« Previous | Table of Contents | Next »
पान १४१
[Image: dhruva_1.JPG - ध्रुव तपश्चर्या]

...करणार? त्याची परीक्षा पाहताहेत नारदमहर्षी. ""चल'' म्हणाले ""माझ्याबरोबर. मी सांगतो तुझ्या बापाला. सिंहासनावर बसण्याची तुझी इच्छा असेल तर बैस'' म्हणाले. व्यवहारामध्ये कसं वागावं हे शिकलं पाहिजे. व्यवहार सोडून जाता येत नाहीये. निश्चय आपला टिकणारा आहे की नाही हे पाहिलं पाहिजे ना. अपमानामुळे तुला राग आलेला आहे. तर हा निश्चय तुझा टिकेल की नाही हा विचार तू केलास का? व्यवहारामध्ये आपल्यापेक्षा श्रेष्ठ काही मंडळी असतात. आपल्या बरोबरीची मंडळी असतात. आपल्यापेक्षा कमी दर्जाची मंडळी असतात. तीन प्रकारची माणसं असतात. श्रेष्ठ मनुष्य भेटल्याबरोबर अत्यंत नम्रपणाने आणि आदरभावाने त्याच्याजवळ वागावं. आपल्याबरोबरीचा जो आहे त्याच्याशी प्रेमाने वागावं आणि आपल्यापेक्षा कमी दर्जाचे जे आहेत त्यांच्याशी दयावृत्तीने वागावे, त्यांना सहाय्य करावं. त्यांची संकटं दूर करण्यासाठी प्रयत्न करावा. असं जर वागणं आपलं ठेवता आलं तर कशाला त्रास होईल म्हणाले. घरदार सोडून अरण्यात जाण्याची गरज काय आहे म्हणाले. तेव्हा माझ्याबरोबर चल. तुला मी घेऊन जातो. पण ध्रुवाचा निश्चय झालेला आहे. हा निश्चय होण्याकरताच अनेक जन्म घ्यावे लागतात. ईश्वराचं दर्शन झालं पाहिजे. मागायचं आहे. काही न मागणं ही गोष्ट फार मोठी आहे. पण मागायचं झालं तर देवाशिवाय कोणालाही मी मागणार नाही. हाही मोठा निश्चय आहे. दाता एक रघुनंदन, तोच एक...

***
पान १४२

...समर्थ आहे. तोच एक आपल्या भक्ताची काळजी वाहण्यास योग्य आहे. सर्वच प्रकारांनी भक्ताला मुक्त करणारा समर्थ आहे. याप्रमाणे नारदांनी ध्रुवाला सर्व सांगितलं. माझ्याबरोबर चल म्हणाले. त्याला भीतीही घातली. अरण्यात जाऊन तू काय करणार? किती दिवस तुझा हा निश्चय राहिल म्हणाले. पण त्याचा पक्का निश्चय झालेला आहे. त्यानी सांगितलं की ऋषीमहाराज, आपण जो काही शांतीचा मार्ग मला दाखवलेला आहे, योग्य आहे. सुखदु:खामध्येच जे गुंतलेले लोक आहेत अशा संसारी जीवांना हा मार्ग बरोबर आहे. त्यांनी असंच वागून समाधान मानलं पाहिजे. पण मला मात्र हे पटत नाहीये. ती सुरुची मला बोललेली आहे. माझा अधिकार नाही म्हणाली. मला परत यायचं नाही.

पदं त्रिभुवनोत्कृष्टं जिगीषोः साधु वर्त्म मे ।
ब्रूहि अस्मत् पितृभिर्ब्रह्मन् अन्यैरपि अनधिष्ठितम् ।।
4.8.37 ।। श्री. भा.

""त्रिभुवनामध्ये जे सर्वश्रेष्ठ स्थान आहे ते मला मिळावं या इच्छेने मी निघालो आहे. आमच्या पित्याने किंवा बंधूंनी आपला अधिकार त्या स्थानावर सांगून उपयोग नाही. माझ्या मालकीचं स्थान मला मिळालं पाहिजे. हे उष्टं राज्य मी घेणार नाही. हे सिंहासन याच्यावर मला बसायचं नाही. अपमान झाला तरी तो अपमान इतका मनाला जाणवला पाहिजे की तिकडे लक्षसुद्धा नाही. हे एकप्रकारे वैराग्यच आहे. हे राज्य मी घेणार नाही म्हणालो. सांगा आपण. मार्गदर्शन तुम्ही करा. तुम्ही समर्थ आहात. तुम्ही मनावर घेतल्यावर मला अशक्य काय आहे?'' मैत्रेय सांगतात विदुरजी, नारदांना समाधान झाले. हा अधिकारी आत्मा आहे. ईश्वराचं दर्शन याला होणार. सांगितलं, ""बाळ तुझ्या आईने जो मार्ग सांगितला तोच मार्ग आहे.''

धर्मार्थकाममोक्षाख्यं य इच्छेच्छ्रेय आत्मनः ।
एकमेव हरेस्तत्र कारणं पादसेवनम् ।।
4.8.41 ।। श्री. भा.

संसारात राहून अपमान सहन केलाच पाहिजे. कोणाबरोबर कसं वागावं सगळं नारदांनी सांगितलं. नारद सांगताहेत, धर्म, अर्थ, काम, मोक्ष चारही पुरुषार्थ, हे परमात्म्याच्या कृपेने चालू आहेत. नारदांची पूर्ण कृपा झाली त्याच्यावर. आपल्या संकल्पाने त्या बालकाचा निश्चय जास्त दृढ केलेला आहे. आणि त्याला मार्गदर्शन केलेलं आहे. मधुवनामध्ये जा, यमुनातीरावर, त्रिकालस्नान करत जा आणि आसन घालून प्राणायाम वगैरे करून मन शुद्ध स्थिर करून घे. भगवान श्रीहरींच्या स्वरूपाचं ध्यान तू कर. सगळं सांगत गेलेले आहेत नारद. शब्दांमध्ये केवढी शक्ती आहे. त्या...

***
पान १४३

...बालकावर कृपा नारदांनी केली. असे सद्गुरू, समर्थ सद्गुरू भेटणं हे किती जन्माचं त्या ध्रुवाचं पुण्य आहे. ध्यान करत जा रोज म्हणाले. भगवंताचं स्वरूप त्यांनी वर्णन केलं. त्या स्वरूपाचं अखंड ध्यान तू सुरू केलंस की पूर्ण शांती तुला मिळेल. समाधान मिळेल. मंत्रदीक्षा त्याला दिली. द्वादशाक्षरमंत्राचा उपदेश त्याला केलेला आहे. याचा जर तू जप करशील तर सात दिवसांमध्ये आकाशमंडलात संचार करणारे जे सिद्ध महात्मे त्यांची भेट तुला होईल. दर्शन होईल. काही मूर्ती, शीलामूर्ती, धातूची मूर्ती म्हणा कोणत्या तरी मूर्तीची पूजा तू करत जा. जे अरण्यामध्ये उपचार मिळतील, तुलसीपत्र, बेल, फुलं जे मिळेल त्यांनी देवाची पूजा करावी हेही त्याला सांगितले आहे. शरीराने, मनाने, वाणीने अखंड देवाची सेवा करण्याकडे तुझं लक्ष राहू दे. तू सेवा कर. म्हणजे भगवंताची तुझ्यावर कृपा होईल असा त्याला आर्शिवाद दिलेला आहे. ""जा'' म्हणाले. पूर्ण आर्शिवाद दिला नारदमहर्षींनी. निघून गेले नारद. राजधानीमध्ये गेले. ध्रुव बालकही अरण्यात निघून गेलेला आहे.

राजधानीमध्ये राजवाड्यात नारदमहर्षी आले. राजा अगदी खिन्न होऊन चिंताक्रांत होऊन बसलेला आहे. राजाला पश्चात्ताप झालेला आहे. ""ऋषीमहाराज माझा बालक तुम्हाला कुठे दिसला का? आपण कोठून आलात? अनाथ, कुठे तरी झोप लागली आणि हिंस्त्र पशूंनी खाऊन टाकले तर काय करायचं? काय माझा अपराध किती झाला. ती स्त्री त्याला बोलली, मी तिकडे लक्षही दिले नाही. बिचारा माझ्या मांडीवर बसण्याची इच्छा करत होता. काही नाही तिकडे मी लक्ष दिले नाही.'' नारदांनी सांगितले, ""राजेसाहेब शोक करण्याचं तुम्हाला काय कारण आहे? तुमच्या मुलाचं संरक्षण तुम्ही करू शकला नाही ना? कोणीही कुणाचं संरक्षण करत नाही. तुमच्या मुलाचं संरक्षण करायला परमात्मा समर्थ आहे. त्याची कीर्ती जगामध्ये सर्वत्र पसरणारी आहे. तो लवकरच तुम्हाला येऊन भेटेल.'' राज्याकडे लक्ष नाही त्या उत्तानपाद राजाचं. पश्चात्ताप झालेला आहे. केव्हा आपला मुलगा परत येईल याची वाट पाहतो आहे.

इकडे ध्रुव बालक अरण्यामध्ये गेलेला आहे. संध्याकाळ झाली. मधुवनामध्ये यमुनानदीच्या तीरावर पोहोचलेला आहे. ऋषीमहाराजांनी काय काय सांगितले याचा मनामध्ये विचार केला. दुसरे दिवसापासून तपश्चर्येला आरंभ करण्याचं त्याने ठरविले. पहाटे उठलेला आहे. स्नान केलेलं आहे. परमेश्वराची पूजा त्याने केली. काही मूर्ती प्रतीक म्हणून पाषाण ठेवून पूजा केली. त्याने आपला आहाराचा नियम ठरवलेला आहे.

***
पान १४४
त्रिरात्रान्ते त्रिरात्रान्ते कपित्थबदराशनः ।
आत्मवृत्त्यनुसारेण मासं निन्येऽर्चयन् हरिम् ।।
4.8.72 ।। श्री. भा.

शरीर आहाराशिवाय राहणं शक्य नाही. अशी वस्तुस्थिती आहे. हा जो निश्चयी अशाप्रकारचा महात्मा जो आहे, ईश्वरदर्शनाची ज्याला तळमळ लागलेली आहे, त्याचं शरीराकडे लक्ष नाही. शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे ही भावना अधिक जर झाली तर शरीराकडेच लक्ष राहणार. औषध घ्यायला पाहिजे, पथ्यपाणी सांभाळायला पाहिजे, उत्तम चांगले पदार्थ खाल्ले पाहिजेत तरच शरीर राहिल. इकडेच जास्तीत जास्त लक्ष गेल्यानंतर ईश्वराचं चिंतन होणार केव्हा? ईश्वराच्या सामर्थ्याची कल्पना येणार कशी त्याला? संरक्षण करणारा ईश्वर आहे ही पक्की भावना कशी तयार होणार? औषधाने शरीर चांगलं राहिल इकडेच लक्ष राहणार. ध्रुवाने पहिल्या महिन्यामध्ये असा निश्चय केला, तीन दिवसांनी फलाहार करायचा. अन्न तर संपलेलं आहे. राजवाड्यातून ज्यावेळेला बाहेर पडला तो, त्यावेळेपासून अन्न मिळाले नाही त्याला. अरण्यामध्ये आल्यानंतर फळं वगैरे मिळत होती. पण त्याने ठरवले तीन दिवसानंतर चौथ्या दिवशी फलाहार करायचा. म्हणून नुसतं रोज फळं खाऊन राहिला नाही तो. एक महिना झालेला आहे. पूजा चालू आहे. ध्यान चालू आहे. मंत्रजप चालू आहे. सगळं चाललेलं आहे. तीन दिवसानंतर एकदा आहार आहे. तरीसुद्धा शरीरातील सामर्थ्य कमी झालेलं नाही. उत्साह, शक्ती आहे. मानसिक शक्ती याला कारण आहे. दुसऱ्या महिन्यामध्ये त्याने आहाराचा काल थोडा पुढे नेलेला आहे.

षष्ठे षष्ठे अर्भको दिने ।
तृणपर्णादिभिः शीर्णैः कृतान्नो अभ्यर्चयद्विभुम् ।।
4.8.73 ।। श्री. भा.

फळ घेत होता ते सोडून दिलं. झाडावरून खाली पडलेली पानं वगैरे आहेत ती भक्षण करायची ती सुद्धा सहाव्या दिवशी. तिसऱ्या दिवसाऐवजी सहाव्या दिवशी. पाच दिवस काही नाही. आणि पुन्हा पूजाअर्चा, ध्यानधारणा सगळं चालू आहे. तिसरा महिना सुरू झाला. निश्चय आणखी वाढत गेलेला आहे. 'तपसंतापे' तप याचा अर्थ शरीर कष्ट पुष्कळ, वाटेल तितके झाले तरी शरीराची आस्था कमी कमी झाली पाहिजे. त्याशिवाय भक्ती नाही, कर्म नाही, ज्ञान नाही काही नाही. शरीरात्मभाव आपण अनेक जन्म पक्का केलेला आहे. शरीर म्हणजे मी आहे हे कमी झालं पाहिजे. शरीरापेक्षा निराळा कोणी आहे, सर्व चालक तो आहे. ही भावना उत्पन्न होण्याकरता हा प्रयत्न आहे. तिसऱ्या महिन्यामध्ये त्याने ठरविले फळ नाही, पानं नाही काही घ्यायचं नाही. पाणी...

***
पान १४५

...तेवढं घ्यायचं. ते सुद्धा नवव्या दिवशी घ्यायचं. आठ दिवस पाणीसुद्धा नाही. सर्व कामं चालू आहेत व्यवस्थितपणाने. तपश्चर्या चालू आहे.

चतुर्थमपि वै मासं द्वादशे द्वादशेऽहनि ।
वायुभक्षः जितश्वासः ध्यायन् देवमधारयत् ।।
4.8.75 ।। श्री. भा.

चौथा महिना चालू झाला. पाणीही चौथ्या महिन्यात बंद केलं. बारा दिवसानंतर एकदा वायूचा आहार करायचा. वायूचा आहार करता येतो. त्यामुळे शरीर राहतं याची कल्पनासुद्धा आम्हाला नाहीये. वायू आत घ्यायचा म्हणजे श्वासोच्छवास बारा दिवस बंद असला पाहिजे. बाराव्या दिवशी श्वास घ्यायचाय. म्हणजे ही भूमिका त्याला मिळालेली आहे. कुंभक सिद्ध झालेलं आहे. प्राण स्थिर झालेला आहे. मनही स्थिर झालेलं आहे. बारा दिवसापर्यंत काही नाही. श्वासोच्छवास जोपर्यंत चालू आहे, प्राणवायूची क्रिया जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत शरीराला अन्न आणि पाणी याची जरुरी आहे. त्याशिवाय राहू शकत नाही. प्राणवायूचं चोवीस तास काम चाललेलं आहे. म्हणून भूक लागते, तहान लागते. ती प्राणाची क्रिया ज्यांची बंद झालेली आहे त्याला तहान कुठली व भूक कुठली? नऊ दिवसांनी काय बारा दिवसांनी काय? किंवा महिन्याने काय, त्याला कशाची अपेक्षाच नाहीये. श्वासजय झालेला आहे, प्राणजय झालेला आहे. परमेश्वराचं ध्यान अखंड चालू आहे. मन स्थिर झालेलं आहे. पाचवा महिना सुरू झाला. सर्व विश्वाला आधारभूत जो परमात्मा आहे त्याचं चिंतन चाललेलं आहे. दुसरं काही नाही, लक्ष कुठेही नाहीये. भगवंताच्या स्वरूपाचं अखंड चिंतन आहे.

आधारं महदादीनां प्रधानपुरुषेश्वरम् ।
ब्रह्म धारयमाणस्य त्रयो लोकाश्चकम्पिरे ।।
4.8.78 ।। श्री. भा.

सर्वही विश्वाला आधारभूत परमात्मा जो आहे तिकडे त्याचं चित्त गेले. अत्यंत शुद्ध चित्त झाल्यामुळे त्या सूक्ष्मस्वरूपाचं तो चिंतन करू शकतो.

श्वास बंद झालेला आहे. सर्व देवांचे श्वासोच्छवास बंद होण्याची पाळी आलेली आहे. समष्टीशी एकरूप त्यांचं चित्त झालं, त्याचा परिणाम समष्टीवर झालेला आहे. देव सगळे घाबरले वैकुंठ लोकाला गेले. भगवंतांना प्रार्थना करताहेत. काय झालं आम्हाला माहिती नाही म्हणाले आम्हाला काही श्वासोच्छवास घेता येईना. भगवंतांनी सांगितलं, मी निघालो म्हणालो आता. त्या बालकाचा श्वास बंद झाल्यामुळे तुमचे बंद झाले म्हणाले. स्वतःशी एकरूप त्याचं चित्त झालेलं...

***
पान १४६

...आहे. भिऊ नका, त्याला मी वरप्रदान करण्याला निघालो, म्हणून भगवान निघाले आहेत. सर्व देवमंडळी आपल्या लोकांना निघून गेली. मधुवनामध्ये भगवान श्रीहरी प्राप्त झालेले आहेत. हा डोळे झाकून उभा राहिलेला आहे. चिंतन चाललेलं आहे अखंड. सगुण स्वरूप काय, निर्गुण स्वरूप काय जे मनामध्ये येईल तिथं चित्त स्थिर आहे. मनात कोणती वासना नाहीये ना. हे योग्य हे अयोग्य आहे काही नाही, त्या मनाची सगळी एकंदर वासना संपलेली आहे. निवासन अंतःकरण झालं, पूर्ण स्थिर झालं. कोणत्याही स्वरूपाचं ध्यान जरी मनाने केलं तरी त्याबद्दल काही नाही. चित्त स्थिर आहे. डोळे झाकून उभा राहिलेला आहे.

भगवान समोर येऊन उभे राहिलेले आहेत. काही लक्ष नाही. भगवंतांनी त्याच्या बुद्धीमध्ये प्रवेश केला. आत जे स्वरूप होतं ते एकदम नाहीसे झाले, दिसेनासे झाले. ज्या सगुण स्वरूपाचं ध्यान तो करीत होता यावेळेला, ते स्वरूप दिसेनासं झाल्याबरोबर एकदम त्याने डोळे उघडले. बाहेर तेच स्वरूप आहे. आनंद झाला. साष्टांग नमस्कार त्या ध्रुवाने केलेला आहे. भगवंतांनी आपल्या हातातिल शंख त्याच्या गालाला लावलेला आहे. स्पर्श केला थोडासा. त्या स्पर्शामुळे त्याला दिव्य ज्ञान उत्पन्न झालेलं आहे. त्या अवस्थेमध्ये त्या ध्रुवाने पुष्कळ स्तुती केलेली आहे. तपश्चर्या झाली, पण तपश्चर्येचा कर्ता परमात्मा आहे. मी तपश्चर्या केलेली नाही, ही पहिली भावना त्यानी व्यक्त केली. शरीर आहे, इंद्रिय आहे, वाणी आहे, प्राणवायू आहे ही सगळी साधनं पाहिजेत ना तपश्चर्येला अनुकूल, त्याशिवाय तपश्चर्या कशी होणार? पण ही सगळीही साधनं, यांचे सगळे व्यवहार बंद करून वृत्ती सगळी यांची बदलून आपल्याकडे सर्व आपण लावून घेतलं हे! ही आपली शक्ती आहे! अंतर्यामी आपण आहात, शरीरामध्ये प्रवेश करून सर्व इंद्रियांना मनाला, प्राणवायूला सगळ्यांना प्रेरणा आपण केलीत. त्यामुळे ही तपश्चर्या घडलेली आहे. हे कर्तृत्व आपलं आहे, हे दिव्य ज्ञान आहे, हे खरं ज्ञान आहे. अहंकार पूर्ण गेलेला आहे त्या ध्रुवाचा! आपले जे भक्त आहेत, त्या भक्तांची संगती मला निरंतर घडावी आणि आपली भक्तीही दृढ व्हावी, अशी पुष्कळ स्तुती त्याने केलेली आहे. भगवान श्रीहरी सांगताहेत त्याला, ध्रुवा, तुझी इच्छा मला समजलेली आहे. तुला काय उच्च स्थान पाहिजे ना राहायला? ती सगळी योजना झालेली आहे बाळ! सर्व सप्तर्षी, नवग्रह, सर्व नक्षत्रमंडळ हे त्या स्थानाला प्रदक्षिणा करताहेत, फिरताहेत सारखे. असं जे ध्रुवपद आहे, ध्रुव म्हणजे स्थिर राहणारं. सर्वांना क्रिया आहे. ध्रुवपद मात्र निष्क्रिय आहे, स्थिर आहे. शेतामध्ये खांब असावा, त्याला बैल बांधलेलेत, मळणी चाललीये, ते त्याच्यासमोर फिरताहेत. तो खांब आपला पक्का आहे. तसं जे ध्रुवपद आहे, सर्व त्या ध्रुवपदाला प्रदक्षिणा करताहेत, फिरताहेत.

***
पान १४७

ते स्थान तुझ्याकरता आहे म्हणाले. तू जाऊन तिथे राहा. तुझा बंधू उत्तम जो आहे, सावत्र भाऊ, तो शिकारीकरता गेलेला असताना, एक यक्ष त्याला ठार मारणार आहे. आपल्या मुलाचा शोध घेण्याकरिता त्याची माता तुला जी बोललेली आहे सुरुची, ती त्याचा शोध करण्याकरता वनामध्ये जाईल आणि चारी बाजूला पेटलेल्या दावानळीमध्ये तिचं शरीर भस्म होऊन जाईल. तुझा पिता, हाही वनामध्ये जाईल. जाताना हे सगळं राज्य तुलाच अर्पण करून जाईल. तुला कोणालाही काही मागावं लागणार नाही. हे राज्यही तुलाच मिळणार आहे आणि शेवटी ध्रुवपद आहे त्या मध्ये जाऊन तू राहा. माझं चिंतन कर. म्हणजे तुला शांती प्राप्त होईल. वरप्रदान करून भगवान अंतर्धान झाले.

हा ध्रुव राजधानीकडे जाण्याकरता निघाला. परंतु त्याच्या मनाला अत्यंत पश्चात्ताप झालेला आहे, नारदांनी मला सांगितलेलं होतं. माझ्या लक्षामध्ये आलं नाही. सावध राहा ध्रुवा, तुझ्या बुद्धीचा भेद करतील हे सगळे देव! बुद्धी बदलून टाकतील. देवाजवळ काय मागायचे? यावेळेला सावध राहा. पण माझी बुद्धी बदलली, काय मागून घेतलं मी? संसारबंधनातून मुक्त करणारा परमात्मा दर्शन देण्याकरता, वर देण्याकरता आलेला असताना मी संसारच त्याच्याजवळ मागून घेतला म्हणाले, काय आता! शांत अविनाशी अशा प्रकारचं ध्रुवपद झालं तरी ते जाणारच आहे ना! तेच मी मागून घेतलं. मायेचा मोह मोठा कठीण आहे. आईने सांगितलेलं होतं निघताना, नारदांनीही सांगितलेलं होतं. कुणाबद्दल मनामध्ये मान-अपमान, काहीही विचार ठेवू नको दुसरा. निर्विकार मनाने, शुद्ध मनाने परमेश्वराची सेवा तू कर! आईने सांगितले, हेही माझ्या लक्षात राहिलं नाही. आता काय करायचं काय? हा जन्म असेपर्यंत इथं राहायला पाहिजे. पुण्य झालं तरी पुण्यात्मक पाप म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. पापात्मक पाप आणि पुण्यात्मक पाप असे दोन भाग त्यांनी पापाचेच केले आहेत. पुण्य सुद्धा पापच आहे. तपश्चर्या एवढी मोठी केली ध्रुवाने, किती पुण्य असेल, पण शेवटी शरीर धारण करून त्याला संसारातच राहण्याची पाळी आली आहे, म्हणजे पापच झालं. निघालेला आहे, राजधानीच्या बाहेर आला आहे. ध्रुव आलेला आहे ही बातमी येऊन त्या नोकरांनी सांगितली. राजेसाहेबांना आनंद झाला. सर्व मंडळींना बरोबर घेऊन राजेसाहेब बाहेर पडलेले आहेत. हत्तीवर अंबारीमध्ये ध्रुवाला बसवलेले आहे. त्याला घेऊन आलेले आहेत. सर्व मंडळी त्याचा जयजयकार करताहेत. मातेचं दर्शन झालं. ध्रुवाने आल्याबरोबर, आपल्या दोन्हीही मातांना नमस्कार केला. सावत्र - सख्खी हे काही मनामध्ये आणलं नाही. त्या सुरुचीने सुद्धा त्याला प्रेमाने जवळ घेतलं, आर्शिवाद दिलेले आहेत त्याला. भगवान श्रीहरी ज्याच्यावर प्रसन्न झाले, त्याच्याबद्दल त्या सुरुचीच्या मनात तरी कशाला ईर्षा, द्वेष राहिल? सर्वही त्याच्यावर अगदी...

***
पान १४८

...प्रेम करणारे आहेत. भाऊ-भाऊ भेटले, उत्तम-ध्रुव. याप्रमाणे, पुष्कळ काळ गेलेला आहे. सर्वांनी त्याचा सत्कार केला.

बराच काल गेल्यानंतर. उत्तम शिकारीला गेला असतांना एका यक्षाने त्याला मारलं, त्याची माता त्याचा शोध करण्याकरिता गेली, तिचाही नाश झालेला आहे. राज्य ध्रुवाला दिलं, आणि उत्तानपादराजा, विरक्त होऊन वनामध्ये भगवंताची आराधना निरुपाधिक रितीने करण्याकरता बाहेर पडलेला आहे. ध्रुवाचा विवाह झाला. शिशुमार प्रजापतीची कन्या, भ्रमी हिच्याबरोबर विवाह झाला. दुसरा विवाह वायूकन्या इला हिच्याबरोबर विवाह झाला. उत्कण नावाचा त्याला पुत्र झाला. उत्तमचा अद्यापि विवाह झालेला नव्हता. तो अरण्यामध्ये गेलेला असताना कुबेराचा सेवक एका यक्षाने त्याला ठार मारलं. ती सुरुचीही दावान्लीमध्ये जळून गेली. हे ध्रुवाला समजल्याबरोबर ध्रुवाला राग आलेला आहे. तो बाहेर पडला. कुबेराच्या नगराजवळ तो आलेला आहे. आपल्या बंधूला ज्या यक्षाने मारलं त्या सर्व यक्षांचा संहार करायचा असा त्याने निश्चय केलेला आहे. सगळे यक्षही बाहेर आलेले आहेत. लाख-सव्वालाख यक्ष बाहेर आले. त्यांचं आणि ध्रुवाचं युद्ध सुरू झालेलं आहे. ध्रुवानेही अनेक अस्त्रांचा प्रयोग करून पुष्कळ यक्ष मारलेले आहेत. त्याचे पितामह म्हणजे मनुराजा, त्या रणभूमीवर आलेले आहेत आणि ध्रुवाला त्यांनी सांगितलं, ""बाळ, काय चालवलंय तू हे? पाच वर्षाच्या वयामध्ये अरण्यामध्ये जाऊन, धैर्याने, निश्चयाने भगवंतांना तू प्रसन्न करून घेतलंस आणि आता रागाने इतक्या लोकांना मारतोस? काही विचार केलायस का तू? अरे हे यक्ष. यक्षांचा जो स्वामी आहे कुबेर, हा जर रणभूमीवर आला तर? त्याच्याशी युद्ध तू करू शकशील काय? कारण कुबेराचे मित्र कोण आहेत तुला माहिती आहे की नाही? भगवान शंकर मित्र आहेत. कुबेरही युद्धामध्ये गेल्यानंतर शंकरही त्याच्याबरोबर त्याला सहाय्य करण्याकरता येणार, तुझी काय अवस्था होईल? हा विचार कर. हा द्रोह मनामध्ये उत्पन्न होणे हे भक्तीमार्गाला मोठं प्रतिबंधात्मक आहे, विघ्न आहे. तेव्हा हे सोडून दे तू.'' असा उपदेश केला नातवाला, त्या मनुराजाने. ध्रुवानेही युद्ध थांबवलेलं आहे. मनुराजा निघून गेलेला आहे. ध्रुवाने युद्ध बंद केलेलं ऐकल्याबरोबर तो कुबेर बाहेर आलेला आहे. येऊन भेटला. ध्रुवाला त्याने सांगितलं, तुझ्या पितामहाच्या आज्ञेप्रमाणे आमचं वैर तू सोडलंस. बरं झालं म्हणा ले, चांगलं झालं. मला समाधान झालं. काय पाहिजे तो वर मागून घे माझ्यापासून. कुबेराने सांगितलं, बाबा, मनामध्ये जर द्वेष उत्पन्न झाला तर त्याचं कारण म्हणजे ही द्वैत बुद्धी कारण आहे! तू आमच्या यक्षांना मारलेलं नाहीस आणि आमच्या यक्षांनी तुझ्या भावाला मारलेलं नाही हे अगोदर मनामध्ये पूर्ण आण. कोणी...

***
पान १४९

...मारलं मग?

काल एव हि भूतानां प्रभुः अप्ययभावयोः ।।
4.12.3 ।। श्री. भा.

सगळ्याला उत्पन्न करणारा, सगळ्यांना मारणारा तो कालात्मा श्रीहरी आहे - त्याच्या इच्छेनं जन्म येतो, त्याच्या इच्छेनं मृत्यू आहे. कोणीही मारणारा नाही आणि कोणीही तारणारा नाही. एक परमेश्वर आहे. ही भावना तू मनामध्ये ठेवलीस म्हणजे वैर नाहीये. कोणाचाही द्वेष उत्पन्न होणार नाही. जा म्हणाले, राज्य वगैरे कर. ध्रुवाने अंतःकरणामध्ये भगवद्भक्ती स्थिर राहावी, भक्तांची संगती मला व्हावी, असा वर मागितला. कुबेराने तो वर दिलेला आहे आणि कुबेर निघून गेला. ध्रुव आपल्या राजधानीमध्ये आला. अनेक यज्ञ त्याने केलेले आहेत. शेवटी मुलांच्या स्वाधीन राज्य केलं. बद्रिकाश्रमामध्ये ध्रुव येऊन पोहोचलेला आहे. भगवंतांची उपासना चालू आहे. संसार करून सोडलेला आहे. अगोदर सोडलेला नाही. दुसऱ्याचा संसार, दु:ख पाहून सोडणं आणि स्वतः त्याचा अनुभव घेऊन सोडणं ह्याच्यामध्ये पुष्कळ अंतर आहे. त्यामुळे, संसाराची आसक्ती चित्तामध्ये नाही. आता भगवंताकडे लक्ष लागलेलं आहे. मनामध्ये काही वासना राहिलेली नाही. अशी त्याची उपासना चालू असताना, एके दिवशी, एक विमान, आकाशमंडलातून खाली आलेलं आहे. नंद, सुनंद दोन हरिदास ते विमान घेऊन आलेले आहेत. त्यांनी सांगितलं, राजेसाहेब, आपल्याला ध्रुवपदाला पोहोचविण्याकरिता हे विमान भगवान श्रीहरींनी पाठवलं आहे. आम्हाला पाठवलेलं आहे. चला आपण, तुम्हाला तिथे नेऊन पोहोचवितो. आपण स्वतः प्रयत्न करून भगवद्भक्तीच्या प्रभावानी आपण हे ध्रुवपद मिळवलेलं आहे म्हणाले, त्याच भगवंताची सेवा आम्ही करतो, त्याचे सेवक आहोत, आपल्याला नेण्याकरता आलेलो आहोत. हे विमान आणलेलं आहे. बसा ह्याच्यामध्ये. मग ध्रुवाने स्नान केलं, त्याठिकाणी असलेल्या सर्व ऋषीमंडळींना वंदन केलेलं आहे. त्यांचे आशीर्वाद ग्रहण केले. ते जे हरिदास दोघे आलेले होते. त्यांनाही वंदन केलं. विमानालाही वंदन केलेलं आहे. त्याच्यामध्ये बसण्याकरता ध्रुव आलेला आहे. त्यावेळेला, तो मृत्यू आला जवळ, राजेसाहेब, हे शरीर माझं आहे म्हणाला, हे शरीर घेऊन कसं जाता? ऐकून घेतलं ध्रुवाने

मृत्योर्मूर्ध्नि पदं दत्त्वा आरुरोह अद्भुतं गृहम् ।।
4.12.30 ।। श्री. भा.

त्या मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवूनच तो त्या विमानामध्ये चढलेला आहे. सामर्थ्य आहे ना! मृत्यू मुकाट्याने निघून गेलेला आहे. देवांची दुंदुभी वगैरे वाजलेल्या आहेत, पुष्पवर्षाव सर्वांनी त्याच्यावर केलेला आहे. ते विमान निघालेलं आहे. एकदम त्याला आपल्या आईची आठवण...

***
पान १५०

...झाली. सुनीतीही तिथं असली पाहिजे. त्याच्याबरोबर बद्रिकाश्रमामध्ये आलेली असली पाहिजे. आपल्या आईला बरोबर घ्यायचं विसरलो म्हणालो मी! काय करावं आता? ते जे नंद-सुनंद हरिदास होते, त्यांनी सांगितलं, राजेसाहेब दुसरं एक विमान समोरून निघालेलं आहे, ते पहा. त्यात आपल्या माताजी आहेत. आपल्याबरोबरच त्या येणार आहेत. आनंद झालेला आहे त्याला. असं ते विमान निघालेलं आहे. सर्व लोकामध्ये आलेलं आहे. सर्व देवांनी त्याचा सत्कार केलेला आहे. मध्ये मध्ये, ज्या ज्या पुण्यशील लोकांमध्ये तो गेला, तिथे सर्वांनी त्याचा सत्कार केला आणि सर्वांच्या उच्चस्थानी असलेलं, जे ध्रुवपद त्या ठिकाणी येऊन हा ध्रुव बालक राहायला आलेला आहे. त्याची माताही त्याच्या सन्निध आहे. नारदांनी आपल्या त्या शिष्याचा प्रभाव स्वतः वर्णन केला. पतिव्रता सुनीती माता त्या ध्रुवाची, काय हिचं पुण्य आहे! काय तप आहे! त्यामुळे तिच्या मुलाला अशा प्रकारचं स्थान मिळालं, भगवंताची कृपा झालेली आहे. हे स्थान दुसऱ्या कोणालाही मागून मिळणार नाही. पाच वर्षाच्या वयामध्ये अपमान झाल्यामुळे घरदार सर्व सोडून देऊन, सर्वांचा स्नेह टाकून देऊन, जो हरीच्या कृपेकरता बाहेर पडलेला आहे, भगवंताची आराधना करून त्याची कृपा ज्याने संपादन केली, असा हा ध्रुव बालक, हा ही मोठा पुण्यशील आहे. ह्याच्यासारखं तप करणारा कुणीही मला दिसला नाही असं नारदांनी एका यज्ञामध्ये उद्गार काढलेले आहेत. असं हे ध्रुवाचं चरित्र मैत्रेय महर्षींनी विदुरजींना निवेदन केलं.

ह्याच्यानंतर आता पृथु राजाचं चरित्र सांगताहेत, बालकाचं चरित्र झालं. तरुण अशा प्रकारच्या पृथु राजाचं चरित्र सांगताहेत. वेनराजा नावाचा अधार्मिक राजा झालेला आहे, अंगराजाचा मुलगा. अत्यंत अधर्माने वागणारा, सर्वांना त्रास देणारा, ऋषीमंडळींच्या शापाने तो गतप्राण होऊन पडलेला आहे. पुन्हा सर्वांच्या आग्रहाने ऋषीमंडळी राजवाड्यामध्ये आली. त्याच्या दोन्ही बाहूंचं, हस्ताचं मंथन करून पृथु राजा आणि अर्चि नावाची स्त्री, हे दोघेही निर्माण झाले. कोणी राज्याला अधिकारी पाहिजे होता ना! ऋषी मंडळींच्या मंत्रप्रभावाने परमेश्वरांनीच हा अवतार धारण केला. सर्वांना आनंद झाला, पृथु राजाला राज्याभिषेक त्या सर्व ऋषींनी केलेला आहे. सर्व मंडळी, प्रजाजन मंडळी पृथु राजाच्या जवळ आलेली आहेत. त्यांनी प्रार्थना केली, राजेसाहेब, आम्हाला अन्न नाहीये, धान्य नाहीये, काहीतरी व्यवस्था आपण करा. अशी प्रार्थना सर्व प्रजाजनांनी केलेली असताना, पृथु राजाने विचार केला की ह्याला कारण कोण आहे म्हणाले, धान्य का निर्माण होत नाही? ही पृथ्वीच ह्याला कारण आहे. धान्य देत नाही म्हणाले. वसुमती हिला म्हणतात. सर्व धनधान्य हिच्यापासून मिळायचं, आणि तिने धान्य देऊ नये? राग आलेला आहे. पृथु राजा...

« Previous | Table of Contents | Next »