« Previous | Table of Contents | Next »
पान ३२१

जावे म्हणून कार्तवीर्यार्जुन राजा जमदग्नि ऋषींना भेटलेला आहे. नमस्कार केलेला आहे. जातो म्हणाले आता. जमदग्नि म्हणाले अरे आता मध्यान्ह कालची वेळ आहे. तुझ्यासारखा सार्वभौमराजा इथे आला असताना उपाशी जाणे मला पसंत नाही. राजा म्हणाला मी एकटा नाही. सतरा अक्षौहिणी सैन्य आहे. थोडा वेळ थांब म्हणाले. कामधेनू होतीच त्यांच्याकडे. कामधेनू मातेची प्रार्थना केल्याबरोबर एकदम मोठा मांडव तयार झाला. चांदीची ताटं पात्रे पाट, सगळं मांडलेलं आहे. सर्व सैन्याचे भोजन झालेलं आहे. कार्तवीर्यार्जुन राजाचे भोजन झाले आणि त्याची बुद्धि फिरलेली आहे. मला सुद्धा इतक्या वेळेत, इतक्या लोकांना जेवायला घालता आलं नसतं म्हणाला. हे कामधेनूचे सामर्थ्य आहे. कामधेनू मागायची म्हणजे हे ऋषि कसे देणार ? तिला बलात्काराने घेऊन कार्तवीर्यार्जुन निघून गेलेला आहे. जमदग्नि काही बोलले नाहीत. काही वेळाने परशुरामजी वनातून परत आले. तेव्हा त्यांना समजले कार्तवीर्याने आपली गाय नेलेली आहे. राग आलेला आहे आणि तसेच परतले. कार्तवीर्यार्जुनाबरोबर युद्ध केलेलं आहे. त्याचे सर्व सैन्य मारलेलं आहे. त्याला ठार मारलेले आहे आणि ती गोमाता घेऊन आश्रमामध्ये आलेले आहेत. एक हजार हात होते, कार्तवीर्यार्जुनाला. पाचशे हातात पाचशे धनुष्य आणि पाचशे हातानी बाण जोडायचे आणि मारायचे. परशुरामाला दोनच हात आहेत. पण काही टिकू शकला नाही. कार्तवीर्यार्जुन राजा. नाश झाला. त्याची मुले त्यावेळेला पळून गेली. तेवढी सुटली. परशुरामांनी गाईला बरोबर घेऊन आश्रमामध्ये परत आल्याबरोबर जमदग्नि रागावून त्यांना म्हणाले. परशुरामा आमच्या आश्रमात तुला राहता येणार नाही. एका सार्वभौमराजाचा तू नाश केलेला आहेस म्हणाले. सर्व प्रजाजनांचे संरक्षण करणारा ईश्वरांश राजा, ज्याच्या वधाचा दोष तुला लागलेला आहे. हे पाप झालेलं आहे. सर्व तीर्थामध्ये स्नान करून नंतर माझ्या आश्रमामध्ये तू ये. जमदग्नि ऋषि रागीट आहेत अशी कल्पना आहे लोकांची. तू जमदग्नि आहेस, तू दुर्वास आहेत असा उल्लेख रागीट माणसांबद्दल करतात. जमदग्नि ऋषि रागीट नाहीयेत. लोकांची सुधारणा करण्यापेक्षा आपल्या घरातल्या लोकांची सुधारणा झाली पाहिजे, इकडे त्यांचे मुख्य लक्ष आहे. रेणुकादेवी पाणी आणण्याकरता गेलेली आहे. काय पातिव्रत्य त्या रेणुकेचे होते ते वर्णन करताहेत. वस्त्राची पिशवी, त्या पिशवीमध्ये ती पाणी आणत होती म्हणे. पाणी गळायचं नाही. एकदा नदीतीरावर गेलेली असताना, चित्ररथ गंधर्व आपल्या स्त्रियांसहवर्तमान क्रीडा करतो आहे हे ती पाहात उभी राहिली. किंचित तिचे चित्त विचलित झालेलं आहे. ती आश्रमात आल्याबरोबर जमदग्नि म्हणाले बाहेर उभी राहा, आत यायचं नाही. मनोदोष सुद्धा उपयोग नाही. स्त्रियांचे दोष जाण्याकरता मनूने सांगितलेले आहे.

***
पान ३२२
रजसा स्त्री मनोदृष्टा नदीवेगेन शुध्यति

असे काही शुद्धिकरणाचे मनूने उपाय सांगितलेले आहेत. मासिक रजोस्राव झाल्यानंतर ती स्त्री शुद्ध होते. पण नुसते हे एक वाक्य घेऊन निर्णय करायचा नाही. दुसरे स्मृतिकार सांगतात

रजसा स्त्री मनोदुष्टा ।।

मनाने दूषित झालेली स्त्री रजोस्राव झाल्यानंतर शुद्ध होते. नाहीतर वाटेल तसे वागायचे आणि रजोस्राव झाला म्हणजे शुद्ध झाली असे नाहीये. हा सगळा एकवाक्यतेने विचार करायचा आहे. मनोदुष्ट आहे ही आपली पत्नी. तिला सांगितले बाहेर उभी राहा. मुलांना सांगितले हिचा शिरच्छेद करा. कोणी ऐकले नाही. परशुराम आले बाहेरून. हे तुझे बंधू आणि माता या सगळ्यांचा शिरच्छेद करून टाक. कुऱ्हाड होतीच ती खांद्यावर, ती उचलून सर्वांचा शिरच्छेद केला.

पितुर्विद्वांस्तपोवीर्यम् ।।
9.16.8 ।। श्री. भा.

पित्याचे तपसामर्थ्य किती आहे, हे परशुरामजींना माहिती होते. माताही मोठे दैवत आहे. काही बोलले नाहीत ते, मातेचा शिरच्छेद केला. जमदग्नि प्रसन्न झाले. काय पाहिजे म्हणाले परशुरामा. त्यांनी सांगितले पिताजी, हे सगळे जिवंत व्हावे अशी माझी इच्छा आहे. मी यांना मारलेले आहे अशी यांना आठवण राहू नये हे मागून घेतले. घरात राहायचं आहे. हा मारणारा आहे आपला वैरी आहे असं जर समजले तर घरात कसे राहायचं ? हेही करून टाकले जमदग्नींनी. स्मरणसुद्धा नाहीये. म्हणजे मनाने सुद्धा सर्वांनी शुद्धरूपाने राहिले पाहिजे. मुलाने काय, स्त्रीने काय सगळ्यांनीच. परशुरामाला त्यांनी आज्ञा केली, राजवधाचा दोष तुला लागलेला आहे, जा तू. राग तुला आवरता येत नाही परशुरामा.

वयं हि ब्राह्मणास्तात क्षमयार्हणतां गताः ।
यया लोकगुरुर्देवः पारमेष्ठ्यमगात् पदम् ।।
9.15.39 ।। श्री. भा.

जमदग्नींचे विचार आहेत. परशुरामांना सांगतात बाबा, ब्राह्मण जे आम्ही आहोत, सर्वांना आम्हाला मान देतात सगळे याचे कारण तुझ्या लक्षात आलेले नाही.

क्षमया अर्हणतां गताः ।।

केवळ क्षमा आहे. कोणीही कितीही त्रास दिला तरी सहन करायचा आहे. या क्षमावृत्तीमुळे आम्ही सर्वमान्य आहोत. ब्रह्मदेव जसे मान्य झाले.

***
पान ३२३
क्षमया रोचते लक्ष्मीः ।।
9.15.40 ।। श्री. भा.

लक्ष्मीदेवी घरामध्ये आहे पण क्षमा पाहिजे. ज्याच्याजवळ क्षमा आहे, तितिक्षा आहे त्याच्यावर भगवान श्रीहरीचा कृपाप्रसाद आहे ज्याच्या मस्तकावर मंत्राभिषेक झालेला आहे, अशा राजाचा तू वध केल्यामुळे तू पापी आहेस, तीर्थस्नान करून मग तू या आश्रमामध्ये परत ये. बाहेर उभे आहेत, आत घेतलं नाही त्यांना. परशुरामजी तीर्थयात्रा करून परत आलेले आहेत. एक वर्षाच्या कालाने परत आलेले आहेत. पुढे कार्तवीर्यार्जुनाची मुलं पळून गेली होती. कार्तवीर्यार्जुनाला तर मारले परशुरामाने. या मुलांच्या मनामध्ये परशुरामाचा सूड घेण्याचे आलं. याच्याही बापाला मारायचे. परशुरामजी वनामध्ये जायचे, दुपारी परत यायचे. ते वनात निघून गेल्यानंतर कार्तवीर्यार्जुनाची मुलं एकदम त्या जमदग्नीच्या आश्रमामध्ये शिरलेली आहेत, जमदग्नींना मारण्याकरता. जमदग्नि ऋषि होमशाळेत बसलेले आहेत. त्यांनी जाऊन एकदम शस्त्रांनी त्यांचा शिरच्छेद केला. रेणुकामाता मध्ये पडलेली आहे, मारू नका म्हणून. काही उपयोग झाला नाही. तिच्याही अंगावर बाण मारले त्यांनी. जमदग्नींना मारून ती मुलं निघून गेली. काही वेळाने परशुरामजी परत आले, त्यांनी हे पाहिले. वाईट वाटले त्यांना आणि रागही आलेला आहे. लगेच जाऊन त्यांनी कार्तवीर्यार्जुनाच्या मुलांना ठार मारलेलं आहे. यांच्या वंशातला कोणीही क्षत्रिय जिवंत ठेवायचा नाही. सगळेच क्षत्रिय दोषी आहेत. एकवीस वेळा क्षत्रिय संहार करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्याचेही कारण गणेश पुराणात सांगितलेलं आहे. ती रेणुकादेवी प्रार्थना करती आहे पण त्या मुलांनी रेणुकेच्या अंगावरही बाण मारलेले आहेत. पायापासून मस्तकापर्यंत एकवीस बाण मारले होते. परशुरामाने तीच प्रतिज्ञा केली. एकवीस वेळेला संचार करून, एकही क्षत्रिय जिवंत ठेवायचा नाही, ब्रह्मतेज त्यांनी त्यावेळी दाखवून दिलेलं आहे. नंतर सर्व क्षत्रियांचा संहार झाला. सर्वांच्या मनात भीतीनो का होईना धर्माबद्दल आदरभाव निर्माण झाला. मग यज्ञ केला मोठा परशुरामजींनी आणि सर्वही राज्य ब्राह्मणांना अर्पण केलेलं आहे. जमदग्नि हे सप्तर्षि मंडळामध्ये एक ऋषि होऊन राहिलेले आहेत. परशुरामजी हेही महेंद्र पर्वतावर दंड त्याग करून शांतपणाने तिथे वास्तव्य करत आहेत. या भृगु कुळामध्ये विश्वात्मा श्रीहरींनी अवतार धारण करून क्षत्रिय संहार म्हणजे भूमिचा भार हरण केलेला आहे.

शुक्राचार्य महाराज हे दैत्यराज वृषपर्वा यांचे गुरु होते. ते तिथे राहात होते. त्यांची कन्या देवयानी. तिला आई नसल्यामुळे शुक्राचार्यांचे प्रेम तिच्यावर अधिक होते. ते तिचे सगळे ऐकायचे, तिची सर्वही इच्छा पूर्ण करायचे. वृषपर्वा दैत्यराजाची कन्या शर्मिष्ठा आणि तिच्या एक सहस्र दासी,

***
पान ३२४

देवयानी सगळ्याही एकदा बाहेर एका मोठ्या जलाशयामध्ये स्नान करण्याकरता गेल्या. वस्त्र तीरावर काढून ठेवली आणि स्नान करताहेत. कोणी नाही असे त्यांना वाटले. इतक्यात भगवान शंकर हे त्या वनाधून निघालेले त्यांच्या लक्षात आल्यावर गडबडीने सर्व मुली वर आल्या आणि एकमेकींची वस्त्र चुकून त्या नेसल्या. देवयानीचे वस्त्र राजकन्या शर्मिष्ठा ही नेसलेली आहे. ते देवयानीला सहन झाले नाही. माझं वस्त्र तू नेसलीस? हट्टी होती, एकुलती एक मुलगी आणि वडिलांचे प्रेम आहे. बाप म्हणजे काय सामान्य नाहिये. आपण जे सांगेल ते बाप ऐकतो आहे, ही कल्पना त्या देवयानीची आहे. देवयानी म्हणाली, आम्ही ब्राह्मण आहोत आणि तुम्ही क्षत्रिय, कळत नाही तुम्हाला? शर्मिष्ठा राजकन्या होती. तिला ते कसं सहन होणार? ती म्हणाली, तुम्ही भिकारी आमच्या राज्यात येऊन राहिलात आणि तू मला बोलतेस? तिच्या दासींनी देवयानीचं वस्त्र काढून घेतलं आणि तिला एका विहिरीत ढकलून दिलं. विहिरीत फारसे पाणी नव्हते. सगळ्या मुली राजवाड्यामध्ये परत आलेल्या आहेत. ययातीराजा हा शिकारीकरता आला असताना त्याला तहान लागलेली आहे. पाण्याचा शोध करत, ज्या विहिरीमध्ये देवयानी पडली होती तिथे आला. पाणी कमी होतं, पण कोणीतरी स्त्री पडलेली आहे, वस्त्र नाही तिच्या अंगावर हे लक्षात आले. त्यांनी आपल्या अंगावरचे वस्त्र काढून तिला दिले आणि तिच्या हाताला धरून वर काढलेलं आहे. देवयानी म्हणाली, आपण माझं पाणीग्रहण केलेलं आहे. मला कचाने शाप दिलेला आहे, तुला ब्राह्मण पति मिळणार नाही. आपण आता अनायासे आलेले आहात. आपण माझा स्वीकार करा. हेही शास्त्र विरुद्ध आहे. क्षत्रियांनी ब्राह्मणाच्या कन्येबरोबर विवाह करायचा कसं शक्य आहे. कोणी कोणाबरोबर विवाह करायचा हे शास्त्राने नियम घालून दिलेले आहेत. ते कोणाच्या मनाला दुखवण्याकरता नाहियेत. त्यांचं पूर्ण कल्याण, हित झालं पाहिजे. हिताकडे दृष्टी आहे. तात्कालिक प्रिय होईल आपल्याला. जो प्रिय वाटेल आपल्याला त्याच्या बरोबर कोणीही मुलीने विवाह करावा; मुलाने कोणत्याही मुलीबरोबर विवाह करावा. तेवढ्यापुरते प्रिय होते पण हित नाही साधत. ययाती राजाने सांगितलं तुझ्या पित्याला विचार, त्यांची संमती असेल तर मी विवाह करीन. मग त्यांनी संमती दिली. देवयानी बरोबर विवाह झालेला आहे. देवयानीने सांगितले माझी सेवा करण्याकरता ही शर्मिष्ठा आणि तिच्या सर्व दासी माझ्याबरोबर आल्या पाहिजेत. राजाला कबूल करावे लागले. शुक्राचार्यांची, आपल्या गुरुमहाराजांची कन्या आहे. शर्मिष्ठेने मान्य केलं. जाते म्हणाली. शुक्राचार्यांनी सांगितले तू या स्त्री बरोबर संबंध ठेवू नकोस. तुझी पत्नी ही माझी मुलगी आहे. आलेले आहेत सगळे. व्हायचे ते झाले, शर्मिष्ठा राजकन्या आहे. देवयानीला दोन मुलं

***
पान ३२५

झाली आणि शर्मिष्ठेला तीन मुले झाली. हे देवयानीला समजले आणि ती ययाती राजाला सोडून आपल्या पित्याकडे आली. घडलेले सर्व सांगितले तिने शुक्राचार्यांना, त्या स्त्रीशी संबंध ठेवणारा राजा म्हणाली, तिने ययातीचा त्याग केलेला आहे. रागावले शुक्राचार्य त्याला रागाने सांगितले.

त्वां जरा विशतां मन्द ।।
9.18.36 ।। श्री. भा.

तू म्हातारा होशील म्हणाले. झाला म्हातारा ययाती राजा. प्रार्थना करतो आहे, क्षमा मागतो आहे. ययाती राजा म्हणाला महाराज अजून माझी विषय वासना संपलेली नाही. आपल्या कन्येबरोबर विहार व्हावा आणि विषयभोग घ्यावा ही इच्छा अजून अतृप्त आहे. आणि मला तुम्ही म्हातारं केलंत. शुक्राचार्य म्हणाले, तुझ्या मुलांना विचार, जो मुलगा आपलं तारुण्य तुला देऊन तुझं म्हातारपण घ्यायला कबूल असेल. त्याचं तारुण्य तुला घेता येईल आणि तुझं म्हातारपण त्याला देता येईल.

वाचमर्थोऽभिधावति ।।

वाणीमधून जे निघेल ते घडण्याचे सामर्थ्य आहे. थोरला मुलगा यदुराजा देवयानीचा त्याला विचारले, असे तुझ्या मातामहांनी सांगितले आहे त्याप्रमाणे माझं म्हातारपण तू घे आणि तुझे तारुण्य मला दे. यदू म्हणाला महाराज म्हातारपणाचं नुसत नाव ऐकलं तरी आम्ही घाबरतो म्हणाले. म्हातारपण तुमचे घ्यायचं, त्या पराधीन स्थितीमध्ये राहायचं दिसत नाही, ऐकायला येत नाही हे शक्य कसं आहे. मी काही तुमचे म्हातारपण घेणार नाही. दुसरा मुलगा देवयानीचा, त्यानीही तसेच सांगीतेले. शर्मिष्ठेच्या दोन्ही मुलांनीही तसेच सांगितले. शेवटचा मुलगा पुरू नावाचा होता. मोठा पितृभक्त आहे. पित्याची इच्छा समजल्याबरोबर त्यांनी सांगितले पिताजी तुमचे म्हातारपण मला द्या आणि माझे तारुण्य तुम्हाला घ्या आणि राज्य करा.

उत्तमश्चिन्तितं कुर्यात् प्रोक्तकारी तु मध्यमः ।
अधमः अश्रद्धया कुर्यात् ।।
9.18.44 ।। श्री. भा.

उत्तम पुत्र कोणता, मध्यम पुत्र कोणता, अधम पुत्र कोणता हे पुरूने सांगितले. पित्याच्या मनामध्ये जो विचार आलेले आहे तो जाणून त्याप्रमाणे वागणारा उत्तम पुत्र आहे. सर्व देवांची, ईश्वराची त्याच्यावर पूर्ण कृपा असते. शंतनूला त्या मत्स्यकन्येबरोबर विवाह करण्याची इच्छा झाली. तिच्या बापाने सांगितले तुमचा मुलगा भीष्म आहे, त्याला तुम्ही राज्य दिले तर, माझ्या मुलीच्या मुलांना राज्य मिळाले पाहिजे. भीष्माचार्यांनी सांगितले मी राज्य करणार नाही. तू राज्य करणार

***
पान ३२६

नाहीस, तुला झालेला मुलगा जर राज्यावर अधिकार सांगू लागला तर, तो म्हणाला मी विवाहच करणार नाही, प्रतिज्ञा केली भीष्माचार्यांनी आपल्या पित्याला सुखी करण्याकरता. पित्यानेही त्याला सांगितले की यमधर्म तुझ्या बाजूला येणार नाही. शरीर त्याग करण्याची तुझी इच्छा होईपर्यंत यमधर्म तुला पाहणारही नाही. त्याला आपोआप वर मिळालेला आहे. तसा हा पुरू राजा चांगला होता. लहान सगळ्यांच्या मध्ये पण गुणांनी मोठा होता. वार्धक्य घेतलं त्यांनी आपल्या पित्याचं आणि पित्याला तारुण्य दिलेलं आहे. पुष्कळ कालपर्यंत ययाती राजाने सुखभोग घेतलेला आहे. शेवटी त्याच्याच मनामध्ये वैराग्य निर्माण झाले. त्यांनी सांगितले देवयानी.

यत् पृथिव्यां व्रीहियवं हिरण्यं पशवः स्त्रियः ।
न दुह्यन्ति मनः प्रीतिं पुंसः कामहतस्य ते ।।
9.19.13 ।। श्री. भा.

आपल्या आपणच मनाने ठरवले पाहिजे. पृथ्वीवरती जेवढं सुवर्ण आहे, जेवढ्या स्त्रिया आहेत, जेवढं धन धान्य आहे तेवढं सगळंही एका मनुष्याला मिळालं, तरी त्याच्या मनाचा संतोष होणार नाही म्हणाले. हा विचार करून प्रत्येकाने वासनाक्षय करण्याकरता आपल्या वासना टाकण्याचा प्रयत्न करून, ईश्वर चिंतनाकडे लक्ष दिले पाहिजे. मी हा आता संसाराचा त्याग करणार आहे. पुरे झाला आता संसार. पुरूचे तारुण्य त्याला देऊन टाकलेलं आहे. आपलं वार्धक्य त्याने परत घेतलेलं आहे. सर्वात लहान जरी पुरू होता, त्याला मुख्य सार्वभौम राज्य दिलेलं आहे, अभिषेक केला आणि त्याचे चौघे भाऊ त्याच्या हाताखाली मांडलिक म्हणून नेमलेले आहेत. तुमची योग्यताही नाही राज्य करण्याची. वनामध्ये निघून गेलेला आहे, बरोबर देवयानी वगैरेही गेली. असा हा ययाती राजा याचे चरित्र चंद्रवंशामध्ये झालेलं आहे.

पुढे पुष्कळ असे राजे झालेले आहेत. त्यापैकी दुष्यंत राजाची कथा सांगताहेत शुक्राचार्य महाराज. दुष्यंत राजा शिकारी करता गेलेला आहे. येता येता कण्व ऋषींचा आश्रम लागलेला आहे. तिथे थांबला दुष्यंत राजा. ऋषींचे दर्शन करावे आणि जावं. सगळ्या सैनिकांना आज्ञा केली शांत राहा, गडबड काही करू नका. ऋषि महाराज कुठे बाहेर गेले होते. त्यांनी पालन केलेली कन्या शकुंतला, विश्वामित्रांची कन्या, ही त्याठिकाणी होती. राजाच्या मनामध्ये मोह उत्पन्न झालेला आहे. परंतु राजाने आपले मन आवरलेलं आहे. ही ऋषि कन्या आहे. हिच्यावर आपले मन जाणे योग्य नाहीये. मनाला आवरलेलं आहे. पुन्हा त्यांनी विचार केला की माझं पवित्र मन आहे म्हणाले, माझं पवित्र मन ज्या अर्थी या कन्येवर गेलेलं आहे त्या अर्थी ही ऋषिकन्या नसली

***
पान ३२७

पाहिजे, ही क्षत्रियाची कन्या असली पाहिजे.

मनानीच निर्णय करून, कोणती मुलगी करावी वगैरे करता येते पण मन असे पवित्र पाहिजे. मनाने केलेला निर्णय शास्त्रविरुद्ध होऊन उपयोग नाही. माझं मनं आर्य आहे, श्रेष्ठ आहे. माझ्या मनाला जर ही कन्या पाहिजे असे वाटते आहे. तर ती क्षत्रियाचीच मुलगी असली पाहिजे. तिला विचारले, कोणाची मुलगी आहेस तू. विश्वामित्रांची मुलगी, मेनका अप्सरेपासून झालेली, बरोबर ठरले. गांधर्व विवाह झाला. राजा निघून गेलेला आहे. त्या शकुंतलेला मुलगा झालेला आहे. भरत त्याचे नांव. मोठा पराक्रमी भरत आहे. लहान वयामध्ये सुद्धा त्यांनी वाघ सिंहाना बांधून ठेवावे. काही दिवसांनी कण्व ऋषींनी शकुंतलेला आणि तिच्या मुलाला राजधानी मध्ये पाठवलेलं आहे. बरोबर तिच्या आपल्या शिष्यमंडळींना दिलेलं आहे. राजाला सांगा ही तुझी पत्नी आहे. हा मुलगा तुझा आहे. यांचा स्वीकार तू कर. आणि एवढं सांगा,

आम्ही शमप्रधान आहोत, शांतीने राहणारे आहोत. सगळं सहन करणारे आहोत म्हणाले. म्हणून आमच्यासुद्धा मनामध्ये तेज आहे म्हणाले. तपःतेज आहे म्हणाले. केव्हा बाहेर पडेल याचा नेम नाही. आमच्या मनाच्या विरुद्ध शास्त्राच्या विरुद्ध जो वागणारा आहे. त्याचा प्रतिकार आमच्या तेजाने आम्ही करू शकत असतो असे राजाला ऐकवा म्हणाले.

सूर्यकांत मणी हातामध्ये घेता येतो. पण सूर्याचे तेज त्याच्यामध्ये पडल्याबरोबर त्यातूनही तेज बाहेर पडते म्हणाले. तसे आमचे तेज. तुम्ही जर शास्त्र विरुद्ध वागायला लागलात. तर तुमचाही प्रतिकार करू हे त्यांना समजावून सांगा म्हणाले.

शकुंतला आणि भरत या दोघांना घेऊन आलेले आहेत, ऋषींचे शिष्य. त्यांनी राजाला सांगितले. ही तुमची पत्नी आहे, आकाशवाणीही झाली. दुष्यंताने तिचा स्वीकार केलेला आहे. भरत हा शेवटी राजा झाला. भरताने पुष्कळ यज्ञ केले. दानधर्म पुष्कळ केलेला आहे. त्यांनी दैत्यांनी नेलेल्या देवांच्या स्त्रिया, त्या सर्व स्त्रियांना सोडवून आणलं आणि देवांकडे पाठवलेलं आहे. मर्त्यलोकात राज्य करणारे राजे सुद्धा, धर्मबल त्यांच्याजवळ इतकं होतं की दैत्यांना सुद्धा ते भारी झालेले आहेत. अशा रितीने ही पण कथा त्यांनी सांगितलेली आहे.

पुढे यदुचे जे कुल आहे, यादवांच्या कुलाचे वर्णन करताहेत, शुक्राचार्य महाराज. यदु राजा हा मूळ आहे, यदुवंशाचा. त्याच्यापासून पुढेही सर्व संतती झालेली आहे. कौरवांचे जे कुल आहे

***
पान ३२८

त्याचे थोडे प्रतिपादन केलं त्यांनी. भीष्माचार्यांनी एका राजकन्येच्या स्वयंवरमध्ये जाऊन सर्व राजांना जिंकून दोन मुली आणल्या त्याच्या आणि आपल्या भावांना त्या दिल्या. तो जो आहे विचित्रवीर्य हा सावत्र मुलगा होता. त्या मुलाला क्षय रोग झाला. आणि त्याला मरण आलेलं आहे. आईच्या आज्ञेवरून वेदव्यासांपासून त्या दोघीना मुले झाली. धृतराष्ट्र पत्नी गांधारी हिला शंभर पुत्र झालेले आहेत. दुःशला नावाची एक कन्या झाली. पांडू राजा कुंतीसह आणि माद्रीसह अरण्यामध्ये राहात होता. त्याला शाप झालेला आहे. स्त्री समागम झाल्याबरोबर त्याचे प्राणोत्क्रमण झालेलं आहे. माद्रीने कुंतीच्याजवळ आपली दोन मुले दिली. कुंतीला दुर्वास ऋषींची सेवा केल्यामुळे मंत्र प्राप्त झाले. त्या मंत्रापासून, यमधर्मापासून धर्मराज, वायूसून भीम, इंद्रापासून अर्जुन, हे तीन कुंतीला झाले. अश्विनीकुमारांपासून दोन मुलं नकुल, सहदेव हे त्या माद्रीला झालेले आहेत. पाच पांडवांपासून पाच मुलं द्रौपदीला झालेली आहेत. अशा रितीने तोही यदुकुलाचा व्याप मोठा वाढलेला आहे. महाभारतामध्ये ही सर्व कथा वर्णन केलेली आहे. यानंतर परीक्षित राजा याच वंशामध्ये तुझा जन्म झालेला आहे. तुझा मुलगा जनमेजय हा तू गेल्यानंतर राज्य करील. पुष्कळ यज्ञयाग वगैरे तो करणार आहे. अशा रितीने हा तुमचा वंश पुढे चालू राहणार आहे. शेवटी यदू राजाचा वंश सांगायला त्यांनी सुरवात केली. ययाती राजाचा ज्येष्ठ पुत्र यदू. ह्या यदुराजाचा वंश, ह्या वंशामध्येच भगवंतांनी अवतार धारण केलेला आहे. सहस्त्रजित हा यदुराजाचा मुलगा आहे. आणखी काही मुलं त्याला झाली. याच वंशामध्ये कृतवीर्य हा राजा झाला. त्या कृतवीर्याचा मुलगा कार्तवीर्यार्जुन याने दत्तात्रेयांपासून सर्व योगसामर्थ्य मिळवले. सर्व पृथ्वीचे राज्य केलेलं आहे. अनेक यज्ञ त्यांनी केले. पंच्याएंशी हजार वर्ष पर्यंत अप्रतिहत राज्य केलेलं आहे. त्यालाही पुष्कळ मुलं झाली. त्या सर्वांचा नाश परशुरामाने केला. चार-पाच मुलं शिल्लक राहिलेली आहेत. अशा रितीने हा यदुवंश वाढत वाढत गेलेला आहे. याच वंशामध्ये मथुरा राजधानीमध्ये देवक नावाचा यादव आणि उग्रसेन हे होते. वसुदेवही त्याच वंशामध्ये जन्माला आलेला आहे. वसुदेवाला देवकाने आपली कन्या देवकीही दिली. त्या पूर्वी त्याचे विवाह झालेले होते. आणखीही त्याचे विवाह पुष्कळ झाले. देवकीपासून वसुदेवाला आठ मुलं झालेली आहेत. ती सहा मुलं कंसानी मारली. सातवा गर्भ हा रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन ठेवला. साक्षात श्रीहरी देवकीचा आठवा मुलगा म्हणून जन्माला आलेले आहेत. मायादेवी हीही जन्माला आली देवीपासून. भगवंतांनी भूमिचा भार दूर करण्याकरता हा कृष्णावतार धारण केलेला आहे. हजारो दैत्य त्यावेळेला राजांच्या रूपांनी जन्माला आलेले होते. अतिशय त्रास सर्वांना देत होते. त्यांचा संहार...

***
पान ३२९

करून भूभार दूर करण्याकरता हा अवतार भगवंतांनी घेतलेला आहे. पुष्कळ कार्य केलं त्यांनी. जन्माला आल्याबरोबर गोकुळामध्ये जाऊन राहिले. त्याठिकाणी अनेक दैत्य मारले. पुढे मथुरेमध्ये आलेले आहेत. कंसादिकांचा नाश केला. जरासंधादिकांचा पराभव केला. पुष्कळ विवाह झालेले आहेत, मुलं बाळ झालेली आहेत. पृथ्वीचा भार सर्वही दूर केला. कौरव-पांडवामध्ये परस्पर कलह निर्माण करून त्या युद्धाच्या निमित्तानेही पृथ्वीचा भार पुष्कळ हलका केला. जाताना उद्धवजींना पुष्कळ ज्ञान सांगितले. सगळी साधनं सांगितली आणि आपण निजधामाला गेलेले आहेत. असे संक्षिप्त कृष्णचरित्र त्यांनी सांगितले.

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा । बुद्ध्यात्मना वा अनुसृतस्वभावात् ।।
करोति यद्यत् सकलं परस्मै । नारायणायेति समर्पयेत् तत् ।। 11.2.36 ।। भा.
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव ।।
प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णो भगवन् नमस्ते ।।
।। गोपालकृष्ण भगवान् की जय ।।
।। श्रीमद्भागवत चौथा दिवस समाप्त ।।
***
पान ३३०
« Previous | Table of Contents | Next »