योग आध्यात्मिकः पुंसां मतो निःश्रेयसाय मे ।।
3.25.13 ।। श्री. भा.
आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मनाचा योग झाला पाहिजे, संबंध झाला पाहिजे. अनात्म पदार्थापासून मन बाजूला झालं पाहिजे. तर सर्व दु:खाची निवृत्ती आहे. पूर्ण सुखाची प्राप्ती आहे. तो योग कसा असावा, कसा करावा, हे तुला सांगतो म्हणाले. मनाची एकंदर शक्ती कशी आहे, हे सांगताहेत. दोन्हीही प्रकारच्या शक्ती मनामध्ये आहेत. विषयाच्या ठिकाणी मन आसक्त होऊन राहिलं म्हणजे, दु:ख आहे, बंध आहे. आणि परमेश्वराच्या ठिकाणी ते मन स्थिर झालं तर मुक्ती आहे. मनानेच मुक्ती मिळते, मनानेच बंध मिळतो. बंधनामध्ये पडणारं मन, जीवाला त्या बंधामध्ये घेऊन पडणारं जे मन आहे, काम क्रोधादिक अनेक विकार त्याच्यामध्ये आहेत. दोष आहेत. हे सगळे दोष त्या मनातून निघून गेले पाहिजेत. त्यावेळेला ते मन शुद्ध झालं असं समजता येईल. दु:खाकडे लक्ष नाही, सुखाकडेही लक्ष नाही, फळाकडेच जिचं लक्ष नाहीतर त्याच्या साधनाकडे तिचं कशाला लक्ष जाईल. ती वासना कशाला उत्पन्न होईल. अशी ज्यावेळेला मनाची शुद्ध अवस्था प्राप्त होईल. त्यावेळेला आपण कोण आहोत हे जीवात्म्याला समजून येते.
प्रकृतेः परम् ।।
3.25.17 ।। श्री. भा.
प्रकृतीचा संबंध आपल्याला नाहीये. स्वयंप्रकाश आपण आहात. अत्यंत सूक्ष्म आपलं रूप आहे. त्याकरता ज्ञान, वैराग्य, भक्ती, भगवत् भक्ती ही अंत:करणामध्ये असली पाहिजे. म्हणजे आपण उदासीन आहोत. साक्षी आहोत आपण. हे ज्ञान होतं. मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे. मी अमुक सत्ताधीश आहे. श्रीमंत आहे, मी अमुक घरांचा मालक आहे, हे सगळे मी पणाचे दोष निघून जातात. प्रकृतीचं सामर्थ्य संपलेलं आहे. प्रकृती त्याला काही करू शकत नाही. ईश्वराच्या ठिकाणी चित्त स्थिर करणं, त्याचं चिंतन करणं याच्याशिवाय दुसरा श्रेष्ठ मार्ग नाही, दु:ख मुक्तीसाठी. या विषयसंगामध्ये सापडणं म्हणजे कधीही न निघणारा बंध आहे हा. कधीही न सुटणारा आहे. पण साधूंचा संग जर झाला, भगवत् भक्तांचा तर मोक्षाचा दरवाजा उघडला जातो म्हणतात. ते घेऊन जातात, त्या दरवाजातून. असे साधू अनन्य भावाने भगवंतांचं चिंतन निरंतर करीत असतात. कर्माकडे लक्ष नाही, आप्तइष्टांकडे लक्ष नाही, घरदाराकडे लक्ष नाही, माझ्या कथा ऐकताहेत, सांगताहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचे ताप होत नाहीत. त्यांची संगती मिळावी, हे देवाजवळ मागितले पाहिजे. विषयसंगामुळे उत्पन्न होणारे जे दोष आहेत ते सर्व दोष दूर करण्याचं सामर्थ्य त्या संतांच्या जवळ आहे. मनामध्ये कोणते-कोणते दोष अधिक प्रधान प्रभावामध्ये आहेत, कमी किती झालेले आहेत, सगळं त्यांचं निरीक्षण करतात आणि ते काढून...
...टाकतात. हे सामर्थ्य त्यांच्याजवळ आहे. देवहूतिने नंतर विचारले महाराज आपली भक्ती म्हणजे काय हे मला समजावून सांगा. भक्त आपले कसे असतात तेही सांगा. मी म्हणाली स्त्री आहे, अज्ञानी आहे, सुखाने बोध होईल असा आपण उपदेश करा. भक्तीचं स्वरूप सांगताहेत, भगवान कपिल.
देवानां गुणलिङ्गानां आनुश्रविककर्मणाम् ।
सत्त्व एव एकमनसो वृत्तिः स्वाभाविकी तु या ।।
3.25.32 ।। श्री. भा.
अनिमित्ता भागवती भक्तिः सिद्धेर्गरीयसी ।
जरयत्याशु या कोशं निगीर्णमनलो यथा ।।
3.25.33 ।। श्री. भा.
शुद्ध भक्तीचं लक्षण सांगताहेत. ज्याचं चित्त केवळ भगवंताकडे लागलेलं आहे अशा मनुष्याची वेदविहित कर्मामध्ये निमग्न असणारी आणि विषयांचं ज्ञान करून देणारी इंद्रियांची आणि मनाची वृत्ती सत्वमूर्ती श्रीहरीच्या ठिकाणी स्वाभाविकरित्या स्थिर होणं, यालाच भगवद्भक्ती म्हणतात. विषयापासून मन सुटल्याशिवाय ईश्वरस्वरूपाशी स्थिर होणार नाही. हाच योग आहे. मनाचा संबंध परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी असतो. ही भक्ती मुक्तीपेक्षासुद्धा श्रेष्ठ आहे असं म्हणतात. कारण लिंग शरीराचा नाश या योगाने होतो असेही सांगताहेत कपिलमुनी. कारण त्या भक्तीचंच पर्यवसान आत्मज्ञानामध्ये होतं शेवटी. भक्तीने मोक्ष मिळाला हा सिद्धांत नाही हा आक्षेप घेण्याचं कारण काय? अंतःकरण हे सर्व इंद्रियांसहित परमेश्वराच्या चिंतनामध्ये निमग्न झाल्यानंतर त्या मनाचे परिवर्तन आत्मज्ञानामध्ये का नाही होणार? तीच भक्ती ज्ञानरूपात पर्यवसित होते आणि सर्व कोशत्याग, कोधनाश लिंगशरीर नाश होतो. अशी भक्ती ज्यांना मिळालेली आहे त्यांना कशाचीही इच्छा राहात नाही म्हणाले. माझं सायुज्य त्यांना नको आहे. सारूप्य नको आहे. सरूपता, समीपता, सलोकता कोणत्याही मुक्तीची त्यांना इच्छा राहात नाहीये. माझ्या अनंत स्वरूपाचं चिंतन करतात, गुणांचं चिंतन करतात. त्याच्यामध्येच त्यांचा काल जातो आहे. माझ्या अनेक विभूती आहेत. त्या सर्व विभूतींचं स्मरण करत आहेत. इतर कशाकडेही त्यांचं लक्ष जात नाहीये. त्यामुळे सर्वांना नियामक असणारा कालसुद्धा काही करू शकत नाही. कालातीत ते होतात. गुणातीत ते होताहेत. त्याकरता असे जे भगवद्भक्त आहेत त्यांची संगती जर घडली तर संसारातूम मन बाजूला होणं शक्य आहे म्हणाले. भगवंताच्या ठिकाणी मनाचा योग झाला पाहिजे, स्थिर झालं पाहिजे, लय झाला पाहिजे. त्याकरता सज्जनांच्या संगतीने ज्ञान वैराग्य, भक्ती यांची प्राप्ती झाली म्हणजे पुनरावृत्ती नाही, जन्ममरण नाही. दु:खं कायमची संपलेली आहेत. हा...
...योग सांगितला भगवंतांनी. परमेश्वरस्वरूपाच्या ठिकाणी चित्ताचा लय होणं, स्थिर होणं, अनात्मपदार्थाचा योग सुटून आत्मयोग झाला पाहिजे. त्याकरता सत्संगती घडली पाहिजे. आत्म्याच्या ठिकाणी चित्त स्थिर होणं, साक्षात्कार होणं त्याला संतांची संगती पाहिजे. भगवद्गुण ऐकायला मिळताहेत त्यांच्या मुखातून. त्यामुळे अंतःकरणामध्ये प्रेमाचा आविर्भाव होतोय. ती भक्ती पराभक्तीस्वरूप होऊन जाते. आत्मज्ञानामध्ये पर्यवसित होते.
त्यानंतर सांख्यमार्ग म्हणजे काय, हे सांगताहेत. एकच आहे. सांख्यमार्ग काय योगमार्ग काय, फलदृष्ट्या एक आहे म्हणतात. तत्वं किती आहेत, ही सगळी सांगायला त्यांनी सुरवात केली. पुष्कळ मोठा विषय आहे. एकंदर आत्मस्वरूपासह पंचवीस तत्वं सांख्यशास्त्रकार सांगतात. ती सगळी तत्व सांगितली, कशी कशी उत्पन्न झाली. सृष्टीची उत्पत्ती कशी झाली. महत्तत्व आहे, अहंकारतत्व आहे. अहंकारतत्वापासून पंचभूतं आहेत. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय त्यांच्या देवता हे सगळं वर्णन केलं. पंचभूतांपासून सगळी भौतिक सृष्टी झालेली आहे. हे सर्वही पुढं तत्वविचार मांडलेला आहे. द्वैत ऐकून घ्यायचं, समजून घ्यायचं आणि पुसून टाकायचं. अध्यारोप आणि अपवाद आहे. कपिलांनी सांगितलेलं जे सांख्य आहे, त्यात तत्वज्ञान आहे आत्मस्वरूपाचाही विचार आहे. आत्मा उदासीन आहे. ज्ञानस्वरूप आहे हे त्यांनी मांडलेले आहे.
कपिल सांगताहेत, माते, हा जो जीवात्मा आहे तो या शरीरामध्ये सापडलेला आहे. तादात्म्य सर्वत्र झालेले आहे. बुद्धी तादात्म्य आहे, शरीर तादात्म्य आहे. सगळीकडे आहे. वस्तुतः त्या प्रकृतीमध्ये असूनसुद्धा त्याला कोणताही विकार नाही. संग नाहीये, सर्वत्र असून असंग आहे. आकाश सर्व ठिकाणी आहे. पण असंग आहे. पावसाचा संबंध नाही, उन्हाचा संबंध नाही, वाऱ्याचा संबंध नाही. आहे मात्र सगळीकडे. तसा हा जीवात्मा आहे. ""जलार्कवत्'' पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे. पाणी हलायला लागलं की ते प्रतिबिंब हलतं. पाणी जास्त वाढलं की तेही वर येतं. मूळ बिंबाला त्याचा काही संबंध नाही. पण ज्यावेळेला हा प्रकृतीच्या गुणांमध्ये आसक्त होऊन जातो, तन्मय होतो आहे. अध्यास त्याला मिळतो आहे, मीच कर्ता आहे अशा प्रकारची समजूत करून घेऊन संसारात तो पडतो म्हणाले. कर्मदोष अनेक प्रकारचे होत आहेत. संगतीमुळे बऱ्यावाईट जन्मामध्ये, योनीमध्ये त्याला जावं लागत आहे आणि संसार काही त्याच्या पाठीमागचा सुटत नाही.
स्वप्ने अनर्थागमो यथा ।।
3.27.4 ।। श्री. भा.
स्वप्नामध्ये कितीतरी संकटाचे प्रसंग आपण पाहतो म्हणाले. काहीही खरं नाही पण दिसतंय मात्र खरं आणि त्यामुळे सुखदु:खाचा अनुभव त्यावेळेला येतो. तसा विषयाचा अखंड ध्यास मनामधे असल्यामुळे त्या विषयाच्या संबंधामुळे निर्माण होणारी सुखदु:खं, जन्ममृत्यू हे सर्व मला आहेत असं तो समजतो. म्हणून हे जे विषयाकडे जाणारं जे चित्त आहे त्याला हळूहळू ताब्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुष्कळ काल लागला तरी प्रयत्न सोडून उपयोग नाही, सांगताहेत कपिलमुनी,
भक्तियोगेन तीव्रेण विरक्त्या च नयेद्वशम् ।।
3.27.5 ।। श्री. भा.
मनाला ताब्यामध्ये आणण्याकरता तीव्र भक्तियोग निर्माण झाला पाहिजे. तेवढ्यापुरता नाही. भूक लागल्याबरोबर पदार्थाची, खाण्याची आठवण होते. भूक लागल्यावर आहे. नेहमी काही भूक नाहीये. ही भगवंतांची नेहमी आठवण पाहिजे. नेहमी तळमळ पाहिजे. तीव्र भक्ती उत्पन्न झाली पाहिजे. तरच ती विरक्तीही तीव्र होईल. परमात्म स्वरूपाचं चिंतन अखंड घडावं अशी जर तळमळ उत्पन्न झाली तर विषयाचं चिंतन आपोआप कमी होतं. त्याकरता यमनियमादिक मार्ग आहेत. त्याचाही अभ्यास केला पाहिजे. सर्वभूतांच्या ठिकाणी समदृष्टी निर्माण झाली पाहिजे.
सर्वभूतसमत्वेन निर्वैरेण अप्रसङ्गतः ।।
3.27.7 ।। श्री. भा.
माझ्या कथा निरंतर श्रवण करणं, चिंतन करणं, सर्वही प्राणीमात्रांच्या ठिकाणी समबुद्धी ठेवणं, हा श्रेष्ठ, हा कनिष्ठ, हा शत्रू, हा मित्र ही बुद्धी नाही. एक ईश्वरभाव आहे. कोणाशीही वैर नाही. ब्रह्मचर्य पालन करणं, वाणीचा निग्रह करणं, याचना न करता जे मिळेल त्यात संतोषाने राहणे, मित आहार करून राहणं, एकांतामध्ये राहून भगवंताचं नामस्मरण, गुणस्मरण करणं, हा जो देह आहे, परिवार वगैरे सर्वत्र त्याठिकाणी खरा आहे असं कधीही न समजणं. आणखी प्रकृतीपुरुष जे आहेत त्यांचा विचार करून तेही समजून घेणं. अशा प्रकारचा हा जो अभ्यास आहे त्याच्यामुळे मन हे स्थिर होऊ लागतं आहे. भगवत्प्रेम संपन्न होतं आहे. अहंकारादिक विकार हळूहळू दूर होतात. आणखी पूर्ण शांती त्याला प्राप्त होते. प्रकृती पुरुषाचा विवेक देवहूतिच्या इच्छेप्रमाणे पुन्हा करून दाखविलेला आहे. पुन्हा भगवान सांगताहेत, निर्गुण ब्रह्माचं ध्यान करणं हाच एक निर्बिज योग आहे. आणि सबीज म्हणजे सगुण साकार परमात्म्याचं ध्यान करणं. तो सुलभ आहे. निर्गुण ब्रह्माचं ध्यान करणं कठीण आहे. त्याकरता सर्वही साधनं सांगताहेत. कोणती कोणती साधनं केली म्हणजे सगुण परमात्म्याचं ध्यान करता येईल.
स्वधर्माचरणं शक्त्या विधर्माच्च निवर्तनम् ।
3.28.2 ।। श्री. भा.
दैवाल्लब्धेन संतोष आत्मविच्चरणार्चनम् ।।
3.28.2 ।। श्री. भा.
यथाशक्ती स्वधर्माचरण झालं पाहिजे. परधर्मापासून दूर झालं पाहिजे. दैवाने जे मिळेल त्यामध्ये संतोष मानता आला पाहिजे. श्रेष्ठ पुरुषांची सेवा घडली पाहिजे. पवित्र आहार घेतला पाहिजे. अहिंसा, सत्य, अस्तेय हे जे यमनियम आहेत, यांचं पालन झालं पाहिजे. आणि असे सर्व नियम झाल्यानंतर त्यांनी प्राणायामाचाही अभ्यास सांगितला आहे. योग्य मार्गदर्शकांच्या सान्निध्यामध्ये त्याचाही अभ्यास करून मनाचे सगळे दोष दूर करायचे आहेत. त्याकरता प्राणायाम आणखी धारणा हे मुद्दाम सांगितले आहेत. सगळे चित्तदोष दूर झाल्यानंतर स्थिर झालेलं जे अंतःकरण आहे, त्याने भगवंताच्या स्वरूपाचं ध्यान करावं असं कपिलमुनी सांगताहेत. ध्यानयोगाचा पुरस्कार त्यांनी केलेला आहे. भगवंताचं साकार मूर्तीचं ध्यान आहे.
प्रसन्न मुख आहे. त्याचप्रमाणे शामवर्ण आहे. शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले आहेत. अलंकार धारण केलेले आहेत, तरुण वय आहे. अशा स्वरूपाचं पायापासून मुखापर्यंत अखंड चिंतन करायला सांगितलेलं आहे. ते सगळं वर्णन केलेलं आहे. चरण कसे आहेत, बाहू कसे आहेत, हस्तातील आयुधं कशी आहेत. त्या सर्वांचं चिंतन करायचं आहे. या सगळ्यासाठी ठराविक काल असा नाही. इतका वेळ भजन करायचं, इतका वेळ चिंतन करायचं असं ठरवून चिंतनाला सुरवात केली म्हणजे, त्यात त्यापेक्षा कमीच होतं. तेवढा वेळही ते होत नाही. कालाचं भान आधी नाहीसं झालं पाहिजे. पुढे नाहीसं होणारच आहे. पण अगोदरसुद्धा कालाचं भान न ठेवता अखंड ध्यान करायला सांगितलं आहे. या ध्यानाच्या प्रभावाने हृदयग्रंथीचा भेद होतो आहे.
भिद्यते हृदयग्रन्थिः ।।
पहिली गाठ आहे ही. आत्मा आणि अंतःकरण जे आहे याचा अध्यास इतका पक्का आहे. पक्की गाठ मारलेली आहे की तीच बाजूला होत नाही. ज्ञान झालं तरीसुद्धा ते दृढ होईपर्यंत हा ग्रंथीभेद होत नाही. ती ध्यानाची अवस्था जर सिद्ध झाली, सगुणातून निर्गुणामधे अंतःकरण गेलेलं आहे आणि याप्रमाणे अंतःकरणाने आत्मध्यान सारखं चालू असताना प्रकृतीपुरुषाचा विवेक झालेला आहे. म्हणजे बुद्धीचा अंतःकरणाचा, आत्म्याचाही विवेक झाला. गाठ सुटली याचा अर्थ विवेक होणं. मी वेगळा आहे, उदासीन आहे मी. कर्ता भोक्ता नाहीये मी. अंतःकरणाचे धर्मच मी समजून घेतलेले होते. आता त्याचा माझा संबंध नाही. हे मोठं फळ आहे. आत्मसाक्षात्कार झालेला आहे परंतु साक्षीभूत होऊन राहिलेला आहे. अद्यापि साक्ष आहे. ध्यानाच्याही पुढे समाधी...
...अवस्था आहे. नंतर साक्षात्कार अवस्था आहे. त्यात सर्वच द्वैताचा उपसंहार होऊन जातो. हेही ध्यानयोगाचं फल कपिलमहामुनींनी देवहूतिला समजावून सांगितलेलं आहे. पुष्कळ सांगितले. प्रत्यक्ष भगवानच गुरु मिळालेले आहेत. काय संशय राहणार त्या देवहूतिला. मनाची सुधारणा करून उपदेश करताहेत. नुसता उपदेश आपण पुष्कळ ऐकतो, बोलतो पुष्कळ, वाचतो. पण दोषयुक्त मन राहिलेलं असताना त्या उपदेशाचा उपयोग काय म्हणाले. घागर पालथी ठेवली आहे आणि वर नळ सोडलेला आहे. काय उपयोग? पाणी काय त्यात एक थेंबभर तरी जाईल काय? पण इथे जे हे भाग्य आहे देवहूतिचं पतिदेवही मोठे मिळाले. साक्षात भगवान पुत्ररूप झाले, ज्ञानी गुरू म्हणून मिळालेले आहेत. ते मनाची शुद्धी करून त्यामध्ये गुण संक्रमण करताहेत. ध्यानाचा अभ्यास करावा म्हणून नुसतं सांगत नाहीयेत. देवहूतिला सर्व उपदेश करून झाल्यानंतर सांगितलं त्याप्रमाणे तू सर्व कर म्हणाले, साधनाभ्यास आणि तू मुक्त होशील.
कपिलमुनी दुसरीकडे निघून गेले. देवहूति लगेच ध्यानाभ्यासामध्ये निमग्न झाली. किंचित थोडावेळ वाईट वाटले. उद्धवजींनाही वाईट वाटलं, भगवंताचा वियोग झाल्यावर. 'पुत्रविश्लेषणात्..' परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे भगवत्स्वरूपाच्या ठिकाणी अगोदर पुत्राचंच ध्यान केलं. भगवानच आहेत ते, मग आत्मस्वरूपाचं ध्यान केलं. तत्वज्ञान झालेलं आहे. त्या तत्वापासून आत्मस्वरूप कसं वेगळं आहे हे ही समजून आलेलं आहे. सगुण साकार भगवत्स्वरूपाचं ध्यानही अखंड चाललेलं आहे. त्यामुळे समाधी अवस्था प्राप्त झाली. देहभान नाहीसं झालेलं आहे. शरीरावर वस्त्र आहे किंवा नाही. केस मोकळे आहेत का बांधलेले आहेत कुठेही लक्ष नाही. अखंडध्यान आहे, नुसतं आसनावर बसून तेवढंच ध्यान नाहीये. ही अप्रतिहत भक्ती आहे, पराभक्ती. थांबायचं नाही कधी. तिच्या दासी होत्या त्यांनी सुटलेले केस बांधावे, वस्त्र अंगावरचं बाजूला झालेलं पुन्हा घालावं, असं त्या शरीराचं संरक्षण करताहेत. याप्रमाणे कपिलमुनींची पूर्ण कृपा झाली. देवहूतिच्या मनाचं पूर्ण समाधान झालेलं आहे. संसारही झाला परमार्थ शेवटी पूर्ण झालेला आहे. तिच्या शरीरापासून एक दिव्य नदी निघाली म्हणतात.
याप्रमाणे कपिलमुनीसुद्धा आपल्या मातेची आज्ञा घेऊन उत्तरदिशेला गेले. समुद्राने त्यांना राहायला जागा दिली. तिचं राहात आहेत. गंगासागर संगमावर त्यांचा आश्रम आहे असे सांगतात. मकरसंक्रांतीला तेथे पाणी बाजूला होते आणि आजही लोक दर्शनाला जातात.
अशा प्रकारचं कर्दमऋषीचं, देवहूतिचं चरित्र आहे. ते स्थान आज भारतामध्ये आहे. स्थानाबद्दल...
...अंतःकरणामध्ये अत्यंत आदरबुद्धी असणं, प्रेम असणं, हे त्या स्थान महात्म्यांच्या ज्ञानाचं महत्त्व आहे. ज्या स्थानामध्ये कर्दमांनी तपश्चर्या केली, देवहूति सारखी पतिव्रता स्त्री ज्या स्थानामध्ये राहिलेली आहे. तिनेही तपश्चर्या केली. भगवान श्रीहरींना त्यांच्याजवळ येऊन जन्म घ्यावा लागला. ते राहिले त्या ठिकाणी उपदेश केला असं अत्यंत पवित्र श्रेष्ठ स्थान ज्याठिकाणी आहे, त्या श्रेष्ठ स्थानासंबंधी पुष्कळ ज्ञान असल्यामुळे आदरबुद्धी आहे. हे स्थान आज भारतामध्ये आहे. भारताचं केवढं भाग्य आहे. मातृगया, मातेकरता म्हणून त्याठिकाणी श्राद्ध करायचंय, पंधरा-सोळा पिंड द्यावे लागतात तिथे असं सांगतात. मातेचे उपकार किती किती आहेत त्या एक एक उपकाराचा उपचार करून एक एक पिंड द्यावा लागतो. गर्भात धारण केल्यापासून शेवटपर्यंत लक्ष आहे मुलाकडे. इतरत्र कोठेही लक्ष नाही. म्हणून पित्यापेक्षा माता श्रेष्ठ आहे असं सांगताहेत शास्त्रकारसुद्धा. संन्यास घेतलेल्या पुत्राला पित्याने नमस्कार केला पाहिजे. पण आपली माता समोर आल्याबरोबर त्या संन्यासी मुलाने तिच्या चरणावर मस्तक ठेवलं पाहिजे. अशी ही मातृगया स्वतंत्र आहे. पितृगया निराळी असली तरी मातेकरीता स्वतंत्र एक शास्त्रकारांनी स्थान करून ठेवलेलं आहे. आणि ते आज भारतात आहे. अशा आपल्या स्थानांचं महत्त्व कायम राहावं अशी इच्छा मनामध्ये येणं आणि त्याकरता प्रयत्न करणं हा काही राष्ट्रद्रोह होऊ शकत नाही. मनाची शुद्धी झाली पाहिजे. त्याशिवाय राष्ट्राचं कल्याण होऊ शकणार नाहीये. कितीही राजशासन मोठं ठरलं तरीसुद्धा. त्याकरता हा महात्म्यांनी उपदेश केला. हे देवहूतिचं आणि कपिलमुनींचं चरित्र इथे समाप्त होतं आहे.
विदुर उवाच
भवे शीलवतां श्रेष्ठे दक्षो दुहितृवत्सलः ।
विद्वेषमकरोत्कस्मादनादृत्यात्मजां सतीम् ।।
4.2.1 ।। श्री. भा.
मैत्रेय आणि विदुरजी यांचा संवाद चालू आहे. शुकाचार्य महाराज सांगतात, परीक्षित राजाला. भागवतच सांगताहेत मैत्रेय महर्षी. कर्दमऋषींच्या कन्या ब्रह्मदेवांच्या आज्ञेप्रमाणे सर्व ऋषींना दिलेल्या आहेत. त्यांच्यापासून संतती काय काय झाली हे सर्व मैत्रेयांनी निवेदन केलं. त्यामध्ये दक्ष प्रजापतीने आपली कन्या ही भगवान शंकरांना दिली होती, ब्रह्मदेवांच्या सांगण्याप्रमाणे. दक्षप्रजापती आणि शंकर यांचा बराच मतभेद झालेला आहे. परस्परांचा द्वेष भाव वाढलेला आहे. त्या द्वेषामुळे शंकरांची पत्नी सती हिला देहत्याग करावा लागला. विदुरजी म्हणाले, हे असं घडलं...
...कसं म्हणाले. दक्षाचंही आपल्या मुलीवर प्रेम असणार आणि भगवान शंकरही मोठे सुशिल आहेत. सर्वांचं कल्याण करणारे आहेत. त्यांचा परस्परांचा द्वेष भाव हा का निर्माण झाला? शंकर हे सर्व विश्वाचे गुरू आहेत. निर्वैर आहेत, शांत आहेत त्या शंकरांचा द्वेष दक्ष प्रजापतीने का केला हे सर्वही आपण सांगा.
पुरा विश्वसृजां सत्रे समेताः परमर्षयः ।
तथामरगणाः सर्वे सानुगा मुनयोऽग्नयः ।।
4.2.4 ।। श्री. भा.
मैत्रेय सांगतात विदुरजी सर्वही प्रजापती ऋषीमंडळी यांचा एक याग चालू होता. त्या यज्ञामध्ये सर्वही देवमंडळी प्राप्त झाली. ऋषीमंडळी आलेली आहेत. त्या यज्ञामध्ये दक्षप्रजापती येऊन पोहोचले. दक्ष हा ब्रह्मदेवांचा पुत्र. ब्रह्मदेवांनी त्याला अधिकारी नेमलेलं आहे. तो त्या यज्ञसभेमध्ये आल्याबरोबर सगळी देवमंडळी, ऋषीमंडळी उठून उभी राहिली, त्याचा आदर करण्याकरता. ब्रह्मदेवांना उठण्याचं कारण नाही. त्यांचाच तो मुलगा होता. ते आपले बसलेलेच होते आणि त्यांच्याजवळ शंकरही बसले होते. तेही काही उठले नाहीत. त्यांचंही लक्ष गेलं नाही. सर्वांनी त्या दक्षप्रजापतीचा सत्कार केला. ब्रह्मदेवांना नमस्कार करून दक्षप्रजापती आपल्या आसनावर बसले. त्यांची दृष्टी शंकरांच्याकडे गेली. आपण आत येण्यापूर्वी जसे बसले होते तसेच बसून आहेत. सर्व उठून उभे राहिले. आपला आदरसत्कार केला पण शंकरांनी काही केला नाही. शंकरांच्याबद्दल दक्षप्रजापतीची कल्पना वेगळी आहे. हे आपले जावई आहेत. इतरांप्रमाणेच तो शंकरांच्याकडे पाहतो आहे. रागावला आहे. देवबुद्धी नाही. हा विश्वेश्वर आहे. "सर्व विद्यानाम् ईश्वरः' असं ज्यांचं प्रतिपादन केलेलं आहे, सर्वही विद्या, परंपरा या शंकरांच्यापासून चालू आहेत इकडे दक्षाचं लक्ष नाहीये. आपला अपमान केला यांनी असं वाटलं आणि रागाने उठून उभा राहिला. ब्रह्मदेव समोर आहेत, मोठेमोठे ऋषि आहेत, देव आहेत आणि त्यांच्या समक्ष तो रागाने बोलायला लागला. ऋषीमंडळीहो, देवहो मी काय सांगतो ते ऐका तुम्ही.
अयं तु लोकपालानां यशोघ्नो निरपत्रपः ।
सद्भिराचरितः पन्था येन स्तब्धेन दूषितः ।।
4.2.10 ।। श्री. भा.
काय म्हणाले, ह्या शंकरांनी आपला मार्ग सोडून दिला. सज्जन ज्या मार्गाने जातात सर्वांचा मानसन्मान करणं, आदरभाव व्यक्त करणं, काही नाही यांच्याजवळ. मर्यादा नाही. माझ्या मुलीचं पाणीग्रहण यांनी केलं, देवब्राम्हणासमक्ष आणि हा माझा शिष्य झालेला म्हणाले. मी आल्यानंतर...
...उठून उभं राहिलं पाहिजे. सासरा आल्यानंतर जावयाने उठून उभे राहिले पाहिजे. त्यावेळची ती पद्धती आहे. याच्या मनाला काही वाटले नाही याबद्दल. धर्ममर्यादा यांनी सगळ्या सोडून दिलेल्या आहेत. माझी मुलगी देण्याची इच्छा नव्हती म्हणाले पण आमचे पिताजी ब्रह्मदेव, त्यांचा आग्रह झाल्यामुळे याला मी मुलगी दिली. स्मशानामध्ये जाऊन राहतो. ते भस्म सगळं स्मशानातील अंगाला लावतो. शिव म्हणतात पण ते अशिव आहे.
अशाप्रकारे पुष्कळ निंदा केली दक्षाने शंकरांची आणि शाप दिला त्याने.
अयं तु देवयजन इंद्रोपेन्द्रादिभिर्भवः ।
सह भागं न लभतां देवैर्देवगणाधमः ।।
4.2.18 ।। श्री. भा.
कोणत्याही देवांच्याबरोबर यज्ञाधे याला हविर्भाग मिळणार नाही. यज्ञामध्ये यांचा अधिकार नाही. असं रागाने बोलून निघून गेला तो दक्ष आपल्या घरी. शंकर आपले स्वस्थ बसून राहिले. ऐकून घेतलं त्यांनी. नंदीकेश्वर, शंकरांचे शिष्य, त्यांनाही अतिशय राग आलेला आहे. हा म्हणे दक्ष प्रजापती अधिकार मोठा मिळाल्यामुळे उन्मत्त झालेला आहे. शंकरांचा द्वेष करायला लागला. संसारामध्ये गुंतलेला हा दक्षप्रजापती. त्या कर्माकडेच त्याचं लक्ष आहे. भगवान शंकरांची योग्यता याला समजली नाही. तेव्हा त्यांचा अपमान करणारा हा जो दक्षप्रजापती याला तत्वज्ञान होणार नाही. असाच हा ही संसारामध्ये गुंतून राहिल. याला ज्या ऋषींनी संमती दाखवलेली आहे, दक्षप्रजापतीला शंकरांची निंदा करण्याची संमती दिली आहे. ते सगळे ऋषी याचक होतील, भक्षक होतील, वाटेल तसे अनाचारी होतील. त्या ऋषींनाही शाप दिला. त्याप्रमाणे ते ऋषीही रागावले. भृगुनेही शाप दिला. तुम्ही असे शिवसेवक, शिवदूत हे असा वाटेल तसा आचार करणारे व्हाल म्हणाले. शंकर तिथून उठले आणि कैलासपर्वतावर निघून गेले. असा बराच काल गेला. जावई आणि सासरा यांचा हा द्वेष त्यावेळीपासून सुरू झाला. शंकरांनी सोडून दिलेलं आहे. दुर्लक्ष केलेलं आहे तिकडे, लक्ष दिलं नाही.
दक्षप्रजापती सृष्टीतला एक अधिकारी म्हणून नेमलं ब्रह्मदेवांनी. ज्ञानी आहे, वेदशास्त्रादिकाचं ज्ञान चांगलं आहे. कर्माचंही ज्ञान चांगलं आहे. पण हा एक अहंकार आहे. वाजपेय यज्ञ त्यांनी केला. त्यानंतर करण्याचा जो यज्ञ बृहस्पतिसव नावाचा यज्ञ करायला त्यांनी आरंभ केला. सर्व ऋषी, देव सगळ्यांना निमंत्रण केलं. सगळी मंडळी त्या यज्ञाकरता निघालेली आहेत. देव मंडळी विमानात बसून जाताहेत. कैलासपर्वतावरून ती विमानं निघालेली असताना या सतीने दक्षाची...
...मुलगी, तिने चौकशी केली असतांना आपल्या बापाच्या घरी यज्ञ आहे त्याकरता ही मंडळी निघालेली आहेत हे तिला समजले. यांना काही निमंत्रण नाहीये. दक्षाचं शंकरांना निमंत्रण नव्हते. तिला इच्छा उत्पन्न झाली. आपल्या पित्याच्या घरी यज्ञ आहे तिकडे आपण जाऊ. भगवान शंकर स्वस्थ बसलेले आहेत. त्यांच्याकडे ती आली आणि प्रार्थना करती आहे, महाराज आपल्या श्वशुरांच्याकडे मोठा यज्ञ होणार आहे. आपल्याला समजले आहे की नाही. आपण जाऊ या तिकडे. सर्व देवमंडळी निघालेली आहेत तिकडे. ही विमाने निघालेली आहेत कैलास पर्वतावरून. माझ्या सगळ्या बहिणी वगैरे भेटतील. आई आहे, मावशी आहे पुष्कळ सगळ्यांची भेट होईल. लवकर आपण जाऊ या. जन्मभूमीला जाऊ, माहेरी जाऊ अशी माझी इच्छा आहे. असं ती सांगती आहे. आपल्याला याच्याबद्दल काही वाटणार नाही म्हणाली. सर्वत्र आपण परमात्म दृष्टी ठेवणारे. पण मी स्त्री आहे. मला आपली जन्मभूमी पहावी असं वाटतंय म्हणाली. कोणत्या मुलीला आपल्या पित्याच्या घरी जाऊ असं वाटणार नाही? बरं आमंत्रण नाही. गुरूच्या घरी, पित्याच्या घरी, पतीच्या घरी आमंत्रणाची काही वाट पहायची नाही. तेव्हा लवकर आपण चला म्हणाली. निघूया आपण. आत्तापर्यंत शंकरांनी, दक्षाने आपला पूर्वी किती अपमान केला, शाप दिला हे त्यांनी सतीला सांगितलं नव्हतं. कशाला उगीच सांगायचं, काय उपयोग काय? पण आता तिची इच्छा आहे, जायचं आहे तेव्हा तिला कल्पना दिली पाहिजे म्हणून तिला शंकरांनी सांगायला आरंभ केला.
त्वयोदितं शोभनमेव शोभने अनाहूता अप्यभियन्ति बन्धुषु ।
ते यद्यनुत्पादितदोषदृष्टयो बलीयसानात्म्यमदेन मन्युना ।।
4.3.16 ।। श्री. भा.
तुझं भाषण काही अयोग्य नाहीये. आपल्या आप्तबांधवांच्याकडे जाण्याकरता आमंत्रणाची वाट पाहू नये हे योग्य आहे. पण ते कसे पाहिजेत आपले आप्तबांधव, कोणी घरी गेलं की त्याच्याकडे रागाने पाहणे, बोलणे, त्यांचा आदर न करणे, असे जर क्रोधी असतील तर त्यांच्या घरी जाऊन काय करायचं म्हणाले. ज्यांना कोणाचाही अपमान करायला मनाला काही वाटत नाही. अशा लोकांच्या घरी कधीही जाऊ नये म्हणाले. शत्रूने बाण मारला तरी दु:ख होणार नाही पण असे जे लोक असतील, त्यांच्या वाणीने मनाला अत्यंत दु:ख होतं. तुझ्यावर तुझ्या पित्याचं प्रेम असेल पण आज जर तू माहेरी जाशील तुझ्या पित्याकडे तर तुझा अपमान होईल हे लक्षात घे.