सर्व भगवान करतात. मित्राला पाहिल्याबरोबर सर्व गोष्टींची आठवण झालेली आहे. देवाला वासनाक्षय आहे की नाही. संसाराची आसक्ती आहे की नाही याचं उत्तर देता येणार नाही. त्यांचं एकंदर लीलाचरित्र पाहिल्याबरोबर आमच्यासारखेच आहेत असं आम्हाला वाटतं. परममित्राची भेट झाली, दर्शन झालं, डोळ्यातून अश्रू वाहताहेत. भगवान अत्यंत प्रेमाने सुदामाजींना वाड्यात घेऊन आलेले आहेत. सुदामाजींची अत्यंत आदराने पूजा केलेली आहे. नुसता मित्र नाहीये. ज्ञानी भक्त आहे. ज्ञानाचं फळ याने मिळवलेलं आहे. पूर्ण विरक्त आहे. ईश्वराची पूर्ण शक्ती विद्यमान आहे. असे म्हणतात सुदामाजी, आम्हाला काय करायचंय? ईश्वराची आमच्यावर जी कृपा झालेली आहे त्यामुळे व्यवहारातल्या कुठल्याही गोष्टीशी आमचा संबंध नाही. मनाचासुद्धा नाही. सर्व त्याग मनापासून झालेला आहे. गंध लावलेलं आहे श्रीकृष्णांनी. धूप-दीप ओवाळून देवाप्रमाणे सुदामाजींची आरती केली. भोजन झालेलं आहे. दरिद्री ब्राह्मण सुदामाजी अत्यंत कृश झालेले आहेत. हाडं दिसताहेत. अन्न नाही, पाणी नाही. श्रीकृष्णांची इतकी निष्ठा, इतकं प्रेम पाहून रुक्मिणीदेवीसुद्धा वारा घालत उभी राहिली. अंतःपुरातल्या सगळ्या लोकांनासुद्धा आश्चर्य वाटलं. हा कोण आहे म्हणाले अवधूत, दरिद्री ब्राह्मण आणि देवाने याची पूजा केली? प्रत्यक्ष लक्ष्मीपती आणि लक्ष्मीला सोडून भेटतोय, बोलतोय, डोळ्यातून अश्रुधारा वाहताहेत. दोघेही मित्र बोलत बसलेले आहेत. गुरूंच्या आश्रमात राहात असताना त्यावेळची आठवण झाली. प्रेमाने त्याचे हात आपल्या हातात घेतले आणि भगवान तन्मय झालेले आहेत. खरी मैत्री आहे, प्रेम आहे. कशाकरता आला, तो दरिद्री आहे. यांनाही काही स्मरण नाही. आणि आपण दरिद्री आहोत, आपला मित्र आपल्याला काही पैसा देईल याचं सुदामाजींनाही स्मरण नाही. शुद्ध प्रेम आहे.
अपि ब्रह्मन् गुरुकुलात् भवता लब्धदक्षिणात् ।
समावृत्तेन धर्मज्ञ भार्योढा सदृशी न वा ।।
10.80.28 ।। श्री. भा.
भगवान विचारताहेत, "काय सुदामाजी, गुरुजींकडून विद्या संपादन करून, गुरुदक्षिणा देऊन घरी गेल्यावर आपण विवाह केला आहे ना? आपल्याला स्त्री योग्य मिळालेली आहे ना? पहिल्यापासूनच तुमची वृत्ती विरक्त आहे. निर्वासन अंतःकरण तुमचं आहे. तुमचं चित्त हे वासनेच्या आधीन झालेलं नाही. धनाची इच्छा नाही, मानाची इच्छा नाही हे पूर्वीच आम्ही पाहिलं आहे. अशीही काही मंडळी असतात की ज्यांच्या मनामध्ये वासना नाही आणि ईश्वरार्पण बुद्धीने कर्माचरण मात्र त्यांचं चाललेलं आहे. या योगाने लोकसंग्रह होतो. आपण गुरुकुलात राहात होतो त्यावेळची आठवण तुम्हाला आहे का? गुरुजींच्या कृपेने जे काही जाणून घ्यायचं ते आपण घेतलेलं आहे.
अज्ञानाच्या पलिकडे आपण गेलेला आहात. आद्य आश्रम जो आहे तो गुरूची सेवा करण्याकरता, ज्ञान मिळवण्याकरता आहे. सद्गुरूंची सेवा आपल्याला घडलेली आहे. माझा संतोष यज्ञाने होणार नाही. संततीने होणार नाही. तपाने होणार नाही. शमाने नाही.
तुष्येयं सर्वभूतात्मा गुरुशुश्रूषया यथा ।।
10.80.34 ।। श्री. भा.
फक्त एक गुरुसेवा करणारा जो गुरुभक्त आहे त्याला पाहून मला आनंद वाटतो. काय सुदामाजी, एके दिवशी आपल्याला गुरुजींच्या पत्नीने सांगितलं, गुरुमाईंनी, की संध्याकाळच्या स्वयंपाकाला घरात लाकडं नाहीत." काय परिस्थिती आहे बघा. चतुर्दश विद्या, चौसष्ट कला देणारे इतके ज्ञानसंपन्न सांदीपनी गुरुमहाराज, त्यांच्या घरात स्वयंपाकाला लाकडं नाहीत. परमेश्वराचे गुरू. श्रीकृष्ण पुढे सांगताहेत, "गुरुमाईने सांगितल्यावर आपण तिथे अरण्यामध्ये लाकडं आणायला निघालो. लाकडं गोळा केली, मोळ्या बांधल्या, डोक्यावर घेतल्या. इतक्यात एकदम पाऊस पडायला लागला. वास्तविक वर्षाऋतु नव्हता. सूर्यास्तही झाला. जिकडे तिकडे अंधार पडला आणि आपण रस्ता चुकलो. तिथेच एका झाडाखाली थांबलो. सांदीपनी गुरुमहाराज सूर्योदय झाल्याबरोबर आमचा शोध करीत त्या अरण्यात आले. आणि आमची स्थिती पाहून त्यांना अतिशय वाईट वाटले. बाबांनो आमच्याकरता किती कष्ट तुम्ही घेतले असं ते म्हणाले. शरीर केवढं प्रिय आहे जीवाला पण शरीराची सुद्धा पर्वा न करता तुम्ही एवढे कष्ट सोसले असं गुरुमहाराज म्हणाले. सच्छिष्याचं हे कर्तव्य आहे की त्याने सद्गुरूंची यथाशक्ती सेवा करावी. सर्व अर्पण करावं. गुरुजींनी प्रसन्न होऊन "तुमचे सर्व मनोरथ सत्य होतील' असा आशीर्वाद आपल्याला दिला. त्यांनी आपल्याला सांगितलं की आपण केलेलं वेदाध्ययन नेहमी तेजस्वी राहील. असं गुरुमहाराजांचं आपल्यावर प्रेम होतं, कृपा होती. त्यामुळेच आणि पूर्णता आपल्या जीवनाला आलेली आहे."
सुदामाजी म्हणाले, "देवा, ही सगळी इच्छा आमची पूर्ण झालेली आहे. काय मिळालं नाही आम्हाला? राहायला मिळालं ना गुरुकुलामध्ये. तुमचा उपदेश, तुमचं मार्गदर्शन, एकंदर आचरण हे सगळं आम्ही पाहिलेलं आहे. वेदरूप आपणच आहात आणि सद्गुरूंची सेवा आपण करून दाखवली आहे." बोलणं चाललेलं आहे. भगवान म्हणाले,
किमुपायनमानीतं ब्रह्मन् मे भवता गृहात् ।।
10.81.3 ।। श्री. भा.
सगळी परिस्थिती समजावून घेताहेत. सुदामाजी काय बोलताहेत. गुरुसेवेबद्दल यांची तशीच निष्ठा आहे. यांनी तर सांगितलं की गुरुसेवेपेक्षा माझ्या सान्निध्याने त्यांना मोठा लाभ आहे.
सुदामाजी, काय फराळाचं काही आणलं आहे का नाही? आमच्या वहिनीसाहेबांनी काही दिलं आहे का नाही?" सुदामाजी विचार करताहेत, काय हे मळकट गाठोडं काढायचं? पण भगवान सांगतात, "भक्ताने मला थोडं दिलं तरी मला समाधान आहे. माझी तृप्ती होते. अभक्ताने काहीही दिलं तरी परिणाम नाही.
पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ।
तदहं भक्त्युपहृतं अश्नामि प्रयतात्मनः ।।
10.81.4 ।। श्री. भा.
शुद्ध अंतःकरणाच्या भक्ताने मला तुळसीपत्र, फुलं, फळ, किंवा जल दिलं तरी मला संतोष होतो. भक्तीने दिलेलं आहे की नाही एवढं मी तपासून घेतो. असं मोठ्या उदारपणाने भगवान बोलताहेत. ब्राह्मणाने खाली मान घातलेली आहे. हा साक्षात लक्ष्मीपती आहे आणि हा याचना करतो आहे? याचना मी करायची. जीव हा कर्मपरतंत्र आहे. त्याला अपमान सोसावा लागतो. संकटं सोसावी लागतात. त्याच्या कर्माचं फळ त्याला भोगावं लागतं. याला याचना करण्याचं काय कारण आहे? नित्य तृप्त आहे परमात्मा. लक्ष्मी याच्या गुणांना पाहून याच्याजवळ राहाती आहे. लक्ष्मीची सुद्धा याला इच्छा नाही मग मागणार काय हा? सुदामाजी, विचार करताहेत. भगवान सांगताहेत, "मला इथं पुष्कळ ऐश्वर्य आहे. पुष्कळ स्त्रिया आहेत, नोकर चाकर आहेत. पंचपक्वान्नाचं ताट जरी समोर आलं तरी मला तुमची आठवण होते. कार्यभाग मोठा असल्यामुळे मी येऊ शकत नाही. आज तुम्ही भेटला, समाधान झालं." खाली मान घालून सुदामाजी बसलेले आहेत. या लक्ष्मीपतीला हे पोहे द्यायचे कसे? लाज वाटली. भगवान विचार करताहेत.
नायं श्रीकामो माभजत्पुरा ।।
10.81.6 ।। श्री. भा.
पत्न्याः पतिव्रतायास्तु सखा प्रियचिकीर्षया ।
प्राप्तो मां अस्य दास्यामि संपदो अमृत्यदुर्लभाः ।।
10.81.7 ।। श्री. भा.
भगवान श्रीहरींचा संकल्प होऊन गेला. हा ब्राह्मण काही सकाम नाहीये. लक्ष्मीकरता याने माझी सेवा कधीच केली नाही. शुद्ध याची भक्ती आहे. पण पतिव्रता पत्नी आहे. तिलाही दुःखी ठेवणे बरं नाहीये. तिच्याही मनाची इच्छा पूर्ण करायची म्हणून हा आलेला आहे माझ्याकडे. तिचंही प्रिय करावं. संपत्ती यांना द्यायची आहे असा संकल्प होऊन गेला भगवंताचा. देवांनासुद्धा जी संपत्ती मिळणार नाही ती संपत्ती याला द्यावी असा संकल्प झालेला आहे. ज्याच्याजवळ संकल्पाद्वारा पंचमहाभूतं तयार होतात, सृष्टी निर्माण होते त्याला संपत्ती द्यायला किती वेळ लागणार? पोहे
खाऊनच संपत्ती द्यायची असं नाही पण यालाही समाधान होईल म्हणून भगवान विचारताहेत, "काय आणलयं सुदामाजी? हे कसलं गाठोडं आहे बघू या बरं". ते गाठोडं आपणच काढून घेतलं. भक्ताने देण्याचीही वाट पाहिली नाही. मागितलं भक्ताजवळ. सर्वांना दान करणारा, सर्वांचं संरक्षण करणारा परमात्मा मागतोय, आपणहून भक्ताचं घेतोय, या भक्ताची योग्यता काय असेल? सुदामाजी आपले गप्प बसले. ते गाठोडं सोडलं आणि भगवान म्हणाले, "वा, वा, सुदामाजी हा मला आवडणारा पदार्थ तुम्ही आणलेला आहे. पोहे मला फार आवडतात. विचारा वाटलं तर आमच्या घरात." हे पोहे विश्वपरमात्म्याला तृप्त करणारे आहेत. त्या कोरड्या पोह्यांची एक मूठ भगवंतांनी तोंडात टाकली.
द्वितीयां जग्धुमाददे ।।
10.81.10 ।। श्री. भा.
सगळे पोहे मलाच खायचेत म्हणाले. दुसरी मूठ भरून घेतली.
तावत् जगृहे हस्तं तत्परा परमेष्ठिनः ।।
10.81.10 ।। श्री. भा.
एतावतालं विश्वात्मन् सर्वसंपत्समृद्धये ।।
10.81.11 ।। श्री. भा.
लक्ष्मीदेवीने, रुक्मिणीने हात धरला. म्हणाली, "पुरे प्रभू, एक मूठ पोह्याने याला काय मिळालं, तिकडे दुसरी द्वारकानगरी निर्माण झाली ना. काय याला द्यायचं ते दिलं आपण. आपली तृप्ती नेहमीच आहे. सगळे पोहे खाऊन तृप्ती होणार असं थोडंच आहे. आणि आम्हालाही राहू दे की थोडा प्रसाद. तुम्ही सगळं घेता काय? तुम्हाला ज्या ब्राह्मणाचे पोहे प्रिय आहे ते आम्हाला जर मिळाले तर आम्हीही तृप्त होऊ. भक्तवत्सलता ही तुमच्या एकट्याजवळच आहे."
रात्रभर सुदामाजी राहिले. अखंड गप्पागोष्टी चाललेल्या आहेत. जणू स्वर्गातच आपण आहोत असं त्यांना वाटलं. दुसरेदिवशी स्नान, संध्या, फराळ झाल्यावर सुदामाजी आपल्या घराकडे जायला निघाले. शुक्राचार्य सांगतात राजा
स चालब्ध्वा धनं कृष्णात्न तु याचितवान् स्वयम् ।
स्वगृहान् व्रीडितो अगच्छन्महद्दर्शननिर्वृतः ।।
10.81.14 ।। श्री. भा.
इतकं समाधान सुदामाजींना झालं की देवाजवळ काही धन मागून घ्यावं अशी आठवणसुद्धा त्यांना झाली नाही. आपण दरिद्री आहोत, स्त्रीने आपल्याला याकरता पाठवलं आहे, काही आठवण नाही. श्रीकृष्णांनीही बरोबर काही दिलं नाही. सुदामाजींना लज्जा वाटते आहे म्हणाले. मी
असा दरिद्री, कृश शरीर झालेलं आणि देवाने मला आपल्या आसनावर बसवलं, आलिंगन दिलं. कर्मपरतंत्र असलेला मी आणि तो भगवान ज्याला कर्मसंबंध नाही.
क्लेशकर्मविपाकाशयैः अपरामृष्टः पुरुषविशेषईश्वरः ।।
पंचक्लेश ज्याला नाहीत, त्याला कारण असलेलं कर्म ज्याला नाही. कर्माचा विपाक, वासना ज्याला नाहीत. रागद्वेषादि विकार ज्याला नाहीत म्हणून जन्ममरण ज्याला नाही. असा सर्व स्वतंत्र असलेला परमात्मा, त्याने मला प्रेमाने आलिंगन दिलेलं आहे. त्याच्या पत्नीने मला वारा घातला. किती सेवा केली माझी? याची लाज वाटली सुदामाजींना. अरे, अरे, मी आलो नसतो तर बरं झालं असतं म्हणाले. काय हे, देवाने माझ्याकरता इतके कष्ट सोसले.
स्वर्गापवर्गयोः पुंसां रसायां भुवि संपदाम् ।
सर्वासाम् अपि सिद्धीनां मूलं तच्चरणार्चनम् ।।
10.81.19 ।। श्री. भा.
सुदामाजी सिद्धांत सांगताहेत. स्वर्ग किंवा मोक्ष याला मूल कारण म्हणजे भगवंतांची सेवा आहे. स्वर्गही मिळेल, पाहिजे असेल तर मोक्षही मिळेल. रसातलामध्ये, भूमीमध्ये ज्या संपत्ती आहेत त्या संपत्ती, सर्व सिद्धी ह्याला मूल कारण म्हणजे भगवंतांची सेवा ही आहे. हा सिद्धांत मनामध्ये पक्का आहे म्हणून याचना नाही, वासना नाही काही नाही. देवाने मला द्रव्य दिलं नाही हे चांगलंच आहे. त्यात देवाचा काही हेतू आहे, हाच विचार आहे, निघायच्या वेळीही!
अयं हि परमो लाभो उत्तमश्लोकदर्शनम् ।।
10.80.12 ।। श्री. भा.
हेच विचार करून सुदामाजी निघालेले आहेत. भगवंतांचं श्रीहरीचं दर्शन मला होणार आहे हाच मोठा लाभ आहे. संपत्ती काय करायचीय? मला द्रव्य दिलं नाही गोपालकृष्णांनी याचं कारण आहे म्हणाले.
अधनोऽयं धनं प्राप्य माद्यन् उच्चैः न मां स्मरेत् ।
इति कारुणिको नूनं धनं मेऽभूरि नाददात् ।।
10.81.20 ।। श्री. भा.
हा जन्मदरिद्री ब्राह्मण, याला जर धन मिळालं तर हा उन्मत्त होईल. निर्वासन अंतःकरण ज्याचं झालेलं आहे त्याच्या मनामध्ये वासना निर्माण करावी लागेल. होईल म्हणाले, या धन देण्याने. याला वासना निर्माण होऊ नये असाच प्रयत्न करायला पाहिजे, याला दरिद्रीच ठेवला पाहिजे. सुदामाजी याला देवाची दया समजताहेत. इतका मी मित्र जवळचा असून देवाने मला काही
दिलं नाही असं मनात सुद्धा आलं नाही. पण देव दयाळू आहे. माझी चित्तवृत्ती, मनोवृत्ती शुद्ध राहावी याकरता मला देवाने धन दिलं नाही. असेच विचार सुदामाजींच्या मनात आहेत. भगवान श्रीहरीची अशीच कृपा माझ्यावर असावी. बायकोने ज्या कामाकरता पाठवलं होतं, म्हणाली, तुम्हाला धन मिळेल, मागायला नको. देव दयाळू आहे, उदार आहे. पण धन मिळालं नाही म्हणून बरं झालं, देवाची दया आहे असं समजूनच सुदामाजी घरी आलेले आहेत. घरी गेल्यावर आता बायको मला बोलणार आणि त्या कृष्णालाही बोलणार म्हणाले. तुम्ही मागितलं नाही तरी त्याला द्यायला काय होतं? असं म्हणेल. तुकाराममहाराजांची पत्नी जिजाई म्हणायची, "तुम्ही सगळा संसार टाकून दिलात आणि तुमच्या त्या विठोबाने माझा संसार उध्वस्त केला.'' पांडुरंगाचीही निंदा करायची. क्षणभर असं वाटायचं सुदामाजींना परंतु पुन्हा आपल्याला श्रीहरीचं दर्शन झालेलं आहे. आपल्याला पुन्हा मोह होऊ नये याची योजना देवाने केली हीच मोठी कृपा त्याची आहे हाच विचार मनामध्ये स्थिर आहे. आपल्या गावाजवळ आले आणि पाहताहेत तर द्वारकेप्रमाणे मोठेमोठे वाडे आहेत, नोकरचाकर हिंडताहेत, सगळी समृद्धी आहे. कुणाची जागा आहे ही म्हणाले, कुठं आलो मी? का पुन्हा चुकून द्वारकेला आलो काय म्हणाले. त्यांच्या स्त्रीची नजर त्यांच्यावर गेली. सगळे नोकर चाकर वाद्य वाजवताहेत. सुदामाजींना नेण्याकरता ते आले. ती पत्नी पतिव्रता स्त्री घरातून बाहेर आलेली आहे. साक्षात लक्ष्मीप्रमाणे रूप आहे तिचं. नेत्रातून प्रेमाश्रू वाहताहेत. आपल्या पतीला तिने नमस्कार केला. देवीप्रमाणे अनेक अलंकार तिने शरीरावर धारण केले आहेत, एवढंच नव्हे तर तिच्या अनेक दासींच्या अंगावरही अलंकार आहेत. सुदामाजींनी पाहिलं आणि तिच्या आग्रहाने ते आपल्या वाड्यामध्ये येऊन पोहोचले.
मणिस्तंभशतैरुपेते माहेन्द्रभवनं यथा ।।
10.81.28 ।। श्री. भा.
शेकडो रत्नखचित खांब त्याठिकाणी आहेत. इंद्राचाच जणू महाल आहे. मोठेमोठे पलंग आहेत, शुभ्र आच्छादनं त्यावर घातलेली आहेत. सुवर्णाची आसनं आहेत. चामरं आहेत. असं ते सर्व सामर्थ्य त्यांच्या दृष्टीला पडलं. रत्नांचे दीप लावलेले आहेत. ही सर्व समृद्धी सुदामाजींनी पाहिली. अहेतुक आहे. भक्ताच्या मनामध्ये कामना उत्पन्न व्हावी म्हणून देवाने हे दिलं असंही नाही. काहीच हेतू नाही. ही जी एकदम समृद्धी उत्पन्न झाली याचं कारण काय आहे असा सुदामाजी विचार करताहेत.
तो जो महाविभूतिरूप असलेला परमात्मा त्याच्या कृपादृष्टीशिवाय दुसरं याचं काहीही कारण नाहीये. मी इतका दरिद्री आहे, दुर्दैवी आहे. असं असताना एकदम एवढी समृद्धी मिळण्याचं काय कारण आहे? सुदामाजींचं आचरण जे चाललेलं आहे, ते ईश्वरार्पण बुद्धीने चाललेलं आहे. कर्तृत्व अभिमान नाही. केवळ ईश्वराज्ञा म्हणून धर्माचरण चाललेलं आहे. त्यामुळे धर्माचाही अभिमान नाही. धर्म नाही, अर्थ, काम तर नाहीच नाही. अकिंचन आहेत सुदामाजी. कृष्णप्रेम तेवढं अंतःकरणामध्ये आहे. काही बोलला नाही म्हणाले तो यदुनाथ. न सांगता एकदम एवढं सगळं देऊन टाकलं.
ईश्वरस्तु पर्जन्यवत् द्रष्टिव्यः ।।
आचार्यमहाराज सांगताहेत. पर्जन्य पडल्यानंतर ज्याप्रमाणे सगळीकडे धान्य समृद्धी होऊन जाते तशी ईश्वराची कृपा झाली की ती भरभरून होते. असा दाता आहे भगवान. भक्ताने थोडी जरी सेवा केली तरी पुष्कळ त्याला वाटते. मी नेलेले पोहे, एक मूठच त्याने स्वतः घेऊन खाल्ले म्हणाले. सुदामाजी प्रार्थना करताहेत,
तस्यैव मे सौहृदसख्यमैत्री
दास्यं पुनर्जन्मनि जन्मनि स्यात् ।
महानुभावेन गुणालयेन
विषज्जतः तत्पुरुषप्रसंगः ।।
10.81.36 ।। श्री. भा.
असा जो अत्यंत भक्तवत्सल परमात्मा आहे त्याचीच मैत्री, त्याचंमच दास्य मला प्रत्येक जन्मामध्ये व्हावं. जन्ममरणातून मुक्त व्हावं असं नाहीये. 'तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी'. सुदामाजी तसंच म्हणताहेत. येऊ दे गर्भवास येऊ दे, पुनर्जन्म येऊ दे. परंतु त्या जन्मामध्ये त्याचंमच दास्य मला मिळावं. त्याची भक्ती मला मिळावी एवढीच इच्छा आहे. सर्व गुणांनी समृद्ध अशा प्रकारचा अनंत गुण संपन्न परमात्मा त्याची संगती मिळाली, त्याचं स्मरण झालं म्हणजे त्याच्या भक्तांची संगती होईल. भगवान आपल्या भक्ताला असं ऐश्वर्य देत नाही म्हणाले. भक्ताची बुद्धी बिघडण्याचा संभव आहे. धनिक लोकांचा मदामुळे अधःपात कसा होतो आहे हे पाहूनसुद्धा मला संपत्ती कशी देईल? भीती वाटली सुदामाजींना आणि म्हणून हे दास्य मागितलेलं आहे. हा
मला मिळालेलं दास्य कायम राहावं, अशी इच्छा आहे. मला मिळालेलं ऐश्वर्य कायम राहावं अशी इच्छा नाहीये, याच्यापेक्षा जास्त मिळण्यामध्ये देवाची कृपा नाहीये हे समजत नाही. भगवंताचं स्मरण अखंड राहिलं पाहिजे, पुन्हा जन्म आला तरी चालेल असा पूर्ण विचार सुदामाजींचा आहे. मुक्तीची इच्छा नाही. कर्मक्षय व्हावा अशीही इच्छा नाही. तो समर्थ आहे आणि हाच सिद्धांत आहे. कोणत्याही तपाने, यज्ञयागाने, अध्ययनाने परमात्मा प्राप्त होत नाही.
यमेव एषः वृणुते स तेन लभ्यः ।।
भगवंताची कृपादृष्टी ज्याच्यावर पडली त्यालाच भगवंताची प्राप्ती होते, इतरांना प्रयत्नाने होत नाही. त्यानेच माझा अंगिकार केला. ज्यांचा भगवंताने अंगिकार केला त्यांचं पूर्ण कल्याण झालेलं आहे.
अंगिकार ज्यांचा केला नारायणे ।
निंद्य तेही तेणे वंद्य केले ।।
तुकाराम महाराज सांगताहेत, अजामेळ काय, कान्होपात्रा गणिका काय, सगळ्यांचा अंगिकार देवाने केलेला आहे. ते वंद्य झालेले आहेत. हेच समाधान आहे. समृद्धी पुष्कळ आहे, पंचपक्वान्नाचं रोज जेवण मिळतं आहे. उत्तम प्रकारची वस्त्रं धारण करायला मिळताहेत. दागदागिने मिळताहेत. परंतु जाणीव पाहिजे
तेन त्यक्तेन भुञ्जीथाः ।। ईशावास्योपनिषद्
हे सर्व ईश्वराचं आहे. सगळंच ईश्वररूप आहे. हा त्याग मनातून आहे, बाहेरून परेच्छा प्रारब्ध आहे. स्त्रीची इच्छा आहे. मुलांची इच्छा आहे. मित्रांची इच्छा आहे. जाऊन बसताहेत, पंक्तीमधे भोजन करताहेत. पण ही सर्व समृद्धी त्या यदुनाथाची आहे ही निरंतर जाणीव सुदामाजींच्या चित्तामध्ये आहे. याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांची पराभक्ती सुदामाजींना मिळालेली आहे. आणि हेच त्यांचं परभाग्य आहे आणि ईश्वराची कृपा आहे. ईश्वराचा परममित्र. परमात्मा अजित असूनसुद्धा सेवकाने त्याचा पराजय केला याचा भगवंताला आनंद वाटतो आहे. भक्ताने पराजय करावा असं वाटतं. त्या भगवंताचं अखंड ध्यान चाललेलं आहे. मिळालेल्या समृद्धीचा मनावर काहीही परिणाम नाही. अहंकारादिक दोष असलेले परमेश्वराच्या कृपेने दूर होतात. यांना तर पहिल्यापासून अहंकार नाहीच आहे. समृद्धी नव्हती तेव्हादेखील समचित्त होते आणि आता समृद्धी मिळाली तरी समचित्त आहेत. सुख मला मिळालं म्हणजे आनंद आहे असं समजणं म्हणजे सुद्धा तो विकार आहे.
दुःखेषु अनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ।।
2.56 ।। भ. गीता
सुख मिळायला लागल्यानंतर जास्तीत जास्त वासना मनामध्ये उत्पन्न होतात.
सुखात् अनुविवर्धते ।।
आचार्य सांगतात, अग्नीमध्ये काष्ठ टाकल्यानंतर अग्नी प्रदीप्त होतो आहे. त्याप्रमाणे सुखाची प्राप्ती झाल्याबरोबर माणसाच्या वासना अधिकाधिक वाढताहेत, पण हा जो ज्ञानी महात्मा आहे, भक्त त्याला असं वाटत नाही की हे सुख जास्ती लाभावं, वाढावं. अशी वृत्ती सुदामाजींना मिळालेली आहे ही ईश्वराची कृपा आहे. घरातल्या पतिव्रता स्त्रीच्या मनाप्रमाणे देवाने दिलं, तिच्याही मनाचं समाधान झालं, बरं झालं म्हणाले. तीही योग्य होती तिला तरी जन्मभर दुःख कशाकरता व्हायला पाहिजे. पण म्हणून ते काही घरदार सोडून गेले नाहीत.
शुक्राचार्य सांगतात, राजन, सूर्यग्रहणाचा पर्वकाल एकदा आलेला आहे. समंतपंचक क्षेत्रामध्ये भारतातली बरीच मंडळी जमलेली आहेत. सूर्यग्रहण लागल्यानंतर सर्वांनी स्नान केलं, जपजाप्य केलं. ग्रहण सुटल्यावरही सर्वांनी स्नान, दान वगैरे केलं. सर्वांचं भोजन झालं. सगळ्यांच्या भेटी झाल्या. पांडवांची भेट झाली. सर्वांना घेऊन आले होते भगवान. तो अनिरुद्ध तेवढा राहिला होता द्वारकेच्या रक्षणाकरता. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, धृतराष्ट्र, गांधारी, दुर्योधनादिक कौरव सगळे तिथे जमलेले आहेत. श्रीकृष्णांच्या स्त्रिया बसलेल्या आहेत. द्रौपदी, सुभद्रा, कुंतीही बसलेल्या आहेत. त्यांचं बोलणं चाललेलं आहे. गोकुळातून नंद, यशोदा, गोपी सगळे तिथे आलेले होते. आणि भगवान श्रीकृष्णांचं दर्शन त्यांना झालेलं आहे. भगवंताने नंद यशोदेला अभिवादन केलं. नेत्रातून प्रेमाश्रू वाहताहेत. काही बोलले नाहीत. भगवान सांगताहेत, "यशोदामाते, काय तुम्ही आमच्यावर प्रेम केलं. तुमचं प्रेम आम्ही विसरू शकत नाही. मातापित्यांना सोडून आम्हाला तुमच्यापाशी यावं लागलं. प्रसंगच तसा होता. परंतु तुम्ही आपल्या देहापेक्षा जास्ती प्रेम आमच्यावर केलं. आमचं संरक्षण केलं." त्या गोपींना जाऊन भेटले गोपालकृष्ण. गोकुळामध्ये आत्तापर्यंत एकदासुद्धा गेले नव्हते. संदेश पाठवताहेत, उद्धवजींना पाठवताहेत. त्याही तशाच राहिलेल्या आहेत. श्रीकृष्ण आलेले आहेत हे कळल्यानंतर अत्यंत आनंद झाला. कृष्णदर्शन झालं. अत्यंत सौंदर्यसंपन्न आहेत श्रीकृष्ण. डोळे सारखे उघडे राहावेत असं त्यांना वाटतंय. भगवंतांनी त्यांची भेट घेतली, कुशल प्रश्न विचारले आणि बोलायला लागले,
अपि स्मरथ नः सख्यः स्वानां अर्थचिकीर्षया ।
गतान्श्चिरायितान् शत्रु पक्षक्षपणचेतसः ।।
10.82.42 ।। श्री. भा.
गोपींनो आमची आठवण तुम्हाला होते का नाही? आम्हाला आठवण नाही असं तुम्ही म्हणणं योग्य आहे. कारण काय आहे इतकी कार्य उत्पन्न झाली आहेत. अनेक शत्रू निर्माण होताहेत. त्यांचा नाश करणं, सर्व व्यवस्था करणं यामुळे मला येणं झालं नाही. सर्व एकंदर प्रेमी मंडळींना परमेश्वरच एकत्र आणतो आणि पुन्हा त्यांचा वियोग करतो. ही परमेश्वराची शक्ती आहे. माझी भक्ती, प्रेम तुमच्या अंतःकरणामध्ये आहे हे मोक्षाचं साधन आहे." असं थोडसं तत्वज्ञानात्मक सांगितलं. ईश्वरेच्छेने सर्व चाललेलं आहे. गोपींच्या मनाचं समाधान झालं आणि त्यांनी शेवटी भगवंताला एवढीच प्रार्थना केली,
आहुश्च ते नलिननाभ पदारविन्दं
योगेश्वरैर्हृदि विचिन्त्यमगाधबोधैः ।
संसारकूपपतितोत्तरणावलम्बं
गेहंजुषामपि मनस्युदियात् सदा नः ।।
10.82.49 ।। श्री. भा.
"भगवन, मोठे मोठे योगेश्वर ऋषी ज्यांच्याजवळ पुष्कळ ज्ञान आहे, योगशक्ती आहे तेही निरंतर आपलं ध्यान करताहेत. संसारकूपामध्ये पडलेल्या जीवांना वर काढणारे आपले चरण समर्थ आहेत. ते आपले चरण आमच्या चित्तामध्ये अखंड राहू दे. आम्हाला काही कुठं जाता येणार नाही. आपलं स्वरूप आमच्या चित्तामध्ये नेहमी राहू दे. एवढीच इच्छा आहे."
सर्व स्त्रिया तेथे जमलेल्या आहेत. कौरवांच्या, पांडवांच्या, कृष्णपत्नी सगळ्या तिथं आहेत. द्रौपदी विचारतीये कृष्णपत्नींना, "भगवान श्रीकृष्णांचा विवाह तुमच्याबरोबर कसा झाला? तुमचं पाणिग्रहण श्रीकृष्णांनी कसं केले ते आम्हाला सांगा". रुक्मिणी सांगतीये.
चैत्याय माऽर्पयितुमुद्यतकार्मुकेषु
राजस्वजेयभटशेख रितांग्रिरेणुः ।
निन्ये मृगेन्द्र इव भागमजावियूथात्
तच्छ्रीनिकेतचरणो अस्तु ममार्चनाय ।।
10.83.8 ।। श्री. भा.
शिशुपालाला मला द्यायचं ठरलं. ते सिद्ध होण्याकरता सर्व राजेलोक सैन्य घेऊन आले.