« Previous | Table of Contents | Next »
पान २०१

गेलेला आहे. पित्याला जे पाहिजे ते आणण्याकरिता आणि परत येताना एक दासी त्याच्या नजरेला पडलेली आहे. क्षुद्र योनीमध्ये जन्माला आलेली, मद्यपान केलेलं आहे. मत्त झालेली आहे. आणि त्या दासीला पाहून याच्या मनाचा ताबा गेलेला आहे. मोहित झाला. मनोनिग्रह करण्याचा प्रयत्न करूनही मनाचा निग्रह झालेला नाही. पुष्कळ ज्ञान आहे पण काही उपयोग नाही. स्वधर्म त्याने टाकून दिला आणि घरामध्ये असलेलं सर्व द्रव्य त्या स्त्रीला देऊन तिच्याच घरामध्ये जाऊन राहिलेला आहे. उत्तम पतिव्रता स्त्री मिळालेली आहे. लहान लहान मुलं आहेत, माता-पिता आहेत. सर्वांना टाकून दिलेलं आहे. आणि त्या दासीच्या संगतीमध्ये निमग्न झाला. कोठूनही न्याय-अन्याय काही विचार न करता धन मिळवून आणायचं आणि पालन-पोषण करायचं. तेव्हा आजपर्यंत त्या अजामिळाकडून असं पाप घडलेलं आहे. त्याकरिता दंडपाणि जे यमधर्म आहेत त्यांच्या आज्ञेने आम्ही याला नेण्याकरिता आलेलो आहोत. त्याठिकाणी याला यातना भोगाव्या लागतील आणि हा शुद्ध होईल. यमदूतांनी एकंदर सृष्टीकार्य कसं चाललेलं आहे, कोणतं प्रमाण आहे पाप-पुण्याकरिता साक्षी कोण आहे हे सगळं सांगितलं आणि अजामिळ काय दोषी आहे अपराधी आहे हेही सांगीतलं. यमदूतांचं भाषण आणि विष्णूदूतांनी ऐकून घेतलं आणि ते बोलू लागले.

अहो कष्टं धर्मदृशाम् अधर्मः स्पृशते सभाम् ।।
6.2.2 ।। श्री. भा.

तुमचे स्वामी यमधर्म हे चांगले धर्मज्ञ आहेत याबद्दल वाद नाही म्हणाले. पण या अजामिळाला तुम्ही नेण्याकरिता आलेले आहात हा तुमच्याकडून मोठा अधर्म होतो आहे. धर्मज्ञ जे आहेत त्यांची नेमणूक ईश्वरानी केलेली आहे. जीवाना आणि योग्य मार्गदर्शन करावं, दंड करावा, सगळं तुम्हाला अधिकार दिलेले आहेत. तुमच्याकडूनच जर असं शास्त्रविरुद्ध वर्तन व्हायला लागलं तर लोकांनी कुणाकडं पाहायचं म्हणाले. सामान्यतः सर्व लोक जे आहेत (जीव) त्यांना धर्माधर्माचं ज्ञान इतकं नसतं म्हणाले. श्रेष्ठ पुरुष जसं वागतात, सांगतात त्याप्रमाणे ते वागत आले. तेव्हा अजामिळाला तुम्ही नेणं हे विरुद्ध आहे. पाप केलेलं आहे आणि नरकाला नेता येत नाही हे कसं म्हणता तुम्ही? पाप केलेलं होतं म्हणाले. पण पाप राहिलं नाही. शिल्लक राहिलं नाही.

अयं हि कृतनिर्वेशो जन्मकोट्यंहसामपि ।
यद् व्याजहार विवशो नाम स्वस्त्ययनं हरेः ।।
6.2.7 ।। श्री. भा.

याची सगळी पापं नाहीशी झालेली आहेत. केली असतील पूर्वी पण आता एकही पाप...

***
पान २०२

...शिल्लक राहिलेलं नाही. एकाच जन्माचं नाही अनेक जन्माची पातकं याची नष्ट झालेली आहेत. कारण अगदी मृत्यूच्या वेळेला याच्या मुखातून देवाचं नाव आलेल आहे. "नारायण" हे चार अक्षर नाव हे याच्या मुखातून शेवटच्या वेळेला निर्माण झालेलं आहे. कितीही चोरी करू देत, सुरापान करू देत, मित्रद्रोह करू देत. महापापं, सगळी अनेक पापं जरी घडली असली तरी ईश्वराच्या नामस्मरणाने सर्वही पातकांचा क्षय होतो. हे फार मोठं प्रायश्चित्त आहे. सर्व पापक्षय होण्याचे हे मोठं साधन आहे म्हणाले. पुष्कळ आणखी कर्म असतील, व्रतवैकल्ये आहेत, दानधर्मादिक अनेक कर्म सांगितलेत पण त्या सर्वांपेक्षा पापक्षय करून त्याची वासनाशुद्धी करणारं हे साधन आहे. हे भगवंताचं नाव आहे. नामामध्ये फार मोठं महात्म्य आहे, नामात सामर्थ्य आहे म्हणाले. तेव्हा अजामिळाच्या मुखातून नारायण हे नाव आलेलं आहे. हे तुम्हालाही माहिती आहे. "नारायणा" म्हणून त्यांनी हाक मारलेली आहे म्हणून तर आम्ही आलोत. त्यांनी सांगितलं, ""अहो, याने नारायण म्हणजे नाव नारायण आहे पण ते मुलाचं नाव आहे. ह्याचं मन मुलाच्या ठिकाणी आहे आणि वाणीतून हे नाव निघालेलं आहे. याचंही फळ आहे?'' ""हो म्हणे याचंही फळ आहे. हरीचं नाव मुखातून आलं की त्याचा पापक्षय होतो.''

साङ्केत्यं पारिहास्यं वा स्तोभं हेलनमेव वा ।
वैकुण्ठनामग्रहणम् अशेषअघहरं विदुः ।।
6.2.14 ।। श्री. भा.

शुकाचार्य महाराजांनी कलियुगामध्ये घडणाऱ्या अनंत पातकांचा क्षय होण्याकरिता हे एक मोठं साधन सांगितलेलं आहे, प्रगट केलेलं आहे. संकेत म्हणजे मुलाचं नाव ठेवणं, ईश्वराचं नाव जर मुलाचं ठेवलं आणि जर ते नेहमी मुखातून आलं, मुलाच्या उद्देशानी का होईना पण तेच नाव त्या नावानीच आपण हाक मारणार. पण त्या नामस्मरणांनी किंवा त्या नावाने ते नाव उच्चारलं गेल्यानीसुद्धा पापक्षय होतो आहे. ईश्वराचा उपहास करताना जरी नाव उच्चारलं, निंदा करायची आहे, कोणत्याही उद्देशानी ईश्वराचं नाव मुखातून आल्यानंतर पापक्षय होतो आहे. कितीही पातकी जरी असला तरी हरीच्या नामाने त्याला यमयातना कधीही भोगाव्या लागत नाहीत. लहानमोठ्या पातकांचा नाश करण्याकरता ऋषीमंडळींनी अशी प्रायश्चित कर्म सांगितलेली आहेत. पण त्या कर्मांनी पापाचा तेवढा नाश होतो. केलेली पापं जातात. पुन्हा पाप करण्याची बुद्धी बंद होत नाही. ती वासना शिल्लक राहती आहे.

नाधर्मजं तद्धृदयं तदपीशांघ्रिसेवया ।।
6.2.17 ।। श्री. भा.
***
पान २०३

अधार्मिक असलेलं हृदय शुद्ध होत नाही पण ईश्वराची भक्ती, ईश्वराचं नामस्मरण जर घडलं तर त्याचं हृदयही शुद्ध होऊन जातं. अज्ञान किंवा ज्ञानपूर्वक भगवंताचं नाव जर मुखातून आलं तर सर्वही पातकं नष्ट होतात. औषध घेताना औषधाचं काय आणखी त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे हे कोणाला कळतंय म्हणाले. औषध देणारा जो आहे, त्या वैद्याला, डॉक्टरला माहिती आहे की औषधामध्ये इतकं सामर्थ्य आहे. रोगी जो आहे त्याला काही माहिती नाही. पण अज्ञानानी औषध घेतलं गेलं म्हणून त्याचं फळ मिळाल्यावाचून राहात नाही. तसं हे औषध आहे. हे तुमच्या लक्षात आलं नाही म्हणाले. विष्णूदूत सांगताहेत हा भागवत धर्म आहे. भगवंतांनी हे मुद्दाम सांगून दिलेलं आहे. सर्वांना हे माहिती नाहीये. तेव्हा अजामिळाला नरकलोकाला नेता येणार नाही. यमदुतांनी बांधलेले पाश सोडून टाकले. त्याला मुक्त केलं आणि विष्णूदूत निघून गेलेले आहेत. यमदूतही परत आले यमधर्माच्या जवळ. त्यांनीही घडलेला वृत्तांत त्यांना सांगितला.

अजामिळ यमदूतांच्या पाशातून मुक्त झालेला आहे आणि त्याच्या मनावर पश्चाताप झाला पुष्कळ. विष्णूदूतांचं दर्शन झालं. त्या दोघांचं संभाषण ऐकलेलं आहे आणि केवढा भागवतधर्म आहे भगवंताच्या नामस्मरणामध्ये किती सामर्थ्य आहे हे त्यानी अनुभवाने आणखी सगळं पाहिलेलं आहे. आपण यमदूतांच्या पाशामध्ये बांधलो गेलो होतो शरीरातून आपल्याला जायचं होतं तरीसुद्धा नामस्मरणांनी त्यातून मुक्त झालो आपण. काही बोलावं असं त्याला वाटलं पण विष्णूदूत थांबले नाहीत ते अदृश्य झाले. पश्चात्ताप झाला अजामिळाला आणि आजपर्यंत माझ्या हातून किती अपराध, पापं किती घडलेली आहेत. माता-पितरांचा त्याग केला, पतिव्रता स्त्रीचा मी त्याग केला आणखी सुरापान करणाऱ्या या स्त्रीच्या संगतीमध्ये येऊन सापडलो म्हणाले मी. अशा भयंकर नरकामध्येच मला जाण्याची पाळी आली होती. पण आज मला त्या विष्णूदूतांनी मुक्त केलं. कुठे गेले ते मला मुक्त करून? माझं काहीतरी भविष्य चांगलं आहे, भाग्य चांगलं आहे म्हणून हा प्रसंग घडलेला आहे. नाहीतर या मृत्यूच्या वेळेला माझ्या मुखातून नारायणाचं नाव तरी कसं आलं? आता या पुढचा काल मात्र आणखी भगवंताची भक्ती करण्यामध्ये घालवायचा असा त्यानी निश्चय केलेला आहे. आणि घरातून बाहेर पडला. वयोवृद्ध आहे पण नाही राहिला नाही. मनामध्ये निश्चय झालेला आहे. आणखीन हरिद्वार क्षेत्रामध्ये आलेला आहे गंगातीरावर. योगाभ्यास त्याचा पूर्वीच झालेला होता. पुन्हा आता त्यानी तिकडे लक्ष देऊन प्राणायाम, प्रत्याहारादिकांनी आपल्या इंद्रियांचं दमन केलेलं आहे. सगळी इंद्रियं आणखी ताब्यामध्ये आणली आणि भगवंताचं स्मरण करतो आहे. भगवंतांच्या स्वरूपाचं ध्यान करण्याला तो प्रवृत्त झालेला असताना एके दिवशी ते...

***
पान २०४

विष्णूदूत त्याला दिसलेले आहेत, दर्शन झालेलं आहे. नमस्कार त्या सर्वांना केला. आपलं शरीर त्या गंगाजलामध्ये टाकून दिलेलं आहे आणि भगवंतांच्या दूताचं स्वरूप त्याला मिळालं. चतुर्भुज किरीट, कुंडल धारी भगवत्स्वरूप तो झालेला आहे. त्या सगळ्या भगवद्भक्तांच्या बरोबर विमाणामध्ये बसून आणि वैकुंठलोकाला अजामिळ पोहोचलेला आहे. सर्व धर्म ज्यांनी टाकलेले होते, एक दासी पती म्हणून सर्व आणखी मार्ग भ्रष्ट झालेला असा जो पतीत झालेला अजामिळ तो,

सद्यो विमुक्तो भगवन्नाम गृह्णन् ।।
6.2.45 ।। श्री. भा.

भगवंताचं नाव मुखातून आल्याबरोबर तो मुक्त झालेला आहे. कर्मबंध हे आणखी तोडून टाकणार असं हे मोठं श्रेष्ठ आहे. मोठे मोठे वेदाभ्यास करणारे असे जे मोठे ज्ञानी आहेत, त्यांचा याच्यावरती विश्वास बसत नाही. नामस्मरण काय साधन आहे असं त्यांना वाटतं म्हणाले पण हे त्याचं उदाहरण आहे. मुलाचं ठेवलेल नाव मुखातून आलेलं आहे. पण ते नाव नारायणाचं आहे, भगवंताचं आहे. अज्ञानानी घेतलं गेलेलं हरिनाम या नामाच्या उच्चारानी अजामिळ तरून गेलेला आहे. श्रद्धेनं, विश्वास ठेवून आणखी हरिनामस्मरण ज्याचं चाललेलं आहे त्याला किती फळ मिळेल राजा.

राजांनी विचारलं, ""महाराज, यमदूत परत गेले. आपल्या स्वामींना त्यानी सांगितलं. यमधर्मांनी पुढं काय केलं म्हणाले. आजच आम्ही ऐकलं म्हणाले. यमधर्माची आज्ञा आणखी उल्लंघन केली. यमदूत आदराने परत गेले. मृत्यूजवळ आलेला असतानासुद्धा तो पुन्हा जिवंत झाला म्हणा किंवा उठून बसला गेला बाहेर. हे आज नवीन ऐकलं. यमदूत त्या विष्णूदूतांनी प्रतिबंध केल्यामुळे यमलोकामध्ये गेले. त्या यमदूतानी आणखी आपल्या स्वामीला यमधर्माला आणखी सांगितलं, विचारताहेत,

कति सन्तीह शास्तारो जीवलोकस्य वै प्रभो ।।
6.3.4 ।। श्री. भा.

महाराज, या मृत्यू लोकावरती किती अधिकारी नेमलेले आहेत? आमची कल्पना आपण एकटेच अधिकारी आहात अशी आत्तापर्यंत कल्पना होती. अनेक अधिकारी अशा उच्चपदावरती जर असले तर सर्व गोंधळ होणार. यांनी एक सांगायचं, यांनी दुसरं सांगायचं. एक कुणीतरी अधिकारी असला पाहिजे आणि तो अधिकार आपल्या जवळच आहे. असा आमचा विश्वास आहे. आज आम्ही आपल्या आज्ञेप्रमाणे एका पापी मनुष्याला आणण्याकरता गेलो. मृत्युलोकावर आणि त्याच्या मुखातून "नारायण" हे नाव निघालं. मुलाचंच नाव त्याचं आहे. त्यानी ठेवलं होतं.

***
पान २०५

पण नारायण नाव मुखातून बाहेर पडल्याबरोबर ते भगवंताचे सेवक आले. त्यांनी आमचे पाश ओढून टाकले आणि त्याला मुक्त केलं. परत जावं लागलं आम्हाला. हे ऐकून यमधर्मसुद्धा त्यांच्याही मनामध्ये भगवत्प्रेम भरलेलं आहे. पूर्ण भगवद्भक्त आहेत. माझ्यापेक्षाही सर्वांचं नियमन करणारा एक परमात्मा श्रीहरी आहे सांगताहेत यमधर्म. ज्याच्या आज्ञेने आम्ही सर्व काम करतो आहोत. भगवंताचं नाम उच्चारून आणखी त्याची सेवा करणारे जे आहेत त्यांना कुणाच्याही बंधनामध्ये पडावं लागत नाही. सर्वही आम्ही मी आहे, इंद्र आहे, वरुण आहे, चंद्र, अग्नी, वायू हे सगळेही ब्रह्मादिक देव सुद्धा आणि त्या भगवंताची आज्ञा पालन करतो. आम्हाला त्याच्या आज्ञेप्रमाणे वागावं लागतं. सर्वव्यापी तो आहे. स्वतंत्र आहे. मायेचा नियंता आहे. त्याचेच दूत सर्वत्र फिरत असतात. विष्णूदूत हे सर्वत्र संचार करत असतात. विष्णूभक्त कोण आहेत, कोण संकटात आहेत हे ते बघत असतात. त्यांची सुटका कशी करायची हे सगळं त्या विष्णूदूतांना माहिती आहे. साक्षात भगवंताने खास आज्ञा केलेली आहे. कोणाला नरक आहे आणि कोणाला नाही हे त्यांनी ठरवलेलं आहे. नरकाची रचनाही त्याने केली. आम्हाला शिक्षा करण्याचा अधिकारही त्यानेच दिलेला आहे. पण त्याने त्याच्यामध्ये अपवादही केलेला आहे. भगवद्भक्ती ज्याच्याजवळ नाही त्याचा उद्धार व्हायचा कसा? ब्रह्मदेव, नारद, शंकर, सनतकुमार, कपिल, मनु, प्रल्हाद, जनक, भीष्माचार्य, बलि, शुकाचार्य आणि आम्ही अशा फक्त बारा लोकांना भगवंताची ती आज्ञा माहिती आहे. भागवतधर्म ज्याला म्हणतात, तो आम्हाला माहिती आहे. अत्यंत दुर्बोध आहे, शुद्ध आहे हा भागवतधर्म. सर्व पापक्षय करणारा कसा आहे याबद्दल इतरांना शंका उत्पन्न होते. आम्हाला त्याचं महात्म्य माहित असल्यामुळे शंका उत्पन्न होत नाही. तुम्ही आज भगवंताच्या नामामध्ये किती शक्ती आहे हे प्रत्यक्ष पाहून आलेले आहात. अजामिळासारखा पापी तुमच्या पाशातून मुक्त झालेला आहे. यापेक्षा आणखी कोणतं उदाहरण पाहिजे नामाचं महत्व समजायला? सामान्य श्रेष्ठ, ज्ञानी म्हणवणारे जे लोक आहेत, त्यांना हे नामसाधन माहिती नाही. मायामोहामध्ये पडलेले आहेत. वेदांनी सांगितलेली तेवढीच कर्म करायची, असं त्यांना वाटतंय. नामसाधन हे वेदांनी सांगितलं नाही असं नाही. भगवंताच्या नामामध्ये काय महात्म्य आहे हे ही वेदामध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा यापुढं तुम्हाला जेव्हा मृत्युलोकामध्ये जायची वेळ येईल तेव्हा प्रथम चौकशी करत चला की हा जीवात्मा हा भगवद्भक्त आहे काय? याचं नामस्मरण नित्य चालू आहे काय? सगळा पूर्ण विचार करून आणि मग त्याला घेऊन जा. यमधर्मांनी यमदूतांना सर्व समजावून सांगितलं आणि भगवंताची क्षमा त्यांनी मागितली. "देवा, आमच्या दूतांनी आज फार मोठा...

***
पान २०६

अपराध केलेला आहे. त्याची आपण क्षमा करा. त्यांना काही माहिती नाही.'

शुकाचार्य सांगतात, राजा,

तस्मात् सङ्कीर्तनं विष्णोः जगन्मङ्गलमंहसाम् ।
महतामपि कौरव्य विद्ध्यैकान्तिकनिष्कृतिम् ।।
6.3.31 ।। श्री. भा.

भगवंताचं नामसंकीर्तन हे सर्वही पातकांचा निश्चित नाश करणारं साधन आहे. एवढं समजून रहा. भगवद्भक्तांचं संरक्षण भगवान कसं करतात हा विषय या सहाव्या स्कंधामध्ये आहे. देवाचा अनुग्रह कसा असतो हे सांगितलेलं आहे. अजामिळासारखा पापी मनुष्य परंतु भगवद्भक्त आहे. त्याचं पूर्व सुकृत काही असलं पाहिजे ना! शेवटच्या क्षणी भगवंताचं नाम मुखातून उच्चारलं गेलं हे काहीतरी पूर्व सुकृत आहे. त्याशिवाय मुखात नाम येणार नाही. इंद्राचाही असाच उद्धार केलेला आहे. तोही भगवद्भक्त आहे.

पुढं ब्रह्मदेवांनी अनेक प्रकारची सृष्टिरचना केलेली आहे. देव, असुर, गंधर्व, पशू-पक्षी हे सगळे निर्माण केले. दक्षानेही ब्रह्मदेवांच्या आदेशाप्रमाणे अशाच प्रकारची सृष्टी केली. आपल्या इच्छेप्रमाणे सृष्टीची वाढ झाली नाही म्हणून दक्ष प्रजापतीने अघमर्षण तीर्थावर जाऊन पुष्कळ तपश्चर्या केली. हरीची आराधना केली. नित्य प्रार्थना तो करतो आहे. भगवंतांची स्तुती करतो आहे. भगवान प्रगट झाले. गरुडावर बसून आलेले आहेत. त्या परमेश्वराचं दर्शन झाल्याबरोबर दक्षाला अतिशय आनंद झाला आणि त्याने त्यावेळी पुष्कळ स्तुती केलेली आहे. भगवान म्हणाले, ""दक्षा, तुझी तपश्चर्या सफल झालेली आहे. तुझ्यावर मी प्रसन्न झालो आहे. तुझी इच्छा पूर्ण होईल. सर्वही ब्रह्मादिक देवही माझ्याच विभूती आहेत. तप हे माझं हृदय आहे. ज्याच्याजवळ तप आहे तो श्रेष्ठ होतो. समर्थ होतो. सृष्टीच्या पूर्वीही मी आहे. मध्येही मी आहे. अंतीही मी आहे. आता तू पंचजन प्रजापतीची कन्या आसिनी हिच्याबरोबर विवाह कर आणि संतती उत्पन्न कर. स्त्री-पुरुष समागमाने सृष्टी निर्माण कर असं भगवंतांने सांगितलं. आत्तापर्यंत ब्रह्मदेबानी, दक्षाने नुसत्या संकल्पाने सृष्टी निर्माण केली होती. दक्षाला आज्ञा करून भगवान गुप्त झालेले आहेत.

दक्षाने विवाह केला आणि हर्यश्व नावाचे दहाहजार पुत्र निर्माण केले. संकल्पसिद्धीही आहेच. धर्मशील अशाप्रकारचे ते दक्षकुमार पित्याच्या आज्ञेप्रमाणे तपश्चर्या करण्याकरता पश्चिम दिशेला गेलेले आहेत. तपश्चर्या करून आपल्या पुत्रांनी सामर्थ्यसंपन्न व्हावं, आणि परत येऊन राज्यकारभार सांभाळावा, प्रजाजनांचं संरक्षण करावं अशी त्या दक्ष प्रजापतीची इच्छा होती. समुद्र

***
पान २०७

आणि नदीचा संगम जिथे झालेला अशा नारायण तीर्थाजवळ ते आलेले आहेत. आणि तपश्चर्या करू लागले. नारदमहर्षि तिथे आले आणि त्यांनी दक्षपुत्रांना काही कूट प्रश्न विचारले.

अदृष्टान्तं भुवो यूयं बालिशा बत पालकाः ।
6.5.6 ।। श्री. भा.

हे जे उत्पन्न होणारं आहे किंवा ही जी भूमी आहे, हिचा अंत कुठे आहे हे तुम्हाला माहिती आहे काय?

एकपुरुषं राष्ट्रम् ।।
6.5.7 ।। श्री. भा.

राष्ट्रामधे नियमन करणारा एकच पुरुष आहे. एका बिळामध्ये गेल्यानंतर बाहेर पडता येत नाही ते कोणतं बीळ आहे? कोणतं स्थान आहे की याचकाने तिथे गेल्यानंतर पुन्हा बाहेर येत नाही? अनेक रूपं धारण करणारी एक स्त्री आहे ती कोण आहे? तिचा पती कोण आहे? अशी एक नदी आहे कि दोन्ही बाजूला जिचे प्रवाह वाहताहेत ती कोणती नदी आहे? पंचवीस पदार्थ ज्याठिकाणी राहताहेत ते कोणतं स्थान आहे? एक स्वयंचलित सारखं फिरणारं असं चक्र कोणतं आहे? हंस पक्षी कोण आहे? हे सगळं जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही तपश्चर्या करा किंवा आणखी काही कार्य करायचं असेल तर करा. हे सगळं माहिती नसताना तुमच्या तपश्चर्येचा काय उपयोग आहे? हे अगोदर ज्ञान संपादन करा असं नारदांनी सांगितलं आणि निघून गेले. जन्मतःच चांगली व विवेकसंपन्न बुद्धी त्या राजपुत्रांची होती. देवर्षींच्या भाषणाचा विचार ते करू लागले.

भूः क्षेत्रं जीवसंज्ञम् ।।
6.5.11 ।। श्री. भा.

भू म्हणजे प्रगट होणारं. जन्माला येणारा जीवात्मा तोच भू आहे. त्याचा अंत म्हणजे त्याचा विलय केव्हा होणार आहे. जीवदशा केव्हा संपणार आहे हे मुख्य समजून घेतलं पाहिजे. नुसती कर्म करून तपश्चर्या करून काय उपयोग आहे? "एकपुरुषं राष्ट्रम्"।। असा एक नियामक पुरुष म्हणजे परमेश्वर आहे. त्यालाही जाणलं पाहिजे. ज्याठिकाणी गेलं की परत बाहेर पडता येत नाही असं स्थान म्हणजे परब्रह्म, परमात्मा आहे. त्याला जाणलं, त्याच्याशी ऐक्य झालं की जीवदशा संपली. कर्म संपली. त्याचा काल संपलेला आहे. परमात्म्यामध्ये एकदा विलीन झाल्यावर जीवाला पुनरावृत्ती नाही. अनेक रूपं धारण करणारी स्त्री म्हणजे ही बुद्धी आहे. त्रिगुणांनी संपन्न आहे. कधी क्रोध आहे, कधी काम आहे. बुद्धी कशी आहे हे ही समजून घेतलं पाहिजे आणि तिच्या संगतीमुळे आपलं ऐश्वर्य विसरून गेलेला, भ्रष्ट झालेला हा जीवात्मा आहे. दोन्ही बाजूला प्रवाह असणारी नदी म्हणजे मायानदी आहे. लक्षावधी जीव रोज जन्माला येतात, लक्षावधी जीव रोज मरण पावतात,

***
पान २०८

हे दोन प्रवाह आहेत, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. पंचवीस तत्वांचं स्थान म्हणजे परमात्मा आहे हे समजून घेतलं पाहिजे. ईश्वराने निर्माण केलेलं शास्त्र हा हंसपक्षी आहे. तो सांगतो आहे, मार्गदर्शन करतो आहे. सारखं फिरणारं म्हणजे हे कालचक्र आहे. रजोगुण आहे. त्यामुळे सारखी क्रिया चालू आहे. अशाप्रकारे मनानेच विचार करून दक्षकुमारांनी ठरवलं की आता कर्म करून काय करायचंय? राज्य कशाला करायचं? भगवद्भक्तीचा मार्ग धरून आपण आत्मकल्याण करून घ्यावं असं त्यांनी ठरवलं आणि ते काही पुन्हा राजधानीत परत आले नाहीत. दक्षाला हे समजलं, वाईट वाटलं. त्याला पुन्हा शबलाश्व एक हजार पुत्र झाले. त्यांनाही पित्याने आज्ञा केली की श्रीहरीचा प्रसाद संपादन करा, शक्तिसंपन्न व्हा. उत्तम गृहस्थाश्रम करा. राज्यकारभार करा. ते पुत्रही नारायणतीर्थापाशी आलेले आहेत. भगवंतांचं चिंतन चालू आहे. मंत्रजप चालू आहे. नारदमहर्षींनी तिथे येऊन पूर्वीसारखंच त्यांना सांगितलं. तुमच्या बंधूंनी कोणता मार्ग पत्करला ते बघून तुम्ही त्यांच्याप्रमाणे वागा म्हणजे तुमचं कल्याण होईल. असं सांगून नारद निघून गेले आणि त्या दक्षकुमारांनी आपल्या बंधूंचाच मार्ग पत्करलेला आहे. इकडे दक्षाच्या राजधानीमध्ये अपशकुन व्हायला लागले. याही पुत्रांना नारदांनी परमार्थ मार्गाला लावून दिलं. गृहस्थाश्रमापासून वंचित केलं हे कळल्याबरोबर दक्ष अतिशय रागावला. त्याचवेळी नारदमहर्षी त्याला भेटण्याकरता राजवाड्यात आले. त्यांना पाहिल्याबरोबर दक्षाने बोलायला सुरवात केली.

अहो असाधो साधूनां साधुलिङ्गेन नस्त्वया ।
असाधु अककार्यं भर्काणां भिक्षोर्मार्गः प्रदर्शितः ।।
6.5.36 ।। श्री. भा.

काय नारदा, साधूचा वेष धारण करून हे तुम्ही हे काय चालवलंय? लहान वय असलेल्या या मुलांना तुम्ही संन्यासाचा मार्ग दाखवला? तीन ऋणातून जे मुक्त झालेले नाहीत, कर्माचा विचारही अजून ज्यांनी केलेला नाही, आचरणही केलं नाही, त्यांचा बुद्धिभेद तुम्ही केला. यांचा इहलोकही गेला आणि परलोकही गेला. काय तुमच्या मनामध्ये दया वगैरे नाही? भगवद्भक्त दयाळू असतात असं आम्ही समजत होतो पण आपण तर त्याविरुद्धच वागता आहात! विषय हे किती दु:खदायक आहेत हे जर अनुभव घेऊन मनाला पटलं तर खरी विषयविरक्ती होते, खरं वैराग्य येतं. केवळ दुसऱ्याच्या सांगण्याने येणारं वैराग्य हे टिकाऊ होत नाही. आम्ही कर्ममार्गी, प्रवृत्तमार्गी आहोत. आणि आमचा सर्व वंशच तुम्ही नाहीसा केला. सगळे परमार्थामागाकडे वळलेले आहेत. तेव्हा लोकांचा बुद्धिभेद करणारे तुम्ही आहात. तुम्ही एका जागी कधीही राहणार नाही. सारखा संचार तुम्हाला करावा लागेल असा शाप दक्षाने नारदांना दिलेला आहे. नारद काही बोलले नाहीत.

***
पान २०९

त्यांनाही शाप देता आला असता. पण काही न बोलता, भजन करत निघून गेले.

नंतर त्या दक्षाला साठ कन्या झालेल्या आहेत. धर्माला त्याने दहा कन्या दिल्या. सत्तावीस कन्या चंद्राला दिलेल्या आहेत. कश्यपांनाही काही कन्या दिल्या. त्यांची नावंही सांगितली शुकाचार्यांनी आणि त्या कन्यांच्यापासून काय काय संतती झाली हे ही सर्व सांगितलं. तार्क्ष्यनाम कश्यपांच्या पत्नी विनता, कद्रू वगैरे आहेत. विनतेपासून गरुड झालेला आहे. सूर्यसारथी अरुण झालेला आहे. कद्रूपासून सर्व नाग वगैरे झालेले आहेत. कश्यपांपासून पुष्कळ सृष्टी झालेली आहे. कश्यपांच्या दिती, अदिती, दनु, काष्ठा, अरिष्ठा, सुरसा, इला वगैरे तेरा स्त्रिया होत्या. तिमि नावाच्या स्त्रीपासून सर्व जलचर प्राणी निर्माण झाले. सुरभि नावाच्या स्त्रीपासून गाय, म्हैस वगैरे पशू उत्पन्न झाले. ताम्रा नावाच्या स्त्रीपासून गिधाड वगैरे शिकारी पक्षी निर्माण झाले. मुनि नावाच्या स्त्रीपासून अप्सरा उत्पन्न झाल्या. क्रोधवशा नावाच्या स्त्रीपासून सर्व सर्पगण निर्माण झाले. इला नावाच्या स्त्रीपासून वृक्षजाती निर्माण झाल्या. अरिष्ठेपासून गंधर्व निर्माण झाले. दनु नावाच्या स्त्रीपासून मोठेमोठे दानव निर्माण झाले. देवांना त्रास देणाऱ्या दानवांचा संहार तुझा पितामह अर्जुन याने इंद्राच्या आज्ञेप्रमाणे केलेला आहे. आता अदिती जी आहे देवमाता तिचा वंश सांगताहेत शुकाचार्य. विवस्वान, अर्यमा, पूषा, त्वष्टा, सविता, भग, धाता, विधाता, वरुण, मित्र, इंद्र आणि त्रिविक्रम म्हणजेच वामन असे बारा पुत्र त्या अदितीला झाले. विवस्वान म्हणजे सूर्यनारायण हा पहिला पुत्र झाला कश्यपांचा. त्याच्यापासून श्राद्धदेव नावाचा मनु झाला. तोच वैवस्वत मनु. यमधर्म आणि यमुना ही दोन मुलं झाली. अश्विनीवेष धारण केलेला असताना संज्ञेला सूर्यापासून अश्विनीकुमार झालेले आहेत. अशी संतती झालेली आहे.

अदितीचा त्वष्टा नावाचा मुलगा होता. त्याची स्त्री रचना नावाची ही दैत्यांची भगिनी होती. तिच्यापासून विश्वरूप आणि संनिवेश असे पुत्र झालेले आहेत. एकदा बृहस्पतींनी देवांचा त्याग केल्यामुळे, कोणीतरी गुरु पाहिजे म्हणून सर्व देव विश्वरूपाकडे गेले आणि आपल्या गुरुस्थानावर त्याची योजना देवांनी केली. परीक्षित राजाने विचारलं, महाराज, देवगुरू बृहस्पतींनी देवांचा त्याग करण्याचं काय कारण घडलेलं आहे? शुक सांगतात राजा,

इन्द्रस्त्रिभुवनैश्वर्यमदोल्लंघन सत्पथः ।।
6.7.2 ।। श्री. भा.

ऐश्वर्य मिळालं, मिळू नये असं नाही परंतु ते ऐश्वर्य मिळाल्यानंतर मनाची अवस्था केव्हा बदलेल, मनामध्ये अहंकार केव्हा जास्ती वाढेल, काही सांगता येत नाही. म्हणून भगवद्भक्त

***
पान २१०

म्हणतात, आम्हाला संपत्ती नको, मुक्ती नको. फक्त आपलं स्मरण तेवढं नित्य असावं. इंद्र त्रैलोक्याचा राजा आहे. परंतु सन्मार्गापासून तो भ्रष्ट झालेला आहे. सभेमध्ये एके दिवशी सर्व देवमंडळी बसलेली आहेत. इंद्रपत्नी शचीही त्याठिकाणी आहे. इतक्यात देवगुरू बृहस्पती त्याठिकाणी आले. त्यांना पाहिल्याबरोबर सर्व देवमंडळी आदराने उठून उभी राहिली.

नोच्चचाल आसनात् इन्द्रः
पश्यन्नपि सभागतम् ।।
6.7.8 ।। श्री. भा.

सभेमध्ये गुरुमहाराज आलेले आहेत. हे डोळ्याने पाहूनही इंद्र आपल्या आसनावरून उठला सुद्धा नाही. नमस्कार तर नाहीच. ही त्याची वृत्ती पाहिल्याबरोबर देवगुरू पाठीमागे वळले आणि आपल्या आश्रमात निघून गेले. सामर्थ्य मिळाल्यानंतर आता हे सामर्थ्य टिकणारं आहे अशीच त्याची कल्पना आहे. ज्यांच्या आश्रयाने, कृपाप्रसादाने हे सगळं ऐश्वर्य मिळालं त्या गुरुमहाराजांना इंद्र विसरून गेलेला आहे. बृहस्पती निघून गेल्यावर मात्र इंद्राच्या मनावर परिणाम झाला. आपली चूक झाली हे त्याच्या ध्यानात आलं. सर्व देवांना सांगतो आहे. अहंकारामुळे माझ्या हातून गुरुमहाराजांचा उपमर्द झालेला आहे. त्यांचा सत्कार माझ्या हातून घडला नाही. ही लक्ष्मी, हे ऐश्वर्य मिळावं अशी इच्छा कोणीही करू नये. कुणाचाही अनादर त्यामुळे घडण्याची शक्यता असते. मन बिघडून जातं. तेव्हा गुरुमहाराजांची क्षमा मागण्याकरता इंद्र बृहस्पतींच्या आश्रमात आला. पण त्याला दर्शन झालं नाही. इंद्र निराश झाला आणि ही बातमी दैत्यांना समजली. त्यांचेही हेर असायचे स्वर्गलोकामध्ये. दैत्यांना आपले गुरु शुक्राचार्यांबद्दल अतिशय आदर होता. त्यांनी शुक्राचार्यांची कृपा संपादन करून, देवांचा पराभव केला आणि स्वर्गाचं राज्य ते करू लागले. एका इंद्रामुळे सगळ्या देवांवर असा प्रसंग आला. इंद्राने अपराध केल्यानंतर जर शासन झालं नसतं तर इतरही देवांना असं वाटायची शक्यता होती की गुरुमहाराजांचा अपमान केला तरी चालतंय. म्हणून सर्वांनाच शासन झालं पाहिजे ही योजना ईश्वराच्या संकल्पाने झालेली आहे. इंद्र स्वर्गाचा राजा आहे. यज्ञयागादिक कर्म करून इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. तरीपण त्यातून बाहेर पडण्याची वेळ येते. आचरण कायम ठेवलं पाहिजे. इंद्रपद मिळाल्यामुळे आता आपण कसंही वागलं तरी चालतंय असं नाहीये. ईश्वराला अमान्य आहे. एकदम देवांचं सर्व सामर्थ्य काढून घेतलं. सर्व देवमंडळी ब्रह्मदेवांना शरण गेली. ब्रह्मदेव म्हणाले, इंद्रा हे चांगलं केलं नाहीस, तुमच्या हातून अपराध घडलेला आहे. ज्ञानी महात्मा तुम्हाला गुरु म्हणून मिळाला असताना नुसता त्यांचा आदर तुम्हाला करता आला नाही? काय तुझं राज्य मागत होता तो? किती साहाय्य त्यांचं होत होतं,

« Previous | Table of Contents | Next »