« Previous | Table of Contents | Next »
पान १०१

आणि तो हिरण्याक्ष खाली पडला. मरण आलेलं आहे. मृत्यू त्याला आलेला असताना सगळे ब्रह्मादिक देव आणखी त्याचीच स्तुती करायला लागले. काय म्हणाले याचं भाग्य आहे. भगवंताचं दर्शन शेवटी झालं, त्यांच्या हातून मृत्यू आला. आणि या भगवंताचं स्वरूप पाहता पाहता याचे प्राण गेले. केवढा भाग्यवान आहे. उत्तम गतीला हा गेलेला आहे. सर्वांनीही भगवान वराहांची प्रार्थना केली. पृथ्वीही तो घेऊन जाणार होता ना? रसातलातून आणलेली पृथ्वी त्याला पाहिजे होती. तेव्हा ती पृथ्वी मनुराजाकरता आहे. धार्मिक राजाने राज्य केलं पाहिजे, त्याकरता ब्रह्मदेवाने ती निर्माण केलेली आहे. तुमच्या-तुमच्या रसातलात तुम्ही रहा. इकडे येऊ नका. असा दैत्य तो हिरण्याक्ष. या हिरण्याक्षाचा भगवान वराहांनी, श्रीहरींनी याप्रमाणे नाश केलेला आहे. असं हे दिव्य चरित्र, मैत्रेय ऋषींनी विदुरजींना सांगितलेलं आहे. शुकाचार्य महाराजांनी हे परिक्षीत राजाला सांगितलेलं आहे. याचं जर श्रवण केलं श्रद्धेने, तर सर्वही पातकांचा नाश होतो आहे. असा हा कथा भाग इथे समाप्त होतो.

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा । बुद्ध्यात्मना वा अनुसृतस्वभावात् ।।
करोति यद्यत् सकलं परस्मै । नारायणायेति समर्पयेत् तत् ।।
11.2.36 ।। भा.
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव ।।
प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णो भगवन् नमस्ते ।।

।। गोपालकृष्ण भगवान की जय ।।
।। श्रीमद्भागवत पहिला दिवस समाप्त ।।
Peacock Feather
***
पान १०२

।। श्रीमद्भागवत दुसरा दिवस ।।

Decorative Image

ॐ नमस्तेस्तु गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने ।
यस्यागस्त्यायते नामविघ्नसागरशोषणे ।।
यस्यस्मरणमात्रेण जन्मसंसारबंधनात् ।
विमुच्यते नमस्तेस्तु विष्णवे प्रभविष्णवे ।।
विशुद्धज्ञानदेहाय त्रिवेदीदिव्यचक्षुषे ।
श्रेयःप्राप्तिनिमित्ताय नमः सोमार्धधारिणे ।।
यो देवः सवितास्माकं धियोधर्मादिगोचरः ।
प्रेरयेत्तस्य तद्भर्गस्तवरेण्यम् उपास्महे ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोस्तुते ।।
नमो आदिरूपा ॐकार स्वरूपा । विश्वाचिया रूपा पांडुरंगा ।।

***
पान १०३

तुझिया सत्तेने तुझे गुण गाऊ । तेणे सुखी राहू सर्व काळ ।।
तूची श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन । सर्व होणे जाणे तुझे हाती ।।
तुका म्हणे जेथे नाही मी-तू-पण । स्तवावे ते कवणे कवणालागी ।।

यत् कीर्तनं यत्स्मरणं यदीक्षणं यत् वंदनं यत् श्रवणं यदर्हणम् ।
लोकस्य सद्यो विधुनोति कल्मषम् तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः ।।
विवेकिनो यद्-चरलोपसादनात् संगं व्युदस्योभयतोऽन्तरात्मनः ।
विन्दंति हि ब्रह्मगतिं गतक्लमाः तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः ।।
तपस्विनो दानपरा यशस्विनो मनस्विनो मंत्रविदस्सुमंगलाः ।
क्षेमं न विन्दंति विना यदर्पणम् तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः ।।
माला पात्रे च डमरू शूले शंख सुदर्शने ।
दधानम् भक्तवरदम् दत्तात्रेयम् नमाम्यहम् ।।
योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् । संजीवयत्यखिलशक्तिधरः स्वधाम्ना ।
अन्यांश्चहस्तचरणश्रवणत्वगादीन् । प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् ।।
मूकं करोति वाचालं पंगुम् लंघयते गिरीम् ।
यत् कृपा तमहं वंदे परमानंदमाधवम् ।।
आपदामपहर्तारम् दातारम् सर्वसंपदाम् ।
लोकाभिरामम् श्रीरामम् भूयो भूयो नमाम्यहम् ।।
यत्र यत्र रघुनाथकीर्तनं । तत्र तत्र कृत मस्तकांजलिम् ।
बाष्पवारिपरिपूर्णलोचनं । मारुति नमत राक्षसांतकम् ।।
पुस्तकाजवटेहस्ते वरदाभयचिन्ह चारुबाहुुलते ।
कर्पुरामलदेहे वागीश्वरी चोदयशु मम वाचम् ।।

***
पान १०४
श्रीगणेशाय नमः ।
श्रीगुरुचरणारविंदाभ्याम् नमः ।
महीं प्रतिष्ठां अध्यस्य सौते स्वायंभुवो मनुः ।
कान्यन्वतिष्ठद् द्वाराणि मार्गाय अवरजन्मनाम् ।।
3.20.1 ।। श्री.भा.

शुकाचार्य महाराज परिक्षीत राजाला सांगताहेत. विदुरजी व मैत्रेय ऋषींचा संवाद चालू आहे. हिरण्याक्ष वध वराहाने केला. पुढे काय झालं? मनू राजाने राज्य कसं केलं? त्याची मुलं मुली वगैरे त्यांच्यापासून काय काय संतती झाली हे विदुरजींनी विचारलेलं आहे. ब्रह्मदेवांचे जे मानसपुत्र सर्व ऋषिमंडळी, त्यांचा गृहस्थाश्रम कसा झाला? प्रवृत्ती मार्गाकडे कोण गेले, निवृत्ती मार्गाकडे कोण गेले? हे सर्वही सांगा म्हणून विदुरजींनी प्रार्थना केली. ब्रह्मदेवांनी जी सृष्टी केलेली आहे, त्या सृष्टीचं वर्णन थोडक्यात मैत्रेयांनी केलं, सर्वही देवांना निर्माण केलं, गंधर्व आहेत. देवयोनी दहा प्रकारच्या सांगितल्या आहेत. देव, गंधर्व, विद्याधर, किन्नर, भूत-पिशाच्च हे सुद्धा देवयोनीमध्येच सांगितलेलं आहे. तेही ब्रह्मदेवांनी निर्माण केले. नंतर हा मनुराजा आणि त्याची स्त्री, आपल्या शरीराचे दोन भाग करून त्या दोघांना त्यांनी गृहस्थाश्रम हा उत्तम प्रकाराने करा, राज्यकारभार करा, धर्मप्रसार करा अशी आज्ञा केली. सर्व ऋषिमंडळीही त्यांनी निर्माण केली. त्या ऋषिमंडळींचंही कार्य चालू आहे. विद्याभ्यास, ज्ञानसंपादन, यज्ञयाग वगैरे करणं, स्वायंभुव मनूचा वंश सांगा म्हणून विदुरजींनी विनंती केल्यावर ते सांगायला आरंभ केलेला आहे. प्रसंगाने मनूची कन्या देवहूती कर्दम ऋषींना दिलेली आहे. तो कथा भाग सांगताहेत.

प्रजाः सृजेति भगवान् कर्दमो ब्रह्मणोदितः ।
सरस्वत्यां तपस्तेपे सहस्राणां समा दश ।।
3.21.6 ।। श्री.भा.

प्रपंच सुद्धा फार कठीण आहे. योग्यरितीने संसार होणं हे देखिल कठीण आहे. ब्रह्मदेवाने आपल्या मुलाला, कर्दम ऋषींना आज्ञा केली तू विवाह करून घे. गृहस्थाश्रमी हो, संसार कर आणि उत्तम प्रकारची संतती निर्माण कर. चांगली मुलं झाली पाहिजेत. कर्दम ऋषींना पित्याची आज्ञा मान्य झाली. त्यांना ईश्वराची भक्ती करावी, समाधीचा अभ्यास करावा, अशी इच्छा होती. संसार करू नये असं वाटत होतं. पण पित्याने आज्ञा केल्यावर ठरवले. आयुष्य पुष्कळ होतं त्या वेळेला. काही दिवस आपण गृहस्थाश्रम करू नंतर जाऊ वनामध्ये. विवाह करायचाय. पण योग्य स्त्री मिळाली पाहिजे. ही इच्छा मनामध्ये धरून कर्दम ऋषींनी तपश्चर्येला आरंभ केलेला आहे. मोठे तपस्वी ऋषि. ध्यान करताहेत भगवंताचं. मंत्र जप चालू आहे. दहा हजार वर्षापर्यंत

***
पान १०५

तपश्चर्या केली, चांगली गृहिणी मिळाली पाहिजे. त्याशिवाय गृहस्थाश्रम हा योग्य ठरणार नाही. ब्रह्मदेवांची आज्ञा आहे. अखंड भगवंताचं ध्यान आहे, जप आहे, पूजा चालू आहे. एक दोन दिवस नाही तर दहा हजार वर्षापर्यंत चालू आहे. कृतयुगाचा काल, आयुष्य भरपूर आहे. हे ऋषि म्हणजे, यांच्या तपाने आयुष्य वाढतं आहे. भगवान विष्णू परमात्मा प्रसन्न झाले. गरुडावर बसून आकाश मंडलामध्ये आलेले आहेत. कर्दम ऋषींनी त्यांचं दर्शन घेतलं. कौस्तुभ मणी आहे कंठामध्ये. किरीट, कुंडलं धारण केलेली आहेत. शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेलं आहे. गरुडावर बसून आलेले आहेत. साष्टांग नमस्कार घातला कर्दम ऋषींनी. आपली इच्छा पूर्ण झालेली आहे. भगवंताचं दर्शन व्हावं आणि त्यांनी मार्गदर्शन करावं. संसार कसा करायचा हे देवांनी सांगितलं पाहिजे. त्याकरता इतकी तपश्चर्या केली. कर्दम ऋषींनी सांगितलं देवा आज माझ्या नेत्राचं साफल्य झालेलं आहे. मला डोळे तुम्ही जे दिलेत त्या डोळ्यांनी आपलं रूप मला दिसलं म्हणजे डोळे मिळाल्याचं फळं मला मिळालं. आपल्या माया-मोहामध्ये सापडलेले जे जीव आहेत त्यांना काही आपली उपासना घडत नाही म्हणाले. भक्ती करणारेही पुष्कळ लोक आहेत. परंतु देवाची भक्ती, आपली इच्छा पूर्ण करावी, देवाने कृपा करावी या करता करतात. त्यांच्या इच्छा आपल्या कृपेने पूर्ण होतात. आपण त्यांना काही नाही म्हणत नाही. पण ते मोहामध्ये सापडलेले आहेत. आपल्या जवळ येऊ शकत नाहीत, राहू शकत नाहीत ना. त्या मायामोहातच गुंतून राहतात.

तथा स चाहं परिवोढुकामः ।।
3.21.15 ।। श्री.भा.

त्यापैकीच मी आहे. सकाम भक्त आहे आपला. मला गृहस्थाश्रम करण्याची पित्याची आज्ञा झालेली आहे. योग्य पत्नी मिळावी या इच्छेने मी आपले ध्यान केलं. आपली तपश्चर्या केलेली आहे. सर्वावर अनुग्रह करणारे आपण आहात. सर्व सृष्टीचे कार्य हे आपल्या इच्छेने चाललेलं आहे. ईश्वर इच्छेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. असा या संतांचा, महात्म्यांचा दृढ विश्वास आहे. अहंकार नाहीये. तेव्हा आपण माझ्यावर कृपा करावी. अशी प्रार्थना केल्यानंतर, भगवान सांगतात

विदित्वा तव चैत्यं मे पुरैव समयोजि तत् ।।
3.21.23 ।। श्री.भा.

ऋषिमहाराज तुमची इच्छा मला समजलेली आहे. सगळी योजना केलेली आहे. तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. माझी सेवा ज्यांनी केली मग ती सकाम असो वा निष्काम. ती सेवा केव्हाही फुकट जाणार नाही. सम्राट राजा मनू या ब्रह्मावर्तमध्ये राहून राज्य करतो आहे. सप्तद्वीपयुक्त पृथ्वीचं राज्य करतो आहे. तो आपल्या स्त्रीला आणि आपल्या मुलीला घेऊन तुम्हाला भेटण्याकरता

***
पान १०६

आपल्या आश्रमामध्ये येणार आहे. आपली कन्या तुम्हाला समर्पण करेल. सम्राट राजाची ही कन्या ह्या कर्दम ऋषींना द्यावी म्हणून मध्यस्थ कोणीतरी पाहिजे. योग्य मध्यस्थाने सगळं कार्य होतं. इथे प्रत्यक्ष भगवानच मध्यस्थ आहेत. त्याला जाऊन सांगितलं तुझी मुलगी त्या ऋषींना तू दे. आणि तो राजा त्यांच्याकडे येणार हे सांगायलासुद्धा भगवान आले. तो राजा येणार आहे, त्या विवाहाला तुम्ही मान्यता द्या आणि विवाह करा. तुम्हाला योग्य मुलगी आहे. असं स्वतः भगवान सांगताहेत. तुमचा विवाह झाल्यावर आरंभाला तुम्हाला मुली होतील. नंतर मी स्वतः तुमचा मुलगा होईन म्हणाले मलाही सर्वांना मार्गदर्शन करायचं आहे. त्याकरता मी येणार आहे. असं ऋषींना सांगून निघाले भगवान तिथून. बिंदू सरोवर म्हणून आहे. मातृगया ज्याला म्हणतात, सिद्धपूर सध्या अहमदाबाद जवळ आहे. सिद्धगण ज्यांची स्तुती करताहेत असे भगवान गरुडावर बसून निघालेले आहेत, वर प्रदान करून. कर्दम ऋषींची केवढी तपश्चर्या आहे. विवाहाची इच्छा नाहीये पण पित्याची आज्ञा मान्य करायची आणि देवांनी जी स्त्री दिलेली आहे तिच्याबरोबरच विवाह झाला पाहिजे. त्यांच्या आज्ञेप्रमाणे सर्व चालायचं आहे. त्या कर्दम ऋषींची दृढ निष्ठा पाहून, त्यांचं प्रेम पाहून श्रीहरींच्या डोळ्यामध्ये प्रेमाश्रू उत्पन्न झाले आणि ते अश्रूबिंदू त्या सरोवरामध्ये पडले म्हणून बिंदूसरोवर हे नाव पडलेलं आहे. मनुराजाला आज्ञा झाल्याप्रमाणे तो आपल्या स्त्रीला आणि कन्येला देवहूतीला घेऊन रथामध्ये बसून त्या ऋषींच्या आश्रमामध्ये आलेला आहे. अत्यंत शांत आश्रम आहे. ऋषींची तपश्चर्या तिथे चाललेली आहे. हरणं फिरताहेत. सिंह, वाघही फिरताहेत. काही कोणी कोणाला त्रास देत नाही. सर्वांची मनोवृत्ती चांगली आहे. राजाला सुद्धा असं शक्य नाहीये. सर्व मानवांना निर्वैर करणं हे राजाला सुद्धा शक्य नाही. तिथे पशू सुद्धा निर्वैर झालेले आहेत. हे एका ऋषींच्या तपश्चर्येमुळे आहे. आश्रमामध्ये मनुराजे आलेले आहेत. ऋषि महाराजांचा अग्नीमध्ये होम नुकताच संपलेला आहे. सकाळची वेळ आहे आणि ते तिथे बसलेले आहेत. तेजस्वी शरीर आहे तपाचं तेज आहे. प्रेमळ दृष्टी आहे. अजानबाहू आहे. कमलाप्रमाणे नेत्र आहेत. जटा आहेत. वल्कल पांघरलेले, नेसलेलं आहे. राजेशाहेब आलेले आहेत पाहिल्याबरोबर कर्दम ऋषि उठून उभे राहिले. त्यांचे स्वागत करून त्यांना आसनावर बसवलेलं आहे. पूजा त्यांची केली ऋषींनी. आपण ऋषि आहोत, राजा आपणहून न बोलवता आला, पण ऋषींना काही अहंकार नाही. कारण राजाही परमेश्वराचं रूप आहे ना. अशी दृष्टी आहे. भगवंतांनी काय सांगून ठेवलं होतं त्यांची आठवण झाली. पण ते काही अगोदर बोलले नाहीत. राजाची स्तुती ते करताहेत.

***
पान १०७
नूनं चंक्रमणं देव सतां संरक्षणाय ते ।
वधाय चासतां यस्त्वं हरेः शक्तिर्हि पालिनी ।।
3.21.50 ।। श्री.भा.

आपण जे देशात संचार करता त्याचा हेतू म्हणजे सज्जन जे असतील त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे आणि दुष्ट जे असतील त्यांना नुसतं शासन नाही वधाय् म्हणतात. त्यांचा नाश करायचा. हे आपलं कार्य आहे. श्रीहरींची संरक्षण शक्ती जी आहे ती आपण आहात. सूर्य, चंद्र, अग्नि, वायू, यमधर्म, वरुण सर्वांची शक्ति आपल्या ठिकाणी आहे. हे सर्व देवरूपी आपण आहात. राजा एकटा राज्य करत होता. हुकूमशाही होती. आता लोकशाही चांगली असा बुद्धिवाद करतात लोक. पण राजा एकटा नाहीये. चारित्र्यसंपन्न, ज्ञानसंपन्न, राजनीतीचे संपूर्ण शिक्षण घेतलेलं, या सर्व देवतांचं रूप असलेलं, सर्व देवता याला मार्गदर्शक आहेत, असे आपण आहात. मी आपल्याला नमस्कार करतो. असे कर्दम ऋषींनी सांगितले. विचारलं महाराज, कोणत्या कामाकरता आपण आलेले आहात. आपण सम्राट राजे आमच्या सारख्यांच्या आश्रमात कशाकरता आलेला आहात. काय आपली इच्छा असेल ती सांगा. असं अगदी नम्रपणाने, विनयाने ऋषींचं भाषण झालेलं आहे ते ऐकून राजालासुद्धा लज्जा उत्पन्न झाली, काय बोलावे या ऋषींसमोर, एवढा महात्मा, की ज्याच्यावर भगवान श्रीहरीचं प्रेम इतकं आहे की त्यांनी मला आज्ञा केली की तुझी मुलगी याला दे. केवढा या ऋषीचा अधिकार आहे. काय बोलू यांच्याबरोबर. वधूपित्याला आपली इच्छा पूर्ण होईपर्यंत काय होईल कोणास ठाऊक. मुलीला पसंत करतील की नाही, सगळीच काळजी असते ना. मनुराजाने अगोदर ऋषीमहाराजांची स्तुती केली. सृष्टीकर्ता ब्रह्मदेवाने आपल्या मुखापासून आपल्याला म्हणजे तपस्वी ब्राह्मणांना उत्पन्न केलेलं आहे. त्यांनी तपश्चर्या करावी. ज्ञान संपादन करावं, योगाभ्यास करावा आणि मनामध्ये कोणतीही आसक्ती ठेवू नये. अलिप्त राहिलं पाहिजे. निर्लोभ राहिलं पाहिजे. प्रथम ब्राह्मणांना निर्माण केलं आणि तुमच्या संरक्षणाकरता आम्हा क्षत्रियांना निर्माण केलं.

हे विचार ऐकण्यासारखे आहेत. समाजशुद्धी, समाजाचं कार्य करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. ब्राह्मणांना सृष्टीकर्त्यांनी निर्माण केलं. पण ब्राह्मणांची कर्तव्य वेगळी आहेत. त्याचं संरक्षण करण्याकरता क्षत्रियांना निर्माण केलं.

हृदयं तस्य हि ब्रह्म क्षत्रमंगं प्रचक्षते ।।
3.22.3 ।। श्री.भा.

सम्राट राजा मनू, प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ तो सांगतो आहे, आपण ब्राह्मण म्हणजे त्या

***
पान १०८

सृष्टीकर्त्या परमात्म्याचे हृदय आहात आणि बाकीचं शरीर म्हणजे आम्ही क्षत्रिय आहोत. म्हणून दोघांनीही एकमेकांचं संरक्षण करावं, अशी इच्छा आहे देवांची' तुमची ज्ञानशक्ति, तपशक्ति आम्हाला मिळावी, उपयोगी पडावी आणि आम्ही तुमचं रक्षण करावं. आपलं दर्शन झालं ऋषीमहाराज, समाधान झालं, धर्म रक्षण करणाऱ्या भगवान श्रीहरींनी मला आज्ञा केलेली आहे. आपल्या रूपांनी आज मला भगवंतांचं दर्शन घडलेलं आहे. मी आपल्याला काही विनंती करण्याकरता आपल्या आश्रमात आलेलो आहे. आपण ती ऐकून घ्यावी.

प्रियव्रतोत्तानपदोः स्वसेयं दुहिता मम ।
अन्विच्छति पतिं युक्तं वयः शीलगुणादिभिः ।।
3.22.9 ।। श्री.भा.

मला दोन मुलं आहेत. प्रियव्रत आणि उत्तानपाद. त्यांची बहिण, दुहिता माझी मुलगी ही देवहूती आहे. ""कन्यम् भ्रातृमति'' ज्योतिषशास्त्रामध्ये, धर्मशास्त्रामध्ये बंधु असलेली कन्या असावी असं सांगताहेत. काय त्यांचा उद्देश असेल कोणास ठाऊक. म्हणजे मुलीला माता-पित्याचं छत्र तसं बंधूंचं प्रेम असलं पाहिजे. आता कायद्यानुसार मुलाप्रमाणे मुलीलापण वाटणी पित्याने दिली पाहिजे म्हणजे भगिनीबद्दल प्रेम कसं राहिल. वाटणी आपली ही मुलगी घेऊन जाणार हे विचार मनात असताना, प्रेम राहणार कसं. ही माझी मुलगी आता विवाहाला योग्य झालेली आहे. आपल्याला योग्य पती मिळावा अशी हिची इच्छा आहे. नारद महर्षि एके दिवशी आमच्या राजवाड्यात आले आणि त्यांनी आपलं वर्णन केलं. मुलीने हे सर्व ऐकलं. आपल शील श्रेष्ठ आहे, आपलं ज्ञान आहे, आपलं रूप आहे, आपले गुण आहे, सगळे नारदांनी वर्णन करून सांगितले. नारद ब्रह्मचारी आहेत. मोठे भगवत् भक्त आहेत. पण अशी कामं करतात ते. योग्य असताना नको कोणी म्हणणारच नाही. श्रीकृष्णांचा आणि रुक्मिणीचा विवाह त्यांनीच जमवून दिला. तेव्हा नारदांच्या मुखातून आपलं तप, आपले गुण हिने ऐकल्याबरोबर आपल्या बरोबरच विवाह व्हावा असं हिने मला सांगितलं. आम्ही दोघांनी अत्यंत प्रेमाने, श्रद्धेने ही कन्या अर्पण करण्याकरता घेऊन आलेलो आहोत. हे सर्व सांगितले मनुराजाने. पुन्हा आणखी तो म्हणतो आहे. एखाद्या मनुष्याला आपल्यासारखे तपस्वी पुरुष की ज्यांना काहीही इच्छा नाही. काही नको आहे. सर्व संग परित्याग करून राहिलेले आहेत. पण आमच्यासारखे जर कोणी संसारी त्याच्याकडे गेले, महाराज आमची एवढी सेवा करायची इच्छा आहे, एवढं आपल्याला घ्या, एवढं देतो म्हणाले, तर त्याने नको म्हणू नये. आपणहून जर याचना न करताना कोणी जर द्यायला आला आणि ते नाही म्हटलं तर त्याचाच आणखी दोष आहे. त्याचं यश जातं आहे. मी असं ऐकलं की आपल्याला

***
पान १०९

विवाह करायची इच्छा आहे. हे माझ्या कानावर पडलं म्हणून मी माझ्या कन्येला घेऊन आलो. तुम्हाला विवाहाची इच्छा आहे, कन्येला सुद्धा नारदांनी आपले गुण वर्णन केल्यामुळे आपल्याबरोबर विवाह करावा अशी इच्छा आहे. आम्ही तिचे आई-बाप अत्यंत श्रद्धेने आदराने आपल्याला ती कन्या अर्पण करावी म्हणून आलेलो आहोत. तेव्हा तुम्ही हिचा स्वीकार करा.

तो मोठा राजनीतिज्ञ राजा त्यांनी सबंध अशाप्रकारे भाषण केलं. कर्दम ऋषि बोलू लागले हो म्हणाले.

बाढं उद्वोढुकामोऽहं अप्रत्ता च तवात्मजा ।।
3.22.15 ।। श्री.भा.

राजेशाहेब, मला विवाह करायची इच्छा आहे हे खरं आहे म्हणाले. आपली कन्याही चांगली आहे, श्रेष्ठ आहे, गंधर्व सुद्धा तिला पाहून मोहित होतात. तिची इच्छा आहे. आपणही आदराने आलेले आहात. कोण नाही म्हणेल. परंतु माझाही काही उद्देश, माझंही काही ध्येय आहे ते तुम्हाला सांगून ठेवतो. यावर तुम्ही आणि तुमच्या कन्येने विचार करावा. पसंत असेल तर करा विवाह.

अतो भजिष्ये समयेन साध्वी
यावत्तेजो बिभृयात् आत्मनो मे ।
अतो धर्मान् पारमहंस्यमुख्यान्
शुक्लप्रोक्तान् बहु मन्येऽविहिस्रान् ।।
3.22.19 ।। श्री.भा.

राजेशाहेब मी काही जन्मभर संसार करणार नाही हे अगोदरच सांगताहेत. संसार केव्हा सोडणार हेही अगोदरच सांगताहेत. हिला मुलमुली झाल्यानंतर मी लगेच संसार सोडून देणार आहे. परमहंस जे आहेत, सर्व संग परित्याग करून भगवान श्रीहरीचं चिंतन निश्चित मनाने करणारे महात्मे त्यांच्या मार्गाने मला जायचं आहे. आत्ताच मला जायचं होतं पण पिताजींची आज्ञा झाल्यामुळे थांबलो मी. संपूर्ण विश्वाचं संरक्षण करणारा, उत्पन्न करणारा, संहार करणारा जो परमात्मा आहे त्याचीच सेवा मला करायची आहे. दुसरी मला इच्छा नाहीये. आपलं अंत:करण किती दृढ आहे हे त्यांनी सांगितलं. दुसरं मला मान्य नाहीये. संसार केला तरी मी तो अशा बुद्धीने करणार आहे.

मैत्रेय सांगतात विदुरजी, मनुराजाला सगळं माहिती होतंच. करणार आहेत संसार. नंतर मुलं बाळं झाल्यावर संन्यास घेणार आहेत, घेईनात का पुढचं कोणी पाहिलयं. ऋषींची अनुज्ञा मिळाली

***
पान ११०

एवढं समजलं आहे, विवाहाला. सम्राट राजाची मुलगी तिचा विवाह त्या अरण्यामध्ये आश्रमात झालेला आहे. राजवाड्यात बोलवून सगळे इकडचे पाहुणे लोक तिकडचे पाहुणे लोक, आणखी काही लोक हे नाही, शास्त्र एवढंच आहे. यथाविधी कार्य करायचं. कन्यादान आहे ते. अर्पण केली कन्या. देवहूतीची माता शतरूपा पुष्कळ तिने वस्त्रं काय, अलंकार काय कितीतरी आपल्या मुलीला, जावयाला दिलेलं आहे. कार्य झाल्यानंतर मनुराजा आपल्या स्त्रीला बरोबर घेऊन राजधानीकडे जाण्याकरता निघालेला आहे. कन्येचा विरह होणार आता. मुलीला या अरण्यामध्ये ऋषीच्या आश्रमामध्ये ठेवून जावं लागणार आपल्याला. डोळ्यातून अश्रुधारा चाललेल्या आहेत. दोघाही राजा्राणीच्या डोळ्यातून प्रेमाश्रू उभे राहिले. चांगली सेवा तू आपल्या पतीची कर आणि आपलं कल्याण करून घे असं त्या मुलीला त्यांनी सांगितलं. ऋषीमहाराजांनाही सांगितलं, महाराज, ही कन्या आपल्याला दिलेली आहे. संरक्षण करा आपण. आता ती आपली आहे, आमचा संबंध संपलेला आहे. त्यांचीही अनुज्ञा घेऊन राजे निघालेले आहेत. जाता-जाता नदीतीरावर अनेक ऋषिमंडळींचे आश्रम होते त्या प्रत्येक आश्रमामध्ये जाऊन त्यांची पूजाअर्चा त्यांची विचारपूस राजाने केली. सर्व प्रजाजनांनाही राजाबद्दल अत्यंत आदरभाव वाटतो आहे. सगळे सामोरे गेलेले आहेत, राजधानीमध्ये राजेशाहेब आल्यानंतर बर्हिष्मती नावाची राजधानी त्यांची होती. अनेक यज्ञ त्या नगरीमध्ये मनुराजाने केलेले आहेत. सम्राट राजाला काय कमी आहे. सम्राट राजाचा जो आनंद आहे तो पहिला आनंद आहे सांगतात, उपनिषदांमध्ये त्यापेक्षा पुढचे आनंद मोठे मोठे आहेत. देवांचा, गंधर्वांचा सर्व समृद्धी आहे. संपूर्ण पृथ्वीचा राजा आहे तो. त्यामुळे संसारामध्ये काहीही कमी नाही. पण मनावर त्याचा परिणाम नाही. हे माझं आहे, अशी बुद्धीच नाहीये. ईश्वरांनी दिलेलं हे वैभव ईश्वराचं आहे. अशी वृत्ती असल्यानंतर आसक्ती कशाला निर्माण होईल. माझं आहे हे वाढलं पाहिजे, टिकलं पाहिजे वगैरे विचार हे माझं आहे अशी समजूत असल्यानंतर होणार आहेत ना. अनेक यज्ञ याग केलेले आहेत. संसारसुखाचा भोग पुष्कळ घेतलेला आहे. अनासक्त जीवन आहे तो मनूचा काल

युगानां एकसप्ततिम् ।।
3.22.36 ।। श्री.भा.

मैत्रेय ऋषि सांगतात. एकाहत्तर युग एवढं मनू राजाचं राज्य झालेलं आहे. म्हणजे किती काल त्याला आयुष्य मिळालेलं आहे, राज्य मिळालेलं आहे. भगवान वासुदेवाची भक्ती अखंड चाललेली आहे. कथाश्रवण चाललेलं आहे. काही काळ ठराविक रोजचा त्याकरता ठेवलेला आहे. संचार देशामध्ये असला तरी हे सगळं चालू आहे. भगवंताच्या कथा श्रवण करणं, पूजाअर्चा करणं.

« Previous | Table of Contents | Next »