« Previous | Table of Contents | Next »
पान ३३१

।। श्रीमद्भागवत पाचवा दिवस ।।

।। भगवान श्रीकृष्ण चरित्र ।।

ॐ नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने ।
यस्यागस्त्यायतेनामविघ्नसागरशोषणे ।।
यस्यस्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् ।
विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे ।।
विशुद्धज्ञानदेहाय त्रिवेदीदिव्यचक्षुषे ।
श्रेयःप्राप्तिनिमित्ताय नमः सोमा‌र्धधारिणे ।।
यो देवः सवितास्माकं धियोधर्मादिगोचरः ।
***
पान ३३२
प्रेरयेत्तस्य तद्भर्गस्तद्वरेण्यं उपास्महे ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोऽस्तुते ।।
नमो आदिरूपा ॐकार स्वरूपा । विश्वाचिया रूपा पांडुरंगा ।।
तुझिया सत्तेने तुझे गुण गाऊ । तेणे सुखी राहू सर्व काळ ।।
तूची श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन । सर्व होणे जाणे तुझे हाती ।।
तुका म्हणे जेथे नाही मी-तू-पण । स्तवावे ते कवणे कवणालागी ।।
यत् कीर्तनं यत्स्मरणं यदीक्षणं यद् वन्दनं यद् श्रवणं यदर्हणम् ।
लोकस्य सद्यो विधुनोति कल्मषं तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः ।।
विवेकिनो यच्चरणोपसादनात् संगं व्युदस्योभयतोऽन्तरात्मनः ।।
विन्दन्ति हि ब्रह्मगतिं गतक्लमः । तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः ।।
तपस्विनो दानपरा यशस्विनो । मनस्विनो मन्त्रविदस्सुमंङ्गलाः ।।
क्षेमं न विन्दन्ति विना यदर्पणम् । तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः ।।
माला पात्रे च डमरू शूलो शंख सुदर्शने ।
दधानम् भक्तवरदम् दत्तात्रेयम् नमाम्यहम् ।।
योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् । संजीवयत्यखिलशक्तिधरः स्वधाम्ना ।
अन्यांश्चहस्तचरणश्रवणत्वगादीन् । प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् ।।
मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरीम् ।
यत् कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् ।।
आपदामपहर्तारम् दातारम् सर्वसंपदाम् ।
लोकाभिरामम् श्रीरामम् भूयो भूयो नमाम्यहम् ।।
यत्र यत्र रघुनाथकीर्तनं । तत्र तत्र कृत मस्तकांजलिम् ।
बाष्पवारिपरिपूर्णलोचनं । मारुति नमत राक्षसान्तकम् ।।
***
पान ३३३
पुस्तकजपवटहस्ते वरदाभयचिन्ह चारुबाहुळते ।
कर्पूरामलदेहे वागीश्वरी चोदय्याशु मम वाचम् ।।
श्रीगणेशाय नमः
श्रीगुरुचरणारविन्दाभ्याम् नमः ।
कथितो वंशविस्तारो भवता सोमसूर्ययोः ।
राज्ञां चोभयवंश्यानां चरितं परमाद्भुतम् ।। 10.1.1 ।।
यदोश्च धर्मशीलस्य नितरां मुनिसत्तम ।।
तत्रांशेनावतीर्णस्य विष्णोर्वीर्याणि शंस नः ।। 10.10.2 ।। श्री.भा.

परीक्षित राजाने संपूर्ण कृष्णचरित्र सांगा अशी प्रार्थना केलेली असताना शुक्राचार्य महाराजांनी कृष्णचरित्र सांगितलेलं आहे.

परीक्षित राजा विचारतो महाराज, चंद्रवंश आणि सूर्यवंश या दोन्हीही वंशामध्ये उत्पन्न झालेले राजे यांचे अद्भुत चरित्र आपण सांगा. यदुराजाचेही चरित्र सांगितले. त्या यदुराजाच्या वंशामध्ये भगवान महाविष्णूंनी अवतार धारण करून, ज्या लीला केल्या त्या सर्व आम्हाला सांगा.

जे जे चरित्र भगवान श्रीहरींचे आहे ते सविस्तर मला सांगावं. आपल्यासारखे भक्त हेही भगवत् गुण वर्णन करतात. संसाररूपी रोगाचे हे औषध असल्यामुळे मुमुक्षूंनाही हे अत्यंत चांगले, अनुकूल आहे. विषयी, संसारी जीवांनाही ऐकायला, त्याप्रमाणे मनालाही आनंद देणारे असल्यामुळे सर्वही लोक या भगवंताच्या गुणानुवादांबद्दल अत्यंत उत्सुक आहेत. माझे पितामह पांडव, भीष्मद्रोणादि, मोठे मोठे जलचर प्राणी त्या कौरवे सैन्या समुद्रामध्ये आहेत पण त्या भगवंताच्या चरणाचा आश्रय करून ते पांडव यातून तरून गेले, विजयी झाले. आईच्या उदरामध्ये असलेलं माझं शरीर नष्ट करण्याकरता अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र प्रयोग केला. पांडवांच्या वंशाला मी एकटाच आधार होतो. पण माझ्या मातेच्या उदरामध्ये प्रवेश करून त्या भगवंतांनी माझे संरक्षण केलेलं आहे, सर्वांच्या अंतर्बाह्य सर्वत्र व्यापून राहणारा भगवान त्याचे चरित्र आपण सांगा. रोहिणीचा पुत्र बलराम असं आपण म्हणालात पूर्वी. तोच देवकीच्या गर्भामध्ये आला हे कसं आहे. मथुरेचा त्याग करून गोकुळामध्ये भगवान श्रीहरी का गेले ? त्याठिकाणी राहून त्यांनी काय काय लीला केल्या, मथुरेमध्ये आल्यावर काय काय लीला केल्या. आपल्या मातेचा बंधू कंस याला कशाकरता त्यांनी...

***
पान ३३४

मारले ? मनुष्य देह धारण करून किती वर्ष या भूमीवर त्यांचा निवास झाला ? त्यांच्या स्त्रिया किती होत्या. हे सर्वही कृष्णचरित्र सविस्तर ऐकण्याची माझी इच्छा आहे. अशी श्रद्धा उत्पन्न झालेली आहे. मला क्षुधा, तृषा याची बाधा नाहीये. आपल्या मुखातून हे भगवंताचे चरित्ररूपी अमृत मला मिळतं आहे. त्यामुळे क्षुधा, तृषा याच्यातून मुक्त झालो. परीक्षित राजा आरंभाला मृगया करून येत असताना शमिक ऋषींच्या आश्रमामध्ये तहान लागल्यामुळे गेला, पाणी मिळालं नाही म्हणून रागावला, म्हणजे त्यावेळेला प्राणमय कोशाचा अभ्यास होता असे दिसते आहे. प्राणमय कोशाचा अभ्यास असल्यामुळे क्षुधा, तृषा आहे. पण आत्ता चारपाच दिवस प्रत्यक्ष शुक्राचार्य महाराजांच्या मुखातून हे चरित्र ऐकल्यामुळे त्यांच्या कृपेमुळे तो या कोशातून बाहेर पडलेला आहे. क्षुधा, तृषेची बाधा मला होत नाही म्हणून सांगतो आहे. हरिकथामृत मिळतंय म्हणून क्षुधा, तृषा गेलेली आहे. हरिकथा श्रवणाने हे मोठे मोठे कोशसुद्धा दूर होतात, असे समजायला हरकत नाहीये.

राजाची अत्यंत श्रद्धा, भक्ती पाहिली, शुक्राचार्य महाराजांनाही, आनंद झाला. शुक्राचार्य महाराज म्हणतात, राजा तुझी बुद्धी खरोखर निर्मळ आहे. वासुदेवाची कथा ऐकण्याबद्दल तुझ्या मनात अत्यंत दृढ श्रद्धा उत्पन्न झालेली आहे.

भूमिर्दृप्तनृपव्याजदैत्यानीकशतायुतैः ।
आक्रान्ता भूरिभारेण ब्रह्माणं शरणं ययौ ।। 10.1.17 ।। श्री.भा.

कृष्णावतार होण्यापूर्वीची काय अवस्था होती ते सांगताहेत. भूमीवर राजांच्या रूपांनी अनेक दैत्य जन्माला आलेले होते. त्यांचा भार झालेला आहे भूमीला. ब्रह्मदेवाकडे ती भूमी शरण गेलेली आहे. गायीचे रूप धारण करून ती गेली. आपल्यावर काय संकट आलेलं आहे हे तिने सांगितले. ब्रह्मदेवांनी भूमीला बरोबर घेतलं सर्व देवमंडळींना बरोबर घेतलं, शंकर परमात्माही आहेत बरोबर. क्षीरसमुद्राच्यातीरावर ते सर्व गेले. ब्रह्मदेवांनी त्या ठिकाणी भगवंतांची उपासना, प्रार्थना केलेली आहे. समाधी अवस्थेमध्ये ब्रह्मदेवांनी श्रीहरीचा जो आवेश झालेला आहे, तो त्यांनी सांगितला. ईश्वराची, श्रीहरींची आज्ञा मी सांगतो तुम्हाला आणि त्याप्रमाणे तुम्ही वागा म्हणजे तुमचे कल्याण होईल. हा भूमीला झालेला भार भगवंतांना समजलेला आहे म्हणाले. त्याकरता स्वतः भगवान अंशाने जन्म घेणार आहेत. तुम्हीही यदुकुलामध्ये सर्व देवांनी जन्म घ्यावा. भगवंताच्या साहाय्याकरता. वसुदेवाच्या गृहामध्ये देवकीपासून भगवान श्रीहरी उत्पन्न होणार आहेत.

***
पान ३३५

सर्व देवस्त्रियांनीही त्यांची सेवा करण्याकरता जन्म घ्यावा. भगवान वासुदेवांची कला, सहस्रमुख जो शेष आहे हा प्रथम जन्म घेणार आहे. श्रीहरींची मायाशक्ती सर्व जगाला मोहामध्ये टाकणारी प्रभूच्या आदेशाप्रमाणे तीही जन्माला येणार आहे.

शुक्राचार्य म्हणतात राजा, सर्व देवांना ब्रह्मदेवांना भगवंतांची आज्ञा झालेली आहे. आश्वासन दिलेलं आहे आणि पृथ्वीचे समाधान केले. आणि आपल्या लोकाला ते निघून गेलेले आहेत.

शूरसेनो यदुपतिः मथुरां आवसन् पुरीम् ।
माथुरान् शूरसेनांश्च विषयान् बुभुजे पुरा ।। 10.1.27 ।। श्री.भा.

यादवांचा राजा शूरसेन नावाचा होता. मथुरा राजधानी होती त्याची. त्याठिकाणी तो राज्य करत होता. एकेदिवशी त्याचा पुत्र वसुदेव याचा विवाह. देवकीबरोबर विवाह झाला आणि त्यांची मिरवणूक निघाली. उग्रसेनाचा पुत्र जो आहे कंस हा या देवकीचा चुलत बंधू आहे. बहिण आहे आपली, बहिणीवर प्रेम होते. रथामध्ये स्वतः रथ हाकण्याकरता हातामध्ये लगाम घेऊन बसलेला आहे. पाठीमागे वसुदेव-देवकी बसलेले आहेत. आणि लग्नाची मिरवणूक निघालेली आहे. देवकीच्या पित्याने देवकीला, ज्यांच्या गळ्यात सोन्याच्या माळा आहेत असे चारशे हत्ती दिले. पंधरा हजार अश्व दिलेले आहेत. अठराशे रथ दिलेले आहेत. दोनशे दासी तिच्याबरोबर दिलेल्या आहेत. केवढी संपत्ती होती भारतवर्षामध्ये. त्याला काय एकच मुलगी नव्हती. पण या मुलीबरोबर एवढी संपत्ती दिली. वाद्यं वाजताहेत. आनंदाने ती लग्नाची मिरवणूक निघालेली असताना एकदम आकाशवाणी झाली. कंसा, ज्या देवकीला तिच्या घरी पोचवायला तू निघालेला आहेस तिचा आठवा पुत्र तुला ठार मारणार आहे. आधी सूचना दिलेली आहे देवाने. सूचना न देता काही नाश केला नाही. इतर जीव निराळे आणि कंस निराळा असं म्हणायला पाहिजे. आम्हाला कुठं काय मृत्यूची कल्पनादेखील येत नाही. सूचना मिळाली असती तर संसाराची आसक्ती बरीच कमी झाली असती. हे सगळं ठरलेलं आहे. ईश्वरेच्छा. एकदम त्या कंसाची वृत्ती बदलली. त्याने लगाम फेकून दिले. म्यानातून तलवार बाहेर काढली. देवकीचे केस धरून तिचा शिरच्छेद करायचा त्यानं ठरवलं. त्याने विचार केला, देवकीलाच शिल्लक ठेवलं नाही तर पुढं मुलगा होईल कसा आणि मला मारेल कसा. हा प्रयत्नवाद आहे. दैववादही मानायचा नाही आणि देववादही मानायचा नाही. केवळ प्रयत्न करून आपण अजरामर होऊ असं वाटतंय. बाकीचे दैत्य तपश्चर्या तरी करत होते. याने तर तपश्चर्याही केली नाही. अहंकारपायी, मला कुणीही काही करू शकणार नाही. कुठली अदृश्य शक्तीही मला

***
पान ३३६

काही करू शकणार नाही. त्याकरता अगोदरच मी ही व्यवस्था करून टाकतो अशी बुद्धी आहे. देवकीवर मोठा कठीण प्रसंग आलेला आहे. केव्हां शिरच्छेद होईल याचा नियम नाहिये व वसुदेव सांगताहेत,

श्लाघनीयगुणः शूरैर्भावान् भोजयशस्करः ।।
10.1.37 ।। श्री. भा.

कंसा, तू मोठा गुणवान म्हणून प्रसिद्ध आहेस. सर्व यादवांचं यश हे तुझ्यामुळे आहे. असा तू सर्वांना मान्य असलेला, विवाहासारख्या मंगल प्रसंगी आपल्या बहिणीला मारतो आहेस हे योग्य आहे का? तू विचारशील की हिच्या आठव्या पुत्रापासून माझा मृत्यू होणार आहे तर मग हिला जिवंत का ठेवू ? पण ज्या दिवशी जीव जन्माला आला त्यादिवशी मृत्यूदेखील बरोबर आलेला आहे. आज नाही, उद्या नाही, शंभर वर्षांनी का होईना मृत्यू येणार आहे. मृत्यूचा प्रतिकार कोणालाही करता येणार नाही. बाकीच्या दुःखाचा प्रतिकार केला अशी समजूत करून घेऊन समाधान मानता येईल. म्हणून वसुदेवाने जीवात्मा कसा जातो, पुढच्या देहाचा संबंध घेऊन हा देह कसा सोडतो वगैरे सर्व काही कंसाला समजावून सांगितले. पुनर्जन्म वगैरे तो मानत होता की नाही कुणास ठाऊक? मृत्यू फक्त देहाला आहे आणि देह म्हणजेच मी आहे. वसुदेवाने हेही त्याला समजावून सांगितलं की, शरीराला तर मृत्यू आहेच परंतु जीवात्म्याला सुद्धा वेगवेगळे देह धारण करावे लागतात. चांगलं कर्म केलं तर चांगला देह मिळेल, वाईट कर्म केलं तर वाईट देह मिळेल. हा देह सोडून त्या जीवात्म्याला जावंच लागणार आहे. म्हणून कोणाचाही द्रोह केव्हाही करू नये. आपल्या कल्याणाकरता, स्वार्थाकरता कुणाचाही द्रोह करू नये. आत्ता तू हिला मारशील पण पुढच्या जन्मामध्ये तुला भय आहे. हा काही तुझा शेवटचा देह नाहिये. देवकीला मारून आपण अजरामर होऊ हा तुझा भ्रम आहे. तू आपल्या बहिणीकरता दया धारण कर आणि तिला मारू नकोस. पुष्कळ सांगितलं वसुदेवाने पण कंसावर काही परिणाम झाला नाही. मग वसुदेवाने वेगळा विचार केला. हा आत्ताचा प्रसंग टाळावा. देवकीचा मृत्यू चुकवावा. पुढे काय होईल ते पाहता येईल. वसुदेव म्हणाला,

प्रदाय मृत्यवे पुत्रान् मोचये कृपणामिमाम् ।।
10.1.49 ।। श्री. भा.

देवकीला जी मुलं होतील ती याला द्यायचं कबूल करावं. आणि तिची सुटका करावी असं वसुदेवाने ठरवलं.

न हि अस्यास्ते भयं सौम्य यद् वागाहशरीरिणी ।
पुत्रान् समर्पयिष्येऽस्या यतस्ते भयमुत्थितम् ।।
10.1.54 ।। श्री. भा.
***
पान ३३७

कंसा, आकाशवाणीनं सांगितलंय देवकीचा आठवा मुलगा तुला मारेल. म्हणजे देवकीपासून तुला धोका नाही ना? देवकीला जीवदान दे. मी तुला वचन देतो की देवकीला झालेला प्रत्येक मुलगा मी तुला आणून देईन. तू त्याला जिवंत ठेव, मार काय वाटेल ते कर. वसुदेव सत्यवाणीकरता प्रसिद्ध होता. कंसाचा विश्वास त्याच्यावर बसला. तलवार म्यानामध्ये ठेवून तो आपल्या वाड्यामध्ये निघून गेला. वसुदेव देवकीही आपल्या वाड्यामध्ये आलेले आहेत. पुढे देवकीला क्रमाने आठ मुलं आणि एक मुलगी झालेली आहे. पहिला मुलगा झाल्याबरोबर वसुदेवाने तो कंसाला नेऊन दिला. देवकीच्या समक्षच वचन दिल्यामुळे तिचीही मानसिक तयारी झाली होती. आपल्याला पराक्रमी मुलगा होणार आहे हे लक्षात असल्यामुळे तिची कंसाची भीती गेली होती. राजसभेमध्ये येऊन वसुदेवाने सांगितलं, राजोसाहेबा, हा मुलगा आत्ताच मला झालेला आहे. कबूल केल्याप्रमाणे हा मी घेऊन आलेलो आहे. विवेक संपन्न महात्मे जे आहेत, त्यांना कोणतंही दुःख असह्य नाहिये. वसुदेवाची सत्यनिष्ठा पाहून कंसाच्या मनावरही परिणाम झालेला आहे. त्याने सांगितलं, वसुदेवा, हा मुलगा तू घेऊन जा. याच्यापासून काही मला भीती, नाही. त्यानंतर एके दिवशी नारदऋषि राजसभेत आले आणि त्यांनी सांगितलं, कंसा, गोकुळात राहणारे सर्व गोपाळ, वसुदेव, देवकीसह सर्व यादव हे सगळे देव जन्माला आलेले आहेत. तुम्ही दैत्य सगळ्यांना जो त्रास देता त्याकरता ही सगळी व्यवस्था देवांनी केलेली आहे. भूमीला भार झालेला आहे तुमचा. आणि त्यामुळे देवांनी अशी व्यवस्था केलेली आहे. तुमचा नाश करायचा असा प्रयत्न देवांनी चालवलेला आहे. देव आलेले आहेत. अर्थात त्यांचा संरक्षक तो येणार आहे. हे सांगून नारद निघून गेले. नारदांनी त्याला थोडी कल्पनाही दिली की देवांचे अधिपति विष्णूही येणार आहेत.

कंसाने ते सगळं समजून घेतलं आणि तो प्रयत्नाला लागला. सर्व दैत्यांचा नाश होणार म्हणजे आता सर्वांनी संघटित राहिलं पाहिजे, असं त्याने ठरवलं. लगेच वसुदेव देवकीला त्याने बंदिखान्यात टाकलं. हातापायामध्ये बेड्या घातल्या. आणि जो मुलगा जन्माला येईल त्याचा नाश केलेला आहे कारण यादव कोणी जन्माला आला की तो देव आहे म्हणजे त्याचा नाश करायचा. स्वतःच्या बापाला, उग्रसेन राजालाही त्याने तुरुंगात टाकलं आणि सर्व सत्ता आपल्या हातामध्ये घेतली. शुक्राचार्य सांगताहेत, राजा, अनेक दैत्य त्याला अनुकूल आहेत. कारण कसंही वागायला राजाची परवानगी आहे. अन्यायाने वागलं म्हणजे उलट, त्यांना प्रोत्साहन मिळतंय. अनेक दैत्य प्रलंबासुर, तृणावर्त इ., बाणासुर, भौमासुर, जरासंध इत्यादि राजेलोक या सर्वांचं साहाय्य आहे. एकाही यादवाला जिवंत ठेवायचं नाही कारण हे सगळे देव आहेत. सर्व यादवांना त्रास द्यायला

***
पान ३३८

कंसाने सुरवात केली. यादवांनी मथुरेतली घरंदारं सोडली आणि दुसऱ्या प्रांतात ते राहायला गेले. काही यादव कंस सांगेल तसं राहून अनुकूल रितीने तिथेच राहिले. देवकीची सहा मुलं त्याने मारली. सातवा गर्भ म्हणजे भगवान शेष त्या देवकीच्या उदरामध्ये आलेले आहेत. यादवांना कंसाची भीती उत्तरोत्तर वाढत चाललेली आहे. भगवंतांनी योगमायेला आज्ञा केली, गोकुळामध्ये वसुदेवाची आणखी एक पत्नी रोहिणी राहातेय. देवकीच्या उदरातला गर्भ रोहिणीच्या उदरात नेऊन ठेव म्हणजे मी लवकरच देवकीच्या उदरात अवतीर्ण होईन. तू ही नंदपत्नी यशोदेच्या पोटी जन्म घे. अनेक नावं दुर्गा, भद्रकाली, वैष्णवी अशी तुला प्राप्त होतील. नारायणी, शारदा वगैरे नादांनी तू ओळखली जाशील. सर्व उपचार तुला अर्पण करतील. तो गर्भ आकर्षण तू करून नेल्यामुळे त्याला संकर्षण म्हणतील. सर्वांना आनंद देणारा तो असल्यामुळे त्याला राम म्हणतील अथवा बलराम असंही म्हणतील.

भगवंतांची आज्ञा झाल्याबरोबर मायेला काय अशक्य आहे. तिने इकडचा गर्भ तिकडे नेऊन ठेवला. देवकीचा गर्भपात झाला अशी सर्व लोकांची कल्पना झालेली आहे. भगवान श्रीहरींनी वसुदेवाच्या मनात प्रवेश केला, सूक्ष्मरूपाने. वसुदेवाचं सर्वांग तेजोमय दिसू लागलेलं आहे आणि त्यांचे ते तेज देवकीच्या शरीरामध्ये प्रविष्ट झालं.

दधार सर्वात्मकमात्मभूतम् ।
काष्ठा यथाऽऽनन्दकरं मनस्तः ।। 10.2.18 ।। श्री. भा.

शुक सांगतात, राजा, वसुदेव देवकी दोघेही मनाने भगवंताचं चिंतन करताहेत. मनानेच ते तेज देवकीने धारण केलं. ती गर्भिणी झालेली आहे. तो कंस सारखा चौकशीला येऊन जातोय. कारागृहाला कुलपं घातलेली आहेत. किल्ल्या आपल्याजवळ ठेवलेल्या आहेत. पहारेकऱ्यांवर विश्वास नाही. देव आता आलेले आहेत. काय करतील याचा नियम नाही. एके दिवशी त्या देवकीला पाहण्यासाठी कंस आलेला आहे. अत्यंत तेजस्वी ती दिसते आहे. माझा नाश करणारा हिच्या उदरात आलेला आहे हे कंसाला उमगलं. मी जिवंत राहिलं पाहिजे. माझे अनुयायी जिवंत राहिले पाहिजेत. त्याकरता या देवकीलाच आता मारून टाकलं म्हणजे काम झालं. वसुदेवाने केलेला सर्व उपदेश केला फुकट गेलेला आहे. देहाचा अभिमान इतका आहे की मीच मोठा आहे. माझा प्राण मी जाऊ देणार नाही. देवकीला मारून टाकल्यावर हा मुलगाही मरेल आणि माझा प्राण वाचेल. असा एक भयंकर विचार कंसाच्या मनात आला. पण हे जे नास्तिक किंवा

***
पान ३३९

निरीश्वरवादी लोक असतात त्यांना आपली कीर्ति व्हावी अशी इच्छा असते. लोकांनी आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. त्यामुळे कंसाला वाटलं की मी जर या गर्भिणी स्त्रीला जी माझी बहीणही आहे, तिला मारलं तर माझी अपकीर्ति होईल. सर्व लोक माझी निंदा करतील. त्यामुळे त्याने वाट पहायची ठरवलं.

आस्ते प्रतीक्षंस्तज्जन्म हरेर्वैरानुबन्धकृत् ।।
10.2.23 ।। श्री. भा.

पूर्वीपासूनच ते वैर आलेलं आहे. पूर्वी कालनेमी म्हणून राक्षस होता. त्याचा नाश भगवान विष्णूंनी केला. तोच हा कंस म्हणून जन्माला आलेला आहे. त्या कंसाला, आपला वैरी म्हणून का होईना सारखा ध्यास लागलेला आहे. सभेमध्ये बसला असताना, जेवत असताना, फिरत असताना सर्वदा आपला वैरी श्रीहरीचंच चिंतन तो करतोय. जन्माला आला काय, मला मारणार आहे, अशी सारखी भीती आहे.

त्या कारागृहात देवकीच्या उदरात श्रीहरी आलेले पाहून, सर्व ब्रह्मादिक देव त्याठिकाणी आलेले आहेत. त्या सर्व देवांनी गर्भस्थ भगवान श्रीहरींची स्तुति केलेली आहे. सत्यमूर्ती परमात्मा आपण आहात. त्रिकालाबाधीत आपलं स्वरूप आहे. विकाररहित आहे. आपल्याला आम्ही शरण आलेलो आहोत.

बिभर्षि रूपाणि अवबोध आत्मा ।
क्षेमाय लोकस्य चराचरस्य ।
सत्त्वोपपन्नानि सुखावहानि ।
सतां अभद्राणि मुहुः खलानाम् ।।
10.2.29 ।। श्री. भा.

भगवान आपली सत्त्वप्रधान सर्व रूपं, सर्व विश्वाचं कल्याण व्हावं, संरक्षण करावं याकरता आहेत. दुर्जनांचा नाश सुद्धा त्यांच्या कल्याणाकरताच आहे. दुर्जनांचा नाश केल्यामुळे जास्तीत जास्त दुर्विचार निर्माण होऊन पुढे होणारा अधःपात तरी टळतो. तेव्हा आपली ही सर्व सात्विक रूपं सज्जनांना अत्यंत आनंद देणारी आहेत. आणि दुर्जनांना मात्र ही अमंगलरूप वाटतात. ते आपल्याकडे शत्रूरूपाने पाहतात. हा अवतारही आपण विश्वरक्षणाकरताच घेऊन आलेले आहात. आम्ही आपल्याला वंदन करतो. देवकीचंही समाधान केलं ब्रह्मदेवांनी, आई, हा प्रत्यक्ष वैकुंठपति परमात्मा तुझ्या उदरात आलेला आहे. तुला भिण्याचं काही कारण नाही. कंसाची भीती अजिबात बाळगू नकोस. त्याचं मरण जवळ आलेलं आहे. सर्व देवमंडळी नंतर आपापल्या स्थानाला निघून

***
पान ३४०

गेली.

शुक सांगतात राजन,
अथ सर्वगुणोपेतः कालः परमशोभनः ।
यर्ह्येव अजन्मर्क्षं शान्तर्क्षग्रहतारकम् ।।
10.3.1 ।। श्री. भा.

गोपाळकृष्णांचा जन्मसमय प्राप्त झालेला आहे. अष्टमीचा दिवस. मध्यरात्रीचा समय झालेला आहे. जन्म नक्षत्र रोहिणी आहे. आकाश निरभ्र आहे. सगळीकडे प्रसन्न, शांत वातावरण आहे. नद्यांचं जलही प्रशांत आहे. सुगंधी वायू मंद मंद वाहतो आहे. द्विजांच्या गृहामध्ये असणारे अग्नीसुद्धा शांत आहेत. सर्व साधूंची अंतःकरणं प्रसन्न आहेत. असा तो काल आहे. भगवान येणार यामुळे जिकडेतिकडे आल्हाददायक वातावरण आहे. अशा रितीने मध्यरात्रीचा समय झालेला आहे.

देवक्यां देवरूपिण्यां विष्णुः सर्वगुहाशयः ।
आविरासीद् यथा प्राच्यां दिशीन्दुरिव पुष्कलः ।।
10.3.8 ।। श्री. भा.

भगवान गोपाळकृष्ण हे त्या देवकीच्या उदरातून बाहेर प्रगट झालेले आहेत.

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे । हे नाथ नारायण वासुदेव ।
प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ ।
मुकुंद विष्णो भगवन्नमस्ते ।।
तमद्भुतं बालकमम्बुजेक्षणं
चतुर्भुजं शंखगदायुधायुधम्
श्रीवत्सलक्ष्मं गलशोभिकौस्तुभं
पीताम्बरं सान्द्रपयोदसौभगम् ।।
10.3.9 ।। श्री. भा.

आरंभाला भगवंताने चतुर्भुज रूप घेतलं. पीतांबर नेसलेलं आहे. शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेलं आहे. किरीट कुंडलं घातलेली आहेत. केशभार पाठीवर रुळतो आहे. अशा प्रकारचं ते दिव्य रूप पहायला मिळालं. किती पुण्य आहे, वसुदेव देवकीचं! तर संसारात असताना नुसतं पुत्ररूपाने नाही तर सगुण साक्षात्कार त्यांना झालेला आहे. कृष्णजन्म झाल्यामुळे अत्यंत आनंद झाला, वसुदेवांना आणि त्यांनी मनाने दहा हजार गाईचं दान देण्याचा संकल्प केला, कारण तुरुंगामध्ये आहेत. प्रत्यक्ष दान करता येत नाही पण मनाने केव्हां आपण मोकळे झालो तर करू

« Previous | Table of Contents | Next »