पूर्ण होईल असा आशीर्वाद देऊन भगवान गुप्त झालेले आहेत. नाभी राजाची स्त्री जी मेरुदेवी हिच्यापासून भगवान प्रगट झालेले आहेत. तेज मोठं आहे, वैराग्य आहे. नियामक शक्ती आहे. सर्वही गुणसंपन्न अशा प्रकारचा तो मुलगा झालेला आहे. सर्व ब्राह्मण मंडळींना अत्यंत आनंद झाला. ऋषभ म्हणजे श्रेष्ठ. सर्व एकंदर गुणांनी श्रेष्ठ म्हणून ऋषभ याप्रमाणे मुलाचं नाव ठेवलेलं आहे. राजाची इच्छा पूर्ण झालेली आहे. त्या मुलाचं पालन-पोषण तो करतो आहे. राजाला आनंद झालेला आहे. ऋषभदेव मोठे झालेले आहेत. त्यांचं उपनयन झालेलं आहे. वेदाध्ययन त्यांनी केलेलं आहे. ब्रह्मचर्याश्रमाच्या धर्माचं सर्व आचरण करून दाखविलेलं आहे. पुढं इंद्राने आपली कन्या जयंती, ही त्यांना दिली. तिच्याबरोबर त्यांचा विवाह झालेला आहे. गृहस्थाश्रम चालू झालेला आहे. उत्तम प्रकारचं राज्य ऋषभदेव करताहेत. पर्जन्यवृष्टी वेळच्यावेळी होती आहे, सर्व धनधान्य समृद्धी आहे. काही कमी नाहीये. त्यांनाही मुलं झाली. त्या मुलांमध्ये भरत नावाचा ज्येष्ठ पुत्र होता. बाकीचे एकंदर शंभर पुत्र झाले म्हणतात. नऊ ब्रह्मज्ञानी पुत्र झालेले आहेत. कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस, करभाजन.
जन्मतःच ज्ञानसंपन्न. सर्व पृथ्वीवर संचार करणारे. काही बाकीचे तपस्वी ब्राह्मण वगैरे झालेले आहेत. एकदा ब्रह्मावर्तामध्ये यज्ञ समाप्त झाल्यानंतर ऋषभदेवांनी आपल्या मुलांना उपदेश केला, सर्व प्रजाजनांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने मुलांना त्यांनी उपदेश केला. त्यांनी सांगितले, मुलांना की, तुम्ही उत्तम राज्य करा. श्रेष्ठ महात्म्यांची संगती करा.
नायं देहो देहभाजां नृलोके
कष्टान् कामान् अर्हते विड्भुजां ये ।।
5.5.1 ।। श्री. भा.
त्या मुलांना ऋषभदेव सांगतात, हा जो मनुष्यदेह तुम्हाला मिळालेला आहे, केवळ विषयसुख भोगण्याकरता नाहीये. सगळे पशू-पक्षीही विषयसुखाकडे निमग्न झालेले आहेत. तप करणं, आपलं चित्त शुद्ध करून घेणं, अनंत जे ब्रह्मसुख आहे, ब्रह्मानंद प्राप्त करून घेणे याकरता हा देह आहे. ब्रह्मानंद प्राप्त करून घेण्याला सत्पुरुषांची संगती, सेवा घडली पाहिजे.
महत्सेवां द्वारमाहुर्विमुक्तेः तमोद्वारं योषितां सङ्गिसङ्गम् ।।
5.5.2 ।। श्री. भा.
महापुरुषांची सेवा हेच मोक्षाचं द्वार आहे. विषयी लोकांच्या, संसारी लोकांच्या संगतीमध्येच निमग्न राहून विषयभोग घेणं हे नरकाचं द्वार आहे. समचित्त असणारे, शांत, क्रोधरहित जे आहेत तेच आणखी महात्मे आहेत. त्यांची संगती करून त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे ह्या सर्वही परिवाराच्या...
...ठिकाणी आपल्या मनाची आसक्ती कमी करणं, ममता कमी करणं ह्याकरता प्रयत्न केला पाहिजे. असा पुष्कळ उपदेश ऋषभदेवांनी आपल्या मुलांना केला. भरतराजा जो आहे, ज्येष्ठ पुत्र त्याला अभिषेक केला. उत्तम प्रकाराने राज्य करण्याचा त्याला आदेश दिलेला आहे. ऋषभदेव बाहेर पडले.
शेवटचं आता काय कर्म करायचं, तर लोकांच्यापुढं आदर्श ठेवायचा आहे त्यांना. ब्रह्मचर्याश्रम झाला, गृहस्थाश्रम झाला, राज्यकारभारही व्यवस्थित झाला, मुलंही झाली. चांगली मुलं आहेत त्यांनाही मार्गदर्शन झालं. शरीरविसर्जन कसं करायचं? हे एक शिल्लक राहिलेलं आहे. ज्ञानी महात्मा जो आहे त्याच्या मनामध्ये शरीरही येऊन उपयोग नाही. शरीराच्या पलिकडे मन गेलं पाहिजे. शरीराचं भान नाहीये. अशी स्थिती झाली पाहिजे. बाहेर पडलेले आहेत. अंगावर वस्त्रसुद्धा नाहीये. समाधी अवस्थेमध्ये निमग्न आहेत. सर्व लोक निंदा करताहेत. अपमान करताहेत पण तिकडं लक्ष नाहीये त्यांचं. दुष्ट लोक, दुर्जन लोक अंगावर माती टाकणं, दगड मारणं, असे सगळे अनेक प्रकारांनी त्यांना त्रास देताहेत पण शुकाचार्य सांगतात, राजा
परिभूयमानः मक्षिकाभिरिव वनगजः ।।
5.5.30 ।। श्री. भा.
रानातला मोठा हत्ती आहे पण त्याच्या अंगावर पुष्कळ मधमाश्या वगैरे बसलेल्या आहेत, चावत आहेत, पण त्या हत्तीचं तिकडं लक्षही जात नाही. दु:खाकडे लक्षच गेलं नाही तर दु:ख कोठून होणार? मान-अपमान जर मनामध्ये आले तर ते होणार. नाही तर काही नाही. असे ते आपल्या आत्मसमाधीमध्ये आनंदामध्ये निमग्न आहेत. शेवटचं शरीर आहे. अत्यंत सुंदर शरीर आहे. त्यांच्या शरीराचा सुगंध सर्वत्र सुटलेला आहे. योगाभ्यासाच्या सगळ्या सिद्धी त्यांच्याजवळ आलेल्या आहेत. पण त्या सिद्धींना त्यांनी परत लावून दिलेलं आहे. नको आम्हाला सिद्धी म्हणाले. राजाने विचारलं, महाराज, काय ऋषभदेवांना सिद्धींची भीती वाटली काय म्हणाले. ज्ञानी महात्म्यांनी सिद्धीला भिऊन सिद्धीला दूर लोटणं काय कामाचं आहे. पुष्कळ बुद्धीवादी लोक म्हणतात, हे मोठे मोठे योगी लोक झाले, ऋषी लोक झाले, त्यांनी आपल्या योगसामर्थ्याने समाजकार्य का केलं नाही. काय समाजकार्य काय करायचंय? समाजकार्य म्हणजे मनाची शुद्धी झाली पाहिजे ना? हे मुख्य कार्य आहे. ते चालूच आहे त्यांचं. सिद्धींचा उपयोग आणखी काय करायचा? सिद्धी घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये गुंतून राहायचं त्यामुळे परमेश्वराकडेच लक्ष बाजूला व्हायचं. मग संसार होता तोच बरा होता की. व्यक्तीचा संसार असो वा समुदायाचा संसार, त्यामध्ये हा चांगला वागणार,
हा वाईट वागणार. पुन्हा सगळ्या द्वंद्वामध्ये बुद्धी गढूनच जाणार आहे. समाजकार्यात तरी काय द्वंद्वापासून दूर राहता येतं का? हा विचार करून ऋषभदेवांनी त्या सिद्धींचा त्याग केलेला आहे. मनाचा निग्रह केला पाहिजे.
शुकाचार्यांनी याचं उत्तर दिलेलं आहे. होय म्हणाले, हे श्रेष्ठ महात्मे, ऋषभदेवांसारखे सिद्धीचा परिग्रह करीत नाहीत. सिद्धी दूर लोटून दिल्या त्यांनी. ह्याचं कारण म्हणजे मनावर विश्वास नाही. मनाचा निग्रह करण्याकरिता शरीर पडेपर्यंत प्रयत्न केला पाहिजे. मन ताब्यात आलेलं आहे असं समजून राहिलं की ते केव्हा बिघडेल हे सांगता येत नाही. हे सांगण्याकरता, दाखवण्याकरता त्या सिद्धी त्यांनी लोटून दिलेल्या आहेत. कुठेही संग उपयोग नाही. मन सिद्धीमध्ये गुंतून राहिल्यानंतर त्याचं कल्याण काय होणार? भक्ती सुटली, ज्ञान सुटलं. सगळं सुटलेलं आहे. ह्याकरता नित्य आपल्या समाधीअवस्थेमध्ये ऋषभदेव राहिलेले आहेत. असा बराच काल गेलेला आहे. ते असेच अरण्यामध्ये कोठेही फिरायचे. असेच फिरता फिरता कर्नाटक प्रांतामध्ये एका डोंगरावरून अरण्यातून निघालेले असताना शरीराचं भान नाही, शरीर म्हणजे मी आहे ही तर बुद्धी केव्हाच गेलेली आहे. त्या शरीराकडे लक्ष नाही तेव्हा शरीराचं संरक्षण व्हावे हा तरी विचार त्यांना कशाला येईल. चाललेले आहेत. जिकडे देह जाईल तिकडे हे चाललेले आहेत. आनंदामध्ये, समाधीमध्ये निमग्न आहेत. समोर मोठा दावानल पेटलेला आहे, चारही बाजूंनी अरण्य पेटलेलं आहे. पण तिकडे यांचं लक्ष नाही. त्या अग्नीमध्ये यांचा देह भस्म होऊन गेलेला आहे. संपलं. देहाची अवस्था काय होणारं काही लक्ष नाही. काळजी कशाला, देहाचीच जिथं काळजी नाही तिथं संसाराची, परिवाराची काळजी कुठली असणार? निश्चिंत राहणं हे ज्ञानी मनुष्याचं मुख्य लक्षण आहे. कोणाचीही चिंता नाही. स्वार्थी मनुष्य जो आहे, त्याला देहाची तरी चिंता असते. नास्तिक आहे कोठेही लक्ष देणार नाही, पण देहाकडे लक्ष देईल. हे त्यांचं होतं. देहाची ज्यांची चिंता गेलेली आहे, मग बाकीची अहंता नाही आणि ममता नाही. त्यामुळे मुक्त झालेले आहेत हा मार्ग जो आहे, अध्यात्मविद्या काय आहे, त्याची साधना कशी आहे, ती सगळी आचरण करून ऋषभदेवांनी दाखवली आहे. भगवंतांनीच हा अवतार धारण करून सर्वांना उपदेश केलेला आहे.
भगवंतांची अशी कृपा आहे की भजन करणारे जे भक्त आहेत त्यांची परीक्षा पाहताहेत भगवान. काय पाहिजे बाबा, मुक्ती, घेऊन जा म्हणतात मुक्ती. मुक्ती मागितली तरी मुक्ती देऊन त्याला मुक्त करतात ज्ञान देऊन. पण एखादा भक्त म्हणाला की मला तुमची मुक्ती नकोय तर
तुमची भक्ती पाहिजे. मग मात्र ते विचार करतात. भक्ती द्यावी का याला, हा राहिल का त्या भूमिकेवर योग्य रितीने ? इतका भक्तियोग दुर्लभ आहे. आपल्या निजानंदामध्ये निमग्न असणारे, सर्व लोकांना हा मार्ग दाखविण्याकरता त्यांनी याप्रमाणे आचरण करून दाखविले, असे भगवान ऋषभदेव यांना आमचा नमस्कार असो. असं शुकाचार्य महाराज म्हणतात आणि अशा रितीने हे चरित्र समाप्त झालेलं आहे.
ह्यानंतर भरत राजा जो आहे, ऋषभदेवांचाच तो पुत्र आहे. तोही मोठा अधिकारी आहे, कर्मयोगी आहे. कर्माचं आचरण कसं करावं हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यांचं चरित्र आता शुकाचार्य महाराज परीक्षित राजाला सांगणार आहेत.
कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा । बुद्ध्याऽऽत्मना वा अनुसृतस्वभावात् ।।
करोति यद्यत् सकलं परस्मै । नारायणायेति समर्पयेत्तत् ।।
11.2.36 ।। भा.
ॐ नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने ।
यस्यागस्त्यायते नामविघ्नसागरशोषणे ।।
यस्यस्मरणमात्रेण जन्मसंसारबंधनात् ।
विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे ।।
विशुद्धज्ञानदेहाय त्रिवेदीदिव्यचक्षुषे ।
श्रेयःप्राप्तिनिमित्ताय नमः सोमार्धधारिणे ।।
यो देवः सवितास्माकं धियोधर्मादिगोचरः ।
प्रेरयेत्तस्य यद्भर्गस्तद्वरेण्यम् उपास्महे ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोऽस्तुते ।।
नमो आदिरूपा ॐकार स्वरूपा । विश्वाचिया रूपा पांडुरंगा ।।
तुझिया सत्तेने तुझे गुण गाऊ । तेणे सुखी राहू सर्व काळ ।।
तूची श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन । सर्व होणे जाणे तुझे हाती ।।
तुका म्हणे जेथे नाही मी-तू-पण । स्तवावे ते कवणे कवणालागी ।।
यत् कीर्तनं यत्स्मरणं यदीक्षणं यद् वन्दनं यद् श्रवणं यदर्हणम् ।
लोकस्य सद्यो विधुनोति कल्मषम् तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः ।।
विवेकिनो यच्चरणोपसादनात् सङ्गं व्युदस्योभयतोऽन्तरात्मनः ।।
विन्दन्ति हि ब्रह्मगतिं गतक्कमाः । तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः ।।
तपस्विनो दानपरा यशस्विनो । मनस्विनो मंत्रविदस्सुमंगलाः ।।
क्षेमं न विन्दन्ति विना यदर्पणम् । तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः ।।
मालां पात्रे च डमरू शूले शंख सुदर्शने ।
दधानम् भक्तवरदम् दत्तात्रेयम् नमाम्यहम् ।।
योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् । संजीवयत्यखिलशक्तिधरः स्वधाम्ना ।
अन्यांश्चहस्तचरणश्रवणत्वगादीन् । प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् ।।
मूकं करोति वाचालं पंगुम् लंघयते गिरीम् ।
यत् कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् ।।
आपदामपहर्तारम् दातारम् सर्वसंपदाम् ।
लोकाभिरामम् श्रीरामम् भूयो भूयो नमाम्यहम् ।।
यत्र यत्र रघुनाथकीर्तनं । तत्र तत्र कृत मस्तकांजलिम् ।
बाष्पवारिपरिपूर्णलोचनं । मारुतिं नमत राक्षसांतकम् ।।
पुस्तकजपवटहस्ते वरदाभयचिन्ह चारुबाहुलते ।
कर्पूरामलदेहे वागीश्वरी चोदयदाशु मम वाचम् ।।
श्रीगणेशाय नमः
श्रीगुरुचरणारविंदाभ्याम् नमः ।
श्रीशुक उवाच
भरतस्तु महाभागवतो यदा भगवता
अवनितलपरिपालनाय संचिंतितः
तदनुशासनपरः पञ्चजनीं विश्वरूपदुहितरं
उपयेमे ।।5.7.1।। श्री. भा.
शुकाचार्य महाराजांनी प्रियव्रत राजाचा वंश सांगायला सुरवात केलेली आहे. या वंशामध्ये भगवंतांनी ऋषभअवतार धारण केला. मुलांना उपदेश केला. ज्येष्ठ मुलगा जो भरत आहे याला राज्याभिषेक करण्याची आज्ञा केलेली आहे. पित्याच्या आज्ञेप्रमाणे भरताने विश्वरूपाची कन्या पंचजनी हिच्याबरोबर विवाह केला. सुमती, राष्ट्रभृत, सुदर्शन, आवरण आणि धूम्रकेतु असे पाच पुत्र त्याला झाले. या देशाला पूर्वी अजनाभ वर्ष असं म्हणत होते. भरत राजा राज्य करू लागल्यानंतर त्याच्या कीर्तीमुळे भारतवर्ष हे नाव या देशाचं पडलं आहे. कर्मयोगी होता मोठा. यज्ञयागादिक जी कर्म वेदरूपाने ईश्वराने दाखविलेली आहेत ती सगळी कर्म आपण करायची असं त्याने ठरवलं. पुष्कळ ज्ञानसंपन्न होता तो. आपल्या पूर्वजांनी ज्याप्रमाणे राज्य केलं. अत्यंत प्रेमाने प्रजाजनांचं संगोपन केलं, त्याप्रमाणेच तो पालनपोषण करतोय. लहान-मोठे अनेक यज्ञ श्रद्धेनं त्याने केलेले आहेत. यज्ञकर्म करण्याच्या वेळेला त्याची भावना, बुद्धी, कशी होती सांगताहेत आचार्य महाराज -
संप्रचरत्सु नानायागेषु विरचितांगक्रियेषु अपूर्व
यत्तत्क्रियाफलं धर्माख्यं परे ब्रह्मणि यज्ञपुरुषे
सर्वदेवतालिंगानां मंत्राणां अर्थनियामकतया
साक्षात्कर्तरि परदेवतायां भगवति वासुदेव एव
भावयमान आत्मनैपुण्यमृदितकषायः हविःषु
अध्वर्युभिर्गृह्यमाणेषु स यजमानः यज्ञभाजो
देवांस्तान् पुरुषावयवेषु अभ्यध्र्यायत ।।
5.7.6 ।। श्री. भा.
यज्ञयाग वगैरे वेदांमध्ये सांगितले आहेत. ते यज्ञ सुरू झालेले असताना, यज्ञाचं फळ म्हणजे जे पुण्य, ते पुण्य त्यांनी भगवान वासुदेवाला समर्पण करावं. अर्पण करणं याचा अर्थ आपण कर्ता नसून ईश्वर कर्ता आहे ही बुद्धी धारण करणं म्हणजे समर्पण आहे. कर्तृत्व अभिमान आपल्याला होतो. कारण फळ आपल्याला पाहिजे असतं. फळाची कामना असते. फळ भोगणारा जर मी आहे तर कर्ता मीच आहे, अशा अभिमानाने कर्म जर झालं तर ते कर्म बंधक ठरतं आहे. त्या कर्माचं फळ भोगण्याकरता त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणून भगवान वासुदेवालाच कर्मफळ समर्पण करावं. फळभोक्ता वासुदेव आहे. हे माझं फळ नाही. कर्ता हा आहे आणि भोक्ता वासुदेव कसा होईल? ज्याने कर्म केलं त्याला त्याचं फळ मिळायचं, तर त्याची जी बुद्धी आहे, मी कर्ता नाही. यज्ञातल्या सर्वही देवतांचा नियामक तो आहे परमेश्वर. बुद्धीचा नियामकही तोच आहे. यज्ञ...
...करण्याला लागणारी जी माझी बुद्धी मी म्हणतो ती बुद्धी ही त्याचीच आहे. त्याच्या हातात आहे. 'आपुलिया बळे, नाही बोलवत, सखा कृपावंत, वाचा त्याची' ही बुद्धी तुकाराम महाराजांनी दाखविलेली आहे. वाणी, इंद्रियं, मन हे सर्वही त्याच्या आधीन आहे. म्हणजे बुद्धीला जर प्रेरणा झाली, इच्छा ही बुद्धीलाच होणार आणि इच्छेनंतर कृती होणार. इच्छा करणं हे कार्य बुद्धीचं नसून त्याला प्रेरक शक्ती ही ईश्वराची आहे. अर्थात खरा कर्ता तोच ठरलेला आहे. हा जरी एक प्रतिनिधी म्हणून म्हणजे प्रेरणेमुळे सांगितल्यामुळे करतो आहे, तरी मुख्य कर्तृत्व परमेश्वराचे आहे. साक्षात कर्ता तो आहे. म्हणजे अहंकार नाही. कर्तृत्व अभिमान गेला. तोच कर्ता आणि तोच भोक्ता आहे. सगळं यज्ञाचं पुण्य त्या परमेश्वराचं आहे. त्याच्याकडे देऊन टाकलं आपण काही नाही घेतलं. यज्ञामध्ये ज्या इंद्रादिक देवता आहेत त्या सर्व इंद्रादिक देवता म्हणजे विश्वरूपी जो परमात्मा आहे त्याच्या शरीरामध्ये अंतर्गत आहेत. त्याच्या अवयवामध्ये देवता आहेत, हीच भावना आहे. देवता निराळ्या नाहीयेत. देवतास्वरूप तोच आहे. कर्ता तोच आहे आणि फलभोक्ता तोच आहे. म्हणजे कर्म किती शुद्ध झालेलं आहे हे सांगताहेत आचार्यमहाराज. अशा त्या शुद्ध कर्माचरणामुळे त्याच्या चित्तामध्ये भगवद्भक्ती निर्माण झाली. ती भक्ती रोज वाढती आहे. हजारो वर्षापर्यंत राज्य केलेलं आहे. अनेक यज्ञ केले. प्रजापालन उत्तम प्रकाराने केलेलं आहे. सर्वांचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि अरण्यात जाण्याचं त्यांनी ठरविले. जे काही राज्य त्याच्या वाट्याला आलेलं होतं ते सर्व त्यांनी आपल्या मुलांना वाटून दिलेलं आहे. आपल्या राजवाड्यातून भरत राजा बाहेर पडला.
पुलहऋषींचा आश्रम ज्या बाजूला होता तिथं येऊन राहिलेला आहे. गंडकी नदी त्या ठिकाणी वहात आहे. भगवान श्रीहरी तिथे राहात आहेत. ज्या गंडकी नदीमध्ये शालिग्राम शिला प्राप्त होतात. रोज राजाने त्रिकाल स्नान करावं. आता काही राज्याचा भार नाही, चिंता नाही. सगळं मुलांवर सोपवलेलं आहे. निश्चिंत मनाने, शांत मनाने भगवंताची पूजा करावी. कंद, मूळ, फळ वगैरे आणावी अरण्यातून. विषयवासना मनातून दूर झालेल्या आहेत. सगळं विसरून गेलेला आहे. राज्य, राजवाडा, मुलं, सगळे आप्तइष्ट सगळ्यांना विसरून गेलेला आहे. अशा रितीने त्याचं पूजन चालू आहे. नामस्मरण चालू आहे. ध्यान चालू आहे, त्यामुळे अत्यंत आनंद, शांती त्याला मिळाली. भगवंताची भक्ती, प्रेम मनामध्ये जास्तीत जास्त वाढायला लागलेलं आहे. आनंदअश्रू नेत्रातून वहावे, अंगावर रोमांच उत्पन्न व्हावेत. सात्विक जे अष्टभाव आहेत ते सगळे उत्पन्न झाले आहेत. भगवंताच्या चरणाचे चिंतन करतो आहे. ध्यान करतो आहे. पूजा झाली तरी पूजा विसरून जावी त्यांनी -
क्रियमाणां भगवत्सपर्यां न सस्मार ।।
5.7.12 ।। श्री. भा.
पूजा झाली की नाही काही भान नाही. असं त्यांनी व्रत धारण केलेलं आहे. भगवंताची पूजा, भक्ती सगळा काल त्याच्यामध्ये चाललेला आहे. प्रत्येक दिवशी प्रातःकाली स्नान झाल्यानंतर सूर्योदय झाला म्हणजे सूर्यमंडलामध्ये जे भगवंताचं तेज आहे त्या नारायणाची स्तुती त्यांनी करावी. नमस्कार करावा, असा कार्यक्रम चाललेला आहे. सर्व संसार सोडून दिलेला आहे आणि निरुपाधिक झाला, काहीही पाठीमागे उपाधी नाही. भगवंताची भक्ती चालू आहे. त्या भक्तीची वृत्ती आहे. प्रगती आहे. पण त्याचं प्रारब्ध कर्म आड आलं. एके दिवशी सकाळी स्नान केलं त्याने नदीमध्ये. नदीतीरावरच जप करीत बसलेला आहे रोजच्याप्रमाणे. इतक्यात एक हरिणी त्याच्या वरच्या बाजूला पाणी पिण्याकरता आलेली आहे. गर्भिणी होती. ती पाणी पिऊ लागलेली असताना जवळच अरण्यामध्ये एका सिंहाने गर्जना केली. ती गर्जना ह्या हरिणीच्या कानावर पडली. घाबरली. नदीवरून पलिकडे उडी मारण्याचा तिने प्रयत्न केला. तिच्या उदरातून तो गर्भ बालक पाण्यामध्ये पडलेला आहे. तीही पलिकडे गेली धावत धावत आणि तिचंही प्राणोत्क्रमण झालेलं आहे. तो हरिण बाळ नदीतून वहात चाललेला आहे. भरत राजा बसला होता. त्यांनी डोळे उघडले होते. समोर तो हरिण बालक वहात चाललेला आहे. त्याला दया उत्पन्न झाली. उठला लगेच जप सोडून, नदीमध्ये जाऊन त्या हरिणाला त्याने वर आणलेलं आहे. अंग पुसलेलं आहे. थोपटलेलं आहे. डोळे उघडले त्या बालकाने. त्याला घेऊन भरत राजा आपल्या आश्रमामध्ये आला. लहान आहे. बिचाऱ्याला आई नाही. बाप नाही. माझ्यावरच देवाने याचं संरक्षण करण्याची जबाबदारी सोपवली आहे. अशी कल्पना याची झालेली आहे. देवाला काय संरक्षण करता येत नव्हतं काय? ह्याच्यावर सोपवायला कशाला पाहिजे. ती एक कर्तव्यबुद्धी निर्माण झाली. दया मनामध्ये आहे. दया वगैरे हासुद्धा एक विकार आहे. पालन पोषण करणं त्याचं चाललेलं आहे. हळू हळू तो हरिण बालक मोठा होतो आहे. स्नानाला जाताना, कुठेही अरण्यामध्ये जाताना त्याला खांद्यावर घेऊन जावं त्याने. कारण पाठीमागे अरण्यामध्ये सिंह-वाघ कोणी प्राणी येतील आणि या हरणाला मारून टाकतील ही आणखी ममता त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. आत पूजा करीत असताना बाहेर त्याने डोकावून पहावं आहे की नाही, का गेला. एकटा गेला म्हणजे कोणीतरी त्याला मारतील हे विचार मनामध्ये येत आहेत.
चोवीस तास भगवंताचं नामस्मरण आहे, ध्यान आहे, पूजन आहे. असा याचा काल चाललेला होता. त्या भरतराजाचा सगळा काल आता त्या हरणाच्या पालन-पोषणामध्ये जायला...
...लागलेला आहे. हे अर्थात प्रारब्ध आहे. प्रयत्न त्याचा किती झालेला आहे. सर्व संग परित्याग करून येऊन राहिलेला आहे. मुलंबाळं सगळी सोडून दिली. राज्य संपत्ती सोडून दिलेली आहे. पण इथं या हरणाच्या रूपाने ते प्रारब्ध त्याला आडवं आलेलं आहे. असा बराच काल गेला. राजर्षी भरताचा मृत्यूकाल जवळ आलेला आहे. तो हरिण जो होता, त्याच्या मनामध्येही प्रेम उत्पन्न झालेलं आहे. तोही त्याच्याजवळ नेहमी बसायचा, राहायचा. भरतराजा पडलेला आहे, मृत्यू जवळ आलेला आहे. तो हरिण बालक समोर बसलेला आहे. त्याच्याविषयी त्याच्या मनामध्ये विचार सुरू झाले. मी गेल्यानंतर आता याचं कसं होईल? कोण याचं संरक्षण करील एवढ्या अरण्यामध्ये? ईश्वराची प्रार्थना करतो आहे. मृगाच्या ठिकाणी मन असताना त्याचं प्राणोत्क्रमण झालेलं आहे आणि त्याला दुसरा जन्म हरणाचाच घ्यावा लागला. पण हरिणाच्या जन्माला गेलेल्या भरतराजाला पूर्व जन्माचं स्मरण राहिलेलं आहे. विसरला नाही. मृत्यू म्हणजे सगळं विसरून जायचं. पण याला याच्या भक्तीमुळे, कर्मामुळे स्मरण राहिले आहे आणि पश्चात्ताप झाला. अरे, अरे, काय म्हणाले, मी माझ्या मार्गातून भ्रष्ट झालो, परमेश्वरापेक्षा या हरणालाच मी जास्त समजलो. त्याचं पालनपोषण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे ह्यात अभिमान आहे मला. अभिमानाने आणि त्याचं पोषण करण्यामध्ये माझा सगळा काल गेला. भगवंताची भक्ती सुटली आणखी मला हरिणाच्या जन्माला यावं लागलं. लगेच त्याने आपल्या आईला सोडून दिलेलं आहे आणि तो हरिणाच्या जन्माला गेलेला भरतराजा तिथून निघाला. पूर्वजन्मामध्ये ज्या आश्रमात राहात होता. गंडकी नदीच्या तीरावर तिथं आलेला आहे. त्याही जन्मामध्ये त्याची भक्ती चाललेली आहे. स्नान करावं, त्रिकाल स्नान त्या हरिणाने, नारायणाचे स्मरण करावं, भगवंतांचे चिंतन करावे असा त्याचा काल गेला. तोही जन्म संपलेला आहे. हरिणाच्या जन्मातून भरतराजा मुक्त झाला.
अथ कस्यचित् द्विजवरस्य अंगिरः प्रवरस्य शमदमतपः ।।
5.9.1 ।। श्री. भा.
यस्तु तत्र पुमांस्तं परमभागवतं राजर्षिप्रवरं भरतमुत्सृष्टमृगशरीरं
चरमशरीरेण विप्रत्वं गतमाहुः ।।
5.9.2 ।। श्री. भा.
एक ब्राह्मण मोठा वेदशास्त्राचा अभ्यास केलेला, उत्तम कर्मानुष्ठान करणारा, सदाचार संपन्न, आत्मगुणही त्याच्याजवळ आहे असा एक ब्राह्मण. त्याला दोन स्त्रिया होत्या. एका स्त्रीपासून त्याला नऊ पुत्र झाले. दुसऱ्या स्त्रीपासून एक मुलगा आणि एक मुलगी झाली. तो जो मुलगा झाला दुसऱ्या स्त्रीपासून तो म्हणजे हरिण जन्म ज्याचा संपलेला आहे असा भरतराजा ब्राह्मणरूपाने जन्माला आलेला आहे. या जन्मामध्ये मुक्त होणार आहे परंतु हरिणाच्या मोहात अडकल्यामुळे...