ऋषीमंडळींनी त्यांच्याकडे येऊन त्यांना विचारलं, ""राजेसाहेब, सर्वांचे धर्म आम्हाला समजावून सांगा.'' मनुराजा मोठे धर्मज्ञ होते. ऋषींच्या प्रार्थनेप्रमाणे मनुराजाने सर्वांचे धर्म समजावून सांगितले. चार वर्ण, चार आश्रम, राजधर्म सांगितले, राजदूताचे धर्म सांगितले. राजदूत कसा असला पाहिजे, परप्रांतामध्ये, परदेशामध्ये राहणाऱ्या राजदूताचे एकंदर गुण कोणते आहेत हे सगळं त्यांनी समजावून सांगितलं. आता कर्दम ऋषी आणि देवहूति यांचंच चरित्र सांगताहेत.
पितृभ्यां प्रस्थिते साध्वी पतिमिङ्गितकोविदा ।
नित्यं पर्यचरत्प्रीत्या भवानीव भवं प्रभुम् ।।
3.23.1 ।। श्री. भा.
माता-पिता हे आपल्या राजधानीला निघून गेले. एकटी देवहूति त्या आश्रमामध्ये, अरण्यामध्ये राहिलेली आहे. सेवा करते आहे पतीची. ""इंगित कोविदा'' म्हणून म्हणतात मैत्रेय ऋषी. इंगित म्हणजे, पतीच्या मनामध्ये काय आलेलं आहे, हे लगेच समजायचं तिला. सांगण्याची वाट पहायची नाहीये. हे ज्ञान आहे, प्रेम इतकं विलक्षण आहे. आदरभाव इतका आहे की ते इंगित समजून येतं. हे सगळं समजून घेऊन सेवा करते आहे. पूर्ण विश्वास पतीच्या तपप्रभावावर आहे. शरीर, वाणी, मन हे अत्यंत पवित्र ठेवण्यामध्ये तिचं लक्ष आहे. इंद्रियांचा निग्रह आहे. मधुर वाणी आहे. काम, क्रोध, मोह, अहंकार, लोभ, दंभ काहीही नाही. आपण केलेलं जे सत्कर्म आहे, ते लोकांच्या पुढं आपल्या तोंडाने सांगणे याला दंभ म्हणतात. हा नाही. केलेलं झालं, कर्तव्य आहे ते होऊन गेलं. सावध आहे, दक्ष आहे कर्तव्य कर्मामध्ये. बराच काल गेलेला आहे. ऋषि महाराज जायचे नदीतीरावर जाऊन समाधी लावून बसायचे. यायचं पाणी आणायचं, सडासंमार्जन करायचं, सगळी व्यवस्था ही करत होती. संतुष्ट झाले कर्दम ऋषी. पुष्कळ काल गेलेला आहे. ही राजकन्या इथे सेवा करते आहे, म्हणजे हिचं शरीर कृश झालं. हाताखाली माहेरी कितीतरी नोकर चाकर असायचे पण इथे कोणीच नाही. ऋषींच्या मनामध्ये दया निर्माण झाली की ही स्त्री खरोखर श्रेष्ठ आहे. चांगली आहे. कर्दम ऋषी बोलू लागले.
तुष्टोऽहमद्य तव मानवि मानदायाः ।
शुश्रूषया परमया परया च भक्त्या ।।
3.23.6 ।। श्री. भा.
""हे मनुकन्ये तुझी जी सेवा चालली आहे, अंत:करणामध्ये तुझ्या जी भक्ती आहे, प्रेम आहे यामुळे माझ्या मनाला खरोखर समाधान झालेलं आहे. कारण असं आहे, सर्वांना आपला देह जितका प्रिय आहे तितकं काहीच प्रिय नाही. शरीरावर जास्ती प्रेम आहे सर्वांचं. पण त्या...
...शरीराकडेही तू लक्ष दिलं नाहीस. शरीरही तुझं कृश झालेलं आहे. शरीराकडेही न पाहता तू सेवा केलीस. स्वधर्माचरण करून, भगवंताचा जो कृपाप्रसाद मला मिळालेला आहे, तो तुलाही मिळेल म्हणालो. तूही त्याला योग्य आहेस. सिद्ध झालेली आहेस तू. तुझ्या धर्माचं पालन तू केलेलं आहेस. मानवांना जे भोग मिळणार नाहीत, स्वर्ग लोकामध्येही जे विषय नाहीयेत ते दिव्य विषय तुला प्राप्त होतील. काय तुझी इच्छा आहे सांग म्हणालो.'' आजपर्यंत काहीच भाषण झाले नाही, काही विचारले नाही. आनंद झाला देवहूतिला, तिने बोलायला आरंभ केला. महाराज,
राद्धं बत द्विजवृषैतदमोघयोग -
मायाधिपे त्वयि विभो तदवैमि भर्तः ।।
3.23.10 ।। श्री. भा.
""आपण योगेश्वर आहात महाराज. आपली शक्ती फार मोठी आहे. आपण काहीही करू शकाल. विवाहाच्या वेळेला आपण बोलून गेलेला आहे, गृहस्थाश्रम करणार आहे. केव्हा करणार आपण? तेवढीच माझी इच्छा आहे. संसार सुख मिळवं.'' आणि त्यात तिने सांगून टाकले,
भवनं सद्यशं विचक्ष्व ।।
3.23.11 ।। श्री. भा.
""राहण्याकरता एक घर पाहिजे म्हणाले. त्याशिवाय कसा संसार करायचा? सर्व सामग्री त्याच्यामध्ये आहे असं स्थान पाहिजे.'' हे समजलं कर्दमांना, मोठे योगी होते. त्यांनी आपल्या संकल्पशक्तीने दिव्य विमान निर्माण केलेलं आहे. त्या अरण्यामध्येच एक मोठं विमान तयार झालं. त्या विमानाचं वर्णन सात आठ श्लोकांमध्ये भागवतात केलेलं आहे.
सर्वकामदुघं दिव्यं...
3.23.13 ।। श्री. भा.
विमानामध्ये बसणारा जो आहे त्याच्या मनामध्ये जी इच्छा उत्पन्न होईल त्याप्रमाणे पदार्थ त्याला मिळतो. भूक लागली की अन्न मिळेल. इच्छा करण्याचा अवकाश सर्व इच्छा सिद्धी होती आहे. सर्व प्रकारची समृद्धी आहे. सगळी साधनं आहेत. किती रत्नांची कपाटं भरलेली आहेत. वस्त्र भरलेली आहे. संसाराची सर्व साधनं, सामग्री याला काहीही कमी नाही. सम्राट राजाने जरी मनामध्ये आणलं तरी त्याला इतकं देता आलं नसतं, आपल्या मुलीला इतकी सामग्री आहे. ही नुसत्या संकल्पाने निर्माण झालेली आहे. आणि त्याच्याबद्दल काही आस्थाही नाही. झाली आहे घ्या, देवहूतिला पाहिजे होती म्हणून केली. रेशमी वस्त्र आहेत, जरीची वस्त्र आहेत. अलंकाराने भरलेली कपाटं आहेत. सगळं आहे. विमान इतके मोठे होते, हंसादिक पक्षी इकडून तिकडे जात आहेत. उद्यानं आहेत आत. हे पाहिलं देवहूतिने. समाधान व्यक्त केलं. हे ऋषी तिचे इंगित...
...जाणणारे होते. सांगायला कशाला पाहिजे. एवढ्या मोठ्या विमानात आपण दोघांनीच राहायचं का? असं तिने विचारले. नोकरचाकर कोणी नकोत का? असे बोलून दाखवले नाही तिने, पण यांना समजलं. त्यांनी सांगितलं देवहूति जा या सरोवरात जाऊन स्नान करून ये. लवकर आपण निघू या विमानातुन. निघालेली आहे. अंगावरती मलीन वस्त्र आहे. सगळे केस कसे तरी बांधलेले आहेत. शरीर सगळं मलीन झालेलं आहे. सरस्वती नदीच्या त्या तीरावरती सरोवराच्या जवळ ती आली. इतक्यात त्या सरोवरातून एक हजार विद्याधर कन्या, अत्यंत तरुण अशा, उत्तम वस्त्र नेसल्या, सबंध शरीराला सुगंध सुटलेला आहे, अलंकार घातल्या त्या सर्व कन्या वर आल्या. ""बाईसाहेब आम्ही आपल्या दासी आहोत. काय सेवा करायची ते सांगा.'' नमस्कार सगळ्यांनी केला. सर्व त्या स्त्रियांनी तिला न्हायला घातलेलं आहे. तेल लावून स्नान घातलं आहे. उत्तम रेशमी वस्त्र तिला दिलेले आहेत, अलंकार दिलेले आहेत. उत्तम प्रकारचं भोजन झालेलं आहे. अमृत पाजलेलं आहे. आरशामध्ये आपलं ते दिव्य रूप पाहिलं त्या देवहूतिने. ती मूळची राजकन्याच होती. अत्यंत तेजस्वी असं रूप पाहून तिलाही समाधान झालेलं आहे. रत्नखचित कमरपट्टा लावलेला आहे. रत्नाचा हार गळ्यामध्ये घातलेला आहे. आपल्या पतीचं स्मरण केल्याबरोबर ती विमानामध्ये येऊन पोहचली. आपले पतिदेव आहेत आणि या सहस्त्र स्त्रिया आहेत. ते विमान किती मोठं असेल, याची कल्पना येईल. एक हजार दासी तिच्या हाताखाली आहेत. अशी देवहूति त्या विमानामध्ये राहिली आहे. प्रत्येक दासीला राहण्याकरता वेगळी खोली. सगळं वेगळं, स्वतंत्र. काय हे विलक्षण सामर्थ्य आहे, आपल्या पतीमहाराजांचं असं तिच्या मनात आले. कर्दम ऋषि निघालेले आहेत. ते विमान चालू झालेलं आहे. एक सहस्त्र विद्याधर दासी तिची सेवा करताहेत. अशा आपल्या पत्नीला बरोबर घेऊन ते ऋषि आकाश मंडळामध्ये निघालेले आहेत. स्वर्गादिक लोकामध्ये ते गेलेले आहेत. वरुण लोक आहे, कुबेराचा लोक आहे. सर्व लोकामध्ये फिरून आले. सर्वही उपवनामध्ये त्यांनी विहार केलेला आहे. तेजस्वी असं ते विमान आहे. विमानामध्ये बसून पुष्कळ देवही हिंडत होते पण त्यांनाही कोणाचं हे विमान आहे, कोण आहे हा महात्मा, इतकं दिव्य विमान कसं आहे, इतकं मोठं हे कसं आहे याचंच त्यांना आश्चर्य वाटले. मैत्रेय महर्षि सांगतात विदुरजी,
किं दुरापादनं तेषां पुंसां उद्दामचेतसाम् ।
यैराश्रितस्तीर्थपदश्चरणो व्यसनात्ययः ।।
3.23.42 ।। श्री. भा.
ज्यांनी भगवान श्रीहरींच्या चरणांचा आश्रय केलेला आहे त्यांना न मिळणारी गोष्ट जगामध्ये...
...नाहीये. दुल्लभ असं त्यांना काही नाहीये. संपूर्ण भूमंडळ विमानामध्ये बसून आपल्या पत्नीला दाखवलेलं आहे, कोणती कोणती स्थानं आहेत, तीर्थयात्राही झाल्या त्याच वेळेला. आश्रमामध्ये हे सर्व झाल्यावर परत आलेले आहेत. पुढं काही दिवसांनी देवहूतिला नऊ कन्या झालेल्या आहेत. सगळी समृद्धी आहे. दु:खाचा अंश सुद्धा नाहीये. संपूर्ण सुख त्या देवहूतिला मिळतं आहे. इतका काल गेला, शंभर वर्ष होऊन गेली. काही याकडे लक्ष नाहीये. त्या सर्व कन्या अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या, अत्यंत सुगंधीत शरीर यांचं आहे.
हे सर्व झाल्यावर कर्दम ऋषींनी बोलायला सुरवात केली. ""झालं'' म्हणाले ""माझं काम झालं. संसार संपलेला आहे. ठरल्याप्रमाणे मला संन्यास घेऊन आता बाहेर जायचे आहे, देवाची भक्ती करायची आहे.'' ज्यांना आपलं आयुष्य निश्चित इतकं आहे हे माहिती आहे त्यांनी देवाची भक्ती पुढं करू असं म्हणायला हरकत नाही. कर्दम हे त्यापैकी नव्हते. त्यांना त्याच वेळेला ईश्वर भक्ती करायची होती. नको, संसार नको होता, पण पिताजींची आज्ञा झाल्यामुळे करावा लागला. आयुष्यही भरपूर आहे. संसारही उत्तम झालेला आहे. तो संपला पाहिजे ना. पुन्हा त्या संसारामध्ये आसक्ती उत्पन्न होऊन जर वासना वृत्ती झाली तर पुन्हा जन्म घ्यायला पाहिजे. ज्ञानी भगवद्भक्तांच्या मनाची स्थिती ही वेगळी आहे. विषयभोग झाल्यानंतर पुरे म्हणतात. पुन्हा इच्छा नाहीये. हे खरं वैराग्य आहे. जेवल्यानंतर तृप्ति व्हायला पाहिजे का नको. पण किती वेळ, दोन तीन तास झाले की लागली पुन्हा भूक. अगदी पुष्कळ पोट भरलेलं आहे, सगळं मनासारखे झालेलं आहे. नको त्यावेळेला म्हणतो. पण पुन्हा भूक लागते. सर्वही विषयांचा भोग घेऊन, आता पुरे असं केव्हाही मानवाला वाटत नाही. जीवांना, देवांनासुद्धा वाटत नाही. पण हे महात्मे फार वेगळे आहेत. भगवद्भक्त आहेत. कर्दम ऋषि म्हणतात, ""झालं सगळं झालं, संसारही केला'' म्हणाले. ""पित्याची आज्ञा पालन केलेली आहे. आता आम्हाला जायचंय'' म्हणाले. देवहूतिच्या मनाला एकदम धक्का बसलेला आहे. तिला आठवण झाली पूर्वीची, ऋषिमहाराजांनी सांगितलेलं आहे संसार सुरू करायच्या वेळेलाच, संसार केव्हा सोडायचा हेही निश्चित केलेलं आहे. हे इतरांना सांगता येणार नाही. खाली मान घातलेली आहे. डोळे अश्रूंनी भरून गेलेले आहेत. प्रार्थना करती आहे.
सर्वं तद्भगवान् मह्यं उपोवाह प्रतिश्रुतम् ।।
3.23.51 ।। श्री. भा.
""आपण जे बोलला होतात, ते सर्वही संसार सौख्य मला आपणापासून मिळालेलं आहे. काहीही संसारात कमी नाही माझ्या. पण माझी एक प्रार्थना, विनंती ऐका. आता या मुली...
...मोठ्या झाल्या. ह्या मुलींचा विवाह करण्याचं कर्तव्य आपलं नाही का? कुठे या मुलींकरता योग्य वरसंशोधन करायचं? ह्या मुली एकदा योग्य स्थळी पडल्या की माझ्या मनाला समाधान वाटेल. हे कार्य आपलं राहिलेलं आहे, असं आपल्याला वाटत नाही का? दुसरी गोष्ट म्हणजे आपण संन्यास घेऊन निघून गेल्यानंतर, मुलीही आपल्या-आपल्या घरी जाणार आणि मी एकटी घरात राहणार, मला एखादा मुलगा जर झाला तर तेवढंच माझ्या मनाला समाधान होईल. ह्या विषयाच्या ठिकाणी आसक्ती माझ्या मनामध्ये उत्पन्न झाली आणि माझ्या हिताकडे माझं लक्ष गेलं नाही.
साहं भगवतो नूनं वञ्चिता मायया दृढम् ।
यत्त्वां विमुक्तिदं प्राप्य न मुमुक्षेय बन्धनात् ।।
3.23.57 ।। श्री. भा.
ईश्वराच्या मायेचं आवरण इतकं माझ्या चित्तावर पडलेलं आहे, की मला माझं कल्याण कसं करून घ्यावे हे समजले नाही. आपल्या सारख्यांकडे मोक्ष मागितला असता तर मुक्तही आपण करू शकाल. पण आत्तापर्यंत संसारातच राहण्याची माझी इच्छा हीच वासना माझ्या मनामध्ये राहिली. हे माझं दुर्दैव आहे.'' खिन्न झाली, निराश झाली. ऋषि महाराज निघून जातात की काय असं तिला दु:ख झालेलं आहे. दया आली कर्दम ऋषींना. देवांनीही सांगून ठेवलं होतं त्यांना. त्यांनीही सांगितलं राजकन्ये, का दु:ख तू करते आहेस. भगवान श्रीहरी तुझे पुत्र होणार आहेत. त्यांनीच सांगितलंय म्हणाले. तूही पतिव्रता स्त्री आहेस. इंद्रिय निग्रह आहे, ईश्वराची भक्ती आहे, सर्व व्रते तू करती आहेस म्हणाले. दान-धर्म तुझ्या हातून झालेला आहे. ईश्वराच्या भजनाकडे अधिक अधिक लक्ष दे म्हणजे झालं. म्हणजे तोच परमात्मा तुला उपदेश करून तुला मुक्त करिल.
देवहूतिने आपल्या पतीची आज्ञा मान्य केली, भगवान श्रीहरींची भक्ती करण्याकडे तिचं जास्तीत जास्त लक्ष लागलेलं आहे. बराच काल गेल्यानंतर तिच्या गर्भामध्ये भगवान श्रीहरी प्राप्त झालेले आहेत. योग्य वेळी कपिल मुनींचा अवतार झालेला आहे. भगवान श्रीहरी त्या देवहूतिपासून प्रकट झाले, अवतीर्ण झाले. अप्सरांचे, गंधर्वांचे नृत्य गायन झालेलं आहे. ब्रह्मदेव हे स्वतः ऋषिमंडळींना बरोबर घेऊन कर्दम ऋषींच्या आश्रमामध्ये त्यांना भेटण्याकरता आलेले आहेत. भगवंतांनी अवतार घेतलेला आहे, हे त्यांना माहिती आहे, ब्रह्मदेवांनी त्या कर्दमांची स्तुती केलेली आहे.
त्वया मेऽपचितिस्तात कल्पिता निर्व्यलीकतः ।
यन्मे सञ्जगृहे वाक्यं भवान्मानद मानयन् ।।
3.24.12 ।। श्री. भा.
""कर्दमा, माझी पूजा तू केलीस म्हणाले, पूजा म्हणजे काय, मी सांगितल्याप्रमाणे तू वागलास. माझी आज्ञा मान्य केलीस, संसार केलास तू. हिच माझी पूजा आहे. पित्याला पुत्रांनी पूजा करावी अशी इच्छा नाहीये. आज्ञा पालन करणं हिच पित्याची पूजा आहे. तू माझी आज्ञा पूर्ण पालन केलीस. शास्त्राज्ञेचे पालन केलेस. आता या मुली तुझ्या विवाहाला योग्य झालेल्या आहेत. त्यावेळेला ठरावीक जास्ती वय झाले असावे असा कायदाही नव्हता आणि इच्छाही लोकांची तशी नव्हती. तशा त्या मुली विवाह योग्य झालेल्या आहेत. हे ऋषि माझ्याबरोबर आणलेले आहेत म्हणाले.'' देवहूतिला काही काळजी करावी लागली नाही. स्वतःच्या लग्नाकरताही काळजी करावी लागली नाही आणि हे पती निघून गेल्यावर या मुलींचे लग्न कोण करील ही पण काळजी करावी लागली नाही. ब्रह्मदेवच सगळी योजना करताहेत. ब्रह्मसूत्र लिहून ठेवतात म्हणे ब्रह्मदेव. ही मुलगी कोणत्या मुलाला द्यायची हे सगळं आधीच ठरवून ठेवलं आहे. जन्माला आल्याबरोबरच लिहून ठेवतात म्हणे. हे ऋषि आलेले आहेत. त्या ऋषींना या कन्या तू अर्पण कर. देवहूतिला सांगितलं, ""देवहूति, प्रत्यक्ष भगवान श्रीहरी तुझ्या उदरातून अवतार घेऊन आलेले आहेत. तुझा सर्व अविद्यारूपी जो पाश आहे त्या पाशातून तुला मुक्त करणार आहे. हा सर्व सिद्धांचा अधिपती कपिल या नावाने प्रसिद्ध होणार आहे.'' देवहूतिच्याही मनाचं समाधान केलं ब्रह्मदेवांनी. कर्दम ऋषींचही समाधान केलेलं आहे. ब्रह्मदेव निघून गेले.
त्यांच्या आज्ञेप्रमाणे आपल्या नऊही कन्या त्या नऊ ऋषींना देऊन टाकल्या.
कला नावाची कन्या मरीचींना दिली. अनुसूया अत्री ऋषींना दिली. श्रद्धा अंगिरा ऋषींना, हविर्भू पुलस्त्यांना, गती पुलहांना, क्रिया क्रतूंना, ख्याती भृगु ऋषींना आणि अरुंधती वसिष्ठांना, शांती नावाची कन्या अथर्वांना दिली. सर्व ऋषिमंडळी अनुज्ञा घेऊन आपल्या स्त्रियांना बरोबर घेऊन आपल्या आश्रमामध्ये निघून गेले. एक काम झालं. देवहूतिचे समाधान झालेलं आहे. आपले पतिदेव ज्याप्रमाणे तपस्वी मोठे, योगी आहेत तसे आपल्याला मिळालेले जावईही योगी आहेत. वाटेल तितकी समृद्धी निर्माण करून अनासक्त राहणारे आहेत. हे मोठं सामर्थ्य आहे. संपत्ती मिळवणारा जावई याला प्राधान्य नाहीये. तेही आहे. संपत्ती, लक्ष्मी राहिली हे सुद्धा उगाच राहत नाही. ते पुण्य आहे, पण त्याच्यापेक्षा हे अधिक पुण्य आहे. कोणाला अपेक्षा असेल तितकी संपत्ती देणारे आपण त्याच्यापासून अलिप्त राहणारे हे जावई मिळाले म्हणून समाधान झालेलं आहे. तपसामर्थ्य, योगसामर्थ्य आहे.
कपिलमुनींचं लहान वय आहे. कर्दम ऋषींचं काम संपलेलं आहे. संसाराचं काम झालं. पत्नीची इच्छा पूर्ण झाली. आता संन्यास घेऊन बाहेर पडायला हरकत नाही. संन्यास घेतला म्हणजे त्या शास्त्रकारांनी असं सांगितलं आहे,
जर संन्यास घेतला, पत्नीने किंवा मातेने त्याला अनुज्ञा दिली संन्यास घ्यायला आणि त्यांनी संन्यास घेतला तर पुढच्या जन्मामध्ये पत्नी आणि मातेला पुरुष जन्म प्राप्त होतो. पुरुष जन्म मिळाला पाहिजे किंवा पुरुषाप्रमाणे सगळी कामं करण्याची जबाबदारी आपल्याला मिळाली पाहिजे अशी इच्छा आहे ना स्त्रियांची, पण जन्म पुरुषाचा मिळावा हे मात्र कोणाला करता येणार नाही. हेही शास्त्रीय फल त्यांनी दाखवलेलं आहे.
कर्दम ऋषि आलेले आहेत. कपिल मुनींना, भगवंतांना त्यांनी नमस्कार केला. प्रार्थना करताहेत महाराज. ""अनेक जन्म, मनोनिग्रह करून आपले चिंतन करणारे महात्मे त्यांना कितीतरी जन्मानंतर आपलं दर्शन होतं. सान्निध्य लाभतं म्हणाले. ते आपण आमच्या अपराधाकडे लक्ष न देता, आम्ही अज्ञानी आहोत, अपराध अनेक आहेत. 'अपराध सहस्त्राणी' एक अपराध काय अनेक अपराध आमच्या हातून घडतात. असे आम्ही संसारी जीव आमच्या अपराधाकडे लक्ष न देता आपण आमच्या गृहामध्ये येऊन राहिलेले आहात, प्रकट झालेला आहात. तुम्हीच वचन दिलेलं होतं, ते स्वतःचं वचन सत्य करण्याकरता आपण आलेले आहात. आमची पुण्याई नाहीये. आपल्या लोकांना, भक्तांना जे जे रूप आवडतं त्याप्रमाणे रूप घेऊन आपण भक्तांना दर्शन देता. आपली सेवा करणारे अनेक मोठे मोठे भक्त आहेत. त्यांच्या कामना आपल्या कृपेने पूर्ण होतात. मलाही आपली अनुज्ञा, अनुमति घेऊन संन्यास दीक्षा धारण करून जायचं आहे. वनामध्ये जाऊन आपली सेवा करायची आहे. संपवायचंय सगळं. आधीपासून संसाराची आसक्ती जर असती तर संन्यास घेऊन वनामध्ये गेल्यानंतर संसार सुटलाय का राहिलाय याचा विचार करावा लागतो. इथे ते काहीच नाही. अगोदरपासूनच तो सुटला आहे. केव्हा बाहेर पडायचंय. कपिल मुनींना सांगताहेत कर्दम ऋषि. आपली आज्ञा मागण्याकरता आलेलो आहे मी. अखंड आपलं चिंतन करण्याकरता मी बाहेर पडतो आहे.''
भगवान म्हणाले कर्दमा, तुम्हाला मी बोललो होतो, त्याप्रमाणे तुमच्या घरामध्ये मी आलेलो आहे. तत्व किती आहेत हे सगळ्या लोकांना समजावून सांगायचं आहे.
प्रसङ्ख्यानाय तत्त्वानां संमतायात्मदर्शने ।।
3.24.36 ।। श्री. भा.
""तत्वज्ञान झाल्याशिवाय आत्मदर्शन होणार नाही. व्यावहारिक तत्व का असेना ती समजली पाहिजेत, मग पारमार्थिक तत्वाचं ज्ञान, स्वरूपाचं ज्ञान नंतर होईल. ही जी व्यावहारिक तत्वं म्हणू, मूल आणि सृष्टीला कारण असणारी सगळी, तीच समजली नाहीत. दुसरंच काहीतरी मनामध्ये येतं. हा आत्मवाद, पुष्कळ काल गेला असल्यामुळे नष्ट झालेला आहे. तो मला प्रवृत्त करायचा आहे. म्हणून मी देह धारण करून आलेलो आहे. आपली इच्छा असेल तर जा आपण वनामध्ये जायला हरकत नाही. मृत्यूला जिंका आणि 'अमृतत्वाय मां भज' हेच पुन्हा सांगून ठेवलं. आता तुम्हाला जी तपश्चर्या करायची ती मोक्षाकरता करा. पूर्वी केलेली तपश्चर्या ही पित्याची आज्ञा होती म्हणून केली. ते काही हा दोष म्हणत नाहीयेत. स्त्री प्राप्त व्हावी, संसार चांगला व्हावा म्हणून तपश्चर्या तुम्ही केलीत तसं आता फक्त मोक्षाकरता तपश्चर्या करा. बाकी काही मनामध्ये ठेवू नका. निवासन अंत:करणाने भजनामध्ये निमग्न रहा. सर्वव्यापी माझं स्वरूप कसं आहे. स्वयंप्रकाश, सर्वांच्या अंतर्यामी मी कसा आहे हे सगळं पहा म्हणजे तुमचा शोक, मोह, सगळा दूर होईल आणि निर्भय जे आत्मस्वरूप त्याची प्राप्ती होईल.
मात्रे आध्यात्मिकिं विद्यां शमनीं सर्वकर्मणाम् ।
वितरिष्ये यया चासौ भयं चातितरिष्यति ।।
3.24.40 ।। श्री. भा.
देवहूतिचीही काळजी करण्याचं तुम्हाला कारण नाही, यतिमहाराज मी त्याकरता आलेलो आहे. सर्व लोकांना तत्वदर्शन करून द्यायचं आहे, आत्मदर्शनाचा उपाय म्हणून, पण पहिलं काम माझं हे आहे. माझ्या मातेला ही अध्यात्मविद्या मी सांगणार आहे. म्हणजे सर्वही कर्मांचा क्षय होऊन जाईल.''
ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात्कुरुते तथा ।।
4.37 ।। श्री. भगवद्गीता
कर्म संपल्यानंतर जन्म संपलेला आहे. सर्व दु:खं संपलेली आहेत. निर्भय होऊन पुनर्जन्म नाही, पुन्हा दु:ख नाही. स्वतः देवांनीच त्या आपल्या मातेची जबाबदारी पत्करली. पती गेल्यानंतर मला कोण आहे, त्या देवहूतिला काळजी करण्याचं कारण नाहीये आणि यांचंही मन गुंतून राहायला नको. गुंतलेलं नव्हतंच पूर्वीही. पण तेही भगवंतांनी सांगून टाकलं. तुम्ही मनामध्ये कोणतीही इच्छा ठेवू नका. निवासन व्हा आणखी भजन करा म्हणाले. कर्दम ऋषींनी भगवान कपिलांना प्रदक्षिणा केली, नमस्कार केला आणखी अरण्यामध्ये गेले. काही व्यवस्था नाही. केवढी संपत्ती आहे, विमानामध्ये, इंद्रादिक देवांनासुद्धा हे विमान आपल्याला मिळावं अशी इच्छा...
...आहे. काय वाटेल तितकी संपत्ती आहे. पण तिकडे बिलकुल लक्ष नाहीये. ही व्यवस्था लावायची याचाही विचार नाही. व्यवस्था कशाला. काही दिवस राहिल अथवा जाईल. असलं काय आणि गेलं काय. तेव्हा पहिल्या प्रथम स्त्रीचा त्याग केलेला आहे. प्रत्यक्ष भगवान श्रीहरी आलेले आहेत. त्यांच्याजवळ राहून त्यांना काय भक्ती करता आली नसती पण नाही वनामध्ये जाण्याचं कारण काय? नाही, पुन्हा मोह उत्पन्न होण्याचा संभव आहे. पुन्हा आपला मुलगा आहे असं वाटलं तर ईश्वर भाव गेला. संसार संबंधी काहीही मनामध्ये राहिला नको. पुत्र नको, स्त्री नको, मुलींची व्यवस्था झालेली आहे. ही संपत्ती आहे. कोणाला न्यायची असेल ते घेऊन जातील आपल्याला काय करायचंय. याप्रमाणे अंत:करणपूर्वक सर्व त्याग केलेला आहे. मग बाहेर पडले. संन्यास याशिवाय होऊ शकत नाही. संसाराबद्दल थोडी जरी इच्छा, लोभ मनामध्ये आसक्ती असली तर संन्यास घेता येणार नाही. अध:पात होईल.
प्रत्यक्प्रशान्तधीर्धीरः प्रशान्तोर्मिरवोदधिः ।।
3.24.44 ।। श्री. भा.
समुद्र जसा लाटा शांत झालेल्या आहेत. तसा समुद्र शांत आहे. किती गंभीर आहे, ओळखता येणार नाही. त्याप्रमाणे सर्व वासनांचा क्षय झालेला आहे, पूर्ण वैराग्य भगवत् कृपेने उत्पन्न झालेलं आहे. पित्याची, ब्रह्मदेवांची कृपा आहे. भगवान वासुदेव सर्वव्यापक आहे.
वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः ।। 7.19 ।। श्री. भगवद्गीता
हे ज्ञान अनेक जन्मांनी मिळतं. भगवान सांगताहेत, ते त्यांना मिळालेलं आहे. पराभक्ती ज्यांना प्राप्त झाली, आत्मरूप, सर्व ठिकाणी आणखी भगवान भरून राहिलेले आहेत. अंतर्यामीही तोच आहे, बाहेरही तोच आहे.
सकलमिदं अहं च वासुदेवः ।।
हे ज्ञान पूर्ण झालेलं आहे. कोणतीही इच्छा राहिलेली नाहीये. शत्रू नाही, मित्र नाही सर्वव्यापी परमेश्वरा कडे लक्ष लागलेलं आहे, चिंतन चाललेलं आहे.
प्राप्ता भागवती गतिः ।।
3.24.47 ।। श्री. भा.
जन्म संपलेला आहे कर्दम ऋषीचा. पुढं कपिल मुनींनी उपदेश काय केला म्हणून विचारताहेत शौनक ऋषि. मैत्रेय म्हणतात विदुरजी,
पितरि प्रस्थितेऽरण्यं मातुः प्रियचिकीर्षया ।
तस्मिन्बिन्दुसरेऽवात्सीद्भगवान् कपिलः किल ।।
3.25.5 ।। श्री. भा.
पिताजी निघून गेले अरण्यात. मातेची इच्छा पूर्ण करायची, आईचा उद्धार करायचाय. भगवान कपिल हे राहिले तिथे मुक्काम. काही कर्म नाही काही नाही. कोणतंही कर्मानुष्ठान नाही, काही नाही. अखंड आत्मचिंतन आहे. सांख्यशास्त्रकारांनीही आत्मचिंतनाला प्राधान्य दिलेलं आहे. आत्मस्वरूपामध्ये जीव ईश्वर असा भेदही त्यांनी सांगितला नाही. केवळ आत्मस्वरूपाचा विचार केलेला आहे. बाकीची तत्वं त्याला अनुसरून सांगितली आहेत. कपिल मुनी, कर्म काही नाही, स्नान-संध्या काही नाही, स्वस्थ बसून अखंड चिंतन चाललेलं आहे. बरं उपदेश करायचा म्हणजे देवहूतिने विचारल्याशिवाय, तिची इच्छा खरी आहे की नाही पाहिल्याशिवाय कसा उपदेश करायचा. उपदेश करण्याकरता तर ते राहिले आहेत. पण एके दिवशी त्या देवहूतिला वाटलं ब्रह्मदेवांनी सांगितलेलं आहे, हा तुझा मुलगा म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर आहे, याची आठवण झाली तिला. हात जोडून ती म्हणती आहे.
निर्विण्णा नितरां भूमन् असदिन्द्रियतर्पणात् ।
येन सम्भाव्यमानेन प्रपन्नान्धं तमः प्रभो ।।
3.25.7 ।। श्री. भा.
""हे प्रभू ही जी इंद्रियं आहेत, या इंद्रियांचा अभिलाष, इच्छा विषयाची ही संपत नाही. त्यामुळे मी अगदी खिन्न झालेली आहे. अंध:कारामध्ये मी पडलेली आहे. या अंध:कारातून तुम्ही मला बाहेर काढा. सर्व लोकांचा उद्धार करण्याची शक्ती फक्त आपली आहे महाराज. माझा हा मोह दूर करा. हे विषय चांगले आहेत असं मला का वाटतं, समजत नाही. त्यातून माझं मन बाजूला करा.
जिज्ञासयाहं प्रकृतेः पूरुषस्य ।
नमामि सद्धर्मविदां वरिष्ठम् ।।
3.25.11 ।। श्री. भा.
तीही ऋषिनीपत्नी होती. तिलाही पुष्कळ ऐकायला मिळालं असेल. राजकन्या आहे. त्यावेळेलासुद्धा पुष्कळ ऐकलं असेल. आत्मानात्म विचार तिला माहिती नाही, असं नाही, म्हणून प्रकृती म्हणजे काय आहे आणि पुरुष म्हणजे काय आहे हे मला कळावे अशी माझी इच्छा आहे. मोठे आपण धर्मज्ञ आहात, श्रेष्ठ आहात. आपण मला हे समजावून सांगा.'' शिष्यांनी इच्छा व्यक्त केल्याशिवाय गुरु काही सांगत नाही. माता आता खऱ्या तळमळीने विचारते आहे. सांगायला आता हरकत नाही. भगवान सांगताहेत,