मार्गदर्शन होतं. ते दैत्य पहा किती बलवान झालेले आहेत. आपल्या गुरूंच्या कृपेमुळे त्यांनी स्वर्गाचं राज्य जिंकलं आणि मलासुद्धा ब्रह्मलोकातून घालवून देण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. कोणी मार्गदर्शन करणारा, ज्ञानी महात्मा तुमच्या गुरुस्थानामध्ये अवश्य पाहिजे. तेव्हा तुम्ही आता त्वष्ट्याचा मुलगा विश्वरूप जो आहे त्याला तुमचं गुरुपद द्या. तो तुमची इच्छा पूर्ण करील. तो मोठा ज्ञानी आहे, तपस्वी आहे, योगी आहे. पण तो कसा वागतो हे मनामध्ये आणायचं नाही. आपलं काम करून घ्यायचं. सर्व देव त्या विश्वरूपाच्या आश्रमामध्ये आलेले आहेत. त्यांनी विनंतीपूर्वक प्रार्थना केली, आम्ही अतिथी म्हणून आपल्याकडे आलेलो आहोत. आमचं गुरुपद आपण घ्या आणि आमचं संरक्षण करा. आमची गेलेली स्थानं आम्हाला तुम्ही मिळवून द्या. विश्वरूपाने सांगितलं, देव हो,
विगर्हितं धर्मशीलैर्ब्रह्मवर्च उपव्ययम् ।
कथं नु मद्विधो नाथा लोकेशैरभियाचितम् ।।
6.7.35 ।। श्री. भा.
पौरोहित्य करणं, कुणाचाही उपाध्याय होणं हे मला पसंत नाही. ब्रह्मतेज सगळं संपून जातंय. यजमानाच्या पातकांचं संक्रमण आमच्यामध्ये होतं. मला याची इच्छा नाहीये केवळ तपश्चर्या करत राहावं असं मला वाटतं. परंतु आपण आता माझ्या दरवाज्यामध्ये अतिथी म्हणून आलेले आहात. तेव्हा तुमची इच्छा पूर्ण करणं हे ही माझं कर्तव्य आहे. तुमच्या इच्छेप्रमाणे तुमचा मी गुरु होतो आणि योग्य मार्गदर्शन करतो असं आश्वासन विश्वरूपाने देवांना दिलं. विश्वरूप मोठा ज्ञानी होता. त्याने इंद्राला नारायणवर्म म्हणून जे आहे, नारायणकवच ती विद्या शिकवली. समर्थ झालेल्या देवांनी दैत्यांचा पराभव करून आपलं राज्य परत घेतलेलं आहे. सगळी समृद्धी देवांना परत मिळाली. नारायणकवचाचं प्रतिपादनही शुकाचार्यांनी केलेलं आहे.
त्या विश्वरूपाला तीन मुखं होती. यज्ञातला सोमरस एका मुखाने त्याने घ्यावा, एका मुखाने अन्नभक्षण करावं आणि तिसऱ्या मुखानी सुरापान करावं. त्याची माता रचना ही दैत्यवंशातली होती. त्यामुळे त्याचं दैत्यांकडेही लक्ष होतं. देवगुरू म्हणून सर्वाधिकार मिळाल्यामुळे यज्ञातील हविर्भाग देवांना कळणार नाही अशा रितीने विश्वरूपाने दैत्यांनाही देण्यास आरंभ केला. इंद्राच्या कानावर ही गोष्ट गेली. इंद्र विचार करतोय, हा आपला गुरु तर आपल्या शत्रूला सामील दिसतोय. आज आमच्या नकळत हविर्भाग देतोय, उद्या आम्हाला बाजूला सारून दैत्यांनाच फक्त हविर्भाग देईल हा! असा विचार मनात आल्याबरोबर इंद्र अतिशय रागावला आणि त्याने आपल्या वज्राने त्या...
...विश्वरूपाची तीनही मस्तके तोडून टाकली. ब्रह्महत्या झाली. इंद्राने त्या ब्रह्महत्येचे विभाग केले. भूमीला एक चतुर्थांश दिला, जलाला एक चतुर्थांश, वृक्षांना एक चतुर्थांश आणि स्त्रियांना एक चतुर्थांश भाग दिलेला आहे. अशाप्रकारे त्या पातकाचे विभाग करून त्यातून तो मुक्त झाला. हे सगळे विभाग करून देताना सगळ्यांना वर द्यावे लागले. भूमीला कितीही खणलं, उकरलं तरी पुन्हा भरून येईल असा वर दिला. भूमीवर मलमूत्र विसर्जन जे केलं जातं, सगळा कचरा जो टाकला जातो हे ब्रह्महत्येचं स्वरूप आहे. वृक्षांनाही तोडल्यानंतर पुन्हा वाढण्याचा वर दिला. झाडातून जो चिक बाहेर पडतो, डिंक वगैरे हे ब्रह्महत्येचं स्वरूप आहे. शास्त्रोक्त पुरुष डिंक वगैरे खात नाहीत त्याचं कारण हे आहे. स्त्रियांना नेहमी पुरुष सहवास मिळेल असा वर दिला. स्त्रियांचं मासिक रजोदर्शन आहे त्या रूपाने ब्रह्महत्येचं स्वरूप दिसतं. जलाला खर्च झाल्यानंतरही निर्झररूपाने वाढण्याचा वर दिला. पाण्यावर फेस, बुडबुडे जे येतात ते ब्रह्महत्येचं स्वरूप आहे. याप्रमाणे त्या गुरूंना बोलावून आणून आपणच त्यांचा नाश इंद्राने केला. पुन्हा गुरु नाही. मार्गदर्शक नाही. इकडे तो त्वष्टा जो होता, विश्वरूपाचा पिता, त्याला अतिशय राग आलेला आहे. वास्तविक त्वष्टा हा ही अदितीचा मुलगा म्हणजे इंद्राचा भाऊच झाला! तोही मोठा तपस्वी होता. दक्षिणानीमध्ये हवन केलं, इंद्राचा नाश व्हावा म्हणून. त्या अग्निकुंडातून एक भयंकर असुर बाहेर पडलेला आहे. वृत्रासुर त्याचं नाव. त्याचं शरीर वाढत वाढत मेघमंडलापर्यंत गेलं. महाप्रचंड आकाराचा तो असुर, काळ्या रंगाचा होता आणि हातामध्ये एक भयंकर त्रिशूळ त्याने धारण केलेलं होतं. त्वष्ट्याने इंद्राला मारण्याकरता अशी व्यवस्था केली. स्वर्गलोकामध्येही अशी भाऊबंदकी चालू आहे. तो वृत्रासुर निर्माण झाल्यावर सर्व दैत्यांनी त्याला आपला सेनापती नेमला आणि स्वर्गावर हल्ला केला. देवांनीही आपापली शस्त्रं वृत्रासुरावर टाकली परंतु त्याने ती शस्त्रं गिळून टाकलेली आहेत. त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. देव घाबरले आणि भगवान श्रीहरींची प्रार्थना करण्याकरता क्षीरसमुद्राच्या तीरावरती ते आलेले आहेत. प्रार्थना करताहेत, ""आपण सर्वेश्वर आहात. सर्वांचं संरक्षण करणं हे आपलंच कार्य आहे. आजपर्यंत अनेक दैत्यांपासून आमचं संरक्षण आपण केलेलं आहे. आम्ही आपल्याला शरण आलेलो आहोत.'' अशी प्रार्थना केल्यानंतर भगवान श्रीहरी प्रगट झालेले आहेत. देवांनीही वंदन केलेलं आहे. भगवान सांगताहेत, ""देवहो, तुम्ही केलेली स्तुती ऐकून मला संतोष झालेला आहे. माझा जो भक्त आहे त्याची जी इच्छा असेल ती पूर्ण होते. तुम्ही आता दधीची ऋषीच्या आश्रमात जाऊन त्यांचं शरीर मागून घ्या. विद्या आहे, तपस्या आहे, योगसामर्थ्य आहे. त्यामुळे त्यांचं शरीर अत्यंत समर्थ आहे. नारायणकवचाच्या सतत पठणामुळे...
...त्यांच्या अस्थी अतिशय अभेद्य झालेल्या आहेत. त्या अस्थींपासून वज्र नावाचं शस्त्र विश्वकर्म्याकडून तुम्ही करून घ्या आणि त्या शस्त्राने इंद्रा तुला वृत्रासुराचा नाश करता येईल. काही घाबरू नका. तुमचा नाश कोणीही करू शकणार नाही''. असं आश्वासन देऊन भगवान गुप्त झाले.
सगळे देव दधीची ऋषीच्या आश्रमात आलेले आहेत. ऋषींनीही त्यांचा सत्कार केला. देवांनी विनंती केली, ऋषिहराज, आम्ही मोठ्या संकटात सापडलेलो आहोत. वृत्रासुर निर्माण झालेला आहे. त्याचा नाश करण्याकरता एक शस्त्र तयार करायचंय आणि त्याकरता आपलं शरीर आम्हाला पाहिजे आहे. ऋषींनी थोडी परीक्षा पाहिली. काय म्हणाले, काय मागावं आणि काय नाही हे तुम्हाला कळत नाही? शरीर कोण देऊ शकेल तुम्हाला? सर्व जीवांना शरीर किती प्रिय असतं आणि मला तुम्ही शरीर मागता? देव म्हणाले, ऋषीमहाराज आपल्यासारखे ब्रह्मज्ञानी महात्मे जे आहेत ते लोककल्याणाकरता काहीही करू शकतात. आमचं एवढं कार्य व्हावं अशी प्रार्थना आहे. दधीची ऋषींनी सांगितलं, हेच मला ऐकायचं होतं. शरीर हे अस्थिर आहे. केव्हातरी पडणारच आहे. मृत झाल्यावर आपलं शरीर दान करावं असं काहीजण लिहून ठेवतात. त्यांच्या शरीराची किंमत ती काय? पण इथं दधीची ऋषी आपलं समर्थ असं जिवंत शरीर द्यायला तयार झालेले आहेत. घ्या म्हणाले, देवकार्य होण्याकरता माझं शरीर खर्ची पडतं आहे, चांगलं आहे. दधीचीऋषी आसन घालून बसले आणि भगवान श्रीहरीचं चिंतन करता करता, योगमार्गाने त्यांनी आपल्या शरीराचा त्याग केलेला आहे. विश्वकर्म्याने त्यांच्या अस्थींपासून एक वज्र नावाचं आयुध तयार करून दिलं. सर्व देव वृत्रासुराचा नाश करण्याकरता युद्धभूमीवर आलेले आहेत. त्रेतायुगाच्या आरंभी नर्मदा तीरावर देव-दैत्यांचं भयंकर युद्ध झालेलं आहे. नमुची, शंबर, अनर्वा, द्विमूर्धा असे मोठे मोठे असुर तिथे आहेत आणि पराक्रमी देवगणही आहेत. वृत्रासुर हा इंद्राचा शोध करतो आहे. दैत्यांचा आरंभाला पराभव झाला. ते पळून जाऊ लागले. वृत्रासूर त्यांना धीर देत बोलू लागला, अरे, पळून कशाला जाताय? युद्धामध्ये मृत्यू आला तर सद्गती मिळते. पुण्य केवढं आहे. परत फिरा. असं सांगून त्या वृत्रासुराने देव सैन्यात जाऊन पुष्कळसे देव पायाखाली चिरडून मारलेले आहेत. आणि शेवटी त्याने इंद्राला गाठलं. इंद्र ऐरावत हत्तीवर बसलेला होता. इंद्राने आपली गदा वृत्रासुरावर टाकली. ती गदा चेंडूप्रमाणे झेलून वृत्रासुराने ऐरावताच्या गंडस्थळावर मारली. तो ऐरावत त्या गदाप्रहाराने त्रस्त होऊन पाठीमागे सरकू लागला. इंद्राने आपला अमृतस्पर्श त्या ऐरावताला करून त्याला शांत केलेलं आहे. इंद्राला पाहिल्याबरोबर तो वृत्रासुर बोलू लागला.
दिष्ट्या भवान् मे समवस्थितो रिपुः
यो ब्रह्महा गुरुहा भ्रातृहा च ।।
6.11.14 ।। श्री. भा.
इंद्रा, आज माझ्यासमोर तू आलेला आहेस. एका ब्राह्मणाची तू हत्या केलेली आहेस. गुरूची हत्या केलीस. आज दैवयोगाने माझ्यासमोर तू आलेला आहेस. तुला मी जिवंत ठेवणार नाही. माझ्या त्रिशुलाने तुझ्या शरीराचे मी तुकडे करणार आहे. एका आत्मज्ञानी महात्म्याला गुरुपदावर बसवून त्याचा शिरच्छेद तू केलास. तुला काही लज्जा नाही? स्वर्गाचं राज्य मिळवून त्याचा उपयोग काय आहे? मनावर ताबा नाही. तुझ्या शरीराचे तुकडे करून गिधाडांना मी वाटून टाकणार आहे. जे जे माझ्या अंगावर धावून येतील त्यांचाही मी नाश करणार आहे. हे आरंभाला सांगितलं वृत्रासुराने, पण तो मोठा विचारी होता. पुन्हा म्हणतोय -
अथो हरे मे कुलिशेन वीर ।
हर्तां प्रमथ्यैव शिरो यदीह ।।
6.11.18 ।। श्री. भा.
तुझ्या हातात जे वज्र आहे त्यामध्ये एका तपस्वी ब्राह्मणाची तप:शक्ती आहे आणि भगवान श्रीहरींचा कृपाप्रसाद तुम्हाला मिळालेला आहे. हे मी जाणून आहे. त्या वज्राने जर तू माझा शिरच्छेद केलास तर हे माझं शरीर भूतगणांना अर्पण करून मी भगवंताजवळ जाईन. भगवंताची प्रार्थना तो करतोय. इंद्रालाही सांगतो आहे लवकर ते वज्र टाक. तुझी गदा फुकट गेली म्हणून हे वज्र फुकट जाणार नाही. बरं होईल, भगवंताचं स्मरण करता करता माझा देह पडेल. भगवंताची कृपा फक्त मला पाहिजे आहे. स्वर्गाचं राज्य नको आहे. कोणतीही राजसत्ता मला नको आहे. आमचा स्वामी, त्याची कृपा कोणती आहे ऐक इंद्रा,
त्रैवर्गिकायासविघातमस्मत् ।
पतिर्विधत्ते पुरुषस्य शक्र ।।
ततोऽनुमेयो भगवत्प्रसादो ।
यो दुर्लभोऽकिंचनगोचरोऽन्यैः ।।
6.11.23 ।। श्री. भा.
खरा भगवद्भक्त आहे वृत्रासुर. तो सांगतो आहे, आमचा स्वामी भगवान! आम्ही धर्माचरण केलं, अर्थार्जन केलं, विषयसेवन केलं. धर्म, अर्थ, कामाकरता आम्ही प्रयत्न करू लागलो तर ते सर्व प्रयत्न तो निष्फळ करतो. यावरून, भगवंताचा प्रसाद आमच्यावर आहे असं आम्ही अनुमान करतो. या अर्थार्जनात, विषयसेवनातच आमची बुद्धी अडकून राहू नये अशी देवाची इच्छा आहे अशी आमची कल्पना होते. असा प्रसाद दुसऱ्याला मिळणार नाही. अकिंचन करून टाकतो ना
देव! धर्माचरण व्यवस्थित झाल्यानंतर, तोही एक अभिमान उत्पन्न होतो. मी धर्माचरण करतोय. उगीच काय देवाची माझ्यावर काही कृपा काय. म्हणजे देवापेक्षा धर्मच मोठा वाटायला लागतो. ईश्वराची आज्ञा म्हणून धर्मपालन करायचं पण प्राधान्य फलदात्याला दिलं पाहिजे. भगवंत हा मुख्य आहे. तेव्हा असा प्रसाद आमच्या स्वामीचा आमच्यावर असल्यामुळे, मला कशाचीही इच्छा नाही. आणि जे होणार आहे ते त्याच्या इच्छेने होणार आहे. भगवंताची प्रार्थना तो वृत्रासुर करतो आहे, की मला आपला दासानुदास करा. आपल्या गुणांचं अखंड स्मरण माझ्या मनामध्ये राहावं. माझ्या शरीराने आपली अखंड सेवा घडावी. वाणीनं आपलं नामस्मरण घडावं. स्वर्गाचं राज्य मला नको, कोणत्याही सिद्धी नकोत. नुकतीच जन्मलेली पक्ष्याची पिल्लं जशी आपल्या आईवडिलांची वाट पाहतात तसं मी आपल्या दर्शनाची वाट पाहतोय. आपल्या भक्तांची संगती मला नेहमी घडावी. संसारचक्रामध्ये अजून मला किती काळ फिरावं लागतंय याचा काही नियम नाही. याकरता मला आपल्या भक्तांची संगती घडावी म्हणजे माझा उद्धार होईल अशी प्रार्थना रणभूमीवरून तो वृत्रासुर करतो आहे. आपल्याला विजय मिळण्यापेक्षा आपला देह पडावा अशीच इच्छा वृत्रासुराची आहे. त्याशिवाय भगवंताच्या जवळ जाता येणार नाही. त्याचं दर्शन होणार नाही. नंतर त्याने एक भयंकर त्रिशूळ इंद्राच्या अंगावर फेकला, म्हणाला, 'इंद्रा आता तू मेलास.' इंद्र सावध होता. इंद्राने आपल्या वज्राने त्या त्रिशूलाचे तुकडे केले आणि त्या वृत्रासुराचा एक हात तोडून टाकलेला आहे. वृत्रासुराने दुसऱ्या हातात शस्त्र घेऊन इंद्राच्या हातावर टाकलं. जोराचा झटका बसला आणि इंद्राच्या हातातून ते वज्र खाली पडलं. इंद्र मोठ्या संकटात सापडला. तेव्हा तो वृत्रासुर त्याला सांगतो आहे. ""इंद्रा, हा काही विषादाचा समय नाही. ते वज्र उचलून घे. युद्ध करायची इच्छा आहे. या जय-विजयाचा निर्णय शेवटपर्यंत नाही. हे सर्वही विश्व ज्याच्या ताब्यात आहे तो परमात्माच केवळ नित्य विजयी आहे. आपण सगळे कधी विजयी होतो, कधी पराजित होतो. तू मला मारण्याकरता प्रयत्न करतो आहेस तेव्हा ते वज्र उचलून घे.'' इंद्राने ते वज्र उचलून घेतलं आणि त्या वृत्रासुराची स्तुति केलेली आहे. इंद्र म्हणाला, ""हे दानवा, तू खरोखरच श्रेष्ठ महात्मा आहेस. भगवंताचा खरा भक्त तू आहेस. सर्व जगाला मोहामध्ये टाकणारी भगवंताची माया तू जिंकलेली आहेस. रजोगुण, तमोगुण तुमचे प्रकृतिस्वभाव बनत असतात पण तुझ्या मनात केवढी भक्ती निर्माण झाली.''
शुकाचार्य सांगतात, ""राजा, दोघांचं असं संभाषण झालेलं आहे आणि युद्धाला पुन्हा सुरवात झाली. वृत्रासुराने परीघ नावाचं शस्त्र डाव्या हातामध्ये घेतलं आणि इंद्रावर टाकलं, त्यावेळी
इंद्राने तो हातही तोडून टाकलेला आहे. वृत्रासुराने मग आपलं ते महा अजस्त्र तोंड उघडलं आणि इंद्राला हत्तीसह गिळून टाकलेलं आहे! हातही नकोत आणि शस्त्रंही नकोत. सर्व देव घाबरलेले आहेत. इंद्र आता याच्या पोटात गेला म्हणजे आता आपलाही नाश होणार असं सर्व देवांना वाटू लागलं. असुराच्या पोटामध्ये जरी इंद्र गेला होता तरी त्याचं नारायण कवचाचं पठण अखंड चालू होतं त्यामुळे तो सुरक्षित होता. इंद्राने आपल्या वज्राने वृत्रासुराचं पोट फाडलं आणि तो पुन्हा बाहेर आलेला आहे. इंद्राने आपलं वज्र त्या वृत्रासुराच्या मस्तकावर टाकलं. तो असुर इतका महाभयंकर आणि अजेय होता की त्याचा शिरच्छेद करायला एक वर्ष लागलेलं आहे. सर्व देव संकटातून मुक्त झालेले आहेत. सर्वांचं समाधान झालं पण इंद्राचं समाधान झालं नाही. वृत्रासुर जन्माला आल्याबरोबर सर्व देव, ऋषि यांनी इंद्राला सांगितलं की याचा नाश करा. इंद्र त्यावेळेला म्हणाला होता, ""मी काहीही हत्या करणार नाही. आधीच एका ब्रह्महत्येच्या दोषातून आत्ताच कुठे मुक्त होतो आहे ही पुन्हा ब्रह्महत्या होईल, हा ब्राह्मणाचाच मुलगा आहे. शरीर असुराचं असलं म्हणून काय झालं.'' मग ऋषींनी सांगीतलं, ""सर्वांच्या संरक्षणाकरता तू याचा नाश कर. तुझ्याकडून अश्वमेध यज्ञ करवून आम्ही तुला ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त करू'' ऋषीच्या वचनावर विश्वास ठेवून इंद्राने वृत्रासुराला मारले. आणि ती ब्रह्महत्या त्याच्या पाठीमागे लागली. कुठेही मनाला स्वास्थ्य नाहीये. इंद्र मग सूक्ष्म रूप घेऊन एका कमलामध्ये जाऊन बसलेला आहे; आणि विचार करतोय की कसं आपण या ब्रह्महत्येतून मुक्त होऊ. त्यावेळेला आयु राजाचा मुलगा नहुष राजा जो आपल्या तपाने, ज्ञानाने, श्रेष्ठ ठरलेला आहे तो तात्कालिक इंद्रपदावर आरूढ झालेला आहे कारण खरा इंद्र तिथे नाहीये. त्याच्याही हातून ऋषीचा अपमान घडल्यामुळे, अगस्ति ऋषीच्या शापाने तो अजगर जन्माला गेलेला आहे. पांडव वनवासात असताना त्या अजगराने भीमाला धरलं. धर्मराज तिथे गेलेले आहेत आणि त्यांनी त्या अजगराच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिल्यावर त्याने भीमाला मुक्त केलं आणि तो अजगरही शापातून मुक्त झालेला आहे. ऋषींनी इंद्राकडून अश्वमेध यज्ञ करवला आणि इंद्राला ब्रह्महत्येचा दोषातून मुक्त केलेलं आहे.
परीक्षित राजाने विचारलं, ""महाराज,
रजस्तमः स्वभावस्य ब्रह्मण् वृत्रस्य पाप्मनः ।
नारायणे भगवति कथमासीत् दृढा मतिः ।।
6.14.1 ।। श्री. भा.
दैत्याचा स्वभाव हा राजस किंवा तामस असतो. अशा व्यक्तीमध्ये भगवद्भक्ती सहसा दिसत
नाही. हा वृत्रासुर असुर जातीत जन्माला आलेला आणि त्याच्या अंत:करणात इतकी ईश्वरभक्ती कशी निर्माण झाली ? देवांनासुद्धा अशी भक्ती मिळत नाही. काही मंडळी ईश्वरापण बुद्धीने कर्मानुष्ठान करत असतात. ज्ञान संपादन करायला त्यांना पुष्कळ काळ लागतो. ज्ञान मिळालं तरीसुद्धा भगवंताची भक्ती करण्याकडे प्रवृत्त होणारे फार अल्प असतात. असं असताना हा वृत्रासुर इतका हरिभक्त झाला कसा? शुकाचार्य महाराज सांगताहेत, ""राजा एक पूर्वीचा इतिहास तुला सांगतो. व्यास महर्षि, नारद महर्षि यांच्याकडून मी हे ऐकलेलं आहे. पूर्वी एक चित्रकेतू नावाचा सार्वभौम राजा होऊन गेला. मोठा राजा आहे, प्रजाजनांचं पालन उत्तम रितीने करतो आहे. सर्व समृद्धी आहे. अनेक स्त्रिया त्याला होत्या. पण एकाही स्त्रीपासून त्याला संतती झाली नाही. त्याच्या मनाला समाधान नाहिये. संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे पण राज्याला वारस नाही. एके दिवशी ब्रह्मकुमार अंगिरा ऋषि त्याच्या वाड्यामध्ये आलेले असताना, त्याने त्यांची यथासांग पूजा केली, राजाने ऋषींना विनंती केली, ""महाराज मला संतती नाही आहे. मला आपण पुत्र द्या.'' अंगिरा ऋषि राजाला उपदेश करून मुक्त करायला आले होते पण राजाची वासना मुलामध्ये होती. संसार चांगला झाला पाहिजे, संतती झाली पाहिजे अशी इच्छा आहे. म्हणून अंगिरा ऋषि थांबले. त्यांनी राजाला काही विधान सांगितलं, त्याच्याकडून यज्ञ करवला, आणि यज्ञाचा प्रसाद पत्नीला देण्यास राजाला सांगून अंगिरा ऋषि निघून गेले तो प्रसाद ग्रहण केल्यानंतर त्याची पत्नी कृतद्युति तिला गर्भधारणा झालेली आहे. नऊ महिन्यानंतर एक उत्तम मुलगा तिला झालेला आहे. आनंदातिशयाने राजाने पुष्कळ दानधर्म केला आणि त्याला एवढा एकच आनंद कमी होता तो मिळाल्यामुळे समाधान झालेलं आहे. संसारामध्ये आनंद मिळत नाही. सुखसाधनं जरी मिळाली तरी त्याचवेळी दु:खाची साधनंही अज्ञातरूपाने असतात. त्या एकट्याच स्त्रीला मुलगा झाला, बाकीच्या स्त्रियांना काही अपत्य झालं नाही. आता हिच्यावर राजाचं प्रेम बसणार या मत्सर भावनेने त्या बाकीच्या स्त्रिया त्या बालकाचा नाश करण्यास टपलेल्या आहेत. बाहेरून त्यांनी प्रेम दाखवावं, मुलाला घ्यावं, खेळवावं, त्या राणीलाही वाटावं, त्या सवती आपल्या किती प्रेम करतात, म्हणून तिनेही मुलाला त्यांच्या ताब्यात द्यावं. एकदा त्या स्त्रियांच्या मनातल्या द्वेष इतका वाढला की मुलाला दुधातून विष त्यांनी पाजलं आणि त्या निघून गेल्या. बराच वेळ झाला. मुलाने हालचाल केली नाही म्हणून त्या राणीने दासीला त्याला आणायला सांगितलं. ती दासी पाळण्याजवळ जाऊन पाहती आहे तो मुलगा गतप्राण झालेला आहे. ती दासी मूर्च्छित पडलेली आहे. ती राणी धावत धावत गेली आणि ते दृश्य पाहिल्यावर तीही मूर्च्छित पडलेली आहे. राजाला ही बातमी समजली. तोही
शोक करू लागला. ज्या स्त्रियांनी विष पाजलं होतं, त्याही रडायला लागल्या. संसारातलं प्रेम उत्तम प्रकारे दाखवता आलं की तो प्रेम करतो एवढीच समजूत आपली असते. कुणाचंही अंत:करण कुणी ओळखू शकत नाही. खरं प्रेम हे फार वेगळं आहे. तो राजा शोकाकुल होऊन पडलेला आहे. आता हा उपदेशाला पात्र झालेला आहे, याला काही सांगून याचा आता उद्धार करावा या हेतूने अंगिरा ऋषि आणि नारद ऋषि राजवाड्यात येऊन पोहोचले. त्या अत्यंत शोकग्रस्त झालेल्या राजाला नारद विचारताहेत,
कोऽयं स्यात् तव राजेन्द्र भवान् यमनुशोचति ।
त्वं चास्य कतमः सृष्टौ पुरेदानीमतः परम् ।।
6.15.2 ।। श्री. भा.
राजा ज्याच्याबद्दल तुला शोक वाटतोय तो कोण आहे तुझा ? तू याचा कोण आहेस आणि हा तुझा कोण आहे ? तुमचा संबंध पूर्वजन्मापासून आहे काय ? प्रवाहांच्या कडेने वालुकांचे खडे वाहात जातात, बाजूला होतात, पुन्हा एकत्र येतात, त्याप्रमाणे ईश्वराच्या मायाशक्तीने काही जीव एकत्र येतात. संसार करतात आणि पुन्हा त्यांच्या कर्माप्रमाणे बाजूला निघून जातात. सगळे जण, आम्ही, तुम्ही या जन्म मृत्यूमध्ये सापडलो आहोत, सर्वांना उत्पन्न करणं, पालन करणं, संहार करणं हे देवाचं कार्य सारखं चाललेलं आहे. हा माझा मुलगा आहे असं तू समजतो आहेस. हे पिता पुत्राचं नातं कसं निर्माण झालं ? पित्याच्या शरीरापासून मातेच्या शरीराच्या माध्यमातून पुत्राचं शरीर निर्माण झालेलं आहे. तुझ्या शरीरापासून देह उत्पन्न झाला त्या देहाला मुलगा म्हणावं आणि ज्याच्या शरीरापासून देह उत्पन्न झाला त्याला जनक म्हणावं हे नातं कोणी ठरवलं ? उत्तम पैकी बियाणं लावलेलं आहे. त्याच्यापासून कणीस तयार झालेलं आहे. त्यालाही पुष्कळ धान्य आलेलं आहे. मग जे जन्माला आलेलं कणीस आहे त्याला मुलगा म्हणायचं का आणि ज्याच्यापासून ते जन्माला आलं त्या पेरलेल्या धान्याला पिता म्हणायचं का ? तुझा देह जनक आहे, त्याचा देह जन्य आहे. मग माझा मुलगा, माझा मुलगा म्हणून काय दु:ख करत बसला आहेस ? तेव्हा राजा, वस्तुस्थिती काय आहे हे समजून घे आणि विचार कर. राजाचं समाधानं झालेलं आहे. तो उठून उभा राहिला हात जोडले,
कौ युवां ज्ञानसंपन्नौ महिष्ठौ च महीयसाम् ।।
6.15.10 ।। श्री. भा.
महाराज, आपण कोण आहात ? आपल्यासारखे ज्ञानसंपन्न महात्मे, माझ्यासारख्या विषयासक्त माणसाला बोध करून, त्याचा उद्धार करण्याकरता सर्वत्र संचार करत असतात. सनत्कुमार आहेत,
नारद आहेत, यापैकी आपण कोण आहात ? मला आपण बोध करा आणि माझा शोक दूर करा. अज्ञान अंध:कारात मी सापडलो आहे यातून मला वर काढा.'' अंगिरा ऋषि म्हणताहेत, ""पूर्वी एकदा मी तुला येऊन भेटलो होतो तोच अंगिरा ऋषि मी आहे. त्यावेळेलाच तुला उपदेश करायचा होता पण मुलगा पाहिजे अशी तुझी वासना होती. हा तुझा अभिनिवेश आहे. संसारामध्ये मुलगा झाला म्हणजे आपण सुखी होऊ असं तुला वाटत होतं. पण त्याचवेळी तुला सांगीतलं होतं की हा मुलगा तुला सुखही देईल आणि दु:खही देईल. हे नारद महर्षि आहेत. पुत्रशोकामुळे अज्ञानात तू सापडलेला असल्याने तुला वर काढलं पाहिजे असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही येथे आलो. सर्व नश्वर आहे, राजा. तू तरी कुठे राहणार आहेस ? हे राज्य तरी कुठे राहणार आहे ? स्वस्थ शांत चित्ताने हे आत्मस्वरूपाचं चिंतन करून, द्वैत सगळं मिथ्या आहे आणि सत्यस्वरूप परमात्मा केवळ शाश्वत आहे हे लक्षात आलं म्हणजे शांती प्राप्त होते.'' नारदांनी त्याला मंत्रदीक्षा दिलेली आहे. या मंत्रजपाने भगवान संकर्षण शेषांचं दर्शन तुला होईल आणि तू कृतार्थ होशील असं सांगितलं. त्याच्या मनातील शोक दूर करण्याकरता नारदांनी आणखी एक घटना त्याला दाखवली. त्या मुलाचं प्रेत तिथे पडलेलं होतं. तिथं नारदऋषि गेले आणि त्या जीवात्म्याला त्यांनी हाक मारली.
जीवात्मन् पश्य भद्रं ते मातरं पितरं च ते ।
सुहृदो बान्धवास्तप्ताः शुचा त्वत्कृतया भृशम् ।।
6.16.2 ।। श्री. भा.
अरे जीवात्म्या, तू या शरीरातून निघून गेल्यामुळे सगळ्या तुझ्या आप्तबांधवांना दु:ख झालेलं आहे. ये, या शरीरामध्ये राहा, पुष्कळ राज्य, संपत्ती तुझ्या वाट्याला आलेली आहे. त्याचा उपभोग घे. नारदांनी आवाहन केल्याबरोबर तो जीवात्मा त्या शरीरात आला आणि तो मुलगा उठून बसलेला आहे, जीव म्हणतोय, महाराज,
कस्मिन् जन्मन्यमी मह्यं पितरं मातरोऽभवन् ।
कर्मभिर्भ्राम्यमाणस्य देवतिर्यङ्नृयोनिषु ।।
6.16.4 ।। श्री. भा.
हे माझे माता पिता कोणत्या जन्मात होते ? किती माझे जन्म झालेले आहेत. माझ्या कर्माहूसार मी सारखा या जन्म-मृत्यू चक्रात अडकलेलो आहे. किती माता झाल्या, किती पिता झाले त्यापैकी हे कोण आहेत मला काही आठवण नाही. मी आपला सारखा फिरतो आहे. सर्वही आपले संबंधी त्या जन्मापुरते होतात आणि पुन्हा निघून जातात आपल्या कर्माने. यांचा माझा काही संबंध नाही. उदासीन मी आहे. कर्माच्या स्वाधीन झालेलो, कर्मपरतंत्र मी आहे. असं सांगून
तो जीवात्मा त्या शरीरातून निघून गेलेला आहे. त्या राजाचाही शोक कमी झाला. हा जीवात्मा म्हणतोय ते खरं आहे, उगीच मी माझा मुलगा म्हणून शोक करतोय. चित्रकेतूने त्या मुलाचं और्ध्वदेहिक केलं. बाकीच्या राण्यांनीही आपण बालहत्या केल्याचं कबूल करून त्याच्या करता प्रायश्चित्तविधी केलेला आहे. नारद महर्षि निघून गेले. चित्रकेतू राजाने विचार केला, शेवटी तरी सोडूनच जायचंय हे राज्य, अनायासे या महात्म्यांचा उपदेश झालेला आहे, आत्ताच त्याग केला पाहिजे. असं ठरवून तो राजा राज्यत्याग करून बाहेर पडला आणि कालिंदी नदीच्या तीरावर जाऊन तो तपश्चर्या करू लागलेला आहे. नारदमहर्षींच्या कृपेमुळे आणि त्यांनी दिलेल्या मंत्राच्या सामर्थ्याने सात दिवसात तो राजा विद्याधरांचा अधिपती झालेला आहे. आणि काही दिवसांनी, उपासनेमुळे तो भगवान शेषांच्या समीप प्राप्त झालेला आहे. प्रसन्न आहेत भगवान शेषनारायण. त्यांचं दर्शन झाल्यावरच सगळी कर्म संपून गेलेली आहेत. पुन्हा जन्म नाही. सर्व पापक्षय झालेला आहे. अंत:करण निर्मळ झालेलं आहे. नेत्रातून प्रेमाश्रू वाहताहेत. त्याने साष्टांग नमस्कार केलेला आहे. आणि स्तुति करतोय,
अजित जितः सममतिभिः
साधुभिर्भवान् जितात्मभिर्भवता ।
विजितास्तेऽपि च भजतां
अकामात्मतां य आत्मदोऽतिकरुणः ।।
6.16.34 ।। श्री. भा.
भगवन् आपण अजित आहात. पण समबुद्धि झालेले, इंद्रियनिग्रह केलेले, मनोनिग्रह केलेले, आपलं अखंड चिंतन करणारे असे जे साधूजन आहेत त्यांनी आपल्याला जिंकलेलं आहे. आपलं स्वातंत्र्य राहिलेलं नाही. आणि आपणही त्यांना जिंकलेलं आहे. तेही आपली इच्छा असेल तसे राहतात. त्यांच्या अंत:करणात कोणतीही वासना राहिली नाही. आपण त्यांना आत्मस्वरूप देऊन टाकलेलं आहे. अत्यंत दयाळू आपण आहात. शेष भगवान म्हणताहेत, ""हे चित्रकेतू राजा, तू सिद्ध झालेला आहेस. भक्तीमुळे तुझं अंत:करण शुद्ध झालेलं आहे. आता सर्व ठिकाणी माझी व्याप्ती कशी आहे हे तुला समजून येईल. नारदांच्या कृपेने माझ्यापर्यंत येऊन तू पोचलेला आहेस. कोणताही संकल्प जीवात्म्याने करू नये. संकल्प केला की त्याच्याकरता प्रयत्न आले, आणि कितीही प्रयत्न केले तरी शेवटी दु:खच आहे. म्हणून जितक्या इच्छा कमी कमी होतील तितकी चित्ताला शांती प्राप्त होते आहे.