दाटून आला. थोडा वेळ स्तब्ध बसले आणि त्यांनी ते चरित्र सांगायला आरंभ केला. अघासुराच्या मुखातून भगवंताने आपल्या सवंगड्यांना, वासरांना सुरक्षित आणलं आणि सर्व मंडळी नदीतीरावर आलेली आहेत. भगवान म्हणाले, मित्रहो, वासरांना पाणी प्यायला जाऊ दे. तुम्हालाही भूक लागली असेल. शिदोऱ्या सोडा आता जेवण करू या. भगवान कृष्ण बसलेले आहेत. सभोवती सर्व गोपाल बसलेले आहेत. आणि त्यांनी आपल्या मातांनी दिलेल्या शिदोऱ्या सोडल्या. प्रत्येक गोपालाने एकेक घास श्रीकृष्णांना द्यावा. असं ते, प्रेमाचं भोजन भगवान करताहेत. विनोद करताहेत. हसवताहेत. सर्व गोपाल अतिशय आनंदात आहेत. त्यांचं जेवण चाललेलं असताना ती वासरं बरीच दूर गेली. डोंगरामध्ये कुठे गेली काही पत्ता लागला नाही. ती मुलं घाबरली. देवाने सांगितलं, तुम्ही सावकाश जेवण करा. मी बघून येतो. म्हणून भगवान निघाले.
त्यावेळी असं झालं, अघासुराचा नाश झाल्यावर सर्व देवांनी मोठा आनंदोत्सव केला. मोठमोठ्याने वाद्यं वाजवली. त्याचा आवाज ब्रह्मलोकापर्यंत गेला. ब्रह्मदेव विचार करताहेत, हा कोण गोपकुमार आहे? याने एका असुराला मारलं म्हणून देवांनी जयजयकार केला. काय याचं सामर्थ्य आहे पाहू या. अहंकार आहे. ब्रह्मदेवांनी ती वासरं आणि गोपालमंडळींना ब्रह्मलोकात नेऊन ठेवलं. सर्वजण गाढ झोपेत आहेत. भगवंत पाहताहेत, वासरंही नाहीत आणि गोपालही नाहीत. नंतर लक्षात आलं, की हे ब्रह्मदेवांचं काम आहे. आता वृंदावनात घरी जायचं कसं? एकही गोपाल नाही आणि एकही वासरू नाही. सगळ्या गोपी विचारणार, आमची मुलं कुठे आहेत? गाईंनाही दुःख होणार वासरं न दिसल्यामुळे! मग भगवंतानेच सर्वांची रूपं धारण केली. सर्व गोपालरूप ते झाले. सर्व वत्सरूप ते झाले आणि त्या सर्वांसह ते वृंदावनात परतले. आपापल्या घरी जाऊन, त्या गोपालांनी आपली वासरं बांधली. आपल्या मातांना ते भेटले त्यांना आनंद झाला. गाईंनाही वासरं भेटल्याचा आनंद झाला. कोणालाही काहीही लक्षात आलेलं नाही. असा काल चाललेला आहे. रोज ती वासरं बाहेर काढायची नदीतीरावर जायचं, संध्याकाळी परत यायचं.
असा एक वर्षाचा काल गेलेला आहे. कुणालाही माहिती नाही. वेगवेगळ्या रूपात भगवान राहताहेत. एके दिवशी ते नित्याप्रमाणे नदीतीरावर बसलेले असताना ब्रह्मदेव पहायला आले. ब्रह्मदेव पाहताहेत, ती वासरंही आहेत आणि ते गोपालही आहेत! ते विचार करताहेत, मी या सगळ्यांना ब्रह्मलोकात नेऊन ठेवलेलं आहे. ते सर्व योगनिद्रेत आहेत. मग हे कोण आहेत? आपण नेलेले गोपाल आणि वासरं खरी का ही खरी? आपल्या मायेने श्रीकृष्णांना मोहात टाकायचा प्रयत्न करणारे ब्रह्मदेव हे स्वतःच मोहात पडले. इतक्यात दृश्य बदललं. सर्व वासरं, गोपाल हे शंख,
चक्र, गदा, पद्मधारी विष्णुरूप आहेत! पुन्हा पाहताहेत ब्रह्मदेव तर एक वर्षापूर्वीचं दृश्य दिसतंय. अर्थात एक वर्ष माणसाचं. ब्रह्मदेवाचा एक क्षण देखील नसेल. भगवान वासरांचा आणि गोपालांचा शोध करताहेत. हातामध्ये गोपालांनी दिलेला दहीभात आहे, तो खात खात शोध करण्याचं काम चाललेलं आहे. ब्रह्मदेवांना हा साक्षात परमात्मा आहे हे ज्ञान झालं. हंस वाहनावरून ते खाली उतरले आणि भगवान श्रीहरींना त्यांनी साष्टांग नमस्कार केलेला आहे. आणि पुष्कळ स्तुती केली.
नौमीड्य तेऽभ्रवपुषे तडिदम्बराय
गुञ्जावतंसपरिपिच्छलसन्मुखाय ।
वन्यस्रजे कवलवेत्रविषाणवेणु
लक्ष्मश्रिय मृदुपदे पशुपांगजाय ।।
10.14.1 ।। श्री. भा.
आज जे स्वरूप दिसतंय त्याचं वर्णन करताहेत. मेघश्याम आपण आहात देवा. गुंजांच्या माळा गळ्यामध्ये घातलेल्या आहेत. वनामध्ये असलेल्या फुलांच्या माळा मित्रांनी करून आणलेल्या, त्या गळ्यात घातलेल्या आहेत. मयूरपिच्छाचा टोप करून मस्तकावर धारण केलेला आहे, हे आजचं आपलं रूप आहे. पण या स्वरूपाचं महत्त्वही आम्ही जाणू शकत नाही. काय करायचं ज्ञान घेऊन? ज्ञानाकरता प्रयत्न करण्यापेक्षा भगवंताचं प्रेम, भक्ती प्राप्त होण्याकरता प्रयत्न करावा, प्रार्थना करावी. भक्ती सोडून देऊन केवळ ज्ञानाकरता प्रयत्न करणाऱ्यांचं अंतःकरण शुष्क, प्रेमरहित असल्यामुळे त्यांना समाधान प्राप्त होत नाही. आपण अनेक अवतार धारण केले आणि अनेकांचं रक्षण आपण केलंय. ब्रह्मदेवांनी स्तुती करत असताना, मनुष्याचा उद्धार होण्याची तीन साधनं सांगितली आहेत. मुक्ती कशाने प्राप्त होते?
तत्तेऽनुकम्पां सुसमीक्षमाणो
भुञ्जान एवात्मकृतं विपाकम् ।
हृद्वाग्वपुर्भिर्विदधन्नमस्ते
जीवेत यो मुक्तिपदे स दायभाक् ।।
10.14.8 ।। श्री. भा.
पहिलं साधन म्हणजे भगवंताची कृपा माझ्यावर केव्हा होईल? दर्शन केव्हा होईल? संसार वासना कधी नष्ट होतील? अशी अंतःकरणात, अत्यंत तळमळ उत्पन्न झाली पाहिजे. कृपेची वाट पाहतोय जीव. जन्म असेपर्यंत जे जे सुख दुःख असेल ते आपल्याच कर्माचं फळ आहे असं समजून, ते भोगतो आहे. आणि काया, वाचा, मनाने अत्यंत विनीत होऊन प्रत्येक भोगामध्ये परमात्मभाव
ठेवून त्यांना वंदन करतो आहे. अत्यंत विनम्र जो राहतो, तो मुक्तीचा अधिकारी होतो. ब्रह्मदेव सांगताहेत, माझ्या हातून आज फार मोठा अपराध घडलेला आहे. खिडकीतून आलेल्या सूर्यकिरणांमध्ये असंख्य रजःकण दिसतात तसं आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी अनेक ब्रह्मांड आहेत. त्यापैकी एका ब्रह्मांडाचा मी ब्रह्मदेव आपल्याच कृपेने झालो, आणि अनंत ब्रह्मांड स्वरूपामध्ये स्थित असलेले आपण! मी ब्रह्मदेव आहे. सृष्टीकर्ता आहे. अशा अभिमानामुळे माझ्या हातून आपला उपमर्द झालेला आहे. वर्ष संपायच्या वेळी बलरामांना हे समजलं. त्यांनी गोपालकृष्णांना विचारलं पूर्वी ही वासरं, गोपाल मला ऋषीरूपात, देवरूपात दिसायची, तुमच्या कार्यात मदत करण्याकरता आलेली, परंतु आज मला हे सर्व तुझ्या रूपातच दिसताहेत! असं कसं झालं? तेव्हा गोपालकृष्णांनी सांगितलं, ब्रह्मदेव आमची परीक्षा पाहताहेत. त्यांनी सगळी वासरं, मुलं ब्रह्मलोकात नेऊन ठेवली. त्यांना वाटतंय की सृष्टी करण्याचं सामर्थ्य फक्त त्यांच्याजवळच आहे. आता त्या दिवशी आम्ही एकटे कसे जाणार? सर्व गोपींना, गाईंना दुःख झालं असतं म्हणून ही रूपं धारण करावी लागली. ब्रह्मदेवांनी क्षमा मागून खरी वासरं, गोपाल आणून दिले आणि त्यांना घेऊन गोपालकृष्ण वृंदावनात आले. त्या मुलांनी आपल्या आईबापांना सांगितलं की, आज सकाळी कन्हैयाने एक मोठा साप मारला. खरं म्हणजे वर्षापूर्वी घडलेली हकीकत, पण ते आज सांगताहेत. वर्षभर आपण योगनिद्रेत होतो याचं भानही नाही. काही लक्षात नाही. भगवंताच्या मायेमुळे जीव सर्वही विसरून जाताहेत.
एकदा गोपालकृष्ण सर्वांसह नित्यप्रमाणे अरण्यात आले. गोपाल सांगताहेत, कृष्णा, इथून जवळच एक उपवन आहे. अत्यंत मधुर आणि रसाळ फळांनी भरलेले वृक्ष तिथे आहेत परंतु आम्हाला तिथे जाता येत नाही. कारण एक दैत्य त्याठिकाणी रहात असून तो आत जाणाऱ्यांचा नाश करतो. ती फळं आम्हाला पाहिजेत. राम म्हणाले, चला आत्ताच जाऊ या. आले त्या उपवनामध्ये. रामांनी एक झाड जोराने हलवलं. त्याची फळं खाली पडली. ती गोपालांना घ्यायला सांगितली. तो फळांचा पडण्याचा, माणसांचा आवाज ऐकून तो दैत्य "धेनुकासुर" आपल्या सैन्यासह आलेला आहे. कंसानेच ते सैन्य ठेवलं होतं. गर्दभरूपात ते आले आणि लाथांनी बुकलून रामकृष्णांना मारण्याकरता ते धावून आले. त्यावेळी एकेकाला उचलून आपटून ठार मारलेलं आहे राम-कृष्णांनी, धेनुकासुराचाही नाश झालेला आहे. ते वन निर्भय झालेलं आहे.
भगवंताची लीला अशी अखंड चालू आहे. भगवान श्रीकृष्ण आता गाई घेऊन...
जायला लागले. सहावं वर्ष लागलं. आपापल्या गाई घ्यावात आणि आता पुष्कळ दूरवर जायला लागले. वासरं न्यायचे तेव्हा जवळच नदीवर जाऊन यायचे. आता दूरपर्यंत जाऊ लागले. एकदा कृष्ण, रामांना न घेताच बाहेर पडले. बाकीच्या सवंगड्यांना घेतलं आणि नदीतीरावर आले. काही गोपाल आणि गाई त्या यमुनेच्या एका डोहातलं पाणी प्यायले आणि एकदम गतप्राण होऊन पडले. त्या डोहामध्ये कालिया नावाचा नाग आपल्या परिवारासह रहात होता. त्यामुळे तिथलं पाणी विषारी झालं होतं. पाण्यावरून जाणारा वारा जर वर उडणाऱ्या पक्ष्याच्या अंगावरून गेला तर तोही मरून पडायचा. सर्व गोपालांना, गाईंना भगवंताने आपल्या अमृतदृष्टीने जिवंत केलं आणि ते झाडावर चढून गेले. त्यांनी ठरवलं आज या नागाला इथून काढून त्याच्या स्थानामध्ये म्हणजे रमणकद्वीपामध्ये पाठवून द्यायचं. श्रीकृष्णांनी त्या डोहामध्ये उडी मारली. आणि तो नाग वर येण्याकरता हाताने पाण्यावर प्रहार करायला सुरुवात केली. तो नाग वर आलेला आहे. त्या कालिया नागाने कृष्णांना दंश केला आणि कृष्णशरीराला वेढा देऊन बांधून टाकलेलं आहे. श्रीकृष्णांची हालचाल बंद झाली. इकडे वृंदावनात अपशकुन व्हायला लागले. लोक म्हणायला लागले, आज कृष्ण एकटाच गेलेला आहे. राम बरोबर नाहीत. त्याच्यावर नक्की काहीतरी संकट आज आलेलं आहे. चला आपण जाऊ या. शोध करत करत सर्वही मंडळी, नदीतीरावर त्या डोहापाशी आली. पाहताहेत की गोपाल आहेत, गाई आहेत आणि समोर त्या भयंकर नागाच्या विळख्यामध्ये कृष्ण सापडलेले आहेत. अतिशय दुःख झालं सर्वांना. आता म्हणाले आपला मुलगा काही परत मिळणार नाही. सगळे शोक करू लागले. बलरामजी अगदी स्तब्ध आहेत. कृष्णप्रभाव काय आहे, कृष्णशक्ती काय आहे याची पूर्ण जाणीव त्यांना आहे. हसले फक्त ते, पाहताहेत. याचा प्राण जाण्याच्या अगोदर आपणच आधी प्राणत्याग करावा अशा हेतूने नंद यशोदेसह सर्वजण नदीमध्ये उडी मारण्याकरता निघाले. बलरामांनी त्यांचं सांत्वन केलं. थांबा म्हणाले थोडं. काय होतंय पहा. श्रीकृष्णांनी आपलं शरीर फुगवायला सुरुवात केली. त्या नागाने, बांधून ठेवणं शक्य न झाल्यामुळे लगेच सोडून दिलं, आणि तो बाजूला झालेला आहे. श्रीकृष्ण सभोवती फिरताहेत, तो नागही फिरतो आहे. एकदम उसळी मारून त्या नागाच्या फण्यावर गोपालकृष्ण उभे राहिले. आणि त्यांनी नृत्य करायला आरंभ केला. गंधर्वमंडळी वाद्यं वाजवताहेत. ताल धरलेला आहे, आणि यांचं नृत्य चाललेलं आहे. त्या नागाला एकशेएक फणा होत्या. जी जी फणा त्याने बाहेर काढावी त्या फणेवर कृष्णांनी उडी मारून नृत्य करावं असं चाललेलं आहे.
तो नाग आपल्या स्थानाहून, रमणकद्वीपाहून या डोहामध्ये यायचं कारण काय ते सांगताहेत शुक्राचार्य. सर्व नाग त्या रमणकद्विपात राहात होते. काही मानवही होते तिथे. नागांनी आपल्याला त्रास देऊ नये म्हणून, त्या माणसांनी रोज पुष्कळ अन्न त्या नागांना द्यायचं ठरवलं. म्हणजे त्यांनी तो अन्नाचा बळी घ्यावा आणि आम्हाला त्रास देऊ नये असा विचार त्या माणसांनी केला. मानवाला जशी नागांची भीती आहे तशी नागांना गरुडाची भीती आहे. सर्वांना भीतीमध्ये ठेवलेलं आहे देवाने. भीतीशिवाय कार्य व्यवस्थित चालू रहात नाही. पंचमहाभूतांनासुद्धा भीती आहे. सूर्यनारायण रोज उगवतो आहे, वायू नित्य वाहतो आहे. वायू असं म्हणत नाही आता कंटाळा आला, किती दिवस काम करू! सगळ्यांना भीती आहे. कर्तव्याच्युत झालो तर शासन होईल ह्या भीतीमुळे सृष्टीतले हे अधिकारी सदैव कर्तव्य करत राहतात. नागांनी सांगितलं, आम्हाला जे अन्न मिळतं, ते आम्ही तुम्हाला देऊ. आम्हाला त्रास देऊ नका. म्हणजे रोज गरुडाला अन्न मिळत होतं. गरुड यायचा, ते अन्न भक्षण करायचा आणि जायचा. ह्या कालिया नागाची पाळी एकदा आली. तो म्हणाला, मी काही गरुडाला अन्न देणार नाही. मला मिळालेलं अन्न मी खाणार. तो अन्न भक्षण करत असताना गरुड आला. कालिया नाग त्याच्या अंगावर धावून गेला. गरुडाने आपल्या पंखाचा हलकासा तडाखा दिल्याबरोबर, तो नाग बाजूला झालेला आहे. गरुडापुढे आपलं काही चालणार नाही हे ओळखून तो कालिया नाग या यमुनेच्या डोहात येऊन राहिला. तो इथेच येऊन सुरक्षित कसा राहिला यालाही एक इतिहास आहे. एकदा गरुड या डोहापाशी आला आणि पाणी पिता पिता मत्स्यांनाही भक्षण करू लागला. एक मोठा मत्स्यराज त्याठिकाणी होता. त्यालाही गरुडाने भक्षण केलं. सर्व मत्स्य दुःखी झाले. त्या ठिकाणी, जलामध्ये तपश्चर्या करण्याकरता 'सौभरी' ऋषी रहात होते. त्यांनी गरुडाला सांगितलं, गरुडा, आजपासून केव्हाही याठिकाणी येऊन तू जर मत्स्य भक्षण करशील, तर तुझे प्राण जातील. गरुडाला ताकीद दिली. त्यालाही भीती आहे ना. कसंही वागायचं, कोणाचीही हिंसा करायची, कुणाचंही सर्वस्व हरण करायचं याला आळा घालायला भीती पाहिजे. आपलं नियंत्रण करणारी कुणी शक्ती आहे अशी भीती असल्याशिवाय कार्य होत नाही. गरुडाने ते स्थान वर्ज्य केलं हे कालिया नागाला माहित होतं म्हणून तो इथे येऊन राहिला.
गोपालकृष्णांचं नृत्य चाललेलं आहे. त्या कालिया नागाची शक्ती क्षीण झाली. मुखातून रक्तस्त्राव सुरू झाला. प्राण जाण्याची वेळ आलेली आहे. सर्व नागस्त्रिया आपल्या मुलांसह आल्या
आणि श्रीकृष्णाची प्रार्थना करताहेत, देवा, यांना जीवदान द्या. आमचं सौभाग्य आम्हाला द्या. यांच्या अपराधांची क्षमा करा. गोपालकृष्णांनी लाथेने त्या नागाला ढकलून दिलं आणि पाण्यामध्येच थांबलेले आहेत. थोड्या वेळाने तो कालिया नाग सावध झाला आणि त्या नागाने स्तुती केलेली आहे. भगवन, आपली शक्ती अनंत आहे. मी काही ओळखू शकलो नाही. सर्व विश्व आपण उत्पन्न केलं. आम्हा नागांनाही आपणच उत्पन्न केलं. आम्ही रागीट आहोत. तो स्वभावही, आपणच बनवलेला आहे. तुमचंच आहे हे सगळं. आज माझ्याहातून आपला अपराध झालेला आहे. आपण मला क्षमा करा. अशी प्रार्थना त्या कालिया नागाने केल्यानंतर, भगवान श्रीहरी त्याला सांगताहेत, हे स्थान सोडून तू तुझ्या स्थानामध्ये रहायला जा. ही काही तुझी जागा नाहीये. सगळं पाणी विषारी झालेलं आहे. कुणाही पशू, पक्षी, मानवाने ते पाणी प्यायल्यावर त्यांचा नाश होतो आहे.
गोभिर्निभुज्यतां नदी ।।
10.16.60 ।। श्री. भा.
पाण्यावरती माणसांचा, गाईंचा हक्क आहे, तुमचा नाही. तुम्ही इथून निघून जा. कालिया नागाने आपल्या परिवारासह श्रीकृष्णांची पूजा केली. उत्तम वस्त्रं, अलंकार दिलेले आहेत. आणि तो सहपरिवार आपल्या स्थानाला निघून गेला. भगवंताच्या कृपेमुळे त्या नदीचे जल निर्विष झालेलं आहे. भगवंतांनी कालियाला सांगितलं की आता त्याला गरुडाची भीती बाळगण्याचं कारण नाही. कारण, त्याच्या फण्यावर कृष्णाची पावलं उमटली होती. ती पाहिल्याबरोबर गरुड त्रास देणार नाही असं सांगितलं. याप्रमाणे शुक्राचार्य महाराजांनी हे कालियामर्दनाचं चरित्र सांगितलं.
असंच एकदा राम-कृष्ण, गोपाल, अरण्यामध्ये गेले. त्यांचा खेळ सुरू झाला. दोन पक्ष केले. कृष्णपक्षाला काही गोपाळ. रामांच्या पक्षाला काही गोपाळ. आणि असं ठरलं की ज्या पक्षाचा पराभव होईल त्या पक्षातील मुलांनी दुसऱ्या पक्षातील लोकांना आपल्या खांद्यावर घेऊन, एक मोठा वटवृक्ष होता, त्याच्याजवळ जायचं. त्या वेळी कृष्णपक्षाचा पराभव झाला. कृष्णांनी आपल्या 'श्रीदामा' नावाच्या मित्राला खांद्यावर घेतलं. प्रलंब नावाचा दैत्य गोपालाचं रूप घेऊन त्यांच्यामध्ये मिसळलेला होता. तो कृष्णपक्षाला होता. प्रलंबाने बलरामांना खांद्यावर घेतलं आणि तो निघाला. प्रलंबासुर ठरलेल्या मर्यादेच्या पुढेच निघाला. आपलं मोठं रूप त्याने प्रगट केलं. बलरामांनी ते पाहिलं आणि रागाने त्याच्या मस्तकावर मूठ मारली. तो गतप्राण होऊन पडला.
अशा अनेक लीला झालेल्या आहेत. गोपालांचं संरक्षण, रामकृष्णांनीच सर्वदा केलेलं आहे. एकदा नदीतीरावर सर्व मंडळी बसलेली असताना चारी बाजूंनी मोठा अग्नी प्रगट झाला. सर्व मंडळी...
घाबरली. भगवंतांनी सर्वांना डोळे मिटायला लावून तो दावाग्नी भक्षण केला म्हणतात, म्हणजे शांत केला. असेच एकदा सर्व सवंगड्यांसह रामकृष्ण अरण्यामध्ये पुष्कळ दूर आलेले आहेत. त्या गाई घनदाट अरण्यामध्ये बऱ्याच दूर गेलेल्या आहेत आणि चारी बाजूला वणवा पेटलेला आहे. कृष्णांनी त्यांना डोळे झाकायला सांगितलं आणि एका क्षणाने उघडायला सांगितलं. तेव्हा अरण्याच्या बाहेर नेहमीच्या रस्त्यावर आपण आलो आहोत हे गोपालांना जाणवलं.
वर्ष ऋतू आलेला आहे. वनात राहणारीच ती सर्व गोपाल मंडळी. त्यांना सगळी सवय होती. पर्जन्य सुरू झाल्यावर काय करायचं याची. पुष्कळ पाऊस पडतो आहे. नदीचा प्रवाह मोठा झालेला आहे. त्यानंतर शरद ऋतू आलेला आहे. अश्विन- कार्तिक महिने. त्यावेळचंही वृंदावनाचं वर्णन आहे. शुद्ध पाणी आहे. धान्य आलेलं आहे. रोजचं कार्य चालू आहे. सकाळी गाईंना घेऊन वनामध्ये जावं, दिवसभर तिथे रहावं आणि संध्याकाळी परत यावं. शुक्राचार्य सांगताहेत राजा,
हेमन्ते प्रथमे मासि नन्दव्रजकुमारिकाः ।
चेरुर्हविष्यं भुञ्जानाः कात्यायन्यर्चनव्रतम् ।।
10.22.1 ।। श्री. भा.
कालियामर्दन केल्यानंतर मात्र सर्व गोपालांची, गोपींची खात्री पटली की, हाच समर्थ आहे. याचंच सामर्थ्य आहे. ज्यामुळे हा अनेक दैत्यांचा नाश करतो आहे. लहान असला तरी याचं सामर्थ्य मोठं आहे ही खात्री झाली.
हेमंत ऋतू, मार्गशीर्ष महिना आहे. पहाटे लवकर उठून गोपकन्या नदीतीरावर येत होत्या. एक महिना कात्यायनीची पूजा करण्याचं त्यांनी ठरवलं होतं. कालिंदी नदीमध्ये त्यांनी स्नान करावं. देवीची वाळूची मूर्ती करावी आणि तिची पूजा करावी. त्यांनी प्रार्थना करावी.
कात्यायनि महामाये महायोगिन्यधीश्वरि ।
नन्दगोपसुतं देवि पतिं मे कुरु ते नमः ।।
10.22.4 ।। श्री. भा.
हे कात्यायनी देवी हा नंदकुमार श्रीकृष्ण आम्हाला पती म्हणून प्राप्त व्हावा असा आशीर्वाद तू दे. पहाटे अगदी अंधार असतानाच त्यांनी यावं. एके दिवशी त्या गोपकन्या तीरावरती वस्त्रं ठेवून
स्नानाकरता नदीत उतरल्या. तेवढ्यात गोपालकृष्ण आपल्या मित्रांसह तिथे आले. ती सगळी वस्त्रं गोळा केली. गाठोडं बांधलं आणि झाडावर चढून बसले. त्या मुलींच्या दृष्टीला पडलं हे. आता काय करायचं? पाण्यामध्येच थांबलेल्या आहेत. थंडीचे दिवस आहेत. तिथूनच त्यांनी सांगितलं, गोपालकृष्णा, आमची वस्त्रं आम्हाला द्या. आपण जर वस्त्रं दिली नाहीत तर आम्ही नंदराजाला सांगू. थंडीचा त्रास होतो आहे. आम्ही आपल्या दासी आहोत. आपण सांगाल ते आम्ही ऐकू. गोपालकृष्ण म्हणाले, मी सांगेन ते ऐकण्याची तयारी आहे ना? मग या इकडे ही वस्त्रे आहेत ती नेसा आणि चला. काय करणार? थंडीचा त्रास होतो आहे. बाहेर आल्या. ती वस्त्रं नेसून तशाच उभ्या राहिल्या. गोपालकृष्ण म्हणाले, ही काय देवीची पूजा व्यवस्थित करता की नाही? वस्त्रं तीरावर ठेवायची आणि नदीत असं स्नान करायचं शास्त्राला मान्य आहे का? वस्त्राचा त्याग स्त्रियांनी केव्हाही करून उपयोग नाही. तुमचं हे स्नान फुकट गेलेलं आहे. आणि इतक्या पहाटे तुम्ही येता. कोण दैत्य कोणत्या वेळी येऊ शकेल याची तुम्हाला कल्पना पाहिजे. कोणालातरी बरोबर घेऊन यायचं. त्यांच्या मनामध्ये भगवान श्रीकृष्णांबरोबर रासक्रीडा करावी अशी पुष्कळ दिवसांची इच्छा होती. भगवंतांनी सांगितलं तुमचा संकल्प मान्य आहे. पुढे आपण रासक्रीडा करू म्हणाले.
न मय्यावेशितधियां कामः कामाय कल्पते ।
भर्जिता क्वथिता धाना प्रायो बीजाय नेष्यते ।।
10.22.26 ।। श्री. भा.
माझ्यावर प्रेम करणं याला काम म्हणत नाहीत. काम हा दोष आहे. पण माझ्याविषयी जर इच्छा उत्पन्न झाली, क्रीडा करण्याची, तर त्याला काही एक बंधन नाहीये. ज्वारी भाजल्यानंतर त्याची लाही होते. ती लाही पेरल्यानंतर काही अंकुर येत नाही. माझ्याकडे तुम्ही येता म्हणजे कर्म संपलेलं आहे. त्यातून पुन्हा कर्म निर्माण होणार नाही. असा एक उपदेश त्यांनी केलेला आहे. आगामी शरद ऋतूमध्ये आपण रासक्रीडा करू, असे आश्वासन त्यांनी दिलं. गोपी आपापल्या घरी निघून गेल्या.
त्या दिवशी तसेच पुढे गेले गोपालकृष्ण. बरेच दूरवर गेले. वृंदावन दूर राहिलेलं आहे. सर्वांना भूक लागलेली आहे. सर्व आले म्हणाले, रामा, कृष्णा आम्हाला भूक लागलेली आहे. तिथं जवळंच, ऋषींचे आश्रम होते. यज्ञयाग त्यांचे सारखे चालू असत. त्यांच्या स्त्रियाही मोठ्या भक्तिसंपन्न होत्या. त्या विप्रपत्नींवर कृपा करायची म्हणून भगवान आलेले आहेत. कृष्ण सांगताहेत, गोपालांहो,
इथं जवळंच ऋषींचे आश्रम आहेत. तिथे तुम्ही जा. माझं, रामाचं नाव सांगा आणि अन्न मागा. विचारून पहा. गोपालमंडळी यज्ञमंडपात आली. ऋषींना त्यांनी नमस्कार केला आणि विनंती केली, रामकृष्ण इथून जवळच आलेले आहेत. त्यांना भूक लागली आहे. तेव्हा त्यांना तुम्ही अन्न द्या. शास्त्राप्रमाणे यज्ञदीक्षा ज्यांनी घेतली आहे, त्याचं अन्न खाऊ नये असं आहे.
न दीक्षितस्य अन्नं अश्नीयात् ।।
पण त्यालाही अपवाद आहे. यज्ञामध्ये अशी काही कर्म आहेत, ती कर्म संपल्यानंतर अन्न घेतलं तर चालतं. हे सगळं गोपालांना माहिती आहे. ते ऋषी काहीही बोलले नाहीत. या गवळ्याबरोबर काय बोलायचं म्हणाले. हो म्हणाले नाहीत, नाही म्हणाले नाहीत. थांबाही म्हणाले नाहीत. निराश झाले गोपाळ आणि त्यांनी येऊन गोपालकृष्णांना सांगितलं की, ते ऋषी तर काही बोलायलाच तयार नाहीत. अन्न काही मिळत नाही. गोपालकृष्ण म्हणाले, तुम्हाला एक युक्ती सांगतो. पहिल्यांदाच सांगायला पाहिजे होती परंतु ऋषींची परीक्षा व्हायची होती.
मां ज्ञापयत पत्नीभ्यः ससंकर्षणमागतम् ।
दास्यन्ति कामं अन्नं वः स्निग्धा मय्युषिता धिया ।।
10.23.14 ।। श्री. भा.
सर्व बुद्धीसाक्षी परमात्मा आहे हा. म्हणून सर्वज्ञ आहे. कोणाची बुद्धी किती योग्यतेची आहे हे त्यांना सगळं माहिती आहे. ऋषीमंडळी खूप ज्ञानी आहेत. वेदशास्त्रांचा अभ्यास केलेला आहे. परंतु धर्माचं पूर्ण ज्ञान नाहीये. ज्याला भूक लागलेली आहे, त्याला अन्न देणं इकडे त्यांचं लक्ष नाहीये. भगवान म्हणाले, गोपालांहो, यज्ञामध्ये ऋषिपत्नींकरता एक पत्नीशाला असते तिथे तुम्ही जा. माझं आणि रामाचं नाव सांगा. तुम्हाला निश्चित त्या ठिकाणी अन्न मिळेल. काही निराश होऊ नका. गोपाल आले पत्नीशालेमध्ये. त्या ऋषिपत्नींना साष्टांग नमस्कार त्यांनी केला. सांगताहेत, ऋषी पत्नींनो, आपल्याला आम्ही नमस्कार करतो. आम्ही, वृंदावनातून गोपाल आलेलो आहोत. आमच्याबरोबर गोपालकृष्ण आणि बलराम आलेले आहेत. त्यांना अत्यंत भूक लागलेली आहे म्हणून त्यांनी आम्हाला आपल्याकडे अन्न मागण्याकरता पाठवलं आहे.
गोपालकृष्ण आलेले आहेत, हे ऐकल्याबरोबर, ऋषिपत्नी उठल्या. तिथे काही अन्नाची कमी नव्हती. काही पात्रांमध्ये त्यांनी अन्न काढून घेतलं. गोपालकृष्णाच्या दर्शनाची तीव्र तळमळ आहे. मथुरेला जाताना गोपी इथे थांबत होत्या, दही-दूध द्यायला. त्या गोपींकडून गोपालकृष्णांच्या दिव्य लीलांचं वर्णन त्यांनी ऐकावं. गोपी अत्यंत प्रेमभराने ते वर्णन करीत. ऋषिपत्नींना काही
घरदार सोडून वृंदावनात जाता येत नव्हतं. पण दर्शनाची उत्कंठा आहे. गोपालकृष्णांना कधीतरी पहावं अशी इच्छा आहे. आज योग आलेला आहे. अन्न घेऊन त्या निघाल्या. यज्ञ चालू आहे, केव्हा आपली गरज लागेल, सगळं विसरल्या. कर्म घेऊन काय करायचंय. यज्ञ करून ज्याचा प्रसाद संपादन करायचा आहे, तो प्रत्यक्ष इथे आलेला असताना, यज्ञ करून काय करायचंय? कर्म सोडायचीही तयारी मनाची झाली पाहिजे. तोच आग्रह उपयोगी नाही. पती, बंधू, आईबाप यांनी पुष्कळ प्रतिबंध केला. थांबा, जाऊ नका. पण या ऋषिपत्नींनी काही ऐकलं नाही. प्रत्यक्ष परमात्मा इथे आला असताना कसली यज्ञकर्म घेऊन बसलात म्हणाल्या. अन्न घेऊन त्या वेगाने आल्या गोपालकृष्णांकडे. ते मेघश्याम रूप त्यांनी पाहिलं. गळ्यामध्ये वनमाला घातलेल्या आहेत. हातामध्ये एक कमळ घेतलेलं आहे, मित्राच्या खांद्यावर हात ठेवलेला आहे आणि कमळ फिरवायचं काम चाललेलं आहे. दर्शन झाल्याबरोबर, त्यांच्या चित्ताचं समाधान झालेलं आहे. किती दिवस कर्म, यज्ञ करत बसायचं म्हणाल्या. गोपींनाच शास्त्राचं खरं रहस्य समजलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. गोपालकृष्ण म्हणाले, या, या, विप्रपत्नींनो तुमचं स्वागत असो. आम्हाला पहाण्याकरता आपण आलात ! चांगलं आहे. सर्वही भक्त तुमच्यासारखे माझ्यावर प्रेम करतात. त्यांच्या अंतःकरणात शुद्ध भक्ती असते. झालं आता भेट झाली आम्ही हे अन्न घेतो. तुम्ही आता परत जा. तिकडे यज्ञ चाललेला आहे. सगळे ऋषी वाट पहात असतील. यज्ञकर्माला प्रतिबंध होऊ नये. त्या विप्रपत्नी म्हणाल्या, देवा याकरताच आम्ही आलो का? असं कठोर तुम्ही बोलताय! आल्याबरोबर आम्हाला जायला सांगताय? आपलं सान्निध्य घडावं, आपली सेवा घडावी म्हणून, सर्व घरदार सोडून आम्ही आलेलो आहोत आणि आम्हाला आता घरात घेणारही नाहीत. त्यांची आज्ञा उल्लंघन करून आम्ही आलो. त्यांना राग आलेला असेल. भगवान सांगताहेत,
पतयो नाभ्यसूयेरन् पितृभ्रातृसुतादयः ।।
10.23.31 ।। श्री. भा.
कोणीही तुमच्यावर रागावणार नाही. जगामध्ये कुणीही तुमच्यावर रागावणार नाही. परमात्मा अनुकूल झाल्यावर, परमेश्वराचा प्रसाद झाल्यावर रागावणार कोण? तेव्हा केवळ माझ्याजवळ रहाणं याला काही खरं प्रेम म्हणत नाहीत.
तन्मनो मयि युञ्जाना अचिरात् मां अवाप्स्यथ ।।
10.23.32 ।। श्री. भा.
घरातंच रहा तुम्ही आणि मन माझ्याठिकाणी ठेवा म्हणजे लवकर तुम्हाला माझी प्राप्ती होईल. नंतर त्या ऋषिपत्नी भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घेऊन अत्यंत समाधानाने घरी परत