« Previous | Table of Contents | Next »
पान ३५१
गर्गः पुरोहितो राजन् यदूनां सुमहातपाः ।।
व्रजं जगाम नन्दस्य वसुदेवप्रचोदितः ।।
10.8.1 ।। श्री. भा.

मुलांची नावं अजून ठेवायची होती. वसुदेवाने यादवांचे पुरोहित गर्गाचार्यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं, ही दोन मुलं आहेत. आपल्याला सर्व माहिती आहेच. आपण गोकुळात जाऊन त्यांचा नामकरण संस्कार करा. त्याप्रमाणे गर्गाचार्य गोकुळात आले. नंदाने त्यांचं स्वागत केलं. ईश्वरबुद्धीने त्यांची पूजा केली. त्यांना प्रणाम केला. नंदाने विचारलं महाराज, आपण ज्योतिषशास्त्रवेत्ते आहात, सर्व जीवांचं जातक आपल्याला कळतं. माझी एक प्रार्थना आहे की आपल्या हातून या मुलांचा नामकरण संस्कार व्हावा. गर्गाचार्य म्हणाले, मी यादवांचा पुरोहित म्हणून प्रसिद्ध आहे. तुझ्या मुलांचा नामकरण संस्कार मी केला आणि हे जर कंसाला कळलं तर त्याला संशय येईल की ही मुलं तुझी नसून ती वसुदेवाची आहेत. आणि त्यामुळे या मुलांच्या जीवालाही धोका निर्माण होईल. वसुदेवाचा आठवा मुलगा हा मुलगी असणं कधीही शक्य नाही हे कंसाच्या मनात आहे. वसुदेवाने त्या मुलाला कुठेतरी लपवून ठेवलेलं आहे असं त्याला वाटतंय म्हणून तो सारखा त्याच्या शोधात आहे. नंद म्हणाला, एवढीच अडचण आहे ना महाराज? मग कुठेतरी एकांतात, डोंगराच्या गुहेमध्ये जाऊन हा संस्कार करू. कुणालाही बोलवायचं नाही, सांगायचं नाही. यशोदा फक्त बरोबर राहील. पुण्याहवाचनाला ती लागेलच. त्याप्रमाणे त्या मुलांचा नामकरण संस्कार गर्गाचार्यांनी गुप्तरीतीने केलेला आहे. त्यांनी सांगितलं, हा रोहिणीचा मुलगा सर्वांना आनंद देणारा. म्हणून याला "राम' म्हणतील. अत्यंत बलशाली म्हणून बल म्हणतील. सर्व यादवांची एकी राखणारा आकर्षण करणारा, म्हणून संकर्षण त्याला म्हणतील. हा दुसरा मुलगा प्रत्येक युगामध्ये भिन्न भिन्न रूपाचा, आत्ता कृष्णवर्णाचा झाल्यामुळे "कृष्ण' असं याचं नांव होईल.

प्रागयं वसुदेवस्य क्वचिज्जातस्तवात्मजः ।।
वासुदेव इति श्रीमान् अभिज्ञाः सम्प्रचक्षते ।।
10.8.14 ।। श्री. भा.

गर्गाचार्य सांगताहेत, पण नंदाच्या लक्षात येत नाहीये. हा एकदा वसुदेवाचा मुलगा म्हणून झालेला आहे. म्हणून वासुदेव असं याचं नाव ठेवतो. याची म्हणाले पुष्कळ नावं आहेत. अनेक रूपं आहेत. ती सर्वांना कळणं शक्य नाही. तुमच्या सर्वांचं, गोकुळाचं संरक्षण करण्यास हा समर्थ आहे. तुम्ही याच्या कृपेने सर्व संकटातून तरून जाल. अनेक राजे लोकांचं, साधूंचं रक्षण याने पूर्वी केलेलं आहे. याच्यावर प्रेम करणारे जे आहेत त्यांना कोणत्याही शत्रूची भीती बाळगण्याचं कारण...

***
पान ३५२

...नाही. हा तुझा मुलगा साक्षात नारायणाप्रमाणे आहे. असं सांगून गर्गाचार्य निघून गेले. नंदालाही आनंद झालेला आहे.

थोड्याच काळात राम-कृष्ण रांगू लागले, चालू लागले. आणि मग घरामध्ये काही त्यांचा पाय ठरेना. या गोपीच्या घरी जा, कधी त्या गोपीच्या घरी जा. जाताना आपली मित्रमंडळी बरोबर घेऊन जावी. त्या ठिकाणी जे काही दूध, दही, लोणी मिळेल ते सर्व मुलांना वाटून द्यायचं असा कार्यक्रम चाललेला आहे. शिल्लक काही ठेवायचं नाही. बाकीचं सर्व जमिनीवर ओतून द्यायचं. राजपुत्र आहेत हे. यांना कोण बोलणार? गोपींना जरी त्रास झाला तरी प्रथम त्यांना बोलता येईना. पण हे प्रकार जेव्हा वाढत चालले तेव्हा त्या गोपींनी एकदा हा प्रकार यशोदेच्या कानावर घालायचा ठरवलं आणि दुपारी एकदा त्या वाड्यामध्ये आल्या. त्या गोपी राम-कृष्णांची गाऱ्हाणी सांगताहेत.

वत्सान् मुञ्चन् क्वचिदसमये क्रोशसंजातहासः ।।
स्तेयं स्वाद्वत्त्यथ दधि पयः कल्पितैः स्तेययोगैः ।।
मर्कान् भोक्ष्यन् विभजति स चेन्नात्ति भाण्डं भिनत्ति ।।
द्रव्यालाभे स गृहकुपितो यात्युपक्रोश्य तोकान् ।।
10.8.29 ।। श्री. भा.

बाई यशोदे, हा मुलगा इतका आम्हाला त्रास देतो आहे. आजपर्यंत सहन केलं. एकदम घरात येतो. सगळी वासरं सोडून देतो. ती वासरं लगेच गाईचं दूध प्यायला जातात. आम्ही घरातून बाहेर वासरं बांधायला बाहेर पडलो की यांची टोळी आत शिरते आणि सगळं दूध, दही, लोणी सर्वांना वाटून टाकतो. कुणी म्हणाले आमचं पोट भरलंय की हा सगळी मडकी फोडून टाकतो आणि सगळं ते जमिनीवर सांडून टाकतो. एखाद्यावेळी आम्ही शिंक्यावर दही दूध ठेवावं तेंव्हा हा पाळण्यातल्या मुलाला चिमटा काढतो त्याला रडवतो आणि वर आम्हालाच ताकीद देतो की आज रात्री तुमचं घर राहतं का बघा. मूत्र विसर्जन करतात. हा तुझा मुलगा त्यांचा पुढारी आहे आणि असं तो करतो. याला तू शिक्षा कर, सांग त्याला. पण भगवंतांची लीला अशी आहे की बाहेर सगळ्या गोपींच्या घरात जाऊन धुडगूस घालावा पण घरात एकदासुद्धा कुठल्या वस्तूला हात लावायचा नाही. घरात केवढी समृद्धी आहे. सगळ्या सवंगड्यांना पोटभर जरी खायला घातलं असतं तरी ती यशोदा काही रागावली नसती. पण घरामध्ये एकदम चिडीचूप. यशोदा म्हणाली, माझा मुलगा असा नाही बायांनो, काय सांगता तुम्ही?

न ह्युपालब्धुमैच्छत् ।।
10.8.31 ।। श्री. भा.
***
पान ३५३

त्याला काहीतरी शिक्षा करावी अशी तिला इच्छा नाहीये. त्याला काहीतरी सांगून गोपींना समजावून तिने पाठवून दिलं. परंतु एकदा प्रसंग आलेला आहे.

एकदा क्रीडमानास्ते रामाद्या गोपदारकाः ।।
कृष्णो मृदं भक्षितवान् इति मात्रे न्यवेदयन् ।।
10.8.32 ।। श्री. भा.

काय व्यास महर्षींची प्रतिभा आहे! अगदी बारीक सारीक लीलास सुद्धा त्यांनी वर्णन करून ठेवल्यात. आणि शुकाचार्य त्या आनंदाने सांगताहेत. खेळण्याकरता मुलं एकदा बाहेर गेलेली असताना धावत धावत यशोदेकडे आली आणि सांगताहेत, माई, आज कृष्णाने माती खाल्ली आहे. तुम्ही काहीतरी सांगा. आली यशोदा कृष्णाजवळ, त्याचा हात धरला. बाळकृष्ण भीतीग्रस्त झाले, काय आता आई काय करते आपल्याला या भीतीने डोळे भरून आले.

कस्मान् मृदमदान्तात्मन् भवान् भक्षितवान् रहः ।।
10.8.34 ।। श्री. भा.

का रे, "आज आणखी एका बाजूला जाऊन तू माती का खाल्लीस? ही सगळी तुझी मित्र मंडळी, हा तुझा ज्येष्ठ बंधू सांगताहेत की तू माती खाल्ली आहेस. बाळकृष्ण म्हणाले, आई मी माती खाल्ली नाही. हे सगळेही खोटं बोलताहेत. यशोदा म्हणाली, बरं, खरं बोलतोयस तू. मग मला तोंड उघडून दाखव. कृष्ण म्हणाले, पहा मी तोंड उघडतो. तोंड उघडल्याबरोबर त्या मुखामध्ये यशोदेला सर्व विश्व दिसायला लागलं. माती खायला कशाला पाहिजे. आतच सगळं आहे की. म्हणजे गोपाळकृष्ण खोटे बोलले नाहीत. सूर्य, चंद्र, नद्या, समुद्र, पर्वत सगळं त्या मुखामध्ये दिसतंय. संपूर्ण विश्व त्या मुलाच्या शरीरामध्ये अंतर्गत आहे. ती विचार करतेय, कोण आहे हा मुलगा? मी स्वप्न पाहतेय का देवाची माया आहे? अथवा माझ्या बुद्धीला भ्रम झालेला आहे? हे असं काय दिसतंय? अथवा या माझ्या बालकाचंच सामर्थ्य आहे.

अर्भकस्य यः कश्चनौत्पत्तिक आत्मयोगः ।।
10.8.40 ।। श्री. भा.

काही तिला कळेना. आणि परमेश्वराचं चिंतन ती करतेय. ज्या परमेश्वराच्या मायामोहामध्ये मी सापडलेली आहे. त्या परमेश्वरानेच माझा मोह दूर करावा. यशोदा तत्त्वविचार करू लागली. मुलगा, पती वगैरे कोणाकडेही लक्ष नाही. भगवान विचार करताहेत, ही जर तत्त्वविचार करू लागली तर माझं संरक्षण कोण करणार? मी हिच्याकरता तर इथे आलो. मी बालक आहे हाच विचार हिच्या मनामध्ये राहिला पाहिजे. असा विचार करून भगवंताने आपल्या मायेचा पडदा तिच्यावर टाकला. तिच्या मनात पुत्रस्नेह उत्पन्न झाला. विश्वरूप दर्शनामुळे उत्पन्न झालेलं आश्चर्य,

***
पान ३५४

आश्चर्यामुळे उत्पन्न झालेलं तत्त्वज्ञान, हे सगळंही नाहीसं झालं.

साऽऽरोप्याङ्कमत्मजम् ।।
10.8.44 ।। श्री. भा.

मुलाला मांडीवर घेतलं आणि स्तनपान चाललेलं आहे. आचार्य सांगतात राजा,

त्रय्या चोपनिषद्भिस्च सांख्ययोगैश्च सात्वतैः ।।
उपगीयमानमाहात्म्यं हरिं सा अमन्यतात्मजम् ।।
10.8.45 ।। श्री. भा.

हा आपला मुलगा आहे. बाळकृष्ण आहे. बाळकृष्णाचीच उपासना ती करते आहे. नंतर गोपाळकृष्ण झालेले आहेत. सर्व वेद, उपनिषद, सांख्ययोग वगैरे आणि ज्ञानी भक्त हे ज्या परमेश्वराचे गुणवर्णन करताहेत तो एवढा श्रेष्ठ, सर्वशक्तिसंपन्न हरी. त्याला आपला मुलगा समजतेय. राजाने विचारलं, महाराज. नंद यशोदेचं काय पुण्य आहे, सगळ्या बाललीला श्रीकृष्णांनी त्यांच्या जवळ राहून केल्या आहेत. शुक सांगतात, अष्टवसूनपैकी द्रोण नावाचा वसू, आणि धरा ही त्याची स्त्री. दोघेही अत्यंत धर्मशील होते. त्यांनी ब्रह्मदेवांची उपासना केली आणि श्रीहरींची भक्ती आणि प्रेम प्राप्त व्हावी असा वर मागून घेतला. तो द्रोण वसू, नंद नावाने जन्माला आलेला आहे आणि त्याची स्त्री यशोदा झालेली आहे. त्यामुळे भगवान पुत्ररूपाने आले आणि त्या पुत्राबद्दल त्यांच्या अंतःकरणामध्ये भक्ती, प्रेम निर्माण झालं. सर्व गोपगोपींनाही प्रेमभावना झाली. ब्रह्मदेवाचा वर खरा करण्याकरता भगवान गोकुळामध्ये जाऊन राहिले. नंदाने वर मागितल्यामुळे असेल, त्या ठिकाणी गेले गोपाळकृष्ण. वस्तुतः खऱ्या भक्ताजवळ देव आपणहून जातात पण आम्हाला सामान्यतः देवाजवळ जायचा प्रयत्न करावा लागतो. पण इथे गोकुळात जन्माला आलेले जे भक्त त्यांच्याजवळ भगवान गेलेले आहेत.

एकदा गृहदासीषु यशोदा नन्दगेहिनी ।।
कर्मान्तरनियुक्तासु निर्ममन्थ स्वयं दधि ।।
10.9.1 ।। श्री. भा.

यशोदेच्या वाड्यामध्ये पुष्कळ नोकर चाकर होते. एके दिवशी दासींना काही काम होतं. दही घुसळण्याचं काम राहिलं होतं. स्वतः यशोदा उठली, पदर बांधला आणि दही घुसळण्याचं काम तिने सुरू केलं. बाळकृष्णाचं चरित्र तर तिच्या साक्षीनेच घडत होतं. अद्याप त्यांच्या सामर्थ्याची जाणीव झाली नव्हती. किंवा भगवंताने ती जाणीव होऊ दिली नाही. आईचं शुद्ध अंतःकरण आहे आणि दही घुसळताना प्रेमाने त्या चरित्राचं गायन चाललेलं आहे. भरजरी वस्त्र नेसलेलं आहे, दही घुसळताना कानातली कुंडलं हलताहेत. मुखावर घाम आलेला आहे. इतक्यात गोपाळकृष्ण...

***
पान ३५५

...बाहेरून धावत धावत आले आणि त्यांनी ती रवी दोन्ही हातांनी घट्ट धरून ठेवली. काम बंद झालं. तिच्या लक्षात आलं याला भूक लागलेली आहे. तिने मांडीवर घेतलं आणि भगवान स्तनपान करू लागले. अत्यंत आनंदाने आपल्या मुलाच्या मुखाकडे पाहतीये.

।। गृहरत्नानि बालकाः ।।
(अभिज्ञान शाकुंतल)

यशोदा अत्यंत भाग्य संपन्न आहे. इतक्यात आतल्या बाजूला चुलीवर ठेवलेलं दूध उतू गेलं. दुधातूपामध्ये लक्ष असतं म्हणतात बायकांचं आणि असलं पाहिजे. पुरुषांना सवड कुठेय? ते दूध उतू जाऊ लागल्यावर यशोदेने गोपाळकृष्णांना तसंच खाली ठेवलं आणि आत गेली. देवाला राग आलेला आहे. या बाईकरता मी वैकुंठातून इथे आलो, आणि हिचं मात्र माझ्यापेक्षा दुधाकडे लक्ष आहे. आणि काय कमी आहे का म्हणाले, गेलं असतं थोडं दूध वाया. त्यांनी ठरवलं आज या घरातही काही ठेवायचं नाही. जे भगवान पुत्रस्नेह उत्पन्न करतात, ते भगवान आता संसाराचा विध्वंस करायला निघालेत. संसारातून हिचं मन बाजूला काढायचं आहे. गोपी गाऱ्हाणी करायच्या पण गोपींना कळलं नाही हे. गोपाळकृष्ण काय दही-दूध चोरी करायला जात होते काय? का घरामध्ये त्यांना काही कमी होतं? संसारामध्येच गुंतलेल्या गोपींना बाहेर काढायचंय ना भगवंतांना! मी इथे आलेलो आहे आणि तरी तुम्ही संसारामध्येच गुंतून राहताय? एक मोठा दगड आणला बाहेरून, आणि त्या दह्याच्या गाडग्यावर मारला. तो फुटून गेलेला आहे. सगळं दही सांडलेलं आहे. बाहेर जाऊन आपल्या सवंगड्यांना बोलावलं, दुसऱ्या दाराने आत जाऊन शिंक्यावर जे काही दूध, दही, लोणी ठेवलं होतं ते वाटायचं काम चाललेलं आहे. पुरे म्हणाले की ते मडकं फेकून द्यावं, सगळं सांडून द्यावं. यशोदा बाहेर आली आणि पाहतीये ते मडकं फुटून गेलेलं आहे. हसली ती, या मुलाचंच काम आहे हे तिने ओळखलं. शोध करायला ती निघाली. ते चोरीचं काम चाललेलं आहे. शिंक्यावरचे लोणी हाताने घेताहेत, मुलांना वाटताहेत, इकडे तिकडे पाहताहेत आई आली काय? यशोदा हातात काठी घेऊनच आली. एकदम गोपाळकृष्णांनी खाली उडी मारली आणि पळत सुटले. यशोदाही त्यांच्या पाठीमागे धावतीये पण सापडणार कसे?

ज्यांनी आपलं मन इतकं समर्थ केलेलं आहे की त्रैलोक्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी तत्काळ जे मनाने समजून घेऊ शकतात. ते योग्याचं मनही भगवंतांपर्यंत पोहोचू शकत नाही. जाणू शकत नाही. त्या भगवंताला ही यशोदा धरणार कशी? गोपाळकृष्णांनी सापडल्यासारखं करावं, एकदम झोकांडी देऊन पळून जावं. ती यशोदा दमली. शेवटी भगवंताला दया आली. धर म्हणाले बाई,

***
पान ३५६
***
पान ३५७

काय करायचं ते कर. डोळ्यातून असू चाललेले आहेत.

कृतागसं तं प्ररुदन्तमक्षिणी कषन्तमञ्जनमषिणी स्वपाणिना ।।
उद्वीक्षमाणं भयविह्वलेक्षणं हस्ते गृहीत्वा भिषयन्त्यवागुरत् ।।
10.9.11 ।। श्री. भा.

मायेचा हा मोह आपल्यालाही झालेला आहे असं दाखवताहेत भगवान. काठी घेऊन आई आलेली आहे, त्यामुळे आईची भीती वाटते आहे. आणि आपण अपराध केलेला आहे. सगळी गाडगी मडकी फोडून टाकली. रडायला लागले भगवान. डोळे पुसताहेत. डोळ्यातलं काजळ सगळं आसवांमुळे गालावर ओघळलेलं आहे. यशोदेने त्याला धरलं आणि घाबरलेला आहे असं पाहून काठी टाकून दिली. आणि त्याला बांधून ठेवायचं ठरवलं. एक मोठं उखळ होतं. त्या उखळाला दावं बांधलं आणि दुसरी बाजू ती गोपाळकृष्णाच्या कमरेला बांधू लागली. आचार्य सांगतात राजा,

तद्दाम बध्यमानस्य स्वार्भकस्य कृतागसः ।।
द्व्यंगुलोनमभूत्तेन सन्दधेऽन्यच्च गोपिका ।।
10.9.15 ।। श्री. भा.

कमरेला बांधलेलं दावं दोन बोटं कमी पडलेलं आहे. बांधता येईना. दासीकडून दुसरं दावं आणलं. आता हे पुरायला पाहिजे की नाही? आधीचं दोन अंगुलच कमी पडत होतं!

तदपि द्व्यंगुलं न्यूनं यदादत्त बन्धनम् ।।
10.9.16 ।। श्री. भा.

तेही दोन बोटं कमी पडायला लागलं. बांधता येईना. मारायचं नाही असं यशोदेने ठरवलेलं आहे. दया दाखवलेली आहे. पण काहीही शासन करायचं नाही, ही दया नाहीये. पण बांधून ठेवायचं हा हट्ट आहे. बाळकृष्ण आहे म्हणून प्रेमही आहे. दासी सारख्या दाव्या आणून देताहेत, एकमेकाला जोडताहेत पण पुरतच नाहीये. सगळ्या गोपीही तिथे जमलेल्या होत्या. त्या मोठ्या आश्चर्यचकीत झाल्या. दमली यशोदा. घाम आलेला आहे. तेव्हा भगवान कृष्णांनी स्वतःला बांधून घेतलं. आचार्य सांगतात राजा, जो परमात्मा सर्वव्यापी आहे. आत, बाहेर जो सर्वत्र आहे, त्याला गोपी बांधायचं म्हणतात ते कसं शक्य आहे? दृश्यरूप वेगळे आहे. पण त्या दृश्य रूपाच्या ठिकाणीही हा चमत्कार दिसतो आहे की ते सुद्धा बांधता येणार नाही. हे जे चरित्र भगवंताने दाखवलं आहे, शुक सांगताहेत,

एवं सन्दर्शिता ह्यंग हरिणा भृत्यवश्यता ।।
***
पान ३५८
स्ववशेनापि कृष्णेन यस्येदं सेश्वरं वशे ।।
10.9.19 ।। श्री. भा.

काय भगवंताची शक्ती आहे! परमात्मा स्वतंत्र आहे. परंतु आपल्या भक्ताच्या प्रेमाखातर तो भक्ताच्या अधीन आहे. हे दाखवलं गोपाळकृष्णांनी. काय प्रसाद झालेला आहे यशोदेवर आणि गोपींवर! ब्रह्मदेवांना मिळाला नाही. शंकरांना मिळाला नाही. लक्ष्मी देवीला मिळाला नाही. सर्वांना मुक्तीदान करणारा परमात्मा स्वतः बंधनात पडलेला आहे. भक्ताची इच्छा आहे. यशोदेने बांधून टाकलं आणि आतमध्ये निघून गेली. ते उखळ ओढत ओढत गोपाळकृष्ण निघालेले आहेत. कुबेराची दोन मुलं नारदांचा शाप झाल्यामुळे वृक्ष झाले होते. त्यांचा उद्धार करायचा होता. नंदाच्या वाड्याच्या बाहेर ते दोन अर्जुनवृक्ष होते. ते दोन्ही वृक्ष एकमेकांच्या जवळजवळ वाढले होते. त्या कुबेर पुत्रांचा वृत्तांत सांगताहेत आचार्यमहाराज. कुबेर आणि त्याचे पुत्र हे भगवान शंकराचे सेवक आहेत. कैलास पर्वतावर उपवनामध्ये कुबेरपुत्रांचं स्नान चाललेलं आहे. मद्यपान केलेलं आहे आणि सर्व स्त्रिया त्याठिकाणी जलक्रीडेला आलेल्या आहेत. ती जलक्रीडा चाललेली असताना नारद महर्षी तिकडून जात होते. त्यांना पाहिल्यावर त्या स्त्रिया सर्व लज्जित झाल्या. वस्त्रं नेसून नमस्कार करून उभ्या राहिल्या. परंतु ते दोघेही कुबेर पुत्र मदधुंद होऊन अतिशय उन्मत्त झालेले तसेच जलक्रीडा करत राहिलेले आहेत. नारदांनी विचार केला, यांना शासन केलं पाहिजे. हे फारच उन्मत्त झालेले आहेत. सामान्य जीवांना पुण्यक्षय झाल्यानंतर पुन्हा जन्माला यावं लागतं. परंतु नारदांसारखे महात्मे दुराचारी लोकांना त्यांच्या पुण्याचा उपभोग घेत असतांना सुद्धा शासन करू शकतात.

क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति ।।

पुण्य संपल्यावरच मर्त्यलोकात येणं असं कशाला पाहिजे. आत्ताच शासन झालं पाहिजे. शासन म्हणजे यांची सर्व संपत्ती, ऐश्वर्य नाहीसं झालं पाहिजे. म्हणजे यांचे डोळे उघडतील. नारद म्हणताहेत, तुमच्या अंगावर वस्त्रही नाही ह्याचं भान, तुम्हाला नाहीये. लोकपाल कुबेराचे पुत्र तुम्ही म्हणवता आणि निर्लज्जपणे जलक्रीडा करत बसता. तुम्ही वृक्ष जन्माला जा. अत्यंत पराधीन स्थितीत रहा. असा शाप नारदांनी दिला. शंभर वर्षांनंतर भगवान श्रीहरींच्या कृपेने तुम्ही मुक्त व्हाल हेही सांगून ठेवलं. नारद महर्षींची ती वाणी सिद्ध करण्याकरता भगवान श्रीकृष्ण ते उखळ ओढीत चाललेले आहेत. त्या वृक्षांच्या मधून ते पुढे गेले. दोन्ही झाडं जवळ जवळ असल्यामुळे ते उखळ अडकलं. थोडासा धक्का दिल्याबरोबर ती दोन्ही झाडं उन्मळून पडली. मोठा आवाज झाल्याबरोबर...

***
पान ३५९

...नंदादिक गोपाळ धावून आले. कृष्णाची मित्रमंडळी होती तिथे. त्यांनी सांगितलं, कृष्ण उखळ घेऊन आला, ते उखळ दोन झाडांमध्ये अडकल्याबरोबर त्याने थोडासा धक्का दिल्याबरोबर ही झाडे पडली. बालकांनी सांगितलं, पुन्हा विश्वास बसला नाही. त्याचवेळेला ते कुबेरपुत्र नलकूबर आणि मणिग्रीव यांना पूर्वीची शरीरं प्राप्त झाली. त्यांनी भगवान श्रीकृष्णांची स्तुती केली. आमच्या काया, वाचा, मनाने निरंतर आपली सेवा घडावी. म्हणजे आम्हाला असा मद होणार नाही. अशी प्रार्थना करून आकाशमार्गाने ते निघून गेले. गोपाळांना ते दिसले असतील, काय बोलले ते कळलं नसेल. पण मुलांच्या बोलण्यावर मात्र विश्वास नाही. ह्या लहान कृष्णाने ही झाडं पाडली? कसं शक्य आहे? त्या मुलांच्या मनामध्ये मात्र संशय नाही. आणि गोपाळांनी जरी प्रत्यक्ष पाहिलं असतं तरी हे सामर्थ्य या मुलाचं आहे हे पटावे कसे? हा ईश्वर नाहीये. आमच्यापेक्षा लहान मुलगा आहे हीच भावना आहे. नंदाने कृष्णांना उखळापासून सोडवून कडेवर घेतलं आणि वाड्यामध्ये आलेले आहेत.

गोकुळात उपनंद नावाचा एक वृद्ध गोप होता. त्याने सांगितलं की, आपण हे स्थान सोडून दुसरीकडे राहायला जाऊ या. या लहान बालकावर सारखी संकटं येताहेत. प्रत्येकवेळी देवाने याचं रक्षण केलं. पण आणखी काही संकटं येण्याच्या आधी आपण इथून दुसरीकडे जाऊ. इथून वृंदावन जवळ आहे. सर्वांना आनंददायक आहे. पाणी आहे चांगलं. मुलांना खेळायला चांगलं वाळवंट आहे. सर्वांना हा सल्ला पटला. पहिल्यांदा गाईंना पाठवून दिलं पाठीमागून गाड्या जुंपून सर्व मंडळी त्या वृंदावनात आलेली आहेत. सर्वांना ते स्थान पाहून मोठं समाधान झालेलं आहे. राम-कृष्णांनी रोज वासरांना घेऊन, आपल्या सवंगड्यांसह यमुनातीरावर जावं. असेच एकदा ते निघालेले असताना, त्यांच्या वासरांत एक दैत्य वासराचं रूप घेऊन शिरलेला आहे. भगवंतांनी रामाला दाखवलं. त्याच्यापाठीमागे गेले. एकदम त्याचे पाय धरून त्याला उचललं आणि खाली आपटलं. अशा रितीने त्या दैत्याचा नाश झालेला आहे.

नदीतीरावर आले. नदीपर्यंत यायचं. वासरांना पाणी पाजायचं, बरोबर दिलेली शिदोरी खायची आणि परत जायचं. लहान वय होतं अजून. नदीतीरावर ते आले असताना बक नावाचा असुर एका मोठ्या बगळ्याचं रूप घेऊन आलेला आहे. त्याने एकदम कृष्णांना आपल्या चोचीमध्ये पकडून गिळून टाकलं. सगळी मित्रमंडळी अत्यंत दुःखी झाली. काय करावं असं ती विचार करू लागली. रामही पाहताहेत. इतक्यात त्या बगळ्याच्या कंठात दाह होऊ लागला. त्याने आपल्या...

***
पान ३६०

...तोंडातून कृष्णांना बाहेर टाकून दिलं आणि चोचीनेच टोचून मारण्याकरता तो आला. तेव्हा त्या चोचीला धरलं कृष्णांनी आणि त्याचं शरीर फाडून टाकलेलं आहे. त्याचा नाश झालेला आहे. सर्व गोपाळ मित्रांना अतिशय आश्चर्य वाटलेलं आहे. किती म्हणाले, याच्या नाशाकरता दैत्य येतात आणि मरून जातात.

एके दिवशी भगवान लवकर उठले. आपल्या मित्रांनाही उठविलं. वासरं बरोबर घेतली. हजारो वासरं आहेत. सगळी वासरं बाहेर काढली आणि त्यांना घेऊन निघाले. चालता चालता मित्रमंडळी थोडी दूर गेली. गोपाळकृष्ण पाठीमागे राहिले. त्यावेळी तिथे अघासुर राक्षस आलेला आहे. बकासुर आणि पूतनेचा भाऊ. त्याने सूड घेण्याकरता कृष्ण आणि गोपालांना आज मारायचं ठरवलं. म्हणून तो एका मोठ्या अजगराचं रूप घेऊन रस्त्यात बसला. एक ओठ खाली आणि दुसरा ओठ मेघमंडळापर्यंत असं अजस्त्र रूप त्याने घेतलं. मोठी जीभ रस्त्यासारखी पसरलेली आहे. गोपाळमंडळी पुढे आलेली आहेत. गोपाळकृष्ण अजूनही पाठीमागेच आहेत. ते गोपाळ त्या अजगरमुखाच्या समोर येऊन उभी राहिली आणि बोलू लागली, आपण इकडे आजपर्यंत कधी आलो नव्हतो. गोवर्धन पर्वताची ही एखादी गुहाच दिसते आहे. हा रस्ताही दिसतो आहे. जणू काही एखाद्या अजगराने तोंड उघडून ठेवलं आहे असंच दिसतं आहे. चला आपण आत जाऊन बघू या. सगळे निघाले. गोपाळकृष्ण मागून ओरडताहेत, अरे थांबा, जाऊ नका. पण हे कुठले ऐकायला. सगळे गेले आत. अघासुराने अद्याप आपलं मुख झाकलेलं नव्हतं. मुलं आणि वासरं आत गेली तरी, कृष्णांनी मुखात प्रवेश केला की मुख झाकायचं त्याने ठरवलं होतं. श्रीकृष्णांनीही विचार करून त्याच्या मुखात प्रवेश केला. सर्व दैत्यांना आनंद झाला, आपला शत्रू आता मेला म्हणाले. देवांना अत्यंत दुःख झालेलं आहे. तो अघासुर आपलं मुख हळूहळू मिटू लागला आणि कृष्ण आपलं शरीर हळू हळू वाढवू लागले. ते शरीर इतकं मोठं झालं की, त्या असुराला तोंड मिटता येईना. प्राणवायू कोंडला गेला आणि थोड्याच वेळात त्याचे प्राणोत्क्रमण झालेलं आहे. ती सगळी मुलं, वासरं, त्या असुराच्या विषारी श्वासोच्छवासाने मरून पडली होती. त्यांना जिवंत करून बाहेर घेऊन आले गोपाळकृष्ण. अघासुराच्या शरीरातून तेज बाहेर पडलं आणि कृष्ण शरीरात प्रविष्ट झालं.

ती मुलं, वासरं नंतर नदीतीरावर गेली आणि एक वर्षानंतर घरी येऊन त्यांनी सांगितलं की आज कृष्णांनी एक असुर मारला. परीक्षित राजा विचारतोय, महाराज, एक वर्षानंतर घरी आले? तोपर्यंत होती कुठे? भगवंताच्या त्या दिव्य लीलेची आठवण झाली शुकाचार्यांना. आणि कंठ...

« Previous | Table of Contents | Next »