« Previous | Table of Contents | Next »
पान २६१

तिसरा मनू उत्तम नावाचा आहे. प्रियव्रताचा पुत्र. वसिष्ठाची सात मुलं. हे ऋषी त्यावेळेला आहेत. प्रत्येक मन्वंतरामध्ये सप्तर्षी वेगवेगळे आहेत. एकाहत्तर युगं मनुराजा आहे. त्याचे पुत्र आहेत. इंद्र आहे. हे सप्तर्षी प्रत्येक मन्वंतरामध्ये वेगवेगळे असतात. सत्यसेन नावाचा भगवंताचा अवतार त्या मन्वंतरामध्ये झाला. अनेक यक्ष, राक्षस जे आहेत दुर्जन, सर्वांचा द्रोह करणारे त्यांचा त्यांनी नाश केलेलाय. इंद्राला सहाय्य केलेलंय. चौथा उत्तमाचा बंधू मनू तामस नावाचा झालेला आहे. त्या मन्वंतरामध्ये देवही अनेक झाले. इंद्र झाले. आणखी हरी नावाचा अवतार त्या मन्वंतरामध्ये झाला.

येन गजेन्द्रो मोचितो ग्रहात् ।।
8.1.30 ।। श्री. भा.

त्या हरींनी त्या मन्वंतरामध्ये गजेंद्र संकटामध्ये सापडलेला असताना मगरीपासून त्याचं संरक्षण केलं. हे ऐकल्याबरोबर परीक्षित राजाने विचारलं, महाराज हे गजेंद्रमोक्ष आख्यान मला सांगा. कसं हे पुण्यकारक आख्यान आहे. त्याला मुक्त कसं केलं? हे सर्व मला सांगा. शुक्राचार्य म्हणतात.

आसीद् गिरिवरो राजन् त्रिकूट इति विश्रुतः ।
क्षीरोदेनावृतः श्रीमान् योजनायुतमुच्छ्रितः ।।
8.2.1 ।। श्री. भा.

क्षीरसमुद्रामध्ये एक त्रिकूट नावाचा मोठा पर्वत आहे. चारी बाजूला क्षीरसमुद्र आहे. मोठा उंच आहे. पसरलेलाय सर्व बाजूंनी. अनेक रत्नं त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यावरती आणखी मोठी मोठी अरण्यं आहेत. त्यापैकी एका अरण्यामध्ये एक मोठा गजेंद्र राहतो आहे. तिथे पुष्कळ हत्ती आहेत. हत्तिणी आहेत. लहान लहान हत्ती आहेत. पुष्कळ त्याचा कळप होता. तो त्या अरण्यामध्ये गजेंद्र फिरतो आहे. सगळीही हरीणं वगैरे जी आहेत ही त्याच्या जवळ येऊन राहिलेली आहेत. सिंहाची, वाघाची त्यांना काहीही भीती नसायची. गजेंद्राच्या भीतीने सिंह, वाघ दुसरीकडे पळून जात होते. असा त्याचा धाक होता. तो गजेंद्र एकदा उन्हाळा असल्यामुळे त्याला तहान लागलेली आहे. मोठं एक सरोवर त्याला समजलेलं आहे. त्या सरोवरामध्ये पाणी पिण्याकरीता तो गजेंद्र आलेला आहे. आत उतरून तो पाणी प्यायला. पाणी प्यायल्यानंतर वर यायचं. तिथच पाण्यामध्ये राहून आपल्या सोंडेमध्ये पाणी घ्यावं आणि तीरावर उभे राहिलेले हत्ती, लहान हत्ती, स्त्रिया वगैरे हत्तिणी सगळ्यांच्या अंगावर तो पाणी टाकायला लागला. काय संकट आपल्यावर आलेलं आहे इकडे त्याचं लक्ष गेलेलं नाही. त्याच सरोवरामध्ये मोठा एक मगर राहात होता. हत्ती पाण्यामध्ये उभा...

***
पान २६२

...आहे. सोंडेने पाणी टाकतो आहे. त्या मगरीने जाऊन एकदम त्याचा पाय आपल्या मुखामध्ये धरला आणि त्याला आत ओढायला सुरुवात केलेली आहे. तो मोठा बलवान मगर आहे. हत्तीनेही वर येण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. हत्तीही बलवान आहे. तो मगरही बलवान आहे. एखाद्या वेळेला हत्तीने बरच वर यावं. पुन्हा त्या मगरीने त्याला आत ओढून न्यावं. तीरावर उभे राहिलेले सगळे हत्ती, हत्तिणी, ती लहान-लहान हत्तीची मुलं सगळी दुःखी झालेली आहेत. ह्याची सुटका आता कशी करायची? बाहेर येण्याचा प्रयत्न तो गजेंद्र करतो आहे. आत त्याला ओढून नेण्याचा प्रयत्न तो मगर करतो आहे. किती काल गेला असेल राजा?

समाः सहस्रं व्यगमन् महीपते ।।
8.2.29 ।। श्री. भा.

एक हजार वर्षाचा काल गेलेला आहे. दोघेही शक्तिसंपन्न आहेत. सर्व देवांनासुद्धा आश्चर्य वाटलं की काय याचं बल आहे. सामर्थ्य आहे. परंतु शेवटी गजेंद्र हा काही जलचर प्राणी नाहीये. बाहेर राहणारा आहे. त्याची शक्ती कमी कमी झाली. आणखी तो आत आत ओढू लागलेला आहे मगर. आणि हा आत जायला लागला. बाहेर येण्याची शक्ती त्याची संपलेली आहे. आपण आपली सुटका करून घेऊ शकत नाही ही खात्री त्या गजेंद्राला झाली. हे माझ्या बरोबर आलेले हे गज मोठे मोठे आहेत पण तेही मला मुक्त करू शकत नाहीत. हा मगर म्हणजे सृष्टीकर्त्याचा पाशच आहे. तो मला घेऊन जाणार आहे. सर्वही विश्वाला उत्पन्न करणारा, संरक्षण करणारा, सर्व सत्ताधीश जो आहे त्यालाच आपण शरण गेलं पाहिजे. तोच माझं संरक्षण करण्याला समर्थ आहे. असा अत्यंत आर्त झालेला भक्त आहे. संकटामध्ये सापडलेला. त्याने भगवंताची स्तुती त्यावेळेला केली. मनामध्ये भगवंताचं स्वरूप आणलेलं आहे. आणि तो स्तुती करतोय.

ॐ नमो भगवते तस्मै यत एतच्चिदात्मकम् ।
पुरुषाय आदिबीजाय परेशाय अभिधीमहि ।।
8.3.2 ।। श्री. भा.

भगवान श्रीहरी जो परमात्मा आहे, सर्वव्यापी, सर्व विश्वाला कारण असणारा, त्या परमेश्वराचं मी ध्यान करतो आहे, चिंतन करतो आहे, आवाहन करतो आहे. संपूर्ण विश्व ज्याच्या अधिष्ठानामध्ये आहे, ज्याच्या आधाराने चाललेलं, सर्व लोकांना सर्व विश्वाला उत्पन्न करणारा संरक्षण करणारा, संहार, पुन्हा उपसंहार करणारा असा तो परमात्मा आहे. त्याच्या कृपेने मी या संकटातून मुक्त व्हावं असंही तो सांगतो आहे. त्यांनी माझ्यावर दया करावी आणि मला या मगरीच्या पाशातून मुक्त करावं. तो अत्यंत दयाळू आहे. सर्वांचं संरक्षण करणारा आहे. हे या संसारामध्ये आसक्त झालेले...

***
पान २६३

...लोक त्यांना त्याची प्राप्ती होत नाही. मुक्त ज्यांचं चित्त आहे त्यांच्या हृदयामध्येच तो परमात्मा प्रकाशित होतो आहे. त्याला माझा नमस्कार असो. अशी पुष्कळ स्तुती केलेली आहे. परमेश्वराची स्तुती गजेंद्राने केली. पुनर्जन्म मानल्याशिवाय आपल्याला याचा विचार करता येत नाही. हत्तीनं स्तुती कशी केली? आणि ही अशी स्तुती? सर्व विश्वाला जो आधार आहे; सर्वांचं कार्य करणारा सर्वव्यापी, सर्वज्ञ हे ईश्वराचं स्वरूप जाणून तो करतो आहे. म्हणजे गजेंद्राला ही बुद्धी कशी उत्पन्न झाली? त्यांनी अशी स्तुती केल्यामुळे देव कुणी आले नाहीत. प्रत्येकाला आपल्या नावाचा, रूपाचा अभिमान आहे. माणसालाच आहे असं नाही. देवांनाही आहे. कारण देवही जीवच आहे. त्यांना वाटलं आपल्याला कुठे यानं बोलावलेलं आहे. ते आले असते तर ते याला मुक्त करू शकले असते. आम्हाला बोलावलं नाही म्हणाले आम्ही कशाला जायला पाहिजे. याने सामान्य आवाहन केलं. सर्व स्वरूपी जो परमात्मा आहे त्याने मला मुक्त करावं. मग सर्वरूपी सर्वात्म स्वरूप असणारा परमात्मा श्रीहरी गरुडावर बसून आलेले आहेत. आकाश मंडळामध्ये आलेले आहेत. मगरीने त्या गजेंद्राला आत घेतलेलं आहे. आता बुडून जाणार गजेंद्र. इतक्यात आकाश मंडळामध्ये भगवान श्रीहरी आलेले पाहिले. त्या सरोवरामध्ये असलेलं कमळ आपल्या सोंडेनं घेतलं त्याने आणखी नारायणाला अर्पण केलेलं आहे.

नारायण अखिलगुरो भगवन् नमस्ते ।।
8.3.32 ।। श्री. भा.

शेवटचा नमस्कार देवा मी आपल्याला करतो आहे. हे कमलपुष्प आपण घ्या. लगेच भगवंतानी त्याला उचलून वर ठेवलं. गजेंद्राला उचलल्या बरोबर तो मगरही वर आला. त्याचा पायच धरला होता त्याने. तीरावर ठेवलं आणि सुदर्शन चक्राने त्या मगरीचा नाश केला. गजेंद्रालाही भगवंतांचा हस्तस्पर्श झाल्यामुळे तो ही हत्तीच्या जन्मातून मुक्त झाला आणि विष्णुदूताचं स्वरूप त्याला प्राप्त झालेलं आहे. तो मगरही त्या जन्मातून मुक्त झालेला आहे. तो गंधर्व होता पूर्वी. हूहू नावाचा गंधर्व. त्याने सांगितलं देवा पूर्वी एकदा ऋषी स्नान करीत असताना त्या ऋषींना मी पाण्यामध्ये जाऊन पाय ओढले त्यांचे. त्यांच्या नाकातोंडातून पाणी गेलं. त्यांनी मला शाप दिला की तू मगर होशील. त्या शापातून आपण मला मुक्त केलेलं आहे. गजेंद्रही मुक्त झालेला आहे. त्या गजेंद्राला बरोबर घेऊन भगवान श्रीहरी वैकुंठ लोकाला गेलेले आहेत. असं हे आख्यान निवेदन केलेलं आहे. त्याच्या पुढं रैवत मन्वंतर आहे.

पञ्चमो रैवतो नाम मनुः ।।
8.5.2 ।। श्री. भा.
***
पान २६४

त्याही वंशामध्ये त्या मन्वंतरामध्ये "वैकुंठ" नावाचा अवतार भगवंतांनी धारण केलेला आहे. आणि त्यांनीच लक्ष्मीच्या इच्छेप्रमाणे "वैकुंठ" लोकाची रचना केली. वैकुंठ लोक म्हणतात. परंतु "वैकुंठ" हे परमेश्वराचं नाव आहे. त्याच्यामुळे वैकुंठ लोक असं नाव झालं. त्यांनी काय काय केलं? सनत्कुमारांनी येऊन जयविजयांना शाप दिला. त्या वैकुंठलोकी. भगवान विष्णूंनी सनत्कुमारांनाही आश्वासन दिलं आणि तीन जन्मांनी पुन्हा ते जयविजय आले. पूर्वी त्यांचे चरित्र राजा सांगितलेलं आहे.

सहावा मनू "चाक्षुष" नावाचा आहे. या चाक्षुष मन्वंतरामध्ये इंद्र झालेला आहे, मंत्रद्रुम नावाचा. सप्तर्षीही त्या ठिकाणी आहेत. वैराजाची संभूती नावाची स्त्री. तिच्यापासून भगवंतांचा जो अवतार झाला तो "अजित" नावाचा अवतार झालेला आहे. त्या अजित परमात्म्याने देवदैत्यांना एकत्र करून समुद्रमंथन केलेलं आहे. समुद्रमंथन करीत असताना तो डोंगर समुद्रामध्ये बुडू लागला. पुन्हा कूर्मरूप धारण केलं. आपल्या पाठीवर तो पर्वत घेतलेला आहे. आणि समुद्र मंथन करून अमृत प्राप्त करून दिलं देवांना. राजाने विचारलं, महाराज हे समुद्रमंथनाचं जे आख्यान आहे, चरित्र आहे भगवंताचं ते आपण मला सांगा म्हणाले. ऐकायचं आहे. भगवंतांची लीला कितीही ऐकली तरी मनाचं समाधान होत नाही. सांगा.

शुक सांगतात राजा, देवदैत्यांची लढाई नेहमी असायची. कोणाचा विजय व्हायचा. कोणाचा पराजय व्हायचा. पराजय झाल्यानंतर पुन्हा त्यांनी प्रयत्न करून पुन्हा लढाई करायची. एकदा देवांचा पराजय दैत्यांनी केलेला आहे. दुर्वासऋषींचा शापही देवांना झाला. आणि आपल्या गुरूंना म्हणजे शुक्राचार्यांची सेवा करून बलवान झालेल्या दैत्यांनी देवांचा पराजय केला. निःस्तब्ध झाले सगळे, तेजोहीन सगळे देव झालेले आहेत. भगवान श्रीहरींची कृपा संपादन करावी म्हणून तिकडे गेले. देवाची प्रार्थना करताहेत. मेरूपर्वतावरती ब्रह्मदेवांच्या सभेमध्ये जाऊन त्यांनी सर्व वृत्तांत निवेदन केला. मग ब्रह्मदेव त्यांना घेऊन आलेले आहेत. भगवान श्रीहरींची स्तुती ब्रह्मदेवांनी केलेली आहे. ती मोठी स्तुती आहे. सर्वांना आणखी त्याच्या कृपेनं आणखी पूर्ण संपन्नता लाभते आहे. सर्वही एकंदर मोठी मोठी देवरूप काय? गंधर्वरूप काय? मानव. सगळी रूपं तो झालेला आहे. त्यांनी आमच्यावरती प्रसन्न व्हावं आमची संकटं दूर करावीत.

प्रसीदतां नः स महाविभूतिः ।।
8.5.36 ।। श्री. भा.
***
पान २६५

अशी मोठी स्तुती आहे. प्रसन्न झाले भगवान. त्यावेळेला दर्शन त्यांचं झालं. सर्व देवांना, ब्रह्मदेवांना आनंद झाला. पुन्हा ब्रह्मदेवांनी स्तुती केली. आणि भगवान श्रीहरी बोलू लागले. "देवहो मी सांगतो त्याप्रमाणे आपण वागा म्हणाले.

यात दानवदैतेयाः तावत् सन्धिर्विधीयताम् ।।
8.6.19 ।। श्री. भा.

तुम्ही दैत्यांच्याकडे चला आणि त्यांच्याबरोबर संधी करा. तह करा. युद्ध थांबवा. काल अनुकूल आहे दैत्यांना. आज तुम्हाला काल अनुकूल नाहीये. तुम्ही नम्रपणाने त्यांच्याजवळ जाऊन युद्ध बंद करा. शत्रूबरोबर सुद्धा संधी करायला पाहिजे म्हणाले, राजनीती आहे. आपलं कार्य हे सिद्ध होण्याकरता, कार्य पूर्ण होण्याकरता, शत्रूबरोबरही मैत्री करावी लागते. काम झाल्यावर पुढे कसं वागायचं ते ठरवायचं. आता प्रथम असं करा. सर्व दैत्यांशी तुम्ही मैत्री करा आणि तुम्ही दोघांनी मिळून अमृत उत्पन्न करण्याचा प्रयत्न करा. कसं अमृत उत्पन्न करायचं? याची कर्तव्यता सांगातहेत. क्षीरसमुद्रामध्ये सर्वही औषधी वनस्पती टाका, मंदारपर्वत घेऊन या, घुसळण्याकरता. वासुकी नागराज त्याला वेष्टन करा. आणि तुम्ही दोघांनी मिळून हे अमृत उत्पन्न होण्याकरता समुद्रमंथन करा. माझं तुम्हाला सहाय्य आहेच म्हणाले. त्यांना अमृत मिळणार नाही. तुम्हालाच मिळेल. दैत्य जी जी इच्छा प्रकट करतील त्याला तुम्ही अनुमोदन द्या. समुद्रातून उत्पन्न झालेल्या कोणत्याही वस्तू बद्दल मला पाहिजे असं म्हणू नका. दैत्यांनी नेलं तर नेऊ दे. साममार्गाने कार्यसिद्धी ही फार उत्तम होते. क्रोधाने सिद्धी होत नाहीये हे लक्षात ठेवा. कदाचित समुद्रातून कालकूट विषही वर येण्याचा संभव आहे. पण भिऊ नका. असं सगळं समजावून सांगितलं भगवंतांनी. गुप्त झाले. ब्रह्मदेवांनी सर्व देवांना सांगितले. भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे करा. सर्वही इंद्रादिक देव बलिराजा आपल्या दैत्य सैन्यासह ज्या ठिकाणी तळ ठोकून बसला होता तिथे आलेले आहेत. इंद्रादिक देवांना आलेले पाहिल्याबरोबर ते दैत्य एकदम उठले. बरं झालं म्हणाले. कैद करू या इंद्राला. दैत्य राजा बळी हा मोठा नीतिशास्त्रज्ञ होता. हे निःशस्त्र आलेले आहेत देव. अर्थात हे काही युद्धाकरता आलेले नाहीत. त्यांनी आपल्या सर्व दैत्यांना सांगितलं स्वस्थ रहा. हे आता निःशस्त्र आलेत त्या अर्थी संधी करण्याकरता आलेले आहेत. युद्धाकरता आलेले नाहीत. हे लक्षात घ्या. आणि स्वस्थ रहा. या म्हणाले त्यांनी सर्वांचा आदर केलेला आहे. मग इंद्रांने बोलायला आरंभ केलेला आहे. आणि सगळं त्याने सांगितलं. आपण दोघे मिळून क्षीरसमुद्राचं मंथन केलं म्हणजे आपल्याला अमृत मिळेल म्हणाले. दोघांनाही अमृत मिळेल. तुमचीही शक्ती वाढेल. आमचीही वाढेल. सर्वांना पसंत पडलं ते. मग देव-दैत्यांनी त्याप्रमाणे ठरवून मंदारपर्वत त्यांनी उपटलेला आहे आणि घेऊन निघाले.

***
पान २६६

समुद्राकडे. पण एवढा मोठा पर्वत तो घेऊन जायचा म्हणजे काय किती श्रम झाले? पडला तो खाली नेताना. त्याच्या खाली काही सापडले. कोणाचे हात पाय मोडले. भगवान त्या ठिकाणी प्रकट झालेले आहेत. सर्वांना आणखी पुन्हा जीवन दिलेलं आहे. तो पर्वत उचलून गरुडावर ठेवलेला आहे. आणि समुद्रतीरावर येऊन तो समुद्रामध्ये सोडून दिलेला आहे. नागराज वासुकीला देव-दैत्यांनी बोलावलेलं आहे. तुम्हालाही काही अमृताचा भाग देऊ म्हणाले. आला तो वासुकी. तो सबंध त्या पर्वताला गुंडाळलेला आहे. समुद्राचं मंथन करायचंय. त्याला लागणारा रवी म्हणजे मंदारपर्वत आणि रवीला बांधलेली, गुंडाळलेली दोरी म्हणजे नागराज एवढा मोठा वासुकी. तो गुंडाळल्यानंतर त्या नागाच्या मुखाची बाजू भगवान श्रीहरींनी सर्व देवांना बरोबर घेऊन गेले आणि मुखाची बाजू आपल्या हातात घेतली आणि पुच्छची, शेपटाची बाजू दैत्यांनी घ्यावी म्हणून ते मुखाकडे जाऊन उभे राहिले. ते म्हणाले हे सापाचं पुच्छ आम्ही हातामध्ये घेणार नाही. अमंगल आहे. आम्हाला मुखाची बाजू पाहिजे. प्रत्येक वेळेला तक्रारी स्वभाव दैत्यांचा आहे.

देवांना ताकीद केली होती अगोदर भगवंतांनी. जी जी इच्छा प्रकट करतील दैत्य त्याप्रमाणे वागा तुम्ही. तुमचे काम होईल. आम्ही म्हणाले कश्यप ऋषींची मुलं आहोत. तपस्वी आहोत आम्ही, वेदाध्ययन केलेलं आहे. ते सापाचं पुच्छ आम्ही हातात घेणार नाही. लगेच त्या मुखाची बाजू भगवंतांनी सोडली. देवांना घेऊन ते लगेच पुच्छाच्या बाजूला गेले. हातामध्ये मुख धारण केलं दैत्य त्या मुखाच्या बाजूला, पुच्छाच्या बाजूला देव राहिलेले आहेत. मंथनाची तयारी झाली. आणि मंथनाला सुरुवात झालेली आहे. पण ते दैत्य म्हणजे अविचारी. ते मंथन, घुसळण्याचं काम सुरू झाल्याबरोबर त्या नागाच्या मुखातून श्वासोच्छ्वास बाहेर पडायला लागले. तो विषारी वारा त्या दैत्यांच्या अंगावर गेला. दैत्य मूच्छित पडलेले आहेत. आता आम्हाला ही बाजू नको असं म्हणताही येत नाही ना. अहंकार आहे. पूर्वीच त्यांना पुच्छाची बाजू दिली होती. मग भगवंतांच्या कृपेनं. वारा सुटला गार. पर्जन्यवृष्टी झाली. सगळे सावध झाले दैत्य. ते मंथन सुरू झाले असताना भगवान स्वतः ते त्यांनी हातामध्ये घेतलं. सहस्त्रबाहूरूप धारण केलं आणि मंथन चालू आहे. त्या वेळेला एकदम समुद्रातून वरच्या बाजूला विष आलेलं आहे. त्या विषाचा वारा अंगावर आल्याबरोबर देव, दैत्य मूच्छित पडले. त्यांनी हातातला साप सोडून दिला आणि लांब पळून गेलेले आहेत. काय करायचे आता? आरंभालाच ही परिस्थिती. अमृत राहिले बाजूला आणि विषच वर आले. जाताही येईना समुद्राच्या जवळ. मग ऋषिमंडळी, देवमंडळी कैलास पर्वतावर गेलेली आहेत. महादेवांना नमस्कार केला. देवा आम्ही सगळे शरण आलेलो आहोत तुला. हे त्रैलोक्याला दग्ध करणारे विष उत्पन्न...

***
पान २६७

झालेले आहे. या विषापासून आपण याचे रक्षण करा. त्रैलोक्याचे रक्षण करा. अमृतमंथनाच्या वेळेला शंकरांची आठवण झाली नाही. विष उत्पन्न झाल्यानंतर आठवण झाली. पण आलेले आहेत महादेव. त्यांचे दुःख दूर करायचे म्हणून शंकर उठलेले आहेत. पार्वतीला विचारले, जाऊ का? यांचे हे संकट दूर करायचे म्हणजे विष खायचे आहे. रक्षण करायचे आहे. ते अमृत नाहीये. पार्वती कशाला प्रतिबंध करते. शंकर म्हणजे मोठे योगी आहेत. मृत्युंजय आहेत. त्यांना विषाची काही बाधा होणार नाही. खात्री आहे. तिनेही संमती दिलेली आहे. दीन जनांचं संरक्षण करणं हा श्रेष्ठ पुरुषांचा धर्म आहे. भगवान शंकर सांगतात. आलेले आहेत. हे विष मी घेणार आहे. सर्व प्रजाजनाचं कल्याण होऊ दे. ते विष घेतलं हातामध्ये आणि सबंध विष भक्षण केलेलं आहे. काही थोडं खाली पडले. त्याच्या विषारी वनस्पती, मोठे मोठे विंचू, सर्प झालेले आहेत. त्या भयंकर हलाहल विषाने शंकरासारख्या योगीश्वरालादेखील आपला प्रभाव दाखवलेला आहे. त्या विषाने ते भक्षण करीत असताना त्यांचा कंठ काळा झाला म्हणतात. त्यामुळे "नीलकंठ" हे नाव झालेले आहे. कापूरगौर भगवान आहेत.

कर्पूरगौरं करुणावतारम् ।।

गौरवर्ण भगवान शंकरांचा आहे, भगवान विष्णूंचा वर्ण श्यामवर्ण आहे. विषाचं संकट भगवंतांनी दूर केलेलं आहे. पुष्पदंतांनी त्या महिम्न स्तोत्रामध्ये ह्या चरित्राचं वर्णन केलेलं आहे.

अकाण्ड ब्रह्माण्ड क्षय चकित देवासुरकृपा ।।

ब्रह्मांडाचा क्षय होण्याची पाळी आलेली आहे. हे आपल्याला शरण आले सगळे देव आणि आपण ते विष भक्षण केलं आणि सर्व देवांचं सर्व जगाचं रक्षण आपण केलेलं आहे.

अस्याग्रे विकृतं दृष्ट्वा तव कंठे विषं स्थितम् ।।
न कुरुते न श्रियमहो ।।
विकारोऽपि श्लाघ्यो भुवन भय भङ्ग व्यसनिनः ।।
महिम्नस्तोत्र

पुष्पदंत म्हणताहेत, भगवंता, देवांच्या संरक्षणाकरता आपण गेलात. काही आशा नाही. देव दैत्य अमृत मिळवणारत. पण तिकडे आपलं लक्ष नाही. त्यांचं संकट दूर करणार. ते विष आपण भक्षण केलं पण त्या विषाने आपला कंठ काळा केला म्हणाले पण ते पोषण झालेलं आहे.

विकारोऽपि श्लाघ्यो भुवन भय भङ्ग व्यसनिनः ।।

सर्व त्रैलोक्याचं संकट दूर करावं हे तुम्हाला व्यसन आहे म्हणाले. शंकर परमात्मा संहार...

***
पान २६८

करणारे आहेत. अशी समजूत आहे. अत्यंत दयाळू आहेत. त्यांनी सगळ्या जगाचं संरक्षण केलेलं आहे. तुमचा कंठ काळा झाला हे तुमचं भूषण आहे. सगळ्या लोकांच्या पुढं हे चरित्र आपलं येतंय ना! की एका वेळी जगाला तुम्ही वाचवलं. संकट दूर झाल्यानंतर सर्व देव-दैत्य पुन्हा गेले समुद्रतीरावर. पुन्हा त्यांनी मंथनाला सुरुवात केली. एक कामधेनू वर आलेली आहे. ऋषी मंडळींनी ती कामधेनू आपल्या जवळ घेतली. आम्हाला सगळं अग्निहोत्र वगैरे करण्याला दूध, दही, तूप वगैरे लागतं म्हणाले. त्यांनी ती घेतलेली आहे. उच्चैःश्रवा नावाचा मोठा अश्व वर आलेला आहे. तो उत्तम अश्व पाहिल्याबरोबर बलिराजाला इच्छा उत्पन्न झाली की हा अश्व आपल्या सान्निध्यामध्ये असावा. इंद्र स्वस्थ बसलेला आहे. काही बोलला नाही. बलिराजाने तो अश्व घेतलेला आहे. ऐरावत नावाचा मोठा हत्ती उत्पन्न झालेला आहे. चार दात त्याला आहेत. पांढरा शुभ्र हत्ती आहे. कौस्तुभरत्न उत्पन्न झालेलं आहे. पारिजात वृक्ष उत्पन्न झाला. स्वर्गलोकाचं भूषण कल्पवृक्ष. अप्सरा सगळ्या उत्पन्न झालेल्या आहेत. स्वर्गलोकातल्या सर्व त्या स्त्रिया. आणि नंतर लक्ष्मीदेवी उत्पन्न झाली. समुद्रातून बाहेर पडलेली आहे. सर्व देव दानव मोहित झालेले आहेत; लक्ष्मीचं स्वरूप पाहिल्यानंतर कुणी तिला आसन आणून दिलेलं आहे. कोणी आणखी तिला अभिषेक करण्याकरता जल सर्व नद्यांनी आणून दिलेलं आहे. सर्व ऋषी मंडळींनी, देवांनी तिला अभिषेक केलेला आहे. अलंकार दिलेले आहेत विश्वकर्म्याने. तिची पूजा-अर्चा सर्वांनी केली. लक्ष्मीदेवी आता आपण कोणाच्या गळ्यात माळ घालावी, कोणाचा स्वीकार करावा, असा विचार करतेय.

निराश्रया न शोभते पंडिता वनिता लता ।।

हा मनूचा सिद्धांत आहे. आश्रयाशिवाय स्त्रियांना शोभा नाहीये. संबंध राहू शकतील पण शोभा नाहीये. हे मुद्दाम सांगितलेलं आहे. न शोभते म्हणताहेत. न जीवती म्हणत नाहीत. जिवंत राहतील त्या पैसा मिळवून पण नाही. आपल्याला योग्य कोण आहे? आश्रय शोधण्याकरता पुष्पमाला हातामध्ये घेऊन लक्ष्मीदेवी निघालेली आहे. पहिल्याप्रथम दुर्वास ऋषी तिच्या दृष्टीला पडले देवीच्या. काय तपश्चर्या आहे. सगळे जग बदलून टाकण्याचं सामर्थ्य आहे. कुंतीला नुसते मंत्र दिलेले आहेत. सूर्यमंत्राचा जप केल्याबरोबर सूर्यनारायण आलेले आहेत. लगेच मुलगा झालेला आहे. इतकी सिद्धी आहे. तपश्चर्या मोठी आहे. पण

नूनं तपो यस्य न मन्युर्जयः ।।
8.8.20 ।। श्री. भा.

विचार केला लक्ष्मीदेवीने, हे मोठे तपस्वी आहेत पण राग मोठा आहे. राग काही हे जिंकू...

***
पान २६९

शकले नाही. शेवटपर्यंत त्यांच्याजवळ राहणे म्हणजे कठीण आहे म्हणाली. अगोदरच परीक्षा करून हे नंतर तक्रार करायची नाहीये नको म्हणाली. चांगले ज्ञान आहे. दुर्वासादिकांना क्रोध जय नाही म्हणून सोडून दिलेले आहे. शुक्राचार्य, बृहस्पती ज्ञान आहे. परंतु विषयासक्ती आहे. असं सगळं पाहात पाहात ती चाललेली आहे. शंकराचं दर्शन झालं. सामर्थ्य आहे. मृत्युंजय आहे. पण काय, स्मशानामध्ये काय राहतात. भस्म अंगाला लावतात. हे पसंत पडलं नाही. भगवान श्रीहरींवर दृष्टी पडलेली आहे.

वव्रे वरं सर्वगुणैः अपेक्षितम् ।।
8.8.23 ।। श्री. भा.

सुमंगल आहेत. भगवान श्रीहरी उत्तम आहेत. अलंकार आहेत. शक्ती आहे. सर्व सामर्थ्य आहे. पण आपल्याकडे त्यांची दृष्टी सुद्धा नाही. माझी इच्छा नाही म्हणाले. पण, "न मागे तयाची रमा होय दासी ।। लक्ष्मीने विचार केला. सर्व गुण संपन्न भगवान श्रीहरी आहेत. त्यांना इच्छा नसली तरी हरकत नाही. आपण त्यांची सेवा करू. म्हणून भगवंतांच्या कंठामध्ये माला घातलेली आहे. अशा रीतीने मग सर्व देवतांनी लक्ष्मीचाही सत्कार केलेलाय. भगवंतांचाही सत्कार केलेलाय. पुन्हा समुद्रमंथनाला सुरुवात झालेली असताना त्या समुद्रातून धन्वंतरी नावाचा भगवंतांचा अंश अमृतकलश घेऊन वरच्या बाजूला आलेलाय. ह्या दैत्यांनी लगेच ते मंथन करायचं सोडून दिलं. धावत गेले आणि तो अमृताचा घडा आपल्या ताब्यामध्ये घेतला आणि निघून गेले. देव पाहात राहिले. काय ठरलं होतं काय म्हणाले आपलं. दोघांनी प्रयत्न करायचा, अमृत दोघांनीही घ्यायचं आणि हे सगळं अमृत घेऊन गेले. निराश झाले सगळे देव. परमेश्वराने योजना केली. त्या दैत्यांमध्ये कलह सुरू झाला. मी अगोदर घेणार. मी समर्थ आहे. मोठा आहे. तुमचा नेता आहे. जो तो बोलायला लागला. जे दुर्बळ दैत्य होते त्यांनी सांगितलं अरे आपण पूर्वी देवांना कबूल केलंय देवांना यातला भाग द्यायचा. आणि तुम्ही एकटेच घेता? तुमचा आम्ही निषेध करतो. काय निषेध करतो. ठराव करून काय होणार आहे. दुर्बळ दैत्य याप्रमाणे त्यांना सांगू लागले आणि त्यांच्यामध्ये कलह सुरू झाला मी अगोदर घेणार. इतक्यात एक दिव्य स्त्री उत्पन्न झालेली आहे. मोहिनी तिचं नाव. सर्वांना मोहात टाकणारी. कंठामध्ये उत्तम अलंकार आहेत. पुष्पमाला सुगंधित केसामध्ये घातलेली आहे. उत्तम शुभ्र वस्त्र धारण केलेलं आहे. कमरपट्टा आहे. अशी अत्यंत सुंदर स्त्री. ही दैत्य ज्या बाजूला गेले होते तिकडं जाऊ लागलेली आहे. दैत्यांना भेटण्याकरीता म्हणणे. त्यांचं भांडण चालू आहे. माझ्या ताब्यात पाहिजे हे भांडं. जो तो म्हणतो आहे. इतक्यात ही मोहिनी जवळ आलेली पाहून सर्व दैत्य तिच्या जवळ आले.

***
पान २७०

ब्रह्मदेवांनी, सृष्टीकर्त्याने दोन ठिकाणी भ्रम निर्माण केलेले आहेत. कांता आणि कनक. या दोन्हीही ठिकाणी ज्याच्या मनामध्ये मोह होत नाही, अनासक्त जो आहे. तो साक्षात भगवान शंकर आहे म्हणाले. मनुष्य जरी असला तरी तो शंकर आहे. हे दैत्य कनक आणि कांता याशिवाय काही नाही. आले लगेच त्या मोहिनीला पाहिल्याबरोबर. कुठून आलात बाईसाहेब आपण? काय तुमचं नाव काय? आजपर्यंत आपल्या सारखी स्त्री आम्हाला पाहायला सुद्धा मिळाली नाही. बरं झालं. देवांनी तुम्हाला आमच्याकडे पाठवलं. आज आमचं भांडण सुरू झालंय. आम्ही सगळी कश्यपऋषींची मुलं भाऊ असताना आमच्यामध्ये या अमृताकरीता भांडण चाललेलं आहे. हे अमृताचं भांडं घ्या म्हणाले. तुमच्या ताब्यात आम्ही देतो आणि आम्हाला सगळ्यांना व्यवस्थित वाटून द्या. म्हणजे भांडणाचं काम राहणार नाही. मोहिनी हसलेली आहे. भगवान हसले. भगवान म्हणताहेत कश्यपांची मुलं तुम्ही म्हणाले आणि मी कोण आहे? कुठून आले? काही विचार न करता एकदम माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवताय. असं एकदम स्त्रियांवर विश्वास टाकणं बरं नाही. ऋषीपुत्र, ऋषीकुमार तुम्ही. काय आमचं अंतःकरण कसं असेल काही तुम्हाला कळलेलं नाही म्हणाले. जास्तीच त्यांच्या मनावर परिणाम झाला. नाही म्हणाले तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. हे घ्या भांडं तुमच्या ताब्यात घ्या. ते अमृतपात्र ताब्यामध्ये घेतलेलं आहे. आणखी पुन्हा ताकीद केली. मी सांगेन त्या प्रमाणे तुम्हाला वागावं लागेल. कुठं बसायचं, कसं बसायचं. काय करायचं. मी काय करेन याला तुमची संमती पाहिजे तर हे काम करेन नाहीतर हे तुमचं अमृताचं भांडं घेऊन चला. मला जरूर नाही. ताब्यात आलेल घेवून जा असं म्हणायचं. हे काय आता घेताहेत थोडेच. नाही नाही. आपण सांगाल ती आज्ञा मान्य आहे. जा म्हणाले. स्नान वगैरे करा. दानधर्म करा. अमृत प्राशन करायचंय आणि त्या बाजूला जाऊन बसा. तुमची दैत्यांची पंगत स्वतंत्र एका बाजूला असू दे. त्यांना घालवून दिलं. स्नान, दान वगैरे करून एका बाजूला दैत्यांची पंगत बसलेली आहे. इकडे देवांचीही पंगत बसायला सांगितलं सगळ्या देवांना. अमृतपात्र आणलेलं आहे. सगळ्यांना आणखी अमृत वाटण्याचं काम सुरूही झालेलं आहे. ते दैत्य वाट पाहताहेत. काही दैत्य म्हणाले उगीच त्या बाईवर आपण विश्वास ठेवला म्हणाले. ओळख नाही. पण ज्यांनी विश्वास दाखविला ते म्हणाले नाही हो तशी बाई ती नाही. येईल म्हणाले थोड्या वेळाने येईल. देवांना देत असेल. देऊ दे थोडं. सर्व देवांना अमृत वाटलेलं आहे. त्यात तो राहू नावाचा दैत्य आहे त्याला काही संशय उत्पन्न झाला. देवरूप धारण करून सूर्यचंद्राच्या मध्ये तो बसलेला आहे. त्यालाही ते अमृत मिळालं. पिऊन टाकलं त्यानी. इतक्यात सूर्य-चंद्रांनी हा आपल्यापैकी नाही म्हणून त्या मोहिनीला...

« Previous | Table of Contents | Next »