हजारो सैनिक मरून पडताहेत. घोडे मेले, सारथी मेले. त्याचप्रमाणे रथी मेले, पदाति मेले, सगळ्यांचा नाश झालेला आहे. संपूर्ण सैन्य नष्ट केलेलं आहे राम आणि कृष्णांनी. रामांनी जरासंधाला धरलं. बांधून घेऊन जायचं ठरवलेलं असताना श्रीकृष्ण म्हणाले त्याला सोडून द्या. जा रे म्हणाले तुला जीवदान दिलेलं आहे. फार बडबड करत होतास. सोडून दिलं त्याला. पराभव झाल्यामुळे आपण आता राजधानीमध्ये न जाता हिमालयात जावं, तपश्चर्या करावी म्हणून तो जरासंध निघाला. पण त्याची मित्रमंडळी राजे लोक होते पुष्कळ. त्यांनी सांगितलं पराभव झाला म्हणून मनाला इतकं लावून घ्यायचं काय काम आहे? आपण आणखी सैन्य जमवू, पुन्हा युद्ध करू. इकडे मथुरेत विजय मिळाल्यामुळे वाद्यं वाजताहेत. द्रव्य वगैरे पुष्कळ मिळालं युद्धामध्ये. ते घेऊन राम-कृष्ण मथुरेमध्ये प्राप्त झाले. युद्धामध्ये मिळालेलं सर्व द्रव्य त्यानी यदुराजा जो उग्रसेन याला समर्पण केलेलं आहे. शुक्राचार्य म्हणतात, राजा याप्रमाणे सतरा वेळा तो जरासंध, तेवीस अक्षौहिणी सैन्य प्रत्येक वेळेला घेऊन आलेला आहे. आणि प्रत्येक वेळेला तितकं सैन्य राम आणि कृष्णांनी मारलेलं आहे. जरासंधाला सोडून द्यायचं! अठराव्या वेळेला पुन्हा त्याने सैन्याची जमवाजमव सुरू केली आणि पुन्हा मथुरेवर आक्रमण करायचं ठरवलं. इतक्यात नारदांनी, जवळच एक कालयवन नावाचा यवनाधिपती होता. त्याला जाऊन सांगितलं, कारण त्याचाही नाश करायचा होता ना! धर्मविरोधी तो आहे. नारद सांगताहेत, "अरे, हा यादवांचा जो सेनापती म्हणा, मुख्य पुढारी आहे कृष्ण, केवढा बलवान झालेला आहे. तुझ्याजवळ आहे मथुरा जरासंधासारख्याचा त्याने इतक्या वेळी पराभव केलेला आहे. हा तुझ्यापेक्षा आणखी वरचढ होईल. तू याच्याकडे लक्ष दे" असं सांगून नारद गेले. त्यानीही पुष्कळ सैन्य जमा केलेलं आहे आणि आला मथुरा राजधानीला वेढा देऊन बसला. भगवान विचार करताहेत की यादवांच्यावर आता दोन्हीकडून संकट आलं म्हणाले. हा कालयवन नगराला वेढा देऊन बसलेला आहे. जरासंधही एक दोन दिवसामध्ये येणार, निघालेला आहे, अशी बातमी आलेली आहे. या कालयवनाबरोबर लढाई करण्यामध्ये आम्ही गुंतलेलो असताना, हा जरासंध एकदम नगरामध्ये निघून जाईल म्हणाले. आमच्या सगळ्या लोकांना मारेल. काय करावं? यांच्या संरक्षणाची प्रथम योजना करायची. विश्वकर्म्याला आज्ञा केली आणि समुद्रामध्ये एक दिव्य नगर, द्वारका नगरी निर्माण केली आहे.
विश्वकर्म्याचं कौशल्य दिसतंय त्याठिकाणी किती मोठे मोठे रस्ते आहेत, त्याचप्रमाणे मोठे वाडे आहेत. उपवनं पुष्कळ आहेत. अशा प्रकारचं ते उत्तम नगर निर्माण झालं. सुधर्मा सभा जी आहे देवलोकामध्ये असणारी ती इंद्राने द्वारकेमध्ये पाठवून दिली. त्या सभेमध्ये बसलेल्या लोकांना...
क्षुधा, तृषाच लागत नाहीये. श्यामकर्ण अश्व जे आहेत, मनाप्रमाणे ज्यांचा वेग आहे ते वरुणाने पाठवून दिले. आठही निधीकोश हे कुबेराने पाठवून दिले हे सगळं देवानेच आम्हाला दिलेलं आहे, हा अधिकार आम्हाला दिलेला आहे, हे ऐश्वर्य देवाने दिलेलं आहे. देवच जर भूमीवर आलेले आहेत तर त्यांचं त्यांना ऐश्वर्य द्यावं असा विचार करून सर्वही लोकपालांनी आपलं ऐश्वर्य पाठवलेलं आहे.
तत्र योगप्रभावेन नीत्व सर्वजनं हरिः ।
प्रजापालेन रामेण कृष्णः समनुमन्त्रितः ।
निर्जगाम पुरद्वारात् पद्ममाली निरायुधः ।।
10.50.58 ।। श्री. भा.
मथुरेमध्ये असणारी सर्वही मंडळी स्त्री, पुरुष, बाल, वृद्ध सगळी मंडळी आपल्या योगसामर्थ्याने आकाशमार्गाने द्वारकेमध्ये नेऊन ठेवली भगवंताने मथुरेमध्ये एकही मनुष्य नाही. काही उरलं नाही. पशु, पक्षी सगळी पाठवली. बलरामजींच्या बरोबर काही विचार केलेला आहे भगवंतांनी, मी आता पुढे जातो, कालयवनाला मारून येतो असं सांगून आणि बाहेर पडले. मथुरेचा दरवाजा उघडला आणि एकटे गोपालकृष्ण निःशस्त्र बाहेर पडले, पळायला लागले! तो कालयवन होताच. घनःशाम, पीतांबरधारी हाच कृष्ण असला पाहिजे. नारदांनी सगळं त्याला वर्णन करून सांगितलं होतं; कृष्ण कसा दिसतो? हाच कृष्ण आहे. हा पळायला लागलेला आहे, हातात शस्त्र नाही. आपण याला धरावं म्हणून तो यवन त्यांच्या पाठीमागे लागलेला आहे. त्यानेही हातात शस्त्र घेतलं नाही. जवळ जवळ सापडलो आपण असं दाखवावं भगवंतांनी आणि पुन्हा एकदम दूर निघून जावं. असं पुष्कळ लांबवर त्याला नेलं. डोंगरावरती एका गुहेमध्ये भगवान गेलेले आहेत. पाठीमागून कालयवन आला. तिथे कुणीतरी मनुष्य झोपलेला आहे. पांघरूण घेऊन. त्याला वाटलं हाच कृष्ण आहे. इतका वेळ मला दमवलंस आणि आता तू झोपेचं सोंग घेतोस काय? म्हणून त्याने रागाने त्या निजलेल्या कृष्णाला लाथ मारली. तो झोपलेला मनुष्य एकदम जागा झाला. आणि त्याने त्या कालयवनाकडे पाहिल्याबरोबर त्याच्या शरीरातून अग्नी उत्पन्न झालेला आहे आणि कालयवनाचं शरीर नष्ट होऊन गेलेलं आहे. गोपालकृष्ण नंतर पुढे आलेले आहेत. आचार्य सांगतात, राजा, इक्ष्वाकु राजाच्या कुळात, मांधाताचा मुलगा, मुचकुंद नावाचा हा राजा होता. देवांनी त्याची प्रार्थना केली, आमचे सेनापती आपण व्हा, आमचं रक्षण करा, दैत्यांचा पराभव करा. पुष्कळ कालापर्यंत स्वर्गलोकामध्ये मुचकुंद राजा देवरक्षणाकरता राहिला. पुष्कळ दिवस गेले. देवांनी सांगितलं, "राजेसाहेब, आता आमचं काम संपलं. पुष्कळ दिवस राज्यत्याग करून आपण...
आमच्याकडे आलात. आता इतका काळ गेलेला आहे की पृथ्वीवर आपल्यापैकी कोणीही शिल्लक नाही जिवंत नाही. स्त्रिया नाहीत, पुत्र नाहीत. आमच्यावर फार उपकार तुम्ही केलेत तेव्हा काही वर तुम्ही मागून घ्या. फक्त मुक्ती मागू नका, ते सामर्थ्य त्या श्रीहरीचं आहे." हे देवांनी कबूल केलं. मग राजाने त्या सर्व देवांना सांगितलं. "तुमचं कार्य झालं. संरक्षणाचं काम फार कठीण आहे, तेव्हा फार जागरण झाल्यामुळे, प्रथम मला विश्रांती घ्यायची आहे. मला आता झोप घ्यायची आहे." देवांनी मग त्याला ह्या गुहेमध्ये झोपायला सांगितलं आणि सांगून ठेवलं, "तुझी झोप होण्यापूर्वी जो तुला जागं करेल, त्याच्यावर तुझी दृष्टी पडल्याबरोबर त्याचं शरीर दग्ध होऊन जाईल." ती स्थिती झाली. हे भगवंतांना माहिती आहे. कुठं कोण आहे, कोणाकडून कोणाचा नाश करायचा. हे सगळं त्यांना माहिती आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण त्या कालयवनाला इथे ह्या गुहेत घेऊन आले. कालयवनाला त्यांनी स्वतः मारलं नाही. त्या मुचकुंद राजाची दृष्टी त्याच्यावर पडल्याबरोबर तो जळून गेलेला आहे आणि मग मुचकुंदावर कृपा करण्याकरता भगवान पुढे आले. भगवंतांच्याकडे मुचकुंदाने पाहिलेलं आहे. घनःश्याम, पीतांबर धारी, श्रीवत्सचिन्ह आहे, चतुर्भुज रूप दिसतं आहे. तेज दिसतं आहे. विचार केला राजाने, साक्षात भगवान हे आहेत, नारायण आहेत. विचारलं, "आपण कोण आहात महाराज" काय सूर्यनारायण आहात, चंद्र आहात का इंद्र आहात? मला असं वाटतं की सर्व देवांचे अधिपती आपण साक्षात महाविष्णू आहात. मी माझा परिचय करून देतो. इक्ष्वाकूच्या कुळात उत्पन्न झालेला मी मुचकुंद नावाचा राजा आहे. यौवनाश्वचा पुत्र. पुष्कळ दिवस जागरण झाल्यामुळे इथे झोपलो होतो. आत्ता कुणीतरी येऊन मला उठवलं आणि त्याच्या पापाने त्याचा नाश झालेला आहे. आणि इतक्यात आपलं दर्शन मला घडलेलं आहे. कोण आहात आपण?" भगवान म्हणाले, "राजा, माझा जन्म, माझी कर्म, माझी नावं पुष्कळ आहेत. कोणतं सांगू. आज मी कुठं जन्माला आलो. आजचं माझं नाव काय हे तुला सांगतो.
विज्ञापितो विरिंचेन पुराहं धर्मगुप्तये ।
भूमेर् भारायमाणानां असुराणां क्षयाय च ।।
10.51.40 ।। श्री. भा.
ब्रह्मदेवाने धर्मसंरक्षणाकरता आणि भूमीला भार झालेल्या असुरांचा नाश करण्याकरता मला प्रार्थना केली. म्हणून मी यदुकुलामध्ये वसुदेवाचा पुत्र म्हणून जन्माला आलो आहे. वसुदेवाचा मुलगा असल्यामुळे माझं नाव वासुदेव यावेळचं आहे. कालनेमी राक्षस कंसरूपाने जन्माला आलेला होता. त्याचा नाश केलेला आहे. त्याचे जे काही सहकारी होते प्रलंबादिक, चाणूर, मुष्टिक सगळे...
राक्षस हे ही सज्जनांचा द्वेष करणारे यांचाही नाश केलेला आहे. हा यवनही त्यांच्याप्रमाणेच असुरवृत्तीचा होता. तुझ्या नेत्रतेजाने याचा नाश झालेला आहे. आता तुझ्यावर अनुग्रह करण्याकरता मी आलेलो आहे. तुला पाहिजे तो वर मागून घे असं भगवंताने सांगितल्यावर साक्षात भगवान नारायण हे आहेत ही खात्री झाली आणि साष्टांग नमस्कार मुचकुंदाने केलेला आहे. मुचकुंद म्हणतो, देवा
विमोहितोऽयं जन ईश मायया
त्वदीयया त्वां न भजत्यनर्थदृक् ।
सुखाय दुःखप्रभवेषु सज्जते ।
गृहेषु योषित् पुरुषश्च वञ्चितः ।।
10.51.46 ।। श्री. भा.
सर्वही जीव जन्माला आलेले आपल्या मायामोहामध्ये सापडलेले आहेत; आणि आपल्या भजनाकडे त्यांचं बिलकुल लक्ष नाहीये. विषयाच्या ठिकाणी मनाची इतकी आसक्ती त्यांची झालेली आहे, सुख मिळावं म्हणून विषयांकडे जातात पण त्याच्यातून दुःखंच निर्माण होतंय. दुर्लभ मनुष्य जन्म मिळालेला असताना आपल्या चरणाची सेवा जो करत नाहीये तो पशू आहे. मनुष्य जन्म त्याने फुकट घालवलेला आहे. माझंही आयुष्य आजपर्यंत फुकटं गेलेलं आहे. या राज्यमदामुळे मला काही कळलं नाही. स्त्री, पुत्र, राज्य यांच्यामध्ये आसक्त होऊन मी राहिलो. यामुळे असावधानी मी राहिलो आणि माझं आयुष्य काही सार्थ झालं नाही. तेव्हा या संसारातून फिरणारा जो आहे, जन्म मरण प्रवाहात सापडलेला हा जीवात्मा त्याला आपल्या कृपेनं आपल्या भक्तांची संगती जर घडेल तरच तो आपल्या जवळ येऊन पोचू शकतो. माझ्यावरही असाच अनुग्रह झाला आपला. राज्य माझं गेलं. संबंध सगळा संपला. आणि आज आपल्या दर्शनाचा योग आलेला आहे. मला कोणताही वर नको आहे. आपली सेवा घडावी याशिवाय दुसरा कोणताही वर नको आहे. सर्व आशा, सर्व वासना टाकून आणि आपल्याला मी शरण आलेलो आहे. माझ्यावर कृपा करा, अशी प्रार्थना त्याने केली असताना भगवान सांगतात राजा,
सार्वभौम महाराज मतिस्ते विमलोर्जिता ।
वरैः प्रलोभितस्यापि न कामैर्विहता यतः ।।
10.51.59 ।। श्री. भा.
तुझी बुद्धी अत्यंत निर्मल आहे म्हणाले. वर मागायला तुला सांगितलं. पाहू या काय मागतो हा. लोभ निर्माण करायचा प्रयत्न केला मी. परंतु तुला कोणताही मोह नाही. निष्काम प्रेम, भक्ती
तुझ्या चित्तामध्ये आहे. तू सावध आहेस की नाही हे पाहिलं म्हणाले, माझे एकनिष्ठ भक्त जे आहेत त्यांच्या बुद्धीमध्ये कोणतीही कामना राहात नाही. बुद्धिभेद त्यांचा होत नाही. मनाला आवरण्याकरता योगाभ्यासही सांगितलेला आहे. परंतु त्या योगाभ्यासाने मनाचा पूर्ण निग्रह होत नाही.
युञ्जानानामभक्तानां प्राणायामादिभिर्मनः ।
अक्षीर्णवासनं राजन् दृश्यते पुनरुत्थितम् ।।
10.51.61 ।। श्री. भा.
मनाचा निग्रह करणं, प्राणवायूला स्थिर करून प्राण अडवून, मनालाही अडवायचं म्हणजे स्थिर करण्याचा प्रयत्न करणारे जे आहेत त्यांच्या अंतकरणामध्ये भक्ती नाही. केवळ योगाचा अभ्यास करताहेत. प्रयत्नानी आमचं मन आम्ही जिंकू. असा प्रयत्न करणारे जे आहेत त्यांच्या मनातून वासनाक्षय होत नाही. सूक्ष्म वासना त्यांच्या मनामध्ये राहातात आणि पुन्हा बाहेर ते मन जातं, संसारामध्ये पुन्हा अडकतं. जा म्हणाले आता, सर्व पृथ्वीवर संचार कर, माझी भावना धारण करून. क्षत्रियधर्माला अनुसरून आजपर्यंत तुझ्या हातून पुष्कळ हिंसा झालेली आहे. शिकारीमध्ये हिंसा झाली, युद्धामध्ये हिंसा झाली. ते सर्व जे पाप आहे ते पाप तपश्चर्येने तू दूर कर. पुढच्या जन्मामध्ये ब्राह्मण तू होशील. सर्वांच्या ठिकाणी सौहार्द भावना तुला उत्पन्न होईल. आणखी माझी प्राप्ती तुला होऊन तू मुक्त होशील. भगवंताने त्याला मार्गदर्शन केलं. प्रणाम करून तो मुचकुंद राजा गुहेच्या बाहेर पडलेला आहे. बाहेर आल्याबरोबर सगळी माणसं, पशू, झाडं वगैरे अगदी लहान लहान त्याला दिसायला लागली. पूर्वीच्या युगातला तो! त्यावेळचा आकार आणि आत्ताचा आकार, त्याला विलक्षण अंतर वाटलेलं आहे. कलियुग आलेलं असावं, अशी त्याची कल्पना झाली. आणि उत्तर दिशेला गंधमादन पर्वतावर तो गेलेला आहे. श्रद्धेने तपश्चर्या तो करतो आहे. बदरिकाश्रमामध्येही तो येऊन राहिलेला आहे शीतोष्ण, सुख दुःख सर्वही सहन करतो आहे. हरीची आराधना करतो आहे. कृतार्थ तो झालेला आहे.
श्रीकृष्णपरमात्मा त्या गुहेतून बाहेर पडले. मथुरेजवळ आलेले आहेत. राम तयार होतेच तिथे. दोघांनी एकदम त्या कालयवनाच्या सैन्यावर जोराचा हल्ला केला आणि सर्व सैन्य मारून टाकलं. पुष्कळ त्यांना संपत्ती मिळाली त्या यवनाच्या युद्धामध्ये. ते सगळं धन बैलावर, उंटावर घेऊन ते मथुरेला निघालेले आहेत. इतक्यात तो जरासंध येऊन पोचला. निरोप आलाच होता. तो अठराव्या वेळेला तेवीस अक्षौहिणी सैन्य घेऊन पुन्हा आलेला होता. इतकं सैन्य यांनी मारलं सतरा वेळेला, तरी पुन्हा तितकं सैन्य आणलं. त्याचा तो वेग पाहिला राम-कृष्णांनी ते सगळं धन टाकलं
आणि पळायला लागले. याच्याबरोबर आत्ता युद्ध करून उपयोग नाही म्हणाले. मनुष्यलीला आहे ती. भीती वाटली असं दाखवलं. तो जरासंध, अगदी आनंद झाला त्याला. आज तरी मी तुला जिंकलं की नाही म्हणतोय. तो ही त्यांचा पाठलाग करतोय. पुष्कळ दूर आलेले आहेत राम-कृष्ण. एका डोंगरावर चढून गेले. कुठे गेले काय गेले पत्ता नाही म्हणून त्याने आपल्या सैनिकांना सांगितलं, चारी बाजूनी हा डोंगरच पेटवून द्या म्हणाले म्हणजे हे जळून जातील, आग लावली त्या सबंध डोंगराला आणि जरासंध सर्व सैन्य घेऊन आपल्या राजधानीला निघून गेलेला आहे. शत्रूला समजणार नाही अशा मार्गाने दोघेही खाली उतरलेले आहेत आणि द्वारकेमध्ये येऊन पोचलेले आहेत. पराजय काय आणि जय काय दोन्हीं सारखं आहे. शुक सांगतात राजा, आनर्त देशाचा रैवत राजाने ब्रह्मदेवांच्या आदेशाप्रमाणे आपली कन्या रेवती बलरामांना दिली हे तुला पूर्वी सांगितलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने, भीष्मक राजाची कन्या जी आहे रुक्मिणी हिच्याबरोबर विवाह केला. त्यावेळेला आलेले अनेक राजे विरोधी होते. जरासंधही प्रमुख होता त्यात. ह्या सर्व राजांचा पराभव केला श्रीकृष्णांनी आणि सर्वांच्या समक्ष रुक्मिणीचं हरण करून ते द्वारकेला गेले आणि तिथे विवाह झालेला आहे. रुक्मिणीविवाहाची कथा सांगा महाराज, अशी राजाने प्रार्थना केल्यानंतर, शुक सांगतात राजा,
राजाऽऽसीद् भीष्मको नाम विदर्भराधिपतिर्महान् ।
तस्य पञ्चाभवन् पुत्राः कन्यैका च वरानना ।।
10.52.21 ।। श्री. भा.
विदर्भ देशाचा अधिपती भीष्मक नावाचा राजा होता. त्याला रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश, आणि रुक्ममाली अशी पाच मुलं होती आणि रुक्मिणी नावाची एक कन्या. नारदादिक महर्षी वारंवार राजवाड्यामध्ये येत होते. आणि ती रुक्मिणी तिथे आईबापांच्या जवळ बसलेली असताना नारदांनी मुद्दाम सांगायचं, अहो तुमच्या मुलीला एक वर मी पाहून आलेलो आहे, द्वारकेचा राजा आहे, पराक्रमी आहे. जरासंधाचा त्याने असंख्य वेळी पराभव केलेला आहे. कालयवनाला त्याने मारलेलं आहे. अत्यंत सुंदर आहे, पराक्रमी आहे. असं वर्णन करावं. तिकडे द्वारकेमध्ये जाऊन वसुदेव देवकीला म्हणावं, अहो आता तुमच्या कृष्णाचा विवाह तुम्हाला करायचा नाही का? करायचाय म्हणाले पण मुलगी कुठंय? आहे म्हणाले नारद, मी पाहून आलेलो आहे. विदर्भाधिपती भीष्मक राजाची कन्या रुक्मिणी ही अत्यंत बुद्धिमान आहे. सुंदर आहे. शीलवती आहे, कृष्णाला योग्य भार्या आहे. त्यांना तिथे सांगावं. कृष्णांच्या कानावर ही बातमी आली. त्यांनाही वाटलं ही कन्या बरी आहे. तिकडे रुक्मिणीनेही कृष्णांचं वर्णन ऐकल्यामुळे
आपल्याला कृष्ण हेच पती प्राप्त व्हावेत अशी तिची भावना आहे.
भीष्मक राजा, त्याची पत्नी, भाऊ, इतर मंडळी यांचा निश्चय झाला की रुक्मिणीचा विवाह श्रीकृष्णांशी करायचा. पण रुक्मिणीचा ज्येष्ठ बंधू जो रुक्मी तो कृष्णाचा वैरी होता, द्वेष करत होता. शिशुपाल वगैरे जे होते, कृष्णद्वेष करणारे त्यांचा तो मित्र होता. नाही म्हणाला, कृष्णाला रुक्मिणी द्यायची नाही. त्याला काय राज्य आहे, काय आहे? माझा मित्र शिशुपाल हा राजा आहे, त्यालाच रुक्मिणी द्यायची. प्रमुख होता तो. सगळा राज्यकारभार पाहात होता, त्याला विरोध कसा करायचा? बर बाबा, हो केलं सगळ्यांनी. रुक्मिणीला अत्यंत दुःख झालेलं आहे. कोणी आता तिच्या बाजूचं नाही आहे. तिने एक विश्वासू ब्राह्मण होता नेहमी वाड्यामध्ये येणारा त्याला प्रार्थना केली. स्वतः कृष्णांना पत्र लिहून दिलेलं आहे. आणि सांगितलं, "भूदेवा, हे माझं पत्र एवढं गोपालकृष्णांना नेऊन द्या तुम्ही आणि माझी अवस्था तेवढी त्यांच्या कानावर अवश्य घाला तुम्ही." मला दुसऱ्या कोणाचाही आधार नाहीये.
ब्राह्मण आलेला आहे द्वारकेमध्ये. श्रीकृष्णांनी अशी ताकीद दिली होती द्वारपालांना की एखादा तपस्वी ब्राह्मण किंवा अशाच प्रकारचा कोणी श्रेष्ठ पुरुष आला तर त्याला प्रतिबंध करायचा नाही. आलेले आहेत हे ब्राह्मण आत. सुवर्ण सिंहासनावरती भगवान बसलेले होते. ब्राह्मणाला पाहिल्याबरोबर सिंहासनावरून उतरलेले आहेत. त्यांना आपल्या सिंहासनावर बसवलं आणि त्यांची यथाविधी पूजा केलेली आहे. भोजन झालेलं आहे, विश्रांती झाली आणि बोलत बसले. सिंहासनावर ब्राह्मण बसले आणि भगवान त्यांच्या पायाजवळ बसलेले आहेत. पाय दाबताहेत काय भूदेवा, तुम्ही कोणत्या राज्यातून आलेले आहात? तुमच्या राज्यामध्ये धर्माचरण करतात की नाही सगळी मंडळी? आपल्यासारखे ब्राह्मण संतुष्ट राहणारे जे आहेत त्यांना धर्माचरणाचं फळ हे निश्चित मिळतं म्हणाले. असंतुष्ट राहणारा, धर्माचरण करून सुद्धा त्याला काही सुख लाभत नाहीये.
विप्रान् स्वलाभसंतुष्टान् साधून् भूतसुहृत्तमान् ।
निरहंकारिणः शान्तान् नमस्ये शिरसासकृत् ।।
10.52.33 ।। श्री. भा.
भगवान गोपालकृष्ण सांगताहेत जे असे विप्र आहेत जे काही दैवयोगाने मिळेल त्याच्यामध्ये संतुष्ट राहणारे. अत्यंत साधुवृत्तीचे, सर्व भूतांच्यावर प्रेम करणारे प्रेमाने वागणारे, निरहंकारी, अत्यंत शांत असे जे विप्र आहेत; त्यांना मी शिरसावंदन करतो; निरंतर वंदन करतो म्हणाले!
गोब्राह्मण प्रतिपालक आहेत. हा जातीयवाद नाहीये. हा विचार केला पाहिजे. अशा रितीने, कुठून आपण आला, काय कामाकरता आला, सगळं मला सांगा म्हणाले गोपालकृष्ण. ब्राह्मणाने सगळं सांगितलं. आमची राजकन्या रुक्मिणी अत्यंत दुःखी कष्टी झालेली आहे म्हणाले. आपल्याबरोबर विवाह व्हावा अशी तिची इच्छा आहे आणि तिच्या बंधूने हे लग्न मोडलं म्हणाले. तिने एक पत्र लिहून दिलेलं आहे. वाचा म्हणाले गोपालकृष्ण,
श्रुत्वा गुणान् भुवनसुन्दर शृण्वतां ते
निर्विश्य कर्णविवरैर्हरतोऽङ्गतापम् ।
रूपं दृशाम् दृशिमतामखिलार्थलाभं
त्वय्यच्युताविशति चित्तमपत्रपं मे ।।
10.52.37 ।। श्री. भा.
सर्वाधार भगवान आहेत. सर्वांचं आणखी मन संतुष्ट करणारा, सर्वांचं संरक्षण करणारा एक भगवानच आहे; ही खात्री मनामध्ये बाळगून रुक्मिणी लिहिती आहे. प्रथम तिने सांगितलं, देवा आपण भुवनसुंदर आहात. त्रिभुवनात आपल्यासारखं सौंदर्य कुणाचही नाही. मी आपल्याला पाहिलं नाही अजून, पण ऐकलंय. आपले गुण ऐकलेले आहेत. ते ऐकूनच माझ्या चित्ताला शांती मिळालेली आहे. आपलं रूप कसं आहे ते मी ऐकलेलं आहे आणि माझ्या मनाचा निश्चय झाला आणि माझं मन आपल्याला अर्पण केलेलं आहे. कोणती कन्या आपलं रूप गुण ऐकून आपल्याला वरणार नाही. मी पूर्ण विचार करूनच आपल्याला मनाने वरलेलं आहे. हा माझा देह मी आपल्याला अर्पण केलेला आहे. आपण याठिकाणी या आणि माझा स्वीकार करा. या शरीराला दुसऱ्या कोणीही स्पर्श करू नये. हा देह तुम्हाला दिलेला आहे. जर आजपर्यंत अनेक जन्मामध्ये माझ्या हातून पुण्यकर्म घडली असतील तर आपण येऊन माझं पाणिग्रहण करा. शिशुपालादिकांनी माझं पाणिग्रहण करू नये. कसं यायचं, काय करायचं सगळं तिने सुचवलेलं आहे. एक दोन दिवस अगोदर या म्हणाली सैन्य मागाहून येऊ दे आपलं. आणि सगळे इथे आलेले आहेत. शिशुपाल काय, जरासंध काय, पुष्कळ राजे आलेले आहेत. त्या सर्वांचा पराभव करून मला घेऊन चला. राक्षसविधी म्हणजे हरण करून घेऊन जायचं. कन्याहरण. तरीपण रुक्मिणीच्या आप्तेष्टांनी प्रतिकार केला तर? त्यावेळी रक्तपात करावा लागेल ना? त्याचंही सांगितलं रुक्मिणीने. नाही म्हणाली, आमचा असा एक नियम आहे, कुळाचार की जी नववधू आहे आहे तिने विवाहाच्या पूर्वी, आमची जी कुलदेवी आहे गावामध्ये, तिच्या मंदिरात राजवाड्यातून चालत जायचं, तिची पूजा करायची, प्रार्थना करायची आणि चालत वाड्यामध्ये यायचं असा नियम आहे. ही वेळ
तुम्हाला योग्य आहे मला घेऊन जाता येईल. त्यावेळेला रस्ता मोकळा असणार माझ्याकरता. आणखी काही युद्धाचा प्रसंग नाही. तुम्ही तिथे तयार राहा म्हणजे झालं. मला लगेच रथामध्ये घेऊन तुम्हाला जाता येईल. हे सगळं तिने सुचवलेलं आहे. गृहित धरलेलं आहे, गोपालकृष्ण येणार आणि मला घेऊन जाणार, अशा अगदी मोठ्या आशेने लिहिलेलं आहे. तरीसुद्धा शेवटी ती म्हणतीये.
यस्यांघ्रि पंकजरजःस्नपनं महान्तो
वाञ्छन्त्युमापतिरिवात्मतमोऽपहत्यै ।
यर्ह्यम्बुजाक्ष न लभेय भवत्प्रसादं
जह्यामसून् व्रतकृशान् शतजन्मभिः स्यात् ।।
10.52.43 ।। श्री. भा.
गोपालकृष्णा, आपल्या चरणांची सेवा घडावी. आपल्या चरणांचे रजःकण स्वतःच्या अंगावर पडावेत, म्हणजे अज्ञान, तम हे दूर होईल अशी इच्छा मोठे मोठे योगी करत असतात. असे आपण आहात. जर आपला प्रसाद माझ्यावर झाला नाही, आपण याठिकाणी आला नाहीत तर मी माझे प्राण ठेवणार नाही. पहा आपण. या जन्मात नाही, पुढं कोणत्या तरी जन्मात आपली प्राप्ती मला निश्चित होईल.
ब्राह्मणाने सांगितलं, हा संदेश आमच्या राजकन्येने आपल्याला लिहून दिला आहे आणि आपल्याला माझीही विनंती आहे, आपण निश्चय करा आणि रुक्मिणीला तेवढं घेऊन या. हसले भगवान गोपालकृष्ण. भूदेवा, मलासुद्धा रात्री झोप लागत नाही म्हणाले. आम्हाला तर आमंत्रणच नाही म्हणाले. त्या रुक्मीने सर्व पुढाकार घेतलाय. लग्नाचं काही आमंत्रण नाही काही नाही. मला माहिती आहे, त्या रुक्मिणीच्या ज्येष्ठ बंधूने माझ्या द्वेषामुळे हे लग्न मोडलेलं आहे. असू दे, काही हरकत नाही. रुक्मिणीचं मन मला समजलेलं आहे, तुम्हीही सांगितलेलं आहे. कोणी कितीही पराक्रमी असो सर्व राजांचा पराभव करून सर्वांसमक्ष मी रुक्मिणीला घेऊन जायची प्रतिज्ञा करतो आहे, चला, किती वेळ आहे अजून ! एक-दोन दिवस आहेत म्हणाला ब्राह्मण. कोणालाही सांगितलं नाही. त्या दारूक सारथ्याला रथ आणायला सांगितला. ब्राह्मणाला रथामध्ये घेतलं आणि निघाला रथ वेगाने. शैब्य, सुग्रीव, मेघपुष्प, वराहक म्हणजे त्या अश्वाचा, मनाप्रमाणे वेग आहे. एका रात्रीमध्ये विदर्भ प्रांतात प्राप्त झाले. द्वारका कुणीकडे आणि अमरावती कुणीकडे. अमरावतीला येऊन पोचले.
जे जे येणारे राजे आहेत त्यांचा आदरसत्कार तो भीष्मक राजा करतो आहे. नियुक्त जावई
जो शिशुपाल तो वऱ्हाडासह आलेला आहे. त्याचाही आदरसत्कार केला, त्याला राहण्याकरता उत्तम व्यवस्था केली. ध्वजपताका सगळ्या नगरामध्ये लावलेल्या आहेत. देवांचं, पितरांचं, विप्रांचं अर्चन वगैरे केलेलं आहे. सर्वांना भोजन घातलेलं आहे होमहवन झालेलं आहे, गृहहोमही झालेला आहे. ब्राह्मणांनी चारही वेदांच्या मंत्रांनी त्या कन्येला आशीर्वाद दिलेले आहेत. दानधर्म पुष्कळ केलेला आहे. अनेक राजे आलेले होते. शाल्व राजा आहे, जरासंध आहे, दंतवक्र आहे, पौंड्रक राजा आहे. शिशुपालाच्या पक्षाचे जेवढे राजेलोक होते ते नुसते नाही, पुष्कळ सैन्य बरोबर घेऊन आलेले आहेत. जरासंधानी सर्वांना सांगितलं, "आज हे राम-कृष्ण जर याठिकाणी येतील, तो कृष्ण जर रुक्मिणीला हरण करायचा प्रयत्न करेल तर त्याचा प्रयत्न यशस्वी होऊ द्यायचा नाही. युद्ध करून त्याचा पराभव करायचा आणि ही रुक्मिणी शिशुपालालाच द्यायची याकरता आपण जमलेलो आहोत. युद्ध करायचं ठरवा." हे इकडे यांचं चाललेलं आहे. भगवान श्रीकृष्ण तर रथामध्ये बसून निघून आले पण लगेच बलरामजींना ते समजलं. कुणीतरी ऐकला होता दोघांचा संवाद. हे रथामध्ये बसून पुढे गेले आहेत अमरावतीला. एकटा गेला म्हणाले, राजे लोक इतके जमलेले आहेत आणि एकटा जाऊन काय करणार? बंधू प्रेम आहे. लगेच यादवांचं सैन्य त्यानी जमा केलं. अत्यंत पराक्रमी यादव आहेत, अनेक युद्धामध्ये त्यांनी विजय मिळवलेला आहे. हत्तीदळ, घोडदळ यासहित सर्वही सैन्य जमा केलं आणि बलरामजीही वेगाने निघाले आहेत. येऊन पोहोचलेले आहेत, अजून विवाहाला अवकाश होता. रुक्मिणी भगवंताची वाट पहाती आहे, ब्राह्मणाची वाट पाहती आहे. अजून ब्राह्मण आला नाही.
अहो त्रियामान्तरित उद्वाहो मेऽल्पराधसः ।
नागच्छत्यरविन्दाक्षो नाहं वेद्म्यत्र कारणम् ।
सोऽपि नावर्ततेऽद्यापि मत्सन्देशहरो द्विजः ।।
10.53.23 ।। श्री. भा.
काय करायचं म्हणाली, माझं दैव मला अनुकूल नाही. एकरात्र आता फक्त शिल्लक राहिली, उद्या माझा विवाह होणार! भगवान श्रीहरीही प्राप्त झाले नाहीत आणि तो ब्राह्मणही आला नाही! काय माझ्याठिकाणी काहीतरी दोष त्यांना दिसला काय? म्हणून भगवंत आले नाहीत काय? गौरीमाता, भगवान शंकर कोणाचीही माझ्यावर कृपा नाही. त्यांचं मी अर्चन केलं आजपर्यंत. सगळं फुकट गेलेलं आहे. निराश झाली रुक्मिणी. डोळे झाकून घेतलेले आहेत तिने. काय करायचं आता? कोणाला सांगायचं? अश्रू नेत्रांमध्ये आलेले आहेत. इतक्यात तिला शुभशकुन झालेले आहेत. डावा डोळा आणि डावा हात स्फुरण पावतो आहे. शुभशकुन झाल्याबरोबर तिने डोळे