« Previous | Table of Contents | Next »
पान ४२१

उघडले आणि पाहती आहे समोर तो ब्राह्मण अत्यंत प्रसन्नमुखाने उभा आहे! या या भूदेवा म्हणाली, तुमचीच वाट पाहती आहे. विचारलं आपण केव्हा आला. मी आत्ताच आलो म्हणाले, गोपालकृष्णांच्या रथातच बसून मी आलो. कृष्ण आले आहेत हे वेगळं सांगण्याची जरूरच नाही. ब्राह्मणांनी सांगितलं, म्हणाले गोपालकृष्णांनी प्रतिज्ञा केली आहे, रुक्मिणीला मी घेऊन जाणार आहे. तुला आता कुणाचीही भीती बाळगण्याचं कारण नाही म्हणाले. इतका आनंद झाला रुक्मिणीला, लक्ष्मीदेवीच ती आहे. ब्राह्मणाला काय द्यावं? केवढं काम केलं यांनी माझं, भगवंताला आणून आणि माझी भेट करून देणार आहे. या ब्राह्मणाला याच्या योग्यतेचं द्यायला माझ्याजवळ नाहीये. असा विचार त्या महालक्ष्मीने केला आणि म्हणाली, "भूदेवा, मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही, फक्त नमस्कार करते." असं म्हणून त्यांच्या पायावर मस्तक ठेवलेलं आहे.

न पश्यन्ती ब्राह्मणाय प्रियमन्यन्ननाम सा ।।
10.53.31 ।। श्री. भा.

इकडे बाहेर वार्ता पसरली, राम-कृष्ण आलेले आहेत. भीष्मक राजाला समजल्याबरोबर त्यांना सामोरा गेलेला आहे. मधुपर्क पूजा केली. वस्त्रं, अलंकार अर्पण केलेले आहेत त्यांना राहण्याकरता उत्तम प्रकारचे वाडे वगैरे सगळी योजना केली. सैन्याची व्यवस्था केली, जनावरांच्या चारापाण्याची व्यवस्था केली. असे पुष्कळ राजेलोक आलेले आहेत. पृथ्वीवरचे जवळजवळ सगळे राजेलोक, कृष्णाच्या विरुद्ध जमलेले आहेत एकाठिकाणी, आणि गोपालकृष्ण त्याकरताच मुख्यतः आलेले आहेत. कोणाचा पराक्रम किती आहे, पहायला मिळेल. रुक्मिणीची इच्छाही पूर्ण करायचीच आहे. पण मुख्य हे आहे. पराक्रमी कोण राजा आहे हे कळण्याकरताच जणू हे स्वयंवर म्हणा, युद्ध म्हणा रचलं होतं भगवंतांनी. गोपालकृष्ण आलेले आहेत ही वार्ता सगळ्या नगरामध्ये पसरली. सर्व नगरवासी लोक, स्त्री-पुरुष त्यांच्या दर्शनाकरता आलेले आहेत. पाहताहेत. त्यांचं ते रूप पाहून इतका आनंद झाला त्यांना आणि बोलायला लागले

अस्याैव भार्या भवितुं रुक्मिण्यर्हति नापरा ।
असावप्यनवद्यात्मा भैष्म्याः समुचितः पतिः ।।
10.53.37 ।। श्री. भा.

आमची राजकन्या रुक्मिणी याचीच भार्या व्हायला योग्य आहे आणि हाच हिला योग्य पती आहे.

तो जो नियोजित वर होता त्याच्या वाड्यामध्ये कोणीही नगरातला मनुष्य गेला नाही.

***
पान ४२२

त्याच्या वाड्यावरून जाताना, कृष्णांनाच रुक्मिणी मिळाली पाहिजे असं ओरडत जात होते.

ठरल्याप्रमाणे रुक्मिणी राजकन्या ही नववधू राजवाड्यातून बाहेर पडलेली आहे. मैत्रिणी बरोबर आहेत. देवीची पूजा, दर्शन करून यायचं आहे. आलेली आहे. मनामध्ये भगवंतांचं ध्यान करते आहे. ऐकलेलं आहे फक्त श्रीकृष्णांबद्दल. पाहिलेलं नाही अद्यापि. त्यांनीही हिला पाहिलेलं नाही. मौन धारण करून मैत्रिणींच्या बरोबर ती मंदिरामध्ये येऊन पोचली. अद्यापि हे देवीचं मंदिर अमरावतीला आहे. दाखवतात - रस्ता मोकळा आहे. आलेले राजे रस्त्याच्या कडेला आपल्या आपल्या वाहनांवर उभे आहेत. सर्वही सशस्त्र सैनिक रस्त्याच्या दोन्ही बाजूला, उभे आहेत. मधून मोकळा रस्ता आहे आणि रुक्मिणी त्या रस्त्याने जाती आहे. मंदिरामध्ये आल्याबरोबर देवीला वंदन केलं, सुवासिनी स्त्रियांनी तिच्याकडून देवीची पूजा करवलेली आहे. प्रार्थना करती आहे रुक्मिणी,

नमस्ये त्वाम्बिकेऽभीक्ष्णं स्वसन्तानयुतां शिवाम् ।
भूयात् पतिर्मे भगवान् कृष्णः तदनुमोदताम् ।।
10.53.46 ।। श्री. भा.

"हे भगवती, अंबिके, पार्वतीमाते, तुला तुझ्या मुलांना, तुझ्या सगळ्या परिवाराला मी नमस्कार करून प्रार्थना करते, भगवान गोपालकृष्ण मला पती प्राप्त व्हावेत असा आशीर्वाद आपण द्यावा.". षोडशोपचारे पूजा झालेली आहे, आरती झालेली आहे. सर्व सुवासिनी स्त्रियांचीही तिने पूजा केली. त्यांनाही वस्त्र, अलंकार सर्व दिलेले आहेत. आशीर्वाद सर्व स्त्रियांनी दिले. मौन सोडून राजवाड्यात जाण्याकरता ती रुक्मिणी मंदिरातून बाहेर पडलेली आहे. हातानी आपल्या सखीचा हात धरलेला आहे. कोणकोण राजे लोक आलेले आहेत हे ती पाहतीये. कुणी रथात आहे, कुणी घोड्यावर आहे, कुणी हत्तीवर आहे. असे सगळे रुक्मिणीला पाहण्याकरता उभे आहेत. श्यामवर्ण होती रुक्मिणी. गौरवर्णाची नाही. श्रीकृष्णही श्यामवर्ण आहेत. उत्तम प्रकारचे अलंकार तिने घातलेले आहेत. हसतमुख आहे आणि अशाप्रकारे रुक्मिणी चालत निघालेली आहे. पत्रामध्ये तिने हीच वेळ सुचवलेली आहे. गोपालकृष्णही आपल्या रथामध्ये सज्ज आहेत, तयार आहेत. सारथ्याला दारूकाला सांगून ठेवलं होतं, "रुक्मिणीचं पाऊल या रथामध्ये पडल्याबरोबर तुमचे घोडे निघाले पाहिजेत. रस्ता मोकळा आहे नं आता! हीच वेळ आहे. युद्ध-बिद्ध न करता मुलगी मिळाली पाहिजे. नंतर पाहता येईल. रुक्मिणी पाहती आहे, एकेक राजा कोणत्या प्रांताचा आहे ही माहिती घेत पाहात चाललेली आहे.

चालताना भगवान गोपालकृष्णांच्या रथाजवळ ती आलेली आहे. दोघांची दृष्टादृष्ट झाली

***
पान ४२३

आणि तिथेच ती थांबलेली आहे. हेच गोपालकृष्ण आहेत. लगेच तिने हात पुढे केलेला आहे. गोपालकृष्णांनी तिच्या हाताला धरून आपल्या रथामध्ये घेतलं. रुक्मिणीचं पाऊल रथामधे पडल्याबरोबर घोड्यांना इशारा मिळाला अन् घोडे निघाले वेगाने. रस्ता मोकळा आहे, अत्यंत वेगाने घोडे गेले आणि बाहेरचं जे त्यांचं, यादवांचं सैन्य होतं, त्या सैन्यामध्ये तो रथ येऊन पोहोचलेला आहे. "आता या म्हणावं" म्हणाले, "गोपालकृष्ण तयार आहेत'. तो जरासंध म्हणतोय, "आमच्या डोळ्यादेखत नेलं याने रुक्मिणीला. चला, चला आणू या त्यांना, त्यांचा पराभव करून आणू या'. सगळे राजे लोक सैन्याची जमवाजमव करून युद्धाला तयार झालेले आहेत आणि ते भयंकर युद्ध सुरू झालं. रुक्मिणी श्रीकृष्णांच्या जवळ रथामध्ये आहे आणि भगवान गोपालकृष्णही युद्ध करतायत. बलराम आहेत. यादवांचे अनेक वीर आहेत. मोठेमोठे. तिला भीती वाटली. इतके राजे लोक आलेले आहेत. प्रतिस्पर्धी, विरोधी युद्ध करताहेत. आपलं कसं होईल? पाहिलं तिने गोपालकृष्णांच्या मुखाकडे, भगवान हसले, "रुक्मिणी, तुला काय भीती वाटतीय काय?' म्हणाले. "शत्रूसैन्य इतकं आहे आणि आपलं सैन्य काय कमी पराक्रमी आहे काय?' पहा म्हणाले आता काय होतंय ते पहा. गद, संकर्षण वगैरे सगळे युद्ध करताहेत. सैन्याचा नाश होतो आहे. मस्तकं तुटून खाली पडताहेत. हत्ती मरताहेत, घोडे मरताहेत. रथी मरताहेत, सगळ्यांचा नाश चाललेला आहे. शेवटी सर्व सैन्य मारलं गेलं, जमलेल्या राजांचं. पराजय झाला. त्या शिशुपालाचं तोंड अगदी वाळून गेलेलं आहे. काय करायचं? त्याला तोपर्यंत आशा वाटत होती, रुक्मिणीला नेलं तरी परत आणता येईल म्हणाला. पण कुठलं आणता येईल. जरासंध आला त्याला भेटायला. म्हणाला, "बाबा, तू काही निराश होऊ नकोस. पराजय आज झालाय आपला त्याला काय करायचं म्हणाला इतकं सैन्य आपण घेऊन आलो, तरीपण पराभव झाला. काल आपल्याला अनुकूल नाहीये. सुखदुःखाचा विचार माणसाने करू नये. जय मिळेल, पराजय मिळेल. अरे, मी या कृष्णाचा पराजय करण्याकरता सतरा वेळा गेलो म्हणाला. प्रत्येकवेळी तेवीस अक्षौहिणी सैन्य घेऊन. सतरावेळा याने माझा पराजय केला. पण शेवटी मी अठराव्या वेळेला याचा पराजय केला.' निर्लज्जपणे सांगतोय. याला काय अहंकार म्हणायचा, काय म्हणायचं? "तेव्हा आपल्याला सध्या काल अनुकूल नाही. पुन्हा आपण यादवांच्याबरोबर युद्ध करू. जाईना रुक्मिणी, गेली म्हणून काय झालं?' असं समाधान केलं. शिल्लक राहिलेलं सैन्य घेऊन सर्व राजेलोक आपापल्या राजधानीमध्ये निघून गेलेले आहेत.

तो रुक्मिणीचा भाऊ रुक्मी हा सैन्य जमवून निघालेला आहे. नाही म्हणाला. मी रुक्मिणीला

***
पान ४२४

जाऊ देणार नाही. पाठलाग करतो आहे. "अरे थांब' म्हणाला, "गवळ्याच्या मुला, माझ्या बहिणीला घेऊन जाता येणार नाही तुला.' भगवान सारथ्याला म्हणाले, "हा एक शिल्लक राहिलाय' रथ थांबवला. युद्धाला सुरूवात झाली. रुक्मीही मोठा महारथी होता. श्रीकृष्णांनी रुक्मीचे चार घोडे मारले. एका बाणाने सारथी मारला. त्याचा ध्वज मोडून टाकलेला आहे. धनुष्य तोडून टाकलेलं आहे. पुन्हा रुक्मीने दुसरं धनुष्य घेतलं, तेही तोडून टाकलेलं. हातामध्ये जे जे शस्त्र त्या रुक्मीने घ्यावं ते सोडण्यापूर्वीच श्रीकृष्णांनी तोडून टाकावं. त्याला शस्त्र घेताच येईना. मग रागाने ढाल तलवार हातात घेऊन त्या रुक्मीने रथाखाली उडी मारली आणि श्रीकृष्णांना मारण्याकरता तो त्यांच्या रथाकडं धावत धावत निघालेला आहे. त्याच्या हातातली ढाल-तलवार श्रीकृष्णांनी तोडून टाकली. तो जवळ आल्याबरोबर त्याला ठार मारण्याकरता श्रीकृष्णांनी आपली तलवार म्यानातून उपसली. घाबरली रुक्मिणी! आपल्या डोळ्यादेखत आपला बंधू मरतोय. "दयाया भगिनी मूर्तिः ।' शास्त्रकार सांगताहेत. भगिनी ही दयेची मूर्ती आहे. आपल्या भावाची दया तिला आली. पायावर मस्तक ठेवलं श्रीकृष्णांच्या. म्हणाली, ""देवा, माझ्या भावाला जीवदान द्यावं. मारू नका.'' रुक्मीचे सगळे केस श्रीकृष्णांनी कापून आपली तलवार म्यानात ठेवून दिली आणि रथाच्या चाकाला त्याला बांधून ठेवलेलं आहे. मारायचं नाही पण त्याला सोडायचं नाही. बलरामजी सर्व सैन्य मारून कृष्णांपाशी आले. त्या बांधून ठेवलेल्या रुक्मीला मुक्त केलं बलरामांनी आणि रुक्मिणीला बरं वाटावं म्हणून ते बोलायला लागले. काय रुक्मिणी, ह्या कृष्णाला राग आवरत नाही म्हणाले, कृष्णा, हा आता आपला आप्त झालेला आहे ना? रुक्मिणीचा भाऊ आहे एवढंसुद्धा तुझ्या लक्षात आलं नाही? आणि ह्याला बांधून ठेवलंस म्हणाले. हा असंच करतो म्हणाले. रागाने वाटेल तसा वागतो हा कृष्ण. आणि असं पहा बाई, आम्ही क्षत्रिय आहोत. क्षत्रियांचा धर्म अत्यंत कठोर आहे. समोर आलेला सख्खा भाऊ जरी असला तरी त्याला आम्ही जिवंत सोडत नाही, मारावं लागतं. अशा वंशामध्ये आमचा जन्म झालेला आहे. तसा हा वागतो म्हणाले. त्यालाही थोडं बोलायचं थोडंसं रुक्मिणीचं समाधान करायचं, असं करून बलरामांनी संभाव्य प्रसंग टाळलेला आहे.

नंतर निघाली सगळी मंडळी. सर्व यादवांचं सैन्य घेऊन बलराम आणि कृष्ण द्वारकेमध्ये प्राप्त झालेले आहेत. आणि नंतर उत्तम मुहूर्तावर रुक्मिणी आणि भगवान गोपालकृष्णांचा विवाह झालेला आहे. अनेक राजे लोक निमंत्रित केलेले, आहेत या सोहळ्याकरता. सर्वही राजकन्यांनाही ही कृष्णलीला ऐकून अत्यंत आश्चर्य वाटलेलं आहे. काय रुक्मिणीनं पत्र काय पाठवलं, गोपालकृष्ण

***
पान ४२५

आले काय, सर्व राजांचा पराजय काय केला. हे सगळं ऐकून त्या राजकन्यांनासुद्धा मोठं आश्चर्य वाटलेलं आहे.

शंकरांच्या तृतीय नेत्रातून अग्नी बाहेर पडला आणि त्यांना त्रास देणारा समोर असलेला मदन जळून गेलेला आहे. त्याला शरीर मिळायला पाहिजे. तो "काम" रुक्मिणीच्या गर्भातून जन्माला आलेला आहे. मदनाला शरीर मिळालेलं आहे. प्रद्युम्न या नावाने तो प्रसिद्ध झाला. तो मुलगा जन्माला आल्याबरोबर नारदांनी शंबरासुराला सांगितलं, "रुक्मिणीला झालेला मुलगा तुझा शत्रू आहे. तुला मारणारा आहे. तो शंबरासुर गुप्तवेषाने येऊन त्या मुलाला उचलून घेऊन गेला आणि समुद्रामध्ये त्याने त्या मुलाला टाकून दिलं. एक मत्स्य वर आलेला होता. त्याच्या मुखामध्ये तो मुलगा पडला. कोळ्याने मत्स्य पकडण्याकरता जाळी लावलेली होती. त्या जाळ्यामध्ये तो मत्स्य सापडला. मोठा मासा आहे. आपल्या स्वामींना हा मत्स्य देऊ या म्हणून त्या कोळ्याने राजेसाहेबांना तो मत्स्य नजराणा म्हणून दिला. त्याने, स्वयंपाकघराकडे तो मत्स्य पाठवला. पाक करण्याकरिता. शंबरासुराच्या पाकगृहाची सर्व व्यवस्था पाहण्याकरता मदनाची स्त्री रती ही राहिली होती. आपल्या पतीला शरीर केव्हा मिळतंय याची वाट पहातीये. त्या मत्स्याला चिरल्याबरोबर आतून तो सुंदर मुलगा बाहेर पडला. रतीने पाहिलेलं आहे. नारद ऋषी येऊन पोहोचले. नारदांनी सांगितलं, "रती, हा तुझा पती आहे. मदन आहे. शंबरासुरांनी याला समुद्रात टाकलं होतं. आता हा तुझ्याजवळ येऊन, पोचलेला आहे. त्या असुराला समजणार नाही अशा रीतीने ह्याचं पालन-पोषण कर. मोठा झाल्याबरोबर याला सर्व युद्धविद्या शिकव आणि याच्याकडून शंबरासुराचा नाश करून ह्याला घेऊन तू द्वारकेमध्ये जा.

गुप्तपणाने त्या मुलाचं संरक्षण केलं रतीनं. तो मोठा झालेला आहे. तरुण वयामध्ये आलेला आहे. आणि त्या रतीनं, स्त्रीप्रमाणे प्रेमानं बोलणं चालणं सुरू केलं. तो म्हणतो आहे प्रद्युम्न, ""तू माझं रक्षण केलंस म्हणाला आणि स्त्रीप्रमाणे वागतीयेस. मातृस्थानी तू आहेस.'' रती म्हणाली, ''आपण साक्षात नारायणाचे पुत्र आहात. शंबरासुरांनी आपल्याला समुद्रात टाकून दिलं होतं. माझ्याजवळ तुम्ही आलात. माझे पती आपण आहात. मी रती आहे, आपण मदन आहात. आता लवकर त्या शंबरासुराला युद्धाचं आव्हान द्या. त्याचा नाश करा म्हणजे आपण जाऊ या द्वारकेत. आपली माता अत्यंत शोकाकुल झालेली आहे.'' प्रद्युम्नाला, उत्तम विद्या तिने दिली. मोठं युद्ध त्या शंबरासुराचं आणि प्रद्युम्नाचं झालं आणि आपल्या गदेने प्रद्युम्नाने शंबरासुराचा नाश केलेला आहे. सर्व देवांनाही आनंद झाला.

***
पान ४२६

रतीनं आपल्या पतीला बरोबर घेतलं आणि आकाशमार्गाने ती द्वारकेमध्ये येऊन पोचलेली आहे. श्रीकृष्णांप्रमाणे रूप त्या प्रद्युम्नाचं होतं. सर्व स्त्रियांनी पाहिलं त्याला आणि गोपालकृष्ण आले असं समजून त्या स्त्रिया लज्जेने बाजूला झालेल्या आहेत. थोडं निरीक्षण करून पाहिलं आणि रूप तसं आहे म्हणाल्या, परंतु हा गोपालकृष्ण नाहीये. रुक्मिणी पहातीये. श्रीकृष्णांप्रमाणे ह्याचं रूप आहे. हा माझा मुलगा तर नसेल? जन्मल्याबरोबर दहा दिवसांच्या आत हा नाहीसा झाला. श्रीकृष्णांचं साम्य ह्याला कसं आलं? त्यांच्यासारखं रूप ह्याला कसं मिळालं? हा निश्चित माझा मुलगा असला पाहिजे. सगळी मंडळी आली. वसुदेव देवकीही आले. सगळ्या बायका जमल्या. गोपालकृष्णही आले. ते काही बोलले नाहीत. उभे राहिले. नारदांची वाट पहात होते. नारद आले बरोबर. ""रुक्मिणी, हा तुझा मुलगा आहे बरं का. त्या शंबरासुराने नेला होता. ही तुझी सून आहे. हिनंच त्याचं रक्षण केलं.'' आता ती रती तरुण होती आणि हा लहान मुलगा. तिने ह्याचं रक्षण केलं आणि याच्याबरोबरच विवाह म्हणजे कसं काय? तर देव जे आहेत स्वर्गलोकातले, 'अमरा निर्जरा देवाः ।' म्हणतात. त्यांना म्हातारपण नाही. नेहमी तरुण असतात ते देव. तशी ही रती, तिचं तारुण्य कायम होतं. प्रद्युम्न हा मनुष्य आहे. तेव्हा तो मोठा झाल्यावर ती मोठी आहेच आहे. कायमचीच आहे. म्हणून दोघांचा विवाह ह्या द्वारकेमध्ये होऊन गेलेला आहे. आणि सर्वही लोकांना गेलेला प्रद्युम्न परत मिळाला हे कळल्यामुळे आनंद झालेला आहे.

श्रीकृष्णांच्या दुसऱ्या विवाहाची कथा आता सांगताहेत.

सत्राजितः स्वतनयां कृष्णाय कृतकिल्विषः ।
स्यमंतकेन मणिना स्वयं उद्यम्य दत्तवान् ।।
10.56.1 ।। श्री. भा.

सत्राजित नावाचा यादव, द्वारकेमध्ये राहणारा. सूर्यनारायणांचा भक्त होता. सूर्यनारायणाने संतुष्ट होऊन सत्राजितला स्यमंतक नावाचा एक दिव्यमणी दिलेला होता. कंठामध्ये बांधून तो राज्यसभेमध्ये गेला. ते तेज पाहून सर्व मंडळी श्रीकृष्णांना सांगू लागली. आपल्या दर्शनाला सूर्यनारायण आलेले आहेत म्हणाले. हसले भगवान. हा सत्राजित आहे म्हणाले. कंठातल्या स्यमंतक मण्याचा हा प्रकाश पडलेला आहे. तो स्यमंतक मणी आपल्या वाड्यामध्ये आणून देवगृहामध्ये त्याची स्थापना सत्राजिताने केली. आणि रोज पूजा करीत होता. आठ भार सुवर्ण रोज त्या मण्यापासून मिळत असे. ज्या ठिकाणी तो मणी आहे, त्या ठिकाणी कधी दुष्काळ पडायचा नाही, रोगराई नाही असं त्याचं सामर्थ्य होतं. एके दिवशी सत्राजितला राज्यसभेमध्ये बोलावून

***
पान ४२७

श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले, "बाबा, हा मणी तू राजेसाहेबांना दे म्हणजे तो सुरक्षित राहील. तुझ्या वाड्यामध्ये हा मणी राहणं, म्हणजे तुला भीती आहे. पण तो लोभी होता. सुवर्ण त्या मण्यापासून मिळतं होतं. त्याने ऐकलं नाही. त्याचा बंधू प्रसेन नावाचा. एके दिवशी कंठामध्ये मणी बांधून घोड्यावर बसून शिकारीकरता अरण्यामध्ये गेला. एका सिंहाने त्याला ठार मारलं आणि मणी नेला. जांबवान जो आहे यमराज याने त्या सिंहाला ठार मारलं आणि तो मणी आपल्या मुलाच्या पाळण्यावरती बांधून ठेवला. दोन-तीन दिवस झाले प्रसेन आला नाही. सत्राजिताने आणखी विचार केला आणि सगळ्या गावामध्ये सांगायला सुरुवात केली, ""ह्या कृष्णाने माझ्या भावाला प्रसेनला मारून आणि तो मणी नेलेला आहे.'' गोकुळामध्ये असेपर्यंत कृष्णांच्या नशिबी होतंच की हे. त्या गोपींनी येऊन सांगत, आज माझ्या घरी चोरी केली. पण आता इथे लग्न झालं, द्वारका वसली आणि कृष्ण चोरी करतोय? सत्राजित सगळ्यांना सांगायला लागला आणि ते लोकांना खरं वाटलेलं आहे. ह्या ज्या खोट्या गोष्टी आहेत, यांचाच जास्ती प्रसार होतोय. सगळी मंडळी बोलायला लागली. कृष्णाने असं करायला नको होतं म्हणाले. पण एकाही माणसाला नीट चौकशी करावीशी वाटली नाही.

श्रीकृष्णांच्या कानावर ही अपकीर्ती गेली. आपल्याबद्दल लोक बोलताहेत. काही मंडळींना बरोबर घेऊन अरण्यामध्ये गोपालकृष्ण निघाले चौकशी करता. तो प्रसेन आणि त्याचा घोडा मरून पडला होता. याला कोणीतरी मारून मणी नेला आहे म्हणाले. त्याच रस्त्याने पुढे गेले तो सिंह मरून पडला होता. म्हणजे सिंहाने याला मारलेलं आहे. तसेच पुढे गेले. तिथे पायऱ्या होत्या खाली जायला. गुहा आहे असं दिसलं. सर्व मंडळींना गुहेच्या तोंडाशी थांबवलं आणि चौकशी करून येतो असं सांगून भगवान आत गेले. तो मणी त्यांना तिथे पाळण्यावर बांधलेला दिसला. तो मणी घेण्याकरता ते गेले. तिथे असलेल्या दासीच्या दृष्टीला श्रीकृष्ण पडले. हा कोणीतरी नवीन मनुष्य आलेला आहे असं पाहून ती आरडाओरडा करायला लागली. तो जांबुवान धावून आलेला आहे. गोपालकृष्णांबरोबर त्याने द्वंद्वयुद्ध सुरू केलं. अठ्ठावीस दिवसांपर्यंत युद्ध चाललेलं. जांबवान दमला. रामावतारापासून तो होता. आणि त्याच्या लक्षात आलं की हा मनुष्य नाहीये. साक्षात भगवान आहेत. आपले स्वामीच आहेत. शरण आलेला आहे. ""देवा, मला कळलं नाही म्हणाला. आपल्याबरोबर युद्ध केलं ही माझ्या हातून चूक झाली. काय काम आहे म्हणाला'' गोपालकृष्ण म्हणाले, ""अरे बाबा, हा मणी नेण्याकरता मी आलेलो आहे. मी मणी चोरला असं सगळे लोक म्हणताहेत. आईबाप काय, बंधू काय, सगळ्यांच्या मनात माझ्याबद्दल संशय आहे. त्या करता हा

***
पान ४२८

मणी घेऊन जाण्याकरता मी आलो आहे.'' तो म्हणाला, ""सध्या मणी माझ्या ताब्यात आहे. मी मणी देतो पण माझी मुलगी एवढी तुम्ही करून घ्या म्हणजे मणी देऊन टाकतो. मला तुम्हाला काही स्वतंत्र नजराणा देण्याची जरुरी नाही''. त्याची मुलगी जांबवती हिच्याबरोबर मग श्रीकृष्णांनी विवाह केला आणि तो मणी घेऊन जांबवतीसह ते द्वारकेला आले आहेत. बाहेर उभे राहिलेल्या मंडळींनी 10-12 दिवस वाट पाहिली. पण एकालाही असं वाटलं नाही की आत जाऊन पाहूयात. काय गोपालकृष्ण संकटात आहेत, कसे आहेत? एकालाही वाटलं नाही. आपण आपलं सुरक्षित राहिलो म्हणजे झालं. ही वृत्ती आहे. पहिल्यापासूनच माणसांची ही वृत्ती आहे. तो लोक आले द्वारकेमध्ये. सगळ्यांना सांगायला लागले. गोपालकृष्ण एका गुहेमध्ये गेले. दहा-बारा दिवस झाले, काय झालं आम्हाला माहित नाही. गोपालकृष्ण परत आले नाहीत. देवकी, रुक्मिणी सगळ्यांना दुःख झालेलं आहे. ब्राह्मणांच्या कडून चंडीपाठ सुरू केलेले आहेत. अठ्ठाविसाव्या दिवशी आपल्या नूतन पत्नीला घेऊन गोपालकृष्ण द्वारकेमध्ये आलेले आहेत.

सत्राजित यादवाला लगेच राज्यसभेमध्ये बोलावणं पाठवलेलं आहे. तो मणी त्या ठिकाणी ठेवला होता चौरंगावर. हा तुमचा मणी आहे. कसा मिळाला? कुठं मिळाला? तुम्हाला साक्षीदार पाहिजे असेल तर आहे म्हणाले. जांबवती होतीच तिथे. मुकाट्याने तुमचा मणी घेऊन जा म्हणून श्रीकृष्णांनी सत्राजितला बजावलेलं आहे. सर्व लोकांना समजली हकीकत. सत्राजितानेच उगीच निंदा केली असं सगळे लोक बोलायला लागले. श्रीकृष्णांनी सांगितलं, ""हा मणी आम्हाला नकोय.'' त्यांनी विचार केला, एकटी मुलगी याला. ही मुलगी आल्यानंतर हिच्या मुलांचाच अधिकार आहे त्याच्यावर. जाईल कुठं हा मणी? सध्यातरी कशाला पाहिजे? घेऊन जा म्हणाले. सत्राजितलाही अत्यंत पश्चाताप झालेला आहे. आणि त्याने आपली कन्या सत्यभामा की जिला अनेक लोकांनी मागणी घातली होती. ती कृष्णांना अर्पण केली. मणीही द्यायला लागला. मणी नको, तुमच्याजवळ ठेवा म्हणाले.

पांडवांचा लाक्षागृहामध्ये दाह झाला. पांडव जळून गेले ही बातमी जिकडे तिकडे पसरली. बलराम, कृष्ण कौरवांना भेटावं म्हणून आले. भीष्माचार्य, कृपाचार्य, गांधारी वगैरे सर्वांच्या भेटी झालेल्या आहेत. या वेळेला इकडे द्वारकेमध्ये अक्रूर आणि कृतवर्मा दोघांनीही शतधन्वा नावाच्या यादवाचा बुद्धिभेद केलेला आहे. त्याला म्हणाले, ""सत्राजिताने आपली मुलगी तुला द्यायचं कबूल केलं होतं. ती मुलगी त्याने कृष्णांनाच देऊन टाकली. निदान मणी तरी घे.'' हा यादव रात्रीच्या वेळेला वाड्यात गेला. सत्राजिताला याने ठार मारलेलं आहे आणि तो मणी घेऊन शतधन्वा गेलेला

***
पान ४२९

आहे. कृष्णांनी अगोदर बजावलं होतं सत्राजितला. पण लोभामुळे त्याचा प्राण गेला. सत्यभामेला अतिशय दुःख झालेलं आहे. ती लगेच हस्तिनापुरला गेली. राम-कृष्णांना सर्व वृत्तांत सांगितला. माझ्या बापाला मारलं म्हणाली कुणीतरी. त्यांनाही दुःख झालं. आलेले आहेत आणि शोध करू लागले. शतधन्वा यादवाला कळून चुकलं की आता जर आपण द्वारकेमध्ये राहिलो तर आपल्याला मारणार. तिथून तो बाहेर पडला. जाताना कृतवर्म्याकडे मणी ठेवायला गेला. कृतवर्मा म्हणाला, "माझ्याकडे हा मणी नको आहे. मी काही कृष्णाचा द्वेष करणारा नाही, द्रोह करणार नाही. तुझं तू बघ.' अक्रूरजींकडे गेला. ते म्हणाले, ""मला कशाला हा मणी पाहिजे? कृष्णाच्या विरुद्ध मला जायचं नाही. तू आणलेला आहेस, कुठंही टाकून दे.'' त्याने अक्रूरांच्या अंगावर तो मणी टाकला. आणि तो घोड्यावर बसून निघून गेला. द्वारकेतून बाहेर पडलेला आहे. हे समजल्याबरोबर राम-कृष्ण रथामध्ये बसून त्याचा पाठलाग करू लागले. मिथिला नगरीच्या वेशीमध्ये त्याचा घोडा मरून पडला. तो पळायला लागला. श्रीकृष्णांनी रथातून खाली उतरून सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद केला. त्याची वस्त्रं तपासून पाहिली. कुठेही मणी मिळालेला नाही. राम आपले रथात बसलेले आहेत. पाहताहेत. कृष्णांनी येऊन सांगितलं की शतधन्व्याचा वध उगीच केला म्हणाले. त्याच्याजवळ तर मणी काही सापडला नाही. पण बलरामांना विश्वास वाटला नाही. पण बोलले नाहीत. म्हणाले कृष्णा, द्वारकेत जाऊन त्याने आणखी कुणाजवळ मणी ठेवला असेल त्याचा शोध घे. मी आत्ताच काही द्वारकेमध्ये येणार नाही. हा मिथिलाधिपती आमचा मित्र आहे. त्याच्याजवळ मी राहणार आहे. एकटे गोपालकृष्ण परत आले. त्यावेळी दुर्योधन मिथिलेला येऊन राहिलेला आहे आणि गदायुद्धाचं उत्तम शिक्षण त्याने बलरामजींकडून घेतलेलं आहे. भीमापेक्षा तो गदायुद्धामध्ये निष्णात झालेला आहे.

इकडे द्वारकेमध्ये येऊन गोपालकृष्णांनी चौकशी केलेली आहे. अक्रूरजींजवळ मणी आहे हे त्यांना समजलं. अक्रूरजींना राज्यसभेमध्ये बोलावलं. अक्रूरजींना कल्पना होती हाच प्रश्न निघणार म्हणून जाताना तो मणी घेऊनच ते गेले. आल्याआल्या श्रीकृष्ण म्हणताहेत, ""या या अक्रूरजी, बरेच दिवसांत तुमची भेट नाही.'' आणि विचारताहेत, मणी तुमच्याजवळ आहे का असं विचारलंच नाही तर

ननु दानपते न्यस्तस्त्वय्यास्ते शतधन्वना ।
स्यमंतको मणिः श्रीमान् विदितः पूर्वमेव नः ।।
10.57.36 ।। श्री. भा.

चातुर्य आहे. ""अक्रूरजी पुष्कळ दानधर्म तुमच्याकडून होतोय, म्हणाले. तो कसा करता?

***
पान ४३०

तुमच्याजवळ त्या शतधन्वाने मणी ठेवलेला आहे, हे आम्हाला पूर्वीच समजलेलं आहे म्हणाले. सत्राजितला एकच मुलगी आहे. तिच्या मुलांचा ह्या मण्यावर अधिकार आहे की नाही? त्या मुलांना मिळायला पाहिजे हा मणी. पण आम्हाला नको तो मणी. तो मणी बाळगणं म्हणजे फार कठीण आहे. तो प्रसेन मेला, सत्राजित मेला, शतधन्वा मेला या मण्यामुळे. तुमच्याजवळ तो मणी राहिलाय ते बरंय. कारण तुम्ही लोभी नाही. हा एक गुण आहे. अनेक ब्राह्मण मंडळी आमच्याकडे येतात आणि सांगतात की अक्रूरजींनी मोठा यज्ञ केला आणि कितीतरी सुवर्ण त्यांना तुम्ही दिलं. हे सुवर्ण मण्यापासूनच मिळतं ना तुम्हाला?'' अक्रूरजींनी कबूल केलं. ""मी नको म्हणत होतो'' म्हणाले. ""माझ्या अंगावर टाकला त्याने आणि तो गेला.'' भगवान म्हणाले, ""असू दे, तुमच्याजवळ ठेवा, फक्त एकदा दाखवा म्हणाले, सगळ्या लोकांना. घरातली सगळी मंडळी बायका, पुरुष. हे आमचे बंधुराज तर तिकडे जाऊन बसले आहेत. मला काय कळत नाही का म्हणाले. माझा मित्र मिथिलाधिपती आहे. मला तिथं राहायचं आहे. मी मणी ठेवलेला आहे अशी सगळ्यांची समजूत झालेली आहे. तेंव्हा तो मणी एकदा दाखवा आणि माझी ही अपकीर्ती दूर करा.'' ""काय संसारात मी पडलो'' म्हणाले. सर्वांना तो मणी अक्रूरजींनी दाखवलेला आहे. भगवान सांगताहेत, ""अक्रूरजी, हा मणी तुमच्याजवळच ठेवा. यज्ञयाग करत चला. दानधर्म करा.'' अशाप्रकारे भगवंताने आपली अपकीर्ती दूर केली. संसारामध्ये राहायचं म्हणजे असा प्रयत्नवाद पाहिजे. सगळं सहन करायचं असं नाहीये. आचार्य सांगताहेत हे स्यमंतक मण्याचं आख्यान. जो श्रवण करतो त्याची अपकीर्ती दूर होते. त्याच्यावर जर चोरीचा आळ आला असेल, तर तो दूर होईल. खरोखर चोरी केली असेल तर दूर होणार नाही.

दुष्कीर्तिं दुरितं अपोह्य याति शान्तिम् ।।
10.57.42 ।। श्री. भा.

शुक्राचार्य सांगतात, राजन, पांडवांना भेटण्याकरता भगवान श्रीहरी, सात्यकी वगैरे यादवांना बरोबर घेऊन इंद्रप्रस्थ नगरामध्ये गेले. पांडवांना धृतराष्ट्राने इंद्रप्रस्थात राहायला सांगितलं होतं आणि आपण मुलांसह हस्तिनापुरात राहात होता. आनंद झाला पांडवांना. प्रेमाने सगळ्यांच्या भेटी झालेल्या आहेत. द्रौपदीचं नुकतंच लग्न झालेलं होतं. तिनेही येऊन भगवंताला नमस्कार केलेला आहे. सात्यकीचाही सत्कार पांडवांनी केलेला आहे. कुंतीच्या जवळ जाऊन भगवान श्रीहरींनी वंदन केलेलं आहे. कुशल प्रश्न वगैरे केले. सूनबाई वगैरे सगळ्या चांगल्या आहेत ना हे ही विचारलं. कुंतीच्या अंतःकरणामध्ये श्रीकृष्णप्रेम फार होतं. हा केवळ आपला भाचा आहे, बंधूचा मुलगा

« Previous | Table of Contents | Next »