« Previous | Table of Contents | Next »
पान ४०१

आहे. त्याला उद्देशूनच एक गोपी बोलू लागली,

मधुप कितवबन्धो मा स्पृशांघ्रिं सपत्न्याः
कुचविलुलितमालाकुंकुमश्मश्रुभिर्नः ।
वहतु मधुपतिस्तन्मानिनीनां प्रसादं
यदुसदसि विडम्ब्यं यस्य दूतस्त्वमीदृक् ।।
10.47.12 ।। श्री. भा.

भ्रमर म्हणजे, उद्धवजींना उद्देशूनच हे भाषण आहे. ती गोपी सांगती आहे. भ्रमर हा कृष्णाचा दूत आलेला आहे आणि त्याला ती उत्तर देती आहे, "आमच्याजवळ येऊ नकोस, तू निघून जा. तो जो तुझा स्वामी आहे, मथुरेचा राजा झालेला आहे. त्याच्या स्त्रिया ज्या असतील त्याच्यावर प्रेम करणाऱ्या, त्यांच्याजवळ जाऊन तू त्याचं वर्णन कर. आमच्याजवळ येऊ नकोस. कशाला आमच्याजवळ त्याच्या गुणांचं गायन करतोस. तो कपटी आहे. त्याने आमच्या प्रेमाचा धिक्कार केलेला आहे. निघून गेलेला आहे. काय काय, कसा वागलाय, आम्हाला सगळं माहिती आहे. रामावतारात वालीला झाडाआड राहून बाण मारला, हाच तो कपटी. शूर्पणखेचे नाक कान कापायला यानेच लावलं. बळीराजाच्या यज्ञामध्ये याचक म्हणून गेला आणि त्याचं सर्वस्व हरण करून त्यालाच शेवटी बंधनामध्ये टाकलं. काय करायचं? हाच तुझा मालक आहे ना." उद्धवजींना उद्देशून हे भाषण आहे. ऐकताहेत उद्धवजी. ही काही निंदा नाहीये. देवाची निंदा नाहीये. "तेव्हा काय करायचं त्याची आठवण करून, नको आता. त्या मथुरा राजधानीमध्ये तो राहतो आहे. आणि इथे आम्ही मात्र या शोकामध्ये निमग्न झालेलो आहोत. आपले सगळे बंधू, सगळे मित्र वगैरे सगळ्यांना सोडून निघून गेलेला आहे. आम्ही त्याच्या दासी आहोत, परंतु आमच्याकडे त्याचं लक्ष नाहीये. आम्हाला विसरून गेलेला आहे तो; उद्धवा!" उद्धवजींना त्यांचं ते अलौकिक दिव्य प्रेम दिसून आलेलं आहे. कृष्णदर्शनाची फक्त उत्कंठा आहे बाकी काही नाही. त्यांचं सांत्वन करताहेत.

अहो यूयं स्म पूर्णार्था भवत्यो लोकपूजिताः ।
वासुदेवे भगवति यासामित्यर्पितं मनः ।।
10.47.23 ।। श्री. भा.

गोपीहो तुमचं सर्व कृत्य संपलेलं आहे. पाप पुण्य तुम्हाला काही नाही. सर्व लोकांनी तुमचा आदर करावा अशी तुमची योग्यता आहे. भगवान वासुदेवाच्या ठिकाणी तुम्ही अंतःकरण समर्पण केलेलं आहे, इतकं प्रेम तुम्ही करता, यात सर्व आलेलं आहे. काहीही साधनाची तुम्हाला जरूर नाही. सर्व साधनांचं फळ हे भगवत्प्रेम तुम्हाला मिळालेलं आहे.

***
पान ४०२
दानव्रततपोहोमजपस्वाध्यायसंयमैः ।
श्रेयोभिर्विविधैश्चान्यैः कृष्णे भक्तिर्हि साध्यते ।।
10.47.24 ।। श्री. भा.

भक्ती कशी मिळेल, उद्धवजी सांगताहेत अनेक जन्म सत्कर्म केली पाहिजेत, दान केलं पाहिजे, व्रत केली पाहिजेत; तप केलं पाहिजे, जप केला पाहिजे. इंद्रियांचा निग्रह केला पाहिजे. अशी अनेक पुण्यसाधनं करता करता आणि पापक्षय होऊन भगवंताची भक्ती चित्तामध्ये उत्पन्न होते. ती भक्ती मोठ्यामोठ्या मुनींना सुद्धा मिळत नाही ती तुम्हाला मिळालेली आहे. देवाची तुमच्यावर फार मोठी कृपा आहे. तुम्हाला मुलाची आठवण नाही, पत्नीची आठवण नाही, घरादाराची आठवण नाही, वस्त्रांलकाराची आठवण नाही. कुणीकडेही तुमचं लक्ष नाही. अखंड भगवान श्रीहरी तुमच्या चित्तामध्ये राहिलेले आहेत. भगवंताने तुम्हाला सांगण्याकरता काही संदेश माझ्याजवळ दिलेला आहे. तो ऐका तुम्ही भगवान सांगताहेत, गोपीहो,

भवतीनां वियोगो मे न हि सर्वात्मना क्वचित् ।
यथा भूतानि भूतेषु खं वाय्वग्निजलं मही ।
तथाहं च मनःप्राणभूतेन्द्रियगुणाश्रयः ।।
10.47.29 ।। श्री. भा.

माझा वियोग झाला असं तुम्हाला का वाटतंय? माझा वियोग कसा होईल? सर्व ठिकाणी मी आहे ना? ही पंचमहाभूतं पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश ही जशी सर्व ठिकाणी आहेत. कुठे नाहीत? तसा मी सर्वत्र आहे. सर्वांच्या मनामध्ये आहे, इंद्रियांमध्ये आहे, शरीरामध्ये आहे. सर्वत्र मी आहे. तेव्हा सर्वात्मरूपी, सर्वस्वरूपी, सर्वव्यापी असा मी असताना, तुम्हाला दुःख होण्याचं कारण काय? इंद्रियांचा निग्रह करून मन स्थिर झालं म्हणजे माझं हे स्वरूप समजून येतं. बरं बाह्य दृष्टीने तुम्ही म्हणत असाल ते हे रूप तुम्हाला कुठं दिसतंय, ते रूप आमच्यासमोर नाहीये, तुम्ही निघून गेला की काय? त्याचं कारण आहे म्हणाले,

मनसः सन्निकर्षार्थं मदनुध्यानकाम्यया ।।
10.47.34 ।। श्री. भा.

हे बाह्य शरीर घेऊन मी इकडे आलो म्हणालो. इथे आहेच आहे, सर्वव्यापी. हे माझं रूप तुम्हाला दिसत नाहीये. ते मी घेऊन आलो, मथुरेमध्ये राहिलो, याचं कारण तुमचं मन माझ्याजवळ नेहमी राहिलं पाहिजे. माझं ध्यान तुम्हाला घडलं पाहिजे. आपला प्रिय मनुष्य हा दूर असताना, जितकं त्याच्याकडे लक्ष जातं, तितकं समोर असताना जात नाही. सन्निकर्ष म्हणजे अनादर होतो. म्हणून तुम्ही इथेच राहा. मन माझ्याकडे ठेवा. आणि मनाने माझं ध्यान, माझ्या गुणांचं चिंतन करा

***
पान ४०३

म्हणजे लवकर माझी प्राप्ती होईल. याप्रमाणे भगवंतांचा तो संदेश त्या गोपींना सांगितला उद्धवजींनी. त्या बोलायला लागल्या. गोपी म्हणतात, कंसाला मारलं. सर्व यादवांना सुरक्षित ठेवलं, त्यांचं संरक्षण केलं. भगवान गोपालकृष्ण, बलरामजी हे सगळे सुखी आहेत ना? आता त्यांना सगळ्या नगरातल्या स्त्रिया भेटलेल्या असणार! त्यांच्या मनाचं समाधान ते करत असतील, हे खरं आहे ना उद्धवजी? हे तत्वज्ञान वगैरे सगळं बाजूलाच ठेवलं. काय ऐकून घेतला संदेश आणि तिकडे लक्षच नाही. काय त्या नगरातल्या राजकन्या त्यांना भेटतील, त्यांच्याबरोबर विवाह होईल. त्यांच्याचमध्ये श्रीकृष्णाचं मन आता गुंतून राहणार आहे. आमची आठवण कशाला होईल? केव्हा येणार आहे आम्हाला भेटण्याकरता? आम्हाला भेटण्याची काही आशा आहे का? काही गोपी म्हणाल्या, कशाला येईल तो आता? राजकन्यांबरोबर त्याचा विवाह होईल. सर्व राज्यकारभार त्याला पाहावा लागेल. आम्ही वनात राहणाऱ्या, खेड्यामध्ये राहणाऱ्या आमच्यासारख्या गोपी यांना भेटण्याकरता कशाला येईल तो म्हणाल्या. तो तर लक्ष्मीपती आहे. त्याला तर कुणाचीच इच्छा नाहीये. आता आमच्या नशिबाला एवढंच आहे.

परं सौख्यं हि नैराश्यं स्वैरिण्यप्याह पिंगला ।
तज्जानतीनां नः कृष्णे तथापि आशा दुरत्यया ।।
10.47.47 ।। श्री. भा.

पिंगला वेश्येने जे सांगितलेलं आहे की निराश माणसाने आशा करू नये हेच आमच्या

***
पान ४०४

नशिबात आहे. तसंच आम्ही वागलं पाहिजे. परंतु कृष्णदर्शनाची आशा आमच्या मनातून जात नाही. उद्धवजी काय करावं? कसं विसरू आम्ही कृष्णांना? डोळे झाकून बसायचं काय? डोळे उघडून जिकडे पहावं तिकडे कृष्णाचं स्मरण होतंय. नदीकडे आमची दृष्टी केली, इथे गोपालकृष्ण उभा राहिला होता. झाडाखाली उभा राहिला होता. इकडे उभा राहिला होता. पर्वतावर उभा राहिला होता. इथं त्याची अमुक लीला झाली. जास्ती जास्ती ते स्मरण आमच्या चित्तामध्ये येऊन व्याकुळ होतो म्हणाल्या आम्ही. कसं, विसरणार कसं सांगा? तत्वज्ञानाने काय कृष्णाचं विस्मरण होतंय? आणि अशा तत्वज्ञानाचा उपयोग काय आहे.

विस्मर्तुं नैव शक्नुमः ।।
10.47.50 ।। श्री. भा.

आम्ही विसरू शकत नाही म्हणाल्या. अतिशय शोकाकुल झाल्या गोपी. हे रमानाथ, हे गोविंदा, आम्हाला या दुःखातून तुम्ही मुक्त करा, दर्शन द्या अशी प्रार्थना करताहेत. उद्धवजींना त्यांचं दुःख दूर करणं शक्य झालं नाही. त्यांची भूमिका फार मोठी आहे. कृष्णलीला वर्णन करताहेत, तत्वविचार मांडताहेत. बरेच दिवस उद्धवजी राहिले तिथे. गोपींची संगती असावी असं उद्दवांना वाटतंय! केवढी योग्यता आहे गोपींची! बरेच दिवस राहिलेले आहेत उद्धवजी आणि नंतर मथुरेला जाण्याकरता निघाले. आणि त्यांनी उद्गार काढलेले आहेत. "काय या स्त्रियांची योग्यता आहे! भगवान श्रीहरीच्या ठिकाणी केवढी भक्ती यांच्या चित्तामध्ये आहे. असे जे भक्त असतील त्यांच्याजवळ भगवान श्रीहरी नेहमीच राहतात. लक्ष्मीला असा प्रसाद मिळाला नाही, स्वर्गातल्या स्त्रियांना असा प्रसाद मिळाला नाही. जो प्रसाद रासक्रीडेच्या वेळी या गोपींना मिळालेला आहे. तुमचे उपकार मी विसरू शकणार नाही. तुमच्या उपकारांची फेड मला करता येणार नाही. असं भगवान यांच्याबद्दल म्हणाले आहेत. सर्व धर्ममार्ग यांनी टाकून दिलेला आहे. कृष्ण निघून गेला तरी कृष्णाला विसरू शकत नाही आहेत. कोण यांना बोलणार कृष्णाची आठवण करायची नाही म्हणून? त्या हिरण्यकश्यपूने आपल्या मुलाला ताकीद केली, श्रीहरीचं नाव घ्यायचं नाही म्हणून, त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःचाच नाश करून घेतलेला आहे. तसं यांना बोलणार कोण? यांचं बुद्धिपरिवर्तन करायचं, यांच्या मनातली कृष्णभक्ती काढून टाकायला कोण समर्थ आहे." अशा रितीने वर्णन करून उद्धवजींनी शेवटी त्या गोपींना नमस्कार केलेला आहे.

वन्दे नन्दव्रजस्त्रीणां पादरेणुमभीक्ष्णशः ।
***
पान ४०५
यासां हरिकथोद्गीतं पुनाति भुवनत्रयम् ।।
10.47.63 ।। श्री. भा.

अर्थात, या नंदाच्या गोकुळात राहणाऱ्या या कृष्णभक्त स्त्रिया ज्या आहेत यांच्या चरणांच्या रजःकणाकणाला मी नमस्कार करतो. पायाला सुद्धा नाही. त्यांनी हरिकथा, हरीलीला गायन करण्याला सुरुवात केल्याबरोबर संपूर्ण त्रिभुवन पवित्र होऊन जातंय. काही कशाची आवश्यकता नाही. राजशासन नको, काही नको, इतकं सामर्थ्य याच्यामध्ये आहे. निघाले उद्धवजी. नंद, यशोदा यांचीही संमती घेतली. रथामध्ये बसलेले आहेत. नंदाने सांगितलं, "उद्धवजी,

मनसो वृत्तयो नः स्युः कृष्णपादाम्बुजाश्रयाः ।
वाचोऽभिधायिनीर्नाम्नां कायस्तत्प्रह्लादिषु ।।
10.47.66 ।। श्री. भा.

गोपालकृष्णाला, परमेश्वराला आमची विनंती सांगा. आमच्या मनोवृत्ती भगवान श्रीकृष्णांच्या चरणाशीच नेहमी राहाव्यात. त्याच्या चरणांचं स्मरण नेहमी व्हावं. आमच्या वाणीनं भगवंताच्या नामाचं स्मरण नित्यं करावं, पठण करावं, नामस्मरण घडावं. आमच्या शरीराने त्याची सेवा व्हावी, पूजा व्हावी आमच्या कर्माने ज्या ज्या जन्माला आम्ही जाऊ त्या सर्वही जन्मामध्ये, 'रतिर्नः कृष्ण ईश्वरे', भगवान श्रीकृष्णाबद्दल प्रेम त्या जन्मामध्ये आम्हाला राहावं एवढीच आमची प्रार्थना भगवान गोपालकृष्णांना कळवा."

उद्धवजी मथुरेमध्ये आलेले आहेत. सर्वांनी आदरसत्कार केलेला आहे. कृष्णांची भेट झाली आणि उद्धवजींनी सांगितलं, व्रजवासी लोकांचं प्रेम अत्यंत श्रेष्ठ आहे. त्याचं वर्णन करणंही अशक्य आहे. हे आपल्या कृपेने मला पहायला मिळालं.

नंतर ती जी दासी होती, चंदनाची उटी देणारी, तिच्या वाड्यामध्ये भगवान गेले, तिनेही पूजा अर्चा केली. तिथून नंतर अक्रूरजींच्या वाड्यामध्ये भगवान आलेले आहेत. त्यांनीही आदरसत्कार केला. श्रीकृष्णांनी अक्रूरजींचीही स्तुती केलेली आहे, आपण श्रेष्ठ आहात. आम्ही लहान मुलं आहोत. आपण आम्हाला मार्गदर्शन करा. पुढे भगवान सांगताहेत अक्रूरजींना, "आपण एकदा हस्तिनापुराला जाऊन पांडवांची एकंदर परिस्थिती काय आहे ती पाहून या, कौरवांच्या ताब्यामध्ये सर्व राज्य आहे. आपल्या लहान मुलांना घेऊन ती कुंती त्याठिकाणी एकटी राहात आहे. काय संकटं त्यांच्यावर आलेली आहेत! प्रजाजनांचं प्रेम पांडवांवर आहे का नाही हे सगळं पाहून या."

अक्रूरजी हस्तिनापुरात आलेले आहेत. सर्वांनी त्यांचा सत्कार केला. कुंती त्यांना भेटली.

***
पान ४०६

बंधूच होते हे. "काय म्हणाली बाबा, तुम्हाला आमची आठवण तरी आहे? आपली बहीण काय संकटात आहे, जिवंत आहे की मेली काही लक्ष तुमचं नाही? मातापितरांचं लक्ष नाही, बंधूचं लक्ष नाही. गोपालकृष्ण भगवान भक्तवत्सल आहेत. आमच्याकडे त्यांचं लक्ष आहे असं आम्हाला वाटतं. आपल्याला त्यानी पाठवलेलं आहे. या शत्रूच्यामध्ये मी अत्यंत संकटात सापडलेली आहे. लांडग्याच्या कळपात एखादी हरिणी सापडावी तशी माझी स्थिती आहे. मुलांना बाप नाही, पितृछत्र नाही आणि इथे कशीतरी मी काळ कंठते आहे काय कोणत्या वेळेला होईल याचा नियम नाही. भगवान गोपालकृष्णांनीच आमचं संरक्षण करावं" अशी प्रार्थना ती करती आहे. अक्रूरजींनी तिचं सांत्वन केलं. काही दिवस मुक्काम अक्रूरजींनी मुक्काम केलेला आहे. नगरातल्या लोकांच्या गाठीभेटी घेतलेल्या आहेत. एकंदर नगरवासी लोकांची मनोवृत्ती सध्याच्या या राजशासनाबद्दल अनुकूल आहे की प्रतिकूल आहे हे सगळं समजून घेतलं. सर्व प्रजाजनांचं प्रेम पांडवांवर आहे हे त्यांच्या दृष्टोत्पत्तीस आलं. पांडव धर्मशील आहेत, भगवद्भक्त आहेत. कौरवांवर प्रजाजनांचं प्रेम नाहीये. राजसत्ता हातामध्ये असल्यामुळे अनुकूल वागावं लागतं इतकंच. मनापासून प्रेम नाहीये. सर्व समजलेलं आहे त्यांना आणि निघाले मथुरेला जाण्याकरता. राजसभेमध्ये आलेले आहेत. धृतराष्ट्राला त्यानी नमस्कार केलेला आहे. येतो म्हणाले, राजेसाहेब आणि थोडासा उपदेश केला. "काय, राजेसाहेब, तुमचा ज्येष्ठ बंधू पांडुराजा मृत झालेला आहे. तुमच्या स्वाधीन राज्य सध्या मिळालेलं आहे. धर्माने तुम्ही राज्य करा. तुमची मुलं आणि पांडव या दोघांबद्दल समदृष्टीने वागा. सारखंच प्रेम दोघांवर करा. म्हणजे तुमची कीर्ती होईल. विषम बुद्धी जर तुम्ही ठेवली तर तुमचं कल्याण होणार नाही. समदृष्टीने वागा. कोण याठिकाणी राहणार आहे. संसारामध्ये कोणीही चिरंजीव नाही आहे. स्वतःचा देहसुद्धा इथे ठेवून जावं लागतं मग स्त्री, पुत्र, राज्य वगैरे काय बरोबर घेऊन जाता येईल? एकटा जीव जन्माला येतो आणि एकटाच मृत्यू पावतो. स्वतः केलेलं पाप पुण्यात्मक कर्म त्याचं फळ, सुखदुःख एकट्यालाच त्याला भोगावं लागतं. अधर्माने पुष्कळ जरी द्रव्य मिळालं तरी दुसरेच कोणीतरी घेऊन जाताहेत. म्हणून तुम्ही हा सगळा विचार करा आणि पांडवांच्यावरही मुलाप्रमाणे प्रेम करा." धृतराष्ट्र म्हणाला "अक्रूरजी, तुमची वाणी खरी चांगली आहे, हित करणारी आहे पण माझ्या मनामध्ये ती राहातच नाही. मुलगा जवळ आला की सर्व विसरून जातो मी. मुलगा जसं म्हणेल त्याप्रमाणे मला संमती द्यावी लागते. काय ईश्वराची इच्छा काय आहे, समजत नाही. भूभार हरण करण्याकरता परमात्म्याने अवतार धारण केलेला आहे.

***
पान ४०७

त्याच्या इच्छेने काय घडेल ते घडेल एवढंच मी बोलतो. मी स्वतंत्र नाही अक्रूरजी, तुम्हीही विचार करा."

अक्रूरजी आले मथुरेमध्ये कौरवांची वृत्ती कशी आहे, प्रजाजनांची वृत्ती कशी आहे. पांडवांची स्थिती काय आहे. कुंती कोणत्या स्थितीमध्ये आहे हे सगळं त्यांनी भगवंताला सांगितलं. समजून घेतलं सगळं. पांडवांचं रक्षण कसं करायचंय हा सगळा विचार भगवंतानी केलेला आहे.

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा । बुद्ध्याऽऽत्मना वा अनुसृतस्वभावात् ।।
करोति यद्यत् सकलं परस्मै । नारायणायेति समर्पयेत् तत् ।।
11.2.36 ।। भा.
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव ।।
प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णो भगवन् नमस्ते ।।
।। गोपालकृष्ण भगवान् की जय ।।
।। श्रीमद् भागवत पाचवा दिवस समाप्त ।।

***
पान ४०८

।। श्रीमद् भागवत सहावा दिवस ।।

ॐ नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने ।
यस्यागस्त्यायते नामविघ्नसागरशोषणे ।।
यस्यस्मरणमात्रेण जन्मसंसारबंधनात् ।
विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे ।।
विशुद्धज्ञानदेहाय त्रिवेदीदिव्यचक्षुषे ।
श्रेयःप्राप्तिनिमित्ताय नमः सोमार्र्धधारिणे ।।
यो देवः सवितास्माकं धियोधर्मादिगोचरः ।
प्रेरयेत्तस्य तद्भर्गस्तवरेण्यम् उपास्महे ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोऽस्तुते ।।
नमो आदिरूपा ॐकार स्वरूपा । विश्वाचिया रूपा पाण्डुरंगा ।।
तुझिया सत्तेने तुझे गुण गाऊ । तेणे सुखी राहू सर्व काळ ।।

***
पान ४०९

तूची श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन । सर्व होणे जाणे तुझे हाती ।।
तुका म्हणे जेथे नाही मी-तू-पण । स्तवावे ते कवणे कवणालगी ।।
यत् कीर्तनं यत्स्मरणं यदीक्षणं यद् वन्दनं यद् श्रवणं यदर्हणम् ।
लोकस्य सद्यो विधुनोति कल्मषं तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः ।।
विवेकिनो यच्चरणोपसादनात् संगं व्युदस्योभयतोऽन्तरात्मनः ।।
विन्दन्ति हि ब्रह्मगतिं गतक्लमाः । तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः ।।
तपस्विनो दानपरा यशस्विनो । मनस्विनो मन्त्रविदस्सुमङ्गलाः ।।
क्षेमं न विन्दन्ति विना यदर्पणं । तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः ।।
माला पात्रे च डमरू शूले शंख सुदर्शने ।
दधानं भक्तवरदं दत्तात्रेयं नमाम्यहम् ।।
योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां । संजीवयत्यखिलशक्तिधरः स्वधाम्ना ।
अन्यांश्चहस्तचरणश्रवणत्वगादीन् । प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् ।।
मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरीम् ।
यत् कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् ।।
आपदामपहर्तारम् दातारम् सर्वसंपदाम् ।
लोकाभिरामम् श्रीरामम् भूयो भूयो नमाम्यहम् ।।
यत्र यत्र रघुनाथकीर्तनं । तत्र तत्र कृत मस्तकांजलिम् ।
बाष्पवारिपरिपूर्णलोचनं । मारुतिं नमत राक्षसान्तकम् ।।

पुस्तकजपवटहस्ते वरदाभयचिन्ह चारुबाहुल्ते ।
कर्पूरामलदेहे वागीश्वरि चोदयशु मम वाचम् ।।
श्रीगणेशाय नमः
श्रीगुरुचरणारविन्दाभ्याम् नमः ।
अस्तिः प्राप्तिश्च कंसस्य महिष्यौ भरतर्षभ ।
मृते भर्तरि दुःखार्ते ईयतुः स्म पितुर्गृहान् ।।
10.50.1 ।। श्री. भा.
पित्रे मगधराजाय जरासंधाय दुःखिते ।
वेदयंचक्रतुः सर्वमात्मवैधव्यकारणम् ।।
10.50.2 ।। श्री. भा.

***
पान ४१०

शुक्राचार्य म्हणतात, राजन, कंसाच्या दोन स्त्रिया अस्ति आणि प्राप्ति. कंसाचा नाश झाल्यानंतर दुःखाकुल झालेल्या त्या दोघीही आपल्या पित्याच्या घरी गेल्या. पिता जो मगधराज जरासंध याला आपलं सगळं दुःख त्यांनी सांगितलं. आपला जावई मारला गेला हे अप्रिय ऐकल्याबरोबर वाईट वाटलं जरासंधाला आणि राग आलेला आहे. जेवढे यादव आहेत त्या यादवांचा संहार करायचा त्याने ठरवलं; आणि राजधानीला वेढा दिलेला आहे. समुद्रासारखं पसरलेलं ते सैन्य पाहिलं भगवंताने. आपल्या नगराला बाहेरून वेढा पडलेला आहे. जाणं येणं शक्यच नाही बाहेर. आणि आतली मंडळी सगळी भयाकुल झालेली आहेत. विचार करताहेत भगवान. हे सैन्य तर सगळं मारायचं म्हणालो, भूमीचा भार कमी करायचा. आणि जरासंधाला मारायचं नाही, त्याला सोडून द्यायचं. पुन्हा सैन्य घेऊन येईल. याकरताच आपण अवतार घेऊन आलो. धर्मरक्षण करणं आणि अधर्माची शांती करणं याकरता आपण आहोत. असा विचार भगवान करत असताना आकाशमंडळातून दोन रथ खाली आलेले आहेत. शैब्य, सुग्रीव, मेघपुष्प, वराहक त्यांच्या घोड्यांची नावं आहेत. सर्व अस्त्रं, शस्त्रास्त्रंही आलेली आहेत. कौमुदीकी गदा आहे, सुदर्शन चक्र आहे. सारथी आहे. बलरामजींना त्यांनी सांगितलं, "आर्य, यादवांच्यावर आज मोठं संकट आलेलं आहे. हा आपला रथ आलेला आहे. आयुधं आलेली आहेत. आपण या रथामधे बसून या सगळ्या आपल्या लोकांचं संरक्षण करायचंय आज. तेवीस अक्षौहिणी सैन्य हा भूमीचा भार आज दूर करायचा आहे आणि रथामधे बसून राम-कृष्ण बाहेर पडले. थोडंसं सैन्य बरोबर घेतलं. पांचजन्य शंख वाजवला, श्रीकृष्णांनी, शत्रूसैन्याच्या मनामध्ये धडकी भरलेली आहे. कोण आहे हा वीर? जरासंध आलेला आहे तो म्हणाला, "कृष्णा तुझ्याबरोबर मला युद्ध करायची इच्छा नाही. तू आपल्या प्रत्यक्ष मामाला मारलेलं आहेस." बलरामाला तो म्हणतो आहे, "तुला जर धैर्य असेल तर माझ्यासमोर युद्धाला उभा राहा. माझा नाश कर किंवा मी तुझा नाश करीन." भगवान सांगताहेत." जरासंधा, शूर पुरुष अशी नुसती बडबड करत नसतात. काय पौरुष असेल ते दाखवतात. कोण तुझ्या भाषणाकडे लक्ष देतोय. सैन्याला आज्ञा केली जरासंधाने आणि युद्धाला सुरुवात झालेली आहे. गरुडध्वज भगवंतांच्या रथावर होता आणि तालध्वज बलरामांच्या रथावर होता. त्या सैन्याच्या गर्दीमध्ये दोघांचे रथ दिसेनांत. मथुरेत असणाऱ्या स्त्रियांना अत्यंत शोक झालेला आहे. केवढं सैन्य आहे आणि हे दोघेच गेलेले आहेत. काय होतंय कुणास ठाऊक! शार्ङ्ग धनुष्य जे आहे ते सज्ज केलं भगवंतांनी आणि बाणवृष्टीला सुरुवात झालेली आहे. भात्यातून बाण केव्हा काढतात. केव्हा जोडतात, केव्हा सोडतात काहीही कुणाला कळलं नाही इतक्या वेगाने कार्य चाललेलं आहे.

« Previous | Table of Contents | Next »