« Previous | Table of Contents | Next »
पान ४९१
विजितहृषीकवायुभिरदान्तमनस्तुरगं
य इह यतन्ति यन्तुमतिलोलमुपायखिदः ।
व्यसनशतान्विताः समवहाय गुरोश्चरणं
वणिज इवाजय सन्त्यकृतकर्णधरा जलधौ ।।
10.87.33 ।। श्री. भा.

आपली इंद्रियं जिंकलेली आहेत. प्राणवायूला जिंकलेलं आहे. या मनालाही बांधून टाकू. या मनोरूपी अश्वाला आम्ही बांधून ठेवू म्हणून प्रयत्न करणारे जे आहेत त्यांना पुष्कळ संकटं मध्ये येतात. सद्गुरूचा त्याग करून, मार्गदर्शकाची आम्हाला जरूर नाही असं म्हणून जे स्वतःच्या स्वतः प्रयत्न करतात त्यांच्या ताब्यामध्ये मन राहात नाही. काही व्यापारी मंडळी समुद्रातून नौकेने निघाली. नावाडी आलेला नाही. नसेना का म्हणाले आम्हीच घेऊन जाऊ आणि समुद्राच्या मोठमोठ्या लाटा जेव्हा आदळू लागल्या तेव्हा ती नौका ताब्यात राहीना. नंतर तो नावाडी पोहोचला आणि त्याने ती नौका तीरावर आणलेली आहे. तशी स्थिती यांची होते. म्हणून सद्गुरूची अत्यंत आवश्यकता आहे.

सत इदमुत्थितं सदिति चेन्ननु तर्कहतं ।
व्यभिचरति क्व च क्व च मृषा न तथोभययुक् ।।
10.87.36 ।। श्री. भा.

हे जगत सत‌्‌तत्वापासून उत्पन्न झालेलं आहे. तेव्हा ते सत्यच आहे. पण तर्काने ते जमत नाही ना. सततत्वापासून उत्पन्न झालं म्हटलं तरी दृष्टिविरोध आहे. विनाशी आहे सगळं. अबाधित नाहीये. ज्याच्यापासून पंचमहाभूतं उत्पन्न झाली त्यांना सत मानायचं, त्यांच्यापासून उत्पन्न झाली आहेत म्हणून! उत्पन्न झालेलं आहे असं म्हटलं की ते सत राहातच नाही. पुष्पदंताने महिम्नस्तोत्रामध्ये भगवंताची स्तुती करताना एक श्लोक अगदी तर्कप्रचुर घातलेला आहे.

अजायमानो लोकाः किमवयववन्तोऽपि ।

आपल्याबद्दल लोकांच्या मनात संशय का येतो माहित नाही. जग उत्पन्न झालंच नाही म्हणतात नित्य आहे अशी एक समजूत आहे. उत्पन्न झालं नाही? सावयव दिसणारं जग हे कार्य आहे.

सावयवत्वात् कार्यत्वात् ।।

कार्य म्हणजे उत्पन्न झालेलं आहे म्हणजे याचा कर्ता कोणीतरी मानलाच पाहिजे.

***
पान ४९२
किं अवयववन्तोऽपि अजायमानः?
जगतां अधिश्वितारं किं भवविधिअनादृत्य भवति?

कर्ता न मानता आपोआप कसं उत्पन्न होईल? मग आहेत की पुष्कळ योगी आहेत, श्रेष्ठ पुरुष आहेत. कोणीतरी जीवाने उत्पन्न केलं आहे.

अनीशो वा कुर्याद् भुवनजनने कः परिकरम् ।

सगळे अनीश आहेत, असमर्थ आहेत. कुणीही जीव एवढी सृष्टी उत्पन्न करू शकणार नाही. हा सगळा विचार केल्यावर

यतो मन्दास्त्वां प्रति अमरवर संशेरत इमे ।

अज्ञानी लोक आपला संशय घेताहेत. तर्काने आपली सिद्धी होऊ शकत नाही. तर असे तर्कही आणखी बरोबर नाही आहेत. प्रत्यक्ष व्यभिचार आहे, वदतो व्याघात आहे. तेव्हा कोणत्याहि प्रमाणाने आपली सिद्धी करता येत नाही. जगाला सत्य म्हणता येत नाही. ते सगळं आभासात्मक आहे. सत्यही नाही आणि असत्यही नाही. अनिर्वचनीयम् हाच विवर्तवाद आहे. तर असं जे आपलं स्वरूप आहे ते समजण्याकरता जर सर्व साधनं मिळाली, गुरुभक्ती झाली, वैराग्य उत्पन्न झालं, ध्यानाची प्राप्ती झाली, भगवद्‌प्रेम आनंद निर्माण झाला म्हणजे आपल्या स्वरूपाची प्राप्ती होते.

अस्मत्कण्ठमणिः ।।
10.87.39 ।। श्री. भा.

आपल्याच गळ्यात असलेला मणी शोधावा तशी स्थिती वासना ज्यांच्या मनात उत्पन्न झालेल्या आहेत त्यांची होते. जवळ असून त्यांना आपली प्राप्ती होत नाही.

असुतृपयोगिनां उभयतोऽपि असुखम् ।।
10.87.39 ।। श्री. भा.

वासनेमध्ये निमग्न झालेले लोक इहलोकातही सुखी होत नाहीत आणि परलोकातही सुखी होत नाहीत. वासनाक्षय झाला पाहिजे. असं पुष्कळ श्रुतींनी वर्णन केलेलं आहे. आणि क्रमाक्रमाने आत्मतत्वापर्यंत जाता येतं असा मार्ग सनंदनानी दाखवलेला आहे. याप्रमाणे नारायणांनी नारदांना सांगितलं सर्व एकंदर वेद, उपनिषदं, पुराणं याचं साररूप असं हे वेदस्तोत्र नारदांनी ऐकलेलं आहे. नारदांनाही आनंद झाला आणि त्यांनी व्यासांना हे सांगितलेलं आहे.

परीक्षित राजाने विचारलं, "महाराज ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे? सांगा आपण धनिक लोकांचं लक्ष लक्ष्मीपतीकडे जात नाही म्हणतात. काय कारण आहे?"

***
पान ४९३

शुक्राचार्य सांगतात, "राजा, भगवान शंकरपरमात्मा ज्ञानमूर्तीच आहेत. विष्णूही असेच आहेत. मनामध्ये काही विकल्प निर्माण होतात, संदेह निर्माण होतात आणि त्यामुळे दोषदृष्टी उत्पन्न होते. तिघेही देव प्रसाद अनुग्रह करू शकतात. पूर्वीचा एक इतिहास तुला सांगतो. वृकासुर असुराने नारदांची भेट झाल्यावर विचारलं, 'तीन देवांमध्ये लवकर प्रसन्न होणारा देव कोणता?' नारदांनी सांगितलं, 'शंकर लवकर प्रसन्न होतात. आशुतोष त्यांना म्हणतात. दोष दिसले की लगेच रागावतात आणि थोडेसे गुण दिसले की प्रसन्नही लगेच होतात. बाणासुरावर संतुष्ट झाले, रावणावर संतुष्ट झाले. त्यांना ऐश्वर्य दिलं आणि आपणच संकटात पडले.' वृकासुर ते ऐकून तपश्चर्येकरता केदार क्षेत्रामध्ये गेला आणि त्याने आपल्या शरीराचे तुकडे करून हवन करायला सुरुवात केली. शेवटच्या सातव्या दिवशी आपलं मस्तक तोडून अर्पण करायला तो तयार झाला असता भगवान शंकर परमात्मा प्रसन्न झाले. त्याला हाताने वर काढलं आणि वर मागायला सांगितला. त्याला पार्वतीचं हरण करायचं होतं. त्याने मागितलं,

यस्य यस्य करं शीर्षे धास्ये स म्रियतामिति ।।
10.88.21 ।। श्री. भा.

ज्याच्या ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवीन त्याचा तत्काळ नाश व्हावा. वर द्यायचा कबूल केल्यामुळे शंकरानी तो दिलेला आहे. आणि तो असुर शंकरांच्या डोक्यावरती हात ठेवायला निघाला. शंकर पळताहेत, मागे तो असुर आहे. वैकुंठलोकामध्ये भगवान शंकर प्राप्त झाले आणि सर्व वृत्तांत महाविष्णूंना समजला. शंकरांना तिथेच थांबवलं आणि आपण ब्रह्मचाऱ्याचं रूप घेऊन बाहेर आले. तेवढ्यात तो असुर आलाच. त्याला विचारताहेत, "काय वृकासुरा, बैस जरा, दमलेला दिसतोस. कुठून आलास? कशाकरता आलास?" त्याने सर्व सांगितलं, "मला असा वर शंकरांनी दिलाय, त्यांच्याच डोक्यावर हात ठेवायला मी आलोय." भगवान म्हणाले, "असं काय! शंकराचं बोलणं तुला खरं वाटलं? काय शंकराच्या वचनावर विश्वास ठेवलास! आम्ही तर कधीच विश्वास ठेवत नाही. कुठेही राहातो, कसाही वागतो. तू वाटलं तर आपल्या डोक्यावर हात ठेवून पाहा, अनुभव घेऊन पाहा, काही तुला होणार नाही मी सांगतो. खोटं बोलतात शंकर." आणि मूर्ख तो असुर, भगवंतांच्या वचनावर विश्वास त्याने ठेवला आणि ठरवलं की हा अनुभव घ्यायचा आणि मग शंकरांबरोबर युद्ध करायचं. असा विचार करून त्याने आपल्या मस्तकावर हात ठेवला मात्र तो गतप्राण होऊन पडलेला आहे. आत आले भगवान म्हणाले, "महाराज, त्या दैत्याचा नाश झालेला आहे. असा वर कशाला देता? भगवान शंकर कैलास पर्वतावर निघून गेलेले आहेत.

***
पान ४९४

दुसरा एक प्रसंग सांगताहेत. एकदा सरस्वती नदीच्या तीरावर ऋषीमंडळी यज्ञ करत असताना त्यांनी भृगुकुमार भृगुऋषींना कोणता देव श्रेष्ठ आहे हे पाहून यायला सांगितलं. प्रथम ब्रह्मलोकामध्ये भृगु ऋषी गेले आणि तसेच उद्धटपणे उभे राहिले. बापाला नमस्कार सुद्धा केला नाही. ब्रह्मदेव रागावले. झालं, परीक्षा झाली. भृगु ऋषी तिथून निघाले आणि कैलास पर्वतावर आले. शंकर भगवान स्वागत करायला लागल्यावर भृगु ऋषी म्हणाले, "लांब राहा, शिवू नकोस, स्मशानात राहातो, कसाही वागतो." हे ऐकून शंकरही रागावले. त्रिशूळ घेऊन अंगावर आले. तिथून भृगु ऋषी वैकुंठलोकात आलेले आहेत. भगवान महाविष्णू पर्यंकावर स्वस्थ पडलेले होते. एकदम जाऊन भृगु ऋषींनी त्यांच्या छातीवर लाथ मारली. उठले भगवान, खाली उतरले. भृगु ऋषींच्या चरणावर मस्तक ठेवलेलं आहे. "या महाराज, मला कळलं नाही आपण आलात ते. माझा अपराध झाला. ऋषी महाराज आपले चरण किती कोमल आहेत. अनेक लढाया करून आणि शस्त्रप्रहार झाल्यामुळे आमची छाती फार बळकट झालेली आहे. तुमच्या पायाला काही लागलं नाही ना? वेदना झाल्या नाहीत ना?'' असं विचारून भगवंत भृगु ऋषींचे पाय चेपत बसले. हे वाक्य भगवंताचं ऐकलं भृगुऋषींनी आणि त्यांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहायला लागल्या. त्यांनी आपला अनुभव सांगितला. भगवान श्रीविष्णू हे सर्वश्रेष्ठ आहेत. सत्वगुण संपन्न आहेत. ज्ञान आहे, वैराग्य आहे, ऐश्वर्य आहे. त्यावेळी सर्व ऋषींनी भगवान महाविष्णूंची स्तुती, प्रार्थना केलेली आहे.

एके दिवशी द्वारकेमध्ये एका ब्राह्मणाला मुलगा झाला आणि लगेच मरण पावला. ते मुलाचं प्रेत घेऊन तो ब्राह्मण राजसभेमध्ये आला आणि म्हणतोय,

ब्रह्मद्विषः शठधियो लुब्धस्य विषयात्मनः ।
क्षत्रबन्धोः कर्मदोषात् पञ्चत्वं मे गतोऽर्भकः ।।
10.89.24 ।। श्री. भा.

अत्यंत लोभी, विषयासक्त जो क्षत्रिय आहे याच्या दोषामुळे, पापामुळे माझ्या मुलाला मृत्यू आला. ते प्रेत त्याने तिथे टाकलं आणि घरी निघून गेला. दुसरा मुलगाही मेला, तोही प्रेत आणून टाकलं. तिसरंही प्रेत आणून टाकलं. एकदा अर्जुन तिथे होता. त्या ब्राह्मणाचं भाषण श्रवण करून अर्जुनाने त्या ब्राह्मणाला विचारलं, "इथे कुणी धनुर्धारी नाही का? हे नुसते नामधारी क्षत्रिय दिसताहेत. तुमची मुलं मरताहेत, तुम्ही इथं आणून टाकता आहात आणि तुमच्याकडे कुणाचंही लक्ष नाही. मी तुमच्या मुलाचं रक्षण करतो. काही काळजी करू नका. आणि जर माझी प्रतिज्ञा

***
पान ४९५

पूर्ण झाली नाही तर मी अग्नीमध्ये प्रवेश करीन.'' ब्राह्मण म्हणाला, "इथे बलराम आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत, प्रद्युम्न आहे, अनिरुद्ध आहे रक्षण करणारा? तुमच्या भाषणावर काही आमचा विश्वास बसत नाही.'' अर्जुन म्हणाला, "मला तुम्ही ओळखलं नाही? मी राम नाही, कृष्ण नाही, प्रद्युम्न नाही. माझ्या पराक्रमाचा तुम्ही अवमान करू नका. मी अर्जुन आहे. शंकरांनासुद्धा युद्धात मी पराजित केलेलं आहे.'' ब्राह्मण म्हणाला, "बरं बाबा, कर तू रक्षण.'' भार्येचा प्रसुतिकाल आला असताना त्याने येऊन अर्जुनाला सांगितलं, "अर्जुना ही वेळ आहे, कर आता रक्षण.'' मोठा धनुर्धारी अर्जुन, सर्व शस्त्र, अस्त्र याचं ज्ञान आहे. आचमन करून, दिव्य अस्त्र सिद्ध करून तो त्या ब्राह्मणाच्या घरी आला आणि त्याने घराभोवती बाणाचा एक पिंजराच तयार केला. आत वारासुद्धा जाणार नाही. पण गंमत अशी झाली की तो मुलगा जन्माला आला आणि त्याचं शरीरही नाहीसं झालं. आत्तापर्यंत प्राण जात होता, शरीर तरी राहात होतं. इतका बंदोबस्त करून सुद्धा शरीरदेखील नाहीसं झालं आहे. ब्राह्मणाने येऊन त्याची निंदा केली, "काय हा मूर्ख अर्जुन! फार बढाई मारली. मी शंकरांना संतुष्ट केलं, मी राम नाही, कृष्ण नाही आणि मुलाचं शरीरही नाहीसं झालं?'' अर्जुन आपल्या मंत्रबळाने यमाच्या नगरात जाऊन आला. मुलगा तिथे नाहीये. इंद्राच्या, वरुणाच्या, अग्नीच्या सर्व लोकपालांच्या नगरात जाऊन आला, मुलगा काही मिळालेला नाही. ब्राह्मणाचा मुलगा काही मिळालेला नाही, आपली प्रतिज्ञा काही पूर्ण झाली नाही म्हणून अग्निप्रवेश करण्याकरता अर्जुन निघालेला असताना गोपालकृष्ण तिथे आले. त्याच्या खांद्यावर हात ठेवला, म्हणाले, "काय अर्जुना काय चालवलंय?'' तो रागावाला म्हणाला, "तुम्हाला काही माहितीच नाही असं विचारताय?'' कृष्ण म्हणाले, "माहिती नसायला काय झालंय. तू काय बोललास ते मला कळलंय. मी कृष्ण नाही, मी राम नाही, मी तुझ्या मुलाचं रक्षण करतो. मग कर रक्षण म्हणून आम्ही गप्प बसलो. तुला मुलं पाहिजेत ना? मला का सांगितलं नाही? सगळी मुलं तुला दाखवतो, एकच कशाला.'' रथामध्ये बसून कृष्णा्जुन निघालेले आहेत. पश्चिम दिशेला गेले. सप्तद्वीप, सप्तसमुद्र, ओलांडून शेवटी लोकालोक पर्वतापर्यंत आलेले आहेत. पुढे अंधार आहे. घोडे अडखळायला लागले. सहस्रसूर्याचं तेज असलेलं आपलं सुदर्शनचक्र भगवंतानी पुढं पाठवलं, आणि नंतर पाण्यामध्ये त्यांनी प्रवेश केला. एक मोठा सहस्रफण्यांचा नाग आहे. आणि त्याच्यावरती भगवान श्रीहरी पडलेले आहेत. दोघांनीही साष्टांग नमस्कार श्रीहरींना केलेला आहे. अर्जुनला तर भीतीच वाटली, कुठं आलो आपण? श्रीहरी सांगताहेत, "बाबांनो, तुम्हाला पाहावं अशी इच्छा झाली म्हणून ब्राह्मणाचे पुत्र इथं आणलेले आहेत. तुम्ही अवतार घेतलेला आहे.

***
पान ४९६

भूभार हलका करण्याकरता. लवकर इकडे परत या. सर्व ब्राह्मणाची सर्व मुलं बरोबर घेऊन कृष्णा्जुन द्वारकेला परत आले आहेत. त्यावेळी अर्जुनाची खात्री झाली.

यत्किञ्चित् पौरुषं लोके मेने कृष्णानुकम्पितम् ।।
10.89.63 ।। श्री. भा.

जगामध्ये जेवढं पौरुष आहे तेवढं कृष्णांचं पौरुष आहे. अशा रितीने भगवंताच्या अनेक लीला झालेल्या आहेत. सोळा हजार आठ राण्या आहेत, त्यांचे संसार आहेत. द्वारकेमध्ये किती यादव मंडळी राहात होती. एकशे एक पुरं त्यांची होती. सर्व यादवांना शास्त्राप्रमाणे मार्गदर्शन चाललेलं आहे. स्वतः भगवान आचरण करून दाखवताहेत. याप्रमाणे भगवंतानी भूतलावर अवतार धारण करून, धर्ममार्ग, वैदिक मार्ग सगळ्यांना शिकवलेला आहे. अनेक दुष्टांचा संहार केलेला आहे, अनेक लीला केलेल्या आहेत. सर्वांच्या दुरितांचा क्षय होण्याकरता या कथा नित्य श्रवण कराव्यात. कथाश्रवणाने, संकीर्तनाने परमेश्वराची भक्ती अंतःकरणामध्ये उत्पन्न होते. असं हे संपूर्ण कृष्णचरित्र शुक्राचार्य महाराजांनी परीक्षित राजाला सांगितलेलं आहे.

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा । बुद्ध्याऽऽत्मना वा अनुसृतस्वभावात् ।।
करोति यद्यत् सकलं परस्मै । नारायणायेति समर्पयेत् तत् ।।
11.2.36 ।। भा.
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव ।।
प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णो भगवन् नमस्ते ।।
।। गोपालकृष्ण भगवान् की जय ।।
।। श्रीमद् भागवत सहावा दिवस समाप्त ।।

***
पान ४९७

।। श्रीमद् भागवत सातवा दिवस ।।

ॐ नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने ।
यस्यावस्त्यायते नामविघ्नसागरशोषणे ।।
यस्यस्मरणमात्रेण जन्मसंसारबंधनात् ।
विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे ।।
विशुद्धज्ञानदेहाय त्रिवेदीदिव्यचक्षुषे ।
श्रेयःप्राप्तिनिमित्ताय नमः सोमार्र्धधारिणे ।।
यो देवः सवितास्माकं धियोधर्मादिगोचरः ।
प्रेरयेत्तस्य तद्भर्गस्तवरेण्यम् उपास्महे ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोऽस्तुते ।।
नमो आदिरूपा ॐकार स्वरूपा । विश्वाचिया रूपा पाण्डुरंगा ।।
तुझिया सत्तेने तुझे गुण गाऊ । तेणे सुखी राहू सर्व काळ ।।

***
पान ४९८

तूची श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन । सर्व होणे जाणे तुझे हाती ।।
तुका म्हणे जेथे नाही मी-तू-पण । स्तवावे ते कवणे कवणालगी ।।
यत् कीर्तनं यत्स्मरणं यदीक्षणं यद् वन्दनं यद् श्रवणं यदर्हणम् ।
लोकस्य सद्यो विधुनोति कल्मषं तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः ।।
विवेकिनो यच्चरणोपसादनात् संगं व्युदस्योभयतोऽन्तरात्मनः ।।
विन्दन्ति हि ब्रह्मगतिं गतक्लमाः । तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः ।।
तपस्विनो दानपरा यशस्विनो । मनस्विनो मन्त्रविदस्सुमङ्गलाः ।।
क्षेमं न विन्दन्ति विना यदर्पणं । तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः ।।
माला पात्रे च डमरू शूले शंख सुदर्शने ।
दधानं भक्तवरदं दत्तात्रेयं नमाम्यहम् ।।
योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां । संजीवयत्यखिलशक्तिधरः स्वधाम्ना ।
अन्यांश्चहस्तचरणश्रवणत्वगादीन् । प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् ।।
मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरीम् ।
यत् कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् ।।
आपदामपहर्तारम् दातारम् सर्वसंपदाम् ।
लोकाभिरामम् श्रीरामम् भूयो भूयो नमाम्यहम् ।।
यत्र यत्र रघुनाथकीर्तनं । तत्र तत्र कृत मस्तकांजलिम् ।
बाष्पवारिपरिपूर्णलोचनं । मारुतिं नमत राक्षसान्तकम् ।।

पुस्तकजपवटहस्ते वरदाभयचिन्ह चारुबाहुल्ते ।
कर्पूरामलदेहे वागीश्वरि चोदयशु मम वाचम् ।।
श्रीगणेशाय नमः
श्रीगुरुचरणारविन्दाभ्याम् नमः ।

बलराम, यादव यांना बरोबर घेऊन गोपालकृष्णांनी भूमीचा भार हलका केला. कलीचं आगमनही आता लवकरच होणार होतं. पांडवांना कौरवांच्या कपटपणामुळे अत्यंत राग आलेला होता. त्यांना निमित्त करून भारतीय युद्ध भगवंताने घडवून आणलं आणि त्यानिमित्तानेही भूभार

***
पान ४९९

बराच हलका केला आहे. इतकं करूनही त्यांचं समाधान झालं नाही. मग यादवांकडे त्यांची दृष्टी गेली. माझे असल्यामुळे या यादवांचा कुणीही पराजय करू शकणार नाही म्हणाले. तेव्हा यांच्यामध्येच कलह निर्माण करावा आणि यांचा नाश झाल्यावर आपण स्वस्थानाला परत जावं असं भगवंताने ठरवलं. ईश्वराचा संकल्प झालेला आहे. विप्रशाप यादवांना झाला आणि त्या शापाचं निमित्त करून आपल्या कुळाचा उपसंहार भगवंताने केलेला आहे. अनेक लोकोत्तर लीला भगवंताने केल्या. सर्व ठिकाणी कीर्ती पसरलेली आहे. त्या लीलाश्रवणातून सर्वही भक्त अज्ञान अंधःकारातून उद्धरून जातील हा उद्देश आहे.

परीक्षित राजा विचारतोय, "महाराज, ब्राह्मणांबद्दल अत्यंत आदर बाळगणारे यादव त्यांना विप्रशाप कसा झाला आणि त्यांच्यामध्ये भेद कसा झाला ? त्यांची संघटना प्रसिद्ध होती. शुक्राचार्य सांगतात, "राजन,

बिभ्रद् वपुः सकलसुन्दरसन्निवेशं
कर्माचरन् भुवि सुमंगलमाप्तकामः ।
आस्थाय धाम रममाण उदारकीर्तिः
संहर्तुमैच्छत कुलं स्थितकृत्यशेषः ।।
11.1.10 ।। श्री. भा.

सौंदर्यसंपन्न स्वरूप भगवंताचं आहे. नामापेक्षा रूपाच्या ठिकाणी आसक्ती होण्याचा याठिकाणी संभव आहे. नाम श्रेष्ठ का रूप श्रेष्ठ असा एक विषय महात्म्यांनी मांडलेला आहे. रूप हे नंतर समजणारं आहे, साक्षात्कार कृपा झाल्यानंतर. प्रथम नामाचीच आवश्यकता आहे. असं अत्यंत सुंदर रूप धारण करून, सर्व लोकांना मार्गदर्शक असं कर्म भगवंताने केलेलं आहे. आपल्या कुलाचा उपसंहार करण्याचा भगवंताचा संकल्प झाला. द्वारकेमध्ये यज्ञयागादि कर्मे नेहमी व्हायची. त्यानिमित्ताने ऋषीमंडळी यायची. एकदा यदुराजाच्या राजवाड्यात पुण्यकर्म होतं म्हणून सगळे ऋषी आले होते. ते कर्म झाल्यानंतर मोठेमोठे ब्रह्मर्षि विश्वामित्र, अंगिरा, नारद, असित, दुर्वास, अत्रि, भृगु आपापल्या आश्रमाला निघाले असताना एका उपवनामध्ये झाडाखाली विश्रांतीकरता थांबले होते. यादवांची तरुण मुलं, त्या दिवशी त्यांना काय दुर्बुद्धी झाली कुणास ठाऊक, सांब जो आहे जांबवतीचा मुलगा याला त्यांनी लुगडं नेसवलं, स्त्रीवेष दिला. ती गर्भिणी आहे असं दाखवलं. त्याला घेऊन ऋषींच्या समोर गेले, नमस्कार केला आणि प्रार्थना करताहेत, "ऋषीमहाराज ही गर्भिणी स्त्री आहे. प्रसुतिकाल आलेला आहे. मुलगा व्हावा अशी तिची इच्छा आहे तेव्हा मुलगा

***
पान ५००

होईल का नाही ते कृपाकरून सांगा." ऋषींना राग आलेला आहे. परीक्षा पाहताहेत ऋषीची ! रागाने त्यांनी लगेच सांगितलं म्हणजे शापच दिला.

जनयिष्यति वो मन्दाः मुसलं कुलनाशनम् ।।
11.1.16 ।। श्री. भा.

या स्त्रीपासून तुमच्या कुळाचा नाश करणारं एक मुसळ उत्पन्न होणार आहे. घाबरली ती मुलं. सांबाचा स्त्रीवेष काढून पाहिलं तर लोखंडाचं एक मुसळ त्याठिकाणी उत्पन्न झालेलं आहे. काय करायचं आता. राजवाड्यामध्ये आले, सर्व वृत्तांत उग्रसेन राजाला सांगितला आणि ते मुसळही त्याला दिलं. श्रीकृष्णांना काही सांगितलं नाही. त्यांनी आधीच ताकीद दिली होती की ब्राह्मणांचा अनादर कधीही करू नका. त्याच्या विरुद्ध झालं हे. ब्राह्मणांची अवकृपा आणि भगवंताचीही अवकृपा. यादवांची उन्मत्त वृत्ति अगोदरच श्रीकृष्णांना समजली होती म्हणून त्यांचा नाश करण्याचा संकल्प झाला. अमोघ विप्रशाप झाला आणि ते मुसळही पाहिलं सर्वांनी. सर्वांना अत्यंत भीती उत्पन्न झाली. उग्रसेन राजाने त्या मुसळाचं बारीक पीठ केलं आणि ते समुद्रामध्ये टाकून दिलेलं आहे. एक लोखंडाचा तुकडा राहिला. एका माशाच्या पोटात तो तुकडा गेला. तो मासा कोळ्याने पकडला आणि त्याच्या पोटातल्या लोखंडाच्या तुकड्यापासून एका व्याधाने बाणाचा अग्रभाग केलेला आहे. आणि ते टाकलेलं चूर्ण वहात वहात तीरावर आलेलं आहे प्रभासक्षेत्राच्या आणि तिथं लव्हाळ्याची लहान लहान बेटं तयार झाली. भगवंताना हे समजलेलं आहे. कुणी सांगितलं नाही. पण ते ईश्वर आहेत. अन्यथाकर्तुम् सामर्थ्यही त्यांच्याजवळ पण त्यांनी ठरवलं. आता हा विप्रशाप फिरवायचा नाही. अनुमोदन दिलं.

कालरूपी अन्वमोदत ।।
11.1.24 ।। श्री. भा.

शुक सांगतात, राजन,

गोविन्दभुजगुप्तायां द्वारवत्यां कुरुद्वह ।
अवात्सीन्नारदोऽभीक्ष्णं कृष्णोपासनलालसः ।।
11.2.1 ।। श्री. भा.

नारदमहर्षि मोठे भक्त होते. ज्ञानापेक्षा भक्ती प्रधान होती. ज्ञानही होतंच त्यांच्याजवळ, ब्रह्मज्ञानीच ते होते. आत्मज्ञान झालं की सर्व ज्ञान होतं म्हणतात. छांदोग्य उपनिषदामध्ये वर्णन केल्याप्रमाणे सनत्कुमारांकडे जाऊन आपण काय काय शिकलो हे सर्व त्यांनी सांगितलं पण मला काही समाधान नाही म्हणाले, मला आत्मज्ञान द्या मग सनत्कुमारांनी त्यांना उपदेश केलेला आहे, म्हणजे ज्ञान मिळालेलं आहे पण भक्त आहेत. वैकुंठपति भगवान कृष्णांच्या रूपाने भूमीवर

« Previous | Table of Contents | Next »