« Previous | Table of Contents | Next »
पान ३०१

पडलं आणि और्वऋषीच्या कृपेने तो चक्रवर्ती राजा झालेला आहे. त्याने गुरूंच्या आज्ञेनुसार, यवन आणि दुर्जन लोकांना मारलं नाही. नुसतं शासन करून त्यांना त्यांच्या त्यांच्या भागात राहायला सांगितलं. त्यानंतर सगर राजाने अश्वमेध यज्ञ केला आणि त्याचा अश्व इंद्राने हरण केला. इंद्राने तो अश्व कपिलमुनींच्या आश्रमात सोडून दिला. सगर राजाला साठ हजार पुत्र होते. एका स्त्रीच्या उदरातून एवढी मुलं होणं शक्य नाही. काही मंत्र प्रयोग असतील. गर्भ कसा व्हावा, कसा वाढावा याकरता बाहेरी काही त्यांचे मंत्रप्रयोग असतील. गांधारीलाही शंभर मुलं अशी प्रयोगानेच झाली असणार. ते साठ हजार सगरपुत्र अश्व शोधण्याकरता निघाले आणि कपिलमुनींच्या आश्रमात येऊन पोहोचले. यांनीच आपला अश्व चोरला असं समजून ते कपिलमुनींना मारायला गेले असताना, मुनींच्या शरीरातून अग्नी उत्पन्न झाला आणि ते साठ हजार सगरपुत्र जळून भस्म होऊन गेलेले आहेत.

सगराने आपल्या अंशुमान नावाच्या नातवाला आपल्या चुलत्यांचा शोध घेण्याकरता पाठवलं. तो कपिलमुनींच्या आश्रमात आला. कपिलांना त्याने वंदन केलेलं आहे. कपिलांनी सांगितलं की हा तुझ्या पितामहाचा अश्व घेऊन जा. हे तुझे पितर दग्ध होऊन गेलेले आहेत. गंगादेवीच्या जलाचा स्पर्श जर यांच्या भस्माला होईल तर हे मुक्त होतील. तो अंशुमान अश्व घेऊन परत आला. सगर राजाने अश्वमेध यज्ञ पूर्ण केला आणि अंशुमनला राज्य सोपवून तो वनात निघून गेला. अंशुमानाने गंगादेवीची तपश्चर्या केली पण त्याच्या आयुष्यकालात काही ती प्रसन्न झाली नाही. त्याचा मुलगा दिलीप नावाचा त्यानेही गंगादेवीची उपासना केली. पण त्यालाही यश आलं नाही. त्याचा मुलगा भगीरथ यानेही मोठी खडतर तपश्चर्या केल्यानंतर गंगादेवीने त्याला दर्शन दिलेलं आहे. गंगादेवीने विचारलं, ""काय पाहिजे ?'' त्याने सांगितलं, ""आपण स्वर्ग लोकातून या पृथ्वीवर यावं. आमचे जे पितर भस्म झालेले आहेत त्यांच्या भस्मावरून आपलं पाणी गेलं की ते मुक्त होऊन स्वर्गलोकाला जातील.'' गंगादेवीने दोन अडचणी सांगितल्या. म्हणाली, ""मी पृथ्वीवर येणार म्हणजे माझा प्रवाह कुणीतरी धारण करून सोडला पाहिजे नाहीतर मी पृथ्वीचा भेद करून पातालात जाईन. ही एक अडचण आहे. आणि दुसरी अडचण म्हणजे, या तुमच्या मर्त्यलोकात सगळे दुर्जन आहेत. मला यायची इच्छाच नाही. चांगली सोय झाली की त्यांची, माझ्या जलामध्ये स्नान करून सर्व पापं टाकून देतील आणि पुन्हा पाप करायला मोकळे ! ती पापं मी कुठं टाकू?'' भगीरथ मोठा बुद्धिमान होता. तो म्हणाला, ""आईसाहेब, भगवान शंकर आपला प्रवाह आपल्या जटेमधे धारण करायला समर्थ आहेत की नाहीत ?'' ""हो, म्हणाली. जा त्यांना

***
पान ३०२

प्रार्थना कर. पण ही दुसरी गोष्ट ? भगीरथ राजा म्हणाला, ""जगामधे काय सगळेच पापी लोक आहेत काय ? पुण्यवान, मोठेमोठे भगवद्भक्त, ज्ञानी महात्मेही आहेत. दुर्जनांनी जरी आपलं पापं तुमच्या जलामध्ये टाकली तरी भगवद्भक्त महात्मेही आपल्या जलात स्नान करून तुम्हाला पुन्हा पवित्र करतील. त्यांच्या हृदयामधे भगवंताचा निवास नेहमी आहे. त्यांच्या स्नानानं तुमचं जल पवित्र होईल का नाही ?'' कबूल करावं लागलं गंगेला. भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी आपल्या जटेमधे तो प्रवाह धारण केला आणि भूमीवर सोडून दिला. तो भगीरथ राजा रथातून वेगाने पुढे जातो आहे आणि गंगा पाठीमागून वाहात येते आहे. ज्याठिकाणी भगीरथाचे पितर भस्म होऊन पडले होते त्यांच्यावरून गंगेला प्रवाह गेल्याबरोबर त्यांना दिव्य देवरूप प्राप्त झालं आणि ते स्वर्ग लोकाला निघून गेले.

शुक सांगताहेत, ""परीक्षित राजा, भगवंतांच्या चरणापासून निर्माण झालेली गंगादेवी, तिच्या जलाचं किती सामर्थ्य वर्णावं ? नुसत्या भस्मावरून जल गेलं तर त्यांचा उद्धार झाला. मग अत्यंत भक्तिभावाने, प्रेमाने गंगादेवीच्या जलामध्ये स्नान करणाऱ्यांना केवढं फळ मिळेल? मर्त्यलोकामधे ईश्वराने पापक्षयाची पुष्कळ योजना करून ठेवली आहे.

याच वंशामध्ये खट्वांग नावाचा राजा झालेला आहे. मोठा पराक्रमी राजा होता. देवांवर एकदा संकट आलेलं असताना त्यांनी राजाला विनंती केली की तुम्ही आमचे सेनापती व्हा आणि हे परचक्र दूर करा. त्याने दैत्यांचा पराभव केला. पुष्कळ दिवस तो सेनापती म्हणून राहिलेला आहे. कार्तिकस्वामी देवांना सेनापती म्हणून मिळाल्यावर देवांनी खट्वांग राजाला त्याच्या राजधानीमधे परत पाठवलं आणि सांगितलं की राजा पुष्कळ कालापर्यंत तू इथे राहिल्यामुळे तिकडे तुझे सगळे आप्तबांधव नाश पावलेले आहेत. तुला काय हवं ते सांग. आम्ही काही तुला ज्ञान देऊ शकत नाही. ते सामर्थ्य फक्त श्रीहरीचं आहे. त्याने विचारलं, "माझं आयुष्य किती राहिलंय सांगा.'' देव म्हणाले, "एक मुहूर्त आयुष्य शिल्लक आहे म्हणजे पुरता एक तासदेखील नाही.' त्या राजाचं अंतःकरण पहिल्यापासूनच तयार असलं पाहिजे. भगवान श्रीहरींचं ध्यान करायला त्याने सुरवात केली आणि हृदयस्थ नारायणांचं ध्यान करता करता तो मुक्त झालेला आहे.

खट्वांग राजाचा मुलगा दीर्घबाहू. दीर्घबाहूचा पुत्र रघुराजा. रघुराजाचा पुत्र अज म्हणून आहे आणि अजाचा पुत्र दशरथ राजा आहे. भगवान श्रीहरी प्रसन्न झाले दशरथावर आणि त्यांनी राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या चार रूपांनी त्याच्या पोटी अवतार घेतलेला आहे. भगवान रामचंद्रांच...

***
पान ३०३

चरित्र पुष्कळ ऋषींनी वर्णन केलेलं आहे.

शुक्राचार्य महाराज रामचंद्रांचं चरित्र सांगताहेत. राम, लक्ष्मण मोठे झाले. पंधरा सोळा वर्षांचं वय असेल. एकदा विश्वामित्र ऋषि राजवाड्यामध्ये आले. दशरथाने त्यांची पूजा केली आणि विचारलं, आपली काय आज्ञा आहे ? विश्वमित्र म्हणाले, ""मी यज्ञाला सुरवात केल्यावर हे दैत्य येतात. रक्त मांस फेकून यज्ञ अपवित्र करतात आणि बंद पाडतात. यज्ञाच्या रक्षणाकरता या दोन मुलांना मागण्याकरता मी आलो आहे. हे राम, लक्ष्मण मला पाहिजेत.'' दशरथाला पुत्र स्नेहामुळे वाटलं, की लहान मुलं आहेत. दैत्यांपुढे यांचा काय निभाव लागणार ? तो म्हणाला, ""महाराज, मी स्वतः सैन्य घेऊन येतो आणि आपल्या यज्ञाचं रक्षण करतो.'' विश्वमित्र म्हणाले, ""नाही, या दोन कुमारांनाच मी नेणार.'' वसिष्ठांनी दशरथाची समजूत घातली, म्हणाले, ""राजा, प्रत्यक्ष विश्वमित्र यांची जबाबदारी घेताहेत तर तू काळजी कशाला करतोस ? यांचं सामर्थ्य तुला माहित आहे ना ? देऊन टाक मुलांना.'' राम, लक्ष्मणांना घेऊन विश्वामित्र ऋषि आपल्या आश्रमाकडे जाण्यास निघाले. मध्ये एका नदीतीरावर विश्रांतीकरता थांबलेले असताना विश्वमित्रांनी राम, लक्ष्मणांना बला आणि अतिबला या विद्या दिल्या. मंत्र दिले. त्या मंत्रांचं सामर्थ्य असं आहे की क्षुधा आणि तृषा संपून गेलेल्या आहेत. काही खायला, प्यायला नाही मिळालं तरी शक्ति कायम आहे. जाताना अरण्यामध्ये ताटिका राक्षसी समोर आली. विश्वमित्रांच्या आज्ञेने श्रीरामचंद्रांनी ताटिकेचा वध केलेला आहे. राक्षसांच्या वधाला आरंभ तिथूनच झालेला आहे.

विश्वमित्रांचा यज्ञ सुरू झाला. ताटिकेचा मुलगा सुबाहू आणि मारिच राक्षस हे दोघे आकाशामध्ये येऊन रक्तमांस वृष्टी करू लागले. एका बाणाने श्रीरामचंद्रांनी त्या सुबाहूला मारलं आणि दुसऱ्या बाणाने त्या मारिचाला समुद्रापलिकडे फेकून दिलेलं आहे. रामांचा पराक्रम काय विलक्षण आहे याची जाणीव त्याला कायम राहिली. तो पुन्हा या दैत्यांच्या मध्ये गेला नाही. आश्रम बांधून तो राहिलेला आहे. रावणाने शेवठी गाठलंच त्याला. "सुवर्णमृगाचं रूप घेऊन जा म्हणाला आणि सीतेला मोहात पाड. मला सीतेला न्यायचंय. "मारिच म्हणाला,' रामबाणाचा विलक्षण प्रभाव मी अनुभवलेला आहे. असं दुष्कृत्य तू काही करू नकोस. मी हे काम करणार नाही.' रावण म्हणाला. मग मीच मारतो तुला मारिचाने विचार केला, रावणाच्या हातून मरण्यापेक्षा रामांच्या हातून मेलो तर सद्गती मिळेल. म्हणून मारिच आला, नाहीतर आला नसता. विश्वमित्रांचा यज्ञ निर्विघ्न पार पडला. राम, लक्ष्मणांना घेऊन ते निघाले. मध्ये गौतमश्रमात शिलारूप होऊन पडलेल्या

***
पान ३०४

अहिल्यादेवीचा उद्धार श्रीरामचंद्रांनी केला. गौतमऋषीचा संबंध आलेला आहे. त्यांचीही कृपा झाली. पुढे तिथून मिथीला नगरीमधे आलेले आहेत. सीतादेवीचं स्वयंवर ठरलेलं होतं. बरेच राजे लोक आलेले आहेत. तीनशे लोकांनी गाड्यावर ओढून आणलेलं शिवधनुष्य राजसभेत ठेवलं गेलं. पुरोहिताने सांगितलं, ""हे शिवधनुष्य उचलून, त्याला प्रत्यंचा लावून जो सज्ज करेल त्या पराक्रमी पुरुषाला राजोसाहेब सीतादेवी अर्पण करतील.'' हा पण आहे, कोण येणार पुढं ? रावणही आला होता तिथे, ते धनुष्य त्याच्या अंगावर पडलं मग तो तिथून निघून गेला. मग विश्वमित्रांच्या आज्ञेने रामचंद्र गेले. त्यांनी तो धनुष्य सहज उचललं, आणि त्याला दोरी लावायला थोडंसं वाकवल्याबरोबर ते तुटून गेलेलं आहे. फेकून दिले दोन्ही तुकडे आणि आपल्या जागेवर ब्राह्मणांमधे येऊन बसले. सीतादेवीला आनंद झालेला आहे. तिने त्यांच्या कंठात पुष्पमाला घातली आता विवाह व्हायला पाहिजे. सीता ही भूमीकन्या आहे. शेतामधे एका पेटीमधे ती मिळाली. दुसरी स्वतःची कन्या उर्मिला म्हणून होती ती लक्ष्मणांना द्यायचं जनकाने ठरवलं. आणि आपल्या बंधूच्या दोन कन्या भरत शत्रुघ्नांना द्यायच्या ठरवलं. अयोध्येला जाऊन सर्वांना निमंत्रण पाठवलं. दशरथराजा सर्व वऱ्हाडासह, परिवारासह आलेला आहे आणि चारी विवाह उत्तम रीतीने पार पडलेले आहेत. याकरता विश्वमित्रांनी राम लक्ष्मणांना आणलं होतं. हे सगळं जोडून द्यायचं आहे ना !

सगळं वऱ्हाड निघालं अयोध्येला. परशुरामांच्या कानावर बातमी गेली. शिवधनुष्याचा भंग करणारा कुणीतरी एक क्षत्रिय वीर निर्माण झालेला आहे. एकाही क्षत्रियाला जिवंत ठेवायचं नाही. ही त्यांची प्रतिज्ञा होती. एकवीस वेळा त्यांनी पृथ्वी निःक्षत्रिय केली होती. ही सगळी मंडळी निघाली असताना समोर परशुरामजी आलेले आहेत. त्यांनी विचारलं, ""राम कोण आहे ? शिवधनुष्याचा भंग करणारा राम कुठे आहे ?'' रामचंद्र पुढे आले, ""काय ऋषिहाराज, मीच राम आहे.'' परशुरामजी म्हणताहेत, ""काय ते शिवधनुष्य तोडलं म्हणजे मोठा पराक्रम गाजवला असं तुला वाटतंय ? ते जुनं झालं होतं. हे माझ्या हातातील धनुष्य घेऊन त्याला बाण जोडून दाखव.'' एकदम रामचंद्रांनी त्यांचं धनुष्य काढून घेतलं. त्यांचं सर्व तेजच काढून घेतलं. धनुष्याला बाण लावलेला आहे. आणि सांगताहेत रामचंद्र," ऋषिहाराज, हा बाण परत भात्यात ठेवता येणार नाही कोणत्यातरी कामाकरता याचा उपयोग झाला पाहिजे. माझी प्रतिज्ञा तुम्हाला माहिती आहे का?

द्विःशरं नाभिसंधत्ते द्विः पीडयति नोऽकरन् ।
द्विर्ददाति न चार्थिभ्यो रामो द्विर्नाभिभाषते ।।
304.30 ।। श्री. भा.
***
पान ३०५

राम एक बाण दोन वेळेला लावत नाही. एकदां पाणीग्रहण केल्यानंतर दुसऱ्या पत्नीबरोबर राम विवाह करत नाही. याचक आला असताना राम दोन वेळेला देत नाही. एकदा दिलेलंच त्याला जन्मभर पुरतं. आणि रामांच्या मुखातून दोन वेळा भाषण होत नाही. एकदा निघालेले शब्दच सत्य होतात. आता काय करू सांगा, तुमची गति बंद करू, इथंच तुम्हाला थांबवू का तुमचा स्वर्गाचा दरवाजा बंद करू ? परशुरामजींनी ओळखलं की हा सामान्य क्षत्रिय नाहिये. प्रत्यक्ष परमेश्वर आहे ते म्हणाले, ""रामा मला स्वर्गाची काही इच्छा नाही तेव्हा तू स्वर्गाचा दरवाजा बंद करून टाक. पण सत्संगती मिळण्याकरता मी अनेक तीर्थक्षेत्रात हिंडत असतो तेव्हा माझी गति तेवढी बंद करू नको.'' रामांनी बाण सोडून विश्वमित्रांचा स्वर्गाचा दरवाजा बंद केलेला आहे. परशुरामजी निघून गेले. सर्व परिवारासह दशरथ राजा अयोध्येला आलेला आहे.

रामांची कीर्ति पसरलेली आहे. रामांवर सर्व प्रजाजन अत्यंत मनापासून प्रेम करताहेत. सर्वांची इच्छा जाणून रामांना राज्याभिषेक करण्याचं दशरथाने ठरवलं. तयारी चाललेली आहे. वसिष्ठ ऋषींनी मुहूर्त तयार केलेला आहे. नगरामधे मांडव घातलेले आहेत. रस्त्यावर चंदनाचे सडे टाकलेले आहेत. जमिनीवर मोठमोठ्या रांगोळ्या काढताहेत. कैकयीच्या दासीने मंथरेने चौकशी...

***
पान ३०६

केली आणि तिला कळलं की रामाला अभिषेक होणार आहे.

निष्कारणो वैरिणो जगति

असं सांगताहेत सुभाषितकार निष्कारण वैर करणारे लोक आहेत.

मृगमीनसज्जनानां तृणजलसंतोषवृत्तिनाम् ।
लुब्धकधीवरपिशुनाः निष्कारणा वैरिणो जगति ।।
सुभाषित

रानामध्ये हरिण गवत खाऊन शांतपणे राहात असतात. पण हे पारधी लोक त्यांना पकडून घेऊन जातात. पाण्यामधे मासे शांतपणे विहार करत असतात. हे कोळी लोक त्यांना घेऊन जातात. आणि सज्जन मंडळी संतोषाने भगवद्भजन करत असताना दुर्जन लोक त्यांचा छळ करतात. निष्कारण वैर करायचं.

ही मंथरा दासी विचार करतेय, हा रामाचा अभिषेक नाही झाला पाहिजे. तो आता तिच्या प्रयत्नाने बंद झाला का त्याला आणखी कारण आहे हा निराळा आहे विचार. पण तिला तरी समाधान मिळवायचंय की आपण बंद केला. कैकेयी आपल्या पलंगावर पडलेली आहे. मंथरा येऊन सांगतीये, ""बाईसाहेब, रामाला युवराजपदाचा अभिषेक होणार आहे.'' कैकेयीला अतिशय आनंद झाला. तिचं रामावर अतिशय प्रेम ! आपल्या गळ्यातील रत्नांची माळ मंथरेला देत कैकेयी म्हणाली, ""अगं किती चांगली बातमी सांगितलीस.'' आता हिचं मन बदलायचं कसं? पण ती मंथरासुद्धा मोठी बुद्धिमान होती. दुर्जनसुद्धा मोठे प्रयत्नवादी असतात. त्यांचे प्रयत्न फुकट जातात पण सारखे ते प्रयत्न करत राहतात. मंथरा म्हणतीये, ""तुम्हाला कळवलं तरी का दशरथ राजाने? आणि तयारी सुरू पण झाली.'' तरीपण परिणाम नाही. कैकेयी म्हणतीये, ""अग तयारी सुरू होईना. आपण अभिषेक पाहायला जाऊ म्हणजे झालं.'' शेवटी ती मंथरा म्हणाली, ""बाईसाहेब, काय अनर्थ होणार आहे तुम्हाला माहिती आहे का ? तुमच्या मनात देखील येणार नाही. राम जर राजा झाला तर कौसल्येच्या हातात सर्व सत्ता जाणार नाही का ? मग तुम्हाला कोण विचारणार ?'' हा बाण लागू पडला. एकदम कैकेयीचं मन बदलून गेलेलं आहे. ती तशी विधीघटनाच होती. ठरलेलंच होतं. नाहीतर रावणाचा नाश कसा झाला असता? कैकेयी सावध झाली. आणि विचारतीये की काय करायला पाहिजे?'' मंथरा म्हणाली, ""मी सांगते, तुम्हाला दशरथ राजाने दोन वर दिलेले आहेत ना आणि वाटेल त्यावेळी माग असं सांगीतलंय ना ? हीच ती वेळ आहे. एका वराने रामाला चौदा वर्ष वनवास मागून घ्या आणि दुसऱ्या वराने भरताला राज्याभिषेक...

***
पान ३०७

मागा.'' कैकेयी म्हणतीये, ""भरताला राज्याभिषेक एक वेळ योग्य आहे म्हणजे आईला तसं वाटणं ठीक आहे. पण रामाला वनवास कशाला?'' काय तिला वाटलं असेल की हे सगळे लोक रामाला अनुकूल आहेत म्हणून ते भरताला राज्यावरून काढतील की काय ? त्याप्रमाणे दशरथ राजा तिच्या वाड्यामध्ये आला असताना तिने सांगितलं, मला आत्ताच्या आत्ता हे दोन वर पाहिजेत. काय प्राणच जाण्यासारखी अवस्था आहे. रामाला वनवासात पाठवायचं ? खिन्न झाला दशरथ राजा, काही बोलला नाही. इतक्यात वसिष्ठांचा निरोप रामाला आला की मुहूर्ताची वेळ जवळ येत चाललीये.

त्याप्रमाणे दशरथ राजा कैकयीच्या महालामध्ये आलेला असताना तिने सांगितले, आत्ताच्या आत्ता मला दोन वर पाहिजेत. रामाला वनवासात पाठवायचं आणि भरताला राज्याभिषेक करायचा. काहीही दशरथ राजा बोलला नाहीये. खिन्न झालेला आहे. इतक्यात रामचंद्रांना वसिष्ठांचा निरोप आला की लवकर आता ये, अभिषेकाची वेळ होती आहे. निघाले रामचंद्र, इतक्यात कैकयीचा निरोप आला, तुला बोलावले आहे राजोसाहेबांनी. वसिष्ठांनी रामांचं वर्णन केलेलं आहे. काय केवढा नेता आहे हा मोठा. हा जर नेता समाजाला मिळाला तर काय कल्याण होईल सर्वांचं !

आहूतस्य अभिषेकाय प्रस्थितस्य वनाय च ।।
रामायण

अभिषेकाला बोलावले गुरुमहाराजांनी तरी मनामध्ये हर्ष नाहीये. बरंय, गुरुमहाराजांची आज्ञा आहे. दुसरी आज्ञा झाली, वनामध्ये जायचंय. त्याचीही तयारी आहे, हर्ष नाही, विषाद नाही निर्विकार अंतःकरण आहे. हा नेता समाजाला मिळाला पाहिजे. त्याचे चरित्र लोकांनी समजावून घ्यावे याकरता वाल्मिकी महर्षींनी हे चरित्र लिहिलेले आहे. याचा विचार कोणी करत नाही हे दुर्दैव आहे भारतवर्षाचे. सांगितले सगळे कैकयीने. राजोसाहेबांची इच्छा आहे, की तू चौदा वर्ष वनामध्ये राहावे. बर आहे निघालो म्हणाले लगेच रामचंद्र. कैकयी म्हणाली, सर्व दागदागीने काढून ठेव म्हणाली. सगळे काढून ठेवलेलं आहे. लक्ष्मणाला समजले. लक्ष्मण रागावला म्हणाला मी राजाला कैद करून ठेवतो. रामचंद्र म्हणाले पित्याला कैद करून ठेवतोस असा विचार तुझ्या मनात येणं हे चांगलं आहे का बाबा. मग मला बरोबर घ्या वनामध्ये, लक्ष्मण म्हणाला. मुद्दामच रामचंद्र त्याला बरोबर घेऊन गेले. पुन्हा हा रागावला आणि त्रास दिला पित्याला तर काय करायचे म्हणून बरोबर नेले. सीतादेवीच्या मंदिरामध्ये गेले, तिला सांगितले असं असं ठरलंय. तू इथे राहा, सासूची सेवा कर. किंवा माहेरी जा आपल्या आई बाबांच्याकडे तिथे राहा. ती म्हणाली मला कोठेही जायचे नाही. तुमच्या बरोबर वनामध्ये यायचंयं. वनामध्ये काय नोकर-चाकर आहेत काय म्हणाले. अरण्यामधे...

***
पान ३०८

वेळेला जेवायला सुद्धा मिळणार नाही, काही नाही. पण ती म्हणाली असू दे. ठरलेले आहे. सीतादेवीसह सर्व वंदन करण्याकरता आले. सीतादेवींनासुद्धा कैकेयीने सांगितले तुझी वस्त्र-दागदागिने काढून ठेव म्हणाली. वसिष्ठ रागावले म्हणाले, सीतेने काय केलंय तुझं ? रामाने वनवासात जावे ही आज्ञा आहे आणि सीतेचे सर्व दागिने काढून घेतेस. सौभाग्यवती ती स्त्री आहे. काही काढून ठेवू नकोस दागिने सीते. अलंकार घालूनच तू वनामध्ये जा म्हणाले. गप्प बसलेली आहे कैकेयी. दशरथ राजा काहीही बोलू शकत नाही. प्राण जाण्याची वेळ आलेली आहे. रामाने आईबापांना, कैकेयीलाही नमस्कार केला. कौसल्येची समजूत केली. सुमित्रेने आपल्या मुलाला लक्ष्मणाला सांगितले, बाबा,

रामं दशरथं विद्धि मां विद्धि जनकात्मजाम् ।
अयोध्यां अटवीं विद्धि ।।
रामायण

ही बुद्धि ठेव बरं लक्ष्मणा. राम म्हणजे प्रत्यक्ष दशरथ आहे, आपला पिता आहे. ही भावना ठेवून तू वाग सीतादेवी म्हणजे प्रत्यक्ष मी आहे ही भावना ठेव आणि सीतेची सेवा कर. अरण्य म्हणजेच अयोध्या आहे अशा समजुतीने तू सेवा कर. तुझे कल्याण होईल.

तिघेही आलेले आहेत. अरण्यामध्ये गंगातीरावर उतरलेले आहेत. सुमंतांना रथ घेऊन परत पाठवलेला आहे. तो आलेला आहे अयोध्येमध्ये. दशरथ राजाने विचारले काय राम गेला काय ? गेले म्हणून समजल्याबरोबर प्राणोत्क्रमण झालेलं आहे.

राज्याभिषेक थांबलेला आहे. पुढे रामचंद्र निघून गेले आणि चित्रकूट पर्वतावर जाऊन राहिले. लक्ष्मणाने झोपडी बांधलेली आहे. तिथे ते वास्तव्य करत आहेत. भरतालाही बोलावून आणले. पित्याचे अंतिम कर्म करायचे होते ना. राम लक्ष्मण वनात गेल्यामुळे ते सर्व भरतालाच करायचे होते. भरत, शत्रुघ्न दोघेही मामाच्या घरी गेले होते. दोघे आलेले आहेत. भरताला कैकेयीने सांगितले की बाबा हे आता तुझं राज्य आहे. राम गेला आहे वनवासात. हे सगळं समजले त्याला. कैकयीचे हे कारस्थान आहे. रामाला वनवासात पाठवलेलं आहे. राग आलेला आहे भरताला. आईला ठार मारावं अशी त्याला इच्छा उत्पन्न झाली. परंतु रामचंद्रांची मूर्ती त्याच्यासमोर उभी राहिली. जर आईला शासन केलं तर राम माझं तोंड पाहणार नाही. रामाचे प्रेम पाहिजे आहे. काय नेण्याची योग्यता आहे, राम जवळही नाही, समोरही नाही. भरताला आलेला राग रामाचे स्मरण केल्याबरोबर आवरावा लागला. फक्त मातेपासून तो दूर राहिलेला आहे. और्ध्वदेहिक झालेलं आहे.

***
पान ३०९

राज्यभिषेक मी करून घेणार नाही, रामचंद्रांना मी परत घेऊन येणार आणि त्यांनाच राज्याभिषेक होईल म्हणाला भरत. सर्व अयोध्यावासी लोकांना बरोबर घेऊन भरत चित्रकूट पर्वतावर आलेला आहे. रामांचे दर्शन झालेले आहे. भरतांनी सांगितले रामचंद्रा माझ्या मनातसुद्धा राज्याची इच्छा नाही. राजा आपण आहात. राम म्हणाले भरता, तुझी योग्यता, तुझे प्रेम मला माहित आहे. तू राज्याचा अभिलाषी नाहीस. खरं आहे. भरत म्हणाला चला मग परत आपण. रामचंद्र नाही म्हणाले, पित्याची आज्ञा मला आहे आणि तुलाही आहे. दोघांनी पालन केली पाहिजे. मला वनात राहण्याची आज्ञा आहे चौदा वर्ष. तुला राज्य करण्याची आज्ञा आहे. आज्ञेचे पालन रामचंद्रांनी असे केलेले आहे की चौदा वर्ष ते अरण्य सोडून कोणत्याही नगरात, राज्यात गेले नाहीत. सुग्रीवांना राज्याभिषेक करण्याचे ठरले, वालीचा नाश केला, राज्याभिषेकाला आपण या म्हणून सुग्रीवाने विनंती केली, मला येता येत नाही, नगरात मला जायचे नाही, लक्ष्मणाला सांगितले तू जाऊन त्यांना राज्याभिषेक करून ये. लंकेचे राज्य बिभीषणाला दिले, तसेच परत आलेले आहेत. इतकं त्यांनी शब्दाचे, आज्ञेचे पालन केले. भरताला सांगत आहेत, तुलाही आज्ञा पालन केली पाहिजे. राज्य करावं लागेल. भरत मोठा अत्यंत शुद्ध बुद्धीचा होता त्यांनी सांगितले, तुमच्या पादुका मला द्या. दिल्या पादुका. त्या पादुकांना मी सिंहासनावर ठेवणार आहे. त्यांची सेवा म्हणून मी राज्य करणार. केवढी ईश्वराची कृपा भरतावर आहे. भरताचा त्याग केवढा मोठा आहे. चौदा वर्षापर्यंत भरताने रामाचे राज्य सेवक म्हणून केलेलं आहे. रामाला सांगितले, तुमची वाट मी चौदाव्या वर्षाची शेवटची रात्र होईपर्यंत पाहीन. पंधराव्या वर्षी सूर्योदय होईपर्यंत भरत जिवंत राहील, नंतर तुमचे तुम्ही राज्य सांभाळा. हा संसार आहे. अशा त्यागी माणसाला संसार बाधक कसा होईल. रामांनी भरताची प्रशंसा केली, बाबा रामाचा त्याग जास्ती का तुझा त्याग जास्ती हा विचार करायला लागलेला असताना, मला अभिषेक होण्यापूर्वीच मी वनात आलो. म्हणजे मी राज्य त्याग केला असे कसे म्हणता येईल. परंतु तुझ्या आईने तुझ्या नावाने राज्य मिळवून ठेवलेलं आहे. माझीही संमती आहे त्याला. असे असताना, तू अनासक्त रितीने हे राज्य केलं. असे त्यागी आदर्श वाल्मिकी महर्षींनी पुढे मांडलेले आहेत. त्याचा विचार करणारी जर जनता असेल तर राष्ट्राचा उत्कर्ष व्हायला वेळ लागणार नाहीये. ईश्वराची कृपा आहे. रामचंद्रांनी विचार केला इतक्या जवळ आपण राहून उपयोग नाही, हा भरत वरचेवर येणार, सर्व प्रजाजन भेटायला येणार. इथून लांब दंडकारण्यामध्ये जाऊन राहिले. त्याठिकाणी शुर्पणखा आलेली आहे त्रास द्यायला. लक्ष्मणाने तिचे नाक, कान कापून टाकलेलं आहे. तिचे बंधू, रावणाचे सैन्य दंडकारण्यात ठेवलेले होते. लंका

***
पान ३१०

ताब्यात आहे त्याबरोबर दंडकारण्य तसेच संपूर्ण भारतवर्ष आपल्या ताब्यात असावे अशी त्यांची इच्छा आहे. खर, दूषण, त्रिशिरा हे तीन सेनापती, चौदाहजार राक्षस, रामांचा नाश करण्याकरता आलेले आहेत. लक्ष्मणाला सांगितले सीतेला घेऊन तू पर्वताच्या वर गुहेमध्ये जाऊन रहा. मी या असुरांचा समाचार घेतो. संरक्षण योजना काय करायची ती केलेली आहे. संरक्षण फक्त अस्त्राने-शस्त्राने नाहीये, ती मंत्रविद्या आहे. अस्त्रविद्या वेगळी आहे. आपल्या संरक्षणाची व्यवस्था केलेली आहे. आपल्या आपण ठरवून दिलेल्या आत त्या शस्त्राचा प्रवेश नाही. एकटे रामचंद्र उभे राहिले आणि एक दिड प्रहरामध्ये चौदा हजार राक्षस आणि त्यांचे सेनापती ठार मारलेले आहेत. सबंध दंडकारण्य संकटरहित केलं. सगळ्या ब्राह्मणांना बोलावून हे तुम्हाला घ्या दान केलं सर्वांना, हे तुमचं आहे, निर्भयपणाने तुम्ही रहा. सर्वही राक्षसांचा संहार मी करणार आहे. अशी प्रतिज्ञाच त्यांनी केली. पुढे रावणाने सीतेचे हरण केलेले आहे. मारिचाला मारलं रामांनी, लक्ष्मणही निघून आला. सगळी योजनाच होती. सगळा दैवयोग आहे. सीताही काही बोलली म्हणून लक्ष्मण निघून आलेला आहे. रावणाने सीतेला नेताना जटायूने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण जटायूना मारलं रावणांनी. दोघे बंधू सीतादेवीचा शोध करण्याकरता निघालेले आहेत. निराश झालेले नाहीयेत. कोण आहे असा, परस्त्री हरण करणारा, कोण आहे ? त्याचे नाव माहित नाही. तो किती लांब राहतो, त्याची शक्ती कशी आहे, काहीही माहिती नाही. पण मनामध्ये प्रतिकार करायचा आहे. याचा प्रतिकार, याला शासन करायचं आहे हा निश्चय झालेला आहे. हे दोघेच आहेत. जवळ सैन्य नाही. सहाय्यक कोणी नाही. हे सगळं असं असताना सुद्धा त्यांचा दुर्दम्य आशावाद आहे की याला शिक्षा करायची आहे, त्या दुर्जनाना जिवंत ठेवायचे नाही. निघालेले आहेत, मध्ये विराट कबंध राक्षसाचा नाश केलेला आहे. पंपासरोवराजवळ आलेले आहेत. सुग्रीव आपल्या काही प्रधांनासह डोंगरावर राहात होते वालीच्या भितीने. वालीनेच यांना पाठवलेले आहेत काय ? अशी त्याला भीती उत्पन्न झाली. हनुमान यांना चौकशी करण्याकरता पाठवले. बटूवेष धारण करून हनुमान, रामचंद्रांच्या जवळ आलेले आहेत. संस्कृत भाषेमध्ये सर्व त्यांनी विचारणा केली. कोण आहात आपण ? कोठून आलात ? आमची परिस्थिती अशी आहे. सुग्रीवाला बंधूंनी राज्याबाहेर घालवले आहे आणि राज्य ताब्यात घेतलेले आहे. सर्व आणखी कथन केले. चला म्हणाले आपण. सुग्रीवाशी मैत्री करा. सुग्रीव आपले सर्व सैन्य आणून रावणाचा नाश करून तुम्हाला सीतादेवी परत आणून देईल म्हणाले. हनुमानजी गेलेले आहेत. रामाने लक्ष्मणाला सांगितले, हा कोणी तरी मोठा उत्तम ज्ञान संपन्न दिसतो. यांनी संपूर्ण व्याकरण शास्त्राचा अभ्यास

« Previous | Table of Contents | Next »