सांगितल्याबरोबर सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद केलेला आहे. ते अमृत खाली उतरलंच नाही. फक्त मस्तक तेवढं राहिलं. ग्रह झालेला आहे. त्याच्याकरता एक लगेच ग्रहमंडळ निर्माण झालं. ग्रहामध्ये त्याला अधिकार दिला. म्हणजे इतक्या जलद निर्णय घेता आला पाहिजे नेत्याला. शत्रूलासुद्धा आपलं करून घ्यायचंय. नुसतं मारून टाकलं नाही त्याला. ग्रहमंडळावरती त्याची नियुक्तीही करून टाकली. नवग्रहापैकी एक स्थान आहे. शिवभक्त आहे. राहू ग्रहाला फक्त मस्तक आहे. बाकी शरीर नाही. ते अमर झालेलं आहे. सर्व देवांना अमृत मिळालेलं आहे. त्यांचं तेज, बल वाढलेलं आहे. भगवंतांनी मोहिनीरूप गुप्त केलं. पुन्हा आपल्या मूळ रूपामध्ये भगवान प्रकट झालेले आहेत.
राजा, देव-दैत्यांनी प्रयत्न सारखेच केले, दोघांनीही अमृत प्राप्तीकरीता. पण फल मात्र देवांना मिळालं, दैत्यांना फल मिळाले नाही. भगवंताचा आश्रय ज्यांनी केलेला आहे. पूर्ण विश्वास भगवंतावर ज्यांनी टाकला, त्यांनाच ते अमृत मिळाले. आपल्याच बुद्धीने निर्णय करणारे, स्वार्थ आणि स्वार्थामध्ये बुद्धी ज्यांची आहे त्यांना ते फल मिळालं नाही. स्वतःचा प्रयत्न मोठा आहे. ईश्वर वगैरे काही मानायला तयार नाहीत. वाट पाहिली दैत्यांनी, ती बाईही गेली, अमृतही गेलं. देव मोठे उत्साही झालेले आहेत. तेजस्वी झालेले आहेत. त्यांना अमृत मिळालं. विश्वासघात झाला. काय म्हणून उपयोग काय?
"शठम् प्रति शाठ्यम्" ही नीती आहे भगवंतांची. दयाळूही आहेत. पण वाटेल त्याच्यावर दया नाहीये. पाहून दया आहे. अगोदर सांगितले देवांना तुम्ही जाऊन संधी करा. आणि दोघेही प्रयत्न करा. हे ठीक आहे. पुढं जसं ते विरुद्ध वागायला लागले. तक्रार करायला लागले, त्यावेळेला त्यांनी ठरवून ठेवले यांच्या हातात अमृत मिळायचे नाही. गेलेले त्यांनी आणून दिले ना. सर्व एकंदर दैत्य रागावलेले आहेत. युद्ध करण्याकरता दैत्य आले. नर्मदा तीरावरती देव-दैत्यांमध्ये भयंकर युद्ध झालेलं आहे. अनेक दैत्यांचा नाश देवांनी केलेला आहे. दैत्यांचा मुख्य सेनापती, बलिराजा हा ही विमानामध्ये बसून आलेला आहे. इंद्र त्याच्याबरोबर युद्ध करण्याकरता आलेला आहे. त्यांनी वज्रप्रहार करून बलिराजाचे विमान खाली पाडले. बलिराजा मूच्छित पडलेला आहे. पुष्कळ दैत्य मारले गेले. मग नारद महर्षीना ब्रह्मदेवांनी पाठवलेले होतं. नारदांनी तिथे येऊन देवांना सांगितले, तुम्हाला अमृत मिळालेलं आहे. तुम्हाला विजय मिळालेला आहे. तुम्ही दैत्यांचा व्यर्थ संहार करू नका. ब्रह्मदेवांची आज्ञा आहे. बंद करा युद्ध. इकडे दैत्यांना जाऊन सांगितले. बलिराजाला...
सांगितलं, बलिराजा, तुम्ही आता सर्व त्या अस्तगिरीवर जाऊन रहा. शुक्राचार्यांची सेवा करा. काही काळांनी शुक्राचार्यांचा प्रसाद तुमच्यावर होईल. पुन्हा तुमची उन्नती होईल. त्यांनाही सांगून पाठवून दिलेले आहे. आणि हे युद्ध बंद झालेलं आहे.
याप्रमाणे देव-दैत्यांचं युद्ध थांबलेलं आहे. देव सर्व आपल्या स्वर्गलोकाला प्राप्त झाले. ही बातमी कैलास पर्वतावर शंकरांना समजली. मोहिनीरूप धारण करून ते अमृत दैत्यांकडून घेऊन देवांना दिले भगवंतांनी. ते वैकुंठ लोकांमध्ये आले. पार्वतीमाता बरोबर आहे. गणमंडळी आहेत. भगवंतांनी त्यांचा सत्कार केला. म्हणाले या महादेवा. काय कशाकरता आलात? महादेव म्हणाले देवा, तुम्ही आजपर्यंत मोठे मोठे अवतार धारण केलेत. सगळे मी पाहिले. आज तुम्ही हा स्त्री वेष धारण केला असं ऐकलं मी. हे कशाकरता केलं? हे मी पाहण्याकरता आलेलो आहे. भगवान म्हणाले प्रसंगच तसा होता. जर देवांना सांगून युद्धाला आम्ही आरंभ केला असता तर दैत्य ते अमृत पिऊन युद्धाला आले असते. आधी अमृत त्यांच्याकडून काढून घ्यायचे. मग युद्ध ठरलेलंच आहे. नाश करायचा. म्हणून हे रूप घ्यावं लागलं म्हणाले. त्या सगळ्या दैत्यांना मोहित करण्याकरीता हे रूप घेतले आहे. पहा, तुमची इच्छा आहे तर. एकदम भगवान अदृश्य झाले. एक दिव्य पुष्पाची बाग, तिथे तयार झालेली आहे. एक अत्यंत सुंदर स्त्री चेंडू खेळण्याचं काम तिथे करती आहे. आणखी काही स्त्रिया, तिच्या मैत्रिणी तिथे आहेत. शंकरांना काही देहभान राहिले नाही. कोण स्त्री आहे ही? सगळं विसरून गेले ते. ती कोण आहे हे विचारण्याकरता त्या स्त्रीजवळ गेले असताना एकदम ते सगळं नाहीसे झाले. पुन्हा भगवान श्रीहरी तिथे अवतीर्ण झाले. पुष्पबाग नाही, ती मोहिनी नाही. भगवान शंकरांना त्याच्याबद्दल काही वाटले नाही. ज्ञानी आहेत. ईश्वराच्या मायेचे असे हे कार्य होणारच म्हणाले. पार्वतीला त्यांनी बोलून सुद्धा दाखवले. भगवंतांची माया किती मोहात टाकणारी आहे. माझ्यासारखा योगी म्हणवणारा सुद्धा मोहात पडला. मग बाकीचे जीव किती मोहात पडले असतील? त्याबद्दल आपल्या हातून असे घडले असा मनावर कोणताच परिणाम नाही. पाप पुण्यातीत झालेले महात्मे आहेत.
अशा रीतीने महादेव कैलास पर्वतावर पुन्हा निघून आलेले आहेत. हे सगळेही समुद्रमंथनाचे भगवंताचे चरित्र, हा जो मन्वंतरामध्ये झालेला भगवंतांचा अवतार, अजित नावाचा अवतार. त्यांनी सर्व देव-दैत्यांना एकत्र करून हे कार्य करून घेतलं. पुढची मन्वंतरे सांगितली. चौदा एकूण मनू. त्यांचे कार्य सगळं सांगितले. भावी मनू कोणते होणार आहेत याचेही शुक्राचार्य महाराजांनी...
वर्णन केलेले आहे.
त्यानंतर वामन अवतार मन्वंतरामध्ये झालेला आहे. बलिराजाचे राज्य अतिथी रूपाने जाऊन हरण केलं. ते चरित्र आपण मला सांगा असं परीक्षित राजाने सांगितले. त्या वामन अवताराचे संपूर्ण चरित्र शुक्राचार्य महाराज सांगणार आहेत.
बलेः पदत्रयं भूमेः कस्माद्धरिरयाचत ।।
भूत्वेश्वरः कृपणवल्लब्धार्थोऽपि बबंध तम् ।।
8.15.1 ।। श्री. भा.
वामन अवताराचं चरित्र परीक्षित राजाने विचारलेलं आहे. अतिथी म्हणून बलिराजाकडे भगवान गेले. तीन पावले भूमीची त्यांनी याचना केली. त्यांनी दान केलं असतानाही बलिराजाला बांधून ठेवलं. काय हे ईश्वराचं चरित्र आपण सांगा. शुक सांगतात राजा, देवांनी पराजय केलेला आहे बलिराजाचा. सर्व दैत्य सैन्य बरोबर घेऊन अस्तगिरीवरती जाऊन राजा राहिला. आपले गुरुमहाराज शुक्राचार्य यांची सेवा करतो आहे. शुक्राचार्यांनी आपल्या दिव्य संजीवनी विद्येच्या प्रभावाने युद्धात मृत झालेल्या बलिराजाला जिवंत केलं होतं. ते उपकार स्मरून बलिराजाने त्यांची तन, मन अर्पण करून अत्यंत निष्ठापूर्वक सेवा केली. त्यामुळे शुक्राचार्य संतुष्ट झाले. त्यांनी बलीची इच्छा पाहून विश्वजीत यज्ञ त्याच्याकडून करवला. विश्वाला जिंकण्याची शक्ती यावी या करता. अग्निकुंडातून एक मोठा रथ बाहेर पडला सुवर्णाचा. घोडे उत्तम आहेत. सिंहध्वज आहे. दिव्य धनुष्य मिळाले. बाणाने अखंड भरलेले असे दोन भाते मिळाले. कवच मिळालेलं आहे. शुक्राचार्यांनी विजयाची सर्व व्यवस्था त्याची करून दिली. पितामह म्हणजे प्रल्हादजी यांनी बलिराजाच्या कंठामध्ये एक पुष्पांची माळ घातली. कधीही फुले सुकणार नाहीत या माळेची. अशी सगळी सामग्री तयार करून दिली शुक्राचार्यांनी. जा म्हणाले. अमरावती ही इंद्राची नगरी ताब्यामध्ये घे. गुरुमहाराजांना प्रदक्षिणा केली, नमस्कार केला. शुक्राचार्यांनी दिलेल्या दिव्य रथामध्ये बसून आणि तो स्वर्गाची राजधानी अमरावतीजवळ येऊन पोहचलेला आहे. त्याच्याबरोबर मोठे मोठे पराक्रमी दैत्यही होते. शुक्राचार्यांनी दिलेला दिव्य शंख त्यांनी वाजवला. तो आवाज नगरीमध्ये असलेल्या इंद्राच्या कानावर पडलेला आहे. बलिराजाच्या शंखाचा आवाज ऐकल्याबरोबरच त्याची कल्पना झाली की हा मोठा सामर्थ्य मिळवून आलेला आहे. आपले गुरुमहाराज बृहस्पती यांना विचारले त्यांनी, या बलिराजाने मोठा प्रयत्न केलेला दिसतो म्हणाले. कोणाचेतरी तेज याला...
मिळालेलं आहे. नाहीतर पराजय केलेला. मूच्छित पडलेला बलिराजा, इतका समर्थ कसा झाला? त्यावेळी बृहस्पतींनी सांगितले याची इतकी उन्नती झाली याच कारण
शिष्याय उपभृतं तेजो भृगुभिर्ब्रह्मवादिभिः ।।
8.15.28 ।। श्री. भा.
याचे गुरुजी काही सामान्य नाहीयेत. भृगुऋषी, शुक्राचार्य महाराज, यांनी आपलं तेज याला दिलेले आहे. शक्ती ज्याला म्हणतात ती तपशक्ती आपल्याजवळची याला दिलेली आहे. प्रत्यक्ष परमेश्वराशिवाय याचा पराजय कोणीही करू शकणार नाही. तुम्ही मुकाट्याने तुमचे राज्य सोडून गुप्तपणाने बाहेर चला. युद्ध करण्याच्या भानगडीत पडू नका. आज यांनी शुक्राचार्यांची पूजा केली. आदर सत्कार केला. पण थोड्याच कालामध्ये हा त्यांचा अपमान करणार आहे आणि त्यांचा शाप याला होणार आहे. शाप झाल्यामुळे याचे राज्य, ऐश्वर्य जाणार आहे. आज तुम्ही बाहेर पडा. इच्छीत रूप धारण करणारे देव होते. देव नुसते बाहेर पडले असते तर पकडले असते बलीने त्यांना. दुसरे रूप धारण करून बाहेर पडलेले आहेत. युद्ध नाही, काही नाही. ही राजधानी ताब्यात आली बलिराजाच्या. त्यानंतर सर्व राज्य स्वर्गाचे मिळाले, भूमीचे मिळाले. बलिराजाला त्यानंतर सर्व विश्व जिंकण्याची इच्छा होती. शुक्राचार्यांनी शंभर अश्वमेध यज्ञ त्याच्याकडून करून घेण्याचा संकल्प केलेला आहे. त्रैलोक्यामध्ये त्याची कीर्ति झालेली आहे. मोठी समृद्धी, ऐश्वर्य मिळालेलं आहे. गुरुकृपेमुळे. आपण पूर्ण सुखी झालो अशी कल्पना बलिराजाची झालेली आहे. शुक्राचार्य सांगतात, राजा सर्व देव निर्वासित होऊन बाहेर पडले. आपले राज्य सोडून द्यावे लागले त्यांना. देवमाता अदितीला अतिशय दुःख झालेलं आहे. काय करावं? आपल्या मुलांचे राज्य गेले. एके दिवशी कश्यप महर्षी त्या अदितीच्या आश्रमात प्राप्त झाले. तिथे सगळे खिन्न झालेले आहेत. आनंद नाही काही नाही. बरेच दिवस समाधी लावून बसले होते. पत्नीही अगदी खिन्न मुख झालेलं आहे. आसनावर बसले. सत्कार केला अदितीने. आणखी कश्यपऋषी बोलू लागले.
अपि अभद्रं न विप्राणां भद्रे लोकेऽधुनाऽऽगतम् ।
न धर्मस्य न लोकस्य मृत्योश्च्छन्दानुवर्तिनः ।।
8.16.4 ।। श्री. भा.
सर्व सामर्थ्य या तपस्वी महापुरुषांचे आहे. पहिला प्रश्न अदितीला विचारलेला आहे की सर्व तपश्चर्या करणारे जे ऋषी आहेत, त्यांच्यावर काही संकटाचा प्रसंग आला नाही ना? धर्माचरण वगैरे सर्व लोकांचं व्यवस्थित चालू आहे की नाही? या तुझ्या गृहामध्ये, आश्रमामध्ये धर्म, अर्थ, काम वगैरे त्यांचे व्यवस्थित आचरण चालू आहे की नाही? अतिथीगृहामध्ये आलेले असताना...
सांसारिक कामाकडे लक्ष देऊन त्या अतिथींचा अनादर तुझ्याकडून झाला नाही ना? पूजा न करता त्यांना परत जावे लागले आहे काय? वेळेला होमहवन अग्नीमध्ये चालू आहे की नाही? हे सगळं विचारलं आणि नंतर प्रश्न आहे
अपि सर्वे कुशलिनस्तव पुत्रा मनस्विनि ।।
8.16.10 ।। श्री. भा.
अदिती, तुझी मुलं सुखामध्ये आहेत ना? काहीतरी तुझे मन अस्वस्थ दिसतं आहे. काय आहे सांग. ती बोलू लागली, महाराज आपण जिला मार्गदर्शन करता, अशा माझ्या आश्रमात धर्म, अर्थ, काम वगैरे पुरुषार्थाचं आचरण व्यवस्थित चालू आहे. अतिथींचे पूजन चालू आहे. अग्नीची सेवाही चालू आहे. आपली कृपा असल्यामुळे मला काहीही कमी नाहीये. पण आज असा प्रसंग आलेला आहे. देवही आपलेच पुत्र आहेत. दैत्यही आपलेच पुत्र आहेत. आपली सर्वत्र समदृष्टी आहे. देवांचा पक्षपात वगैरे असं कोठेही नाहीये. मी आपली सेवक आहे. आमचं रक्षण आपण करा. आम्हाला देवांना शत्रूंनी बाहेर घालवलेलं आहे. राज्यत्याग करून, ही माझी मुलं बाहेर पडलेली आहेत. त्यांचं राज्य त्यांना मिळावं अशी इच्छा आहे माझी. कृपा करा आपण. कश्यपऋषींनाही आश्चर्य वाटले.
अहो मायाबलं विष्णोः स्नेहबद्धमिदं जगत् ।।
8.16.18 ।। श्री. भा.
सर्व जग हे या स्नेहपाशामध्ये बद्ध झालेलं आहे. काय भगवंताची माया आहे. मुलांच्या शरीरालाच मुलगा समजून, माझा मुलगा समजून ही अदितीसुद्धा दुःख करते आहे. काय कुणाचा संबंध आहे म्हणाले. बरं, काही हरकत नाही म्हणाले. भगवंताची तू उपासना कर. सर्वव्यापी तो परमेश्वर आहे. सर्वांच्या बुद्धीला प्रेरणा करणारा तो आहे वासुदेव. दीनांच्या वरती दया करणारा आहे. त्याची उपासना तू केलीस म्हणजे परमेश्वर तुझी इच्छा पूर्ण करेल. भगवद्भक्ती अमोघ आहे. अदिती विचारते आहे, कशी उपासना करू? काय करायला पाहिजे मला सांगा. माझा संकल्प खरा व्हायला पाहिजे. कश्यपांनी सांगितले, भगवान ब्रह्मदेवांनी मला एक व्रत करायला सांगितले आहे. ईश्वराच्या संतोषाकरता. फाल्गुन शुद्ध पक्षामध्ये बारा दिवस हे व्रत करायचं आहे. श्रीहरीची पूजा करायची आहे. आदल्या दिवशी म्हणजे माघ अमावस्येला स्नान करून भूदेवीची पूजा करायची. आदिवराहांनी रसातलातून भूमीला वर आणलेलं आहे. माझ्या सर्व पातकांचा नाश करावा, अशी भूदेवीची प्रार्थना करावी. फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून भगवंताच्या मूर्तीच्या ठिकाणी अथवा अग्नीच्या ठिकाणी सूर्य, जल कुठेही आणखी परमेश्वराचे अर्चन करावं. त्या मंत्रांचा उच्चार...
करून उपचार अर्पण करावे. त्या मूर्तीला आवाहन त्याचप्रमाणे आसन, पाद्य, अर्घ्यस्नान हे सगळे उपचार अर्पण करावेत. गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य सर्वही द्यावेत. द्वादशाक्षर मंत्राचा जप करावा. दुधामध्ये शिजवलेले असे जे अन्न म्हणजे भात आहे. त्याच्यामध्ये तूप आहे, गूळ घातलेला आहे. त्याचे मंत्रांनी हवन करावं. देवाला दिलेलं अर्पण केलेलं त्याच्या भक्ताला द्यावं किंवा आपण तो प्रसाद घ्यावा. अष्टाक्षर ह्या मंत्राचा जप करावा. प्रदक्षिणा नमस्कार करून विसर्जन करावं. ब्राह्मणांना अन्नदान करावं नंतर आपण भोजन करावं. फक्त दूध घ्यायचंय बारा दिवसांपर्यंत. पयोव्रत याला म्हणतात. असे रोज पूजा व्हावी बारा दिवसपर्यंत. तेराव्या दिवशी, त्रयोदशीला भगवंताची महापूजा करावी. बारा दिवसपर्यंत त्रिकाल स्नान करणं. असत्य भाषण वगैरे काहीही न करणे. कोणाचीही हिंसा, कोणालाही उद्वेग, त्रास न देणं हे सगळे नियम पाळावेत. त्रयोदशीला भगवान विष्णूंना अभिषेक, स्नान वगैरे करून सर्व पूजा वगैरे समाप्त करावी. आचार्य जे आहेत त्यांनाही वस्त्र, अलंकार, धेनु हे द्यावं, अर्पण करावं. त्यांना अन्नदान करावं. इतरांनाही अन्नदान करावं, दक्षिणादान करावं. इतरही जी मंडळी आहेत, श्वान, चांडाल वगैरे सगळ्यांनाही अन्नदान करावं. नंतर आपण भोजन करावं तेराव्या दिवशी. रोज परमेश्वराची स्तुती, गायन वगैरे करावं. नृत्य, वादन हे सर्व करावं म्हणाले. दुसरे कोणी कलाकार असले त्यांचे कडून हे करून घ्यावं. हे पयोव्रत नावाचे व्रत आहे. पितामह ब्रह्मदेवांनी मला सांगितलेलं आहे. तू हे व्रत कर म्हणाले. भगवान संतुष्ट होतील आणि तुझी इच्छा पूर्ण करतील. अदितीला, कश्यप ऋषींनी आशीर्वाद दिलेला आहे आणि ते निघून गेले. श्रद्धा, भक्ती अंतःकरणामध्ये धारण करून अदितीने हे पयोव्रत केलं. बारा दिवस पूजा केली भगवंतांची, फाल्गुन महिन्यामध्ये शुद्ध पक्षात आणि भगवान प्रसन्न झाले. दर्शन दिलेलं आहे. एकदम भगवंताचं ते स्वरूप पाहिल्याबरोबर उठून उभी राहिली अदिती. आनंदाश्रू नेत्रातून वाहत आहेत. गद्गद् वाणीने हरीची स्तुती तिने पुष्कळ केली.
यज्ञेश यज्ञ पुरुषाच्युत तीर्थपाद
तीर्थश्रवः श्रवणमङ्गलनामधेय ।।
आपन्नलोकवृजिनोपशमोदयाद्य
शं नः कृधीश भगवन्नसि दीननाथः ।।
8.17.8 ।। श्री. भा.
आपण यज्ञेश्वर आहात. यज्ञपुरुष आपण आहात. पवित्र आपले चरणकमल आहेत. आपली कीर्ति, कथाही पवित्र आहे. आपलं नावही अत्यंत पवित्र आहे. आपत्तीमध्ये सापडलेल्या लोकांची सर्व संकटं दूर करण्याची शक्ती आपल्याजवळ आहे. आमचं आपण मंगल करावे. आमच...
कल्याण आपण करावं अशी प्रार्थना अदितीने केलेली आहे. भगवान संतुष्ट झाले. आणखी सांगताहेत देवमाते, तुझी इच्छा मला समजलेली आहे म्हणाले. शत्रूने तुझ्या मुलांचं सर्व ऐश्वर्य काढून घेतलेलं आहे. त्यांना बाहेर घालविलेलं आहे. त्यांचा पराजय व्हावा आणि आपल्या मुलांचं राज्य आपल्या मुलांना मिळावं अशी तुझी इच्छा म्हणाले. पण आज अशी स्थिती आहे. असुरांच्या बरोबर युद्ध करून त्यांचा पराजय करता येणार नाही. त्यांना काल अनुकूल आहे. त्यांच्या गुरूंनी त्यांना शक्ती दिलेली आहे. पण तू काही काळजी करू नको. आजपर्यंत हे व्रत तू केलंस. माझी पूजा केलीस. त्या पूजेचं फल तुला मिळेल म्हणाले. काळजी करू नकोस. मी तुझा मुलगा होईन. तुझ्या पुत्रांचे, इंद्रादिक देवांचे संरक्षण मी करीन. पतीची सेवा करत रहा. हे सांगू नकोस कोणालाही असंही त्यांनी सांगितलं. भगवान स्वतः आपले पुत्र होणार हे ऐकून तिला अत्यंत आनंद झालेला आहे. पतीची सेवा ती करते आहे कश्यपांची. कश्यपांच्या शरीरामध्ये हरीचा अंश प्राप्त झालेला आहे. तेज प्राप्त झालं आणि ते तेज त्यांनी अदितीच्या ठिकाणी स्थापन केलं. भगवान गर्भातून प्रकट झाले. ब्रह्मदेव आलेले आहेत. त्यांनीही त्यांची स्तुती पुष्कळ केली. प्रकट झाले म्हणजे चतुर्भुजरूपामध्ये प्रकट झाले. आरंभाला शंख, चक्र, गदा, पद्म, पितांबरधारी असे प्रकट झाले. त्यांच्या तेजाने घरातला सर्व अंधःकार दूर झालेला आहे. भाद्रपद शुद्ध द्वादशीचा दिवस आहे, विजयाद्वादशी त्या दिवशी माध्यान्हकाली वामन प्रकट झालेले आहेत. वाद्य वाजवताहेत देव वगैरे. अप्सरांचं नृत्य, गंधर्वांचं गायन चाललेले आहे. अदितीला आनंद झालेला आहे. ते स्वरूप गुप्त झाले आणि एकदम लहान बालक, आठ वर्षाचा बटू ब्रह्मचारी दिसू लागला. त्यांचे सर्व संस्कार केले. सूर्यनारायणांनी गायत्री मंत्राचा उपदेश केला. ब्रह्मसूत्र बृहस्पतींनी दिलेलं आहे. भूमीने कृष्णाजीन त्यांना दिले. कमंडलू वगैरे ब्रह्मदेवांनी दिले. उपनयन झाले. यमराज कुबेर यांनी भिक्षेचे पात्र दिले. साक्षात भगवती उमादेवी, अंबिकादेवी, पार्वती हिने त्या पात्रात त्याला भिक्षा घातलेली आहे. ते ब्रह्मतेज चमकते आहे. दिसते आहे. ब्रह्मर्षी मोठे मोठे हे सगळे त्या सभेमध्ये आहेत. अग्नी प्रदीप्त केलेला आहे आणि मंत्रांनी अग्नीमध्ये हवन केलं. ब्रह्मचाऱ्याने अग्नीची सेवा केली पाहिजे. होम संपल्यानंतर वामन निघाले. अश्वमेध यज्ञ बलिराजाचे चालू आहेत. तिकडे जायचंय म्हणाले. भृगुऋषी म्हणजे शुक्राचार्य त्याचा यज्ञ करताहेत. शंभर अश्वमेध यज्ञ संपत आलेले होते. नर्मदानदीच्या उत्तरतीरावरती हा यज्ञ चालू होता. मुख्य शुक्राचार्य आहेत. बाकीचे ऋषी, पुष्कळ ऋत्विज मंडळी आहेत. त्या यज्ञमंडपामध्ये वामनांनी प्रवेश केल्याबरोबर सर्व ऋषिमंडळी उठून उभी राहिली. सूर्य किंवा अग्नी नारायण साक्षात आला काय म्हणाले. शुक्राचार्यही...
विचार करताहेत. बलिराजाने समोर जाऊन नमस्कार केला. आसनावरती बसायला सांगितलं. पाय धुतलेले आहेत बलिराजांनी वामनांचे. ते पवित्र जल आपल्या मस्तकावर धारण केलं. बलिराजा म्हणाला, या महाराज आपले स्वागत असो, ब्रह्मर्षीचे तप आपल्या रूपात मी पाहतो आहे. तपमूर्ती आपण आहात. आज आमचे सर्व पितर संतुष्ट झाले असे मी समजतो आहे. आमचे कुल पवित्र झालेले आहे आणि हे यज्ञकर्म माझे चालू झाले त्याचे फळ मिळाले असे मी समजतो. आपण काही मागण्याकरता आलेले आहात असं मला वाटतं. "अतिथी देवो भव' असा वागणारा तो बलिराजा होता. आल्याबरोबर त्यांनी काय पाहिजे आपल्याला ते सांगा म्हणाला, गाय पाहिजे? सुवर्ण पाहिजे? घर पाहिजे? कन्या पाहिजे? काय लागेल ते घ्या म्हणाले. याप्रमाणे विरोचनाचा पुत्र बलिराजा याचे भाषण उत्तम आहे. धर्मयुक्त भाषण आहे. भगवानही प्रसन्न झाले. त्यांनी बोलायला सुरुवात केली. दैत्य हे शत्रू आहेत अशी भावना नाहीये भगवंताची.
शत्रोरपि गुणाव्ह्याः ।।
हे मोठ्यांचे लक्षण आहे. भगवान सांगताहेत राजा, तुझं भाषण हे फार उत्तम, धर्मयुक्त आहे. तुझ्या कुळाला शोभण्यासारखं आहे. तुम्हाला या भृगुऋषींचं म्हणजे शुक्राचार्यांचं मार्गदर्शन मिळालेलं आहे म्हणजे तुमची प्रवृत्ती ही धर्माकडेच आहे. तुमच्या कुळामध्ये कृपण मनुष्य कोणी झाला नाही. एखादा अतिथी आलेला आहे आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे त्याला मी देतो कबूल केलं आणि पुन्हा नाही बाबा माझ्या हातून काही होणार नाही असे सांगणारा एकही नाहीये. तुमच्या कुळामध्ये प्रल्हाद जो आहे मोठा भगवद्भक्त. स्वतःच भगवान वर्णन करताहेत. केवढा कीर्तिसंपन्न झालेला आहे. या तुमच्या कुळामध्ये हिरण्याक्ष नावाचा मोठा वीर उत्पन्न झालेला होता. हातामध्ये गदा घेऊन तो बाहेर पडला. विष्णूंनी त्याला जिंकले. नाश केला त्याचा. पण आपला पराक्रम सफल झाला. आपल्या पराक्रमांनी हिरण्याक्षाला मारलं अशी विष्णूंची कल्पना नाहीये. हिरण्याक्षाच्या पराक्रमाची अद्यापि विष्णूला आठवण आहे. आपल्या बंधूचा वध केलेला आहे हे समजले हिरण्यकशिपूला, तोही हरीचा नाश करायला बाहेर पडला. वैकुंठलोकामध्ये गेला. भगवान गुप्त झालेले आहेत. त्याच्या हृदयामध्ये जाऊन बसलेले आहेत. सापडले नाहीत. परत गेला हिरण्यकशिपू.
तुझा पिता विरोचन, हा मोठा तपस्वी. ब्राह्मणांबद्दल आदर बाळगणारा होता. एके दिवशी देव त्याच्या राजसभेमध्ये आले आणि त्यांनी सांगितलं, राजेसाहेब, तुमच्या राहिलेल्या आयुष्याचं दान आम्हाला द्या.तसं पाणी सोडा. आणि सोडलं त्याने. आपलं आयुष्य दिलं. शरीर टाकलं. अशा...
कुळामध्ये जन्माला आलेला आहेस बलिराजा! हे सगळं भाषण त्याची भूमिका तयार करण्याकरता आहे. कारण शुक्राचार्य सगळं जाणणारे आहेत. हा कोण अतिथी आहे त्यांनी ओळखलेलं आहे. बलिराजाने अजून ओळखलं नाही.
तेव्हा तुझ्यासारख्या दात्याकडून मला थोडीशी जमिन पाहिजे आहे. माझ्या पायाने तीन पावलं भरतील एवढी जमिन तू मला दे. बलिराजा म्हणाला, काय तुम्ही मागता आहात? फक्त तीन पावलं भूमी? माझ्यासारख्याच्याकडे आलेला आहात तुम्ही. एकदा माझ्याकडे आलेल्याला पुन्हा याचना करावी लागणार नाही आणि तीन पावलं भूमी तुम्हाला कशी पुरेल? मोठी तरी जमिन मागून घ्या. भगवान सांगताहेत राजा, जगामध्ये जेवढे विषय आहेत, ते सगळे जरी मिळाले तरी मनुष्याची तृप्ती होणार नाही. तीन पावलांनी व्यापलेल्या जमिनीने ज्याला संतोष होत नाही त्याला कितीही मोठी जमिन मिळाली तरी संतोष होणार नाही. मोठे मोठे राजे पूर्वी या भूमीच्या लोभानेच गेले. त्यांची तृष्णा संपली नाही. यदृच्छेने प्राप्त झालेल्यात संतुष्ट राहणाऱ्या माणसाला जे सुख आहे ते सुख इतरांना नाही. संसारमोह पाठीमागे लागलेला आहे त्याला कारण म्हणजे असंतोष आहे. कितीही अर्थ मिळाला, कितीही विषय मिळाले तरी ज्याला असंतोष वाटतो तो नेहमी संसारात राहातो. आणि जे मिळेल त्याच्यात संतोष मानणारा जो आहे तो मुक्त होतो. अग्नीमध्ये जास्तीत जास्त तूप घालायला लागल्यावर अग्नी शांत कसा होईल? संतुष्ट राहणाऱ्या ब्राह्मणाचं तेज वृद्धींगत होत असतं.
त्रीणि पदान्येव वृणे ।।
8.19.27 ।। श्री. भा.
तुझ्यासारख्या दात्याजवळ तीन पावलं भूमीच मला मागायचीय. जास्ती नको. राजाने सांगितलं तुम्हाला तीन पावलं भूमी दिली. तुम्ही स्वतः मोजून घ्या. आणि आता संकल्प सोडायचा आहे. पाणी सोडायचं आहे. हे शुक्राचार्यांनी ओळखलं.
विष्णवे क्ष्मां प्रदास्यन्तं उशना असुरे श्वरम् ।।
8.19.29 ।। श्री. भा.
हा विष्णू आहे म्हणाले आणि याला आपला हा शिष्य देऊन टाकणार आहे. विष्णूंची इच्छा शुक्राचार्यांना समजली आणि ते बोलू लागले. बलिराजा, कोणाला दान करतो आहेस तू? हा साक्षात भगवान विष्णू आहे. कश्यपापासून अदितीपोटी वामन म्हणून याने जन्म घेतला. देवांचं काम करण्याकरता हा आज तुझ्याकडे आलेला आहे. तू याला जो शब्द दिलास, बोलून गेलास, दान देतो म्हणून ते चांगलं नाही. तुझं सर्व राज्य, सर्व स्थान हा घेणार आहे. आणि ते सगळं घेऊन...
इंद्राला देणार आहे, तुझ्या शत्रूला. मायेनं ब्रह्मचाऱ्याचा वेष धारण करून अतिथी म्हणून हा तुझ्याकडे आलेला आहे. हा विश्वमूर्ती आहे, विश्वरूप आहे. त्याचं विराट रूप जर याने प्रगट केलं तर तुझं सर्वस्व जाणार नाही का? एका पावलाने सबंध भूमंडळ व्यापून टाकणार. दुसऱ्या पायाने स्वर्गलोक व्यापून टाकणार. आपल्या सबंध शरीराने संपूर्ण आकाशमंडळ व्यापून टाकणार आहे. दोन पावलातच तुझं सगळं हरण होणार. तिसरा पाय ठेवायला जागा कुठेय? म्हणजे सर्वस्व दान करून सुद्धा कबूल केल्याप्रमाणे त्रिपादभूमीचं दान देता न आल्यामुळे दान पूर्ण होणार नाही आणि तू नरकाला जाशील. त्यापेक्षा अगोदरच सांगून टाक, की माझी काही शक्ती नाही. तू राहणार कुठं? खाण्यापिण्याची व्यवस्था काय? उद्या जर याने सांगितलं, की माझ्या जागेमध्ये राहू नको तर जाणार कुठं तू ? जिवंत राहिलो, आपली योगक्षेमाची व्यवस्था नीट असेल तर पुढं कार्य करता येतं. जीवनाची व्यवस्था नीट असेल तर धर्माचरण करता येईल. सर्वस्व देऊन टाकणं हे काही दान नव्हे. हे बरं नाही. शास्त्रज्ञांचं मत तुला सांगतो.
धर्माय यशसेऽर्थाय कामाय स्वजनाय च ।
पञ्चधा विभजन् वित्तं इहामुत्र च मोदते ।।
8.19.37 ।। श्री. भा.
आपण मिळवलेल्या द्रव्याचे पाच भाग करावेत. एक पंचमांश द्रव्याचा धर्माकरता विनियोग करावा. एक पंचमांश धनाचा कीर्तीकरता, यशाकरता विनियोग करावा. लोकांनी चांगलं म्हणावं, बरंय घरी गेलं की फराळ-पाणी व्यवस्थित मिळतं. काही नाही असं नाही. याच्याकरता करावं लागतो. एक पंचमाश धन शिल्लक ठेवायला पाहिजे. एक पंचमांश धन आपल्या लोकांकरता ठेवावं आणि एक पंचमांश विषयभोगाकरिता ठेवावं. असा धनाचा विनियोग करून वागणारा जो आहे त्याला इहलोकातही सुख मिळतं आणि परलोकातही सुख मिळतं. धर्माचरण होतंच. काही द्यायचं नाही असं नाही. आणखी तुला मार्ग दाखवतो. शास्त्रज्ञांचंच म्हणणं आहे. सत्य आणि अनृत यांची व्यवस्था शास्त्रज्ञांच्या दृष्टीने अशी आहे.
सत्यं पुष्पफलं विद्यात् आत्मवृक्षस्य गीयते ।।
8.19.39 ।। श्री. भा.
शरीररूपी वृक्ष जो आहे त्याचं मूळ हे अनृत आहे आणि सत्य हे फल किंवा पुष्पाप्रमाणे आहे. अनृत हे मूळ आहे. असत्य मूळ राहिलं तर हे शरीररूपी झाड राहणार आहे. फुलं, फळं तोडून घेतली म्हणून झाड काही पडत नाही. तेव्हा असत्य अगदी बोलायचं नाही असं ठरवलं तर शरीर राहणारच नाही. मूळ शिल्लक ठेव. एखाद्या वेळेला असत्य झालं तर होऊ दे. हा विचार तू कर.