धनुष्यबाण घेऊन पृथ्वीला शासन करण्याकरता बाहेर पडलेला आहे. काय राजाचं सामर्थ्य किती विलक्षण आहे. पंचभूतं ही सुद्धा जीवच आहेत. पृथ्वी म्हणजे नुसती जमीन असं नाहीये. त्याची देवता आहे ती भूदेवी आहे. सीदादेवीची माता आहे. सीदादेवीचा अपमान झाला, कैकेयी बोलली म्हणे शेवटी! सगळं झालं होतं. त्याग झाला होता, अरण्यामध्ये वाल्मिकी ऋषींनी तिला ठेवून घेतलं, दोन मुलं झाली, मोठी झाली. त्यांना सगळं वाल्मिकी ऋषींनी सगळं शिकविलेलं आहे, त्यांच्या सांगण्याप्रमाणे, पुन्हा सीतेचा स्वीकार केलेला आहे. भावार्थ रामायणामध्ये एकनाथ महाराजांनी सगळं दिलेलं आहे. असं सगळं व्यवस्थित चालू असताना भर सभेमध्ये ती कैकेयी बोलली. ती म्हणाली, रावणाच्या घरात राहून आलेली, तिला कशाला घेतलं म्हणाले या रामाने? काय जरूर होती आता? अतिशय वाईट वाटलं सीदादेवींंना. आपल्या मातेला हाक मारती आहे ती. ती भूदेवी, भूमीतून वर आलेली आहे, सिंहासन घेऊन. आपल्या मुलीला बरोबर घेतलं अनं गेली. म्हणजे, केवळ भौतिक नाहीये. भूतांचाही असलेला एक जीवात्मा निराळा आहे. ईश्वराने त्याची नेमणूक केली आहे. पंचमहाभूतांचं स्वामित्व धारण करणारे, पंचमहाभूतं हे त्यांचं शरीर आहे, अशा प्रकारचे ते पुण्यवान जीवात्मे आहेत. पण मोठे समर्थ आहेत. यांच्यावरही या राजे लोकांचा अधिकार आहे. अन्याय जर झाला, तर त्या पंचमहाभूताला सुद्धा शासन करण्याचं सामर्थ्य त्यांच्याजवळ आहे. त्यांच्या चारित्र्याने, तपाने सगळं सामर्थ्य आहे.
पृथ्वीला शासन करण्याकरता राजा निघालेला आहे. ती गाईचं रूप धारण करून पळती आहे पुढं. राजा तिच्या पाठीमागं लागलेला आहे. देव लोकामध्ये ती गेली, इंद्रालाही तिच्याकडं लक्ष देता आलं नाही, शासन करणाऱ्यांच्या विरुद्ध कोण वागणार? सर्व एकंदर लोकामध्ये ती फिरून आलेली आहे. शेवटी त्या भूमीनं प्रार्थना केली, राजेसाहेब, देव आहात आपण, परमेश्वर आहात, पूर्वी वराह अवतार आपणच धारण केलात. मी रसातलामध्ये गेलेले होते. मला आपणच बाहेर काढलं, हिरण्याक्षाबरोबर युद्ध केलंत, त्याचा आपण नाश केलात. माझं संरक्षण केलंत आणि आज आपणच मला मारणार? मी स्त्री आहे हाही विचार तुमच्या मनामध्ये नाही? राजाकडून स्त्री-हत्या झाली, हे शास्त्राच्या विरुद्ध नाही का होणार? पृथु राजा म्हणाला, स्त्री-पुरुष हा भेद मी मानत नाही. अन्यायी जो आहे त्याला शासन करणं माझं कर्तव्य आहे. तिने सांगितलं, मला तुम्ही मारल्यानंतर पाण्यावर तुम्ही कसे राहाल? पृथ्वीच्या आधाराने तुम्ही राहू शकता ना? त्याने सांगितलं, माझं सामर्थ्य आहे, माझ्या योग सामर्थ्याने मी माझ्या प्रजाजनांसह वर्तमान पाण्यावर सुद्धा राहू शकतो. तुला काय करायचंय ते? तुला मी शासन केल्याशिवाय राहणार नाही. अन्याय...
...करतेस, संपूर्ण बीज सगळं तुझ्यामध्ये टाकताहेत ते. त्याचं धान्य तू त्यांना देत नाहीस. मग भूदेवीनं सांगितलं हे सगळे दैत्य उत्पन्न झाले. त्यांनी सगळं धान्य बीज न्यायला सुरवात केली, यज्ञाकरता पाहिजे म्हणून, माझ्या ठिकाणी ते सगळं बीज आणखी विलीन झालेलं आहे. दुधाच्या रूपाने मी तुम्हाला देते म्हणाली, घ्या. ह्या रूपाने तुम्ही माझं दोहन करा. एक वासरू पाहिजे आणि धार काढणारा एक पाहिजे. म्हणून मग त्यांनी मनुराजाला बोलावलं. मनुराजा तिथे आलेला आहे. धार काढली आहे. दुग्ध रूपाने घेतलं. पुष्कळ लोकांनी, देवांनी, ऋषींनी, दैत्यांनी सगळ्यांनी आपल्याला जे जे पाहिजे ते दुग्धरूपाने त्या पृथ्वीपासून ग्रहण केलेलं आहे. आणखी एक कारण त्या भूदेवीनं सांगितलं की, डोंगर पुष्कळ झाले म्हणाली, माझ्या ठिकाणी पावसाचं पाणी स्थिर राहात नाही शेतामध्ये. त्यामुळे धान्य होत नाही. मग त्याने आपल्या अनुष्ठानाने सबंध डोंगर वगैरे साफ केलेले आहेत. उत्तम जमीन तयार केली. धान्य वगैरे उत्पन्न व्हायला लागलेलं आहे. लोकांना राहण्याकरता उत्तम प्रकारची नगर रचना करून दिली. लहान-मोठी गावं बांधून दिलेली आहेत. पूर्वी कुठेतरी लोक अरण्यात वगैरे राहात होते. पृथु राजाने सर्व योजना ही केली. सर्व प्रजाजनांना धान्य मिळतंय. त्यांची सगळी व्यवस्था झालेली आहे. सर्वांना अत्यंत आनंद झाला.
मग पृथुराजाने शंभर अश्वमेध यज्ञ करण्याचं ठरवलेलं आहे. भगवान श्रीहरी प्रसन्न व्हावे, त्यांची कृपा मिळावी याकरता. पण इंद्राला भीती उत्पन्न झाली. शंभर अश्वमेध यज्ञ ज्यांनी केले, तो इंद्र होतो. त्यावेळी जो इंद्रपदावर होता त्या इंद्राला भीती उत्पन्न झाली, हा पृथु राजा शंभर अश्वमेध यज्ञ करणार आणि हा जर माझ्या आड आला तर, हा इंद्र झाला तर मला लगेच या पदावरून खाली यावं लागेल. अशी काही भीती उत्पन्न झाली. वास्तविक पृथु राजा काही इंद्रपदाकरता यज्ञ करत नव्हता. त्या यज्ञातला अश्व इंद्राने हरण केलेला आहे. इंद्र अश्व घेऊन निघाला. अत्री ऋषींची दृष्टी त्याच्यावर पडली. पृथु राजाच्या मुलाला त्यांनी सांगितलं, हा अश्व घेऊन ये म्हणाले, यज्ञ बंद पडेल. मुलगा त्याच्या पाठीमागे लागलेला आहे. एका अरण्यामध्ये, तो अश्व फिरतो आहे. एक ऋषीमहाराज डोळे झाकून बसलेले आहेत. त्या मुलाने तो अश्व घेतला. यज्ञमंडपामध्ये आणून तो ऋषींच्या स्वाधीन केला. अत्रीऋषींना सांगितलं, महाराज अश्व चोरणारा कोणी तिथं मला भेटलं नाही. तिथं कोणी ऋषी डोळे झाकून स्वस्थ ध्यान करत बसले होते. अत्री ऋषी म्हणाले, तोच चोर आहे. तू फसलास म्हणाले, तोच इंद्र आहे. तुला त्याने आपलं रूप ऋषींच्या रूपात दाखवलं. असा बऱ्याच वेळा त्या इंद्राने प्रयत्न केलेला आहे. एकदा मिळाला नाही अश्व, पुन्हा अश्व घेऊन गेला. पुन्हा अत्रीऋषींनी त्या मुलाला पाठविले. पृथु राजाच्या कानावर ही...
...बातमी गेली. इंद्र आमच्या यज्ञामध्ये गडबड करतो आहे. त्याला राग आलेला आहे. तुमचा तुमचा अधिकार सांभाळून राहायचं. आम्ही मृत्युलोकामध्ये येऊन यज्ञ करतो, आमच्या कार्यामध्ये प्रतिबंध करण्याचं कारण काय? देवांचा राजा असला म्हणून काय झालं? इंद्राला शिक्षा करायची. राजा उठला धनुष्यबाण घेऊन. ऋषीमंडळी म्हणाली, राजेसाहेब, तुम्ही यज्ञाची दीक्षा घेतलेली आहे. तुम्हाला याठिकाणी दुसऱ्याची हत्या करता येणार नाही. आम्हाला सांगा तुमचा कोण शत्रू आहे. आम्ही या यज्ञकुंडामध्ये आणून टाकतो. ऋषीमंडळी मंत्रबलाने इंद्राला त्या अग्निकुंडात आणून टाकणार असा प्रसंग आलेला आहे.
भगवान श्रीहरी यज्ञमंडपामध्ये प्रगट झालेले आहेत. पृथु राजाला सांगितलं, राजा, कशाला आहे यज्ञाचा आग्रह तुला. शंभर अश्वमेध यज्ञ झाले पाहिजेत हा आग्रह करायचा तरी कशाला? पाप झालं पाहिजे हाही आग्रह उपयोग नाही, पुण्य झालं पाहिजे हाही आग्रह उपयोग नाही. जे घडेल ते घडेल. तर ते कर्म शुद्ध कर्म होते. ईश्वरापण बुद्धीने पाप होऊ दे की पुण्य होऊ दे. शंभर अश्वमेध यज्ञ करून तुला काय इंद्र व्हायचं आहे का? मग कशाला हे करतो? त्या इंद्रालाही बरोबर आणलं होतं भगवंतांनी. इंद्राने क्षमा मागितलेली आहे. पृथु राजाही त्याला भेटलेला आहे. दोघे मित्र झाले आहेत. भगवंतांची मोठी भक्ती पृथु राजाच्या अंतःकरणामध्ये आहे. भगवंतांनी त्याला वर दिलेला आहे. सनतकुमारांचं मार्गदर्शन तुला मिळेल. त्यामुळे तू मुक्त होशील. यज्ञ समाप्त झालेला आहे. शंभर अश्वमेध यज्ञ पूर्ण झालेले आहेत त्याचे. राज्य उत्तम चाललेलं आहे. म्हणजे इंद्रालासुद्धा शासन करू शकणारा समर्थ राजा पृथ्वीवर राहणारा होता. धर्ममर्यादा पालन करणारा जो आहे, तो कुणालाही शासन करू शकतो. अन्यायाचं शासन त्याच्याकडून होतं.
भगवंतांच्या आदेशाप्रमाणे एकेदिवशी राजवाड्यामध्ये आकाशमंडलातून सनक, सनंदन, सनतकुमार चौघे कुमार आलेले आहेत. राजानी त्यांची पूजा केली. सुवर्णसिंहासनावर चौघेही बसलेले आहेत. त्याने प्रार्थना केली असताना त्या कुमारांनी त्याला उपदेश केलेला आहे. राजा, भगवंताच्या भक्तीकडे तुझं अंतःकरण स्थिर झालेलं आहे, चांगला मार्ग आहे. ती भगवद्भक्ती तू करत रहा. काय पाहिजे म्हणाले, संसारबंधनातून मुक्त होण्याकरता दोनच गोष्टींची जरुरी आहे, ते सनतकुमार सांगताहेत,
शास्त्रेष्वियानेव सुनिश्चितो नृणां
क्षेमस्य सध्यग्विमृशेषु हेतुः ।।
असङ्ग आत्मव्यतिरिक्त आत्मनि
दृढा रतिर्ब्रह्मणि निर्गुणे च या ।।
4.22.21 ।। श्री. भा.
दोन साधनं आहेत मुक्त होण्याकरता. परमात्म स्वरूपापेक्षा जे निराळं आहे ते सर्व पंचभौतिक, याच्याबद्दल कुठेही मनाची आसक्ती उत्पन्न होऊ नये, असंग पाहिजे. आणि सगुण असो किंवा निर्गुण असो त्या परमात्म रूपाच्या ठिकाणी पूर्ण प्रेम अंतःकरणामध्ये उत्पन्न झालं पाहिजे. ही दोनच साधनं आहेत म्हणाले, त्यामुळे मुक्ती प्राप्त होते. असा उपदेश त्यांनी केलेला आहे आणि त्याला आर्शिवाद देऊन ते सगळे कुमार निघून ब्रह्मलोकाला गेले. पुढं, पृथु राजाने पुष्कळ दिवस राज्यकारभार केला. वार्धक्य आलेलं आहे, मग मुलाच्या स्वाधीन राज्य करून वनामध्ये गेलेला आहे पृथु राजा. अर्चि, पत्नीही त्याच्याबरोबर आलेली आहे. वानप्रस्थाश्रम म्हणजे अत्यंत मोठी तपश्चर्या आहे, तितिक्षा ज्याला म्हणतात तो अभ्यास आहे. शरीराकडे लक्ष नाही, बाहेर राहायचं आपण, मोकळ्या जागेत आणि अग्नीचं तेवढं संरक्षण होण्याकरता एखाद्या झोपडीमध्ये किंवा गुहेमध्ये अग्नी सुरक्षित ठेवायचा. आपण मात्र थंडी, वारा, ऊन, पाऊस सगळं सहन करून राहायचं. काही काळ अशी तपश्चर्या त्यांनी केली. नंतर भगवान श्रीहरींचं चिंतन करता करता आपल्या शरीराचं विसर्जन केलेलं आहे. त्याची पत्नी अर्चि हिलाही मोठं दु:ख झालेलं आहे. नंतर स्नान वगैरे करून चिता तयार केलेली आहे त्या अर्चिनं. पृथु राजाचं शरीर त्या चितेवर ठेवलेलं आहे. अग्निनारायणाची पूजा करून अग्नी प्रदीप्त केलेला आहे. आपलं शरीरही त्या अग्नीमध्ये तिने अर्पण केलं. सहगमन केलं पतीबरोबर आणि ती विष्णूलोकामध्ये गेली. पृथु राजा मूळ विष्णूरूपच होता. तो विष्णूस्वरूपामध्ये विलीन झाला. अर्चि ही लक्ष्मीस्वरूपामध्ये विलीन झाली आहे. सर्व देवस्त्रिया त्या अर्चिची स्तुती करताहेत, काय ही पतिव्रता स्त्री आपल्या पतीला घेऊन उत्तम लोकाला गेलेली आहे. याप्रमाणे हे पृथु राजाचं चरित्र हे ही त्यांनी सांगितलेलं आहे.
यानंतर, प्राचीनबर्ही नावाचा राजा, याचं चरित्र मैत्रेय महर्षी सांगताहेत. प्राचीनबर्ही राजाने यज्ञयाग करावेत, कर्मामध्येच त्याची बुद्धी आसक्त झालेली आहे, भक्तीमार्गाकडे लक्ष नाही, ज्ञानाकडे लक्ष नाही, काही नाही. एक यज्ञ झाला की दुसरा यज्ञ सुरू करायचा लगेच. ऋषीमंडळीही तयारच होती. जिकडं-तिकडं सबंध भूमीवर दर्भ अंथरले गेले आहेत. कारण, एक यज्ञ संपला की दुसरा यज्ञ. बर्ही म्हणजे दर्भ. जिकडेतिकडे दर्भ पसरलेले आहेत प्राचीनात, म्हणून त्याचं नाव प्राचीनबर्ही असं पडलेलं आहे. तो प्राचीनबर्ही राजा, कर्मामध्ये आसक्त झालेला आहे, त्याला त्या मार्गातून पुढं मार्ग दाखविला पाहिजे, असं नारदांनी ठरविलेलं आहे. नारद महर्षी हे त्याच्या वाड्यामध्ये आलेले आहेत. प्राचीनबर्ही राजानेही त्यांचा आदरसत्कार केलेला आहे. नारदांनी विचारलं, राजोजसाहे, हे जे यज्ञ सारखे करता याचं काय फळ तुम्हाला पाहिजे? काय मिळणार...
...आहे याचं फळ तुम्हाला. खरं फळ म्हणजे की सर्व दु:ख संपली पाहिजेत आणि पूर्ण आनंद, अविनाशी सुख मिळालं पाहिजे. हे खरं फळ आहे म्हणाले. याचीच इच्छा करायची. पण हे ह्या तुमच्या यज्ञांनी मिळणार नाही. पुण्य मिळेल. पण पुण्यामुळे देवलोकाला स्वर्गलोकामध्ये जावं लागेल. स्वर्गलोकातही कायम राहता येत नाही. पुण्य संपलं की पुन्हा याठिकाणी यायचं, पुन्हा यज्ञ करायचे, पुन्हा स्वर्गाला जायचं, काय उपयोग नाही. अविनाशी आनंद जो आहे सुख आहे आणि सर्व दु:ख निवृत्ती हे यज्ञाचं फळ नाहीये. हा विचार तुम्ही करा.
नारदांनी एक कथा रूपक म्हणून सांगितली. एक पुरंजन नावाचा राजा पूर्वी होऊन गेला. याचा खुलासा त्यानी पुढं केलेला आहे. त्यांनी आपल्या मित्राला सोडून दिलं. चांगला मित्र, समर्थ असलेला, त्याला सोडून देऊन एकटाच हा राजा निघाला. हिमालयाच्या बाहेर पलिकडे आलेला आहे. एक उत्तम नगर त्याला दिसलेलं आहे. कुठंतरी त्याला राहायचं होते. इतक्यात बाहेरून एक दिव्य तरुण स्त्री आलेली आहे. तिच्याबरोबर सगळीही दहा मंडळी तिचे नोकर होती. एक मोठा नाग होता बरोबर. राजाने विचारले बाई हे नगर कोणाचं आहे? ती म्हणाली, माझंच नगर आहे. आपण राहू या, या नगरामध्ये जाऊन. पुष्कळ आपल्याला सुख भोगता येईल. हे माझे नोकर आहेत, हा नागही माझा सेवक आहे. चला आपल्याला इच्छा असेल तर. म्हणून त्या स्त्रीला बरोबर घेऊन राजा त्या नगरामध्ये जाऊन राहिला. नऊ दरवाजे त्या नगराला होते. अशा त्या नगरामध्ये राजा राहतो आहे, त्याला मुलबाळं झाली, पुष्कळ यज्ञ-याग वगैरे केले, नारद सांगताहेत राजाला! तुमच्याप्रमाणेच यज्ञ करायचे. दुसरीकडे कुठे लक्ष नाही. असे अनेक यज्ञयाग केलेले असताना एक गंधर्वांचा अधिपती, आपलं सैन्य बरोबर घेऊन आलेला आहे. आणि त्या सैन्यासह वर्तमान त्या नगराला त्यांनी वेढा दिलेला आहे. पुरंजन राजाला कैद करण्याचे त्यांनी ठरविले. त्याला अत्यंत त्रास होऊ लागला. या नगरामध्ये, नऊ दरवाजे होते. शरीरालाच नगराची कल्पना केलेली आहे. ह्या शरीराला नऊ दरवाजे आहेत. त्या नवद्वारयुक्त नगरामध्ये हा जीवात्मा राहतो. वरच्या बाजूला दोन नेत्र आहेत, दोन नासिका आहेत, दोन कान आहेत आणि मुख आहे. हे सात दरवाजे वर आहेत आणि मलमूत्रविसर्जन करण्याचे दोन असे नऊ दरवाजे आहेत. असा त्या नगराला वेढा पडलेला आहे. त्या सैनिकांनी या नऊ दरवाज्यातून आत प्रवेश केला. त्या पुरंजन राजाला बांधून बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. आपल्या स्त्रीकडे त्याचं लक्ष गेलं. मी गेल्यानंतर ह्या स्त्रीचं संरक्षण कोण करील? अशा वासनेमध्ये शेवटी हीच वासना स्त्री बुद्धी त्याच्या मनामध्ये उत्पन्न होऊन त्याला बाहेर काढलं गेलं. त्यामुळे पुन्हा दुसऱ्या जन्मामध्ये त्याला स्त्री रूप प्राप्त झालेलं आहे. स्त्रीचा जन्म...
...त्याला आलेला आहे. मोठी राजकन्याच तो झालेला आहे. एका उत्तम दुसऱ्या राजपुत्राबरोबर त्याचा विवाह झाला. उत्तम प्रकारचं संसारसौख्य त्याला मिळालेलं आहे. आणि या आपल्या स्त्रीला घेऊन अरण्यामध्ये गेलेला आहे, मुलाला राज्य देऊन. त्यांनी आपलं शरीर योगमार्गाने सोडून दिलं.
ती स्त्री म्हणजे पुरंजन राजा. तिला दु:ख झालेलं आहे. आपले पती गेलेले आहेत. चिता तयार केली. आपला देह अर्पण करण्यासाठी ती उद्युक्त झालेली असताना हा पुरंजन राजा आपल्या त्या मित्राला सोडून देऊन एकटाच निघून आला होता त्याचा तो मित्र ब्राह्मणरूपाने त्याच्याजवळ आलेला आहे. त्यांनी त्याला उपदेश केला, बाबा, तू काही राजकन्या नाहीयेस. तू कोण आहेस, पूर्वजन्मामध्ये तू कोण होतास त्याचे स्मरण कर. तु पुरंजन आहेस. मी तुझा मित्र आहे. तुला यातून सोडवण्याकरता आलेलो आहे. पूर्वजन्माचं स्मरण तू कर, म्हणजे या दु:खातून तू मुक्त होशील. तू आणि मी एकच आहोत म्हणाले. वस्तुतः आनंदरूप आपण आहोत. सहा अहम्, अहम् सः हा उपदेश केलेला आहे, सोहम्चा. त्यावेळेला त्या पुरंजनाला ज्ञान झालं आणि सर्व दु:खं त्याची दूर झाली. नारदांनी ही कथा त्या प्राचीनबर्ही राजाला सांगितली, प्राचीनबर्ही राजा म्हणाला, महाराज, काय तुमची गोष्ट मला काही कळली नाही. कोण पुरंजन राजा, त्याला भेटलेली स्त्री कोण, त्याला वेढा कोणी दिला, कोण तो राजा आला, काही कल्पना नाही. मग त्याचा खुलासा त्यानी केला.
पुरुषं पुरञ्जनं विद्यात् यद् व्यनक्त्यात्मनः पुरम् ।।
4.29.2 ।। श्री. भा.
हा जो पुरुष म्हणजे जीवात्मा आहे हाच पुरंजन आहे. आपल्या मित्राला म्हणजेच ईश्वराला बाजूला टाकून तो एकटाच बाहेर पडलेला आहे. ते नगर म्हणजे नवद्वारयुक्त शरीर आहे. मनुष्यशरीर! आणि त्याला भेटलेली स्त्री म्हणजे
बुद्धिं तु प्रमदां विद्यान्ममेति यत्कृतम् ।।
4.29.5 ।। श्री. भा.
ती बुद्धी ती त्याला भेटली स्त्री. आणि त्या बुद्धीनं त्याला या शरीरामध्ये आणून ठेवलेलं आहे, बांधून ठेवलेलं आहे. ईश्वरभक्ती नाही, आत्मानात्म विचार नाही, ज्ञान मार्ग नाही, काही नाही. केवळ कर्मामध्ये निमग्न झाला, संसारामध्ये आसक्त झाला पुरंजन राजा. पुन्हा त्याला स्त्रीजन्म घ्यावा लागला. त्याने जरी मित्राला सोडून दिलं होतं तरी मित्रानं त्याला सोडलं नाही. परमेश्वराने येऊन, उपदेश करून त्याचा उद्धार केलेला आहे. नारद सांगतात, राजेसाहेब, तुम्हीही काही हा विचार करा. काय करता यज्ञ करून काय करणार? तुम्ही यज्ञामध्ये जेवढे पशू मारलेले आहेत, ते सगळे...
...तुमची वाट पाहतायंत वरती. केव्हा हा राजा येतो. आपल्या शिंगानी त्याचं शरीर केव्हा फाडून टाकावं. वाट पाहताहेत. काय करता हे कर्म करून? असा त्याला उपदेश केला आणि नंतर त्याला ज्ञान प्राप्त झालं. त्यांने सांगितलं नारद महाराज हे आमच्या ह्या उपाध्यायांना हे काही माहिती नाही असं दिसतंय. त्यांनी एक यज्ञ झाला की दुसऱ्या यज्ञाची यादी लगेच माझ्यापुढे आणावी. तुम्ही दाखविलेला जो मार्ग आहे त्या मार्गाने जाण्याची मला इच्छा उत्पन्न होणंम शक्य नाहीये. कर्मामध्ये आसक्त झालेलो आहे. कर्माच्या फळामध्ये आसक्त बुद्धी झालेली आहे. ते किती विनाशी आहे किंवा अविनाशी आहे इकडे लक्ष जात नाही. प्रयत्न करायचा, पुन्हा फळ मिळवायचं, पुन्हा प्रयत्न करायचा, यात एक जन्म नाही, अनेक जन्म जातात. ईश्वराच्या भक्तीकडे लक्ष जाणं, ज्ञानमार्गाकडे लक्ष जाणं, कोणीतरी असा महात्मा भेटल्याशिवाय हे होत नाही. प्राचीनबर्ही राजा हा सत्संगती करण्याकरता बाहेर पडलेला आहे. संतांच्या मार्गदर्शनाने त्याने आपला उद्धार करून घेतला आहे.
मैत्रेय महर्षी सांगतात, राजा, देवर्षी नारदांनी त्या प्राचीनबर्ही राजाचा उद्धार केलेला आहे. त्याला कथारूपी बोध करून त्या कथेचा खुलासाही केला.
यानंतर, मैत्रेय महर्षी आणि विदुरजी यांचा संवाद संपलेला आहे. पुष्कळ आणखी विचार झाला. दोघेही जिज्ञासू! विदुरजी आणि मैत्रेय दोघांचा संवाद म्हणजे अत्यंत विचार करण्यासारखा आहे. त्यात भक्तीमार्ग आहे, कर्ममार्ग आहे, पतिव्रता धर्म आहे, सकाम भक्ती आहे, निष्काम भक्ती आहे, सगळं आहे. सनतकुमारांनी याठिकाणी पृथु राजाला उपदेश केलेला आहे. हे सगळे अनेक प्रकारचे विषय त्याच्यामध्ये आलेले आहेत. ते सगळेही विदुरजींनी ऐकलेलं आहे आणि त्यांना वाटलं आता पुष्कळ झालं. ऐकलं इतकं पुरे झालं. निश्चित मार्ग समजलेला आहे. आणि त्यांची आज्ञा घेऊन वंदन करून विदुरजी हस्तिनापुराला आले. धृतराष्ट्र राजालाही उपदेश करून त्यालाही घेऊन गेलेले आहेत. त्याचाही उद्धार केला आणि नंतर विदुरजी पुन्हा यमलोकाला निघून गेलेले आहेत.
आता, मनुराजाचा दुसरा पुत्र म्हणजे प्रियव्रत नावाचा. त्याचंही राज्य कसं होतं वगैरे चरित्र सांगताहेत, शुकाचार्य महाराज. परीक्षित राजाने विचारलं, महाराज, प्रियव्रत राजा नारदांचा भक्त आहे. नारदांच्या आश्रमात राहणारा. तो पुन्हा संसारात कसा गुंतला, राज्य कशाकरता त्याने केलं? हे असे सर्वसंगपरित्याग करणारे भगवत्कृपा संपन्न जे महात्मे आहेत त्यांचं मन संसारामध्ये कधीही गुंतून राहात नाही. काय आहे हे चरित्र अशी प्रार्थना केली असताना शुकाचार्य महाराज...
...सांगतात -
राजा, भगवान श्रीहरींची सेवा करण्याचा ज्यांच्या मनामध्यो, निश्चय झालेला आहे, भगवत्कृपेनं! असे जे भगवद्भक्त आहेत, त्यांचं अंतःकरण विषयसुखाकडे कधीही जाणार नाही. हे योग्य सांगितलंस. प्रियव्रत राजपुत्र हा मनुराजाचा मुलगा. हाही असाच होता म्हणाले, मोठा भगवद्भक्त! नारद ऋषींच्या आश्रमामध्ये राहून नारदांची सेवा, गुरुभक्ती करतो आहे. परमार्थ मार्गाची पूर्ण कल्पना त्याला आलेली आहे. म्हणून संसारापासून त्याचं मन बाजूला झालेलं आहे. मनुराजाणे त्याला सांगितलं, प्रियव्रता हे राज्य तू आता सांभाळ. आमचं काम झालेलं आहे. तुझं कर्तव्य आहे राज्य करणं. पण प्रियव्रताने सांगितलं, पिताजी मला राज्य करायचं नाहीये. मला आमच्या गुरुमहाराजांची सेवा करायची आहे. त्यांच्याजवळच मला राहायचं आहे. मी राज्य करणार नाही. हे ब्रह्मदेवांना समजले. त्यांचा नातूच होता प्रियव्रत म्हणजे. ब्रह्मदेव त्याला भेटण्याकरता आले सत्यलोकातून, विमानात बसून. ब्रह्मदेव आल्याबरोबर प्रियव्रतने नमस्कार केला. ब्रह्मदेवांनी त्याला थोडासा उपदेश केला. भगवान ब्रह्मदेव सांगतात -
निबोध तातेदम् ऋतं ब्रवीमि ।
मासूयितुं देवमहस्य अप्रमेयम् ।।
वयं भवस्ते तत एष महर्षिः ।
वहाम सर्वे विवशा यस्य दिष्टम् ।।
5.1.11 ।। श्री. भा.
प्रियव्रता, तू रागावू नकोस म्हणाले, मी, भगवान शंकर, हा तुझा पिता मनुराजा हे सगळेही त्या परमेश्वराच्या आज्ञेमध्ये आहोत. त्याच्या आज्ञेने जे काही आमचं कर्तव्य आमच्या वाट्याला आलेलं आहे ते आम्ही करतो आहोत. तपाने, विद्येने, योगसामर्थ्याने परमेश्वराची प्राप्ती होणार नाही. त्याची इच्छा, परमेश्वराचा जो संकल्प झालेला आहे, त्याच्या विरुद्ध कोणीही वागू शकत नाही. सुख मिळालं पाहिजे, म्हणून संसारात पडायचं नाही. नारदांची सेवा करायची आहे, असं तू ठरविले असशील पण तू जन्माला कुठं आलेला आहेस? राजपुत्र होऊन जन्माला आलेला आहेस. तुझं कर्तव्य देवांनी नेमून दिलेलं आहे. त्याच्या विरुद्ध तुला वागता येणार नाही. तुझा संकल्प सिद्ध होणार नाही म्हणाले. ईश्वराची आज्ञा आम्ही सुद्धा मान्य करून राहतो. प्रियव्रता, मला वाटत नाही का बाबा की नुसती ईश्वराची उपासना करावी? पण मला काम नेमून दिलंय देवाने? सर्व जीवांची कर्म तपासून त्यांना त्यांच्या त्यांच्या योग्य शरीरामध्ये घालायचं, जन्म द्यायचा. काय झोप आहे...
...काय, अहोरात्र काम चाललेलं आहे. लक्षावधी जीव जन्माला येतात, लक्षावधी जातायेत. चाललेलं आहे कार्य. पुरे झालं असं मलाही वाटतं म्हणाले. पण त्याची आज्ञा आहे. त्याने नेमून दिलेलं आहे. ते करायला पाहिजे. तेव्हा तुझं कर्तव्य म्हणजे ईश्वराने नेमून दिलेलं राज्य करणं आहे. ते तुला करावं लागेल. राज्य कर, पित्याची आज्ञा आहे, ईश्वराची आज्ञा आहे. काही काल तू राज्य कर. गृहस्थाश्रम उत्तमरितीने करून मग जाऊन रहा नारदांच्याजवळ. पित्याची आज्ञा मान्य करायला नको का तुला? आणखी ब्रह्मदेव सांगतात, घरदार सोडून अरण्यामध्ये गेलं म्हणजे आपलं कल्याण होतं हे तुला कोणी सांगितलं?
भयं प्रमत्तस्य वनेष्वपि स्यात् ।
यतः स आस्ते सहषट्सपत्नः ।।
5.1.17 ।। श्री. भा.
ब्रह्मदेवांचा उपदेश आहे, कर्म सोडू नये असं त्यांचं म्हणणं आहे. संयमाने राहिलं पाहिजे. मनावर ज्याचा ताबा नाही, वाटलं मला सोडून द्यावं हे घरदार आणि जावं वनामध्ये, अरण्यामध्ये देवाची उपासना करावी, पण त्याला भीती आहे. इंद्रियांच्यावर ज्याचा ताबा नाही असा जर अरण्यामध्ये निघून गेला तर सहा शत्रू बरोबर घेऊन तो गेला आहे, इकडे त्याचं लक्ष नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर सगळे शत्रू आहेत. अरण्यामध्ये जाऊनसुद्धा त्याचा तिथं अधःपात होतो आहे. विश्वामित्रांनी साठ हजार वर्ष तपश्चर्या केली. ब्रह्मर्षी होण्याकरता वसिष्ठांशी स्पर्धा केलेली आहे. ती मेनका अप्सरा भेटली, सगळं नाहीसं झालं. तो वनामध्ये सगळे शत्रू बरोबर घेऊन गेलेला असतो. संसारात राहणारा, गृहस्थाश्रमात संयमाने वागणारा जो आहे तो त्याला
गृहाश्रमः किं नु करोति अवद्यम् ।।
5.1.17 ।। श्री. भा.
गृहस्थाश्रम त्याचं काय वाकडं करणार आहे म्हणाले, हा विचार करून तू वाग. काही काल संसार कर म्हणाले, राज्य कर. पित्याच्या मनाचंही समाधान होऊ दे. आम्हालाही समाधान वाटेल. आणि नंतर जाऊन नारदांची सेवा कर म्हणाले. याप्रमाणे ब्रह्मदेवांनी त्याला मार्गदर्शन केलं. त्याला पटलेलं आहे. त्या प्रियव्रत राजाने राज्य करण्याचे ठरवले आहे. मनुराजाने त्याच्या ताब्यात राज्य दिलं. असा ईश्वराचा संकल्पच होता. नारदांनी ध्रुवालाही उपदेश केला, पण तो परत फिरला नाही. संसार केला, राज्य केलं ध्रुवाने. पण ईश्वरदर्शनाकरता आत्ता निघालोय मी परत फिरणार नाही हा निश्चय ध्रुवाने केला. प्रियव्रताने आत्ताच नाही जाणार मी, माझं काम झाल्यानंतर मी संसार करीन, असं सांगितलं नाही. हा ईश्वराचा संकल्प ठरलेलाच आहे. त्याप्रमाणे त्याने कबूल केलं आणि राज्य...
...करायला आरंभ केलेला आहे. भगवंतांचं चिंतन तो निरंतर करतो आहे. त्याच्यावर नारदांची कृपा आहे. ईश्वार्पण बुद्धीने त्याचा सर्व कारभार चाललेला आहे.
प्रियव्रत राजा राज्य करू लागलेला असताना सूर्यनारायणाच्या फिरण्यामुळे, गतीमुळे दिवस-रात्र हा व्यवहार होतो आहे. रात्रीच्या वेळेला सूर्यकिरण इकडे पडत नाहीत, म्हणून प्रियव्रत राजा एका तेजस्वी रथामध्ये बसून सूर्याबरोबर फिरतो आहे. आपल्या राज्यामध्ये निरंतर प्रकाश पाहिजे ही इच्छा आहे. त्यावेळेला त्याच्या रथचक्रांनी भूमीमध्ये सात द्वीपं तयार झाली आणि सात समुद्र तयार झालेले आहेत. असा पराक्रमी राजा, समर्थ होता. त्याला नंतर अग्निध्र नावाचा पुत्र झालेला आहे. बाकीचीही मुलं झालेली आहेत त्याला. त्या सप्तद्वीपाच्या ठिकाणी सात मुलांची योजना केली. प्रियव्रत राजा नंतर नारद महर्षींच्या आश्रमामध्ये जाऊन राहिलेला आहे. ब्रह्मदेवांची आज्ञा पालन केली. पित्याची आज्ञा पालन केली. संसार केला आणि अरण्यामध्ये जाऊन गुरुसेवा करण्यामध्ये निमग्न झालेला आहे.
अग्निध्र राजा, जंबुद्वीपाचा अधिपती. तो तपश्चर्या करण्याकरता अरण्यामध्ये गेलेला असताना ब्रह्मदेवांनी सभेमध्ये गायन करणाऱ्या पूर्वचिती नावाची अप्सरेला आज्ञा केली की त्या अग्निध्र राजाला संसारात घे म्हणाले. ती प्राप्त झाली आहे. तिचं ते स्वरूप पाहून अग्निध्र राजा तपश्चर्या करण्याचं विसरलेला आहे. पुन्हा राजधानीमध्ये परत आला. त्याचा संसार सुरू झाला. पुन्हा त्याला नऊ मुलं झाली. जंबुद्वीपाचे नऊ विभाग त्याने केले. नऊ खंड त्याला म्हणतात. त्या विभागांमध्ये नऊ मुलांची स्थापना केली. मेरूच्या कन्या नऊ, ह्यांचा विवाह त्यांच्याबरोबर झालेला आहे.
त्याचा मुलगा नाभी नावाचा होता. मोठा भगवद्भक्त होता. यज्ञेश्वराच्या तृप्तीकरता त्याने यज्ञाला सुरवात केलेली आहे. आपल्याला परमेश्वर साक्षात पुत्र मिळाला पाहिजे म्हणून तो यज्ञ करतो आहे. भगवान प्रसन्न झाले. अग्निकुंडातून भगवान प्रगट झालेले आहेत. सर्व ब्राह्मण मंडळींनी त्यांची पूजा केली. त्यांनी स्तुती केली, भगवंता, आपली सेवा करणारा हा राजा ह्याच्यावर आपली कृपा होण्याचा योग आज आलेला आहे. ह्या राजाची इच्छा हीच आहे, की आपणच त्याचे पुत्र व्हावं. अशी राजाची इच्छा आहे. म्हणून त्याने हा यज्ञ केलेला आहे. आपली त्याच्यावर कृपा व्हावी. अशी प्रार्थना सर्वही मंडळींनी केलेली आहे. भगवान म्हणाले, आता, तुम्ही सर्व मंडळी प्रार्थना करत आहात. तुमची इच्छा मोडणं प्रशस्त नाही. राजाची इच्छा तीच आहे. माझ्यासारखा दुसरा कोण आणायचा, तेव्हा मलाच आता पुत्र व्हायला पाहिजे. या राजाची इच्छा...