कृष्णांना नेऊ द्यायची नाही रुक्मिणी. मोठे मोठे अजिंक्य राजे होते. परंतु भगवान श्रीकृष्णांनी सिंहाने जशी कळपातून एखादी शेळी न्यावी तसं माझं हरण केलं. असा श्रीहरी परमात्मा, त्याच्या चरणाची पूजा, अर्चा, ध्यान निरंतर घडावं एवढी माझी इच्छा आहे. सत्यभामेने सांगितलं, जांबवतीने सांगितलं. शेवटी नरकासुराच्या कारागृहातून आणलेल्या राजकन्यांनी सांगितलं. "देवी द्रौपदी, नरकासुराचा नाश करून निराधार असलेल्या आम्हाला घेऊन गोपालकृष्ण द्वारकेला आले. आणि आमच्याबरोबर विवाह करून त्यांनी आम्हाला आधार दिला. आता आमची काही इच्छा नाही. आम्हाला साम्राज्य नको, ब्रह्मलोक नको. वैकुंठलोकात जाण्याची सुद्धा आम्हाला इच्छा नाही.
कामयामहे एतस्य श्रीमत्पादरजः श्रियः ।
कुचकुंकुमगंधाढ्यं मूर्ध्ना वोढुं गदाभृतः ।।
10.83.42 ।। श्री. भा.
भगवान श्रीहरीचे चरणकमल ज्यांना चंदन लावलेले आहेत, ते आमच्या चित्तामध्ये नेहमी राहावेत. सुगंधित असे ते चरणांचे रजःकण आमच्या केसामध्ये पडावेत एवढीच आमची इच्छा आहे.
त्याठिकाणी वसिष्ठादि, परशुराम सर्व ऋषीमंडळीही आली होती. ती ऋषीमंडळी येताच भगवान उठून उभे राहिले. नमस्कार त्या सर्वांना केला. यथाविधी पूजा केली आणि बसलेली आहे मंडळी सगळी. आणि भगवान बोलायला लागले.
अहो वयं जन्मभृतो लब्धं कार्त्स्न्येन तत्फलम् ।
देवानामपि दुष्प्रापं यद् योगेश्वरदर्शनम् ।।
10.84.9 ।। श्री. भा.
"आज आम्हाला मनुष्यजन्म मिळाल्याचं सार्थक झालं असं वाटतं. देवांनासुद्धा आपल्यासारख्या योगेश्वरांचं दर्शन दुर्लभ आहे ते आम्हाला मिळालं. काय मानवांचं पुण्य किती असणार? अल्प तप आहे, अल्प पुण्य आहे. जलरूप असलेली तीर्थ किंवा शिलारूप असलेले देव ते सुद्धा पूजा करणाऱ्याला, सेवा करणाऱ्याला पवित्र करतात पण त्याला फार काल लागतो.
दर्शनादेव साधवः ।।
10.84.11 ।। श्री. भा.
आपल्यासारखे पुण्यशील महात्मे दर्शन झाल्याबरोबर पवित्र करतात. अशी मोठी पुण्याई आमची म्हणून आपलं दर्शन झालं." गोपालकृष्णांची वाणी ऐकली सर्व ऋषीमंडळींनी. ते विचार करू लागले. आम्ही यांच्या दर्शनाकरता आलो परमेश्वर म्हणून, आणि हे स्वतः आपल्याकडे
कमीपणा घेतात आणि आम्हालाच मोठेपणा देतात. हा सगळा लोकसंग्रह आहे. लोकांना मार्गदर्शन करण्याकरता आहे. ऋषीमंडळी सांगताहेत, "देवा, आपल्या मायेच्या मोहामध्ये मोठेमोठे ज्ञानीसुद्धा पडतात. आपली मायाशक्ती फार मोठी आहे. आपल्या भक्तांच्या रक्षणाकरता आपण हे सात्विक शरीर धारण करून आलेला आहात. या सनातन वेदमार्गाचं, धर्ममार्गाचं संरक्षण करण्याकरता आपण आलेला आहात. आमचा सन्मान आपण करता हे लोकसंग्रहाच्या दृष्टीने आहे असं आम्ही मानतो. आज आमचाच जन्म सफल झाला, आमची विद्या सफल झालेली आहे." अशी ऋषीमंडळींनीही स्तुती केली आणि निघाले आपल्या आश्रमात जायला. वसुदेव हे ऋषीमंडळींसमोर आले, नमस्कार केला.
कर्मणा कर्मनिर्हारो यथा स्यान्नस्तदुच्यताम् ।।
10.84.29 ।। श्री. भा.
आणि विचारताहेत, "ऋषीमहाराज, या कर्मबंधनातून मुक्त होण्याकरता मी कोणतं साधन करावं याचं मार्गदर्शन आपण करा." सगळी ऋषीमंडळी आश्चर्यचकित झाली. ज्याचा पुत्र म्हणून साक्षात वैकुंठपती जवळ राहतो आहे आणि हा आम्हाला विचारतो आहे? संसारातून मुक्त होण्याचं साधन कोणतं? नारद म्हणाले सांगा त्याला काही.
कृष्णं मत्वा अर्भकं यन्नः पृच्छति श्रेय आत्मनः ।।
10.84.30 ।। श्री. भा.
कृष्णाबद्दल याची काय भावना आहे? तुम्हाला विचारतोय कारण कृष्ण हा आपला मुलगा आहे. असं तो समजतोय, त्याला काय विचारायचंय. सन्निकर्ष आहे. गोपींना लांब ठेवलं भगवंताने याचं कारण हे आहे. वसुदेवाच्या मनामध्ये कृष्ण हा आपला मुलगा आहे ही भावना आहे, नारदांनी स्पष्टपणे सांगितलं. कृष्ण भगवान आहे, परमेश्वर आहे, सर्व काम पूर्ण करणारा आहे, भक्तवत्सल आहे, ही भावना गोपींच्या मनात आहे. नारद म्हणाले सांगा काहीतरी. त्याचं समाधान करा. ऋषीमंडळी म्हणाली, "वसुदेवा, जन्माला आलेल्या माणसाला तीन ऋणं असतात. देवांचं ऋण, ऋषींचं ऋण, आणि पितरांचं ऋण. या तीन ऋणातून मुक्त झाल्याशिवाय मोक्षमार्गाकडे जाता येत नाही. मध्येच प्रतिबंध होतो. विप्र संन्यास घेऊन निघाला म्हणजे 'देवादारदिरूपिणः' विघ्न येतात स्त्री-पुत्र रूपाने. अध्ययन केल्यामुळे ऋषीऋणातून तू मुक्त झालास. संतती झाल्यामुळे पितरांच्या ऋणातून तू मुक्त झालास. पण देव ऋण राहिलेलं आहे. यज्ञ केले पाहिजेत. हा मार्ग आहे. वास्तविक वसुदेवा, तुला कसलंच बंधन नाही. तुला कुठलं ऋण आहे? पूर्ण ऋणमुक्त तू आहेस. जगदीश्वर परमात्मा हा तुझा पुत्र झालेला आहे. कशाला कर्माकडे जातोस?" वसुदेवाने
त्या ऋषींना थांबायला सांगितलं आणि माझ्याकडून यज्ञ करवूनच जा असं म्हणाला. थांबले ऋषी. अनेक प्रकारचे यज्ञ उत्तमपणे ऋषींनी त्याच्याकडून करविले. दानधर्म पुष्कळ झाला. अवभृथ स्नान करून सर्व ऋषीमंडळी आपापल्या आश्रमाकडे निघून गेली. इतर सर्व मंडळीही कौरव, पांडव आपापल्या नगराकडे निघून गेली. वसुदेवाच्या मनाचंही समाधान झालेलं आहे. सर्वांच्या भेटीही झाल्या आणि यज्ञही झाले.
अथैकदा आत्मजौ प्राप्तौ कृतपादाभिवन्दनौ ।
वसुदेवो अभिनंद्याह प्रीत्या संकर्षणच्युतौ ।।
10.85.1 ।। श्री. भा.
रोज सभेमध्ये जाताना बलराम-कृष्णांनी वसुदेव-देवकीला वंदन करावं. एके दिवशी नित्यप्रमाणे बलराम आणि कृष्ण वसुदेव-देवकीच्या दर्शनाला आलेले असताना वसुदेवाला त्या ऋषींच्या भाषणाची आठवण झाली. नारद म्हणाले होते, 'परब्रह्म परमात्मा त्याला हा आपला मुलगा समजतोय?' ते स्मरण झालं. आणि वसुदेव म्हणतोय,
कृष्ण कृष्ण महायोगिन् संकर्षण सनातन ।
जाने वां अस्य यत् साक्षात् प्रधानपुरुषात् परौ ।।
10.85.3 ।। श्री. भा.
आपण साक्षात जगदीश्वर आहात हे मला ऋषींच्याकडून समजलं आहे. सर्व विश्व आपणच उत्पन्न केलं. आपणच त्याचं संरक्षण करता आणि पुन्हा उपसंहार करता. जगामध्ये जेवढं दिव्य स्वरूप आहे ते आपलंच स्वरूप आहे. विभूतीरूप आहे. सर्व भूतांचे नियामक आपण आहात. ही दृष्टी मला निरंतर राहिली पाहिजे. मनुष्यजन्म आल्यानंतर पुन्हा जर या संसारात मन गुंतून राहिलं तर आपल्या स्वरूपाचं, शक्तीचं ज्ञान होणं कठीण आहे. अहंता आणि ममता या पाशामध्ये सर्व जगत बद्ध झालेलं आहे. तुम्ही माझे पुत्र नाही आहात. प्रधानपुरुषाचे आपण नियामक आहात. भूभार हरण करण्याकरता आपण याठिकाणी अवतार घेऊन आलेला आहात. मी आपल्याला शरण आलेलो आहे. संसाराची मला फार भीती वाटते आहे. यातून मला मुक्त करा. आपण माझे पुत्र आहात ही बुद्धी पुढं मला केव्हाही होऊ नये अशी कृपा करा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, "पिताजी, आपली विचारसरणी उत्तम आहे. आम्हाला मुलांना उद्देशून तुम्ही भाषण केलं की, तुम्ही ईश्वरच आहात." आमच्यापुरतीच एवढी बुद्धी ठेवू नका. संपूर्ण विश्व हे ईश्वराचं स्वरूप आहे. मी, तुम्ही, हे बलरामजी, हे सगळे द्वारकावासी सर्वही ईश्वररूप आहेत, ही दृष्टी ठेवा. म्हणजे हा "नानात्वकभेदभ्रम" जो आहे तो दूर होईल." भगवंताने वसुदेवाला मार्गदर्शन करून त्याच
समाधान केलं.
देवकी एके दिवशी भगवंताला म्हणाली, "देवा, सांदीपनी गुरुमहाराजांना त्यांचा मेलेला पुत्र तुम्ही आणून दिलाय असं मी ऐकलंय. माझी जी मुलं त्या कंसाने मारलेली त्यांना पाहण्याची माझी इच्छा आहे. तेवढी मला दाखवा." लगेच बलराम आणि कृष्ण सुतललोकामध्ये गेले. तिथं ती मुलं होती. त्याठिकाणची मुलं आणून त्यांनी देवकीला दिली. तिला अत्यंत आनंद झालेला आहे. पुन्हा ती मुलं सुतललोकात निघून गेली. ब्रह्मदेवांच्या शापामुळे त्यांना हा जन्म आलेला होता. अशाचरीतीने भगवंतांच्या लीला अनंत झालेल्या आहेत.
राजाने विचारलं, "महाराज, बलराम-कृष्णांची भगिनी सुभद्रा हिच्याबरोबर अर्जुनाचा विवाह झाला असं आम्ही ऐकलं. तो वृत्तांत आम्हाला सांगा." शुक्राचार्य म्हणतात, "राजा, अर्जुन हा काही प्रसंगाने तीर्थयात्रेला गेला होता. तीर्थयात्रा करता करता तो प्रभास क्षेत्रामध्ये आलेला आहे. त्याच्या कानावर बातमी आली की आपली मामेबहीण सुभद्रा ही आपल्याला द्यावी अशी कृष्णांची इच्छा आहे. वसुदेव देवकीचं मत तसंच आहे. प्रत्यक्ष सुभद्रेचीही तशीच इच्छा आहे. बलरामजींचा आग्रह आहे की दुर्योधनाला ही मुलगी द्यायची. त्या रुक्मिणीप्रमाणेच पेच निर्माण झाला. तिचा ज्येष्ठ बंधू एकटाच तिच्याविरुद्ध होता. इथेही तसंच आहे. संन्यासीवेष धारण करून तो अर्जुन द्वारकेमधल्या एका मंदिरात जाऊन राहिलेला आहे. सगळ्या लोकांना आदरभाव निर्माण झाला. दर्शनाकरता हजारो लोक येऊ लागले. बलरामजींच्या कानावर ही बातमी आली की कुणी एक सत्पुरुष आलेले आहेत. त्यांना राजवाड्यात येण्याचं निमंत्रण पाठवलं. हे स्वामीमहाराज भिक्षेला गेले. ती सुभद्राच वाढायला होती. तिनेही पाहिलेलं आहे. ओळखलंही असेल. त्याचं ते स्वरूप पाहून तिला मोह निर्माण झाला. एकदा मोठी देवाची यात्रा होती. सर्व लोक दर्शनाला जायला निघाले. सुभद्राही रथामध्ये बसून दर्शनाला निघाली. स्वामीमहाराज मंदिरात असताना एका दूताने येऊन सांगितलं की तुम्हाला एक निरोप आहे. कुणाचा वगैरे काही सांगितलं नाही. ""ही वेळ आहे. सुभद्रा रथामध्ये आहे. सर्व शस्त्रास्त्र सामुग्री रथामध्ये आहे. पहा तुम्हाला सुभद्रेला यावेळेला नेका आलं तर शक्य आहे.'' अर्जुन लगेच गेला, रथामध्ये बसून धनुष्यबाण सज्ज करून त्याने सर्व सैनिकांचा पराजय केला आणि सुभद्रेला घेऊन तो गेला. बलरामजींना ही वार्ता समजली. हा खरा संन्यासी नव्हता, अर्जुन होता काय. कसा नेतो पाहू म्हणाले. रागावले बलरामजी आणि अर्जुनाबरोबर युद्ध करून सुभद्रेला परत आणायची प्रतिज्ञा त्यांनी केली. गोपालकृष्ण आले आणि त्यांनी
बलरामजींचे पाय धरले, "दादासाहेब, कुठं निघालात?" बलरामजी म्हणाले, "मलाच विचारतोस कुठं निघाला म्हणून? हे सगळं कारस्थान तुझंच आहे ना?" कृष्ण म्हणताहेत, "कुणाचं का असेना, पण वाईट काय झालं? अर्जुनाने सुभद्रा नेली म्हणून काय बिघडलं? दादासाहेब काही विचार केला तुम्ही? ही मुलगी काय तुमची आहे वाटेल त्याला द्यायला? मुलीची इच्छा काय आहे, मुलीच्या आई-बापांची इच्छा कशी आहे. बाकीच्या आप्तबांधवांची इच्छा काय आहे याचा काहीही विचार केला नाहीत. आणि दुर्योधनाला द्यायचा आग्रह करता तुम्ही? काही विचार करा. हे काही योग्य नाही.'' बलरामजी म्हणताहेत, "तुझी इच्छा पूर्ण झाली ना बाबा.'' कृष्ण म्हणताहेत, "जा, मोठेपणा घ्या तुम्ही, त्याला बोलावून आणा. आदराने लग्न करून द्या.'' प्रसंगी कसं वागावं हे दाखवताहेत भगवंत. अगदी नम्र होऊन, शरण जाऊन, क्षमा मागून आपलं काम त्यांनी करून घेतलं. लग्न झालेलं आहे. सुभद्रेला घेऊन अर्जुन इंद्रप्रस्थाला परत आलेला आहे.
गोपालकृष्णांचा एक मोठा भक्त आहे. श्रुतदेव नावाचा ब्राह्मण.
कृष्णैकभक्त्या पूर्णार्थः शान्तः कविरलंपटः ।।
10.86.13 ।। श्री. भा.
मिथिलानगरीमध्ये राहतो आहे. कृष्णभक्ती अंतःकरणात असल्यामुळे काहीही कामना नाही. अनासक्त रितीने, अयाचित वृत्तीने गृहस्थाश्रम चाललेला आहे. काहीही संग्रह नाहीये. त्या राष्ट्राचा राजा बहुलाश्व नावाचा हा ही निरहंकार आहे. मोठा भगवद्भक्त आहे. एकदा सर्व ऋषीमंडळींना घेऊन भगवान श्रीकृष्ण मिथिला नगरीमध्ये प्राप्त झाले. सर्व ऋषी बरोबर होते. नारद, वामदेव, अत्रि, परशुराम, अरुणी. शुक्राचार्यही होते. सर्व नगरवासीयांनी भगवान श्रीकृष्णांचा सत्कार केला. सर्व लोक दर्शनाला आलेले आहेत. राजा आणि श्रुतदेव ब्राह्मणही आलेले आहेत. आणि दोघांनीही निमंत्रण दिलं. राजाने सांगितलं की, ""भगवन् या सगळ्या ऋषीमंडळींना घेऊन आपण माझ्या राजवाड्यामध्ये या. माझं आतिथ्य आपण स्वीकारा.'' श्रुतदेव ब्राह्मणानेही सांगितलं की 'माझ्या वाड्यामध्ये सगळ्या ऋषीमंडळींना घेऊन' आपण या. दोघांकडेही भगवान गेले. राजाने अत्यंत आदराने सर्वांची पूजा केली. भगवंतांची स्तुति केली. सर्वांचं भोजन वगैरे झालेलं आहे. इकडे श्रुतदेव ब्राह्मणाच्या घरीही भगवान सर्व ऋषींना घेऊन आले. ऋषींना आसनावर बसवून त्यांची पूजा केली आणि काय घरात असेल फळ, मूल, जल वगैरे त्यांना अर्पण केलं. तो म्हणतोय, महाराज,
नाद्य नो दर्शनं प्राप्तः परं परमपुरुषः ।
यर्हीदं शक्तिभिः सृष्ट्वा प्रविष्टो ह्यात्मसत्तया ।।
10.86.44 ।। श्री. भा.
"देवा, आपलं दर्शन आजच झालं असं नाहीये. ज्यावेळी आपण मायाशक्तीने सर्व विश्व निर्माण केलं ते विश्वरूप दर्शन मला पूर्वीच झालेलं आहे. आज या रूपामध्येही दर्शन झालं. आपल्या लीला श्रवण करणारा, वर्णन करणारा, आपली नित्य सेवा करणारा, त्याच्यावर आपली पूर्ण कृपा असते. आपलं स्मरण सोडून नेहमी आणखी कर्मामध्येच ज्याचं चित्त गुंतलेलं आहे, त्याच्या हृदयामध्ये आपण असूनही दूर असता. सर्वांतमा आपण आहात. आमचं संरक्षण आपण करावं. आम्हाला मार्गदर्शन करावं.'' याप्रमाणे त्या श्रुतदेव ब्राह्मणाने प्रार्थना केली असताना, भगवान बोलू लागले,
ब्रह्मंस्ते अनुग्रहार्थाय संप्राप्तान् विद्ध्यमून मुनीन् ।।
10.86.51 ।। श्री. भा.
"भूदेवा, ही सगळी ऋषीमंडळी मोठी ज्ञानी, भक्त तुमच्या वाड्यामध्ये आज आलेली आहेत. तुमच्यावर अनुग्रह करण्याकरता आले आहेत. देव, तीर्थे पवित्र करतात पण त्याला वेळ लागतो.
ब्राह्मणः जन्मना श्रेयान् सर्वेषां प्राणिनामिह ।
तपसा विद्यया तुष्ट्या किमु मत्कलया युतः ।।
10.86.53 ।। श्री. भा.
जन्मतःच ब्राह्मण श्रेष्ठ आहे. मग ज्याने तपश्चर्या केली, ज्ञान मिळवलेलं आहे, संतोष वृत्तीने जो राहतो आहे. आणि ज्याच्या चित्तामध्ये माझा निरंतर निवास आहे, तो किती श्रेष्ठ असेल, ब्राह्मणांपेक्षा माझं हे चतुर्भुज रूपही मला प्रिय नाहीये. सर्व वेदरूप ब्राह्मण आहेत. हे कोणाला समजत नाही. संपूर्ण चराचर विश्व हे माझंच रूप आहे. तेव्हा श्रुतदेवा, हे ब्रह्मर्षि म्हणजे माझंच रूप आहे अशा श्रद्धेने त्यांची पूजा आपण करा म्हणजे माझी पूजा झाल्यासारखीच आहे. त्याप्रमाणे श्रुतदेवांने सर्वांची पूजा केली. भगवंताने श्रुव्तदेवाची आणि बहुलाश्व राजाची भक्ती जाणून, सर्व वेदांचं सार काय आहे, तात्पर्य काय आहे याचा उपदेश त्यांना केला. परब्रह्म, परमात्म्याचंच वर्णन सर्व वेदांनी केलेलं आहे.
सर्व शास्त्रांनी हाच परमात्मा वर्णिलेला आहे. हे ऐकून घेतलं परीक्षित राजाने.
ब्रह्मन् ब्रह्मण्यनिर्देश्ये निर्गुणे गुणवृत्तयः ।
कथं चरन्ति श्रुतयः साक्षात् सदसतः परे ।।
10.87.1 ।। श्री. भा.
मोठा जिज्ञासू राजा आहे. मनाने निर्मळ आहे. तो विचारतोय, "वेदांनीच परमात्म्याचं ज्ञान होतं, सर्व वेदांचं पर्यवसान परब्रह्मामध्येच आहे हे आपण कसं सांगितलंत महाराज?'' प्रत्यक्ष प्रमाणाला आकार लागतो. बाकीची सहयोगी कारणं तेज, संयोगादि ती लागतात. हा निराकार निर्गुण परमात्मा आहे त्याचं वर्णन करायला प्रत्यक्ष प्रमाण असमर्थ आहे. अनुमान प्रमाणाचंही तसंच आहे. अनुमान प्रमाणही ईश्वराचं वर्णन करायला असमर्थ आहे. फक्त वेदप्रमाणच आत्मरूपाचं ज्ञान करून देतं असं आपण म्हणालात. पण ते तरी निर्गुण निराकार परमात्म्याचं ज्ञान कसं करून देणार? परमात्मा कसा आहे? शब्दाने सांगता येत नाही.
आद्य आहे म्हणून संबोधन केलेलं आहे, आद्या म्हणजे अनुमान प्रमाण सुचवलेलं असावं त्यांनी. सर्वांचं कारण आहे ना हा. म्हणजे कार्यावरून त्या कारणाचं ज्ञान होण्याकरता प्रयत्न करता येईल. पण समजणार नाही. दुसरं प्रमाण "वेदप्रतिपाद्या" म्हणून ज्ञानेश्वरमहाराज म्हणताहेत. वेदांनीच त्याचं प्रतिपादन केलेलं आहे. त्याबद्दल राजाची शंका आहे. निर्गुण आणि शब्दांनी ज्याचं प्रतिपादन करता येत नाही असा परमात्मा आहे. प्रत्यक्ष प्रमाणापेक्षा शब्दप्रमाण हे अधिक व्यापक आहे, कबूल आहे. वर्तमानकाळातला आपल्यासमोर असलेला पदार्थच फक्त इंद्रियांनी समजू शकतो. वर्तमानकाळात सर्वही पदार्थांचे ज्ञान डोळ्याने होत नाही. शब्दप्रमाणाने वर्तमान, भूत आणि भविष्यकाळातील सर्वही पदार्थांचं ज्ञान होऊ शकतं परंतु ते शब्दप्रमाण मोठं आहे, परंतु,
कोणता तरी जातिवाचक शब्द असल्याशिवाय बोध होत नाही. हा ब्राह्मण आहे, हा क्षत्रिय आहे. कोणत्या तरी क्रियेप्रमाणे, हा पाचक आहे, हा गायक आहे. त्या त्या क्रियेच्या द्वाराने शब्दापासून बोध होतो. संज्ञा शब्द काही असतात. काही गुणवाचक शब्द असतात, हा काळा आहे, हा गोरा आहे. अशा गुणांच्याद्वारा बोध करून देणारा शब्द आहे. ज्याच्याजवळ गुण नाहीत, क्रिया
नाही, जातिवाचक संज्ञा नाही अशा परमात्म्याचं ज्ञान शब्दाने कसं होतं हा राजाचा प्रश्न आहे. परमात्मा हा कार्यकारणाच्या पलिकडे आहे. शुक्राचार्य सांगतात, "राजा, शाखाचंद्रन्याय आहे बाबा, इंद्रिये आहेत, बुद्धी आहे. ही सगळी साधनं परमेश्वराने आपल्या स्वरूपाचं ज्ञान करून घेण्याकरताच दिलेली आहेत. सगुणाचंमच ज्ञान अगोदर करून घ्यायचंय. अध्यारोप का असेना. आणि नंतर निर्गुणामध्ये बुद्धी जाऊ शकते. याबद्दल तुला पूर्वी घडलेला एक इतिहास सांगतो. नारद महर्षी एकदा नरनारायणांच्या दर्शनाकरता बद्रिकाश्रमात गेले होते. त्याठिकाणी नारदांनी हाच प्रश्न विचारला, 'निर्गुण, निराकार, निष्क्रिय अशा परमात्म्याचं ज्ञान शब्दाने कसं होतं!' आप्तवाक्य म्हणा, वेद अपौरुषेय आहेत, स्वयंभू आहेत परंतु प्रमाण श्रेष्ठ आहे ठीक आहे पण असमर्थ आहे ना! वाचस्पतिमिनांनी परमात्म्याचं ज्ञान बुद्धीने होतं असं सांगितलं, उपनिषदांच्या संदर्भानेच सांगितलं.
असं सांगतात. श्रेष्ठ, निर्मळ बुद्धी झाल्यानंतर परमात्म्याचं ज्ञान होतं. पण इथे भगवंतानी उपदेश केला की सर्व वेदांचं पर्यवसान परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी आहे. म्हणजे वेदांनीच परमात्मा समजतो. वेदव्यासाही शास्त्रयोनित्वात् सावधारणं सांगताहेत. शास्त्रमेव योनिः प्रमाणं यस्य त्याबद्दल राजाचा प्रश्न आहे. नारदांनी विचारल्यानंतर भगवान नारायण म्हणाले, "बाबा, पूर्वी एकदा जनलोकामध्ये सर्व ऋषीमंडळी एकत्र बसलेली होती. आणि त्यांचा ब्रह्मविचार चाललेला आहे. तुम्ही श्वेतद्वीपामध्ये अनिरुद्ध दर्शनाकरता गेला होतात म्हणून तुम्ही त्या सभेमध्ये नव्हता. श्रुतीनी ब्रह्माचं ज्ञान कसं होतं? दुसरं कोणतंही प्रमाण नाहीये. सनंदनांना सर्वांनी वक्ता म्हणून बसवलं आणि बाकी सर्व श्रोता म्हणून ऐकताहेत. सनंदनांनी बोलायला सुरुवात केली,
स्वसृष्टमिदमापीय शयानं सह शक्तिभिः ।
तदन्ते बोधयांचक्रुः स्तुतिभिः श्रुतयः परम् ।।
10.87.12 ।। श्री. भा.
यथा शयानं सम्राजं वन्दिनस्तत्पराक्रमैः ।
प्रत्यूषेऽभ्येत्य सुश्लोकैः बोधयन्त्यनुजीविनः ।।
10.87.13 ।। श्री. भा.
श्रुतीने परमेश्वराचं प्रतिपादन कसं केलेलं आहे हे सांगताहेत. प्रलय झालेला आहे. सृष्टीचा उपसंहार केलेला आहे आणि भगवान योगनिद्रेमध्ये निमग्न आहेत. मन स्थिर करून राहिलेले आहेत. ईक्षण नाही, संकल्प नाही अशी स्थिती म्हणजे निद्रा आहे. प्रलयकाल संपला, सर्व श्रुती
त्यांना जागृत करण्याचा प्रयत्न करतात. स्तुती करताहेत.
जय जय जहि अजाम् अजित दोषगृभीतगुणाम्
त्वमसि यदात्मना समवरुद्धसमस्तभगः ।।
अगजगदोकसाम् अखिलशक्त्यवबोधक ते
क्वचित् अजया आत्मना च चरतो अनुचरेन्निगमः ।।
10.87.14 ।। श्री. भा.
वेद स्तुती करताहेत, "हे भगवंता, आपला जयजयकार असो आपला उत्कर्ष आपण प्रगट करा. ही जी अजा आहे. अविद्येला अनादि म्हटलंय. तिला जन्मही नाही आणि नाशही नाही.
समर्थ म्हणताहेत. काहीच नाही. विश्वही नाही आणि ती मायाही नाही. पण आम्हाला तर अनुभव येतो आहे. सुख दुःख दिसताहेत. त्यामुळे असत म्हणता येणार नाही. प्रचिती आहे. त्यामुळे ही अजा जी कोणालाही दूर करता येत नाही, ती अजा नष्ट करा, अविद्या दूर करा हा आपला उत्कर्ष आहे. तिचे सगळे गुण दोषांनी आच्छादित आहेत. दोषा करताच तिच्या गुणांचा उपयोग होतो. आणि या अजेने आपल्या शक्तीलासुद्धा आवरण घातलेले आहे. सर्व स्थावरजंगमात्मक विश्वशक्तीला उद्बोध करणारे, जागृत करणारे आपण आहात. सृष्टिनिर्मितीच्या वेळेला आपण या अजेचा अंगिकार करता. इतरवेळी, प्रलयाच्यावेळी आपण स्वयं आपल्या महिम्यामध्ये स्थित असता; आत्मस्वरूपामध्ये स्थित असता. आणि हे सगळं आपलं वर्णन हा निगम म्हणजे वेद करतो आहे. वेद आपलंच वर्णन करतात हे त्यांना सांगायचंय. वेदांमध्ये पुष्कळ देवतावर्णन आहे. तरीसुद्धा आपल्याठिकाणी सर्वांचा समावेश आहे. या पृथ्वीचे एकंदर अनेक विकार उत्पन्न झालेले आहेत परंतु मृत्तिका हीच सत्य आहे. मृत्तिकेपासूनच जन्माला येतात आणि शेवटी मृत्तिकेमध्येच विलीन होतात. म्हणून हे संपूर्ण विश्व जे आहे नाना प्रकारांनी दिसणारं ते शेवटी आपल्याठिकाणीच विलीन होणार आहे. म्हणून आपल्याठिकाणीच सर्व वेदांचं तात्पर्य आहे. आपलं स्वरूपच वेदांना सांगायचं आहे. जे काही विवर्तवादाप्रमाणे दिसणारं हे भौतिकरूप आपलंच आहे. हे मोठेमोठे ज्ञानी महात्मे आपल्या पापांतून मुक्त होण्याकरता आपल्या चरित्रामृतात, कथामृत समुद्रात प्रवेश करतात आणि संतापातून मुक्त होतात. सगुण रूपाचं चिंतन करतात, स्मरण करतात, त्यानेसुद्धा
त्यांच्या तापांची निवृत्ती होते. मग आपलं हे जे नित्य आनंदरूप आहे याचं चिंतन जर ते करू लागले तर ते मुक्त होणार नाहीत का? आपलं स्वरूप आरंभाला अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय अशा प्रकारचं कोशामध्ये आहे आणि त्याच्या शेवटी अधिष्ठानरूप असं आपलं शुद्ध रूप आहे. त्याचं ज्ञान करून घेण्याकरता भिन्न भिन्न उपासना ज्ञानी लोक करताहेत. हृदयस्थानामध्ये परमात्मा आहे, उदरस्थानामध्ये परमात्मा आहे म्हणजे परमात्म्याला काही विशिष्ट स्थान आहे का? रूप आहे का? हे जे शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्थान दाखवलेलं आहे ते केवळ शाखाचंद्रन्यायाने आहे. कोशादिकामध्ये परमात्मा आहे. देहत्रयामध्ये परमात्मा आहे याचा अर्थ चंद्र हा फांदीपर्यंत आहे असं आधी दाखवलं जातं. फांदीपर्यंत दृष्टी केली की मग चंद्रमंडळापर्यंत दृष्टी जाते, याच न्यायाने त्या त्या स्थानामध्ये त्या त्या उपासना भगवत्स्वरूपाच्या करायच्या आणि मूळ ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचं. हे आपलं जे नित्य आनंदरूप आहे, अनुभवरूप आहे ते कळण्याकरता अगोदर सगुणभक्ती करायला पाहिजे, असं सनंदन सांगताहेत. शुद्ध जे निर्गुण निराकार आत्मतत्व ते समजून घेण्याला अत्यंत कठीण आहे. पण ते समजून देण्याकरताच आपण सगुण साकार झालेले आहात. आपल्या लीला कथारूपी अमृताब्धीमध्ये ज्यांनी अवगाहन केलेले आहेत असे
आपले भक्त,
न परिलषन्ति केचिदपवर्गमपीश्वर ते ।।
10.87.21 ।। श्री. भा.
त्या भक्तीप्रेमामुळे त्यांना मोक्षाची सुद्धा इच्छा राहात नाही. आपल्या चरणाची सेवा करणारे जे भक्त आहेत त्यांची संगती, त्यांची सेवा हे भक्त करतात आणि त्यामुळे अनात्म पदार्थापासून, सर्व सृष्टीपासून ते विरक्त होतात. आणि आपल्या भक्तांच्या संगतीने त्यांची भक्ती अनन्य होते आहे. तेव्हा आपली भक्ती जर उत्पन्न झाली तर आपलं ज्ञान होईल. प्रलयाच्या वेळी काहीही नाही, वेद नाही, शास्त्र नाही, गुरू नाही कोणी नाही. तेव्हा या भक्तीच्या प्रभावानेच आपल्या स्वरूपाचं ज्ञान होणं शक्य आहे. ती भक्ती उत्पन्न होण्याकरता आपलं ध्यान अखंड ज्ञान घडण्याकरता वैराग्य पाहिजे. अनात्म पदार्थांमध्ये जर मन गुंतून राहिलं तर ध्यान घडणार नाही, भक्ती येणार नाही आणि ज्ञान होणार नाही. आणि ही सगळी साधनं व्यवस्थित चालू राहण्याकरता महापुरुषांचं मार्गदर्शन पाहिजे. सद्गुरूंची प्राप्ती झाली पाहिजे. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय साधनाभ्यास व्यवस्थित होणार नाही. म्हणून ईशभक्ती दृढ होण्याकरता गुरुभक्तीचीही आवश्यकता आहे.