« Previous | Table of Contents | Next »
पान ३८१

दुसऱ्यावर निरपेक्ष प्रेम करायचं, हे खरं प्रेम आहे. मायपित्यांचं प्रेम असं आहे. मुलाने कितीही अपराध केले, किंवा प्रेम केलं नाही तरी त्यांचं प्रेम काही कमी होत नाही. तिसरा वर्ग उपेक्षा करणारा तुम्ही काढलात त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत.

आत्मारामश्चाप्तकामाः अकृतज्ञा गुरुद्रुहः ।।
10.32.19 ।। श्री. भा.

त्यांच्यात चार वर्ग पडतात. आत्मारामात जे मग्न आहेत, त्यांचं जगाकडे लक्षच नाही. कोण प्रेम करतो कोण नाही, म्हणून त्यांची उपेक्षा आहे. "आत्मार्थे पृथ्वीं त्यजेत् ।।" आत्मलाभ व्हावा म्हणून जे प्रयत्न करतात त्यांचंही लक्ष नाहीये. कृतघ्न जे लोक आहेत ते उपेक्षा करतात आणि अत्यंत कठोर वृत्तीचे, तामसी वृत्तीचे लोक त्यांचंही लक्ष नसतं, तेही उपेक्षा करतात. यापैकी कोणत्या वर्गात तुम्ही मला घातलेलं आहे? मला तुम्ही आत्माराम म्हणता, आत्मकाम म्हणता, अकृतज्ञ म्हणता का तामसी म्हणता? मी असं वागतो कधीकधी की भक्तांनासुद्धा दर्शन देत नाही पण त्याला कारण आहे. त्यांचं प्रेम वाढावं म्हणून मी असं करतो. मी समोर दिसलो की तेवढ्यापुरतं प्रेम असणं हे काही खरं नाही. अदृश्य राहून, तुमच्या अंतःकरणात केवढं प्रेम आहे हे मला पहायला मिळालं. भगवान बोलून गेले,

न पारयेऽहं निरवद्यसंयुजां
स्वसाधुकृत्यं विबुधायुषापि वः ।
या माभजन दुर्जरगेहशृंखलाः
संवृश्च्य तद् वः प्रतियातु साधुना ।।
10.32.22 ।। श्री. भा.

या गोपींनी माझ्यावर जे शुद्ध प्रेम केलंय त्या प्रेमाचा मी उतराई होऊ शकणार नाही. त्याची परतफेड मी करू शकणार नाही. यांनी संसार तोडून टाकला आणि माझ्या भजनाकडे लागलेल्या आहेत. माझ्याठिकाणी चित्त स्थिर केलं. पुन्हा त्यांच्यावर उपकार करायचीही मला इच्छा नाहीये. कारण उपकार करण्याची इच्छा होणं म्हणजे त्यांच्यावर संकट येण्याची इच्छा करण्यासारखं आहे. हनुमानाला रामरायांनी हेच सांगितलं. हनुमंता, केवढे उपकार माझ्यावर तू केलेले आहेस. सीतेचा शोध लावलास, सेतूबंधन झालं, आम्हाला सर्वांना घेऊन गेलास. अनेक राक्षस मारलेस, लक्ष्मणाला जीवदान दिलंस. हे तुझे उपकार माझ्याठिकाणी जिरून जाऊ दे. त्यांची परतफेड करण्याची पाळी मला येऊ नये कारण तशी इच्छा करणं म्हणजे तुझ्यावर संकट येण्याची इच्छा करण्यासारखं आहे. मारुतीवर संकट

***
पान ३८२

कधीही येऊ नये तो नित्य सुखी राहावा ही रामांची इच्छा आहे. तसं भगवान श्रीकृष्ण गोपींना सांगताहेत. समाधान झालं गोपींचं. पहाट झाली. भगवंतानी गोपींना घरी जायला सांगितलं. चंद्रास्त झाला आहे. सगळ्या गोपी आपापल्या घरी गेलेल्या आहेत. हे सगळं चरित्र ऐकलं परीक्षित राजाने आणि त्याने विचारलं, गुरुमहाराज,

संस्थापनाय धर्मस्य प्रशमायेतरस्य च ।
अवतीर्णो हि भगवान् अंशेन जगदीश्वरः ।।
10.33.27 ।। श्री. भा.
स कथं धर्मसेतूनां वक्ता कर्ताभिरक्षिता ।
प्रतीपं आचरद् ब्रह्मन् परदाराभिमर्शनम् ।।
10.33.28 ।। श्री. भा.

धर्माची स्थापना करावी, धर्माचं रक्षण करावं, अधर्माचा नाश करावा याकरता भगवान अवतार घेऊन आलेले आहेत. आणि परस्त्रियांबरोबर त्यांनी रासक्रीडा केली हा अधर्म झाला नाही का? धर्माच्या रक्षणाकरता अवतार घ्यायचा आणि आपण अधर्म करायचा हे बरोबर आहे का? आपण मला गोपालकृष्णांचं चरित्र सांगताहात परंतु या चरित्राबद्दल मला संशय निर्माण झाला आहे. शुक्राचार्य थोडे रागावले. किती सांगायचं म्हणाले याला. त्यांनी थोडं रागातच उत्तर दिलं

धर्मव्यतिक्रमो दृष्टः ईश्वराणां च साहसम् ।
तेजीयसां न दोषाय वह्नेः सर्वभुजो यथा ।।
10.33.30 ।। श्री. भा.

कृष्णांनी अपराध केला असं तुला म्हणायचंय काय? काय वाटेल ते करतील. पाप-पुण्याच्या पलिकडे गेलेले श्रेष्ठ पुरुष आहेत ते. तुला कल्पना आहे का त्या परमेश्वराच्या सामर्थ्याची? पेटलेल्या अग्नीमध्ये ओलं लाकूड टाका, वाळलेलं लाकूड टाका. तो सगळं जाळून टाकतो आणि पुन्हा प्रदीप्त राहतो. तशी यांची स्थिती आहे. हे लक्षात आण तू आणि मग विचार असे प्रश्न. मनाने सुद्धा अशा लोकांच्या या कर्माचा असा विरुद्ध विचार करू नये. श्रीकृष्णांसारख्या श्रेष्ठ पुरुषाने रासक्रीडा केली म्हणून इतर जीव जर तसं करायला जातील तर त्यांचा नाश होईल. समर्थ पुरुषांचं तंतोतंत आचरण करण्यास आपण असमर्थ असतो. समुद्रातून उत्पन्न झालेलं विष भगवान शंकरांनी प्राशन केलं म्हणून दुसरा जर तसं करायला जाईल तर तो मरेल. श्रेष्ठ पुरुष जसं सांगतात तसं वागावं. त्यांच्या आचरणाप्रमाणे आचरण करू नये. त्यांच्या वागण्यातलं जे मनाला पटेल, जे

***
पान ३८३

शास्त्राप्रमाणे असेल तेवढंच घ्यावं. विरुद्ध असलेलं घेऊ नये. ज्ञानी महात्म्यांना पुण्यापासून काही सुख मिळवायचं नसतं आणि पाप जरी घडलं किंवा तसं वाटलं तरी त्यापासून त्यांना काहीही नुकसान होत नाही. ही इतर ज्ञानी लोकांची अवस्था आहे. मग हा तर परमेश्वर आहे. सर्व जीवांचा अंतर्यामी परमात्मा आहे, सर्वांचा नियामक परमात्मा आहे. त्याला पापपुण्यांचा काहीही संसर्ग नाही. जीवात्म्यांचा उद्धार करण्याकरता हा परमात्मा अवतार घेतो. भगवंतांचं अखंड ध्यान, चिंतन करणारे ऋषी हे सुद्धा एखादे वेळेला वाटेल तसं वागतात. पण त्यांनाही त्या कर्माचा संबंध नाही. कर्मबंधन तुम्हाला आहे. जोपर्यंत जीव अहंकारी आहे तोपर्यंत कर्मबंधन आहे. ज्याला भेद दिसतो आहे. चांगलं-वाईट ज्याला दिसतंय त्याला कर्मबंधन आहे. सर्व गोपगोपींच्या अंतःकरणात राहणारा जो परमात्मा आहे त्याची ही क्रीडा आहे. हा एक विचार मनामध्ये धारण कर. सर्व प्राणिमात्रांवर अनुग्रह करण्याकरता भगवान आलेले आहेत. ते क्रीडा करताहेत. त्या क्रीडा श्रवण करायच्या, त्यांचं चिंतन करायचं. गुण-दोष कुठल्याही दृष्टीने त्यांच्याकडे बघायचं नाही हे लक्षात ठेव. असं त्याला समजावून सांगितलं आणि विचारलं, काय रे राजा तुझ्या लक्षात हे कसं आलं नाही, सगळ्या स्त्रिया रात्रीच्या वेळी घराबाहेर होत्या. ते गोपाल शोध करत का आले नाहीत? शोध करत असताना नदीतीरावर येऊन का पाहिलं नाही? त्यांनी आपल्या बायकांबरोबर रासक्रीडा करतो म्हणून कृष्णाला शासन का केलं नाही? हे नाही विचारलंस तू? परीक्षित म्हणाला, काय झालं महाराज?

नासूयन् खलु कृष्णाय मोहितास्तस्य मायया ।
मन्यमानाः स्वपार्श्वस्थान् स्वान् स्वान् दारान् व्रजौकसः ।।
10.33.38 ।। श्री. भा.

सगळ्या गोपी घरामध्येच आहेत. हे घरच्यांना दिसतंय. राग यायचं कारण काय? गोपींच्या दिव्य भावाला प्रतिसाद देऊन भगवंतांनी अनुग्रह करण्याचं ठरवलं. त्यामुळे गोपी घरातही आहेत आणि वृंदावनातही आहेत. संत सखुबाईला पांडुरंग दर्शनाची तळमळ लागलेली आहे. पण पतीने आणि सासूने कोंडून ठेवलेलं आहे. पांडुरंग आलेले आहेत, म्हणाले, जा बाई, संतंमंडळी निघालेली आहेत. त्यांच्याबरोबर पंढरपूरला जा आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊन ये. तिला पाठवलं आणि स्वतः पांडुरंग तिचं रूप घेऊन, स्वतःला बंदिवान करून त्या अंधारकोठडीत राहिलेले आहेत. अनंतजन्म, संसाराच्या वासनेत अडकलेल्या जीवाला, कुठल्यातरी जन्माच्या पुण्याईने किंवा संतांच्या कृपेने जर अंतःकरणात

***
पान ३८४

भगवत्प्रेम निर्माण झालं तर त्या प्रेमाप्रमाणे फळ द्यायला भगवंतांशिवाय दुसरा कोण समर्थ आहे? तिथे शास्त्र आड येणार नाही, व्यवहार आड येणार नाही. गोपींचंही तसंच आहे. भगवंतांचं सान्निध्य मिळावं, त्यांची सेवा घडावी, तन्मय व्हावं. नुसतं बाहेर राहून तन्मय होणं निराळं आणि सन्निध राहून तन्मय होणं निराळं. शृंगाररस जरी असला तरी त्या रसामध्ये चित्ताची उन्नत्ती होण्याचा मार्ग आहे. सर्वही प्रेम म्हणा, सुख म्हणा हे या विषयापासूनच मिळतं आहे. अशी जरी कल्पना झाली तरी ते सुख किंवा तो आनंदही आत्मानंद आहे असा एक सिद्धांत आहे. वस्तुतः विषयांपासून आनंद मिळतच नाहीये. विषयांपासून अंशभूत आनंद मिळतोय तर पूर्ण आनंदरूप असलेल्या परमात्म्यापासून केवढा आनंद मिळेल हा खरा आनंद आहे. गोपींनी सर्व संसार सोडलेला आहे. नरकाची भीती नाही, धर्म-शास्त्राची भीती नाही, स्वकीयांची भीती नाही. त्या म्हणतात, आमचं चित्त जर परमेश्वराकडे लागलेलं आहे सारखं तर ते दुसरीकडे वळवायचं कसं? असे विचार मनामध्ये आहेत आणि आमचा मार्ग निंद्य नाहीये. हा विश्वास आहे. भगवंतांची अनुमती आहे ना त्याला. राजाने बाह्यदृष्टीने विचार केलाय. पण त्यांची मनोवृत्ती कशी आहे. गोपींची मनोवृत्ती कशी आहे तर भगवान श्रीकृष्ण प्रत्यक्ष परमात्मा आहे आणि आपला अनंत जन्मांचा सखा आहे. भगवंतांची मनोवृत्ती कशी आहे, तर जीव हे माझंच प्रतिबिंब आहे. मीच सर्वत्र भरून राहिलेलो आहे. राजा, तुम्हाआम्हाला असं मनामध्ये वाटेल का? सर्वात्मभाव ज्यांचा झालेला आहे त्यांची बुद्धी निराळी आणि अज्ञानात, भेद बाळगणाऱ्यांची बुद्धी निराळी. ह्या गोपी भगवत्प्रेमामुळे सर्व बंधनांच्या पलिकडे गेलेल्या आहेत. त्या गोपींची योग्यता तुझ्या लक्षात आली नाही आणि भगवान कृष्णांची तर नाहीच नाही. उगीच आक्षेप घेतोस राजा.

गोपी पुन्हा घरी परत आल्या. म्हणजे होत्याच तिथे, त्या अदृश्य झाल्या आणि या आल्या. शुक्राचार्य महाराज या रासक्रीडा चरित्राची फलश्रुती सांगताहेत.

विक्रीडितं व्रजवधूभिरिदं च विष्णोः ।
श्रद्धान्वितोऽनुशृणुयादथ वर्णयेद्यः ।।
भक्तिं परां भगवति प्रतिलभ्य कामं ।
हृद्रोगमाश्वपहिनोत्यचिरेण धीरः ।।
10.33.40 ।। श्री. भा.

गोपी ज्याप्रमाणे निष्ठा ठेवून होत्या. त्यांच्या मनातलं ईश्वरप्रेम, ईश्वरभक्ती कोणालाही घालवता आलेली नाही. शुक्राचार्यांसारखे ब्रह्मज्ञानी महात्मे त्रिगुणातीत झालेले, त्यांना गोपींचं

***
पान ३८५

माहात्म्य सांगावसं वाटलं, सांगणारे ते आहेत हा ही विचार केला पाहिजे. या चरित्रावर आक्षेप घेणारे ज्यांना भगवान काय आहेत, भगवद्भक्त काय आहेत, त्यांची मनःस्थिती काय आहे. भक्तीमार्ग काय आहे. याबद्दल काहीही माहिती नाही. संस्कारही तसे नाहीत. त्यांनी नुसतं वरवर पाहून असे आक्षेप घेणं हे चांगलं नाही. परीक्षित राजालासुद्धा शुक्राचार्यांनी गप्प बसायला सांगितलं. तुझा अधिकार नाही म्हणाले, ऐकून घे, श्रद्धा ठेव. हे चरित्र जे वर्णन करतात, श्रवण करतात त्यांचा काम नष्ट होतो हे याचं फळ आहे. रासक्रीडाचरित्र रोज चिंतन करणारा निष्काम होऊन जातो.

शुक्राचार्य सांगतात, राजा, एकदा काही देवीची यात्रा होती. सर्व गोपाल मंडळी दर्शनाकरता गेली. रात्री तिथेच मुक्काम केला सर्वांनी. रात्री झोपलेले असताना एक अजगर आला आणि नंदाचा पाय धरून ओढून न्यायला लागला. नंद ओरडायला लागला. गोपाल काठ्या मारताहेत, पेटती लाकडं टाकताहेत तरी त्याच्यावर काही परिणाम नाही. गोपालकृष्ण आले, त्याला नुसता पाय लावला. एकदम त्याच शरीर पडलेलं आहे आणि दिव्य शरीर त्याला प्राप्त झालं. सुदर्शन नावाचा विद्याधर होता तो. तो सांगायला लागला, मी सुंदर, सुस्वरूप होतो याचा मला अहंकार झाला. एकेदिवशी अंगिरा ऋषी माझ्या दृष्टीला पडले. त्यांचं वाकलेलं अंग आणि कुरूप शरीर पाहून मी हसलो, तेव्हा त्यांनी मला शाप देऊन सर्पयोनीत पाठवलं. आज आपल्या पदस्पर्शाने माझा उद्धार झालेला आहे. ही भगवंतांची शक्ती आहे.

या प्रमाणे अनेक लीला चाललेल्या आहेत भगवंतांच्या. दिवसभर गोपालकृष्ण अरण्यात असायचे. ह्या गोपी आपली कामंधामं आटोपून एकत्र जमायच्या आणि भगवंताच्या लीलांचं गुणवर्णन करायच्या. पुढं एकदा कंसाच्या आज्ञेप्रमाणे अरिष्टासुर नावाचा राक्षस बैलाचं रूप धारण घेऊन गोकुळात आला. तो मोकाट आहे. नाकात वेसण नाही. मोठ्याने ओरडत फिरतो आहे. सगळे लोक घाबरले. श्रीकृष्णांना ते कळलं. ते बाहेर पडले. त्याला म्हणाले, यांना कशाला भीती दाखवतोस? माझ्या समोर ये. तुझं काय सामर्थ्य आहे दाखव. मित्राच्या खांद्यावर एक हात ठेवला आणि त्या राक्षसाला आव्हान दिलं. तो राक्षस शिंग पुढे करून मारायला आला. आल्याबरोबर त्याची दोन शिंगं पकडली आणि त्याला जोराने मागे ढकलून दिलेलं आहे. तो पडला. पुन्हा धावत धावत आला. त्याची शिंगं धरून त्याला खाली पाडलं भगवंतांनी आणि शरीर जसं एखादं वस्त्र पिळावं त्याप्रमाणे

***
पान ३८६

त्याला पिळून टाकलं. त्याचा प्राण जायला किती वेळ लागणार? अरिष्टासुराचा नाश झाल्याची वार्ता कंसाला समजली. एकेक दैत्य जातो म्हणाला गोकुळामध्ये आणि त्याचा नाशच होतो. कोण आहे हा? असा तो विचार करत असताना नारदमुनी आकाशमार्गाने त्या राजसभेत येऊन पोचले. कंसाने त्यांचं स्वागत केलं. पूजा केली. नारद म्हणाले, का रे कंसा, तुला हे राम-कृष्ण कोण आहेत अजून कळलं नाही? तुझं हेर खातं काय करतंय? अरे, देवकीचा आठवा मुलगा म्हणजेच कृष्ण आहे आणि रोहिणीचा मुलगा बलराम हा देवकीचा सातवा मुलगा आहे. आणि देवकीची आठवी मुलगी देवकीची तू समजलास. पण ती योगमाया होती. वसुदेवाने तुझ्या भीतीने आपल्या दोन्ही मुलांना गोकुळात नंदाच्या घरी ठेवलं आहे. नंदाला सुद्धा हे माहित नाही. मग तुला कसं माहित असणार? कंस रागाने तलवार उपसून म्हणाला, आत्ताच्या आत्ता वसुदेवाला ठार मारतो. नारद म्हणतात, फार शहाणा आहेस. वसुदेवाला मारून काय होणार आहे? जे शत्रू आहेत त्यांच्याकडे लक्ष देशील का वसुदेवाकडे लक्ष देशील? लगेच वसुदेव देवकीची रवानगी तुरुंगात झाली. देवाचं पालक होणं फार कठीण आहे. देवाचं सान्निध्य पाहिजे असेल तर हे सगळं भोगण्याची तयारी पाहिजे. शेवटीही देव सोडूनच गेले. कुठं बरोबर नेलं. कंसाला आता खरी हकीकत समजल्यावर त्याचे प्रयत्न सुरू झाले. केशी नावाच्या दैत्याला त्याने आज्ञा केली की गोकुळात जाऊन त्या दोघांची हत्या कर.

सर्व मंत्रीमंडळाला बोलावून सांगितलं, वसुदेवाची दोन मुलं गोकुळात आहेत असं मला आत्ताच नारदांकडून समजलेलं आहे. त्यांच्यापासून माझा मृत्यू आहे असं देवांनी ठरवलं आहे. त्या दोघांना मथुरेत आणायचं आणि त्यांचा नाश करायचाय. सर्व मल्लांना बोलवून मल्लयुद्ध करायचं त्याने ठरवलं. त्यानिमित्ताने त्यांना बोलवायचं. कुवलयापीड नावाच्या हत्तीकडून दरवाजाधेच त्यांना मारण्याचा प्रयत्न करायचा अशी सगळी योजना कंसाने केली. धनुषयाग ठरला. शिवधनुष्याची पूजा करायची ठरलं. आणि अक्रूरजींना बोलावणं पाठवलं. कंस सांगतोय, अक्रूरजी तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही माझे आत्मीय आहात. माझं एक काम करा. वसुदेवाने आपली दोन मुलं गोकुळात नंदाकडे ठेवलेली आहेत. त्या दोघांना मथुरेत घेऊन या. हा माझा रथ घेऊन जा. त्यांना सांगा धनुषयाग आहे, मल्लक्रीडा आहे आणि तुमच्या मामाला तुम्हाला पहाण्याची फार इच्छा आहे. त्याला आज समजलं की तुम्ही गोकुळात आहात नाहीतर मागेच बोलावलं असतं तुम्हाला. यानिमित्ताने मथुरा राजधानी पहायला मिळेल. असं सांगून घेऊन या. कंस मोठा

***
पान ३८७

राजनीतिज्ञ होता. सगळं त्याने बोलून दाखवलं. आणि अक्रूरजीवर विश्वास आहे. मंत्री म्हणजे राजाशी झालेलं सर्व भाषण गुप्त ठेवणारा असा त्याचा अर्थ आहे. कंस पुढे सांगतोय, अक्रूरजी, त्या मुलांना इथे आणल्यानंतर कुवलयापीड हत्तीला दरवाज्यामध्ये उभं करणार आहे. ते आत येताना दरवाजाधेच हत्तीकडून त्यांना मारण्याचा पहिला प्रयत्न असणार आहे. त्यातून ते आत आले तर माझ्याकडे असणाऱ्या चाणूर, मुष्टिक वगैरे बलाढ्य मल्लांकडून त्यांचा नाश करायचा. नंतर माझा पिता उग्रसेन, वसुदेव, देवकी यांचा नाश मी करणार आहे त्यामुळे माझं राज्य निष्कंटक होऊन जाईल. मी अजरामर होईन. कुणाचीच भीती मला राहणार नाही. अक्रूरजींनी हे ऐकून घेतलं. त्यांनी सांगितलं राजेसाहेब,

दैवं हि फलसाधनम् ।।
10.36.38 ।। श्री. भा.

दैवाने सर्व कार्य होतं आहे. आपण पुष्कळ मनोरथ करतो आणि दैव जर अनुकूल नसेल तर व्यर्थ हर्ष-शोकामध्ये पडावं लागतं. आपली आज्ञा आहे. मी त्यांना घेऊन येतो. पुढं तुमचं तुम्ही पहा. अक्रूरजी निघून गेले. शुक्राचार्य सांगतात, राजा,

केशी तु कंसप्रहितः खुरैर्महीं
महाहयो निर्जरयन् मनोजवः ।।
10.37.1 ।। श्री. भा.

केशी दैत्याने मोठ्या घोड्याचं रूप घेतलं आणि तो गोकुळात शिरलेला आहे. जोरजोरात ओरडतो आहे, फिरतो आहे. गोपालकृष्ण त्याच्यासमोर आले आणि त्याला आव्हान केलं. तो एकदम धावत आला आणि त्याने कृष्णांना लाथ मारली. हे एकदम बाजूला झाले. तो प्रहार चुकला. आणि कृष्णांनी त्यालाच जोराने फेकून दिलं. तो लांब जाऊन पडला. पुन्हा सावध झाला तो दैत्य आणि मुख उघडून कृष्णांना चावण्याकरता तो आला असताना कृष्णांनी आपला हात त्याच्या मुखामध्ये घातला. तो हात एकदम मोठा केला कृष्णांनी त्यामुळे त्याचा श्वास बंद झाला आणि प्राण गेलेला आहे. काही विशेष प्रयत्नही कृष्णांना करायला लागला नाही. देवर्षी नारद कृष्णांना भेटण्याकरता आले. म्हणाले, भगवंता, इथे राहून पुष्कळ दैत्य आपण मारले. आता अजूनही बरंच कार्य बाकी आहे. ते आम्हाला पहायला मिळेल. भूमीला भार झालेले अनेक दैत्य आहेत, त्यांचा नाश आपल्याला करायचाय. आपलं दिव्य चरित्र आम्ही पाहू. आणि दिव्य आनंद उपभोगू. आपण साक्षात परमेश्वर आहात. नियामक आहात. अशी प्रार्थना करून

***
पान ३८८

आणि भगवंताला वंदन करून नारदमहर्षी निघून गेले. दुसऱ्या दिवशी अक्रूरजी राम-कृष्णांना मथुरेला नेण्याकरता गोकुळात येऊन पोचले. संध्याकाळच्या वेळी गोकुळात आले. मध्ये कुठे तरी स्नानसंध्या करण्याकरता थांबले असतील. आपल्या गाईंना घेऊन राम-कृष्ण नुकतेच रानातून परत आलेले होते. अक्रूरजींना कृष्णांची पावलं उमटलेली दिसली. वज्र, अंकुश, कमल ही चिन्हं त्या पावलांमध्ये उमटलेली होती. ती पावलं उठलेली पाहिल्याबरोबर अक्रूरजींचं देहभान हरपलं. त्यांनी खाली उडी मारली आणि त्या पावलांमध्ये ते लोळू लागले.

हरेः अमूनि अंघ्रिरजांसि अहो इति ।।
10.38.26 ।। श्री. भा.

हरीचा चरणस्पर्श झालेले हे रजःकण आहेत. पवित्र करणारे आहेत. जन्मजन्मांतराचं पातक या स्पर्शाने नाश पावतं आहे. येणारेजाणारे लोक पाहताहेत. याला काय झालं म्हणाले. मातीमध्ये लोळतो आहे. त्यांना काय कल्पना असणार? अक्रूरजींची मनोभूमिका कुणीकडं आणि गाई राखणाऱ्यांची मनोभूमिका कुणीकडं? नंदाच्या वाड्यामध्ये अक्रूरजी आले. राम-कृष्ण गाईची धार काढायला बसले होते. पीतांबरधारी आहेत गोपालकृष्ण आणि नीलांबरधारी राम आहेत. राम-कृष्ण सामोरे आले. कृष्णांनी सांगितलं रामांना, अक्रूरजींची पूजा करायला. त्याप्रमाणे पूजा केली, पाय धुतले, सत्कार केला. त्यांना गोदान दिलं. मधुपर्क पूजा केली. भोजन झालेलं आहे आणि मंडळी बोलत बसली. भगवान श्रीहरींनी विचारलं, अक्रूरजी काय मथुरेत राहणारे सर्व यादव, आमचे मातापिता सर्व कुशल आहेत ना? आमचा हा मामा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कुणाच्याही सुखाची इच्छा नाही. आमच्यामुळे आमच्या माता पित्यांना संकटं भोगावं लागतात. अजूनही त्यांच्यामागचा तुरुंग सुटत नाही. काय करायचं? आमच्यामुळे त्यांची मुलं मारली गेली. त्यांना बंधनामध्ये पडावं लागलं. आज आपण कशाकरता आलात ते सांगा. अक्रूरजी सांगताहेत, कंसाच्या मनामध्ये यादवांबद्दल भयंकर द्वेष आहे. त्याने पुष्कळ यादवांना निर्वासित करून पाठवून दिलेलं आहे. त्यांची घरंदारं पाडलेली आहेत. आज तुम्हाला आणण्याकरता मला पाठवलेलं आहे. पण त्याच्या मनात तुम्हाला मारायचं आहे. हत्तीकडून, मल्लांकडून मारण्याची सर्व व्यवस्था झालेली आहे. असे त्याचे विचार आहेत. श्रीकृष्ण म्हणाले, असू दे. उद्या जायचं ना? कंसाचं पाहून घेता येईल. गोपालकृष्ण नंदाला म्हणाले, पिताजी, राजाचं बोलावणं आलेलं आहे. अक्रूरजी रथ घेऊन आलेले आहेत. तेव्हा गेलं पाहिजे. आपण सर्वच जाऊया मथुरेला. आम्हालाही राजधानी पहायची

***
पान ३८९

आहे. मल्लयुद्धही पहायला मिळेल. नंदानेही सर्व गोपालांना आज्ञा केली की दुसऱ्या दिवशी राम-कृष्णांबरोबर मथुरेला जायचं आहे. राजाला द्यायला नजराणा घ्या. गाड्या जुंपून तयार रहा. गोपींच्या कानावर ही बातमी गेली.

गोप्यस्तास्तदुपश्रुत्य बभूवुर्व्यथिता भृशम् ।
रामकृष्णौ पुरीं नेतुं अक्रूरं व्रजमागतम् ।।
10.39.13 ।। श्री. भा.

मथुरेहून राम-कृष्णांना न्यायला अक्रूर आलेला आहे, हे त्यांनी ऐकलं. काय करायचं? त्यांचं कुठेच लक्ष लागेना. अन्नाकडे लक्ष नाही, कामाकडे लक्ष नाही. आता काय होणार उद्या? सकाळी रानात जाणारे गोपालकृष्ण निदान संध्याकाळी तरी परत येत होते. मथुरेला गेल्यानंतर आता परत कशाला येतील? त्या सृष्टिकर्त्यालाच दोष देताहेत, काय ब्रह्मदेवा, का अशी सृष्टीमध्ये व्यवस्था तुम्ही करता की प्रेमळ जीवांना एकत्र आणता आणि पुन्हा त्यांचा वियोग घडवता? अक्रूर याचं नाव कुणी ठेवलं? किती क्रूर आहे हा. आमचे प्राणच हा घेऊन चाललेला आहे. हा नंदकुमार श्रीकृष्ण याचंही मन बरोबर नाही.

क्षणभंगुरसौहृदः ।।
10.39.22 ।। श्री. भा.

याचं प्रेम टिकावू नाहीये. दिखाऊ आहे. सर्व घरदार मुलं सर्व सोडून आम्ही याच्यावर प्रेम केलं आणि याला नगरात रहाण्याची इच्छा झाली काय? आमचा त्याग करून हा जातोय. आता काही भगवंताचं दर्शन होणार नाही. त्यांनी ठरवलं, आपण यांना जाऊ द्यायचं नाही. रथासमोर आडवं पडायचं आणि राम-कृष्णांना नेऊ द्यायचं नाही. सकाळ झाली. भगवंताच्या लीलांचं गायन गोपी करताहेत. इतक्यात नंदादिक गोपाल गाड्या जुंपून पुढे आले. अक्रूरजींचही आन्हिक झालेलं आहे. त्यांचाही रथ नंदाच्या वाड्यासमोर येऊन उभा राहिला. गोपालांच्या गाड्या चालू लागल्या आणि राम-कृष्ण अक्रूरजींच्या रथात बसले. सगळ्या गोपी समोर येऊन उभ्या राहिल्या. काही बोलले नाहीत गोपालकृष्ण. कुणाला तरी सांगितलं की त्या गोपींना जाऊन सांगा की राजाने बोलावलं म्हणून आम्ही जातोय. पुन्हा भेटायला आम्ही येऊ. आणि अक्रूरजींना सांगितलं, शक्य तितक्या लवकर घोड्यांना इशारा करा. रथ लवकर निघू द्या. थोडा वेळ जर तुम्ही थांबला तर पुढे काय होईल सांगता येत नाही. ह्या गोपी काय करतील याचा नेम नाही. अक्रूरजींनी लगेच घोड्यांना इशारा केल्याबरोबर रथ वेगाने चालू झालेला आहे. त्या गोपी पाहताहेत. रथ दिसेनासा

***
पान ३९०

झाला. ध्वज दिसतोय. तोही दिसेनासा झाला. आता फक्त धुराळा दिसतोय. तोही दिसेनासा झाला. अत्यंत निराश झालेल्या गोपी आपल्या घरात परत आलेल्या आहेत. आणि भगवंतांच्या लीलांचं चिंतन करताहेत. मनानेच आता भगवंतांचं सान्निध्य आहे. भगवान आता प्रत्यक्ष दिसणार नाहीत.

यमुना नदीच्या तीरावर अक्रूरजींचा रथ आलेला आहे. थांबवला त्यांनी. मी म्हणाले, स्नान करून येतो तुम्हीही पाणीबिणी पिऊन येऊन बसा. ते दोघेही बंधू रथामध्ये बोलत बसले. अक्रूरजींनी पाण्यामध्ये बुडी मारल्यावर पाण्यामध्ये त्यांना राम-कृष्ण दिसायला लागले. वर डोकं करून त्यांनी पाहिलं तर रथात दोघांच्या गोष्टी चाललेल्या आहेत. पुन्हा पाण्यात बुडी मारल्यावर

सहस्रशिरसं देवं सहस्रफणमौलिनम् ।
नीलाम्बरं बिसश्वेतं शृंगैः श्वेतमिवस्थितम् ।।
10.39.45 ।। श्री. भा.

एक सहस्रफणांचा शेषभगवान त्याठिकाणी दिसतो आहे. नीलांबरधारी आहे. आणि त्याच्या त्या शेषशय्येवर घनश्याम पीतांबरधारी, चतुर्भुज असे भगवान पडलेले आहेत. स्वस्थ आहेत.

शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम् ।।

अशा प्रकारचं दिव्यरूप त्यांनी पाहिलेलं आहे. अत्यंत भक्तीभाव चित्तामध्ये प्रकट झालेला आहे आणि त्यांनी त्यावेळी नारायणाची पुष्कळ स्तुती केलेली आहे. अक्रूरजीही मोठे अधिकारी होते. अनेक अवतार धारण करून जगताचं रक्षण आपण केलं. आपल्याला नमस्कार असो. अशी प्रार्थना केली. एकदम ती माया बंद झाली. ते दृश्य दिसेनासे झालं. अक्रूरजी स्नान आटोपून रथाकडे आले. आल्याबरोबर गोपालकृष्णांनी विचारलं, काय अक्रूरजी, काही आश्चर्यकारक गोष्ट तुम्हाला बघायला मिळाली का? भूमीवर, आकाशामध्ये का पाण्यामध्ये? अक्रूरजी म्हणाले, काय देवा विचारताय? जगामध्ये सगळीच अद्भुत कृती आहे आपली. आपलंच दर्शन मला पाण्यामध्ये झालं. गोपालकृष्ण हसले फक्त. रथ पुन्हा निघालेला आहे. गोपालांच्या गाड्या अगोदरच येऊन मथुरेबाहेरच्या एका उद्यानात थांबल्या होत्या. सगळे गोपाल, कृष्णाची वाट पहात होते. अक्रूरजी तिथे येऊन पोचले. गोपालकृष्ण म्हणाले, अक्रूरजी, सांगा तुमच्या राजाला मी राम-कृष्णांना घेऊन आलो म्हणून. अक्रूरजी म्हणाले देवा आपण इथेच राहणार. आमच्या वाड्यात चला. गोपालकृष्ण म्हणाले, तुमच्या वाड्यामध्ये जर मी उतरलो तर त्या कंसाचा विश्वास तुमच्यावर बसेल का? आज येता येणार नाही. यादवांचा द्वेष करणाऱ्या कंसाचा नाश झाल्यावर मी तुमच्याकडे

« Previous | Table of Contents | Next »