अशी तिची दृष्टी नाहीये. त्याची दृष्टी आपल्यावर आहे. प्रत्यक्ष परमेश्वर तो आहे. प्रेम अंतःकरणामध्ये उत्पन्न झालेलं आहे. ती बोलून गेली, "बाबा, पूर्वीच कंसाला मारल्याबरोबर तू आमच्या समाचाराकरता अक्रूरला पाठवलं होतंस. त्यावेळेलाच माझ्या मनाचं पूर्ण समाधान झालेलं आहे की आम्हाला आधार आहे, जगामध्ये आमची विचारपूस करणारा कोणीतरी आहे. हे तुझं प्रेम असंच आम्हाला मिळालं. विश्वाचा तू मित्र आहेस. हा आपला आणि हा दुसऱ्याचा ही कल्पना तुझ्या मनामध्ये नाहीये. पण आपलं स्मरण करणारे जे आहेत, आमच्यासारखे, त्यांना सर्व क्लेशातून आपण मुक्त करता. अशीच कृपा आपली आमच्यावर असावी." बरेच दिवस म्हणजे दोन-चार महिने तिथे राहिले गोपालकृष्ण.
एकदा कृष्णा्जुन रथामध्ये बसून शिकारीला गेले आणि परत येताना नदीतीरावर त्यांनी रथ थांबवला. अर्जुन पाणी पिण्याकरता नदीतीरावर गेला. तिथं तीरावर एक कन्या बसलेली त्यानी पाहिली. चौकशी केली. कुणाची मुलगी तू आहेस, इथे कशाला आलीस? ती म्हणाली.
अहं देवस्य सवितुर्दुहिता पतिमिच्छती ।
विष्णुं वरेण्यं वरदं तपः परममास्थिता ।।
10.58.20 ।। श्री. भा.
"सूर्यनारायणांची मी कन्या आहे. मला भगवान विष्णू पती प्राप्त व्हावेत अशी इच्छा आहे. तपश्चर्या मी करते आहे. देवाने कृपा करावी आणि माझा स्वीकार करावा. अन्य पती मला नको आहे. कालिंदी माझं नाव आहे. यमुनाजलामध्ये माझ्या पित्याने माझी राहण्याची वगैरे सगळी व्यवस्था केली आहे. अच्युताचं, भगवंतांचं दर्शन होईपर्यंत मी या ठिकाणी तपश्चर्या करणार आहे." अर्जुनानं जाऊन सांगितलं श्रीकृष्णांना, अशी अशी सूर्यकन्या आहे. तुमच्याबरोबर विवाहाची इच्छा करते आहे. तिला बरोबर घेऊनच आले हे दोघेही. अग्निनारायणाला खांडववन पाहिजे होतं. कृष्णा्जुन रथामध्ये बसून त्या खांडववनाभोवती फिरताहेत. वनातून बाहेर कोणालाही जाऊ द्यायचं नाही. पक्षी काय, पशू काय बाण मारून त्याला पाठीमागे ढकलून द्यायचं. खांडववन अग्नीला दिलेलं आहे. संतुष्ट झाले अग्निनारायण. त्यावेळेला मयासुर सापडला होता अग्नीमध्ये. कृष्णांच्या सांगण्याप्रमाणे अर्जुनाने त्याला जीवदान दिलं. सोडून दिलं. अग्नीमध्ये टाकलं नाही. त्या मयासुराने, पांडवांचे उपकार जाणून त्यांना एक मयसभा बांधून दिलेली आहे. मोठा शिल्पकार तो होता. अग्निनारायणानेही संतुष्ट होऊन त्या अर्जुनाला श्वेत अश्व दिलेले आहेत रथासाठी. अक्षय बाणांनी भरलेले भाते दिले. एक धनुष्य दिलेलं आहे. आणखी एक अभेद्य कवच दिलेलं आहे.
नंतर सात्यकी वगैरे यादवांसह भगवान द्वारकेला प्राप्त झाले. आणि उत्तम मुहूर्तावर सूर्यकन्या कालिंदीबरोबर त्यांचा विवाह झाला. रुक्मिणी, जांबवती, सत्यभामा आणि कालिंदी. चार स्त्रिया झालेल्या आहेत. अवंती देशाचे अधिपती दुर्योधनाच्या पक्षाचे होते. त्यांची जी बहीण आहे कृष्णांवर प्रेम करणारी, मित्रविंदा नावाची. तिचंही रुक्मिणीप्रमाणे श्रीकृष्णांनी हरण केलेलं आहे. सर्व राजांचा पराभव करून. कोसल देशाचा राजा सत्यजित नावाचा. त्याला सत्या नावाची कन्या होती. अनेक राजे स्वयंवराकरता जमले पण तिचा विवाह होऊ शकला नाही कारण त्याचा पण मोठा निराळा होता. सात मोठे बैल सोडले होते मोकळे. त्या सर्वांना बांधून ठेवणारा जो राजपुत्र असेल, त्याला ही राजकन्या द्यायची असं त्या राजानं ठरविलं होतं. गोपालकृष्ण त्या राजधानीमध्ये आलेले आहेत. त्या राजाने त्यांचा सत्कार केला. पूजा केली. "काय आज्ञा आहे महाराज?" असं त्या राजाने विचारलं. भगवान म्हणाले, "राजा, क्षत्रियाने कोणाजवळ याचना करायची नाही. पराक्रमाने काय पाहिजे असेल ते मिळवायचं." "हे आहे म्हणाले पण आपली मैत्री राहावी, म्हणून मी आपल्या कन्येला मागणी घालण्याकरता आलो आहे." राजा म्हणाला, "तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणता मला जावई मिळेल. पण माझा असा पण आहे, म्हणाला सात बैलांना जो बांधून ठेवेल त्याला मुलगी द्यायची माझं ठरलेलं आहे. पुष्कळ राजपुत्र आले पण ते बांधू शकले नाहीत. त्या बैलांनी पुष्कळांची डोकी फोडली, मारलं पुष्कळांना. असं झालेलं आहे." निघाले गोपालकृष्ण. सात रूपं कृष्णांनी धारण केली आणि सातही बैलांना वेसण घालून बांधून टाकलेलं आहे. आनंद झाला राजाला, राजपत्नीला. त्या कन्येला तर फार आनंद झाला. वाद्यं वाजताहेत. पुष्कळ मंडळी जमलेली आहेत. आणि त्या सत्या नावाच्या राजकन्येबरोबर गोपालकृष्णांचा विवाह झालेला आहे. मुलीच्याबरोबर राजाने किती देणगी दिली? हे शुक्राचार्य मुद्दाम सांगतायत. आत्तापर्यंत ही इतकी लग्नं झाली, काय दिलं मुलीच्या बापाने काही सांगितलं नाही. इथं मात्र सांगताहेत संपत्ती किती होती-
दशधेनुसहस्राणि पारिबर्हं अदाद् विभुः ।
युवतीनां त्रिसाहस्रं निष्कग्रीवसुवाससाम् ।।
10.58.50 ।। श्री. भा.
पहिल्याप्रथम दहा हजार गाई दिलेल्या आहेत. तीन हजार तरुण स्त्रिया मुलीची सेवा करण्याकरता दिल्या.
नबनागसहस्राणि नागाच्छतगुणान् रथान् ।
रथाच्छतगुणानश्वानश्वाच्छतगुणान् नरान् ।।
10.58.51 ।। श्री. भा.
नऊ हजार हत्ती दिलेले आहेत. गजांतलक्ष्मी म्हणतात. एक हत्ती पोसायचा म्हणजे तो म्हणे अगोदर समोर टाकलेल्या, शे-सव्वाशे पेंड्या फेकूनच देतो. नंतर खात असेल आणि म्हणजे घरातले असलेले सगळे हत्ती दिले असं नाही. कितीतरी हत्ती असले पाहिजेत. जावयाला काही सर्व घर द्यायचं नाहीये. नऊ लाख रथ दिले. रथ दिल्यानंतर अश्व द्यायलाच पाहिजेत. नऊ कोटी अश्व दिलेले आहेत. अश्वांच्या शंभरपट माणसं दिलेली आहेत. म्हणजे नऊ अब्ज झाले. कामंधामं करायला नोकर-चाकर. म्हणजे त्यावेळेला धान्य भारतवर्षामध्ये किती असेल? एक विवाह झाल्यानंतर तिच्या घरची इतकी माणसं, पशू वगैरे आणायचे म्हणजे द्वारकेमध्ये सुद्धा किती समृद्धी असेल. दोघे पती-पत्नी रथामध्ये बसून निघालेले आहेत. पुष्कळ सैन्य बरोबर आहे. ज्या राजपुत्रांना ही कन्या मिळाली नाही, कन्याही नाही आणि संपत्तीही नाही, ते सगळे लोक युद्ध करण्याकरता आलेले असताना तो अर्जुन त्या वेळेला कृष्णांच्या बरोबर होता. त्यानेच सर्व राजांचा पराभव केलेला आहे. सर्व देणगी घेऊन द्वारकेमध्ये भगवान प्राप्त झाले. श्रुतकीर्ति राजाची कन्या भद्रा हिच्याबरोबरही श्रीकृष्णांचा विवाह झालेला आहे. त्याचप्रमाणे कैकेयी नावाची स्त्री तिच्या बंधूने दिलेली, तिच्याबरोबरही विवाह झाला. आणि मद्रदेशाचा अधिपती, त्याची कन्या लक्ष्मणा तिच्या स्वयंवरामध्ये मत्स्यभेद करून तिचा स्वीकार श्रीकृष्णांनी केलेला आहे. आणखीही अशा प्रकारच्या सोळा हजार राजकन्या श्रीकृष्णांच्या स्त्रिया झालेल्या आहेत. भौमासुराचा नाश करून त्याने आणलेल्या सर्वही राजकन्यांबरोबर गोपालकृष्णांनी विवाह केलेला आहे.
ती कथा राजाने ऐकण्याची इच्छा केल्यानंतर आचार्य सांगताहेत. भौमासुर नावाचा प्रागज्योतिषपुर प्रांताचा अधिपती होता. सध्याचा आसाम प्रांत. नरकासुर किंवा भौमासुर. स्वर्गलोकामध्ये जाऊन अदितीची कुंडलं त्यानं काढून आणली. देवमाता अदिती. इंद्राने जाऊन श्रीकृष्णांना प्रार्थना केली. हा असुर म्हणाले अत्यंत उन्मत्त झालेला आहे. केव्हाही स्वर्गात येतो. वाटेल ते घेऊन जातो. त्याला शासन करण्याकरता गोपालकृष्ण गरुडावर बसून निघाले. द्वारकेतून बाहेर पडले. मोठे मोठे आडवे डोंगर आहेत. कितीतरी संरक्षणाची व्यवस्था त्या नरकासुराने केली होती. त्याच्यापुढे शस्त्रास्त्रांची व्यवस्था केलेली आहे. गिरिदुर्ग आहेत, शस्त्रदुर्ग आहेत, जलदुर्ग आहेत, अग्निदुर्ग आहेत, अनिलदुर्ग आहेत. त्याच्या पलिकडे त्याची राजधानी आहे. सर्वही दुर्गांचा नाश चक्राने करून, अग्नी आणि जल हे सर्व नष्ट करून राजधानीजवळ भगवान येऊन पोहोचले. गरुडावर बसून आलेले आहेत. बरोबर सत्यभामा त्यावेळेला होती. पांचजन्य शंख वाजवल्याबरोबर तो जो मुरासुर होता तो पाण्यामध्ये निजलेला होता. पाच मस्तकं त्याला होती. तो उठला
पाण्यातून आणि त्रिशूळ घेऊन युद्धाकरता बाहेर पडलेला आहे. गरुडाच्या अंगावर त्यांने त्रिशूल फेकला. तो येण्यापूर्वीच बाणाने त्याचे तुकडे केले. गदायुद्धही झालेलं आहे. सुदर्शन चक्राने त्याचे बाहू आणखी पाचही मस्तकं भगवंतांनी तोडून टाकली. गतप्राण होऊन तो खाली पडला. त्याची मुलं सेनापती पीठ याला पुढं करून युद्धाला आलेली आहेत. त्या सर्वांचाही नाश भगवंतांने केलेला आहे. आणि नंतर तो नरकासुर हत्तीवर बसून युद्ध करण्याकरता आला. दोघांचं युद्ध सुरू झालं. सर्व सैन्य मारलेलं आहे. अच्युताला मारण्याकरिता त्या नरकासुराने त्रिशुल हातामध्ये घेतला, पण तो टाकण्यापूर्वीच भगवंतांनी नरकासुराचा शिरच्छेद केलेला आहे. किरीटकुंडलंघारी त्याचं मस्तक धरणीवर पडलेलं आहे. भूदेवी श्रीकृष्णांजवळ आली आणि नरकासुराने आणलेली अदितीची कुंडलं तिनं भगवंतांना दिली. नरकासुराच्या मुलाला तिने पुढं केलं. आणि त्याला संरक्षण द्या, याला राज्य द्या म्हणून विनंती तिने केली. त्यावेळेला भूदेवीने भगवंतांची पुष्कळ स्तुती केलेली आहे.
त्या मुलाला राज्याभिषेक करून भगवान इंद्रलोकात गेले. नरकासुराने जमवलेली संपत्ती कृष्णांनी द्वारकेला पाठवून दिलेली आहे. सोळा हजार राजकन्या त्या नरकासुराने सर्व राजांचा पराभव करून आपल्या राजधानीमध्ये ठेवल्या होत्या. त्या सगळ्या राजकन्यांना द्वारकेला पाठवून दिलेलं आहे. ऐरावताच्या कुळातले चौसष्ट पांढरेशुभ्र हत्ती, ज्यांना चार चार दात आहेत असे, तेही द्वारकेला पाठवून दिले आहेत. स्वर्गलोकामध्ये गेले भगवान. देवमाता अदितीला तिची कुंडलं अर्पण केली. इंद्रानेही पूजा केली. निघाले द्वारकेला जाण्याकरता. सत्यभामा म्हणाली, हा पारिजात वृक्ष माझ्या उद्यानामध्ये पाहिजे. पारिजात कल्पवृक्ष आहे. लगेच तो वृक्ष उपटून घेतला श्रीकृष्णांनी आणि निघाले. मग इंद्रादिक देव म्हणाले, "हा वृक्ष, आमच्या स्वर्गातला आहे. तुम्हाला भूमीवर आम्ही नेऊ देणार नाही." नरकासुराला मारून निष्कंटक राज्य भगवंताने केलं आहे. त्याचा काही उपकार स्मरावा पण इंद्र म्हणतोय हा वृक्ष आमचा आहे. स्वर्गातच राहणार हा. त्यावेळेला भयंकर युद्ध झालेलं आहे. सर्व यादव हे द्वारकेतून तिथं आले होते म्हणतात. विष्णू पुराणामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. देवांचं आणि यादवांचं भयंकर युद्ध झालेलं आहे. पराभव झाला देवांचा आणि तो पारिजात वृक्ष द्वारकेला आणून सत्यभामेच्या बागेमध्ये लावलेला आहे.
नंतर एकाच मुहूर्तावर सर्व सोळा हजार राजकन्यांबरोबर श्रीकृष्णांनी विवाह केलेला आहे. म्हणजे तेवढी रूपं धारण केली आणि तितके वाडे झालेले आहेत. तितके नोकरचाकर, सर्वांची
व्यवस्था झालेली आहे आणि हा एवढा मोठा गृहस्थाश्रम सुरू झालेला आहे. साक्षात लक्ष्मीपती ज्यांना पती मिळाले अशा त्या सर्व राजकन्या. परंतु भगवंतांची कृपा आपल्यावर अखंड राहावी त्यांचं प्रेम राहावं या उद्देशाने सर्व सेवा देवाची त्यांनी करावी. आल्याबरोबर उठून उभं राहावं, त्यांना बसायला आसन द्यावं, पाय धुवावेत. वारा घालावा. त्याचप्रमाणे जेवण झाल्यानंतर तांबूलदान करावं. अशी सर्वप्रकारची सेवा स्वतः त्या स्त्रियांनी करावी. शेकडो स्त्रिया त्यांच्याहाताखाली काम करताहेत. त्यांना काय पाहिजे ते घेऊन दे गं, असं दासीला सांगून या आपल्या बसलेल्या आहेत असं नाही. स्वतः त्यांनी सेवा करावी. हा एवढा गृहस्थाश्रम कसा चालला होता, हे ऐकण्याची इच्छा होती राजाला. एक गृहस्थाश्रम रुक्मिणीचा, त्याची कथा त्यांनी सांगितली त्यावरून बाकीचे समजून घे म्हणाले.
कहिंचित् सुखमासीनं स्वतल्पस्थं जगद्गुरुम् ।
पतिं पर्यचरत् भैष्मी व्यजनेन सखीजनीः ।।
10.60.1 ।। श्री. भा.
दुपारचं भोजन झालेलं आहे. रुक्मिणीच्या वाड्यामध्ये भगवान आहेत. प्रत्येक वाड्यामध्ये आहेत. पलंगावरती विश्रांती घेण्याकरता पडलेले आहेत. रुक्मिणीने दासीच्या हातातून पंखा घेतला आणि वारा घालत उभी राहिली. सहज लीलेनं ज्याने हे संपूर्ण विश्व उत्पन्न केलं, पालन करतो, पुन्हा उपसंहार करतो तोच परमात्मा, या ठिकाणी जन्माला आलेला आहे. या बुद्धीने ती रुक्मिणी ती विचार करते आहे. काय झालं कुणाला ठाऊक, तिची परीक्षा पाहायची होती का तिचा गर्व दूर करायचा होता, पडल्या पडल्या श्रीकृष्णपरमात्म्याने बोलायला आरंभ केलेला आहे. साक्षात लक्ष्मीदेवी ती आहे.
राजपुत्रीप्सिता भूपैर्लोकपालविभूतिभिः ।।
10.60.10 ।। श्री. भा.
काय राजकन्ये, पडल्या पडल्या एकदम हाक मारली . ती दचकली, राजकन्ये म्हणताहेत? आता काय होणार आहे कुणाला ठाऊक? आता काय बोलणार. श्रीकृष्ण बोलताहेत. "तुझ्या विवाहाच्या वेळेला किती राजेलोक तुझ्या इच्छेने आले होते? तुझ्याबरोबर विवाह करावा म्हणून पुष्कळ श्रीमंत राजे लोक आलेले होते. तुझ्या बंधूंचीही संमती होती, आईबापांचीही संमती होती.
कस्मान्नो ववृषेऽसमान् ।।
10.60.11 ।। श्री. भा.
सर्व राजे लोकांचा तिरस्कार करून तू आमच्याबरोबर विवाह का केलास? आता विवाह झाला, मुलं झाली आणि आज यांनी हे काढलेलं आहे. का विवाह केला? "आमची योग्यता
आणि तुझी योग्यता बरोबरीची नाही बाई. या सगळ्या राजांची भीती आम्हाला वाटते म्हणून आम्ही समुद्रात येऊन राहिलो म्हणालो. सगळे बलवान राजे आमचा द्वेष करताहेत. आम्हाला राज्य नाही. आम्ही जसं वागतो ते वागणंही लोकांना पसंत नाहीये. लोकमार्ग सोडून आम्ही वाटेल तसं वागतो. आमच्या नादाला लागलेल्या स्त्रिया कधीही सुखी होणार नाहीत हे तुला कळलं नाही का?''
निष्किंचना वयं शश्वन्निष्किंचनजनप्रियाः ।
तस्मात् प्रायेण न ह्याढ्या मां भजन्ति सुमध्यमे ।।
10.60.14 ।। श्री. भा.
"राजकन्ये, आम्ही अकिंचन आहोत. आमच्याजवळ काही संपत्ती नाही आणि असे अकिंचन लोक जे आहेत, त्यांनाच मी आवडतो. श्रीमंत लोक माझ्याकडे कधी येत नाहीत. वर आणि वधू यांचं समान ऐश्वर्य असेल तर दोघांचा विवाह हा योग्य ठरतो. तू काहीही विचार केला नाहीस. अविचाराने पत्र काय मला पाठवलं, त्या ब्राह्मणाला काय पाठवून दिलंस, आणि ज्याच्याजवळ काहीही गुण नाहीत, घरदार नाही, संपत्ती नाही, राज्य नाही अशा माझ्याबरोबर विवाह करून बसलीस?'' एवढं बोलून तरी थांबायचं की नाही?
पुढे आणखी बोलताहेत.
अथात्मनोऽनुरूपं वै भजस्व क्षत्रियर्षभम् ।
येन त्वमाशिषः सत्या इहामुत्र च लप्स्यसे ।।
10.60.17 ।। श्री. भा.
"तुला जर इच्छा असेल, कोणत्यातरी राजावर जर तुझं प्रेम असेल, तर तू जा, माझी काही हरकत नाही. तुझ्या मनाला समाधान मिळेल. तू विचारशील मग मी आलो का तुला न्यायला. माझी योग्यता कमी असताना, त्यावेळी का बोललो नाही? तर त्याचं असं आहे, हे सगळे राजे शिशुपाल, जरासंध, दंतवक्र वगैरे माझा द्वेष करतात. ते सगळे एका ठिकाणी जमले होते. त्यांचा गर्व मला दूर करायचा होता. त्याकरता मी आलो त्यावेळी. त्यांच्यादेखत मी तुला हरण करून आणलं. याचा अर्थ त्यांच्या पराक्रमाचा भंग मला करायचा होता.''
उदासीना वयं नूनं न स्त्र्यपत्यार्थकामुकाः ।।
10.60.20 ।। श्री. भा.
"आम्हाला या संसार सुखाची इच्छाच नाहीये. स्त्री, मुलं, द्रव्य कुणीकडेही आमचं लक्ष नाहीये. आत्मानंदामध्ये आम्ही निमग्न आहोत, तृप्त आहोत.'' शुक्राचार्य सांगतात, राजा, हे इतकं विलक्षण भाषण केलं. आपणच श्रीकृष्णांच्या प्रेमाला खरोखर पात्र आहोत, आपल्यावरच त्यांचं जास्ती प्रेम आहे असा थोडासा अहंकार त्या रुक्मिणीला झालेला होता. तो दूर करायचाय म्हणून
असं भाषण केलं. आजपर्यंत कधीही असं भाषण त्या रुक्मिणीला ऐकायला मिळालं नव्हतं. इतकं प्रेम करणारे गोपालकृष्ण, आज नुसतं बोलत नाहीत, तर निघून जा म्हणताहेत. केव्हां मला घरातून बाहेर काढतील कुणाला ठाऊक? असं त्या रुक्मिणीला वाटलं. मनाने अत्यंत कोमल असलेली रुक्मिणीदेवी, घाबरलेली आहे. तिने लगेच काही उत्तर दिलं नाही. भीतीने तिच्या मनावर इतका परिणाम झालेला आहे. डोळ्यातून अश्रुधारा वहाताहेत. खाली मान घातलेली आहे आणि घाबरल्यामुळे तिच्या हातातून तो पंखा खाली पडला आणि ती रुक्मिणीसुद्धा धाडदिशी जमिनीवर मूर्च्छित होऊन पडलेली आहे. पत्नीचं ते विलक्षण प्रेम पाहिलं भगवंतांनी. हिला काय म्हणाले थट्टामस्करी कळत नाही? एकदम पलंगावरून उडी मारली. तिच्याजवळ गेले. वारा घालताहेत. केस सगळे सारखे केलेत. डोळ्याला पाणी लावताहेत आणि सांगताहेत.
मा मा वैदर्भग्यसूयेथा जाने त्वां मत्परायणाम् ।
त्वद्वचः श्रोतुकामेन क्ष्वेल्याऽऽचरितमंगने ।।
10.60.29 ।। श्री. भा.
"रुक्मिणी, मी बोललो ते तुला काय खरं वाटलं काय म्हणाले. थट्टेने बोललो. तू अगदी माझ्यावर पूर्ण प्रेम करणारी आहेस. खरी पतिव्रता आहेस हे मला माहिती आहे. पण तुला राग आल्यानंतर तू कशी दिसतेस किंवा कशी बोलतेस ते मला एकदा पहायचं होतं. म्हणून मी असं बोललो म्हणाले. गृहस्थाश्रमी माणसाचं हे कामच आहे. थट्टामस्करी करायची, राग आला स्त्रीला ते पहायचं. कसा राग येतो, काय काय बोलते हे सगळं पहायचं. गृहस्थाश्रमी पुरुषाने हेच करायचं. खरा राग नसतो तो. ते भाषण खरं मानायचं नाही.'' समाधान केलं त्या रुक्मिणीचं. मग तिची भीती दूर झाली. दुसऱ्या राजाकडे निघून जा म्हटल्यानंतर, आजच्या आज जा म्हटलं तर काय करायचं? उठून उभी राहिलेली आहे. आनंद झालेला आहे. आणि तिने उत्तर द्यायलाआरंभ केला.
ननु एवमेतत् अरविन्दविलोचनाह
यद् वै भवान् भगवतोऽसदृशी विभूम्नः ।
क्व स्वे महिम्न्यभिरतो भगवांस्त्र्यधीशः
क्वाहं गुणप्रकृतिरज्ञगृहीतपादा ।।
10.60.34 ।। श्री. भा.
"केवढा कमीपणा माझा आहे देवा, तुमची आणि माझी योग्यता सारखी नाही हे मला मान्य आहे. मी पूर्ण जाणूनच तुम्हाला विनंती केली. तुम्ही माझा स्वीकार केला. मी धन्य झाले. तुम्हाला साजेशी अशी मी नाही आहे. स्वयंप्रकाश, आनंदरूप आपण आहात. हा आपला महिमा आहे. कमीही होत नाही आणि जास्तीही होत नाही. त्या आनंदामध्ये मग्न असणारे आपण
कुणीकडे आणि त्रिगुणात्मक प्रकृती असलेली मी कुणीकडे?''
अज्ञानीलोक माझे पाय धरतात. ज्ञानी लोक माझ्याकडे कधीही येत नाहीत. ते आपल्याकडे येतात. तुमची आणि माझी योग्यता सारखी कशी होईल? देवाने आपल्याकडे कमीपणा घेतला. ही त्यांनाच मोठेपणा देऊन आपल्याकडे कमीपणा घेतीये. खरं सांगतीये. त्यात थट्टा नाहीये. सर्वांच्या भीतीने समुद्रामध्ये जाऊन आपण राहिलात हे ही खरं आहे.
सत्यं भयादिव गुणेभ्य उरुक्रमांतः ।
शेते समुद्र उपलंभनमात्र आत्मा ।।
10.60.35 ।। श्री. भा.
"हे जे त्रिगुणात्मक विषय आहेत, या संसाराच्या भीतीने आपण या जलामध्ये जाऊन राहिलात असं मी समजते. राजाची भीती नाही. ही जी इंद्रियं आहेत यांच्याबरोबर आपला निग्रह आहे. परंतु आपले जे सेवक आहेत, ते ही असेच करतात. त्यांनी आपलं राज्य सोडून दिलेलं असतं. आणि आपल्या ध्यानाकरता, भजनाकरता अरण्यात जाऊन राहतात. तेव्हा आपण कशाला राज्य स्वीकाराल? निष्कांचन आपण आहात. म्हणजे काहीही जवळ नाही. परंतु बाह्य साधनांनी आपली योग्यता ठरवायची नाही. स्वयंयोग्यता आपली आहे. ब्रह्मादिक देव ज्यांना नजराणा देतात आणि ज्यांची आज्ञा पालन करतात ते आपण स्वतःला निष्कांचन समजता? सर्वही पुरुषार्थाचं पर्यवसित रूप आपलं आहे. चारही पुरुषार्थ मिळाले नाहीत तरी चालेल पण आपली प्राप्ती झाली की ते सर्व प्राप्त होतात एवढंच नव्हे तर मुक्ती पुरुषार्थही आपल्यामुळे प्राप्त झाला अशी माझी समजूत आहे. सर्वही भक्तांना आत्मदान करणारे, संरक्षण करणारे असे आपण आहात. राजांच्या भीतीने आपण समुद्रात जाऊन राहिला असं आपण म्हणता.काय हे कोणाला तरी खरं वाटेल का? युद्धाच्या वेळेला रथामध्ये तुमच्याजवळ राहून मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे ना? राजे पळून गेले की तुम्ही पळून गेलात? माझ्या नादाला कोणी लागला की त्याला त्रास होतो, हे ही तुमचं काही मला पसंत नाही म्हणाली. मोठे मोठे राजे राज्यत्याग करून आपली कृपा संपादन करण्याकरता वनामध्ये जाताहेत. त्यांना काय दुःख झालेलं आहे? आपल्या कृपेनं त्यांना किती आनंद मिळालेला आहे. आपला त्याग करून दुसरीकडं कोणती स्त्री जाईल?'' ""सर्व समृद्धी आपल्याजवळ आहे त्यामुळे आपला त्याग कोणालाही पसंत नाही. सर्व विचार करून ब्रह्मादिक देवांचा त्याग करून मी आपल्याजवळ आलेली आहे.'' लक्ष्मीने महाविष्णूंना का स्वीकारलं का त्याचा आश्रय घेतला
याचं हे उत्तर आहे. रुक्मिणी ही लक्ष्मीदेवीच आहे. आणि शेवटी म्हणाली, आपण जे बोललात, की निघून जा दुसऱ्या राजाकडे, हे बोलणं कसं आहे? कुणी ऐकलं तर काय म्हणेल? त्या दासी, सख्या होत्याच की तिथे. पण हेही बोलणं योग्यच आहे म्हणाली.
नैवालीकमहं मन्ये वचस्ते मधुसूदन ।
अम्बाया इव हि प्रायः कन्यायाः स्याद् रतिः क्वचित् ।।
10.60.47 ।। श्री. भा.
व्यूढायाश्चापि पुंश्चल्या मनोऽभ्येति नवं नवम् ।
बुधोऽसतीं न विभृयात् तां बिभ्रत् उभयच्युतः ।।
10.60.48 ।। श्री. भा.
"कोणावर प्रेम असेल तर त्याच्याकडे जायला हरकत नाही, हे ही आपलं बोलणं योग्य आहे. आईप्रमाणे आपली भाषा आहे. आम्ही राजकन्या म्हणाली, सर्वही साक्षात आहे. राजकन्यांचं मन हे असंच आहे. नवीन नवीन ठिकाणी जाणं, ही त्या मनाची सवय आहे. विवाह झाला तरी सुद्धा त्यांचं प्रेम एके ठिकाणी स्थिर राहात नाही. अशी जर राजकन्या असेल किंवा अशी जर वधू आपल्याला मिळाली असेल, तर तिचा स्वीकार कोणीही करू नये. पण माझ्या अंतःकरणामध्ये मात्र दुसरं कोणीही नाहीये.
अस्त्वम्बुजाक्ष मम ते चरणानुरागः
आत्मनः रतस्य मयि च अनतिरिक्तदृष्टेः ।
यर्हि अस्य वृद्ध्यै उपात्तरजोऽतिमात्रो
मामीक्षसे तदु ह नः परमानुकम्पा ।।
10.60.46 ।। श्री. भा.
आपला अनुराग, आपलं प्रेम माझ्या चित्तामध्ये निरंतर आहे. आपण केवळ आत्मानंदामध्ये निमग्न आहात. माझ्या अंतःकरणातला अनुराग वृद्धिंगत व्हावा याकरता तुमची कृपादृष्टी जर माझ्यावर झाली तर हीच मी आपली अनुकंपा, दया समजून आनंदाने राहीन. तुम्ही जे जे बोललेला आहात ते सगळं योग्य आहे.''
भगवान सांगतात,
साध्वी एतत् श्रोतुकामैस्त्वं राजपुत्रि प्रलम्भिता ।।
10.60.49 ।। श्री. भा.
"तुझ्या मुखातून मला हे सगळं ऐकायचं होतं म्हणाले. माझं सगळंच म्हणणं तू खोडून काढलंस. मी कमीपणा घेतला तो मोठेपणाच तू दाखवलास म्हणाले. मी शेवटी अत्यंत निंद्य बोललो. पण तेही योग्यच तू ठरलेलं आहेस. स्वतःकडेच तू दोष घेतलेला आहेस. जी जी इच्छा
तुला आहे, ती ती सर्व पूर्ण होईल म्हणाले. अकाम भक्त तू आहेस. पतीचं प्रेम तू मिळवलेलं आहेस. इतका मी तुला टोचून बोललो, रागाने बोललो तरीसुद्धा माझ्याठिकाणचं तुझ्या अंतःकरणातलं प्रेम थोडंही कमी झालेलं नाही. माझ्याजवळ येऊन कोणत्याही ऐश्वर्याची, मोक्षाची सुद्धा इच्छा त्या भक्तांना होत नाहीये. माझ्याबद्दलचा अनुराग तुझ्या चित्तामध्ये दृढ आहे मला माहिती आहे. तुझ्यासारखी प्रेमशील गृहिणी मला दिसत नाही. माझ्या प्रेमामध्ये अंतराय येऊ नये म्हणून सर्व राजे लोकांचा तिरस्कार करून एका ब्राह्मणाबरोबर तू पत्र पाठवलंस. दुसरी गोष्ट तुझा भाऊ लढाईला आला असताना त्याचे केस कापून त्याला आम्ही रथाला बांधून ठेवलेलं आहे, त्याचा अपमान केलेला आहे. अनिरुद्धाच्या विवाहाच्या वेळेला बलरामांनी तुझ्या भावाला ठार मारलेलं आहे. पण
दुःखं समुत्थमसहः अस्मदयोभिया ।
नैवाब्रवीः किमपि तेन वयं जितास्ते ।।
10.60.56 ।। श्री. भा.
रुक्मिणी, हे सर्व घडून सुद्धा एवढं दुःख तू सहन केलंस. आमचा वियोग होऊ नये, आमच्याजवळ राहायला मिळावं म्हणून आमच्याविरुद्ध एक चकार शब्द तू तोंडातून काढला नाहीस. या तुझ्या सहनशीलतेनं आम्हाला तू जिंकलेलं आहेस. देवाने अभिनंदन केलेलं आहे रुक्मिणीचं. शुक्राचार्य सांगतात, राजा, प्रत्येक वाड्यामध्ये याप्रमाणे स्त्रियांच्याबरोबर बोलणं चालणं चालू आहे. एका वाड्यातला रुक्मिणीचा वृत्तांत शुक्राचार्यांनी सांगितला. प्रत्येक वाड्यातला वृत्तांत देणं अशक्यच आहे. कृष्णचरित्र कितीतरी अद्यापि अज्ञात आहे. व्यासांनी किती लिहायचं? दुसऱ्या वाड्यामध्ये नारद दर्शन आहे. अवतार घेऊन नुसतं बाहेरच्या लोकांना वळण लावायचं असं नाहीये. घरातही वळण लावायचं आहे. रुक्मिणीला थोडासा अहंकार झालेला त्यांच्या दृष्टीला पडला आणि हे बोललेले आहेत. तरी रुक्मिणीला राग आलेला नाही. तिचं प्रेम, पातिव्रत्य हे दृढ ठरलेलं आहे आणि कबुली भगवंतांनी दिलेली आहे. याप्रमाणे पुढे संसार कसा कसा झाला, काय काय लीला झाल्या हे शुक्राचार्यांनी सांगितलं.
एकैकशस्ताः कृष्णस्य पुत्रान् दश दशाबलाः ।
अजीजनन्नवमापितुः सर्वात्मसंपदा ।।
10.61.1 ।। श्री. भा.
शुक्राचार्य महाराज सांगतात राजा, सोळा हजार आठ स्त्रिया, भगवान कृष्णांच्या आहेत. प्रत्येक स्त्रीपासून त्यांना दहा मुलं झाली. पित्याप्रमाणे रूप, शौर्य, बुद्धी त्या मुलांना आहे. सर्वही त्या स्त्रिया भगवंतांची सेवा करताहेत. सर्व प्रकारची अनुकलता त्यांना आहे. आठ ज्या स्त्रिया