श्रेष्ठ महात्मे जे आहेत, त्यांची संगती करावी, त्यांची सेवा करावी. भगवंताच्या दिव्य कथा, दिव्य लीला त्याने ऐकाव्यात श्रद्धेनं, आणि सत्संगतीच्या योगाने स्त्री-पुत्र, आप्त इष्ट, सर्व ठिकाणीचा जो संग आहे आसक्ती जी आहे, ती कमी करण्याचा प्रयत्न करावा. सोडायचं नाही. पण मानसिक आसक्ती कधी धरायची नाही. आसक्तीमुळे भीती उत्पन्न होते. हे राहील कसं? राजा येईल काय? कोणाचा छापा येईल काय? ही भीती आसक्तीमुळे उत्पन्न होते. सर्वही ईश्वराचं आहे. ही ईश्वरार्पण बुद्धी आहे. ही जर खरी पक्की झालेली असेल तर भीती नाही. त्याचप्रमाणे आणखी एक नारद सांगताहेत, पुष्कळ आप्त इष्ट मंडळीही आपली आहेत आई बाबा आहेत, मुलं आहेत, बंधू आहेत, मित्र आहेत. जे जे सांगतील ते लोक अशी सगळी आपली मंडळी त्यांची जी जी इच्छा असेल, जे जे ते आणखी बोलून दाखवत असतील. "अनुमोदेत निर्ममः' त्या सर्वांना अनुमोदन देण्याचा एक अभ्यास आहे. चांगलंय, तुमचं म्हणणं योग्य आहे. काय व्हायचं ते क्रमाने होईल म्हणा. म्हणजे आग्रह उपयोग नाही. आग्रहरहित बुद्धी जर ठेवली, तो एक अभ्यास झाला तर संसारी मनुष्यालाही काही दुःखं होणार नाहीत. जे जे काही द्रव्य आहे, त्या द्रव्याचा उपयोग जो आहे. आपण त्याचा भोग घ्यायला हरकत नाही. परंतु अधिक संग्रहाचा प्रयत्न करू नये. आपलं पोषण झालं, तेवढंच आपलं आहे. अधिक मिळालं पाहिजे नुसतं ठेवण्याकरता काय करायचंय? तो स्वतः मालक असून तो चोर ठरतो म्हणाले. साम्यवाद नवीन आत्ता आलेला नाहीये आणि कायद्याने तो सिद्ध होणार नाहीये. हा साम्यवाद आहे खरा. अधिक संग्रह करणारा तोच चोर आहे, असं शास्त्रकार म्हणतात. हे कुणी वाचलेलं आहे आणि कुणी समजून घेतलं आहे? सर्वही प्राणी, केवळ मानवाबद्दल दया आहे असं नाही. केवळ मानवालाच सहाय्य करणार असं नाही. पशु, पक्षी सर्वही आपलेच आहेत. जो जीव आहे त्या जीवाची दुःखं दूर करण्याचा प्रयत्न किंवा त्यांच्याबद्दल दया मनामध्ये असली पाहिजे. धर्म, अर्थ आणि काम तीन पुरुषार्थ आहेत. त्या तीनही पुरुषार्थाचा स्वीकार त्याने करावा. अर्थार्जनही करावं. विषय सेवनही करावं आणि सर्वांनाही आपल्या जवळ जे काही असेल त्यातला विभागही सर्वांनाही द्यावा त्याने. आपणही अतिथीची सेवा करावी. आपल्या स्त्रीलाही आणि अतिथीची सेवा करण्याचा आदेश द्यावा. शरीर हे किती काल आहे म्हणाले. ते पडणार आहे, जाणार आहे. त्या शरीराचा असा उपयोग झाला पाहिजे. यज्ञयागादिक कर्म झाल्यानंतर शिल्लक राहिलेलं जे द्रव्य आहे, धनधान्य वगैरे त्याने आपली उपजीविका त्याने करावी, सर्व द्रव्य आपलं आहे, सर्व ठिकाणी आपली स्वत्व बुद्धी ठेवू नये. देवांच्या करता, ऋषींच्या करता, मानवांच्या करता, पितरांच्या करता जे द्रव्य मिळविलं असेल त्या...
...द्रव्याचा उपयोग या सर्वांच्या करता करावा. कदाचित ईश्वरकृपेने दैवयोगे पुष्कळ संपत्ती मिळाली तर त्या योगाने यज्ञ याग, वगैरे करावेत. आधिदैविक विभाग जो आहे शास्त्रकारांनी सांगितलेला. अनेक देवता आहेत, त्या सर्व देवताही परमेश्वररूपच आहेत. त्यांच्या संतोषाकरता अग्निहोत्र करणं, ऋषिपूर्णमास याग करणं, सोमयाग करणं असे अनेक याग सांगितले आहेत. अग्नीच्या द्वारे सर्व देवतांना हविर्भाग मिळतो, परमेश्वरालाही तोच भाग मिळतो आहे. यानंतर गृहस्थाश्रमी पुरुषावरती दुसरी एक जबाबदारी आहे, देवता तृप्त होण्याकरता अशी कर्म करावीत. वेदोक्त कर्म आहेत, स्मार्त स्मृतींनी सांगितलेली कर्म आहेत, ती करावीत. दुसरा एक विभाग म्हणजे पितरांचा विभाग आहे. ज्या गोत्रामध्ये आपण उत्पन्न झालेलो आहोत, ते जे ऋषी आहेत किंवा आपले पूर्वज पिता, पितामह, प्रपितामह वगैरे हे सगळेही पूर्वज देवता स्वरूपामध्ये विलीन झालेले आहेत. तेव्हा भाद्रपद कृष्ण पक्षामध्ये त्यांच्या तृप्तीकरता त्याने श्राद्ध वगैरे करावे. पुष्कळ श्राद्धाचे काल आहेत. देवभक्तीप्रमाणे, पितृभक्ती करावी, ती वाढावी म्हणजे त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या कल्याण चिंतनाने आपलं कल्याण होतंय. म्हणून पितरांच्या करताही श्राद्ध एकदिवशी आपण करतो. ते सुद्धा झालं तर झालं नाही तर नाही. विसरून राहिलं तर राहिलंम आहे. दक्षिणायन सुरू झालं. उत्तरायण सुरू झालं की त्या दिवशी श्राद्ध करायला सांगितलेलं. व्यतीपात असलेल्या दिवशी श्राद्ध आहे. क्षयतिथी असलेल्या दिवशी श्राद्ध आहे. चंद्रग्रहणाच्या वेळेला, सूर्यग्रहणाच्या वेळेला. अशी अनेक प्रकारची श्राद्धं आहेत म्हणाले. तर या दिवशी आपल्या पितरांचे आशीर्वाद प्राप्त व्हावेत. कृतज्ञता बुद्धीने श्राद्ध कर्म करायचं आहे. श्राद्धाला काय अमुक इतकंच झालं पाहिजे, असंही नाहीये. पुष्कळ त्यांच्यातही बरेच प्रकार आहेत. यथाशक्ती सगळं आहे तर अशा पवित्र दिवशी स्नान करणं, जप करणं, दान करणं, देवद्विजांचं पूजन वगैरे करणं, पितरांचं वगैरे, हे सगळंही पुण्यसंपादक आहे. त्यानंतर आता तीर्थयात्रेचंही सांगताहेत. गृहस्थाश्रमी पुरुषाला तीर्थयात्रा ही सांगितलेलीय, संन्यासी तर नेहमीच फिरत असतात.
स वै पुण्यतमो देशः सत्पात्रं यत्र लभ्यते ।।
बिम्बं भगवतो यत्र सर्वमेतच्चराचरम् ।।
7.14.27, 28 ।। श्री. भा.
तीर्थ म्हणजे अशी काही ठरलेली आहेत असं नाही म्हणाले. अत्यंत श्रेष्ठ महात्मा ज्या ठिकाणी आहे, तेच तीर्थ आहे. पुण्य देश तो आहे. भगवंताचं स्वरूप आहे. सर्व चराचर भगवत्स्वरूपच आहे. अमुक स्थान चांगलं, अमुक स्थान वाईट असं नाही. ज्या ठिकाणी तपस्वी महात्मे, भगवद्भक्त महात्मे राहाताहेत, हरीच्या मूर्ती वगैरे शिवलिंग, वगैरे ज्या ज्या ठिकाणी असेल त्या...
...देशामध्ये जावं, पूजन वगैरे करावं. गंगादिक नद्या ज्या प्रांतामध्ये वहाताहेत. पुष्कळ सरोवर आहेत. कुरुक्षेत्र आहे, गया आहे, प्रयाग आहे, नैमिषारण्य आहे. त्याचप्रमाणे प्रभासक्षेत्र आहे, वाराणसी आहे, मथुरा आहे, बिंदूसरोवर आहे. नरनारायणाश्रम ही सगळी पवित्र स्थानं आहेत. त्या पवित्र स्थानामध्ये जाऊन आपलं कल्याण होण्याकरता म्हणून त्याने अर्चन करावं, दान करावं, जपजाप्य उपासनाही त्या ठिकाणी करावी. अशी पवित्र स्थानं म्हणजे तीर्थयात्रा ती ही याला सांगितलेली आहे. पितरांचं अर्चन करण्याकरता आणखी थोडसं सांगताहेत नारद. काही कर्मनिष्ठ असतात ब्राह्मण, आपलं आपलं जे काही आचरण असेल ते करत असतात. काही तपस्वी आहेत. वेदाध्ययन करण, वेदप्रवचन करणं, अशा ज्ञानामध्येच निमग्न झालेले काही असतात. ज्ञाननिष्ठांना बोलावून श्राद्ध वगैरे विधी करावा. देवस्थानी दोन ब्राह्मण अथवा पितृस्थानी तीन ब्राह्मण हा एक प्रकार आहे. अथवा दोन्हीकडे एक एक ब्राह्मण म्हणजे दोन ब्राह्मणांना बोलावून श्राद्ध करता येतं. पुष्कळ संपत्ती आहे तरी श्राद्धाच्या वेळेला जास्ती विस्तार नाही. जेवढा विधी असेल तेवढंच व्यवस्थित करायचं. ब्राह्मणाचं पूजन, अन्नदान एवढंच करायला सांगितले आहे. अधिक दाखवण्याकरता संपत्तीचा विनियोग करायचा नाही. विस्तार करायचा नाही. योग्य देशामध्ये योग्य कालामध्ये अन्नदानही करायला सांगितलेलं आहे. म्हणजे धान्य जे आहे त्या धान्याचंच अन्न बनवून ते द्यायला सांगितलेलं आहे. अन्नाचा विभाग देव ऋषी, पितर, सर्व प्राणी, आपण स्वतः, आपले लोक, या सर्वांच्या करता सांगितलेलाय. श्राद्धाच्या वेळेला किंवा इतरही वेळेलाही मांसाहार करू नये. हे ऋषींचं धान्य जे आहे, धान्याने जितकं आणखी परमेश्वराला प्रीती आहे तशीच प्रीती पशु हिंसा करून आणखी मांसग्रहण करून प्रीती नाहीये. अहिंसा हा मोठा धर्म आहे. सधर्मक पुण्य ज्यांना पाहिजे आहे, त्याने हिंसा कधीही करू नये. अधर्माचे पाच प्रकार सांगताहेत नारद महर्षी, विधर्म, परधर्म, आभास, उपमा आणि छल हे अधर्म आहेत. ते धर्मासारखे वाटतात.
धर्मबाधो विधर्मः स्यात् परधर्मोऽन्यचोदितः ।।
उपधर्मस्तु पाखण्डो दम्भो वा शब्दभिच्छलः ।।
7.15.13 ।। श्री. भा.
विधर्म म्हणजे आपल्या धर्माचा त्याग. काही अर्थ नाहीये. धर्माचरण करून काय उपयोग आहे. नास्तिक बुद्धी उत्पन्न होऊन धर्मत्याग केला म्हणजे तो अधर्म झालेला आहे. धर्मत्याग केला म्हणजे काही होत नाही असं नाहीये. धर्मत्याग म्हणजे पाप आहे. जास्ती पाप. घोर पातक हा एक अधर्म. परधर्म म्हणजे दुसऱ्याला जे काही सांगितलेलंय वागायला, भिक्षा मागावी संन्यासाला सांगितलेलं आहे. ब्रह्मचाऱ्याला सांगितलं आहे ते गृहस्थाश्रमी पुरुषांनी करू नये. तो अधर्म आहे.
त्यानंतर नास्तिक धर्म जो आहे, आभासात्मक, चांगलं बरं वाटतंय. तो वागतो तसं आपण वागावं पण तो अधर्म होतोय.
शब्दाचे अर्थ वेगळे वेगळे करून आपल्याला अनुकूल असा अर्थ त्यातून काढून वागणे हा ही एक अधर्म आहे. आभासात्मक धर्म म्हणजे आपल्या बुद्धीला जसं वाटेल त्याप्रमाणे धर्म कार्य करणं तो अधर्म आहे. पित्याच्या श्राद्धाकरता घरी काही करत नाही. सध्या ही सवय झाली आहे लोकांना. तुमच्या विद्यालयामध्ये विद्यार्थी जे आहेत, त्यांना अमुक दिवशी तुम्ही जेवायला घाला त्याकरता इतके पैसे मी तुमच्याजवळ ठेवतो. अन्नदान झालं ते पुण्य झालं. पण श्राद्ध गेलेलंय. ते पापही झालं. त्याला श्राद्ध म्हणत नाही. इच्छेने केलेलंय, विद्यार्थ्यांना जेवायला घातलं म्हणजे पित्याला मिळालं हे तुम्ही कसं ठरवलं? हा ही आभास म्हणजे अधर्म आहे. असे अधर्म जे आहेत ते सोडले पाहिजेत. त्याचप्रमाणे मला पुण्य कर्म करायचे आहे. मला यज्ञ करायचा आहे. मला उत्सव करायचा आहे. मला यात्रा करायचीय म्हणून कोणाजवळूनही द्रव्य घेऊ नये. याचना करू नये. जायचं नाही यात्रेला. यात्रेला जायचंय म्हणून द्रव्य दुसऱ्याकडून घेऊन जाणं म्हणजे पुण्य तुम्हाला काय लागणार? सगळंच पुण्य त्याला जाणार. संतोषाने निरीच्छ वृत्तीनं राहणारा जो आहे त्याला जे सुख आहे ते सुख आशा धारण करून सारखा देशोदेशाला धावणारा आणि सारखा आणखी कर्म करणारा त्याला बिल्कूल नाही.
सदा सन्तुष्टमनसः सर्वाः सुखमया दिशः ।।
7.15.17 ।। श्री. भा.
नेहमी अंतःकरणामध्ये ज्याच्या संतोष आहे. जैसी स्थिती आहे तैशपरी राहे। ही संतोष वृत्ती. हा अभ्यास ज्याचा आहे, त्याला सर्वही दिशा सुखकारक आहेत. पाणी मिळालं तरी त्याचा संतोष होतोय ना! समाधान मिळतंय. हे विषय जे आहेत हे विषय भोगणं, यामुळे हा जो विषयासक्त झालेला याची अवस्था म्हणजे कुत्र्याप्रमाणे होतो म्हणतात.
"गृहपालायते जनः,' आसक्ती ज्याच्या मनामध्ये आहे त्याच्यामध्ये आणि श्वानामध्ये काही अंतर नाही. असंतुष्ट विप्राचं तेज, विद्या, तप सगळं नष्ट होतंय. काम जो आहे, इच्छा, ह्या इच्छा संपविता येत नाहीत. भूक लागल्याबरोबर खायला मिळावं, व तहान लागल्याबरोबर पाणी मिळावं व हे सगळं जर व्यवस्था उत्तम असेल तर काही इच्छा होणार नाही, कोणी इच्छेला प्रतिबंध केला, की लगेच क्रोध उत्पन्न होतो. पण आपल्या इच्छेप्रमाणे मिळत आहे ना, मग क्रोध तरी कशाला येईल? हे दोन विकार हे असे शांत करता येण्यासारखे आहेत म्हणाले. पण लोभाचा अंत मात्र...
...कधीही होणार नाही. देशोदेश जिंकलेल्या आहेत. सगळी सत्ता मिळालेली आहे, सगळं धन मिळालेलं आहे. तरीसुद्धा लोभ हा जास्तीत जास्त वाढतो आहे तो थांबविता येणार नाही. या सर्व विकारांना कसं जिंकावं? या करता नारद महर्षी हे धर्मराजाला सांगताहेत.
असङ्कल्पाज्जयेत् कामं क्रोधं कामविवर्जनात् ।।
अर्थानर्थेक्षया लोभं भयं तत्त्वावमर्शनात् ।।
7.15.22 ।। श्री. भा.
मनामध्ये संकल्प होतो. संकल्प म्हणजे चांगलाय बुवा, हा पदार्थ बरा आहे. हा संकल्प झाल्याबरोबर तो मला मिळावा, न्यायाने नाही तर अन्यायाने. हे सगळं वाढत जातं. संकल्पच कमी झाला तर चांगलं अनं वाईट म्हणायचा काय अधिकार? मनाची ती सवय आहे. इंद्रियांनी डोळ्यांनी फक्त तो दिसतो तो चांगला आहे. संपादन केला पाहिजे, मिळविला पाहिजे. ही सगळी मनाची कामं आहेत. त्या मनातला संकल्प जर बंद करता आला तर, काम बंद होतो. इच्छाच संपल्या आहेत आणि काम कमी झाला म्हणजे क्रोध कमी होईल. इच्छा बलवत्तर झाली आणि कोणी प्रतिबंध केल्याबरोबर "कामात् क्रोधो भी जायते' माझ्या इच्छेच्या विरुद्ध वागणारा त्याच्याबद्दल राग येतोच. ठरलेलंय. काम कमी झाल्यानंतर क्रोधही कमी होतो.
लोभाचंही त्यांनी निवारण करण्याचं साधन सांगितलेलंय.
अर्थ चांगला आहे. संकल्प कमी झाला परंतु चांगला आहे असं नाही. त्याच्यापासून अनर्थ फार आहे. हे पाहिलं पाहिजे. हा विचार केला पाहिजे. किती अनर्थ, झोप नाही, भीती आहे, एकमेकाबद्दल अविश्वास आहे. हे सगळे अनर्थ अर्थापासून उत्पन्न होताहेत. हे जर मनाला पटलं तर लोभ कमी होतो. भीती आहे खरं काय आहे? तत्त्वचिंतन केलं पाहिजे.
"वाजे पाउल आपले, म्हणे मागे भूत आले'. समर्थ सांगताहेत. आपलीच पावलं वाजताहेत आणि भूत आलं म्हणून वाटतं. काय खरं काय आहे ? याचा विचार केला म्हणजे भीती हीन होते. शोक, मोह, दंभ. हा दंभ जो आहे - आपण केलेलं पुण्य हे आपल्या मुखानी सांगणं, आत्मधर्म आपल्या मुखानी सांगणं, चांगलं आपण केलेलं आपल्या मुखानी सांगणं, याला दंभ म्हणतात. हा दंभ जाण्याकरता "महदुपसया' श्रेष्ठ महात्मे यांची संगती धरावी. कितीही परोपकार, कितीही मोठी कामं त्यांच्याकडून घडत असतात सारखी, परंतु कधीही वाणीतून एक शब्द येत नाही. आम्ही इतकं याला दिलं. आम्ही इतका उपकार केला. देवाच्या कृपेनं झालेलंय. अशी ही महापुरुषांची संगती झाली की दंभ कमी होतो म्हणाले. आपल्याला लाज वाटते काय मी एवढंस...
...केलं आणि सांगायला लागलो सगळ्यांना. मी तीर्थयात्रेला जाऊन आलो. मी वारी केली. मी अमुक दान केलं. योगामध्ये येणारी जी विघ्नं आहेत, ती विघ्नंही दूर करता येतात. दयावृत्तीचा अभ्यास झाल्यानंतर भौतिक दुःखं दूर होताहेत. योगाभ्यासाने आध्यात्मिक दुःखं दूर होताहेत. सात्विक आहार विहार ठेवल्यानंतर निद्राही कमी होते. असे सगळे उपाय सांगितले. ह्या प्रत्येक विकृती आहेत, विकार आहेत. कामक्रोध लोभादिक सगळ्या विकारांना या उपायांनी, या अभ्यासाने जिंकता येतं म्हणतात. पण शेवटी नारद सांगताहेत.
एतत् सर्वं गुरौ भक्त्या पुरुषो ह्यञ्जसा जयेत् ।।
7.15.25 ।। श्री. भा.
गुरुभक्ती, ईश्वरभक्ती जर अंतःकरणामध्ये दृढ उत्पन्न झाली तर त्या भक्तीच्या योगाने हे सर्वही विकार जिंकता येतात. गुरुकृपेनं, ईश्वराच्या कृपेनं ज्ञान देणारे, मार्गदर्शन करणारे जे आहेत श्रेष्ठ ज्ञानी महात्मे सद्गुरू, यांच्याबद्दल ज्याला माझ्यासारखेच हे आहेत शरीरधारी, मलाही शरीर आहे, यांनाही शरीर आहे. यांनाही जेवायला लागतं, मलाही जेवायला लागतं. आपल्याप्रमाणे त्याला मर्त्य समजणारा जो आहे त्यांनी पुष्कळ ऐकलं, पुष्कळ वाचलं, तरीसुद्धा सर्व आणखी व्यर्थ आहे. "कुंजरशौचवत्' सांगताहेत नारद. हत्तीला पुष्कळ स्नान घातलं नदीमध्ये जाऊन त्या माहूताने, स्वच्छ केलं आणि परत येताना एका ठिकाणी चिखल होता. तो चिखल त्या हत्तीने आपल्या सोंडेमध्ये घेतला. आपल्या अंगावर टाकला. त्या स्नान घालणाऱ्याच्या अंगावरही टाकला. काय उपयोग त्याला स्नान घालून ? तसं व्यर्थ आहे. तर अशा प्रकारे चित्तविजय करावा, चित्ताचा निग्रह करण्याकरता हे सगळे गृहस्थाश्रम धर्म आहे. उपोषण आहेत. व्रत आहेत. वेगवेगळी सांगितलेली आहेत. हे निग्रहपर्यवसायी सगळे आहेत. दान आहे. लोभादिक आसक्ती कमी होण्याकरता दान आहे. मिळवायचं, सगळंच माझ असं समजून उपयोग नाही. त्याग हा आसक्तीला प्रतिबंध करतो. प्राणायामाचाही अभ्यास त्याने सांगितलेला असे कुणी भेटले तर त्यांच्याकडून योगाभ्यासाचंही शिक्षण घ्यावं म्हणाले. आत्मचिंतन करण्याचा अभ्यास करावा. वेळ मिळेल तर आणि त्या आत्मचिंतनाने हे विचार शांत करावेत. आणखी सांगताहेत उपाय -
भावाद्वैतं क्रियाद्वैतं द्रव्याद्वैतं तथात्मनः ।।
वर्तयन् स्वानुभूत्येह त्रीन् स्वप्नान् धुनुते मुनिः ।।
7.15.62 ।। श्री. भा.
अद्वैत बुद्धीचा अभ्यास, "भावाद्वैत' हे पहिलं अद्वैत आहे. "क्रियाद्वैत' आहे आणि "द्रव्याद्वैत' आहे. याचं स्पष्टीकरण करताहेत.
कार्यकारणवस्त्वैक्यदर्शनं पटतन्तुवत् ।।
अवस्तुत्वाद्विकल्पस्य भावाद्वैतं तदुच्यते ।।
7.15.63 ।। श्री. भा.
भौतिक पदार्थ सगळे जगामध्ये पुष्कळ आहेत. पंचभूतांपासून तयार झाले. कार्य आणि कारण असे दोन भाग त्यात आले. पंचभूतं मूळ कारण आहेत आणि त्यांच्यापासून सर्वही सृष्टीमध्ये दिसणारे सर्व पदार्थ कार्यात्मक दिसतात पण कार्य निराळे नाहीच, कारणच कार्यरूप झालेलं आहे ना! सोनंच अलंकार बनलेलं आहे. अलंकार वेगळे आहेत. अलंकार चांगले आहेत ही दृष्टी कशाला पाहिजे? कार्य कारण एकच आहे. कारणरूप पहाणं ह्याला भावाद्वैत म्हणतात. मनाच्या समाधानाकरिता, शांतीकरता हा एक अभ्यास उपयोगी आहे. क्रियाद्वैत सर्वही क्रिया एकरूप होतात. पाप पुण्य हा भेद राहात नाही हा एक अभ्यास सांगताहेत.
यद् ब्रह्मणि परे साक्षात् सर्वकर्मसमर्पणम् ।।
मनोवाक्तनुभिः पार्थ क्रियाद्वैतं तदुच्यते ।।
7.15.64 ।। श्री. भा.
शरीराने, मनाने, वाणीने सारखी कर्म चालू आहेत अखंड. अनेक जन्म झाले तरी कर्म बंद होत नाहीत. पण तीच कर्म त्यांच्यात चांगली असतात, पापही होतं, पुण्यही होतं पण हा भेद केव्हा जातो? तर जी जी कर्म आपल्या हातून घडताहेत ही सगळी कर्म त्याच्याच प्रेरणेने होताहेत. कर्ता तो आहे. पुण्याच्या वेळेला मात्र मी कर्ता आहे. पापाच्या वेळेला मी नाही. देवाने बुद्धी दिली म्हणून तसं केलं म्हणून आम्ही मोकळे होतो. असं चालणार नाही. सर्वही कर्म त्याची आहेत. ही जर बुद्धी उत्पन्न झाली तर जी कर्म होताहेत ती सगळी अद्वैत होताहेत. पापपुण्य हा विभाग त्यात राहात नाहीये. चांगले दागिने, चांगला दागिना आणून दिला सोनाराजवळ किंवा सराफाजवळ, वाईट सोन्याचाही दिला, त्याला काही नाही. ते सगळं एक त्या मुशीमध्ये घालून ते सगळं वितळवून पुन्हा नवीन दागिना बनवतोय. त्याला त्याच्याबद्दल काही नाहीये. तिथं चांगलं आणि वाईट सोनं राहिलेलं नाहीये. सगळ एक सोनं होऊन जातं. असं ईश्वराला अर्पण करणारी पापं आणि पुण्यं ही वेगळी राहातच नाही. शुद्ध होऊन जातं. द्रव्याद्वैत सांगताहेत. हा एक अभ्यास बुद्धिवादी लोकांना करण्यासारखा आहे. आणि पूर्वीची प्राचीन विचारी माणसं कशी होती? हे ही दिसतंय,
आत्मजायासुतदीनां अन्येषां सर्वदेहिनाम् ।।
यत् स्वार्थकामयोः ऐक्यं द्रव्याद्वैतं तदुच्यते ।।
7.15.65 ।। श्री. भा.
मी नोकरी करतो आहे, मी अमूक काम करतो आहे. मी सगळा पैसा मिळविलेला आहे. मी प्रमुख आहे. ही भावना झाली की संघर्ष निर्माण झाला. संपत्ती मिळविणाऱ्या मनुष्याने स्वतःकरताही या द्रव्याचा उपयोग आहे, स्त्रीकरताही आहे, पुत्राकरताही आहे. बाकीचे जे आणखी गरीब असतील, दुःखी असतील त्यांच्याकरताही हे द्रव्य आहे. माझ्या एकट्याच्या प्रयत्नाने मिळालं असं नाही. प्रयत्न आणि प्रारब्ध या दोघांचाही संबंध आहे. प्रयत्नांनी सगळ्यांनाच द्रव्य कुठे मिळतं? एखादाच लक्षाधीश होतो. सगळे का होत नाहीत? प्रयत्न सगळेच करतात. मिळालेलं जातं एखाद्याचं. तर याला कारण एक प्रारब्ध म्हणजे चांगलं कर्म जे आहे पुण्यकर्म, हेही कारण आहे. ही बुद्धी असली पाहिजे. ते पुण्यकर्म माझं एकट्याचंच आहे असा पुन्हा अहंकार उत्पन्न होतो. ही जी सगळीही मंडळी आहेत, प्रपंचामध्ये असलेली घरातली, बाहेरची या सर्वांचंही प्रारब्ध मला अनुकूल झालेलं नाही कशावरून? त्या करता ह्या द्रव्याचं स्वामित्व म्हणा विनियोग सर्वांच्याकरिता व्हायला पाहिजे. ही जर मनामध्ये बुद्धी उत्पन्न झाली तर त्याप्रमाणे आणखी विनियोग होईल. कायद्यानं होणार नाही ते. ही द्रव्याद्वैत भावना मुद्दाम करायला सांगितली आहे शास्त्रकारांनी गृहस्थाश्रमी पुरुषाला. द्रव्य मिळवणारा तो आहे. त्याने ही भावना ठेवली तर समाजाचं कार्य, राष्ट्राचं कार्य आपोआप होऊन जातंय. अशा रितीनं या तीन अद्वैत वृत्तींचा जर अभ्यास झाला संसारातून तो मुक्तच झाला. जाग्रती स्वप्न आणि सुषुप्ति या तीन अवस्थेच्या पलिकडे तो गेलेला आहे. तीन अवस्था म्हणजेच संसार आहे. चौथी अवस्था म्हणजे समाधी अवस्था आम्हाला माहितीच नाहीये. तीन अवस्थेमध्येच आपण आहोत. दमल्यानंतर रात्रीच्या वेळेला झोप आहे. स्वप्नावस्था आहे. निद्रा आहे. गाढ झोप आहे. पुन्हा जाग्रती आहे. याच्यामध्येच आम्ही पडलेलो आहोत. त्याच्यापेक्षा पलिकडची अवस्था प्राप्त करण्याकरता द्रव्याची आसक्ती कमी करावी. सर्वांचं समाधान करावं. त्या समाधानाने सुद्धा पुष्कळ अनुकूलता निर्माण होतीये. त्याकरता अनुमोदन देण्याची बुद्धी गृहस्थाश्रमी पुरुषांनी शिकावी हे आधीच सांगितलेलंय नारदांनी. संघर्ष करू नये, आग्रह करू नये, आग्रह धरू नये. आपल्या मनानी ठरविलेलं ते योग्य आहे हे कशावरून ? "बालादपि सुभाषितम्' ही भारतीय संस्कृती आहे. लहान मुलांनी सांगितलेलं ते सुद्धा मान्य करण्याची तयारी पाहिजे. मग दुसरा एखादा त्यागी जर असला, आपल्या राष्ट्राचं काम करणारा त्याच्याबद्दलही आत्मीयता का असू नये? हे एक मानसशास्त्र आहे. स्वतंत्र आहे. भारतीयांचं. त्या शास्त्राचा पूर्ण विचार करा आणखी बुद्धीवाद कोणता योग्य आहे ते विचाराने ठरविता येतंय.
नारद सांगताहेत धर्मराज
एतै रन्यैश्च वेदोक्तैर्वर्तमानः स्वकर्मभिः ।।
गृहेऽप्यस्य गतिं यायाद् राजंस्तद्भक्तिभाङ्नरः ।।
7.15.67 ।। श्री. भा.
गृहस्थाश्रम स्वीकारून राहणारा जो आहे, त्याने याप्रमाणे वागावं. आणखीही शास्त्राने सांगितलेलं आहे. श्रेष्ठ महापुरुषांनी जसं मार्गदर्शन केलेलंय त्याप्रमाणे वागणारा जो आहे तो आपल्या गृहस्थाश्रमात राहून सुद्धा संन्यासाला जी गती प्राप्त होते, ती त्याला प्राप्त होते. संन्यास न घेता भगवद्भक्तीच्या प्रभावाने. तुमचं उदाहरण आदर्श घेण्यासारखं आहे. नारद सांगताहेत. नारद स्वतः ब्रह्मचारीच आहेत. संन्यासीच आहेत. पण या पांडवांची आणखी प्रशंसा करताहेत. तुम्ही प्रभूंच्या कृपेनं या सगळ्या संकटातून तरून गेलेले आहात. अनेक यज्ञ तुमच्या हातून झाले धर्मराज तेव्हा ही सत्कर्म करावीत. भगवद्भक्ती करावी आणखी मनाचा, इंद्रियांचा निग्रह त्या योगाने होतोय. आणि आपली उन्नती करून घ्यावी. सज्जनांचा उपमर्द कधीही करू नये. श्रेष्ठ पुरुषांच्या गुणाकडे लक्ष द्यावं, दोषाकडे देऊ नये. मी ही पूर्वजन्मामध्ये गंधर्व होतो म्हणाले. उपबर्हण नावाचा गंधर्व. एकदा आणखी देवांचा यज्ञ चालू असताना हरिकथा गायन करण्यासाठी मला बोलावलं पण मी मात्र त्यामुळे सगळ्या स्त्रियांना बरोबर घेऊन मोठ्या उन्मत्त अशा स्थितीमध्ये गेलो. प्रजापती, सृष्टीकर्ते, सृष्टीचे नियंत्रण करणारे त्यांना राग आला, काय म्हणाले नम्रपणाने सगळी मंडळी आली हा आपला उन्मत्त. सगळ्या स्त्रियांच्याबरोबर असा उन्मत्तपणे. त्यानी मला शाप दिला. तू दासी पुत्र होशील. त्याप्रमाणे दासीपुत्र म्हणून मी जन्माला आलो. पण ईश्वरकृपेमुळे त्याही जन्मात मला सज्जनांची संगती मिळाली. आणि त्याही जन्मातून मी मुक्त झालो. ब्रह्मदेवांचा पुत्र म्हणून मी जन्माला आलो. तेव्हा गृहस्थाश्रमी पुरुषाचा जो धर्म आहे. आचारधर्म राजा तुला सांगितलेलाय. पापनाश या योगाने होतोय. संन्यासाला जे फळ मिळतं, जी गती, ती गती गृहस्थाश्रमी पुरुषाला सुद्धा मिळतीये. तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात पांडव. आम्ही सगळे ऋषी तुमच्या घरी मुक्काम येतो. भगवंताचं दर्शन आम्हाला या ठिकाणी होतयं. साक्षात परब्रह्म परमात्मा, मनुष्य शरीर धारण करून आलेला आहे. तुमच्याजवळ तो राहतो. तुमच्याबद्दल त्याला फार प्रेम वाटतंय कारण तुम्ही धार्मिक आहात. धर्माचरण करणारे आहात. म्हणून देवाचं प्रेम तुमच्यावरती आहे. ब्रह्मदेव, लक्ष्मी सनत्कुमारादिक वगैरे यांनासुद्धा परमेश्वराचं काही कळत नाही म्हणाले. त्याची तुम्ही भक्तीनं आणि पूजा करता, त्याचा प्रसाद तुम्ही संपादन केलेला आहे.
शुकाचार्य सांगताहेत राजा, देवऋषी नारदांनी चार वर्णाचे आणि चार आश्रमाचे आचारधर्म धर्मराजाला याप्रमाणे त्याला कथन केले. पूजा केली धर्मराजाने त्यांची. अत्यंत आदरबुद्धी मनामध्ये उत्पन्न झालेली आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची, धर्मराज यांची अनुज्ञा घेऊन नारद महर्षी निघून गेले. धर्मराजालाही अत्यंत समाधान झालेलंय. याप्रमाणे दक्षकन्यांचे वंश. कोण कोण मोठे मोठे झाले हे सगळं खुलासा घेतलेला आहे.
स्वायंभुव मनूचा वंश राजाने ऐकला त्यांच्या कन्या काय झाल्या? त्यांच्यापासून काय झालं हे सगळं ऐकलंय. आता आणखी जे मनू आहेत झालेले हा आदिराजा मनू याचं चरित्र सांगितलं. आणखीही मनू पुष्कळ झालेलेत. ब्रह्मदेवांचा एक दिवस म्हणजे चार हजार युगं इतका काल आहे. इतकं दीर्घ आयुष्य ब्रह्मदेवांना मिळालेलं आहे. काम करण्याकरता नेमलेली जी मंडळी आहेत, ईश्वराने, त्यांची व्यवस्थाही अशी करून ठेवली आहे. एकदम हृदयक्रिया बंद पडली आणखी गेला असं नाही. अधिकारी मोठा, कायम राहणारा पाहिजे. ब्रह्मदेवांना सृष्टी करण्याचं काम दिलेलं आहे. त्यांना इतकं आयुष्य दिलेलंय. एक शतकं आयुष्य दिलेलंय. एकाहत्तर युगं इतका एकेक मनूला काल आहे म्हणाले. असे चौदा मनू होताहेत. पहिल्या मनूचं चरित्र सांगून दिलेलंय. त्याच्यानंतर त्याची कन्या देवहूति यांच्यापासून भगवंतांनी जन्म घेतला, कपिलमुनींचं चरित्र आधी सांगितलेलं आहे. दुसरा अवतार म्हणजे यज्ञ नावाचा अवतार आहे. मनुराजा हा तपश्चर्या करण्याकरता आपल्या पत्नीला बरोबर घेऊन वनामध्ये गेला. तपश्चर्या चालू आहे. भगवंताची प्रार्थना चालू आहे. चिंतन चालू आहे. इतक्यात काही राक्षस, दैत्य हे त्याला मारण्याकरता धावून आले. मनुराजाचा नातू, मुलीचा मुलगा यज्ञ हा अवतार भगवंताचा, त्यानी लगेच त्याठिकाणी येऊन त्या दैत्यांचा नाश केलेलाय. सर्वही देवांना संरक्षण दिलेलं आहे. आणखी मनुराजाचही संरक्षण केलं.
दुसरा मनू झालेलाय स्वारोचिष. त्यालाही मुलं झाली. रोचन नावाचा इंद्र त्या ठिकाणी त्या मन्वंतरामध्ये झालेलाय. आणखी विभू नावाचा भगवंतांचा अवतार त्या मन्वंतरामध्ये झाला. प्रत्येक मन्वंतरामध्ये एक एक इंद्र आहे. एक एक भगवंतांचा अवतार आहे. इंद्राला साहाय्य करणं, सर्व देवांचं संरक्षण करणं ही कार्य ते करतात. हा विभू नावाचा जो अवतार झाला त्यांच्याजवळ राहून ८८ हजार ऋषिनी ब्रह्मचर्य व्रत कसं आहे? त्याचं फल काय आहे? त्याचं साधन काय आहे? स्वरूप काय आहे? हा सगळा अभ्यास केला म्हणणे. ब्रह्मचर्य म्हणजे यज्ञ आहे. हा सगळा अभ्यास त्यांच्याजवळ केला.