कुणीही घरी अतिथी आला आणि त्याला सांगितलं, घ्या महाराज, तुमचंच घर आहे. आणि त्यानं घराबाहेर काढलं तर बाहेर पडावं लागेल. याला काही दान म्हणत नाहीत. कोणी आला सांगितलं आमच्या घरी काही मिळायचं नाही चला पुढं. हे ही चूक आहे. हा सगळा विचार करून दान करावं. तेव्हा कबूल केलं तरी माझ्या हातून दान होत नाही असं सांगून दे. सत्य हे पालन करता येणार नाही.
स्त्रीषु नर्मविवाहे च वृत्त्यर्थे प्राणसंकटे ।
गोब्राह्मणार्थे हिंसायां नानृतं स्याज्जुगुप्सितम् ।।
8.19.43 ।। श्री. भा.
इतक्या ठिकाणी असत्य बोललं तर चालतं. स्त्रियांच्या बरोबर असत्य बोलायला हरकत नाही. नेहमी असा अर्थ नाही. प्रसंगाने काही कार्य होण्याकरता बोलावं. थट्टेमध्ये असत्य भाषण होऊन जातं. एखाद्याचा विवाह जमवायच्या वेळी असत्य बोललं तरी चालतं. आपण जिवंत राहण्याकरता आपला योगक्षेम चालण्याकरता असत्य बोललं तर चालतं. गाय, ब्राह्मणांची हिंसा होतेय ती थांबवण्याकरता असत्य बोललं तर चालतं. शुक्राचार्यांनी सगळं त्याच्यापुढे मांडलं आणि जमत नाही असं सांगून टाकून याला जाऊ दे म्हणाले. केवढा प्रसंग निर्माण झालेला आहे. साक्षात विश्वेश्वर परमात्मा याचक म्हणून आलेला आहे. दान सामान्याला करायचं नाहीये. हे दान जर झालं बलिराजाकडून तर तो मुक्तच होईल. संसार संपून जाईल. पण गुरुमहाराज विरुद्ध आहेत. आता तेही कदाचित परीक्षा पाहताहेत का काय कुणास ठाऊक?
बलिराजा थोडावेळ स्वस्थ बसलेला आहे. त्याने थोडा विचार केला आणि तो गुरुमहाराजांना म्हणाला,
सत्यं भगवता प्रोक्तं धर्मोऽयं गृहमेधिनाम् ।।
8.20.2 ।। श्री. भा.
गृहस्थाश्रमी माणसानं कसं वागावं हे तुम्ही सांगितलं महाराज. ते योग्यच आहे. अर्थ पाहिजे. काम पाहिजे. कीर्ति पाहिजे. आपलं जीवन व्यवस्थित पाहिजे हे सगळं मला मान्य आहे. पण या वृत्तीच्या मोहाने मी जिवंत राहिलं पाहिजे. माझा परिवार जिवंत राहिला पाहिजे या लोभाने मी एका तपस्वी ब्राह्मणाला दान नाही कसं म्हणू? माझ्याजवळ आहे तोपर्यंत मी देईन. आणि मी कबूल केलेलं आहे. मग आता नाही कसं म्हणायचं? असत्य हा मोठा अधर्म आहे महाराज. भूदेवी सांगतीये मला सगळं सहन होईल पण असत्य बोलणाऱ्याचा भार मला सहन होत नाही. आपण म्हणाला दान पूर्ण झालं नाही तर मला नरकात जावं लागेल. मला नरकाची भीती वाटत नाही.
मी स्थानभ्रष्ट झालो तरी मला त्याची पर्वा नाही कारण एका ब्राह्मणाचा विश्वासघात करणं मला पसंत नाही. जे जे आपण दान देतो त्याच्यामुळे जास्ती समाधान वाटायला पाहिजे. श्रेष्ठ पुरुष दुसऱ्याचं कल्याण करण्याकरता आपले प्राणसुद्धा देतात. दधिची ऋषी आहेत. शिबी राजा आहे. जमिन, राज्य काय करायचंय? याचा उपयोग काय आहे? आजपर्यंत ज्यांनी राज्य केलं, वाढवलं ते स्वतः शिल्लक राहिले काय? ज्यांनी त्याग केलेला आहे त्यांची कीर्ति जगामध्ये वाढलेली आहे. युद्धामध्ये आपला प्राणत्याग करणारे पुष्कळ मिळतील पण तपस्वी पुरुष आला असताना त्याला दान करणारा मिळणं फार कठीण आहे. द्रव्याचा मोह फार मोठा आहे. दाता भवति वानवा ।। आपल्यासारख्या ब्रह्मज्ञानी महात्म्यांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न आमच्यासारख्या गृहस्थाश्रमी पुरुषांनी केला पाहिजे. ह्या ब्रह्मचाऱ्याला जी इच्छा आहे ते देण्याचं मी ठरवलेलं आहे. विष्णू असले तरी आज माझे अतिथी म्हणून आलेले आहेत. असे अतिथी मला कोणत्या जन्मात मिळतील? याचवेळेलाच मला हे कार्य करायचं आहे. माझं दान पूर्ण झालं नाही म्हणून यांनी मला बांधून ठेवलं तरी मी यांना प्रतिकार करणार नाही.
शुक्राचार्य सांगतात, राजा आपण याच्यावर इतके उपकार केले. इंद्रपद मिळवून देण्याकरता शंभर अश्वमेध यज्ञ करवले. आणि हा शिष्य आपलं ऐकत नाही. शुक्राचार्यही रागावले. दैवयोग आहे बलिराजाचा.
दृढं पण्डितमान्यज्ञः स्तब्धोऽस्यस्मदुपेक्षया ।
मच्छासनातिगो यस्त्वं अचिराद् भ्रश्यसे श्रियः ।।
8.20.15 ।। श्री. भा.
स्वतःला तू पंडित समजायला लागलास काय? आमच्या सांगण्याची तुला किंमत नाही. तुझ्या हिताचं मी सांगतो आहे. इतकी खटपट करतोय. माझी आज्ञा तुला मान्य नसेल, तर तुझं सर्व ऐश्वर्य नष्ट होईल. शुक्राचार्यांनी बलिराजाला शाप दिला आणि यज्ञमंडपातून बाहेर जाऊन एका झाडाखाली स्वस्थ बसले.
बलिराजाने वामनांना आसनावर बसवून त्यांचे पाय धुतले. त्याची स्त्री विंध्यावली पाणी घालते आहे. चरण प्रक्षालन केलं. ते विश्वाला पवित्र करणारं तीर्थ मस्तकावर घेतलं. त्याला वंदन...
केलं. सर्व देवमंडळीसुद्धा प्रशंसा करताहेत. पुष्पवृष्टी करताहेत. केवढा त्यागी महात्मा हा आहे. आपला शत्रू आपलं सर्वस्व हरण करण्याकरता आलेला असतानासुद्धा हा विलक्षण दान करतोय. हे मोठं दान आहे. हातावर पाणी सोडलं. प्रतिगृह्यताम्. घ्या महाराज आपली जमिन घ्या. नमस्कार केलेला आहे. वामनांचं रूप एकदम मोठं व्हायला लागलं. विराट विश्वरूप धारण केलं वामनांनी. भूमंडळ आहे. आकाशमंडळ आहे. स्वर्गलोक, सप्तपाताल सगळं त्यांच्या रूपामध्ये दिसायला लागलं. सर्व एकंदर ब्रम्हांड त्या स्वरूपामध्ये दिसतंय. हे दर्शन झालं हे दानाचं फळ आहे. मनापासून दान झालेलं आहे. एका पायामध्ये सगळी जमिन व्यापून गेली. दुसऱ्या पायामध्ये सगळा स्वर्गलोक व्यापून गेलेला आहे. बलिराजाचं राज्य संपलेलं आहे. तिसरा पाय कुठं ठेवायचा? तो पाय वाढता वाढता ब्रह्मलोकापर्यंत गेला. ब्रह्मदेवांनी त्या पायावर पाणी घालून पूजा केली. तीच गंगानदी उत्पन्न झालेली आहे, हरिचरणांपासून. दैत्य मंडळींच्या दृष्टीला हे विश्वरूप दिसलं. ते म्हणाले, हा काही खरा ब्राह्मण नाही. ब्राह्मणाचं रूप घेऊन देवांचं कार्य करायला आलेला हा विष्णू दिसतोय. ब्रह्मचाऱ्याचा वेष घेऊन काय आला, स्तुती काय केली आमच्या राजोसाहेबांची आणि शेवटी त्यांचं सर्वस्व हरण केलं म्हणाले. आमच्या राजोसाहेबांनी यज्ञदीक्षा घेतलेली आहे तेव्हा असत्य भाषण बोलायचं नाही हा नियम आहे. अशावेळी याने येऊन यजमानाला फसवलं. तेव्हा याला जिवंत ठेवायचं नाही असं ठरवून ते बलीचे सेवक वामनांवर धावून गेले. बलीची इच्छा नाहीये. इतक्यात विष्णूंचे दूत तिथे आले. नंद, सुनंद, जय, विजय, बल, प्रबल असे बरेच दूत ज्यांना दहा हजार हत्तींचं बळ आहे अशा त्या दूतांनी राक्षसांचं बरचसं सैन्य मारलं. बलिराजाने पाहिलं की आपले दैत्य मरताहेत. गुरुमहाराजांचाही शाप झालेला आहे. त्याने दैत्यांना सांगितलं थांबा, युद्ध करू नका. हा काल आम्हाला प्रतिकूल आलेला आहे. त्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी यश मिळणार नाही. या देवांना कितीतरी वेळा आम्ही जिंकलयं परंतु आज तेच आमचा पराजय करताहेत आणि यशस्वी होतात. काल जेव्हा आम्हाला अनुकूल होईल तेव्हा पुन्हा आपण यांना जिंकू. तुम्ही तोपर्यंत रसातलात निघून जा. सर्व दैत्य रसातलात निघून गेले. गरुडाने भगवंतांची इच्छा जाणून बलिराजाला वरुणपाशाने बांधून ठेवलं आहे. भगवान विचारताहेत,
पदानि त्रीणि दत्तानि भूमेर्मह्यं त्वयासुर ।
द्वाभ्यां क्रान्ता मही सर्वा तृतीयं उपकल्पय ।।
8.21.29 ।। श्री. भा.
दान घेणारे ब्राह्मणही समर्थ होते. तुम्ही कबूल केलं इतकं दान आम्हाला मिळालं पाहिजे असं म्हणता येत नाही ब्राह्मणांना. हे तसे नाहीयेत. राजा, तीन पावलं भूमी द्यायचं तू वचन दिलेलं...
आहेस. दोन पावलामध्येच मी तुझं सर्वस्व हरण केलेलं आहे. तिसरा पाय कुठं ठेवायचा सांग. तुझ्या हातून पूर्ण दान झालेलं नाही. तुझ्या गुरूंनी तुला वस्तुस्थितीची कल्पना दिली होती. तू अभिमानाने म्हणालास, तीन पावलं जमिन काय मागता, मोठी जमिन मागून घ्या. गुरूचंही तू ऐकलं नाहीस आणि दानही पूर्ण केलं नाहीस. त्याकरता तुला नरकात जावं लागेल. हा प्रसंग आलेला आहे. सर्वस्व गेलं. धर्मही गेला आणि अर्थही गेला. पण बलिराजा मोठा सत्यनिष्ठ होता. सत्वबल हे सगळ्यात मोठं बल आहे. अंतःकरणाचं जे बल आहे. धर्माचा निश्चय, मनाचा निश्चय मोठा होता बलिराजाचा. काहीही त्याने विचार केला नाही. भगवंताला त्याने सांगितलं, देवा, मी काय खोटं बोललो. मी त्रिपाद भूमी द्यायचं कबूल केलं. त्यावेळी तुम्ही कोणत्या रूपात आला होतात? ते रूप पाहून मी भूमी दिली असं कबूल केलं.
तरीसुद्धा माझं वचन सत्य करण्याकरता मी माझं शरीरदेखील आपल्याला अर्पण करतो आहे.
पदं तृतीयं कुरु शीर्षणि मे निजम् ।।
8.22.2 ।। श्री. भा.
तिसरा पाय माझ्या मस्तकावर आपण ठेवा. नरकाची मला भीती वाटत नाही. माझं स्थान गेलं, मला तुम्ही बांधून ठेवलं तरी मला काही वाटणार नाही. श्रेष्ठ पुरुषाने आम्हाला दंड करण्यामध्ये आमचं कल्याण आहे असं मी समजतो माता, पिता, मित्रमंडळी एखाद्यावेळी असं करतात पण त्यात हितच असतं. आम्ही असुर जरी असलो तरी परोक्ष रितीने आमचं कल्याण करणारे गुरु आपण आहात. आपण आमचे शत्रू नाही आहात. या ऐश्वर्याच्या मदाने अंध झालेल्या आम्हाला दंड करून आपण मार्गदर्शनच करत असता. आपलं वैर करून अनेक दैत्य मुक्त झालेले आहेत. मोठे मोठे ऋषि, योगी आपली सेवा करत असतात, अशा आपण मला बांधून ठेवलं म्हणून मी तक्रार करायचं कारण काय ? आमचे पितामह प्रल्हादजी यांनी जन्मभर आपली भक्ति केलेली आहे, कितीतरी दुःख सोसलेलं आहे. त्यांच्या पित्यानेच त्यांना दुःख दिलं पण आपण त्यांना मुक्त केलं. काय करायचंय हा संसार करून ? स्त्री आहे, पुत्र आहे, राज्य आहे पण त्याचा काय उपयोग आहे. हा सगळा विचार प्रल्हादजींनी केला आणि आपलं सर्वस्व आपल्याला त्यांनी अर्पण केलं. सर्व भाव आपल्या चरणी ठेवला. शेवटी ते निर्भय झाले आणि आपल्या कृपेने संकटातून मुक्त झाले. दैवयोगाने आपलं दर्शन मला आज झालं. माझी संपत्ती, ऐश्वर्य बलात्काराने आपण काढून घेतलं ही दयाच आपली माझ्यावर झालेली आहे. हे जीवन कृतांताच्या अधीन आहे. यम केव्हा घेऊन जाईल याचा नियम नाही. अशा स्थितीमध्ये माझी बुद्धी स्थिर राहण्याकरता...
आपण माझ्यावर अनुग्रह केलेला आहे. ""प्रल्हादजींना हे समजलं. ते आले तिथे. भगवान श्रीहरीचं दर्शन त्यांना झालेलं आहे. बलिराजाला गरुडाने बांधून ठेवलं होतं. त्याला उठता आलं नाही, आपल्या आजोबांची पूजा करता आली नाही. मान खाली घालून तो बसून राहिलेला आहे. प्रल्हादजींनी भगवंताला नमस्कार केला आणि सांगताहेत,
त्वयैव दत्तं पदमैन्द्रमूर्जितं
हृतं तदेवाद्य तथैव शोभनम् ।।
मन्ये महान् अस्य कृतो ह्यनुग्रहो
विभ्रंशितो यच्छ्रिय आत्ममोहनात् ।।
8.22.16 ।। श्री. भा.
भगवंता, बलिराजाला इंद्रपद आपणच दिलेलं आहे. हा काय घेणार आहे ? आणि आज ते दिलेलं इंद्रपद आपणचं काढून घेतलं हे फार चांगलं झालं. मोहामध्ये टाकणारी, गर्व निर्माण करणारी ही जी श्री आहे तिच्यापासून आपण याला भ्रष्ट केलं, बाहेर काढलं हे फार चांगलं झालं. अशीच कृपा या सर्वांवर ठेवा.
त्या बलिराजाची स्त्री विंध्यावली ही अतिशय भीतीग्रस्त झालेली आहे. आपल्या पतीचं राज्य गेलं, संपत्ती गेली, आता नरकात टाकतात की काय कुणास ठाऊक अशा विचाराने ती घाबरून गेली. ती भगवंताला प्रार्थना करतेय.
क्रीडार्थमात्मन इदं त्रिजगत् कृतं ते
स्वाम्यं तु तत्र कुधियोऽपर ईश कुर्युः ।।
कर्तुः प्रभोस्तव कििमस्यत आवहंति
त्यक्तह्रियस्त्वदवरोपित कर्तृवादाः ।।
8.22.20 ।। श्री. भा.
परमेश्वरा, हे जे आमचे पतीदेव आहेत, यांची बुद्धि अद्यापि सुधारली नाही. तिसरा पाय माझ्या मस्तकावर ठेवा, माझं शरीर आपल्याला अर्पण करतो, अद्यापि माझं माझं म्हणतात. त्यांचं तरी शरीर कुठे आहे ? संपूर्ण विश्व ज्याने निर्माण केलं त्याचं हे शरीर आहे. असं असताना, माझं शरीर आहे, मी तुम्हाला देतो असं म्हणणं योग्य नाही. हे काही खरं दान नाही. केवढी अधिकारी स्त्री असली पाहिजे यांचा अभिमान अद्यापि गेला नाही. आपण यांना क्षमा करा अशी प्रार्थना ती करते आहे.
ब्रह्मदेव म्हणतात, ""भगवान, याने आपलं सर्वस्व आपल्याला दिलं. आपला देहदेखील अर्पण केला. आपल्याला भक्ताने पत्र, पुष्पं, फलं, तोयं यातलं काहीही जरी दिलं तरी तो उत्तम गतिला जातो आणि याने सर्वस्व देऊन सुद्धा याला बंधनात ठेवलं आहे ? याला आपण सोडा.''
ब्रह्मन् यमनुगृह्णामि तद्विशो विधुनोम्यहम् ।।
यन्मदः पुरुषः स्तब्धो लोकं मां चावमन्यते ।।
8.22.24 ।। श्री. भा.
ज्याच्यावर खरी कृपा करावीशी मला वाटते त्याचं सर्वस्व मी हरण करतो. जोपर्यंत संपत्ती आहे, बुद्धि आहे तोपर्यंत तो सर्व लोकांचा अपमान करतो, माझाही अपमान करतो. हा जीवात्मा आपल्या कर्माने सारखा जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये पडलेला असतो. केव्हातरी मनुष्यजन्म याला मिळतो आणि अशावेळेला, याला जर धनाचा, ज्ञानाचा अभिमान उत्पन्न झाला तर याचा मनुष्यजन्म फुकट जाईल. पुन्हा मनुष्यजन्म केव्हा मिळेल याचा नियम नाहि. पण माझा जो खरा भक्त आहे तो या अभिमानामध्ये कधीही पडत नाही. हा दानवांचा सेनापती राजा अत्यंत कीर्तिसंपन्न आहे. माझ्या मायेच्या मोहातून तो बाजूला झालेला आहे. इतक्या संकटात पडलेला असताना सुद्धा याला दुःख नाहिये. याचं राज्य गेलं, संपत्ती गेली, आप्तबांधव निघून गेले, गुरूंनी याला शाप दिला. पण अशाही स्थितीमध्ये आपलं सत्य त्याने सोडलेलं नाही. कितीही याची परीक्षा घेतली तर सत्यवाणी सोडलेली नाही
एष मे प्रापितः स्थानं दुष्प्रापं अमरैरपि ।।
8.22.31 ।। श्री. भा.
देवांनासुद्धा जे स्थान मिळणार नाही ते याला द्यायचंय. पुढं सावर्णि मन्वंतरामध्ये याला इंद्र व्हायचं आहे. लक्षात ठेवा ब्रह्मदेवा. तुमच्या नियमाप्रमाणे शंभर अश्वमेध यज्ञ याचे आता पूर्ण झाले परंतु याची योग्यता किती आहे. हा दैत्य असला तरी श्रेष्ठ महात्मा आहे. दैत्यांनी स्वर्गाचं राज्य करू नये हा तुमचा नियम असेल सृष्टीमध्ये, पण मी सांगतो आहे. हा इंद्र होणार आहे. आत्ता याला राहायला जागा नाही. हे सर्व घेतलेलं इंद्राकडे द्यायचं आहे ना याला सुतल लोकामध्ये जाऊ दे. त्याठिकाणी आधि, व्याधि काहीही नाहिये. बलिराजाला सांगीतलं, ""बलिराजा तू आनंदाने सुतललोकात जा. स्वर्गापेक्षासुद्धा अत्यंत सौख्य त्याठिकाणी आहे. सगळ्या आपल्या ज्ञातिबांधवांना बोलव आणि तिथं राहा. तुला कोणीही त्रास देऊ शकणार नाही. इंद्रादिक देवसुद्धा तुला काहीही करू शकणार नाहीत. मी स्वतः तुझा द्वारपाल म्हणून राहीन आणि तुझं रक्षण करीन. माझ्या सहवासाने, दर्शनाने तुझी आसुरी वृत्ति पूर्ण शांत होईल.''
शुक सांगतात, ""राजा, भगवंताचं ते भाषण ऐकलं बलिराजाने, नेत्रातून अश्रुधारा वाहताहेत. हात जोडून तो म्हणतोय, ""भगवंता, आपण आल्यापासून मी आपल्याला प्रणामदेखील केला नाही. दान द्यायचं का नाही, गुरूंचा दोष यातचं सगळा वेळ गेला. त्याने मग श्रीहरींना, शंकरांना, ब्रह्मदेवांना प्रणाम केला आणि तो सुतललोकात जाण्याकरता निघाला. प्रल्हादजी म्हणाले, ""देवा, या बलिराजावर केवढी कृपा आपण केलेली आहे. बाकी कुणावरही अशी कृपा नाहिये. आपण स्वतः याचे द्वारपाल म्हणून राहणार ही केवढी कृपा आहे. आपण विश्ववंद्य असताना, आमचे द्वारपाल म्हणून राहायचं म्हणजे आमचं पुण्य म्हणायचं का आपली कृपा ? भगवान सांगताहेत, प्रल्हादा, तू ही जा आपल्या नातवाबरोबर, माझं दर्शन होईल. सगळी मंडळी निघालेली असताना, एक काम बाकी राहिलंय असं लक्षात आलं. तो शंभरावा अश्वमेध यज्ञ अजून पूर्ण झालेला नव्हता. हे वामन आल्याबरोबर तो बंद पडला. ते शुक्राचार्य रागावून दूर एका झाडाखाली बसले होते. वामनांनी आपलं मूळ बटुरूप धारण केलं आणि ते गेले शुक्राचार्यांकडे. ""गुरुमहाराज नमस्कार, शिष्यावर इतकं रागावणं बरं नाही. आपणच त्याला वाढवलं आणि आपणचं त्याला आता शाप देताय?
विषवृक्षोऽपि संवर्ध्यः स्वयं छेत्तुं असाम्प्रतम् ।।
विषाचं झाड स्वतः लावलेलं असेल तरीही स्वतः तोडू नये म्हणतात. बलिराजा किती गुणी आहे महाराज. केवढा सत्यनिष्ठ आहे. त्याचं तुम्ही कौतुक करायला पाहिजे. इतके यज्ञ त्याच्याकडून करवले तुम्ही आणि शंभरावा यज्ञ अर्धवटच सोडून देताय ? हा पूर्ण करायला पाहिजे. तुम्ही या. चला. आम्ही आल्यामुळे हे विघ्न उत्पन्न झालं. करा. यज्ञ पूर्ण करा. शुक्राचार्यांच्या लक्षात आलं ते. कायद्याप्रमाणे सगळं झालं पाहिजे. शंभर अश्वमेध यज्ञ झाल्याशिवाय इंद्रपद कसं मिळेल ? भगवान असले तरी लोक विचारणार ! शुक्राचार्य म्हणाले, ""भगवंता, आपण आल्यामुळे हे उत्तम कर्म झालेलं आहे. आपण साक्षात यज्ञेश्वर याठिकाणी येऊन त्याचं दान घेतलं म्हणजेच ते कर्म पूर्ण झालेलं आहे. आपली आज्ञा आहे तर यज्ञ पूर्ण करू.'' यज्ञ पूर्ण झालेला आहे. पूर्णाहुति झालेली आहे आणि बलिराजा प्रल्हादजींसह सुतललोकात राहायला गेलेला आहे. मग इंद्राला बोलावून त्याला ते राज्य दिलेलं आहे. अदितीलाही सांगीतलं, ""आई साहेब, हे राज्य तुमच्या मुलाला दिलंय बरं. तुम्ही सुद्धा आपल्या मुलांजवळ जाऊन राहा. आता काही दुःख करू नका, काळजी करू नका. इंद्राने राज्य घेतलं पण काही जाणीव नाहिये. वामनांनी इतका प्रयत्न केला, बलिराजाकडे याचक म्हणून गेले, म्हणून व्यवहारदृष्टीने का होईना परंतु वामनांचा सत्कार करण
वगैरे काही नाही. इंद्राला काही लक्षात आलं नाही. ब्रह्मदेवांनी पुढाकार घेतला आणि वामनांचा सत्कार सर्व देवांकडून करवलेला आहे.
उपेन्द्रं कल्पयांचक्रे पतिं सर्वविभूतये ।।
8.23.23 ।। श्री. भा.
इंद्रस्थान जसं आहे तस एक उपेंद्र म्हणून स्थान वामनांना दिलेलं आहे, काहीतरी कृतज्ञता म्हणून. सर्व मंडळी आपापल्या स्थानाला निघून गेलेली आहेत.
राजानं विचारलं, ""महाराज, मला मत्स्यावताराचं चरित्र सांगा. देव कुठलंही रूप धारण करतात ! मत्स्यावतार काय, कूर्मावताय काय, वराहावतार काय ही असली रूपं कशाला धारण करायची ?'' शुक सांगतात, ""राजा, देवाचा अवतार कशाकरता होतो. तुला माहिती आहे का?
गोविप्रसुरसाधूनां छन्दसामपि चेश्वरः ।
रक्षां इच्छंस्तनूर्धत्ते धर्मस्य अर्थस्य चैव हि ।।
8.24.5 ।। श्री. भा.
गाई, विप्र, देव, साधू, वेद, धर्म या सर्वांचं रक्षण करण्याकरता भगवंताचा अवतार होत असतो. कोणतंही रूप धारण केलं तरी देवाला काही कमीपणा नाही. वायु हा सगळ्यांच्या ठिकाणी आहे. पशु, पक्षी, मानव, देव सगळ्यांच्या ठिकाणी वायु आहे म्हणून वायूला काय कमी जास्तपणा मानायचा का ? तो नेहमीच समर्थ आहे. पूर्वी एकदा, ब्रह्मदेव निद्रीस्त झालेले होते नैमित्तिक प्रलय झाला होता. त्रैलोक्य सगळं जलामध्ये विलीन झालं. झोपलेल्या ब्रह्मदेवांच्या मुखातून वेद बाहेर पडले आणि हयग्रीव नावाच्या दैत्याने ते हरण केले. ते वेद पुन्हा आणून ब्रह्मदेवांना द्यायचे आहेत त्याकरता हा मत्स्यावतार झालेला आहे.
एकदा एक राजर्षि, सत्यव्रत नावाचा, मोठा नारायणभक्त होता. तोच सत्यव्रत हा पुढं सूर्यनारायणांचा पुत्र, वैवस्वत मनू म्हणून जन्माला आलेला आहे. तो एकदा नदीतीरावर तर्पण करत असताना त्याच्या हातामध्ये एक लहानसा मासा येऊन पडला. त्याने तो मासा पुन्हा नदीत टाकून दिला, तेव्हा तो मासा बोलू लागला, ""राजेसाहेब, इथे मोठे मोठे मासे, मगर आहेत. इथं मला ठेवू नका, माझं रक्षण करा.'' त्या माशाला आपल्या तांब्यामध्ये राजाने घेतलं आणि तो आपल्या राजवाड्यामध्ये आला. त्या माशानं आपल्या शरीराचा विस्तार केला त्यामुळे तो तांब्या पुरेना, मग त्याला एका मोठ्या रांजणात ठेवलं. परत तो मासा मोठा झाला मग त्याला एका तलावात ठेवलं. तेही पुरेना म्हणून राजाने त्याला पुन्हा समुद्रात टाकून दिलं. पुन्हा तो मासा म्हणाला, ""अहो इथे मला टाकू नका. माझ्या जीवाला धोका आहे.'' तो राजा विचारतोय,
""बाबा, तू आहेस तरी कोण ? कितीही मोठी जागा तुला दिली तरी तुला पुरत नाही, हे काय आहे ?'' भगवान म्हणाले, ""राजा, दैत्याने हरण केलेले वेद हे ब्रह्मदेवांना पुन्हा आणून देण्याकरता मी हा देह धारण केलेला आहे. सध्या प्रलयकाल आहे. ब्रह्मदेव निद्रीस्त आहेत तोपर्यंत हे सगळं त्रैलोक्य जलामध्ये विलीन होणार आहे. आजपासून सातवे दिवशी हा प्रलय होणार आहे. त्यावेळेला एक मोठी नाव इथे येईल. सप्तर्षींना घेऊन तुम्ही त्याच्यात बसा. मी त्याठिकाणी प्रगट होईन. नागराज वासुकीला घेऊन माझ्या शिंगाला ती नाव बांधून टाका. मी त्या नावेला घेऊन त्या जलामध्ये विहार करीन. मी कोण आहे, माझं सामर्थ्य काय आहे हे सगळं तिथं आपण बोलू. ऋषिंडळीही असतील तिथे. ब्रह्मदेव जागे होईपर्यंत आपल्याला हेच काम करायचंय.'' याप्रमाणे त्याला सांगितलं. पुढे पर्जन्यवृष्टी सुरू झाली. हत्तीच्या सोंडेप्रमाणे धारा पडायला लागल्या. समुद्राने मर्यादा सोडली. जिकडेतिकडे पाणीच पाणी झालं. सप्तर्षि आले म्हणाले, ""चला राजेसाहेब, ही नाव आलेली आहे. आपण जाऊन बसू या. भगवान आपलं संरक्षण करणार आहेत.'' सर्व ऋषींना बरोबर घेऊन राजा त्या नावेत जाऊन बसला. एक अजस्त्र मत्स्य प्रगट झालेला आहे त्याला एक शिंग आहे, त्याचं शरीर सुवर्णमय आहे आणि दहालक्ष योजनं लांब आहे. वासुकीच्या साहाय्याने त्या मत्स्याच्या शिंगाला ती नाव बांधली आणि त्या नावेला घेऊन मत्स्यमूर्ती श्रीहरी समुद्रातून निघालेले आहेत. ऋषिमंडळी विचारताहेत, आपण कोण आहात, सृष्टीरचना कशी आहे, प्रलयराचना कशी आहे ! अनेक प्रश्न विचारताहेत. त्याची उत्तरं भगवान देताहेत. असं चाललेलं आहे. भरपूर वेळ उपलब्ध आहे. असा बराच काल गेला. सृष्टीनिर्मिती काल आलेला आहे. भगवंताने त्या हयग्रीव दैत्याला मारून ते वेदज्ञान, जागृत झालेल्या ब्रह्मदेवांना अर्पण केलेलं आहे. सत्यव्रत राजावर मत्स्यरूपी परमेश्वराची पूर्ण कृपा झालेली आहे. असं हे मत्स्यावताराचं चरित्र शुक्राचार्य महाराजांनी परीक्षित राजाला निवेदन केलेलं आहे.
आता याच्यानंतर राजाने विचारलं, ""महाराज, सर्व मनुराजांचं चरित्र, त्यांचा काल किती वगैरे हे सगळं ऐकलं. सत्यव्रत राजाला भगवंतांच्या कृपेने ज्ञान मिळालं आणि तो सूर्यनारायणांचा पुत्र विवस्वान म्हणून प्रसिद्ध झाला हे आपण सांगितलं. श्रेष्ठ अशा प्रकारचे भगवद्भक्त तपस्वी, उत्तम धर्मशील राजे लोक कोणते झालेले आहेत त्यांच्या कथा मला आपण सांगा. पूर्वी होऊन गेलेले, आत्ता असलेले, पुढे होणार असलेले अशा सर्व राजांची चरित्रं आपण सांगा. राजे आहेत म्हणून चरित्र ऐकायची असं नाही तर हे राजे म्हणजे भगवंताच्या विभूतीच आहेत म्हणून त्या कथा सांगा.
शुक्राचार्य सांगताहेत, ""मनुराजाचा वंश पुष्कळ आहे. ब्रह्मदेव हे श्रीहरीच्या नाभिकमलातून उत्पन्न झाले. त्यांचे प्रथम पुत्र म्हणजे मरिची ऋषि. हे मनःसंकल्पाने उत्पन्न झाले. त्यांचे पुत्र कश्यप आहेत. आणि कश्यपांपासून दक्षकन्या अदितीच्या ठिकाणी विवस्वान म्हणजे सूर्यनारायण हा पुत्र झाला. सूर्यनारायणांपासून श्राद्धदेव मनू किंवा वैवस्वत मनू झालेला आहे. सध्या त्यांचाच काल चालू आहे. बरेच दिवस वैवस्वत मनूला संतती नव्हती. आपल्या गुरूंना, वसिष्ठ ऋषींना त्याने पुत्रप्राप्तीकरता उपाययोजना करण्याची विनंती केली. वसिष्ठ महर्षींनी मित्रावरुण देवतांच्या प्रसादाकरता यज्ञ केला. तो यज्ञ चालू असताना मनूची पत्नी ऋषीजवळ आली आणि तिने सांगितलं की मला मुलगी पाहिजे आहे. ऋषींनी मंत्रप्रयोग वेगळा केला. शेवटी राजाला मुलगी झालेली आहे. राजाला हे माहिती नाही. राजाने आश्रमात जाऊन गुरूंना विचारलं, ""काय ऋषिहाराज, हे असं कसं झालं ? तुमच्यासारख्या तपस्वी पुरुषांनी पुत्र होण्याकरता माझ्याकडून यज्ञ करवला आणि कन्या कशी झाली ? वसिष्ठ ऋषींना खरं काय ते कळलं तरी त्यांना सांगता येईना. तुझ्या पत्नीनेच हे सांगितलं असं सांगून त्या दोघांत काय भांडण लावायचंय ? वसिष्ठ म्हणाले, काळजी करू नकोस, तुला मुलगा पाहिजेना, आपण प्रयत्न करू. त्यांनी भगवान श्रीहरींची प्रार्थना केली, ही मुलगीच मुलगा व्हायला पाहिजे. दुसरा मुलगा कशाला, राजाची इच्छा आहे, पुन्हा यज्ञ करा, पुन्हा वाट पाहा. प्रसन्न झाले भगवान. ती इला नावाची कन्या, ती पुरुषरूप झाली, सुद्युम्न नाव त्याचं ठेवलं. राजपुत्र मोठा होतो आहे. एकदा आपल्या सवंगड्यांसह तो राजपुत्र शिकारीला गेलेला असताना, मेरूपर्वताच्या एका स्थानामध्ये ती मंडळी गेली. त्या स्थानामध्ये भगवान शंकर पार्वतीमातासह राहात होते. त्या स्थानामध्ये राजपुत्राने आपल्या मित्रांसोबत प्रवेश करताच सगळ्यांना स्त्रीरूप प्राप्त झालं. राजा म्हणतोय याचं कारण काय आहे! शुक्राचार्य सांगताहेत, ""शंकर परमात्मा तिथे राहात असताना एकदा काही ऋषिमंडळी दर्शनाकरता तिथे आली. त्यावेळी पार्वतीमाता, तिच्या दासी यांना लज्जा उत्पन्न झाली. गडबड झाली. ऋषिमंडळींनी पाहिलं आणि ते निघून गेले. त्यावेळी सहज भगवान शंकर बोलून गेले.
स्थानं यः प्रविशेत् एतत् स वै योषिद् भवेदिति ।।
9.1.32 ।। श्री. भा.
या स्थानामध्ये माझ्याशिवाय जो पुरुष प्रवेश करेल त्याला स्त्रीरूप प्राप्त होईल. त्यावेळेपासून ज्यांना माहिती आहे असा कोणीही पुरुष तिथे जात नाही. तो राजपुत्र आणि त्याचे मित्र स्त्रीरूप झाले आणि फिरताहेत तिथे. ती राजकन्या म्हणजे तो स्त्रीरूप झालेला राजपुत्र फिरत फिरत बुधाच्या आश्रमात आलेला आहे. बुधाने तिच्याबरोबर विवाह केलेला आहे आणि ती तिथेच