येत चला नारदा. आम्ही गृहस्थाश्रमी लोक. आमचं पुण्य काही तुमच्यासारखं नाही. तेव्हा वारंवार येत चला आणि आमचा उद्धार करा'. नारद काही बोलले नाहीत. मुकाट्याने बाहेर पडले. तिसऱ्या वाड्यामध्ये गेले.
तत्राप्यचष्ट गोविन्दं लालयन्तं सुतान्र्छिशून् ।।
10.69.23 ।। श्री. भा.
बाहेरूनच पाहताहेत. आत गेले नाहीत. लहान लहान जे नातू, मुलं, मुली त्यांच्याबरोबर गोपालकृष्ण गोट्या खेळताहेत. चेंडूचा खेळ चाललेला आहे. इथेही आहेत गोपालकृष्ण! पुढच्या वाड्यात गेले. सर्व स्त्रिया जमलेल्या आहेत. स्नान करण्याचं कार्य चाललेलं आहे. एकेक वाड्यातून नारद महर्षी कृष्णाचं दर्शन करताहेत, पाहताहेत आत जात नाहीयेत. एका ठिकाणी अग्नीमध्ये हवन चाललेलं आहे. एका वाड्यामध्ये ब्राह्मणांना भोजन वाढायचं काम चाललेलं आहे. इतक्यात नारदांवर दृष्टी गेली. म्हणाले, "या या नारदा जेवायला बसा". नारद म्हणाले, "माझं भोजन झालेलं आहे मला वेळ नाही". तिथून बाहेर पडले. कुठे संध्योपासना चालली आहे. कुठे डोळे झाकून जप करण्याचं काम चाललेलं आहे. एका वाड्यामध्ये सर्व शस्त्रास्त्रं तपासायचं काम चाललेलं आहे. चांगली धार लावली आहे की नाही? धनुष्यांची व्यवस्था काय, बाणांची व्यवस्था काय, ही चौकशी चालली आहे. एका वाड्यामध्ये नुकतेच भोजन झालेलं आहे, देव निजलेले आहेत. उठवायचं काय? नको म्हणाले. पाहिलं आणि बाहेर पडले. एका वाड्यामध्ये सगळं मंत्रीमंडळ जमलेलं आहे आणि काही विचार चालू आहे. एका वाड्यामध्ये ब्राह्मणांना गाईचं दान करण्याचं काम चालू आहे.
पाहत पाहत नारद चाललेले आहेत आणि दमले नाहीत. आज सर्व ठिकाणी जाऊन कृष्णांचं दर्शन घेऊन चौकशी करायची असं त्यांनी ठरवलेलं आहे. एका वाड्यात पौराणिकबुवा पुराण सांगताहेत आणि गोपालकृष्ण डोळे झाकून हात जोडून पुराण ऐकताहेत. हे सगळ्यांना मार्गदर्शन करण्याकरता आणि लोकसंग्रहाकरता आहे. कुठे ध्यान करताहेत. एका वाड्यामध्ये वसुदेव-देवकींना वारा घालायचं काम चाललेलं आहे. मातापित्यांची सेवा चाललेली आहे. एका वाड्यामध्ये कुणा उन्मत्त झालेल्या राजाबरोबर युद्धाच्या तयारीची चर्चा चालली आहे. दुसरीकडे एखाद्या राजाबरोबर संधी करायचा, युद्ध थांबवण्याचा विचार चाललेला आहे. एका वाड्यामध्ये बलरामजींबरोबर बोलत बसलेले आहेत. एका वाड्यामध्ये मुली, नाती माहेरी आलेल्या सासरी निघालेल्या आहेत. त्यांची पाठवणी करताना स्वतः गोपालकृष्ण चौकशी करताहेत की यांना काही दिलं की नाही, फराळाचं, वस्त्रं, दागदागिने वगैरे याची चौकशी चाललेली आहे. काही
मुलींची, नातींची लग्नं व्हायची होती. प्रत्येक स्त्रीपासून कृष्णांना दहा मुलं आणि एक मुलगी झाली. साम्यवाद आहे. मला कमी आणि तिला जास्त का, असं नाही. पण नाती बिती पुष्कळ होत्या. त्यांच्याकरता वरसंशोधन चाललेलं आहे. नारदांना पाहिल्याबरोबर, "या या नारदा, बसा आमच्या या नातीकरता वर बघायचाय. तुम्ही फिरता सगळीकडे. कुठलं योग्य स्थळ असेल तर सांगा". नारद म्हणाले, "आज मला वेळ नाही. सांगेन केव्हातरी. पुष्कळ स्थळं आहेत." कुठे देवपूजा चाललेली आहे. कुठे विहिरी खणणं, तलाव खणणं, हे काम चालू आहे. धर्माचरण आहे, अर्थशास्त्र आहे. कामशास्त्र आहे. असे प्रत्येक वाड्यामध्ये भगवान कोणत्या ना कोणत्या कार्यामध्ये निमग्न आहेत.
केवढा मोठा कर्मयोग आहे आणि केवढा मोठा गृहस्थाश्रम आहे. नारद आश्चर्यचकित झालेले आहेत. एका वाड्यात थांबून भगवान श्रीहरीला म्हणताहेत, "देवा, काय आपल्याजवळ ही विलक्षण योगमाया शक्ती आहे. प्रत्येक वाड्यात आहातच आपण!. मी परीक्षा पाहण्याकरीता आज सबंध दिवस फिरतो आहे पण आपण कुठे नाही असे नाही". समोरचं साकार रूपही सर्वव्यापी, असू शकतं हे भगवंताने दाखवलेलं आहे. निर्गुण निराकार, आत्मस्वरूप तर सर्वव्यापी आहेच आहे पण हे सगुणरूप सुद्धा सर्वत्र आहे. भगवान म्हणाले, "धर्म नुसता सांगण्याकरिता मी आलेलो नाही तर आचरण करून दाखवण्याकरिता मी आलेलो आहे. मला सगळं करावं लागतं. राजधर्म आहे, क्षत्रियधर्म आहे, सर्व स्नानसंध्यादिक शास्त्रीय कर्मही करायची. त्याचप्रमाणे क्षत्रियधर्माप्रमाणे साम, दाम, दंड, भेद सगळं आम्हाला करावं लागतं. सोडून कसं चालेल? आणि आश्चर्य सांगतात शुक्राचार्य महाराज, प्रत्येक वाड्यामध्ये नारदांची पूजा केल्याशिवाय देवाने त्यांना सोडलं नाही. ऋषींना अत्यंत विस्मय निर्माण झालेला आहे. मनुष्यरूप धारण करून भगवान मृत्युलोकावर आलेले आहेत. सोळा हजार स्त्रियांच्याबरोबर त्यांचा गृहस्थाश्रम चाललेला आहे. हे नारदांनी प्रत्यक्ष दिव्य कृष्णचरित्र पाहिलेलं आहे. त्यांच्या मनात श्रद्धा, आदर का राहणार नाही? ते तर मूळ भक्तच होते. पण हे प्रत्यक्ष चरित्र पाहूनही तो आदरभाव वाढलेला आहे. कृष्णांची दिनचर्या प्रसंगाने आचार्य सांगताहेत.
अथोषस्युपवृत्तायां कुक्कुटान् कूजतोऽशपन् ।
गृहीतकण्ठ्यः पतिभिर्माधव्यो विरहातुराः ।।
10.70.1 ।। श्री. भा.
पहाटेच्या वेळी कोंबडा ओरडल्याबरोबर श्रीकृष्णांनी उठावं लगेच.
युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ।।
6.17 ।। भ. गी.
हा उपदेश करणारे जे आहेत. आहार, विहार, स्वप्न, झोप, जागरण सगळं नियमित पाहिजे. उठल्याबरोबर आचमन करून ब्राह्ममुहूर्तावर त्यांनी आत्मस्वरूपाचं ध्यान करावं. एक अद्वितीय अशाप्रकारचा आत्मा आहे. तोच मी आहे, आनंदरूप मी आहे. जग सगळं आत्मचिंतनात विसरून जायचं आहे. नंतर शौचमुखमार्जन करून स्नान करावं. वस्त्र धारण करून संध्यावंदन करून अग्नीमध्ये हवन केलेलं आहे. कण्वशाखेचे होते म्हणतात भगवान. सूर्योदयापूर्वी हवन केलं जायचं असं सांगतात. देवाची पूजा करावी. देव, ऋषी, पितर यांचं तर्पण करावं. श्रीकृष्णांचं अग्निहोत्र होतं. प्रत्येकाचं अग्निहोत्र निराळं. वसुदेवाचं वेगळं, प्रद्युम्नाचं वेगळं. प्रत्येकाकडे अग्नीची सेवा आहे. यादवांचं तेज कधीही कमी होत नव्हतं, याचं कारण अग्नी, सूर्य या देवतांची नित्य उपासना चालू असायची. त्याच्यानंतर निमंत्रित ब्राह्मणांना गाईचं दान करावं. उत्तम वस्त्रं त्या गाईंच्या अंगावर घातलेली असायची. त्यानंतर वस्त्रं, अलंकार धारण करून राजसभेमध्ये जावं. राजसभेमध्ये जाण्यापूर्वी काही मंडळी जरुरीच्या कामाकरता यायची. राजसभेमध्ये निर्णयाला वेळ लागणार म्हणून या वेळेला भेटून लगेच निर्णय घ्यायला काही मंडळी यायची. सभेमध्ये उग्रसेन राजा मुख्य असायचा. त्याच्या बाजूलाच असलेल्या एका सिंहासनावर भगवान गोपालकृष्ण बसायचे. त्या सभेमध्ये गायन, वादन चाललेलं आहे. विदूषक लोकांचं मनोरंजन करताहेत. काही इतिहासज्ञ पूर्वीच्या राजांचा इतिहास सांगताहेत. मोठी सभा आहे ती.
त्याठिकाणी थोड्या वेळाने एक राजदूत आलेला आहे. त्याने द्वारपालाला सांगितलं, "कृष्णांच्या भेटीकरता मी मुद्दाम लांबून आलो आहे. मगध देशातील पाटण्याहून आलो आहे.". श्रीकृष्णांना नमस्कार करून त्याने बोलायला सुरुवात केली, "जरासंध हा सैन्य घेऊन दिग्विजयाकरता बाहेर पडला होता. सर्व राजांना त्याने जिंकलेलं आहे आणि त्यांना आपल्या कैदेमध्ये ठेवलेलं आहे. वीस हजार आठशे राजांना एका मोठ्या किल्ल्यामध्ये कैदेत ठेवलेलं आहे. जे नम्र न झालेले खंडणी न देणारे, युद्धाला उभे राहिलेले अशा सर्व राजांना जिंकलेलं आहे. त्या राजांनि मला आपल्याकडे पाठवलं आहे आणि विनंती केली आहे की "भगवंता, आम्हाला या संकटातून आपण मुक्त करा. आपल्याशिवाय या जरासंधाच्या कारागृहातून आम्हाला सोडवणारा दुसरा कुणी नाही. जरासंधाने आम्हाला तुरुंगात टाकलं ही आपली कृपा आम्ही समजतो. सर्व ऐश्वर्य भोगत असताना आपलं
स्मरणसुद्धा आम्हाला झालं नाही. आज मात्र आम्ही आपल्याला शरण आलो आहोत. आपण या संकटातून आम्हाला मुक्त करा". असा निरोप त्या दूताने सांगितला. ते ऐकून घेतलं भगवंताने. इतक्यात देवर्षी नारद आकाशमार्गाने त्या सभेमध्ये आले. अत्यंत तेजस्वी असे नारद महर्षी त्याठिकाणी आल्याबरोबर भगवान उठले, त्यांच्या पायावर मस्तक ठेवलं, त्यांची पूजा केली आणि एका मोठ्या आसनावर त्यांना बसवलं. भगवान विचारताहेत, "काय नारद महर्षी,
अपि स्विद् अद्य लोकानां त्रयाणां अकुतोभयम् ।
ननु भूयान् भगवतो लोकान् पर्यटतो गुणः ।।
10.70.35 ।। श्री. भा.
ऋषीमहाराज, त्रैलोक्यामध्ये सर्व मंडळी सुखी आहेत ना? कुणी संकटात पडलं नाही ना? आपण सर्व त्रैलोक्यामध्ये फिरत असता. एक आपल्याला विचारतो, पांडवांची भेट अलिकडे आपली झाली होती काय? त्यांची स्थिती काय आहे?" नारद म्हणाले, "पांडवाचा निरोप सांगायलाच मी आलो आहे. धर्मराजांना राजसूय यज्ञ करण्याची इच्छा आहे. यज्ञांचा हा राजा आहे. "पारमेष्ठ्यकामः" ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेवांच्या जवळ राहायला मिळावं या इच्छेने हा राजसूय यज्ञ आपल्याकडून व्हावा असं धर्मराजांना वाटतंय आणि आपण येऊन हे कार्य पार पाडावं. आपल्या नेतृत्वाखाली हा राजसूय यज्ञ व्यवस्थितपणे होईल अशी त्यांची खात्री आहे. म्हणून आपल्या कानावर घालण्याकरता मला त्याने पाठविलेलं आहे. त्याची इच्छा आपण पूर्ण करा. त्रैलोक्यातून सर्व देव, सर्व राजे सगळे त्या यज्ञामध्ये येतील. आपलं दर्शन सगळ्यांना होईल. धर्मराजाची इच्छाही पूर्ण होईल.
दोन कामं एकदम आलेली आहेत. राजसूय यज्ञाला येण्याचं धर्मराजाचा आमंत्रण घरचंच होतं. अत्यंत प्रिय तो धर्मराज होता. आणि दुसरा त्या राजांचा निरोपही तातडीचा होता. आता काय करायचं? त्यांना सगळं माहित होतं. पण उद्धवजी मोठे राजनीतिज्ञ आहेत. त्यांनाही मान दिला पाहिजे. म्हणून भगवान श्रीहरी म्हणाले, "उद्धवजी कोणतं काम आधी करावं सांगा. आपण मोठे राजनीतिज्ञ आहात. तुमचा सल्ला आम्हाला यावेळेला पाहिजे". उद्धवजी म्हणाले,
यदुक्तमृषिणा देव साचिव्यं यक्ष्यतस्त्वया ।
कार्यं पैतृष्वसेयस्य रक्षा च शरौषिणाम् ।।
10.71.2 ।। श्री. भा.
"देवर्षी नारदांनी आपला जो आतेभाऊ आहे धर्मराज याची विनंती आपल्याला निवेदन केली. राजसूय यज्ञ करण्याकरता आपलं साहाय्य त्याला पाहिजे आहे. हेही काम श्रेष्ठ आहे.
तुरुंगात पडलेले राजे आपल्याला शरण आलेले आहेत. त्यांचं रक्षण करणं हेही आपलं कर्तव्य आहे. राजसूय यज्ञ करण्याचा अधिकार त्यालाच आहे जो सर्व भूमंडळ जिंकून सम्राट झालेला आहे. तेव्हा आपण तिथे चला. धर्मराजाला सांगून चारी दिशांना सैन्य पाठवा. त्यांच्या बंधूंना पाठवा आणि सर्व राजांना जिंकल्यानंतर मग राजसूय यज्ञाला आरंभ करा. त्या राजेलोकामध्ये जरासंध येणारच की. त्यालाही जिंकल्याशिवाय राजसूय यज्ञ करता येणार नाही. अशी दोन्ही कामं ह्या दृष्टीने करता येतील. परंतु जरासंध हा सहजासहजी पराभूत होणार नाही. अत्यंत पराक्रमी आणि सामर्थ्यवान तो आहे. दहा हजार हत्तींचं सामर्थ्य त्याला आहे असं म्हणतात. भीम त्याच्याबरोबर द्वंद्वयुद्ध करायला योग्य आहे. भीमाची शक्तीही मोठी आहे. तेव्हा असं करा आपण, भीम आणि अर्जुनाला घेऊन ब्राह्मणवेषामध्ये माध्यान्हकाली जरासंधाकडे जावं. तो जरासंध कसाही वागेना, पण त्याचा एक मोठा नियम आहे. माध्यान्हकाली जो ब्राह्मण अतिथी घरी येईल त्याची जी इच्छा असेल ती तो पूर्ण करतो. त्यावेळी त्याला गाठा आणि युद्ध भिक्षा मागून घ्या. भीम आणि जरासंधाचं युद्ध तुमच्या दृष्टीसमोर झालं म्हणजे जरासंधाचा नाश होईल". सर्वांनाही हा सल्ला पसंत पडलेला आहे.
भगवान श्रीकृष्णांनी प्रथम आपल्या सर्व स्त्रियांना त्या इंद्रप्रस्थ नगराला पाठवून दिलं. हजारो रथ निघालेले आहेत. तिथे जाऊन प्राथमिक व्यवस्था बघायची. चारी बंधू चार दिशांना जाऊन दिग्विजय करून पुष्कळ धन घेऊन येतील. जरासंधाला त्यांनी जिंकलं असलं तर ठीक नाहीतर आम्ही तिघे जाऊन त्याचा नाश करून येऊ असं भगवंतांनी ठरवलं. त्या राजदूताला निरोप सांगितला की राजेहो लवकरच आम्ही येऊ आणि जरासंधाच्या कारागृहातून तुम्हाला मुक्त करू. काळजी करू नका. राजदूताने येऊन तो निरोप सांगितला. कृष्णदर्शनाची आस मनात धरून ते राजे लोक वाट पाहू लागले.
प्रवास करीत करीत श्रीकृष्ण परमात्मा त्या इंद्रप्रस्थनगराजवळ पोचलेले आहेत. उपाध्यायांना बरोबर घेऊन धर्मराज गावाबाहेर सामोरे आलेले आहेत. वाद्यांचा घोष चाललेला आहे. धर्मराजाला कृष्णदर्शनाने अत्यंत आनंद झाला. कितीतरी दिवसांनी भेट झाली होती. प्रेमाने भेटले एकमेक. नेत्रांतून अश्रुधारा वाहताहेत. शरीराचंही भान धर्मराजाला नाहीये. भीमानेही भेट घेतलेली आहे. अर्जुन, नकुल, सहदेव सगळ्यांनी भेट घेतली. प्रेमाश्रू सगळ्यांच्या नेत्रातून वाहताहेत. कृष्णदर्शन म्हणजे सगळं विसरून जायला व्हायचं, देहाचं भान नाही मग संसार कसला? भगवंताने सर्व वृद्ध
मंडळींना नमस्कार केलेला आहे. सर्वजण स्तुती करताहेत. वाद्यं वाजताहेत, पुष्पवर्षाव होतो आहे. पायघड्या घातलेल्या आहेत. आणि त्या मार्गाने धर्मराज भगवान श्रीकृष्णांना राजवाड्यात घेऊन आलेले आहेत. श्रीकृष्ण आपल्या नगरामध्ये आलेले आहेत हे कळल्याबरोबर सर्व स्त्रीपुरुष आपल्या वाड्याच्या दरवाजामध्ये, रस्त्यामध्ये उभे राहिलेले आहेत. सर्व मंडळींनी श्रीकृष्णांचा जयजयकार केला. कुंतीच्या जवळ आले भगवान. "आत्याबाई आलो बरं". तिला नमस्कार केला. तीही उठून उभी राहिली. "ये बाबा कृष्णा बरं झालं तू आलास". समाधान झालेलं आहे. नंतर त्या कुंतीने आपल्या सगळ्या सुनांना, द्रौपदी आणि सुभद्रेला सांगितलं. "कृष्णपत्नी आपल्या यज्ञाकरता आलेल्या आहेत. त्यांची सगळी व्यवस्था ठेवा. खाण्यापिण्याची, राहण्याची. काही कमी पडू नये इकडे लक्ष द्या तुम्ही". धर्मराजाने सगळ्यांची व्यवस्था उत्तम केलेली आहे. खांडववन अग्नीला दिलेलं आहे, त्याचवेळेला. मयासुराला मुक्त केलं. त्याने धर्मराजाच्या राजवाड्यात मयसभा बांधून दिली. काही महिने गोपालकृष्णांचा निवास झालेला आहे.
एके दिवशी राजसभेमध्ये गोपालकृष्ण बसलेले आहेत. सर्व मंडळी आहेत. आणि धर्मराज उठून उभे राहिले आणि त्यांनी हात जोडून प्रार्थना केली
क्रतुराजेन गोविन्द राजसूयेन पावनीः ।
यक्ष्ये विभूतिर्भवतस्तत् सम्पादय नः प्रभो ।।
10.72.3 ।। श्री. भा.
"हाच क्रतुराजा म्हणजे यज्ञांचा राजा राजसूय यज्ञ. हा यज्ञ करून आपल्या ज्या सगळ्या दिव्य विभूती आहेत, देव वगैरे त्यांना तृप्त करावं अशी माझी इच्छा आहे. तेवढी आपण पूर्ण करा. आपली सेवा निरंतर करणारे जे आहेत त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात, देवा आपल्या कृपेनं.
तद् देवदेव भवतश्चरणारविन्द
सेवानुभावमिह पश्यतु लोक एषः ।
ये त्वां भजन्ति न भजन्त्युत वोभयेषां
निष्ठां प्रदर्शय विभो कुरुसृंजयानाम् ।।
10.72.5 ।। श्री. भा.
आपली सेवा करणारे जे भक्त आहेत, त्यांच्यावर आपली कृपा कशी होते. आपल्या कृपेचं सामर्थ्य काय आहे हे सर्व लोकांनी पहावं म्हणून माझी इच्छा आहे. माझा यज्ञ पार पाडा असं म्हणत नाही. आपल्या कृपेने भक्तांचं सर्व कार्य कसं सिद्ध होतं, फलद्रूप होतं हे सर्व लोकांना समजावं. आपलं भजन करणारे आणि न करणारे या लोकांना काय फळं मिळतात हे ही लोकांनी
पहावं". अशी प्रार्थना केली. भगवान सांगतात, "राजा चांगली इच्छा आहे तुझी. यामुळे तुझी कीर्ती सर्वत्र पसरणार आहे. हा यज्ञ म्हणजे ऋषींना, पितरांना, देवतांना, मित्रमंडळींना सर्वांना आनंद देणारा आहे. पण अगोदर पृथ्वीवरच्या सर्व राजांना जिंकलं पाहिजे. आणि मग हा यज्ञ करता येईल. तुझे चार बंधू आहेत ना? त्यांना चारी दिशांना पाठवून दे. मोठे पराक्रमी आहेत. ते सर्व राजांना जिंकून तुला पुष्कळ द्रव्यही आणून देतील. सहदेवाला दक्षिण दिशेला पाठवलं. पश्चिमेला नकुलाला पाठविलं, पूर्वेला भीमाला पाठविलं आणि उत्तरेला सव्यसाची अर्जुनाला पाठवलेलं आहे.
थोड्याच दिवसात सर्वही राजांना जिंकून पुष्कळ द्रव्य बरोबर घेऊन ते चौघेही बंधू प्राप्त झाले. त्यांनी सांगितलं, जरासंधाला मात्र आम्ही जिंकू शकलो नाही. त्याचा पराजय करू शकलो नाही. हे समजलं. उद्धवजींनी सुचवल्याप्रमाणे श्रीकृष्ण, अर्जुन आणि भीम यांनी ब्राह्मण वेष घेतलेला आहे. रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या आहेत. भस्म लावलेलं आहे. आणि माध्यान्हकाली जरासंधांच्या वाड्यामध्ये ते आलेले आहेत. जरासंध हा मोठा अतिथीभक्त होता. "या, या महाराज, कुठून आला आपण?" त्यांची पूजा केली. त्याने त्यांच्याकडे पाहिलं. वेष तर ब्राह्मणाचा आहे पण अंग पाहिलं तर शरीरावर मोठ्या मोठ्या जखमांचे व्रण आहेत. आणि धष्टपुष्ट शरीर आहे. हे क्षत्रिय असले पाहिजेत. पण दिसतात ब्राह्मण. कशाला आपण संशय घ्यायचा म्हणाला. त्याने विचारलं, "काय इच्छा आहे आपली? आपण माध्यान्हकाली आलेले अतिथी साक्षात विष्णूस्वरूप आहात. तुम्हाला काय जेवायचं आहे का आणखी काही इच्छा आहे?" वाटेल ते मागा.
ददामि आत्मशिरोऽपि वः ।।
10.72.27 ।। श्री. भा.
माझं मस्तक जरी तुम्ही तोडून मागितलं तरी आत्ता मी ते देतो. भगवान सांगतात -
युद्धं नो देहि राजेन्द्र द्वन्द्वशो यदि मन्यसे ।।
10.72.28 ।। श्री. भा.
युद्धाकरता आम्ही आलो म्हणालो. जेवण्याकरता नाही. परिचय करून दिला. हा कुंतीचा मुलगा भीमसेन आहे. त्याचा कनिष्ठ बंधू हा अर्जुन आहे. आणि यांचा मामेभाऊ कृष्ण मी आहे. ज्याला तू शत्रू समजतो आहेस. ऐकलं जरासंधाने. हसला तो मोठ्याने. तू आलास होय म्हणाला. हे पहा कृष्णा, युद्धात्ून पळून जाणाऱ्या तुझ्यासारख्या भित्र्याबरोबर मला युद्ध करायचं नाही. आमच्या भीतीनेच तू समुद्रात जाऊन राहिलास ना? हा अर्जुन माझ्या बरोबरीचा नाही. लहान मुलगा आहे. भीम मात्र माझ्या बरोबरीचा आहे. त्याच्याबरोबर द्वंद्वयुद्ध करायला मी तयार आहे
म्हणाला. भगवान तसंच ठरवून आले होते आणि जरासंधानेही तसंच कबूल केलं. भीमाला एक मोठी गदा दिली जरासंधाने, आपण एक घेतली आणि दोघे बाहेर मोकळ्या जागेमध्ये गदायुद्ध करण्याकरता आले. दोघांचही कौशल्य आहे. गदा तुटून गेल्या. मग कुस्ती चाललेली आहे. द्वंद्वयुद्ध चाललेलं आहे. संध्याकाळपर्यंत रोज असं युद्ध चालायचं.
संध्याकाळ झाली की युद्ध बंद होई. कृष्ण, अर्जुन, भीम यांनी राजवाड्यामध्ये राहावं. जरासंधाने भीमाच्या अंगाला तेल लावावं, मालिश करावं, स्नान घालावं. सर्व मंडळींनी एकत्र जेवण करावं. संध्याकाळी वाड्यात आल्यावर शत्रुत्व वगैरे काही नाही. अगदी
मित्राप्रमाणे बोलणं-चालणं, हास्य-विनोद सर्व करावं. दुसरे दिवशी सूर्योदय झाल्याबरोबर जरासंध एकाबाजूला, भीम एकाबाजूला आणि युद्ध सुरू होई. सत्तावीस दिवस झाले आणि भीम दमला. रात्री त्याने गोपालकृष्णांना सांगितलं, "मी काही जरासंधाला जिंकू शकत नाही. माझी शक्ती सगळी संपलेली आहे. त्यावेळी श्रीकृष्णांनी सांगितलं, घाबरू नकोस त्याचा नाश कसा करायचा ते मी तुला उद्या सांगेन".
पार्थमाप्याययन् स्वेन तेजसाचिंतयद्धरिः ।।
10.72.42 ।। श्री. भा.
आपलं स्वतःचं तेज श्रीकृष्णांनी भीमाच्या शरीरात प्रविष्ट केलं. आपली शक्ती त्याला दिली. आणि आश्वासन दिलं. "उद्या तुझ्याहातून जरासंध मारला जाईल. काही घाबरू नकोस". दुसरे दिवशी युद्धाला सुरुवात झाली. श्रीकृष्णांनी एक झाडाचं पान हातामध्ये घेतलं आणि फाडून दाखवलं. त्याला पाडायचं, त्याच्या शरीराचे दोन तुकडे करायचे आणि दोन्ही बाजूला फेकून द्यायचे. अशी सूचना त्याला केली. भीमाचं सामर्थ्य मोठं होतं. युद्धाचं कौशल्य त्याच्याकडे कमी होतं. एकदम भीमाने जरासंधाला खाली पाडलं, त्याच्या एका पायावर आपला पाय ठेवला आणि दुसरा पाय ओढून एखादं वस्त्र फाडावं तसं त्याचं शरीराचे दोन भाग केले आणि ते दोन बाजूला फेकून दिलेले आहेत. दोन तुकडे झाल्यामुळे तो जरासंध मृत झालेला आहे. जरासंधाच्या जन्माचाही
वृत्तांत असाच आहे. हा जरासंध ज्यावेळी जन्माला आला, गर्भातून बाहेर पडला, त्यावेळी दोन तुकडेच होते म्हणे. त्याच्या आईने घाबरून ते दोन तुकडे राजवाड्याबाहेर टाकून दिले. जरा नावाची एक यक्षिणी त्यावेळी तिथं होती. तिने ते दोन तुकडे जोडले. त्याला जिवंत केले आणि पुन्हा राजवाड्यात आणून दिलं. जरासंधाचा नाश झाल्याबरोबर कृष्णा्जुनांनी भीमाचं अभिनंदन केलं. त्याला आलिंगन दिलं. आज फार मोठं काम केलंस. मोठा पराक्रम केलास अशी शाबासकी त्याला दिली. नंतर गोपालकृष्णांनी जरासंधाच्या मुलाला सहदेवाला राज्याभिषेक केला आणि त्याला जरासंधाने बंदिवान केलेल्या राजांना मुक्त करायला सांगितलं. सर्व राजे मुक्त होऊन कृष्णदर्शनाकरता आलेले आहेत. आपण जे मनामध्ये ध्यान करत होतो. त्या भगवंतांचं आज प्रत्यक्ष दर्शन झालं. सर्व राजे लोकांनी भगवंताला साष्टांग नमस्कार केला. ते म्हणताहेत,
नमस्ते देवदेवेश प्रपन्नार्तिहराव्यय ।
प्रपन्नान् पाहि नः कृष्ण निर्विण्णान् घोरसंसृतेः ।।
10.73.8 ।। श्री. भा.
"आम्ही आपल्याला शरण आलेलो आहोत. आमचं रक्षण करा. या घोर संसार दुःखापासून आमचं रक्षण करा. जरासंधाबद्दल आम्हाला राग वाटत नाही. त्याच्यामुळे आम्हाला आपलं दर्शन झालं ना? हा त्याचा मोठा उपकार आमच्यावर झालेला आहे. पूर्वी राज्यमदामध्ये आमचं लक्ष गुंतून गेलेलं असताना, कुठेही दुसरीकडे आमचं लक्ष गेलं नाही. धर्माकडे नाही. धार्मिक श्रेष्ठ पुरुषाकडे नाही. आणि आपल्याकडे तर नाहीच नाही. जरासंधाने आम्हाला बंधनात टाकलं. मग मात्र आमचं लक्ष आपल्याकडे गेलं. आपलं स्मरण आम्हाला झालं.
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।
प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः ।।
नम्र झालेल्या शरणागतभक्तांचे सगळे क्लेश दूर करणारे आपण आहात. आपल्याला आम्ही नमस्कार करतो". त्यांची स्तुती भगवंताने ऐकली आणि सांगितलं, "राजेहो, तुमच्या चित्तामधली माझी भक्ती दृढ राहील. ऐश्वर्याचा मद होतो याचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे. पुष्कळ मोठे मोठे राजे झाले. रावण झाला, नरकासुर झाला, कंस झाला. या ऐश्वर्याच्या मदानेच त्यांचा नाश झालेला आहे. हा सगळा विचार तुम्ही करा. प्रजाजनांचं धर्माने रक्षण करा. यज्ञयाग वगैरे करा आणि निरंतर माझं चिंतन करा. म्हणजे तुमचा उद्धार होईल". मग नोकरांना सांगून त्या सर्वही राजांना मंगलस्नान घातलेलं आहे. सहदेवाला सांगून त्यांचा आदरसत्कार केलेला आहे. वस्त्रं, अलंकार वगैरे
त्या सहदेवाने, जरासंधाच्या मुलाने सर्व राजांना दिलेले आहेत. भोजन झालेलं आहे आणि प्रत्येक राजाला दिव्य रथ देऊन त्यांची पाठवणी केलेली आहे. ही जी योजना भगवंताने केली त्याचं एक विशेष कारण आहे. ते सर्व राजे लोक भगवंताबद्दल अत्यंत आदरभाव बाळगणारे झाले. इतके राजे लोक हे श्रीकृष्णांचे भक्त झालेले आहेत आणि श्रीकृष्णांच्या सौजन्याबद्दल सतत जाणीव त्यांच्या मनामध्ये आहे. पुढे ज्या वेळेला कौरव पांडवांचं युद्ध निश्चित झालेलं आहे, त्यावेळी धर्मराज तर बारा वर्षे वनातच होते. एकदम युद्धाची तयारी करायची कशी? सैन्य कुठून आणायचं, द्रव्य कुठून आणायचं? दुर्योधन तर तेरा वर्षांपर्यंत युद्धाची तयारी करतोय. राज्य ताब्यामध्ये आहे. कोश ताब्यामध्ये आहे. नाना प्रकाराने त्याने सैन्याची जमवाजमव केली होती. पण धर्मराजाला इतकं एकदम सैन्य मिळालं कसं? तर भगवंताने ही योजना अगोदरच करून ठेवली होती. वीस हजार आठशे लहानमोठे राजे कृष्णाचे इतके अंकित झालेले आहेत की श्रीकृष्णभगवान पांडवांच्या बाजूला आहेत हे समजल्याबरोबर ते राजे सर्व सैन्य घेऊन पांडवांच्या गोटात दाखल झालेले आहेत. नंतर ते सर्व राजे लोक भगवंताला नमस्कार करून आपापल्या राजधानीमध्ये परत आले आणि श्रीकृष्णांच्या दयेचं वर्णन ते आपल्या प्रजाजनांना करू लागले.
कृष्णा्जुन आणि भीम जरासंधाचा नाश करून इंद्रप्रस्थाला परत आलेले आहेत. आता यज्ञ व्हायचा आहे. नगराबाहेर आल्याबरोबर तिघांनीही आपापले शंख वाजवलेले आहेत. तो आवाज ऐकल्याबरोबर धर्मराजाला समजलं की हे कृतकार्य करून म्हणजे जरासंधाचा नाश करून हे आलेले आहेत. भगवंतांची प्रार्थना धर्मराज करताहेत, "परब्रह्म परमात्मा आपण आहात. कोणत्याही कर्माने आपलं तेज वाढत नाही किंवा कमी होत नाही. नित्यमहिमा आपला आहे. स्वाभाविक आहे. आपल्या भक्तांचं संरक्षण आपल्याकडून निरंतर चालू आहे".
आता यज्ञाकरता तयारी सुरू झाली. ऋत्विज मंडळींना, सगळ्या ऋषींना निमंत्रणं गेली. मोठे मोठे ब्रह्मज्ञानी ऋषी आहेत. प्रतिसृष्टी करण्याचे सामर्थ्य असलेले विश्वामित्र आहेत. व्यास आहेत, भरद्वाज, सुमंतु, वसिष्ठ, गौतम, च्यवन, वामदेव, जैमिनी, पराशर, गर्गाचार्य सगळ्या मोठ्यामोठ्या ऋषींना आमंत्रित केलेलं आहे. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, धृतराष्ट्र, विदुर, दुर्योधनादि सगळी मंडळी हस्तिनापुराहून यज्ञाकरता आलेली आहेत. ब्राह्मणांनी सुवर्णाच्या नांगराने ती यज्ञभूमी नांगरली आहे. सर्व यज्ञकुंडं वगैरे घातलेली आहेत. धर्मराजाला यज्ञदीक्षा त्यांनी दिली. यज्ञाला आरंभ झालेला आहे. त्या यज्ञामध्ये सगळी भांडी सोन्याची होती म्हणतात! हल्लीची पांढरी