« Previous | Table of Contents | Next »
पान ३११

केला असावा म्हणाले.

बह्व्याहरतानेन न किंचिदपभाषितम् ।।

इतका वेळ तो बोलत राहिला संस्कृत भाषेमध्ये, पण एकही चूक याच्या भाषणामध्ये मला आढळली नाही. गेले रामलक्ष्मण, सुग्रीवाशी सख्य झालेलं आहे. वालीचाही नाश केलेला आहे. सुग्रीवाला राज्याभिषेक झाला. सर्वही ठीकठिकाणच्या वानरांना बोलावून घेतलं सुग्रीवाने. अगोदर मारुतीरायाला शोध घेण्याला पाठवले. चारही दिशांना वानरांना शोध घेण्यासाठी पाठवले. तो रावण दक्षिणेकडे गेलेला आहे. हे त्या वानरांनी पाहिले. सुग्रीव हनुमान वगैरे पर्वतावर बसलेले असताना आकाशातून रावण ह्या सीतादेवींना खांद्यावर घेऊन जात आहे, असे दिसले होते. सीतादेवीला वाटले राम लक्ष्मण शोध करीत कदाचित इथे आले तर आपण इकडून गेलो हे त्यांना समजावे म्हणून तिने भराभरा आपल्या अंगावरचे दागिने काढले. पांघरण्याच्या वस्त्रात बांधून तिने ते खाली टाकलेले आहेत. सुग्रीवाच्या वानरांनी ते गाठोडे घेतले. रामलक्ष्मण आल्यावर त्यांना ते सांगितले की एक राक्षस हा एका स्त्रीला घेऊन गेला इकडून, त्या स्त्रीने हे अलंकाराचे गाठोडे टाकलेले आहे. हे कोणाचे सीतेचे आहेत का पहा म्हणाले. ते गाठोडे सोडल्याबरोबर रामांना अत्यंत शोक झालेला आहे. ते सर्व अलंकार सीतेचे होते. लक्ष्मणाला त्यांनी विचारलं. लक्ष्मणा या दागिन्यांची ओळख तुला आहे काय ? लक्ष्मण तरी काय सांगणार रामचंद्राला, बाहू मध्ये घालण्याची भूषणे, वाळ्या माझ्या ओळखीच्या नाहीत, कानातली कुंडले माझ्या ओळखीची नाहीत.

नाहं जानामि केयूरे । नाहं जानामि कुंडले ।। नूपुरे त्वभिजानामि नित्यं पादाभिवन्दनम् ।।
रामायण

पायातले पैंजण माझ्या ओळखीचे आहेत. सीतादेवीच्या चरणावर नित्य मस्तक ठेवण्याच्या वेळेला नित्य हे दिसत होते. एवढे मी ओळखतो म्हणाला. केवढी आदर बुद्धी आहे. शास्त्राज्ञेचे पालन किती आहे. म्हणून लक्ष्मणाने इंद्रजिताला मारलेलं आहे. रामाने सुद्धा हे टाळलं. झालं सगळ्या वानरांना पाठवलेलं आहे. दक्षिणेला मात्र उत्तम प्रकारची बुद्धिमान वानरं पाठवलेली आहेत कारण रावण दक्षिणेला गेलेला आहे, इतका पत्ता लागला. हनुमानांच्या वरती विश्वास आहे. उत्तम ज्ञान संपन्न आहे. भाषणामध्ये परिचय झालेला आहे, हनुमंतांचा, हा मोठा आहे. "जितेंद्रियम् बुद्धिमतां वरिष्ठम्' त्याला बोलावून घेतलं. आपल्या हातातील अंगठी काढून त्याच्याजवळ...

***
पान ३१२

दिली ही सीतेला दाखव म्हणाले म्हणजे तुझ्यावर तिचा विश्वास बसेल. नाहीतर रावणच या वानरांच्या वेषात आला नसेल कशावरून. ती बोलणारसुद्धा नाही. हनुमान सीतादेवीच्या शोध निश्चित करून येणार, अशी खात्री रामचंद्रांची होती. सुग्रीवाने आज्ञा केली, एक महिन्याच्या आत सर्वांनी परत आलं पाहिजे. शोध लागला किंवा न लागला काय असेल ते येवून सांगितले पाहिजे. एक महिन्यापेक्षा जास्त एक दिवस जरी लागला तरी त्याचा शिरच्छेद केला जाईल. सगळी वानरं मंडळी सर्व दिशेने आलेली आहेत. दक्षिणेची मंडळी मात्र महिना झाला तरी आली नाहियेत. सगळे त्या समुद्राच्या तीरावर येवून बसले. पलिकडे कसे जायचे. शंभर योजने समुद्राच्या पलिकडे लंका आहे ती काही इथून दिसू शकत नाही. महिना होवून गेला. परत आपण तसेच गेलो तर शिरच्छेद होणार त्यापेक्षा आपण इथेच समुद्रतीरावर प्राणत्याग करावा. प्रायोपवेशन करून, आसन घालून सर्व वानरमंडळी बसली. जटायूचा भाऊ संपाती त्याठिकाणी आलेला आहे. त्याने सांगितले ती समोर सीता दिसती आहे. ईश्वराने सृष्टीमध्ये सगळ्यांना सारखी शक्ती दिलेली नाही. चक्षु नेत्र हे प्रमाण आहे. पण दूरदर्शन मनुष्याला होवू शकत नाहीये. अंधारात मनुष्य पाहू शकत नाही. त्याच्या डोळ्याची शक्ति मर्यादित आहे. तो गृध्रपक्षी, लांबचे पाहण्याची योग्यता त्याच्या डोळ्यामध्ये आहे. ती समोर सीता आहे म्हणाले. अशोक वनामध्ये एका वृक्षाच्या खाली सीतादेवी बसलेली आहे, तिच्याभोवती सर्व राक्षसींचा पहारा आहे. कोणाला जायचे असेल तर तिला जाऊन भेटून या म्हणाले. हे कसं मान्य करायचे कसे ? हाही प्रश्न आहे ना. संपाती सांगतोय, तो पाहून सांगतोय. वानराने म्हटले तर, आम्हाला दिसत नाही. आम्हाला तुझ्या म्हणण्यावर विश्वास बसत नाही. असे म्हटले असते तर, आपण प्रत्यक्ष पाहून सांगतो त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायला पाहिजे का नाही. आमच्या नेत्राची योग्यता कमी आहे हे मानायला पाहिजे की नाही. त्याप्रमाणे त्यांचे शब्द प्रमाण मानलेले आहेत. हा ज्ञानी महात्मा आहे, तो दूरचे पाहू शकतो आणि आम्हाला सांगतो. विश्वास ठेवला म्हणून सीतेचा शोध लागलेला आहे. उगीच काहीतरी बुद्धिवाद पुढे आणून, हे खरं कसं मानायचं ह्याला दिसते हे खरे कशावरून, हा कदाचित फसवत नसेल कशावरून असे तर्ककुतर्क मनामध्ये आणले असते तर सीतेचा शोध लागला नसता. सर्वानुमते मारुतीराय एक समर्थ आहेत असा निर्णय झालेला आहे. मारुतींना आठवण करून द्यावी लागत होती. अहंकार बिल्कुल नाहिये. सर्व विसरून रामचिंतन चाललेलं आहे. नामस्मरण अखंड चाललेलं आहे. त्यामुळे आपल्या शक्तीची सुद्धा आठवण नाहिये. जवळ गेले सगळे वानर अहो हनुमान, उठा लवकर सीतेचा शोध तुम्ही करून या. तुम्ही समर्थ आहात. शंभर योजने विस्तीर्ण समुद्राच्या...

***
पान ३१३

पलिकडे जायचंय. लंका राजधानी मोठी आहे. कडेकोट बंदोबस्त असणार. शोध करण्याचे सामर्थ्यही तुमचेच आहे. अशी पुष्कळ त्यांची स्तुती केली. उठले हनुमान. मोठे रूप धारण केलेलं आहे. योगाभ्यासही त्यांचा चांगला होता. वानर मंडळी जरी असली तरी उत्तम अभ्यास. निरनिराळ्या शिल्पाचा अभ्यास, योगांचा अभ्यास आहे, विद्यांचा अभ्यास आहे. सगळा अभ्यास आहे. सूर्यनारायणाच्या बरोबर राहून व्याकरणाचा अभ्यास केला मारुतीरायाने. उपेक्षा नाहिये. महेंद्र पर्वतावरून, आकाशामध्ये उड्डाण केलेलं आहे. मारुतीराज संध्याकाळच्या वेळेला लंकेमध्ये येऊन पोहचले. मारुतीची कथा मोठी आहे. वाल्मिकी रामायणातील सुंदरकाण्ड हे सर्व मारुतीचाच महिमा आहे. त्या नुसत्या सुंदरकाण्डाचे पठण केले असता कार्यभाग होतो. संध्याकाळी आल्याबरोबर एकदम लहान झालेले. मोठे रूप धारण करून लंकेमध्ये गेले तर सगळं सैनिक पाहणार, युद्धाचा प्रसंग येणार. रात्रीभर सगळीकडे फिरून सूक्ष्मरूपाने सगळ्यांच्या अंतःपुरामध्ये सगळीकडे जाऊन त्यांनी शोध केला. रावणाच्या अंतःपुरामध्ये रावणाचे आणि मंदोदरीचे भाषण त्यांना ऐकायला मिळाले गुप्त रूपाने. सीतादेवी अशोकवनामध्ये आहे हा पत्ता लागलेला आहे. आले तिथे. सीतादेवीचे दर्शन झाले. झाडावर बसलेले आहेत. त्या सगळ्या राक्षसी होत्या तिथे. इतक्यात रावणही तिथे आलेला आहे. तिला वश करण्याकरता पुष्कळ त्याने आमिष दाखवलेलं आहे. तू सर्वश्रेष्ठ राणी होशील. देवांना मिळालेलं नाही असं ऐश्वर्य तुला मिळेल. पण काहीही भाषण तिने केलेलं नाही. राम येतील आणि तुझा समाचार घेतील, असे सांगून गप्प बसलेली आहे. नंतर रावण निघून गेलेला आहे. मध्यरात्रीच्या वेळेला सीतादेवी निराश झालेली आहे. कोण सांगणार मी इथे आहे. रामचंद्रांना समजायचे कसे ? पत्ताच जर नाही, माझा शोध लागला नाही तर रावणाला शासन कसे होईल ? सुटका नाही होणार. रडती आहे, शोक करती आहे. सर्व राक्षसी निजलेल्या आहेत. मारुतीरायाने रघुवंशाचे वर्णन केलेलं आहे. रामचंद्र असे आहेत. रामलक्ष्मण असे आहेत. सुग्रीवांचे त्यांचे सख्य झालेलं आहे. सुग्रीवाने सर्व वानर मंडळींना देशोदिशांना सीतेचा शोध करण्याकरता पाठवलेलं आहे. त्यांच्यापैकी एक रामदूत मी या ठिकाणी येवून पोहचलेलो आहे. सीतादेवीचे दर्शन झालेलं आहे. कृतार्थ झालो आहे. वृक्षावरून भाषण त्यांनी केलं. ती रामांची मुद्रिका तिच्यासमोर टाकली. कोण आहे ? मुद्रिका पाहिल्या बरोबर आनंद झालेला आहे. रामचंद्रांना जाऊन आता कळवेल म्हणाले. रामचंद्र येतील. आले मारुतीराय. नमस्कार केला. आश्वासन दिलेलं आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्हालाही बरोबर घेऊन जातो म्हणाले. राक्षसांची पर्वा करण्याचे कारण नाही. मी त्यांचा समाचार घेऊ शकतो. नाही म्हणाली सीता.

***
पान ३१४

बलात्कारानी रावणानी मला आणले आहे. त्याचा स्पर्श झालेला आहे. आता दुसऱ्या कोणी पुरुषाचा स्पर्श मला नको आहे. मारुती म्हणाले मी ब्रह्मचारी आहे जन्मापासून. नाही म्हणाली सीता. रामाची कीर्ति वाढायला नको का बाबा. तिने हे कारण सांगितले, तू आहेस ब्रह्मचारी. मला तुझ्याबद्दल कोणताही संदेह नाही. पण माझी सुटका अशी केली तर हा रावण जिवंत राहिलना. याला काही शासन व्हायला पाहिजे. सर्वांना अजिंक्य ठरलेला रावण रामांनीच मारला पाहिजे त्याकरता मी येत नाही. जाऊन सांग, रावणांने सांगितलंय, तो माझा नाश करणार आहे मी त्याला वश झाले नाही तर. निघाले मारुतीराय, पण ते राजदूत होते. परप्रांतामध्ये, परदेशामध्ये राहणारा जो दूत आहे त्याला त्या देशातील सगळी माहिती पाहिजे. आणि त्यांने आपल्या देशातल्या अधिकाऱ्यांना दिली पाहिजे. मारुतीरायाने विचार केला हा जो शत्रू आहे त्याचे सामर्थ्य किती आहे हे पाहून जायचे आहे. सीतेची भेट झाली काम झालं म्हणाले. सांगकाम्या असून उपयोग नाही राजदूत. सीतेचा शोध करून ये सांगितले, झाला शोध, आता परत जावे, नाही. रावणाचे सामर्थ्य पाहून जायचंयं. निर्भय वृत्ती आहे. सामर्थ्यावर पूर्ण विश्वास आहे. आपण वागतो ते अत्यंत न्याय आहे हा पण आत्मविश्वास आहे. अभिमान अशा प्रकारचा चांगला आहे. सीतादेवीला म्हणाले मारुतीराय मला भूक लागलेली आहे. ही इथली फळं घेऊन का मी ? चांगली उत्तम फळं आहेत. सीता म्हणाली हे त्या राक्षसांचं, रावणाचे अत्यंत प्रिय वन आहे. ऐंशी हजार राक्षसी याचे संरक्षण करण्याकरता त्यांनी ठेवलेल्या आहेत. तू फळं तोडायला लागलास तर कसे ? असं कर झाडावरून खाली पडलेली जी फळं आहेत ती तू भक्षण कर. अगोदर तिने असे केले, आपल्या हातातील सोन्याची बांगडी काढून दिली आणि सांगितले हे विकून जे मिळेल त्यातून तू खा म्हणाली. हनुमान म्हणाले मी असं विक्रीचे काही खात नाही. नैसर्गिक माझा आहार आहे. फळ पाहिजेत मला. पडलेली फळे खा म्हणाली. "पडत्या फळाची आज्ञा' ही म्हण मारुतीपासून पडलेली आहे. पडलेली घ्यायची ना, एक एक झाड उपटायचे, धोपटायचं आणि पडलेली फळ घ्यायची. सुरवात झाली त्यांची. रावणाला कोणी तरी सांगितले, असा एक वानर आलेला आहे. आणि त्याने अशोक वनाचा विध्वंस केलेला आहे. संरक्षणाकरता ठेवलेले राक्षस मारुतीने मारून टाकलेले आहेत. रावणाने सैनिक पाठवलेले आहेत. तोही सैन्य मारलेले आहे. इंद्रजित आलेला आहे. रावणाच्या सभेमध्ये जाण्यासाठी इंद्रजिताचा ब्रह्मपाश मारुतीने मान्य केला. ब्रह्मदेवांनीही आज्ञा केली. हनुमानाला बांधून आणले इंद्रजिताने रावणाच्या समोर आपले उच्चासन घालून मारुती उंच बसलेला आहे. त्याने सांगितलं, मी रामदूत आहे, तुझा समाचार

***
पान ३१५

घेण्याकरता आम्ही लवकर सैन्य घेऊन याठिकाणी येणार आहोत. तू आणि तुझा परिवार, दैत्य सगळे मारले जाणार आहेत. तर लक्षात ठेव. रावणाची पत्नी मंदोदरी ही सांगत होती रावणाला, कशाला आणली सीता, तुम्हाला काय कमी आहेत काय स्त्रिया. ही देऊन टाका रामाला. इंद्रजिताने सांगितले ही देऊन टाका रामाला. पिताजी हिला ठेवून घेऊ नका. सगळ्या परिवाराचा नाश होईल. त्रास होईल. कुंभकर्णाने सांगितले कशाला आणले हिला. जातो म्हणाला, तुझी इच्छा असेल तर रामाबरोबर लढायला. असे सगळे, प्रधान वगैरे सगळे विरुद्ध होते. पण याचा आग्रह आहे, हट्ट आहे. त्याप्रमाणे रामचंद्रांचे काय सामर्थ्य आहे सगळे सांगितले. वालीला एका बाणांनी मारले. तुझी त्यामुळे काय कथा आहे. वालीची शक्ती तुला माहित आहेना ? वालीच्या पुढे तुझी काही किंमत नाहीये. तुला मारायला काही वेळ लागणार नाही. काही परिणाम झाला नाही. शेवटी त्याचे पुच्छ जाळायचे ठरले. पुच्छ गेलं म्हणजे मारुती गेला. सगळी वस्त्रं आणून त्याला गुंडाळलेलं आहे, ते पेटवून दिलेलं आहे. मारुती ब्रह्मपाशातून मोकळे झालेले आहेत. संपूर्ण लंकानगरी जाळून टाकलेली आहे. रावणाचा वाडा, प्रधांनांचा वाडा, सगळे वाडे जाळून टाकलेले आहेत. ते पुच्छ समुद्रामध्ये विझवले. त्यांना वाटले या अग्नीमध्ये सीता देवींना काही त्रास झाला, इजा झाली काय ? वाईट वाटले. मारुतीरायाचे पुच्छ पेटवून दिले, त्यांना मारत आहेत असे सीतादेवींना समजले. अग्निनारायणाची ती प्रार्थना करत आहे.

शीतो भव हुताशनः ।।

रामदूत आलेला आहे. अत्यंत पराक्रमी आहे, श्रेष्ठ आहे. रामभक्त आहे. याला तुम्ही दाह करू नका. अग्नी नारायणाने दाह कमी केलेला आहे. मारुतीरायांना वाटले पुच्छाला इतकी वस्त्रं लावली, इतके पेटवून दिले तरी त्याचा दाह कसा मला होत नाही. सर्व लंका दहन झालेलं आहे. सीतादेवीची भेट घेतली शेवटी. नमस्कार केला. तुमची काही खूण माझ्याजवळ द्या म्हणाले हनुमान. सीतादेवीला पाहून आलो म्हणून नुसते सांगितले तर कोण विश्वास ठेवेल ? आपल्या केसातील दिव्य मणी सीतेने त्यांना दिला. रामांना सांग म्हणाली इंद्राला दशरथराजाणे सहाय्य केल्यामुळे इंद्राने हा मणी दशरथ राजांना दिला. दशरथ राजाने हा मणी कौसल्येला दिला आणि माझा विवाह झाल्यावर हा मणी कौसल्या मातेने मला दिला. हे रामांना सांग आणि हा मणी त्यांना दाखव म्हणजे तू सीतेला पाहून आलेला आहेस हे त्यांना खरं वाटेल.

मारुतीराज समुद्राचे उल्लंघन करून आलेले आहेत. सर्व वानरांना त्यांनी सीता पाहून आलो म्हणून सांगितले. सगळी मंडळी परत आलेली आहे. सगळा वृत्तांत रामचंद्रांना सांगितला. रावणाच

***
पान ३१६

सर्व सामर्थ्य पाहून आलो असे सुग्रीव राजाला सांगितले. राजनीतीचे उत्तम ज्ञान मारुतीरायांना आहे. रावणाच्या राजधानीमध्ये एकटे मारुतीराय गेले आणि हे सगळे माहिती करून आले. सत्वबल आहे.

सर्व वानरसैन्य निघालेलं आहे. समुद्रतीरापर्यंत आलेलं आहे. समुद्रावर सेतूबंधन केलेलं आहे. एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये कितीतरी वर्णन केलेलं आहे. पहिल्या दिवशी दहा-पंधरा मैलाचा सेतू तयार झाला म्हणे. दुसऱ्या दिवशी सव्वीस योजनांचा तयार झाला. शेवटी मारुतीरायाने सात आठ पर्वत एकट्यानेच आणून पन्नास योजनांचा सेतू बांधून टाकला. सेतूबंधन करून सर्व वानर त्या सेतूवरून रामचंद्रासह लंकेमध्ये येऊन पोहचलेले आहेत. रावणाला हे समजले. त्यांनी सर्व सेनापतींना सांगितले. रामचंद्रांचे सैन्य समुद्रकिनारी असताना, बिभीषणाने एक प्रयत्न केला. त्याच्या आईने त्यांना सांगितले की रावणाला जाऊन सांग, ऐक माझे म्हणावं, सीतेला देऊन टाक. तरच तुमचे कूळ शिल्लक राहिल. तू जाऊन स्वतः सांग असे म्हटल्यावर बिभीषण राजसभेमध्ये आला. त्यांने रावणाला पुष्कळ बोध केला. बिभीषणाने रामाचे सामर्थ्य वर्णन केले. इंद्रजित रागावला. काय म्हणाले रामाचेच वर्णन तू करतो आहेस, आमच्याजवळ काय शक्ती नाही का ? तू गप्प बस म्हणाले, तुला काय कळतयं, तू बोलू नकोस. शेवटी रावण रागावलेला आहे. त्यांने लाथ मारली बिभीषणाला. पडला खाली, उठला, नमस्कार केला रावणाला. आता मी जातो म्हणाला रामाकडे. तुझी बुद्धी बदलण्याचा प्रयत्न मी केला, पण नाही, तुझं नशीब. तुझा नाश होणार आहे. चार प्रधान मंडळींना बरोबर घेऊन आप्तमंडळींना घेऊन आकाशमार्गाने बिभीषण रामाच्या सैन्याजवळ आलेला आहे. सर्वांचा अविश्वास त्याच्यावर आहे. रामचंद्र स्वस्थ बसलेले आहेत. सुग्रीवाला विचारले काय याला घ्यायचं का आपल्याबरोबर? नको म्हणाला सुग्रीव, शत्रूच्या भावाला तुम्ही आपल्या सैन्यामध्ये घेता ? ही सगळी बातमी तिकडे देणार नाही कशावरून? नाही आमची यासाठी संमती नाही. मारुतीरायांना विचारा याबद्दल. मारुतीराय म्हणाले हा चांगला सात्विक आहे. याचा आपल्याला झाला तर उपयोग होईल. कारण तुमची कृपा झाल्यावर राज्य याला मिळणार आहे, हे त्याला माहिती आहे. मारुतींच्या सांगण्यावरून त्याला बोलावलेले आहे आणि त्याला लगेच राज्याभिषेक केला, त्याला सांगितले, लंकेचे राज्य तुला दिलेले आहे. बिभीषणाचे पुष्कळ साहाय्य त्या युद्धाच्या वेळेला झालेले आहे. लंकेपर्यंत येऊन सर्व पोहचलेले आहेत. आरंभाला अंगदाला शिष्टाई करण्याकरता रामचंद्रांनी पाठविले तोपर्यंत युद्धाला सुरवात केली नाही. जाऊन सांग माझा निरोप अंगदा, सीता पुन्हा मला अर्पण कर म्हणते तू जिवंत

***
पान ३१७

राहशील, आम्ही निघून जाऊ, आम्ही युद्ध करणार नाही. पण हे काही रावणाने ऐकले नाही. अंगद रागाने तिथून निघाला आणि जाताना रावणाचा एकदम महालच उचलून घेऊन गेला. पराक्रमी होता वालीचा पुत्र. पुन्हा रामांच्या सांगण्याप्रमाणे तिथे परत ठेवून टाकला.

युद्धाला सुरवात झालेली आहे. अनेक राक्षसांचा नाश केलेला आहे. वानरांनी पुष्कळ राक्षस मारले. तसेच रामचंद्रांनीही राक्षस मारले. प्रधान सगळे मारले गेलेले आहेत. कुंभकर्णाला उठविलेलं आहे. त्याला युद्धाला पाठविलेलं आहे. कुंभकर्ण अगोदर म्हणाला रावणाला की परत देऊन टाक सीतेला रामचंद्रांना, रावण म्हणाला, मी आणलेली आहे आणि मी परत करणार नाही. कोणी देव जरी आले तरी मी त्यांचे ऐकणार नाही. मग कुंभकर्ण म्हणाला तू सीतेला रामाचे रूप घेऊन भेटायला का जात नाहीस ? ती लगेच तुला वश होईल. नाही, सीतादेवी काय ओळखू शकत नाही काय ? रामाच्या रूपामध्ये जरी रावण आला असता तरी तो जाऊ शकलाच नसता अगोदर. सीतेने त्याचा प्रतिकार केला असता. मग कुंभकर्ण युद्धाला गेला. त्याचा नाश रामचंद्रांनी केलेला आहे. इंद्रजिताचा नाश लक्ष्मणाने केलेला आहे. रावणाचा नाश शेवटी भगवान रामचंद्रांनी केला. बिभीषणाला राज्य करण्याची आज्ञा केली. सीतादेवीला भेटीसाठी पालखीत बसून चला असे सांगितले पण सीतादेवी म्हणाली मी चालतच येणार आहे. चालत आलेली आहे सीतादेवी. रामाने तिच्याशी भाषणसुद्धा केलेलं नाही. मारुतीराज रामचंद्रांना रागावले, इतकी पतिव्रता स्त्री अन्न नाही, पाणी नाही, अत्यंत निर्मल मनाने तुमची सेवा करणारी, चिंतन करणारी, तिच्याबरोबर बोलतही नाही तुम्ही. तिने दिव्य करून दाखवले पाहिजे असे रामचंद्र म्हणाले. लोक काय म्हणतील मला. शत्रूच्या घरात राहणाऱ्या पत्नीला परत घेतलं, रामाने. हे मला मान्य नाही. सीता शुद्ध आहे हे तिने सिद्ध करून दाखवावे. रामराज्याचे नियम आहेत. कोणीही अपराध करणारा मनुष्य कोणाचा कोण आला आणि कोर्टाने त्याला निर्दोष म्हणून सोडून दिला. असं नाहीये. ज्यांनी अपराध केला त्यांनी आपल्या योग्यता स्वतः दिव्य करून सिद्ध केली पाहिजे. सीतादेवी असो किंवा कोणी असो. कबूल केलं सीतादेवीने. अग्नि प्रदिप्त केला. अग्निनारायणांची प्रार्थना केली. काय, वाचा, मनाने रामाशिवाय दुसऱ्या कोणाकडेही माझं अंतःकरण गेलेलं नसेल. तर माझं संरक्षण करा आपण. नाहीतर जाळून टाका मला. उडी मारली अग्निकुंडामध्ये. अग्निनारायण प्रकट झाले. सीतादेवीला घेऊन बाहेर आले. तुमची पत्नी निर्दोष आहे रामा. तिचा स्वीकार करा तुम्ही. अग्नीची साक्ष झालेली आहे. आनंदाने रामचंद्र सीतादेवीला बरोबर घेऊन पुष्पक विमानामध्ये बसून मुख्य मुख्य मंडळींना घेऊन पुढे गेले. त्या सेतूवरून सर्व वानरमंडळी पलिकडे आलेली आहेत. नंतर ती सगळी मंडळी अयोध्येला

***
पान ३१८

आलेली आहेत. भरताची भेट झाली. त्या पादुका रामचंद्रांच्या पुढे ठेवलेल्या आहेत. हे तुमचे राज्य तुम्ही सांभाळा, माझा आता याबद्दलचा संबंध संपलेला आहे. सेवक सुद्धा मी नाही. राज्य पाहणार नाही. वसिष्ठ महर्षींनी रामचंद्राना राज्याभिषेक केलेला आहे. आपल्या सर्व बंधूंच्याकडे ही मुख्य मुख्य कामे नेमून दिलेली आहेत. सेनापती शत्रुघ्नाला केलेलं आहे. भरताच्याकडे मुख्य मंत्रीपद दिलेलं आहे. लक्ष्मणाने सांगितले. मला काही नको आहे, मला अधिकारच नको आहे. फक्त रामचंद्रांची घडेल तेवढी सेवा मी करीन. राज्य उत्तम सुरू झालेलं आहे सीतादेवी गर्भिणी झालेली आहे. तिला डोहाळे विचारत आहेत राम. काय तुझी इच्छा आहे सीते. सीता म्हणाली आपण ज्या अरण्यात पूर्वी राहात होतो त्या अरण्यामध्ये सगळे पहावे, ती वनभूमी पहावी, अशी इच्छा आहे म्हणाली. दुपारी हे बोलणं झालं. त्याच दिवशी रात्रीच्या वेळेला गुप्तहेर आलेला आहे, राजवाड्यामध्ये काय म्हणतात लोक, माझ्या एकंदर राज्याबद्दल. चांगलं आहे, रामाचे राज्य उत्तम आहे म्हणतात. हे फक्त गुण सांगू नकोस तर लोकांनी दोष काय सांगितले, आक्षेप काय लोकांनी घेतले ते सांग म्हणाले. एक मोठा आक्षेप भयंकर आहे. एका रजकाने आपल्या स्त्रीबरोबर भांडण करत असताना तिला सांगितले, माझ्या घरात मी तुला घेणार नाही. रामाने आपल्या सीतेला आपल्या बरोबर घेतलं तसं मी तुला घरात घेणार नाही हे मी ऐकलंय. काय करावं. हे सगळं ऐकले रामांनी लगेच लक्ष्मणाला आज्ञा केली, उद्या रथामधे सीतादेवीला घेऊन जा आणि नदीतीरावर आश्रमामध्ये सोडून ये म्हणाले. वाईट वाटले लक्ष्मणाला, पण काय रामाची आज्ञा आहे.

स्नेहं दयां च सौख्यं च यदि वा जानकीमपि
आराधनाय लोकस्य मुञ्चतो नास्ति मेऽञ्जसा ।।
318.30 ।। श्री. भा.

रामचंद्रांचे सांगणे आहे. कोणाचाही स्नेहभाव मैत्री मी सोडून देईन. लोकांची आराधना मला करायची आहे. लोकांचे संरक्षण करायचे आहे. दयाही मी टाकून सर्व सौख्य मी टाकून देईन अथवा जानकी मला सर्वप्रिय आहे, जानकीचा त्याग करण्याचा प्रसंग आला तर मी तो करणार आहे. एकही मनुष्य माझ्या विरुद्ध आक्षेप घेणारा असा नसावा. एकही मत विरुद्ध जाऊ नये. असा नेता आहे. जास्ती मतं मिळाली म्हणजे निवडून आलो अशी समजूत आहे लोकांची, विरुद्ध पुष्कळ मतं असतात.

लक्ष्मण घेऊन गेलेला आहे सीतादेवींना. तिला वाटले, त्यांनी सांगितले तुम्हाला वनाची भूमी पाहण्याची इच्छा होती ना अरण्य पहायची म्हणून रामाने सांगितले तुम्हाला घेऊन जा. तिथ

***
पान ३१९

आल्याबरोबर उतरले दोघेही. आणि नंतर सांगितले तुमचा त्याग केला आहे रामांनी. मी जातो आता. वाईट वाटले प्रथमतः परंतु सीतादेवीने सांगीतले, राजाचे कर्तव्य केलं रामचंद्रांनी, ते मला मान्य आहे, माझा नमस्कार सांगा रामचंद्रांना, कौसल्यादेवी, तसेच सर्वांना माझा नमस्कार सांगा. राज्य उत्तम प्रकारांनी करायला सांगा. वाल्मिकी महर्षींना सीतेला आपल्या आश्रमात घेऊन आलेले आहेत. ऋषिपत्नींनी तिचे संरक्षण केलेलं आहे. प्रसूत झाली सीतादेवी, तिला लवकुश हे दोन पुत्र झालेले आहेत. त्यांना सर्व विद्या ऋषींनी शिकवल्या. गायन, संगीत विद्याही शिकवलेल्या आहेत, रामकथेचे गायन रामांच्या यज्ञामध्ये जाऊन लवकुशांनी केलेलं आहे. काही घ्यायचं नाही. आज्ञा केली. तसेच परत आलेले आहेत. कोणाची मुलं आहेत. वाल्मिकी महर्षींनी सांगितले रामचंद्रा ही सीतेची मुलं आहेत. तुमचीच मुलं आहेत. सीतादेवी आमच्या आश्रमामध्ये आहे. निर्दोष आहे ती. तिचा स्वीकार तुम्ही करा. मग लवकुशांना, सीतादेवींना रामचंद्रांनी आणलेलं आहे. पुष्कळ दिवस आनंदात गेले. एके दिवशी कैकेयी भर सभेमध्ये सीतेच्या विरुद्ध बोलली. तिचा विरूद्ध स्वभाव गेलाच नाही, शेवटपर्यंत. काय म्हणावे रामा या स्त्रीला कशाला आणलस म्हणाली. रावणाच्या घरी राहिलेली सीता आणलीस तू. वाईट वाटले सीतेला. इतकं होऊन सुद्धा माझ्यावरती अजून आरोप आहेत म्हणाली. आपल्या मातेचे स्मरण केलं, भूमीदेवी मला घेऊन जा म्हणाली. ती भूदेवी वर आलेली आहे. आपल्या मुलीला तिने बरोबर घेतलं. पुन्हा भूमी मध्ये ती अदृश्य झालेली आहे. सीता गेलेली आहे. रामचंद्र आपल्या मुलांचं संरक्षण करत आहेत. भावांना राज्य करण्याला सांगताहेत. यज्ञयाग वगैरे करताहेत. तेरा हजार वर्षांपर्यंत अयोध्येमध्ये राहिले. नंतर शेवटी आपल्या अयोध्यावासी सर्वही लोकांना बरोबर घेऊन आपल्या वैकुंठ लोकाला रामचंद्र निघून गेलेले आहेत. लोकापवाद येणारचं, तो न यावा याकरता राजाने कसे वागले पाहिजे हे दाखवलेलं आहे.

नंतर कुश हा राजा झालेला आहे. त्याचंही राज्य झालं. अशा प्रकारचे सूर्यवंशामध्ये हा राम अवतार झालेला आहे. हे सूर्यवंशाचे वर्णन झालेलं आहे. आता चंद्रवंशामध्ये कोण राजे झाले हे सांगत आहेत शुक्राचार्य.

श्रुतायु, सत्यायु, रय, विजय आणि जय चंद्रवंशामध्ये गाधी नावाचा एक राजा झाला. त्या राजाला सत्यवती नावाची कन्या होती. ऋचिक ऋषींनी तिला येऊन मागणी घातली. राजाने सांगितले मला एक हजार शामकर्ण अश्व जर आणून दिले तर माझी कन्या मी तुम्हाला देईन. ऋचिक ऋषींनी आपल्या तप: सामर्थ्याने वरुणलोकातून ते अश्व आणून दिले. सत्यवती बरोबर

***
पान ३२०

ऋचिक ऋषींचा विवाह झालेला आहे. तिची आई, गाधी राजाची पत्नि तिलाही मुलगा नव्हता. सत्यवतीने आपल्या पतीची प्रार्थना केली, महाराज मलाही मुलगा झाला पाहिजे, माझ्या आईलाही मुलगा झाला पाहिजे. अशी आपण कृपा करा. त्यांनी पत्निवा देण्याचा भाग कोणता तोही अभिमंत्रित करून ठेवला. सासूला द्यायचा भाग कोणता तोही अभिमंत्रित करून ठेवला. स्नानादिक कर्म करण्याकरता ऋचिक ऋषि नदीवर गेले. ह्या दोघी मायलेकी यांनी आपल्या बुद्धीने असे ठरवले, ती आई म्हणाली तुझा भाग मला दे म्हणाली. तिलाही वाटले. आई मागती आहे. देऊन टाकावा. अशी अदलाबदल झाली. आईचा भाग मुलीला मिळाला आणि मुलीचा भाग आईच्या उदरामध्ये गेलेला आहे. ऋचिक ऋषि आल्यानंतर त्यांना हे समजले. पत्निला त्यांनी सांगितले, काय केलंस हे. शास्त्राच्या विरुद्ध असे आपल्या बुद्धीने निर्णय घेऊ नये म्हणाले. तुला क्षत्रियासारखा भयंकर शौर्य संपन्न युद्ध करणारा मुलगा होणार. आणि तुझ्या आईला ब्राह्मणासारखा तपस्वी पुरुष होणार. योग्य योजना केली होती. परंतु तुम्ही उलटापालट केली म्हणाले. काही तरी करा म्हणाली सत्यवती. मला असला क्षत्रिय मुलगा नको आहे. ऋषि समर्थ आहेत. त्यांनी सांगितलं. तुला मुलगा चांगला होईल परंतु तुझा नातू मात्र असे भयंकर कर्म करणारा होईल. तेज त्या नातवात तरी येणार म्हणाले. ते जाणार नाही. मग त्या सत्यवतिला जमदग्निनावाचे पती झालेले आहेत. गाधी राजाच्या स्त्रीला विश्वामित्र पुत्र झालेले आहेत. ऋचिक ऋषींच्या मंत्रप्रभावाने विश्वामित्रांनी वसिष्ठांचे ते ब्रह्मतेज पाहून आपणही ब्रह्मतेज संपादन करण्याकरता तपश्चर्या केली आणि ते ब्रह्मर्षि झालेले आहेत. जमदग्नि ऋषींचा विवाह रेणू राजाची कन्या रेणुका हिच्याबरोबर झालेला आहे. त्यांना चार मुलं झाली. त्या मुलांपैकी भार्गवराम, परशुराम ज्यांना म्हणतात, हा एक मुलगा झालेला आहे जमदग्नि ऋषींना रेणुकेपासून. क्षत्रियांनी काही अपराध केलेला आहे. म्हणून सर्वही क्षत्रियांचा परशुरामाने एकवीस वेळा भारतवर्षामध्ये नाश केलेला आहे. रामांच्या भीतीने, मोठे मोठे क्षत्रिय स्त्रियांची वस्त्रं नेसून अंतःपुरामध्ये लपून बसलेले असायचे. राम गेल्यावर बाहेर यायचे. राजाने विचारले, क्षत्रियांनी काय अपराध केला ? शुक सांगतात राजा, हैहय राजवंश होता. त्याचा अधिपति म्हणजे कार्तवीर्यार्जुन नावाचा होता. भगवान नारायणांचा अवतार दत्तात्रेय, यांची कृपा संपादन करून तो मोठा पराक्रमी राजा झालेला आहे. तो एकदा शिकारी करता गेलेला आहे, सैन्य बरोबर घेऊन, सतरा अक्षौहिणी सैन्य होते. एवढ्या सैन्याची खाण्यापिण्याची व्यवस्था कशी होत असेल, भारत भूमीमध्ये कोणतीही न्यूनता नाहीये. धान्यही पुष्कळ आहे, धनही पुष्कळ आहे. जमदग्निचा आश्रम त्यांनी पाहिला. ऋषिमंडळींना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे

« Previous | Table of Contents | Next »