सङ्कल्पात् विरमेत कविः ।।
6.16.59 ।। श्री. भा.
कोणतीही वासना मनामध्ये ठेवू नये. आपल्याला सुख मिळावं, सर्वही दु:खं आपली दूर व्हावीत म्हणून सर्व स्त्री-पुरुष प्रयत्न करताहेत. जगाचा व्यवहार हा असा आहे. पण त्यांच्या प्रयत्नानंतरही दु:खं जात नाहीत आणि पाहिजे तितकी सुखं मिळत नाहीत, हा ही विचार मनुष्याने करायला पाहिजे आणि व्यावहारिक प्रयत्न मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करावा. श्रद्धेने उपासना तू कर. ज्ञान, विज्ञान तुला प्राप्त होईल आणि तू मुक्त होशील.'' असं सांगून भगवान गुप्त झालेले आहेत. तो विद्याधरांचा अधिपती चित्रकेतू त्याला दिव्य विमान भगवंताच्या कृपेने मिळालेलं आहे, त्याच्यात बसून तो सर्वत्र संचार करतो आहे. लक्षावधी वर्ष गेली तरी सामर्थ्य कायम आहे. सर्व ऋषीमंडळी सुद्धा त्याची स्तुति करताहेत. मोठा योगी महात्मा आहे. संचार करत असताना एकदा तो कैलास पर्वतावर आलेला आहे. त्याठिकाणी महादेव बसलेले आहेत. ऋषीमंडळी आहेत. देवमंडळी आहेत. पार्वतीमाता शंकरांच्या अगदी जवळ मांडीला मांडी लावून बसलेली आहे. चित्रकेतूने विमानातून ते पाहिलं आणि तो हसायला लागला. काय म्हणाला, हे महादेव म्हणवतात, सर्वांना मार्गदर्शन करतात आणि या भर सभेमध्ये इतक्या जवळ स्त्रीला घेऊन बसतात? सामान्य लोकसुद्धा असं करणार नाहीत. भगवान शंकरांनी त्यांची ती वाणी ऐकली पण ते काही बोलले नाहीत. पूर्ण ज्ञानसंपन्न ते आहेत. त्यांना काही राग आला नाही. पार्वतीला मात्र राग आलेला आहे. ती म्हणाली, ""आम्हाला शिकवणारा हा आज कोण आला आहे? इथे बसलेल्या ऋषीमंडळींना काय कळत नाही हे? हे कोणी महादेवांची निंदा करत नाहीत आणि आज हा कोण नविन आला आहे? भगवंताचा भक्त म्हणवतो आहे आणि श्रेष्ठ महात्म्यांचा उपहास करतो आहे? तू या तुझ्या पापकर्मानुसार राक्षसजन्माला जाशील'' असा शाप पार्वतीमातेने त्याला दिलेला आहे. तो लगेच विमानातून खाली उतरला. पार्वतीच्या चरणावर त्याने मस्तक ठेवलं आणि आपल्या अपराधाची क्षमा मागितली. इतके जन्म झाले, अजून एक जन्म दैत्याचा आला तर आला असा विचार करून तो चित्रकेतू राजा न रागावता विमानामध्ये बसून निघून गेला. भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलं, ""पार्वती, हा केवढा मोठा आहे तुला माहिती नाही? तुला राग यायचं काय कारण होतं? तो मला बोलला होता. तुला राग येण्याचं आणि शाप देण्याचं काय कारण आहे? असं करत जाऊ नकोस. एवढ्या मोठ्या भगवद्भक्ताला तू शाप दिलास! भगवंताने याची क्षमा करावी अशी प्रार्थना आहे.'' अविवेक उपयोगी नाही, वासुदेवाची भक्ती करणारे जे आहेत ते कुणालाही बोलू शकतात. त्यांना कुणाचीही भीती वाटत नाही. ते निर्भय असतात.
तेव्हा असा तू विचार कर आणि अशा महात्म्यांबद्दल मनामध्ये राग येऊ नये असा प्रयत्न कर.'' तो चित्रकेतू पार्वतीलाही शाप द्यायला समर्थ होता परंतु त्याने राग आवरलेला आहे. शुक सांगताहेत, ""हे परीक्षित राजा, तो विद्याधर चित्रकेतू राजा पार्वतीच्या शापाने दक्षिणानीतून उत्पन्न होऊन दानव झालेला आहे. वृत्रासुर नावाने तो ओळखला गेला. महान भगवद्भक्त असल्यामुळे असुर योनी प्राप्त होऊन सुद्धा त्याचं ज्ञान, भक्ती हे कायम राहिलेलं आहे. महान विष्णुभक्तांचही माहात्म्य याच्यावरून कळून येतं. श्रद्धेने याचं श्रवण करणारा जो आहे तो सर्व पातकांपासून मुक्त होतो. अशा रितीने हे सर्व चरित्र शुकाचार्य महाराजांनी परीक्षित राजाला कथित केलेलं आहे.
कश्यपांची पत्नी दिती ही एकदा विशेष हेतूने कश्यपांची सेवा करू लागली. आपल्याला पतीपासून वर प्राप्त व्हावा अशी तिची इच्छा होती. अन्न नाही, पाणी नाही अशा अवस्थेत ती तप करत असताना कश्यप प्रसन्न झाले आणि वर माग म्हणून सांगीतलं. तिने "इंद्राला मारणारा मुलगा मला व्हावा' असा वर मागीतला. आता हे मोठं धर्मसंकट आलं. इंद्रही कश्यपांचाच मुलगा. आता काय करायचं? त्यांनी दितीला सांगीतलं, तुझी इच्छा पूर्ण होईल. पण त्याकरता मी सांगतो ते व्रत तुला एक वर्षापर्यंत करावं लागेल. सर्व कामना पूर्ण करणारं हे व्रत आहे. लक्ष्मीनारायणाची सेवा तुला वर्षभर करावी लागेल. सर्व नियम पाळून जर तू हे व्रत केलंस तर तुला तुझ्या इच्छेप्रमाणे मुलगा होईल. त्याच्यामध्ये काही न्यूनता आली, काही चुकलं तर तो मुलगा देवांचा बंधू होईल, हे ही सांगून ठेवतो. दितीने कश्यपांच्या सांगण्याप्रमाणे व्रताचरण सुरू केलं. इंद्राला ही बातमी समजली. आपली मावशी आपला जीव घेणार आहे. इंद्र वेषांतर करून सेवक म्हणून त्या आश्रमात येऊन राहिला. सगळी कामं तो करतोय. एके दिवशी सायंकाळच्या वेळेला ती दिती दमून झोपलेली होती. कश्यपांनी सांगीतलं होतं, सायंकाळी निजायचं नाही. इंद्राने आपल्या योगसामर्थ्याने तिच्या उदरामध्ये प्रवेश केला आणि त्या गर्भाचे सात तुकडे केले. पण त्या गर्भाला मृत्यू आला नाही. पुन्हा इंद्राने आपल्या वज्राने त्या सात तुकड्यांचे प्रत्येकी सात तुकडे केले. असे ते एकंदर एकोणपन्नास मरुद्गण त्यावेळी जन्माला आलेले आहेत. दितीही जागी झाली. ती विचार करतीये, ही इतकी मुलं कशी झाली. तो इंद्रही आपल्या खऱ्या स्वरूपात तिथे प्रगट झाली. तिने इंद्रालाच खरं खोटं काय ते विचारलं. इंद्राने सांगीतलं, ""मला माझ्या प्राणाची भीती असल्यामुळे मी येथे सेवक म्हणून येऊन राहिलो आणि आज तुमच्या हातून व्रताचा नियमभंग झाल्यामुळे मीच त्यांचे एकोणपन्नास तुकडे केले. परंतु तुमच्या पुण्याईमुळे या जीवांना मृत्यू आला नाही.'' दितीने सांगीतलं, ""हे तुझे बंधूच आहेत आता. यांना आता स्वर्गलोकाला तू घेऊन जा.'' त्याप्रमाणे इंद्र...
त्या मरुद्गणांना घेऊन स्वर्गलोकाला निघून गेला. इच्छा जरी झाली तरी ती इच्छा सात्विक पाहिजे. सात्विक वासना पाहिजे. वस्तुतः सात्विक वासनाही जायला पाहिजे शेवटी, पण निदान सुरवातीला सात्विक वासनेमुळे राजस, तामस वासना कमी होऊ शकतात.
परीक्षित राजा विचारतोय शुकाचार्यांना, ""महाराज, भगवान श्रीहरी हे पक्षपाती दिसताहेत, इंद्रादिक देवांचा पक्ष घ्यायचा आणि अवतार घेऊन दैत्यांना मारायचं हे सामान्य माणसासारखंच झालं!
समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः ।।
9.29 ।। भगवद्गीता
सांगताहेत एक आणि वागताहेत एक. मला शत्रू, मित्र कुणी नाही म्हणतात आणि देवांचं संरक्षण करण्याकरता दैत्यांना मारतात हे काय आहे? नारायणाच्या गुणाबद्दल मला संशय उत्पन्न झाला आहे! ही विषम बुद्धी ईश्वराची कशी झाली?'' शुकाचार्य सांगताहेत, ""परमात्मा हा सम आहे. सर्वत्र समबुद्धी आहे हे कळण्याकरता एक पूर्वीचा इतिहास तुला सांगतो. धर्मराजाच्या राजसूय यज्ञात, शिशुपालाने श्रीकृष्णांची निर्भर्त्सना केल्यावर, श्रीकृष्णांनी त्याचा शिरच्छेद केला. त्याच्या शरीरातून तेज बाहेर पडून ते कृष्णशरीरामध्ये विलीन होऊन गेले. हे पाहून धर्मराजाला आश्चर्य वाटलं. त्याने नारदांना विचारलं, ""नारदमहर्षि, हा शिशुपाल नभघोषाचा मुलगा, जन्माला आल्यापासून कृष्णांचा द्वेष करतो आहे. शिशुपाल आणि दंतवक्र दोघेही कृष्णाचा द्वेष करत. असं असताना निरंतर ईश्वरनिंदा करणारा हा पापी मनुष्य खरं म्हणजे नरकाला जायला पाहिजे. पण नरक राहिला बाजूला, याला तर श्रीकृष्णांची सायुज्यमुक्ती मिळाली, कृष्णरूप हा होऊन गेला, हे कसं काय? पाप आणि पुण्याची काही कल्पनाच करता येत नाही. नारद सांगताहेत, ""
निंदास्तवसत्कारन्यक्कारार्थं कलेवरम् ।
प्रधानपरयो राजन् अविवेकेन कल्पितम् ।।
7.1.22 ।। श्री. भा.
हे शरीर जे आहे, ह्या शरीरात आलेला जीवात्मा कुणाचा शत्रू होतो, मित्र होतो. मान, अपमान सगळं ह्या शरीराच्या माध्यमामे होतं. प्रधान आणि परमात्मा यांचा अविवेक झाल्यामुळे हे शरीर निर्माण झालेलं आहे. आणि या शरीरात आल्यानंतर पाप घडतं, पुण्य घडतं हे कार्य चाललेलं आहे. म्हणून मानव शरीर मिळाल्यानंतर भगवंताची भक्ती करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. निवृत्त अंत:करण झालं पाहिजे. प्रेम निर्माण झालं पाहिजे. भक्तियोग हा श्रेष्ठ आहे पण...
या शिशुपालाच्या उदाहरणावरून असं दिसतंय की ईश्वराचं वैर करणारा सुद्धा मुक्त होतो. द्वेषामुळे त्याच्या मनामध्ये सतत परमेश्वर आहे. त्यामुळे हा शिशुपाल मुक्त झालेला आहे. द्वेषामुळे त्याचं अंत:करण कृष्णाशी तन्मय झालेलं आहे. शिशुपाल आणि दंतवक्र, मामेभाऊच होते कृष्णांचे, पूर्वजन्मात मोठे विष्णुभक्त होते, ब्राह्मणांच्या शापाने या जन्मात आल्यानंतर भगवंताने त्यांना मुक्त केलेलं आहे. भक्तांचा उद्धारच भगवंताने केलेला आहे, त्यांचा नाश करून. धर्मराजाने विष्णुभक्तांना शाप कसा झाला, ते कसे जन्माला आले हे सर्व आम्हाला सांगा असं विचारल्यावर नारद ही कथा सांगताहेत. एकदा विष्णुलोकामध्ये, ब्रह्मदेवांचे मानसपुत्र सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार हे श्रीविष्णूंच्या दर्शनाकरता आले. पाच सहा वर्षाचच वय आहे त्यांचं पण ज्ञानी आहेत. ते आले दरवाजामधे, तिथे जय-विजय होते द्वारपाल. त्यांनी ब्रह्मपुत्रांना आत जायला प्रतिबंध केला. ब्रह्मकुमारही रागावले, त्यांनी सांगीतलं, ""तुम्ही विष्णुलोकात राहायला अपात्र आहात. रजोगुण, तमोगुणाचं इथं काही काम नाही. शुद्ध सत्वात्मक वैकुंठलोक आहे आणि तुमच्या मनात मात्र उच्चनीच भेदभाव आहे. तेव्हा तीन जन्म तुम्ही असुरयोनीत घ्याल.'' असा शाप त्यांनी दिलेला आहे. तीन जन्मानंतर तुम्ही परत याल असा उ:शाप दिलेला आहे. ते दोघे पहिल्यांदा दितीच्या गर्भातून जन्माला आले. हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष नावाने, हिरण्यकश्यपूचा नाश नृसिंह अवतार धारण करून भगवंताने केला आणि पृथ्वीचा उद्धार करण्याच्या वेळेला वराहरूपाने हिरण्याक्षाचा नाश केला. ते दोघे दुसऱ्या जन्मात रावण आणि कुंभकर्ण झालेले आहेत. भगवान रामचंद्रांनी त्यांचा नाश केलेला आहे. तिसऱ्या जन्मात ते शिशुपाल आणि दंतवक्राच्या रूपाने जन्माला आले आणि भगवान श्रीकृष्णांच्याकडून उद्धार होऊन आता ते शापातून मुक्त झालेले आहेत आणि जय-विजय म्हणून वैकुंठलोकाला प्राप्त झालेले आहेत.
धर्मराज विचारताहेत, ""नारद ऋषे, हिरण्यकश्यपूने आपल्या मुलाचा द्वेष केला याला काय कारण आहे?'' पित्याने मुलाचा द्वेष केला असं आत्तापर्यंत आम्ही ऐकलं नाही. फार तर प्रतिकूल वागणाऱ्या मुलाला काही शासन करावं इथपर्यंत ठीक आहे. पण आपल्या मुलाला मारायचा प्रयत्न त्याने केला याला काय कारण आहे?'' नारद सांगतात, ""वराहअवतार घेऊन हिरण्याक्षाचा नाश भगवंताने केला. हिरण्यकश्यपू रागावलेला आहे. हरीने माझ्या भावाला मारलं, या हरीला मारलं पाहिजे. त्याच्या मनामध्ये हरीबद्दल वैरभाव निर्माण झाला. हरीस्वरूप त्याला माहिती नाहिये. हिरण्यकश्यपूने राक्षसांना सांगीतलं, "हे सर्व ऋषि ईश्वरार्पण बुद्धीने आपलं कर्मानुष्ठान करताहेत. आपलं सर्व कर्मफळ हे ईश्वराला अर्पण करत असल्यामुळे हा हरी बलवान...
झालेला आहे तेव्हा तुम्ही पृथ्वीवर जाऊन सगळ्या ऋषींचं हे कर्म बंद पाडा. आश्रमांचा, यज्ञशाळांचा विध्वंस करा,' सर्व दैत्य त्या आज्ञेप्रमाणे सर्व सज्जनांना त्रास देऊ लागले. त्यानंतर हिरण्यकश्यपूने आपल्या मातेचं, हिरण्याक्षाच्या पत्नीचं, मुलांचं सांत्वन केलेलं आहे आणि तो तपश्चर्येसाठी बाहेर पडला.
अजरामरम् आत्मानं अप्रतिद्वन्द्वं एकराजं व्यधित्सत ।।
7.3.1 ।। श्री. भा.
आपण अजरामर व्हावं, अजिंक्य व्हावं आणि सर्वांचं स्वामी व्हावं ही इच्छा धरून तो तपश्चर्येला गेलेला आहे. मंदार पर्वतावर गुहेमधे त्याची तपश्चर्या चाललेली आहे. वर हात केलेले आहेत, दृष्टी आकाशाकडे केलेली आहे आणि पायाच्या अंगठ्यावर उभा राहून तो तप करतोय. पुष्कळ काल गेलेला आहे. जटा वाढलेल्या आहेत. त्याच्या मस्तकातून अग्नी बाहेर पडलेला आहे. देवांना अत्यंत त्रास होऊ लागला. ते सर्व ब्रह्मदेवांकडे गेले आणि त्यांना विनंती केली की हिरण्यकश्यपूला काय वर पाहिजे तो द्या पण आम्हाला या संकटातून सोडवा, आम्हाला त्याच्या तपाचं तेज काही सहन होत नाही. देव सांगताहेत, आम्ही असं ऐकलंय की, ज्या ब्रह्मदेवांनी आपल्या तपाने सर्वोच्च स्थान मिळवलं आणि सर्व सृष्टी निर्माण केली त्या सृष्टीतले सगळे नियम बदलून टाकायचे असा संकल्प हिरण्यकश्यपूने केलेला आहे. ब्रह्मदेवांनी ज्यांना देव केलेलं आहे त्यांना दैत्य करायचं आणि ज्यांना दैत्य केलेलं आहे त्यांना देव करायचं. असा त्याचा संकल्प आहे. तुम्हाला सुद्धा भीती आहे, तेव्हा लवकर त्याचं तप बंद करा. ब्रह्मदेव आले हिरण्यकश्यपूजवळ. शरीराभोवती वारूळ वाढलेलं आहे. रक्त, मांस आटून गेलेलं आहे. मोठी तपश्चर्या आहे. ब्रह्मदेवांचंही समाधान झालं. त्यांनी कमंडलूतील पाणी त्याच्या अंगावर टाकताच त्याला दिव्य शरीर प्राप्त झालेलं आहे. हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवांची स्तुति केली आणि काय पाहिजे, वर माग अस विचारल्यावर तो सांगतो आहे, ""आपण ज्या ज्या जीवाना उत्पन्न केलेलं आहे त्या कोणत्याही भूतापासून मला मृत्यू येऊ नये.'' अजून त्यात सुधारणा करतोय. आपली बुद्धी जास्ती जास्ती चालवली की असा घोटाळा होतो. घराच्या आत मृत्यू येऊ नये, घराच्या बाहेर मृत्यू येऊ नये. म्हणजे उंबऱ्यावर मारलं तरी चालतंय हे त्यानेच कबूल केल्यासारखं झालं. दिवसा मृत्यू येऊ नये, रात्री मृत्यू येऊ नये, संध्याकाळी त्याचा नाश झालेला आहे. भूमीवर मृत्यू येऊ नये, अंतराळात येऊ नये. माणसापासून येऊ नये, पशूपासून येऊ नये. युद्धामध्ये मी अजिंक्य व्हावं, सर्वांवर माझं स्वामित्व असावं. सर्व इंद्रादिक लोकपालांचं सामर्थ्य मला प्राप्त व्हावं. असे वर त्याने मागीतले, अत्यंत दुर्लभ परंतु त्याने तपश्चर्याच तशी केली होती. ब्रह्मदेवांनी सांगीतलं, तुझी इच्छा पूर्ण होईल आणि ते अंतर्धान...
पावले.
हिरण्यकश्यपूने श्रीहरीचा द्वेष करायला आरंभ केला. सर्व त्रैलोक्य जिंकलं त्याने, स्वर्गातून देवांना घालवून दिलं आणि स्वर्ग लोकात राहून तो राज्य करू लागला. महेंद्रभवनात जाऊन राहिलेला आहे. स्वर्गलोकात, मृत्युलोकात सगळीकडे अनेक दैत्य त्याच्या हाताखाली आहेत. सर्व देवांनी, ऋषींनी त्याची प्रार्थना करावी, त्याच्या मनाप्रमाणे वागावं असा काळ आलेला आहे. धनधान्याची समृद्धी आहे, काही कमी नाही. समुद्राने अनेक रत्नं त्याला अर्पण केली. असं त्याचं राज्य चाललेलं आहे पण कडक शासन आहे. इंद्रादिक लोकपाल भीतीने बाहेर पडलेले आहेत आणि संकटग्रस्त झाल्यामुळे ते श्रीहरींना शरण गेले. अन्नपाणी सोडून देऊन ते ध्यान करताहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून भगवान त्यांना सांगताहेत, ""भिऊ नका देवहो. तुमचं कल्याण होईल. लवकरच त्या हिरण्यकश्यपूचा मी नाश करणार आहे. तोपर्यंत वाट पाहा. वेदांचा, देवांचा, गाईंचा, विप्रांचा, धर्माचा, सत्पुरुषांचा जो द्वेष करतो त्याचा नाश लवकर होतो. त्याचा मुलगा प्रल्हाद हा निर्वैर आहे. शांत आहे. मोठा भक्त आहे माझा. ज्यावेळेला हिरण्यकश्यपू प्रल्हादाचा द्वेष करायला लागेल त्यावेळी ब्रह्मदेवांनी कितीही वर याला दिले असले तरी मी याचा नाश करीन.''
दैत्यराज हिरण्यकश्यपूला चार मुलं होती. प्रल्हाद हा सगळ्यात लहान पण गुणांनी मोठा होता. त्याची सत्यप्रतिज्ञा आहे. कधीही खोटं बोलायचं नाही. इंद्रिय ताब्यामध्ये आहेत. अत्यंत नम्रपणाने श्रेष्ठ, गुरुजनांपाशी वागतो आहे. सर्वांशी प्रेमाने वागतो आहे. त्याच्या अंत:करणामध्ये हरिभक्ती ही जन्मापासूनच आहे. कोणत्याही अवस्थेत, केव्हाही भगवंताचं स्मरण आहे. जेवायला बसलं असताना भगवंताचं स्मरण झालं की जेवण बंद होतंय. भावावस्थेमध्ये रडतो आहे, हसतो आहे, देहभान त्याला राहात नाहिये. अशा मुलाबद्दल त्या हिरण्यकश्यपूच्या मनामध्ये वैर निर्माण झालं. नारद सांगताहेत,
पौरोहित्याय भगवान् वृतः काव्यः किलासुरैः ।।
7.5.1 ।। श्री. भा.
दैत्यांचे गुरू म्हणजे शुक्राचार्य. त्यांची मुलं म्हणजे शंड आणि अमर्क. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला त्यांच्या स्वाधीन केलं आणि त्याला सगळं शिकवायला सांगितलं. आणखीही पुष्कळ दैत्यांची मुलं त्यांच्याजवळ शिकण्याकरता राहिली होती. पण प्रल्हादाला काही त्या गुरूंनी शिकवलेलं पटेना ! त्यांनी सांगावं, तुम्ही दैत्य आहात, देव आपले शत्रू आहेत वगैरे पण प्रल्हादाला ते काही पटलं नाही. एकदा ते गुरु प्रल्हादाला घेऊन राजवाड्यामध्ये आले. हिरण्यकश्यपू सिंहासनावर...
बसलेला होता. प्रल्हादाने आल्याबरोबर आपल्या पित्याला साष्टांग नमस्कार केला. त्याला उचलून हिरण्यकश्यपूने आपल्या मांडीवर घेतलं, आणि विचारलं, ""बाळ प्रल्हादा, तुला काय करावसं वाटतं ? तुझ्या मनाने अत्यंत योग्य असं तू काय ठरवलं आहेस ?'' लगेच प्रल्हादजी म्हणाले,
तत् साधु मन्ये असुरवर्य देहिनां
सदा समुद्विग्नधियां असद्ग्रहात् ।
हित्वात्मपातं गृहमन्धकूपं
वनं गतो यद्धरिमाश्रयेत ।।
7.5.5 ।। श्री. भा.
""राजोजसाहे, रागावू नका, पण माझ्या मनाने अत्यंत योग्य म्हणजे हरिभक्ती करावी. घरदार सोडून वनामध्ये जावं. हेच उत्तम आहे असं मला वाटतं. कारण घरात राहणारे हे सगळे संसारी जीव नेहमी उद्विग्न असतात. त्यांच्या मनाचं पूर्ण समाधान झालेलं कधीही दिसत नाही. या असत्य, मिथ्या अशा प्रकारच्या विषयांमध्ये त्यांची बुद्धी गुंतून राहिलेली आहे. त्यांच्या मनाप्रमाणे सगळं त्यांना काही मिळत नाही आणि म्हणून ते नेहेमी दु:खी असतात. त्यामुळे हे सर्व सोडून देऊन, वनामध्ये जाऊन भगवान श्रीहरीची भक्ती करावी हे मला उत्तम वाटतं. हे माझं ध्येय आहे.'' पहिलीच भेट झाली प्रल्हादाची आणि तो म्हणतोय हरीची भक्ती करावी ?'' हिरण्यकश्यपू हसला. लहान मुलगा आहे म्हणाला. गुरूजींना सांगीतलं, ""गुरूजी तुम्ही लक्ष द्या बरं ! सगळी दैत्यांची मुलं तुमच्या ताब्यात आहेत. त्यांच्या मनात हे असले विचार उत्पन्न होऊ नयेत इकडे तुमचं लक्ष पाहिजे.'' गुरूजी प्रल्हादाला घेऊन घरी आले. त्याला विचारताहेत, ""का रे प्रल्हादा, हरीची भक्ती करावी असं तुला कोणी सांगीतलं ? दैत्यकुलामध्ये जन्माला येऊन अशी बुद्धी तुला कशी झाली? हा तुझा बुद्धिभेद कोणी मुद्दामून येऊन केला आहे का तुला स्वतःलाच असं वाटतं ?'' प्रल्हादजी म्हणाले, ""गुरूजी, हा माझा आणि हा शत्रूपक्षाचा हे माझ्या मनामध्ये कधीही येत नाही. भगवंताच्या मायेचा हा प्रभाव आहे. भगवंताकडे ज्याचं लक्ष लागलं त्याच्या मनामध्ये हा भेद येत नाही. सर्वांचा आत्मा परमात्मा आहे. ब्रह्मादिक देवसुद्धा त्याच्या आज्ञेचंच पालन करताहेत, तो सर्वान्तर्यामि भगवान श्रीहरी माझा बुद्धिभेद करतो आहे. माझं अंत:करण त्याच्याकडे त्याच्या इच्छेने जातंय. माझ्या प्रयत्नानेही जात नाही किंवा दुसरा कोणीही मला सांगत नाही.'' असं उत्तर त्यानी दिलेलं आहे. पूर्ण ज्ञान आहे आणि भक्ती आहे. ज्ञानी भक्त आहे प्रल्हाद. ध्रुवही मोठाच आहे पण त्याच्या मनात ती वासना होती, अढळ पदाची त्यामुळे नंतर पश्चाताप होऊनही त्याला त्या ध्रुवपदावर जाऊन राहावं लागलं. प्रल्हादजी जन्मापासूनच ज्ञानी भक्त आहेत, निष्काम आहेत.
गुरूजींनी त्याला धाक दाखवण्याकरता इतर शिष्यांना सांगीतलं, ""कोण आहे रे तिकडे, ती छडी घेऊन या. आज याला शिक्षा करायची आहे. दैत्यांच्या चंदनासारख्या वंशात जन्माला येऊन हा कुळाच्या विरुद्ध बोलतो आहे ?'' रागावले, त्याला थोडी भीती दाखवली आणि पूर्वीप्रमाणे त्याला शिक्षण देण्याचं काम सुरू केलं. धर्म, अर्थ आणि काम. तीन पुरुषार्थच फक्त दैत्यांच्या समोर आहेत. मोक्षमार्गाचा विचारच नाहिये. कारण सगळं खरंय, जग सत्य आहे. आपण प्रयत्न करायचा आणि आपण सुख मिळवायचं. दु:ख सुद्धा आपल्या प्रयत्नांनी दूर करायची एवढंच त्यांना माहिती आहे. सुख विनाशी आहे. असेना. पुन्हा प्रयत्न केला की पुन्हा मिळवू शकतो आम्ही. देवांना पुन्हा जिंकायचं, पुन्हा स्वर्ग मिळवायचा. याचा त्यांना कंटाळा येत नाही.
पुन्हा एके दिवशी गुरूजी प्रल्हादाला घेऊन राजवाड्यामध्ये आले. आल्याबरोबर त्याने पित्याला साष्टांग नमस्कार केला. मातृदेवो भव, पितृदेवो भव हे सगळं त्यांच्या लक्षात आहे. हिरण्यकश्यपूने उचलून त्याला मांडीवर घेतलं आणि विचारलं, ""इतके दिवस तू गुरूजींकडे शिक्षण घेतलंस. तुझं उत्तम शिक्षण आजपर्यंत कुठलं झालं हे मला सांग.'' प्रल्हादजींना काही भीती नाही. ते म्हणाले, ""राजेसाहेब,
श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् ।
अर्चनं वन्दनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनम् ।।
7.5.23 ।। श्री. भा.
इति पुंसार्पिता विष्णौ भक्तिश्चेन्नवल्लक्षणा ।
क्रियते भगवत्यद्धा तन्मन्ये अधीतमुत्तमम् ।।
7.5.24 ।। श्री. भा.
कोणता अभ्यास उत्तम आहे, सांगू पिताजी ! भगवान विष्णूंची नवविधा भक्ती करता आली पाहिजे. नऊही प्रकारची भक्ती करण्याकडे ज्यांचं लक्ष लागलेलं आहे ते मोठे भक्त आहेत. आणि ती सुद्धा ईश्वरार्पण बुद्धीने झाली पाहिजे. बुद्धीला प्रेरणा करणारा श्रीहरी आहे आणि त्याच्या इच्छेप्रमाणे माझ्याकडून ही भक्ती घडते आहे. जन्माला येऊन हे एवढंच शिकायचं आहे, तेवढंच मी शिकलो पिताजी.'' हिरण्यकश्यपू अतिशय रागावलेला आहे. माझ्या भावाला मारणारा, माझा शत्रू हरी आणि त्याची भक्ती माझा मुलगा करतोय ! तो त्या गुरूजींवर रागावला, ""का हो गुरूजी, हे काय माझ्या मुलाला शिकवलं तुम्ही ? तुम्हाला पूर्वी एकदा ताकीद केली होती. शत्रूपक्षाचे हेर याठिकाणी येत असतील. तुमचं लक्ष नाहिये. या मुलाची बुद्धी बिघडलेली आहे.'' त्या गुरुपुत्रांनी सांगीतलं, ""राजेसाहेब, रागावू नका, मी यांना काय शिकवणार ? तुम्ही बाकीच्या
मुलांना विचारा. त्याप्रमाणे यालाही मी शिकवलं. ही जी भगवद्भक्ती करावी अशी त्याची बुद्धी आहे ती नैसर्गिक आहे. जन्मापासून आहे.'' हिरण्यकश्यपूने मग प्रल्हादाला विचारलं,
वद्यतां आसुरं वद्यः ।।
7.5.34 ।। श्री. भा.
""हे तुला गुरूजींनी शिकवलं नाही ना ? मग ही तुला ईश्वराची भक्ती करायची अमंगल बुद्धी आली कुठून ?'' प्रल्हादजी म्हणाले, ""राजेसाहेब, भगवंताची भक्ती स्वतःच्या इच्छेने होत नाही किंवा दुसऱ्याच्या सांगण्यानेही होत नाही. घरामध्ये, इंद्रियांमध्ये, विषयांमध्ये ज्यांचं चित्त अडकलेलं आहे. मनावर, इंद्रियावर ज्यांचा ताबा नाही पुन:पुन्हा तेच विषय भोगायचे, पुन्हा तेच सुख घ्यायचं इकडे ज्यांचं लक्ष आहे त्यांची बुद्धी कृष्णभक्तीकडे जात नाही खरा स्वार्थही त्यांना समजत नाही. ईश्वराची भक्ती केल्यानंतर किती स्वार्थ सिद्ध होतो हे त्यांना समजत नाही. बाह्य विषयांकडेच त्यांचं लक्ष जातं. एका आंधळ्याच्या मागून त्याच्या खांद्यावर हात ठेवून दुसरा आंधळा निघाला, तिसरा आंधळा निघाला तशी स्थिती या सर्व जगाची झालेली आहे. परमेश्वराची सेवा करण्याची बुद्धी त्यांना कधीही उत्पन्न होणार नाही. श्रेष्ठ भगवद्भक्तांची संगती झाली, त्यांचा अनुग्रह झाला तरच भगवद्भक्ती चित्तामध्ये उत्पन्न होते.'' अतिशय रागावला हिरण्यकश्यपू आणि त्याने प्रल्हादाला समोरच्या चौकात फेकून दिलेलं आहे. राक्षसांना आज्ञा केली,
वद्यतां आशु अयं वद्यः ।।
7.5.34 ।। श्री. भा.
राक्षसहो, याला ठार मारा. माझ्या बंधूचा ज्याने नाश केला, आपल्या चुलत्याला ज्याने मारलं त्याची भक्ती हा करतोय ! हा आमच्या विरुद्ध वागणारा आमचा नाहिये. केवढा अहंकार आहे ! पुत्रप्रेम आहे पण तीव्र अहंकाराने व्याप्त झाल्यामुळे मुलाचं प्रेम निघून गेलेलं आहे. पाच वर्षाचं हे कार्ट, आमच्या प्रेमाची जर याला कदर नाही तर आम्हालाही याची जरूर नाही, याला मारून टाका म्हणाला. वाटेल ते उपाय करा. ते सर्व राक्षसचं आहेत. दया वगैरे काही त्यांच्याजवळ नाहिये. त्रिशूळ, खड्ग, वगैरे शस्त्रं आहेत आणि आता स्वामीची आज्ञा झालेली आहे. ते दैत्य धावत आले आणि त्यांनी प्रल्हादाच्या अंगावर तलवारीने गदेने, त्रिशूलाने, भाल्यांनी प्रहार करायला सुरवात केली.
परे ब्रह्मणि अनिर्देश्ये भगवति अखिल आत्मनि ।
युक्तात्मनि अफला आसन् अपुण्यस्येव सत्क्रियाः ।।
7.5.41 ।। श्री. भा.
प्रल्हादजींचं परमात्मस्मरण अखंड चाललेलं आहे. मृत्यूची भीती नाही मग हिरण्यकश्यपूची कसली भीती ? इतके शस्त्रप्रहार होऊन केसालाही धक्का लागला नाही. शेवटी दैत्य दमले परंतु प्रल्हादाचा नाश झाला नाही. प्रल्हादजी उठून बसलेले आहेत. ईश्वराचं अखंड नामस्मरण चाललेलं आहे.
[Image: pralh-vishnu.jpg - प्रल्हाद विष्णु स्मरण]
त्रैलोक्यधिपती असलेला दैत्यराज, कुणीही त्याची आज्ञा आजपर्यंत उल्लंघिली नाही त्याला आपण शस्त्रप्रहाराने प्रल्हादाचा नाश करू शकू असं वाटत होतं. पण प्रल्हादावर काहीही परिणाम झालेला नाही. आपल्या शक्तीपेक्षा मोठी शक्ती कुठली आहे काय ? अशी थोडीशी जाणीव त्याच्या मनामध्ये झाली. पण ती टिकली नाही. श्रीमंत, अहंकारी पुरुषांना सद्बुद्धि होते पण ती टिकत नाही. लगेच त्या गुरुपुत्रांनी येऊन सांगीतलं, ""राजेसाहेब, चिंता कशाला करता आपण. सगळं त्रैलोक्य आपण जिंकलेलं आहे. हा लहान बालक काय करणार आहे ? शुक्राचार्य महाराज थोड्याच दिवसात येतील ते आले की आपण पुढील उपाययोजना करू. ह्याला वरुणपाशामध्ये बांधून ठेवा. हिरण्यकश्यपूने सांगीतलं, ""ह्याला तुमच्याच वाड्यामध्ये घेऊन चला. माझ्या डोळ्यासमोर नको हा. काहीतरी पाहा उपदेश करून. याची बुद्धी बदला.'' प्रल्हादजी नम्र आहेत. पित्यावरही रागावले नाहीत आणि गुरूजींवरही रागावले नाहीत. पण त्यांचं शिक्षण मात्र पसंत नाही. ईश्वरभक्तीकडे यांचं लक्ष नाही हे पाहून त्यांना विषाद वाटायचा. एके दिवशी गुरूजी काही कामाकरता बाहेर गेले असताना, सर्व मुले खेळण्याकरता बाहेर पडली. प्रल्हादजींच्या मनामध्ये दया उत्पन्न झाली. किती जन्म घेताहेत म्हणाले आणि पुन्हा खेळण्याकडे लक्ष आहे ? त्यांना काहीतरी मार्गदर्शन करावं, त्यांचा उद्धार व्हावा या हेतूने प्रल्हादजी सांगताहेत, ""मित्रहो माझ्याजवळ येऊन बसा. तुम्हाला काही सांगायचंय.'' सगळ्या मुलांना प्रल्हादजींबद्दल शस्त्रप्रहाराचा काहीही परिणाम झाला नाही हे पाहून भीतीने का होईना आदर उत्पन्न झाला. सर्व मुलं येऊन बसली आणि प्रल्हादजी त्यांना उपदेश करताहेत, हरिभक्तीचं माहात्म्य त्यांना सांगीतलं, आत्मानात्मविवेक सांगितला आणि हरिभक्ती तुम्ही करा असं त्यांनी सांगीतलं. नंतर करायची ही गोष्ट नाही.
कौमार आचरेत् प्राज्ञो धर्मान् भागवतान् इह ।
दुर्लभं मानुषं जन्म तदपि अध्रुवमर्थदम् ।।
7.6.1 ।। श्री. भा.