« Previous | Table of Contents | Next »
पान २४१

शुक्राचार्य महाराज सांगताहेत राजा, दैत्यराज हिरण्यकशिपूचे चरित्र नारदांच्या मुखातून धर्मराजाने ऐकलं, आनंद झाला त्याला आणि नंतर त्याने नारदांना विचारले, ""महाराज ! मानवांचा जो धर्म आहे 'आचारधर्म' वर्णाश्रमाचा आचार; तो आचारधर्म आपल्या मुखातून ऐकण्याची मला इच्छा आहे. साक्षात भगवान ब्रह्मदेवांचे आपण पुत्र आहात! आपल्या सारखे नारायणांचे जे भक्त आहेत त्यांनाच खरं धर्मरहस्य हे माहिती असेल. धर्मराजांचा प्रश्न ऐकून नारदांनाही समाधान वाटलं.

नारद सांगताहेत, ""धर्मराज, भगवान नारायणांच्या मुखातूनच मी ऐकलेलं आहे हा धर्माचार! हा मी तुला सांगतो. आरंभाला दाक्षायणीपासून ज्यांनी अवतार घेतला बदकाश्रमामध्ये, त्यांचं वास्तव्य आहे, तप चालू आहे. धर्माचं मुख्य प्रमाण म्हणजे वेदरूपी परमात्मा आहे 'श्रीहरी'. वेदाभ्यास करणारे जे काही ऋषी आहेत त्यांनी करून ठेवल्या स्मृति याही धर्माचं प्रमाण आहेत. सामान्य धर्म, सर्वसाधारण, तो अगोदर सांगताहेत, सत्य, दया, तप, शुचिता, तितिक्षा, विचार, आंतरेंद्रिय निग्रह, बहिरेंद्रिय निग्रह, संतोष, श्रेष्ठ पुरुषांची सेवा, व्यावहारिक जे विषय आहेत त्या विषयांच्या करिता प्रयत्न कमी करणं, मानवांच्या प्रयत्नांचं इष्टफल कसं प्राप्त होत नाही हे पहाणं, आत्मानात्म विचार करणं, अन्नधान्य, धन वगैरे जे आपलं असेल याचा विभाग करणं सर्व भूतांना आणि त्यातून ते यथाशक्ती देणं, सर्वांच्या ठिकाणी परमात्म भावना धारण करणं, आणि ईश्वराची श्रवणकीर्तनादिक नवविधाभक्ती हा तीस प्रकारचा सामान्य धर्म आहे. कुणालाही, चारी वर्ण, चारी आश्रम, स्त्री, पुरुष, बाल, वृद्ध सर्वांना हा करता येण्यासारखा आहे.

आता वर्ण धर्म सांगताहेत. ब्राह्मण, क्षत्रिय वैश्य आणि शूद्र.

गर्भाधानादिक संस्कार ज्या ठिकाणी अविच्छिन्न चालू आहेत, त्यालाच द्विज म्हणायचं. यज्ञ करणं, अध्ययन करणं, दान करणं, ही द्विजांची कर्म आहेत. आश्रमांचे वेगवेगळे धर्मही त्यांना आहेत. विप्रांनी अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान, आणि प्रतिग्रह ही सहा कर्म विप्राला सांगितलेली आहेत. त्यापैकी याजन, प्रतिग्रह आणि अध्यापन ही उपजीविकेची साधनं म्हणून सांगितलेली आहेत.

उत्तम वर्णाची वृत्ती इतरांनी घेऊ नये, आपत्ती नसेल तर घेऊ नये. आणखी काही सांगितलेली आहेत. ऋतवृत्ती म्हणजे उंच आणि शिलवृत्ती त्याला म्हणतात. शेतात पडलेले धान्य कण पुष्कळ असतात. ते गोळा करून आणणं आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करणं ही उंच वृत्ती आहे. मोठा...

***
पान २४२

...बाजार ज्या ठिकाणी असेल तिथेही धान्य पुष्कळ सांडलेलं असत ते कण गोळा करून आणून त्याच्यावर निर्वाह करणं ही शिलवृत्ती! अयाचित राहून आपलं कर्म करणं ही अमृतवृत्ती आहे. नित्य याचना करणं ही मृतवृत्ती आहे. कृषिकर्म करणं ही प्रमृतवृत्ती आहे. सत्यानृत म्हणजे वाणिज्य वृत्ती, व्यापार करणं, आणि नीच सेवा करणं ही श्वानवृत्ती आहे. ती कधीही विप्राने करू नये, क्षत्रियाने करू नये.

बाह्य इंद्रियांचा निग्रह, आंतरइंद्रिय निग्रह, तप, शुचिता, संतोष, क्षमा, ज्ञान, दया, भगवत भक्ती ही ब्राह्मणाची लक्षणं सांगितलेली आहेत. पराक्रम आहे, धैर्य आहे, तेज आहे. त्याग आहे, चित्ताचा निग्रह आहे, आणखी सर्वांचं रक्षण करण्याची प्रवृत्ती आहे, हे क्षत्रियांचं लक्षण आहे. देव गुरु भगवान यांची भक्ती करणं, धर्म, अर्थ काम या तीन अर्थांचे आचरण करणं. आस्तिक्य बुद्धी असणं आणि नित्य उद्योगशील असणं हे वैश्याचं लक्षण आहे. चतुर्थ वर्ण जो शूद्र आहे, सर्वांशी नम्रतेने वागणं, पवित्रपणाने रहाणं, स्वामी सेवा करणं, अमंत्र यज्ञ करणं, चोरी वगैरे कोणाचीही न करणं, गाईचं, विप्रांचं संरक्षण करणं, सत्य भाषण करणं हा शूद्राचा धर्म आहे. पतिव्रता स्त्रिया ज्या आहेत, त्यांनी पतीची सेवा करणं, पतीचे जे आप्तबांधव आहेत त्यांच्याबद्दलही अनुकूल वृत्ती ठेवून राहाणं, गृहसंमार्जन करणं, झाडून काढणं, स्वतःही उत्तम आणखी वस्त्रालंकाराने संपन्न राहणं, प्रेमभाषणाने, मधुर भाषणाने, नम्रतेनं सर्वांच्याही मनाला समाधान देणं अशी ही पतिव्रता स्त्री आहे. आपल्या कर्तव्यामध्ये दक्ष राहणारी ही हरिलोकामध्ये पतीला बरोबर घेऊन लक्ष्मीप्रमाणे सुखाचा उपभोग घेत राहाती.

संकर जातीमध्ये उत्पन्न झालेले जे आहेत, त्यांचा धर्म म्हणजे त्यांच्या कुलामध्ये जो चालत आलेला आहे, तो त्याप्रमाणे त्यांनी आचरण करावा. असे प्रत्येकाच्या स्वभावाला अनुसरून हे धर्म सगळे सांगितलेले आहेत. कर्तव्य वेदांनी सांगितलेली आहेत.

अनंत वासना मनामध्ये असतात. अधिकाधिक विषयसेवनाने त्या वासना जास्ती जास्ती वाढतात. म्हणून त्या कमी करण्याचा प्रयत्न करताहेत.

यानंतर आता आश्रम धर्म सांगताहेत नारद, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणखी संन्यासी.

ब्रह्मचारी गुरुकुले वसन्दान्तो गुरोहितम् ।
आचरन्दासवन्नीचो गुरौ सुदृढसौहृदः ।।
7.12.1 ।। श्री. भा.
***
पान २४३

ब्रह्मचाऱ्याने उपनयन झाल्यानंतर गुरुकुलामध्ये जाऊन राहावं; आणखी गुरुची सेवा करावी. अत्यंत प्रेम, श्रद्धा, भक्ती असावी, अंतःकरणामध्ये. सायंकाळी आणि प्रातःकाळी सद्गुरूंची, अग्नीची, सूर्यनारायणांची, देवतांची भक्ती, सेवा करावी. मौन धारण करून दोन्ही वेळेला संध्योपासना करावी. गायत्री मंत्राचा जप करावा आणि गुरूंनी बोलावल्यावर जवळ जाऊन, आरंभी आणि शेवटी त्यांच्या चरणाला वंदन करून वेदाचा अभ्यास करावा. कृष्णाजीन, जटा, दंड, कमंडलू, यज्ञोपवीत हे सगळं त्याने धारण करावे. दोन्ही वेळेला भिक्षा मागून ते भिक्षान्न गुरूला निवेदन करावं त्यांची अनुज्ञा झाली तर मग भोजन करावं नाहीतर उपोषित राहावं. सुशील, मिताहारी, श्रद्धावान, जितेन्द्रिय असं त्यांनी राहावं. स्त्रियांच्या बद्दल आवश्यक तेवढाच व्यवहार त्यांनी करावा. जास्ती संपर्क करू नये. हे नियम ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी सर्वांनाच आहेत. याप्रमाणे आणखी वेदाभ्यास शेवटपर्यंत करायचा असेल तर शेवटपर्यंत ब्रह्मचर्य आश्रम धारण करून त्याने वेदाभ्यासामध्येच आपलं सगळं आयुष्य खर्च करावं. काही काळ आपल्या शाखेचं अध्ययन झाल्यानंतर आणि गुरूंना दक्षिणा यथाशक्ती देऊन गृहस्थाश्रमाचा स्वीकार करावा; अथवा वानप्रस्थाश्रम किंवा इच्छा असेल तर संन्यासाश्रमाचाही स्वीकार त्या ब्रह्मचाऱ्याने करावा.

अग्नीनारायण, सद्गुरू, परमात्मा, सर्वही प्राणीमात्र यांच्या ठिकाणी परमेश्वराची व्याप्ती आहे हे लक्षात ठेवावं. अशा आश्रम धर्माप्रमाणे वागणारा ब्रह्मचारी, वानप्रस्थ, गृहस्थाश्रमी, संन्यासी यांना ईश्वरकृपेने आत्मज्ञान होतं आणि ते मुक्त होतात.

वानप्रस्थाचे धर्म सांगताहेत नारदमुनी. ऋषीलोकाला तो जातोय. जे काही सूर्य किरणांनी पक्व झालेलं धान्य म्हणा, अग्नीमध्ये शिजलेलं धान्य हेही त्यांनी ग्रहण करावं. नवीन धान्य प्राप्त झाल्यानंतर, जुनं धान्य आणि त्याचा त्याग करावा. देऊन टाकावं कुणाला तरी, संग्रह करू नये. अग्नी सुरक्षित राहाण्याकरता, एखाद्या गुहेमध्ये किंवा झोपडीमध्ये अग्नीला ठेवावं आणि आपण मोकळ्या जागेमध्ये राहायचं. थंडी वारा, पाऊस, सूर्यकिरण वगैरे सगळं त्यानं सहन करायचं. त्याने जटा धारण कराव्यात. दंड, कमंडलू आपल्याजवळ ठेवावेत. बारा वर्ष, आठ वर्ष, चार, दोन किंवा एक वर्षापर्यंत वानप्रस्थ आश्रमाचे नियम पालन करून विचारी माणसाने तितिक्षेचा अभ्यास करावा. आपलं कर्म करण्याचं सामर्थ्य राहिलं नाही, व्याधी म्हणा, किंवा म्हातारपणामुळे म्हणा, सामर्थ्य जर शरीरातलं नाहीसं झालं तर आहारत्याग त्याने करावा, आणि मूलतत्त्व जे परमात्मरूप, त्याचं चिंतन करून आपल्या शरीराचं विसर्जन त्यांनी करावं.

***
पान २४४

संन्यासी, त्यांनी कसं वागावं हे सांगताहेत. वानप्रस्थामध्ये असणारा जो आहे. जीव, याला जर सामर्थ्य असेल शरीरामध्ये, संचार करण्याकरता, तर त्याने संन्यासश्रम दीक्षा घ्यावी. फक्त देह तेवढा शिल्लक राहिलेला आहे. बाकी कशाचाही संग्रह त्याने करू नये. निरपेक्ष वृत्तीनं कोणत्याही गावामध्ये एक रात्र फक्त त्याने मुक्काम करावा, लगेच दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावाला, असं सारखं फिरावं म्हणाले. एक पांघरण्याचं वस्त्र आहे, दंड कमंडलू, एकट्यानं संचार करायचा आहे. सर्वही भूतांच्या बद्दल अत्यंत प्रेमभावना आहे. नारायणाची भक्ती अंतःकरणामध्ये आहे. संपूर्ण विश्व हे नारायणस्वरूप आहे, असा त्याने अभ्यास करावा. मृत्यू वगैरे याची भीती बाळगण्याचं काही कारण नाही. देहाला सगळे हे विकार आहेत. जी काही नास्तिक शास्त्रं असतील त्या ठिकाणी आसक्त होऊ नये वादविवाद कोणाबरोबरही करू नये. शिष्य संग्रह त्याने करू नये. जास्ती ग्रंथाचा अभ्यासही करू नये. संन्यासश्रमाचे हे धर्म सांगताहेत. संन्यासश्रमामध्ये सुद्धा आत्मज्ञान होण्याकरता घेतलेला एक संन्यास आहे. ज्ञानाच्या इच्छेनं घेतलेला आणि ज्ञान झाल्यानंतर होणारा संन्यास नैसर्गिक संन्यास, विद्वत संन्यास तो फार मोठा आहे म्हणाले. विद्वान संन्यासीबुवा आहे तो काय करतो, कसा वागतो कोणत्या वर्णाचा आहे काही समजत नाही. याबद्दल पूर्वी घडलेला इतिहास तुला सांगतो, धर्मराज. भगवान अवधूत दत्तात्रेय आणि प्रल्हादजी जे आहेत यांचा संवाद झालेलाय. पृथ्वीवर संचार करण्याकरता प्रल्हादजी बाहेर पडलेले आहेत. राजधानीतून फिरता फिरता त्यांनी पाहिलं, कावेरी नदीच्या तीरावर, एका झाडाखाली एक महात्मा फक्त पडलेला आहे. जमिनीवर पडलेला आहे. विलक्षण तेज आहे. पण काही कळत नाही हा कोण आहे, त्याचा वर्ण कोणता, त्याचा आश्रम कोणता, काही समजून येत नाही. स्वस्थ आहे. प्रयत्न नाही, कर्म नाही, काही नाही. प्रल्हादजींनी त्यांना नमस्कार केला. पायावर मस्तक ठेवलेलं आहे. आणि जिज्ञासू बुद्धीनं त्या भगवद्भक्त असुराने विचारलं, ""महाराज !

बिभर्षि कायं पीवानं सोद्यमो भोगवान्यथा ।
वित्तं चैवोद्यमवतां भोगो वित्तवतामिह ।।
भोगिनां खलु देहोऽयं पीवा भवति नान्यथा ।।
7.13.16 ।। श्री. भा.

व्यवहारामध्ये जो कार्यकारण भाव मानून आपण वागतो त्याप्रमाणे प्रल्हादजी विचारताहेत, आपलं शरीर महाराज, इतकं धष्टपुष्ट कस राहिलं ? एखादा प्रयत्न करणारा, धनधान्य मिळविणारा जो आहे त्याचं शरीर चांगलं असतं. उद्योग केला तर द्रव्य मिळतं. द्रव्य मिळाल्यानंतर खाण्यापिण्याची...

***
पान २४५

...व्यवस्था करता येतो, आणि अशी व्यवस्था ज्याची झालेली आहे त्याचंच देह असा चांगला असतो, असं आम्ही पहातो. आपण तर स्वस्थ झाडाखाली पडून राहिलेले आहात काही उद्योग करीत नाही. तुमच्या जवळ अर्थ नाही, संग्रह नाही, मग खाण्यापिण्याची व्यवस्था कशी आहे ? आणि काहीही व्यवस्था नसताना तुमचा देह इतका चांगला कसा आहे ? हा प्रश्न आहे. समर्थ आहात आपण, आपण कोणालाही ज्ञान देऊ शकाल किंवा कोणताही उद्योग करून आपल्याला पुष्कळ द्रव्य मिळविता येईल. जिज्ञासू म्हणून प्रल्हादजींनी हे विचारल्यानंतर नारद सांगतात, हसले थोडे अवधूत, म्हणाले बाबा, तू मोठा भगवद्भक्त आहेस. तू आता विचारलं म्हणून, माझा अनुभव, मी कसा वागतो, माझं काय वर्तन, काय आचरण आहे. तुला मी सांगतो, म्हणाले,

तृष्णया भववाहिन्या योग्यैः कामैपूरया ।।
कर्माणि कार्यमाणोऽहं नानायोनिषु योजितः ।।
7.13.23 ।। श्री.भा.

कितीही प्रयत्न करून अर्थार्जन केलं, विषयभोग घेतले, तरी मनाची तृप्ती कधीही होत नाही. अशा व्यवहारामध्ये आसक्त झालेल्या माणसाचे विचार, त्यांचे कार्यकारणभाव हे प्रल्हादजींनी मांडले. असा नित्य तृप्त झालेला महात्मा, त्याची बुद्धी कशी आहे ? दोन बुद्धीवाद आहेत - संसारी लोकांचा एक बुद्धीवाद प्रल्हादजींनी मांडलेला प्रयत्नवाद. कर्म केल्याशिवाय धन मिळणार नाही, खाण्यापिण्याची सोय होणार नाही. शरीर राहणार नाही. हे ज्ञानी महात्मे सांगताहेत, यांचा बुद्धीवाद वेगळा आहे - मी म्हणाले कर्म करत नाही. विचारांनी सोडलेलंय कर्म. ही जी आहे तृष्णा म्हणजे आशा मनामध्ये, हे करावं ते करावं. हे मिळवावं ते मिळवावं धन आहे, संपत्ती, त्याचप्रमाणे सत्ता आहे. कीर्ति आहे, अनेक वासना मनामध्ये उत्पन्न होतात. कितीही विषय मिळाले तरीसुद्धा त्या वासना पूर्ण होत नाहीत. ती तृष्णा पूर्ण होत नाही, आणि त्या तृष्णेमुळे कर्म घडतात म्हणाले, हे करावं, ते करावं असं वाटतं. आणि त्या कर्मामुळे अनेक प्रकारची शरीरं धारण करावी लागतात. अनेक योनीमध्ये मी फिरून आलो म्हणाले. दैवयोगाने या मर्त्यलोकात माझा जन्म झाला. मनुष्य जन्म मला मिळाला. स्वर्ग किंवा मोक्षाचा हा दरवाजा आहे. मनुष्य शरीर म्हणजे पुण्य कर्म केली, यज्ञयागादिक, तर स्वर्गाला जाता येईल. कायमचं राहता येणार नाही किंवा सर्वसंग परित्याग करून भगवद्भक्ती जर केली तर त्याला मुक्ति म्हणजे मोक्षही मिळेल. जन्ममरणाच्या बंधनातून कायमची सुटका होईल. अशा या योनीमध्ये मी आलोय. याठिकाणी मी निरीक्षण पुष्कळ केलं म्हणाले. स्त्री-पुरुष सारखी कर्म करतात, प्रयत्न करताहेत. सुख मिळावं आणि दुःख...

***
पान २४६

...जावीत सगळी. पण उलटंच त्यांच्या पदरात फळ मिळतंय म्हणणे. असलेली सुखे जातात. नसलेली दुःखे येतात. हे पुष्कळ ठिकाणी ज्यावेळेला मी पाहिलं, अनुभव घेतला त्या वेळी "निवृत्तोस्मि' । काहीही करायचं नाही असं मी ठरविलं. पण ठरविलं म्हणजे मनामध्ये कोणतीही तृष्णा राहिलेली नाही हे त्याच पाठीमागचं कारण आहे. काही करायचं नाही असं ठरविलं तरी कोणीही तसा राहू शकत नाही.

न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् ।
कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः ।।
3.5 ।। भ.गी.

भगवान सांगताहेत अर्जुनाला, युद्ध करणार नाही तू म्हणतोयस. तुला करावं लागेल. कोणीही कर्मत्याग करू शकत नाही. त्रिगुणात्मक सृष्टीमध्ये बांधला गेलेलाय. अवधूत सांगतात, मी सगळं सोडून दिलं. लोकांना कर्म करून, प्रयत्न करून, इच्छेप्रमाणे फळ पदरात पडत नाही. पण हे सोडून दिलं याचा अर्थ मनामध्ये कोणातीही तृष्णा राहिलेली नाही, हे मुख्य कारण आहे. मग हे शरीर इतकं चांगलं राहिलं कसं ? प्रयत्नाशिवाय द्रव्य नाही. द्रव्याशिवाय खाण्यापिण्याची व्यवस्था नाही. विषयभोग नाहीत. मग शरीर चांगलं कसं राहिलं ? सुख मिळालं पाहिजे ना! सुख मिळालं म्हणजे शरीर चांगलं राहतं. त्याच उत्तर देताहेत अवधूत दत्तात्रेय !

सुखमस्यात्मनो रूपं सर्वेहोपरतिस्तनुः ।
मनःसंस्पर्शजान् दृष्ट्वा भोगान्स्वप्स्यामि संविशन् ।।
7.13.26 ।। श्री. भा.

सुख, सुख म्हणून जे समजलं जातं म्हणाले ते सुख खरं म्हणजे आत्मरूप सुख आहे. आत्माच आनंदरूप आहे. स्वतःच मी आनंदरूप आहे. हे ज्या वेळेला मला समजलं त्या वेळेला प्रयत्नांनी द्रव्य मिळवायचं त्यांनी सुख मिळवायचं, हे थांबलं. द्रव्य म्हणजे सुख नाहीये. सुखाचं साधन म्हणून समजलं गेल्यामुळे द्रव्य मिळविण्याकरता प्रवृत्ती होतेय. बाह्य सुखाची इच्छा आहे. विषयेंद्रिय संबंध झाला म्हणजे सुख मिळतं. ते सगळं विषय मिळविण्याकरता कर्म केलं पाहिजे. ते सुख मिळालं पाहिजे. अशी तृष्णा मनामध्ये असते. पण सुख म्हणजे खरं मी स्वतःच आनंदरूप आहे. "नाथांच्या घरची उलटीच खूण, पाण्यासी लागली तहान'. नाथमहाराज सांगताहेत. तहान लागल्यानंतर तहान शांत होण्याकरता पाणी प्यायलं म्हणजे झालं. पाण्यालाच तहान लागली तर? दुसऱ्याची तृष्णा, तहान शांत करणारं पाणी, ते म्हणालं मला तहान लागलेली आहे. त्याची तहान कशी जायची कशी? तुला तहान नाही बाबा! आपण स्वतःच सुखरूप आनंदरूप असताना, विषयांच्यामध्ये...

***
पान २४७

...सुख आहे. ते मिळविले पाहिजे, त्यांचा संग्रह केला पाहिजे तो किती, काही ठरत नाहीये. कार्यकारणभाव जरी ठरविला, विषयाशिवाय, विषयसंबंधाशिवाय, सुख नाही. विषय किती संपादन करायचे ? हेच निश्चित नाहीये. वाढत जातं ते, तृष्णा वाढत जातीये. मृग, त्याला तहान लागलेली आहे. दुपारची वेळ आहे. हरिणाला तहान लागलीये. समोर सूर्यकिरण पडलेले आहेत; लांब मैलभर आणि त्या किरणामध्ये पाण्याचा आभास झाला. पाणी आहे, धावत निघाला हरिण. रस्त्यामध्ये एका ठिकाणी झाडी होती आणि तिथे जलाशय होता पाण्याने भरलेला एक आहे तलाव. पण त्याच्यावर शेवाळ आलेलं आहे पाण्यावर. हा त्याच रस्त्यानं गेला, पाहिलं त्यानी तिथं काही पाणी नाही म्हणाले आणि समोर दिसणारं जे आहे मृगजळ, त्याला जल म्हणून दिसतंय तिथपर्यंत आला. पुन्हा त्याच्यापुढं एक मैलभर तसच दिसायला लागलं. कितीही फिरला, पळाला, तरी पाणी मिळालं नाही तशी स्थिती झालेली आहे. आनंदरूप आपण असताना तो आनंद आवृत झालेला आहे.

अज्ञानेन आवृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः ।।
5.15 ।। भ. गी.

भगवान सांगताहेत आणि त्यामुळे बाहेर सुख आहे. विषयापासून सुख मिळणार आहे. त्याकरता प्रयत्न केला पाहिजे, अहोरात्र. अशी समजूत होऊन प्रयत्नाकडे लागतो आहे आणि सर्वही प्रयत्न व्यर्थ होऊन जातात. प्रयत्नाप्रमाणे त्याच्या पदरात सुख पडत नाहीये. दुःख तरी जातं? किती दुःख आहे, आध्यात्मिक दुःख आहे. शरीरामध्ये व्याधी उत्पन्न झाल्यानंतर होणारी दुःखं, मनाच्या विरुद्ध गोष्टी घडल्यानंतर मनामध्ये उत्पन्न होणारी मानसिक दुःखं, त्याला आध्यात्मिक दुःख म्हटलेलं आहे, ती चालूच आहेत. एक ना दोन काहीतरी असतील. भौतिक दुःख आहे. अतिवृष्टी झाली, अनावृष्टी झाली, टोळधाड आली, धान्य गेलं, असे प्रसंग आहेत काही देवता कोपाने होणारी दुःखं आहेत. भूकंप झाला, अमुक झालं, तमुक झालं वगैरे अशी, एकापाठोमाग एक कोणती तरी दुःखं ठरलेली आहेत. त्याचा प्रतिकार करता येतो का? म्हणाले. हा कोण विचार करणार ? धनाकरता तुम्ही सांगता प्रल्हादजी, पण धनार्जन करणारे लोक सुखी आहेत का ? मी पाहिलं म्हणाले, नाही कोणी सुखी नाही.

पश्यामि धनिनां क्लेशं लुब्धानां अजितात्मनाम् ।
भयाद् अलब्धनिद्राणां सर्वतोऽभिविशङ्किनाम् ।।
7.13.31 ।। श्री. भा.

श्रीमंत झालेले जे लोक आहेत, प्रयत्न करणारे, त्यांना किती क्लेश आहेत ? पैसा मिळता...

***
पान २४८

...आहे तरीसुद्धा लोभ वाढतो आहे. अजून मिळालं पाहिजे, हे कमीच आहे. हे मोठं दुःख आहे. पैसा समोर आहे, घरात आहे तरी लोभ वाढल्यामुळे कमी वाटलं. कमी वाटलं की झालं दुःख. मिळालेलं जे द्रव्य आहे त्यातलं हे द्रव्य सुरक्षित कसं राहील? ही भीती वाटते आहे. रात्री झोप लागत नाही त्यांना, सर्वांच्याबद्दल अविश्वास त्यांच्या मनामध्ये असतो. अगदी आप्त, इष्ट, पुत्र, सर्वांच्या बद्दल अविश्वास आहे. माझं द्रव्य नेतील काय? राजाची भीती आहे, चोरांची भिती आहे, शत्रूची भिती आहे, आप्तेष्टांची भीती आहे. याचक येणार ते काहीतरी मागतील मला त्यांची भिती आहे. आपल्या प्राणाची भीती, द्रव्याची भीती ही दोन भीती द्रव्यार्जन करणारे, प्रयत्न करणारे जे आहेत त्यांच्या मनात या भीती आहेत. शरीर चांगलं राहिलं पाहिजे. मला सगळे आणखी भोग मिळाले पाहिजेत. तेव्हा या वासना सर्व अगोदर कमी झाल्या पाहिजेत. अर्थवासना गेली पाहिजे आणि प्राणाबद्दलही तितकी आस्था उपयोग नाही. याकरता मी दोन गुरु केले म्हणाले. संतोषाने राहाणे.

मधुकारमहासर्पौं लोकेऽस्मिन्नौ गुरूत्तचौ ।
वैराग्यं परितोषं च प्राप्ता यच्छिक्षया वयम् ।।
7.13.34 ।। श्री.भा.

मधमाश्या आणि अजगर दोघांना गुरु केलं म्हणाले. मधमाश्या पुष्कळ फुलांवर हिंडतात. रस गोळा करतात. एक मधाचं पोळं तयार करतात. मध साठवितात. संग्रह करतात. स्वतःही भोग घ्यायचा नाही, दुसऱ्यालाही द्यायचा नाही. त्यांनी साठवून ठेवलेला सगळा मध दुसराच कोणीतरी घेऊन जातो. त्या अंगावर आल्या तर त्यांना मारून टाकतात. म्हणजे संग्रहापेक्षा वैराग्य हे चांगलं म्हणाले. इच्छाच जर केली नसती तर संग्रहाकरता प्रयत्न कसा केला असता? आणि सर्व संग्रह जातो त्यामुळे पुन्हा दुःखामध्ये निराश व्हावं लागतं. त्यामुळे हा प्रयत्नवाद जो पाहिला मी, त्यामुळे इच्छाच नको, इच्छा करून प्रयत्न करायचा ते मिळवायचे अन् ते जायचं, काय उपयोग आहे? इच्छा करायची नाही तर मग आपल्याला सर्व व्यवस्था कशी होणार? राहायला पाहिजे घर, त्याचप्रमाणे अन्न, वस्त्र, सगळं पाहिजे. तर त्याच्याकरता अजगराला गुरु केले म्हणाले. संतोष त्याच्याजवळ आहे, तो काही प्रयत्न करत नाही. पडून राहिलेला असतो अजगर. जवळ कोणी आल्यानंतर त्याला घेतोय. क्षुधा शांत करतोय. नाहीतर स्वस्थ पडून राहतो. त्याच्यापासून मी संतोषाचं शिक्षण घेतलं. मूळ कारण आणखी निराळंच आहे. आनंदरूप मी आहे हे प्रत्यक्ष समजून आल्यामुळे प्रवृत्तीच बंद झाली. तृप्ती झालेली आहे. दुःखाचा काही प्रसंगच नाहीये. संग्रह केल्यानंतर तो कोणीतरी नेला तर दुःख होणार. संग्रह नाही, प्रयत्न नाही. आनंद मिळालेला आहे. हे प्रथमपासूनच अगदी सगळी अशी स्थिती आहे. कार्यकारणभाव यांचा वेगळा आहे. व्यवहारामध्ये प्रयत्न करत...

***
पान २४९

...नाही म्हणजे मी मनापासून काही करत नाही. कारण हा आमचा कार्यकारणभाव अनुभवसिद्ध झालेला आहे. प्रयत्नाचं फळ पदरात पडत नाही. अन्न एखादे वेळेला थोडं मला मिळते तेही मी घेतो. एखाद्यावेळेला भरपूर अगदी पोटभर मिळतं. तरी त्यावेळीही संतोष आहे. चांगलं पक्वान्न मिळालं, भाजीभाकरी मिळाली तरी दोन्ही वेळेला अंतःकरणाची स्थिती बिघडत नाहीये. एवढंच का? तेवढंच का? काही वाटत नाही. कोणी श्रद्धेनं, आदराने, आणून देतात. कोणी काय बुवा आमच्या इथे गावात राहिला इथे जवळ आलेलाय, द्या याला. कोणी. अपमान करून देतात. तिकडे लक्ष द्यायचं नाही. यदृच्छेने जे प्राप्त होईल, अयाचित वृत्तीनं ते घेतो मी. वस्त्राबद्दल - उत्तम भरजरीची वस्त्र, रेशमी वस्त्र मला एखाद्या वेळेला कोणीतरी देतात. त्याच्याबद्दलही काही वाटत नाही मला. एखाद्यावेळेला, वस्त्र मिळतही नाहीत, वल्कल धारण करावी लागतात.

।। दिग्ध्भुक्त तुष्टधीरहम् ।।
7.13.39 ।। श्री. भा.

हे सांगताहेत अवधूत जे काही पूर्वीचं संचित असेल, कर्म केलेलं असेल. त्या कर्माचं जे फल मिळतं आहे. त्याला सामोरं जाणं, संतुष्ट राहाणं, हे मी ठरविलेलं आहे. मनालाही शिकवण दिलेली आहे. "आत्ता मी इथं झाडाखाली पडलेलोय म्हणाले. असा मी एखाद्या वेळेला जमिनीवरही पडून राहीन.

क्वचित् प्रासादपर्यङ्के कशिपौ वा परोच्छ्रये ।।
7.13.40 ।। श्री. भा.

एखाद्या वेळेला पूर्व कर्माने मोठ्या राजवाड्यामध्ये मोठ्यामोठ्या गाद्यागिरद्यावर निजण्याचा मला प्रसंग येतो. पलंगावरही मी पडून राहतो. पण हेच माझं राहावं असं मला कधी वाटत नाही. अरण्यामध्ये जाऊन पडण्याचा प्रसंग आला तरी ते सुख गेलं, राजवाड्यात होतो, बरं होतं हे कधीही नाही. स्नान उत्तम प्रकारचं मला घालतात लोक, वस्त्र देतात, अलंकार घालतात, रथामध्ये, घोड्यावर सगळ्या अशा रीतीनं मी संचार करतो हत्तीवर बसून. कुठं एखाद्या वेळेला काही वस्त्र सुद्धा नाही, पडून राहतो. ही शरीराची जी स्थिती आहे, पूर्वकर्माप्रमाणे, हे सगळे सिद्धांत पक्के झालेले आहेत ज्ञानी मनुष्याचे. हा एक बुद्धीवाद, विचार करण्यासारखा आहे. पूर्वकर्म मान्य केलं पाहिजे. पूर्वजन्मही मला होता, आत्ताही आहे. पुढंही येणार आहे. हे सगळं मान्य करून त्यांनी कार्यकारण भाव ठरविलेला आहे. कोणाचीही निंदा मी करीत नाही. कुणाचीही स्तुती करीत नाही. त्यात पडायचंच नाही. शत्रू-मित्र भाव निर्माण करण्यासाठी ही साधनं आहेत. सर्वांचं कल्याण ईश्वराने करावं सर्वत्र एक तोच परमात्मा आहे. दुसरा आहे कोण? अशा वृत्तीनं मी वागतो म्हणाले.

***
पान २५०

व्यवहारामध्ये सुद्धा जे काही मिळेल त्याला वैराग्य म्हणजे अतिरेक नाही. काहीच मला नको आहे. मी घेणार नाही. तेही घेतो जे मिळेल त्याच्यामध्ये. असा माझा आचार आहे प्रल्हादा!

हे लोकांनाही मान्य होणार नाही आणि शास्त्रामध्येही असं सांगितलेलं नाही. पण मनाची भूमिका स्थिर करावी एवढं शास्त्र सांगतेय. ती स्थिर करण्याकरिता मी ही मनाची वृत्ती अशी ठेवलेली आहे. वर्णाश्रमी याला म्हणतात. वर्णधर्मही नाही, आश्रमधर्मही नाहीत. कसेही वागतात. असं लोक मला म्हणाले. परमहंस, ज्ञानी महात्मा, त्याचे धर्म कसे असतात हे प्रल्हादजींना समजलेलं आहे. ते मोठे राजे होते प्रल्हादजी आणि भक्त होते. आनंद झाला, अवधूतांची पूजा केली प्रल्हादजींनी आणखी त्यांची अनुज्ञा घेऊन ते राजधानीमध्ये परत आलेले आहेत.

धर्मराज विचारतात नारदा, ""आमच्यासारखे गृहस्थ जे आहेत यांनी कसं आचरण करावं ते आम्हाला सांगा. संन्यासी लोक कसे कसे वागतात, कसे कसे आनंदाने राहतात, शरीर असेपर्यंत आनंद आहे. शरीर गेलं तरी पुन्हा जन्म नाही, पुन्हा देह नाही, सगळी दुःखं जातात. शरीर असलं तरी सुद्धा दुःख त्यांना होत नाही. सर्वही मान्य करण्याची सवय मनाला झालेली आहे. दुःखाची स्थितीही मान्य आहे. सुखाची स्थितीही मान्य आहे. सुख अधिक व्हावं अशीही इच्छा नाही दुःख गेलं पाहिजे असंही नाही. जाणार आहे सगळंच जाणार आहे. हा सिद्धांत पूर्ण पक्का आहे. दुःखही कायमच राहणार नाही पण सुखही कायमच राहणार नाही. हि मात्र मनाची तयारी होत नाहीये. सुख मिळाल्याबरोबर जास्तीत जास्त आपण सुखी आहोत, अहंकारादिक विकार वाढतात, ते ही नाही.

हे संन्यासाशांचं बरोबर सांगितलं म्हणाले, आमच्यासारख्या गृहस्थाश्रमी पुरुषाला असं कसं वागता येईल? नारद सांगताहेत धर्मा,

गृहेषु अवस्थितो राजन् क्रियाः कुर्वन् गृहोचिताः ।
वासुदेवार्पणं साक्षात् उपासीत महामुनीन् ।।
7.14.2 ।। श्री. भा.

गृहस्थाश्रमी पुरुषाला कर्मत्याग करता येत नाही म्हणाले, अनेक कर्म आहेत. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत अनेक प्रकारची कर्म शास्त्राने सांगितलेली आहेत. जबाबदारी आहे, पत्नी आहे, पुत्र आहे, आप्त इष्ट आहेत. समाजाचे कार्य आहे. सगळीकडे त्याला लक्ष द्यायला पाहिजे. त्यांनी कर्म करायची. आपल्या गृहस्थाश्रमाला योग्य जे काही कर्तव्यकर्म आहेत, ती त्यांनी करायची पण ईश्वरार्पण बुद्धी ठेवावी म्हणणे. म्हणजे तो त्यातून मुक्त होतो.

« Previous | Table of Contents | Next »