सर्वही अवतारांची चरित्र सूत हे पुढे सांगणार आहेत. आरंभाला नुसता उल्लेख करताहेत. हे पृथुराजाचं स्वरूपही भगवंतांनीच धारण केलेलं आहे. सर्वांचं संरक्षण केलं. मत्स्यावतार धारण केला. समुद्रमंथन देव दैत्य करीत असताना, कूर्मावतार धारण केलेला आहे. धन्वंतरी अवतार धारण केला, आयुर्वेद त्यांनी प्रकट केलेला आहे. सर्व दैत्यांना मोहामध्ये पाडून अमृत आपल्या ताब्यात घेण्याकरता मोहिनीरूप धारण केलं भगवंतांनी. वामन अवतार घेतलेला आहे. परशुराम अवतार धारण करून उन्मत्त झालेले, अशा प्रकारचे क्षत्रिय राजे यांना शासन त्यांनी केलं. सत्यवतीपासून वेदव्यास रूपांनी भगवान हे अवतीर्ण झाले. वेदांचे अनेक भाग केले त्यांनी, पुराणांची रचना केली. पुढं देवाचं कार्य करण्याकरता, अयोध्येमध्ये रामचंद्र रूपाने भगवान प्रकट झालेले आहेत. कलियुग सुरु झालेलं असतांना यदुकुलामध्ये श्रीकृष्ण रूपाने भगवान प्रकट झाले आणि भूमीचा भार त्यांनी हलका केलेला आहे. पुढे बुद्धांचं रूप त्यांनी धारण केलेलं आहे आणि शेवटी कलियुगामध्ये कल्कि नावाने भगवान प्रकट होणार आहेत. असे अनेक अवतार आहेत म्हणाले. पण त्या सर्वही अवतारांचे स्वरूप काय आहे, लीला काय आहे, सामर्थ्य आहे हे समजून घेणं म्हणजे अत्यंत कठीण आहे. हे त्याच्या कृपेनेच व्हायचं.

***
पान ५०

ही भगवंतांची मायाशक्ती सर्वांनाही मोहामध्ये टाकणारी आहे. त्या भगवंताची कृपा होण्याकरता त्याच्या लीला अत्यंत श्रद्धेने ऐकल्या पाहिजेत, चिंतन केल्या पाहिजेत.

इदं भागवतं नाम पुराणं ब्रह्मसम्मितम् ।
उत्तमश्लोकचरितं चकार भगवानृषिः ।।
1.3.40 ।। श्री. भा.

वेदव्यास महर्षींनी हे वेदतुल्य भागवत पुराण हे सर्व लोकांच्या कल्याणाकरता म्हणून याची रचना केलेली आहे आणि आपल्या मुलाला म्हणजे शुकाचार्यांना हे भागवत सगळं शिकवलेलं आहे. सर्व वेद, उपनिषदं यांचं सार काढून हे भागवत तयार केलेलं आहे. शुकाचार्य महाराजांनी गंगातीरावर प्रायोपवेशन करून बसलेल्या परिक्षीत राजाला सांगितले हे भागवत. शुकाचार्य महाराज परिक्षीत राजाला भागवत कथन करत असताना ईश्वर कृपा माझ्यावर झाली, मी तिथं होतो म्हणाले. मलाही ऐकायला मिळालेलं आहे. ते संपूर्ण भागवत मी आपल्याला सांगणार आहे. भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेल्यानंतर भागवत हाच पुराणसूर्य सर्वांच्या रक्षणाकरता म्हणून प्रकट झालेला आहे.

हे ऐकलं शौनकादिक महर्षींनी आणि आनंद झाला त्यांना. त्यांनी सागितलं, ""सूतजी ही भागवतकथा आम्हाला अवश्य ऐकायची इच्छा आहे, आपण सांगा. कोणत्या युगामध्ये हे भागवत तयार झालेलं आहे? वेदव्यासांना कोणी प्रेरणा केली आणि व्यासांनी हे केलेलं आहे''. त्यांचे पुत्र जे शुकाचार्य, नेहमी आत्मसमाधीमध्ये निमग्न असणारे, देहाचं सुद्धा त्यांना भान नाही. शुकाचार्य पुढे निघालेले आहेत, घरदार सोडून आणि व्यास महर्षि त्यांना आणावं म्हणून पाठीमागे चाललेले आहेत. तरुण वयामध्ये असलेले शुकाचार्य महाराज, रस्त्यामध्ये एका सरोवरात काही अप्सरा स्नान करीत होत्या, त्यांच्या समोरून तरुण अशा प्रकारचे तेजःपुंज शुकाचार्य गेले पण त्यांच्या मनावर काही परिणाम झाला नाही. त्यांचं स्नानाचं कार्य चाललेलं आहे. पाठीमागून हे वेदव्यास महर्षि आले. त्यांना पाहिल्याबरोबर त्या स्त्रिया वर आल्या, वस्त्र नेसून त्या खाली मान घालून उभ्या राहिल्या. व्यासांना आश्चर्य वाटले. व्यासांनी विचारले, ""बायकांनो, माझा तरुण मुलगा तुमच्या समोरून गेला, वस्त्रसुद्धा त्याच्या अंगावर नाही, त्याला पाहून तुम्हाला लज्जा वाटली नाही, काही नाही. आणि मी म्हातारा, मला पाहिल्याबरोबर तुम्हाला लाज वाटली?'' त्या बायका म्हणाल्या, ""व्यास महर्षि, हे तुम्ही विचारता ना, हेच कारण आहे. तुमच्या मनामध्ये, स्त्री आणि पुरुष ही भेददृष्टी आहे. तुमच्या मुलात हा भेद गेलेला आहे, संपलेला आहे. एकमेव, अद्वितीय जे परमात्म

« Previous | Table of Contents | Next »