भक्तिज्ञानविरागाप्तो विवेको वर्धते कथम् ।
मायामोहनिरासश्च वैष्णवैः क्रियते कथम् ।।
1.5 ।। माहात्म्य
सर्वसंग परित्याग करून अरण्यामध्ये राहताहेत ऋषी, पण सर्वही समाजाचं कल्याण व्हावं, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे त्यांचा संवाद चाललेला आहे. त्यांनी विचारलं, सूतांना,
प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये, समाजाच्या मनामध्ये विवेक हा वाढला पाहिजे. सारासार विवेक. योग्य कर्म कोणतं, अयोग्य कोणतं, पाप कोणतं, पुण्य कोणतं सगळा विवेक प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये असला पाहिजे, तो वाढला पाहिजे, तो कसा वाढेल ? हा मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्याला सहाय्यक म्हणजे, भगवंताची भक्ती, प्रेम अंतःकरणामध्ये पाहिजे, ज्ञान पाहिजे आणि विराग म्हणजे अनासक्त मनाची वृत्ती पाहिजे, निलांभ वृत्ती पाहिजे. हा जर विवेक प्रत्येकाच्या मनामध्ये वाढीला लागेल तर मोह सगळा दूर होईल, सर्व सुखी होतील. असा प्रश्न त्या ऋषींनी केलेला आहे. त्यावेळी सूत हे त्यांना बोलताहेत, ""ऋषि महाराज, विवेक प्रत्येकाच्या मनामध्ये उत्पन्न झाला पाहिजे. विषयाची आसक्ती, लोभवृत्ती दूर झाली पाहिजे. खरं-खोटं याचं ज्ञान झालं पाहिजे, आणि भगवंता बद्दल नितांत प्रेम चित्तामध्ये उत्पन्न झालं पाहिजे. याच्याकरता शुकाचार्य महाराजांनी संपूर्ण भागवत, हे कलियुगामध्ये सर्वांना समाधान, शांती मिळावी म्हणून सांगितले आहे.
कालव्यालमुखग्रासत्रासनिर्नाशहेतवे ।
श्रीमद्भागवतं शास्त्रं कलौ कीरेण भाषितम् ।।
1.11 ।। माहात्म्य
जगामध्ये सर्वही जेवढे जीव म्हणून आहेत, त्या सर्वांनाही कालाची मर्यादा आहे काही. प्रत्येकाचा काल ठरलेला आहे. ब्रह्मदेवांचं आयुष्यसुद्धा ठरलेलं आहे ना. इतर मानवांच्यापेक्षा, देवांच्यापेक्षा अधिक असेल. पण कायम राहणारे ब्रह्मदेवसुद्धा नाहीयेत. त्यामुळे आपला जो काल आहे, त्या कालामध्ये आपण सुखी व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. त्याकरता जी साधनं आहेत जगामध्ये, व्यवहारामध्ये तीच साधनं खरी आहेत, सुखाची तीच साधनं आहेत, अशीही कल्पना झालेली आहे.
जगामध्ये अविनाशी सुख आहे अशी कल्पनासुद्धा नाहीये कोणाला. त्यामुळे खरं एकंदर सुख कोणतं आहे, आनंद, पूर्ण आनंद कोणता आहे आणि अपूर्ण आनंद हा जगामध्ये असलेला कसा...
आहे, हे सर्व दाखवण्याकरता, हे भागवतशास्त्र शुकाचार्य महाराजांनी मुद्दाम सांगितलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्या विषयांचा विचार त्यांनी केलेला आहे. मनाची शुद्धी करणारं हे एक मोठं साधन आहे. अनेक जन्मांचं जर पुण्य असेल तरच भागवताचं श्रवण घडतं.
परिक्षीत राजाला भागवत कथा सांगण्याकरता शुकाचार्य महाराज आपल्या आश्रमातून बाहेर पडले हे देवांना समजले. परिक्षीत राजाचा मृत्यू जवळ आलेला आहे. सातव्या दिवशी त्याचा देहांत होणार आहे. शुकाचार्य महाराज आपणहून त्याला सांगण्याकरता निघाले. देवमंडळी स्वर्गलोकातून आली. शुकाचार्य महाराजांना नमस्कार केला आणि बरोबर येताना स्वर्गामध्ये जे अमृत आहे, त्या अमृताचा एक घडा भरून आणला.
त्यांनी शुकाचार्य महाराजांना विनंती केली, ""महाराज, आम्हाला आपल्याजवळ भागवत कथारूपी जे अमृत आहे ते द्या आणि हे आम्ही आणलेले अमृत आहे ते तुम्ही घ्या. हे अमृत त्या परिक्षीत राजाला तुम्ही पाजा म्हणजे त्याला मृत्यू येणार नाही. आम्हाला भागवत ऐकायचंय''.
हसले शुकाचार्य. ""तुमच्या स्वर्गातले अमृत तुम्ही रोज पिता पण तुम्ही कुठे अमर आहात? तुमचंही पुण्य संपल्याबरोबर तुम्हाला खाली यावं लागतं.'' तेव्हा भागवताला अमृताने विकत घ्यायचं किंवा अमृत द्यायचं आणि भागवत ऐकायचं ही त्यांची इच्छा शुकाचार्यांना पसंत पडली नाही. हे खरे भक्त नाहीत म्हणाले.
त्यांनी सांगितलं, ""पाहू सध्या सवड नाही.'' त्यांना सोडून दिलेलं आहे, निघून गेलेले आहेत. फक्त परिक्षीत राजाला भागवत सांगण्याकरता आलेले आहेत.
सनकादिक ऋषि यांनी नारदांना हे भागवत सांगितले. भागवताचं श्रवण कसं करावं हा सगळा विधी सनतकुमारांनी सांगितला. नारदांची आणि सनतकुमारांची भेट कुठे झाली हा प्रश्न ऋषींनी केलेला असतांना ती कथा सांगताहेत सूतजी.
नारद महर्षि हे बद्रिकाश्रमामध्ये आलेले आहेत, काही प्रसंगाने आणि त्याच ठिकाणी ब्रह्मदेवांचे जे पूर्ण ज्ञानी मानसपुत्र आहेत सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार. त्यांची आणि नारदांची भेट झाली. नारदांचं मुख अगदी खिन्न पाहिलं त्या सनतकुमारांनी आणि त्यांनी विचारलं ""नारदा, काय झालं तुम्हाला? खिन्न होण्याचं कारण काय ? खेद किंवा अशांती कोणाला होते ? संसारामध्ये आसक्त झालेला जो आहे, त्याला खेदाचा प्रसंग येतो. तुम्ही तर सर्व...
संग सोडून दिलेला आहे. तेव्हा तुम्हाला कशाबद्दल खेद वाटतो आहे ?'' नारदांनी आपली हकीकत सांगण्याला आरंभ केला.
अहं तु पृथिवीं यातः ज्ञात्वा सर्वोत्तमाम इति ।।
1.28 ।। माहात्म्य
नारद महर्षींना सर्व ठिकाणी संचार करण्याची शक्ती होती. मर्त्यलोकामध्ये फिरावं, स्वर्गलोकामध्ये, ब्रह्मलोकामध्ये कुठेही, पाताळलोकामध्ये कुठेही जाऊ शकत होते, मोठे योगी होते.
नारद म्हणाले, ""ऋषीमहाराज मी या पृथ्वीवर गेलो फिरण्याकरता, मला पहायचं होतं मर्त्यलोक कसा आहे ? आणि सर्व ठिकाणी मी फिरलो. प्रयाग क्षेत्र आहे, काशी क्षेत्र आहे, त्याचप्रमाणे गंगा, गोदावरी यांच्या तीरावर फिरलो. सगळ्या तीर्थांमध्ये मी फिरलो पण माझ्या मनाचं समाधान काही झालेलं नाहीये.'' आत्ता कलियुग सुरु झालेलं आहे. नारदांची आणि सनतकुमारांची भेट होऊन हजार वर्ष होऊन गेलेली आहेत. त्यावेळची हकीकत नारद सांगताहेत. आत्ता कलियुगाला किती दिवस झाले आणि किती आता बिघडलेलं आहे, हे काही सांगण्याची आवश्यकता नाही.
माझ्या मनाचं समाधान काही झालं नाही. हा जो कलि आहे, कलियुग, त्याने अधर्माला बरोबर घेतलं, पृथ्वीवर आपलं साम्राज्य त्याने स्थापन केलेलं आहे.
सत्यं नास्ति तपः शौचं दया दानं न विद्यते ।
उदरंभरिणो जीवा वराकाः कूटभाषिणः ।।
1.31 ।। माहात्म्य
कुठेही मला सत्य दिसलं नाही, तपश्चर्या नाही, पवित्रपणा नाही, दया नाही, दान नाही, धर्म नाही. पोट भरण्याचं कार्य मात्र सर्व जीवांचं चाललेलं आहे. असत्य भाषण करणारे आहेत. नास्तिक मार्गाकडे त्यांची बुद्धी गेलेली आहे. ईश्वर नाही, स्वर्ग नाही, नरक नाही, धर्म नाही, अधर्म नाही. नाही नाही सगळे म्हणताहेत. सर्व पवित्र नद्या, देव, मंदिरे सर्व ठिकाणी अशा प्रकारचा अधर्म चाललेला आहे म्हणाले. कोणी योगी नाही, ज्ञानी नाही, कोणी कर्म करणारा चांगला दिसला नाही. अशी स्थिती या कलीने जगामध्ये करून टाकलेली आहे. मी निघालो. फिरत फिरत आणि यमुना नदीच्या तीरावरती आलेलो आहे. भगवान श्रीकृष्णप्रभूंनी यमुना नदीच्या तीरावर गोकुळामध्ये राहून, वृंदावनामध्ये राहून पवित्र लीला केलेल्या आहेत. तिथे मला एक आश्चर्यकारक घटना पहायला मिळाली म्हणाले. एक तरुण स्त्री खाली मान घालून स्वस्थ बसलेली होती. तिच्या...
दोन्ही बाजूला दोन वृद्ध पडलेले होते आणि ती तरुण स्त्री रडत होती. कोण आपल्याला या संकटातून मुक्त करणारा भेटेल काय? अशी पाहते आहे. शेकडो स्त्रिया तिला वारा घालताहेत. तिचं समाधान करण्याचा प्रयत्न करताहेत. मी गेलो तिथं. मला पाहिल्याबरोबर ती उठून उभी राहिली. म्हणाली, ""साधुमहाराज थोडं थांबा, माझ्या मनाची अशांती, दुःख तुम्ही दूर करा. आपल्यासारखे सत्पुरुष हे सर्व पापक्षय करणारे आहेत.''
नारद म्हणाले, बाई तू आहेस कोण? तुझी सेवा करणाऱ्या या स्त्रिया कोण आहेत? तुला कसलं दुःख झालेलं आहे सांग मला.
त्यावेळेला त्या स्त्रीने आपला परिचय करून दिलेला आहे -
अहं भक्तिरिति ख्याता इमौ मे तनयौ मतौ ।
ज्ञानवैराग्यनामानौ कालयोगेन जर्जरौ ।।
1.45 ।। माहात्म्य
मला भक्ती म्हणतात म्हणाली. आणि हे दोन माझे पुत्र आहेत. ज्ञान आणि वैराग्य त्यांना म्हणतात. या माझी सेवा करणाऱ्या स्त्रिया म्हणजे गंगा, गोदावरी, नर्मदा नद्या माझी सेवा करताहेत. मी अशीच आणखी सर्वत्र संचार करीत असतांना कलियुगाला आरंभ झाला आणि माझी सगळी शक्ती, सामर्थ्य नाहीसे झालं. वृंदावनामध्ये मी आल्यानंतर माझं सामर्थ्य थोडंसं उत्पन्न झालं, तारुण्य मला मिळालं. परंतु ही माझी दोन मुलं मात्र म्हातारी, मूर्च्छित पडलेली आहेत. यांची अवस्था काही चांगली नाहीये. माता तरुण आहे आणि मुलं वृद्ध आहेत असं कुठंतरी पहायला, ऐकायला मिळतं का? नारदा, काय कारण आहे, आपण विचार करा. माझं दुःख एवढं आहे.''
नारद सांगताहेत, कलीला सुरुवात झालेली आहे. अधिकार कलीकडे मिळालेला आहे आता. ब्रह्मदेवांनीच दिलेला आहे म्हणाले. कृतयुग झालं, त्रेतायुग झालं, द्वापारयुग झालं. कलि सुरु झाल्याबरोबर त्याचा सर्वाधिकार याठिकाणी आहे आणि अधर्माचाच प्रसार त्याला करायचा आहे. म्हणून या ठिकाणी योग नाही, तपश्चर्या नाही, सदाचार नाही, काहीही याठिकाणी पहायला मिळत नाही.
इह संतो विषीदंति प्रहृष्यंति ह्यसाधवः ।।
1.58 ।। माहात्म्य
थोडक्यात सांगताहेत नारद. कलियुगामध्ये खरे जे भगवद्भक्त, सज्जन असतील त्यांना दुःख...
भोगावं लागणार आहे आणि दुर्जन जे असतील, अधर्माने वागणारे त्यांना आनंदाचे दिवस आहेत. हे कलीचं सामर्थ्य आहे. अशाही स्थितीमध्ये धैर्य धारण करून भगवान श्रीहरीची भक्ती करण्याकडे ज्यांची प्रवृत्ती आहे त्याच संरक्षण भगवंताच्या कृपेनं होतं म्हणाले. सर्व लोकांनी तुझी उपेक्षा केलेली आहे. भक्तिदेवीला सांगताहेत नारद. विषयाची आसक्ती मनामध्ये उत्पन्न झाल्यामुळे कोणाचंच लक्ष नाहीये. वृंदावनामध्ये तू येऊन पोहचलीस, तारुण्य तुला मिळालेलं आहे. ज्ञान, वैराग्याकडे कोणाचंही लक्ष नाही. सर्वांनी त्यांची उपेक्षा केल्यामुळे यांची अशी दशा झालेली आहे.
हे ऐकल्यानंतर त्या भक्तिदेवीने विचारले, नारदा,
कथं परिक्षिता राज्ञा स्थापितो ह्यशुचिः कलिः ।।
1.63 ।। माहात्म्य
सध्या परिक्षीत राजा राज्य करतो आहे ना! "राजा कालस्य कारणम्' हा सिद्धांत आहे. राजाने इकडे लक्ष देऊ नये? कलीने येऊन आणखी वाटेल तसा अधर्माचा प्रसार करावा. राजा कलीला शासन करू शकत नाही? भक्तिदेवीची ती अपेक्षा आहे. बरं राजा राहू दे, सर्व सृष्टी ज्याने निर्माण केली त्याचंही लक्ष इकडे नाही म्हणाली. भगवान श्रीहरी दयाळू आहेत आणि त्यांच्या डोळ्याला हा अधर्म पडत नाही का? काय कारण आहे सांगा.'' नारद सांगतात, ""भक्तिदेवी, भगवंतांनी व्यवस्था केलेली आहे. काय आहे, भगवान श्रीहरींनी, गोपालकृष्णांनी या भूमीचा ज्या दिवशी त्याग केला आणि ते वैकुंठलोकाला निघून गेले, त्यादिवशी कलीचा अधिकार सुरु झाला. तोपर्यंत काही कली येऊ शकला नाही. सध्या राज्य करणारा परिक्षीत राजा, यानेसुद्धा कलीला शिक्षा का केली नाही, आवरलं का नाही असं तुझं म्हणणं आहे. पण कलियुगामध्ये असा एक मोठा गुण आहे. साधन अगदी सोपं आहे. कलियुगामध्ये जन्माला आलेले जे जीवात्मे आहेत, त्यांना सुख मिळालं पाहिजे. आणि ते सुख मिळवण्याकरता मोठेमोठे यज्ञ करणं, दानधर्म करणं, योगाभ्यास करणं हे शक्य नाहीये. ही शक्ती कलियुगातल्या जीवांच्याकडे नाहीये. भगवंताची भक्ती करावी, कथा श्रवण कराव्यात, लीला श्रवण कराव्यात. त्या भक्तीनं आपला उद्धार हे कलियुगातले जीवात्मे करून घेतील. हा एक उपाय त्या परिक्षीत राजाच्या दृष्टीला पडल्यामुळे कलीचा विरोध त्याने केला नाही. कलियुगाचा अधिकार, सामर्थ्य जास्ती आहे का, भगवंताच्या कथेचं सामर्थ्य जास्ती आहे, हे पहायला मिळेल. संपूर्ण पदार्थ हे साररहित झालेले आहेत, कलीच्या प्रभावामुळे. सर्वही खरं ज्ञान, खरं कर्म काही दिसत नाही''.
नारदांनी याप्रमाणे भक्तिदेवीचं समाधान केलं. तिला थोडीशी शांती मिळाली. या मुलांना...
आपण सावध करा, त्यांचा वृद्धपणा दूर करा अशी तिने प्रार्थना केली. नारद म्हणाले कलियुग फार चांगलं आहे, कारण या कलियुगामध्ये भक्तीचा प्रसार होऊ शकतो. भक्तीचा प्रसार झाल्याबरोबर कलीचं सामर्थ्य आपोआप कमी होईल. म्हणून मी प्रतिज्ञा करतो म्हणाले, की सर्वही एकंदर घराघरातून किंवा सर्वही देशातून भक्तीचा प्रसार मी करीन असं नारदांनी सांगितले. ऋषींचा जो पहिला प्रश्न आहे, विवेक वाढला पाहिजे समाजामध्ये, वैराग्य म्हणजे निलांभ वृत्ती वाढली पाहिजे तर सुख होणार. त्याशिवाय एकता होणार नाही. त्याकरता भगवद्भक्ती हा मार्ग नारदांनी शोधून काढला आहे.
ईश्वराबद्दल प्रेम जर अंतःकरणामध्ये निर्माण झालं तर सर्वही पातकं, तर जातीलच, पण ज्या पापवासना मनामध्ये असतील, उत्पन्न होतील त्या वासनाही नाहीशा होतील. अनेक जन्मामध्ये फिरत असतांना संतांच्या आणि श्रीहरीच्या कृपेने भगवद्भक्ती अंतःकरणामध्ये निर्माण होते म्हणतात, ती टिकणं फार कठीण आहे. या मुलांना सावध करा अशी प्रार्थना भक्तिदेवीने केल्यानंतर नारदांनी, त्यांच्याजवळ जाऊन वेदमंत्रपठण केलेलं आहे, उपनिषदांचा पाठ केलेला आहे, गीता पाठ केलेला आहे. पण काहीही उपयोग झाला नाही. ते सावध झाले नाहीत. डोळे उघडावेत, पुन्हा डोळे झाकून पडून रहावं., नारदांचा प्रयत्न फुकट गेलेला आहे. इतक्यात आकाशवाणी झाली -
एतदर्थं तु सत्कर्म सुरर्षे त्वं समाचर ।
ततो कर्माभिधास्यंति साधवः साधुभूषणाः ।।
2.32 ।। माहात्म्य
नारदा, ज्ञान वैराग्यांना सावध करायचंय म्हणजे त्याचा प्रसार जगामध्ये करायचा आहे, भक्तीचा प्रसार तुम्हाला करायचा आहे, चांगली इच्छा आहे. पण त्याच्याकरता एक मोठं पुण्यकर्म तुम्हाला करावं लागेल. म्हणजे भक्तीचा, ज्ञानाचा, वैराग्याचा प्रसार सर्वत्र होईल. साधूंची भेट तुम्हाला झाली म्हणजे ते ज्ञानी महात्मे तुम्हाला काय करायचं ते सांगतील. आकाशवाणीनं काही स्पष्ट खुलासा केलाच नाही. नारदांनी विचार केला आता कोणाला विचारावं, कोणतं पुण्यकर्म केलं म्हणजे भगवद्भक्ती, ज्ञान, वैराग्य यांचा प्रसार होईल. तिथून निघाले नारद. ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे ज्ञानी लोक भेटले, त्यांना ही आकाशवाणी सांगितली. भक्तीचा, ज्ञानाचा, वैराग्याचा प्रसार हा जर लोकांमध्ये झाला तर सर्व पापक्षय होणार आहे. पापक्षय झाल्यानंतर सर्वांचं कल्याण होणार आहे, सर्वांना शांती प्राप्त होणार आहे.
पण कुणी सांगू शकलं नाही. कोणतं कार्य आहे? त्यांच्या कोणाच्याही लक्षात आलेलं नाही. चिंताग्रस्त झाले नारद महर्षि, त्यांनी विचार केला, बद्रिकाश्रमामध्ये जावं, भगवान नारायणांनाच विचारावं. अशा रितीने आले तिथे तपश्चर्या करण्याकरता आणि अशावेळेला हे सनतकुमार त्यांना भेटलेले आहेत. त्यांना सर्व वृत्तांत त्यांनी सांगितलेला आहे.
सांगा म्हणाले काय करायचं? आकाशवाणी म्हणजे भगवंताचीच वाणी आहे. त्यांनी जे पुण्यकर्म मला करायला सांगितलं आहे ते कोणतं पुण्यकर्म आहे ज्यायोगाने भक्तीची वाढ होईल, कलीचा वेग थांबणार आहे. आपण श्रेष्ठ आहात. तेव्हा आम्हाला सांगा काय करावं? भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा प्रसार झाला पाहिजे लोकांमध्ये.
सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार यांचा जन्म सृष्टीच्या आरंभाला झालेला आहे. पण भगवंताच्या कृपेने आपलं शरीर ताब्यात आहे. त्यामुळे कितीही काल गेला तरी यांचं वय पाच वर्षांचंच आहे. पण पूर्ण ज्ञानी आहेत. सनतकुमार म्हणाले, ""देवर्षि नारदा, सोपा उपाय आहे, काही काळजी करू नका. आपणही मोठे विरक्त आहात. मोठे भगवद्भक्त आहात. भक्तीची वृद्धी व्हावी, भगवत भक्ती सर्वत्र सर्वांच्या मनामध्ये उत्पन्न व्हावी अशी तुमच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झालेली आहे. आपण कृष्णभक्त आहात, भक्तीची स्थापना करण्याचा संकल्प आपला उत्तम आणि योग्य आहे. अनेक मार्ग ऋषिंमंडळींनी दाखवलेले आहेत. योगमार्ग आहे, कर्ममार्ग आहे, ज्ञानमार्ग आहे. पण प्रत्येक मार्गामध्ये श्रम आहेत, कष्ट फार आहेत. भगवत्कृपा प्राप्त होण्याकरता जो मार्ग आहे तो फार दुर्लभ आहे. आकाशवाणीने आपल्याला जे पुण्यकर्म करायला सांगितलेलं आहे, ते पुण्यकर्म म्हणजे
श्रीमद्भागवतालापः स तु गीतः शुकादिभिः ।।
2.60 ।।
भागवतसप्ताह करणं, पारायण करणं हाच एक मार्ग आहे. हा यज्ञ आहे, शुकाचार्यांसारखे ज्ञानी भगवद्भक्त जे आहेत त्यांनी याचा पुरस्कार केलेला आहे. या भागवताच्या पठणाने भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांना जास्ती बल प्राप्त होईल. कलियुगाचं बल, कलीचं बल कमी होईल. भागवत कथेच्या श्रवणाने कलीचे सर्व दोष दूर होत आहेत आणि ज्ञान, वैराग्य, भक्तीही अंतःकरणामध्ये उत्पन्न होते''. नारदांनी सांगितले, ""ऋषीमहाराज, त्या ज्ञान, वैराग्यांना जागं करण्याकरता, सावध करण्याकरता मी पुष्कळ वेदमंत्र म्हणालो, उपनिषद पाठ केला, गीतापाठ केला तरी ते सावधच झाले नाहीत. भागवतामुळे ते सावध कसे होतील? भागवत तर एक पुराण...
आहे''. हा एक संशय नारदांनी व्यक्त केला. त्यावेळी सनतकुमार म्हणाले, ""नारदा, सर्वही वेद, उपनिषदे वगैरे सार ग्रहण करून ही भागवतकथा व्यासांनी निर्माण केलेली आहे. उसामध्ये रस आहे म्हणाले, त्या रसामध्ये साखरही आहे. पण ती काढायला पाहिजे वेगळी. नुसता उसाचा रस प्यायला म्हणजे काही साखर मिळत नाही. दुधामध्येच तूप आहे. पण दही केलं पाहिजे, लोणी काढलं पाहिजे, ते तापवलं पाहिजे म्हणजे तूप मिळतं. तसं ही भागवतकथा ही सर्व वेद, उपनिषदं या सर्वातून निराळी काढलेली अशाप्रकारची सारभूत आहे. आणि आपणच व्यासांना सांगितलं नाही का? भगवद्गुण वर्णन करा, भागवतकथा तयार करा, तुम्हीच सांगितलं व्यासांना, आणि तुम्हालाच संशय कसा उत्पन्न झाला?''
मग नारदांचं समाधान झालेलं आहे.
ज्ञानयज्ञं करिष्यामि शुकशास्त्रकथोदयम् ।।
3.1 ।। माहात्म्य
आपण ज्ञानयज्ञ करावा अशी त्यांना इच्छा उत्पन्न झाली. कुठं करायचा हा ज्ञानयज्ञ? भागवतसप्ताह यज्ञाचं स्थान कोणतं हे विचारलं आणि या भागवताचा महिमा, माहात्म्य आपण सांगा. किती दिवसामध्ये भागवतकथा ऐकावी? काय विधी आहे त्याचा हे सगळं मला सांगा.
कुमार सांगतात नारदा -
गंगाद्वारसमीपे तु तटं आनंदनामकम् ।।
3.4 ।। माहात्म्य
नानाऋषिगणैर्जुष्टं देवसिद्धनिषेवितम् ।।
3.5 ।। माहात्म्य
हरिद्वार क्षेत्र आहे गंगातीरावर. त्याठिकाणी ऋषिमंडळी राहताहेत. अत्यंत सात्त्विक अशी ऋषिमंडळी, रम्य स्थान आहे ते. त्याठिकाणी राहणाऱ्या जीवांच्या अंतःकरणामध्ये परस्पर वैरही नाही.
त्या स्थानाचंही महत्त्व आहे. स्थानात गेल्यावर वैरभाव निघून जातो. असं ते स्थान आहे. त्याठिकाणी तुम्ही हा ज्ञान यज्ञ ठरवा. आणि ह्या ज्ञान यज्ञाला सुरवात झाल्याबरोबर ते ज्ञान, वैराग्य, ती भक्तिदेवी त्याठिकाणी तुमचं भागवताचं कथन सुरु झाल्याबरोबर येऊन पोहोचतील. त्यांची सगळी दुःखं दूर होतील''.
याप्रमाणे सनतकुमारांची आज्ञा झाल्याबरोबर नारद निघाले. नारदांनी त्या कुमारांनाही बरोबर घेतलं आणि गंगातीरावर हरिद्वार क्षेत्रामध्ये ते येऊन पोहोचले. ही बातमी सगळीकडं...
समजली. नंतर सर्व ऋषिमंडळी, देवमंडळी, सिद्धमंडळी, मोठेमोठे ज्ञानी, योगी सर्व मंडळी त्याठिकाणी प्राप्त झाली. भृगु ऋषि आहेत, वसिष्ठ ऋषि आहेत, च्यवन, गौतम, परशुराम, दत्तात्रेय, विश्वामित्र अशी सगळी मोठीमोठी मंडळी प्राप्त झाली. सर्व शास्त्रांच्या देवता, सर्व वेदांच्या देवता, त्याठिकाणी आलेल्या आहेत. गंगादिक सर्वही नद्या याही त्याठिकाणी येऊन पोहचलेल्या आहेत, प्रत्यक्ष रूप धारण करून. मग नारदांनी आसनावरती ब्रह्मकुमारांना बसायला सांगितलं. सनतकुमारांची पूजा केली. वंदन केलं सर्वांनी. विष्णुभक्त, विरक्त, संन्यासी हे समोर बसलेले आहेत. नारद मुख्य श्रोते म्हणून बसले. एका बाजूला ऋषिमंडळी, दुसऱ्या बाजूला देवमंडळी. स्त्रिया एका बाजूला अशी योजना श्रोत्यांची झाली. जयजयकार झालेला आहे, वाद्यं वाजताहेत. विमाणामध्ये बसून देवांनी कल्पवृक्षाच्या पुष्पांचा वर्षाव केलेला आहे. सगळे अगदी एकाग्र चित्ताने भागवत श्रवणाकरता बसलेले आहेत. त्यावेळेला नारदांना भागवताचं महत्त्व सांगायला सनतकुमारांनी आरंभ केला.
अथ ते वर्ण्यतेऽस्माभिः महिमा शुकशास्त्रजः ।
यस्य श्रवणमात्रेण मुक्तिः करतले स्थिता ।।
3.24 ।। माहात्म्य
भागवताच्या महिम्याचंही मोठं वर्णन आहे.
सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद्भागवती कथा ।
यस्याः श्रवणमात्रेण हरिचित्तं समाश्रयेत् ।।
3.25 ।। माहात्म्य
भागवताचं महत्त्व सांगताहेत सनतकुमार. भागवतकथा ही नेहमी ऐकावी म्हणे. नेहमी वाचावी. नेहमी चिंतन करावं. वेळ असेल त्याप्रमाणे. या भागवतकथा श्रवणाने भगवान श्रीहरी आपल्या चित्तामध्ये वास्तव्य करतात. अठरा हजार श्लोक या भागवतामध्ये आहेत. बारा स्कंधविभाग आहेत. शुकाचार्यांनी परिक्षीत राजाला हे भागवत सांगितले. पुष्कळ शास्त्रं आहेत, पुराणं आहेत पण केवळ भागवत हेच मुक्ती देणारं, समर्थ अशाप्रकारचं आहे.
कथा भागवतस्यापि नित्यं भवति यद्गृहे ।
तद्गृहं तीर्थरूपं हि वसतां पापनाशनम् ।।
3.29 ।। माहात्म्य
म्हणून सांगताहेत कुमार, भागवतकथा ही ज्या घरामध्ये नेहमी चाललेली असेल, चिंतन म्हणा, वाचन म्हणा, ते गृह तीर्थरूप बनते. तीर्थस्थानं आहेत पुष्कळ. परंतु स्वतःचं घरसुद्धा तीर्थाप्रमाणे पवित्र होऊन जातं. राहाणाऱ्यांची सर्व पातकं नष्ट होतात. अनेक यज्ञ आहेत परंतु या भागवताची बरोबरी त्यांना येत नाही. अर्थपूर्ण भागवतशास्त्र निरंतर आणखी वाचणारा, चिंतन...
करणारा, त्याच्या अनेक जन्मांच्या पातकांचा नाश होतो.
असं पुष्कळ वर्णन केलं त्यांनी आणि ज्याच्या कानावर ही भागवतकथा जन्म असेपर्यंत पडली नाही, त्याचा जन्म व्यर्थ गेलेला आहे. त्याने केवळ आपल्या जननीच्या नऊ महिने उदरात राहून तिला त्रास, दुःख दिलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही.
तर याप्रमाणे सनतकुमार सांगताहेत, पण याच्याकरता नियमही सांगताहेत
दिनानां नियमो नास्ति सर्वदा श्रवणं मतम् ।।
3.45 ।। माहात्म्य
भागवत इतक्या दिवसामध्ये ऐकावं असं नाहीये, नेहमी ऐकावं. चांगलं आहे. रोज घरातला केर आपण काढतो की नाही, रोज काढायला पाहिजे. शरीराला स्नान करणं, रोज शरीराची शुद्धी करावी लागते, त्याचप्रमाणे सर्वदा कथाश्रवण जर केलं तर मनाची शुद्धी रोज होते. सत्य भाषण करणं, ब्रह्मचर्याने राहणं. असे काही नियम सांगितलेले आहेत. इंद्रियनिग्रहादि या दृष्टीने जर आणखी ऐकलं तर त्या श्रवणाचं विशेष फल सांगितले आहे. म्हणून सात दिवसामध्ये ऐकावं असा नियम शुकाचार्यमहाराजांनीच करून ठेवलाय याचं कारण काय?
मनसश्चजयाद् रोगाद् पुंसां चैव आयुुषः क्षयात् ।
कलौदोषबहुत्वाच्च सप्ताहश्रवणं मतम् ।।
3.49 ।। माहात्म्य
सात दिवसामध्ये भागवत ऐकावं असं का ठरवलं त्यांनी? मनोजय राहत नाही. चार महिने ऐकू, वर्षभर ऐकू. पण वर्षभर मन स्थिर राहील की नाही संशय आहे. हा एक दोष आहे कलीचा. रोग कोणता शरीरामध्ये उत्पन्न होईल आणि आपली प्रवृत्ती बंद होईल, शरीर आरोग्य रहित होईल, आयुष्य केव्हा संपेल याचाही भरवसा नाही, म्हणून सात दिवसांमध्ये ऐकायचा संकल्प करून सात दिवसामध्ये ऐकावं, असा शुकाचार्यमहाराजांनी नियम घालून दिलेला आहे.
त्यावेळेला शौनक ऋषी म्हणाले, ""सूता ज्ञान, वैराग्य योगाभ्यास हे सगळे बाजूला करून आपण या भागवत पुराणाचंच महत्त्व सांगायला लागलात. इतकं महत्त्व या भागवताचं काय आहे? त्याचं कारण सांगताहेत सूतजी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याजवळ सर्व देव निमंत्रण करण्याकरता आले, ""भगवन, आपण आता वैकुंठलोकामध्ये या. आता आपलं इथलं काम झालेलं आहे. आमच्याही स्थानामध्ये येऊन आमची पूजा घेऊन चला, अशी प्रार्थना केली''. तसा विचार ठरवला गोपालकृष्णांनी, जावं आता इथून. एकादशस्कंध सबंध त्यांनी उद्धवजींना सांगितला.