येईन. आज तुम्ही जा. अक्रूरजींनी येऊन कंसाला सांगितलं की राम-कृष्णांना आणलेलं आहे आणि ते नगराबाहेर उतरलेले आहेत.
राम-कृष्णांनी विश्रांती घेतली आणि संध्याकाळच्या सुमारास गोपालांसह मथुरा नगरी पाहण्याकरता निघाले. यादवांची मोठी नगरी ती होती. हजारो मोठे मोठे वाडे आहेत. मोठे मार्ग आहेत. मध्ये मध्ये उपवनं आहेत. पहात चाललेले आहेत. राम-कृष्णांची कीर्ती अगोदरच मथुरेपर्यंत पसरली होती. आज ते नगरात आलेत हे कळल्याबरोबर सर्वही स्त्रीपुरुष घराच्या दरवाजामध्ये, गच्चीवर उभे राहून त्यांचं दर्शन घेताहेत.
जाता जाता रस्त्यामध्ये कंसाच्या परीटाची गाठ पडली. राजवस्त्रं घेऊन तो राजवाड्यामध्ये निघाला होता. आता इथं हे गुंजांच्या माळा, खेड्यातली वस्त्रं कशी चालणार? राजवेष पाहिजे. त्याला हाक मारली, अरे इकडे ये. तुझी गाठोडी सोड आणि आमच्या अंगाला येणारी वस्त्रं आम्हाला दे. घेऊ काय? देणार काय? हा प्रश्नच नाही. तोही उद्धट होता. तुम्ही गवळी लोक ही वस्त्रं मागता? ही राजवस्त्रं मागता? मिळणार नाहीत. त्याच्या जोराने थोबाडीत मारली, तो मरूनच गेला. त्याचे नोकरचाकर पळून गेले. राम-कृष्णांनी आपल्या अंगाला साजेशी वस्त्रं निवडली. तिथे एक शिंपी आलेला आहे त्याने त्यांच्या अंगाला बसतील अशी ती पुन्हा शिवून दिली. बाकीची वस्त्रं आपल्या बरोबरच्या गोपालांना वाटून टाकली. उत्तम राजवस्त्रं मिळालेली आहेत. नगरामध्ये असंच राहिलं पाहिजे.
वैराग्य कुठं दाखवायचं, कुठं नाही हे कळलं पाहिजे. दाखवायचं वैराग्य निराळं. खरं वैराग्य अंतःकरणात पाहिजे. भगवान श्रीहरींचं वागणं निराळं आणि भगवान सदाशिवांचं वागणं निराळं. दाखवण्याकरता कोणतंच नाही. त्यांनी जरी पोषाख केला, अलंकार घातले तरी अंतःकरणात काही नाही. पण लोकांनी व्यवहार कसा पाळला पाहिजे हे शिकवताहेत. सदाशिवांचं इकडे लक्ष नाही. स्मशानातलं भस्म धारण करतील, सर्प धारण करतील, काहीही करतील. असंगता, ज्ञान, शक्ती दोन्ही ठिकाणची सारखीच आहे. बाहेरचं रूप वेगळं आहे.
एका माळ्याने राम-कृष्णांना उत्तम सुगंधित पुष्पमाळा घालायला दिल्या. पुष्पगुच्छ दिले. जाता जाता रस्त्यामध्ये कंसाची दासी कुब्जा राजवाड्यामध्ये चंदनाची उटी घेऊन निघाली होती. तिला उत्तम ज्ञान त्याचं होतं की त्याप्रमाणे काही औषधं मिसळून अंगाला लेप दिला की तापसुद्धा जायचा. पूर्वीचे प्रघात, आचरण यांच्यामध्ये काही कल्याणाचं साधन असायचं. भगवंतांनी विचारलं, बाई, आम्ही आत्ताच उन्हातून आलो, फार त्रास झाला. तुमची ही चंदनाची उटी आम्हाला अंगाला
लावायला देता का? तिलाही आनंद झाला. म्हणाली, घ्या घ्या देवा, आपल्याकरताच आहे. दोघांनीही ती उटी लावली. त्या कुब्जेचं शरीर तीन ठिकाणी वाकडं होतं. तिला काहीतरी फळ द्यायला पाहिजे ना. तिच्या जवळ गेले गोपालकृष्ण, तिच्या दंडांना धरलं, तिच्या पायावर आपला पाय ठेवला आणि तिला सहज वर उचलल्यासारखं केलं. तिचं शरीर सारखं झालेलं आहे. सुंदर शरीर तिला मिळालं. कोण आहे सज्जन असं करणारा? आनंद झाला त्या स्त्रीला. तिने विनंती केली, देवा, आमच्या वाड्यामध्ये उतरा. गोपालकृष्ण म्हणाले, आम्ही प्रवासी आहोत. कुठंही उतरू शकतो पण आज नाही. पुन्हा केव्हातरी तुमच्या वाड्यात येऊन जाईन.
निघाले पुढं. प्रत्येक दुकानामध्ये, व्यापाऱ्याने राम-कृष्णांचा सत्कार केलेला आहे. धनुष्याची जागा कुठंय याची चौकशी करताहेत. त्या धनुष्याच्या रक्षणाकरता कित्येक सैनिक कंसाने ठेवले होते. ते धनुष्य पहाण्याकरता गेले कृष्णभगवान. हातात घेतलं आणि थोडंसं वाकवल्याबरोबर ते मोडून गेलं. ते सैनिक अंगावर धावून आले. राम-कृष्णांनी त्या धनुष्याचे दोन तुकडे करून त्यांनीच सर्व सैनिक मारून टाकलेले आहेत. आणि गावाबाहेर उपवनामध्ये जिथे उतरले होते तिथे येऊन पोचले.
कंसाला रात्रभर झोप नाहीये. मृत्यू जवळ आलेला आहे. हे कळण्याकरता शास्त्राने काही चिन्हं सांगितली आहेत.
अदर्शनं स्वशिरसः प्रतिरूपे च सत्यपि ।।
10.42.28 ।। श्री. भा.
समोर आरसा ठेवलेला आहे. कंसाने पाहिलं, आपलं खालचं शरीर दिसतंय पण मुख मात्र दिसत नाही. मृत्यू जवळ आलेला आहे. हे कुणी करून बघायचं नाही हं. भीतीने तसं वाटण्याचा संभव आहे. आयुष्य असताना सुद्धा.
प्राणघोषानुपश्रुतिः ।।
10.42.29 ।। श्री. भा. (संदर्भ अंदाजित)
कान झाकल्यानंतर प्राणवायू जो चालू आहे त्याचा आवाज ऐकायला येत असतो तो कंसाला ऐकू येईना.
स्वपदानां अदर्शनम् ।।
10.42.29 ।। श्री. भा.
स्वतःचे पाय त्याला दिसेनांत. ही सगळी दुश्चिन्हं आहेत. सकाळी उठल्याबरोबर त्याने सगळी ठरलेली व्यवस्था करायला सांगितली. सर्व मंडळी येऊन बसली. मल्ल आलेले आहेत. कंसही भीतीग्रस्त मनाने सिंहासनावर येऊन बसलेला आहे. वाद्यं वाजताहेत. सगळे गोपाल पुढे गेलेले
आहेत. दूध वगैरे पिऊन राम-कृष्ण निघाले. अक्रूरजींनी सांगितलंच होतं की दारामध्ये कुवलयापीड नावाचा हत्ती उभा करणार आहेत.
सहस्रद्विपसत्वभृत् ।।
10.43.39 ।। श्री. भा.
त्या हत्तीमध्ये एक हजार हत्तींचं बळ होतं. आणि या हत्तीकडून राम-कृष्णांचा नाश करायचा अशी माहुताला आज्ञा आहे. मुद्दाम कंसाच्या आज्ञेने तो उभा केलेला आहे आणि याच्याकडून राम-कृष्णांचा नाश करायचा अशी त्याला आज्ञा आहे. दरवाजामध्ये आल्याबरोबर पाहिलं कृष्णांनी, सांगितलं माहुताला, हा तुझा हत्ती बाजूला कर म्हणाले, आम्हाला आत जायचंय आणि नाहीतर तू आणि तुझा हत्ती, दोघेही जिवंत राहणार नाहीत, लक्षात ठेव. पण तो कसा ऐकणार? ही लहान मुलं आहेत, ही काय करणार आहेत? ह्या अहंकारातच सगळे गेले. हत्तीला अंकुशाने प्रेरणा केल्याबरोबर, तो हत्ती राम-कृष्णांच्या अंगावर धावून गेलेला आहे. राम बाजूला उभे राहिले. कृष्ण भगवानांनी त्याचं शेपूट हातामध्ये घेतलं, त्याला ओढायला लागले, हत्तीला पुढे जाताही येईना. बरंच पाठीमागे ओढून आणलं. पुढे आले. त्याच्या पायाखालून गेले. तो हत्ती पाहतोय. सापडेना आणि समोर येऊन त्याच्यासमोर एकदम पडल्यासारखं दाखवायचं. पडले गोपालकृष्ण, हत्तीने एकदम आपला दात मारला. मोहरा केला. हे बाजूला झाले आणि लगेच त्याला धक्का देऊन खाली पाडलं. त्याच्या शरीरावर जाऊन त्याचा एक दात जोराने उपटून घेतला. आणि हत्तीला प्रहार केला. माहुतालाही मारलेलं आहे. दोघेही मरून गेलेले आहेत. तो दात खांद्यावर घेऊन गोपालकृष्ण निघाले. बलरामांनीही दुसरा दात उपटून घेतला. खांद्यावर, आणि दोघेही आत आलेले आहेत. कंसाच्या कानावर ही बातमी गेली. हत्ती मारला गेला. राम-कृष्ण हे सुरक्षित राहिले. अंगावर रक्त सांडलेलं आहे हत्तीचं. सर्व मंडळी, मल्लयुद्ध पहायला आलेली, राम-कृष्णांचं दर्शन त्यांना झालेलं आहे. त्यांनाही इच्छा होती. आज दर्शन झालं. सर्वांनाही समाधान झालेलं आहे. इतक्यात तो चाणूर नावाचा जो मुख्य मल्ल होता, तो आलेला आहे "रामा, कृष्णा, तुम्ही अरण्यात राहणारे लोक! आणि कुस्तीचं तुम्हाला उत्तम शिक्षण असलं पाहिजे. कुस्त्या तुम्ही करता असं ऐकलंय राजेसाहेबांनी, म्हणून तुम्हाला बोलावलंय म्हणाले. राजेसाहेबांना कुस्ती पहाण्याची फार हौस आहे. राजाची इच्छा पूर्ण केली म्हणजे, प्रजाजनांचं कल्याण असतं म्हणाले तेव्हा आपण मल्लयुद्ध करावं, अशी राजेसाहेबांची इच्छा आहे. "कृष्णभगवान म्हणाले, "काही हरकत नाही, राजेसाहेबांची इच्छा आहे तर, आमच्याबरोबरीची जी लहान मुलं आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही मल्ल क्रीडा करू
म्हणाले. कुस्ती करू." चाणूर म्हणाला, "तू काय लहान आहेस काय? येताना आत्ता तू सहज त्या हत्तीला मारून आलास. आणि स्वतःला लहान म्हणवतोस? माझ्याबरोबर तुला मल्लयुद्ध करावं लागेल आणि बलरामांच्याबरोबर हा मुष्टिक जो आहे तो युद्ध करेल. भगवान श्रीहरी हे त्या आखाड्यामध्ये उतरलेले आहेत. चाणूर आणि श्रीकृष्ण यांची कुस्ती सुरू झाली. बलराम आणि मुष्टिक यांची कुस्ती सुरू झाली. कंस वरती बसलेला आहे सिंहासनावर. सर्व मंडळी पाहताहेत. ते दोघेही मोठे पराक्रमी आहेत. चाणूरही मोठा मल्ल आहे. विष्णू सहस्रनामामध्ये "चाणूरांध्रनिषूदनाय" असा एक पाठ आहे. म्हणजे हा आंध्रप्रांतातला मल्ल असला पाहिजे. एकमेकांना हातांनी मारताहेत, पायांनी मारताहेत, मस्तक मस्तकावर आपटताहेत, चाललेलं आहे ते मल्लयुद्ध. सर्वही मंडळी पाहताहेत, त्यांना चिंता उत्पन्न झाली, काय हे राजाने मल्लयुद्ध सुरू केलेलं आहे, एक लहान मुलगा आणि एक मोठा मल्ल. कसं व्हायचं? ही जोडी बरोबर आहे का? आणि त्यावेळचं मल्लयुद्ध म्हणजे, पराजय कुणाचा झाला - म्हणजे जो मरून गेला, मेला जो त्याचा पराजय झाला आणि जिवंत राहिला तो विजयी झाला, असं ते मल्लयुद्ध आहे. नुसती पाठ लागली जमिनीला म्हणजे त्याचा पराजय झाला, असं नाहीये. सर्व लोकांना चिंता उत्पन्न झाली. राजाला ते दोष देताहेत. असं बराच वेळ ते मल्लयुद्ध झालेलं आहे. आणि चाणूर दमला. कृष्णांच्या छातीवर त्याने मूठ मारली जोराने, यांनीही चाणूराच्या दोन दंडाना धरून वर उचललं आणि खाली जोराने आपटलेलं आहे, चाणूराचा प्राण निघून गेला. बलरामांनीही मुष्टिकाला मारून टाकलेलं आहे. आणखी काही मल्ल आले पण बाकीचे सगळे पळून गेलेले आहेत भीतीने. आपल्याबरोबरीची गोपालमंडळी, त्यांना बोलावलं, राम-कृष्णांनी, त्यांच्याबरोबर आणखी मल्लयुद्ध चालू आहे. पुष्कळ मल्ल मारले. वाद्यं वाजायला लागली. सर्व लोक टाळ्या वाजवताहेत, प्रशंसा करताहेत, गोपालकृष्णांची, रामाची. कंस एकदम रागाने उठून उभा राहिला, वाद्यं बंद करा म्हणाला. हा जो वसुदेव आहे, आणि उग्रसेन आहे, या दोघांनाही ठार मारा. बडबड करायला लागला. प्राण जाण्याची वेळ आलेली आहे. एकदम रागाने गोपालकृष्णांनी त्याच्याकडे पाहिलं आणि त्या आखाड्यातून एकदम वर उडी मारली, कंसाच्या सिंहासनासमोर. तो ही उठलेला आहे, तलवार उपसलेली आहे. पण त्याला धरलं गोपालकृष्णांनी. त्याला धरून उचललं, जोराने त्याला खाली टाकून दिलेलं आहे आणि त्याच्या अंगावर आपण उडी मारली. फक्त एवढंच केलं. त्यांच्या हातात काही शस्त्र नाहीये. पण तो कृष्णांचा भार त्याला सहन झाला नाही. कृष्णांनी एकदम जोराने टाकल्यामुळे त्या कंसाचे प्राण निघून गेलेले आहेत. कंसाचे आठ भाऊ एकदम धावून आले, कृष्णांना मारण्याकरता. बलरामजी
सावध होते. त्यांनी त्या आठ बंधूंना ठार मारून टाकलेलं आहे. संपला, विरोध संपलेला आहे. गोपालकृष्ण, बलराम वर आलेले आहेत. वसुदेव देवकींना तुरुंगातून मुक्त करून आणलेलं आहे. उग्रसेन राजालाही तुरुंगात टाकलं होतं कंसाने. त्यालाही मुक्त केलं, आणखी उग्रसेन राजाला सांगताहेत भगवान गोपालकृष्ण, "राजेसाहेब, हे राज्य आपलं आहे. आपण राज्य करा, आम्ही तुमचे सेवक आहोत. साहाय्य आमचं होईलच. देवसुद्धा तुमच्या विरुद्ध वागणार नाहीत. मी तुमचं संरक्षण करीन." याप्रमाणे उग्रसेनाला आश्वासन दिलं, राज्याभिषेक त्याला करवलेला आहे. पुढं त्या सगळ्या कंसाच्या स्त्रिया रडताहेत. त्यांचं समाधान केलेलं आहे, करवलेलं आहे. आणखी देवकी वसुदेवांना तुरुंगातून बाहेर आणलं. ते बसलेले आहेत. जन्मापासून आत्तापर्यंत कधी त्यांनी कृष्णाला, रामाला पाहिलेलं नाही. रामाला तर पाहिलंच नाही, गर्भातूनच तो बाहेर गेला. कृष्ण जन्माला आल्याबरोबर त्यांना गोकुळात नेऊन ठेवलं. अकरा वर्ष गेली. अकरा वर्षानंतर गोकुळातून हे परत आले. पाहताहेत. ही मुलं नाहीत, साक्षात परमेश्वर आहेत. त्यांच्या अनंत लीला त्यांनी ऐकल्या होत्या आणि कंसासारखा, दहा हजार हत्तीचं ज्याला सामर्थ्य आहे, अशा प्रकारचा कंस एका क्षणामध्ये मारला गेला म्हणाले, हे काही सामान्य माणसाचं काम नाही. हे काही सामान्य आमच्यासारखे जीव नाही आहेत, परमेश्वर आहेत. वसुदेव देवकींच्या मुखातून वाणी निघेना, दर्शन झालेलं आहे, आनंद झालेला आहे, वियोग संपलेला आहे; मुलं भेटलेली आहेत. पण काय बोलायचं? स्वस्थ बसून राहिले.
पितरावुपलब्धार्थौ विदित्वा पुरुषोत्तमः ।
मा भूदिति निजां मायां ततान जनमोहिनीम् ।।
10.45.1 ।। श्री. भा.
ईश्वर समजताहेत आम्हाला? ईश्वर असून ईश्वर समजणं काही दोष आहे का? नाही म्हणाले, आम्ही आता ईश्वर म्हणून इथे काम करणार नाहीये. यांची मुलं म्हणून राहणार आहोत. पुण्याई आहे यांची. आपली माया त्यांनी टाकली. हात जोडलेले आहेत गोपालकृष्णांनी, "आई, पिताजी, आमच्याकडून तुमची सेवा आत्तापर्यंत काहीही घडली नाही, बालपण आहे, किशोरवय आहे. इतकं वय आमचं गेलं पण आमचं दुर्दैव असं आड आलं की तुमची, मातापितरांची सेवा काही आम्हाला करता आली नाही. ज्यांच्यामुळे हा देह आम्हाला मिळाला, ज्यांनी आमचं पोषण केलं, त्या मायपित्यांच्या ऋणातून कुणीही मुलगा मुक्त होणार नाही. माता पिता, त्याचप्रमाणे आपली साध्वी भार्या, मुलगा यांचं संरक्षण करणं हे कर्तव्य आहे सर्वांचे. पण कंसाच्या भीतीने
आम्ही गोकुळात जाऊन बसलो म्हणालो. व्यर्थ आमचं आत्तापर्यंत आयुष्य गेलेलं आहे. आमच्या अपराधाची आपण क्षमा करा, आशीर्वाद द्या म्हणाले. मायेने मनुष्यरूप धारण करून आलेला परमात्मा, विश्वरूपी, त्याची ती वाणी ऐकलेली आहे. - लोकसंग्रहाकरता आहे. सर्वांनी मातापितरांबद्दल कशी वृत्ती ठेवली पाहिजे हे सांगण्याकरता आहे. - प्रेमाने जवळ घेतलं, दोघांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहताहेत. काही बोलणं झालं, नाही मातापितरांचं समाधान केलं. उग्रसेन राजाला राज्याभिषेक केलेला आहे. कंसाच्या भीतीने घरदार सोडून गेलेल्या परप्रांतात गेलेल्या सगळ्या यादवांना बोलावून आणलेलं आहे. त्यांना जे जे साहाय्य पाहिजे ते ते सर्व केलेलं आहे. घरंदारं बांधून दिली, सगळी त्यांची व्यवस्था केली. संघटना ही पाहिजे ना! आणि आता झालेली ही संघटना निश्चितच आहे. कंसाने त्रास दिल्यामुळे जावं लागलं, आज आपण पुन्हा परत आलो. हा पुढारी आपल्याला मिळालेला आहे. सर्वही यादव मंडळी अत्यंत संघटित अशी राहिलेली आहेत.
बाहेर आलेले आहेत. नंदराजाला भेटले राम-कृष्ण. भगवान सांगताहेत, "पिताजी, आपण आमचं पालनपोषण आत्तापर्यंत केलेलं आहे. स्वतःच्या देहापेक्षा आपल्या मुलावरती मातापितरांचं प्रेम अधिक आहे म्हणाले. जा आपण आता गोकुळामध्ये चला. आम्हाला आता इथे राहिलं पाहिजे, कामं आहेत आता पुष्कळ. हे मोठं राज्य आहे. व्यवस्था लावली पाहिजे. सगळ्यांना भेटण्याकरता आम्ही सवडीने येऊन जाऊ म्हणाले. सांगा सर्वांना." त्यांचं सांत्वन केलं, आता काही मांडलिक राजा, सार्वभौम राजा असं काही नातं राहिलेलं नाही. त्याला पुष्कळ वस्त्रं, अलंकार सर्व दिलेलं आहे. सत्कार केला आणि त्याला जायला सांगितलं. नंद आपल्या सगळ्या गोपालांना घेऊन निघालेले आहेत. डोळ्यातून अश्रुधारा वाहताहेत. पुन्हा केव्हा भेट होईल राम-कृष्णांची, काही नियम नाही.
वसुदेवाने आपल्या या दोन मुलांचं उपनयन केलेलं आहे, गर्गाचार्यांना बोलावून आणून. गाईंचं दान केलं. कृष्णजन्माच्या वेळेला, मनाने ज्या दहा हजार गाई देण्याचं ठरवलं होतं, त्या दहा हजार गाई यावेळेला दिलेल्या आहेत. आता सगळं स्वातंत्र्य आहे. उपनयन झाल्यानंतर, राम-कृष्ण दोघेही विद्याभ्यास करण्याकरता उज्जयिनी नगरीत आलेले आहेत. सांदीपनी गुरुमहाराजांच्या आश्रमात येऊन राहिले. विद्याभ्यास चाललेला आहे. सांदीपनी गुरुमहाराजही त्यांची शुद्ध भक्ती, त्यांची प्रज्ञाशक्ती पाहून अत्यंत संतुष्ट झालेले आहेत. सर्व वेद, सर्व उपनिषदं वगैरे सर्वही त्यांनी शिकवलेलं आहे. धनुर्वेद सर्व शिकवलेला आहे. राजनीती, सर्वही विद्या त्यांना दिलेल्या आहेत. सर्व विद्या
ज्यांच्यापासून निघालेल्या आहेत, ते विद्याभ्यास करताहेत, त्यांना विद्याभ्यास करायला किती वेळ लागणार आहे? चौदा विद्या आणि चौसष्ट कला. चौसष्ट दिवसांमध्ये सगळ्या कला शिकले. कोणत्या कला आहेत, काय, कल्पनासुद्धा नाहीये. फुलाची माळ कशी करावी, ही सुद्धा एक कला आहे. द्रौपदीला ती माहिती होती, सगळं शिकलेली होती. विराट राजाच्या नगरामध्ये त्या राणीची ती दासी म्हणून राहिली होती. तिला उत्तम फुलांच्या माळा, गजरे वगैरे करून द्यायची ती. पाय तेवढे कुणाचे
धुणार नाही म्हणाली. बाकीचं काम करीन, तिने अगोदरच सांगितलं होतं. अशा सगळ्या कला - ह्या सर्व कलांचं, विद्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. आणखी त्यांनी प्रार्थना केली, "गुरुमहाराज, काय आता गुरुदक्षिणा काय द्यायची?" त्यावेळेला गुरुदक्षिणा नंतर द्यायची पद्धत होती. आत्ता अगोदरच डोनेशन मागतात, विद्याभ्यास करू दे विद्यार्थी नाहीतर सोडून जाऊ दे. सर्व विद्या विद्यार्थ्याला दिल्यानंतर, पूर्ण ज्ञानसंपन्न तो झाल्यानंतर, त्यांनी विचारायचं. काय गुरुदक्षिणा पाहिजे विचारताहेत. काय त्यांची विलक्षण प्रज्ञा पाहिली. विद्या ग्रहण करण्याला त्यांना विलंबच नाही. सर्व विद्या त्यांना माहितीच आहेत असं वाटलं सांदीपनी गुरुमहाराजांना. 'अतिमानुषी मती' म्हणतात, मनुष्याची अशी बुद्धी नाही. पत्नीचा विचार घेतला काय मागायचं यांच्याजवळ, वाटेल ती गुरुदक्षिणा देतील हे. तुझी काय इच्छा आहे. ती म्हणाली, आमचा एक मुलगा गेलेला आहे ना? तो मुलगा आणून द्यायला सांगा. समुद्रात बुडून गेलेला आहे. सांगितलं सांदीपनी गुरुमहाराजांनी, असा असा एक मुलगा गेला आहे म्हणाले. आलेले आहेत राम-कृष्ण समुद्रकिनारी. समुद्रामध्ये शोध केला आणि तिथून यमलोकाला ते आलेले आहेत. यमलोकात आल्याबरोबर आपला तो पांचजन्य शंख वाजवला, समुद्रात मिळालेला. यमधर्म आलेले आहेत. त्यांनी दोघांचीही पूजा केलेली आहे. हात जोडून विचारलं, "काय आज्ञा आहे महाराज?" भगवान म्हणाले, "यमा, आमच्या गुरुजींचा मुलगा इथे आणलेला आहे ना? त्याच्या कर्माचं फळ आहे. नरकाला जाणं दुःख भोगणं, सुख भोगणं. ते प्रारब्धकर्माचं फळ भोगण्याकरता इथे आणलेलं आहे. त्या
गुरुपुत्राला नेण्याकरता आम्ही आलेलो आहोत. तो आणून द्या म्हणाले." यमधर्म काय बोलणार! तो नेमलेला अधिकारी होता, हे सर्वाधिकारीच आहेत, आणला त्या गुरुपुत्राला. त्याला घेऊन पुन्हा सांदीपनी गुरुमहाराजांच्याजवळ आले, "महाराज, हाच तुमचा मुलगा ना? घ्या म्हणाले. आणखी काही पाहिजे असेल तर सांगा." आनंद झालेला आहे. यमाच्या नगरात गेलेला पुत्र प्रारब्धकर्माच्या बंधनात पडलेला गुरुपुत्र, त्याला प्रारब्धकर्मबंधनातून मोकळं केलं, यमाच्या बंधनातून मुक्त केलं ही ईश्वराची शक्ती आहे. ही शक्ती ज्यांच्या मनामध्ये पक्की आहे. ईश्वरशक्तीबद्दल ज्यांचा पूर्ण विश्वास आहे त्यांना यमाची भीतीही काही बाळगण्याचं कारण नाही. आशीर्वाद दिलेला आहे सांदीपनी गुरुमहाराजांनी. "तुमच्यासारख्यांचा जो गुरु झालेला आहे त्याची कोणतीही इच्छा शिल्लक राहात नाही. जा आपल्या घरी जा. तुमची पवित्र कीर्ती सर्वत्र पसरून राहील. तुमचं ज्ञान हे तेजस्वी राहील. चांगलं राहील" आशीर्वाद दिलेला आहे. रथामधे बसून, आपल्या नगरामध्ये, मथुरा राजधानीमध्ये सर्व आलेले आहेत. आनंद झालेला आहे सर्वांना; राम-कृष्णांचं दर्शन झालेलं आहे.
यादवांचा एक श्रेष्ठ मंत्री म्हणजे उद्धवजी. राजमंत्री होते. बृहस्पतीचे शिष्य आहेत. राजनीतीचा अभ्यास त्यानी बृहस्पतीपासून केलेला आहे. उद्धवजी भगवंताचा एकनिष्ठ भक्त आहे. त्याच्याजवळ बोलत बसलेले आहेत भगवान. "उद्धवजी, एक काम आहे म्हणाले. तुम्ही एकदा गोकुळामध्ये जाऊन या. त्या गोपींना भेटून या. त्यांच्या मनाचं समाधान करा. मी इकडे आल्यामुळे त्यांना अत्यंत दुःख झालेलं आहे. मन, प्राण सगळं त्यांनी मला अर्पण केलेलं आहे. देहाकडे लक्ष नाही. खाण्यापिण्याकडे लक्ष नाही सर्व व्यवहार धर्म सगळे त्यांनी सोडलेले आहेत. कशाची त्यांना भीती नाही. त्या गोकुळवासी ज्या गोपी आहेत. अत्यंत दुःख भोगताहेत. त्यांचं समाधान करा, माझा एकंदर संदेश सांगा त्यांना, येणार आहे म्हणावं मी. मनाचं समाधान करून या."
उद्धवजी भगवंतांच्या आज्ञेप्रमाणे गोकुळामध्ये आलेले आहेत. नंदाच्या वाड्यामध्ये गेलेले आहेत. नंदाची भेट झाली. नंदाने त्यांचा सत्कार केलेला आहे. भोजन झालेलं आहे आणि बोलत बसले. नंदजी विचारताहेत
कच्चित् महाभाग सखा नः शूरनन्दनः ।
आस्ते कुशल्यपत्याद्यैर्युक्तो मुक्तः सुहृद्वृतः ।।
10.46.16 ।। श्री. भा.
"आमचा मित्र वसुदेव हा कुशल आहे ना? त्याची मुलं बाळं, त्याची मित्रमंडळी सर्वांचं कुशल आहे ना? कंसाचा नाश झाला ईश्वरेच्छेनं, त्याचे सगळे अनुयायीही मारले गेले. यादवांचं संरक्षण झालेलं आहे. गोपालकृष्णांना आमची आठवण होते का उद्धवजी? त्याच्या आईची तरी त्याला आठवण होते का? त्याची मित्रमंडळी आहेत. ह्या गाई आहेत. हे वृंदावन आहे. हा गोवर्धन पर्वत आहे. इथे त्याने लीला केलेल्या आहेत. त्याचं स्मरण त्याला आहे का? तो गोविंद ह्या आपल्या लोकांना भेटण्याकरता येणार आहे का एकदा तरी. केव्हा आम्हाला त्याचं मुख पहायला मिळेल. दावाग्नीपासून आमचं रक्षण केलं. पर्जन्यवृष्टीपासून आमचं रक्षण केलं. कालिया नागापासून रक्षण केलं. अनेक संकटं आमच्यावर आली, श्रीकृष्णांनी आमचं रक्षण केलेलं आहे. त्याचं स्मरण झाल्याबरोबर सर्व आमची कामं थांबतात."
सर्वाः नः शिथिलाः क्रियाः ।।
10.46.21 ।। श्री. भा.
केवढं स्मरण आहे त्यांना देवाने दिलेलं. ज्या ज्या ठिकाणी आम्ही पहावं तिकडं मुकुंदाचं स्मरण होतंय. असं नंदजी सांगताहेत. यशोदा नुसती ऐकतीये. डोळ्यातून अश्रुधारा वाहताहेत. उद्धवजी म्हणाले, "नंदजी, यशोदामाई तुम्ही किती पुण्यवान आहात. मनुष्यदेह तुम्हाला मिळाला पण नारायण जो परमात्मा त्याची भक्ती, प्रेम तुमच्या अंतःकरणामध्ये मिळालेलं आहे, देवाने दिलेलं आहे. तुमचा जन्म धन्य झालेला आहे. राम-कृष्ण हे विश्वेश्वर आहेत. सर्व विश्वाला उत्पन्न करणं, पालन करणं, उपसंहार करणं हे त्यांचं कार्य अखंड चालू आहे. प्राणवियोगाच्या वेळेला या भगवंताचं स्मरण ज्याला होतंय तो या सर्व त्रिगुणात्मक संसारातून मुक्त होतो आहे. त्या नारायणाची भक्ती, प्रेम, भाव तुमच्या चित्तामध्ये उत्पन्न झालेला आहे, आणखी काय पुण्य पाहिजे म्हणाले? हेच तुमचं पुण्य आहे. येणार आहेत कृष्ण, भगवंतांनीच सांगितलंय तुम्हाला सांगायला. येऊ म्हणाले, लवकर आम्ही येऊ, भेटू असं सांगितलंय आणि भेटायचं म्हणजे, तो नाही कुठे? सर्व ठिकाणीच आहे उद्धवजींचं जरासं ह्या ज्ञानमार्गाकडे लक्ष होतं. देवाचंही वर्णन केलं. तुमची भक्ती मोठी आहे, तुम्ही धन्य आहात असंही सांगितलं आणि पुन्हा ज्ञान सांगायला लागले. सर्व ठिकाणी आहे परमेश्वर! वियोग कुठे आहे म्हणाले असंही सांगीलं. याप्रमाणे रात्रभर बोलत बसलेले आहेत.
प्रभातकाल झाला. त्या सगळ्या गोपी उठलेल्या आहेत. दही घुसळण्याचं काम चाललेलं आहे. भगवंताच्या लीलांचं गायन चाललेलं आहे. अंतःकरण भगवंताकडे आहे. वाणीनं त्याचं
वर्णन चाललेलं आहे ते लीलागायन त्या आवाजाने सर्व दशदिशांचं अमंगल नष्ट झालं असं शुक्राचार्य सांगताहेत. काम झालेलं आहे. सूर्योदय होऊन गेलेला आहे. बाहेर आल्या गोपी आणि नंदाच्या दरवाजामध्ये एक रथ उभा आहे असं त्यांना दिसले. उद्धवजी संध्याकाळी आले होते त्यामुळे गोपींना काही कळलं नाही. त्या म्हणाल्या, हा रथ कुणाचा आलेला आहे? काय पुन्हा अक्रूर आला काय म्हणाल्या, आणि आता अक्रूराचं काय काम आहे? काय घ्यायचं ते, आमचे प्राण घेऊन गेला म्हणाल्या. गोपींना मुख्य भेटण्याचं काम होतं, उद्धवजींना, सर्व आन्हिक आवरून उद्धवजी गोपींना भेटण्याकरता बाहेर पडले. गोपी उभ्याच होत्या. पीतांबरधारी, अगदी आजानुबाहू हा भगवंताचा भक्त आलेला आहे हे त्यांना समजलं. त्याही आल्या जवळ, नमस्कार केला उद्धवजींना त्यांनी आणि बोलण्याकरता त्या सर्व गोपी बसल्या. उद्धवजीही बसले. त्या गोपी बोलायला लागलेल्या आहेत. उद्धवजींना अवसरच मिळाला नाही.
जानीमस्त्वां यदुपतेः पार्षदं समुपागतम् ।
भर्त्रेह प्रेषितः पित्रोर्भवान् प्रियचिकीर्षया ।।
10.47.4 ।। श्री. भा.
रागावलेल्या आहेत. सात्विक कोप आहे. देवाने आम्हाला सोडून जायला नको होतं असं त्यांना वाटणारच! आपल्या भक्तीवर, आपल्या प्रेमावर त्यांचा विश्वास आहे. अभिमान नाही हा. त्या म्हणतात, "उद्धवजी, त्या यादवांच्या राजाने तुम्हाला इथे पाठवलं आहे ना? त्याचं नावही घेतलं नाही कृष्णाचं. तुमच्या मार्गाने तुम्हाला इथे पाठवलं आहे. दुसरी एक गोपी म्हणाली, कशाकरता पाठवलं? त्या गोपी सगळ्या चतुर होत्या. कशाकरता म्हणजे? त्याचे आई बाप इथे आहेत की, आई बापांना भेटण्याकरता, सांगण्याकरता पाठवलं असेल'. ते उद्धवजी स्वस्थ ऐकताहेत काही बोलत नाही आहेत. कोण आहे याठिकाणी त्याचं? आई बापांशिवाय त्याच्यावर प्रेम करणारं इथं कुणी नाही म्हणाल्या.
स्नेहानुबन्धो बन्धूनां मुनेरपि सुदुस्त्यजः ।।
10.47.5 ।। श्री. भा.
मात्यापित्याचं प्रेम सोडता येत नाही म्हणाल्या. त्यामुळे त्याच्याकरता पाठवलं असेल. पुन्हा म्हणताहेत, उद्धवजी, भेटलात का त्याच्या आईबापांना? झाली का भेट काम झालं का नाही? केव्हा जाणार मथुरेला परत? काय विचारायचं आता! या गोपी काय कृष्णावरती प्रेम करतात का रागावलेल्या आहेत, उद्धवजींना काही समजेना. असं भाषण केलेलं आहे एक भ्रमर आलेला