ही कथा त्यांना फार आवडायची. रामभक्तीमुळे हनुमानजीही त्यांना प्रिय होते. गीतरामायणातले, 'कधी न चलावे चंचल हे मन | श्रीरामा ह्या चरणापासून' हे गीत त्यांनी अनेकदा आवर्जून ऐकले.
श्रेष्ठ महात्मे, संत, ज्ञानीपुरुष याविषयी प. पू. महाराज नेहमीच अत्यादराने बोलत असत. नुसते बोलत नसत, तर स्वतःच्या कृतीतून तो आदर व्यक्त करीत असत. एकदा आश्रमात करवीरचे शंकराचार्य आलेले असताना, त्यांना उच्चासनावर बसवून, त्यांचा गौरव करून प. पू. महाराज त्यांच्या पायाशी बसले. अध्यात्माच्या क्षेत्रात 'आत्मज्ञान' कसे प्राप्त होईल? हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. प. पू. महाराजांनी जडभरताची गोष्ट सांगताना हे स्पष्ट केले. रहूगण राजा जडभरताला प्रश्न करतो, 'व्यवहारापासून निवृत्त व्हायचं, संसार सोडून जायचा तर संसार खोटा आहे असं कुठे आहे? संसार खरा आहे की!' जडभरतांनी उत्तर दिले, 'तू हा प्रश्न विचारलास पण ही ज्ञानी माणसाची दृष्टी नाही, केवळ अध्ययनाने ज्ञान होत नाही. महात्मे जे आहेत त्या महात्म्यांना शरण गेल्याशिवाय, त्यांची कृपादृष्टी झाल्याशिवाय ज्ञान होत नाही.'
आणखी एका ठिकाणी ते म्हणतात की, 'आत्मज्ञानासाठी बुद्धीची स्थिरता हवी. बुद्धीची स्थिरता संपादन करणं हे मुख्य आहे. बुद्धीस्थैर्य हे आत्मज्ञानाला अत्यंत उपयोगी आहे. ही स्थिरता ईश्वरप्रणिधानाने येते तशीच, ती वीतराग महात्म्यांच्या संकल्पाने सुद्धा होऊ शकते.' पूर्ण बुद्धीचे महात्मे म्हणजे साक्षात ईश्वरस्वरूपच झालेले असतात. अशा महात्म्यांचा जो संकल्प आहे, त्यांची दृष्टीसुद्धा इतकी शक्तिसंपन्न असते की ती ज्याच्यावर पडेल त्याचा सर्व ही पापक्षय होतो.' 'मन एकाग्र होण्यासाठी संत चरित्रे वाचावीत.' असे ते नेहमी म्हणत असत.
एकदा प. पू. महाराजांजवळ गीतेविषयी काही चर्चा करताना विचारले, 'शेवटी ज्ञान होणं हे महत्त्वाचं आहे..' त्यावर प. पू. महाराज क्षणभर शांत राहिले आणि म्हणाले, 'नाही. त्या ज्ञानातून शांतीची अवस्था प्राप्त होणं महत्त्वाचं आहे. गीतेत एक श्लोक आहे,
"विहाय कामान् यः सर्वान्पुमांश्चरति निस्पृहः |
निर्ममो निरहंकारः स शांतिमधिगच्छति ||"
शेवटी शांती अनुभवणं हेच महत्त्वाचं आहे.' आपण जगताना प्रत्येक गोष्टीचे कर्तृत्व स्वतःकडे घेण्यासाठी धडपडत असतो. त्यातून आपल्या अहंकाराचे छानपैकी पोषण होत असते. आणि मग तोच अहंकार आपल्याला आपल्या शुद्ध रूपापासून, मूळ रूपापासून दूर नेत असतो. ईश्वराची साधनाही आपणच करतो हा अहंभाव आपल्यापाशी असतो. यावर प. पू. महाराजांनी...
अतिशय सोप्या पण ठाम भाषेत महत्त्वाचे भाष्य केले आहे. ते लिहितात, "उपासना पक्की होणं याचा अर्थ 'त्याचा' भ्रम गेला पाहिजे. 'मी उपासना करतो आहे', एकच आहेत ते दोघेही. उपासनेचं कर्तृत्व जोपर्यंत मनात आहे तोपर्यंत उद्धार नाही. 'मी उपासना करणारा आहे.' असं जर वाटत असेल तर त्यामुळेही अध:पात होतो." (दैवी संपदा पृ. 74)
प. पू. महाराजांची कृती-उक्ती एकरूप होती. साधकांना दीक्षा मिळाल्यावर साधक प. पू. महाराजांना म्हणत, "आपण मला दीक्षा दिलीत. तो आनंद काही विलक्षणच आहे." प. पू. महाराज त्यावर उत्तर देत, "आम्ही कुठे काय केलं. पोस्टमन पत्र नेऊन टाकतो, आम्ही पोस्टमनचं काम केलं." ज्यांच्या वृत्ती तदाकार झाल्या आहेत, असे महाराज कसलेच कर्तृत्व स्वतःकडे घेत नसत. ज्ञानेश्वरीतल्या काही ओव्यांचा ह्या दृष्टीने ते अनेकदा उल्लेख करत त्या अशा -
परी मने वाचा देहे | जैसा जो व्यापारु आहे |
तो मी करीत आहे | ऐसे न म्हणे ||
करणे वा न करणे | हे आघवे तोचि जाणे |
विश्व चालतसे जेणे | परमात्मेनी ||
एकदा प. पू. महाराज गावाला गेलेले असताना त्यांच्या चिरंजीवांनी सुंदर शोकेस बनवून त्यात वेळोवेळी झालेल्या त्यांच्या सत्कारातील मानपत्रे, भेटवस्तू वगैरे मांडून ठेवले. प. पू. महाराज गावाहून आल्यावर त्यांनी तिकडे क्षणभर दृष्टी टाकून म्हटले, "अहो, हे ज्ञानेश्वर महाराजांनी जे सांगितलं त्याच्या अगदी विरुद्ध झालं. त्यांनी काय सांगितलं आहे ?"
पूज्यता डोळा न देखावी | स्वकीर्ति कानी नायकावी |
हा अमुक ऐसा हे नोहावी | सेची लोकी || श्री ज्ञानेश्वरी ||
ज्या विभूतींचा 'मी' लयाला गेला त्यांची ही अमृतमयी वाणी ! त्यांच्या उदात्त विचारसरणीचा प्रत्यय त्या शब्दांतून येतो.
शब्दांचा अन्वय सांगण्याची त्यांची पद्धतीही अशीच उदात्त होती. "गृहेषु अतिथिवत् वसेत् |" याचा अर्थ सांगताना ते एकदा म्हणाले होते, "'गृह' या शब्दाचा अर्थ 'शरीर' असाही घ्यावा. शरीरात आपण अतिथी आहोत हा विचार पक्का झाला तर देहाविषयी ममत्व राहणार नाही.
"ॐ नमोजी आद्या | वेद प्रतिपाद्या |"
"जय जय स्वसंवेद्या | आत्मरूपा ||"
ह्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीचा अर्थ सांगताना ते म्हणाले होते, "ज्ञानेश्वर महाराजांनी आत्मस्वरूपच सगळीकडे आहे हे मांडले. आधी तर्क केला, ज्याअर्थी सृष्टी निर्माण झाली त्याअर्थी कर्ता हा असणारच. न्यायशास्त्र तर्काच्या मार्गाने जाते. नंतर वेदांनी सांगितले म्हणजे शब्दप्रचिती आहे आणि शेवटी 'स्वसंवेद्या' म्हटल्यामुळे आत्मप्रचिती आहे. म्हणजेच तिन्ही प्रमाणांनी त्याचे अस्तित्व सिद्ध होते. अशा रितीने पहिल्याच ओवीत आत्मरूप सिद्ध करून मगच त्यांनी ज्ञानेश्वरीला आरंभ केला." 1995 मध्ये बार्शी येथे पंचांगकर्ते धुंडिराजशास्त्री दाते यांच्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना प. पू. महाराज म्हणाले की, 'शास्त्राच्या अभ्यासानंतर संतवाङ्मय जास्त स्पष्ट झाले असे श्री. धुंडामहाराज देगलूरकर म्हणाले होते.'
पितामह भीष्मांचे चरित्र त्यांना आवडायचे. उत्तरायण लागल्यावर देह विसर्जनाच्या वेळेस, भीष्मांनी कृष्ण स्तुती केली ती अशी -
इति मति रूपकल्पिता वितृष्णा |
भगवति सात्वत पुंगवे विभूम्नि |
स्वसुखमुपगते क्वचिद् विहर्तुं |
प्रकृतिमुपेयुषि यद् भवप्रवाह: ||
याचे स्पष्टीकरण करताना प. पू. महाराज म्हणायचे की, "तुम्हाला वाटते तेव्हा तुम्ही सृष्टी निर्माण करता, प्रकट होता, नाही तर निर्गुणातच असता. हा भवप्रवाह सगळा प्रकृतीमुळे निर्माण झाला आहे.'
ज्ञानेश्वर महाराजांचा 'तुज सगुण म्हणू की निर्गुण रे' हा अभंग ह्याच अर्थाचा आहे.' 'भीष्म शरपंजरी पडले होते तरी त्यांची सर्व इंद्रिये शेवटपर्यंत त्यांच्या ताब्यात होती.' असे ते सांगत. प. पू. महाराजांनी शेवटच्या आजाराच्या आधीच्या आजारपणात महाभारत वाचून घेतले. पण भीष्मांनी देह ठेवला, तिथून पुढे ऐकले नाही. भीष्मांनी शेवटी वाणी बंद करून चित्त केवळ परमात्म स्वरूपावर स्थिर केले. प. पू. महाराजांनीही 13 फेब्रुवारीपासून मौन धारण केले ते अखेरपर्यंत सोडले नाही.
प. पू. महाराजांसारख्या श्रेष्ठ पुरुषांविषयी खूप काही सांगितले तरी खूप काही सांगायचे...
राहून जाते. कारण शब्दांच्या अतीत असलेले हे महात्मे असतात. तरी शब्दांच्या सहाय्याने त्यांचा मागोवा अंतर्मुखपणे जेवढा घेता येईल तेवढा घ्यावा, शब्दांच्या पलीकडच्या नि:शब्दांच्या प्रांतात त्यांच्याच कृपेने पाऊल पडेल ही आशा मनी ठेवावी. या संदर्भात दासबोधातील त्यांची आवडती ओवी आठवते,
मनी धरावे ते होते | विघ्न अवघे नासोनि जाते |
कृपा केलीया रघुनाथे | प्रचिती येते ||
ए-11 गुडविल बिल्डिंग, मनमाला टँक रोड, माहिम.
मुंबई - 400016, फोन - 24305396
Q