``` \ \
```म्हणाले. वसुदेवाने स्तुती केलेली आहे.
विदितोऽसि भवान् साक्षात् पुरुषः प्रकृतेः परः ।
केवलाधुनाऽऽनन्दस्वरूपः सर्वबुद्धिदृक् ।।
10.3.13 ।। श्री. भा.
भगवंता, प्रकृतीचंही नियंत्रण करणारे आपण आहात. केवल सच्चिदानंदरूप आपण आहात. आणि सर्वांच्या बुद्धीचे साक्षी आहात. सर्वसाक्षी आपण आहात. आपल्या मायाशक्तीने हे सर्व त्रिगुणात्मक जगत आपण निर्माण केलंत. अप्रविष्ट आपण आहात कारण पूर्वीपासूनच आपण आहात. पण जगत निर्माण झाल्यावर आपण त्यात प्रविष्ट झालात. सर्वांना चेतना आली. सर्व सक्रीय झालेले आहेत. बुद्धी आणि इंद्रिय यांच्या कार्यावरून आपल्या प्रेरक शक्तीचं अनुमान करता येतं. आपल्याला कोणतंही आवरण नाहीये. सर्वात्मरूप आपण आहात. सर्व गुणांमध्ये संमिलित असतानासुद्धा आपल्याला त्याची बाधा होत नाही. सर्व विश्व हे आपल्यापासून उत्पन्न होतं, आपणच त्याचं संरक्षण करता आणि आपणच त्याचा उपसंहार करता.
वदन्ति अनीहात् अतुणात् अविक्रियात् ।
10.3.19 ।। श्री. भा.
असे आपण असताना उत्पत्ती, स्थिती, लय आपल्यापासून होतात असं लोक समजतात. वास्तविक आपण तटस्थ आहात. आपला कशाशीही संबंध नाही. परंतु जगाची उत्पत्ती, स्थिती, लय हे समजून येत असताना त्याच्या कर्त्यापर्यंत बुद्धी पोहचण्याकरता शाखाचंद्रन्यायाने हे लक्षण उपयोगी पडेल. त्रैलोक्याच्या रक्षणाकरता आपण हे सत्वरूप धारण करता. रजोगुणयुक्त स्वरूप आपण उत्पत्तीकरता धारण करता. तमप्रधानरूप आपण संहाराकरता धारण करता. आपण माझ्या गृहात अवतार घेऊन आलात ते सर्व लोकांच्या रक्षणाकरता आला आहात. वेगवेगळ्या राजांच्या रूपाने हे जे असुर आलेले आहेत यांचा आपण नाश करा आणि भूमिभार हलका करा. या कंसाने आपल्या पूर्वीच्या बंधूंना ठार मारलेलं आहे. आपण जन्माला आला हे समजल्यावर तो शस्त्र घेऊन लगेच इकडे येईल. देवकीलाही मोठा आनंद झाला ते रूप पाहून. तीही मोठी विचारशील होती. त्याकाळी श्रवणभक्ती सगळ्यांनाच घडायची. नारदादिक मोठे मोठे ऋषी नेहमी यायचे आणि त्यांच्याबरोबर विचार विनिमय करून वेगवेगळे सिद्धांत ऐकायला मिळायचे आणि मुळातच सात्विक बुद्धी असल्यामुळे ते विचार दृढ व्हायचे. देवकीची स्तुतीसुद्धा वेदांतपूर्ण आहे.
रूपं यत् तत् प्राहुः अव्यक्तमाद्यं
ब्रह्म ज्योतिर्निर्गुणं निर्विकारम् ।
सत्तामात्रं निर्विशेषं निरीहं ।
स त्वं साक्षाद् विष्णुः अध्यात्मदीपः ।।
10.3.24 ।। श्री. भा.
निर्गुण निराळं, सगुण निराळं असं नाहीये. अव्यक्त रूप जे आहे. ब्रह्म ज्याला म्हणतात, निर्गुण, निराकार, निर्विकार, स्वयंप्रकाश जे रूप आहे. क्रिया नाही, गुण नाही. तेच रूप आत्मज्योतीरूप आपणच श्रीविष्णू आहात. दोन परार्ध इतकं ब्रह्मदेवांचं आयुष्य संपल्यानंतर सर्व महाभूतांचा विलय होतो आहे. सर्व त्रैलोक्याचा विलय होतो. पण आपण फक्त एकटे शिल्लक राहता म्हणून शेष म्हणतात, आपल्याला. हा जो सर्वांना अव्यक्ताकडे नेणारा काळ आहे तो आपलंच रूप आहे. मृत्यूच्या भीतीने सर्व लोक हे काळापासून पळून जाण्याचा प्रयत्न करतात. ज्यावेळी ते लोक आपल्या चरणाजवळ आपल्याच इच्छेने येऊ शकतील तेव्हा ते मृत्यूच्या भीतीतून मुक्त होतील. देवा, या कंसापासून आम्हाला फार त्रास होतो आहे. आपलं हे चतुर्भुज रूप ध्यान करण्याला योग्य आहे. बघितल्याबरोबर अंतःकरण स्थिर झालंच पाहिजे. असं ध्यानाला योग्य असं रूप लोकांनी पाहू नये अशी माझी इच्छा आहे. आपण जन्माला आलो हे त्या कंसाला समजू नये. देवा, मला फार भीती वाटते आहे. तेव्हा हे आपलं दिव्य रूप आपण अदृश्य करा आणि सामान्य बालकाचं रूप धारण करा.
भगवान सांगतात, देवकी, स्वायंभुव मन्वंतरामध्ये पूर्वी तू पृश्नि म्हणून जन्माला आली होतीस आणि वसुदेव हा सुतपा नावाचा प्रजापती होता. ब्रह्मदेवांच्या आज्ञेप्रमाणे उत्तम संतती होण्याकरता सर्व इंद्रियं, मन यांचा संयम करून तुम्ही पुष्कळ वर्ष तपश्चर्या केली. थंडी, वारा, ऊन वगैरे सगळं सहन केलंत. प्राणनिरोध करून मनाची शुद्धी केलेली आहे. काही दिवस झाडावरून खाली पडलेली पानं भक्षण केलीत. काही दिवस कुंभक करून प्राणनिरोध केला. माझी कृपा व्हावी, वर मिळावा म्हणून माझी आराधना तुम्ही केली. देवांची बारा हजार वर्ष इतकी तपश्चर्या तुम्ही केली. माणसांचं एक वर्ष म्हणजे देवांचा एक दिवस! संतुष्ट होऊन याच रूपाने मी तुम्हाला दर्शन दिले. तुम्ही माझ्यासारखा मुलगा व्हावा हा वर मागितला. विषय त्याग केलेला आहे, आणि संतती नाही त्यामुळे संसारात तुमची वासना पुष्कळ अडकली होती. म्हणून तुम्ही मोक्ष न मागता मुलगा मागितला. मी तो वर तुम्हाला दिला. त्या जन्मात मी तुमचा मुलगा झालो, पृश्निगर्भ नावाने. तुमचा दुसरा जन्म म्हणजे कश्यप आणि अदिती. त्यावेळीही मी तुमचा मुलगा उपेंद्र किंवा वामन नावाने झालो. आता हा तुमचा तिसरा जन्म आहे. ह्या जन्मामध्येसुद्धा मी तुमचा मुलगा झालो आहे. हे रूप तुम्हाला पूर्वजन्माचं स्मरण व्हावं म्हणून दाखविलंय.
युवां मां पुत्रभावेन ब्रह्मभावेन चासकृत् ।
चिन्तयन्तौ कृतस्नेहौ यास्येथे सद्गतिं पराम् ।।
10.3.45 ।। श्री. भा.
मला मुलगा समजा किंवा परब्रह्म समजा, कोणत्याही भावनेनं माझ्याकडे पाहिलं असता तुम्हाला गती प्राप्त होईल. तुम्ही मुक्त व्हाल. याप्रमाणे भगवंतांनी सांगितलं आणि लगेच सामान्य बालकाप्रमाणे रूप धारण केलं आहे. वसुदेवाला काय सांगायचंय ते त्यांनी सांगितलेलं आहे.
भगवत्प्रचोदितः ।।
10.3.47 ।। श्री. भा.
त्या मुलाला वसुदेवाने आपल्याजवळ घेतलं. याला आता गोकुळात नेऊन ठेवायचं. भगवंतांनीच सांगितलं होतं. भगवंतांचा जन्म झाला त्याचवेळी गोकुळात यशोदेच्या पोटी योगमायेने जन्म घेतला. त्यामुळे सगळ्या लोकांना गाढ झोप लागलेली आहे. अव्यक्त रूपात असताना ती मायाशक्ती किती मोहात टाकते. आता तर व्यक्त रूपात आलेली आहे. सर्व पहारेकरीही गाढ झोपले. तुरुंगाचे सगळे दरवाजे उघडले गेले. मायेला नुसता जन्म घ्यायला सांगितला नव्हता. ही सगळी व्यवस्था त्या मायेमुळेच झाली आहे. जोराचा पाऊस सुरू झाला. शेष भगवानाने भगवंताच्या डोक्यावर फणा धरला आणि वसुदेव गोकुळात जायला निघाले. यमुनानदीला मोठा पूर आलेला आहे. वर्षा ऋतू होता. वसुदेव यमुनेजवळ आल्याबरोबर यमुनेचं पात्र दुभंगलं आणि त्या रस्त्याने वसुदेव पलिकडे आले. गोकुळामध्ये आले. तिथेही सर्व गाढ झोपलेले आहेत. नंदाच्या वाड्यामध्ये ते गेले. यशोदेच्या अंतर्गृहात ते गेले. तिलाही झोप लागलेली आहे. आणि नुकतीच जन्मलेली एक मुलगी त्या ठिकाणी पडलेली आहे. त्याचं काहीही भान यशोदेला नाहीये. आणलेला मुलगा वसुदेवाने यशोदेजवळ ठेवला आणि ती मुलगी घेऊन ते निघाले. परत त्या रस्त्याने यमुना पार करून तुरुंगात आले. पहारेकरी अजूनही झोपलेलेच होते. दरवाजेही उघडे होते. आणि देवकीच्या स्वाधीन ती मुलगी केली. इतकी व्यवस्था होऊन गेली. आठवा मुलगा जन्माला येणार हे देवकीच्या लग्नापासून कंसाला माहिती आहे. त्यावेळेपासून त्याचे प्रयत्न चालू आहेत. शेवटी मुलगा झाला, दुसरीकडे गेला. काहीही कंसाला कळलं नाही.
बहिः अन्तः पुरद्वारः सर्वाः पूर्ववदावृताः ।
10.4.1 ।। श्री. भा.
तुरुंगाचे दरवाजे पूर्वीप्रमाणे झाकले गेले. ती मुलगी रडायला लागली. पहारेकऱ्यांनी तातडीने ती बातमी कंसाला सांगितली. तो एकदम उठला आणि धावतच तिथं आला. हा माझा काळ आहे म्हणाला. पाहतो आहे, देवकीने आपल्या हृदयाजवळ त्या अपत्याला धरलं आहे.
स्नुषेयं तव कल्याण स्त्रियं मा हन्तुमर्हसि ।।
10.4.4 ।। श्री. भा.
देवकी म्हणतीये, बाबा, ही एवढी शेवटची मुलगी तरी माझ्याजवळ राहू दे. बाकीची मुलं मारलीस तू. ही तुझी सून समज. मारू नकोस.
तस्याः तद् वचनं आदाय उपगुह्य न्यवर्तत ।
10.4.5 ।। श्री. भा. (अंदाजित संदर्भ)
कंसाला ते काही खरं वाटेना. हा मुलगाच असला पाहिजे. ही काहीतरी बतावणी करून मला फसवतेय अशीच त्याची समजून आहे. त्याने त्या मुलीला हिसकावून घेतलं आणि तिला शिळेवर आपटून मारण्याकरता वरती उचललं तेव्हा त्याच्या हातातून निसटून ती मुलगी अवकाशात गेलेली आहे. देवीच्या रूपात ती प्रगट झाली. अष्टभुजा देवी आहे. भगवंताची बहीण आहे ती. दिव्य शस्त्रं धारण केलेली आहेत तिने. अनेक सिद्ध मुनी तिची स्तुती करताहेत. ती देवी कंसाला सांगतीये,
किं मया हतया मन्द जातः खलु तवांतकृत् ।
10.4.12 ।। श्री. भा.
काय कंसा, मला मारून काय करणार आहेस तू? तुला ठार मारणारा हा जन्माला आलेला आहे हे लक्षात ठेव. व्यर्थ मुलांची हत्या करू नकोस. काय मिळालं तुला मुलं मारून? देवकीला इतका त्रास दिलास, दुःख दिलंस. याप्रमाणे सांगून ती देवी आकाशमंडळात राहिलेली आहे.
देवीने मुलगा जन्माला आला ते सांगितलं पण कुठे आला ते काही सांगितलं नाही. खरं बोलायचं संदिग्ध पण ते खोटंही ठरता कामा नये. देवांची पद्धती आहे. त्या देवीचं भाषण कानावर पडल्यावर कंसाच्या मनावर परिणाम झाला. व्यर्थ म्हणाला मुलं मारली. लगेच वसुदेव देवकीच्या पायातील बेड्या काढल्या आणि त्यांच्या पायावर मस्तक ठेवलं. आकाशवाणीवर विश्वास ठेवून तुमची मुलं व्यर्थ मी मारली. देवकीला तर आठवी मुलगीच झाली. आकाशवाणीने देवांनी सांगितलं ते मी खरं समजलो. देवसुद्धा काय खोटं बोलायला लागले काय? माझ्या हातून फार मोठं पाप घडलेलं आहे. कोणत्या नरकाला मला जावं लागेल काही कल्पना नाही. पश्चाताप होऊन बोलतोय. वसुदेवाने त्याचं सांत्वन केलं. कंसा, आमचंही प्रारब्ध आहे. आम्हाला पुत्रशोक व्हायचा होता. तू फक्त निमित्त आहेस. देवकीच्याही मनातल्या राग निघून गेलेला आहे. सर्वजण आपापल्या वाड्यामध्ये निघून गेले.
सकाळ झाल्यानंतर प्रात:कालीन सभेमध्ये सर्व दैत्य जमले आणि कंसाने त्यांना रात्री घडलेली हकीकत सांगितली. तो सांगतोय माझ्या भीतीने देवांनी आपला विचार बदललेला...
दिसतोय. देवकीला आठवा मुलगा व्हायच्या ऐवजी मुलगीच झाली. अज्ञानामुळेसुद्धा अहंकार कायम राहतो. त्या मुलीने सांगितलं की माझा शत्रू जन्माला आलेला आहे. आता तो कसा सापडायचा? बाकीचे अनुयायी असुर म्हणाले, राजेसाहेब, देवांना किती प्रयत्न करायचा तो करू द्या. आम्ही असं ठरवलंय की गेल्या दहा दिवसात
जितकी मुलं जन्माला आली असतील ती सगळी मारून टाकायची. त्यात तुमचा शत्रू मारला जाईल का नाही? पण कोणत्या ठिकाणी जन्माला आलेला आहे तो मुलगा हे कसं कळणार? पण एककली विचार आहे. आम्ही मुलं मारून टाकणार आणि त्यात राजेसाहेबांचा शत्रूही मरणार. मग राजेसाहेब अमर होणार. कंसाला हे ऐकून आनंद झाला, त्याने असुरांना आज्ञा केली आणि साधुजनांना त्रास देण्यास सांगितलं.
सतां विद्वेषमाचरेत् आरात् आयुः विनश्यति ।
10.4.45 ।। श्री. भा. (अंदाजित संदर्भ)
आचार्य महाराज सांगताहेत. त्यांचा मृत्यू जवळ आल्यामुळे त्यांना अशी बुद्धी झाली.
गोकुळामध्ये सकाळ झाल्यानंतर नंदाला वार्ता समजली की यशोदेला मुलगा झाला. आनंद झाला. वेदज्ञ ब्राह्मणांना त्याने बोलावलं. स्नान करून अलंकृत झाला आणि स्वस्तिवाचन करून आपल्या मुलाचं जातकर्म त्याने केलं. देवांचं, पितरांचं अर्चनही झालेलं आहे. दोन लक्ष गाईंचं दान त्याने केलेलं आहे. किती गोधन होतं भारतवर्षामध्ये. सात पर्वतप्राय तिळाचे ढीग त्याने केले. उत्तम भरजरी वस्त्रं त्यावर टाकून त्यांचंही दान केलेलं आहे, पुत्रमंगल होण्याकरता. ब्राह्मणांनीही आशीर्वाद दिलेले आहेत. सर्वत्र ध्वज, पताका वगैरे लावलेल्या आहेत. गोकुळातल्या लोकांना आनंद झाला की आपल्या राजाला मुलगा झाला. सर्व गोपाल, गोपी हे यशोदेचा मुलगा पहाण्याकरता नंदाच्या वाड्याकडे निघाले आहेत. दही, दूध, लोणी वगैरे एकमेकांच्या अंगावर फेकताहेत. रस्त्यावर त्याचाच चिखल झालेला आहे. वैकुंठपति भूलोकावर अवतार घेऊन आल्यानंतर भगवती रमादेवी ही गोकुळामध्ये येऊन राहिलेली आहे.
तत आरभ्य नन्दस्य व्रजः सर्वसमृद्धिमान् ।
हरेर्निवासात्मगुणैः रमारक्रीडमभून्नृप ।।
10.5.18 ।। श्री. भा.
असे काही दिवस गेले. नंद कंसाचा मांडलिक राजा होता. त्याला वार्षिक कर द्यावा लागे. म्हणून काही गोपालांना गोकुळात संरक्षणासाठी ठेवून नंद मथुरेत आला. राजवाड्यामध्ये जाऊन...
नेहमीप्रमाणे खंडणी दिली. लोणी, तूप हेही दिलेलं आहे. वसुदेवाला आपला मित्र नंद आलेला आहे हे समजलं. वसुदेव त्याला भेटायला आले. दोघांची भेट झाली, आनंद झाला. वसुदेवाने सांगितलं, या वयामध्ये मुलाची आशा नव्हती. पण तुला मुलगा झाला ही चांगली गोष्ट झाली. आणि तुझी भेट झाल्यामुळे मला अतिशय आनंद झालेला आहे. प्रिय मित्रांची भेट होणं, एका जागी राहणं हे फार कठीण असतं. उद्योगाच्या निमित्ताने इकडे तिकडे जावं लागतं. तुझ्या गोकुळामध्ये सर्व स्त्री-पुरुष, गाई वगैरे सुखी आहेत ना? जनावरांना गवत वगैरे मिळतं का नाही? सर्व समृद्धी आहे ना? माझा एक मुलगा बलराम तुझ्या आश्रयाने राहतो आहे. नंद म्हणाला, वसुदेवा, तुमची सर्व मुलं कंसाने मारली. शेवटी एक मुलगी झाली ती ही आकाशात गेली. सर्व जीव हे अदृष्टाधीन आहेत. सुखदुःख हे अदृष्टाने त्यांना भोगावी लागतात. तू ही मोठा विवेकी आहेस. देवकीचंही समाधान तू कर आणि तूही स्वस्थचित्त रहा. वसुदेवाने सांगितलं नंदा, आता इथं फार काळ राहू नका. लवकरात लवकर गोकुळात पोहोच. नंदाला कळेना वसुदेव असं का म्हणाला? असं कोणतं संकट गोकुळावर येणार आहे?
त्याचवेळी इकडे गोकुळामध्ये एक विलक्षण घटना घडली.
कंसो न प्रहिता घोरा पूतना बालघातिनी ।
शिशूंश्चचार निघ्नन्ती पुरग्रामव्रजादिषु ।।
10.6.2 ।। श्री. भा.
त्या दैत्यांच्या सभेमध्ये ठरलं होतं की जन्माला आलेली सर्व मुलं मारायची. कंसानेही त्यांना अनुमती दिली. पापाचा घडा पूर्ण भरला पाहिजे. तशीच बुद्धी व्हायची आणि शेवटी नाश व्हायचा. देव काही आपल्यावर घेत नाहीत. तुमच्या पापाचं फळ तुम्हाला मिळतं. पूतना नावाची राक्षसी गावोगाव हिंडते आहे. तिने चौकशी करावी, कुठे कुठे नवीन मुलं जन्माला आलेली आहेत आणि त्यांचा नाश करावा. मुलं कशी मरायची हे कळायचं सुद्धा नाही. कारण राक्षस हे मोठे मायावी असतात. कुठलंही रूप ते घेऊ शकतात. अदृश्य रूपाने जाऊ शकतात. गोकुळामध्ये ती पूतना आली आणि यशोदेला मुलगा झाला असं तिला समजलं. भगवत्कथा श्रवण, संकीर्तन चाललेलं असताना जिथे राक्षसांचं, दुर्जनांचं काही चालत नाही तिथे प्रत्यक्ष भगवान असताना राक्षसांचं बळ काय पुरं पडणार आहे? पूतना राक्षसीने एका श्रीमंत बाईचं रूप घेतलं. यशोदेच्या वाड्यामध्ये ती आली. काही गोपी बसलेल्या आहेत. यशोदा मुलाला स्तनपान करवते आहे. ही आत आल्याबरोबर गोपींनी तिचं रूप पाहिलं. भरजरी वस्त्र आहे, दागदागिने आहेत आणि कोणी मोठ्या घरची बाई...
असावी असं वाटून तिला अगदी आदराने बसायला आसन दिलं. एकदम त्या बाईनं यशोदेच्या मांडीवरचा मुलगा आपल्या मांडीवर घेतला. दिसायला जरा चमत्कारिक दिसलं. यशोदा रागावली नाही. बाई मोठी प्रेमळ दिसतीये म्हणाली. घेऊ दे. पूतनेने आपला विषयक्त स्तन श्रीहरींच्या मुखात दिला. आल्याबरोबर तिला एकदा पाहून घेतलं देवांनी. श्रीमन्महागणाधिपतये नमः आरंभ आता हिच्यापासूनच करायचा म्हणाले. डोळे मिटून घेतले. विष शोषून घेतलं. दूध संपलं आणि रक्त शोषायला आरंभ झाला. मग मात्र ती पूतना कासावीस झाली. सोड सोड म्हणती आहे. आता कुठली सुटका. आजपर्यंत अनेक बालकांचा नाश तू केलेला आहेस. त्यापैकीच एक मला समजून तू आलीस. आता मी सोडणार नाही. तिला अत्यंत क्लेश होऊ लागले. ती रडू लागली. ओरडू लागली. तिचा तो भयंकर आवाज सगळीकडे पसरलेला आहे. आणि ती वाड्याच्या बाहेर आली आणि आपल्या मूळ रूपात येऊन गतप्राण होऊन पडलेली आहे.
पतमानोऽपि तद्देहस्त्रिगव्यूत्यन्तरद्रुमान् ।
चूर्णयामास राजेन्द्र महदासीत्तदद्भुतम् ।।
10.6.14 ।। श्री. भा.
पूतना राक्षसीचा देह केवढा होता हे आचार्य महाराज सांगताहेत. तो देह खाली पडताना बरीच झाडं मोडून पडली. सहा कोस लांब इतका तिचा देह होता. केवढं संकट आलेलं आहे गोकुळावर. त्या सर्व गोपी शोधताहेत. त्या राक्षसीच्या छातीवर तो बालक पडलेला आहे. त्याला उचलून घेऊन, घरात आणलं, गोमूत्राने स्नान घातलं. गाईच्या चरणाचे रजःकण अंगारा म्हणून त्याला लावलेले आहेत. आणि अंगन्यास, करन्यास करून कवचनपठणाला त्यांनी सुरवात केली. भगवानच संरक्षक आहेत ही भावना आहे. अदृष्ट हे कारण मानावं लागतं. पण सहकारी कारणांमध्ये जर अदृष्ट हे प्रधान कारण ठरलं तर सर्वही घटना अदृष्टाने घडतात असं लक्षात येईल. पण अदृष्टाकडे लक्षच जाईनासं झाल्यामुळे सर्व दृष्ट उपाय तेवढे फलदायी आहेत अशीच वृत्ती होते. फल मिळालं नाही तरी पुन्हा दृष्ट उपाय करायचे आणि त्यानेच फळ मिळवायचं ही बुद्धी काही शेवटपर्यंत जात नाही. अनेक ऋषिमंडळींनी गोकुळात यावं. त्यांनी कवचादिसाधनं त्यांना सांगावी आणि त्यामुळे आपलं रक्षण होतं अशी श्रद्धा लोकांची होती.
अव्यादजोऽंघ्रि मणिमांस्तव जान्वथोरू
यज्ञोऽच्युतः कटितटं जठरं हयास्यः ।
हृत् केशवस्त्वदुर ईश इनस्तु कण्ठं
विष्णुर्भुजं मुखमुरुक्रम ईश्वरः कम् ।।
10.6.22 ।। श्री. भा.
इंद्राची अनेक रूपं आहेत आणि अनेक नावं आहेत. ही सगळी या कवचाच्या रूपाने त्यांना माहिती आहे. त्या त्या रूपाला धारण करणारा त्या त्या नावाचा जो परमात्मा आहे त्याने या बालकाच्या एकेक अवयवाचं रक्षण करावं. अज परमात्म्याने याच्या चरणाचं रक्षण करावं, मणिमान जो आहे त्याने याच्या जानूचं आणि उरूचं रक्षण करावं, अच्युताने कटीचं रक्षण करावं, हयग्रीवांनी जठराचं रक्षण करावं, अशी प्रार्थना करावी. सर्व अवयवांचं रक्षण करायला औषधासारखाच हा शास्त्रीय प्रयत्न आहे.
प्राणान् नारायणोऽवतु ।।
10.6.24 ।। श्री. भा.
नारायणाने ह्याच्या प्राणांचं रक्षण करावं. जमिनीवर असताना रक्षण करावं, उचलून घेतलं असताना रक्षण करावं. खेळत असताना गोविंदाने रक्षण करावं. निजलेला असताना माधवाने रक्षण करावं, यक्ष, राक्षस, भूत, पिशाच्च ह्या सर्वांपासून आमच्या बालकाचं रक्षण परमेश्वराने करावं अशी प्रार्थना अत्यंत प्रेमाने, गोपींनी केली. यशोदेने त्याला स्तनपान केलेलं आहे आणि पाळण्यामध्ये निजवलं. तेवढ्यात नंदादिक गोपाल परत आले. आल्याबरोबर त्यांना तो सगळा प्रकार कळला. बाहेर पडलेला तो राक्षसीचा प्रचंड देह दिसला. नंद म्हणाला, वसुदेवाला हे समजलं म्हणजे मोठा योगी दिसतोय. गोपालांनी त्या राक्षसीच्या देहाचे तुकडे करून एक मोठा ढीग केला आणि त्याला अग्नी दिलेला आहे. त्याचा जो धूर निघालेला आहे त्याचा सुगंध सगळीकडे पसरलेला आहे. भगवान श्रीकृष्णांनी जिचं स्तनपान केलं त्या राक्षसीचं शरीरही पवित्र होऊन गेलेलं आहे. देवाच्या हातून मृत्यू आल्यामुळे त्या राक्षसीला सद्गती मिळालेली आहे. पुनर्जन्माला गेलीही असेल, पण चांगली बुद्धी घेऊन गेली असेल. जन्मभर चांगली बुद्धी होण्याचा प्रयत्न करावा, असं संत-महात्मे सांगतात. इथं देवाच्या स्पर्शाने तिची बुद्धी चांगली होऊन ती सद्गतीला गेली. कैवल्य देणारे श्रीहरी त्यांनी सर्व गोपींचही दुग्धपान करून त्यांना मुक्त केलेलं आहे. भगवान गोपालकृष्णांवर अत्यंत प्रेम करणारे गोकुळातले सर्व स्त्री, पुरुष यांचा अज्ञानामुळे होणारा सर्व संसार भगवंताच्या संगतीमुळे संपलेला आहे. सर्व लोकांना ही बातमी समजली पण त्या पूतना राक्षसीचा नाश कोणी केला हे काही कुणाला कळलं नाही. बालकापासून राक्षसीचा नाश झाला हे कदाचित त्या असुरांना समजलं असेल. मुलाच्या शक्तीची कल्पना नाहीये. मुलाचं स्वरूप पाहून ईश्वर भावना होऊ शकत नाही. हे मायेचं मोठं आवरण आहे.
शुक्राचार्य पुढे चरित्र सांगताहेत. मुलगा एका अंगावर वळू लागला आहे. यशोदेने जन्म नक्षत्र...
पाहिलं, सगळ्या स्त्रियांना बोलावलं आहे. ब्राह्मणांना बोलावलं. स्वस्तिवाचन केलं. तिने ब्राह्मणांना अन्न, वस्त्र, धेनू सगळी दानं केली आहेत. आलेल्या सर्व लोकांचा सत्कार करण्याकडे ती निमग्न झालेली आहे. एका गाडीला पाळणा बांधला होता. त्याच्यात मुलाला झोपवून यशोदा आपल्या कामात मग्न झाली. भगवान जागे झाले. भूक लागलेली आहे. एकदम त्यांनी लाथ मारली आणि तो गाडा उलटलेला आहे. शकटासुर म्हणून कोणी आला होता म्हणतात. यात तो उल्लेख नाही. सगळे लोक घाबरले. त्या गाड्यातली भांडीकुंडी खाली पडली. सर्व मंडळी तिथे जमा झाली. तिथे काही लहान मुलं खेळत होती. त्यांनी सांगितलं हा मुलगा रडत होता, त्याने लाथ मारली म्हणून ही गाडी पडली. हे खरं कुणाला वाटेल. लहान मुलाने लाथ मारली आणि एवढं सामान भरलेली गाडी उलटली? सांगणाराही लहान आहे त्यामुळे त्यांच्यावर विश्वास काही बसला नाही. आता सांगणारा लहान आहे का हे लहान आहेत?
अप्रमेयं बलं तस्य बालकस्य न ते विदुः ।।
10.7.10 ।। श्री. भा.
याच्या बलाची कल्पनाच येणार नाही असं ते बल आहे. म्हणून ते जाणू शकले नाहीत. पुन्हा काही गृहबाधा, पिशाच्चबाधा झाली काय असं वाटून यशोदेने ब्राह्मणांकडून त्या बालकाला मंत्राभिषेक केलेला आहे. शुद्ध ज्यांचं अंत:करण आहे. तपःतेज ज्यांचं आहे अशी शास्त्रोक्त कर्म विधिवत् करणारी ब्राह्मण मंडळी नेहमी गोकुळात यायची आणि पूजाविधी स्विकारून आशीर्वाद देऊन जायची.
एके दिवशी यशोदा मुलाला मांडीवर घेऊन बसलेली आहे. स्तनपान चाललेलं आहे. मुलाच्या मुखाकडे पहाती आहे. पुष्कळ वय झाल्यानंतर मुलगा झालेला आहे आणि तो मुलगाही पाहिल्याबरोबर अंत:करण आकर्षण करून घेणारा आहे. एकदम तिला असं वाटायला लागलं की आपण काही याला मांडीवर घेऊ शकत नाही. जड वाटायला लागला. त्याचवेळी एक दैत्य गोकुळात आलेला आहे. दैत्यांची नजर आता गोकुळाकडे वळलेली आहे. या मुलाने पूतना राक्षसीला मारलं. त्यामुळे याचा नाश करायचा असं दैत्यांनी ठरवलं. ते काही भगवंताचा द्वेष करणारे नव्हते, कारण हा भगवंत आहे हे माहिती कुठे आहे? पण हा कोणीतरी सामर्थ्यसंपन्न आहे याची जाणीव त्यांना होती. तेव्हा आपण जिवंत रहावं, सुरक्षित आपण रहावं म्हणून या मुलाला मारायचं. तृणावर्त नावाचा राक्षस हा गोकुळात वाऱ्याचं रूप घेऊन शिरलेला आहे. भयंकर सोसाट्याचा वारा सुटला, वादळ झाल्यासारखं झालं. सर्वांनी डोळे मिटून घेतले. यशोदेनेही डोळे...
मिटून घेतले. त्या मुलाला खाली ठेवलं. त्या वायुरूपी दैत्याने एकदम त्या मुलाला उचललं आणि आकाशामध्ये नेलेलं आहे. धुराळा असल्यामुळे यशोदा डोळे झाकून बसली. थोड्यावेळाने सर्व शांत झाल्यावर तिने डोळे उघडले आणि पहाती आहे तर मुलगा कुठे आहे? रडायला लागली. सर्वही गोपी धावत जवळ आल्या. त्याही रडू लागल्या. आचार्य सांगतात राजा,
तृणावर्तः शान्तरयो वात्यारूपधरो हरन् ।
कृष्णं नभोगतो गन्तुं नाशकन्नोद भूरिभारभृत् ।।
10.7.26 ।। श्री. भा.
प्रेम करणाऱ्या यशोदेला भार झाला, आणि त्या असुराला होणार नाही काय? तो तृणावर्त राक्षस जो चक्रवाकाचं रूप घेऊन आला होता त्याला काही मुलाला नेता येईना. अत्यंत जडभार त्याला झालेला आहे. इतक्यात त्याचा गळा दाबला गेला. प्राण कंठाशी आले आणि तो राक्षस गतप्राण होऊन आकाशातून जमिनीवर धाडदिशी पडलेला आहे. गोपींनी पाहिलं की तो बालक राक्षसाच्या शरीरावर खेळतो आहे. त्यांनी त्याला उचलून घेतलेला आहे. आनंदाने त्या बालकाला त्यांनी यशोदेला दिला. काय म्हणाल्या, या बालकाचा नाश करण्याकरता हे दैत्य येतात पण शेवटी त्यांचाच नाश होतो.
हिंस्रः स्वपापेन विहिंसितः खलः ।
साधुः समत्वेन भयाद् विमुच्यते ।।
10.7.31 ।। श्री. भा.
गोपींची वाणी आहे. हे जे दैत्य आहेत, त्यांच्याच पापाने, दुष्कर्मानं त्यांचा नाश होतो. खरा शुद्ध बुद्धीचा साधू जो आहे तो आपल्या आचरणाने भीतीपासून मुक्त होतो. काय आमचं तप आहे, पुण्य आहे की आमचा, मृत्यूच्या मुखात गेलेला मुलगा आम्हाला मिळालेला आहे. गोपालांनाही आनंद झाला. कोण या मुलाचं संरक्षण करतो कुणास ठाऊक? असं त्यांना वाटलं. पण हा मुलगाच स्वतःचं रक्षण करतो आणि इतरांचंही करतो याची अद्यापी जाणीव नाहीये.
एकदा यशोदेच्या मांडीवर होते भगवान. सहज जांभई आली म्हणून तोंड उघडलं त्यांनी तर यशोदेला त्या मुखाच्या आत सर्व विश्व दिसू लागलं. घाबरली ती. याच्या मुखात डोंगर आहेत. नद्या आहेत. सर्व विश्व दिसतंय. कोण आहे हा मुलगा? डोळे झाकून घेतले तिने. मुलाची शक्ती काय आहे हे जाणून घ्यायची वेळ आली होती. पण अद्यापी तिलाही ती जाणीव झालेली नाही. शुक सांगतात. राजा...