« Previous | Table of Contents | Next »
पान १७१

भरत राजाला दोन जन्म घ्यावे लागलेले आहेत.

या जन्मामध्ये मुक्त व्हायचंय पण पुन्हा नवीन शरीरं घ्यावी लागली. परंतु स्मृती आहे. अशी स्थिती आपली का झाली, पुन्हा जन्माला का यावं लागलं सगळं माहिती आहे. आत्मज्ञानसंपन्न आहे. पूर्ण ज्ञान आहे. त्यामुळे व्यवहारातल्या कोणत्याही विषयाची इच्छा नाही. जेवायला मिळालं काय, न मिळालं काय चाललेलं आहे कार्य. कोणाचीही संगती करायची नाही. असं त्याने निश्चित ठरवून टाकलं. हरिण जन्मामध्येही सगळं सोडून दिलेलं आहे. आईला सोडून दिलेलं आहे. एकट्यानेच जन्म काढलेला आहे. झाडावरून खाली पडलेली पानंच फक्त घ्यायची. पाणी प्यावं आणि भगवंताचे चिंतन करावे. आता जन्माला आलेला आहे कोणाचीही संगती असू नये. कोणीही आपल्याला प्रेम करू नये. अशाकरता आपली वृत्ती, दुसऱ्यांना दाखवण्याकरता, कोणीही हाक मारली तरी ऐकायला आलं नाही असं दाखवणे. दाखविण्यासाठी नाही तर याला खरंच ऐकायला यायचंय नाही. लक्ष जर नाही बाहेरच्या शब्दाकडे तर बाहेरच्या व्यवहाराचे ज्ञान होणार कसे? दिसत नाही असं दिसावं. कसं तरी वागायचं. कोणी काम करून घेतलं पुढं उभे राहून तर तेवढं काम करायचं अशी त्याची वृत्ती पाहून लोकांची कल्पना झाली की हा वेडा मुलगा आहे. जडभरत त्याचं नाव ठेवलं. जड म्हणजे अज्ञानी वेडा. त्याच रूपाने सगळे त्याच्याकडे पाहायला लागले. काम मात्र त्याच्याकडून सगळ्यांनी करून घ्यावीत आणि याने करावीत. कोणी बोलावून न्यावे आपापल्या घरी, खायला द्यावं. कामं सांगावी, पाणी भरावं, काहीही कामं मोठीमोठी सांगावीत त्याला. असं त्याचं चाललेलं आहे.

त्याची आठव्या वर्षी पित्याने मुंज केलेली आहे. वेदाभ्यास त्याने करावा म्हणून पिता प्रयत्न करतो आहे. मोठा ज्ञानी पिता आहे. पण याचं कुठं लक्ष आहे. कशाला वेदाभ्यास करायचा. आता शिकायचं काय राहिलंय म्हणाले. बोलून दाखविलेलं आहे त्याने. पुष्कळ प्रयत्न केला पित्याने पण त्याला काही समजले नाही. ज्ञान नाही काही नाही. काहीच समजत नव्हते. पिता निराश झालेला आहे. काही दिवसांनी पित्याला मृत्यू आलेला आहे. जडभरताची माता जी आहे तिला एक मुलगी आहे. तिची जी सवत होती, जडभरताची सावत्र आई, तिलाही मुलं होती. या जडभरताच्या आईने ती दोन मुले तिच्या सवतीच्या ताब्यात दिली. सांगितले, बाई, तू या दोन मुलांचा सांभाळ कर. मी पतीबरोबर सहगमन करणार आहे, म्हणून तिने सहगमन केलं. जडभरताला आता पिताही नाही आणि माताही नाही. अपेक्षाही त्याला कोणाचीच नाही. आत्मानंद मिळालेला आहे. पण...

***
पान १७२

...सगळे त्याचे बंधू व्यवहारात आसक्त झालेले आहेत. त्या सर्वांना व्यवहार खरा आहे, संसार खरा आहे, अशी कल्पना आहे. अध्यात्मविद्या, भगवद्भक्ती इकडे लक्ष नाहीये. चांगला धष्टपुष्ट भाऊ मिळालेला आहे. घरातली सगळी कामं त्याच्याकडून करून घ्यावीत. त्या भाऊ-बहिणींनी, धुणं-भांडी सर्व करायचे, रात्री जेवणं झाल्यावर उरलेले अन्न खा म्हणायचे व भांडी घासायला सांगायचे. यानेही काही तक्रार न करता सर्व कामे करायची. हा जन्म आपला शेवटचा आहे. कशाला तक्रार करायची. संपणार आहे या जन्मी सगळं. पुढे जन्म नाही मृत्यू नाही काही नाही. हा ही पूर्ण विश्वास आहे. अशा प्रकारचं कार्य चाललेलं आहे. शेतामध्ये पाठवावं बंधूंनी. शेत राखायचं काम त्याला सांगावं. तिथेही बसून राहायचं याने. थंडी, वारा, पाऊस यात पांघरायला वस्त्र आहे की नाही याकडे लक्ष नाही. शरीर धष्टपुष्ट आहे. आत्मानंद मिळालेला आहे. चिंता कशाचीच नाही. देह म्हणजे मी आहे या अज्ञानाने देहाची आस्था निर्माण होते. देहासंबंधित सगळे आप्तेष्ट माझे आहेत, ही ममता निर्माण झाली की त्यांचीही चिंता निर्माण होते. जितकी ममता वाढेल तितकी चिंता अधिक आहे. काही नाही, अहंकार नाही आणि ममता नाही. मी आनंद स्वरूप आहे. 'चिदानंद रूपः शिवोहम् शिवोहम्'. कोणाशीही माझा संबंध नाहीये. कोणीही माझे संबंधी नाहीयेत. जगच कुठेय? सगळ्या त्या बंधूंनी कामं करून घ्यावीत. लोकांनीही कामं करून घ्यावीत. त्याला काही तरी खायला द्यावं. त्यानेही समाधान मानून घ्यावं. शेतातली कामं करण्याकरता बंधूंनी त्याला पाठवावं. सगळी कामं त्यांनी करावी. कोठे जमीन उकरायची, कोठे काय करायचे हे उभे राहून मात्र सांगायला लागायचं. सांगितल्यानंतर थोडा वेळ गेल्यावर बसला की बसला. समाधी लागलेली आहे.

एके दिवशी जडभरत शेत राखण्याकरता शेतात बसलेला आहे. डोळे झाकून बसलेला आहे. धान्य पक्षांनी नेलं काय, पक्षी आले काय, गेले काय, याचं लक्ष फक्त ईश्वराकडेच आहे. कबीरजींच्या आईने त्यांना सांगितलं अरे कबीरा शेला विणायला बस त्या मागावर. त्यांनी जाऊन बसावे, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचं स्मरण झाल्याबरोबर काम बंद झालेलं आहे. शेले विणायचे, विकायचे परंतु हे ध्यानामध्ये निमग्न झाले असतानासुद्धा ते माग चालत होता. शेला विणला जात होता. त्या शेल्याला बाकीच्या शेल्यापेक्षा जास्त किंमत येत होती बाजारामध्ये. कोण करत होतं हे सगळं? तशीच स्थिती आहे. शेतामध्ये बसून राहिलेला आहे जडभरत. तहान नाही, भूक नाही काही नाही. त्या बाजूला एक चोरांचा राजा होता. त्याची मोठी टोळी होती. त्याला मुलगा नव्हता. त्यानी नवस केला होता देवीला की मला जर मुलगा झाला तर मी तुला नरबळी देईन. त्याला...

***
पान १७३

...मुलगा झालेला आहे. नवस फेडण्याकरता त्या चोरांनी एका मनुष्याला धरून आणलेलं आहे. रात्रीची वेळ आहे. नजर चुकवून तो मनुष्य पळून गेला. राजदूत शोध करायला निघाले. वेळेला तो बळी देण्यासाठी मिळाला पाहिजे.

शोध करता करता ते त्या शेतामध्ये जडभरत ज्याठिकाणी बसले होते डोळे झाकून, तिथे आले. त्यांची दृष्टी या जडभरतावर पडलेली आहे. काय धष्टपुष्ट शरीर आहे, असे वाटले. त्यांना वाटले की बरंय की म्हणाले तो मनुष्य पळाला तर जाऊ दे तो मिळाला नाही तर याला बळी देऊ म्हणाले. चला हो उठा म्हणाले. उठले. कोठे जायचे काही पत्ता नाही. शेतातलं काम माझ्याकडे दिलेलं आहे, काही नाही. कर्म सुटलं पाहिजे. सोडून उपयोग काही. विसरून गेलं पाहिजे म्हणजे खरा संन्यास आहे. कोणतं आपलं कर्म आहे, काय आहे, काही जाणीव नाहीये. कर्माच्या अतित आहे. सर्व एकंदर धर्माच्या, साधनाच्या अधीन झालेलं आहे. ते राजदूत यांना घेऊन आलेले आहेत. गुहेमध्ये मोठं मंदिर बांधलेलं आहे. भद्रकाली देवीची पूजा झालेली आहे. जडभरताला स्नान घातलं. भोजन उत्तम प्रकारचं दिलेलं आहे. शांतपणे भोजन केलं. उत्तम वस्त्र नेसायला दिली. गळ्यामध्ये सुगंधीत पुष्पाच्या माला घातलेल्या आहेत. देवीच्या समोर, महापूजा संपल्यानंतर, एक कट्टा होता तिथे त्याला बसा म्हणाले. बसलेले आहेत. काही चौकशी नाही. त्यांना कळलेलं नसेल असं नाही. कशाकरता आणलेले आहे वगैरे मनामध्ये काहीही नाही. मला मृत्यू येणार आहे मला मारणार आहे. कोणाला मारणार आहेत?

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ।।
2.23 ।। भगवद्गीता

ही जी स्थिती आत्मस्वरूपाची, भगवान सांगताहेत, त्या आत्मस्वरूपाचं चिंतन चाललेलं आहे. मला काही शस्त्राचा आघात होणार नाही, काही नाही. कोणत्याही पंचमहाभूतांकडून किंवा कोणत्याही कारणाने मला मृत्यू नाही. नैसर्गिक अमर मी आहे. हे प्रत्यक्ष ज्ञान झालेलं आहे नुसतं गीता वाचून, श्रद्धेनं गीता वाचून आचरण करणारे लोक फाशी जाताना सुद्धा नैनं छिन्दन्ति शस्त्राणि अशी भावना ठेवतात. अमर आहे मी. इतकी श्रद्धा ठेवून फासावर जाणारे, मृत्यूची भीती त्यांना वाटली नाही. या महात्म्यालासुद्धा कशाचीही भीती वाटत नाहीये. शांतपणाने मांडी घालून बसलेले आहेत. तो जो चोरांचा पुरोहित होता, त्याने ठरवलं की याचा आता शिरच्छेद करायचा, याचं मस्तक तोडून देवीच्या पायावर टाकायचं. त्या खड्गाचं अभिमंत्रण केलं. ते खड्ग, तलवार...

***
पान १७४

...उचलली त्यांनी. देवीला हे सहन झालं नाही. माझ्यासमोर एका ब्रह्मज्ञानी महात्म्याला मारतायत हे लोक. हिंसेचं या लोकांना काहीच वाटत नाही. कोणाचाही प्राण घ्यायचा म्हणजे यांना काही वाटतच नाही. कोणाचा प्राण घेत आहेत? देवीला राग आलेला आहे. ती देवी त्या मूर्तीतून एकदम प्रगट झाली. त्याच्या हातातली तलवार काढून घेऊन त्याचाच शिरच्छेद देवीने केलेला आहे. सर्व चोर जमलेले होते त्या सर्वांचा शिरच्छेद केलेला आहे. देवी अदृश्य झाली. त्याचंही काही नाही.

न प्रहृष्येत्प्रियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम् ।।
5.20 ।। भगवद्गीता

हर्षामर्षभयोद्वेगैः मुक्तो यः स च मे प्रियः ।।
12.15 ।। भगवद्गीता

आपलं मरण टळलं, आपण सुटलो म्हणून आनंद नाहीये. आपल्याला मृत्यू येणार आहे याबद्दल भीतीही नाही, विषादही नाही. म्हणून देवीला यावं लागलं. शुकाचार्य सांगतात हे राजा, जडभरत उठलेले आहेत. बाहेर पडलेले आहेत. श्रेष्ठ पुरुषांना त्रास देणारे त्यांचा नाश करण्याचा प्रयत्न करणारे जे आहेत, त्यांचाच नाश होतो. जडभरत यामधून मुक्त झालेले आहेत.

परीक्षित राजा, यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही. कारण स्वतःचा शिरच्छेद होणार आहे हे माहित असतानासुद्धा चित्तामध्ये कोणतीही गडबड नाहीये. शांत प्रेक्षक म्हणून पाहत आहेत. हे केवढं सामर्थ्य आहे. देहात्मभाव, देहाची आसक्ती हे पूर्ण गेलेलं आहे. आपल्या शिराचा, मस्तकाचा छेद होणार आहे, हे पाहत आहेत. सर्वत्र त्यांची मैत्री आहे. त्यांच्या कामाकरता माझा शिरच्छेद करत आहेत. करेनात का! असं निर्वैर अंतःकरण आहे. म्हणून साक्षात भगवान हे यांचे संरक्षण करत असतात. निर्भय अशा प्रकारच्या भगवंताला जे शरण गेलेले आहेत, त्यांचं संरक्षण भगवंत करतात. बाहेर पडलेले आहेत गुहेतून. जिकडे रस्ता दिसेल तिकडे निघाले. आपल्या घरी जायचंय, आपल्या गावात जायचंय काही नाही. सगळं विसरले. आले समोर कोणी तर आपले आहेत. नाहीतर कोणी आपलं नाही. हे निघालेले आहेत रस्त्याने. त्या देशाचा राजा रहूगण नावाचा होता. त्याने मुलांच्या स्वाधीन राज्य केलं आणि कपिल मुनींच्याकडे जाऊन काही ज्ञान मिळवावं अशा उद्देशाने तो निघालेला होता. पालखीमध्ये बसून चाललेला आहे राजा. पालखी वाहण्याकरता रस्त्यामध्ये जे लोक दिसले त्यांना धरून आणलेलं आहे दूतांनी. कामं करून घ्यायची. एक मनुष्य कमी पडलेला आहे. इतक्यात समोरून हे जडभरत येत आहेत हे त्यांनी पाहिले. त्यांना आनंद झाला. हा एकटा मनुष्यसुद्धा पालखी घेऊ शकेल म्हणाले. चांगला धष्टपुष्ट मनुष्य दिसतो. आले, चला महाराज काम आहे. चला म्हणाले घ्या ही पालखी खांद्यावर घ्या. बाकीचे लोक होतेच.

***
पान १७५

यांनीही पालखी खांद्यावर घेतली. मान अपमान काही नाही.

मानापमानयोस्तुल्यः तुल्यो मित्रारिपक्षयोः ।।
14.25 ।। भगवद्गीता

मान अपमान हे दोन्हीही सारखे आहेत. हे दोन्ही करणारे लोकही सारखे आहेत. काही नाही. शत्रू मित्र भावना नाहीये. पालखी वाहण्याचे काम चाललेले आहे पण खाली बघून चालत आहेत. कोणताही कीडा मुंगी आपल्या पायाखाली मरू नये. मध्ये काही कीडा मुंगी आली तर एकदम त्यांनी उडी मारावी पलिकडे. पायाखाली त्यांचा नाश होऊ नये म्हणून जपावे. शरीराकडून होणारी कार्य, वाणीने होणारी, इंद्रियाकडून होणारी कार्य, मनाने होणारी कार्य अत्यंत भगवत् स्मरणपूर्वक आहेत. यांनी उडी मारल्याबरोबर पालखीला धक्का बसावा, त्या रहूगणराजाला त्रास व्हावा. त्यांनी सांगितलं अरे बाबा सावकाश चाला, मला त्रास होतो आहे. एकदा झालं, दोनदा झालं. त्यांनी सांगितलं राजेसाहेब आम्ही अगदी सावकाश चाललेलो आहोत. कोणी नवीन मनुष्य आलेला आहे. हा मध्येच एकदम उडी मारतो, त्याला तुम्ही काहीतरी सांगा म्हणाले. राजाला राग आलेला आहे. एकाामुळे सगळेच आणखी दोषी ठरण्याचा प्रसंग आलेला आहे. म्हणून राजा त्या जडभरताला उद्देशून मुद्दाम मनाला लागेल असं बोलतो आहे.

अहो कष्टं भ्रातः व्यक्तं उरु परिश्रान्तः दीर्घम् ।
अध्वानं एक एव ऊहिवान् सुचिरं नातिपीवा न ।।
संहनननांगः जरसा च उपद्रुतो भवान् सखे नो ।
एवं अपरे एते सङ्घट्टिनः इति बहु विप्रलब्धोपि ।।
अविद्या रचितद्रव्यगुणकर्माशय स्वचरमकलेवरे ।
अवस्तुनि संस्थानविशेषे अहम् ममेति ।।
अनध्यारोपित मिथ्याप्रत्ययः ब्रह्मभूतः तूष्णीम् ।
शिबिकां पूर्ववत् उवाह ।।
5.10.6 ।। श्री. भा.

राजा म्हणतो आहे, अरे हा दमलेला दिसतो आहे. तुझ्या एकट्यावरच पालखीचा भार पडलेला दिसतो आहे. म्हातारा झालेला आहे वाटतं. तरुण होते जडभरत, पण मुद्दाम त्याला लागेल असं बोलले. फार वेळ हा भार तुझ्या खांद्यावर झाल्यामुळे तू दमलेला दिसतो आहेस. हे बाकीचे लोक दमलेले दिसत नाहीत. तुलाच फार श्रम झालेले दिसतात. सावकाश चल म्हणाले. असं मुद्दाम त्याला टोचून बोलतो आहे राजा. पण त्या शब्दाकडे त्याचं लक्ष नाहीये. स्वतःच्या...

***
पान १७६

...शरीराकडे ज्याचं लक्ष नाहीये त्या शरीराला उद्देशून जे शब्द उच्चारले जातात, तिकडे कसं लक्ष जाईल. शेवटचं शरीर आहे. संपणार आहे. जगाचा माझा संबंध संपणार आहे. कशाला रागवायचं, बोलेना बिचारा. अविद्येने तयार झालेलं हे शरीर खरं नाही, खोटं आहे. त्या शरीराला मी कशाला समजायचं. शिरच्छेद होण्याच्या वेळेला ज्यांना काही वाटलं नाही त्यांना राजा थोडं बोलला तर काय वाटणार आहे. इतकी मनोभूमिका तयार झालेली आहे. शांतपणाने पालखी वाहण्याचे काम चाललेले आहे. पुन्हा धक्का बसला पालखीला. अतिशय रागावलेला आहे राजा. आणि रागाने म्हणतो आहे अरे तू जिवंत आहेस का मृत झालेला आहेस. मी कोण आहे माहित आहे काय? मी राजा आहे. तुला चांगली शिक्षा मी करीन, दंड करीन. वाटेल तसं बोलतो आहे राजा. महापुरुषांच्याकडून उपदेश मिळवण्याकरता निघालेला आहे. आश्चर्य वाटलं जडभरतांना. थोडोसे याचे डोळे उघडावे, त्याचं प्रारब्धचं उदयाला आलं म्हणून यांना बोलण्याची बुद्धी झाली. त्यांनी बोलायला आरंभ केलेला आहे.

त्वयोदितं व्यक्तमविप्रलब्धं
भर्तुः स मे स्याद् यदि वीर भारः ।।
गन्तुर्यदि स्याद् अधिगम्पमध्वा
पीवेति राशौ न विदां प्रवादः ।।
5.10.9 ।। श्री. भा.

स्थौल्पं कार्श्यं व्याधय आधयश्च
क्षुत्तृड्‌भयं कलिरिच्छा जरा च ।
निद्रा रतिर्मन्युरहंमदः शुचः
देहेन जातस्य हि मे न सन्ति ।।
5.10.10 ।। श्री. भा.

काय राजोसाहेब काय बोलला आपण. दमला आहेस, श्रम झालेले आहेत. कोणाला उद्देशून बोलला आपण. मला तरी भार झाला नाही तर श्रम कुठले? कुठं जायचं, कसं जायचं, काय काही माहीत नाही म्हणाले. तू मोठा कृश झालेला आहेस, म्हातारा झालेला आहेस. कोणाला म्हणालास तू. स्थूल किंवा कृश हे देह धर्म आहेत राजोसाहेब. आधि-व्याधी सर्व देहाची स्थिती आहेत. प्रेम करणं त्याचप्रमाणे रागवणं, निद्रा वगैरे हे सर्वही देहधर्म आहेत. मला काही नाही. देह जन्माला आलेला आहे. त्या देहाबरोबर मी जन्माला आलो आहे असं आजपर्यंत मी समजत नाही. मला जन्म नाही किंवा मृत्यू नाही. मला कोणतेही देहाचे विकार नाही आहेत. कृशता नाही, स्थूलता नाही, श्रम नाही काही नाही. दमलेला आहे घाम आलेला आहे दिसतो आहे म्हणून राजा म्हणाला...

***
पान १७७

...श्रम झाले असावेत. जिवंत किंवा मृत हे सगळे या देहालाच आहे. आदि-अंत असा हा देह आहे. आपण राजे आहात आणि हे सगळे आपले नोकर आहेत, हे सुद्धा खरं कशावरून मानायचं. खरं आहे स्वामी-सेवक असं कोण आहे? ते तत्वज्ञान आहे. तुम्ही राजे आणि आम्ही सेवक हे जर खरं असेल तर तुम्ही शिक्षा करू शकाल आम्हाला. काय संबंध आहे. व्यवहारामध्ये कोणी राजे समजावे कोणी कोणाचा नोकर समजावे, काही संबंध नाही. आत्मस्वरूपाची प्राप्ती मला झाली. मी कोण आहे हे मला समजले आहे. मला आता शिक्षा काय देणार तुम्ही, दंड करून काय शिकवणार तुम्ही. काही आता शिकायचं राहिलं नाही म्हणाले. थोडसं भाषण केलेलं आहे. त्यांचा अनुभव त्यांच्या वाणीतून प्रगट झालेला आहे.

राजाच्या मनावर परिणाम झाला. हा कोणी ज्ञानी महात्मा आहे. पालखीतून खाली उतरला राजा. त्यांच्या खांद्यावरची पालखी काढून घेतलेली आहे. आणि त्यांच्या पायावर मस्तक ठेवलेलं आहे. अनेक योगशास्त्राचे मोठे मोठे जे ग्रंथ आहेत, त्या ग्रंथामध्ये जे वर्णन केलेलं आहे, ज्ञानी महात्म्यांचं, त्याप्रमाणे यांच्या मुखातून सर्व ग्रंथाचे सार निघालेले आहे. कोण आहात आपण महाराज सांगा. कोठून आलेले आहात, कोठे निघालेले आहात. इंद्राच्या वज्राची तुम्हाला भीती वाटत नाही, शंकराच्या त्रिशुलाची, यमदंडाची भीती वाटत नाही. पण आपल्यासारख्या ज्ञानी, ब्रह्मर्षी महात्म्याचा अपमान आज माझ्या हातून झाला. कोण आहात आपण सांगा. सामान्य जड, वेड्यामाणसाप्रमाणे बाहेरून आपण दिसता पण केवढं ज्ञान आपल्यापाशी आहे. आपली वाणी ही समजून घेणं हे आम्हाला माहिती नाही. व्यवहार खरा आहे. त्या व्यवहार दृष्टीने आपल्या वाणीचा अर्थ लावतो आहे. जन्म नाही. मृत्यू नाही. रोग नाही काही नाही, हे आम्हाला खरं कसं वाटणार? सांगा, आपण समजावून सांगा. श्रम झालेले दिसत आहेत आपल्याला. नाही कसं म्हणता आपण? चालताना खाली पाहून चालता आपण, आम्हाला जे दिसतं आहे ते खरं मानायला काय हरकत आहे.

स्थौल्यं कार्श्यं व्याधयः आधयश्च
क्षुत्तृड् भयं कलिः इच्छा जरा च ।
निद्रा रतिः मन्युः अहम्मदः शुचः
देहेन जातस्य हि मे न सन्ति ।।
5.10.10 ।। श्री. भा. [Note: Reference corrected to match previous page context for verse starting with 'Sthaulyam']

[Also possibly referenced: 5.10.22 ।। श्री. भा. for next context]

व्यवहार सत्य आहे ही बुद्धी झाल्यामुळे राजा प्रश्न मांडतो आहे. आत्मा हा कर्ताभोक्ता नाही.

***
पान १७८

देहधर्माचा संबंध आत्म्याला होत नाही म्हणणे. आत्मा तर सर्वव्यापी आहे. सर्वव्यापी असणारा आत्मा सर्वांशी बद्ध आहे. मग सर्वांची सुख दु:खं त्याला नाही कसं म्हणता. चूल पेटलेली आहे, जाळ लावलेला आहे. त्याच्यावर पातेले ठेवलेले आहे, पाणी टाकलेले आहे त्याच्यामध्ये. खाली अग्नी आहे. ते पात्र तापल्याबरोबर आतलं पाणी तापलेलं आहे. पाण्यामध्ये टाकलेले तांदूळही शिजायला लागलेले आहेत अग्नीच्या सामर्थ्यामुळे. अग्नी त्या पात्राच्या सहाय्याने तांदुळापर्यंत पोहचला आहे आणि तांदुळाचा भात तयार झालेला आहे. देह आहे. मी आहे. अंत:करण आहे. अन्नमय, प्राणमय, मनोमय, ज्ञानमय, आनंदमय यात सर्वत्र आत्मा आहे. पलिकडे आहे याचा अर्थ इथे नाही असे नाही. अन्नमय कोशापासून आहे. या सर्वांशी संबंध असणारा असा जो आत्मा आहे. त्याला या देहादिकांचे धर्म का नसावेत. कर्तृत्व भोक्तृत्व त्याला का नसावं? तो सुखीदु:खी आहे असे का मानू नये? हे जसं खरं आहे तसं राजाही खरा आहे आणि सेवकही खरा आहे. हा स्वामी-सेवक भावही खरा आहे. हे जर जगामध्ये नाही असं मानलं तर जगामध्ये अव्यवस्था होईल म्हणाले. कोणीही वाटेल तसा वागायला लागेल. म्हणून स्वामी सेवक भावही योग्य असला पाहिजे. ते मला समजावून सांगा म्हणाले. काय आहे, तुम्हाला काही नाही हे दिसतंय. तुमच्या खांद्यावर पालखी दिली तरी तुमच्या मनात कोणताही विकार नाहीये. मानाकरता किती प्रयत्न करावा लागतो. किती वैर उत्पन्न होते, काही नाही. निर्विकार आपले मन आहे. परंतु आम्ही कसं हे समजून घ्यायचं. आत्मा हा अकर्ता-भोक्ता आहे. कोणत्याही क्रियेचा त्याला संबंध नाही. हे आम्हाला जाणून घ्यायचंय.

जडभरताने बोलायला सुरवात केली आहे. राजासुद्धा जिज्ञासू आहे. पश्चाताप झालेला आहे. जडभरताची योग्यता त्याला पूर्ण समजली आहे. पण आपलीही शंका त्यांनी मांडली. ज्ञानी महात्माच त्या शंकेचं समाधान करू शकतो. त्यांनी सांगितले बाबा

न सुरा यो हि व्यवहारमेनं
तत्त्वावमर्शेन सहामनन्ति ।।
5.11.1 ।। श्री. भा.

तू मोठा बोलका आहेस म्हणाले. बोलायला तुला चांगलं येतं. पण ज्ञान तुला बिलकुल नाही. खरे ज्ञानी महात्मे सर्वच व्यवहार हा मिथ्या समजत आहेत. तत्वज्ञानाच्या बरोबर व्यवहार नाहीये. आत्मज्ञान झाल्यावर व्यवहार संपलेला आहे. व्यवहारच जिथे नाही तिथे हे खरे आहे वगैरे...

***
पान १७९

...कोण समजणार? त्या तत्वज्ञानी माणसाच्या मनामध्ये काही नाही. सगळे धर्म जे आहेत, वर्णधर्म आहे, आश्रमधर्म आहे, राजधर्म आहे हे सगळेही व्यवहारात येतात. तत्त्वज्ञान होण्याकरता या वाणीचा काहीही उपयोग नाही. कर्माचा काहीही उपयोग नाही. स्वप्नामध्ये सुद्धा सर्व सुख दु:ख भोगायला लागतं म्हणाले. म्हणून स्वप्नातलं खरे होत नाही. मनामध्ये रजोगुण, तमोगुण जोपर्यंत आहे, तोपर्यंत सगळा व्यवहार दिसतो आहे. भासतो आहे. सुख मिळालं, दु:ख मिळालं. दु:ख गेलं, सुख जास्ती झालं ह्या सगळ्या वासना चित्तामध्ये उत्पन्न होतात. हे सर्वही फल वासनांमुळे मिळतं, फल भोगतो आणि संसार यामुळे खरा वाटतो म्हणाले.

तावान् अयं व्यवहारः सदाइविः
क्षेत्रज्ञसाक्ष्यो भवति स्थूलसूक्ष्मः ।।
5.11.7 ।। श्री. भा.

जोपर्यंत त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान होत नाही, तोपर्यंत हा व्यवहार सर्व खरा वाटतो आहे म्हणाले. त्याला कारण म्हणजे मन आहे. मनानेच खरं वाटून घेतलेलं आहे आणि तोच मनाचा अभ्यास कितीतरी जन्माचा आहे. त्यामुळे खोटं म्हटलं ज्ञानी माणसाने, ते खरं कसं वाटेल? या त्रिगुणामध्ये जोपर्यंत विषयात आसक्त मन आहे तोपर्यंत संकटं आहेत. दु:खं आहेत. गुणातीत अवस्था ईश्वरकृपेने प्राप्त झाली तर त्याचं पूर्ण कल्याण होते, शांती त्याला प्राप्त होोते. असा पुष्कळ उपदेश जडभरताने राजाला केलेला आहे. हे मत आत्मस्वरूपाचे ज्ञान करून देणारं आहे.

सुखमात्यन्तिकं यत्तद् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम् ।।
6.21 ।। भगवद्गीता

बाकीचं प्रमाण त्याला काही समजावून सांगू शकत नाहीये. संसारताप दूर करणारं मन आहे. यामधील दोष जर सगळे दूर करता आले तर मात्र आपलं पूर्ण कल्याण होतं. मन हा खरा शत्रू आहे. सद्गुरूची, श्रीहरीची उपासना हे शस्त्र तू मिळव आणि त्या शस्त्राने मनाला शासन कर म्हणाले. रहूगण राजाच्या मनाचे समाधान झालेले आहे. देहाभि मानी मी आहे म्हणाले त्यामुळे अमृतासारखं आपलं भाषण माझ्या चित्तामध्ये स्थिर राहात नाहीये. हा अध्यात्मयोग आहे, आत्मसंबंधी जो उपाय आपण सांगितलात त्याचं स्पष्टीकरण करून आपण सांगा महाराज.

उपदेश करताना सर्वत्र जे आत्मतत्व आहे हे त्याला समजावून सांगायचं आहे. त्याकरता पृथ्वी, भूतदया आहे हे घेतले दृष्टांताकरता म्हणून. सर्वही लोक या पृथ्वीवर राहतात म्हणाले. पार्थिव आश्रय घेऊन राहतात. त्या पृथ्वीपासूनच हे शरीर झालेलं आहे. द्वैत सांगतात आणि अद्वैतही दाखवतात. शरीर पृथ्वीपासून तयार झालेलं आहे. पण शरीरामध्ये पाय निराळे, हात...

***
पान १८०

...निराळे, गुडघे निराळे, मांड्या निराळ्या, धड निराळे, मस्तक निराळे, कान निराळे, नेत्र निराळे किती विविधता आहे पण सगळं एक आहे म्हणाले. हा भेद जरी असला तरी वस्तुतः अभेद आहे. म्हणून अभेदाकडे गेलं पाहिजे, मूळ चिंतन झालं पाहिजे. केवळ बाह्य कार्यदृष्टी उपयोग नाही. कारणदृष्टी निर्माण झाली पाहिजे. तरच शांती आहे. हे शरीर, शरीराचे अवयव अनेक आहेत. खांदा हे पार्थिव आहे. खांद्यावर दिलेली पालखीही पार्थिव आहे आणि पालखीत बसलेला पण पार्थिवच आहे. पालखी घेणारेही पार्थिव आहेत. राजा समजतो आहेस की मी राजा आहे, हे नोकर आहेत आणि म्हणून मी सांगितलेली आज्ञा यांनी मान्य केली पाहिजे. कुठला राजा आहेस तू. तूही पार्थिव आणि आम्हीही पार्थिव. वाटेल त्याला धरून आणतोस आणि त्याला पालखी देतोस, पालखीमध्ये बसून जातोस आणि आज्ञा करतोस आणि ज्ञान मिळवायला जातोस तू. कसं तुला ज्ञान मिळेल? अहंकार नष्ट झाल्याशिवाय आत्मस्वरूपाजवळ येत नाही म्हणाले. काय या बिचाऱ्या लोकांना धरून आणून तू त्रास देतोस. सर्व चराचर हे पृथ्वीमधे अंतर्भूत आहे. सगळं पार्थिव आहे. पृथ्वीशिवाय दुसरं काही नाही. तुम्ही वाटेल ते समजा मी राजा आहे, मी पंतप्रधान आहे. मी राष्ट्रपती आहे. समजून नुसतं काय उपयोग? असा हा व्यवहार आहे.

अभेद असताना, अद्वैत असताना, द्वैत मानून त्यामध्ये सुद्धा मी श्रेष्ठ मी कनिष्ठ हे सगळे द्वैत तुम्ही निर्माण केलेलं आहे. ही संपूर्ण पृथ्वी तिचेही मूळतत्व जे आहे, मूळ कारण अणू म्हणून सांगताहेत त्याचंही मूळ जे आहे. क्रमाने विचार केला तरी हरकत नाही. पृथ्वी आहे, तेज आहे, वायू आहे. आकाश आहे, जल आहे. महत्तत्व आहे, अव्यक्त प्रकृती आहे. पुन्हा आणखी अव्यक्त जे आत्मस्वरूप त्या ठिकाणी प्रकृतीचा संबंध संपतो. मुळापर्यंत अगदी आत्मस्वरूपापर्यंत गेल्यानंतर सगळी कार्यदृष्टी संपून जाते अपवाद होऊन जातो आहे. दागिने ही दृष्टी जोपर्यंत आहे तोपर्यंत हा दागिना चांगला आहे, हा मला मिळाला पाहिजे असा विचार येतो. पण सगळं सोनं आहे. तो दागिना विकणारा त्याच्यादृष्टीने हा दागिना चांगला हा वाईट ही दृष्टी नाही. लोकांना जसं पाहिजे तसं तो दागिने करून देतो. पण त्याच्याजवळ जर दागिना दिला तर तो दागिना मोडून, जाळून त्यापासून निव्वळ सोनं मिळवतो. त्याला त्या दागिन्याबद्दल मोह नाहीये. म्हणून शुद्ध अशा स्वरूपाचं आत्मस्वरूप जे आहे, ते सत्य आहे मूळतत्व आहे. त्या मूळतत्वांचा सगळा आविर्भाग झालेला आहे. मनोवासनेमुळे, कर्मामुळे ईश्वराने हा आविर्भाग दाखविलेला आहे. ईश्वराने केलेलं आहे म्हणून हे सत्य आहे, हेही नाही. ईश्वराने दाखविलेलं आहे. तुम्ही ते सत्य समजता त्याला...

« Previous | Table of Contents | Next »