« Previous | Table of Contents | Next »
पान १३१
[Image: umamahes.JPG - उमा महेश्वर]

त्याला काही विवेक नाहीये. सर्वठिकाणी श्रीकृष्णपरमात्मा व्यापून राहिलेला आहे अशी दृष्टी त्याची नाहीये. पूर्वी एका यज्ञामध्ये काय माझ्या हातून अपराध झाला माहीत नाही, उगाच वाटेल तसं बोलला, निंदा केली माझी, शाप दिला. तेव्हा अशा ठिकाणी तुझा अपमान झाला तर तुला ते मरणप्राय दु:ख होईल. तेव्हा तूही न जाणे हे योग्य आहे. मला तर जायचं नाही, मला आमंत्रणही नाहीये. पत्नी त्या ठिकाणी गेल्यानंतर तिचा अपमान होणार. मानी स्त्री आहे ही. अपमान झाल्याबरोबर देहत्याग करणार. थांबवावं तिला. पण त्या सतीचाही विनाशकाल आलेला आहे जवळ. तिला उलट राग आला. काही नाही, जायचं जन्मभूमीकडे. माहेरी जायचं, शंकर येत नाहीत तर आपणच जाऊया, बाहेर पडली ती. पण शंकरांची आज्ञा नसताना बाहेर पडणं हे बरं नाही. पुन्हा ती घरात आली. पुन्हा निघाली. असं एकदोनदा केलेलं आहे. ठरविले तिने, यज्ञाला जाण्याला काय हरकत आहे? म्हणून एकटीच ती सती निघालेली असताना शंकरांचे जे गण होते नंदीकेश्र्वर वगैरे तेही तिच्याबरोबर निघाले. तिला घेऊन सगळी मंडळी त्या यज्ञमंडपापर्यंत येऊन पोहोचलेली आहेत. वेदघोष चालू आहे ऋषीमंडळींचा. त्या यज्ञमंडपामध्ये सतीने प्रवेश केलेला आहे. दक्षाने तिच्याकडे पाहिले सुद्धा नाही. दुसरीकडेच बोलत राहिले. मुलगी आल्याबरोबर तिच्याशी भाषण नाही आणि काही नाही. मुख्य यजमानच जर असा वागतो तर बाकीचे कोण येणार. पण तिच्या बहिणी, आई, मावशी वगैरे पुढे आल्या. जवळ जाऊन म्हणाल्या, ये बाई आलीस तू बरं झालं. कुशलवार्ता, कुशलप्रश्न वगैरे केलेले आहेत. तिची भेट झाली सगळ्यांची.

***
पान १३२

पण ती थांबली नाही. शंकरांनी सांगितलेल हे सत्य आहे. दक्ष प्रजापती शंकरांचा द्वेष करणारा अत्यंत अज्ञानी आहे. राग आला तिला. कोणाशीही भाषण न करताना ती अगोदर यज्ञमंडपात येऊन पोहोचलेली आहे. हविर्भाग सर्व देवांचे मांडून ठेवले होते. इंद्र आहे, वरुण आहे, सगळ्या देवांचे. विष्णू, ब्रह्मदेव सगळ्यांचे भाग आहेत पण शंकरांचा भाग नाहीये. केवढा मोठा यज्ञ. पण शंकरांना बाजूला करून चाललेला आहे. मग मात्र त्या सतीला राग आवरलेला नाही. ती रागाने आपल्या पित्याला बोलती आहे.

न यस्य लोकेऽस्त्यतिशायनः प्रियः ।
तथाप्रियो देहभृतां प्रियात्मनः ।।
4.4.11 ।। श्री. भा.

ज्या भगवान शंकरांना शत्रू किंवा मित्र कोणीही नाही. सर्वत्र जे समदृष्टीने पाहात आहेत. कोणतंही वैर ज्यांनी कधीही केलेलं नाही. अशा भगवंताचा, शंकरांचा तुझ्याशिवाय द्वेष करणारा जगात दुसरा कोणीही दिसत नाही. पित्याला उद्देशून बोलतीये. पिता आणि कन्या हे नातं तिने सोडून दिलेलं आहे.

दोषान् परेषां हि गुणेषु साधवः ।
गृह्णन्ति केचित् भवादृशा द्विज ।।
गुणांश्च फल्गून् बहुलीकरिष्णवः ।
महत्तमाः तेषु अविदत् भवानघम् ।।
4.4.12 ।। श्री. भा.

""दक्षा, संत महात्मे श्रेष्ठ सत्पुरुष जे आहेत ते लोकांचे दोष जरी असले तरी गुण म्हणून पाहतात. तुला ही बुद्धी सुचायची नाही. लोकांच्या गुणालाही तुझी दोषदृष्टीच आहे. थोडे जरी कोणाचे गुण असले तरी ते फार मानतात. 'पावती कृत्य नित्यशः' अशा महात्म्यांना मान्य असणारे श्रेष्ठ ज्ञानी, भगवान शंकर यांचा तू द्वेष करतो आहेस. तुझ्यासारख्या यज्ञ करणाऱ्या दुर्जनांच्या सभेमध्ये श्रेष्ठ पुरुषांची निंदाच होत राहणार. यात काहीच आश्चर्य नाहीये. भगवान शंकरांचं दोन अक्षरांचं 'शिव' हे नाव मुखातून घेतलं गेलं तर सर्व पातकांचा नाश होतो. असा हा, ज्याची कीर्ती पवित्र आहे, ज्याची आज्ञा कोणीही उल्लंघन करत नाही, अशा या भगवान शिवांचा तू द्वेष करतो आहेस. ज्यांची सेवा करणारे असे तपस्वी पुरुष यांना ब्रह्मज्ञान प्राप्त होते. असा तो विश्वबंधू परमात्मा यांचा तू द्वेष करतो आहेस. मी आता परत जाणार नाही म्हणाली. दक्षाची कन्या म्हणूनच मला शंकर हाक मारणार. तुझं नाव सुद्धा मला नको आहे आता.'' याप्रमाणे त्या सतीने...

***
पान १३३

...देव ऋषि यांच्या सर्वांच्या सभेमध्ये आपल्या पित्याची निर्भर्त्सना केली. ""हे शरीर आता मला ठेवायचं नाही. माझ्या शरीराशी तुझा संबंध असल्यामुळे हे शरीर मला नाहीसं करायचं आहे.'' असं रागाने ती सती बोललेली आहे. त्या मंडपामध्ये आसन घालून बसून राहिलेली आहे. योगमार्ग तिला पूर्ण माहिती आहे. भगवान शंकरांची ती पत्नी आहे. शरीर विसर्जन कसं करायचं? सगळं तिला माहिती आहे. आचमन केलं तिने. पितांबर नेसलेली होती. डोळे झाकून घेतलेले आहेत. सर्व ऋषीमंडळी, देवमंडळी पाहताहेत. काय करणार आहे ही सती. शरीरामध्ये असणारा जो अग्नी आहे तो अग्नी तिने प्रदीप्त केला. ज्ञानेश्वर महाराजांनीही तो अग्नी प्रदीप्त केला होता म्हणतात पाठीवर. त्यांना मुक्ताबाईंनी मांडे भाजून दिले. तसं आहे. तो अग्नी प्रदीप्त केला. प्राणवायूलाही उर्ध्वगती प्राप्त झाली. एकदम तो अग्नी भडकलेला आहे आणि त्या सतीचं शरीर भस्म होऊन गेलेलं आहे.

मग मात्र सर्व मंडळी घाबरलेली आहेत. सतीचा देह भस्म झाला, सर्व देवमंडळींना भीती उत्पन्न झाली की हा दक्षप्रजापती काय म्हणतो आहे, ब्रह्मदेवाने त्याला सृष्टीचा अधिकारी काय नेमलेलं आहे. मुलीकडे आपल्या प्रत्यक्ष पोटाच्या मुलीकडे लक्ष नाही. मुलीने प्राणत्याग केला तरी याच्या मनावर काही परिणाम नाही. शंकरांचे गण होते ते रागाने दक्षाला मारण्याकरता धावून गेले असतांना भृगुऋषींनी दक्षिणानीमध्ये होम केला. त्या होमबलाने होमातून पुष्कळ सैन्य बाहेर पडलं. त्यांनी शंकरांच्या गणांचा पराभव केला. ते कैलासपर्वतावर पळून गेले. मैत्रेय सांगतात विदुरजी,

भवो भवान्या निधनं प्रजापतेः ।
असत्कृतायाः अवगम्य नारदात् ।।
4.5.1 ।। श्री. भा.

नारद गेले कैलास पर्वतावरती, शंकरांना त्यांनी हा वृत्तांत सांगितला. प्रत्यक्ष बापाने, प्रजापतीने सतीचा अपमान केल्यामुळे त्या सतीने योगबलाने आपल्या देहाचं विसर्जन केलेलं आहे, योगसामर्थ्याने. आत्महत्या म्हणत नाहीत याला. योगसामर्थ्याने शरीर टाकता आलं पाहिजे किंवा शत्रूबरोबर लढाई करताना शरीर टाकता आलं पाहिजे म्हणजे त्याला उत्तम गती मिळते. ""तुमच्या सैन्याचा पराभव झालेला आहे.'' हे ऐकल्यावर शंकरांना राग आलेला आहे. त्यांनी आपली जटा भूमीवर टाकली. त्या जटेपासून एक मोठा पुरुष निर्माण झालेला आहे. सहस्त्रबाहू त्याला आहेत. वीरभद्र नावाचा आणि त्याने प्रार्थना केली, विनंती केली, काय आज्ञा आहे महाराज.

शंकरांनी सांगितलं,

***
पान १३४
दक्षं सयज्ञं जहि मद्भटानां त्वमग्रणी रुद्र भटांशको मे ।।
4.5.4 ।। श्री. भा.

""जा तो दक्ष आणि त्याचा यज्ञ सर्वांचा नाश करून ये. तू माझाच अंश आहेस'' म्हणाले. निघाला तो वीरभद्र. शंकरांचे गणही त्याच्याबरोबर निघालेले आहेत. त्रिशूळ हातामध्ये घेतलं आणि तो यज्ञाचा नाश करण्याकरता, दक्षप्रजापतीचा नाश करण्याकरता निघालेला आहे. मोठा ध्वनी उठलेला आहे. ते सैन्य येतं आहे. ही मंडळी, देवमंडळी भीतीग्रस्त झाली. काय होणार कोणाला ठाऊक. सर्व विश्वाचा प्रलय करण्याचं सामर्थ्य या भगवान शंकराचं आहे. त्याच्या पत्नीचा नाश झाला. काय या दक्षप्रजापतीला शिक्षा होणार? घाबरले सगळे. अशी सगळी मंडळी भीतीग्रस्त झालेली असताना, शंकरांचे सैन्य, गणसैन्य त्या यज्ञमंडपामध्ये घुसलेलं आहे. यज्ञमंडपात आल्याबरोबर आधी सगळ्या ऋषींना बांधून ठेवलं. पुन्हा मंत्राने यज्ञकुंडातून सैन्य त्यांनी निर्माण करू नये म्हणून. दक्षाला बांधून ठेवलेलं आहे वीरभद्राने. यज्ञकुंड सगळी मोडून तोडून टाकलेली आहेत. असं सर्व लोकांना त्रास झाला. देवांवर शस्त्रास्त्र प्रहार केलेले आहेत. देव पळून गेले यज्ञमंडपातून ब्रह्मदेवांच्याकडे. दक्षप्रजापतीला मारण्याचा प्रयत्न केला तो काही मरू शकला नाही. वीरभद्राने त्या दक्षाचा कंठ दाबून प्राण घेतला. त्याचे शिरच्छेद करून मस्तक अग्निकुंडामध्ये टाकून दिलेलं आहे. सर्व यज्ञमंडप जाळून टाकलेला आहे आणि तो वीरभद्र सर्व सैन्य बरोबर घेऊन कैलासपर्वतावर निघून गेला.

मैत्रेय सांगतात विदुरजी, सर्व देव जखमी झालेले आहेत. कोणाचं डोकं फुटलं, कोणाचे हात मोडले, पाय मोडले. ब्रह्मदेवांना हे सर्व शरण आलेले आहेत. सर्व देव या यज्ञाकरता आले होते. पण ब्रह्मदेव आणि विष्णू मात्र आले नव्हते. यांना अशी घटना होणार आहे याची कल्पना असावी. ब्रह्मदेवांच्या लोकामध्ये जाऊन सर्वांनी हा घडलेला वृत्तांत सांगितला. ब्रह्मदेव देवांना म्हणताहेत, दक्षप्रजापतीपेक्षा खरे तुम्ही दोषी आहात. तुम्हाला त्यांनी बोलावलं होतं. शंकरांना बोलावलं नाही. तुम्ही त्याला सांगायला नको होतं की शंकरांना तू बोलावून आण. त्यांची क्षमा माग. तर आम्ही तुमच्या यज्ञातला हविर्भाग घेऊ नाहीतर घेणार नाही. स्वार्थी म्हणाला तुम्ही. शंकर आले काय आणि नाही आले काय? तुमचीच याला संमती होती असं झालं. तुम्हाला जर हा यज्ञ पुन्हा व्यवस्थित व्हावा असं वाटत असेल, तर शंकरांची क्षमा तुम्ही मागितल्याशिवाय हे काही होणार नाही. सर्व देवांना आज्ञा केली. त्या देवांना बरोबर घेऊन ब्रह्मदेव हे कैलासपर्वतावर जाण्याकरता निघालेले आहेत.

***
पान १३५
[Image: daksacur.JPG - दक्षाचा विनाश]

कैलासपर्वताच्या जवळ आले आहेत. सर्वांनी पाहिला तो. अनेक मोठीमोठी सिद्धमंडळी याठिकाणी आहेत. जन्मतः सिद्धी कोणाला आहे. बृहस्पतीमुळे सिद्धी आहे. वनस्पतीमुळे सिद्धी आहे, तपाने आहे, मंत्राने आहे, योगाने आहेत. अनेक मोठेमोठे योगीपुरुष आहेत, गंधर्व आहेत, अप्सरा आहेत. अशा त्या कैलासपर्वताच्याजवळ देवमंडळी, ब्रह्मदेव येऊन पोहोचलेले आहेत. मोठेमोठे वृक्ष आहेत, अरण्यं आहेत. त्याचप्रमाणे कुबेराची नगरी, अलकावती या नगरीजवळ आलेले आहेत. पुष्प, कमलाचं वन त्या ठिकाणी त्यांनी पाहिलेलं आहे. नंदा, अलकनंदा दोन नद्या वाहात आहेत बाहेर. असं ते सर्व पाहून त्या पलिकडे कैलास पर्वतावर ते सर्व येऊन पोहोचलेले आहेत. मोठा वटवृक्ष आहे, विशाल वृक्ष आहे. त्या वृक्षाखाली भगवान शंकर बसलेले आहेत. सर्वही मोठे मोठे सनतकुमार, सनातन, सनक, सनंदन, नारद सर्वही मोठी मोठी मंडळी भगवान शंकरांच्याजवळ बसलेली आहेत. काहीतरी संभाषण चाललेलं आहे. त्यांना मार्गदर्शन करताहेत भगवान शंकर. सर्व विद्या आहे, योग आहे, तप आहे. सर्वही भगवान शंकरांच्याजवळ आहे. असा तो विश्वामित्र त्यांना पाहिलेलं आहे. मांडी घालून बसलेले आहेत. नारदांच्या बरोबर काही भाषण करताहेत शंकर. हे पाहिल्याबरोबर सर्व देवांनी शंकरांना साष्टांग नमस्कार केलेला आहे. शंकरांनी पाहिले, ब्रह्मदेव आले. एकदम उठून उभे राहिले. या देवा, केव्हा आलात तुम्ही? या बसा म्हणाले. त्यांचा सत्कार केला. ब्रह्मदेव म्हणतात सर्व विश्व निर्माण करण्याची, पालन करण्याची, संहार करण्याची शक्ती आपल्याजवळ आहे. विश्व उत्पन्न करणं, पालन करणं, संहार करणं हे सामर्थ्य...

***
पान १३६

...आपलं आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष सर्व पुरुषार्थ देण्याचं सामर्थ्य आपल्याजवळ आहे. सर्वही पुण्यकर्म जी चालू आहेत जगामध्ये त्या सगळ्याला आपलं सहाय्य आहे, प्रेरणा आपली आहे. तेव्हा आपली मोठी शक्ती आहे. हा जो दक्षप्रजापतीचा यज्ञ बंद पडलेला आहे, तो यज्ञ पुन्हा सुरू व्हावा या इच्छेने सर्व देव आपल्याला शरण आलेले आहेत. प्रार्थना करताहेत, क्षमा मागताहेत. यज्ञातला शिल्लक राहिलेला जो भाग आहे तो हविर्भाग सगळा आपला आहे. कोणत्याही यज्ञामध्ये शिल्लक राहिलेलं म्हणजे आपलं असं समजायचं नाही. यज्ञातला शिल्लक राहिलेला भाग शंकरांचा आहे. ब्रह्मदेवानं ठरवून टाकलेलं आहे. लवकर चला आमची विनंती मान्य करा. आपण जाऊ या त्या यज्ञस्थानामध्ये दक्षप्रजापती तर मेलेला आहे. त्याला जिवंत करावं लागेल तुम्हाला. आणि हा यज्ञ पुन्हा पूर्वीप्रमाणे चालू करून द्यावा लागेल. प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनी प्रार्थना केली. हसले भगवान शंकर.

नाहं प्रजेश बालानां वर्णये नानुचिन्तये ।
देवमायाभिभूतानां दण्डस्तत्र धृतो मया ।।
4.7.2 ।। श्री. भा.

ब्रह्मदेवा, दक्षासारखी मंडळी म्हणजे अगदी अज्ञानी आहेत. त्यांनी काय केलं? कसं वागावं? याचा विचार करण्याची मला काही जरूर नाही. फार उन्मत्त झाला होता तो. आपली मुलगी गेली डोळ्यादेखत तरी त्याच्या मनावर काही परिणाम झाला नाही. आता आपण आला आहात तर जाऊ या. यज्ञाला आरंभ करू या. पण त्या दक्षाचं मस्तक जळून गेलेलं आहे. तेव्हा

भवतु अजमुखं शिरः ।।
4.7.3 ।। श्री. भा.

त्याठिकाणी जो अज आहे, बोकड आहे त्याचं मस्तक त्याला जोडा म्हणाले. भृगुऋषींचे डोळे गेलेले आहेत. दुसऱ्याच्या नेत्राने त्याला पाहता येईल. अशी काही व्यवस्था केली आणि शंकर निघालेले आहेत. यज्ञ मंडपात जाऊन पुन्हा यज्ञ सुरू करायचा. ब्रह्मदेव सर्व देवांना शंकरांना बरोबर घेऊन त्याठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्या पशूचं मस्तक त्या दक्षाच्या धडाला जोडलेलं आहे. शंकरांनी अमृतदृष्टीने त्याच्याकडे पाहिल्याबरोबर एकदम तो जिवंत झालेला आहे. समोर पाहतो आहे. भगवान शंकर समोर आहेत. पश्चात्ताप झाला त्याला. आपली कन्याही, आणखी देहत्याग तिने केलेला आहे. याची आठवण झाली आणि पश्चात्ताप झालेला आहे. शंकरांना नमस्कार केला. क्षमा मागतो आहे. देवा, आपण मला दंड केला असं मी समजत नाही. माझ्यावर कृपा आपली झालेली आहे. माझा अहंकार सगळा दूर झालेला आहे. विद्या, तप यांनी संपन्न झालेले जे महात्मे आहेत त्या सर्वांचं संरक्षण करणारे आपण आहात. त्या सर्वांना मार्गदर्शन...

***
पान १३७

...करणारे आहात. आपली निंदा माझ्याकडून झालेली आहे. अतिशय मी पापी आहे. दोषी आहे. क्षमा करावी अशी प्रार्थना त्याने केली. मग ब्रह्मदेवांच्या आज्ञेप्रमाणे पुन्हा पहिल्यापासून यज्ञाला आरंभ झालेला आहे. भगवान विष्णूंचं आवाहन ब्राह्मणांनी केलं. त्यांना हविर्भाग द्यायचा आहे. ते आले नव्हते. आत्तापर्यंत त्यांचा तो पुरोडाश त्यांना देण्याकरता तयार केला आणि त्यांचे आवाहन केल्याबरोबर श्रीहरी त्या यज्ञमंडपामध्ये प्रकट झालेले आहेत. त्यावेळी सर्वही मंडळी उठून उभी राहिली, देव ऋषि सर्वांनीही भगवान विष्णूंची पुष्कळ स्तुती केलेली आहे. सर्व ऋषि मंडळी दक्ष प्रजापतींनी स्तुती केली. भगवान रुद्राने स्तुती केली. ब्रह्मदेव, इंद्र, यज्ञपत्नी सर्व एकंदर यज्ञातले ब्राह्मण, सर्वांनीही भगवान श्रीहरींची स्तुती केली. भगवंतांनी आपला हविर्भाग ग्रहण केलेला आहे. दक्ष प्रजापतीला थोडासा उपदेश केला. सर्व मंडळी ऐकताहेत -

अहं ब्रह्मा च शर्वश्च जगतः कारणं परम् ।
आत्मेश्वर उपद्रष्टा स्वयंदृग्‌ अविशेषणः ।।
4.7.50 ।। श्री. भा.

दक्षा, सर्वही विश्वाचं कार्य करणारे आम्ही तिघे आहोत म्हणाले. पण तिघे असूनसुद्धा एकच आहोत. उत्पन्न करण्याचं कार्य करणारे ब्रह्मदेव, रक्षण करण्याचं कार्य करणारे विष्णू, संहार करण्याचं कार्य करणारे शंकर. म्हणजे तिघेही भिन्न नाहीत. आम्ही तिघे एकच आहोत. विश्वाचं कार्य करतो आहे. या तिघांच्या ठिकाणी एक ईश्वरबुद्धी ज्याची आहे त्यालाच शांती प्राप्त होते.

यथा पुमान् स्वाङ्गेषु शिरःपाण्यादिषु क्वचित् ।
पारक्यबुद्धिं कुरुते एवं भूतेषु मत्परः ।।
4.7.53 ।। श्री. भा.

तिघे म्हणजे एक ईश्वर आहे असं नाही. तर सर्व विश्व, सर्व प्राणीमात्र म्हणजे ईश्वररूप आहे, ही भावना असली पाहिजे. स्वतःचं शरीर स्वतःचं आहे म्हणाले. हात वेगळे, पाय वेगळे, डावा हात निराळा, उजवा हात निराळा, मस्तक आहे, डोळे आहेत कितीतरी अवयव आहेत. पण हे सर्व अवयव मिळून एक शरीर आहे. ही बुद्धी ठेवली म्हणजे सर्व कार्य व्यवस्थित होतं. हात प्रधान आहे, पायाचा काही संबंध नाही असं जर भिन्न भिन्न भावना जर ठेवली तर व्यवहार कसा होईल? सर्व अवयव मिळून एक शरीर आहे ही दृष्टी उत्पन्न झाली पाहिजे. तरच व्यवहार चांगला होतो आणि शांती राहते. तसं त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू, महेश हे ही एक ईश्वररूप आहेत, ही भावना धारण केली पाहिजे म्हणाले. तू मोठा अधिकारी, सृष्टीतला अधिकारी म्हणून नेमलं तुला ब्रह्मदेवांनी तुझी अशी बुद्धी! शंकरांच्याबद्दल इतका तिरस्कार उत्पन्न होण्याचं काय कारण आहे? विष्णूची भक्ती...

***
पान १३८

...करणारे शंकरभक्तांचा द्वेष करतात. शंकरांची भक्ती करणारे विष्णूभक्तांचा द्वेष करतात. ह्याला काय भक्तीमार्ग म्हणतात का? सर्व ठिकाणी ईश्वरदृष्टी पाहिजे. तरच शांती आणि फळ मिळतंय.

याप्रमाणे दक्षप्रजापतीचं समाधान केलं. सर्वांच्या समक्ष हे भाषण विष्णूंनी केलेलं आहे. सर्वांच्याही मनामध्ये शंकरांच्याबद्दल आदरभाव निर्माण केलेला आहे. आम्ही आणि शंकर वेगळे नाहीयेत हे सांगितले.

अशा रितीने सतीचं चरित्र मैत्रेय महर्षींनी विदुरजींना निवेदन केलेलं आहे. ती सती शंकरांची आज्ञा नसताना यज्ञाला आलेली आहे, माहेरी आलेली आहे. पण तिला पश्चात्ताप झाला. प्राणत्याग तिने केला. ती पुन्हा हिमालयाची कन्या झाली आहे, पार्वती या नावानं. अपर्णा तिला म्हणतात. शंकरच पती प्राप्त व्हावेत म्हणून तिने तपश्चर्या केली. शंकरांनी परीक्षा तिची केली आणि मग तिचा स्वीकार केलेला आहे. असं हे सतीचं पवित्र चरित्र, भगवान शंकरांचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. हे श्रवण केलं असतांना सर्वही पातकांचा क्षय होतो आहे असं मैत्रेयांनी विदुरजींना वर्णन केलेलं आहे.

यानंतर आता एका बालकाचं चरित्र आहे. भारतामध्ये स्त्रियाही मोठ्या झालेल्या आहेत, पतिव्रता. ते सांगण्याकरता सतीचं चरित्र सांगितलं. आता ध्रुव चरित्र सांगताहेत मैत्रेय महर्षी.

स्वायंभुव मनूच्या वंशामध्ये त्याचे दोन पुत्र म्हणजे प्रियव्रत आणि उत्तानपाद हे दोघे, संरक्षण करण्याचं राज्य करण्याचं कार्य पित्याच्या आज्ञेप्रमाणे करताहेत. उत्तानपाद राजाची कथा प्रथम सांगताहेत. उत्तानपाद राजाला सुनीती आणि सुरुची अशा दोन स्त्रिया होत्या. नावाप्रमाणे उत्तम नीतीसंपन्न, धर्माधर्माचा पूर्ण विचार करणारी, संसाराबद्दल जिच्यामनामध्ये काहीही आसक्ती नाहीये, अशी सुनीती होती. तिचा मुलगा म्हणजे ध्रुव आहे. आणि दुसरी सुरुची. संसारसुखाकडेच जिचं लक्ष आहे. योग्यायोग्य विचार करण्याचं काही तिला काही साधलेलं नाही. अशा प्रकारची ती आहे. पण पतीला ती प्रिय आहे. सुनीती मात्र नावडती आहे. उत्तानपाद राजा सिंहासनावर सभेमध्ये बसलेला आहे, सुरुची त्याच्याजवळ बसलेली आहे. अशावेळेला त्या सुरुचीचा मुलगा उत्तम नावाचा, तोही पाच वर्षाचा आहे. तो बाहेरून आला. मुलं खेळत होती. तिथून धावत धावत आत आला. सिंहासनावर चढून आपल्या बापाच्या मांडीवर जाऊन बसला. त्या ध्रुवालाही वाटलं आपणही पित्याच्या मांडीवर जाऊन बसावे. तोही आला धावत. सिंहासनाच्या जवळ येण्याअगोदर ती सुरुची त्याची सावत्र माता आहे. हा काही आपला सख्खा मुलगा नाही. तिने...

***
पान १३९

...त्याला सांगितलं, ध्रुवा थांब म्हणाली. या सिंहासनावर बसण्याचा तुला अधिकार नाही. बालवय आहे. अधिकार, अनाधिकार, मान, अपमान, योग्य, अयोग्य हे सगळं वय मोठं झाल्यावर. त्या मोठ्या वयामध्ये मनात विचार येतात. योग्य असतात की नाही हा निराळा विषय आहे. बालबुद्धी आहे. सर्वठिकाणी त्याची प्रेमबुद्धी आहे. आदरबुद्धी आहे. ही पण आपली आई आहे. या माझ्या भावाला येण्याला परवानगी दिली. मलाही मिळेल. मला देवाने दोन माता दिलेल्या आहेत. असं तो समजत होता. सावत्र किंवा सख्खी ही त्याची बुद्धी नाहीये. ती सुरुची म्हणाली या सिंहासनावर तुला बसता येणार नाही. अधिकार नाही तुला. कारण काय सांगते आहे. माझ्या गर्भातून माझ्या उदरातून तुझा जन्म झालेला नाही. हे कारण आहे त्याला. तुला हे कळायचं नाही म्हणाली. दुसऱ्या स्त्रीपासून तुझा जन्म झालेला आहे तेंव्हा या सिंहासनावर बसण्याचा तुला अधिकार नाही. तुला जर या सिंहासनावर बसायची इच्छा असेल तर भगवान श्रीहरीची उपासना कर. प्रार्थना कर. त्यांचा वर मिळव. माझ्या उदरातून जन्म घे आणि मग या सिंहासनावर बस. ध्रुव, पाच वर्षाचा मुलगा, तो नुसता बसला असता तर सिंहासन त्याच्या मालकीचं झालं असतं काय? पण काय विलक्षण अहंकार आहे. ह्या अहंकारामुळे काय आपण बोलतो, कोणाला बोलतो, योग्य कसं आहे काही विचार नाहीये.

थांबला ध्रुव बिचारा, त्याने आपल्या पिताजीकडे पाहिले. त्याला जसं जवळ घेतलं तसं उत्तानपाद राजानं याला जवळ घेतलं असतं तर ती काय करणार होती? पण तोही गप्प बसून राहिलेला आहे. हाही अपराध दोष होतो आहे. मोठेपणा जरी असला तरी मोठेपणा कुठे वापरायचा. स्पष्टपणा कुठे दाखवायचा, निग्रही कुठे व्हायचं, अनुग्रह कोठे करायचा, हे सर्व समजले पाहिजे ना. तोही विवेक त्या उत्तानपाद राजाच्या मनात आला नाही. तोही गप्प बसून राहिला. एकदा वाट पाहिली थोडी. डोळ्यातून अश्रुधारा त्या बालकाच्या सारख्या चालू झाल्या. नाही पिताजींचीही इच्छा दिसत नाही. परतला बिचारा. आईकडे निघालेला आहे. त्याच्या आईला हा सर्व प्रकार कोणीतरी जाऊन सांगितला. तुमच्या मुलाचा अपमान केलेला आहे त्या सुरुचीने. रडू लागली. तो मुलगा रडत आलेला आहे. त्याला पोटाशी धरलेलं आहे. तीही रडती आहे आणि तो ध्रुवही रडतो आहे. पण ती सुनीती अत्यंत धैर्यसंपन्न होती. धर्माचरणावर परमेश्वरावर तिचा विश्वास होता. आपला शोक तिने आवरलेला आहे. तिने सांगितले, ध्रुवा, खरं आहे म्हणाली. तुझी जी माता आहे तिने तुला सांगितलं ना, सिंहासनावर बसण्याचा तुझा अधिकार नाहीये. खरं आहे हे. माझ्यासारख्या दुर्दैवी स्त्रीच्या गर्भातून तुझा जन्म झालेला आहे. राजेसाहेबांचंही आमच्याकडे लक्ष...

***
पान १४०

...नाही. तुमच्याकडे लक्ष नाहीये. जाऊ दे म्हणाली. तुझ्या सावत्र आईने सांगितलेलं आहे की तू वनामध्ये जाऊन हरीची आराधना कर. चांगलं आहे म्हणाली. तिने मार्गदर्शनच केलेलं आहे. अरण्यामध्ये जाऊन परमेश्वरावर सर्व भार घाल म्हणाली. तुझं कार्य होईल. काही काळजी करण्याचं कारण नाही. ब्रह्मदेवांनी श्रीहरीची आराधना केली आणि त्यांनी ब्रह्मलोकाचं स्वामित्व मिळवलेलं आहे. तुझे पितामह राजेसाहेब मनू यांनीही अनेक यज्ञ भगवंताच्या प्रसादाकरता केले. त्यांनाही हे सबंध पृथ्वीचं राज्य मिळालेलं आहे. त्या परमेश्वराला तू शरण जा. भक्तवत्सल परमात्मा आहे, अनन्य भावाने आपल्या धर्ममर्यादेचं पालन करणारा जो भक्त आहे त्याच्या सर्वही इच्छा पूर्ण करण्याला भगवान समर्थ आहे. त्याच्याशिवाय दुसरा कोणीही मला या संकटातून मुक्त करणारा दिसत नाही. सर्वही जिची इच्छा करतात ती लक्ष्मीदेवी भगवंताच्या चरणाची सेवा करत त्या ठिकाणी राहिलेली आहे.

मैत्रेय सांगतात, विदुरजी, पाच वर्षाचा बालक आहे तो, अद्यापि मुंज नाही काही नाही. अपमान झालेला आहे आणि आईनेही त्याला प्रोत्साहन दिलेलं आहे. जा म्हणाली वनामध्ये जा. सर्व भार त्या ईश्वरावर टाक. लहान वयामध्ये त्या बालकाची मनाची तयारी केवढी आहे. ईश्वर म्हणजे काय वगैरे काही कल्पना त्या वयामध्ये नसणार. आईचं मार्गदर्शन आहे. आईचा संकल्प आहे की ईश्वराच्या कृपेनेच काय मिळायचं ते मिळेल दुसरे काही नको आता. निघालेला आहे ध्रुव. बाहेर पडला. आईला नमस्कार केला. आज्ञा घेऊन तो बाहेर पडला. अरण्याचा रस्ता धरला. नारद महर्षींना ते समजले. नारद सामोरे आले. ध्रुवा कोठे निघालास? प्रेमाने जवळ आले. मस्तकावर हात ठेवला. काय म्हणाले, क्षत्रियांचं तेज किती विलक्षण आहे. थोडासुद्धा अपमान क्षत्रियांना सहन होत नाही. हा लहान बालक आहे. पण सावत्र आई बोलली काय आणि याच्या मनावर इतका परिणाम झाला काय? अरण्यामध्ये हा निघाला आपल्या आईला सोडून.

नारद म्हणतात, ध्रुवा अरे, कोठे निघालास तू? या वयामध्ये मान अपमानाची कल्पना तुला कशी आली म्हणाले. हे काय मान अपमानाच्या कल्पनेमध्ये जर मन गुंतून राहिलं तर त्याला शांती कधीही मिळणार नाही. जी जी स्थिती आहे त्याप्रमाणे समाधान मानून राहिलं पाहिजे. कोणी सांगितलं तुला जायला वनामध्ये? आईने सांगितले आहे म्हणाला. आईला काय समजते काय? इतक्या लहान वयात तू वनात जाऊन काय करणार? मोठेमोठे ऋषी तपश्चर्या करतात, हजारो वर्ष. त्यांना देवाचं दर्शन होत नाही म्हणाले. तू जाऊन काय करणार? तपश्चर्या म्हणजे काय...

« Previous | Table of Contents | Next »