श्री भगवती प्रकाशन, पुणे
098220 27704, 020-2546 9060
u सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन
u प्रकाशन दिवस ...
27 फेब्रुवारी, 2010
फाल्गुन शुद्ध चतुर्दशी
प. पू. दत्तमहाराज कवीश्वर जन्मशताब्दी वर्ष
u प्रकाशक ...
श्री भगवती प्रकाशन
6/1 ब, साई विहार (फेज II)
कर्वेनगर, पुणे - 411 052
फोन ... 25469060 मोबाईल ... 98220 27707
E-mail : [email protected]
URL : www.dattamaharajkavishwar.org
u रंगीत चित्रे ...
सौ. गायत्री निहार आडकर
u मुद्रक ...
के. जोशी आणि कंपनी
भिकारदास मारुती मंदिराजवळ, सदाशिव पेठ, पुणे 30
फोन ... 24471409, 24482748
E-mail : [email protected]
u किंमत ... रु. 400/-
ब्रह्मर्षि प. पू. दत्तमहाराज कवीश्वर यांच्या अमृतवाणीतून साकारलेला श्रीमद् भागवत निरूपण ग्रंथ त्यांच्याच जन्मशताब्दी वर्षात प्रकाशित होत आहे, ही गोष्ट भक्ताधीन असलेल्या ईश्वरेच्छेचेच प्रमाण आहे. आपल्या भक्ताने केलेले श्रीहरीनिरूपण त्याच्याच जन्मशताब्दीच्या आनंदोत्सवात प्रकट करावे असा संकल्प भगवंताने केला आणि हा एक सुवर्णयोग साधला गेला.
या ग्रंथाकरिता प. पू. श्री विद्याशंकर भारती स्वामी महाराज श्रीजगद्गुरु शंकराचार्य करवीर पीठ, कोल्हापूर आणि प. पू. श्री भानुदास महाराज देगलूरकर, पंढरपूर यांनी विनंती केल्यावर लगेचच आशीर्वादपत्र या कार्याला दिले. तसेच प. पू. श्री पंडितराज राजेश्वरशास्त्री उप्पिनबेटगिरी, धारवाड यांनीही या ग्रंथाला उत्तम अशी प्रस्तावना दिली. याबद्दल श्री भगवती प्रकाशन त्यांचे कायमचे ऋणी आहे. या श्रेष्ठ पुरुषांचा प. पू. दत्तमहाराजांशी अतिशय आत्मीय संबंध होता. तेव्हा यानिमित्ताने आचार्य संप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि वैदिक संप्रदाय यांचा आशीर्वाद या कार्याला मिळाला असे म्हणता येईल आणि प. पू. दत्तमहाराजांबद्दल या सर्व ठिकाणी असलेलं प्रेमही अनुभवास आले.
डॉ. सौ. माधुरीताई पणशीकर या तर प. पू. दत्तमहाराजांच्या संप्रदायातीलच. त्यांनीही नेहमीच्याच आत्मीयतेने या ग्रंथाकरिता भूमिका लिहून दिली याबद्दल त्यांचे हार्दिक आभार !
प. पू. दत्तमहाराजांच्या मुलीची (सौ. शैलताईंची) सूनबाई सौ. गायत्री निहार आडकर हिने दोन लहान मुलांना सांभाळून व घरातले काम सांभाळून उत्तम अशी तेरा चित्रे काढून दिली त्याबद्दल ती विशेष अभिनंदनास व ईश्वराकृपेस पात्र आहे. या कामाकरिता तिला घरातल्या मंडळींचेही बहुमोल साहाय्य झालेले आहे.
या पुस्तकाचे मुद्रक श्री. अनिल जोशी, श्री. अण्णासाहेब जोशी आणि त्यांचे सहकारी हे श्री भगवती प्रकाशनाचे काम नेहमीच आपल्या घरचं काम समजून करतात. इतकं सुंदर बांधणीचं व उत्कृष्ट छपाईचं काम केल्याबद्दल या सर्वांचे विशेष आभार !
आणि ज्यांच्या अनुकपेमुळे, संकल्पामुळे व अनुग्रहामुळे हा अद्वितीय ग्रंथ साकार झाला, त्या प. पू. भगवतीस्वरूप ताईमहाराजांचे आभार कसे मानावेत ? रुक्मिणीदेवीने त्या ब्राह्मणाला सांगितले की, 'भूदेवा, तुम्ही साक्षात भगवंताला माझ्या विवाहाकरिता घेऊन आलात, याबद्दल मी तुम्हाला काय देणार ? मी फक्त तुम्हाला शिरसा वंदन करते.' तशीच काहीशी भावना आमची झाली आहे. ज्यांनी प. पू. दत्तमहाराजांचे प्रेम सतत प्रसारित केलं, एवढंच नव्हे तर ते अनंतपटीने वाढविलं आणि प. पू. दत्तमहाराजांना श्रीदत्तात्मात प्रतिष्ठापित केलं त्या प. पू. भगवतीस्वरूप ताईमहाराजांना आमचे लक्ष लक्ष प्रणाम !
सगुण रूप देवाचंही कायम राहत नाही, माणसाचं तर नाहीच नाही. परंतु ईश्वराची विभूती म्हणून इथे आलेल्या प. पू. दत्तमहाराजांसारख्या व्यक्ती त्यांच्या जीवनकालात जे प्रेम प्रसारित करतात तेच प्रेम अनुकूल लोकांना एकत्र बांधून ठेवतं आणि पुढे अनेक जन्म शिदोरी म्हणूनही पुरतं. असंच प्रेम सर्वांना मिळावं आणि अशा श्रेष्ठ पुरुषांची, सद्भक्तांची संगती सर्वांना मिळावी हीच भगवान गोपालकृष्णाच्या चरणी प्रार्थना आहे.
ह्या सगळ्या विश्वाच्या निर्मितीचा हेतू काय? कशासाठी हे सारे विश्व निर्माण झाले आणि याचा शेवट किंवा पर्यवसान कशात होणार आहे? मी कोण? माझ्या जन्माचे प्रयोजन कोणते? माझ्या अस्तित्वाला ह्या विश्व चक्रात अर्थ आहे का? परिवर्तनशील असलेल्या ह्या जगाच्या मागे काही अपरिवर्तनीय, चिरंतन, स्थिरसत्य आहे का? ह्या विश्वाच्या अफाट पसाऱ्यामागे काही मूलतत्त्व असेल का? हे आणि अशा प्रकारचे प्रश्न संवेदनशील मनापुढे पुरातन काळापासून उभे आहेत. त्यांची उत्तरे माणूस निरनिराळ्या अंगांनी सारखा शोधतोच आहे. ज्ञानाच्या कक्षा आज विविध दिशांनी विस्तारत चालल्या आहेत. ज्ञानेंद्रियांच्या कक्षेत येणाऱ्या प्रश्नांना विज्ञान भिडले. अचंबा वाटावा असे शोध माणसाने लावले. आणि तरी मनात वर उपस्थित केलेल्या प्रश्नांची घुसळण चालूच राहिली.
विज्ञानाने विश्वाच्या मुळाशी असलेल्या शक्तीचा शोध विज्ञानाच्या अंगाने घेतला. त्यात प्रत्यक्ष, वस्तुनिष्ठता आणि कार्यकारणभाव ह्याला महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीत पुरातन काळापासून वर उपस्थित केलेल्या प्रश्नांचा शोध विचारवंतांनी चिंतनाच्या अंगाने घेतलेला दिसतो. वेद, उपनिषदे, गीता इ. ग्रंथांनी लौकिकाचा आणि जीवनाच्या पलीकडच्या अलौकिकाचा कसोशीने शोध घेतला. ऋषी-मुनींनी त्यावर भरपूर चिंतन केले. अशा चिंतनगर्भ परंपरेतील एक...
महान व्यक्तिमत्त्व म्हणजे प. पू. दत्तमहाराज कवीश्वर. श्री वासुदेव निवासातील योगिराज गुळवणी महाराजांचे उत्तराधिकारी. नाथ महाराजांच्या जीवनात जसा प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय दिसतो, तसाच समन्वय प. पू. दत्तमहाराजांच्या जीवनात होता. षड्दर्शनांचा अभ्यास केलेले, कोणत्याही विषयाची खोल जाणारी सूक्ष्म, मर्मग्राही दृष्टी असलेले, भक्तीमार्गाचे पुरस्कर्ते. नम्रता, विनयशीलता, ज्ञान, भक्ती आणि शास्त्रशुद्ध आचरण ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची महत्त्वाची अंगे होती, असे दत्तमहाराज कवीश्वर !
"शुद्ध बीजापोटी || फळे रसाळ गोमटी ||" ह्या तुकारामांच्या उक्तीप्रमाणे प. पू. दत्तमहाराजांचा जन्म पिढ्यानपिढ्या निष्ठा ठेवणाऱ्या कवीश्वरांच्या घराण्यात झाला. कवीश्वरांचे मूळ आडनाव सप्रे. प. पू. दत्तमहाराजांचे पणजोबा श्री. दाजी दीक्षित हे व्युत्पन्न पंडित होते आणि त्यांचा रामायण-महाभारताचाही चांगला अभ्यास होता. नरसोबावाडीला ते रोज पाच श्लोक करून श्री दत्तप्रभूंच्या चरणी अर्पण करीत असत. त्यांच्या जवळ असलेल्या प्रतिभासंपन्नतेमुळे लोक त्यांना "कवीश्वर" नावाने ओळखू लागले. (ह्याच प्रतिभेचा अविष्कार पुढे प. पू. दत्तमहाराजांच्या ठायी झालेला दिसतो.) ह्यांचे चिरंजीव श्री. वक्रतुंड महाराज ह्यांचाही रामायण-महाभारताचा व्यासंग होता. त्यावर ते प्रवचने करीत. त्यांच्या पत्नी सौ. सावित्रीबाई ह्यांची वीस बाळंतपणे झाली पण फक्त दोन मुली जगल्या. नंतर श्री. गोविंदस्वामींच्या कृपाप्रसादाने त्यांना पुत्ररत्न झाले. ते म्हणजे प. पू. श्रीदत्तमहाराजांचे वडील श्री. धुंडिराज शास्त्री. त्यांचा न्यायशास्त्राचा अभ्यास होता. त्यांना सद्गुरु वासुदेवानंदसरस्वतीस्वामी महाराजांचा सहवास खूप लाभला, त्यांच्या पत्नी सौ. सरस्वतीबाई वाडीला रोज प्रदक्षिणा घालत असत. त्यांच्या पोटी बुधवार दि. 2 मार्च 1910, माघ वद्य शके 1831 रोजी प. पू. दत्तमहाराजांचा जन्म झाला. त्यांचे बालपण कृष्णामाईच्या नयनरम्य परिसरात गेले. 7 वी पर्यंतचे शिक्षण वाडीलाच झाले. त्यानंतर वाडीलाच श्री. दीक्षित स्वामी महाराजांचा मंत्रोपदेश मिळाला. प. पू. महाराजांचा पहिला भागवत सप्ताह श्री दीक्षितस्वामी महाराजांच्या प्रेमळ कृपादृष्टीखाली सिद्ध झाला. सप्ताहसमाप्तीनंतर स्वामी महाराजांनी प. पू. दत्तमहाराजांच्या अंगावर शाल पांघरली आणि त्यांना चांदीचे फुलपात्र दिले. कृष्णेच्या एका तीरावर वाडी आणि दुसऱ्या तीरावर दत्तअमरेश्वराचे मंदिर आहे. ते जागृत असून चौसष्ट योगिनींचा तिथे निवास आहे. दीक्षित स्वामी महाराज तेथे वस्तीला होते.
धारवाड इथे पं. नागेशशास्त्री उप्पिन बेट्टिगरी यांच्या साक्षेपी नजरेखाली प. पू. महाराजांनी न्यायशास्त्राचे धडे गिरवले...
न्यायशास्त्राचे धडे गिरवले. पुढे विद्वज्जनांच्या अनेक सभांमध्ये त्यांची विद्वत्ता निखालसपणे सिद्ध झाली. कांची कामकोटीला सद्गुरू शंकराचार्य श्री चंद्रशेखर सरस्वती यांनी आयोजित केलेल्या विद्वत् सभेत प. पू. दत्ता महाराजांनी वेदांत विशद करून त्यांची वाहवा मिळविली. धारवाडच्या अद्वैत ब्रह्मविद्या परिषदेतील प. पू. दत्तमहाराजांनी केलेल्या वेदांतावरील अप्रतिम विवेचनाचा वृत्तांत कांची कामकोटीच्या श्रीमद् शंकराचार्यांना कळल्यावर त्यांनी श्री. दत्तमहाराजांसाठी आदरपूर्वक सुवर्णकंकण, वस्त्र आणि श्रीफळ पाठवले. 1930 मध्ये बार्शी येथील श्री. भगवंतराव पाठक यांच्या कन्येशी प. पू. दत्तमहाराजांचा विवाह झाला. योगिराज गुळवणी महाराजांनी त्यांच्यावर अरण्यपार प्रेम केले. त्यांचा सहवासही खूप दिला. 1937 साली पुण्याला नातूंच्या वाड्यात प. पू. दत्तमहाराजांचे बिऱ्हाड झाले. पुढे 1957 साली इन्फ्लुएंझाच्या साथीत प. पू. महाराजांची शोभा नावाची मुलगी दगावली. त्यावेळी दत्तमहाराज आखाडला सप्ताहासाठी गेले होते. ह्या सर्व काळात प. पू. गुळवणी महाराजांनी कवीश्वर कुटुंबीयांना अत्यंत ममतेने सांभाळले. मुलीच्या मृत्यूचा आघात प. पू. दत्तमहाराजांनी अत्यंत धीराने सहन केला. कसोटीचे प्रसंग संतांच्या आयुष्यातही येतात आणि तिथेच त्यांच्या स्थिर विवेकशील मनाचा प्रत्यय येतो.
योगिराज गुळवणीमहाराज गोडबोईकरांच्या चाळीत राहत होते. त्यावेळेस पानशेतचे धरण फुटले, पुण्यात हाहा:कार झाला आणि चाळीत पाणी शिरले. लोकांनी प. पू. गुळवणीमहाराजांना बाहेर काढले परंतु त्यांचे देव, पोथी वगैरे बाहेर आणता आली नाहीत. दुसऱ्या दिवशी मातीतून लोकांनी देव बाहेर काढले. देवांसाठी आश्रमासारखी वास्तू असावी असे प. पू. दत्तमहाराजांना वाटत होतेच आणि त्यांचा संकल्प पूर्ण झाला आणि "वासुदेव निवास" ही वास्तू आकाराला आली. ह्या वास्तूला "वासुदेव निवास" हे नावही प. पू. दत्तमहाराजांनीच सुचवले. अनेक नावे येत होती. पण हे नाव निश्चित करण्यामागे प. पू. दत्तमहाराजांचा काही विचार होता. त्यांनी सांगितले, "वासुदेव याचा अर्थ सर्वांना धारण करणारा असा आहे. ह्या आश्रमाचे कार्य व्यापक स्वरूपाचे असेल, सर्व जगाच्या कल्याणाचे कार्य येथून होईल." ह्या जाणीवेतून "वासुदेव निवास" हे त्या वास्तूला नाव सुचवले गेले. ह्या वासुदेव निवासात प. पू. गुळवणी महाराजांच्या आज्ञेनुसार पहिला सप्ताह प. पू. दत्ता महाराजांच्या भागवताचा झाला.
एकदा सज्जनगडावरून प. पू. श्रीधरस्वामींनी दासनवमीच्या उत्सवाला प. पू. दत्तमहाराजांना बोलावले. त्यावेळी दत्तमहाराजांची प्रकृती ठीक नव्हती. ताप येत होता तरी प. पू. गुळवणी...
महाराजांच्या आज्ञेवरून ते गेले, गडाच्या पायथ्याशी आल्यावर "प्रकृती अस्वस्थ आहे" असा त्यांनी श्रीधरस्वामींना निरोप पाठवला. "डोली करून या" असा उलटा निरोप आला. पण प. पू. दत्तमहाराज तसेच वरती गड चढून गेले. आणि तिथे पहाटे त्यांना शक्तिपात दीक्षा झाली. "ते कुंडलिनी जगदंबा || चैतन्यचक्रवर्तीची शोभा || जिथे विश्वबिजाचिया कोंभा || साऊली केली ||" असे ज्या शक्तीच्या अनन्यसाधारण शक्तीचे वर्णन ज्ञानेश्वरांनी केले तिचा उत्सव प. पू. दत्तमहाराजांच्या ठायी मूर्त झाला.
दीक्षा मिळाली तरी प. पू. गुळवणी महाराज सगुणात होते. तोपर्यंत आपल्या गुरूविषयी अरण्यपार प्रेमादराची भूमिका असणाऱ्या प. पू. दत्तमहाराजांनी इतर साधकांना दीक्षित केले नाही. 15 जाने. 1974 ला प. पू. गुळवणी महाराजांची इहलोकीची यात्रा संपली. त्यांच्या अस्थि कलशाचे विसर्जन प्रयागला झाल्यावर त्यांनी दीक्षा द्यायला सुरुवात केली.
योगिराज गुळवणी महाराजांच्या अधिकारसंपन्न दृष्टीखाली प. पू. दत्तमहाराजांचा षष्ठ्यब्दिपूर्ती सोहळा झाला. नंतर 25 मे ते 31 मे 1981 ह्या सात दिवसांत अमृत महोत्सव साजरा झाला. 11 मे ते 18 मे 1990 ह्या काळात सहस्रचंद्रदर्शन शांती महोत्सव, 23 एप्रिल ते 29 एप्रिल 1997 ह्या काळात देऊळगावराजा-बुलढाणा इथे आणि 20 मे ते 23 मे 1994 पुणे येथे रौप्यशांती महोत्सव झाला. भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद, श्री. वराहगिरी गिरी आणि श्री. शंकरदयाळ शर्मा यांच्याकडून त्यांच्या विद्वत्तेचा गौरव झाला. आयुष्यभर महाराष्ट्राच्या खेडोपाडी हिंडून त्यांनी भागवत सप्ताह केले. तिथेही अनेक भाविक, विद्वानांकडून त्यांचे सत्कार समारंभ झाले.
प. पू. दत्तमहाराजांनी बरेच लेखनही केले. सद्गुरू टेंबे स्वामी महाराजांचे समग्र वाङ्मय 1954 मध्ये श्री. स्वामी महाराजांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांनी 12 खंडांत प्रकाशित केले. 1965 मध्ये टिळक विद्यापीठाने त्यांच्या द्वैताद्वैतवादी निम्बार्काचार्यांच्या ब्रह्मसूत्रावरील भाष्याचा अनुवाद प्रदीर्घ अभ्यासपूर्ण प्रस्तावनेसह "वेदांतपारिजात सौरभ" या नावाने प्रसिद्ध केला. श्री. वासुदेवानंद सरस्वतींचे चरित्र "गुरुदेवचरित्र" ह्या शीर्षकाने प्रसिद्ध केले. गुण गाईन आवडी, चांदणे कैवल्याचे, सत्संग, नारायण नमोस्तुते इ. पुस्तकातून प्रकाशित झालेली त्यांची प्रवचने साधकांना मार्गदर्शन करणारी आहेत. "विवेकचूडामणी" हा त्यांचा प्रिय ग्रंथ ! त्यातील 125 श्लोकांचे त्यांनी केलेले विवरणही प्रसिद्ध झाले आहे.
"वामन निवास" ही भव्य वास्तू त्यांनी अथक परिश्रमाने उभी करून आपल्या गुरूंबद्दलच्या संदर्भातील कृतज्ञता व्यक्त केली. ह्याच वास्तूत "तुळजाभवानी आरोग्यधाम" उघडले. इथे स्त्रियांसाठी औषधोपचाराची व्यवस्था आहे. वाडीच्या पैलतीराला श्री दत्तअमरेश्वराचे जे स्थान आहे, त्याचा जीर्णोद्धार त्यांनी केला. तिथे एका भव्य वास्तूत प. पू. स्वामी महाराजांच्या आणि प. पू. दीक्षित स्वामी महाराजांच्या पादुका आहेत. स्वामी महाराजांनी अभिमंत्रित केलेले यंत्र आहे. त्या शिवाय प. पू. दीक्षित स्वामी महाराजांच्या पूजेतील देव, फोटो वगैरे गोष्टींचा सांभाळ तिथे पावित्र्याने केला जातो. श्री दत्तअमरेश्वराची मूर्ती आणि योगिनी असून ती वास्तू अत्यंत पवित्र व मंगल वातावरणाने भारलेली आहे. ते कृष्णेच्या काठावरचे जागृत देवस्थान आहे.
प. पू. दत्तमहाराजांनी विविध प्रकारची कार्ये करून आपल्या कृतार्थ जीवनाची सांगता 1 मार्च 1999 फाल्गुन शुक्ल चतुर्दशीला केली. तत्पूर्वी त्यांच्या सहधर्मचारिणी सौ. लक्ष्मीबाई कवीश्वरांनी 10 जानेवारी 1999 रोजी ह्या जगाचा निरोप घेतला. करुणावतार अशा प. पू. दत्तमहाराजांच्या अस्थींचे विसर्जन ज्या कृष्णेच्या काठावर त्यांचा जन्म झाला त्या कृष्णामाईच्या पवित्र जलात झाले.
संतांच्या लौकिक जीवनाचा आलेख रेखाटता रेखाटता त्यांच्या अंतर्यामीही थोडेसे उतरण्याचा प्रयत्न करायला हवा. चिमणीच्या किलकिल्या डोळ्यांनी अनंत अवकाशात भरारी घेणाऱ्या गरुडाची झेप थोडीशी न्याहाळायला हवी. पण कशी ? संतांच्या अलौकिक विचारसरणीचा मागोवा त्यांच्या शब्दांतून घेता येतो. त्यांच्या अंतरंगात वसणाऱ्या असीम शांतीचे थोडेफार तरंग अनुभवता येतात.
षड्दर्शनांचा मन:पूर्वक अभ्यास करणाऱ्या प. पू. दत्तमहाराजांना भागवत पुराण अत्यंत प्रिय होते. त्यातल्या कथा, सिद्धांत सांगताना त्यांचा आवाज भक्तीरसात चिंब भिजलेला असायचा. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांनी भागवत सप्ताह केले. भागवत सांगून शुकाचार्य महाराजांनी परीक्षित राजाला मृत्यूच्या भयापासून मुक्त केले. आणि तेच भागवत कथन करून प. पू. दत्तमहाराजांनी अनेक आर्त जीवांच्या दुःखावर फुंकर घातली. भागवत पुराणाच्या केंद्रस्थानी भक्तीविचार आहे. प. पू. महाराज ज्ञानी पंडित होते, तरी त्यांचा ओढा भक्तीकडे होता. प्रल्हादजी अकामभक्त म्हणून त्यांना परमप्रिय होते. प्रल्हादजींनी ईश्वराकडे काहीच मागितले नाही. मन निर्वासन व्हावे, कुठलीच कामना मनात राहू नये अशी प्रल्हादजींनी इच्छा होती, हा त्यांचा विशेष प. पू. महाराज...
आवर्जून सांगत असत. पद्मपादाचार्यांच्या कथेचाही ते अनेकदा उल्लेख करत. श्रेष्ठ भक्त आपल्या इष्ट दैवताचे ध्यान करता करता त्याच्याशी कसा एकरूप होऊन जातो हे सांगायला त्यांना आवडे. पद्मपादाचार्य हे आद्य शंकराचार्यांचे परमभक्त ! ते नृसिंहाची उपासना करीत असत. त्याचे ध्यान करताना ते एकदा इतके तद्रूप झाले की जगद्गुरु शंकराचार्यांना मारायला आलेल्या कापालिकावर ते नृसिंह रूपाने धावून गेले आणि त्याचा त्यांनी नि:पात केला. ही कथा प. पू. महाराजांना फार आवडत असे. कर्मज्ञानभक्तीयोग ह्या चारही ईश्वराप्रत जाण्याच्या मार्गांत भक्तीमार्गाचे श्रेष्ठत्व त्यांनी परत परत सांगितले. कारण प्रारब्ध भोगूनच संपवायचे असते, अज्ञान हे ज्ञान झाल्यावर नाहीसे होते पण मन निर्वासन होत नाही तोवर, पुनरपि जननं पुनरपि मरणं || पुनरपि जननी जठरे शयनम् ||' हे चक्र चालूच राहते. भक्तीने मन निर्वासन होते हे भक्तीचे महत्त्व आहे.
नित्य ईश्वराची आठवण मनात रहायला हवी हे त्यांचे सततचे सांगणे होते. महाभारतातील "कुंती"विषयी ते आत्मीयतेने विचार मांडत. भारतीय युद्धात पांडवांना विजय मिळाला. श्रीकृष्ण हस्तिनापुराहून परत जायला निघाले तेव्हा कुंतीने त्यांच्याकडे मागणे मागितले की, "सुखात तुझी आठवण आम्हाला राहील का ? ती राहावी म्हणून तू आम्हाला सदैव दुःखात ठेव." ईश्वरावरील प्रेमाचा, भक्तीचा उत्कट स्पर्श कुंतीच्या शब्दांना आहे. दुःखात बुडून गेलेल्या भक्तांनी दुःख बाजूला सारून ईश्वराचे स्मरण केले आहे, असे तुकारामांच्या ज्या एका अभंगात वर्णन आलेले दिसते, तो अभंग महाराजांना फार प्रिय होता. तो असा -
पहा ते पांडव अखंड वनवासी || परि त्या देवासी आठविती ||
प्रल्हादासी पिता करितो जाचणी || परि तो स्मरे मनी नारायण ||
सुदामा ब्राह्मण दारिद्र्ये पिडला || नाही विसरला पांडुरंगा ||
तुका म्हणे तुझा न पडावा विसर || दुःखाचे डोंगर आले तरी ||
कृष्ण भक्तीमध्ये अंतर्बाह्य रंगून गेलेले पितामह भीष्म आणि विदुर ही सुद्धा प. पू. महाराजांना अंत:करणापासून प्रिय असलेली माणसे ! कृष्ण शिष्टाईच्या वेळेस विदुरजींच्याकडे जाऊन राहिला तेव्हा विदुरजी आणि त्यांच्या पत्नीला विलक्षण आनंद होऊन, आपल्या ह्या प्रिय दैवतासाठी काय करू आणि काय नको असे त्यांना झाले. अतिशय प्रेमाने विदुरजींची पत्नी श्रीकृष्णाला फळे सोलून देऊ लागली, पण त्याच्या श्रीमुखाकडे बघताना ती इतकी तन्मय झाली की, फळे स्वतः खाऊन फळाची साल कृष्णाला भरवू लागली. भक्तीभावनेची उत्कटता दाखविणारी...