भांडी तिथं नव्हती. अलोट संपत्ती भारतवर्षामध्ये होती. सुवर्णभूमी म्हणजे नुसती प्रशंसा नाहीये. किती नेलं तरी आणखी आहेच. सर्व राजांना सहकुटुंब, सहपरिवार येण्याचं आमंत्रण होतं. कृष्णभक्त असलेल्या धर्मराजाचा यज्ञ होणार आहे. आणि त्याठिकाणी भगवान गोपालकृष्ण प्रत्यक्ष असणार आहेत, त्यांचंही दर्शन होईल या अपेक्षेने सर्वही लोक तिथं आलेले आहेत. नंतर सोमरस काढायचा दिवस आलेला आहे. त्यादिवशी असा एक नियम आहे की यज्ञाकरता जी जी मोठी मोठी मंडळी आलेली आहेत, त्यांची पूजा यजमानाने करायची. आता योग्य आणि मान्यवर सगळेच आहेत. मोठे मोठे राजे आहेत, देव आहेत, ऋषी आहेत त्यांची पूजा करायची. पण अग्रपूजा कोणाची करायची? आरंभ पूजेचा कोणापासून करायचा? हा प्रश्न निर्माण झाला. त्याचाच विचार चाललेला आहे. लोकशाहीमध्ये निर्णय लवकर होणे म्हणजे फार कठीण आहे. जास्ती मतांनी झाला म्हणजे एकमताने झाला असं समजायचं. देवांची पूजा करा, ऋषींची पूजा करा, या अमुक राजाची पूजा करा. चर्चा चाललेली आहे. थांबलं ते काम! यज्ञ थांबला ना! सहदेव उठून उभा राहिला आणि त्याने बोलायला सुरुवात केली.
अर्हति अच्युतः श्रेष्ध्यं भगवान् सात्वतां पतिः ।
एष वै देवताः सर्वाः देशकालधनादयः ।।
10.74.19 ।। श्री. भा.
सहदेव सांगतो, "मंडळी हो, कसला विचार तुम्ही करता आहात? पूजेला आरंभ कोणापासून करावयाचा? भगवान गोपालकृष्ण इथे आहेत. त्यांचीच अग्रपूजा तुम्ही करा. त्यांची पूजा करून तुम्ही सुरुवात करा. सर्व देवतारूपी, सर्व विश्वरूपी हे आहेत. यांची पूजा केली म्हणजे सर्व विश्वाची पूजा केल्यासारखं आहे. मागाहून कोणाची पूजा करा अगर करू नका". सहदेवाच्या या भाषणाने सर्वांना आनंद झाला. कुणीतरी असा बोलणारा पाहिजे असतो. सर्वांनी टाळ्या वाजवून श्रीकृष्णांचा जयजयकार केलेला आहे. सर्वांची संमती आहे हे समजून भगवान गोपालकृष्णांना आणून सभेमध्ये सिंहासनावर बसवलेलं आहे. सम्राट धर्मराज ज्याने सर्व पृथ्वी जिंकलेली आहे त्याने भगवंतांचे पाय धुतले. पीतांबर, अलंकार सर्व त्यांना अर्पण केलं. पूजा करताना धर्मराजाच्या नेत्रातून अश्रू ओघळताहेत. प्रेमाने कृष्णरूपाकडे पाहतो आहे. पूजा समाप्त झाल्याबरोबर सर्व लोकांनी भगवंताला नमस्कार केलेला आहे. जयजयकार केलेला आहे. तेवढ्यात एक विघ्न निर्माण झालं. चेदिराज शिशुपाल तिथे होता. त्यालाही आमंत्रण होतं. कृष्णांची अग्रपूजा केली, सर्वजण कृष्ण गुणांचं वर्णन करताहेत हे पाहून त्याला अतिशय राग आलेला आहे. उठून उभा
राहिला आणि त्याने बोलायला आरंभ केला. "ऐका माझं म्हणणं लोकहो. काल मोठा कठीण आलेला आहे. हा लहान मुलगा सहदेव काय बोलला, कृष्णाची पूजा करू आणि तुम्ही मोठी मोठी मंडळी, ज्ञानी मंडळी तुम्ही याला संमती दिली? किती श्रेष्ठ मंडळी इथे आलेली आहेत, किती ज्ञानी ऋषी आहेत. मोठे पराक्रमी राजे आहेत. भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत. या सर्वांना सोडून आणि एका गवळ्याच्या मुलाची पूजा तुम्ही करता? तुम्हाला काही कळलं नाही? हा कसा आहे".
वर्णाश्रमकुलापेतः सर्वधर्मबहिष्कृतः ।
स्वैरवर्ती गुणैर्हीनः सपर्यां कथमर्हति ।।
10.74.35 ।। श्री. भा.
गोपालकृष्ण सिंहासनावर स्वस्थ बसलेले आहेत. कोल्ह्याने ओरडायला सुरुवात केली म्हणून सिंह काय त्याला उत्तर देतो काय? श्रीकृष्णांनी त्याच्या आईला वचन दिलं होतं, याचे शंभर अपराध मी क्षमा करीन. पुढं नाही. शिशुपाल म्हणतोय, "काही धर्माचरण नाही, वर्णाश्रमधर्म नाही आणि याची पूजा तुम्ही करता? ययाति राजाने यांच्या कुळाला शाप दिलेला आहे की यांना राज्याभिषेक नाही, राज्य नाही. सर्व भूमीचा त्याग करून समुद्रामध्ये जाऊन हे राहिलेले आहेत". वाटेल तसा बोलायला लागला, "कशी पूजा केली तुम्ही? काय म्हणून याची पूजा केली?" भगवंतांनी काहीही भाषण केलं नाही . भगवंतांची निंदा इतर लोकांना ऐकवली नाही. पांडवही रागावले. यज्ञामध्ये रक्तपात होण्याची वेळ आली. एकदम आपल्या सिंहासनावरून उठले गोपालकृष्ण, "थांबा कोणीही गडबड करू नका. बसा जागच्या जागी". श्रीकृष्णांनी आपलं सुदर्शनचक्र शिशुपालावर सोडलं. त्या चक्राने शिशुपालाचा शिरच्छेद केला. शिशुपाल मरून खाली पडला आणि त्याच्या शरीरातून दिव्य तेज निघून ते कृष्णशरीरात प्रविष्ट झालं. भगवंताचा तीन जन्म द्वेष करणारे जयविजय यावेळेला मुक्त झाले. पुन्हा वैकुंठलोकाला गेले. शिशुपालाचे अनुयायी मंडळी मात्र पळून गेलेली आहेत. यज्ञ समाप्त झालेला आहे.
अवभृथ स्नान झालं. सर्व श्रेष्ठ मंडळींची पूजा केली, सत्कार केला, दानधर्म केलेला आहे. सर्व मंडळी धर्मराजाच्या यज्ञाची, धर्मराजाची आणि कृष्णांची स्तुती करत आपापल्या स्थानाला निघून गेली.
दुर्योधनाला मात्र हे सहन झाले नाही. पांडवांचा उत्कर्ष काही त्याला बघवेना. त्याचं कारण काय म्हणून राजाने विचारलं. धर्मराजाच्या यज्ञामध्ये श्रीकृष्णांनी वेगवेगळ्या कामावर काही
ठराविक लोकांची नेमणूक केली होती. कोण व्यक्ती कोणतं काम करायला योग्य आहे हे श्रीकृष्णांना बरोबर माहीत होतं.
भीमो महानसाध्यक्षो धनाध्यक्षः सुयोधनः ।।
10.75.4 ।। श्री. भा.
स्वयंपाकाच्या कामावर भीमाची नेमणूक केली. भीम या पाकशास्त्रामध्ये मोठा प्रविण होता. जरी राजा होता तरी या कला त्यांनी शिकलेल्या होत्या. किती अन्न पाहिजे. किती मंडळी आहेत, याचा अंदाज पाहिजे ना. लक्षावधी मंडळी जेवणार रोज. त्यावेळेला अन्न किती तयार करायचं. ते स्वादिष्ठ आणि उत्तम प्रकारचं झालं पाहिजे. तो स्वतः स्वयंपाक करत होता असं नाही. हजारो आचारी असतील हाताखाली. पण देखरेख याची आहे. दुर्योधनाला खजिनदार नेमलं. कोषाध्यक्ष. सगळा कोष त्याच्या ताब्यात दिला आणि सांगितलं, "सगळं द्रव्य तुझ्या ताब्यात आहे सगळा जमाखर्च तू ठेवायचास. यज्ञमंडपातून जेवढी मागणी येईल तितकं द्रव्य पाठवलं पाहिजेस". ज्योतिषदृष्टीने त्याच्या हातावर काही मत्स्य होता म्हणे, हे यांना सगळं माहित होतं. जितकं द्रव्य तो खर्च करी त्याच्यापेक्षा दुप्पट द्रव्य येऊन पडायचं खजिन्यात. सर्वांचा सत्कार करणं, देखरेख करणं हे काम सहदेवाला दिलं. सर्व सामुग्री संपादन करणं हे काम नकुलाला दिलं. जमलेल्या श्रेष्ठ पुरुषांची पूजा-अर्चा करण्याचं काम अर्जुनाकडे दिलं. ज्ञानी, श्रेष्ठ ऋषीमंडळींचे पाय धुण्याचं काम श्रीकृष्णांनी आपल्याकडे घेतलेलं आहे.
गुरुशुश्रूषणे जिष्णुः कृष्णः पादावनेजने ।
परिवेषणे द्रुपदजा कर्णो दाने महामनाः ।।
10.75.5 ।। श्री. भा.
वाढायच्या कामावर द्रौपदीची नेमणूक केली. द्रौपदी काही एकटी वाढत नव्हती एवढ्या लोकांना. पण जेवायला बसल्यानंतर एकदा फिरून यायची. बायका वाढणाऱ्या असल्या आणि पुरुष वाढायला असले म्हणजे फरक लगेच कळून येतो. नको म्हटलं की थांबले पुरुष. ती द्रौपदी इतकी चाणाक्ष होती, नको म्हटलं तरी त्यांना वाढ म्हणायची. लाडू वाढा, जिलेबी वाढा, त्याला पाहिजे असायचं. अन्नदान करणारा जो आहे त्याला हे सगळं माहिती पाहिजे. तृप्ती होईपर्यंत अन्नदान झालं पाहिजे आणि कर्णाकडे दानाचं खातं दिलं होतं. मोठा उदार होता तो. यज्ञ करणारा धर्मराज आहे आणि दान करणारा कर्ण आहे. भगवान म्हणाले, "धर्मराज, तुला हे दानाचं काम जमणार नाही. फार कठीण आहे. मनापासून झालं पाहिजे. दान करताना, माझा पैसा संपतो आहे, इतकं कशाला द्यायचं? हे मनात आलं की संपलं. गेलं ते दान फुकट गेलं. ते कर्णालाच
फक्त जमेल". अशी मंडळी श्रीकृष्णांनी कामावर नेमली होती आणि यांचही लक्ष सर्वांवर होतंच. त्यामुळे तो मोठा यज्ञ अत्यंत व्यवस्थित आणि निर्विघ्न पार पडलेला आहे. समाप्ती झाली. यजमानाचं आणि बाकीच्या मंडळींचं नदीतीरावर स्नान झालेलं आहे.
उत्तम वस्त्र, अलंकार परिधान करून धर्मराज आपल्या बंधूसह मयसभेमध्ये सिंहासनावर येऊन बसलेले आहेत. द्रौपदी जवळ आहे. श्रीकृष्ण भगवानही बाजूच्या सिंहासनावर स्वस्थ बसलेले आहेत. धर्मराजाने कौरवांना मुद्दाम आग्रहाने ठेवून घेतलं. ते ही राहिले. एकेदिवशी सभेमध्ये सर्वजण बसलेले असताना दुर्योधनाला ती सभा पहाण्याची इच्छा झाली. त्यांच्याकरताही शंभर आसनं ठेवली होती. आपल्या बंधूंना घेऊन त्या सभेमध्ये दुर्योधन आलेला आहे आणि आता पलिकडे आसनं आहेत त्यांच्यावर जाऊन बसायचं. निघाला तो. त्याला एकदम जमिनीवर पाणी दिसायला लागलं. जमीन असताना पाणी दिसतंय. पाण्यामध्ये आपली वस्त्रं भिजतील म्हणून त्याने आपली वस्त्रे उचलून घेतली आणि पुढे गेला तर तिथे पाणी नाहीये, जमीनच आहे. तसाच पुढे गेला. पुढे जमीन आहे. वस्तुतः तिथे पाणी होतं. पाण्यावर जमिनीचा आभास निर्माण केला आहे मयासुराने. पलिकडे आसन आहे म्हणून दुर्योधन वेगाने निघाला आणि धाडदिशी पाण्यामध्ये पडला. भीमसेन, द्रौपदी सगळे हसायला लागले. श्रीकृष्ण काही बोलले नाहीत. आता वैराला सुरुवात झालेली आहे. बरंय म्हणाले, भूमीचा भार दोघांमुळे नष्ट होणार आहे असा विचार करताहेत गोपालकृष्ण. धर्मराज सावरायचा प्रयत्न करताहेत पण भीमसेन, द्रौपदी वगैरे सर्व स्त्रिया हसताहेत. दुर्योधन पडला म्हणून त्याच्याजवळ जाणं त्याची समजूत घालणं, त्याला साहाय्य करणं हे काही नाही. ती वेळच आलेली आहे. अपमान झालेला आहे. सगळे कपडे भिजले. दुर्योधन उठला आणि रागाने लगेच हस्तिनापुराला निघून गेलेला आहे. धर्मराजाला फार खेद झालेला आहे. काय आता हा दुर्योधन करतो कोणास ठाऊक?
शुक सांगतात, राजा, आणखी एक भगवतांचं शौर्य कसं आहे ते तू ऐक. यज्ञामध्ये शिशुपालाचा वध झाल्यावर त्याची मित्रमंडळी सगळी पळून गेली. शाल्व नावाचा राजा रुक्मिणीस्वयंवराच्या वेळी पण आलेला होता. शिशुपालाचा मित्र होता. त्यावेळीही शिशुपालाला काही मिळालं नाही आणि आता तर प्राणच गेले. म्हणून त्याने सर्व राजांसमोर यादवांचा संहार करण्याची प्रतिज्ञा केली. त्यात कृष्णही आलेच. भगवान शंकरांची आराधना त्याने केली. अन्न नाही, पाणी नाही अशा अवस्थेत एक वर्ष तपश्चर्या केल्यावर शंकर भगवान प्रसन्न झाले. देव, असुर, मानव, गंधर्व या सगळ्यांनाही अभेद्य असं विमान त्याने शंकरांना मागितलं. शंकरांनी
मयासुराला असं एक अभेद्य विमान तयार करून शाल्वाला द्यायला सांगितलं. लोखंडाचं अत्यंत दृढ अशा प्रकारचं विमान त्या शाल्व राजाला मिळालं. विमानामध्ये बसून तो राजा द्वारकेला आला आणि वरून शस्त्रवृष्टी करतोय. गोपालकृष्ण इंद्रप्रस्थाहून अद्यापि परत आले नव्हते. प्रद्युम्न, सांब वगैरे मोठेमोठे यादव होते तिथे. त्यांनी खालून शस्त्रं वर टाकावीत आणि शाल्वाने वरून शस्त्रवृष्टी करावी असं युद्ध चाललेलं आहे. आकाशात असल्यामुळे शाल्व वरचढ ठरू लागला आणि मोठं संकट यादवांसमोर उभं राहिलं. घरंदारं पडायला लागली. प्रद्युम्नाने शाल्व राजाच्या द्युमान नावाच्या प्रधानाबरोबर युद्ध करून त्याचा नाश केला. सत्तावीस दिवस युद्ध चाललेलं आहे. यादवांचा प्रतिकार चालू आहे आणि त्यांनी शाल्व राजाला थोपवून धरलेलं आहे. इतक्यात भगवान कृष्ण तिथे येऊन पोहोचले. त्यांनी आपल्या सारथ्याला दारूकाला सांगितलं, ""हा मोठा मायावी दैत्य आहे. मोठ्या सावधगिरीने रथ चालव.'' शाल्व राजाने पाहिलं. भगवान कृष्ण रणभूमीवर आलेले आहेत. त्याने शस्त्रवृष्टी करायला आरंभ केला आणि कृष्णांनीही त्याच्या विमानावर बाणवृष्टी करायला सुरुवात केली. त्याचा एक बाण येऊन कृष्णांच्या हाताला लागला आणि त्यांच्या हातातून धनुष्य खाली पडलं. सगळे यादव घाबरले. त्या शाल्वाला तर अतिशय गर्व झाला. तो म्हणाला, ""तू माझ्या परममित्राची भार्या हरण केलीस आणि यज्ञसभेमध्ये त्याचा नाश केलेला आहेस. आज मी तुझा प्राण घेणार आहे.'' भगवान सांगतात, ""उगच बडबड कशाला करतोस? काय तुझं पौरुष आहे पाहू या.'' एकदम कृष्णांनी एक गदा त्या विमानावर फेकली. त्या विमानाचे तुकडे झाले आणि ते विमान समुद्रामध्ये पडलं. शाल्व राजा जमिनीवर उतरलेला आहे. तो मायावी दैत्य होता. युद्ध सुरू असताना एक पुरुष द्वारकेतून आला कृष्णांना काही निरोप सांगायला. तो सांगतोय, ""देवकीने मला पाठवलेलं आहे. शाल्वराजाने तुमच्या पित्याला वसुदेवाला धरून नेलेलं आहे.'' भगवान विचार करताहेत, 'बलराम तिथे आहे आणि शाल्व वसुदेवांना धरून घेऊन गेला?' त्यांना खरं वाटेना. इतक्यात शाल्वाने त्या वसुदेवाला आणलं आणि कृष्णांना तो म्हणाला, ""हा तुझा पिता मी धरून आणलेला आहे. तुझ्यासमक्ष मी याचा आता शिरच्छेद करतो. तुझं सामर्थ्य असेल तर रक्षण कर.'' असं म्हणून त्याने वसुदेवाचा शिरच्छेद केलेला आहे. आणि तो निघून गेला. स्वस्थ बसले भगवान. पण लगेचच त्यांच्या लक्षात आलं की ही राक्षसाची माया आहे. तो दूत दिसेना, वसुदेवाचं शरीर दिसेना. आणि मग मात्र गदा घेऊन धावत येणाऱ्या शाल्वाचं मस्तक भगवंतांनी आपल्या सुदर्शन चक्राने तोडून टाकलेलं आहे. सर्व देवांनी दुंदुभि वाद्ये वाजवून आनंद व्यक्त केला. शिशुपालाचा नाश झाला. त्याचा मित्र शाल्वाचा नाश झाला. पौंड्रकाचा नाश
झाला. मग दंतवक्र जो होता तो हातामध्ये गदा घेऊन युद्धाला आला. श्रीकृष्णांनी पाहिलं, हा आपला अजून एक शत्रू आहे. श्रीकृष्णांनी आपल्या कौमोदकी गदेने त्याच्या छातीवर प्रहार केल्याबरोबर तो दंतवक्र गतप्राण होऊन पडलेला आहे. त्याच्याही शरीरातून दिव्य तेज बाहेर पडून ते कृष्णशरीरामध्ये प्रविष्ट झालं. जय-विजयांपैकी तो होता. तीन जन्मापर्यंत भगवंताचा द्वेष त्यांनी केला. आणि आता त्यांचा उद्धार झालेला आहे. असे भगवान श्रीहरी गोपालकृष्ण. सामान्य अज्ञानी लोकांना वाटतं, कृष्णांचा पराभव झाला, पळून गेले गोपालकृष्ण, त्यांची शक्ती कमी आहे, पण ते खरं नाही.
कौरव पांडवांचं युद्ध निश्चित झालेलं आहे. दोघांनी आपापलं सैन्य जमवलं. दुर्योधनानं येऊन कृष्णांना विनंती केली. कृष्ण म्हणाले, "मी युद्धामध्ये शस्त्र हातात धरणार नाही. नुसता सल्लागार म्हणून येईन." दुर्योधन म्हणाला, "मला सल्लागार पुष्कळ आहेत. तू मोठा पराक्रमी म्हणून तुझ्याजवळ आलो." श्रीकृष्णांनी दुर्योधनाला आपली नारायणी सेना दिली. त्याला आनंद झाला. नुसता कृष्ण येऊन काय करणार म्हणाला, सैन्य मिळालं, बरं झालं. अर्जुनही बोलावण्याकरता आला. "आपण नुसतं माझ्याजवळ येऊन रहा. लढाई करू नका. तुम्ही असला म्हणजे मी विजयी होईन." कृष्णांनी कबूल केलेलं आहे. बलरामजींनी मात्र कोणत्याही पक्षात जायचं नाही असं ठरवलं. तीर्थयात्रेचं निमित्त करून ते बाहेर पडले. नैमिष्यारण्यात आले. सगळी तीर्थं पाहून दक्षिणेकडे रामेश्वर आहे, तिरुपती व्यंकटेश आहेत. त्यांचं दर्शन घेऊन ते परत आले. तो भारतीय युद्धाचा अठरावा दिवस होता. रणभूमीवर ते आले आणि पाहताहेत, भीम आणि दुर्योधन हातात गदा घेऊन रागाने एकमेकांकडे पाहताहेत. बलरामजी मध्ये आले, म्हणाले, "दुर्योधना, भीमा, तुमचा युद्धामध्ये जय पराजय काही सांगता येणार नाही. भीमाची शक्ती जास्त आहे. पण दुर्योधनाजवळ गदायुद्धाचं कौशल्य जास्ती आहे. भीमाला काही तेवढं ज्ञान नाही. तेव्हा या युद्धाचा निर्णय होणार नाही तेव्हा कशाला हे युद्ध करता? थांबवा. झालं, सगळं सैन्य मारलं गेलं. सगळे सेनापती गेले. आता तरी समेट करा. प्रेमाने वागा." पण त्यांनी काही ऐकलं नाही. तेव्हा ते सोडून देऊन बलरामजी पुन्हा नैमिषारण्यात आलेले आहेत. ऋषींनी बलरामजींकडून अनेक यज्ञ केलेले आहेत आणि बलरामजींनीही ऋषींना ज्ञानोपदेश केलेला आहे.
भगवन् यानि चान्यानि मुकुन्दस्य महात्मनः ।
वीर्याण्यनंतवीर्यस्य श्रोतुमिच्छामहे प्रभो ।।
10.80.1 ।। श्री. भा.
परीक्षित राजा कृष्णलीला श्रवण करतो आहे. आनंद आहे. मध्ये काही विचार मनामध्ये आले तर त्याने शुकदेवांना विचारावं आणि निरसन करून घ्यावं. अश्रद्धा नाही. आणखी भगवंताच्या लीला मला सांगा अशी प्रार्थना परीक्षिताने केल्यानंतर एका मोठ्या भक्ताचं चरित्र शुक्राचार्य सांगताहेत.
कृष्णस्यासीत्सखा कश्चिद् ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः ।
विरक्त इंद्रियार्थेषु प्रशान्तात्मा जितेन्द्रियः ।।
10.80.6 ।। श्री. भा.
भगवान गोपालकृष्णांचा परममित्र सुदामा हा मोठा ज्ञानसंपन्न आहे, विरक्त आहे, शांत आहे, जितेंद्रिय आहे. गृहस्थाश्रमी तो आहे आणि ईश्वरेच्छेने, याचना न करता जे मिळेल त्याच्यामध्ये संतोष आहे. श्रीकृष्णांचे अत्यंत प्रेम आहे. सांदीपनी गुरुमहाराजांच्या आश्रमात विद्या शिकण्याकरता बलराम, कृष्ण राहिलेले असताना, सुदामाजी त्यांचे सहाध्यायी होते. त्यांची अनासक्त विरक्त वृत्ती प्रथमपासूनच आहे. ज्ञानानंतर जे फळ मिळायचं ते अगोदरच मिळालेलं आहे. गृहस्थाश्रमामध्ये द्रव्याची आवश्यकता आहे. सुदामाजी पहिल्यापासूनच विरक्त आहेत. याचना करायची नाही. संतोष आहे ना. कमी असलं तरी संतोष आहे. नसलं तरी संतोष आहे. हाच अभ्यास आहे. आपल्याला संसारात काहीतरी कमी पडतं आहे ही वृत्ती म्हणजे असंतोषाचे काम आहे. समाधान नाही. केवढी भगवत्कृपा सुदामाजींवर आहे. ज्ञानाचं खरं फळ मिळालेलं आहे. पण सुदामाजींच्या स्त्रीला हे कसं साधावं? यांचा एक अभ्यास झालेला आहे. श्रीकृष्णांची मैत्री आहे. कृष्णप्रेम मनामध्ये आहे. तेव्हा ज्ञान आहे. आणि सर्व साधनांचं स्वरूप काय आहे, फळ काय हे सर्व जाणून त्यांनी तसं आचरण केलेलं आहे. म्हणून भगवंताने त्या रुक्मिणीकडून आलेल्या ब्राह्मणाजवळ बोलताना उद्गार काढलेले आहेत.
विप्रान् स्वलाभसंतुष्टान् साधून् भूतसुहृत्तमान् ।
निरहंकारिणः शान्तान् नमस्ये शिरसासकृत् ।।
10.52.33 ।। श्री. भा.
जे विप्र अयाचित वृत्तीने जो लाभ होईल त्याच्यामध्ये संतुष्ट आहेत. साधू आहेत. सर्वांच्या बरोबर सौहार्द भावना धारण करणारे आहेत. निरहंकारी असे जे शांत ब्राह्मण आहेत त्यांना मी शिरसावंदन करतो. वारंवार त्यांना मी वंदन करतो. तसे हे सुदामाजी होते. एवढा आपला मित्र मोठा आहे. सर्व विश्वाचा तो अधिपती आहे. नियामक आहे, ईश्वर आहे. पण कधी त्याच्याकडे जावं आपली परिस्थिती सांगावी असं कधीही त्यांना वाटलं नाही. इच्छाच नाही. तो सर्वज्ञ आहे ना.
परमेश्वराजवळ मागण्याची इच्छा या भक्तांना का होत नाही? आणि प्रत्यक्ष असून तशी सोय असताना. तर मागणाऱ्या भक्तांकडे भगवंताचं खरं लक्ष जात नाही. तेवढ्यापुरतं देऊन टाकतो. नेहमी याच्यातच सापडणार तो भक्त. वासना मनामध्ये वाढत जाणार अधिकाधिक आणि त्यामुळे संसारात मोकळं होण्याची त्याची योग्यताच राहात नाही. वासनाक्षय करण्याचा प्रयत्नही नाही आणि सारखे भोग भोगण्याचा त्याला खेदही वाटत नाही. आपली एकंदर परिस्थिती चांगली असावी म्हणजे देहाव्यतिरिक्त आत्मा आहे. क्षेत्र-क्षेत्रज्ञ विवेक झाला असता तर
काही म्हणता येत नाही. पण सुदामाजींच्या अंतःकरणात मात्र काहीही इच्छा नाही. मित्राची आठवण होत असेल पण त्याच्याकडे जाऊन आपली काही व्यवस्था करून घ्यावी अशी इच्छाच नाही. त्यांची जी पतिव्रता स्त्री आहे तीही त्यांच्या योग्यतेचीच आहे. परंतु आवश्यक जे आहे तेवढ्याकरता याचना करायला काय हरकत आहे. असं तिला वाटत होतं. याचना कुणाजवळ करायची हे ही तिला माहिती आहे. जो श्रेष्ठ उदार महात्मा आहे, त्याच्याजवळ याचना करायला हरकत नाही.
याच्ञा मोघा वरमधिगुणे नाधमे लब्धकामाः ।।
हा ही अंतःकरणामध्ये निग्रह आहे. परंतु श्रेष्ठ पुरुषाजवळ आपली परिस्थिती सांगायला हरकत काय आहे? वासनाक्षय करायला पाहिजे हे खरं आहे. पण देह कसा राहायचा? आवश्यक जे आहे, एकंदर आश्रमाची व्यवस्था काय, मुलाबाळांकरता व्यवस्था करायला पाहिजे. पण हे जे महात्मे आहेत, ते ईश्वराजवळ मागत नाहीत तर इतरांजवळ काय मागणार? न मागता पाठवून दिलं तरी घेत नाहीत. शिवाजीराजांनी तुकाराम महाराजांकडे रत्नांनी, मोहरांनी भरलेली ताटं पाठवली. त्यांनी लगेच परत पाठवली. नको म्हणाले, देवाकडचा प्रयत्न कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणजे खरं प्रेम तुमचं नाही. त्या पतिव्रता स्त्रीचे विचार वेगळे आहेत. देवासमोर आपलं सांगायला काय हरकत आहे? भक्ताने सकाम व्हायला काय हरकत आहे? निष्काम म्हणजे ज्ञानच झालेलं आहे. क्षेत्र-क्षेत्रज्ञ विवेक पूर्ण झालेला आहे. तोच खरा निष्काम आहे. तोपर्यंत काम अंतःकरणामध्ये आहे.
प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् ।।
2.55 ।। श्री. भ. गीता
प्रल्हादजी, नृसिंहांनी वरदान मागायला सांगितलं असताना नको म्हणाले. पुन्हा म्हणाले द्यायचंच असेल
कामानां हृदि असंशरोहं भवतस्तु वृणे वरम् ।।
7.10.7 ।। श्री. भा.
हृषिकेश आपल्याला म्हणतात. सर्व इंद्रियं, मन आपल्या ताब्यात आहे. त्याची सुधारणा तुम्हीच करायची. आमच्या प्रयत्नावर पण जर तुमची दृष्टी असेल तर ते फळ मिळतं. तेव्हा कोणतीही इच्छा मनामध्ये येऊ नये. निष्काम अंतःकरण झालं पाहिजे. हेच मुक्तीचं स्वरूप आहे. सर्व दुःखणिवृत्ती याचाही अर्थ मुक्ती आहे. सर्व काम निवृत्ती यालाही मुक्ती म्हणतात. काही मनामध्ये वृत्तीच नाही. निवृत्तिक अंतःकरण झालेलं आहे. तेव्हा कामनिवृत्ती व्हावी, निष्काम अंतःकरण व्हावं असं प्रल्हादजींनी नृसिंहांना मागणं मागितलं आणि सांगताहेत की त्याचं अंतःकरण निर्वासन झालेलं आहे, श्रमसिद्धी झाली.
तस्यैव पुण्डरीकाक्ष भगवत्त्वाय कल्पते ।।
7.10.9 ।। श्री. भा.
जीवभाव संपला म्हणाले. तो भगवानच झालेला आहे. तसे सुदामाजी होते. पण त्यांच्या स्त्रीने विचार केला की यांना एकदा गोपालकृष्णांकडे पाठवावं. यांनी काही मागो नाहीतर न मागो. समक्ष भेटल्यावर एकदा यांची परिस्थिती लक्षात आली की गोपालकृष्ण कृपा करतील. त्याप्रमाणे ती एकदा म्हणू लागली.
ननु ब्रह्मन् भगवतः सखा साक्षाच्छ्रियः पतिः ।
ब्रह्मण्यश्च शरण्यश्च भगवान् सात्वतर्षभः ।।
10.80.9 ।। श्री. भा.
"लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण आपले मित्र आहेत असं मी ऐकलं आहे. ब्राह्मणांबद्दल अत्यंत आदरभाव त्यांना आहे. दुःखीकष्टी मानवांबद्दल त्यांच्या मनात अत्यंत दया आहे. अशा भगवान कृष्णांना तुम्ही एकदा भेटून या. एकदा द्वारकेला जाऊन या." सुदामाजी म्हणाले, "कशाकरता?" ती सांगतीये,
दास्यति द्रविणं भूरि सीदते ते कुटुम्बिने ।।
10.80.10 ।। श्री. भा.
आपण काही ब्रह्मचारी, संन्यासी नाही महाराज, गृहस्थाश्रमी आहोत. आणि आपण अत्यंत कष्टामध्ये आपला गृहस्थाश्रम चालवत आहोत हे श्रीकृष्णांच्या दृष्टीला पडल्याबरोबर पुष्कळ द्रव्य
आपल्याला मिळेल.'' हा अभिप्राय त्या स्त्रीने बोलून दाखवला. श्रीकृष्णांच्या दर्शनाला जायचं म्हणजे द्रव्य मिळेल. ते देतील, तुम्ही मागू नका म्हणाली. सुदामाजींनी ऐकून घेतलं. पण तिकडे लक्ष दिलं नाही. भार्या पुन्हा पुन्हा सांगती, भगवान श्रीकृष्ण अत्यंत उदार आहेत पण तिकडे यांचं लक्ष नाहीये. ते आपल्या नित्यक्रमात मग्न आहेत. ज्ञानदानाचंही काम चालू आहे. अनेक शिष्यमंडळींना शिकवताहेत. पुष्कळवेळा त्या स्त्रीने प्रार्थना केली. सुदामाजींनी एकदा ठरवलं, आपल्या स्त्रीची इच्छा आहे, आपण द्वारकेला जाऊन येऊ. पण जाताना मनोवृत्ती कशी आहे? त्यांना भेटायला गेला म्हणजे तुम्हाला पुष्कळ द्रव्य मिळेल, तुमचा संसार सुखाचा होईल. असं ती स्त्री म्हणतीये. सुदामाजींच्या मनात काही नाही. दुःख असलं तर जायचं म्हणाले. दुःख नाहीच आहे. भगवंतांचं स्मरण ज्याअर्थी मला होतंय म्हणजे दुःख नाही अशी पूर्ण जाणीव त्यांना आहे.
अयं हि परमो लाभ उत्तमश्लोकदर्शनम् ।।
10.80.12 ।। श्री. भा.
परंतु म्हणाले जाऊ या, मोठा लाभ होईल. ज्यांची कीर्ती अत्युत्तम आहे. पवित्र आहे अशा त्या भगवान श्रीहरींचं दर्शन मला होईल ना? द्वारकेला जाऊन काही मागायचं नाही. परंतु दर्शन होईल. म्हणून त्यांनी स्त्रीला सांगितलं म्हणाले जाऊन येतो. परंतु मोकळ्या हाताने कसं जायचं? देवाच्या दर्शनाला असंच जाऊ म्हणाले? काही आहे का घरात? घरात काय असणार? चार घरात जाऊन तिने चार मूठ पोहे आणले आणि एका फडक्यात बांधून सुदामाजींना दिले. हे द्या म्हणाली श्रीकृष्णांना. निघाले सुदामाजी द्वारकेला.
कृष्णसंदर्शनं मह्यं कथं स्यात् इति चिन्तयन् ।।
10.80.15 ।। श्री. भा. (अंदाजित)
कृष्णदर्शन व्हायला पाहिजे याशिवाय कुठलीही इच्छा नाही. पण ते होणार कसं? द्वारका काय लहान सहान गाव आहे. येऊन पोचले द्वारकेत, प्रवास करत करत. मोठे मोठे वाडे आहेत. कृष्णांचाच परिवार केवढा मोठा आहे. सोळा हजार स्त्रिया, त्यांचे नोकरचाकर, त्यांचे मोठेमोठे वाडे. एवढ्या मोठ्या द्वारकेमध्ये कृष्णदर्शन कसं व्हायचं? एका वाड्याच्या दरवाजामध्ये ते उभे राहिले. कृष्णदर्शन व्हावं अशी तळमळ आहे. आत गोपालकृष्ण बसलेले होते. त्यांची दृष्टी सुदामाजींवर पडल्याबरोबर उठले आणि धावत येऊन त्यांनी सुदामाजींना आलिंगन दिलेलं आहे.
सख्युः प्रियस्य विप्रर्षेः अंगसंगातिनिर्वृतः ।
प्रीतो व्यमुंचत् अबिन्दून् नेत्राभ्यां पुष्करेक्षणः ।।
10.80.19 ।। श्री. भा.
भगवान मायावी आहेत. माया आसक्त नाहीयेत. परंतु जे जे उत्तम आहे व्यवहारदृष्टीने ते ते