आलेल्या आहेत. कुणीही रागावलं नाही. सर्व यज्ञकर्म पार पडलेलं आहे. रामकृष्णानी गोपालांसह ऋषिपत्नींनी आणलेलं अन्न सेवन केलं आणि वृंदावनामध्ये निघून गेले. त्या ऋषींना पश्चाताप झालेला आहे. स्त्रियांच्या मनात केवढी भगवद्भक्ती आहे आणि आमच्या अंतःकरणात त्याचा लवलेशदेखील नाही. ब्राह्मणजन्म मिळाला. वेद-शास्त्रांचा अभ्यास झाला. कर्मानुष्ठान झालं पण आज हे सर्व फुकट गेलेलं आहे.
धिग् जन्म नस्त्रिवृद् विद्यां धिग् व्रतं धिग् बहुज्ञताम् ।
धिक् कुलम् धिक् क्रियादाक्ष्यं विमुखा ये त्वधोक्षजे ।।
10.23.39 ।। श्री. भा.
अधोक्षजापासून आम्ही पराङ्मुख झालो, परमेश्वराकडे आमचं लक्ष नाही. त्यामुळे आजपर्यंतचं सर्व कर्म फुकट गेलेलं आहे. काय भगवंताची माया आहे. सर्वांचे गुरू म्हणून ओळखले जाणारे आम्ही, आज देव जवळ आल्यानंतर त्यांच्याकडे पाठ फिरवली. आमच्या स्त्रियांच्या मनामध्ये जगद्गुरू श्रीकृष्णाबद्दल केवढी भक्ती आहे? यांना उपनयनादि संस्कार नाहीत. वेदशिक्षण नाही, यज्ञयाग ह्या वेगळेपणाने करू शकत नाहीत. पण तरीसुद्धा यांच्या अंतःकरणामध्ये केवढी तीव्र भक्ती आहे जी आम्हाला एवढे संस्कार असूनसुद्धा प्राप्त झाली नाही. खरा स्वार्थसुद्धा आम्हाला साधत नाही. परमेश्वराला अन्न मागायचं काय कारण होतं? मुद्दाम आमची परीक्षा पहाण्याकरता त्यांनी गोपालांना पाठवलं. पण आम्ही काही ते जाणू शकलो नाही. आमच्या स्त्रियांमुळे तरी आमचा उद्धार होईल म्हणाले. त्यांच्या भक्तीमुळे भगवान श्रीकृष्ण आमच्या अपराधाची क्षमा करतील. पुन्हा त्यांना वाटलं, आपण वृंदावनात जाऊन दर्शन घेऊ. पण त्यांना दर्शन मिळायचं नव्हतं.
दिदृक्षवोऽप्यच्युतयोः कंसाद् भीता न चाचलन् ।।
10.23.52 ।। श्री. भा.
पश्चाताप होऊन रामकृष्णांच्या दर्शनाची इच्छा झाली. पण कंसाची मूर्ती डोळ्यासमोर आली. कंसाला जर कळलं आम्ही वृंदावनात गेलो तर आमचे आश्रम राहणार नाहीत. त्यांनी पहायचं होतं परीक्षा घेऊन. आश्रम राहिला असता की नाही पण नाही. राम-कृष्णांचं सामर्थ्य समजलेलंच नाही. त्यांना दर्शन व्हायचंच नव्हतं हेच खरं.
एकेदिवशी प्रतिवर्षाप्रमाणे, गोपालांनी इंद्रयाग करण्याची तयारी सुरू केली. भगवंतांना हे माहिती आहे. पण त्यांनी जिज्ञासू बुद्धीने नंदाला विचारलं, पिताजी, ही गडबड कसली चालू आहे? कसली तयारी चालू आहे? कोणतं कर्म करणार आहात? त्याचं फळ काय आहे? या यज्ञाची देवता कोण आहे? कशाकरता हा यज्ञ करायचा हे सांगा मला. काही लोक कर्माचं पूर्ण...
ज्ञान करून घेऊन कर्म करतात तर काही लोक श्रद्धेने करतात पण कर्माचं पूर्ण ज्ञान त्यांना नसतं. ज्ञानपूर्वक कर्म केलं की त्याचं उत्तम फळ मिळतं. नंद सांगतात बाबा,
पर्जन्यो भगवान् इन्द्रो मेघास्तस्यात्ममूर्तयः ।
तेऽभिवर्षन्ति भूतानां प्रीणनं जीवनं पयः ।।
10.24.8 ।। श्री. भा.
इंद्र हा मेघांचा स्वामी आहे. त्या मेघापासून आम्हाला जल मिळतं. त्या पाण्यामुळे आम्हाला धान्य मिळतं. गाईंना गवत मिळतं. त्यामुळे आम्ही सुखी राहतो. तेव्हा हे इंद्राचे उपकार फेडण्याकरता ही पूजा आम्हाला करायला नको का? इंद्राकरता म्हणून आम्ही हा यज्ञ करतो. भगवंताला इंद्राची परीक्षा पहायचीय. नेमलेले सर्व अधिकारी हे अहंकाराने वागतात का दयेने वागतात हे पहायचंय. इंद्राला राग यावा आणि तो कसा वागतो ते पहावं, म्हणून इंद्राची पूजा बंद करायची भगवंताने ठरवलं. भगवंताने आरंभाला, कर्म हेच श्रेष्ठ आहे असा सिद्धांत सांगितला. देव वगैरे नाही म्हणाले. मीमांसा शास्त्राचा सिद्धांत.
कर्मणा जायते जन्तुः कर्मणैव विलीयते ।
सुखं दुःखं भयं क्षेमं कर्मणैव अभिपद्यते ।।
10.24.13 ।। श्री. भा.
कर्मानेच जीव जन्माला येतो आणि ते कर्म संपल्यानंतर शरीरपात होतो. सुख दुःख हे सर्व कर्मामुळेच मिळतं. ईश्वराचा काही संबंध नाही. त्याने केलेल्या कर्माचं त्याला फळ मिळतं. ईश्वर आहे असं जरी मानलं, तरी त्या त्या जीवाचं ते ते कर्म पाहून तो फल देतो. म्हणजे कर्म हे श्रेष्ठ झालं का नाही? चांगली कर्म करावीत म्हणजे चांगलं फळ मिळतं. ईश्वराचा याच्यामध्ये काय संबंध येतो म्हणाले. इंद्राचा याच्यात काय संबंध आहे? आम्ही कर्तव्यकर्म यथास्थित करतो म्हणून पाऊस पडतो. पाऊस का पडतो हे सांगणार आहेत पुढं. आपल्या स्वभावाला अनुसरून ही कर्म आपल्या वाट्याला आली आहेत ती आपण करायची. सामान्य धर्म, विशेषधर्म याप्रमाणे वागायचंय. आमची कर्म म्हणजे गाईचं रक्षण करणं. कृषिकर्म करणं. आम्ही गाईचं पालनपोषण करतो, त्यांचं संरक्षण करतो. त्यांच्यापासून आम्हाला दूध प्राप्त होतं यात इंद्राचा संबंध कुठे आला? इंद्र आम्हाला काय देतो? इंद्र पाऊस पाडतो काय? सांख्य सिद्धांत सांगताहेत. सत्व, रज आणि तम हे तीन पदार्थ आहेत. सर्वव्यापी आहेत. पंचभूतात्मक सृष्टी जशी आहे तशी त्रिगुणात्मक सृष्टी आहे. त्रिगुणांमुळेच सृष्टीकार्य चालू आहे. 'प्रकृतिः कर्त्री' हा सिद्धांत त्यांनी मांडला नाही. त्रिगुणांच्या स्वाधीन सगळं आहे हे सांगायचं नाही. परंतु या त्रिगुणांपैकी जो रजोगुण आहे त्याचं कार्य म्हणजे
विश्वाची उत्पत्ती. सर्व जीव उत्पन्न होणं हे रजोगुणाचं कार्य आहे. रजोगुण म्हणजे क्रिया आहे. त्या क्रियेमुळे मेघ येतात. त्यातून पाऊस पडतो. म्हणजे हा क्रियेचा परिणाम आहे. आपोआप हे सर्व कार्य चाललेलं आहे. रूपांतर होणं. पर्जन्य पडल्यावर, बी पेरल्यावर त्याचं धान्यात रूपांतर होतं हे कार्य चाललेलं आहे. यात कुणी प्रवर्तक नाही म्हणाले. या रजोगुणामुळे सर्व चाललेलं आहे. इंद्राचा काहीही संबंध नाही. इंद्राला तुम्ही कधी पाहिलं आहे?
महेन्द्रः किं करिष्यति ।।
10.24.23 ।। श्री. भा.
हे विचारताहेत, आम्ही वनात राहणारे, डोंगरावर राहणारे हा गोवर्धन पर्वतच आमचा देव आहे. याच्यामुळे आमच्या गाईंना गवत मिळतं, फळं मिळतात. याची पूजा करायला पाहिजे. प्रत्यक्ष देव समोर असताना त्याची पूजा करायची सोडून इंद्राची पूजा कशाला करायची? इंद्राची परीक्षा पहाण्याकरता, हा निरीश्वरवाद मांडलेला आहे. सांख्यही निरीश्वरवादी आहेत. मिमांसकही निरीश्वरवादी आहेत. वेदावर त्यांची श्रद्धा आहे. नास्तिक नाही आहेत. पण प्रत्येकाने आपापलं कर्म केलं पाहिजे. तेव्हा गोवर्धनाची पूजा करा. गाईपासून आपल्याला दूध मिळतं. त्या दुधामुळे दही, तूप, लोणी मिळतं म्हणून त्या गाईंची पूजा करा. जे अत्यंत तपस्वी ब्राह्मण आहेत त्यांची पूजा केली पाहिजे. त्यांना सोडून तुम्ही इंद्राची पूजा करता हे आम्हाला पसंत नाही. सगळ्यांना पटलं ते. खरंय म्हणाले. प्रत्यक्ष दिसणाऱ्या देवाचीच पूजा करावी म्हणाले. श्रीकृष्णांनी सांगितलं, करा सगळी तयारी करा. ऋषींना अन्नदान करा. गाईंना चारा घाला. गोवर्धनाची पूजा करा. त्याला प्रदक्षिणा घाला, त्याला बलिदान करा. कालात्मा श्रीहरी आहे. कालरूपाने सर्वांवर त्याचं लक्ष आहे. तो कुठे नाही असं नाही. काल सगळीकडे आहे. सर्व नंदादिक गोपालांना समाधान झालं बरंय म्हणाले. आजपर्यंत समजलं नाही. ब्राह्मण मंडळी आली, स्वस्तिवाचन झालेलं आहे. आणि गोवर्धनाची पूजा केली, गाईची पूजा केली, ब्राह्मणांचा आदरसत्कार केला. त्यांना अन्नदान केलं. सर्वांचं भोजन झालं. गोवर्धन पर्वताला बलिदान केलं आणि सर्व मंडळी गोवर्धनाला प्रदक्षिणा करण्याकरता निघाली. राम-कृष्ण गाडीमध्ये आपल्या मातांजवळ बसलेले होते. बाकीचे गोपाळ चालत निघाले. मध्येच गोवर्धन पर्वताचं रूप धारण केलं भगवंताने. ते बोलायला लागले, म्हणजे हेच होते. तुम्ही माझी पूजा केलीत, मला समाधान झालं. असंच करत चला. तुमचं रक्षण मी करीन. इथं गाडीमध्ये गोपालकृष्ण बसलेले आहेत. तुमची पूजा तुमच्या देवाला मिळाली म्हणाले. हा गोवर्धन म्हणजे आमचा देव आहे. त्यांनी आपल्याला दर्शन दिलेलं आहे. नमस्कार करा म्हणाले. आपणही नमस्कार केला. इंद्र तुम्हाला येऊन असं कधी भेटला होता का? प्रदक्षिणा
करून सर्व मंडळी आपल्या स्थानात येऊन पोहोचलेली आहेत. इंद्राला मात्र राग आलेला आहे. या गोपालांनी आपला धर्म सोडून दिलेला आहे. कृष्णांनी धर्म परिवर्तन केलं नाही. देवताकुद्धी कायम आहे. ती बुद्धी कुठं ठेवायची एवढं फक्त सांगितलं. इंद्राने रागाने आपल्या प्रलयकालाच्या मेघांना बंधनातून मुक्त केलं आणि गोकुळावर जलवर्षाव करून गोकुळाचा नाश करा अशी त्यांनी आज्ञा केली. मीही येतो म्हणाले. आणि पाऊस पडायला सुरुवात झाली. भयंकर पाऊस पडतो आहे. सूर्यदर्शन नाही. जिकडे-तिकडे पाणीच पाणी आहे. सगळे गोपाल, गाई, गोपी सर्व गोपालकृष्णांकडे आलेले आहेत, आणि सांगताहेत, बाबा, इंद्र रागावलेला आहे. त्याचा यज्ञ आम्ही केला नाही म्हणून ही पर्जन्यवृष्टी होते आहे. आपण आता जिवंत कसे राहणार? गोपालकृष्णांनी पाहिलं, या म्हणाले. सगळ्यांना घेऊन बाहेर आले आणि तो गोवर्धन पर्वत उचलून हातावर धारण केला. त्याच्याखाली जाऊन रहा म्हणाले. पण पाणी आत जातंच होतं. शेष भगवान होतेच तिथे. त्यांनी चारी बाजूंनी प्रतिबंध केला. पाण्याचा एक थेंब आत जाईना. सर्व गोप-गोपी, गाई, वासरं सर्वजण सुरक्षित त्या गोवर्धन पर्वताच्या आश्रयाने रहाताहेत. पाऊस पडेना बाहेर. असे सात दिवस निघून गेले. परंतु
सप्ताहं नाचलत् पदात् ।।
10.25.23 ।। श्री. भा.
सात वर्षाचं वय होतं गोपालकृष्णांचं आणि गोवर्धन पर्वत धारण करून उभे राहिलेले आहेत. सात दिवस झाले तरी एक पाऊलदेखील मागेपुढे नाहीये. हे कृष्णांचं योगसामर्थ्य इंद्राच्या दृष्टीला पडलेलं आहे. सामर्थ्य दृष्टीला पडल्याशिवाय अहंकार दूर होत नाही. भीतीनेही अहंकार दूर होतो आणि ही भीतीच आहे. यापेक्षा जास्ती अविनय जर आपण दाखवला तर आपल्याला शासन होईल ही भीती आहे. पदावरून खाली जावं लागेल. लगेच इंद्राने आपले मेघ आवरले. पाऊस बंद झाला, सूर्यप्रकाश पडलेला आहे. सर्वांना श्रीकृष्णांनी बाहेर जायला सांगितलं आणि सर्वांसमक्ष तो गोवर्धन पर्वत जागच्या जागी ठेवून दिलेला आहे. गोप-गोपींना आनंद झाला. प्रेमाने त्यांनी गोपालकृष्णांना आलिंगन दिलेलं आहे. देव-गंधर्वांनी पुष्पवृष्टी केलेली आहे. वाद्यं वाजताहेत.
गोपाल मंडळी एकदा बोलत बसलेली असताना त्यांनी नंदाला विचारलं की, हा तुझा मुलगा कोण आहे बाबा. काय विलक्षण सामर्थ्य याचं आहे! सात वर्षाचा मुलगा आणि त्याने एवढा मोठा पर्वत हातावर धारण करून आमचं रक्षण केलं. तेव्हा तुझा मुलगा आमच्यासारखा मानव नाहीये. कोणीतरी लोकोत्तर पुरुष आहे. परमेश्वराचा अंश आहे. नंदाने सांगितलं, तुमचं म्हणणं खरंय.
गर्गाचार्यांनी याचं नामकरण केल्यानंतर मला सांगितलं होतं की हा मुलगा अत्यंत सामर्थ्यवान आहे. वासुदेव याचं नाव आहे. अनेकांचं संरक्षण पूर्वी याने केलेलंय. तुम्हालाही सर्व संकटातून हा तारणार आहे. याच्यावर प्रेम करा म्हणजे सर्व संकटातून तुम्ही मुक्त व्हाल. हे गर्गाचार्यांचं सांगणं तुम्हाला मी आज सांगतो आहे. हा आपल्यापैकी मानव नाहीये हे खरं आहे.
गोवर्धन पर्वत धारण करून सर्वांचं रक्षण भगवंताने केलं आणि इंद्राचा अहंकार दूर झाला आणि तो क्षमा मागण्याकरता एकांतात आलेला आहे. गोपालकृष्णांच्या पायावर मस्तक ठेवलं आणि क्षमा मागतोय. भगवंता, आपलं सामर्थ्य मी विसरून गेलो. अहंकारामुळे माझ्या हातून हा अपराध घडलेला आहे. आपण मला क्षमा करा. भगवान श्रीहरी म्हणाले,
मया तेऽकारि मघवन् मखभङ्गोऽनुगृह्णता ।
मदनुस्मृतये नित्यं मत्तस्येन्द्रश्रिया भृशम् ।।
10.27.15 ।। श्री. भा.
स्पष्ट बोलले. इंद्रा तुझा यज्ञ मीच बंद करायला सांगितला. तुझ्यावर मला अनुग्रह करायचाय. कृपा करायची आहे. स्वर्गाचं राज्य आणि ऐश्वर्य मिळाल्यामुळे तू उन्मत्त झालास आणि या गरीब लोकांचा आणि प्राण्यांचा नाश करायचा तू प्रयत्न केलास. तुझ्यापुढे यांची काय शक्ती आहे? तुला असा सामर्थ्याचा अहंकार धारण करून चालणार नाही. ते स्थान तुला दिलंय ते असं...
वागण्याकरता नाहीये. शक्तीचा उपयोग असा करून उपयोग नाही.
शक्तानां भूषणं क्षमा ।।
खरा शक्तिसंपन्न जो आहे त्याच्याजवळ क्षमा असली पाहिजे. ती तुझ्याजवळ नाहीये. ऐश्वर्याचा मद ज्याला झालाय त्याचं लक्ष माझ्याकडे जात नाही. तो आपल्या अहंकारामध्येच निमग्न असतो. जा आपला अधिकार सांभाळ. दयाबुद्धी धारण करून सर्वांचं रक्षण कर. त्रैलोक्याचं रक्षण करण्याचा तुला अधिकार दिलेला आहे हे लक्षात ठेव. गोलोकातून ती कामधेनू गोमाता आलेली आहे. ती म्हणाली, देवा आमचे इंद्र आपणच आहात. या इंद्राने आमचा नाश करण्याचा प्रयत्न केला पण आपल्यामुळे आमचं संरक्षण झालेलं आहे. गाईंचा इंद्र म्हणजे गोविंद, हे नाव त्यावेळेपासून पडलेलं आहे. त्या कामधेनूने आपल्या दुधाने भगवंताला अभिषेक केला. इंद्रानेही ऐरावताच्या सोंडेतून आकाशगंगेचा अभिषेक केला आणि दोघेही आपापल्या स्थानाला निघून गेलेले आहेत.
एकदा एकादशी होती. नंद रात्रीच उठला आणि स्नान करण्याकरता मध्यरात्रीच नदीवर गेला. वरुणाचा दूत त्यावेळी जलक्रीडा करत होता. तो नंदाला पाण्यात ओढून वरुणलोकात घेऊन गेला. नंद स्नानाला गेला आणि परत आला नाही. हे सगळ्यांना कळल्यावर सगळे घाबरले. त्यांना वाटलं हा काय बुडाला काय नदीमध्ये? भगवंतांच्या कानावर ही बातमी पोचली. श्रीकृष्ण परमात्मा लगेच वरुणलोकात जाऊन पोचले. भगवंताजवळ ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती अप्रतिहत आहेत कधीही या शक्ती कमी होत नाहीत. वरुणाने लगेच सिंहासनावर बसवून त्यांची पूजा केली. नंद होताच तिथे. माझ्या दूताने आपल्या पित्याला आणलं, त्याला काही माहित नव्हतं. आपण मला क्षमा करा आणि आपल्या पित्याला घेऊन चला. नंदाला घेऊन गोपालकृष्ण नदीतून वर आले. आणि नंदाने सांगितलं, काय विलक्षण आहे. वरुणासारखे लोकपाल कृष्णाच्या पायावर डोकं ठेवतात. याने मला वरुणलोकातून इकडे आणलं. सर्वही लोकांच्या लक्षात आलं की हा वैकुंठपती आहे. तेव्हा वैकुंठलोक आम्हाला कधीतरी पहायला मिळेल काय? भगवंताने विचार केला, हे सर्व जीव जन्म-मृत्यू चक्रात सारखे अडकलेले आहेत. यांना कधी वैकुंठ लोक दिसणार? म्हणून भगवंताने प्रथम त्यांना आपलं स्वरूपज्ञान दिलं आणि वैकुंठलोकही दाखवला. सर्वांना अत्यंत आनंद झालेला आहे.
शुक्राचार्य आता रासक्रीडेचं चरित्र सांगताहेत. परमेश्वराजवळ स्त्री-पुरुष हा भेद नाही आहे.
सर्व सृष्टी ज्याने निर्माण केलेली आहे, सृष्टीचं कर्तृत्व ज्याच्याकडे आहे त्याला हा चांगला, हा वाईट असा किंवा कोणताच भेद नाहीये. गोपींची इच्छा आहे रासक्रीडा व्हावी म्हणून. त्यालाही संमती दिली भगवंताने. गोपालांचं रक्षण करायचं. यांचही रक्षण केलं पाहिजे. रक्षण म्हणजे त्यांच्या बुद्धीप्रमाणे, मनाप्रमाणे जर घडून आलं तर त्यांचंही समाधान आहे. अश्विन महिन्यातल्या पौर्णिमेला रात्रीच्या वेळी भगवान यमुनातीरावर आलेले आहेत आणि त्यांनी गायन करायला आरंभ केला. पूर्ण चंद्र उदयाला आलेला आहे. त्या स्वर्गीय गायनाचा आवाज गावामध्ये गोपींच्या कानावर पडलेला आहे. तो आवाज कानावर पडल्याबरोबर तो काममोह जो आहे. अनंग जीवनं, अनंगवर्धनम् म्हणताहेत. तो अनंग वाढलेला आहे चित्तामध्ये. गोपालकृष्णांना भेटण्याकरता गेलं पाहिजे. या तीव्र भावनेने सर्वही गोपी घराबाहेर पडलेल्या आहेत. सगळी हातातली कामं टाकून दिली. काही गोपी धार काढायला बसल्या होत्या, त्या गोपी चरवी तिथेच ठेवून निघाल्या. दूध तापवताहेत, स्वयंपाक करताहेत, मुलांना जेवायला वाढताहेत पण सगळी कर्म टाकून दिलेली आहेत. निघाल्या त्या सर्व गोपी. कुणाचीही आज्ञा मान्य नाही. पती, पुत्र, पिता, भ्राता सगळे स्वस्थ राहिलेले आहेत. परमात्मा श्रीहरी हा आपला प्रिय सखा आहे. तोच उपास्य आहे. त्याचंच ध्यान करायचंय. या प्रेमामुळे त्या गोपी मुक्त झालेल्या आहेत. राजाने विचारलं, महाराज! गोपींचं हे कृत्य धर्म म्हणायचं का?
कृष्णं विदुः परं कान्तं न तु ब्रह्म॑तया मुने ।
गुणप्रवाह उपरमस्तासां गुणधियां कथम ।।
10.29.12 ।। श्री. भा.
गोपालकृष्ण म्हणजे एक सुंदर राजपुत्र आहे. एवढीच त्यांची दृष्टी आहे. ह्या पांचभौतिक शरीरावर त्यांचं प्रेम आहे. त्रिगुणात राहणाऱ्या गोपी त्रिगुणातून बाहेर कशा पडल्या? संशय आहे. आधी गोपींबद्दल विचारतोय. कृष्णांना इतक्यात बोलला नाही राजा. पुढे बोलणार आहे. गोपींनी हे कर्म चांगले केलं नाही असं मला वाटतंय. शुक्राचार्य म्हणाले, राजा तुला पूर्वी शिशुपालाची कथा सांगितली आहे ना? जन्मभर भगवंतांचा द्वेष करणारा शिशुपाल मुक्त झाला मग प्रेम करणाऱ्या गोपींना मुक्ती मिळणार नाही? त्यांनी जे प्रतीक डोळ्यासमोर ठेवलेलं आहे तो परमात्मा आहे. इतर कोणावर त्यांनी प्रेम केलं असतं तर तो अधर्म झाला असता. पण त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या मनामध्ये सर्वदा परमात्म्याची मूर्ती आहे. त्याचा हा प्रभाव आहे. काम, क्रोध, द्वेष सगळं हरीबद्दल आहे. हरीबद्दल असताना हे विकार होत नाहीत. उलट अंतःकरण तन्मय होऊन जातं.
योगेश्वर श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती ज्यांनी मनामध्ये बाळगली, त्यांना मोक्ष कसा मिळाला हा संशय तू मनामध्ये बाळगू नकोस. सर्व गोपी आलेल्या आहेत. गोपालकृष्णांनी त्यांचं स्वागत केलं. "या" कशाकरता आलात? एवढ्या रात्रीच्या वेळेला घरदार सोडून इथे आलात? तुमचे माता-पिता, पती सगळे तुमचा शोध करत असतील, कुठे गेलात म्हणून? वनाची शोभा पाहिली आता तुम्ही घरी जा. तुमची मुलं तुमची वाट पहात असतील. माझ्यावरच्या प्रेमाखातर तुम्ही इथे आलात. सर्व जीव माझ्यावर प्रेम करतात. तुमचं कर्तव्य असं आहे.
भर्तुः शुश्रूषणं स्त्रीणां परो धर्मो ह्यमायया ।
तद् बन्धूनां च कल्याण्याः प्रजानां चानुपोषणम् ।।
10.29.24 ।। श्री. भा.
स्त्रियांचं हे कर्तव्य आहे की आपल्या पतीची सेवा करणं. पतीच्या आप्तबांधवांची सेवा करणं. मुलाबाळांचं संगोपन करणं. हे तुमचं प्रथम कर्तव्य आहे. कसाही दोषी पती असला तरी त्याचा त्याग स्त्रियांना करता येणार नाही आणि माझ्या जवळ राहून काय करणार? जवळ राहून प्रेम राहात नाही. दूर राहिलं तर प्रेम राहतं. जा तुम्ही घरी जा. तुमचं प्रेम तिथं राहूनच चांगलं राहील.
शुक्राचार्य महाराज सांगतात, राजा त्या गोपींनी हे ऐकल्याबरोबर त्यांना अत्यंत वाईट वाटलेलं आहे. अतिशय दुःख झालेल्या त्या गोपींच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहताहेत. त्या म्हणाल्या, देवा, केवढं कठोर भाषण आपण करता! आपल्या दर्शनाकरता आम्ही इथे आलो आणि आम्हाला घरी जायला सांगता? तुमच्या दर्शनाने संसारबंधनातून मुक्त होता येतं आणि तुम्ही आम्हाला संसारातच राहायला सांगता? कर्ममार्गच श्रेष्ठ आहे. शास्त्राची आज्ञाच श्रेष्ठ आहे. तुमचं दर्शन, सान्निध्य, चिंतन याचं काही फळ नाही का? सामर्थ्य नाही का? कशाला या पती-पुत्र संसारामध्ये आम्हाला पाठवता! आजपर्यंत आम्ही संसारात होतो पण आता मात्र आम्ही संसारातून बाहेर पडलेलो आहे. आम्हाला कशाचीही काळजी नाही. संबंधच नाही. आपलं दर्शन जर आम्हाला घडतंय तर हे सोडून आम्ही कसं जायचं? आम्ही जाऊ शकत नाही. भगवती लक्ष्मीदेवीला चंचल म्हणतात पण ती आपल्या चरणाजवळ आलेली आहे. स्थिर आहे. तेव्हा आता आम्हाला घरी पाठवू नका. आपली सेवा घडावी एवढीच आमची इच्छा आहे. असं त्या सर्वही गोपींनी निकरून सांगितल्यावर भगवान श्रीकृष्णांनी त्या गोपींबरोबर रासक्रीडेला सुरुवात केली. त्या शेकडो गोपी आहेत. तितकी रूपं भगवंताने घेतली आणि प्रभू रास रचताहेत. गोपींच्या मनामध्ये प्रेम आहेच. परंतु आता थोडा अभिमान उत्पन्न झाला की आम्ही सुंदर गोपी आहोत, आमच्या मोहजालात
गोपालकृष्ण आलेला आहे. आमच्या ताब्यात आला आहे. हा त्या गोपींचा अभिमान दूर करण्यासाठी आणि त्यांच्यावर प्रसाद करण्यासाठी भगवान एकदम अदृश्य झाले. त्या सर्व स्त्रिया घाबरल्या. इकडेतिकडे पाहताहेत. देहभान नाहीसं होऊन त्या शोध करीत निघाल्या. झाडाला विचारताहेत.
दृष्टो वः कच्चिदश्वत्थ प्लक्ष न्यग्रोध नो मनः ।
नन्दसूनुर्गतो हृत्वा प्रेमहासावलोकनैः ।।
10.30.5 ।। श्री. भा.
हे वटवृक्षा, आमचं मन हरण करून घेऊन गेला गोपालकृष्ण. तो तुम्हाला भेटला का? कुठंय सांगा.
आता त्या झाडांनी काय उत्तर द्यावं? पण कृष्णप्रेमामध्ये निमग्न झालेल्या गोपी कृष्णाशिवाय दुसरा विचारही त्यांच्या मनात नाही. त्यांना कुणाला विचारावं आणि कुणाला नाही याचंही भान राहिलं नाही. योग्य-अयोग्य विचार करण्यासारखी मनाची स्थिती नाहीये. पुष्कळ दूर गेलेल्या आहेत. पुढे गाढ अंधार आहे, दाट अरण्य आहे परत आल्या. कृष्णलीलेचंच संस्मरण करताहेत. आणि शेवटी कृष्णदर्शन झालं नाही म्हणून अत्यंत वियोगदुःख झालं आणि त्या दुःखावेशामध्ये त्यांनी भगवान कृष्णांची प्रार्थना करायला सुरुवात केली.
गोपी अत्यंत शोकाकुल झालेल्या आहेत. भगवंतांचं ते सगुण स्वरूप केव्हा आपल्याला दिसेल याची वाट पाहताहेत. ध्यानामध्ये आणताहेत आणि गोपालकृष्णांची प्रार्थना करताहेत. अत्यंत प्रेम त्या प्रार्थनेत आहे. ज्ञान ही आहे आणि प्रेमही आहे.
न खलु गोपिकानन्दनो भवान् ।
अखिलदेहिनाम् अन्तरात्मदृक् ।।
10.31.4 ।। श्री. भा.
बाह्य रूपाच्या ठिकाणी ही आसक्ती आहे. मुख्य जे रूप आहे, अंतरात्मा परमात्मा आहे. ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्यामुळे जगतरक्षणाकरता आपण हे रूप घेऊन आलात. त्या स्वरूपाचीही जाणीव आहे त्यांना पण मन तिथे टिकत नाही. मनाला हे रूप अत्यंत प्रिय आहे. आणि मन तिथे अत्यंत स्थिर आहे. भक्तिमार्गामध्ये समाधी लागण्याकरता प्रयत्न करावा लागत नाही. वैराग्य मिळवण्याकरता प्रयत्न करावा लागत नाही. इंद्रियनिग्रह करण्याकरता प्रयत्न करावा लागत नाही. अंतःकरणामध्ये प्रेम भरलेलं आहे, गोपालकृष्णाचं. संसार एकदम टाकून दिला त्यांनी. अनंत जन्माच्या वासना चित्तामध्ये होत्या त्या गेल्या. भगवंतांचं कथामृत हे संसारतप्त झालेल्या जीवांचं जीवन आहे. हे सगळं जाणताहेत. आपण देवा वनामध्ये जाता, एकेक क्षण म्हणजे आम्हाला
एकेक युगासारखा वाटतोय. संध्याकाळपर्यंत आपल्या मार्गाकडे लक्ष लावून आम्ही बसतो. आपलं दर्शन झालं म्हणजे समाधान वाटतं. कोमल, मृदू आपले चरण आहेत. अरण्यात आपल्या पायाला काटे टोचतात, दगड लागतात आणि आमच्या मनाला अत्यंत व्यथा होतात कारण तिथंच मन आहे ना? शरीराची शुद्धच राहात नाही. आपल्याला काही दगड लागला, काटा टोचला, इकडे लक्ष नाहीये. त्या भगवंताचंच अखंड चिंतन चाललेलं आहे. गोपी म्हणताहेत, देवा, आपल्या गायनाचा मोह आम्हाला झाला. आणि आम्हाला एकदम टाकून देऊन तुम्ही गेलात असं रात्रीचं? हे योग्य आहे का? अशी पुष्कळ प्रार्थना केलेली आहे आणि त्या रडू लागल्या. भगवान प्रकट झालेले आहेत. एकदम सगळा शोक त्यांचा गेला, उत्साहाने त्या उठलेल्या आहेत. जगामध्ये इष्टवियोग आणि अनिष्ट संयोग चाललेलंच आहे. त्याच्याबद्दल सुख, दुःख नको. पण भगवंतांचं दर्शन झालं की आनंद झाला पाहिजे आणि भगवंतांचा वियोग झाला की शोक झाला पाहिजे. त्यामुळे भगवंताने गोपींना शोकही दिलेला आहे. भगवंताने गोपींसमवेत रासक्रीडा सुरू केली. गौरवर्णाच्या गोपी आणि मेघश्याम कृष्ण. दोन गोपींमध्ये एक-एक गोपालकृष्ण दिसू लागले. इतकी रूपं धारण केली. त्या गोपी टिपऱ्या वाजवताहेत, नृत्य करताहेत. गायन चाललेलं आहे. असा तो बराच काळ त्यांचा खेळ चालला. सर्वांना घेऊन नदीतीरावर आले गोपालकृष्ण. सर्वांनी स्नान केलं आणि नदीकाठी वाळवंटात सर्व बसले. गोपींना थोडा राग आला होता. काय म्हणाल्या, सर्व घरदार सोडून आलो आणि याला आमची किंमत नाही? त्या बोलायला लागल्या
भजतोऽनुभजन्त्येक एक एतद्विपर्ययम् ।
नोभयांश्च भजन्त्येक एतन्नो ब्रूहि साधु भोः ।।
10.32.16 ।। श्री. भा.
नाव घेतलं नाही. गोपालकृष्णा, जगामध्ये एक वर्ग असा आहे लोकांचा की ते आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांवर प्रेम करतात. दुसरा एक वर्ग असा आहे लोकांचा की ते आपल्यावर कुणी प्रेम करो न करो ते सर्वांवर प्रेम करतात. आणि एक वर्ग असा आहे की आपल्यावर कुणी प्रेम करणारा असो, नसो तिकडे लक्षच द्यायचं नाही, उपेक्षाच करायची. अशी का आहे जगाची स्थिती? गोपालकृष्ण सांगताहेत.
मिथो भजन्ति ये सख्यः स्वार्थैकान्तोद्यमा हि ते ।।
10.32.17 ।। श्री. भा.
परस्पर एकमेकांवर प्रेम करणारे, एकमेकांच्या उपयोगी पडणारे दोघेही स्वार्थी आहेत. कुणाचंही प्रेम खरं नाही. त्याने केलं तर आपण करायचं. पण दुसरा वर्ग जो तुम्ही काढला की