« Previous | Table of Contents | Next »
पान ३१

कर्मयोग सांगितलेला आहे, ज्ञानयोग सांगितला, भक्तियोग सांगितला, ब्रह्मचारी, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ, संन्यासी, यांची सर्व कर्म, कर्तव्यकर्म कोणती आहेत ही सगळी त्यांना सांगितली. उद्धवजींना हे सगळं मार्गदर्शन केलं. शेवटी उद्धवजींनी विनंती केली, ""भगवंता, आपण आता वैकुंठलोकाला जाण्याचा निश्चय केला म्हणाले, पण मला एक मोठी चिंता उत्पन्न झाली,

आगतोऽयं कलिघोरो भविष्यंति पुनः खलाः ।।
3.56 ।। माहात्म्य

हा कलि आता म्हणाले सुरुवात झाली आहे. त्या कलीमुळे उत्पन्न होणारे सज्जनसुद्धा दुर्जन होतात. अशी याची स्थिती आहे. आपण निघून गेल्यानंतर भूमीला या दुर्जनांचा भार होईल. ही भूमी कोणाला शरण जाईल? सज्जनांनी कोणाला शरण जायचं? त्यांचं संरक्षण कोणी करायचं याकडे तुम्ही लक्ष द्या आणि माझी प्रार्थना आहे की आपण भक्तांच्याकरता सगुण झालेले आहात. निराकार असून आकार धारण केलेला आहे. आपण जर निघून गेलात तर भक्तांचे रक्षण कोण करील. म्हणून इथेच राहा आपण. उद्भवांची विनंती ऐकल्यानंतर, भगवंतांनीही विचार केला, काहीतरी केलं पाहिजे. सज्जनांना आधार पाहिजे काहीतरी मी गेल्यानंतर. म्हणून त्यांनी असा विचार केला

स्वकीयं यद् भवेत्तेजस्तच्च भागवतेऽदधात् ।
तिरोधाय प्रविष्टोऽयं श्रीमद्भागवतार्णवम् ।।
3.61 ।। माहात्म्य

स्वतःचं जे दिव्य तेज ते त्यांनी भागवत पुराणामध्ये ठेवलेलं आहे. गुरुरूपाने राहतात. भागवत म्हणजे भगवान श्रीहरींची वाङ्मयूर्ती आहे. तिची सेवा करणं, नुसतं भागवत पुस्तकाचं दर्शन घेणं, प्रदक्षिणा घालणं हे सगळं करावं, कारण भगवंताचं तेज त्याच्यामध्ये आहे. सप्ताहश्रवणाने अधिक फल सांगितलेलं आहे. अशातिरीने सनतकुमार सांगत असताना एक आश्चर्यकारक घटना घडली. ती भक्तिदेवी आपल्या दोन मुलांना, ज्ञान वैराग्यांना घेऊन जी तरुण झालेली आहेत आणि

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव
प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णो भगवन्नमस्ते ।।

भगवंतांचं नामस्मरण करीत, त्या सभेमध्ये प्रविष्ट झालेली आहे. सगळे लोक विचारताहेत. ही आली कशी. सनतकुमार म्हणाले ती भागवतातूनच उत्पन्न झाली. भागवतामध्येच भक्तीदेवी आहे. ज्ञान आहे, वैराग्य आहे. सगळ्या देवता त्याठिकाणी आहेत. त्या भक्तीदेवीने सगळ्यांना सांगितले तुम्ही आहे सज्जनमंडळी, भगवद्भक्त आहात म्हणून मला याप्रमाणे शांती मिळाली.

***
पान ३२

माझी मुलं तरुण झाली, त्यांची मूर्च्छा दूर झाली. तेव्हा आपल्यासारखे जे भगवद्भक्त आहेत त्यांचीच कृपा सर्व लोकांच्यावर निरंतर राहावी एवढीच भगवंताजवळ प्रार्थना आहे.

आनंद झाला सर्वांना आणि मग नारदांनी विचारलं सनतकुमारांना, ""महाराज या सप्ताहयज्ञांनी भागवतश्रवणाने कोणाकोणाची कोणतीकोणती पापं जातात एवढं मला सांगा.''. आता कितीतरी पापं आहेत. महापापं आहेत, उपपातकं आहेत, ब्रह्महत्या, सुरापान, त्याचप्रमाणे गुरुपत्नीगमन अशी पातकं आहेत. आणखी सुवर्णस्तेय. हेही पापच आहे. यांचा संबंध ठेवणारा हा एक महापापी आहे. आता यांच्यापासून दूर राहायचं कसं? संबंधसुद्धा महापापामध्ये जातो आहे, अशी अनेक पापं आहेत म्हणाले, ही सगळीही पातकं, उपपातकं आहेत, संकरीकरण आहे, मलिनीकरण आहे, कितीतरी आहे. पन्नास माणसांचं काम करणारं यंत्र निर्माण करू नये. हे उपपातकांमध्ये घातलेलं आहे. इतकी मंडळी उपाशी राहणार आहेत. धर्मशास्त्रकारांनी अगोदरच सांगून ठेवलेलं आहे. नंतर काय व्हायचं ते होतंय पुढं. काम मिळायला लागल्यावर त्यांना नोकरी मिळाली तेच संप करताहेत. कारखाने बंद पडताहेत, हे सगळे पुढचे दोष आहेत. परंतु इतक्या मंडळींचं अन्न कमी होणारं आहे असं यंत्र तयार करू नये, करता आलं नसतं असं नाही, पूर्वीच्या लोकांना. पण धर्मशास्त्राची आज्ञा आहे, की लोकांची उपजीविका बंद होणार आहे. अशी अनेक पापं आहेत

सप्ताहयज्ञेन कलौ पुनंति ते ।।
4.11 ।। माहात्म्य

शरीराने पातकं घडतात, वाणीने घडतात, मनाने घडतात, इच्छेने घडतात, इच्छा नसतानाही घडतात. ही सगळीही पातकं, सप्ताहयज्ञाने, सप्ताहश्रवणाने निघून जातात.

याबद्दलचा एक इतिहास नारदांना सनतकुमारांनी सांगितला.

आत्मदेवः पुरे तस्मिन् सर्ववेदविशारदः ।।
4.17 ।। माहात्म्य

तुंगभद्रा नदीच्या तीरावर दक्षिण प्रांतामध्ये एका नगरात आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहात होता. उत्तम वेदशास्त्र ज्ञान आहे. सूर्यासारखा तेजस्वी आहे. सर्व लोकांच्याकडून त्याने कर्म करवावीत, त्यांना जे जे फल आहे ते ते फल त्यांना मिळवून द्यावं. कुणाला संतती नाही, कुणाला संपत्ती नाही, कुणाला रोग आहे हे सर्व त्याने दूर करावं. असा तो ब्राह्मण प्रसिद्ध होता, पुष्कळ संपत्ती त्याला मिळायची लोकांकडून, त्याला मिळालेली स्त्रीही अशाच प्रकारची चांगल्या कुळात उत्पन्न झालेली होती. असे दोघेही ते पतीपत्नी आपल्या घरामध्ये राहात असताना, संपत्ती आहे पुष्कळ काही कमी नाही, परंतु घरामध्ये त्यांना काही संतती झाली नाही, मुलगा नाहीये. त्या...

***
पान ३३

ब्राह्मणाने दुसऱ्याकडून यज्ञ करवावेत, चांगली पुण्यकर्म करवावीत, त्यांना मुलं व्हावीत आणि याच्या घरामध्ये मुलगा नाही. मग त्याने पुण्यकर्म करायला सुरुवात केली. दानधर्म करायला सुरुवात केली, गाईचं दान, भूमीचं दान, सुवर्णाचं दान, वस्त्रांचं दान अशी अनेक प्रकारची दानं त्यांनी केली. पुष्कळ द्रव्य दानाकरता खर्च केलं. पण मुलगा नाही किंवा मुलगी नाही. चिंताग्रस्त झाला आत्मदेव ब्राह्मण. निराश झालेला आहे आणि अत्यंत दुःखाने वनामध्ये निघून गेला, तहान लागली होती. एक मोठा तलाव आहे. त्यातलं पाणी प्यायला आणि झाडाखाली बसला असताना थोड्याच वेळात एक संन्यासी महात्मा त्याठिकाणी आलेला आहे. तोही पाणी पिऊन झाडाखाली बसला. ब्राह्मणाला वाटलं हा मोठा महात्मा आहे. याला आपण शरण जावं. जवळ गेलेला आहे. त्यांच्या पायावर मस्तक ठेवलेलं आहे. डोळ्यातून अश्रुधारा त्या आत्मदेव ब्राह्मणाच्या सुरु झाल्या. त्या संन्याशाने विचारले, ""बाबा का रडतोस? काय तुला दुःख झालेलं आहे?'' ब्राह्मण म्हणाला, ""महाराज काय सांगू माझं दुःख. मी देवाना काही दिलं, पितरांना काही दिलं तर ते माझ्याकडून काहीही ग्रहण करत नाहीत. मला संतती नाही ना? माझे सबंध जीवीत हे व्यर्थ झालेलं आहे. काय माझं पाप आहे, सांगता येत नाही. एखादी गाय जर मी घरात आणली तर तिलाही वासरू होत नाही, माझ्या पापामुळे. एखादं आंब्याचं झाड उत्तम लावावं. दुसऱ्याने लावलेले दुसऱ्याच्या शेतातलं, त्याला पुष्कळ आंबे येतात. पण माझ्या झाडाला फळंच येत नाहीत. अशा प्रकारचं माझं पाप आहे, त्यामुळे मला संतती नाहीये. काही आपणच कृपा करा''. त्या संन्यासी महाराजांच्या मनामध्ये दया उत्पन्न झाली. ते मोठे ज्योतिषशास्त्रज्ञ होते. योगशास्त्रज्ञही होते. त्याचं काय एकंदर जातक आहे, पुढे काय होणार आहे, हे त्यांच्या लक्षामध्ये आलेलं आहे. त्यांनी त्याला उपदेश केला. ब्राह्मणा, काय करतोस हे मुलं-बाळं घेऊन. संसार वासना काय मनामध्ये आणतोस?'' ""काय झालं महाराज?'' ब्राह्मण म्हणाला. संन्यासी म्हणाला, ""अरे तुझं प्रारब्ध मी पाहिलं. तुला या जन्मात तर नाहीच पण पुढचे सात जन्म मुलगा होणार नाही. तेव्हा माझं सांगणं असं आहे ही इच्छा तू सोडून दे, वासना टाकून दे''.

संन्यासे सर्वथा सुखम् ।।
4.36 ।। माहात्म्य

आमच्याबरोबर यायचं असलं तर ये म्हणाले, तीर्थयात्रा आपण करू. चांगलं होईल. संन्यासमार्गामध्ये सुख आहे. पण ब्राह्मणाला तो मार्ग कसा पटणार? अनुभव आल्याशिवाय गृहस्थाश्रम चांगला आहे अशीच त्याची भावना असणार. त्यांनी सांगितलं, ""महाराज, तुम्ही हा उपदेश मला करून काय करता? संन्यास घेऊन काय करायचं? मुलगा नाही काही नाही.

***
पान ३४

तुमच्यासारख्या संन्याशांना आमच्या घरी भिक्षेला यावं लागतं ना? आम्हीच भिक्षा घालतो ना संन्याशांना? मुलं, बाळं, नातू, पणतू असा संसार सुखाचा आहे. संन्यास कसला सुखाचा आहे? मला मुलगा आपण द्या. ब्राह्मणाचा आग्रह पाहिलेला आहे. शास्त्रदृष्टीने त्याला मुलगा नाही हे त्यांना कळलेलं आहे. पण आता काय करायचं? आग्रही आहे, प्राण त्याग करीन म्हणतो आहे. त्यांनी एक फळ घेतलं, त्याच्या हातात दिलं. हे म्हणाले असं कर तुझ्या घरी जाऊन तुझ्या पत्नीला हे भक्षण करायला सांग म्हणजे मुलगा होईल. पण एक वर्षापर्यंत तिने नियमाने राहिले पाहिजे. खरं बोललं पाहिजे. पवित्रपणे राहिले पाहिजे. त्याचप्रमाणे एकवेळ भोजन करून राहिलं पाहिजे. असं एक वर्षभर जर तुझ्या पत्नीने केलं तर चांगला मुलगा होईल. सात जन्म मुलगा होणार नाही म्हणून त्यांनीच सांगितलेलं आहे. पण आग्रहामुळे फळ दिलेलं आहे. शास्त्र खरं, प्रारब्ध खरं का प्रयत्न खरा ह्याचा आणखी विचार चालू झालेला आहे. आनंद झाला ब्राह्मणाला. बरं झालं म्हणाला, या स्वामीमहाराजांच्या कृपेने मला मुलगा होणार. आला घरी आणि आल्याबरोबर त्या स्त्रीला ते फळ दिलं. ""हे फल मिळालेलं आहे. एका संन्यासी महात्म्याने दिलेलं आहे हे तू भक्षण कर. एक वर्षभर नियमाने रहा''.

आता ती बाई जी आहे त्याला मिळालेली, तिचा याच्यावर विश्वास होता की नाही कुणाला ठाऊक? काही तिच्या मैत्रिणी घरी आलेल्या आहेत. तिची एक बहिण गावामध्ये होती गरीब. त्या सगळ्या घरी जमल्यानंतर त्या सर्वांच्यासमोर त्या स्त्रीने सांगितले, ""काय बाई ह्यांनी हे फळ आणलेलं आहे. हे फळ भक्षण केल्यावर मला गर्भधारणा होणार, शक्ती शरीरातली कमी होणार, मग घरातली कामं धामं कुणी करायची? अन्न जाणार नाही''. असे तर्क कुतर्कच ती करू लागली''. ""बरं, कदाचित नऊ महिने पूर्ण झाले आणि तो गर्भ आडवा आला तर? आणि मलाच मरण आलं तर?'' असे सगळे विचार तिच्या मनात यायला लागले.

त्या बायकांच्या समोर तिने बोलून दाखविले आहे. आणि वर्षभर सगळं खरं बोलायचं, कोणालाही रागवायचं नाही हे सगळे नियम कसे शक्य आहेत? बरं मुलगा झाला तरी काय सुख आहे?

लालने पालने दुःखं प्रसूतायाश्च वर्तते ।
वंध्या वा विधवा नारी सुखिनी चेति मे मतिः ।।
4.49 ।। माहात्म्य

ब्राह्मणाला मुलगा पाहिजे. पण ही सांगते आहे त्याचं लालन पालन करणं किती दुःखाचं आहे. त्यापेक्षा ज्या स्त्रीला मुलगा झाला नाही ती स्त्री जास्त सुखी आहे असं माझं मत आहे. त्या बायकाही म्हणाल्या बरं आहे काही खाऊ नकोस तू हे फळ. तुझ्या घरात जी गाय आहे तिला खायला घाल. म्हणजे त्या संन्यासी महात्म्याने जे सांगितलं ते खरं होण्याची पाळी आली. त्या...

***
पान ३५

तपाने, त्याच्या संकल्पाने झाला असता मुलगा. पण ह्याच बाईच्या तर्ककुतर्काने तिने फळ खाल्लं नाही. गाईला घातलं ते फळ. पतीला खोटंच सांगितलं. एकदा खोटं बोलायला सुरुवात केल्यानंतर, पतीने विचारलं खाल्लं का फळ? हो खाल्लं म्हणाली. माझे नियम, धर्म सगळे चालू आहेत तुमच्या सांगण्याप्रमाणे. तिची बहीण त्या गावामध्ये होती. गरीब होती मात्र. त्या बहिणीने त्या स्त्रीला सांगितलं, तू आता गर्भिणी स्त्रीचे सोंग घेऊन रहा म्हणाली. गर्भिणी आहे असं दाखव लोकांना. मी ही गर्भिणी आहे. माझ्या पतीला, दरिद्री आहे, त्याला द्रव्य देत जा. तू श्रीमंत आहेस. मला मुलगा झाल्याबरोबर घराच्या पाठीमागच्या दरवाजाने तुझ्या घरामध्ये मी आणून देईन. मग तुला मुलगा झाला असं तू जाहीर कर. हे या दोघींचं बहिणीबहिणींचं ठरलेलं आहे. झालं. ठरल्याप्रमाणे त्या बहिणीचा मुलगा हिच्या घरामध्ये आला. हिने सांगितलं की मला मुलगा झालेला आहे. आनंद झाला. आत्मदेव ब्राह्मणाला काय माहिती आहे? संन्यासी महाराज म्हणाले, सात जन्म मुलगा होणार नाही मग झाला कसा मुलगा? पण संन्यासी महात्म्याचं सामर्थ्य आहे हे कळून चुकले. प्रारब्ध आहे, ज्योतिषशास्त्र आहे पण त्या शास्त्राच्या विरुद्ध यांच्या संकल्पाने झाला म्हणाले मुलगा. खरं याला काही माहित नाही. याचा मुलगा कुठे होता तो. याला मुलगा नाही. हे शास्त्रही खरं झालेलं आहे. आला दुसऱ्याचाच मुलगा. ब्राह्मणाला आनंद झालेला आहे आणि त्याचे संस्कार सगळे, जातकर्म संस्कार केले, पुष्कळ दानधर्म केलेला आहे. पुढे तीन महिन्यानंतर त्या गाईपासून एक मुलगा झाला. त्या महात्म्याचं फळ तिच्या उदरामध्ये गेलेलं होतं. अत्यंत सुंदर, दिव्य अशा प्रकारचा तो मुलगा होता. ब्राह्मणाला आनंद झाला. सगळी मंडळी पाहण्याकरता आली की या ब्राह्मणाला एकही मुलगा आजपर्यंत नव्हता, आता गाईनेही मुलगा दिला. कुणालाही काही माहिती नाही. त्या मुलाचे कान गाईसारखे लांब असल्यामुळे गोकर्ण त्याचं नाव ठेवलं. आणि हा जो मुलगा बाहेरचा आलेला, धुंधुकारी त्याचं नाव आहे. हा मात्र दुराचारी निघालेला आहे. चोरी करणं, सर्वांचा द्वेष करणं, दुसऱ्यांच्या घराला आग लावणं, मुलांना धरून विहिरीमध्ये ढकलून देणं, अशा प्रकारची दुष्ट कर्म तो करतो आहे. वेश्यासंगतीमध्ये सापडून त्याने सर्व द्रव्य नाहीसे केले. मातापित्यांना मारायला सुद्धा त्याने कमी केलं नाही. धन पाहिजे त्याला. मग आत्मदेव ब्राह्मणाचे डोळे उघडलेले आहेत. संन्यासी महाराज सांगत होते, "संन्यासे सर्वथा सुखम्' हे खरं आहे. मी मात्र आग्रहाने बोललो. मुलं, नातू, पणतू असा संसार सुखाचा आहे गोकुळासारखा. संन्यासावर माझा विश्वास नाही. पण तेच खरे आहे आता मला अनुभवायला आलेलं आहे म्हणाले. मला मुलगा झाला नसता तर बरं झालं असतं. पूर्वीसारखा मी निःसंग आणि संततीरहित राहण...

***
पान ३६

हेच चांगलं होतं. अतिशय दुःख झालं. तो जो दुसरा मुलगा गाईपासून झालेला तो मोठा ज्ञान वैराग्य संपन्न होता. त्याने आपल्या पिताजींना उपदेश केला, ""पिताजी, कशाला दुःख करता? संसारामध्ये सुख आहे अशी कल्पना तुमची होती. ती गेला ना आता? कुणाचा मुलगा आणि कोणाचं द्रव्य म्हणाले. अज्ञान आहे सगळं, मोहामध्ये पडलेलं आहे सगळं. वनामध्ये जा आपण आणि भगवान श्रीहरीची आराधना करा. भगवद्भक्ती करा आणि शांती प्राप्त करून घ्या''. त्यांनी विचारलं, ""बाबा, काय करू मी वनामध्ये?'' त्याने थोडक्यात उपदेश केला.

देहेऽस्थिमांसरुधिरेऽभिमतिं त्यज त्वं
जायासुतादिषु सदा ममतां विमुञ्च ।
पश्यातिशं जगदिदं क्षणभंगनिष्ठं
वैराग्यरागरसिको भव भक्तिनिष्ठः ।।
5.79 ।। माहात्म्य

पहिल्याप्रथम हा जो अस्थि मांस रुधिराने भरलेला जो देह आहे, शरीर आहे तो देह मी आहे ही बुद्धी सोडून द्या. देहापेक्षा तुम्ही निराळे आहात. आणि देहाचे संबंधी असलेले स्त्रीपुत्रादिक जे आहेत, ते माझे आहेत ही ममता सोडून द्या. संपूर्ण विश्व हे विनाशी आहे, हे टिकणारं नाही, कोणीही चिरंजीव नाही, कोणीही राहणार नाही. ही आसक्ती मनातून काढून टाका आणि भगवंताचं नामस्मरण करा. गुणचिंतन करा. भागवतधर्माचं श्रवण करा. व्यवहार कमी करा. सत्पुरुषांची संगती करा. मनातल्या वासना कमी करा. दुसऱ्याच्या दोषगुणाचा विचार करू नका. स्वतःचे दोष काय आहेत याचा विचार करा आणि भगवत् सेवा करा, भगवत्कथा ऐका यांनी तुमचा उद्धार होईल.

मुलाचा उपदेश ऐकल्याबरोबर आनंद झाला त्या आत्मदेव ब्राह्मणाला. साठ वर्ष वयाला झालेली होती. अरण्यात निघून गेलेला आहे आणि भगवान श्रीकृष्णांची भक्ती म्हणजे भागवतामधील दशमस्कंध जो आहे. रोज त्याने संपूर्ण कृष्णचरित्र वाचन करावं, चिंतन करावं, त्यामुळे त्याचा उद्धार झालेला आहे.

सूत सांगतात, ऋषि महाराज, पिता निघून गेला वनामध्ये, ती आई उरली. हा आला आता मुलगा. याच्यावर नियंत्रण करणारा कोणीच नाही. त्यानी आईला मारावं, कुठंय, पैसा कुठंय? पैसा पाहिजे. अतिशय त्रासली ती बिचारी. वाड्यामधे असलेल्या पाठीमागच्या विहिरीमध्ये तिने देहत्याग केलेला आहे, आत्महत्या केलेली आहे. तो गोकर्ण जो आहे, तो पूर्वीच घरातून बाहेर...

***
पान ३७

पडलेला होता. त्याला काही सुख नाही व दुःखही नाही, शत्रू नाही, मित्र नाही. भगवंताचं चिंतन करणं, तीर्थयात्रा करणं, सज्जनांच्या भेटीगाठी घेणं, विचार करणं, असं त्याचं चाललेलं आहे. घरामध्ये धुंधुकारी राहिलेला आहे. वेश्यास्त्रियांना त्याने घरामध्ये, वाड्यामध्येच आणून ठेवलं. आता कोण त्याला विचारणार आहे? आई नाही, बाप नाही. त्या स्त्रियांनी त्याला सांगितलं की, आम्हाला पुष्कळ अलंकार पाहिजेत. चांगली चांगली वस्त्रं पाहिजेत. हे सांगितल्यावर तो गेला बाहेर आणि पुष्कळ अलंकार, वस्त्रे वगैरे आणली. चोरी करून आणलेली आहेत आता ती. त्या स्त्रियांनी, वेश्या स्त्रिया त्या. त्यांनी विचार केला की हा चोरी करतो आहे रोज म्हणाले. याला केव्हातरी राजा धरणार, तुरुंगात टाकणार आणि आम्हालाही धरणार म्हणाल्या. तेव्हा आज इतका पैसा मिळालेला आहे. तो पैसा घेऊन आपण निघून जाऊ या. जाण्यापूर्वी याला मारून जाऊ या. ठार मारू या. असा विचार त्या चार-पाच स्त्रियांनी केलेला आहे आणखी रात्रीच्या वेळेला त्याला झोप लागल्याबरोबर त्याला गळफास बांधलेला आहे. मृत्यू लवकर येईना त्याला. निखारे, पेटलेले निखारे त्याच्या अंगावर टाकले त्यांनी आणखी तडफड तडफड करून त्याचा प्राण गेलेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या स्त्रियांनी सर्वांना सांगितलं, हा कुठे तरी दुसरीकडे व्यापाराकरता निघून गेलेला आहे, द्रव्य आणण्याकरता गेलेला आहे. सर्व द्रव्य घेऊन त्या निघून गेल्या आपल्याघरी.

तो धुंधुकारी पिशाच्च झालेला आहे. वायुरूपधारी असल्यामुळे अन्न नाही, पाणी नाही, अशा स्थितीमध्ये अत्यंत कष्ट त्याला होत आहेत. गोकर्ण हा तीर्थयात्रेला गेलेला, त्याला गावचे लोक भेटले. त्यांनी सांगितलं, तुझा बंधू मेलेला आहे म्हणाले. आपला बंधू अनाथ आहे बिचारा, कोणी नाही म्हणून त्या गोकर्णाने गया क्षेत्रामध्ये जाऊन त्याचा उद्धार होण्याकरता विष्णुपदावर जाऊन पिंड प्रदान केलेलं आहे. स्नान केलेलं आहे. तीर्थयात्रा करीत करीत तो गोकर्ण आपल्या गावामध्ये प्राप्त झाला. रात्रीच्या वेळेला तो आलेला आहे. आपल्या वाड्याबाहेरच एका कट्ट्यावर बसून राहिला. पुष्कळ दिवसांनी आलेला आहे. तो निजल्यानंतर हा आपला बंधू आहे, हे पिशाच्चरूपी धुंधुकारीने ओळखलं. तो तिथं आला. हा जागा झाला गोकर्ण. एकदम त्यानी वेगवेगळी रूपं घ्यायला सुरुवात केली. मोठा मेंढा आहे, बोकड दिसायला लागला, एकदम मोठा हत्ती दिसायला लागला, एक रेडा दिसायला लागला. एकदम मोठा अग्नी पेटलेला आहे असं दिसायला लागलं. गोकर्ण मोठा धैर्यशाली. हा दुर्गतीला, पिशाच्चगतीला गेलेला कोणीतरी जीवात्मा आहे. त्याने विचारलं, ""कोण आहेस तू? अशी दशा तुझी का झाली? असं त्या गोकर्णाने विचारल्यानंतर तो रडायला लागलेला आहे. मला काही बोलता येत नाही म्हणाला, खूण केली. हातामध्ये जल घेऊन...

***
पान ३८

अभिमंत्रण करून त्याच्या अंगावर गोकर्णाने टाकल्याबरोबर त्याला वाणी उत्पन्न झाली. तो बोलायला लागला.

अहं भ्राता त्वदीयोऽस्मि धुंधुकारीति नामतः ।
स्वकीयेनैव दोषेण ब्रह्मत्वं नाशितं मया ।।
5.27 ।। माहात्म्य

""बाबा, मी तुझाच भाऊ आहे धुंधुकारी. माझ्याच पापाने ब्राह्मणजन्मासारखा चांगला जन्म मिळालेला असताना, तो जन्म मी फुकट घालवलेला आहे. माझ्या पापाला संख्या नाही. किती लोकांना मी मारलेलं आहे! शेवटी त्या वेश्या स्त्रियांनीच मला मारलं, म्हणून ही माझी दुर्दशा झालेली आहे.''

गोकर्ण म्हणाला, ""तुझा उद्धार होण्याकरता गया क्षेत्री श्राद्ध केलं, पिंड प्रदान केलं आणि अजून तू पिशाच्च कसा राहिलास?'' तो म्हणाला, ""शंभर वेळा जरी गया श्राद्ध केलीस तरी मला मुक्ती मिळणार नाही अशी माझी पापं इतकी आहेत''. गोकर्ण म्हणाला, ""तू आता जाऊन स्वस्थ रहा तुझ्या स्थानात''. तो गेलेला आहे पिशाच्च. सकाळी प्रातःकाल झाल्यानंतर गोकर्ण आपल्या वाड्यामध्ये आलेला आहे ही बातमी गावातल्या लोकांना समजली. मोठा महात्मा आहे हा. पहिल्यापासूनच त्याच्याबद्दल मोठा आदरभाव होता. सगळी मंडळी गावातली, विद्वान मंडळी, सगळी मंडळी त्याला भेटण्याकरता आली. रात्रीच्या वेळेला ही अशी अशी भेट झाली म्हणाले, बंधूची, तो पिशाच्च झालेला आहे. गया श्राद्ध करूनही तो मुक्त झाला नाही. काय करावं आता. सर्व विद्वान मंडळींनी सांगितलं, पण त्यांना काही कळेना. त्यांनी सांगितलं बाबा तू सूर्यनारायणांना विचार. काय सामर्थ्य संपन्न हे लोक होते. गोकर्णाचं सामर्थ्य किती आहे. सूर्यनारायणांना विचारून तू हे मार्गदर्शन घे म्हणाले, ते सांगतील त्याप्रमाणे कर म्हणाले. सूर्यनारायणांना नमस्कार केला त्यांनी. सूर्याचा रथ थांबवलेला आहे. रथ पुढे जाईना. ""जगतसाक्षी आहात आपण नारायणा, सगळ्यांची पापं पुण्यं आपल्याला माहिती आहेत. माझ्या बंधूला पिशाच्च योनीतून मुक्त करण्याकरता मी काय करावं ते आपण सांगा.'' त्यांनी लगेच सांगितलं.

श्रीमद्भागवतान्मुक्तिः सप्ताहे वाचनं कुरु ।।
5.41 ।। माहात्म्य

""भागवतसप्ताह यज्ञ तुझ्या बंधूला पिशाच्च योनीतून मुक्त होण्याकरता तू केलास की तो मुक्त होईल''. गोकर्णाने निश्चय केलेला आहे भागवतकथा सप्ताह करण्याचं त्यानी ठरवलेलं आहे.

अनेक देशातून, गावातून मंडळी सगळी ऐकण्याकरता तिथे आली. पापक्षय व्हायला पाहिजे

***
पान ३९

आपला. मोठा समाज जमलेला आहे. आसनावरती गोकर्ण बसलेला आहे. कथाकथन करण्याकरता. तो पिशाच्चही आलेला आहे. वायुरूपधारी. राहावं कोठे, सप्ताह ऐकायचा आहे. एक वेळू मोठा वाढलेला आहे, वेळवाचं बेट आहे. त्या एका वेळवात छिद्रातून आत शिरलेला आहे. पिशाच्चाला वायवीय शरीर असतं. शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. या मर्त्यलोकावरती, भूलोकावरती पार्थिव शरीर आहे. म्हणजे पृथ्वीचा भाग जास्ती आहे. सूर्यलोकामध्ये तैजस शरीर म्हणजे तेजाचा भाग जास्ती आहे. वरुण लोकामध्ये जलाचा भाग जास्ती आहे. हे वायवीय शरीर, पिशाच्चयोनी म्हणजे डोळ्यांनी दिसत नाही, कारण वायू डोळ्याने दिसत नाही. त्याचं शरीर हे वायुप्रधान आहे. तो त्या छिद्रामध्ये जाऊन बसलेला आहे. आतल्या बाजूला. सगळी इंद्रिये वगैरे आहेतच त्याला. आणि गोकर्णाने कथा सांगायला आरंभ केला. सायंकाळपर्यंत कथा सांगितली. त्या पिशाच्चानेही ती कथा ऐकली. सात त्याला छिद्रे, गाठी होत्या. एक गाठ फुटलेली आहे. आवाज झालेला आहे. दुसऱ्या दिवशी दुसरी ग्रंथी फुटलेली आहे. सात दिवस श्रवण केलं त्या पिशाच्चाने. त्या वेळवाचे दोन तुकडे झाले आणि आतून तो धुंधुकारी शंख, चक्र, गदा, पद्म धारण करून भगवंताच्या स्वरूपामध्ये बाहेर पडलेला आहे. त्याने आपल्या बंधूला साष्टांग नमस्कार घातलेला आहे.

त्वयाहं मोचितो बद्धो कृपया प्रेतकश्मलात् ।।
5.52 ।। माहात्म्य

""काय उपकार माझ्यावर तुझे झाले आहेत. या पिशाच्च योनीतून तू मला मुक्त केलंस. अन्न खाता येत नाही, पाणी पिता येत नाही, हे सगळे कष्ट माझे दूर झाले. काय दिव्य ही भागवत कथा. सबंध माझी पीडा दूर झाली. असं त्याने पिशाच्चाने पुष्कळ वर्णन केलेलं आहे. आणि याच्या योगाने सर्वांचं दुःख दूर होईल असा स्वतःचा अनुभव सांगितला असताना त्याला नेण्याकरता विमान आलेलं आहे वैकुंठलोकातून. ते हरिदास आले. गोकर्णाने त्यांना विचारलं, ""याला एकट्याकरताच तुम्ही विमान कसं आणलं? इथे सगळ्या लोकांनी ऐकलंय की. मग यांना नेण्याकरता तुम्ही विमानं का आणली नाहीत?'' सर्वांनी जर श्रवण सारखं केलेलं आहे तर असा फलभेद का झाला? एकट्यालाच वैकुंठलोक!'' हरिदास म्हणाले या लोकांना येण्याची इच्छा आहे का हे तरी विचारा. या सगळ्या लोकांची इच्छा कुठंय म्हणाले. वासनाक्षय झाल्याशिवाय काही आणखी वैकुंठलोक मिळणार नाही. आणखी दुसरी गोष्ट, हा पिशाच्च म्हणजे दिवसभर याने ऐकावं आणि रात्रभर त्याचं मनन करावं. ते ज्ञान त्याच्या चित्तामध्ये अगदी पूर्ण संक्रांत झालेलं आहे. अन्न नाही, पाणी नाही अशा स्थितीमध्ये त्याने श्रवण केलेलं आहे आणि त्याचं मनन केल्यामुळे, पक्कं त्याच्या चित्तामध्ये बिंबल्यामुळे आणखी तो अधिकारी झालेला आहे. आणखी एकदा आपण

***
पान ४०

भागवद् सप्ताह करा असं सांगितलं त्या हरिदासांनी. म्हणजे हे मुक्त होतील. पहिल्यांदा आषाढ महिन्यामध्ये ही कथा सांगितली गोकर्णाने. त्या हरिदासांच्या सांगण्याप्रमाणे पुन्हा श्रावण महिन्यामध्ये भागवत सप्ताह यज्ञ केला गोकर्णाने. सगळी मंडळी ऐकायला होती. त्यावेळेला असं झालेलं आहे, हजारो विमानं आलेली आहेत. भगवान श्रीहरीही साक्षात आलेले आहेत. आणि त्या गोकर्णाला आलिंगन देऊन आपलं स्वरूप त्याला प्राप्त करून दिलं. सगळेही श्रोते पीतांबरधारी, शंख, चक्र, गदा, पद्म धारण करणारे विमानात बसून गोकर्णाच्या कृपेनं हरिलोकाला निघून गेलेले आहेत. त्रेतायुगामध्ये भगवान रामचंद्र अयोध्येहून आपल्या वैकुंठलोकाला जाताना अयोध्यावासी सर्वही लोकांना बरोबर घेऊन गेले. हा गोकर्ण जो आहे त्याने कलियुगामध्ये आपल्या गावातल्या सर्व लोकांचा उद्धार केलेला आहे. तर अशा प्रकारचं भागवत कथेचं माहात्म्य सनतकुमारांनी नारदांना सांगितलेलं आहे.

आता यानंतर थोडासा विधी, नियम काय ते सांगताहेत.

सहायैर्वसुभिश्चैव प्रायः साध्यो विधिः स्मृतः ।।
6.1 ।। माहात्म्य

भागवत सप्ताह यज्ञाला पुष्कळ सहाय्य करणारी मंडळी पाहिजेत आणि द्रव्याचीही जरूर आहे. योग्य दैवज्ञाकडून आणि उत्तम मुहूर्त विचारून आणि याला आरंभ करावा.

विवाहे यादृशं वित्तं तादृशं परिकल्पयेत् ।।
6.2 ।। माहात्म्य

हे मुद्दाम सांगताहेत. ज्यांना ज्यांना मुली आहेत त्यांच्या लक्षात राहण्याकरता हे आहे. विवाहाला, कन्याविवाहाला जेवढं द्रव्य लागेल तितक्या द्रव्याची अगोदर तयारी पाहिजे म्हणाले, सप्ताहयज्ञ करायचा म्हणजे. म्हणजे तात्पर्य काय की द्रव्यापेक्षा याला प्राधान्य आहे. त्याचप्रमाणे श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, आषाढापासून हे सर्व महिने त्यांनी सांगितले परंतु सर्वही, कोणत्याही वेळेला करायला हरकत नाही. त्याचप्रमाणे सर्वत्र ही वार्ता सगळ्यांना समजून सांगावी. या ठिकाणी असा यज्ञ होणार आहे. आपण सहकुटुंब याठिकाणी या. सात दिवसांपर्यंत आपल्याला सवड नसेल तर एखादा दिवस तरी आपण येऊन श्रवण करा. असं सर्वांनाही कळवावं म्हणाले. पत्र वगैरे लिहून कळवावे. आणखी अशा रितीने येणाऱ्यांची सर्व व्यवस्था करणं, त्याशिवाय इतकं द्रव्य कसं लागणार आहे. तेव्हा सगळी येणाऱ्यांची राहण्याची व्यवस्था, ही सगळी करावी आणि विशाल स्थान जिथे असेल तिथे कथास्थान असावं म्हणतात. सर्व मंडळींना बसण्याकरता मंडप वगैरे घालावा. त्याचप्रमाणे सर्वही एकंदर जे लोक आहेत त्यांची...

« Previous | Table of Contents | Next »