« Previous | Table of Contents | Next »
पान ४४१

आहेत "अष्टमहिषी", त्यांच्या मुलांची नावं सांगताहेत. मुख्य रुक्मिणीचा पुत्र जो प्रद्युम्न आहे हा पित्याप्रमाणे सर्वगुणसंपन्न आहे. त्यांची मुलं, नातू, पणतू वगैरे पुष्कळ आहेत. यादवांचा वंश फार वाढलेला आहे. प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्ध याला त्या रुक्मीने आपली नात दिलेली आहे. राजा म्हणाला, तो तर कृष्णाचा द्वेष करणारा मग त्याने आपली नात दिली कशी यादवांकडे? आचार्य सांगतात, पुढे त्याचा द्वेष दूर झाला बहिणीच्या प्रेमामुळे त्याने आपली नात दिली. भोजकट नावाचं नवीन नगर तयार करून तो तिथे राहिला होता. आपल्या मुळच्या नगरात तो गेला नाही. त्याने प्रतिज्ञा केली होती की कृष्णाचा पराभव करून मी माझी बहीण परत आणीन आणि जर शक्य झालं नाही तर नगरात पाऊल ठेवणार नाही.

अनिरुद्धाच्या विवाहाकरता सर्व यादव मंडळी त्या भोजकट नगरामध्ये आली. विवाहसमारंभ उत्तम झालेला आहे. आणि त्या रुक्मीला त्याच्या मित्रांनी सांगितलं, बलरामाला अक्षक्रीडा, म्हणजे फाश्यांनी द्यूत खेळण्याचं ज्ञान याला नाहीये. तू याला बोलाव. दोघेही द्यूत खेळा. बलरामांपासून पुष्कळ द्रव्य तुला जिंकून मिळेल. दोघांचं द्यूत सुरू झालं. रुक्मीने पुष्कळ द्रव्य जिंकून घेतलेलं आहे. कलिंग देशाचा राजा, रुक्मीचा मित्र होता. बलरामजींचा पराभव झाला की त्याने हसावं, उपहास करावा. बलरामजी हट्टाला पेटले आणि त्यांनी एकदा पुष्कळ द्रव्य पणाला लावलं. त्या खेळामध्ये बलराम विजयी झाले. पण रुक्मी आणि त्याचे मित्र यांनी आरडाओरडा केला की रुक्मीला हे द्रव्य मिळालं पाहिजे. बलरामांचा पराजय झालेला आहे. आकाशवाणी झाली की बलरामांचा जय झालेला आहे. पण त्या रुक्मीने काही ऐकलं नाही. तो त्यांना बोलला, तुम्ही गवळी लोक. तुम्हाला या अक्षक्रीडेचं ज्ञान असणार कसं? आमच्यासारख्या राजांशीच अक्षक्रीडा करावी आणि युद्धही आम्हीच करावं. तुम्हाला काहीही ज्ञान नाही. बलराम रागावले आणि त्यांनी लगेच त्या रुक्मीला ठार मारलं. बाकीचे राजे पळून गेले. प्रत्यक्ष आपला मेव्हणा आणि आपल्या भावाने मारलं कुणाला बोलायचं? तो शत्रूच होता. मारलं, बरं झालं. असं म्हणावं तर रुक्मिणीला राग येणार. आणि माझ्या मेव्हण्याला का मारलं असं विचारावं तर बलरामांना राग येणार. हे उठले, कृष्ण भगवान. सारथ्याला रथ काढायला सांगितला आणि द्वारकेला निघून गेले. कुणालाही बोलायला नको म्हणाले. मागाहून सर्व मंडळी, वऱ्हाड द्वारकेला आलेलं आहे.

राजाने एक प्रश्न विचारला, "महाराज, अनिरुद्धाचा विवाह बाणासुराची कन्या उषा हिच्याबरोबर झाला त्यावेळी श्रीकृष्ण आणि शंकर भगवान यांचं मोठं युद्ध झालं असं मी ऐकलंय.

***
पान ४४२

ते चरित्र आपण सांगा.'' शुक्राचार्य सांगतात,

बाणः पुत्रशतज्येष्ठो बलेरासीन्महात्मनः ।।
10.62.2 ।। श्री. भा.

वामनांना ज्याने भूमिदान केलेलं आहे त्या बळीचा हा बाणासुर ज्येष्ठ पुत्र आहे. तो मोठा शिवभक्त होता. उदार होता. बुद्धिमान होता. सत्य बोलणारा होता. पुरामध्ये तो राज्य करतो आहे. शंकरांचा पूर्ण कृपा प्रसाद त्याच्यावर असल्यामुळे देवसुद्धा अतिशय नम्रपणे त्याच्याशी वागत असत. कोणत्याही वेळेला एक हजार हात त्याला उत्पन्न होत होते. शंकरांच्या वरामुळे. शंकर भगवान तांडवनृत्य करत असताना त्याने उत्तम प्रकारे मृदंग वाजवून शंकरांना अत्यंत प्रसन्न केलं होतं. त्याची कला पाहून शंकरांनी वर दिला होता. एके दिवशी बाणासुर शंकरांच्या दर्शनाकरता आला. नमस्कार केला आणि प्रार्थना करतो आहे, "देवा मला तुम्ही हजार हात कशाकरता दिले? भार झालाय मला. त्रैलोक्यामध्ये माझ्याबरोबर युद्ध करायला कोणीही तयार नाही. सगळ्यांना भीती वाटते. तुम्ही तेवढे समर्थ दिसता. माझ्याबरोबर युद्ध करू शकाल". म्हणजे आपल्या उपास्य देवालाच युद्धाचं आव्हान याने दिलं. रागावले शंकर. फार उन्मत्त झालास म्हणाले. लवकरच भेटेल तुला एक वीर पुरुष आणि तुझा गर्व दूर करील. परत आला बाणासुर. बाणासुराची एक कन्या होती उषा नावाची. एका मोठ्या राजवाड्यामध्ये ती उषा, तिच्या मैत्रिणींसह राहत होती. बाहेर कडक पहारा होता. आत कुठल्याही पुरुषाला जाऊ देत नव्हते. बाणासुराच्या एका मंत्र्याची मुलगी, चित्रलेखा नावाची ही उषेची मैत्रीण होती. ती चित्रकलेमध्ये अत्यंत निष्णात होती आणि मोठी योगिनी होती. योगाभ्यासही तिचा पुष्कळ झालेला होता. एका रात्री ती उषा एकदम झोपेतून जागी झाली आणि रडायला लागली. चित्रलेखा जवळ होतीच. तिने विचारलं, "काय झालं? तू का रडते आहेस?" ती म्हणाली, "आत्ता मला स्वप्नामध्ये एका सुंदर पुरुषाचं दर्शन झालं आणि तो एकदम दिसेनासा झाला. म्हणून मी दुःख करते आहे. पीतांबरधारी, अत्यंत सुंदर तो होता. त्याला भेटण्याची माझी इच्छा आहे." चित्रलेखा म्हणाली, "काही घाबरू नकोस. मी तुला त्या पुरुषाची भेट घालून देते." कोण आहे उषेला भेटलेला मनुष्य हे समजण्याकरता त्या चित्रलेखेने चित्र काढायला सुरुवात केली. चित्रकला खरी ज्याला आणखी अवगत करायचीय त्याला मनाची एकाग्रता, स्थिरताही पाहिजे. मनामध्ये ते आणून त्याप्रमाणे चित्र काढायचं. देवांची चित्रं काढली. दैत्यांची, विद्याधरांची, गंधर्वांची मानवांची चित्रं काढायला लागली. मोठ्या मोठ्या राजांची चित्रे काढून दाखवतीये. यादवांची चित्रं ती काढायला लागली. वसुदेवाचं चित्रं काढलं. बलराम-कृष्णांची चित्रं काढली. नंतर प्रद्युम्नाचं काढलं. आणि नंतर शेवटी अनिरुद्धाचं

***
पान ४४३

चित्र तिने काढलं. उषा म्हणाली, "यांचंच मला दर्शन झालं. चित्रलेखा म्हणाली आता पत्ता लागला. श्रीकृष्णांचा हा नातू आहे म्हणाली. मी घेऊन येते. मध्यरात्रीच्या सुमारास ती चित्रलेखा आकाशमार्गाने द्वारकेस येऊन पोहोचली आणि अनिरुद्धाला त्याच्या पलंगासह उषेच्या अंतःपुरात घेऊन आली. अत्यंत सुंदर तो अनिरुद्ध होता. साक्षात कामाचा म्हणजे मदनाचा तो मुलगा होता. तो तिथे राहिलेला आहे. बाहेरच्या पहारेकऱ्यांना काही संशय आला की आत कुणीतरी पुरुष असला पाहिजे. त्यांना काही आत जायला परवानगी नव्हती. मग त्यांनी जाऊन बाणासुराला सांगितलं की राजेसाहेब, आपल्या कन्येच्या अंतःपुरामध्ये कुणीतरी पुरुष गेलेला आहे असं आम्हाला वाटतं. आम्ही तर कुणालाही आत जाऊ देत नाही. कसा गेला आपणच शोध करा. अपकीर्ति होणार आता. कन्येने आपल्या कुळाला कलंक लावला. रागाने एकदम तो बाणासुर त्या कन्येच्या अंतःपुरात स्वतः आलेला आहे. अचानक येऊन तो पाहतोय तर ती उषा आपल्या मैत्रिणींसह एका अत्यंत सुंदर अशा पुरुषाबरोबर सोंगट्या खेळतीये, हास्यविनोद चाललेत. लगेच त्याने आपल्या सैनिकांना त्याला पकडण्याची आज्ञा केली. अनिरुद्धही मोठा पराक्रमी होता. त्यानेही पुष्कळसे सैनिक मारले. पण बाणासुरासमोर त्याचं काही चाललं नाही. बाणासुराने त्याला नागपाशामध्ये बांधून तुरुंगात टाकलेलं आहे. ती उषा रडते आहे. तिच्याकडे लक्ष न देता तो बाणासुर रागाने निघून गेलेला आहे.

शुक्राचार्य म्हणतात राजा, द्वारकेतून अनिरुद्ध नाहीसा झाला. चार महिने होऊन गेले तरी त्याचा पत्ता लागला नाही. सगळे लोक दुःखी झालेले आहेत. एकेदिवशी नारदांनी येऊन सांगितलं, तुमचा अनिरुद्ध त्या बाणासुराच्या तुरुंगात पडलेला आहे म्हणाले. लगेच सगळं यादवसैन्य निघालेलं आहे. प्रद्युम्न आहे, सात्यकी आहे, सांब आहे. मोठे मोठे पराक्रमी वीर होते. बलराम-कृष्ण होतेच. बारा अक्षौहिणी सैन्य घेऊन त्यांनी बाणाच्या नगराला वेढा घातलेला आहे. बाणासुर युद्धासाठी बाहेर आलेला आहे. आणि त्याला साहाय्य करण्याकरता भगवान शंकरही आपलं गणांचं सैन्य घेऊन आलेले आहेत. शंकर आणि कृष्ण यांचं युद्ध चाललेलं आहे. प्रद्युम्न आणि कार्तिकस्वामी यांचं युद्ध चाललेलं आहे. बाणासुराच्या दोन प्रधानबरोबर बलराम युद्ध करताहेत. पुष्कळ कालापर्यंत ते युद्ध चालू आहे. शार्ङ्ग धनुष्यातून श्रीकृष्ण बाण सोडताहेत. अनेक प्रकारची अस्त्रं कृष्णांनीही सोडली, शंकरांनीही सोडली. शेवटी शंकरांनी पाशुपतास्त्राचा प्रयोग केला. कृष्णांनी आपल्या नारायणास्त्राचा प्रयोग केला. श्रीकृष्णांनी शंकरांच्यावर जृंभणास्त्राचा प्रयोग केला. शंकरांना जांभया यायला लागल्या. शस्त्र काही हातात धरता येईना. ते रणांगणातून निघून गेले. प्रद्युम्नाने

***
पान ४४४

कार्तिकस्वामीचाही पराजय केलेला आहे. मग बाणासुर आणि श्रीकृष्ण यांचं युद्ध सुरू झालं. त्या बाणासुराला हजार हात होते. पाचशे हातामध्ये पाचशे धनुष्यं आणि दुसऱ्या पाचशे हातामध्ये पाचशे बाण घेऊन तो बाणवर्षाव करतो आहे. श्रीकृष्णाला फक्त चार हात, चतुर्भुज होते ते. पण त्यांनी बाणासुरांच्या सर्व बाणांचं निवारण केलं. शेवटी बाणासुराला पळून जायची पाळी आली. त्याची माता रणांगणावर आली आणि तिने श्रीकृष्णांना प्रार्थना केली. तो बाणासुर नगरामध्ये निघून गेलेला आहे. पुन्हा तो युद्धाला आला. आणि त्यावेळेला श्रीकृष्णांनी बाणासुराचे हात तोडायला सुरुवात केली. चार हात शिल्लक ठेवून बाकी सगळे हात तोडून टाकलेले आहेत. शंकर परमात्मा श्रीकृष्णांची प्रार्थना करताहेत, म्हणाले हा माझा भक्त आहे. याला तुम्ही मारू नका. भगवान म्हणाले, मलाही ह्याला मारायचं नाहीये. हा प्रल्हादाच्या कुळातला आहे. प्रल्हादाचा पणतू आहे हा. मी प्रल्हादाला वर दिला होता. तेव्हा मला ह्याला मारायचं नाही. पण हा फार उन्मत्त झाला होता. तुम्हालाही युद्धाचं आव्हान दिलं होतं याने. तेव्हा याचे हात तोडून टाकायचे होते. बाणासुर त्या युद्धातून परावृत्त झालेला आहे. सर्व यादवांना बोलावलं त्याने. त्यांचा सत्कार केला. आपली कन्या उषा त्या अनिरुद्धाला दिलेली आहे. विवाह झालेला आहे. मग अनिरुद्धाला घेऊन सर्व यादव हे द्वारकेमध्ये आलेले आहेत.

एकदोपवनं राजन् जग्मुर्यदुकुमारकाः ।
विहर्तुं साम्बप्रद्युम्नचारुभानुगदादयः ।।
10.64.1 ।। श्री. भा.

शुक्राचार्य सांगतात राजा, यादवांची मुलं ही एकदा खेळण्याकरता बाहेर पडली. द्वारकेच्या जवळच एक चांगलं वन होतं. पुष्कळ वेळ त्यांचा खेळ झाला. आणि त्यांना तहान लागली. एक विहीर त्यांच्या दृष्टीला पडली. पाणी असेल, पिऊया म्हणून आली ती मुलं, विहिरीमध्ये एक अतिशय मोठा सरडा पडला होता. त्या मुलांनी दोऱ्या आणल्या, त्या सरड्याला बांधून वर ओढायचा प्रयत्न केला. पण तो काही वरती येऊ शकला नाही. मुलांना काही त्याला काढता येईना एवढा अजस्त्र तो होता. गोपालकृष्णांना सांगितल्यावर ते तिथं आले. सहज हाताने उचलून त्या सरड्याला वर ठेवलं. श्रीकृष्णांचा हस्तस्पर्श झाल्याबरोबर त्याचा तो सरड्याचा देह गेला आणि देवाप्रमाणे रूप त्याला प्राप्त झालं. सर्वांना समजण्याकरता गोपालकृष्णांनी त्याला विचारलं, की तू कोण आहेस? सरड्याचा जन्म तुला का आला? तो नृग नावाचा राजा होता. तो बोलू लागला, इक्ष्वाकु राजाचा मुलगा नृग मला म्हणतात. दानशूर असे मोठे मोठे जे दाते होऊन गेले त्यामध्ये माझंही नाव कदाचित आपल्या कानावर आलं असेल. पुष्कळ गायींचं दान मी केलेलं आहे.

***
पान ४४५

जितके वाळूचे कण असतील, जितक्या तारका असतील अथवा जितक्या पावसाच्या धारा पडत असतील तितक्या गाई मी दिलेल्या आहेत. आपण विचारलं म्हणून सांगतोय. पुष्कळ दूध देणाऱ्या, ज्यांचे खूर चांदीने मढवलेले आहेत. शिंगांना सोन्याचा पत्रा मारलेला आहे, न्यायाने मिळवलेल्या अशा गाईंचं दान मी केलेलं आहे. बाकीची दानंही मी केली, भूदान आहे, हिरण्यदान आहे, गृहदान आहे. अनेक यज्ञ केले. माझ्यावर एकदा धर्मसंकट आलं. एका ब्राह्मणाला मी एक गाय दिली. तो घरी घेऊन गेला. त्याची गाय त्याच्या घरातून निघून माझ्या वाड्यात आली आणि इतर गाईंबरोबर मिसळली. मला काही माहिती नाही. दुसऱ्या दिवशी तीच गाय मी दुसऱ्या ब्राह्मणाला दिली. आणि तो ब्राह्मण ती गाय घेऊन निघालेला असताना, आदल्या दिवशी ज्याला गाय दिली होती त्या ब्राह्मणाची गाठ रस्त्यामध्ये पडली. तो म्हणाला ही माझी गाय आहे. हा म्हणाला, मी आत्ताच राजवाड्यातून ही गाय घेऊन आलो आहे. दोघेही माझ्याकडे आले. काय राजेसाहेब, आज गाय दान करायची, संध्याकाळी परत आणायची दुसरे दिवशी तीच गाय दुसऱ्या ब्राह्मणाला द्यायची. कशाला करता हे दान? कुणी सांगितले तुम्हाला? मला काही बोध झाला नाही, समजलं नाही. त्या दोघांची समजूत करण्याचा मी प्रयत्न केला. त्या गाईकरता एक लाख गाई द्यायला मी तयार झालो आणि विनंती केली की या धर्मसंकटातून मला मुक्त करा. दोघांनाही तीच गाय पाहिजे होती. ती गाय तिथेच त्यांनी सोडून दिली आणि दोघेही ब्राह्मण घरी निघून गेले. यमदूतांनी मृत्युनंतर मला यमाकडे नेले. यमधर्माने मला विचारलं, राजा तुझं पुण्य पुष्कळ आहे. पण पापही थोडं आहे. तुला पापाचं फळ अगोदर भोगायचं आहे की पुण्याचं फळ आधी भोगायचं आहे; मी म्हणालो, पाप थोडं आहे ना, मग आधी पापफळ भोगतो. लगेच यमधर्मांच्या आज्ञेप्रमाणे मला हा सरड्याचा देह प्राप्त झाला. इथे येऊन मी पडलो होतो. आज आपला हस्तस्पर्श झाल्याबरोबर माझा उद्धार झालेला आहे. मी आता स्वर्गलोकाला जातो महाराज.'' असं सांगून, भगवान श्रीकृष्णांना प्रदक्षिणा, नमस्कार करून विमानात बसून तो नृगराजा स्वर्गलोकाला निघून गेलेला आहे.

बरीच मंडळी तिथं जमलेली. त्यांनी ते नृगराजाचं आख्यान त्याच्या तोंडूनच ऐकलं. भगवान सर्व लोकांना उद्देशून म्हणताहेत,"" ब्राह्मणाचं द्रव्य कुणीही घेऊ नका बरं! हलाहल विषापेक्षासुद्धा ते भयंकर आहे. विष हे ज्याने खाल्लं त्याचाच फक्त नाश करतं. परंतु हे जे ब्रह्मअपराधविष आहे हे सबंध कुळाचा नाश करतं. तुम्ही या नृगराजाची गोष्ट ऐकली ना? त्याने काय चोरून आणलेली नाही गाय! पण दुसऱ्याची गाय याच्याकडे आली आणि याने दान केली. पण या धर्मसंकटाचा

***
पान ४४६

काही निर्णय झाला नाही. म्हणजे संदिग्ध का होईना, दोष याच्याठिकाणी राहिला आणि त्या दोषामुळे याला हा जन्म घ्यावा लागला. तेव्हा हे लक्षात ठेवा, कुणीही ब्राह्मण कसाही वागला, रागावला तरी तुम्ही रागावत जाऊ नका. मी कसा वागतो बघा आणि तसं वर्तन ठेवा. नाहीतर, याच्याविरुद्ध वागलात तर तुम्हाला शिक्षा होईल म्हणाले.'' असं सर्वांना मार्गदर्शन भगवंतांनी केलेलं आहे.

बलरामजी एकदा एकटेच गोकुळामध्ये गेले. श्रीकृष्ण गेलेच नाहीत. गोकुळामध्ये सर्वांना आनंद झाला. सर्वांनी भेट घेतली. यशोदेला आनंद झाला. प्रेमाने बलरामांना जवळ घेतलं. डोळ्यातून अश्रुधारा वाहताहेत. सर्व वृद्ध गोपालमंडळींना बलरामजींनी नमस्कार केला. लहान वयाच्या गोपालांनी बलरामांना नमस्कार केला. मित्रमंडळी भेटलेली आहेत. पूर्वीच्या गोष्टी निघालेल्या आहेत. प्रेमाने सर्व बोलत बसलेले आहेत. नंदजी विचारताहेत,"" कंसाचा नाश करून, सर्व यादवांना तुम्ही सुखी केले. अनेक मोठ्या मोठ्या शत्रूंना जिंकून आणि आता तुम्ही समुद्रामध्ये द्वारकानगर तयार करून तिथे राहिलात; असं आम्ही ऐकलं. बलरामांच्या दर्शनामुळे, गोपींना अत्यंत समाधान झालं. त्याही रामांच्याजवळ येऊन बोलू लागल्या,

कच्चिदास्ते सुखं कृष्णः पुरस्त्रीजनवल्लभः ।।
10.65.9 ।। श्री. भा.

बलरामजी गोपालकृष्ण सुखी आहेत ना? पुष्कळ राजकन्यांबरोबर त्यांचा विवाह झाला आहे. आमची आठवण त्याला होते का? निदान आपल्या आईबापांची तरी आठवण त्याला आहे का? येणार आहे का कधी इथं? भगवंताचं दर्शन नसल्यामुळे त्या गोपी अतिशय दुःखात आहेत. बलरामजी त्यांचं समाधान करताहेत. कृष्णलीला सांगताहेत. चैत्र, वैशाख दोन महिने बलरामजी गोकुळात राहिलेले आहेत.

बलराम गोकुळाला गेलेले असताना, पौंड्रक नावाच्या राजाने आपला एक दूत श्रीकृष्णांकडे पाठविला. तो राजसभेमध्ये आला आणि त्याने आपल्या राजाचा निरोप सांगितला, ""पौंड्रकाने असा निरोप पाठविला आहे की वासुदेव हे नांव माझं आहे. ते तू घेतलं आहेस. ते मुकाट्याने सोडून दे. शंख,चक्र, गदा, पद्म ही माझी चिन्हं आहेत. माझी आयुधं आहेत. ती मुकाट्याने सोडून दे. मला शरण ये. नाहीतर युद्धाची तयारी कर.'' सभेमध्ये बसलेले सगळे लोक हसायला लागले. नाव काय म्हणाले? वासुदेव सांगतोय? सुदर्शन चक्र काय याचं आहे? सुदर्शनचक्राबद्दल एक कथा व्यासांनी महाभारतात दिली आहे. भगवंतांचं दिव्य शस्त्र आहे हे सुदर्शन. ते अश्वत्थाम्याने आग्रहपूर्वक

***
पान ४४७

मागून घेतलं. घेऊन जा म्हणाले, तिथे आहे. त्याला ते उचलेना. मग लढाई करणं तर दूरच. त्याची फजिती झाली. भगवंतांनी त्या दूताला सांगितले, ""तुझ्या राजाला जाऊन सांग, कोणाची शस्त्रं आहेत आणि कुणाचं काय याचा निर्णय युद्धातच होईल. तूच तयारी कर. आम्ही आलो लढायला.'' निघाले गोपालकृष्ण. पौंड्रकराजा हा दोन अक्षौहिणी सैन्य घेऊन बाहेर पडला. काशिराजा त्याचा मित्र होता. तोही तीन अक्षौहिणी सैन्य घेऊन त्याला साहाय्य करायला निघालेला आहे. गोपालकृष्ण पाहताहेत. शंख, चक्र, गदा, पद्म हातामध्ये घेतलेलं आहे. चंदन लावलेलं आहे. वनमाला गळ्यात घातलेली आहे. श्रीकृष्णांची हुबेहूब अगदी नक्कल केली होती. हसले भगवान. चार हात कुठले आणले कुणास ठाऊक? नवीन निर्माण करण्याचं काही सामर्थ्य त्याला नाही. कृत्रिम वेष घेऊन तो आलेला आहे. दोघांचं युद्ध झालं. भगवंतांनी त्याचा शिरच्छेद केला. तो मृत झाल्यावर दिव्य तेज त्याच्या शरीरातून बाहेर पडून ते कृष्णशरीरामध्ये प्रविष्ट झाले. मी वासुदेव आहे, शंख, चक्र, गदा, पद्म माझी आहेत असा एक ध्यास त्याला लागलेला होता. वेडेपणा नाही अहंकार का होईना. माझं नाव आहे, माझी शत्रे आहेत. हा ध्यास त्याला कृष्णांचा सारखा लागल्यामुळे तो मुक्त झालेला आहे. काशिराजाचंही सैन्य मारलं भगवंतानी आणि काशिराजाचं मस्तक बाणाने काशीनगरीच्या वेशीमध्ये नेऊन टाकलं. त्या काशिराजाचा मुलगा सुदक्षिण नावाचा त्याने आपल्या पित्याचा वधाचा सूड घ्यायचा ठरवून श्रीकृष्णांचा नाश करण्याचं ठरवलं. शंकरांची आराधना केली. शंकरांनी त्याला सांगितलं, ""ब्राह्मणमंडळींना बोलावून तू शत्रूचा नाश करण्याकरिता जे काही होमहवन करायचं असतं ते कर. तुझा शत्रू मात्र धार्मिक नसावा. तरच या मांत्रिक कर्माचा उपयोग होईल. 'अब्रा्मण्येत् प्रयोजिता' म्हणतात. ब्राह्मणांविषयी अत्यंत आदर बाळगणारा जर तुझा शत्रू असेल तर ते कर्म उलटून तुझा नाश होईल.'' त्या सुदक्षिणाने होमहवन केलं. त्या होमातून एक भयंकर अग्नी उत्पन्न झाला आणि द्वारकेकडे गेलेला आहे. सर्व द्वारका जाळून टाकण्याकरता. सभेमध्ये भगवान बसलेले होते. अक्षक्रीडा चाललेली आहे. सर्व लोक धावत धावत आले. आणि द्वारकेला चारी बाजूंनी आग लागल्याचं वर्तमान त्यानी सांगितलं. ओळखलं भगवंतांनी. महेश्वराचं हे काम आहे म्हणाले. चक्राला आज्ञा केली, बंदोबस्ताकरता. ते कोटीसूर्यासारखं तेजस्वी चक्र बाहेर पडलं. त्या आलेल्या अग्नीला त्या चक्राने परत फिरवलं. काशीतून निघालेला अग्नी त्या चक्राच्या प्रतिघातामुळे पुन्हा काशीत आला आणि सबंध काशी त्याने जाळून टाकली. तो राजपुत्र सुदक्षिण, त्याच्याकरता यज्ञ करणारे ब्राह्मण सर्वांना त्या अग्नीने दग्ध करून टाकलं. पाठोपाठ ते चक्रही आलं. त्यानेही सर्व जाळून टाकलं आणि ते द्वारकेला परत आलेलं आहे.

***
पान ४४८

राजा विचारतो महाराज भगवान शेषावतार बलरामजी यांचं काही चरित्र मला सांगा. शुक सांगतात राजा, नरकासुराचा नाश भगवंताने केला. त्याचा मित्र द्विविद नावाचा वानर होता. रामावतारात सुग्रीवाचा तो मंत्री होता. असुराचा मित्र आहे. आता रामावतार होऊन बराच काल झालेला आहे. द्वापरयुग संपत आलेलं आहे. तो द्विविद वानर असुराचा मित्र असल्यामुळे त्याप्रमाणे वागू लागला. सगळ्यांना त्रास देऊ लागला. नगरामध्ये जावं, आश्रमामध्ये जावं, झाडं तोडावीत. स्त्रीपुरुषांना पकडून गुहेमध्ये टाकावं, गुहेचा दरवाजा बंद करावा. समुद्राचं पाणी तीरावर टाकून तीरावरील लोकांना त्रस्त करावं. असा त्याचा त्रास सर्व लोकांना होऊ लागला. एकदा रैवतक पर्वतावर बलरामजी आणि इतर यादव स्त्रिया बोलत बसलेले असताना द्विविद वानर तिथे आला. तो ओरडू लागला. विचार केला, हा सर्व देशाला उपद्रव देणारा वानर, याचा आता नाश केला पाहिजे. मुसल आणि नांगर दोन शस्त्रं बलरामांची. त्यांनी नांगराने त्या वानराला ओढून घेतलं आणि मुसळाने त्याचं मस्तक तोडून टाकलेलं आहे. तो द्विविद वानर मरून पडलेला आहे. रामावतारापासून असलेला आणि बलरामजींच्या हातून त्याचा नाश झालेला आहे.

आणखी एक कथा सांगताहेत -

दुर्योधनसुतां राजन् लक्ष्मणां समितिज्जयः ।।
10.68.1 ।। श्री. भा.

दुर्योधनाची कन्या लक्ष्मणा हिचं स्वयंवर त्याने जाहीर केलं. अनेक राजपुत्र आलेले आहेत. जांबवतीचा मुलगा सांब जो होता त्याने सर्व राजांचा पराभव करून त्या लक्ष्मणेचं हरण केलेलं आहे. कौरव रागावले. हा यादवांचा मुलगा, आमच्या देखत आमच्या मुलीला घेऊन जातो? सगळे कौरव एकत्र आले. कर्ण आहे, दुर्योधन आहे. त्यांनी लढाई करून त्या सांबाचा पराजय केला आणि त्याला धरलं आणि तुरुंगात टाकलं. यादवांना ही बातमी कळल्यावर तेही रागावले. कृष्णही रागावले. पण बलरामजींना कौरवांबद्दल थोडा पक्षपात होता. दुर्योधनाबद्दल त्यांना प्रेम होते. त्यांचा प्रिय शिष्य होता तो. त्यांनी सांगितलं एकदम लढाई करू नका. मी जाऊन साममार्गाने समजावून आपल्या मुलाला घेऊन येतो. म्हणून बलरामजी उद्धवजी काही यादवांना घेऊन हस्तिपुराला आले. बाहेरच थांबलेले आहेत. उद्धवजींनी सांगितलं, बलरामजी आले आहेत भेटायला. सर्वांना आनंद झाला. सर्व मंडळी भेटण्याकरता बाहेर आलेली आहेत. त्यांनी बलरामजींचं स्वागत केलं. पूजा केली, नगरामध्ये येण्याकरता निमंत्रण दिलं. बलरामजी म्हणाले, ""लोकहो, उग्रसेन राजाची तुम्हाला आज्ञा आहे, ती सांगण्याकरिता मी आलेलो आहे. तुम्ही आमच्या

***
पान ४४९

सांबाला अनेक जणांनी घेरून त्याला विरथ केलं. त्याचं धनुष्य तोडलं, त्याला बंदिवान केलं. पण उग्रसेन राजाने सांगितलंय की तुम्ही आमचेच आहात. तुमच्या अपराधांची मी क्षमा करतो. पण आमचा मुलगा आम्हाला आणून द्या.'' ते कौरव सगळे उमट होते. ते रागावले. हा कोण नविन निघाला म्हणाले, उग्रसेन राजा. यादवांना काय राज्य करण्याची आज्ञा आहे का? ययाति राजाने यदुराजाला शाप दिलेला आहे. तुमच्या वंशात कोणीही राजा होणार नाही म्हणून. आणि हे म्हणाले आपणच राज्य करताहेत आणि पुन्हा आम्हालाच हुकूम करताहेत. पायातली वहाण डोक्यावर बसायची तिला इच्छा झाली वाटतं. असं अगदी उमटपणे बोलून रागाने कौरव निघून गेले. मग मात्र बलरामजींना अत्यंत राग आलेला आहे. काय यादवांना राज्याचा अधिकार नाही? काय उन्मत्तपणे बोलताहेत म्हणाले. श्रीकृष्णांची सुद्धा यांना भीति वाटत नाही म्हणाले. मी त्यांची समजूत काढून त्याला थांबवलेलं आहे. साममार्गाने कार्य करावं म्हणून मी आलो. इंद्रादिक लोकपाल ज्याची आज्ञा पालन करतात त्या श्रीकृष्णाला हे लोक किंमत देत नाहीत. साक्षात लक्ष्मीदेवी ज्याची उपासना करतेय त्याला राज्याचा अधिकार नाही? आम्ही यादव म्हणजे पादत्राण आणि कौरव म्हणजे मस्तक काय?

अद्य निष्कौरवीं पृथ्वीं करिष्यामीत्यमर्षितः ।।
10.68.40 ।। श्री. भा.

बलरामजींना राग आला म्हणजे काय? उठलेले आहेत. आज एकही कौरव जिवंत ठेवायचा नाही. त्यांनी आपला नांगर घेतला आणि जमिनीमध्ये मारून ते सबंध नगर उचलून ते नदीमध्ये पालथं घालायचं असं त्यांनी ठरवलं. युद्ध कशाला पाहिजे? सबंध वाडे धडाधडा पडायला लागले. सगळे कौरव घाबरले. त्या सांब आणि लक्ष्मणेल घेऊन बलरामजींकडे आले. हा आपला मुलगा, ही सून ही घ्या पण थांबवा आता हे संहारक कार्य आणि आमचं रक्षण करा. सोडून दिलं बलरामजींनी. बलरामजींची पूजाअर्चा केली, नमस्कार केला, क्षमा मागितली. नंतर त्या दोघांना घेऊन बलरामजी द्वारकेला आलेले आहेत. दुर्योधनानेही आपल्या कन्येबरोबर अनेक हत्ती, अश्व, रथ वगैरे पुष्कळ संपत्ती दिलेली आहे. नगरात आल्यावर बलरामजींनी सांगितलं, ""आधी साममार्गाने समजूत घालण्याचा मी प्रयत्न केला. पण वाटेल तसं बोलायला लागले. त्यामुळे थोडंसं चांलदावं रत्न दाखवायला लागलं''. शुक्राचार्य सांगतात, ""राजा, ते नगर अजून एका बाजूला उचललेलं दिसतं म्हणे. बलरामांचा तो प्रभाव आहे.

शुक्राचार्य सांगताहेत राजा-

***
पान ४५०
नरकं निहतं श्रुत्वा तथोद्वाहं च योषिताम् ।
कृष्णेनैकेन बह्वीनां तद् दिदृक्षुः स्म नारदः ।।
10.69.1 ।। श्री. भा.

नरकासुराचा नाश करून त्याने धरून आणलेल्या सोळा हजार राजकन्यांबरोबर कृष्णांनी विवाह केला ही बातमी सगळीकडे पसरली. सोळा हजार वेगवेगळे वाडे आहेत. एकत्रही आहेत आणि भिन्नही आहेत. एकत्र म्हणजे सगळ्यांचे एक मत आहे. प्रत्येकाची चूल वेगळी पाहिजे असं नाही. सोयीकरिता वेगळं राहणं निराळं आणि मनानं विरुद्ध होऊन वेगळं राहणं निराळं. प्रत्येक स्त्रीचा वाडा वेगळा आहे. नोकरचाकर वेगळे आहेत. सगळी व्यवस्था आहे. त्या स्त्रीला जास्ती आणि मला कमी असे एकाही स्त्रीच्या मुखातून उद्गार निघणार नाहीत अशी व्यवस्था भगवंताने करून टाकली. नारदांनाही ही बातमी समजली. एकट्या गोपालकृष्णांनी सोळा हजार राजकन्यांबरोबर विवाह केला? आपण एकदा समक्ष हे कृष्णचरित्र पाहावं या हेतूने नारद महर्षींनी ठरवलं की एक सबंध दिवस हा गृहस्थाश्रम पहायचा. गोपालकृष्ण एका ठिकाणी आहेत का सर्व ठिकाणी आहेत. देवर्षी नारद द्वारकेमध्ये आलेले आहेत. प्रथम त्यांनी रुक्मिणीच्या वाड्यामध्ये प्रवेश केला. भगवंताने पाहिलं, ""या या नारदा'' म्हणाले. उठले आपल्या आसनावरून. पायावर डोकं ठेवलेलं आहे. हात जोडून नमस्कार करून त्यांना आपल्या आसनावर बसवलं. पाय धुतले नारदांचे आणि ते तीर्थ मस्तकावर मार्जन केलेलं आहे. सर्व विश्वाचे गुरु भगवान हे सज्जनांच्याबद्दल अत्यंत आदरभाव बाळगणारे आहेत. पूजा केली नारदांची आणि विचारताहेत ""आपली काय आज्ञा आहे महाराज? काय कुठे संकट वगैरे आलेलं आहे काय?'' नारद म्हणाले ""काही नाही, उगीच आलो. वाटतं वारंवार द्वारकेला यावं, तुमची संगती घडावी. तुमच्याबरोबर बोलावं. राहावं. सहज आलो''. त्या वाड्यातून बाहेर पडले.

ततोऽन्यदाविशद्गेहं कृष्णपत्न्याः स नारदः ।।
10.69.19 ।। श्री. भा.

दुसऱ्या वाड्यामध्ये नारद गेले. रुक्मिणीच्या वाड्यामध्ये गोपालकृष्ण आहेत म्हणजे या वाड्यात ते असणार नाहीत. परंतु चमत्कार असा झाला, त्या दुसऱ्या वाड्यामध्ये गोपालकृष्ण आहेत, उद्धवजी आहेत, सत्यभामा आहे. सोंगट्याचा खेळ चाललेला आहे. तिथेही गोपालकृष्णांनी उभं राहून स्वागत केलं. पूजा केली. आणि विचारताहेत, "केव्हा आला नारदा?' आता, आत्ताच रुक्मिणीच्या वाड्यात भेटले होते तेच गोपालकृष्ण विचारताहेत 'केव्हा आला?' म्हणजे गोपालकृष्णाचं रूप सारखं आहे पण बुद्धी वेगवेगळी आहे काय, असं नारदांना वाटलं. नारदांना ती सबंध चरित्रलीला पहायचीच होती. त्या वाड्यातून बाहेर पडताना भगवंत म्हणताहेत, "वारंवार

« Previous | Table of Contents | Next »