हा मनुष्यजन्म अत्यंत दुर्लभ आहे. तुम्ही असावध राहू नका. हे शरीर केव्हा पडेल सांगता येत नाही परंतु परमपुरुषार्थ मोक्ष देण्याचं सामर्थ्य या शरीरामध्ये आहे.
मी मातेच्या उदरामध्ये होतो. इंद्र माझ्या मातेला स्वर्ग लोकाला घेऊन जाऊ लागला. ती घाबरली. तेवढ्यात नारद महर्षि तिथे आले आणि त्यांनी इंद्राला विचारलं, ""का रे, हिरण्यकश्यपू तुमचा शत्रू आहे. या स्त्रीने तुझं काय केलं आहे ? हिला कशाला धरलंयस. हिला सोडून दे.'' इंद्राने सांगीतलं, ""ऋषीमहाराज, ही गर्भिणी आहे. हिच्या उदरामध्ये दैत्यांचा गर्भ आहे. ही प्रसूत होईस्तव मी हिला स्वर्गलोकात ठेवणार आहे आणि प्रसूत झाल्यावर त्या अपत्याला मारून मग हिला सोडणार आहे.'' देवांचा राजा इंद्र त्याचे हे विचार आहेत. कुणीही असला तरी स्वार्थापुढे काहीही सुचत नाही. सद्विचार कोणाच्या मनात येतील, दुर्विचार कोणाच्या मनात येतील काही सांगता येत नाही. नारद म्हणाले, ""इंद्रा, हा कोण आहे तुला माहिती आहे का ? अत्यंत पुण्यशील असा भगवंताचा भक्त आहे हा. याचा तू नाश करू शकणार नाहीस. सोडून दे या स्त्रीला.'' देवर्षींची आज्ञा झाली. माझ्या मातेला सोडून दिलं इंद्राने आणि नारदांना प्रदक्षिणा, नमस्कार करून तो स्वर्ग लोकाला निघून गेला. नारदमुनी माझ्या मातेला घेऊन आश्रमात आले आणि तिला सांगीतलं, ""बाई, आनंदाने, निर्भयपणाने तू येथे राहा. तुझा पती परत आल्यानंतर तू स्वगृही जा.'' माझी माता तिथे निर्भयपणाने नारदांची सेवा करत राहिलेली आहे. ऋषीसेवा करत असताना नारदांनी माझ्या मातेला उपदेश केला आणि तिच्या माध्यमातून मलाच तो उपदेश केला. त्यांना दया उत्पन्न झाली की हा जीवात्मा, ही स्त्री माझ्या आश्रयाला आलेले आहेत. यांचं हित यांना सांगीतलं पाहिजे. अज्ञान बंधनातून हे मुक्त झाले पाहिजेत. नारदांनी मला आत्मानात्मविवेक शिकवला. आत्मा नित्य आहे, अविनाशी आहे, शुद्ध आहे, स्वयंप्रकाश आहे बाकी सगळे शरीरादिक जे पदार्थ आहेत ते विनाशी आहेत. जागृति स्वप्न, सुषुप्ती या अवस्थांतून जावं लागतं जीवाला. आणि या अवस्थांना साक्षी असणारा जो आहे तोच परमात्मा आहे आणि तोच मी आहे हे ज्ञान शेवटी झालं पाहिजे.
गुरुशुश्रूषया भक्त्या सर्वलब्धार्पणेन च ।
सङ्गेन साधुभक्तानां ईश्वराराधनेन च ।।
7.7.30 ।। श्री. भा.
गुरुसेवा करावी. जे काही आपल्याला मिळालेलं आहे ते सगळं ईश्वराला अर्पण करावं. श्रेष्ठ भगवद्भक्तांची संगती करावी भगवत्कथा श्रद्धेने श्रवण कराव्यात, वर्णन कराव्यात, निरंतर...
...त्याच्या रूपाचं चिंतन करावं. सर्वठिकाणी परमेश्वर आहे ही भावना ठेवून, सर्वांबद्दल आदरबुद्धि ठेवावी. अशी वासुदेवाची भक्ती करणारा जो आहे तो त्याच्या कृपेने अज्ञानबंधनातून मुक्त होतो. अंत:करणामध्ये ही भक्ती जशी जशी वाढत जाते तसं देहभान हरपंत, प्रेमाश्रू डोळ्यातून वाहतात, नाचतो काय, गातो काय, काही भान त्याला राहात नाही, ही श्रेष्ठ अवस्था आहे. संपत्ती आहे, नोकरचाकर आहेत, स्त्री-पुत्र आहेत पण त्यांच्यापासून काय सुख मिळणार ? फाशी द्यायला माणसाला घेऊन जाताना त्याला उत्तम खायला प्यायला दिलं, संपत्ती दिली त्याचा उपयोग काय आहे. त्याला काय त्याच्यात आनंद वाटणार आहे ? मी जाणार आहे, नश्वर आहे ही वृत्ति बाणल्यानंतर बाहेरची कितीही सुखाची साधनं असली तरी त्याकडे लक्ष जात नाही त्याचप्रमाणे यज्ञयाग करून मिळवलेले स्वर्गादिक लोकसुद्धा विनाशी आहेत. एकमेकांपेक्षा कमीजास्तपणा त्याठिकाणीही आहे. म्हणून कोणत्याही सुखाची इच्छा करू नये. फक्त भगवंताची भक्ती करावी, त्याची कृपा संपादन करण्याकरता निरंतर प्रार्थना करावी. सर्व भूतांचा अंतर्यामी श्रीहरी आहे, सर्वव्यापी आहे, सर्वज्ञ आहे. देव असो, दैत्य, मनुष्य, गंधर्व कोणीही त्याची सेवा केली की त्याचं कल्याण होतंय. भगवंताला दान नको, तप नको. पूजा नको, सेवा नको.
प्रीयते अमलया भक्त्या हरिः अन्यद् विडम्बनम् ।।
7.7.52 ।। श्री. भा.
शुद्ध प्रेम त्याला पाहिजे. रामचंद्र वनात येणार आहेत हे कळल्यावर ती मातंग ऋषींची शिष्या शबरी रानामध्ये बोरं गोळा करते आहे. झाडावरनं बोरं काढायची आणि थोडी खाऊन बघायची, आंबट नाहीत ना ! मग दोणामध्ये तिने ठेवावीत. प्रभूला आंबट बोरं कशी देणार ? रामचंद्र आल्यावर विनंती केली, ""प्रभो, ही बोरं आपल्याकरता आणली आहेत. आपण घ्या.'' लक्ष्मणही पाहताहेत; प्रत्येक फळावर दात उठलेले आहेत ! रामांच्या मनामध्ये काहीही शंका नाही. त्यांनी बोरं घेतली आणि खायला सुरवात केली. भक्त जर सर्व विसरून गेलाय तर आपल्याला सर्व विसरायला नको का ! उष्टी बोरं हा विचारसुद्धा रामांच्या मनात नाहिये. केवळ त्या शुद्ध भक्तीला भगवंत भुललेला आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही श्रीहरीची भक्ती करा. आजपर्यंत अनेक भक्त होऊन गेलेले आहेत. मनुष्य जन्माला येऊन हेच मिळवायचं आहे. आत्मानात्म विचार प्रल्हादजींनी मांडला, भगवद्भक्तीचं माहात्म्य सांगीतलं, आणि बालमन आहे, शुद्ध आहे. त्या सगळ्याही मुलांच्या मनावर परिणाम झाला आणि हरिभजन ते सर्व करायला लागले. गुरूजी बाहेरून आले आणि त्यांना हे विलक्षण दृश्य दिसलं. आत्तापर्यंत एकटे प्रल्हादजीच भजन करायचे, तिकडे हे लक्ष द्यायचे नाहीत. आज सर्व शाळाच भजन करायला लागली.
हिरण्यकश्यपूने आज्ञा केली, ""आणा प्रल्हादाला'' प्रल्हादजी आले, नमस्कार करून उभे राहिले. हिरण्यकश्यपूने ठरवलं, आज मुलाला मारायचं. तो विचारतोय, ""अरे प्रल्हादा आपल्या कुळाचा नाश करतोस ? हरिभक्ती करून सगळ्यांना करायला लावतोस ? माझी आज्ञा तुला मान्य नाहीतर, तुलाही मी जिवंत ठेवणार नाही. मी रागावलेला असताना सगळ्या त्रैलोक्यातले लोक मला घाबरतात आणि तुला माझी भीती वाटत नाही ? तुझ्याजवळ कोणाचं बल आहे ? कुणामुळे तू इतका निर्भय झालेला आहेस ?'' प्रल्हादजीही मोठे स्पष्टवक्ते होते,
न केवलं मे भवतश्च राजन्
स वै बलं बलिनां चापरेषाम् ।
परेऽवरेमी स्थिरजङ्गमा ये
ब्रह्मादयो येन वशं प्रणीताः ।।
7.8.8 ।। श्री. भा.
""राजेसाहेब, माझ्याजवळ कुणाचं बल आहे असं तुम्ही विचारता आहेत. तुमच्याजवळ कुणाचं बल आहे हा विचार तुम्ही केला काय ? तुमचंही बल तुमचं नाहिये. सर्व बल हे त्या परमेश्वराचं आहे. ब्रह्मादिक देव ज्याच्या ताब्यात आहेत त्याचं बल हे सामान्य नाहिये. तोच परमात्मा सर्व विश्वाचं नियमन करणारा आहे. राजेसाहेब, ही आसुरी वृत्ति तुम्ही टाकून द्या. मन शांत ठेवा. काय जिंकलं आपण ? स्वतःचं मन तुम्हाला ताब्यात ठेवता येत नाही. आणि त्रैलोक्य जिंकलं म्हणून सांगता ? हे चांगलं नाही. तुम्ही आपल्या मनाला आवरा. मनाचे विकार सोडून द्या.'' असं बोलले प्रल्हादजी पण उपयोग काय ? हिरण्यकश्यपू म्हणाला, ""तुझं मरण जवळ आलेलं आहे असं दिसतंय, मलाच उपदेश करतो आहेस तू ! तुझं संरक्षण करणारा हरी कुठे आहे ?'' प्रल्हादजी म्हणाले, ""सर्व ठिकाणी आहे.'' हिरण्यकश्यपू म्हणाला, ""या खांबात का दिसत नाही ?'' प्रल्हादजी म्हणाले, ""आहे, त्या खांबातही परमात्मा आहे. तुम्हाला दिसत नाही त्याला काय करायचं ? सिंहासनावरून हिरण्यकश्यपू उठला आणि त्या खांबाजवळ येऊन जोराने मुष्टीप्रहार त्याने केलेला आहे. बघू या म्हणाला, तुझा हरी कुठे आहे. एकदम भयंकर गर्जना ऐकायला आली, सभेतले सगळे लोक घाबरले, कुठून हा आवाज आला काही कळलं नाही.
सत्यं विधातुं निजभृत्यभाषितं
व्याप्तिं च भूतेष्वखिलेषु चात्मनः ।
आपला भक्त प्रल्हाद याची सर्वठिकाणी परमात्मा आहे अशी भावना आहे आणि तो सांगतो आहे की या स्तंभामध्येसुद्धा माझा हरी आहे. त्याचं भाषण खरं करण्याकरता, आणि त्याच्या संरक्षणाकरता एकदम तो स्तंभ दुभंगला आणि त्यातून नृसिंह प्रगट झालेले आहेत. शरीर माणसाचं आणि मुख सिंहाचं असं रूप धारण करून श्रीहरी...
...आलेले आहेत. हिरण्यकश्यपू पाहतो आहे ते भयंकर रूप. डोळे लाल झालेले आहेत, केस पसरलेले आहेत, मोठ्या दाढा आहेत. कान मोठे झालेले आहेत. हिरण्यकश्यपूच्या लक्षात आलं की आपला नाश करण्याकरता हरीने हे रूप धारण केलेलं आहे. एकदम तो धावून गेला नृसिंहाच्या अंगावर. त्यांनी धरलं त्याला पण तो त्यांच्या हातातून सुटलेला आहे. सर्व देवांना आश्चर्य वाटलं की नृसिंहाच्या हातातून हा कसा काय सुटला ? तलवार, ढाल घेऊन तो नृसिंहाना मारण्याकरता धावून गेला असताना, त्यांनी धरलं त्याला. संध्याकाळची वेळ होती. दिवसा मृत्यू नको, रात्री नको. ते ब्रह्मदेवांचे वर सगळे खरे करायला पाहिजेत ना ! नियमभंग करून मारायचं नाही. संयम आहे. घराच्या आत मृत्यू नको, बाहेर नको, हे उंबऱ्यामध्ये येऊन बसले. जमिनीवरती मृत्यू नको, अंतरीक्षात मृत्यू नको, त्याला आपल्या मांडीवर घेतलेलं आहे. शस्त्राने मृत्यू नको, अस्त्राने मृत्यू नको, आपल्या नखांनी त्याचं पोट फाडून टाकलं, त्याची आतडी गळ्यामध्ये अडकवली आणि ते शरीर फेकून दिलेलं आहे.
हिरण्यकश्यपूचा नाश झाल्यावर सर्व देवांनी पुष्प वृष्टी केली आणि भगवंताची पुष्कळ स्तुति केलेली आहे. शंकर भगवान आहेत, ब्रह्मदेव आहेत, सगळ्यांनी ईश्वर स्तुति केलेली आहे. नृसिंह हे सिंहासनावर जाऊन बसले. अत्यंत क्रोधायमान झालेल्या त्यांच्याजवळ जाण्याचं धैर्य कुणाचंम नाहिये. लांबूनच सगळे स्तुति करताहेत. देवाचा राग शांत कसा करायचा हा प्रश्न उत्पन्न झाला. ब्रह्मदेव सर्व देवांसह लक्ष्मीदेवीकडे गेले आणि विनंती केली, ""आईसाहेब, आपण या आणि...
...देवांचा राग शांत करा.'' लक्ष्मीने लांबूनच ते रूप पाहिलं. जन्मामध्ये असं कधी रूप पाहिलं नव्हतं म्हणाली. हे माझं काम नाही, तुम्ही काय वाटेल ते करा, हे मला जमणार नाही म्हणाली. मग ब्रह्मदेवांनी प्रल्हादाला सांगीतलं, ""बाळ तू भगवंताजवळ जा. तुझा पित्याबद्दल त्यांना अत्यंत राग आलेला आहे. तू त्यांचा राग शांत कर.'' प्रल्हादजींना काही भीती वगैरे काही नाही. देव रागावतच नाही अशी निश्चित बुद्धि असल्याशिवाय उपासना होतच नाही. काही प्रतिकूल घटना घडली म्हणजे देव रागावला म्हणून असं घडलं, म्हणजे देवाचा दोषच आमच्या लक्षात येतो. देव नेहेमी अनुकूल आहे, नेहेमी कृपा करणारा आहे. प्रल्हादजींनी नृसिंहांच्या चरणावर साष्टांग नमस्कार घातलेला आहे. गेला, देवाचा राग गेला. आपल्या चरणावर हा बालक पडलेला आहे हे पाहिल्यावर दया उत्पन्न झाली. त्याला उठवलं नृसिंहाची आणि त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवलेला आहे. ध्रुवाच्या गालाला नुसता शंख लावला होता, याच्या मस्तकावर हात ठेवलेला आहे. भगवंतांचा हस्तस्पर्श झाल्याबरोबर आत्मदर्शन झालेलं आहे, आत्मज्ञान झालेलं आहे. सर्व पापक्षय झालेला आहे. नेत्रातून अश्रुधारा वाहताहेत आणि प्रल्हादजींनी भगवान नृसिंहाची स्तुति करण्याला आरंभ केलेला आहे. पुष्कळ मोठी स्तुति आहे. प्रेम आहे, ज्ञान आहे सगळं त्याच्यामध्ये आहे. आरंभाला ते म्हणताहेत, ""ब्रह्मादिक देव जिथे आपली स्तुति करू शकत नाहीत तिथे मी दैत्यकुलात जन्माला आलेला बालक कसा आपली स्तुति करू शकेल ? आपली भक्ती करणारा जो आहे तो सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. त्याच्यावरच आपली कृपा होते.
आपली भक्ती करणारा जो आहे तो सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. त्याच्यावरच आपली कृपा होते आहे. कोणीही भक्त आपली सेवा करणारा तो स्वत:करताच करतो आहे. आपल्याला काही वस्त्र देणं, अलंकार देणं हे सगळं स्वत:करताच हे भक्त करतात. त्यांनी एक ज्ञानसिद्धांत सांगितलेला आहे. सर्व जीव म्हणजे परमेश्वराचे प्रतिबिंब आहे. बुद्धीमध्ये पडलेले प्रतिबिंब म्हणजे जीव आहे. प्रतिबिंबवाद. तेव्हा जीवाला जर पाहिजे असेल तर बिंबाला दिले पाहिजे. आरशामध्ये जे प्रतिबिंब आहे त्या प्रतिबिंबाच्या गळ्यात जर आणखी सोन्याचा हार पाहिजे असेल तर हे जे बाहेर असलेलं बिंब त्याच्या गळ्यामध्ये तो हार घातला पाहिजे. त्या बिंबाला अर्पण केल्यानंतर तेच प्रतिबिंबालाही मिळतंय. तसे सगळे भक्त सेवा करतात म्हणाले सगळे स्वार्थी आहेत. निष्काम कोणी नाहिये. सिद्धांतही सांगितलाय आणखी कार्य जीवाचं कसं होते हेही दाखवलेलं आहे. देव काही आपल्याकडे ठेवून देत नाही. सगळं जीवांना देऊन टाकतात. आपण अवतार अनेक घेतले देवा हे काय लोकांना भीती दाखवण्याकरता घेतले का भीती...
...मधून मुक्त करण्याकरता घेतले म्हणाले, हे सगळं लोक भ्यालेले आहेत. लक्ष्मीदेवीही घाबरलेली आहे. राग कशाला आपल्याला. ज्याच्याबद्दल राग आलेला तो तर गेला. आता कशाला राग पाहिजे? आपला राग आपण आवरा सर्व लोक आता आनंदात आहेत, समाधान सर्व लोकांचं झालेलं आहे. मला मात्र आपल्या रागाची भीती वाटते. या संसारातून आपण लवकर माझा उद्धार करा आणि सर्वांचा उद्धार करा. मला एकट्याचा नकोय. सर्व लोकांचाही आपण उद्धार करा. अशी प्रार्थना केली. आपली दास्यभक्ती मला मिळावी हेही त्यांनी सांगितलेलंय. आपल्याला नमस्कार करावा. वाणीनी आपली स्तुति करावी, सेवा शरीरानी घडावी, पूजा घडावी, आपल्या दिव्य चरित्राचं अखंड स्मरण व्हावं. आणि आपल्या कथांचं श्रवण नित्य व्हावं अशी भक्ती त्यांनी मागितली.
भक्तांनी या प्रमाणे स्तुति केल्यानंतर नारद सांगतात, भगवान प्रसन्न झाले. प्रल्हाद, काय पाहिजे तुला मागून घे बाळ. माझं दर्शन झाल्यानंतर काहीही इच्छा मानवाची राहात नाही. सर्व इच्छा पूर्ण होतात. मागून घे तू. परंतु खरे निष्काम भक्त होते प्रल्हादजी, त्यांनी काही मागितले नाही. भक्तियोगाचा हा प्रतिबंध आहे म्हणाले. काही मागणं देवाजवळ म्हणजे. प्रल्हादजी सांगतात, देवा, मला त्या लोभामध्ये टाकता काय? वर मागून घे अमुक घे. मी असा लोभी नाही. मी मुमुक्षु आहे. मला बाकी कोणाचीही इच्छा नाही. आपल्यासारखे मला स्वामी मिळालेले आहेत आणि मी आपला भक्त आहे अनन्य भक्त. मागणारा हा खरा भक्त होत नाही म्हणे. तेव्हा मला काहीही इच्छा नाहिये. जर आपल्याला काही देण्याची इच्छा असेल तर माझ्या मनामध्ये कोणतीही वासना राहू नये एवढा मला वर द्या.
यदि रासीश मे कामान् वरांस्त्वं वरदर्षभ ।
कामानां हृद्यसंरोहं भवतस्तु वृणे वरम् ।।
7.10.7 ।। श्री. भा.
माझ्या मनामध्ये कोणतीही इच्छा उत्पन्न होऊ नये सर्व कामनिवृत्ती ही मुक्ती आहे. मुक्तीचं स्वरूप आहे. हे प्रल्हादजींनी मागितलं. कोणतीही इच्छा राहू नये. याचा अर्थ जीवभाव संपलेला आहे. तो प्रत्यक्ष परमेश्वर झालेला आहे. आणखी एक वर मागतो म्हणाले. माग म्हणाले, तुला कुणी नाही म्हटलं. प्रल्हादजी सांगताहेत, आमच्या पिताजींनी आपला द्वेष केला, वैर केलं, पण अज्ञानाने केलं. आपलं स्वरूप न जाणताना त्यांनी वैर केलेलं आहे, निंदा केली, त्यांचाही उद्धार व्हावा अशी माझी इच्छा आहे. केवढं मोठं अंत:करण आहे. "पिता मे पूयेत", त्यांच्या पातकापासून पिता मुक्त व्हावा. भगवान सांगतात, प्रल्हादा ! तुझ्या पित्याचा तर उद्धार झालेलाच आहे. पण...
...पित्याच्या पूर्वीच्या एकवीस पिढ्यांचा उद्धार झालेला आहे आणि कारण नृसिंह सांगतात.
त्रि:सप्तभि: पिता पूतः पितृभिः सह तेऽनघ ।
यत् साधोऽस्य गृहे जातो भवान् वै कुलपावनः ।।
7.10.18 ।। श्री. भा.
की याच्या घरामध्ये तुझ्यासारखा सर्व कुळाला पवित्र करणारा मोठा भक्त निर्माण झालेला आहे. तुझ्यासारखा भक्त या कुळामध्ये उत्पन्न झाल्यामुळे सर्व कुळ पवित्र होऊन गेलेलं आहे. भक्तांनी देवाला मोठं म्हणायचं. देवही भक्तालाच मोठेपणा देताहेत. ज्या ज्या देशांमध्ये माझे भक्त असतील ते सर्व देश पवित्र होऊन जातात. जा आता हे राज्य वगैरे सांभाळ तू. सर्व भक्तांचा आदरभाव धारण करून राज्य कर म्हणाले. पित्याचं और्ध्वदेहिक सगळं करून टाक. राग शांत झाल्यानंतर ब्रह्मदेव जवळ आले, देवा, आपण या असुराचा नाश करून या बालकाचं संरक्षण केलं, फार चांगलं झालं म्हणाले. माझ्याजवळ याने वर मागितले, आणि सर्वांना याने त्रास दिलेला आहे. मुलालाही त्रास दिलेला आहे. नृसिंह म्हणाले, ""ब्रह्मदेवा ! तुम्ही आता यापुढे वर देताना विचार करून वर देत चला म्हणाले. काय हे ? असुरांनी वर काय मागितले, तुम्ही प्रत्येक वेळेला तथास्तु म्हणत गेलात आणि हा असुर आपल्या स्वभावाप्रमाणे सर्वांना आणि त्रास देणाराच निर्माण झाला ना? मुलाबद्दल द्वेष करणारा असुर, इतरांचा द्वेष किती केला असेल?'' बजावलेलं आहे ब्रह्मदेवांना, आणखी भगवान नृसिंह गुप्त झालेले आहेत.
प्रल्हादजींना राज्याभिषेक केला ब्रह्मदेवांनी, आणि सर्वांचा सत्कार प्रल्हादजींनी केला. आपल्याआपल्या लोकांना सर्व ब्रह्मादिक देव निघून गेले. हेच दोघे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे पुढे रावण आणि कुंभकर्ण झाले. त्यांचा नाश रामावतार धारण करून भगवंतानी केला. पुढे हेच शिशुपाल दंतवक्र झाले. भगवान श्रीकृष्णांनी त्यांचा नाश केला. त्यांना मुक्त केलेलं आहे. ही सगळी कथा, हा इतिहास धर्मराजाला नारदांनी सांगितला आहे शेवटी त्याला सांगितलं बाबा, तुम्ही पांडव म्हणजे खरे पुण्यवान आहात, भाग्यवान आहात. कारण तुमच्या घरी आम्हाला सगळ्या ऋषींना यावं लागतं म्हणाले. तुमच्या घरामध्ये भगवान श्रीहरी वास्तव्य करताहेत. केवढं तुमचं पुण्य आहे. प्रल्हादाला एकदा दर्शन दिलं. त्याच्या पित्याचा नाश केला. त्याचं संरक्षण केलं, त्याला वर प्रदान केला आणि भगवान नृसिंह गुप्त झाले. हा द्वारकेचा राणा पांडवाघरी राहतो आहे. आम्हाला यावं लागतं म्हणाले. केवढं भाग्य तुमचं आहे. पण तुम्ही याला जाणून आहात ना ! हा आपला मामेभाऊ आहे, अर्जुनाला वाटतं हा आपला मित्र आहे. वाटेल ती काम सांगता तुम्ही...
याला आणि करतो हा. काही मानापमान काही नाही. याचं स्वरूप काय आहे, हा प्रत्यक्ष परमेश्वर आहे. हे समजून घेऊन आता याच्याबद्दल वागा याची आज्ञा पालन करा. याच भगवान गोपालकृष्णांनी पूर्वीही त्रिपुरासुराचा नाश करायचा होता त्यावेळेला एकाच बाणाने त्या तीन विमानांचा नाश झाला पाहिजे. जाळून टाकली पाहिजेत विमानं. मग भगवान विष्णूंनी बाणाचं रूप धारण केलं, शंकर भगवंतांनी तो बाण हातामध्ये घेतला आणि त्या एकाच बाणाने त्रिपुर दहन करून टाकलेला आहे. त्यावेळी सर्व राक्षसांचा नाश झाला म्हणजे भगवंतांनी शंकरांनाही साह्य केलं आणि ते कर्म केलेलं आहे. अशा प्रकारचा हा भगवान श्रीहरी, त्याची सेवा तुम्ही जितकी ज्ञानपूर्वक कराल तितकं तुमचं आणखी कल्याण होणार आहे. असं नारदांनी सांगितल्यानंतर मग नारदांना त्यांनी सुवर्ण आश्रम यांचे धर्म विचारले. चार वर्णांचे, चार आश्रमांचे धर्म कोणते आहेत? ते मला समजावून सांगा. धर्मजिज्ञासू धर्मराज, आचरण करणारे आणि नारदांनी त्यांना सर्व उपदेश केला.
कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा । बुद्ध्याऽऽत्मना वा अनुसृतस्वभावात् ।।
करोति यद्यत् सकलं परस्मै । नारायणायेति समर्पयेत् तत् ।।
11.2.36 ।। भा.
ॐ नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने ।
यस्यागस्त्यायते नामविघ्नसागरशोषणे ।।
यस्यस्मरणमात्रेण जन्मसंसारबंधनात् ।
विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे ।।
विशुद्धज्ञानदेहाय त्रिवेदीदिव्यचक्षुषे ।
श्रेयःप्राप्तिनिमित्ताय नमः सोमार्धधारिणे ।।
यो देवः सवितास्माकं धियोधर्मादिगोचरः ।
प्रेरयेत्तस्य यद्भर्गस्तद्वरेण्यम् उपास्महे ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोऽस्तुते ।।
नमो आदिरूपा ॐकार स्वरूपा । विश्वाचिया रूपा पांडुरंगा ।।
तुझिया सत्तेने तुझे गुण गाऊ । तेणे सुखी राहू सर्व काळ ।।
तूची श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन । सर्व होणे जाणे तुझे हाती ।।
तुका म्हणे जेथे नाही मी-तू-पण । स्तवावे ते कवणे कवणालागी ।।
यत् कीर्तनं यत्स्मरणं यदीक्षणं यद् वन्दनं यद् श्रवणं यदर्हणम् ।
लोकस्य सद्यो विधुनोति कल्मषम् तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः ।।
विवेकिनो यच्चरणोपसादनात् सङ्गं व्युदस्योभयतोऽन्तरात्मनः ।।
विन्दन्ति हि ब्रह्मगतिं गतक्कमाः । तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः ।।
तपस्विनो दानपरा यशस्विनो । मनस्विनो मंत्रविदस्सुमंगलाः ।।
क्षेमं न विन्दन्ति विना यदर्पणम् । तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः ।।
मालां पात्रे च डमरू शूले शंख सुदर्शने ।
दधानम् भक्तवरदम् दत्तात्रेयम् नमाम्यहम् ।।
योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् । संजीवयत्यखिलशक्तिधरः स्वधाम्ना ।
अन्यांश्चहस्तचरणश्रवणत्वगादीन् । प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् ।।
मूकं करोति वाचालं पंगुम् लंघयते गिरीम् ।
यत् कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् ।।
आपदामपहर्तारम् दातारम् सर्वसंपदाम् ।
लोकाभिरामम् श्रीरामम् भूयो भूयो नमाम्यहम् ।।
यत्र यत्र रघुनाथकीर्तनं । तत्र तत्र कृत मस्तकांजलिम् ।
बाष्पवारिपरिपूर्णलोचनं । मारुतिं नमत राक्षसांतकम् ।।
पुस्तकजपवटहस्ते वरदाभयचिन्ह चारुबाहुलते ।
कर्पूरामलदेहे वागीश्वरी चोदयदाशु मम वाचम् ।।
श्रीगणेशाय नमः
श्रीगुरुचरणारविंदाभ्याम् नमः ।
भगवन्छ्रोतुमिच्छामि नृणां धर्मं सनातनम् ।
वर्णाश्रमाचारयुतं यत् पुमान् विन्दते परम् ।।
7.11.2 ।। श्री. भा.