त्याच्या अक्षाचा आणि मानसोत्तर पर्वतावर दुसरा भाग. त्याच्यामध्ये सूर्याच्या रथाचे एक चाक आहे. सूर्यरथाला एकच चाक आहे. एक चक्र रथातून सूर्यनारायण सर्व आकाशमंडळामध्ये भ्रमण करताहेत. त्याला एक वर्षाचा काल लागतो आहे, सबंध राशी फिरून यायच्या म्हणजे. अरुण नावाचा सारथी त्या रथामध्ये बसलेला आहे. बालखिल्य ऋषी सूर्यनारायणांच्या बरोबर असतात, त्यांची स्तुती करतात.
काही ऋषीमंडळी आहेत, काही गंधर्व आहेत, काही अप्सरा आहेत, नाग आहेत, यक्ष आहेत. प्रत्येक महिन्याला भिन्न भिन्न अशा प्रकारची सूर्यनारायणांची स्वरूपं, त्यांच्याबरोबर असलेला हा सर्व परिवार, ह्या सर्वांसहित भ्रमण चाललेलं आहे. भूमंडळातून भ्रमण करणारा, आकाशातून फिरणारा सूर्यनारायण यांचा रथ चालू आहे. सूर्यनारायणाला गती आहे किंवा सगळ्या राशींना, नक्षत्रांना गती आहे. हे समजायचं कसं? राजाने विचारले. शुक्राचार्य सांगतात राजा, सूर्याला गती आहे हे आपल्याला प्रत्यक्ष दिसले जरी नाही. एका राशीतून दुसऱ्या राशीला सूर्य गेलेला आहे, त्याला क्रिया असल्याशिवाय गती असल्याशिवाय तो कसा जाईल. आकाशमंडळाचा जो राशीरूपी रस्ता आहे. एका राशीतून तो दुसऱ्या राशीला गेलेला आहे म्हणजे त्याचे भ्रमण झालेलेच आहे, गति त्याला आहे हे अनुमानाने ठरवले नाही. कुंभाराचे चाक आहे. त्या चाकावरती मडकं तयार करतो आहे. ते चाक सारखे फिरते आहे, त्याच्यावरच्या मुंग्या इकडून तिकडे दिसायला लागल्या तर त्यांनाही गती आहे असे म्हणता येते. चक्रालाही गती आहे. त्यामुळे त्यावर असणाऱ्या मुंग्या यांनाही गती आहे. कालचक्र जे आहे परमेश्वराचं ते सारखं फिरते आहे. गुणत्रयात्मक. त्या चक्राबरोबर सर्वही सूर्यादिक ग्रह काय सप्तर्षि काय, नक्षत्र मंडळ काय हे सगळेही फिरताहेत. ध्रुवाला प्रदक्षिणा करत आहेत. भगवान नारायण हा सर्वांना मार्गदर्शक आहे.
अशा रितीने हे सूर्यभ्रमण चाललेलं आहे. संपूर्ण आकाशमंडळामध्ये सूर्यनारायण फिरून आला. एक भ्रमण पूर्ण झाले की एक वर्ष म्हणतात. बारा राशी फिरून यायला सूर्यनारायणांना एक वर्षाचा काल लागतो. अर्ध भ्रमण त्याचे झाले की दक्षिणायन म्हणतात. पुढचं अर्ध भ्रमण म्हणजे उत्तरायण म्हणतात. हा देवांचा एक दिवस आहे. सहा महिने माणसांचे म्हणजे देवांचा एक दिवस.
एवं चन्द्रमा अर्कगभस्तिभ्यः उपरिष्टाल्लक्षयोजनतः
उपलभ्यमानः अर्कस्य संवत्सरभुक्तिं पक्षाभ्यां...
मासभुक्तिं सपादर्क्षाभ्यां दिनेनैव पक्षभुक्तिं
अग्रचारी द्रुततरगमनो भुंक्ते ।।
5.22.8 ।। श्री. भा.
सूर्यनारायणाच्या वरच्या बाजूला एक लक्ष योजना अंतरावरती चंद्रलोक आहे. अंतसृष्टी आहे. परमेश्वराने विश्व निर्माण केलेलं आहे. कितीतरी चंद्र आहेत, कितीतरी सूर्य आहेत. वैज्ञानिक सुद्धा अवकाशमंडळ अनंत आहे म्हणतात. हा चंद्र सूर्याच्यावर आहे. अतिशय वेगवान आहे तो. सूर्यनारायणाला सर्व राशी फिरून येण्याला एक वर्षाचा काळ लागतो. चंद्र एका महिन्यामध्ये सर्व राशी फिरून येतो. सर्वांना आनंद देणारा शांती देणारा हा ग्रह आहे. त्याच्यावरती तीन लक्ष योजने अंतरावर नक्षत्रमंडळ आहे. त्यालाही गती आहे. तेही सारखे फिरते आहे. अठ्ठावीस नक्षत्रे आहेत. अभिजीत नक्षत्र घेऊन अठ्ठावीस नक्षत्रे. तेही सारखे फिरते आहे. त्याच्या वरच्या बाजूला बुध नावाचा ग्रह आहे. दोन लक्ष योजने अंतरावरती तो अनुकूल ग्रह समजला जातो. त्यानंतर त्याच्यावरती दोन लक्ष योजने अंतरावरती अंगारक म्हणजे मंगळ आहे. एकेका राशीतून दुसऱ्या राशीला जाण्याला मंगळाला तीन पक्ष म्हणजे दीड महिन्याचा काळ लागतो. चंद्रापेक्षा कमी गती आहे. हा अशुभ ग्रह समजला जातो. त्या मंगळाच्या दोन लक्ष योजनेवरती बृहस्पती म्हणजे गुरु ग्रह आहे. हे फार मंद आहेत. एका राशीतून दुसऱ्या राशीला जाण्याला यांना एक वर्षाचा काळ लागतो. सबंध आकाशमंडळ फिरून यायचं म्हणजे बारा वर्ष लागतात. अनुकूल ग्रह हा समजला जातो. या गुरूच्यावरती दोन लक्ष योजने अंतरावर शनैश्चर आहेत. ते सर्वात मंद ग्रह आहेत. एका राशीतून दुसऱ्या राशीला जाण्याला तीस महिने म्हणजे अडीच वर्षाचा काळ लागतो. सबंध आकाशमंडळ फिरून येण्याला यांना तीस वर्ष लागतात. सगळ्यापेक्षा मंद गती आहे यांची. हे शनैश्चर म्हणजे सर्वांना अशांती देणारे आहेत, अशी लोकांची समजूत आहे. शनैश्चरांच्या वरच्या बाजूला एकादश लक्ष योजना अंतरावर सप्तर्षिंचे मंडळ आहे. त्यांचाही संचार चालू आहे. ध्रुवपदाला हे सर्वही प्रदक्षिणा करत आहेत. हा ध्रुव मात्र स्थिर आहे मध्यभागी. सूर्यनारायणाचे जे मंडळ आहे, दहाहजार योजने विस्तीर्ण आहे. त्याच्या खाली राहू नावाचा ग्रह आहे. बाकीचे सगळे ग्रह सूर्यमंडळाच्या वर आहेत अंतरिक्षामध्ये. राहू मात्र खाली आहे. त्याचा जन्म कसा झाला. हा कथाभाग पुढे येणार आहे.
सूर्यनारायणाचे मंडळ हे दहा हजार योजने विस्तीर्ण आहे. चंद्राचं बारा हजार योजने विस्तीर्ण आहे. राहूचे मंडळ हे तेरा हजार योजने विस्तीर्ण आहे. पूर्वीचे वैर लक्षात येऊन तो राहू, चंद्र-सूर्याच्या अंगावर धावून जातो. त्यावेळेला हे ग्रहण लागले असे लोक समजतात. राहूच्या खाली...
सिद्धचारण, विद्याधर वगैरे राहतात. त्याच्या खाली यक्ष, पिशाच्च वगैरे यांचे स्थान अंतरिक्ष लोक ज्याला म्हणतात तो आहे. त्याच्याखाली शंभर योजने अंतरावर हा गोलोक आहे. हंसादिक पक्षी जोपर्यंत वर जाऊ शकतात ती भूलोकाचीच मर्यादा आहे. भूमीची रचना कशी आहे तुला राजा सांगितलेलं आहे. या भूमीच्या खाली आणि जलाच्या मध्ये सात लोक आहेत. अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताल दहा-दहा हजार योजने अंतरावर हे लोक आहेत. त्या ठिकाणी हे सगळे असुर राहताहेत. नाग, सर्प वगैरे सगळे त्याठिकाणी राहताहेत. त्या सगळ्यालाही सप्तपाताल म्हणतात. प्रत्येकाची नावं निराळी आहेत. पाताललोक एकच आहे. त्या सगळ्या लोकामधे पहिला जो लोक अतल नावाचा. मयासूराचा मुलगा बल नावाचा तो इथे राहतो आहे. असुरांनी बरेचसे लोक ताब्यामध्ये घेतलेले आहेत. अनेक स्त्रिया त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. त्या अतल लोकामध्ये जाणारे जे जीवात्मे त्यांना त्या स्त्रिया उत्तम रसायन देतात, विषयभोग घेताहेत. त्यापुढे दुसरा लोक म्हणजे वितल लोक. हाटकेश्वर भगवान शंकर त्याठिकाणी राहात आहेत. मोठी नदी वहाती आहे हाटकी नावाची. त्या नदी तीरावर असलेली मृत्तिका, वाळू सुवर्णरूप आहे. त्या सोन्याचे दागिने वगैरे बनवून असुर स्त्रियांना देत आहेत. तिसरा लोक सुतल नावाचा आहे. दानवेंद्र बळी राजा तिथे राहतो आहे, भगवंतांच्या आज्ञेप्रमाणे. इंद्राला स्वर्गलोकाचे राज्य देऊन टाकले बळी राजाकडून आणि बळी राजाला राहण्याकरता ही जागा भगवंतांनी दिली. वामन त्यांचे द्वारपाल म्हणून राहतात. त्याच्याखाली तलातल नावाचा लोक आहे. मयासुर येथे राहातो आहे. पहिल्या अतल लोकामध्ये मयासुराचा मुलगा राहतो. या तलातल लोकामध्ये स्वतः मयासुर राहतो आहे. मोठा शिल्पकार आहे. देवांचा शिल्पकार विश्वकर्मा त्यापेक्षाही अधिक मोठा शिल्पकार मयासुर आहे. असुरांचा शिल्पकार आहे तो. मयसभा धर्मराजाला त्यानेच बांधून दिली. जमीन जिथे आहे तिथे पाणी वाटावे आणि पाणी जिथे आहे तिथे जमीन वाटावी. अशा प्रकारचे विलक्षण शिल्प मयासूराने निर्माण केले. भगवंतांची प्रार्थना करतो आहे. सुदर्शनाची भीती त्याला नाही. महादेव त्याचे संरक्षण करत आहेत.
त्याच्याखाली महातल नावाचा लोक आहे. अनेक सर्प राहत आहेत तिथे. पुष्कळ मोठी शरीरं त्यांची आहेत. आपल्या परिवाराला घेऊन ते तिथे राहत आहेत. त्याच्याही खाली रसातल लोक आहे. तोही दैत्यांचा आहे. देवांचा जसा स्वर्गलोक तसा दैत्यांचा रसातल. म्हणजे जवळ जवळ सात लोकांपैकी पहिल्या लोकात मयासुराचा मुलगा. पाचव्या लोकात तो मयासुर आणि सातव्या लोकात बाकीचे दैत्य. तीन लोक यांच्या ताब्यात आहेत. तरी यांना पूर्णता वाटत नाही. स्वर्गलोक...
आम्हाला का नाही. तपश्चर्या करतात. देवांचा पराजय करतात. स्वर्गलोक आपल्या ताब्यात घेतात. निर्वासित करून सर्व देवांना बाहेर घालवतात. देवांनी पुन्हा अवतार घेऊन त्यांचा पराजय करावा हे चाललेले आहे.
सर्वात खालचा लोक म्हणजे पाताळलोक आहे. अनेक साप, नाग तिथे राहतात. एका फण्यापासून हजार फणे असलेले नाग आहेत. प्रत्येकाच्या फण्यावर प्रकाश देणारे दिव्यमणी आहेत. त्यामुळे तिथे जरी सूर्यचंद्राचा प्रकाश नसला तरी अंधार नाहीये. त्यांच्या मण्याच्या प्रकाशामुळे सर्व व्यवहार चालतात. त्याच्याही खाली वीस हजार योजने अंतरावर भगवान श्रीहरी शेषरूपाने राहतात. सहस्त्रफणा त्यांना आहे. त्यांच्या एका फण्यावर ही सबंध भूमी जी आहे, भूमंडळ ही त्या फण्यावर राहिलेली आहे. एखादी मोहरीप्रमाणे ती पृथ्वी त्यांच्या फण्यावर वाटते आहे. केवढं तरी मोठं प्रचंड रूप आहे शेषरूप. शेवटी प्रलयाच्या वेळेला त्यांच्या मुखातून अग्नी उत्पन्न होतो आहे. खालून सगळं दग्ध होतं आहे. आणि वरचं सूर्यनारायणांच्यामुळे दग्ध होते अशी सर्व पुढची व्यवस्था आहे.
सर्व नाग स्त्रिया भगवान संकर्षण म्हणजे शेषभगवंतांची पूजा करत आहेत, प्रार्थना करत...
आहेत.
अशा रितीने ही सगळी रचना सप्तअधोलोक, सप्त उर्ध्वलोक, भूमी हे सगळंही त्यांनी सांगितले. त्यानंतर राजाने विचारले महाराज,
नरका नाम भगवन् किं देशविशेषा अथवा
बहिस्त्रिलोक्या आहोस्वित् अन्तराल इति ।।
5.26.4 ।। श्री. भा.
नरक नरक म्हणून आम्ही ऐकतो म्हणाले, हे काही देश आहेत का? त्रैलोक्याच्या आत आहेत की बाहेर आहेत? कुठे आहेत? आचार्य सांगताहेत, राजा त्रैलोक्यामध्येच आहेत. दक्षिण दिशेला हे सगळे लोक आहेत. भूमी आणि जल यांच्यामध्ये नरकलोकाची रचना परमेश्वरांनी केलेली आहे. तिथे सगळे पितृगणांचे अधिपती हे राहाताहेत. यमधर्म जे आहेत, पितरांचे अधिपती सूर्यकुमार यमधर्म हे त्या नरकाचे स्वामी आहेत. ज्या ज्या जीवाकडून जसं जसं कर्म झालेलं असेल त्याप्रमाणे त्याला शासन करण्याकरता यमधर्म त्या नरकलोकामध्ये राहताहेत. एकवीस किंवा अठ्ठावीस नरक त्यांनी सांगितले. मुख्य बाकीचे अवांतर कितीतरी नरक आहेत. त्याचे वर्णन करताहेत शुकाचार्य महाराज, आपल्या एकंदर धर्माचा त्याग करणारा, दुसऱ्याचे द्रव्य हरण करणारा स्त्री-पुत्रादिकांचे हरण करणारा, तो या तामिस्र नरकामध्ये जातो, तो या अंधतामिस्र नरकामध्ये राहतो आणि त्याला अनेक यातना भोगाव्या लागतात. मी आणि माझं अशा प्रकारची वृत्ती धारण करून सर्व भूतांचा द्रोह करणारा जो आहे तोही या रौरव नरकामध्ये जातो. त्यांनी ज्यांना ज्यांना पिडा दिलेली असेल ते त्या नरकामध्ये सापापेक्षाही भयंकर जे प्राणी आहेत, रुरू नावाचे, ते ह्या पिडा देणाऱ्या जिवात्म्याला तिथे आल्याबरोबर, त्याच्या शरीराचा छेद-विच्छेद करत आहेत, चावत आहेत त्याला. नरकामध्ये गेलेल्या जीवाला फक्त दु:ख वेदना भोगाव्या लागतात. प्राण जात नाही. प्राण गेला तर सुटला की तो, पण त्याची सगळी शिक्षा पूर्ण झाली पाहिजे. केलेले जितके दोष आहेत त्या सगळ्या दोषांबद्दल शिक्षा मिळाली पाहिजे. सर्व शिक्षा मानवांच्या व्यवहारामध्ये दिली जात नाही. खून करणाऱ्या मनुष्याला न्यायाधीश फाशीची शिक्षा देतो. एक खून केला त्याला फाशी दिली आणि ज्यांनी आठ-दहा खून केले त्यांनी? एकदा फाशी दिली की तो गेला. एका खुनाची शिक्षा मिळते. पण बाकीचे खून त्याला माफ झाले असे समजायचे काय? अशाप्रकारची शिक्षा इथे नरकामध्ये पूर्ण मिळते. नरकामध्ये तो जातो. इथे शरीर कायम आहे. अग्नीमध्ये टाकलं, तापलेल्या कढईत टाकलं तरी शरीर नष्ट होत नाही. तडफड होत आहे. वेदना, क्लेश होत आहेत,
यातना देह म्हणून निराळा आहे. यातना फक्त भोगाव्या लागतात. देहाचा नाश होत नाही.
पशुपक्ष्यांचा नाश करणारे, मांसभक्षण करणारे, सर्वांना त्रास देणारे त्यांना यमदूत कुंभीपाक नरकामध्ये टाकत आहेत. तापलेल्या तेलाच्या अनेक कढया तिथे आहेत. त्याच्यामध्ये त्याला टाकून देत आहेत.
मातापितरांचा द्वेष करणारा तो कालसूत्र नावाच्या नरकामध्ये पडतो आहे. तांब्याची भूमी आहे. सगळी तप्त झालेली भूमी आहे आणि त्या भूमीवर त्याला चालायला सांगताहेत. पाठीवर कोरडे ओढताहेत. संबंध शरीराची आग होत आहे.
आपला वेदमार्ग आपत्ती नसताना ज्यांनी सोडला. आपत्तीमध्ये एखाद्या वेळेला सुटला तरी तो धर्म अधर्म समजला जाईल. नास्तिक धर्माचा ज्यांनी स्वीकार केला त्याला मृत्यूनंतर यमदूत हे असिपत्र वनामध्ये टाकतात. 'असि' म्हणजे तलवार, सबंध तलवारीचीच जमीन आहे. याला सांगतात जा, या रस्त्याने चालत जा पुढं. तलवारीवरून चालत जायचं. किती जखमा होत असतील, पण काही नाही ते क्लेश भोगावे लागतात. स्वधर्म त्याग आणि नास्तिक मार्गाच्या स्वीकारामुळे असिपत्र वनामध्ये त्याला पडावं लागतं.
जो राजा किंवा राजाचा अधिकारी निरपराध माणसाला दंड करेल, मारेल त्याला सूकरमुख नावाच्या नरकामध्ये टाकतात. उसाचा घाणा जसा असतो तसे अनेक घाणे तिथे आहेत. ऊस जसा घाण्यामध्ये जावून पिळून निघतो तसं याला घाण्यामध्ये घालतात. निरपराध माणसाला सत्ताबलाने त्रास देणारा, सूकरमुख नरकामध्ये जातो. प्राण जात नाही. शरीरातले रक्त जाईल, पुन्हा त्याला पहिल्यासारखे शरीर मिळेल, पुन्हा घाण्यात घालतील. तो ओरडतो आहे, रडतो आहे पण काहीही इलाज नाहीये.
सर्व भूतांच्या वृत्तीला उपरोध करणारा, त्यांना लुटणारा जो आहे तो अंधकूप नरकामध्ये जातो आहे. आपण मिळवलेले द्रव्य आपणच जो उपभोग घेतो, अन्नधान्य वगैरे दुसऱ्या कोणालाही देत नाही, किडीभोजन नावाच्या नरकामध्ये जातो. किड्यांनी भरलेली कुंडं असतात त्याच्यामध्ये याला टाकून देतात. सगळे किडे त्याच्या शरीरातले मांस वगैरे घेतात. चोरी करून किंवा बलात्काराने दुसऱ्याची सुवर्ण, रत्न वगैरे हरण करणारा, संकट नसताना चोरी करणे अक्षम्य आहे. संकट असताना एखाद्यावेळेस चोरी केली, खरे म्हणजे चोरी करू नये, पण अशी चोरी क्षम्य आहे.
अशाप्रकारे चोरी करणाऱ्याला यमदूत हे संदंश नावाच्या नरकामध्ये टाकतात. लोखंडी चिमटे तापलेले असतात. त्या चिमट्यामध्ये त्याला धरतात. सबंध शरीर तप्त, दग्ध होतं आहे.
कोणत्याही पुरुषाशी समागम करणारी स्त्री किंवा कोणत्याही स्त्रीबरोबर समागम करणारा पुरुष या दोघांना मृत्यूनंतर यमदूत हे तप्तसूमी नावाच्या नरकामध्ये टाकतात. येथे पुरुषांचे, स्त्रीयांचे असे त्रिशुल-शुल उभे केलेले आहेत. मोठ्यामोठ्या, लाल तापलेल्या शुलांना स्त्री-पुरुषांना बांधून टाकतात.
वैतरणी नदी त्या नरकलोकात आहे. रक्त, मांस यांनी भरलेला हिचा प्रवाह आहे. त्याच्यामध्ये या पापी लोकांना टाकून देत आहेत. तेच नदीतले सगळे त्या लोकांच्या पोटामध्ये जातं आहे, ते बुडतात पण पुन्हा वर येत आहेत, पुन्हा बुडतात. अशा प्रकारची ही वैतरणी नदी आहे.
साक्ष देण्याच्या वेळेला कोर्टामध्ये जाऊन जो खोटी साक्ष देईल, पैशासाठी खोटी साक्ष देणारा, त्याला अवीचिमान नावाच्या नरकामध्ये टाकतात. म्हणजे इथे एक मोठा कडा आहे त्याला त्या कड्यावरून खाली ढकलतात. पुन्हा वर आणतात, पुन्हा कडेलोट करतात. डोकं फुटतंय, सर्व शरीराला जखमा होत आहेत.
सुरापान करणारा जो आहे, त्याच्या मुखात अग्नीने तापवलेला लोहोरस घालतात. क्षारकर्दम नावाचा नरक आहे हा. निरपराधी अशा लोकांना त्रास देणारे त्यांना दंदशूक नावाच्या नरकामध्ये टाकतात.
आपल्या घरी कोणीही अतिथी, अभ्यागत आलेले असताना, गृहस्थाश्रम स्वीकारलेला जो असेल त्यानी जर त्याच्याबद्दल आदरभाव दाखवला नाही, रागाने पाहतो आहे, कशाला आला? मलाच कमी पडते आहे तर याला कोठून घालणार? अशी वृत्ती धरणाऱ्या पापी माणसाला नरकामध्ये गेल्याबरोबर गिद्ध पक्षी एकदम त्याचे डोळे फोडून टाकत आहेत.
अहंकार धारण करणारा, आपले द्रव्य हे आपल्या जवळच राहिलं पाहिजे, खर्च होऊ नये म्हणून नेहमी त्या धनाच्या चिंतेमध्ये निमग्न असणारा जो आहे त्याला मृत्यूनंतर सूचीमुख नावाच्या नरकामध्ये यमदूत टाकतात. मोठी मोठी शिवण्याची यंत्रे तिथे आहेत. ती यंत्रे सारखी चालू असतात. त्या यंत्रामध्ये याला घालतात. जसे वस्त्र शिवावे तसे याचे शरीर शिवतात, सबंध शरीरामध्ये सुया घुसतात.
अशा प्रकारचे अनेक नरक आहेत. यमधर्म या ठिकाणी राहत आहेत. अधार्मिक लोकांना शासन करण्याकरता ईश्वराने त्यांना नेमले आहे. दया वगैरे काही नाही. फक्त शिक्षा, शासन द्यायचे. दु:ख भोगल्यानंतर त्यांचे सर्व पापक्षालन झाले म्हणजे मग पुन्हा या मृत्युलोकावर त्यांना जन्म येतो आहे. काही पूर्वीचे चांगले संस्कार घेऊन जन्माला आले तर चांगले कर्म करतात, पुण्यकर्म करतात, मृत्यूनंतर स्वर्गलोकाला जातात. पुण्य संपल्यानंतर पुन्हा या ठिकाणी यावे लागते. असे हे ईश्वरांनी सृष्टीची व्यवस्था, सृष्टी निर्माण केली आणि ती व्यवस्था करण्याकरता हे सगळे नियम घालून दिलेले आहेत. अधिकारी नेमले आहेत, ते कार्य करण्याकरता. तेव्हा राजेसाहेब भूमी, भूमीवरची सप्तद्वीप, सप्तपाताल, नरकलोक हे सर्वही ईश्वरसृष्टीचे वर्णन तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला सांगितले आहे. आणखी तुम्हाला काय ऐकण्याची इच्छा आहे असे शुकाचार्य महाराजांनी विचारल्यानंतर त्यांनी पुढील कथाभाग सांगावा अशी विनंती केली.
शुकाचार्य महाराजांनी परीक्षित राजाच्या इच्छेप्रमाणे सर्वही भूगोलाचे वर्णन त्याच्याजवळ केले. ईश्वराने काय काय एकंदर सृष्टिरचना कशी केलेली आहे हे त्याला समजावून सांगितले. शेवटी त्यांनी नरकलोक म्हणजे कुठे आहे? त्याठिकाणी अधिकारी जे यमधर्म आहेत ते पापी जीवांना आणून दंड कसा करतात? हे सगळं सांगितले. परीक्षित राजाने विचारले, महाराज, हे जे भयंकर नरक आपण सांगितले, त्यात किती यातना जीवांना भोगाव्या लागतात. त्या नरकाला जावं लागू नये याकरता काही उपाय असेल तर सांगा. शुकाचार्य महाराज म्हणतात, राजा, पाप केल्यानंतर नरकाला गेलंच पाहिजे. मृत्यूच्या पूर्वीचं, केलेलं पाप नाहीसे करण्याकरता शास्त्राने सांगितल्याप्रमाणे प्रायश्चित कर्म केलं पाहिजे. पापक्षय झाला की मग काही नरकाची भीती नाही. राजाने ऐकून घेतलं. महाराज प्रायश्चित्ताने पापाचा नाश होतो आपण म्हणता, पण कसं शक्य आहे. पुन्हा पापकर्म करण्याकडे प्रवृत्ती होतेच म्हणाले. शिक्षा झाली, तुरुंगामध्ये जावं लागलं तरी सुटून आल्यानंतर चोरी पुन्हा करतोच. मग त्या प्रायश्चित्ताचा उपयोग होणार नाही. एखाद्यावेळेली पापकर्मापासून बाजूला होईल मनुष्य, पण पुन्हा पाप करतो आहे. हे मान्य केलं शुकाचार्य महाराजांनी केवळ कर्मांनी कर्मक्षय होत नाही. खरं प्रायश्चित्त म्हणजे आत्मज्ञान हेच आहे. "क्षीयंतेचास्यकर्माणि" परमात्म्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्यानंतरच सर्व कर्माचा क्षय होतो. परंतु ज्याप्रमाणे पथ्याने वागणाऱ्या मनुष्याला रोगाची पिडा ही सहसा होत नाही, त्रास होत नाही. तसं नियमाने वागणारा जो आहे, शास्त्रीय कर्म करणारा, हळू हळू समर्थ होतो. आत्मज्ञानापर्यंत जातो म्हणाले. पापक्षय करण्याकरता अनेक मार्ग आहेत. तो पापक्षय तपाने होतो, इंद्रिय दमन करणे,
दानधर्म करणे, यमनियम हे सगळे मार्ग पापक्षयाकरता म्हणून सांगितलेले आहेत. आणखी एक मार्ग म्हणजे,
केचित् केवलया भक्त्या वासुदेवपरायणाः ।
अघं धुन्वन्ति कार्त्स्न्येन नीहारमिव भास्करः ।।
6.1.15 ।। श्री. भा.
केवळ भक्ती भगवंताची आहे. ज्ञानही नाही आणि कर्मही नाही. केवळ भगवंताचे प्रेम अंत:करणामध्ये आहे. गोपींनी जशी भक्ती केली, केवळ भक्ती आहे. ज्ञान मिश्र नाही, कर्म मिश्रही नाही. अशा केवळ भगवंताच्या भक्तीनं सर्व पापक्षय होतो. ईश्वराचं चिंतन अखंड जर घडलं तर तो पवित्र होऊन जातो. त्याला नरकाला जावं लागत नाही. श्रीकृष्णांचे अंत:करणानी जर चिंतन घडलं, अनुराग, प्रेम जर निर्माण झालं तर यमदूत त्याला नेऊ शकत नाहीत. याकरता एक घडलेला इतिहास राजा तुला सांगतो -
विष्णूदूत आणखी यमदूत यांचा संवाद घडलेला आहे
कान्यकुब्जे द्विजः कश्चित् दासीपतिरजामिलः ।
नाम्ना नष्टसदाचारो दास्याः संसर्गदूषितः ।।
6.1.21 ।। श्री. भा.
एक ब्राह्मण अजामिळ नावाचा, आपला संबंध आचरण धर्म, ब्राम्हण धर्म सोडून देऊन एका दासीच्या संगतीमध्ये सापडलेला आहे. जुगार खेळणं, चोरी करणं असे वाटेल त्या मार्गांनी पैसा मिळवतो आहे. कुटुंबपोषण करतो आहे. असा त्याचा बराच काळ गेला. अठ्याऐंशी वर्ष वयाला झाली. त्याला दहा मुलं झाली होती. त्यामध्ये लहान मुलाचे नाव नारायण असे होते. मोठा प्रिय आहे, माता-पित्यांना. त्या अजामिळाचे या मुलावर जास्त प्रेम आहे. त्यामुळे त्याचे अंतःकरण सारखे त्याच्याकडे जाते आहे. नेहमी तिकडे लक्ष आहे. त्या अजामिळाचा मृत्यूकाल जवळ आलेला आहे. वयही बरंच झालेलं आहे. यमदूत त्याला नेण्याकरता आले. ठरलेल्या वेळेला तीन यमदूत आले. भयंकर स्वरूप त्यांचं आहे. त्यांना आलेले अजामिळाने पाहिले. त्यावेळी त्या नारायण नावाच्या मुलाकडे लक्ष होतेच. यमदूतांना पाहिल्याबोबर घाबरून ओरडू लागले "नारायणा, नारायणा" मुलाला हाका मारू लागले. नारायण हे नाव मृत्यूच्या वेळेला अजामिळाच्या मुखातून बाहेर पडलेलं आहे, त्यावेळेला विष्णूदूत त्याठिकाणी प्राप्त झाले आहेत. अजामिळाला ते बाहेर काढत आहेत. त्याला पाशामध्ये बांधून ठेवले आहे. नरकलोकाला त्याला घेऊन जाणार आहेत यमदूत. यांनी त्यांचे निवारण केले, थांबा घेऊन जाता येणार नाही अजामिळाला. यमदूतांनी...
विचारले, कोण आहात आपण? पितांबरधारी, किरीट कुंडले वगैरे सगळी, चार हस्तामध्ये शंख, चक्र, गदा, पद्मधारी असे आपण कोण आहात?
त्या यमदूतांनी सांगितले की आम्ही यमधर्माच्या आज्ञेने याला नेण्याकरता आलेलो आहोत. आम्हाला प्रतिबंध तुम्ही का करता? विष्णूदूतांनी विचारले, यमधर्मांचे तुम्ही सेवक आहात. धर्म म्हणजे काय सांगा आम्हाला म्हणाले. हा दंड तुम्ही कोणत्या आधारावर करता? याला कोणता आधार आहे? अमुक जीवाला दंड करायचा आणि अमूक जीवाला दंड करायचा नाही हे तुम्ही कसे ठरवता सांगा. काही लोकांनाच दंड करायचा, का सर्व लोकांना सर्व जीवाला दंड करायचा याबद्दल काय ठरले आहे सांगा.
वेदप्रणिहितो धर्मः ह्यधर्मस्तद्विपर्ययः ।।
6.1.40 ।। श्री. भा.
वेदांनी जे करायला सांगितले आहे, कृष्ण भजन करावं, सत्य भाषण करावं, दान करावं हे जे सगळं सांगितलेलं आहे, "करावं" म्हणून त्याला धर्म म्हणतात. जे करू नये असं सांगितलेलं आहे, त्याचा निषेध केलेला आहे. कोणाचीही हिंसा करू नये, मनाला उद्वेग उत्पन्न करण्यासारखं भाषण करू नये, असत्य बोलू नये हे सगळे अधर्म आहेत. वेद म्हणजे साक्षात नारायणाचेच स्वरूप आहे. त्यांनीच हे धर्माधर्म पुढे मांडलेले आहेत. त्या वेदाने सांगितल्याप्रमाणे कर्म करणारे त्यांच्याकडे आम्ही जात नाही. विरुद्ध वागणारे जे आहेत त्यांना आम्ही घेऊन जातो. याने वेदाच्या विरुद्ध कर्म केलेली आहेत त्याला नरकाला न्यायचंय. याला साक्षीपुरावे म्हणून सांगताहेत. साक्षी पुष्कळ आहेत. सूर्यनारायण, अग्नी, आकाश, वायू, चंद्र, रात्र, दिवस, दिशा हे सगळे देावतारूप आहेत. हे सगळेही जिवानी काय काय कर्म केले याचे साक्षी आहेत. त्यांच्याकडूनही यांनी केलेला अधर्म समजतो आणि यांना दंड केला जातो. चांगलीही कर्म घडतात आणि पापकर्मही घडतात म्हणाले. जसं ज्याच्या हातून कर्म झालेलं असेल त्याप्रमाणे त्याला आणखी दंड करावा लागतो. कोणतंही कर्म केलं नाही किंवा करायचं नाही असं शक्यच नाही. कोणीही देहधारी कोणत्या ना कोणत्या कर्मामध्ये सापडलेला आहे. धर्म अधर्म काय केलं असेल त्याने त्याप्रमाणे त्याचं फळ मिळतंय. ही ईश्वराची योजना आहे म्हणाले. सृष्टिचक्र व्यवस्थित चालू राहण्याकरता ही कर्मशक्ती त्यांनी निर्माण केलेली आहे.
हा जो अजामिळ आहे हा चांगला होता पूर्वी. वेदाध्ययन झालेलं आहे, माता-पित्यांची सेवा करतो आहे. पुण्यशील होता. एके दिवशी अरण्यामध्ये समीधा दर्भ, पुष्प, वगैरे आणण्याकरिता...