राहिलेली आहे. पुरुरवा नावाचा मुलगा त्यांना झालेला आहे. वसिष्ठांना हे समजलं. भगवान शंकरांना ते शरण गेले. ""तुमच्या वचनामुळे आमचा राजपुत्र स्त्री झालेला आहे. त्याच्यावर कृपा करा. पुरुषरूप करा त्याला.'' शंकर म्हणाले, ""बाबा, माझंही वचन खरं ठरलं पाहिजे, तुमचीही इच्छा पूर्ण झाली पाहिजे. त्यामुळे असं करू, एक महिना हा पुरुष राहील आणि एक महिना स्त्री होईल.'' कबूल करावं लागलं वसिष्ठांना. परत आलेले आहेत. पण त्या राजाकडे कुणाचंही लक्ष नाहिये. एक महिना पुरुष काय, एक महिना स्त्री काय? हा असला राजा आम्हाला नको म्हणाले लोक. शेवटी त्या सुद्युम्नाने राज्यत्याग केला. आपल्या मुलाला पुरुरव्याला राज्याभिषेक करून तो वनात निघून गेला.
यानंतर वैवस्वत मनूने तपश्चर्या केली आणि इक्ष्वाकू, शर्याती वगैरे दहा मुलं त्याला नंतर झालेली आहेत. त्यापैकी पृषध्र नावाचा जो मुलगा होता त्याला वसिष्ठांनी आपल्या गाईंचं रक्षण करण्याची आज्ञा केली. कितीतरी गाई असायच्या. त्यावेळेला दान हे रुपया-पैशात नव्हतं तर गाईंच्या रूपाने असायचं. ब्राह्मणांना, ऋषींना गाईचं दान दिलं जायचं. त्यांच्याही आश्रमात अनेक शिष्य शिकायला असायचे, तिथे उपयोग व्हायचा.
अटवी पर्वताश्चैव वनानि उपवनानि च ।
एतानि अस्वामिकान्याहुः ।।
मनुस्मृती
मोठे मोठे पर्वत, अरण्य, वृक्ष, वनं यांच्यावर कोणाचंही स्वामित्व नाही. सगळं मोकळं होतं. राजाचंही स्वामित्व नाही असं मनुराजाने सांगून ठेवलेलं आहे. सगळ्या गाईंनी त्याच्यावर चरावं. कशावर बंदी नाही. आता प्रत्येक झाडावर नंबर घातलेले आहेत. सगळंच आमचं आहे अशी वृत्ति उत्पन्न झाली आहे. तो राजपुत्र गाईंचं संरक्षण करतो आहे. एकेदिवशी संध्याकाळी त्या गाई परत आल्यानंतर त्यांचं दूध काढलेलं आहे, त्यांना बांधून ठेवलं. थोडासा अंधार पडलेला असताना एक वाघ गोठ्यामध्ये शिरला आणि त्या गाईला त्याने धरलं. ती ओरडायला लागली. हा पृषध्र राजपुत्र तलवार उपसून तिथे गेला. त्याला अंधारात नीट दिसलं नाही. वाघाचा कान तुटला आणि गाईचं मस्तक तुटलेलं आहे. वाघ पळून गेला. दुसरे दिवशी सकाळी हा प्रकार सर्वांना समजला. वसिष्ठ रागावलेले आहेत. गोहत्या तू केलेली आहेस. जा निघून जा म्हणाले, वनामध्ये. तू शूद्र होशील. तुला राज्य करण्याचा अधिकार नाही. तो निघून गेला. ब्रह्मचर्यव्रत धारण करून भगवान वासुदेवाची भक्ति करून तो मुक्त झालेला आहे.
मनुराजाचा शर्याति नावाचा एक मुलगा होता. उत्तम वेदाध्ययन त्याने केलेलं आहे. यज्ञाधे त्याने काम करावं, असा तो मोठा अधिकारी होता. त्याला एक सुकन्या नावाची कन्या होती. एकदा त्या कन्येला बरोबर घेऊन तो शर्याति राजा अरण्यामध्ये शिकारीला गेला. मध्ये विश्रांतीकरता च्यवन ऋषींचा आश्रम होता तिथे तो आपल्या सैन्यासह थांबलेला आहे. ती सुकन्या आपल्या मैत्रिणींसह त्या अरण्यामध्ये फिरू लागलेली आहे. मध्ये एक मोठं वारूळ लागलं, आत कुणीतरी बसलं आहे असं तिला वाटलं. तिने एक काठी घेऊन त्या वारुळात घातली. आत च्यवन ऋषि बसलेले होते, त्यांच्या डोळ्याला ती काठी लागली. डोळे गेलेले आहेत. त्यांच्या शापामुळे सर्व सैनिकांचा, सर्वांचा मल-मूत्रनिरोध झाला. त्या शर्यातिने सगळ्यांना विचारलं, ""कुणी या आश्रमात ऋषीचा अपमान केला आहे काय? खरं सांगा.'' त्या सुकन्येने येऊन सांगितलं की असा असा अपराध माझ्या हातून झालेला आहे. मला काही कळलं नाही. मुलीला घेऊन शर्याति राजा च्यवन ऋषींना शरण गेलेला आहे. प्रार्थना केली. आता ऋषि अंध झालेले आहेत. त्यांचं कोण संरक्षण करणार? त्यांनी सांगितलं, ""बाबा, तुझी कन्या मला अर्पण कर. ती माझं संरक्षण करेल.'' राजाची इच्छा नव्हती. आपली एकुलती एक मुलगी अंध, वृद्ध ऋषीला द्यायची त्याची इच्छा नव्हती. राणीचीही इच्छा नव्हती. परंतु ती सुकन्या तयार झाली. लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न होता. मग त्या शर्यातिने आपल्या कन्येला च्यवन ऋषींना अर्पण केलं. विवाह झाला. राजा परत गेलेला आहे.
एके दिवशी ती सुकन्या पाणी आणण्याकरता गेलेली असताना, सूर्यनारायणांचे पुत्र अश्विनीकुमारांची दृष्टी तिच्यावर पडली. तिची चौकशी केली त्यांनी. तिनेही सांगितलं की आपण शर्याति राजाची कन्या असून, च्यवन ऋषि माझे पती आहेत. ते म्हणाले, ""काय तू राजकन्या असून ही कामं करत बसली आहेस? अलंकार नाहीत, उंची वस्त्र नाहीत, तू आमच्याबरोबर स्वर्गलोकाला चल.'' नाही म्हणाली सुकन्या, ""मी यांची सेवा करत राहणार आहे. मोठे तपस्वी महात्मे आहेत.'' त्यांना स्नान घालणं, अन्न तयार करणं, जेवायला घालणं, पूजेची तयारी करून ठेवणं अशी सगळी कामं ती सुकन्या करत होती. अश्विनीकुमार आश्रमामध्ये च्यवन ऋषींना भेटण्याकरता आले. ऋषि म्हणाले, ""तुम्ही देववैद्य आहात. मला तारुण्य प्राप्त करून द्या आणि नेत्र प्रदान करा. हे जर तुम्ही काम केलं तर मी तुम्हाला यज्ञातला हविर्भाग मिळवून देईन. सोमरसपायी मी तुम्हाला करीन.'' अश्विनीकुमार च्यवनऋषींना घेऊन बाहेर आले. मोठा एक तलाव होता. त्या तिघांनीही जलाशयात प्रवेश केला. ती सुकन्या वाट पाहात तीरावर थांबलेली
आहे. थोड्याच वेळात तीन दिव्य पुरुष बाहेर आले. सगळ्यांचं सारखं रूप आहे. अश्विनीकुमारांनी तिला सांगितलं होतं की तुझा पती ओळखून तू घे. आता कसं ओळखायचं? कुणाला तरी पसंत केलं आणि ते अश्विनीकुमार निघाले तर? ती देवीभक्त होती. तिने स्मरण केलं देवीचं आणि काही खूण म्हणून ती म्हणाली, संध्याकाळ झाली महाराज, संध्यावंदनाची वेळ झाली. असं म्हटल्याबरोबर जे ऋषि होते ते अर्घ्यप्रदान करायला लागले. हेच आपले पती आहेत हे तिने ओळखलं. अश्विनीकुमारांनीही तिची प्रशंसा केली आणि ते स्वर्गलोकाला निघून गेले.
तरुण झालेल्या च्यवनऋषींबरोबर सुकन्येचा संसार चालू आहे आता काही पराधीनता नाही. डोळे आलेले आहेत, सामर्थ्य आलेलं आहे. शर्याति राजाला यज्ञ करण्याची इच्छा झाली आणि आपल्या जावयांना बोलावण्याकरता तो आश्रमात आला. मोठे अधिकारी होते च्यवनऋषि. आश्रमात प्रवेश केल्यावर तो राजा पाहतो आहे की आपली कन्या एका तरुण पुरुषाबरोबर बोलत बसलेली आहे. त्याची कल्पना झाली की सुकन्येने अंध, वृद्ध च्यवन ऋषींना कुठेतरी घालवून दिलं किंवा नदीमध्ये ढकलून दिलं आणि या तरुणाला घेऊन ही बसलेली आहे. तो रागावलेला आहे. च्यवन ऋषिही ऐकताहेत. तो म्हणतोय, ""तुझं नाव मी सुकन्या ठेवलं आणि तू मात्र आपल्या वृद्ध पतीला घालवून देऊन या तरुणाला घेऊन बसली आहेस. आपल्या कुळाला कलंक लावलास तू.'' सुकन्येने सांगितलं, ""या, या पिताजी, अहो हेच आपले जावई च्यवनऋषि आहेत. उगीच काय रागावता?'' मग तिने सगळी घडलेली हकीकत सांगितली.
राजाने च्यवनऋषींना विनंती केली आणि त्या दोघांना घेऊन तो राजधानीमध्ये आलेला आहे. यज्ञ सुरू झालेला आहे. सोमवल्लीचा रस काढला आणि प्रत्येक देवांची पात्रं भरलेली आहेत. त्यापैकी च्यवनऋषींनी कबूल केल्याप्रमाणे अश्विनीकुमारांच्या नावचं पात्र भरलेलं आहे. च्यवनऋषींनी त्यांना ते पात्र घ्यायला सांगितलं. इंद्र उठून उभा राहिला, ""नाही, यांना यज्ञात अधिकार नाही. यांना सोमरस घेता येणार नाही.'' च्यवनऋषि म्हणाले, ""का घेता येणार नाही? ते तुमच्यापैकीच देव आहेत ना. मला त्यांनी नवजीवन प्रदान केलेलं आहे. लोकोपकारक विद्या त्यांची आहे. वैद्यांना सोमरस देता येत नाही, कुणी सांगितलं?'' इंद्र रागावला आणि शर्याति राजाला मारण्याकरता त्याने हातात वज्र घेतलं. च्यवन ऋषींनी रागाने पाहिल्याबरोबर त्याचा हातच हलेना. वज्र घेतलेला हात तसाच वरच्यावर राहिला. मग इंद्राने कबूल केलं. ऋषींनी, देवांनी कबूल केलं. इंद्राचा आग्रह! सगळे देवच असताना हे वैषम्य कशासाठी? च्यवनऋषींनी ते वैषम्य दूर केलं आणि अश्विनीकुमारांना यज्ञातला भाग मिळवून दिला.
याच वंशामध्ये रैवत नावाचा राजा झालेला आहे. समुद्रामध्ये मोठी नगरी त्याने निर्माण केली. राज्य करतो आहे. त्याला ककुद्मि नावाचा मुलगा झाला. त्याला रेवती नावाची मुलगी झाली. त्या मुलीला घेऊन तो ककुद्मि राजा ब्रह्मलोकात गेला, तिला कुठला वर ब्रह्मदेवांनी योजलेला आहे हे जाणून घ्यायला. हे एवढं कुणाला करता येत नाही. नाही तर लग्न लवकर झाली असती. राजा गेला ब्रह्मदेवांच्याकडे तेव्हा तिथं गायन चाललं होतं. त्यावेळेला काही बोलणं झालं नाही. गायन संपल्यावर तो ब्रह्मदेवांपाशी गेला, नमस्कार केला आणि विचारलं ह्या मुलीचं लग्न कुणाबरोबर करायचं? ब्रह्मदेव हसले, म्हणाले, ""तुमच्या भूमीवर कितीतरी काळ उलटून गेलेला आहे. तुझी मुलं, त्यांची मुलं कुणीही शिल्लक राहिलेलं नाही. सत्तावीस युगं इतका काळ गेलेला आहे आता तुझ्या वेळचं कोणीही शिल्लक नाही. आता सध्या शेषांचा अवतार बलराम आहेत, मथुरेमध्ये त्यांना तुझी कन्या देऊन टाक.'' राजाने येऊन आपली कन्या रेवतीला बलरामांना अर्पण केली आणि तो तपश्चर्या करण्याकरता बद्रिकाश्रमात निघून गेलेला आहे.
मनुराजाचा एक मुलगा नभग नावाचा होता. त्याचा पुत्र नाभाग नावाचा. त्याने पुष्कळ दिवस गुरुकुलात राहून अभ्यास केला. त्याच्या इतर भावांना वाटलं हा आता ब्रह्मचारीच राहणार आहे, आपण आपली वाटणी करून घेऊ. त्याप्रमाणे त्यांनी ते आपापसात वाटून घेतलं. काही कालाने नाभाग परत आला. माझा दायभाग मला द्या म्हणाला. तुझ्या वाटणीला फक्त हा बाप शिल्लक राहिलेला आहे. त्याला तू घेऊन जा. त्याची सेवा कर. त्याने येऊन पित्याला सांगितलं सर्व. नभग म्हणाला, बोलू देत त्यांना, आपण प्रयत्न करू. इथे जवळच ऋषिमंडळींचे आश्रम आहेत. तिथे यज्ञ चाललेले आहेत. तू आत्ताच शिकून आलेला आहेस. तिथे जाऊन तू मंत्रपठण कर म्हणजे यज्ञातलं राहिलेलं द्रव्य ते तुला देतील, त्याच्यावर तुझा निर्वाह होईल. बंधूंना कशाला दुखवतोस? नाभाग गेलेला आहे. त्याच्या मंत्रपठणाने ऋषिमंडळी प्रसन्न झाली आणि यज्ञातलं सर्वही द्रव्य त्याला देऊन ती स्वर्ग लोकाला निघून गेली. ते द्रव्य घेऊन तो घरी निघाला असताना एक दिव्य पुरुष त्याठिकाणी आला आणि त्याने सांगितलं हे माझं द्रव्य आहे. नाभाग म्हणाला, मला आत्ताच ऋषींनी हे दिलेलं आहे ते तुमचं कसं होईल? तो पुरुष म्हणाला तू तुझ्या पित्याला जाऊन विचार आणि नंतर मला सांगायला ये. त्याने पित्याला जाऊन सांगितलं की कोणी एक पुरुष आलेला आहे आणि यज्ञातला राहिलेला भाग माझा असतो. असं तो म्हणतोय. पित्याने सांगितलं, बरोबर आहे, यज्ञात राहिलेला अवशिष्ट भाग रुद्राचा असतो. शास्त्र सांगतं आहे. आपण आणखी पुन्हा प्रयत्न करू. त्याचा भाग त्याला देऊन टाक. देवाच्या कृपेने कसाही आपला...
योगक्षेम चालेल. परत आला तो राजपुत्र. त्या रुद्राला नमस्कार केला. मला माहिती नव्हतं म्हणाला. पित्याने मला सांगितलं, हे आपलं द्रव्य आपण घ्या. भगवान शंकर संतुष्ट झाले. पित्याच्या सांगण्यावरून केवढी सत्यनिष्ठा आहे. आपल्या उदरनिर्वाहाचीही चिंता नाही. शंकर म्हणाले, ""नाभागा, हे सर्व द्रव्य मी तुला दिलेलं आहे आणि तुला ज्ञानही दिलेलं आहे. तू नित्यतृप्त राहशील. मुक्त होशील.'' असं सांगून भगवान शंकर अंतर्धान पावलेले आहेत. सत्याचं फळ त्या नाभागाला मिळालं. काही दिवस त्याने राज्य केलेलं आहे आणि त्याला अंबरीश नावाचा मुलगा झालेला आहे. मुलाच्या स्वाधीन राज्य करून नाभाग वनात निघून गेलेला आहे.
अंबरीश राजा मोठा हरिभक्त होता. नित्य हरीची सेवा त्याने करावी. पुष्कळ यज्ञ त्याने केले. द्रव्यदान पुष्कळ केलेलं आहे. सर्व देवगण त्याच्या यज्ञामध्ये हविर्भाग घेऊन तृप्त झालेले आहेत. अशी त्याची भक्ति चाललेली आहे. पुष्कळ संपत्ती आहे, स्त्रिया, पुत्र, आप्तबांधव, राज्य आहे, पण हे सर्व विनाशी आहे ही जाणीव पक्की झालेली आहे मनामध्ये. आहे तोपर्यंत भोगायचं. अशा आपल्या भक्ताचं रक्षण करण्याकरता श्रीहरींनी आपल्या सुदर्शनचक्राला त्याच्यापाशी अंगरक्षकरूपाने ठेवलेलं आहे. त्याने एकदा द्वादशीव्रत केलं. एकादशीला निराहार राहायचं, द्वादशीला लवकर पारण्याच्या वेळेप्रमाणे, ब्राह्मणांची पूजा करायची आणि त्यांना भोजन द्यायचं. अस एक वर्षभरपर्यंत त्याने केलं. कार्तिक द्वादशीला, सगळी मंडळी जमलेली आहेत. ताटं, पाट, वाट्या सगळं मांडलेलं आहे. भोजनाची सर्व सिद्धता झालेली आहे. इतक्यात दुर्वास ऋषि त्याठिकाणी आले. अंबरीषाने त्यांची पूजा केली आणि विनंती केली की पानं तयार आहेत, जेवायला बसावं. दुर्वासऋषि म्हणाले स्नानसंध्या करून येतो असं म्हणून ते नदीतीरावर गेले. त्यांना यायला वेळ लागला, बाकीची ब्राह्मण मंडळी तर पानावर येऊन बसली. पारण्याची वेळ टळू नये म्हणून आणि ब्राह्मणांचा अपमान होऊ नये म्हणून अंबरीषाने मनाने ठरवलं की नुसत पाणी पिऊन द्वादशी सोडायची. म्हणजे भोजन केलं असंही होणार नाही आणि पारणं केली नाही असंही होणार नाही. पाणी पिऊन त्याने बाकीच्या ब्राह्मणांना जेवायला बसवलं. वर्षभर व्रत केलं होतं, थोड्याकरता व्रतभंग होऊ नये म्हणून त्याने असं केलं. दुर्वासऋषि आले आणि त्यांनी ओळखलं की राजाने द्वादशी सोडलेली आहे. मला काही त्याने विचारात घेतलं नाही आणि माझा उपमर्द केलेला आहे. पण राजा थोडाच जेवला होता. पण विचार नाहिये. शासन करायचंय. अतिशय रागावलेले आहेत दुर्वास, म्हणताहेत, "अरे अंबरीषा, फार उन्मत्त झाला आहेस तू. ही काय विष्णुभक्ति म्हणायची? अतिथीला सोडून पारणं करतोस?'' राजा हात जोडून काकुळतीने उभा आहे. दुर्वास ऋषींनी...
आपली एक जटा उपटली आणि भूमीवर टाकलेली आहे. त्यातून एक राक्षसी निर्माण झाली आणि तलवार हातात घेऊन त्या अंबरीश राजाला मारण्याकरता धावून गेली.
प्राग्दिष्तं भृत्यरक्षायां पुरुषेण महात्मना ।
ददाह कृत्यां तां चक्रं क्रुद्धाहिमिव पावकः ।।
9.4.48 ।। श्री. भा.
सुदर्शनचक्राला आज्ञा केली होती भगवंतानी याचं रक्षण तुला करायचंय. अंबरीषाचा शरीररक्षक तू आहेस. त्याप्रमाणे ते चक्र एकदम तिथे प्रकट झालं. त्या राक्षसीला त्याने जाळून टाकलं आणि दुर्वास ऋषीच्या मागे ते लागलेलं आहे. दुर्वास ऋषींना त्या चक्राचं भयंकर तेज काही सहन होईना, ते पुढे पळताहेत आणि ते चक्र पाठीमागे चाललेलं आहे. दुर्वास ऋषि ब्रह्मलोकात गेले, कैलास पर्वतावर गेले. ब्रह्मदेव, शंकरांनी सांगितलं हे काही आमचं काम नाही. तुम्ही वैकुंठलोकात परमेश्वराला शरण जा. वैकुंठलोकात येऊन ऋषींनी भगवंताचे पाय धरले, म्हणाले, ""माझं रक्षण करा, तुमचं चक्र काढून घ्या. अज्ञानाने माझ्या हातून हा दोष घडलेला आहे, मी क्षमा मागतो'', भगवान म्हणाले,
अहं भक्तपराधीनः ह्यस्वतन्त्र इव द्विज ।
साधुभिर्ग्रस्तहृदयो भक्तैर्भक्तजनप्रियः ।।
9.4.63 ।। श्री. भा.
""काय ऋषिहाराज, तुम्हाला मी कोण क्षमा करणार? मी स्वतंत्र कुठे आहे. मी भक्तांच्या अधीन आहे. साधूंनी माझं हृदय ताब्यामध्ये घेतलेलं आहे. माझं माझ्यावर स्वामित्व नाही. ज्यांनी आपल्या स्त्रीपुत्रादिकांना सोडून दिलेलं आहे आणि मला जे शरण आलेले आहेत त्यांना मी सोडून देऊ असं तुम्ही म्हणता. हे साधूलोक माझी केवळ भक्ति करताहेत, त्यांनी संपूर्ण त्याग केलेला आहे. माझ्याशिवाय त्यांना दुसरं काहीही सुचत नाही. तुम्हाला जर या चक्रापासून सुटका पाहिजे असेल तर एकच उपाय आहे. त्या अंबरीश राजाकडे जाऊन त्याची प्रार्थना करा तेव्हा ते चक्र थांबेल. मी काही याला सांगणार नाही.'' आत्तापर्यंत भगवंताचं असं रूप पाहिलेलं नाही. ब्राह्मणाविषयी केवढा आदर भगवंताला! भृगुऋषींनी लाथ मारली छातीवर तर उलट त्यांनाच विचारलं की आपल्या पायाला काही लागलं कां म्हणून. पण इथे क्षमा नाहिये. भगवंतानी सांगितलं.
तपो विद्या च विप्राणां निःश्रेयसकरे उभे ।
ते एव दुर्विनीतस्य कल्पेते कर्तुरन्यथा ।।
9.4.70 ।। श्री. भा.
ब्राह्मणाचं पूर्ण कल्याण तपाने आणि ज्ञानाने होतं. जे असे अत्यंत रागीट आहेत, अविनयाने वागणारे आहेत त्यांना उलट फळ मिळतं. त्यांच्या तपाचा, विद्येचा काही उपयोग होत नाही. नाभागाचा पुत्र अंबरीश राजाला तुम्ही शरण जा, त्याची क्षमा मागा तरंच ते चक्र शांत होईल. नाईलाज झालेला आहे. धावत धावत दुर्वास ऋषि आले. अंबरीश राजा वाट पाहतो आहे. एक वर्षाचा काल गेला. दुर्वास ऋषि जेवल्याशिवाय आपण जेवायचं नाही असा निश्चय करून तो राजा उपोषित राहिलेला आहे. दुर्वास ऋषि आले आणि त्यांनी एकदम अंबरीषाचे पाय धरले, म्हणाले सोडव मला या संकटातून, राजालाही लज्जा वाटली, एवढ्या मोठ्या ऋषींनी पाय धरले म्हणून. त्याने त्या चक्राची पुष्कळ स्तुति केलेली आहे. सर्व तेजोरूपी आपण आहात. सर्व अस्त्रांचा संहार करणारे आपण आहात. आपण शांत व्हा आणि या ऋषिहाराजांना त्रासातून मुक्त करा. आजपर्यंत जर माझ्या हातून धर्माचरण यथास्थित झालेलं असेल, कुणिही अतिथी जर आजपर्यंत माझ्या दारातून विन्मुख गेलेला नसेल तर, ह्या ब्राह्मणाचा त्रास बंद होईल.'' तरी ते चक्र शांत होईना. मग त्याने असं सांगितलं,
यदि नो भगवान् प्रीत एकः सर्वगुणाश्रयः ।
सर्वभूतात्मभावेन द्विजो भवतु विज्वरः ।।
9.5.11 ।। श्री. भा.
सर्वात्मभाव धारण करून, सर्वठिकाणी परमात्मा आहे अशी भावना ठेवून जर भगवंताची सेवा माझ्याहातून झालेली असेल, भगवंताची कृपा जर माझ्यावर असेल तर हे चक्र शांत होईल. भगवंताची कृपा होती म्हणूनच तर ते चक्र राजाच्या नगरीत होतं. लगेच ते चक्र अदृश्य झालेलं आहे. दुर्वास ऋषि तापातून मुक्त झालेले आहेत. ऋषीचं सर्वांग तप्त झालेलं आहे. राजा म्हणाला, ""चला, महाराज, बराच उशीर झालेला आहे.'' आदराने पूजा करून त्यांना भोजन दिलेलं आहे. दुर्वास ऋषिही संतुष्ट झाले, म्हणाले, ""बाबा, माझ्यावर तू दया केलेली आहेस. तू खरा भगवद्भक्त आहेस. तुझं हे चरित्र सर्व लोकांमध्ये देव गायन करतील. इतकी तुझी कीर्ति आहे.'' नंतर दुर्वास ऋषि आकाशमार्गाने ब्रह्मलोकाला निघून गेलेले आहेत. एवढं सगळं झाल्यावरसुद्धा अंबरीषाला अहंकार नाहिये. ही देवाची इच्छा आहे. मला मोठेपणा देवाने दिला आहे म्हणजे काय ते माझं कर्तृत्व आहे का? परमेश्वराच्या इच्छेने हे घडलेलं आहे. दुर्वास ऋषींना देखील काही मार्गदर्शन करायचं असेल त्यांना. आपलं सामर्थ्य नाही. अशा निरभिमान वृत्तीने त्याने भगवद्सेवा केली. मुलांच्या ताब्यात राज्य देऊन, तो वनात गेला आणि अखंड ईश्वरभक्ति करून तो मुक्त झालेला आहे.
यानंतर अनेक लहानमोठे राजे झालेले आहेत. यौवनाश्व नावाच्या राजाला संतती नव्हती. तेव्हा ऋषिमंडळींनी इंद्र याग त्याच्याकडून करवला. रात्रीच्या वेळी सगळी मंडळी निजलेली असताना राजाला तहान लागली. यज्ञमंडपामध्ये राजा गेला आणि तिथे एक पात्र भरून ठेवलं होतं ते पाणी राजा प्यायला आणि जाऊन झोपला. सकाळी सर्व ऋषिमंडळी येऊन पाहतात तर पात्रात पाणी नाही. ते पाणी अभिमंत्रित करून राणीला प्यायला ठेवलं होतं तेच पाणी राजा प्यायला. राजाने सांगितलं, मला काही माहित नव्हतं, तहान लागल्यामुळे मी ते पाणी प्यायलो. ऋषि म्हणाले, काय नशीब आहे पहा, आता राजालाच गर्भ राहाणार. त्याच्या उदरातून तो मुलगा जन्माला आला. आता त्या मुलाला दूध कोण पाजणार? माता नाहिये ना ! मग ज्याचा यज्ञ केला होता, तो इंद्र प्रसन्न झाला. त्याने आपली अमृतयुक्त अंगुली त्या मुलाच्या तोंडात घालून त्याला तृप्त केलं. तो राजाही इंद्राच्या कृपेने जिवंत झालेला आहे.
असा तो यौवनाश्वपुत्र मान्धाता राजा, इंद्राला देखील त्याने साहाय्य केलेलं आहे. रावणासारखे राजेदेखील त्याला भिऊन राहात. कार्तवीर्य अर्जुन, वाली वगैरे राजांना रावण भिऊन राहात होता. तो मान्धाता राजा सप्तद्वीप युक्त पृथ्वीचं राज्य करतो आहे. परमेश्वराच्या प्रसादाकरता अनेक यज्ञ त्याने केले. त्याला तीन मुले, आणि पन्नास मुली झाल्या. यमुनेच्या जलामध्ये एक सौभरी नावाचे ऋषि जाऊन राहिले होते, बाहेरच्या लोकांचा संबंध नको म्हणून. बापाने सांगितलं तरी गृहस्थाश्रम करायचा नाही असं त्यानी ठरवलं. सर्वसंगत्याग करून जलामध्ये राहून तपश्चर्या करत असताना, मत्स्यराजाचा परिवार, गृहस्थाश्रम यांनी पाहिला आणि यांच्याही मनात इच्छा झाली की आपणही गृहस्थाश्रम करावा. बाप सांगत होता ते ऐकलं नाही. पण आता वेळ आलेली आहे. सौभरी ऋषि, मान्धाता राजाच्या राजवाड्यात आले आणि त्यांनी राजाला सांगितलं की ""मला विवाह करायचा आहे, तुझी कन्या मला दे.' म्हाताऱ्या ऋषीला कन्या द्यायला राजाचं मन काही तयार होईना. पण नाहीही म्हणता येईना, हे ऋषि रागावले तर शाप देतील. त्याने सांगितलं, ""ऋषिहाराज, राजकन्या या स्वयंवर करत असतात आपल्याला माहिती आहे. आपण या कन्यांच्या अंतःपुरात जा. जी कन्या आपल्या गळ्यात माळ घालेल ती कन्या मी तुम्हाला अर्पण करीन. म्हणजे मुलींच्यावर तो निर्णय राजाने सोडला. राजाने असं का सांगितलं याचं कारण ऋषींच्या लक्षात आलं आणि अत्यंत सुंदर तरुणाचं रूप घेऊनच ते अंतःपुरात गेले. राजाने निरोप पाठवला होता, "हे ऋषि आलेले आहेत. कोणाला यांच्याबरोबर विवाह करायचा असेल तर करावा. सर्व कन्या म्हणाल्या यांच्याबरोबर आमचा विवाह व्हावा. मग राजाने आपल्या सर्वही कन्यांचा विवाह...
ऋषीबरोबर करून दिलेला आहे.
मोठे योगी होते सौभरी ऋषि. तितके वाडे, तितके नोकर चाकर निर्माण झाले, तितकी रूपं धारण केली सौभरी ऋषींनी आणि त्यांचा संसार सुरू झाला. मान्धाता राजा आपल्या मुलींचा संसार बघण्याकरता त्यांच्या आश्रमात आला. केवढी अपार संपत्ति आहे. कशाचीही ददात नाही. राजाला वाटलं, मी श्रेष्ठ आहे का हे ऋषि श्रेष्ठ आहेत ! अशा तऱ्हेने सौभरी ऋषींनी पुष्कळ कालापर्यंत विषयभोग घेतला. अनेक शरीरं धारण करून त्यांनी आपली कर्म संपवली. योगी पुरुषांना असं करता येतं. अनेक शरीरांनी सुख दुःखांचा उपभोग घेऊन ते प्रारब्ध कर्म संपवू शकतात. त्या मत्स्याच्या संगतीमध्ये राहून त्यांना गृहस्थाश्रम करायची इच्छा झाली. शेवटी त्यांचे विचार बदलले. पश्चाताप झाला. काय म्हणाले, व्यर्थ मी या मोहात सापडलो, मुलं झाली. नातू झाले, सगळं आयुष्य फुकट गेलं. मग त्यांनी निश्चय केला आणि आपल्या स्त्रियांना सांगितलं की मी आता इथं राहणार नाही. सर्व ऐश्वर्य सोडून सौभरी ऋषि अरण्यात निघून गेले. त्या स्त्रियाही त्यांच्याबरोबर गेलेल्या आहेत. सर्वांना उत्तम गती प्राप्त झाली.
याच वंशामध्ये सत्यव्रत राजा होऊन गेला. त्याला त्रिशंकु म्हणतात. त्याला सशरीर स्वर्गाला जाण्याची इच्छा झाली. विश्वामित्रांना तो शरण गेला. विश्वामित्रांनी त्याला आश्वासन दिलं. आणि त्याला सशरीर स्वर्गात पाठवलं. देव काही त्याला त्या शरीराने स्वर्गात घ्यायला तयार होईनात. तुझं हे शरीर पडल्यावर तू ये म्हणाले. त्यांनी त्याला खाली ढकलून दिलं. विश्वामित्रांनी पुन्हा त्याला आपल्या सामर्थ्याने वर पाठवलं. शेवटी समेट झाला. त्याला दिव्य शरीर मिळालं आणि त्या शरीराने त्रिशंकुराजा स्वर्गात गेलेला आहे.
त्याचा मुलगा हरिश्चंद्र आहे. हरिश्चंद्राला मुलगा नव्हता. वरुणाला तो शरण गेला आणि त्याने सांगितलं; "महाराज, मला जर मुलगा झाला तर तो मी तुम्हाला अर्पण करीन.' नरमेध यज्ञ पूर्वी करत होते म्हणे. त्याला मुलगा झाला. लगेच वरुण ब्राह्मणवेशात आला. आणि त्याने मुलगा मागितला. राजा म्हणाला, आत्ताच मुलगा झालाय, थोडा काल तरी जाऊ दे. थोडा मोठा होऊ दे. त्याला दात येऊ दे. दात आल्यावर पुन्हा वरुण आला. पुत्रप्रेमामुळे पुढं पुढं तो काल ढकलतो आहे राजा. मुंज होऊ दे म्हणाला. रोहित त्याचं नाव, तो मोठा झालेला आहे. त्याला कुणीतरी सांगितलं, तुला तुझा पिता वरुणाला बळी देणार आहे. हे कळल्याबरोबर तो रोहित अरण्यात निघून गेला. वरुण आल्यावर हरिश्चंद्राने सांगितलं की मुलगा कुठे गेला हे माहित नाही. वरुण रागावलेला...
आहे आणि त्याने हरिश्चंद्राला शाप दिला की तुला जलोदर रोग होईल.' त्या रोगामुळे अतिशय त्रास हरिश्चंद्राला होऊ लागला. रोहितला हे समजलं आपल्या पित्याला असा असा त्रास होऊ लागलाय. तो परत यायला निघाला. वाटेत चार-पाच वेळा इंद्राने त्याला राजधानीत जाण्यापासून परावृत्त केलं. "कशाला जातोस म्हणाला, मरायला, तो वरुण आणि तुझा पिता बघून घेईल.
इकडे वसिष्ठांच्या सांगण्याप्रमाणे राजाने मुलगा विकत घ्यायचा ठरवलं. त्याप्रमाणे राजाचा प्रधान एका ब्राह्मणाकडे गेला. त्याला तीन मुलं होती. ब्राह्मण म्हणाला, मोठा मुलगा माझी परंपरा सांभाळणारा आहे त्यामुळे हा देता येणार नाही. त्या ब्राह्मणाची पत्नी म्हणाली कनिष्ठ मुलगा माझा आहे. मी देणार नाही. मधला मुलगा जो शुनःशेप याला प्रधानाने आणलेलं आहे. त्या बदल्यात काही द्रव्य त्या दरिद्री ब्राह्मणाला दिलं. राजाने शुनःशेपाला यज्ञपशु म्हणून वरुणाला अर्पण करायचं ठरवलं. तो शुनःशेप अतिशय भीतीग्रस्त झाला. विश्वामित्र ऋषींना दया आली. त्यांनी राजाला विनंती केली की याला मारू नकोस, घाबरलाय हा. राजा म्हणाला, "माझा जीव जाणार आहे. तिकडे आधी बघू का याच्याकडे लक्ष देऊ. विश्वामित्र रागावले. त्यांनी त्या शुनःशेपाला वरुणाची प्रार्थना करण्याचा मंत्रोपदेश केला. शुनःशेपाने वरुण आल्यावर त्याची प्रार्थना केली. वरुण संतुष्ट झाला आणि त्याने शुनःशेपाला मुक्त केलेलं आहे. जा, म्हणाला, माझा यज्ञ पूर्ण झालेला आहे. आता तो मुलगा कोणाचा ? कुणाकडे जाणार ? काही ऋषि म्हणाले बापाने पैसे घेऊन मुलाला विकलं, त्याचे प्राण वाचविले नाहीत म्हणून मुलाने बापाकडे जायचं नाही. हरिश्चंद्र राजाही तसाच. तो मारायला तयार झालेला त्यामुळे त्याच्याकडेही मुलाने जायचं नाही. मग वसिष्ठांनी सांगितलं, खरा पिता याचा विश्वामित्र आहे. त्याने दयेने याला वरुणाच्या संकटातून सोडवलं. त्यामुळे याने विश्वामित्राकडे जावं. विश्वामित्र ऋषि शुनःशेपाला घेऊन आपल्या आश्रमात आले आणि त्यांनी त्याला उत्तम उपदेश केलेला आहे. हरिश्चंद्र राजाही रोहितला आपल्या मुलाला राज्य सोपवून वनात गेला आणि भगवद्भक्ति करून तो मुक्त झालेला आहे.
याच वंशामध्ये बाहूक नावाचा राजा झालेला आहे. शत्रूने त्याचं राज्य घेतल्यामुळे तो वनात गेला. वृद्धावस्थेमुळे त्याला मृत्यू आला. त्याची स्त्री सहगमन करायला निघाली असताना ती गर्भिणी आहे असं कळल्यावर तिला तसं न करण्याविषयी इतर जनांनी सांगितलं. बाकीच्या सवतींना हे समजल्यावर त्यांनी तिला विष पाजलेलं आहे. पण तिला काही बाधा झाली नाही. तो मुलगाही विषासह बाहेर पडला आहे. गर म्हणजे विष. विषासहित म्हणून सगर असं त्याचं नाव