« Previous | Table of Contents | Next »
पान १८१

ईश्वराचा काय दोष? हे जे आत्मस्वरूप आहे ईश्वरस्वरूप याची प्राप्ती कोणत्याही साधनाने होत नाही.

तपसा न याति
न चेज्यया निर्वपणाद् गृहाद्वा ।।
5.12.12 ।। श्री. भा.
दानधर्म करा. तपश्चर्या करा, योगाभ्यास करा.
विना महत्पादरजोऽभिषेकम् ।।
5.12.12 ।। श्री. भा.

आत्मज्ञानी महात्म्यांच्या चरणांचे रजःकण जोपर्यंत आपल्या मस्तकावर पडले नाहीत, म्हणजे इतकी नम्रता, निरहंकार वृत्ती जोपर्यंत झाली नाही तोपर्यंत कोणत्याही साधनांनी आनंदरूपी आत्मा मिळणार नाही. भगवान श्रीहरी वासुदेवाद्दल शुद्ध भावना जर अंतःकरणामध्ये निर्माण झाली तर सर्व व्यवहार संपून जातो आहे.

यत्रोत्तमश्लोकगुणानुवादः प्रस्तूयते ग्राम्यकथाविघातः ।।
5.12.13 ।। श्री. भा.

त्या परमेश्वराच्या कृपेनेच अशी शुद्ध बुद्धी उत्पन्न होते. जडभरत सांगतात रहूगण राजा मी सुद्धा पूर्वी तुझ्यासारखा राजा होतो म्हणाले. परंतु हे सगळं मी ऐकलं, विचार केला मार्गदर्शन मला मिळालं. केवळ भगवंताची आराधना करावी म्हणून सर्वसंग परित्याग करून अरण्यामध्ये आलो असताना एका हरिणाच्या बालकामध्ये माझे मन गुंतून राहिलं आणि मला हरिणजन्म घ्यावा लागला. पण मृगशरीर आलं तरी अद्यापि याचे स्मरण मला भगवंताच्या कृपेने आहे. म्हणून कोणाचीही संगत करायची नाही असं मी ठरवलंय. असंग रितीने मी सर्वत्र संचार करतो आहे. म्हणून जो आत्मजिज्ञासू आहे त्याने असंग राहण्याचा प्रयत्न करावा. असंगता अंगामध्ये बाणण्याकरता म्हणून संतांची, महात्म्यांची संगती करावी. म्हणजे हे विवेक, ज्ञान उत्पन्न होते. नित्यानित्य विवेक आहे, क्षेत्रक्षेत्रज्ञ विवेक आहे, हेयोपादेय विवेक आहे सगळे विवेक हे चित्तामध्ये उत्पन्न झाल्यानंतर आत्मस्वरूपाची ओळख होती आहे आणि तो मुक्त होतो आहे. जडभरताने त्याला आणखी थोडा उपदेश केला. संसार हे अरण्य आहे.

दुरत्ययेऽध्वन्यजया निवेशितो रजस्तमः सत्त्वविभक्तकर्मदृक् ।
स एष सार्थोऽर्थपरः परिभ्रमन् भवाटवीं याति न शर्म विन्दति ।।
5.13.1 ।। श्री. भा.

ह्या मार्गावर आणून सोडलेलं आहे त्या ईश्वराच्या मायेने. सगळ्या लोकांनी या अरण्याचा रस्ता धरलेला आहे. सुखाच्या इच्छेने सगळे या रस्त्यांनी चाललेले आहेत. ही भवाटवी म्हणजे संसार...

***
पान १८२

अरण्य आहे. या अरण्यामध्ये सहा चोर राहत आहेत म्हणले. त्यांचं राज्य आहे. स्पष्टीकरणही शुकाचार्य महाराजांनी केलेलं आहे. ते चोर म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे चोर आहेत. हा जो अरण्यातून चाललेला प्रवासी आहे, त्याने जे काही पुण्यधन मिळवलेलं असेल, चांगली कर्म करून, हे चोर सगळं त्यांचं पुण्यं हिरावून नेतात. कोठल्यातरी मोहात ते त्याला टाकून जातात, मग संपते सगळे. अरण्यातल्या लांडग्या-कोल्ह्यासारखे आप्तइष्ट सगळं धन समक्ष डोळ्यादेखत घेऊन जातात. पुष्कळ गवत याठिकाणी वाढलेलं आहे म्हणाले. पुष्कळ मधमाश्या वगैरे चावत आहेत. सगळे लोक अरण्यातून चाललेले आहेत. कोणत्या दिशेनं आपण निघालो काही त्याला समजत नाहीये. त्याप्रमाणे मधमाश्या म्हणजे हे सगळे दुर्जन लोक. शुकाचार्य महाराजांनी स्पष्टीकरण केलं. दुर्जनांचीही गाठ पडली. एकदम याचं सर्वस्व हरण करतात, दु:ख देतात. सुवर्ण जे आहे त्याठिकाणी आसक्त झालेला जो आहे बंधू असो, गुरू शिष्य असो पिता पुत्र असो कोणीही जरी असलं तरी त्यांच्या मनातील प्रेमभाव नाहीसा होतो, त्या सुवर्णाच्या लोभामुळे. अजगर मोठा आहे या ठिकाणी. निद्रा हा अजगर आहे म्हणतात शुकाचार्य महाराज. ह्या निद्रा अजगराने ह्याला गिळून टाकलेलं आहे. ह्याला काही समजत नाही. ज्ञान नाही, अज्ञानही नाही. हे अज्ञान आहे हे त्यावेळेला समजत नाही. नंतर जागा झाल्यावर म्हणतो मी अगदी काही समजू शकलो नाही. अज्ञानाचं अनुमान करावं लागतं. अज्ञानाचा अनुभव साक्षात नाहीये. त्या अजगराच्या पोटामध्ये हा जातो.

अशा रितीने चालले आहेत या अरण्यातून सगळे. हंस पक्षी भेटतात यांना. चांगले वागणारे म्हणजे सत्पुरुष, त्यांची संगती धरावी असे वाटते. त्यांनी सांगितलेलं सर्व ऐकावे असे वाटते. पण पुन्हा या हंसांची संगती सोडून देतो. पुन्हा माकडांची संगती धरतो. सत्पुरुषांची संगती सोडून देऊन चांचल्य बुद्धीने नेणारे वानरासारखे विषयी लोक यांच्या संगतीने जातो. संकटं येतात. दु:खं येतात त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो. ईश्वराला शरण जातो आणि दु:खं नाहीशी झाली की पूर्ण सुख आपल्याला मिळालं अशी समजूत करून घेतो म्हणाले. डोक्यावर घेतलेला भार जड झाला म्हणून खांद्यावर घेतला त्यांनी किती हलके वाटले. पण भार आहेच ना! डोक्यावरचा भार खांद्यावर आला. याप्रमाणे मनामध्ये उत्पन्न होणारे अनेक विकल्प जे आहेत त्यामुळे सगळं हे खरं वाटतं. दु:खं झाली तरी त्याचे स्मरण राहात नाही. निदान दु:खाचं स्मरण तरी राहायला पाहिजे. सगळं खरं आहे. मग दु:खही खरीच आहेत की पण दु:खाची आठवण राहात नाही ना! ती आठवण राहिली तरी यातून बाजूला व्हावं असं वाटेल. पण ते स्मरणच राहात नाही. रहूगण राजा तुझे मन कोठेही...

***
पान १८३

आसक्त होऊ देऊ नको. भगवान श्रीहरीची सेवा भक्ती तू कर. त्याच्या कृपेने विवेक ज्ञानरूपी शस्त्र प्राप्त करून घे आणि यातून बाहेर पड म्हणाले. रहूगण राजाला ज्ञान व्हावं, या दयेतून त्याला उपदेश केलेला आहे. राजाने अपमान केला हे मनामध्ये सुद्धा नाहीये. ज्ञानी मनुष्याला फक्त दया आहे, इतरांना नाहीये. राजा म्हणतो महाराज मानवाचा जन्म किती चांगला आहे, दुसऱ्या जन्मापेक्षा. आपल्यासारख्या महात्म्यांची संगती या जन्मामध्येच घडती आहे. आपल्या थोड्याशा समागमाने माझ्या अंतःकरणामध्ये भगवद्भावना उत्पन्न झाली. माझं पाप सगळं गेलेलं आहे. आपल्याला मी नमस्कार करतो. शुक सांगतात राजा ब्रह्मर्षि जडभरत हे त्या सिंधू राजाला आत्मतत्वा्बद्दल मार्गदर्शन करत आहेत. अत्यंत दयाळू आहे. रहूगण राजांनी त्यांच्या पायावर मस्तक ठेवलेलं आहे.

आपूर्ण अर्णव इव निभृतकरणोर्म्याशयः
धरणिमिमां विचचार ।।
5.13.24 ।। श्री. भा.

संपूर्ण जलाने भरलेला समुद्र जसा गंभीर आहे. कोणाला उपदेश केला, कोणाचा उद्धार झाला इकडे काही लक्ष नाही. ते त्याचं प्रारब्ध आहे. निघालेले आहेत जडभरत पुढे. कोठे जायचे काही माहित नाही. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर। किंबहुना चराचर। आपुलाचि जाहला।। सगळेच माझे आहे. त्यांची ममता हा गुण आहे. आमची ममता हा दोष आहे. मर्यादित आहे ममता. हे घर माझे आहे. ही मंडळी माझी आहेत. एवढीच ममता आहे. सर्वच माझं आहे अशी ममता उत्पन्न झाली तर तो ज्ञानी ठरेल. याप्रमाणे जडभरताने केलेला उपदेश आणि त्याचे स्पष्टीकरणही शुकाचार्य महाराजांनी केलेलं आहे. परीक्षित राजाच्या मनाचे पूर्ण समाधान झालेलं आहे. निवृत्तीमार्ग कसा आहे? भगवद्भक्तीनं खरी निवृत्ती प्राप्त होते, हे सगळं शुकाचार्य महाराजांनी त्याला समजावून सांगितलेलं आहे.

पुढे राजाने विचारले महाराज, प्रियव्रत राजाचे चरित्र सांगताना आपण या भूमंडलाचे वर्णन केले, सप्तद्वीप झाली तो रथामध्ये बसून फिरल्यामुळे आणि सात समुद्र झाले. हे पृथ्वीचे वर्णन मी आपल्या मुखातून ऐकले पण हेच सविस्तर ऐकण्याची माझी इच्छा आहे. सप्तद्वीप कोणती आहेत, सप्तसमुद्र कोणते आहेत, त्या द्वीपामध्ये कोण कोण राहत आहेत, ते कसं वागताहेत हे समजून घेण्याची माझी इच्छा आहे. भूगोल सगळा समजावून सांगा.

***
पान १८४

सात दिवसाचे आयुष्य ठरलेलं आहे. सातव्या दिवशी जायचं आहे आणि राजा म्हणतोय भूगोल मला समजावून सांगा. पण राजानेच याचा खुलासा केला.

भगवतो गुणमये स्थूलरूपे आवेशितं मनो हि
अगुणेऽपि सूक्ष्मतमे आत्मज्योतिषि परे ब्रह्मणि
भगवति वासुदेवाख्ये क्षमं आवेशितुं तदु ह्येतद्
गुरोऽर्हस्यनुवर्णयितुमिति ।।
5.16.3 ।। श्री. भा.

राजा काही भूगोल समजून घेणार नाहीये. हे संपूर्ण बाह्य जे जगत आहे ते परमेश्वराचे रूप आहे. हेच विश्वरूप झालेलं आहे. विश्वकर्ताही तो आहे आणि विश्वरूपही तो आहे. हे स्थूल रूप एकदा बुद्धीमध्ये स्थिर झाले म्हणजे सूक्ष्म जे सच्चिदानंद, अधिष्ठान रूप ते समजून घेण्याची योग्यता प्राप्त होते. म्हणून मला हे सांगा अशी प्रार्थना करतोय. शुकाचार्य महाराज म्हणतात राजा, परमेश्वराचं रूप म्हणजे विश्व आहे ते किती अनंत आहे. मनाने, वाणीने याचे आकलन होणे कठीण आहे. कितीही आयुष्य असले तरी याचे वर्णन करता येत नाही, आकलन होत नाही. मुख्य मुख्य जेवढं आहे तेवढं मी तुला सांगतो. जसं आमच्या गुरुमहाराजांच्या मुखातून मला कळलेलं आहे, तसं मी तुला सांगतो.

जंबुद्वीपापासून त्यांनी सांगायला आरंभ केलेला आहे. जंबु, प्लक्ष, शाल्मली, कुश, क्रौंच असे सगळे सात द्वीपांचे ते वर्णन करणार आहेत. पृथ्वी गोल आहे-मध्यभागी जंबुद्वीप त्याच्या सभोवती एक समुद्र, त्याच्या सभोवती एक द्वीप, त्याच्या सभोवती एक समुद्र अशी रचना वर्तुळाकार आहे. दहा लक्ष योजने विस्तीर्ण असा वर्तुळ असलेला हा जंबुद्वीप आहे. नऊ खंड याच्यामध्ये आहेत. त्याची मर्यादा घालणारे त्याचे पर्वतही आहेत. या जंबुद्वीपाच्या मध्यभागी इलावृत नावाचे खंड आहे आणि त्याच्या मध्यभागी मेरु पर्वत आहे. मोठा उंच आहे, लांब आहे. त्याच्याही सभोवती लहान लहान अशा प्रकारचे पर्वत आहेत. इलावृताच्या दक्षिणेला हिमालय पर्वत आहे. निषद, हेमकूट हे पर्वत आहेत. ते समुद्रापर्यंत पसरलेले आहेत. दुसऱ्या दिशेला माल्यवान, गंधमादन असेही पर्वत आहेत. चारी दिशांना पर्वत आहेत. ह्या मेरु पर्वतावर देवांची उपवनं आहेत. नंदन, चैत्ररथ, वैभ्राजक, सर्वतोभद्र या उपवनामध्ये सर्व देव आपापल्या स्त्रियांसहवर्तमान विहार करत आहेत. मोठी मोठी फळं या वृक्षातून खाली पडतात. त्या फळाच्या रसापासूनही नदी निर्माण झालेली आहे. इलावृत खंडातून ती वहात जात आहे. अनेक पर्वत या...

***
पान १८५
[Image: 0068_SB-.JPG - भूमंडल रचना / जंबुद्वीप]

खंडात आहेत. अनेक नद्या आहेत. या ठिकाणी जे काही राहणारे लोक आहेत, ते भगवंताची उपासना करत आहेत. मुख्य म्हणजे या इलावृत खंडामध्ये भगवान शंकर परमात्मा राहात आहेत. ईश्वराची उपासना ते करत आहेत. भगवंतांच्या चरणापासून निघालेली गंगा नदी वहात वहात हिमालयातून आलेली आहे.

यापैकी जंबुद्वीपापैकी भारतवर्ष म्हणून एक खंड आहे. ती कर्मभूमी आहे. बाकीची सगळी खंड म्हणजे स्वर्गाचे स्थान म्हणजे पुण्याचे फळ भोगण्याकरता म्हणून ती स्थानं केलेली आहेत.

भूमीवरचे स्वर्गच त्यांना म्हणतात. हजारो वर्ष आयुष्य त्यांना आहे. त्याठिकाणी राहणारे लोक. दहा दहा हजार हत्तींचे सामर्थ्य त्यांना आहे. असा पुष्कळ सुखाचा काल त्यांना येतो आहे. तिथं राहणारी मंडळी पुष्कळ सुखाचा उपभोग घेत आहेत. इलावृत खंडामध्ये भगवान शंकर परमात्मा हे एकच पुरुष आहेत. बाकी सर्व पार्वतीच्या सख्या-दासी वगैरे आहेत. त्या इलावृताच्या प्रदेशात प्रवेश करणारा पुरुष त्याला स्त्रीरूप प्राप्त होते. ते काय चरित्र आहे ते पुढे राजा तुला सांगू. भगवान शंकर, पार्वती माता आणि तिच्या सर्व दासी, सखी या सर्वांशी सहवर्तमान, श्रीहरीचे जे संकर्षण रूप आहे त्याचे चिंतन करतात, ध्यान करतात, प्रार्थनाही करतात. एक खंडाचे वर्णन झालेले आहे.

यापुढे भद्राश्ववर्ष म्हणून इलावृत खंडानंतर आहे. त्या ठिकाणी हयग्रीव नावाचे परमेश्वराचे रूप आहे. त्या ठिकाणचे जे राजपुत्र आहेत त्या हयग्रीव परमेश्वराची उपासना करत आहेत, प्रार्थना नित्य करत आहेत. तिथे राहणारी बाकीची मंडळीही हयग्रीव परमेश्वराची उपासना करत आहेत.

तिसरे खंड हरिवर्ष आहे. या हरिवर्षामध्ये भगवान नृसिंह रूपाने वास्तव्य करतात. नृसिंह अवतार कशाकरता घेतला, हे सगळं पुढे सांगू. त्यांची सेवा दैत्यराज प्रल्हाद हे मोठे भगवद्भक्त आहेत, हे भगवान नरहरीची सेवा करत आहेत. प्रार्थना करतात, नृसिंह मंत्राचा जप करतात.

***
पान १८६
[Image: kurmavta.JPG - कूर्म अवतार]
स्वस्त्यस्तु विश्वस्य खलः प्रसीदतां
ध्यायन्तु भूतानि शिवं मिथो धिया ।
मनः च भद्रं भजतात् अधोक्षजे
आवेश्यतां नो मतिः अप्यहैतुकी ।।
5.18.9 ।। श्री. भा.

प्रल्हादजी प्रार्थना करतात, सर्व विश्वाचे कल्याण व्हावे. खलः प्रसीदताम्, जे खलांची व्यकटी सांडो ज्ञानेश्वर महाराजांनीही ही प्रार्थना केली. खलाचे मन प्रसन्न व्हावे, त्याचे विकार सर्व दूर व्हावेत आणि सर्वही प्राण्यांनी एकमेकांचे कल्याण, चिंतन करावे. सौहार्द भावनेने राहावे. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे। हीच प्रार्थना ज्ञानेश्वर महाराज करताहेत. भगवद्भक्तांची संगती आम्हाला घडावी, त्याचे मार्गदर्शन आम्हाला घडावे, स्त्री पुत्र आप्त इष्ट, मित्र, घरदार इथे आमचे अंत:करण राहू नये, गुंतू नये अशी पुष्कळ प्रार्थना प्रल्हादजी करताहेत. त्या खंडामध्ये राहणारी जी मंडळी आहेत, प्रजाजन आहेत त्यांना बरोबर घेऊन नृसिंहाची उपासना करण्यामध्ये ते निमग्न आहेत.

त्यानंतर चौथे केतुमाल वर्ष. कामदेव रूपाने भगवान राहाताहेत. भगवती लक्ष्मी देवी,

***
पान १८७

स्त्रीपुरुष जे प्रजाजन आहेत यांना बरोबर घेऊन ती कामदेवांची उपासना करत आहे. प्रार्थना, नामस्मरण करत आहे.

पुढे रम्यक वर्ष. त्या रम्यकवर्षामध्ये मत्स्यरूपी परमात्म्याची उपासना मनुराजा करतो आहे. सर्वही प्रजाजन त्या मत्स्यरूपी परमात्म्याची भक्ती करण्यामध्ये निमग्न आहेत.

त्यानंतर हिरण्यमय वर्षामध्ये कूर्म रूपाने भगवंतांचा निवास आहे. पितरांचे अधिपती अर्यमान हे त्या कूर्मरूपी परमेश्वराची उपासना सर्व प्रजाजनांना घेऊन करताहेत. प्रार्थना करताहेत.

उत्तरकुरु नावाचा एक खंड आहे. भगवान वराहरूपी परमात्मा त्या ठिकाणी राहत आहेत. ही भूदेवी सर्व प्रजाजनांना घेऊन त्या वराहांची भक्ती करण्यामध्ये निमग्न आहे. मंत्रजप चालू आहे. प्रार्थना चालू आहे.

त्यानंतर किम् पुरुषवर्ष आठवं, भगवान रामचंद्र हे त्याठिकाणी राहत आहेत. रामभक्त हनुमान हे त्यांची उपासना करताहेत. सर्व प्रजाजनांना सांगत आहेत त्यांना घेऊन उपासना करत आहेत.

मर्त्यावतारः तु इह मर्त्यशिक्षणं
रक्षोवधायैव न केवलं विभोः ।
कुतोऽन्यथा स्याद् रमतः स्व आत्मनः
सीताकृतानि व्यसनानि ईश्वरस्य ।।
5.19.5 ।। श्री. भा.

हनुमान सांगताहेत, हे जे मनुष्यरूप धारण केलं भगवान श्रीहरींनी, रामरूप हे काय रावण, कुंभकर्णांना मारण्याकरता केलं असेल? ते काय सहज मेले असते. परंतू मर्त्यांना शिक्षण द्यायचंय. संसार खरा आहे. संसारसुख खरं आहे. स्त्री पुत्रादिक सर्व संसार योग्य आहे असे हे सुख खरं आहे अशा समजूतीने जे संसारात आसक्त झालेले आहेत, त्यांना दु:ख भोगावे लागते. हे सांगायचंय, दाखवायचंय त्यांना. अरण्यात काय गेले, मारीच राक्षस आलेला आहे सुवर्णमृग रूपाने. सीतादेवीच्या सांगण्याप्रमाणे त्याला धरून आणून त्याचे कातडे मिळवण्याकरता पाठीमागे गेले. मारीच राक्षस रामाप्रमाणे आवाज काढून ओरडला. लक्ष्मणांना जावं लागलं. इकडे सीतादेवींना रावण घेऊन गेलेला आहे. रामचंद्र दु:ख करत बसले, कुठे गेली सीता. संसारामध्ये आसक्ती ही दु:खदायक आहे हे दाखवण्याकरता लोकांना सर्व दु:ख भोगून दाखवली आहेत रामचंद्रांनी. मारुतीराय सांगतात,

***
पान १८८

त्यांना कोठले दु:ख, त्यांना काही नाही. पण शिक्षण द्यायचंय.

शेवटचं खंड नववं खंड म्हणजे भारतखंड. याठिकाणी नर-नारायण देवता आहे भारतवर्षाची. नारदमहर्षी भारतीय प्रजाजनांसहवर्तमान नर-नारायणांची भक्ती करत आहेत. प्रार्थना करत आहेत. सर्व लोकांच्या कल्याणाकरता नर-नारायण हे तपश्चर्या अखंड करत आहेत. 'सर्वेऽपि सुखिनःसंतु', देवाला तपश्चर्या करावी लागते. भारतवर्षामध्ये सुद्धा पुष्कळ मोठे मोठे पर्वत आहेत. नद्या पुष्कळ आहेत. याठिकाणी ज्यांना जन्म प्राप्त झालेला आहे. त्यांच्याकडून होणारी पुण्य पाप वगैरे नित्यकर्म, त्या कर्माप्रमाणे त्यांना पुढे फळं मिळतं आहे. स्वर्गलोकाला कोणी जातात, कोणी नरकाला जातात पाप करणारे. दोन्ही समान झाल्यानंतर पुन्हा मनुष्यजन्म प्राप्त होतो आहे. असं हे कर्म करणं आणि त्याचे फळ मिळवणे याकरता भारतवर्ष आहे.

असे एकंदर जंबुद्वीपाचे वर्णन झालेले आहे. नऊ खंड, त्या नऊही खंडावर स्थापन केलं आपल्या नऊ पुत्रांना अग्निध्र राजांनी.

याच्यानंतर क्षार समुद्रआहे. एक लक्ष योजने विस्तीर्ण. जंबुद्वीप आणि त्याच्या सभोवती खाऱ्या पाण्याचा समुद्र आहे. त्याच्या पलिकडे प्लक्षद्वीप आहे. प्लक्षद्वीपाच्या सभोवती समुद्र आहे. मोठा एक वृक्ष आहे प्लक्ष नावाचा. त्याचेच नाव या द्वीपाला पडलेलं आहे. दुप्पट मोठा आहे. अग्निनारायण त्या वृक्षाच्या आश्रयाने तिथे राहत आहेत. प्रियव्रताच्या मुलाने इध्रद्वीप याने खंडाचे सात विभाग केले आणि आपल्या मुलांना दिले. मोठ्या मोठ्या नद्या सात आहेत. पर्वतही सात आहेत. त्या द्वीपामध्ये राहणारी जी मंडळी आहेत, चार वर्ण त्या ठिकाणीही आहेत. भारतवर्षामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही नावे आहेत. हंस, पतंग, उर्ध्वायन, सत्यांग असे चार वर्ण त्या प्लक्षद्वीपामध्ये आहेत. हजारो वर्ष आयुष्य आहे त्यांना. स्वर्गाप्रमाणे सुख भोगत आहेत. ते प्लक्षद्वीप निवासी जे आहेत, ते सूर्यनारायणाची उपासना करत असतात. या पुढच्या द्वीपामध्ये राहणारे जे आहेत जन्माला आलेले जीव, जन्माला आल्यावरच त्यांना सर्व प्रकारचे साहाय्य, सामर्थ्य हे प्राप्त झालेलं आहे. त्या प्लक्षद्वीपाच्या सभोवती इक्षुरसाचा समुद्र आहे. उसाच्या रसाप्रमाणे गोड असलेला हा समुद्र तिथे आहे.

त्याच्यानंतर शाल्मली द्वीप आहे. तिसरं द्वीप प्लक्षद्वीपाच्या दुप्पट आहे. त्याच्या सभोवती सुरा समुद्र आहे. मद्याचा समुद्र आहे. शाल्मली नावाचा एक वृक्ष आहे मोठा, त्या वृक्षावर गरुड हे राहत आहेत. गरुडांचं निवासस्थान ते आहे. तेच नाव त्या द्वीपाला पडलेले आहे. त्याच द्वीपाचा

***
पान १८९

अधिपती प्रियव्रताचे पुत्र आहेत. तिथेही राहणारे जे चार वर्ण आहेत, श्रुतधर, वीर्यधर, वसुंधर, इषंधर हे भगवान चंद्राची उपासना त्याठिकाणी करत आहेत. त्याची प्रार्थना ते करताहेत. मंत्रजप करताहेत. त्यानंतर त्या शाल्मली द्वीपाच्या सभोवती सुरा समुद्र आणि त्याच्या पलीकडे कुशद्वीप आहे. त्याच्या सभोवती घृतसमुद्र आहे. तुपाचा समुद्र आहे. त्या ठिकाणीही प्रियव्रत राजाची मुलं राज्य करत आहेत. नद्या आहेत, पर्वत आहेत. तिथे राहणारे सर्व लोक आहेत चतुर्वर्णांचे, भगवान अग्निनारायणांची उपासना ते करत आहेत. त्याच्या पुढे घृतसमुद्र त्या द्वीपाच्या सभोवती. त्याच्या पलिकडे क्रौंच द्वीप आहे. क्रौंच नावांचा मोठा पर्वत आहे त्या द्वीपामध्ये. हेच नांव त्याला पडलेलं आहे. त्यानंतर तिथेही प्रियव्रताचे पुत्र राज्य करत आहेत. प्रियवंदाने तिथेही सात सात विभाग करून दिलेले आहेत. त्या ठिकाणी राहणारी जी मंडळी आहेत, प्रजाजन आहेत ते सर्वही जलदेव जो आहे त्या वरुणाची उपासना करत आहेत. सर्वही द्वीपामध्ये उपासना चालू आहे. त्या क्रौंच द्वीपाच्या सभोवती क्षीर समुद्र आहे. ईश्वराची सृष्टी ही पुराणामध्ये आलेली आहे. भूगोल हा पुराणामध्ये आलेला आहे. सध्याचा भूगोल हा रचलेला आहे. तयार केलेला आहे. हा ईश्वराने केलेला भूगोल हा वेदव्यासांनी सांगितलेला आहे. क्षीरसमुद्र म्हणजे दुधाचाच समुद्र आहे. काही कमी नाही. त्याच्या पलिकडे शाकद्वीप आहे. शाक नावाचा एक मोठा वृक्ष आहे. त्याचेच नाव या द्वीपाला पडलेलं आहे. तिथेही प्रियव्रताचा पुत्र आहे. त्यानीही आपल्या मुलांना सात विभाग करून दिलेले आहेत. नद्या, पर्वत, मर्यादा पर्वत आहेत. या शाकद्विपात राहणारे लोक भगवान वायूची उपासना करतात. वायू हा फार मोठा देव आहे. वायुमध्ये सगळ्यांचा अंतर्भाव होतो. त्याची उपासना त्या द्वीपामध्ये चाललेली आहे. आता याच्यापुढं हा दधिसमुद्र आहे. शाकद्वीपाच्या सभोवती दधिसमुद्र आणि समुद्राच्या पलिकडे पुष्करद्वीप आहे. पुष्करद्वीपाच्या सभोवती गोड्या पाण्याचा समुद्र आहे. चौसष्ठ लक्ष योजने विस्तीर्ण, सर्वांपेक्षा मोठं हे द्वीप आहे. तो समुद्रही तितका विस्तीर्ण आहे. मोठं पुष्कर म्हणजे एक कमल. या कमलातून ब्रह्मदेव निर्माण झाले. त्याचेच नाव त्याला पडलेलं आहे.

जंबुद्वीपामध्ये मेरु पर्वत आहे. आणि या पुष्करद्वीपामध्ये मानसोत्तर नावाचा एक पर्वत आहे. मोठा पर्वत आहे. या दोन पर्वतावर सूर्याच्या रथाचा अक्ष जो आहे तो ठेवलेला आहे आणि त्या अक्षामध्ये सूर्याचा रथ बसवलेला आहे. तो सूर्य फिरतो आहे त्या मानसोत्तर पर्वताच्या सभोवती. त्याच द्वीपाचा अधिपती प्रियव्रताचा पुत्र वीतिहोत्र यांनी त्याचे दोन विभाग केले. रमणक आणि धातकि या मुलांना दिलेले आहेत. त्या द्वीपात राहणारी सर्व मंडळी ब्रह्मदेवांची

***
पान १९०

उपासना करत आहेत. ब्रह्मदेवांना दुसऱ्या द्वीपात स्थान नाहीये. भारतवर्षामध्येही नाही. त्या पुष्कर क्षेत्रात फक्त ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. मानसोत्तर पर्वत आणखी मेरु पर्वत यामध्ये जेवढी भूमी गेलेली आहे तितकीच भूमी त्या सातव्या समुद्राच्या पलिकडं आहे. सुवर्णमय भूमी आहे. त्या भूमीवर पडलेला पदार्थ सुवर्णतेजामुळे दिसतही नाही. कोणीही त्या भूमीवर राहत नाही. निर्जन भूमी आहे ती. त्याच्या पलिकडे लोकालोक नावाचा उंच पर्वत आहे. सूर्य चंद्रापेक्षाही उंच आहे. त्रैलोक्याची मर्यादा म्हणून तो पर्वत ईश्वराने निर्माण केला आहे.

अशा रितीने हा लोकालोक पर्वत शेवटचा आहे. भूमीची मर्यादा संपलेली आहे तिथे. अशा रितीने सप्तद्वीप, आणि सप्तसमुद्र, शेवटचा लोकालोक पर्वत ही सर्वही भूमंडलाची रचना परीक्षित राजा तुला सांगितली आहे. वर असलेलं जे ब्रह्मांड आहे, सत्यलोक वगैरे स्वर्गादिक लोक हे सबंध भूमंडलाचे वर्णन संपले शुकाचार्य महाराज सांगताहेत.

आता आकाशमंडळ. अर्धा भाग हा भूमंडळ आणि वरचा भाग तो आकाशमंडळ. हरभऱ्याचे जसे बरोबर दोन तुकडे होतात, तसं ब्रह्मांडाचा अर्धा भाग भूमंडलाचा आहे. त्याच्या वरचा अर्धा भाग म्हणजे द्युलोक आहे. मध्यभागी अंतरिक्ष म्हणतात. या दोन्ही लोकांमध्ये सूर्यनारायणांचा संचार आहे. आपल्या रथामध्ये बसून ते संचार करताहेत. उत्तरायण आहे. दक्षिणायन आहे, समगती आहे, द्रुतगती आहे, मंदगती आहे. मकरादिग्रहाच्या मार्गाने सूर्याचा रथ चाललेला आहे. मेष व तुला या राशीवरून सूर्याचा रथ चाललेला असताना त्या दोन राशीच्या वेळेला दिवस आणि रात्र समान असतात. वृषभादिक पाच राशीला सूर्य संचार असताना दिवस मोठे आहेत आणि रात्र एक एक घटका कमी होते आहे. वृश्चिकादिक राशींना संचार असताना दिवस लहान आणि रात्री मोठ्या होतात कारण गती कमी होते त्यावेळेला. दक्षिणायन असेपर्यंत दिवस मोठे. उत्तरायणामध्ये रात्री मोठ्या. असं हे सबंध सूर्याचं भ्रमण चाललेलं आहे. त्या मेरु पर्वतावरती, मानसोत्तर पर्वतावरती देवांच्या सगळ्या नगरी आहेत. वरुणाची आहे, कुबेराची आहे, यमाची आहे सगळ्यांच्या नगरी आहेत. सूर्याचा रथ त्या नगरीकडून जातो आहे. इंद्रनगरीच्या ठिकाणी तो रथ आला म्हणजे सूर्योदय झाला असे म्हणतात. पुढे दक्षिणेला तो माध्यान्ह झालेला आहे. वरुण नगरीकडे गेला असता अस्तमय झालेला आहे. पुन्हा कुबेर नगरीकडे गेला असता मध्यरात्र झाली असं सगळ्यांना दिसते आहे. मेरुपर्वतावर नेहमी सूर्यप्रकाश आहे. असा वेगाने तो रथ चाललेला आहे. याप्रमाणे सूर्याच्या रथाचे जे चक्र आहे, संवत्सर वर्ष त्याला म्हणतात. मेरूच्या शिखरावर एक भाग आहे

« Previous | Table of Contents | Next »